Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्ह्यात शिवसेना ‘नंबर वन’ करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत दहाच्या दहा जागी शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा, तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये आपला पक्ष जिल्ह्यात सगळीकडे क्रमांक एकचा पक्ष व्हावा, यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे' असा सूर रविवारी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उमटला. शिवसेनेच्या पक्ष स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी शाहू स्मारक भवनात रविवारी मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी झटण्याचा निर्धार केला.

पक्षाचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'आपला पक्ष ५०व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यामुळे पक्ष प्रगल्भ झाला आहे. पक्षाची ओळख राजकारणापेक्षा समाजकारण करणार पक्ष म्हणून आहे. सध्या मित्र पक्षाच्या माध्यमातून आपण सत्तेत आहोत. त्यावेळी मोठा भाऊ, लहान भाऊ अशी चर्चा ऐकायला मिळते. जर संख्याबळाच्या जोरावर मोठा भाऊ ठरणार असेल, तर आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेना संख्याबळाच्या दृष्टीने क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.'

गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विचार न करता आपण क्रमांक एकवर कसे पोहचू, याचा विचार केला पाहिजे, असे मत मंडलिक यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने चुरस वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत ४० जागा हे आमचे लक्ष्य आहे. सध्या चंदगड, कागल येथे आम्ही मोर्चेंबांधणी करत आहोत. तसेच काम इतर विधानसभा मतदारसंघांमध्येही सुरू व्हावे, अशी अपेक्षा मंडलिक यांनी व्यक्त केली.

आमदार नरके म्हणाले, 'शिवसेनेने पक्षाचे ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढत आहे. मात्र, सहकार क्षेत्रात अजूनही आपण कमी पडत आहोत. सहकारी संस्था दूध डेअरी येथे पक्षाचे अस्तित्व दिसायला हवे. त्यादिशने प्रयत्न होण्याची गरज आहे.'

जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पक्षाच्या सुवर्णमहोत्सवाची कार्यक्रमांची माहिती दिली. मेळाव्यास आमदार चंद्रदीप नरके, शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस तसेच युवा सेनेचे हर्षल उपस्थित होते. मेळाव्यात जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार असल्याचा उल्लेख वारंवार झाला. मात्र, मेळाव्याला एकच आमदार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, वाहतूक सेनेचे दिनेश परमार, रिक्षा सेनेचे राजू जाधव, एस.टी. सेनेचे दीपक घाटगे, के. एन. पाटील, विराज पाटील यांचा सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपचे राज्यात ‘सोशल पंचकर्म’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

युवराज संभाजीराजे छत्रपती भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही, या चर्चेचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच त्यांची थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याची बातमी आली. थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर गेल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला सध्या अल्पविराम मिळाला असला, तरी भाजपने संभाजीराजेंच्या रुपाने राज्यातून पाचवा मोहरा निवडून एक प्रकारचे 'सोशल पंचकर्म' केले आहे. केवळ सध्याची राजकीय गणितेच नव्हे, तर आगामी निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज करण्याचा हा भाजपचा प्रयत्न मानला जात आहे.

भाजपने यंदा महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या व्यक्तींना राज्यसभेवर नियुक्त करून 'सोशल पंचकर्म' केले आहे. यातील विनय सहस्त्रबुद्धे व डॉ. विकास महात्म्ये बिनविरोध निवडून आले. सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली. तर डॉ. महात्म्ये यांची निवड करून भाजपने धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळवून दिले आहे. त्याचबरोबर नरेंद्र जाधव यांच्या रुपाने त्यांनी आपण दलित समाजाला सोबत घेऊन जाणारे असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

रेल्वे खात्याची धुरा समर्थपणे सांभाळत असलेल्या सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशातून संधी देऊन भाजपने एक उच्चशिक्षित आणि काम करणार निष्कलंक नेता आपल्याजवळ केला आहे. या सगळ्याच्या जोडीला भाजपने युवराज संभाजीराजे छत्रपती यांची निवड करून बाजी मारली. डॉ. महात्म्ये, संभाजीराजे आणि डॉ. जाधव यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारात अत्यंत प्रभावी असणाऱ्या धनगर, मराठा आणि दलित समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपने आगामी निवडणुकांसाठी मतांची बेजमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकावेळेला पक्षासाठी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आणि मतांची गणिते जुळविण्यास फायदेशीर ठरतील, अशा व्यक्ती असा दुहेरी हेतू भाजपने या राज्यसभा सदस्य नियुक्त्यांमधून साध्य केला आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यसभेच्या जागेसाठी हालचाली सुरू होत्या. राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सात जागा रिक्त होत्या. त्यातील सहा जगांवर नियुक्ती झाली आहे. सातव्या जागेसाठी सरकारकडून सुरुवातीला ऑल वर्ल्ड गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पंड्या यांनी सरकारकडून मिळणारा हा सन्मान नम्रपणे नाकाराला. राज्यसभेतील वातावरण योग्य नसल्याचे कारण त्यांनी सरकारला दिले होते. त्यानंतर त्यांच्याऐवजी संभाजीराजे यांचे नाव पुढे आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजार शिक्षकांना वाटाण्याच्या अक्षता

$
0
0

Anuradha.kadam@ timesgroup.com

कोल्हापूर : काम करत असलेल्या शाळेने शिक्षण कायद्यानुसार अनुदान पात्रतेचे निकष पूर्ण केले आहेत. अनुदानपात्र शाळांच्या यादीतही शाळेचे नाव समाविष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर यासंदर्भात न्यायालयाने अशा शाळांचे अनुदान अडवू नये असा आदेशही दिला आहे. या मुद्यांच्या बळावर गेल्या १५ वर्षापासून राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे उंबरे झिजवणाऱ्या सात हजार शिक्षकांच्या सरकारने हातावर वाटाण्याच्या अक्षता टेकवल्या आहेत.

