Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गडहिंग्लजमध्ये भरदिवसा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

अनैतिक संबधातून बाप-लेकाने भररस्त्यात युवकाचा खून केला. सुनील बाबूराव मगदूम (वय ३६, रा.चंदूर, ता. हातकणंगले) असे मृत युवकाचे नाव असून संशयित भीमराव रामू मगदूम व रोहित भीमराव मगदूम (रा.बहिरेवाडी, ता.आजरा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुनील व संशयित हे नात्याने काका व पुतण्या आहेत. सुनील याने भीमराव यांच्या पत्नीस पळवून नेऊन आपल्या राहत्या घरी ठेवले होते. यासंदर्भात गडहिंग्लज कनिष्ठ न्यायालयात सुनीलवर अपहरणाचा दावा दाखल आहे. याकामी वॉरंट बजावल्याने ते रद्द करून घेण्यासाठी तो गडहिंग्लज न्यायालयात हजर झाला होता. न्यायालयातील काम आटोपून दुपारी साडेतीनच्या सुमारास दसरा चौकात अनिल टी स्टॉलसमोर सुनील उभा होता. दरम्यान संशयित भीमराव व रोहित दोघेही हातात कुऱ्हाड व जांबिया घेऊन तेथे आले.

क्षणार्धात कुणालाही काहीच कळण्यापूर्वी रोहितने सुनीलच्या डोळ्यात चटणी फेकली व जांबियाने पोटात वार केला. तर भीमराव यांनी सुनीलवर कुऱ्हाडीने डोक्यात व शरीरावर वार केले. अचानक झालेल्या या झटापटीत सुनील गंभीर जखमी झाला. दसरा चौक हे शहरातील गजबजलेले ठिकाण असून बसस्थानकासह प्रमुख प्रशासकीय कार्यालये या परिसरात आहेत. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे निवासस्थान येथेच आहे. हल्ल्यादरम्यान सुनीलने मदतीसाठी हाक दिली. मात्र या परिसरात शेकडो लोक असताना देखील त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. दरम्यान, जेवणासाठी घरी आलेल्या पोलिस निरीक्षक पाटील यांनी हा प्रकार पहिला व ते तातडीने त्या दिशेने धावले. संशयित दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन जखमी सुनीलला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख दिनेश बारी, पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अक्रम मिट्टू सय्यद यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.

सुसंकृत शहर म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. ३० जुलै रोजी गडहिंग्लज शहरात किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी पुन्हा भरचौकात झालेल्या ह्या खुनी हल्ल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरला कैद्यांशी बोलण्याची परवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुनातील प्रमुख आरोपी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांबरोबर बोलण्यास परवानगी द्यावी, असा आदेश सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. दरम्यान पानसरे हत्येप्रकरणी बुधवारी (ता. ३१) मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार असल्याने पुढील सुनावणी १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. समीरवर आरोप निश्चिती करू नये, यासाठी सरकारी वकिलांनी हायकोर्टात अर्ज केला आहे.

समीर गायकवाड गेल्या साडेअकरा महिन्यांपासून कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. समीरला कारागृहात विशिष्ट वेळेत बाहेर फिरण्यास सोडले जाते पण इतर कैद्यांशी बोलू दिले जात नाही. त्यामुळे समीरला अमानवी वागणूक मिळत आहे, असा आरोप करत समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी कोर्टाचे लक्ष वेधले होते. समीरची कळंबा कारागृहात रवानगी केल्यापासून त्याला सकाळी सहा ते सात व दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत खुल्या वातावरणात ठेवण्यात येत होते. पण समीरने ही वेळ कमी असल्याची तक्रार कोर्टाकडे केली होती. तक्रारीनंतर समीरला सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत खुल्या वातावरणात ठेवण्याचा आदेश दिला. पण ज्यावेळी समीरला खुले ठेवण्यात येत होते त्यावेळी अन्य कैदी बराकीत असत. त्यामुळे समीरला अन्य कैद्याबरोबर बोलत येत नव्हते. याकडे अॅड. पटवर्धन यांनी लक्ष वेधले. त्यावर समीरला अन्य कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. घोटवडेकरांवर कारवाईची शक्यता

$
0
0



सातारा

वाई हत्याकांडातील क्रूरकर्मा संतोष पोळ आठ वर्षे कार्यरत असलेल्या वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विद्याधर घोटवडेकर मंगळवारी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. या वेळी पोळ कनेक्शनबाबत तब्बल सोळा दिवसांनी घोटवडेकरांची कसून चौकशी करण्यात आली.

पोळने खुनाची कबुली देत असताना अनेकदा घोटवडेकर हॉस्पिटलचा संदर्भ आला होता. पोळ हॉस्पिटलमध्ये आठ वर्षे आयसीयू प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्यामुळे पोलिसांकडून सुरूवातीपासून घोटवडेकर हॉस्पिटल तपासाचा केंद्रबिंदू ठेवण्यात आले होते. संतोष पोळकडे अधिकृत डिग्री नसताना घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये तो आयसीयू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता. घोटवडेकर यांनीही पोळ यास डॉक्टर असल्याचे संबोधले होते. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे काही पेशंट बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. पोळ याने खून केलेल्या सहा व्यक्तींचा संपर्क या ना त्या कारणाने घोटवडेकर हॉस्पिटलशी आला होता. पोळ याने क्रूर कृत्य करताना जी भुलीची इंजेक्शन वापरली, ती या हॉस्पिटलमधूनच त्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी पोळच्या वाईतील फ्लॅटवर छापा टाकून मोबाइल व इतर कागदपत्रे जप्त केली होती. या कारवाईतही हॉस्पिटलशी निगडीत काही कागदपत्रे सापडल्याने घोटवडेकर हॉस्पिटलवरही छापा टाकण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच डॉ. घोटवडेकर पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. छाप्यात पोलिसांनी हॉस्पिटलमधील कागदपत्रे, हार्डडिस्क, औषधांचा साठा जप्त केला. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे स्वतंत्रपणे जाबजबाबही घेण्यात आले. पोळच्या वागणुकीबाबतही यावेळी कर्मचाऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी केली. ज्योती मांढरे व सलमा शेख या दोघीही याच हॉस्पिटलमध्ये काम करीत होत्या. कालांतराने दोघीही बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे डॉ. घोटवडेकर यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित होते. मात्र, ते पुणे येथे अॅडमिट असल्याने चौकशी होत नव्हती. घोटवडेकर यांच्याकडे एलसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. हॉस्पिटल चालवण्याचा परवाना आहे काय? वैद्यकीय डिग्री नसताना संतोष पोळ याला आयसीयू इन्चार्ज कसा केला? पोळला रूजू करून घेण्यापूर्वी त्याची डिग्री तपासली नव्हती का? त्याच्याकडे आणखी कोणती कामे सोपवली होती? आर्थिक व्यवहार पोळ पहात होता का? रूग्णवाहिकेचा वापर कशाप्रकारे केला जात होता? त्याच्यावर नियंत्रण कोणाचे होते? या अनुषंगाने रात्री उशीरापर्यंत एलसीबीचे अधिकारी घोटवडेकर यांची चौकशी करीत होते. पोळ याचा स्वभाव, पोळबरोबरचे घनिष्ट संबंध या अनुषंगानेही चौकशी झाल्याचे समजते. डॉ. घोटवडेकरांचा चौकशीत घाम काढल्याने पोलिसांनी जसजशी अधिक विचारणा केली तसतसे घोटवडेकर गोंधळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तपासाअंती घोटवडेकरांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संतोष पोळ आणि ज्योत मांढरे या दोघांची पोलिस कोठडीची मुदत आज, गुरुवारी संपत असल्याने त्यांना पुन्हा कोठडी मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारळी धरणाला गळती

