Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कॅप सेंटर्सना सतर्कतेच्या सूचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई विद्यापीठ स्टाँगरूममधून अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका पुन्हा सोडवण्यासाठी दिल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने दक्षता घेतली आहे. विद्यापीठाच्या सर्व कॅप सेंटरना सुरक्षीतता आणि गोपनीयतेच्या नियमांचे पालन करण्याचे सक्त आदेश परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिले आहेत. कोडिंग सिस्टिममुळे शिवाजी विद्यापीठाला कोणताही धोका नसला, तरी प्रशासनाने कॅप सेंटर्सना दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्टाँगरुममध्ये ठेवल्या गेल्या. मात्र ज्या परीक्षार्थींना संबंधीत विषय अवघड गेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा उत्तरपत्रिका ताब्यात घेवून न सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली. पुन्हा उत्तरपत्रिका स्टाँगरुममध्ये ठेवण्यात आल्या. हा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. मुंबई विद्यापीठाच्या आठ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यापीठाच्यावतीने १५ मार्चपासून विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेतल्या गेल्या आहेत. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम विद्यापीठाच्या सात कॅप सेंटरवर सुरू आहे. सर्व कॅप सेंटरच्या प्रमुखांना सुरक्षीतता आणि गोपनीयतेच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले गेले आहेत. दररोजचा अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यापीठाच्यावतीने कोडिंग सिस्टीम असल्याने कोणताही धोका नसला तरी, प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नॅक मूल्यांकन पद्धतीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा दर्जा ठरवणाऱ्या 'नॅक'ने (नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडेशन कौउन्सिल) मूल्यांकन (ग्रेडेशन) पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅकच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. नॅकच्यावतीने मूल्यांकनाच्या आठ ग्रेड जाहीर केल्या असून त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून करण्यात येणार आहे. मूल्यांकनात 'अ' श्रेणीच्या वरही श्रेणी असल्याचा उल्लेख 'नॅक'च्या परीपत्रकात केला आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावर याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. लवकरच याबाबचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाला मिळेल असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

२००८ पासून मूल्यांकन पद्धतीला सुरुवात झाली. यामध्ये अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट, समाधानकारक आणि असमाधानकारक याप्रमाणे श्रेणी दिली जात होती. 'नॅक' कमिटीच्या भेटीदरम्यान विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये अतिउत्कृष्ट श्रेणी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. मूल्यांकन पद्धतीमुळे विद्यापीठ आणि कॉलेजांच्या दर्जामध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. अनेक कॉलेजांनी 'नॅक'टी 'अ' श्रेणी मिळवल्यानंतर यामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. नवीन मूल्यांकनाच्या पद्धतीला एक जुलैपासून सुरुवात होणार आहे.

'नॅक' ज्या महाविद्यालयांना भेट देणार आहे, त्या महाविद्यालयाच्या मूल्यांकनाची श्रेणी नव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. श्रेणी देण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार असला, तरी मूल्यांकन जुन्याच पद्धतीने करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना 'नॅक'चे मूल्यांकन मिळाले आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र मूल्यांकन आणि पुर्नमुल्यांकन करतील त्याच महाविद्यालयाच्या श्रेणीत हा बदल होणार आहे. मुल्यांकनामध्ये सात निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये अध्ययन व अध्यापनाची पद्धती, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा व अध्ययनाची साधने, शिक्षण संस्थेच्या विकासात विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रशासन, नूतनीकरणाचे प्रयोग व सांस्कृतिक उपक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालयांना 'नॅक'चे मूल्यांकन करणे बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदारास मारहाण, दोन तरुणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उमा टॉकीज चौकात सिग्नल पडल्यानंतर अडवल्याच्या रागातून दोन तरुणांनी वाहतूक विभागाचे सहायक फौजदार जानबा शंकर देसाई (वय ५७) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी साईदास संजय शिंदे (वय २७, रा. शिवाजी स्टेडियम) आणि प्रीतम सतीश शिंदे (वय ३०, रा. रविवार पेठ) या दोघांना अटक केली आहे.

वाहतूक शाखेकडील सहायक फौजदार जानबा शंकर देसाई सोमवारी (ता. २३) उमा टॉकी चौकात ड्युटीवर होते. चारच्या सुमारास साईदास आणि प्रीतम हे दोघे मोटारसायकलवरून आले. सिग्नल पडल्यानंतर देसाई यांनी या दोघांना मोटारसायकल थांबवायला सांगितले. यावेळी मोटारसायकलवरील दोघांनीही थांबवल्याच्या रागातून देसाई यांना शिवीगाळ केली. थोड्या वेळाने ते दोघे पुन्हा उमा टॉकीज चौकात आले. त्यांनी देसाई यांना शिवीगाळ मारहाण सुरू केली.