पात्र शाळांना अनुदान आणि ​शिक्षकांना वेतन देण्याचा आदेश काढण्यासाठी शिक्षण विभाग टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ राज्यभर शिक्षकांच्यावतीने उपोषण, आंदोलन सुरू आहे. राज्य कायम विनाअनुदानित कृती समिती आणि राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ यांच्यावतीने हे आंदोलन राज्यभर सुरू आहे. कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरही शिक्षकांचे उपोषण सुरू आहे.

आजपर्यंत झालेल्या आंदोलनाच्या लढ्यात प्रत्येकवेळी आश्वासनाची ​खिरापत वाटायची आणि मागण्यांच्या निवेदनांच्या कागदाचा बोळा करायचा अशा पद्धतीने शिक्षकांना वाटेला लावण्याचे काम सरकारने केल्यामुळे शिक्षकांवर गेल्या १२ दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

अनुदान पात्रतेचे निकष पूर्ण होऊनही गेल्या १५ वर्षापासून पगाराचा छदामही न मिळालेल्या राज्यातील सातहजारांहून अधिक शिक्षकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची झळ बसलेले जवळपास आठशेच्या आसपास शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. कधीतरी अनुदानाची रक्कम संमत होईल आणि पगाराचे पैसे हातात येतील या आशेने ते गलेलठ्ठ पगारी शिक्षकांच्या बरोबरीने तळमळीने अध्यापनाचे काम करत आहेत. मात्र गेल्या दीड दशकांत सरकारी यंत्रणेकडून केवळ आश्वासनांचे गाजर मिळाले.

राज्यातील १३४३ शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून या शाळेतील सात हजारांहून अधिक शिक्षकांना अनुदानातून पगार मिळण्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. केवळ राजकीय उदासीनतेमुळे आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा फटका हजारो शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयाना बसत आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विनाअनुदानित शाळेतील तसेच अनुदानास पात्र शाळेतील शिक्षक विनावेतन काम करत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात त्यांना जगणं मुश्किल झाले आहे. मरावं की जगावे असा भयानक विचार काही कर्मचाऱ्यांच्या मनात येऊ लागला आहे. याबाबत वेळोवेळी महासंघाच्यावतीने आंदोलने करून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये तसेच उन्हाळी अधिवेशनात अनुदानाची घोषणा केली जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते. त्यानंतर उन्हाळी अधिवेशनात अनुदानाची तरतूद करतो असे लेखी पत्र देण्याची ग्वाहीही दिली होती. पण हे अधिवेशन होऊन दोन महिने उलटले असून शाळा सुरु होण्याची तारीख दोन दिवसांवर आली तरी याकडे सरकारचे लक्ष नाही.

सध्या सुरू असलेले गेल्या दहा वर्षातील १२८ वे आंदोलन असून या आंदोलनात सहभागी झालेल्या १३ शिक्षकांचा बळी गेला आहे. बारा कर्मचाऱ्यांची अनुदान मंजूर होईल या प्रतीक्षेत हयात संपली आहे. पगार नाही म्हणून उधारीवर अनेक शिक्षकांचा संसार सुरू असून वृद्ध आईवडीलांच्या औषधोपचारासह मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था करताना अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

शिक्षणमंत्र्यांची कोलांटी उडी

गेल्या १५ वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या राज्यात सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्षनेते असताना आंदोलक शिक्षकांसोबत सरकारच्या दुर्लक्षाबाबत घोषणा देत होते. आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवत होते. मात्र आता तेच तावडे शिक्षणमंत्री झाल्यावर अनुदानपात्र शाळा आणि तेथील ​​शिक्षकांच्या वेतनाबाबत डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत शिरले आहेत. तावडे यांच्या कोलांटी उडीचा शिक्षकांकडून निषेध केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेचे ‘सनातन’ कनेक्शन स्ट्राँग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीबीआयने अटक केलेला सनातनचा साधक, डॉक्टर वीरेंद्र तावडे याने स्वतःला सनातनच्या कामाला वाहून घेतले होते. संघटन कौशल्यात माहीर असल्यामुळेच त्याला कोल्हापूर जिल्हा संघटकपदाची जाबाबदारी मिळाली होती. त्यातून त्याचा मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटील, प्रवीण लिमकर यांच्याशी संपर्क आला. पानसरे हत्येतील समीर गायकवाड याच्याशीही त्याचा संपर्क आल्याचा संशय तपास यंत्रणांचा आहे.

मूळ सातारा येथे राहाणारा डॉ. तावडे याच्यावर सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव आहे. सन २००२ ते २००८ या कालावधीत कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या तावडे याच्याकडे २००५ पासून कोल्हापूर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. साडेतीन ते चार वर्षांच्या या काळात कोल्हापूरसह सांगली आणि कोकणातील अनेक साधकांची कोल्हापुरात ये-जा सुरू होती. तावडे याने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेचा प्रभाव वाढवला होता.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तावडे याचा वावर होता. यातून मडगाव स्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील आणि प्रवीण लिमकर यांच्याशी त्याचा संपर्क आला होता. विशेष म्हणजे मडगाव स्फोटापूर्वीच तावडे याने कोल्हापूर सोडले. कोल्हापुरात अगदी मोक्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू असतानाही तो कोल्हापूर सोडून सातारा येथे गेला. त्याच्यावर सोपवलेली 'सनातन'च्या जिल्हा संघटकपदाची जबाबदारी त्याने सोडली या बाबी संशयास्पद आहेत. त्यानंतर काही महिन्यातच मडगाव येथे स्फोट होऊन रुद्र पाटील आणि प्रवीण लिमकर गायब झाले.