$
0
0



सातारा :

पुण्यातील टेमघर धरणाच्या गळतीनंतर आता सातारा जिल्ह्यातील तारळी धरणाला लागलेली गळती समोर आली आहे. धरण बांधल्यापासून ही गळती होत असून, त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली आहे. या धरणाचे काम सोमा इंटरप्रायजेस, पीआर कंस्ट्रक्शन आणि आणखी एका कंपनीने केले आहे. या प्रकरणी धरणाची पाहणी करुन दोषींवर कडक कारवाई करू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. धरणाचे काम १९९७-२००७ अशी दहा वर्ष सुरू होते. सुरुवातीला ५०४ कोटींचे बजेट असलेल्या या धरणाचा खर्च ८७० कोटी रुपये इतका झाला. तरीही धरणाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. जलसंपदा विभागाने गळती रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी माती टाकून गळती लपवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीच्या बाजूने पाण्याचा ओढाच तयार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही बळकटीचा विद्यापीठात जागर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

युवकांनी भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनी विद्यापीठाच्या नवमतदार नोंदणी कक्षाद्वारे तातडीने त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाद्वारे मंगळवारी विद्यापीठ परिसरातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

राज्य निवडणूक आयोगाकडून नवमतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आदेश विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिले आहेत. त्याअंतर्गत विद्यापीठात जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करण्याचे तसेच मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

नोडल अधिकारी डॉ. भगवान माने, विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी रॅलीचे स्वागत केले. याठिकाणी पुन्हा एकदा मतदार नोंदणीबाबत आवाहन करणाऱ्या घोषणा देण्यात येऊन रॅली विसर्जित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांवर फिरतोय शेवटचा हात

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूर ः गणेशोत्सवाला अवघे चार दिवस उरलेले...अजून काही मूर्तींवर फक्त पहिला रंग लागला आहे. काही मोठ्या मूर्ती साच्यातून बाहेर काढल्या आहेत. तीन दिवसांत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस सुरू आहे. एक फुटापासून एकवीस फुटापर्यंतच्या मूर्तींवर शेवटचा ब्रश फिरवण्यासाठी कुंभारांचे सारे कुटुंब राबत आहे. मूर्तीच्या सफाईदारपणावर मूर्तिकारांचे शिक्कामोर्तब झाले की मग कुटुंबातील महिलांपासून ते अगदी शाळाकॉलेजमध्ये जाणारी मुलंही 'टचअप'साठी हातभार लावत आहेत. दिवसभर रंगकाम आणि रात्री मूर्तीतील बारकावे अशा नियोजनात बापट कँपमधील कुंभारवसाहत बाप्पामय झाली आहे.

सकाळी दहाच्या ठोक्याला बापट कँप परिसरात फेरफटका मारल्यानंतर कुंभार कुटुंबीयांचा दिवस सकाळी सहालाच सुरू झाल्याचे दिसून आले. या परिसरात कुंभार समाजाची जवळपास हजाराच्या आसपास कुटुंबे आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कानाकोपऱ्यात केवळ बाप्पांचेच दर्शन होत आहे. कुठे अजून रंगाचा हात न लागलेली मूर्ती तर कुठे अगदी आत्ताच न्यावी अशी तयार झालेली मूर्ती. लहान मुलाचे कौतुक करावे तशी प्रत्येक मूर्तीला न्याहाळणाऱ्या मूर्तिकारांच्या नजरेत निर्मितीचा आनंद तर दिसत आहेच पण प्रत्येकांशी बोलल्यानंतर, मूर्तिकाम करताना कितीही त्रास झाला तरी कंटाळा येत नाही, ही भावना मात्र समान आहे.

भोगावकर कुटुंबाच्या घराच्या अंगणातील शेडमध्ये मूर्ती रांगेत मांडून ठेवल्या आहेत. कुटुंबातील कुणी ना कुणी सदस्य रात्रभर जागरण करून मूर्तीचे काम मार्गी लावण्यात दंग आहे. शेडमध्ये वीस फूट उंचीच्या तयार मूर्ती रांगेत मांडल्या आहेत. या मूर्ती उचलून ट्रॉलीत कशा ठेवणार या प्रश्नाचं उत्तर देताना ते सांगतात की मूर्तीखाली असलेल्या पाटाला दोरी लावण्यासाठी खास जागा केली आहे. एका बाजूने उचललेल्या मूर्तीच्या खाली छोटा हत्ती टेम्पो घालायचा आणि त्यावरून ती मूर्ती ट्रॉलीवर ठेवायची. हे तंत्र युवराज भोगावकर यांनीच शोधून काढलंय. असे अनेक प्रयोग ये‌थील प्रत्येक मूर्तिकाराच्या कल्पनेतून आकाराला आले आहेत.

