Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिकेला हवे स्वतंत्र न्यायालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेशी संबंधित खटल्यांची संख्या मोठी आहे. ही संख्या जवळपास सहाशेवर आहे. बहुतांश खटले वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. महापालिका आणि तक्रारदार यांच्यामधील वादामुळे विविध विकासकामावर परिणाम होत आहे. या खटल्यांचा जलदगतीने निपटारा झाला तर कायदेशीर बाबींमुळे रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. ​यासाठी महापालिकेकरिता स्वतंत्र कोर्ट स्थापण्याचा प्रस्तावाला वेग आला आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारकडे स्वतंत्र कोर्ट स्थापण्यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. येत्या १८ जूनला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र कोर्ट स्थापण्याचा ठराव येणार आहे.

आरक्षित जागा, भूसंपादन, बेकायदेशीर बांधकाम, बांधकाम परवाना, जागेची हद्द यावरून वाद निर्माण होतात. असे सहाशेवर खटले जिल्हा दिवाणी कोर्टात आहेत. काही खटले तर २० वर्षांपासून सुरू आहेत. महापालिकेच्या काही निर्णयाला नागरिकांनी आव्हान देत कोर्टात दाद मागितली आहे. दिवाणी कोर्टात याप्रश्नी सुनावणी सुरू आहेत. वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक सुनावणीला हजर राहावे लागत आहे. रोज कुठल्या ना कुठल्या विभागातील अधिकाऱ्याला सुनावणीसाठी कोर्टात फेऱ्या माराव्या लागतात.

या प्रलं​बित खटल्यांची जलद सुनावणी होवून निवाडा झाला तर ते महापालिकेच्या हिताचे ठरणार आहे, या भूमिकेतून महापालिकेने स्वतंत्र कोर्ट स्थापण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी या कोर्टसंदर्भात राज्य सरकारकडे अहवाल दिला आहे. प्रशासनाकडून सप्टेंबर २०१५ मध्ये सरकारला या संदर्भात माहिती देण्यात आली होती. स्वतंत्र कोर्ट स्थापण्याच्या हालचाली पुन्हा वेगावल्या आहेत. महापालिकेची १८ जूनला सर्वसाधारण सभा आहे. त्या सभेत मंजुरीसाठी स्वतंत्र कोर्ट स्थापण्याचा प्रस्ताव आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीत जागा

महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र कोर्ट प्रस्तावित आहे. यासाठी मुख्य इमारतीतील रेकॉर्ड ऑफिसला प्राधान्यक्रम असेल. मुख्य इमारतीतील रेकॉर्ड रुम शाहू क्लॉथ मार्केट येथील कार्यालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्लॉथ मार्केटमधील पूर्वीच्या केएमटी ऑफिसमध्ये रेकॉर्ड रुम होणार आहे. रेकॉर्ड रूम नव्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र कोर्टासाठी जागा उपलब्ध होईल.

स्वतंत्र कोर्टवर एक दृष्टीक्षेप

एक न्यायाधीश

एक स्टेनो, दोन कनिष्ठ लिपिक

दोन शिपाई

स्वतंत्र कोर्टातील न्यायाधीश व कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका करणार

कोर्ट निवासस्थान, आवश्यक साहित्य उपलब्धतेसाठी महापालिकेचा निधी

महापालिकेच्या बजेटमधून दरमहा साधारणपणे चार लाखांची तरतूद होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे हत्या खटल्याची २४ जूनला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीस मुंबई हायकोर्टाने २३ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणी २४ जूनपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे, समीरवरील आरोपनिश्चिती लांबणीवर पडली आहे.

समीरवर आरोप निश्चितीची घाई करू नये, अशी मागणी मेघा पानसरे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. गुरुवारी मुंबई हायकोर्टात यावर सुनावणी झाली. पानसरे हत्येचा सखोल तपास होण्याची गरज आहे. स्कॉटलंड यार्डकडून बॅलेस्टिक रिपोर्ट यायचा असल्याचे विशेष सरकारी वकील हर्षजित निंबाळकर यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने २३ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली.

शुक्रवारी सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी समीरचे वकील अॅड. एस. एस. पटवर्धन यांनी मुंबई हायकोर्टाची प्रत आपल्याला मिळाली नसल्याचे सांगितले. अॅड. निंबाळकर यांनी मुंबई हायकोर्टातील वृत्तांत कोर्टात सादर केला. हायकोर्टाने सुनावणीची तारीख २३ जून दिली असल्याचे निदर्शनास आल्यावर २४ जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली. दरम्यान, सुनावणीवेळी कडेकोट बंदोबस्तात समीरला कोर्टात हजर केले होते. सुनावणीवेळी उपस्थित असणाऱ्यांना पोलिसांनी बॅगा बाहेर ठेवायला लावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती’चे सहा हजारांवर सभासद अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतःच्या नावावर शेती असल्याचा पुरावा सादर न करणाऱ्या आणि किमान २० गुंठे शेती नसल्याने पोटनियमबाह्य सभासदत्व दिल्याबद्दल भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६ हजार ४६५ सभासदांचे सभासदत्व शुक्रवारी साखर सहसंचालक सचिन रावल यांनी रद्द केले. सभासदत्वाबाबतच्या सुनावणी पूर्ण होऊन निकाल दिला असल्याने आता कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

भोगावती कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाची सत्ता होती. या कालावधीत २०११ व २०१२ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ज्या सभासदांच्या नावावर ऊस क्षेत्राची नोंद नाही अशांना बेकायदेशीरपणे सभासद करुन घेतल्याची तक्रार सदाशिव चरापले यांनी केली होती. त्यांच्याबरोबर अन्य काहींनी केलेल्या तक्रारीनुसार वेळोवेळी मंजूर केलेल्या सभासदांची छाननी करुन मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांनी तसेच हायकोर्टानेही सभासदांची पात्रता तपासून घेण्याच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे छाननी करण्यात आली. दरम्यान संचालक मंडळाची मुदत संपल्याने कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमण्यात आले. याबाबत नेमआलेल्या छाननी समितीने करवीर तालुक्यातील ३३९७ व राधानगरी तालुक्यातील ४३५९ अशा ७७५६ सभासदांची कागदपत्रे, ऊस पुरवठा, जमीन याबाबत तलाठी यांच्याकडून तपासणी केली. त्यानुसार समितीने अपात्र ठरवलेल्या ७१३२ सभासदांना बाजू मांडण्यास मुभा दिली. त्यामध्ये पात्र असल्याबाबत, जमीनधारक, ऊस उत्पादक असल्याबाबतची कागदपत्रे तसेच लेखी व तोंडी पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अनेक सभासदांनी वैयक्तिकरित्या, वकिलांकरवी बाजू मांडली. कागदपत्रे सादर केली. त्यानुसार किमान २० गुंठे जमीन धारण करत असल्याचे, शेतजमीन असल्याचे तसेच सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याबद्दल ६४६५ सभासदांचे सभासदत्त्व रद्द केल्याचा आदेश सहसंचालक रावल यांनी दिला. त्याचवेळी ६६७ सभासद पात्र म्हणून जाहीर करण्यात आले.