कोल्हापुरातील उचगाव येथे राहणारा प्रवीण लिमकर हा एका हिंदुत्ववादी संस्थेच्या मुखपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करीत होता. त्याच्या अचानक गायब होण्यानेही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. लिमकर अद्याप फरार आहेत.

तावडे याच्या चौकशीतून रुद्र पाटील आणि लिमकर यांच्या संबंधांची उकल झाल्यास पोलिसांनी तिन्ही हत्यांच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तावडे याचा सनातन संस्थेतील वावर आणि स्वतःच्या चरितार्थाचे काम सोडून संस्थेच्या कामाला वाहून घेणे यातून त्याला बरीच माहिती असल्याचे जाणवते. तावडे याच्या चौकशीतून कोल्हापूर कनेक्शन स्पष्ट होण्यासही मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहाचा कपही न देणाऱ्या मंडलिकांना पावणेसहा लाख मते कशी?

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीत मी तीन लाख मताधिक्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास होता. पण कुणाला चहाचा कप न दिलेले, ओळख नसलेले संजय मंडलिक यांनी पावणेसहा लाख मते मिळवली. ती कशी पडली? असा प्रश्न विचारत खासदार धनंजय महाडिक यांनी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

जैन जागृती सेंटरचा पदग्रहण समारंभ रविवारी दसरा चौकातील जैन बोर्डिंगमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेंटरच्या केंद्रीय बोर्डाचे अध्यक्ष संजय शहा होते. नूतन अध्यक्ष कांतीलाल ओसवाल यांनी सूत्रे स्वीकारली.

कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांची 'टॉप थ्री' खासदारांत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. खासदार महाडिक म्हणाले, निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले. पण मोदींच्या लाटेमुळे जैन समाजातील काहींनी शिवसेनेला मदत केली. या प्रकारामुळेच मंडलिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात मते पडली. दोन वर्षांत कोल्हापूरचे, राज्याचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. गेल्यावेळी ज्यांनी मदत केली नाही, त्यांनी पुढे मदत करावी. 'टॉप थ्री' साठी वशिला लावला असेल, असे वाटत असेल तर ते खोटे आहे. सभागृहात चांगले काम करणे किंवा सभागृहाबाहेर मारामारी करावी, असे दोन पर्याय नावाची चर्चा होण्यासाठी असतात. मारामारी करू शकत नसल्याने संसदेत प्रभावी काम करून नावलौकिक मिळविला. जैन समाजाने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना ४३ कोटी रुपयांची बिनव्याजी कर्ज दिले, हे कौतुकास्पद आहे. इतर समाजातील गरीब विद्यार्थ्यांना किमान चार लाखांची मदत करावी.'

यानंतर ललित गांधी, जयेश ओसवाल, अध्यक्ष कांतीलाल ओसवाल यांची भाषणे झाली. शेफाली मेहता यांनी सूत्रसंचालन केले. विजय शहा यांनी आभार मानले. याप्रसंगी रमेश मोरबिया, किशोर शेठ, देवीचंद ओसवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १० लाखांवर वीमाधारक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ८ हजार ६७१ खाती उघडण्यात आली आहेत. यापुढील काळात सर्व बँकांनी या विमा योजनांतर्गत अधिकाधिक खाती उघडण्यात सक्रीय पुढाकार घ्यावा,' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी.एस.पराटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी.के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक आणि अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार ७४० खाती उघडण्यात आली आहेत. मार्च २०१६ अखेर १२ क्लेम मंजूर केले आहेत. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत ३ लाख ४७ हजार १८९ खाती उघडली असून आता पर्यंत ११३ क्लेम मंजूर केले आहेत. त्यातून वारसांना अडीच कोटींचे अर्थसहाय्य केले आहे. या योजनांच्या नूतनीकरणाचे काम सर्व बँकांमध्ये सुरु आहे. खातेदारांनी बचत खात्यामध्ये पुरेसा बॅलन्स ठेवून विमा योजनांचे नूतनीकरण करावे. जीवन ज्योती योजनेत क्लेम पात्रताही ४५ दिवसांची करण्यात आल्याने पॉलिसी सुरु झाल्यापासून ४५ दिवसानंतर क्लेम मंजूर करण्यात येईल. या सर्व योजना जनतेपर्यंत प्रभावी पोहचाव्यात यासाठी अधिकाधिक बचत गटांना सामावून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

अटल योजनेंतर्गत ९ हजार ७४२ खाती उघडली आहेत. याबरोबरच पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार ८५४ खाती उघडली आहेत. ३ लाख ६२ हजार ३१६ खात्यासाठी रुपे कार्ड प्रधान करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील उद्योजकांना २३ हजार २७१ खात्यामध्ये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेंतर्गत १९ हजार ८२० खात्यामध्ये किशोर योजनेंतर्गत २ हजार ७५१ खात्यामध्ये आणि तरुण योजनेंतर्गत ७०० खात्यामध्ये अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात बचत गटांच्या महिलांसाठी आर-सेटी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रामार्फत २०१५-२०१६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा या बैठकीस घेण्यात आला. तसेच कोल्हापूरमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रामार्फत वेगवेळ्या गावांमध्ये बँकिंग साक्षरतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी महिन्यातून किमान एकवेळ ग्रामीण भागात कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले.