याच परिसरात पाटील यांचे कुटुंब आहे. अख्खं कुटुंब सध्या फक्त मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात तल्लीन झाले आहे. गौरेश पाटील या तरूणाकडे मूर्ती तयार झाल्यानंतर ती कुठे ठेवायची याचे नियोजन आहे तर घरातील महिलांनी मूर्तीवरील आभूषणे रंगवण्याची जबाबदारी घेतली आहे. सकाळी स्वयंपाक आणि घरातील कामं आवरायची आणि मूर्तीच्या रंगकामासाठी बसायचं हा शिरस्ता गेल्या दोन महिन्यांपासून न चुकता सुरू असल्याचे इंदुबाई वडणगेकर कुंभार सांगतात.

मूर्ती 'ढकटी'ची सुरक्षा

जवळपास चार महिन्यांपासून मूर्तिकामाला सुरूवात झाली आहे. मूर्ती आकाराला येते ती ऐन पावसाळ्यात. बापटकँप परिसरात नदीकाठचा भाग येत असल्यामुळे हवेत आर्द्रता आहे. त्याचा परिणाम तयार झालेल्या मूर्तीवर होतो. ओलसर मूर्तीवर रंग बसत नाही. त्यामुळे मूर्ती ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या अनुषंगाने संभाजी माजगावगर यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की मूर्तीला ढकटी दिले जाते. लाकडाचा भुसा आणि कोळसा यापासून धुमसता विस्तव पत्र्याच्या डब्यात तयार करून तो मूर्तीच्या खालील भागात ठेवला जातो. यामुळे मूर्तीतील ओलावा नाहीसा होता. हे तंत्र बापट कँपमधील प्रत्येक घरात वापरले जात असल्यामुळे अंगणात पिंजर, माती, रंग यासोबत लाकडाचा भुसा का ठेवला जात असेल या प्रश्नाची उकल करते.

कच्च्या मूर्तींचे आगर

शहरातील कुंभारगल्ल्या दाटीवाटीत असल्यामुळे ऐन उत्सवात मूर्ती करणे आणि त्या जपून ठेवणे हे जिकिरीचे होत होते. त्यामुळे बापटकँप वसाहतीत केवळ मूर्तिकाम करणाऱ्या कुंभारांना जागा देण्यात आली. घरगुतीपेक्षाही सार्वजनिक मूर्ती बनवणाऱ्या बहुतांशी मूर्ती या ठिकाणीच तयार होतात. त्यासोबत कोल्हापूरबाहेर मूर्ती विक्री करणारे काही व्यापारी कच्च्या मूर्ती बापटकँपमधून घेऊन जातात आणि नंतर रंगवून विक्री केल्या जातात. या प्रक्रियेनुसार गणेशोत्सवात हजारांच्या संख्येत केवळ कच्च्या मूर्ती बनवणारी कुटुंबेही बापट कँपमध्ये आहेत.

===

घरातील प्रत्येकाचा हात मूर्तीकामाला लागेल याप्रमाणे नियोजन केले आहे. काहीजण घरगुती मूर्ती आदल्या दिवशी घेऊन जात असल्यामुळे रविवारी दुपारपर्यंत मूर्ती ऑर्डरनुसार तयार ठेवल्या जात आहेत.

संजय कातवरे, मूर्तिकार

सध्या मोठे काम पूर्ण झाले असून बारकावे सुरू आहेत. यामध्ये मूर्तीवरील दागिन्यांचे रंगकाम आणि सर्वांत शेवटी डोळे रंगवण्याचे काम केले जाणार आहेत. मूर्ती तयार होईल त्याप्रमाणे ती सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आहे. नव्या टेक्निकचे रंग वापरून काम सोपे करण्याकडेही भर आहे.

गौरेश पाटील, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच

$
0
0

कोल्हापूर शहराची हद्दवाढ फक्त हद्दवाढ कृती समितीला पाहिजे आहे, तर हद्दवाढीला १८ गावातील लोकांचा विरोध आहे हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे महापालिका आपल्या कार्यक्षेत्रातील उपनगरांना पाणीपुरवठा, गटर्स, दवाखाने, शाळा या सुविधा पुरवू शकत नाहीत. उत्पन्नही कमी असल्याने १८ गावांत सोयीसुविधा पुरवण्यात महापालिका असमर्थ ठरणार आहे. त्यातून महापालिकेची फरफट होणार आहे. याउलट १४ व्या वित्त आयोगातून ग्रामीण भागाला चांगला निधी मिळाला आहे. त्यातून रस्ते, पाणी, स्ट्रीट लाइट या सुविधा पुरवता येणे शक्य आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व दोन्ही बाजूंचा अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ गावांसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस स्वतः नागपूरसारख्या शहराचे महापौर होते. त्यांना हद्दवाढीमुळे महापालिकेवर कसा ताण पडणार हे माहीत आहे. मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांजवळील गावांचा विकास प्राधिकरणाद्वारे केला आहे. प्राधिकरणाचे फायदे लक्षात घेऊन ग्रामपंचायत, तेथील लोकप्रतिनिधी यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात येणार आहेत. प्राधिकरण केल्यामुळे महानगरपालिकेवर आर्थिक बोजा चढणार नाही. प्राधिकरणाला मिळणाऱ्या निधीतून शहर व १८ गावांतील विकास होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाने शहर व ग्रामीण जनतेचे समाधान करण्याचे प्रयत्न केले आहेत. प्राधिकरणातून जी गावे वगळली आहेत अशा गावांचाही प्राधिकरणात समावेश होऊ शकतो. त्यातून शहरालगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीसाठी आता चळवळ