देसाई यांनी हा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साईदास शिंदे आणि प्रीतम शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे. यातील प्रीतमने मद्यप्राशन केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाहतूक पोलिस कर्माचाऱ्यास मारहाण झाल्याचे कळताच वाहतूक पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांनीही लक्ष्मीपुरी पोलिसात धाव घेतली. शहरातील ३० ते ३५ वाहतूक पोलिसांनी ठाण्यात येऊन देसाई यांची भेट घेऊन विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीआधीच अधीक्षक रजेवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागाचे अधीक्षक एम.डी. सावंत यांची चौकशी करण्याची ग्वाही आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली होती. मात्र ही प्रक्रियाय सुरू होण्याआधीच सावंत सोमवारपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सावंत यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करीत त्यांच्या तीन वर्षाच्या काळात वर्कशॉपमधील २ कोटी ८४ लाखांचा हिशेब लागत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यावर आयुक्तांनी यांच्या कामकाजाच्या चौकशीची ग्वाही दिली होती. चौकशी अधिकारी नेमण्याअगोदरच सावंत रजेवर गेले.

निविदा प्रक्रिया न राबविता मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्याबरोबरच बाजारभावापेक्षा जादा दराने वस्तूंची खरेदी केल्याचा आक्षेप सावंत यांच्यावर आहे. कंटेनर खरेदी, घंटागाड्या दुरूस्ती, जेटिंग मशिन खरेदी अशा प्रकरणातही त्यांचे नाव गोवले आहे. वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची टायर विभागात नियुक्ती, टायर विभागात कर्मचाऱ्यांना दुरूस्तीची कामे सोपविणे, महापालिकेच्या वाहनांची जादा पैसे देऊन बाहेरून दुरूस्ती या प्रकरणात सावंत यांचे नाव घेतले जाते. कंटेनर खरेदीबरोबरच कंटेनर दुरूस्तीवर पैसे खर्च करून महापालिकेच्या पैशाची लूट केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता.

सावंत यांच्या कालावधीत गेल्या तीन वर्षात जवळपास तीन कोटी रुपयांच्या वस्तूंची खरेदी विक्री झाली असून त्याचा हिशोब ठेवण्यात आला नाही. अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची खरेदी झाली असून महापालिकेच्या लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. आयुक्तांनी त्यानुसार सावंत यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांची बदली करण्यात येईल, असे शुक्रवारी स्पष्ट केले. आयुक्त सोमवारी कार्यालयीन कामानिमित्त बाहेर होते. यामुळे चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकली नाही. मंगळवारी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच सावंत यांनी रजा घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातील माढा, मोहोळ तालुक्यात पाण्याचा ठणठणाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक वाड्यावस्त्यांवर पाण्याचा ठणठणाट आजही कायम आहे. मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावांचे डोळे टँकरकडे लागलेले असून, रस्त्याच्या दुतर्फा पाण्यासाठी ठेवण्यात आलेले बॅरेलचे चित्र दररोज पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागातील विहिरी, आड तसेच बारव पूर्णपणे कोरडे पडले असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. मोहोळ आणि माढा परिसरात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी भरण्यासाठी भांडी ठेवण्यात आल्याचे दिसून येतात तर अनेकठिकाणी दुचाकी, चारचाकी तसेच बैलगाडीमधून बॅरेलद्वारे पाणी नेण्यात येत आहे. या दोनही तालुक्यात काही प्रमाणात टँकर सुरू असले, तरी तेसुद्धा पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे.

माढा तालुक्यातील १०६ नळ पाणीपुरवठा योजनांपैकी तब्बल ९१ पाणीपुरवठा योजनांमधील पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटले आहेत. तर तांत्रिक अडचणींमुळे कव्हे योजना बंद असल्याने सोळा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोहोळ तालुक्यातील परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. या तालुक्यातील विहिरी, आड, पूर्णपणे आटले असून नागरीकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.

'पाणी केव्हा येणार?'

गावागावामध्ये यात्रा आणि जत्रांचा माहोल सुरू असून, या निमित्ताने येणाऱ्या भाविकांनासुद्धा पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे. ज्याठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत त्याठिकाणी पाणी भरण्यासाठी दोन दोन दिवस घरातील छोटीमोठी भांडी ठेवून पाण्याची वाट पाहावी लागत आहे. एकूणच पाणी केव्हा येणार ही एकच चर्चा गावागावात सुरू आहे.