एम.जी.कुलकर्णी यांनीही सर्व योजनांचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यमशीलतेची मानसिकता ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उद्योग-व्यवसायाचा विचार करताना मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता विद्यार्थिदशेपासून छोट्या-छोट्या उद्योगातून व्यवसायाला सुरुवात करावी. त्यामुळे वाया जाणारा वेळे सत्कारणी लागून मोठ्या उद्योगाकडे झेप घ्यावी. अशा मोठ्या उद्योगातून मिळणाऱ्या फायद्यातील दहा टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरल्यास अनेक वचितांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. मात्र, त्यासाठी स्वत:चे मनोधैर्य वाढवून आतापासूनच उद्योग व्यवसायाला सुरुवात करा,' असा संदेश ज्येष्ठ उद्योगपती मोहन मुल्हेरकर यांनी दिला.

चाटे ग्रुफ ऑफ एज्युकेशन प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित 'टाइम्स एज्युफेस्ट'मध्ये ते बोलत होते. कमला कॉलेज येथील व्ही. टी. पाटील स्मृती भवनमध्ये प्लॅनेट कॅम्पसअंतर्गत 'उद्यमशील व्हा' विषयावर त्यांनी

मौलिक मार्गदर्शन केले. व्याख्यानाला काविरा नॅचरल्सचे प्रायोजकत्व लाभले होते.

उद्योगपती मुल्हेरकर म्हणाले, 'मराठी समाजाचा कल उद्योग-व्यवसायापेक्षा नोकरीकडे जास्त असतो. यासाठी विचारसणीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. बिल गेट्स, वॉरेन बफे यांसारख्या उद्योजकांनी छोट्या-छोट्या व्यवसायातून आपली सुरुवात केली. आज याच व्यक्तींची वार्षिक उलाढाल करोडो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यासाठी सिंधी समाजाचाही आदर्श जपला पाहिजे. खडतर श्रमातून गांधीनगरसारख्या व्यापारपेठेची स्थापना केली आहे. त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती काहीना काही व्यवसाय करत

असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण उद्योजजगतामध्ये होणाऱ्या उलाढालीपैकी ३५ टक्के वाटा गांधीनगरमधील ट्रेडिंग व्यवसायातून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्यमशील बनण्यासाठी आतापासूनच या क्षेत्राच्या जाण्याचे ध्येय ठेवावे.'

ते पुढे म्हणाले, 'उद्योग व्यवसाय सुरू करताना किंवा सुरू केल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र, त्यातून मार्ग काढण्यास शिकले पाहिजे. उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेकजण खोटी प्रतिष्ठा आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. सण, समारंभ यावर उद्योगातून मिळालेल्या पैशाची उधळपट्टी करतात. त्यामुळे बँकांची कर्जे थकीत होऊन मार्केटमधील पत जाण्याचा धोका निर्माण होतो. नोकरांचे वेतन, बँकांचा सिबिल रिपोर्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाची प्रगती झपाट्याने होत आहे, देशाला बलाढ्य करण्यासाठी आपले हातही बळकट करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासामध्ये सिन्सिअरपणा हवाच. मात्र, गुण व व्यवसायाचा कोणताही संबंध नसून बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी

आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यास शिका. विद्यार्थिदशेत असतानाच उद्योजक बनण्याची पावले टाकल्यास पुढे मोठे उद्योजग बनाल. तेव्हा आताच उद्योगशीलतेचे ध्येय बाळगा.'

महाराष्ट्र टाइम्सचे पुणे विभागाचे लँग्वेज हेड दीपक खैरनार यांनी स्वागत केले. रिस्पॉन्स हेड मधुर राठोड यांनी प्रास्ताविक केले. मंदार मिरजकर यांनी आभार मानले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे ढोल आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा आणि वर्गतुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन अनुदान मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाच्या तेराव्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी ढोल आंदोलन केले. मागण्यांची दखल सरकार घेत नसल्याने ढोल आंदोलनाने जाग येण्यासाठी सीइओ कुणाल खेमनार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता महामार्ग रोखला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यलयामसोर बेमुदत उपोषण सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन, तोंडाला काळ्या पट्ट्या, घंटानाद करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, दंडवत आंदोलन, गोंधळ, भजन आणि सरकारचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन केले. पात्र ठरलेल्या शाळांना आणि वर्गतुकड्यासाठी सुमारे ७०० कोटींची केलेल्या तरतुदीपैकी काहीही निधी अद्याप वर्ग केलेला नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजता समिती आणि महासंघाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेवर ढोल मोर्चा काढला. राज्य विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, प्रकाश पाटील, गजानन काटकर, मच्छिंद्र जाधव आदी सहभागी झाले. खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे इचलकरंजीचे शहर सचिव मुकुंद चव्हाण, शहराध्यक्ष नरसिंह महाजन, अवधूत कवडे यांची प्रकृती खालावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्दिष्ट निश्चित केल्यास यश निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय सेनादलात असणाऱ्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी योग्यवेळी ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या उद्दिष्टानुसार ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश प्राप्ती होते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. यासाठी अफाट वाचन करावे. आपण काय वाचतो याचे मनन करून जो आत्मविश्वास निर्माण होतो, त्यातून स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल होते. यातूनच ध्येयाची परिपूर्ती होते,' असे मत इंडियन एअरफोर्सचे विंग कमांडर अनिल मैंदर्गी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी देशाच्या तीनही सेना दलांमधील दहावी, बारावी व पदवीनंतर उपलब्ध संधींचा वेध घेतला.

महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित टाइम्स एज्युफेस्टमध्ये 'इंडियन एअरफोर्समधील करिअर' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विंग कमांडर मैंदर्गी म्हणाले, 'भारतीय सेनेत (आर्मी, नेव्ही व एअरफोर्स) वर्ग १ राजपत्रीत अधिकारी होण्यासाठी किमान बारावी व पदवीधारक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. तीनही दलाच्या वर्ग १ पदासाठी वर्षातून दोनदा जाहिरात प्रसिद्ध होते. शारीरिक चाचणी, वैद्यकीय, ग्रुप चर्चा यातून उमेदवारांची निवड केली जाते. वर्ग १ पदासाठी टेक्निकल ट्रेडसाठी विद्यार्थ्यांना बारावीमध्ये ५० टक्के गुणांची आवश्यकता असते. त्यामध्ये फिजिक्स, मॅथ्स व इंग्लिश विषय अनिवार्य असतात. विविध पात्रता फेरींतून त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना बेळगाव, चेन्नई, हैदराबाद येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची पसंतीनुसार नियुक्ती होते. तर ऑफिसर केडरसाठी बारावीनंतर एनडीए हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. या अभ्यासक्रमासाठी विद्यावेतनही दिले जाते.'

मैंदर्गी पुढे म्हणाले, 'भारतीय सेनादलात असणाऱ्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी योग्यवेळी ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या उद्दिष्टानुसार ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश प्राप्ती होते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक आहे. स्वतःच्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे आकलन करून त्याचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. आपला भूतकाळ भविष्यामध्ये

परावर्तित होत असल्याने करिअरच्या सुरुवातीलाच विविध अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होताना उद्दिष्टापासून विचलित होऊ नका.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हैसाळ’ला मुहूर्त २०२०चा

$
0
0

केंद्रीय जलसंपदा विभागाच्या सचिवांची ग्वाही; खासदार संजय पाटील

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली ताकारी-म्हैसाळ योजना (कृष्णा कोयना उपसा योजना) मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांत १६४३ कोटी २९ लाख रुपयांच्या निधीचे टप्पे करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांचा वाटाही ठरला असल्याच्या ठोस आश्वासनाबरोबरच लेखी पत्रही केंद्रीय जलसंपदा खात्याचे सचिव शशी शेखर यांनी आपल्याला दिले आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

ताकारी-म्हैसाळ प्रकल्प मार्च २०२०पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी त्वरित सिंचन लाभ योजनेद्वारे (एआयबीपी) केंद्रही आपला हिस्सा वेळेवर आणि सुनियोजित पद्धतीने देणार असल्याचे सचिवांनी पत्रात स्पष्ट केले असल्याचे सांगून खासदार पाटील म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १६४३ कोटी २९ लाख रुपयांचा खर्च अद्याप बाकी आहे. उद्दिष्टानुसार हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी चालू वर्षी ८० कोटी, २०१७-१८ मध्ये ४०४.५ कोटी, १८-१९ मध्ये ५५९.३९ कोटी आणि १९-२० मध्ये ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आराखडा केंद्र व राज्याने तयार केला आहे. या प्रकल्पाच्या खर्चामधील ५७.७ टक्के हिस्सा केंद्र, तर ४२.३ टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे.

या योजनेमधील केंद्र सरकारकडे तीन वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सुमारे १८२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी खासदार पाटील यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्याकडे केली होती. निधी बंद झाल्याने अवर्षण-प्रवर्षण भागातील या प्रकल्पाचा वेग मंदावला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. या निधी विलंबाचे कारण देताना शेखर यांनी नमूद केले आहे, २०१४-१५च्या सुधारित खर्चांमध्ये मोठी कपात केली होती आणि १५-१६मधील तरतूदच संपुष्टात आली. परिणामी या दोन्ही वर्षांमध्ये केंद्राकडून या प्रकल्पाला निधी दिला गेला नव्हता. आता मात्र हा प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दर वर्षी पुरेशा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

प्रतीक पाटील यांनी नीट माहिती घ्यावी

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे संपूर्ण कार्यालयाचे हस्तांतर होणार असल्याचे माजी खासदार प्रतीक पाटील यांचे आरोप बालिशपणाचे आहेत. अपुऱ्या माहितीच्या आधारे प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहेत. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी या योजनांसाठी किती निधी आणला हे जनतेला सांगावे. आपण खासदार झाल्यानंतर सतत पाठपुरावा करून प्रकल्पपूर्तीचा कालावधी निश्चित केल्याचे लेखी पत्रच आणले आहे. सुमारे १६५० कोटींचा निधी तीन वर्षांत आणला जाणार आहे. कोणत्या वर्षी किती निधी येणार हे ठरलेले आहे. त्यात राज्याचा आणि केंद्र सरकारचा वाटा निश्चित झाला आहे. अवर्षण आणि प्रवर्षणमधून सुमारे दोनशे कोटी रुपयांचा लवकरच मिळणार आहे.