$
0
0

मुंबईत एक ऑगस्टला झालेल्या बैठकीत हद्दवाढ समर्थक व विरोधकांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा निर्णय मेरिटवर घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता हद्दवाढ होणार असा शहरवासीयांना विश्वास होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यासाठी आग्रही होते. १८ गावांपैकी काही गावे वगळा, पण हद्दवाढ कराच, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले होते. पण ३० ऑगस्टच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अचानक यू टर्न घेतल्याने हद्दवाढीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी मेरिटवर निर्णय घेऊ असे घोषित केले होते. मग कोल्हापूरचे मेरिट नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१८ गावांसाठीच्या प्राधिकरणाच्या प्रस्तावाचा कोल्हापूर महापालिकेला काहीच उपयोग नाही. मग आम्ही तो मान्य का करावा? आम्हाला हद्दवाढच हवी आहे. प्राधिकरण स्थापन करून विशिष्ट मुदतीनतंर १८ गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याचा निर्णय झाला असता तर आम्हीही दोन पावले मागे गेलो असतो, पण आमची साफ निराशा झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, विरोधी भाजप, शिवसेना, ताराराणी आघाडीचाही हद्दवाढीला पाठिंबा आहे, पण हद्दवाढीला विरोध करणाऱ्या तीन आमदारांमुळे मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ न करण्याऱ्या गटाला झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाचा प्रस्ताव दिला असून, त्याबाबत तज्ज्ञ मंडळी, राजकीय नेते, महापालिका पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. आम्हाला हद्दवाढीसाठी पुन्हा चळवळ करावी लागणार आहे. शेवटी कोल्हापूरला संघर्षाशिवाय काही मिळत नाही, हा इतिहास आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावीर कॉलेजमध्ये आज कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आज, (गुरुवार) महावीर कॉलेजमध्ये युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा होणार आहे. विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे कार्यशाळा होणार आहे. शहर उपअधीक्षक भारतकुमार राणे उद्घाटक आहेत. दुपारी दोन वाजता प्रदूषण कमी करण्यास योगदान दिलेल्या विविध मंडळांचा गौरव जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

प्राचार्य डॉ. लोखंडे म्हणाले, 'पंचगंगा नदीचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याने गणेश चतुर्थीवेळी मूर्ती व निर्माल्यदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत शहरातील १४७ सार्वजनिक मंडळांनी मूर्तीदान करुन प्रदूषणमुक्ती चळवळीला बळ दिले होते. ही चळवळ अधिक सक्षम होण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. महावीर महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एनएसएस विभागाच्यावतीने होणाऱ्या कार्यशाळेत विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.'

भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. अरुण पाटील म्हणाले, कार्यशाळेंतर्गत पंचगंगा

प्रदूषण कमी करणाऱ्या सुमारे ८० मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त पी. शिवशंकर, मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. भालबा विभूते, अॅड. के.ए. कापसे, डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज शहर आणि परिसरात रस्त्यांवर पडलेले मोठ मोठे खड्डे दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकींचे वारंवार अपघात होत असून, यात महिलांसह दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांचे जीव जात असताना पालिका कारभाऱ्यांची मात्र रस्ते दुरुस्तीबाबत उदासिनता दिसून येत आहे. पालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत.

रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधाही देण्यातही महापालिका अपयशी ठरत आहे. वैद्यकीय आणि व्यापारिदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मिरज शहरातील वाहनांची मोठी वर्दळ असते. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर-विजापूर, अशा दोन राष्ट्रीय महामार्गावरील मिरज हे शहर आहे. लांब पल्ल्याची अवजड वाहनेही मोठ्या संख्येने ये-जा करतात. वाहनांची वर्दळ वाढत असताना येथील रस्ते मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरातील एसटी स्थानक- मिशन हॉस्पिटलपर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे रुंदीकरण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडले होते. या रस्त्यांवरील विजेचे खांब हटविण्यावरुन महापालिका व महावितरण प्रशासनातील विसंवाद चव्हाट्यावर आला. या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेचेही दर्शन घडले. रस्त्यांवरील खड्ड्यात अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर एसटी स्थानक-मिशन हॉस्टिपटल पर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मात्र, शहरातून कोल्हापूरकडे व कर्नाटकात बेळगावकडे जाणाऱ्या रस्त्यांची तसेच मिरज व कुपवाड हद्दीतील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची मात्र, कमालीची दुर्दशा झाली आहे.

दोन जीव गेल्यानंतरही दुरावस्था कायम

पंधरा दिवसांपूर्वी शास्त्री चौक येथे रस्त्यांवरील खड्ड्यामुळे दुचाकीवरुन पडलेली महिला माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याची घटना घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भाजपने आंदोलन केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. मात्र, महापालिकेचा कोणीही पदाधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. याच रस्त्यावर शहरी बसस्थानकाजवळ व हीरा हॉटेल जवळ दुचाकीस्वार महिला व एका सायकल स्वारास जीव गमवावा लागला आहे. शहरातील या प्रमुख मार्गासह मिरजेचा मार्केट परिसर, गणेश तलाव मार्ग, गुरुवार पेठ, नदीवेस परिसर, वखार भाग, रेल्वे स्थानक परिसर, एसटी स्थानक, महात्मा गांधी चौक, सांगली-मिरज रस्ता, मिरज-पंढरपूर रस्ता परिसर अशा सर्वच भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मिरजेचा मार्केट परिसर शहरातील मध्यवर्ती भाग आहे. येथे वाहनांची मोठी वर्दळ असते तर पादचारी व शालेय विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी असते. यातूनच एसटी बससह अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. येथील खड्ड्यांमुळे पादचारी व दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत या मार्गावरील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल. गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, पालिका उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० हजार राज्य कर्मचारी संपात सहभागी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसह प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी दोन सप्टेंबरला संप करणार आहेत. संपात सहभागी झालेले कर्मचारी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. संपात जिल्ह्यातील २० हजारावर कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपूर्ण देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना संपात सहभागी होणार आहेत. संपाला पाठिंबा देण्यासाठी राज्य कर्मचारी संघटना उतरणार आहेत.

जिल्हा परिषद, जिल्हा कृषी कार्यालय, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, आरटीओ, आयटीआय, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, शिक्षण, विक्रीकर विभागासह सरकारी कार्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. महागाई व बेरोजगारीला आळा घाला, कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, प्राप्तीकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, वेतन पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत करावी, कामगार कायद्यात कामगारविरोधी बदल करू नका, या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, निवृत्तीचे वय साठ वर्षे करावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, नोव्हेंबर २००५ नंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे भरावीत, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची संगोपन रजा मिळावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रूटी व केंद्राप्रमाणे सर्व भत्ते फरकासह द्यावेत, शैक्षणिक, प्रवास व इतर भत्ते केंद्राप्रमाणे द्यावेत, खासगीकरण, कंत्राटीकरण, आउट सोर्सिंगचे धोरण रद्द करावे, या मागण्या केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, अध्यक्ष वसंतराव डावरे उपाध्यक्ष के. एम. बागवान, संघटक संजय क्षीरसागर, महसूल राज्य संघटना उपाध्यक्ष विलासराव कुरणे, प्रकाश शेलार, डी.एस. खोत, हशमत हावेरी, अंजली देवरकर, शुभांगी फुटाणे, निखिल कांबळे, सत्यजित ढेकळे, उत्तम पाटील संप यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे संघटन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मपिसा’विरुद्ध सांगलीत कॉँग्रेस रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

भाजप सरकारने नवीन प्रस्तावित महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी कायदा (मापिसा) रद्द करावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. बुधवारच्या मोर्चात प्रथमच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली दिसली.