जून २०१५ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपल्याने तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. पण सभासदांबाबतच्या तक्रारी असल्याने त्यांची सुनावणी पूर्ण झालेली नसल्याने निवडणुकीला अडथळा येत होता. मात्र आता सुनावणीचा निकालही सहसंचालकांनी दिल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असताना सरकारने दुष्काळी पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल, असे दिसते.

सभासदत्व रद्द केलेली कारणे

२० गुंठे जमीन नसलेले शेतकरी ५४२

शेतजमीनच नसलेले शेतकरी ११२३

सुनावणीवेळी गैरहजर राहिलेले शेतकरी ९९२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनजमीन वगळून विमानतळ विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागाची जमीन वगळून विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी विमान प्राधिकारणाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकसचिव व अदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमवेत बैठक झाली. विमानतळ विस्तारीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ​झालेल्या बैठकीत छोट्या विमानांची वाहतूक, ​जमीन हस्तांतरणासंबंधी गड मुडशिंगी गावाचा ठराव या विषयांवर चर्चा झाली.

वनखात्याच्या अखत्यारितील १० हेक्टर जमिन देण्याचा ठराव गड मुडशिंगी ग्रामपंचायतीकडून झालेला नसल्याने विमानतळ विस्तारीकरणाचे काम थांबले आहे. शुक्रवारी देवरा यांनी गड मुडशिंगी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तत्पूर्वी विमानतळ विस्तारीकरणाबाबत तीन प्रस्तावावर चर्चा झाली. मूळचा विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा बदलता येईल का, यावरही चर्चा झाली. सर्व शक्यतांची पडताळणी केल्यानंतर वनविभागाची जमीन वगळून विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी विमान प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सध्याच्या विमानतळावर छोटी विमाने उतरण्यासाठी कोणत्या सोयी हव्या आहेत, याबाबत विमानतळ प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यांनी पाठवलेल्या अभ्यास अहवालानंतर ताबडतोब बदल करण्यात येतील. हे बदल करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी राज्य सरकारने यापूर्वीच दर्शवली आहे.

वनखात्याची १० हेक्टर जमीन विमानतळांसाठी घेण्यासाठी वनखात्याने अनुकूलता दाखवली आहे. या जमिनीच्या बदल्यात वनखात्याला शाहूवाडी तालुक्यातील जमीन हस्तांतरीत करण्यात येणार आहे. वनखात्याच्या जमीन गडमुडशिंगी गावाच्या हद्दीत येते. ही जमीन विमानतळ विस्तारीकरणांसाठी द्यावी, असा ठराव ग्रामपंचायतीकडून आवश्यक आहे. त्यासाठी एक जुलैच्या आधी प्रयत्न करण्याची सूचना देवरा यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिली. गड मुडशिंगीचे उत्पन्न कमी असल्याचे तेथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे या गावच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. गावातील महसूल खात्याशी संबंधित प्रश्न सोडवण्याबाबत युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, करवीर प्रातांधिकारी प्रशांत पाटील, तहसिलदार योगेश खरमाटे, उप वनसरंक्षक रंगनाथ नायकडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडच्या प्रांताधिकाऱ्यांवरमारहाणीचा गुन्हा दाखलवडोली भिकेश्वर वाळू उपसा प्रकरण

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील अनाधिकृत वाळू उपशा प्रकरणी कारवाई दरम्यान जखमी झालेले सचिन काशीनाथ पवार (वय ३६ रा. कराड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रांताधिकारी किशोर पवार यांच्यावर मारहाणीचा (भा. दं. सं. ३२४ कलमाअंतर्गत) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सचिन पवार याच्यावर सध्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तळबीड पोलिसात कराडचे प्रांतअधिकारी किशोर पवार यांनी अनाधिकृरित्या वाळू चोरीची पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर शनिवारी पुकारलेला बंद मागे घेण्यात आला.

मागील गुरुवारी प्रशासनाने संयुक्तरित्या वडोली भिकेश्वर येथील बेकायदा सुरू असलेल्या वाळू उपशासंदर्भात कारवाईची धडक मोहिम राबवली होती. या कारवाईत कोट्यावधी रुपयांची साधनसामुग्री वापरून संबंधीत ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी या बाबत तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार वडोली भिकेश्वर येथील गट नं ५१२ व धनकवडी येथील ९६,९८,१०८ या गट नंबर मधील ३६ लाख २० हजार रुपये किमंतीची वाळू चोरून नेली आहे. यावेळी घटनास्थळी १ कोटी ६८ लाख ३२ हजार रुपये किंमतीची ट्रक, पोकलॅडसह इतर साधनसामुग्री मिळून आली आहे. तसेच ८३ ब्रास वाळू व ३३ ट्रक, पाच पोकलॅड मिळून आले आहेत. एकूण ९०५ ब्रासचे अनाधिकृत वाळू उत्खनन करून सरकारच्या मालकीचे ३६ लाख २० हजार रुपये किंमतीची वाळू चोरी केली आहे. यावरून सुधीर विलास साळुंखे (रा. वडोली भिकेश्वर ता. कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यात आला आहे. याचा अधिक तपास तळबीडच्या स.पो.नि विद्या जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलदूत’साठी मुंबईच्याव्यापाऱ्यांकडून एक कोटींचा निधी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतून लातूरची तहान भागविण्यासाठी धावत असलेल्या जलदूतचा खर्च भागविण्यासाठी मुंबईच्या व्यापाऱ्यांची संघटना 'मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्स' सरसावली आहे. व्यापाऱ्याच्या या संघटनेने एक कोटी रुपयांचा निधी रेल्वेकडे जमा केला आहे, अशी माहिती पुणे विभागीय तांत्रिक विभाग प्रबंधक कृष्णात पाटील यांनी दिली.

मराठावाड्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने पाच एप्रिल रोजी मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी नेण्याचा निर्णय घेतला. केवळ चारच दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होऊन लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दहा एप्रिल रोजी पहिली जलदूत एक्स्प्रेस लातूरला धावली. लातूरला आजअखेर सुमारे १३ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्यात आला आहे. या यशस्वी उपक्रमाचे देशभरात कौतुक झाले. पण, जलदूतचा खर्चही मोठा आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सने जलदूत एक्स्प्रेसच्या सुमारे पावणे सहा कोटी रुपये भाड्यांपैकी एक कोटी रुपये दिल्याची माहिती पुणे विभागीय तांत्रिक विभाग प्रबंधक कृष्णात पाटील यांनी दिली.

१०एप्रिल रोजी जलदूत एक्स्प्रेस पहिल्यांदा दहा टँकर घेऊन धावली. त्यानंतर १९ एप्रिल रोजी पूर्ण क्षमतेने ५० टँकरने पाणीपुरवठा होऊ लागला. आज अखेर ५८ फेऱ्यांद्वारे सुमारे १३ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. रेल्वेतून होणाऱ्या या पाणीपुरवठाचे एकूण रेल्वे भाडे सुमारे सहा कोटी रुपये इतके झाले आहे.

मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सने जलदूत एक्स्प्रेसच्या पावणे सहा कोटी रुपये भाड्यांपैकी एक कोटी रुपये भाडे रेल्वेला दिले. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एक कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. हा निधी लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलदूत एक्स्प्रेससाठी वापरावा, अशी विनंतीही केली. त्यानुसार हा निधी रेल्वे पुणे विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती तांत्रिक विभागाचे प्रबंधक कृष्णात पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमीयुगुलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस असल्याचा बहाणा करून प्रेमीयुगुलांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. चोरीचे दागिने विकत घेणारा सोनारही पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, पोलिसांनी या दोघांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कविराज हेमंत नाईक (वय ३०, रा. नारायणी बंगला, देवकर पाणंद) या तोतया पोलिसासह सोनार मयूर पोतदार (३४, रा. खरी कॉर्नर, कोल्हापूर) यांना अटक केली.

गुरुवारी (ता.९) राजाराम तलाव परिसरात प्रेमीयुगुल त्यांच्या कारमध्ये बोलत बसले होते. यावेळी मोटारसायकलवरून तिथे आलेल्या एकाने आपण पोलिस असल्याचे सांगत चौकशीस सुरुवात केली. पोलिस स्टेशनला घेऊन जाण्याची भीती दाखवत त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी आणि रोख रकमेसह ४२ हजारांचा ऐवज लंपास केला. यानंतर संबंधित प्रेमीयुगुलाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजाराम तलाव, शिवाजी विद्यापीठ आणि चित्रनगरी परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, शनिवारी (ता. ११) संध्याकाळी राजाराम तलाव परिसरात आलेला एक संशयित प्रेमीयुगुलांना हटकण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्या मोटारसायकलवर 'पोलिस' असे लिहिलेले स्टिकर मिळाले. दुचाकीचे स्टिकरही पोलिसांच्या लोगोचे होते. याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याला ठाण्यात आणले. कविराज हेमंत नाईक असे याचे नाव असून, त्याने पोलिस असल्याची बतावणी करून १४ ठिकाणी लूटमार केल्याची कबुली दिली. त्याने शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव, चित्रनगरी, शेंडापार्क, पन्हाळा आदी ठिकाणी लूटमार केली आहे. नाईक याने लुटलेले दागिने मयूर पोतदार या सोनाराकडे विकले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याच्या चार चेन, पाच अंगठ्या असा दीड लाखांचा ऐवज जप्त केला, त्याचबरोबर ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकलही जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरघोड्यांचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुरघोड्यांच्या राजकारणामुळे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे साडेसहा हजार सभासद अपात्र झाल्याने त्याचा थेट दोन्ही काँग्रेसना फटका बसणार आहेच. पण सहा वर्षे सत्तेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जरा जास्तच फटका बसेल असे दिसते. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात एकवटलेल्या मित्रपक्षांची मोट आगामी निवडणुकीतही बांधली जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला बराच आटापिटा करावा लागणार आहे.

भोगावती सहकारी साखर कारखान्यात २०१० पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोघे सत्तेत होते. त्यामुळे या कालावधीत या दोन्ही पक्षांच्यावतीने सभासद करण्यात आले होते. २०१० च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप अशा मित्रपक्षांना एकत्र केले. यामध्ये काँग्रेस म्हणजे पी. एन. पाटील यांचे विरोधकच अधिक असल्याने ही निवडणूक राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी जिंकली. त्यानंतर आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुरघोड्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यातून काँग्रेसचे सदाशिव चरापले यांनी राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कालावधीत झालेल्या सभासदांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. त्याची तक्रार झाल्यानंतर २०१० पूर्वीच्या सभासदांबाबतही तक्रार झाली. यातून दोन्ही तक्रारींनुसार सभासदांच्या छाननीची प्रक्रिया सुरू झाली. यामधून दोन्ही पक्षांनी सत्तेच्या कालावधीत बेकायदेशीरपणे केलेले सभासदत्व रद्द झाले. यामधून सत्ताधारी कुणीही असले तरी बेकायदेशीरपणे सभासद करण्याचे प्रमाण हे असते हेही स्पष्ट झाले.

सभासद नोंदणी रद्द झालेल्या साडेसहा हजार सभासदांमध्ये इतर कुणी नव्हे तर दोन्ही काँग्रेसच्या कालावधीतच सभासद नोंदले गेले आहेत. फक्त राष्ट्रवादी गेल्या सहा वर्षांपासून सत्तेत असल्याने त्यांच्याकडून केलेल्या सभासदांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीलाच याचा मोठा फटका बसेल असे मानले जात आहे. मात्र, सभासद नोंदणी ही गावपातळी, संचालकनिहाय केली जात असल्याने आगामी निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानावरूनच फटका कसा बसला हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

३६ हजार सभासद असलेल्या या कारखान्यातील साडेसहा हजार सभासद रद्द झाले असले तरी निवडणुकीतील समीकरणावर बरेच अवलंबून आहे. यावेळीही पी. एन. पाटील यांच्याविरोधी गट राष्ट्रवादीकडून एक​त्रित केले जाण्याची शक्यता आहे. करवीर तालुक्यातील शिवसेना, शेकापचे कार्यकर्ते, जनता दल हे सारे राष्ट्रवादीबरोबर जातील असे दिसते. पण गेल्यावेळी काही जागांमुळे आघाडी तोडण्यापेक्षा आघाडीत आलेले मित्रपक्ष यावेळी कोणती भूमिका घेतात यावरही बरेच राजकारण अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीपर्यंत पी. एन. पाटील यांच्या गटात असलेले सदाशिवराव चरापले हे काँग्रेसमध्येच असले तरी सतेज पाटील यांच्या गटात गेले आहेत. मात्र, राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला मोठा आटापिटा करावा लागेल, असेच दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म.टा.तर्फे बुधवारी ‘हेरिटेज वॉक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराची ओळख हेरिटेज अशीच आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या आपल्या शहरात प्रागैतिहासिक काळापासून अगदी ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतच्या अनेक वास्तू दिसतात. यातील काही वास्तूंचा इतिहास आणि त्यांचे कोल्हापूरच्या ‌विकासातील योगदान जाणून घेण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित हेरिटेज वॉकमधून '‌मटा'च्या वाचकांना मिळणार आहे. १५ जून रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत 'हेरिटेज वॉक'चे आयोजन केले आहे.

बिनखांबी गणेश मंदिरपासून ते बिंदू चौक या मार्गावर 'हेरिटेज वॉक' होणार आहे. त्यात बिनखांबी गणेश मंदिर येथील रंकोबा मंदिर, इंदुमती हायस्कूल परिसरातील महादेव मंदिर व बुद्ध मूर्ती, तुळजाभवानी मंदिरमधून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हेरिटेज वॉक घेण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यात काही पुरातन वॉल पेंटिंग्ज आहेत. त्याचीही माहिती वॉकमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर मेन राजाराम हायस्कूल आणि ऐतिहासिक करवीर नगर वाचन मंदिराला भेट देऊन बिंदू चौकात 'हेरिटेज वॉक'ची सांगता होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबच्या वाचकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, तो सर्वांसाठी मोफत असणार आहे. यात कोल्हापुरातील मोडी लिपी अभ्यासक अमित अडसुळे मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ हेच अंतिम ध्येय

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com
कोल्हापूरसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, हे माझ्या कार्यकाळातील अंतिम ध्येय असेल. यासाठी राज्य सरकारसह मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करावे लागेल, त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील वकिलांची नव्याने संघटनात्मक पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती अॅड. प्रकाश मोरे यांनी सांगितले. जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधला.