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे संपूर्ण कार्यालय नाही तर एक मुख्यअभियंता आणि त्यांच्याबरोबर एखाद-दुसरा अधिकारीच जाणार आहे. याचा प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नाही. अशा प्रकारच्या राज्यातील उपसा योजनांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा खर्च सुमारे तीनशे कोटींवर गेला आहे. अशाप्रकारचे खर्च कमी करण्याबरोबरच कार्यप्रणातील सुसूत्रता यावी म्हणून राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. अशा उपाययोजनांच्या संदर्भात माजी खासदारांनी नीट आणि पुरेशी माहिती घ्यावी, असा टोला खासदार संजय पाटील यांनी सोमवारी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळिंबी खाल्ल्याने चौघांना विषबाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गिरगाव (ता. करवीर) येथे सोमवारी (ता. १३) शेतातील आळिंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली. चौघांनाही उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर चौघांचीही स्थिती स्थिर आहे.

गिरगाव येथील आनंदा भीमराव पाटील (वय ४२) हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी ते शेतात गेले होते. शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात आळंबी उगवल्या होत्या, त्यातील काही आळिंबी घेऊन ते घरी आले. सकाळी अकराच्या सुमारास घरातील चौघांनी अळंबीची भाजी खाल्ली. आनंदा भीमराव पाटील यांच्यासह मुलगा अजिंक्य आनंदा पाटील(१२), बहीण संगीता दत्तात्रय दाभोळे(४०) आणि भाचा वैभव दत्तात्रय दाभोळे (२०) या चौघांनाही जेव‍णानंतर उलट्या सुरू झाल्या. पोटदुखीचाही त्रास सुरू झाल्याने जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय आला. इतर नातेवाईकांनी या चौघांनाही तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या सुरूवातील अनेक ठिकाणी आळिंबी उगवतात. यातील सर्वच अळंबी खाण्यासाठी सुरक्षित नाहीत. काही आळिंबी विषारी असल्याने त्या खाणे धोकादायक आहे. तज्ज्ञांकडून खात्री केल्यानंतरच आळिंबी खाव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोलकर हत्या : महत्त्वाचे धागेदोरे हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर तिन्ही हत्यांसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. तावडेची कसून चौकशी सुरू आहे. गरज पडल्यास त्याला कोल्हापुरातही चौकशीसाठी आणले जाणार आहे. यातून काही महत्त्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

तावडे याच्या चौकशीतून तपास यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील तपासातून अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्याही हत्या एकाच विचारधारेच्या व्यक्तींकडून झाल्याची शक्यता बळावली आहे. तिन्ही हत्यांमधील महत्त्वाच्या समान दुव्यांचा पोलिसांनी अभ्यास केला आहे. यात अनेक व्यक्तींच्या सहभागाची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज आणि बेळगाव परिसरात सनातन संस्थेचा मोठा प्रभाव आहे. या संस्थेतील काही संशयितांची तपासणी सुरूच आहे. त्याचबरोबर डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतही याच विचारांचे हल्लेखोर असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या तिन्ही हत्यांमधील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी माहिती सीबीआयला मिळाली आहे.

सीबीआय चौकशी संपताच एसआयटीही तावडेचा ताबा घेणार आहे. कॉम्रेड पानसरे हत्येबाबतही तावडेकडे महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याने गरज पडल्यास त्याला कोल्हापुरातही आणले जाणार आहे. कोल्हापुरातील त्याचे हॉस्पिटल, त्याच्या संपर्कातील सनातनचे इतर कार्यकर्ते, त्याने वाढवलेल्या संघटनातील कार्यकर्त्यांचे सध्याचे लोकेशन आदी माहिती घेतली जाणार आहे. पानसरे हत्येप्रकरणातील संशयित समीर गायकवाडशी तावडेचा संपर्क होता काय, याचाही पोलिस शोध घेत आहेत. समीर आणि तावडे यांच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागत आहे. महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा करणारे पोलिस लवकरच एखादा नवीन खुलासा करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

तपास यंत्रणांचा परस्पर समन्वय

सीबीआय, एसआयटी आणि कर्नाटक सीआयडी या तिन्ही तपास यंत्रणांचा परस्पर समन्वय आहे. दररोज यातील माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे. हैदराबाद येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत नुकतीच तिन्ही हत्यांच्या तपासाचा आढावा घेणारी बैठक झाली. तिन्ही हत्यांमागील समान सूत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी सोमवारी उघडकीस आणले. या प्रकरणात तीन महिलांसह रॅकेट चालवणारा दलाल आणि रिक्षाचालकालाही अटक करण्यात आली आहे. भरतकुमार राणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

शहरात छुप्या पद्धतीने हे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षकांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याची शहानिशा करून सोमवारी (ता. १३) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कळंबा-वाशी नाका रोडवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी राजू बाबुराव चव्हाण-दलाल (वय ४६, रा. आपटेनगर, महादेव मंदिराशेजारी) आणि रिक्षाचालक चंद्रकांत लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. राजोपाध्येनगर) या दोघांसह तीन महिलांना अटक केली. यातील राजू चव्हाण-दलाल हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील आरोपी आहे. याआधीही तो सेक्स रॅकेट चालवताना पोलिसांच्या हाती लागला होता. ग्राहकांच्या मागणीनुसार तो ठरलेल्या ठिकाणी महिला पोहोच करत होता. या बदल्यात तो ग्राहकांकडून दोन हजार रुपये घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या तीन महिलांमधील एक महिला मुंबई येथील आहे. ती दलाल याच्या घरीच राहत होती. इतर दोन महिला शहरातील आहेत.