सांगलीतील स्टेशन चौकात नेतेमंडळी जमली. सरकारच्या धोरणाचा निषेध करीत जोरदार निदर्शने करून काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाने गेले. या मोर्चात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेशउपाध्यक्ष माजी आमदार सदाशिव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आनंदराव मोहिते, महेंद्र लाड, विक्रम सांवत आदींसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश होता. शंभर किंवा त्यापेक्षा जास्त जनसमुदाय असलेल्या कार्यक्रमासाठी पोलिस परवानगी घेणे बंधनकारक राहील, सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांवर राहील, या नव्या कायद्यामुळे लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस या सारख्या घरगुती कार्यक्रमावरही बंधने येतील. या चुकीच्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलने सुरू झाली आहेत. सरकारने विरोधकांचा गळाच बंद करून टाकण्याचे कुभांड रचले आहे. राज्य सरकार अकार्यक्षम आहे. म्हणूनच पोलिस खात्याला अमर्याद अधिकार देऊन त्यांच्या लाठ्या काठ्या तमाम जनतेच्या डोक्यावर मारू पाहत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर आली आहे. भाजप सरकारला राज्य कसे चालवायचे हेच माहित नाही, आपल्या चुकांवर, अयोग्य निर्णयावर कोणीही आपला करता कामा नये यासाठी आणलेला हा कायदा म्हणजे महाराष्ट्रातील जनतेची गळचेपी आहे. बेधुंद कारभाराची तरतूद करण्याची ही संकल्पना आहे. हा कायदा लागू केल्यास धार्मिक, वैयक्तिक, सामाजिक इतकेच काय सरकारी, निमसरकारी, खासगी व्यवस्थापन, हॉटेल, एसटी, विमानतळ, धरणे तलाव अशा ठिकाणी तपासण्याची सक्ती होईल. शंभरपेक्षा जास्त लोक एकत्र आले तर पोलिसांची परवानगी लागेल, अशी सक्ती आहे. हा कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा मुलांचा खून करुन पित्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोटच्या दोन मुलांचा खून करून वडिलाने आत्महत्या केल्याची घटना वसगडे (ता. करवीर) येथे​ घडली. आवबा आण्‍णाप्पा धनगर (वय ३२, रा. सुतारमाळ) असे या तरुणाचे नाव आहे. स्वतः गळफास घेण्याआधी त्याने मुलगा मायाप्पा (१०) आणि श्रावणी (८) यांचाही गळा आवळून खून केला. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने वसगडे गावावर शोककळा पसरली होती.

याबाबत गांधीनगर पोलिसांत नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आवबाचे कुटंबीय सुतारमळा बेघर वसाहत येथे राहते. दुपारी आवबाने तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी आवबाला खाली उतरवले. खोलीत आवबाची दोन मुले मायाप्पा व श्रावणी झोपली असल्याचा नातेवाईकांचा समज होता. पण, दोघांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही गळा आवळल्याचे लक्षात आले. आवबाच्या शरीराची हालचाल होत असल्याने तिघांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने नातेवाईकांना धक्का बसला.

आवबा व त्याची पत्नी शेतमजूर म्हणून काम करत होती. पत्नीला मणक्याला दुखापत झाल्याने तिच्यावर महिनाभर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिला माहेरी, पट्टणकोडोलीला पाठवले होते. पत्नीच्या आजाराने आवबा निराश होता. बुधवारी त्याचे वडील आण्णाप्पा व आई भागुबाई शेतात गेले होते. घरी दोन मुले आणि आवबा होता. मुलांचा गळा आवळून त्याने आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगणेश, छोटा भीम आणि मोटू पतलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशाची नानाविध रुपे, यामुळे दरवर्षी उत्सवात नव्या रुपातील गणेश मूर्ती या आकर्षण ठरत असतात. सिनेमा आणि विविध वा​हिन्यातील देवदेवतांच्या मालिकेचाही उत्सवावर प्रतिबिंब उमटलेले दिसते. यंदा बाल गणेश, छोटा भीम, शंकर, जोतिबा ते जय मल्हार रुपातील गणेश मूर्तींना पसंती मिळत आहे. काही कारागिरींनी टीव्हीवरील कार्टून मालिकेतील पात्रांना आकार दिला आहे. मोटू पतलू, छोटो भीम ही पात्रे यंदा गणेशाचे रुप घेऊन येणार आहेत. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई रुपातील गणेश मूर्तींना पूर्वीसारखीच मागणी आहे. कारागिरांनी बच्चे कंपनीची आवड लक्षात घेऊन मूर्ती घडविल्या आहेत.

बापट कॅम्प, शाहूपुरीतील कुंभार गल्ली आणि गंगावेश परिसरात सध्या कारागीरांची लगबग सुरू आहे. कोल्हापूरच्या गणेश उत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या रुपातील गणेशमूर्ती तयार करण्याची क्रेझ आहे. कारागीर प्रदीप कुंभार म्हणाले, 'घरगुती गणेशमूर्ती एक ते चार फुटापर्यंतच्या असतात. मूर्ती आकाराने लहान असली तरी त्यामध्ये वैविध्य असते. अनेक आकारात मूर्ती तयार केल्या जातात. बच्चे कंपनीत मोटू पतलू या कार्टूनची मोठी क्रेझ आहे. बाल गणेश, छोटा भीम तर लहान मुलांच्या आवडीचे विषय आहेत. कार्टून मालिकेतील या पात्रांना आकार दिला आहे.