प्रश्न ः येणाऱ्या वर्षभरात तुमच्यासमोर सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे?

कोल्हापूरसह आसपासच्या पाच जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि नागरिक गेल्या २७ वर्षांपासून खंडपीठासाठी आंदोलन करीत आहेत. उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. खंडपीठासाठी इमारत उलब्ध आहे काय? असा प्रश्न मुख्य न्यायमूर्तींनी विचारला होता, त्यामुळे इमारतीच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ ते २० जूनच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठाच्या इमारतीसाठी आर्थिक तरतूद करण्याचे आवाहन करू. शेंडा पार्क येथील जागेसाठी महापालिकेने ठराव करावा यासाठी आयुक्त, सर्व पक्षांच्या प्रमुखांसह प्रत्येक नगरसेवकांनाही निवेदन देणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे. हे आंदोलन योग्य रितीने पुढे नेण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील वकिलांना भेटून नव्याने संघटनात्मक बांधणी करावी लागेल. हा लढा आता निर्णायक वळणावर असल्याने गेल्या २७ वर्षांतील स्वप्न साकार होईल अशी खात्री आहे.

प्रश्न ः गेल्या दोन वर्षांत आंदोलनाची तीव्रता वाढूनही निर्णय झाले नाहीत, त्यामुळे नव्याने आंदोलनाचे स्वरूप कसे असेल?

वकिलांनी नेहमीच सनदशीर मार्गाने आंदोलन केले आहे. तब्बल २७ वर्षे न्याय्य मागणी करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. गेल्या वर्षभरात दोनवेळा कामबंद आंदोलन करून खंडपीठ कृती समितीने आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील वकिलांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला होता. आता पुन्हा एकदा नव्याने आंदोलन करण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील बार असोसिएशनची लवकरच बैठक होईल. सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या सूचनांनुसार पुढील दिशा ठरवली जाईल. चर्चेच्या माध्यमातून खंडपीठाचा प्रश्न सुटावा अशीच आमची इच्छा आहे. मात्र, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा तीव्र करण्याचीही आमची तयारी आहे. यावेळी वकील आणि पक्षकारांसोबत नागरिकही आंदोलनात असतील. हे आंदोलन नक्कीच निर्णायक होईल.

प्रश्न ः न्यायसंकुलाच्या नवीन इमारतीतील सोयीसुविधांसाठी काय प्रयत्न करणार?

न्यायसंकुलाच्या नवीन इमारतीमुळे प्रशस्त जागा मिळाली आहे. मात्र, या इमारतीत वकिलांसाठी अनेक गैरसोयी होत्या. वकिलांसाठी स्वतंत्र लिफ्ट, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह निर्माण करावे यासाठी न्यायाधीशांची भेट घेतली आहे. लवकरच या मागण्यांची पू्र्तता होईल. न्यायसंकुलाच्या परिसरात हिरवळ वाढविण्यासाठी २०० रोपे लावण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ५० रोपे लावली आहे. लवकरच न्यायसंकुलाचा परिसर हिरवळीने बहरेल. न्यायाधीश पदाच्या परीक्षा देणाऱ्या वकील सहकाऱ्यांसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्याची सोय करणार आहे.

प्रश्न ः बार असोसिएशनमार्फत वकिलांसाठी कोणत्या सुविधा देणार आहात?

अनेकदा महसूल कोर्टात वकिलांना दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे वकिलांच्या वेळेचा अपव्यय होतो आणि काही महसूल अधिकारी वकिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देतात. हे प्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आवाहन करू. याशिवाय महसूल कोर्टातील खटले दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत यावेत अशीही आमची मागणी आहे. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वकिलांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा विचार आहे. लवकरच नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करणार आहे. या माध्यमातून वकील सहकाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील.

प्रश्न ः बार असोसिएशनची सामाजिक बांधिलकी काय आहे?

बार असोसिएशनने नेहमीच सामाजिक बांधिलकीचे भान राखले आहे. कोल्हापूरच्या सर्वच सामाजिक प्रश्नांमध्ये बार असोसिएशन अग्रभागी राहिली आहे. टोलविरोधी लढा, पर्यावरणरक्षण, नागरिकांना कायद्यांची माहिती मिळावी यासाठी बार असोसिएशन प्रयत्नशील आहे. विशेषतः शहरातील वृक्षारोपणासाठी बार असोसिएशन विविध सामाजिक संघटनांसोबत काम करेल, त्याचबरोबर समाजविधायक कामांमध्येही नेहमीच सहभाग असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचा जोर का झटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

महावितरण कंपनीने लघुदाब आणि उच्चदाब वीज आकारणीत मोठा बदल केल्यामुळे त्याचा फटका रॅपिअर व एअरजेट कारखानदारांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागणार आहे. लघुदाब दराने आकारणी होणाऱ्या कारखानदारांचा समावेश उच्चदाब वर्गात समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रात लागू करण्यात आल्याने या परिक्षेत्रातील कारखानदारांवर पुन्हा एकदा संकट कोसळणार आहे. सात जून रोजी याबाबतचे आदेश महावितरणने जारी केले आहेत.

महावितरण कंपनीचे सतत बदलते धोरण उद्योगांना घातक ठरत आहे. कोणताही निर्णय करण्यापूर्वी सर्वंकष विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. शिवाय घेतलेला निर्णय योग्य असेल तर तो कायमस्वरूपी राबवावा यात गैर काहीच नाही. परंतु महावितरणच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे उद्योजकांची मानसिकता बिघडत चालली असून त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केला आहे.

महावितरण कंपनीने १५ ऑक्टोबर २०१५ रोजी काढलेल्या आदेशात एलटी (लघुदाब) वीज कनेक्शनची मर्यादा ८० केव्ही (१०७ अश्वशक्ती) वरुन १५० केव्ही (२०१ अश्वशक्ती) केली होती. ती महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रासाठी लागू केली होती. त्यामुळे नविन उद्योग वाढीसाठी चालना मिळाली. यापूर्वी ८० केव्हीच्या वरील कनेक्शन एचटी (उच्चदाब) मध्ये गणले जात होते. त्याचा वीजदर हा जास्त आकारला जात होता. त्याची मर्यादा १५० केव्ही झाल्याने लघु उद्योगांना कमी दरात वीज पुरवठा उपलब्ध होत होता. परंतु ७ जून २०१६ रोजी काढलेल्या नविन आदेशाप्रमाणे ही सवलत केवळ महापालिका क्षेत्रातील उद्योगांसाठी लागू केली आहे. तर महापालिका क्षेत्राबाहेरील उद्योगांसाठी मात्र ८० केव्हीचीच मर्यादा ठेवली आहे. महावितरणने आठ महिन्यापूर्वी जारी केलेल्या आदेशात पुन्हा बदल केल्याने केवळ मोठ्या उद्योजकांच्या लाभासाठीच हे चालले असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