शेततळ्यांनीही तळ गाठला

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील काही भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी साकारली आहेत. पाऊस आणि शेतात असलेल्या विहिर व बोअरच्या माध्यमातून या शेततळ्यांमध्ये पाण्याची साठवणूक करून त्याद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेती फुलविण्यात येत आहे. परंतु, यंदाच्या भीषण दुष्काळात शेततळ्यांनीही तळ गाठला आहे. मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक ठिकाणची शेततळी कोरडी पडली आहेत. तर, काही शेततळ्यांमध्ये काही प्रमाणात पाणी असले, तरी मोटारीने त्याचा उपसा करता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीस लाखांची रोकड जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी शहरात ठिकठिकाणी पोलिसांची पथके तैनात करून नाकाबंदी केली आहे. याच नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी दुचाकीवरून निघालेल्या दोघांना हटकून त्यांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडे सुमारे ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली. फौजदार चावडीच्या पोलिसांनी एसटी बसस्थानक परिसरात ही कारवाई केली.

पकडण्यात आलेले दोघेही गुजरातचे असून, एकाचे नाव जयेशकुमार ओझा आणि दुसऱ्याचे नाव सुनील कडिया असे आहे. हे दोघेही दुचाकीवरून सोलापुरात येत होते. तेव्हा तिथे नाकाबंदीसाठी नेमण्यात आलेल्या फौजदार चावडीच्या पोलिसांनी या दोघांना हटकले आणि लायसन्सची चौकशी केली. तेव्हा या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी दोघांची झाडाझडती घेतली असता, सुमारे तीस लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, ही रक्कम कोठून आली आणि कोठे नेण्यात येत होती, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी पोलिस अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात चांगला रिपोर्ट पाठविणे आणि दोषारोपपत्र पाठविण्यामध्ये मदत करण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना घरकुल पोलिस चौकीतील पोलिस नाईक राजेश माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
घरकुल पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवकर, पोलिस नाईक राजेश माने आणि पोलिस नाईक नंदकुमार पाटील या तिघांनी गुन्ह्यातील आरोपींच्या अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात चांगला रिपोर्ट पाठविण्यासाठी व दोषारोपावेळी मदत करण्यासाठी २५ हजार लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केली असता, २४ हजार रुपये निश्चित करण्यात आले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती. त्यानुसार, सोलापूरच्या पथकाने घरकुल चौकी येथे सापळा रचला.
राजेश माने याने तक्रारदाराला घरकुल चौकी येथून पोलिस लाइनच्या गेटसमोरील ट्रान्सपोर्टसमोर पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी २४ हजारांची लाच घेताना माने याला रंगेहाथ पकडले. ही २४ हजाराची रक्कम देवकर, माने व पाटील हे तिघे वाटून घेणार होते. त्यामुळे या प्रकरणी जेलरोड पोलिस स्टेशनला तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ए ब्लॉकजवळच्या शेडमध्ये एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. भटक्या कुत्र्‍यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसून आले आहे. या महिलेची ओळख पटली नसून हा घातपात आहे की अन्य काही प्रकार आहे, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारातील शेडमध्ये पडलेल्या या महिलेच्या पायाचे भटकी कुत्री लचके तोडत असल्याचे नागरिकांनी पाहिले. तत्काळ याविषयीची माहिती हॉस्पिटल प्रशासन व सिव्हिल चौकीतील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागृहामध्ये पाठविला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच नक्की काय प्रकार आहे, हे समजणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता याच परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षायंत्रणा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी बनली जलमित्र

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) सातारा विभाग रोज एक लाख लिटर पाण्याची बचत करीत आहे. बसगड्या रोज न धुता या पाण्याची बचत केली जात आहे. त्यामुळे सध्या एसटीही जलमित्र झाल्याचे चित्र आहे.

एसटीच्या सातारा विभागातील विविध आगारांत मिळून ८०० बस आहेत. त्या रोज न धुता दोन-तीन दिवसांतून आवश्यकतेनुसार धुण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे दररोज सुमारे एक लाख लिटर पाणी बचत होत आहे. रोज चकाचक स्वच्छ गाडी असल्यास प्रवाशांना प्रवास करायला आवडते, असा एसटी अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे या गाड्या नियमित धुण्याचा प्रत्येक आगाराचा प्रयत्न असतो. किमान लांब पल्ल्यांच्या गाड्या धुतल्यानंतरच आगारातून बाहेर काढल्या जातात. एक गाडी धुण्यासाठी साधारणपणे दोनशे लिटर पाणी लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते.