वेगळ्या रुपातील मूर्ती या हातांनी घडविल्या जातात. त्याला वेळ लागतो. पारंपरिक स्वरुपाच्या मूर्तीसाठी रबर मोल्डचा वापर होतो. यामुळे कमी वेळेत जादा मूर्ती तयार होतात. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, पाटील गणपती या पारपंरिक मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पारंपरिक मूर्तींना मागणी मोठी आहे. ग्राहक मूर्तीत वेगळेपण शोधत असतात. परिणामी मूर्तीकाराला वेगवेगळ्या देवदेवतांची रुपे गणेश मूर्तीत साकारावी लागतात. जय मल्हार मालिकेची क्रेझ टिकून असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. खंडोबा, शंकर,बालगणेश या मूर्तींना मागणी आहे.

घरगुती मूर्ती तयार करताना कलाकुसर आणि आकर्षक रंगसंगती यावर विशेष काम करावे लागते, असे मूर्तीकार गणेश पुरेकर यांनी सांगितले. मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी त्यावर आभूषणे घडवावी लागतात. दा​गिने म्हणून डायमंड, खड्याचा वापर केला जातो. शाही लूक लाभावा म्हणून लेसचा अवलंब केला जातो. त्यामुळे कपडे परिधान केल्याचे चित्र नजरेस पडते. मूर्तीवर टिकल्या, चकमकचा वापर केल्याने मूर्तीच्या आकर्षणात भर पडते. सिंहासनारूढ गणेश मूर्तीसाठी रंगावर भर दिल्याने त्या चटकन नजरेत भरतात असे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.

पोटल्या गणपतीला स्थान

कोल्हापुरात तालीम संस्थांकडून गणेश उत्सव थाटामाटात साजरा होता. या संस्थाकडून दरवर्षी विशिष्ट रूपातील गणेश मूर्तीची स्थापना होत्या. यामध्ये बैठ्या स्वरुपातील पोटल्या गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश मूर्तीचे स्थान कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीनगर बसपोर्ट लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एअरपोर्टच्या धर्तीवर संभाजीनगर बसस्थानकाचा बसपोर्ट करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल. कोल्हापूर विभागात विविध मार्गांवर प्रवाशांना विनावाहक, विना थांबा सेवा, सीबीएसच्या नूतनीकरणाचा नक्की विचार केला जाईल. बसस्थानक हायटेक करण्यासाठी संबधित सर्व बाबींची पाहणी पूर्ण झाली आहे. येत्या काही महिन्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, ही माहिती एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

एसटीचे उपाध्यक्ष देओल यांचा मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक, विभागीय कार्यशाळेची पाहणी केली. उत्पन्नवाढीसाठी आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन सूचना केल्या. देओल यांनी संभाजीनगर बसस्थानकाच्या जागेची पाहणी केली. पुणे प्रादेशिक विभागाचे व्यवस्थापक सुहास जाधव यांनी संभाजीनगर बस स्थानकाची माहिती दिली. राज्यातील १३ बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगरचा समावेश आहे. बसस्थानकाचा १२ एकरचा परिसर आहे. संभाजीनगर बसस्थानकाच्या नियोजित जागेत यात्री निवास, सभागृह कार्यालय, स्वच्छतागृह, खाद्यपदार्थ, काही बसस्थानकावर चित्रपटगृह, आरामदायी बैठक व्यवस्था, पार्किगची सुविधा, दर्जेदार रस्ते, प्रवाशांसाठी टीव्ही आदी अत्याधुनिक सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

देओल यांनी मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी केली. त्यामध्ये प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्या वेळी विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी सीबीएसच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाची गरज असल्याचे सांगितले. विना थांबा सेवा इचलकरंजी, सांगली, पुणे, गडहिंग्लज येथे विना वाहक, विना थांबा सेवा सुरू असल्याचे सांगितले. त्या वेळी देओल यांनी प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी काही मार्गांवर विना थांबा, विना वाहक सेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या. आगार व्यवस्थापकांची बैठक घेऊन उत्पन्न वाढीसाठी सूचना केल्या. त्यानंतर एसटी बँकेच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहिले.

०००

सारे काही चकाचक

एसटीचे उपाध्यक्ष येण्याच्या पार्श्वभूमीवर सीबीएसचा आवार चकाचक करण्यात आला. एसटीच्या खासगी सुरक्षा यंत्रणेचे सुरक्षा रक्षक विभागीय कार्यालय, सीबीएसच्या आवारात तैनात करण्यात आले. कर्नाटक महामंडळाची एसटी बसस्थानकाच्या आवारात काही सेकंदही थांबविली जात नव्हती. त्यासाठी त्यासाठी खास तीन वाहतूक निरीक्षक तैनात करण्यात आले. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे एक दिवसासाठी का असेना प्रवाशांना सोयी सुविधा मिळाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात ‘जेम्स अँड ज्वेलरी’चे केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरी साज, ठुशी, टिका अशा खास दा​​गिन्यांच्या कलाकुसरीत अग्रेसर असलेल्या कोल्हापूरला मुंबईनंतर प्रथमच जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राचा दर्जा मिळाला आहे. या प्रक्रियेअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतनमधील धातू तंत्र प्रबोधिनी संलग्नित जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि शासकीय तंत्रनिकेतन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल आणि शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याअंतर्गत लघुकालीन प्र​शिक्षण वर्गाचा शुभारंभ शनिवारी (ता. ३) सकाळी साडेदहा वाजता शाहू स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमास ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधरन, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश मेहता आणि जेम्स आणि ज्वेलरी फेडरेशने झोनल चेअरमन नितीन खंडेलवाल, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि धनंजय महाडिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्य पट्टलवार म्हणाले, 'शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून ज्वेलरी डिझाइनमधील प्रशिक्षण केंद्राची धुरा सांभाळली जाणार आहे. दा​गिने घडवण्याच्या पारंपरिक कौशल्याला शास्त्रशुद्ध शिक्षणाची जोड मिळाल्यास भविष्यात कोल्हापूर हे उत्पादनाचे केंद्र बनेल. यादृष्टिने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनचे संचालक आणि जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, 'सोन्याचांदीचे दा​गिने आणि कलाकुसरीची आभूषणे बनवण्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर असले तरी तंत्रज्ञानाच्या अभावामुळे येथील कौशल्याची पिछेहाट होत आहे. जिल्ह्यात या व्यवसायात जवळपास २५ ते ३० हजार कारागीर आहेत. मात्र शास्त्रशुद्ध शिक्षणाची जोड नसल्याने दागिने घडवण्याच्या व्यवसायाला मर्यादा येत आहेत. ज्वेलरी डिझाइन या क्षेत्रातील शिक्षण देणाऱ्या संस्थेचे केंद्र कोल्हापुरात कार्यान्वित झाले तर येथील नव्या पिढीतील सुवर्णकार, कारा​गीरांना व्यावसायिक संधी मिळतील. याविचारातून प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेचा विचार पुढे आला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने सुविधांसाठी निधी देण्याची तत्वत: मान्यता दिली आहे. पत्रकार परिषदेस धातूतंत्र प्रबोधिनी नियामक समितीचे अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन, प्रा. शशांक मांडरे आदी उपस्थित होते.