यंत्रमागधारक चक्रावले

यंत्रमागधारकांकडून जादाचे घेतलेले इंधन अधिभार पाच महिन्यात परत मिळणार अशी घोषणा सरकारने केली होती. उशीरा का होईना सरकारने ते परत देण्याचे काम मे महिन्यापासून सुरु केले. पण महावितरणच्या बदलत्या धोरणामुळे त्याला ब्रेक लागला आहे. जून महिन्यात वितरित करण्यात आलेल्या बिलांमध्ये इंधन अधिभार वजा करण्याऐवजी त्याची आकारणी करण्यात आलेले बिल हातात पडले आहे. हे बिल पाहून यंत्रमागधारक चक्रावून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला चेहरा, पश्चिम महाराष्ट्रात ताकद

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूरः थेट निवडणुकीच्या राजकारणात अपयश आल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना आपला मार्ग बदलला. समाजकारण आणि चळवळीच्या माध्यमातून राज्यभर त्यांनी वेगळी प्रतिमा निर्माण केली. अशा प्रतिमेच्या नेत्याच्या शोधात असलेल्या भाजपने संभाजीराजेंना खासदार करत पक्षाची प्रतिमा बदलण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट खेळी केली आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या वारसदारांना संधी देत त्यांचा सन्मान राखत मराठा समाजाचा पक्षातील पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

राजकारणापासून काहीसे लांब असलेल्या संभाजीराजेंनी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मोठी स्पर्धा असतानाही त्यांना उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे तेव्हा शिवसेना, काँग्रेस, भाजप हे सारे पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छूक होते. मात्र लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी पुन्हा राजकारणाशी काही प्रमाणात फारकत घेतली. समाजकारणाला महत्व देत कामाचा धडाका मात्र सुरूच ठेवला. स्थानिक राजकारणात न अडकता महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी नेटाने पुढे रेटला. शिवराज्याभिषेक दिन सोहळा आणि गडकोट संवर्धनाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळे राज्यभर त्यांची ओळख निर्माण झाली. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याबद्दल जनतेच्या मनात अत्यंत सन्मानाची भावना आहे. त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संभाजीराजेंनी धडपड सुरू केल्याने त्यांच्याबद्दलही मराठवाडा, विदर्भात अतिशय चांगली प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीने त्याचा पुरावा मिळू लागला.

राज्यभर संभाजीराजे फिरू लागल्याने त्यांच्याकडे भाजपचे लक्ष वेधायला वेळ लागला नाही. यातूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर वेगळ्या पद्धतीने हा चेहरा भाजपशी जोडण्याचा पर्याय भाजप शोधत होता. यातूनच राज्यसभेचा पर्याय पुढे आला. दोन वर्षे भाजपचे काही नेते संभाजीराजेंच्या संपर्कात होते. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये अधिक रस होता. राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार आणि स्वच्छ आणि लढाऊ प्रतिमा असलेले संभाजीराजे पक्षात असावेत, यासाठी फडणवीस प्रयत्न करत होते. त्यामुळे संभाजीराजेंनी​ दिलेले कोणतेही निमंत्रण त्यांनी नाकारले नाही. शिवराज्याभिषेक दिन सोहळा आणि शिवनेरी किल्यावरील शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी संभाजीराजेंना योग्य तो संदेश दिला.

दोन महिन्यांपासून या प्रकियेला वेग आला. १६ मे रोजी एक संयुक्त बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संभाजीराजेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले. त्यातून राज्यसभेचा पर्याय पुढे आला. संभाजीराजेंनी मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्राच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर घेण्याचे निश्चित झाले. पण, काही अडचणी आल्याने तो पर्याय लांबणीवर पडला. राष्ट्रपती कोट्यातून त्यांना राज्यसभेवर नियुक्त करण्याचे ठरले. महाराष्ट्राच्या कोट्यातून त्यांची निवड झाली असती तर त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असते, त्यामुळे ते टाळून राष्ट्रपती कोट्यातून खासदार करण्यात आले.

अलिकडच्या काळात काँग्रेसने विशेषतः नारायण राणे, नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचा लढा हायजॅक केला होता. भविष्यकाळात याचा फार मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्यभर लढणारे संभाजीराजे आपल्यासोबत असावेत, असे भाजपला वाटत होते. त्यामुळेच त्यांनी राजेंना पसंती दिली. त्यांना पक्षात घेण्यात सर्वांत मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली ती मुख्यमंत्र्यांनीच. याला भाजप अथवा या पक्षाला मदत करणाऱ्या कुणाचाही फारसा विरोध झाला नाही, कारण संभाजीराजेंचा उपद्रव कुणाला नसतो. त्यांनी वाटच वेगळी केल्याने त्यांच्या वाटेत काटा येण्याचे कारणच नव्हते.

एका दगडात दोन पक्षी

संभाजीराजेंना खासदार करून भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजपवर जो ब्राह्मण्यवादी शिक्का आहे, तो पुसण्यास ही नियुक्ती उपयोगी पडणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या वारसदारांना संधी देत त्यांना भाजपमध्ये आणण्यात भाजप यशस्वी होणार आहे. राजघराण्यावर अजून लोकांची निष्ठा आहे, प्रेम आहे. त्यामुळे जनतेत वेगळा मेसेज जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ताकद वाढवायची आहे. ही ताकद वाढतानाच राज्यभर पक्षाचा ​चेहरा तयार होण्यास मदत होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांशी लढा देताना हा चेहराच त्यांना उपयोगी पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरेंद्र तावडेचे कोल्हापूर कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेला सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याची एसआयटीकडूनही चौकशी होणार आहे. तावडेचे सहा वर्षे कोल्हापुरात वास्तव्य होते आणि तो सनातन संस्थेचा जिल्हा संघटक म्हणून कार्यरत होता, हेही स्पष्ट झाले आहे. कॉम्रेड पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड आणि तावडेच्या संबंधांची आता चौकशी होणार आहे. यातून महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना येताच एसआयटीचे कोल्हापुरातील अधिकारी चौकशीसाठी पुण्याला जाणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी (ता. १०) तावडे याला अटक केली. कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणी एयआयटीने समीर गायकवाडला अटक केल्यानंतर आता डॉ. दाभोलकर हत्येसंदर्भातही पुन्हा सनातनच्याच साधकाला अटक झाल्याने एसआयटीकडून तावडेची चौकशी होणार आहे. गायकवाड आणि डॉ. तावडे सनातनच्या आश्रमात एकत्र काम करीत होते. त्यामुळे दोन्ही हत्यांबाबत त्यांच्याकडे महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. एसआयटीकडूनही डॉ. तावडेची सखोल चौकशी होणार आहे.