राज्यभर पडलेला दुष्काळ, पाण्यासाठी चाललेली वणवण पाहून महामंडळाने या गाड्या पाणी वापरात काटकसर करण्याच्या लेखी सूचना सर्व विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सातारा विभागानेही केली असून, ते पत्र जिल्ह्यातील अकरा आगारांना पाठविले आहे.

या मोहिमेला कर्मचारीही चांगला प्रतिसाद देत आहेत. गाडी खूपच अस्वच्छ झाली असेल तरच धुतली जाते. आठशे गाड्या दररोज धुतल्या असत्या तर १.६० लाख लिटर पाण्याचा वापर झाला असता. मात्र, आता रोज पन्नास टक्केच गाड्या धुतल्या तरी किमान ७५ हजार लिटर पाणी व इतर मार्गाने वाचविलेले असे एकूण सुमारे एक लाख लिटर पाण्याची सहज बचत होत आहे.

गाड्या धुण्यासाठी सर्वाधिक वापर होत आहे. असे असले तरी सर्व आगार, बसस्थानक, विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, वापरासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. अनेक ठिकाणी या टाक्यांच्या नळांना तोट्या नव्हत्या. त्या ठिकाणी तोट्या बसविणे. आगारातील जलवाहिन्यांना गळती असल्यास त्या काढण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रोज थेंब-थेंब पाण्याची बचत करण्यासाठी एसटीने पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माण तालुक्यात उपाययोजना तोकड्या

0
0

सातारा : माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून, प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पाणी-चाऱ्यावाचून जनावरे तडफडताना पाहण्याखेरीज शेतकरी काहीही करू शकत नाही.
वडगाव (ता. माण) येथील भाऊराव ओबासे या शेतकऱ्याची दुभती गाय चाऱ्यावाचून दावणीला तडफडून मृत्युमुखी पडली. पाऊस न पडल्याने शेतात कोणतेही पीक घेता आले नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करायचा तर जनावरांना चारा नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. चारा विकत घ्यायचा म्हटले तर त्याचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकरी चारा खरेदी करून आपल्या जनावरांना वाचवू शकत नाही. त्यामुळे जनावरांची तडफड त्यांना पाहावी लागत आहे.
माण तालुक्यात दुष्काळाने हाहाकार माजवला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जीवापाड जपलेले पशुधन वाचवण्यासाठी पशुपालकांचा जीव व्याकुळ झाला आहे. याची दाहकता वडगाव, पांगरी, राजवडी, बिजवडी, मोगराळे, हस्तनपूर, पाचवड, शेवरी याबरोबरच मार्डी मंडलामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.

रोहयोची कामे यंत्राने

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावरील पीक पाण्याच्या नोंदीनुसार सरकारकडून आलेले अनुदान अद्याप वाटप केलेले नाही. त्यामुळे दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आणखीन वाईट झाली आहे. रोजगार हमीची कामे कुठेही सुरू नाहीत. असली तरी बोगस मजूर दाखवून यंत्राने कामे करून घेतली जातात; परंतु काम मागूनही गरजू मजुरांना काम मिळत नाही ही माण तालुक्यातील स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेशी प्रेमाच्या संशयावरून मारामारी

0
0

कराड : महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून युवकांच्या दोन गटांमध्ये कोळे (ता. कराड) येथे सशस्त्र मारामारी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
एकमेकांवर तलवार व कोयत्याने वार करण्यात आला. त्यातील एकास दोरीने बांधून चौकात आणून मारण्यात आले. त्याच्या डोक्यातही वार करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री उशिरा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला. वैभव उत्तम काळे (वय २६) व प्रशांत श्रीपती घार्गे (वय २५, दोघे रा. मालदन) अशी जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
गावातीलच विकास घार्गे याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय गावातीलच वैभव उत्तम काळे याला होता. या प्रेमसंबंधाला वैभवचा विरोध असल्यामुळे त्याने शुक्रवारी रोजी विकासला फोन करून दमदाटी व शिवीगाळ केली. याबाबत विकासने ढेबेवाडी पोलिसात तक्रारही दिली होती. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मालदन येथील विकास घार्गे, श्रीकांत राजाराम घार्गे व प्रशांत श्रीपती घार्गे हे तिघेजण कारमधून कराडच्या दिशेने येत होते. कोळे येथे बसथांब्यावर वैभव काळे उभा असल्याचे या तिघांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी कार थांबवली. प्रशांत कारमधून उतरून वैभवजवळ गेला. त्याने विकासला फोन करून शिविगाळ का करतोस, अशी वैभवला विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
रागाच्या भरात वैभवने त्याच्याजवळील कोयता काढून प्रशांतवर वार केला. हा वार प्रशांतच्या हातावर बसल्याने तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार पाहताच विकास व श्रीकांत घार्गे हे दोघेजण कारमधून उतरून त्याठिकाणी गेले. वैभव पळून जात असल्याचे दिसताच त्यांनी त्याला पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्याच सॅकमधील तलवार काढून त्यांनी त्याच्या डोक्यात वार केला. तसेच त्यांनी त्याला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी मारहाण केली. वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना प्रशांतला घेऊन विकास व श्रीकांत कारने कराडला कृष्णा रुग्णालयात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