एक आश्वासक पाऊल

महाराष्ट्र टाइम्सच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त मेक इन कोल्हापूर या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या कॉन्क्लेवमध्ये कोल्हापुरातील सराफ व्यवसाय आणि त्यातून विकासाकडे वाटचाल हा विषय चर्चेत आला होता. या बैठकीत सराफ संघाच्यावतीने जेम्स अँड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू झाल्यास दागिने निर्मितीमध्ये कोल्हापूर ब्रँड अधिक ठळक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आठवड्याभरातच झालेल्या या करारामुळे महाराष्ट्र टाइम्सने मेक इन कोल्हापूर या संकल्पनाधर्तीवर घेतलेल्या पुढाकारामुळे एक आश्वासक पाऊल पडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडक बंदोबस्तात होणार गोकुळची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या बुधवारी (७ सप्टेंबर) होणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी ​विरोधकांकडून केल्या जात असलेल्या तयारीमुळे सत्ताधाऱ्यांनी खबरदारी घेण्याची तयारी चालवली आहे. सभेमध्ये सत्ताधारी व विरोधक आमने सामने भिडण्याची शक्यता असल्याने त्यातून काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच सभास्थळाभोवतीही भक्कम अडथळे उभे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडूनही प्रतिनिधींना सभेमध्ये पोलिस बंदोबस्तात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

गोकुळच्या सर्वसाधारण सभेसाठी विरोधकांकडून जय्यत तयारी केली जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारातील त्रुटी शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार संपर्क सभांमधून काही ठिकाणी चुणूक मिळाली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक आमदार सतेज पाटील स्वतः व प्रतिनिधी या त्रुटींवर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक आमने सामने भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेला केवळ ठराव असलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने जादा पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच सभास्थळी इतर ठिकाणाहून घुसखोरी होऊ नये, यासाठी भक्कम अडथळे उभे केले आहेत.

एकीकडे सत्ताधाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली असली तरी यातून विरोधकांना प्रवेशास आडकाठी करण्याची शक्यता विरोधी गटाला वाटते. त्यामुळे प्रतिनिधी असलेल्यांना सभेमध्ये प्रवेश सुकर करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी विरोधी आमदार पाटील गटाकडून केली आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे. दोन्हीबाजूच्या या खबरदारीमुळे सर्वसाधारण सभा निश्चितच गाजण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथेच मिळाली शिस्त, प्रेरणा अन् जिद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अचूक उत्तरे शोधण्याच्या प्रवासात प्रश्न पडले पाहिजेत ही शिकवण असो किंवा एखादी गोष्ट कशी होते या प्रश्नाने अस्वस्थ करणारी ​जिज्ञासूवृत्ती असो... राजाराम कॉलेजच्या आवारातच संशोधनाचे पहिले बीज मनात रूजले... पोलिस प्रशासनात करिअर करण्याची प्रेरणा देणारे स्रोत आणि स्पर्धा परीक्षेसाठी झोकून देण्याचे बळ अनेकदा कॉलेजच्या दिवसात याच आवारात नसानसात भिनले. आयुष्यात शिस्तीचे महत्त्व देणारे धडे आणि एखाद्या गोष्टीची कास धरत असताना अभ्यासूवृत्तीचा पाठ राजाराम कॉलेजच्या वर्गातच गिरवला... अशा शब्दात ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी राजाराम कॉलेजचे आयुष्यातील स्थान शब्दबद्ध केले.

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या राजाराम कॉलेजमधील माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने आपापल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या पद्मश्री डॉ. यादव, पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि खासदार संभाजीराजे यांचा सत्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाला. गुरुवारी राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा गौरव सोहळा झाला. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी होते.

डॉ. यादव म्हणाले, 'संशोधक व्हा असे सांगणारे शिक्षक आयुष्यात आले म्हणून संशोधनाच्या वाटेवर काहीतरी करून दाखवू शकलो. माझ्या संशोधक म्हणून झालेल्या आजपर्यंतच्या प्रत्येक प्रवासात राजाराम कॉलेजचा फार मोठा वाटा आहे. कोल्हापूरला खेळाची परंपरा आहे. त्यादृष्टीने आश्वासक पाऊल टाकावे. मल्लांनी ऑलिम्पिकची तयारी करावी. परिश्रमातून यश मिळते हा माझा अनुभव आहे. कोल्हापुरात प्रत्येक गोष्ट अव्वल क्षमतेची आहे. कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरातून भविष्यात चांगले मल्ल घडावेत यासाठी राजाराम कॉलेजने पुढाकार घ्यावा.'

युवराज संभाजीराजे म्हणाले, 'जीवनात राजाराम कॉलेजमधील शिस्तीचा खूप मोठा फायदा झाला. केवळ सुविधा नाही म्हणून स्पर्धा परीक्षेपासून मराठी मुले मागे राहतात. असे केंद्र दिल्लीत झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील मुलांना उपयोग होईल. दिल्ली येथे मराठी मुलांसाठी यूपीएससी सेंटर आणि वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्न करून कोल्हापूरचे टॅलेंट अधोरेखित करणार आहे. या केंद्राला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात येईल.'

नांगरे-पाटील म्हणाले, 'समाजाचा घटक म्हणून समाजाला काहीतरी देण्याची दानत असावी याचे बाळकडू मला या कॉलेजमध्ये मिळाले. तरुणांनो, स्वप्ने पाहा आणि ती सत्यात आणण्यासाठी सक्षम बना. १९९० साली याच कॉलेजमध्ये मी गोंधळलेल्या आणि बावरलेल्या अवस्थेत आलो, पण या वास्तूने मला दृष्टी दिली. पुस्तकांनी विचार दिले. इथला श्यामचा वडा आजही आठवतो. प्रचंड अभ्यास केलेले तास आठवतात. मुंबईत ज्यांच्यासाठी तासनतास वाट पाहिली जाते ते आज माझ्या भेटीसाठी प्रतीक्षेत असतात हा क्षण मला कॉलेजमधील कष्टामुळेच मिळाला.'