दरम्यान, तावडे हा २००२ ते २००८ या कालावधीत कोल्हापुरात साइक्स एक्स्टेन्शन परिसरात वास्तव्यास होता. गंगावेशीतील आर्य क्षत्रीय भवनच्या पहिल्या मजल्यावर त्याचे हॉस्पिटल होते. त्याची पत्नीही डॉक्टर असून, हे दोघेही हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. मात्र सनातनमध्ये सक्रीय असलेल्या तावडेकडे कालांतराने जिल्हा संघटकपदाची जबाबदारी आली. तावडेनेच जिल्ह्यात सनातनचे जाळे वाढवल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील आणि प्रवीण लिमकर यांच्याशी त्याची जवळीक होती. २००८ मध्ये त्याने कोल्हापुरातील घर विकले आणि कुटुंबासह तो साताऱ्यात राहू लागला. पुढे दीड वर्षातच तो पनवेल येथे राहायला गेला. तावडेच्या मोबाइल संभाषणातून डॉ. दाभोलकरांच्या हत्येसंदर्भात संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने अटकेची कारवाई केली. यातून डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तावडेचे कॉल डिटेल्स तपासणार

मोबाइलवरील संशयास्पद संभाषण आणि इ मेलमुळे तावडे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्या संभाषणातून पोलिसांना पूरक माहिती मिळणार असल्याने त्याचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत. सनातनच्या अनेक साधकांशी त्याचा नियमित संपर्क होता. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येबाबतही महत्त्वाचे धागे दोरे मिळण्याची पोलिसांना अपेक्षा आहे. कॉल डिटेल्समधून इतर संशयितांचीही माहिती पोलिसांना मिळणार आहे.

पानसरे हत्या तपासातही संशय

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेवर संशय आल्याने पोलिसांनी साधकांकडे चौकशी सुरू केली होती. त्यादरम्यान तावडे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवर आला होता. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांत सहभागी असणाऱ्या तावडेच्या विरोधात पोलिसांना पुरेसे पुरावे मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला अटक झाली नव्हती. सीबीआयने अटक केल्यानंतर आता एसआयटीकडून होणाऱ्या चौकशीत तावडेकडून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हॉस्पिटलकडे दुर्लक्ष

डॉक्टर असलेल्या तावडे दाम्पत्याचे हॉस्पिटल गंगावेशीतील मुख्य मार्गालगत होते. अगदी वर्दळीच्या ठिकाणी हॉस्पिटल असूनही त्यांच्याकडे पेशंटची वर्दळ नव्हती. हॉस्पिटलपेक्षा हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमांत त्यांचा वावर वाढला होता. त्यामुळे सनातनच्या संघटनात्मक कामासाठीच ते कोल्हापुरात राहिले होते, अशी चर्चा आहे.

संपर्कातील व्यक्तींची होणार चौकशी

डॉ. वीरेंद्र तावडे सहा वर्षे कोल्हापुरात होता. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्थांच्या अनेक कार्यकर्त्यांशी त्याची जवळीक होती. जिल्हा संघटक म्हणूनही त्याने काम केल्याने कोल्हापुरातील अनेकांशी संपर्क आला आहे. तावडे याच्या संपर्कातील व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

सहा संशयित रडारवर

मडगाव स्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील, प्रवीण लिमकर यांच्यासह इतर सहा संशयितांशी तावडे याचा संपर्क आला असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे या सहा संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.

तावडेच्या अटकेनंतर तपासाला गती येईल, अशी अपेक्षा आहे. तिन्ही हत्यांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आम्ही पूर्वीच केली आहे. तावडेच्या अटकेने पानसरे हत्येचेही धागेदोरे मिळतील, मात्र या तपासाला गती आली पाहिजे. तपास सीमित राहिल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. सीबीआयने तपासाची मर्यादा वाढवावी. यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेऊ.

मेघा पानसरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीराजे राज्यसभेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापुरात सायंकाळी हे वृत्त समजताच संभाजीराजेंच्या समर्थकांनी शहरभर जल्लोष केला. शिवराज्याभिषेक सोहळा, मराठा आरक्षणाची लढाईच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत आलेल्या संभाजीराजेंना भाजपने संधी देत पश्चिम महाराष्ट्रात आपला पाया भक्कम करण्याचा आणखी एक यशस्वी प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

त्यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस संभाजीराजे भाजपच्या वाटेवर असल्याचे आणि त्यांना राज्यसभेवर संधी मिळणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला सायंकाळी या नियुक्तीने पूर्णविराम मिळाला.

लोकसभा निवडणूक लढवलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या काही वर्षांत वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. शिवराज्याभिषेक दिन सोहळा आणि मराठा आरक्षण लढाईबरोबरच राज्यभर गडकोट संवर्धनाच्या माध्यमातून वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. संभाजीराजेंसारखी व्यक्ती भाजपमध्ये यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिने प्रयत्न करत होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरला होता. यातूनच संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग सुकर झाला. यापूर्वी या घराण्यातील विजयमाला राणी सरकार लोकसभेवर तर मालोजीराजे विधानसभेवर निवडून गेले होते. राजघराण्याला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

यांच्यासोबत युवराज संभाजीराजे छत्रपती रायगड येथे ६ जूनला शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची तसेच सर्व गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेवर नियुक्त करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या सोलापूर ते कोल्हापूरदरम्यानच्या पट्ट्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल, असे म्हटले जात आहे.

राष्ट्रपती नियुक्त जागेसाठी सरकारकडून सुरुवातीला ऑल वर्ल्ड गायत्री परिवाराचे प्रमुख प्रणव पंड्या यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पंड्या यांनी सरकारकडून मिळणारा हा सन्मान नम्रपणे नाकाराला. त्यानंतर त्यांच्याऐवजी संभाजीराजे यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावाची घोषणा होताच सायंकाळी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. आज (रविवारी) दिवसभर संभाजीराजे न्यू पॅलेसवर जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा राज्यसभेत नेण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. ही नियुक्ती अत्यंत सन्मानजनक झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळेच ही संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या मुद्दापेक्षा शिव-शाहू विचारांचा हा सन्मान महत्त्वाचा आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासवर फुलला ‘सातारीतुरा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात 'सातारीतुरा' उमलला आहे. 'सातारान्सिस' हे फूल पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. तसेच या हंगामात पाचगणी आमरी, पांढरा सापकांदा, छोटा नागरमोथा ही फुलेही उमलली आहेत. उन्हाळ्याची सुटी काही दिवसच बाकी असल्याने राज्याच्या विविध भागांतून पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीत दाखल होऊ लागले आहेत. त्यातच दुर्मीळ फुले फुलल्याचे समजल्यावर त्यांची पावले कासच्या दिशेने वळायला लागली आहेत.

पांढरा सापकांदा, छोटा नागरमोथा, पाचगणी आमरी सध्या काही ठिकाणी ही फुले फुलली आहेत. तसेच या फुलांचा साधारण पंधरा दिवसांचा हंगाम राहतो.