दलाल गेल्या तीन महिन्यांपासून शहरात सेक्स रॅकेट चालवत होता. अनेक महिलांचे फोटो आणि त्यांचे मोबाइल नंबर त्याच्याजवळ आहेत. आपटेनगर येथे भाड्याच्या घरात पत्नी आणि मुलासह राहणारा दलाल हा अतिशय छुप्या पद्धतीने रॅकेट चालवत होता. मोबईलवरून ग्राहकांना तो माहिती पुरवत होता. इतर शहरांमधील महिलाही त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या पाचजणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी धरण क्षेत्रातकृत्रिम पावसासाठी प्रयत्न

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पुढील आठ दिवसांत उजनी धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यास धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत सरकारला पत्र लिहिणार असल्याचे महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

'सध्या उजनी धरणातील पाण्याची पातळी खूपच कमी झाली आहे. दुबार पंपिंगने शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. औज बंधाऱ्यातील पाणीसाठा देखील हळूहळू कमी होत आहे. आता मोठ्या पावसाची गरज आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढली नाही तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान खात्याने मान्सून लांबणीवर गेल्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आठ दिवसानंतर परिस्थिती पाहून सरकारला कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत पत्र पाठविणार आहे,' असे काळम-पाटील यांनी सांगितले.

कृत्रिम पाऊस पाडला तर उजनी ते सोलापूर दरम्यानचे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जातील. शहराप्रमाणे नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठीदेखील पाणी उपलब्ध होऊ शकेल. सध्या पाण्यासाठी जो खर्च होतो तो दखील कमी होईल, असेही आयुक्त म्हणाले. उजनी धरणातून सध्या दुबार पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. तिबार पंपिंगची आज गरज नाही. मात्र, भविष्यकाळात गरज पडली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून ती तयारीही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत १२.५५ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

कोयनेत १२.५५ टीएमसी पाणीसाठा

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणात आजअखेर एकूण १२.५५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दर वर्षी सरासरी सात जूनला होते. यंदा मात्र जून निम्मा संपला तरी मान्सूनचा थांगपताच नाही. मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच धरणांमध्ये खडखडाट जाणवत आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण तालुके अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या भागात मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा राज्यातच मान्सून आलेला नसल्याने हे तालुके पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यातील मान्सूनचा पाऊस जूनच्या मृग नक्षत्रापासूनच सुरू होते. कोयना धरणात १२.५५ टीएमसी, त्या खालोखाल उरमोडीत ३.४७ टीएमसी पाणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांमध्ये किलबिलाट

$
0
0

सातारा :

साताऱ्यात बुधवारचा दिवस मुलांच्या किलबिलाटाने उजाडला. बुधवारी शाळा सुरू झाल्या. सकाळपासून शाळेत मुलांना घालविण्यासाठी घरात आणि मुले शाळेत गेल्यानंतर शाळांमध्ये किलबिलाट झाला. मुलांच्या सोबत पालकांचाही पळापळ सुरू होती. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात झाली. या निमित्त विविध शाळात स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नवीन मराठी शाळा, हत्तीखाना, बालक मंदिर, चिरमुले विद्या मंदिर, बापूसाहेब चिपळूणकर शाळा यांसह जानकीबाई झंवर शाळा, विविध इंग्रजी माध्यमांच्या शाळांतही या निमित्त सजावट करण्यात आली होती. शाळेत फुगे, आंब्याच्या झाडांच्या पानांची तोरणे, पताका, रांगोळ्या काढून शालेय परिसर सुशोभीत करण्यात आला होता.

शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत नऊवारी साडी नेसलेल्या मुलींनी आणि डोक्याला फेटा व मराठी पारंपारिक पोशाख परीधान केलेल्या मुलांनी हसत खेळत नव्या शालेय वर्षात प्रवेश केला. शाळेत सरस्वती पूजन करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.

पाचवी इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पालिकेच्या शाळांची वैशिष्ठ्ये सांगणारे अनेक फलक शहराच्या प्रमुख ठिकाणी लाऊन जनजागृती करण्यात आली होती. अनेक शाळेत मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. माध्यमिक शाळेत मोफत शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. अनंत इंग्लिश स्कूल शाळेत आज ढोल ताशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करुन अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

वाहतूक कोंडी

शहरातील न्यू-इंग्लिश स्कूलच्या परिसरात बुधवारी शाळांच्या पहिल्या दिवशीच वाहतुकीची मोठी कोंडी झाली. हीच परिस्थिती दुपारी शाळा सुटल्यावर झाल्याने अनेक वाहन चाहलकांना या मार्गावर पुढे जाताना कसरत करावी लागत होती. हा मार्ग एकतर एकेरी करावा अथवा शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत येथून वाहतुकीस बंदी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी तसेच पालक वर्गाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक पालखी तळावर पाचशे स्वच्छतागृहे

$
0
0

सातारा : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तळावर ५०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो.
यंदा पालखी सोहळा रविवारी, ३ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सोहळ्याच्या स्वागतासाठी व येथील वास्तव्यादरम्यान परंपरागत पद्धतीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावर्षी सोहळ्यामया व्यवस्थेसाठी प्रत्येक पालखी तळावर ५०० फिरती स्वमछतागृहे उपलब्ध केली जाणार असून, संबंधित यंत्रणांनी या स्वच्छतागृहांसाठी पुरेसे पाणी, प्रकाशव्यवस्था प्राधान्याने करावी. त्याचबरोबर तेथील व्यवस्थेसाठी प्रत्येक २५ स्वच्छतागृहांसाठी एक याप्रमाणे कर्मचारी नियुक्त करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. पालखी तळाची स्वच्छता सोहळा येण्यापूर्वी आणि सोहळा गेल्यानंतर दोन्ही वेळा संबंधित गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छता करण्याला प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे पालखी तळाव्यतिरिक्त सोहळ्याचा मुक्काम असलेल्या गावांत अन्य ठिकाणी काही दिंड्या व वारकरी थांबतात तेथील स्वच्छतेची काळजीही संबंधितांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात उभारावे