अध्यक्षीय भाषणात बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, 'शिक्षणाला पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीचे शास्त्रशुद्ध शिक्षण हे पारंगत बनवतो. सध्या खेळातही अनेकजण कर्तृत्व सिद्ध करत आहेत. शिक्षणाचे खासगीकरण होणे धोक्याचे आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यामुळे शिक्षणातून तरूणांचा विकास याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.'

यावेळी प्राचार्य हेळवी यांनी मनोगत व्यक्त केले. अर्पिता डाफळे यांच्या गणेशवंदना नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रीकांत सावंत यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनी दानानंतरही आम्ही सुदृढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

२०१३ मध्ये मुलगा किडनी फेल्युअर असल्याचे समजल्यानंतर आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला; पण यातून मार्ग निघत असल्याने व आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी स्वतः माझी किडनी मुलाला दिली. आज मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे. मुलाने गिरीश कमलाकांत कुलकर्णी नावाने किडनी फाउंडेशन सुरू केले आहे. किडनी दान करूनही माझी तब्येत खणखणीत आहे. दर १५ दिवसांनी मी कोल्हापूर ते जोतिबा चालत जातो. माझ्या अवयवदानाची इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन किडनीदाते कमलाकांत कुलकर्णी यांनी केले.

महाअवयवदानाची औपचारिक सुरुवात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये अवयवदान मोहिमेच्या कार्यक्रमात अवयवदान करणाऱ्या कमलाकांत कुलकर्णी, मंगल मारुती सावंत, आक्काताई पाटील, सुवर्णा गवळी, राणी चौगुले यांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या हस्ते करण्यात आला. कमलाकांत कुलकर्णी, मंगल सावंत, आक्काताई पाटील या तिघांनी आपापल्या मुलासाठी किडनीदान केली आहे. सुवर्णा गवळी यांनी आपल्या पतीसाठी, राणी चौगुले यांनी आपल्या भावासाठी किडनी दान केली आहे. किडनी दान करणाऱ्या सर्वांनी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले.

सुवर्णा गवळी म्हणाल्या, 'दोन वर्षांपासून आपल्या पतीला किडनीचा त्रास होत होता. त्यांना किडनी देऊन पुनर्जन्म देण्याची माझी इच्छा झाली. मी पतींना ​माझी किडनी दिली. त्यामुळे आम्ही दोघेही आज आनंदी जीवन जगत आहोत.'

राणी चौगुले म्हणाल्या, 'जेव्हा माझ्या भावाला किडनीची गरज असल्याचे समजले त्यावेळी मी ती देण्यास तयार झाले. यावेळी माझ्या पतीने किडनी दानात खरी साथ आणि प्रेरणा दिली. माझी मुले लहान असल्याने भावाने सुरुवातीला किडनी घ्यायला नकार दिला. माझ्या पतीने अवयवदानाबाबत माझ्या भावाचे व माझ्या शंकांचे समाधान केल्याने भाऊ किडनी घेण्यास तयार झाला. या प्रक्रियेत पतीची प्रेरणा विसरू शकत नाही.'

जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, 'अवयवदान मोहिमेत राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचे काम सर्वांत चांगले आहे. या मोहिमेसाठी सर्व घटकांचा समन्वय चांगला आहे. अवयवदानाबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन अवयवदानासाठी लोक मोठ्या संख्येने पुढे येतील.'

यावेळी जिल्हाधिकारी सैनी स्वतः अवयवदानाचा फॉर्म भरला. कार्यक्रमास राजर्षी शाहू छत्रपती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक एल. एस. पाटील, रोटरी क्लबचे हेमंत दळवी, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे राजू मेवेकरी, राजकुमार पाटील, शिरीष पाटील, सुनील करंबे, अजित गायकवाड, अजित रोकडे, अनुप्रिया घोरपडे, दीपक देवलापूरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची हाताची घडी, तोंडावर बोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. तरुणांना थेट कुलगुरूंच्या नावाचा वापर करून फसविल्यानंतरही आणि शिवाजी विद्यापीठातील ‌विविध अधिविभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे, असे बोगस पत्रे दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. इतरवेळी विद्यापीठातील विहिरी आणि तलाव भरल्याच्या बातम्या देण्यासाठी धडपडणारे प्रशासन या प्रकरणात मात्र मौन बाळगून आहे.

शिवाजी विद्यापीठामध्ये वरिष्ठ लिपिक पदासह विविध पदावर नियुक्ती करण्याचे अमिष दाखवून ११ बेरोजगार युवकांची ५५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी (ता. २८) उघडकीस आला. बेरोजगार युवकांची फसवणूक करताना शिवाजी विद्यापीठाचे लेटर हेड, आवक-जावक क्रमांकासह नियुक्तीपत्रावर कुलसचिवांची बनावट सही केली आहे. तसेच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकरवी कुलगुरू डॉ. ‌देवानंद शिंदे यांना सांगून नियुक्ती देऊ असे सांगण्यात आले होते. शिवाजी विद्यापीठाचा वापर, कुलगुरू आणि कुलसच‌‌िवांच्या नावांचा थेट उल्लेख येऊनही याबाबत प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही. तत्कालीन कुलसचिव एस. एन. देसाई व डी. व्ही. मुळे यांच्यावर नोकरभरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप असल्याने त्यांची चौकशी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर चर्चेला अधिक गंभीर स्वरुप प्राप्त होत आहे. गंभीर चर्चेची दखल घेवून विद्यापीठ प्रशासनाने खुलासा करण्याची आवश्यकता होती. मात्र घटना घडून चार दिवसांचा अवधी होऊनही कोणताही खुलासा न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे या विषयाबाबत पोलिसांना जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात येईल. तसेच याबाबतीत जे कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा...

फसवणुकीची घटना उघडकीस आल्यानंतर कुलगुरूंनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मुळात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवाजी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र, त्याबाबत फारसे काही न करता केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन प्रशासनाने हे प्रकरण खूपच वरवर घेतल्याचा आरोप होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images