मे महिन्यात गेळा, तोरण, करवंद, भोमा, आसाना, आंबा, फणस झाडावर येणारी पांढरी आमरी हे आर्कीड येऊन गेले. हे आर्कीड ज्या भागात येते तो परिसर निसर्ग समृद्ध मानला जातो. तसेच पांढऱ्या मानेचा काळा करकोचा पक्षी साधारण सव्वा फूट उंच पाय असणारा या दिवसात तलावाच्या परिसरात बेडूक, भुईकिडे खाण्यास येतो. त्याचे दर्शन होताना दिसत आहे, अशी माहिती बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली.

'पाचगणी आमरी' ची क्रेझ

पाचगणी आमरी या फुलाला 'अबनारिया पाचगणीसीस' या नावानेही ओळखले जाते. जमिनीत येणारे हे फूल असून, त्याचा हंगाम पंधरा दिवसांचा असतो. फुले पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पांढरा सापकांदा हे फूल पर्यटकांना भुरळ घालत असून, त्याचे शास्त्रीय नाव 'आरोशिमा मुदाई' आहे. हिरवी दांडी, तोंड पांढरे, सापासारखे वाकलेले असते. त्यामुळे त्याला 'पांढरा सापकांदा' असे म्हटले जाते.

सातारीतुरा या फुलांना शास्त्रीय भाषेत 'अपोनोजेटॉन सातारान्सिस' म्हणूनही ओळखले जाते. दुर्मीळ वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्कीड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी वाय आकाराचा तुरा येतो. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते.

गवताच्या जातीतील छोटा नागरमोथा (लव्ही) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कानातल्या फुलाप्रमाणे पाच पाकळ्यांचे फूल असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करिअरसाठी इंजिनीअरिंगच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची शंभर टक्के हमी आहे. उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना करिअरसाठी इंजिनीअरिंगचा मार्ग स्वीकारावा,' असे मत तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य एस. व्ही. आणेकर यांनी व्यक्त केले.
अभियांत्रिकी शिक्षण का आणि कसे? विषयावर प्राचार्य एस. व्ही. आणेकर म्हणाले, 'दहावी-बारावीनंतर पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने पालकांना पडतो. विद्यार्थ्यांला मिळालेले गुण, संबंधित शाखेची आवड आणि भविष्यात नोकरी, व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या संधीचा अंदाज घेऊन करिअरसाठी शाखेची निवड केली जाते. जागतिकीकरणाच्या युगात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुवर्णंसंधी आहे. हा अभ्यासक्रम केलेला एकही विद्यार्थी बेरोजगार राहू शकत नाही. सरकारी, निमसरकारी क्षेत्रात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे. त्यासह स्वतःचा व्यवसायही करू शकतात. उत्पादन, बँक, विमा यासह अन्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. जगातील नामवंत कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात. त्यातून इंजिनीअरिंगच्या हजारो विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससीतही झळकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी आणि उद्योगाची हमी आहे. '
तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख बी. व्ही. बिराजदार यांनी बदललेल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती सांगितली. ते म्हणाले, 'इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत तीन राउंड होणार आहे. तीन राउंडमध्ये रिक्त राहिलेल्या जागा चौथ्या राउंडमध्ये भरल्या जातील. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत एआरसीमध्ये प्रवेशाचे कीट दिले जातील. १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करावे लागणार आहे. कॉलेजची निवड करताना पसंतीक्रम अत्यावश्यक आहे. कारण एकदा दिलेला पसंतीक्रम बदलता येणार नाही. त्यामुळे कॉलेजची निवड करताना विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. इंजिनीअरिंगसाठी असलेल्या शुल्काची माहिती काळजीपूर्वक घेण्याची गरज आहे. खुल्या प्रवर्गातील आणि मागासवर्गींय उमेदवारांसाठी प्रवेश अर्जाचे आणि शैक्षणिक शुल्क वेगळे आहे. काही राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक शुल्काची परिपूर्ती केली जाते. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. कास्ट व्हॅलिडीटी होत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्क दिले जात नाही. कॉलेजचे विकास शुल्क निधी हा वेगळा आहे. त्याची माहिती प्रवेशाच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने घेणे गरजेच आहे. पसंती क्रमाकॉलेजमध्ये पहिल्या राउंडमध्ये प्रवेश निश्चित होईल, असे सांगता येत नाही. त्यामुळे पसंतीक्रम देताना विचारपूर्वक द्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात भाजपचा मार्ग प्रशस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवराज्याभिषेक सोहळा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यपातळीवर युवकांचे संघटन करणाऱ्या युवराज संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर सदस्यत्व देऊन भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे घट्ट रुजविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेव महाडिक यांचा गट भाजपसोबत आहे. आता लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे यांना सोबत घेऊन त्यांचाही गट जोडण्याचे काम पक्षाने केले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्याचा काही प्रमाणात भाजपला लाभ होऊ शकतो.

छत्रपती घराण्यातील संभाजीराजे यांची जशी राज्यात प्रतिमा आहे, तशीच जिल्ह्यातही आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी जिल्ह्यात गटबांधणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागात त्यांनी सर्वात जास्त लक्ष केंद्रीत केले होते. या डोंगराळ तालुक्यांमधून संभाजीराजे यांनी संपर्क वाढवून युवक कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. २००९साली राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकसभा निवडणूक लढवताना त्यांना त्याचा मोठा फायदा झाला होता. कागल विधानसभा मतदारसंघानंतर त्यांना चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली. चंदगडमध्ये त्यांना ७६ हजार तर तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना ६८ हजार मते मिळाली होती.

संभाजीराजे यांना मिळालेली ही मते त्यांच्या गटाच्या ताकदीचे द्योतकच होते. या गटामध्ये जिल्ह्यातील राजकारणात फार मोठे स्थान असणारे कार्यकर्ते नसले तरी संभाजीराजे यांना मानणारे, त्यांच्यासाठी झटून काम करणारे कार्यकर्ते ही त्यांची मोठी बाजू आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भाने संभाजीराजे यांच्या राज्यातील प्रतिमेचा भाजपला फायदा होईलच. पण सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या सुरू झालेल्या जिल्ह्यातील निवडणुकीच्या हालचालींसाठीही भाजपला फायदा मिळेल, असे मानले जाते.

भाजपने स्थानिक पातळीवरील नेत्यांचा आधार घेण्याचे धोरण अवलंबले आहे. नुकतेच पेठवडगाव येथील डॉ. अशोक चौगुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही तालुक्यांमध्ये भाजपला अशा पद्धतीनेच आगामी निवडणुकांच्या काळात प्रवेशाचे काम करावे लागणार आहे. अशावेळी संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांनाही ही संधी मिळू शकते. सध्या महाडिक गट भाजपसोबत असल्याने दोघांच्या माध्यमातून भाजपला या निवडणुकांमध्ये पाळेमुळे रुजवण्याची संधी आहे.

लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेकडून आतापासूनच तयारी चालू केली आहे. संभाजीराजे यांना भाजपने सोबत घेऊन जिल्ह्यातील खासदारकीचा एक उमेदवार आपल्या गोटात सहभागी करुन घेतला आहे. तीन वर्षात बऱ्याच घडामोडी होऊ शकत असल्याने त्यावेळी कोण, कुठल्या ठिकाणी थांबतो यावर उमेदवारी कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे.