$
0
0

सातारा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू करावे, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) केली आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना देण्यात आले.
सध्या सातारा जिह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरणे, शुल्क भरणे, पुनर्तपासणी फॉर्म भरणे, उत्तरपत्रिकेची सत्यप्रत आणणे, पदवी प्रमाणपत्र, मूळ कागदपत्रे आणि विविध प्रशासकीय कामासाठी कोल्हापूरला जावे लागते. सातारा ते कोल्हापूर हे अंतर १३० किलोमीटर आहे. हेच अंतर शिरवळ किंवा फलटण येथून सुमारे २०० किलोमीटर आहे. तसेच विविध महाविद्यालयांनाही प्रशासकीय कामे, बैठका यासाठी कोल्हापूरला प्रवास करावा लागतो. त्यामुळे यात विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ खर्च होऊन मानसिक त्रास होतो. विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे झाल्यास सर्व सोयी साताऱ्यातच उपलब्ध होतील आणि विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम येथेच शिकवले जातील. याचा विद्यार्थ्याना फायदा होईल. यासाठी शासकीय जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने ती उपलब्ध करून द्यावी, असे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
लवकरच उपकेंद्रासंदर्भात कुलगुरू, एनएसयूआय व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिऱ्यांनी दिल्याचे एनएसयूआयतर्फे सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अनिकेत भोसले, सरचिटणीस दीपक कांबळे, ऋतुराज बिरामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवे येथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

$
0
0

सातारा : महामार्गालगत असलेल्या गोवे, (ता. सातारा) ग्रामपंचायतीने आधुनिक जगाशी नाळ जोडत आदर्श गावाकडे वाटचालीची घोडदौड सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला साथ देत ग्रामपंचायतीने सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

'हा उपक्रम राबविणारी गोवे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. महामार्गालगत गोवे गाव असून, सीसीटीव्ही बसविल्याने गावात चाललेल्या प्रत्येक हालचालींवर आता लक्ष राहणार आहे. यामुळे गावात गुन्हे घडण्याचे प्रमाण निश्चित कमी होणार आहे.

महामार्गावरून लोणंद-कोरेगाव आणि पुढे जाण्यासाठी याच गावातून जावे लागत असल्याने आता गावातून जाणारा प्रत्येक जण सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असेल. याचा फायदा महामार्गावर होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी 'वाय-फाय' यंत्रणा सुरू केल्यामुळे अनेकांना गावच्या विविध विकासकामांची, प्रकल्पांची तसेच लोकांच्या कामांची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिली जात आहे. मोबाईल क्रमांकावर गावचे दाखले, नोंदी आणि ग्रामस्थांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत,' असे मत सातारा सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केले.
सरपंच आशा जाधव, ग्रामसेवक विकास चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन जाधव, पोलिस पाटील राजेंद्र जाधव, विवेक जाधव, एकनाथ जाधव, महेंद्र पवार, मधुकर जाधव, हंबीरराव जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये ४३ जुगाऱ्यांना अटक

$
0
0



कराड : शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या तीन पानी पत्त्याच्या जुगार अडड्यांवर सांगली पोलिसांनी एकाच वेळी छापा मारून ४३ जणांना अटक केली. या कारवाईमुळे शहरातील बेकायदा व्यावसायिकांना चांगलीच दहशत बसली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे सांगली पोलिसांचे म्हणणे आहे.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये कराड पंचायत समितीच्या माजी सदस्यासह स्थानिक राजकीय नेत्यांसह अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. कराड शहर पोलिसांना अजिबात पत्ता लागू न देता सांगली पोलिसांनी ही कारवाई केली. मुत्याल यांच्या आदेशानुसार सातारा, सांगलीसह कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. मात्र या कारवाईत स्थानिक पोलिसांना सामावून न घेता नजीकच्या जिल्ह्यातील पोलिसांना पाठविण्यात आले होते.
मंगळवारी रात्री सांगली पोलिसांची तीन पथके कराडात एकाचवेळी दाखल झाली. यामध्ये एक पथक शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या इमारतीमधील ऐश्वर्या रेडियम या दुकानाच्यावरील अड्ड्यात जावेद बाबू मुल्ला (वय २०, रा. विंग, ता. कराड) याच्या क्लबवर छापा मारून २२ जणांना अटक करण्यात आली. तेथून दोन लाख ४७ हजार ८०० रुपयांची रोकड, ५७ हजार रुपयांचे मोबाईल व सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कारवाईत क्लबमधील अशपाक मुल्ला व अस्मल पटेल या दोन कामगारांनाही अटक केली आहे.
ओगलेवाडीतील कल्याणी बिल्डिंगनजीक नरेश प्रभुनाथ गुप्ता (रा. बनवडी, ता. कराड) याच्या अड्ड्यावरील छाप्यात गुप्तासह सहा जणांना अटक करण्यात आली. तेथून दोन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
वारुंजी फाटा येथील अड्ड्यावर स्थानिक राजकीय नेते, रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळून १३ जणांना अटक करण्यात आली. सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images