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा

भाजपने सध्या जिल्ह्यात हातपाय पसरण्याच्या फायद्याबरोबरच राज्यातील मराठा आरक्षण चळवळीतील चेहऱ्याचा फायदा संभाजीराजे यांच्या माध्यमातून घेण्याचे ठरवल्याचे दिसून येते. मात्र राज्यसभेवर नियुक्तीनंतर भाजप आणि संभाजीराजेंच्या संबंधांवरुन सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये काही जुन्या संदर्भाचे दाखलेही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीला हवी प्रशिक्षणाची जोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'केवळ पदवी मिळविली म्हणजे नोकरी मिळत नाही. त्यासाठी प्रशिक्षणाची जोड अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पदवीसह कौशल्य, प्रशिक्षण आत्मसात करणे काळाची गरज आहे,' असा सल्ला विजेता अॅकॅडमीचे संचालक प्रा. जयंत पाटील यांनी दिला. त्यांनी 'नोकरीसाठी गरजेचे आहे प्रशिक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'मराठी माध्यमांच्या मुलांमध्ये खूप क्षमता आहे. पारंपरिक अभ्यासक्रमातून कौशल्ये मिळतात. मात्र, ती नोकरीसाठी पुरेशी नाहीत. कार्पोरेट कंपन्यांसाठी लागणाऱ्या कौशल्याची कमतरता आहे. सध्या हजारो विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. जागतिक दर्जाच्या अनेक कार्पोरेट कंपन्या देशात येत आहे. त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अनेक तरुणांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते. मात्र, त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. अनेकदा विद्यार्थी मुलाखतीत कमी पडतात. गुणवत्ता असूनही मिळालेली संधी जाते. त्यासाठी मुलाखतची तयारी अत्यावश्यक आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरीसाठी प्रशिक्षण मोलाचे ठरते. काही कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन मराठी भाषेतून केले जाते. संकल्पना समजण्यासाठी मराठी भाषेचा उपयोग केला जातो. प्रत्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल आहे. दरवर्षी काही नामांकित कंपन्या कॉलेजमध्ये कॅम्पस घेतात. पदवीसोबतच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. कंपन्यांतील दोन जागांसाठी दोनशे उमेदवार मुलाखतीसाठी येतात. मात्र, त्यातील काही मोजक्या उमेदवारांकडे नोकरी मिळविण्याचे कौशल्य असते. मुलाखतीसाठी ड्रेसकोड महत्त्वाचा नाही. मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि व्यवसायातील कौशल्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर ज्या क्षेत्रात नोकरी करायची आहे, त्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात केले पाहिजे. दोन ते तीन महिन्याचे प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियोजनबद्ध अभ्यासातूनच यश’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'दहावी, बारावीच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा संपूर्ण वेळ करमणुकीमध्ये जात असतो. अभ्यासाचे कोणतेही नियोजन नसल्याने परीक्षेच्या काळात अभ्यासात मन लागत नाही, लक्ष विचलित होणे, लिखाणाची गती मंदावते, अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ९० टक्क्यांवरून कसे तरी पास क्लास मिळतो. करिअरच्या सुरुवातीला येणाऱ्या अपयशामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करण्यापेक्षा अभ्यासाचे योग्य नियोजन करून यश मिळवा,' असे आवाहन प्रा. शशिकांत कापसे यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्यावतीने डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे सुरू असलेल्या टाइम्स एज्युफेस्टमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 'दहावी, बारावीच्या यशाचा कानमंत्र' विषयावर बोलताना प्रा. कापसे यांनी यशाचे अनेक कानमंत्र दिले. प्रा. कापसे म्हणाले, 'सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्ती प्रचंड आहे, मात्र त्यांना योग्य वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचा बहुमोल वेळ वाया जात आहे. दहावीत मर्यादित अभ्यासक्रमामुळे मुले ९० टक्के मार्क मिळवतात. मात्र, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढल्यानंतर याच विद्यार्थ्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत घसरते. घसरलेल्या टक्केवारीला नियोजनाचा अभाव कारणीभूत असते.'
प्रा. कापसे पुढे म्हणाले, 'परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. मात्र, त्यापैकी मोजक्याच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असते. अशा विद्यार्थ्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी ९५ टक्के गुण मिळवण्याचे ध्येय निश्चित करावे लागेल. ध्येय निश्चित केले नाही, तर स्वप्न साकार होत नाहीत.
त्यामुळे केवळ पासिंग मार्कावर समाधान मानावे लागते. परिणामी भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊन त्या सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपून जाते. अशा अडचणींतून मार्ग काढण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, एकाग्रहता, लिखान कौशल्य, वेळेचे नियोजन, मास्टर थॉट्स, माइंड पॉवर असल्याशिवाय ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचता येणार नाही.'
महाराष्ट्र टाइम्सचे रिस्पॉन्स हेड मधुर राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अमोल पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी महिलेची पर्स लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑस्ट्रीयातून मित्राकडे आलेल्या पददेशी महिलेची पर्स लंपास होण्याचा प्रकार रविवारी सकाळी आझाद चौकात घडला. या प्रकारात क्रिस्टिने कतरिना रुडिसा (वय ६५, रा. व्हियाना सिटी, ऑस्ट्रिया) यांचा पासपोर्ट, व्हिसाकार्ड, कॅमेरा, मोबाईल असा सुमारे तीस हजारांचा ऐवज गायब झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ऑस्ट्रिया देशातील क्रिस्टिने रुडिसा आणि आर्किटेक्ट प्रवीण व्हटकर (वय ३१, रा. ६८९, सी वॉर्ड, कक्कया रोड, आझाद चौक) यांची फेसबुकवरून ओळख झाली होती. वर्षभरातील मैत्रीनंतर रुडिसा यांनी भारत पहायला येण्याची इच्छा व्यक्त केली. व्हटकर यांनी त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिल्याने रुडिसा बुधवारी (ता. ८) मुंबईत आल्या. त्या गुरुवारी कोल्हापुरात व्हटकर यांच्या घरी आल्या. दोन दिवस त्या कोल्हापुरातील पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत.

शनिवारी रात्री व्हटकर यांच्या घरात दरवाजालगतच्या टेबलवर त्यांनी पर्स ठेवली होती. रविवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास त्यांना टेबलवरील पर्स अज्ञाताने लंपास केल्याचे लक्षात आले. पर्समध्ये रुडिसा यांच्या पासपोर्टसह व्हिसा, कॅमेरा, मोबाइल, एटीएम, औषधे आणि २१०० यूरो होते हे लक्षात येताच व्हटकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात धाव घेतली. प्रवीण यांच्या घरी त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

पर्स चोरीमुळे परदेशी पाहुण्यांचा महत्त्वाचा ऐवज लंपास झाल्याने व्हटकर कुटुंबीय चिंतेत होते. घरातून झालेल्या चोरीने रुडिसाही आचंबित झाल्या. सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी रुडिसा यांना दिलासा देऊन परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांकडे शोध सुरू केला आहे. रुडिसा यांची पर्स कोणाला मिळाल्यास त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images