0
0


इस्लामपूर : उसाच्या शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथील पांडुरंग नारायण पाटील (वय ४०) यांचा मंगळवारी पहाटे शेतातच मृत्यू झाला.
पांडुरंग पाटील हे मंगळवारी पहाटे पाच वाजता शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. उसाच्या शेतात वीज मंडळाची प्रवाही तार तुटून पडली होती. तार तुटून पडल्याचे लक्षात न आल्याने हा प्रकार घडला. याबाबत नामदेव पाटील यांनी इस्लामपूर पोलिसांना माहिती दिली. पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, नऊ वर्षांची मुलगी व तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांशी रोज संवाद आवश्यक

0
0



कराड : मुलांना शिकवणे ही एक कला असून या कलेचाच वापर करून, त्यांना समजावून घेतले तर मुले शिकतात. त्यांना कुठलीच गोष्ट शक्य नाही, हे तुला जमणार नाही, तू लहान आहेस हे करू शकत नाही, असे नकारार्थी न सांगता त्यांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांच्यासोबत रोज संवाद ठेवा, असे विचार मानसशास्त्र तज्ज्ञ रचना सारंग पाटील यांनी मांडले.
येथील श्रीनिवास पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सनबिम शिक्षण समूहाच्यावतीने राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'पालकत्व एक कला' ही विनामूल्य कार्यशाळा येथील सनबीम इन्सिटटयूट येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पाटील बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, 'मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने पालकत्व ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. मुलांना वाढविण्याबरेबरच त्यांच्या विकसनशीलतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलांना समजून घेणे आवश्यक असून त्याचबरोबर आपल्या स्वत:लाही समजून घेतले पाहिजे. सुजाण पालकत्व ही एक कला आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यांची जोपासना होणे गरजेचे आहे. मुलांच्या मनापर्यंत पोहचायचे असेल तर सुसंवादाची गरज आहे.पालकांनी मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. त्यासाठी घरातील वातावरण पोषक ठेवावे. मुलांना एकलकोंडे बनवू नका. त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नका.
यावेळी पालंकानीही आपले मते मांडली.सुत्रसंचालन सी-डॅक कोर्स कोर्ऑर्डीनेटर प्रशांत लाड यांनी केले. आभार निशाद मुल्ला यांनी मानले. कार्यक्रमास सातारा जिल्हा एलएलसी कोऑर्डिनेटर दामोदर आरे, पराग पारवे, विक्रम जाधव, सुनील जोशी, अमोल पाटील, संदीप नरेवाडीकर, प्रियांका चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,विकास साळुखे आदी अनेक पालकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेच्या मृत्यूनंतर सांगलीत मानवाधिकार संघटनेचे आंदोलन

0
0




सांगली : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मानवाधिकार संघटनेच्या आंदोलकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. दगडाला शेण, गुलाल फासून 'आरोग्य अधिकारी दगडच' आंदोलन करीत प्रशासनाच्या निषेध केला.
यावेळी आंदोलक व महापालिकेचे कर्मचारी यांच्यात जोरदार झटापट झाली. 'अधिकारी दौऱ्यावर, कर्मचारी वाऱ्यावर' अशी आरोग्य कर्मचाऱ्यांची अवस्था दिसून आली. शहरातील उद्योग भवनाजवळील सरस्वती नगरात प्रातर्विधीसाठी गेलेल्या सुंदरी परतोष भारती या सहा वर्षाच्या बालिकेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया सोमवारी उमटली. आरोग्य विभागाचे सारेच अधिकारी, निरीक्षक, मुकादम गायब अशी स्थिती होती.
भटक्या कुत्र्यांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट झाला आहे. विविध पक्षाच्या व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांत शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा स्वच्छता निरीक्षकांचे पगार रोखा असे आदेश स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिला आहे. काय वाट्टेल ते करा पण मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त झाला पाहिजे असे त्यांनी निक्षून सांगितले.

एजन्सी नेमल्या;
काम मात्र नाही

मोकाट मुत्री, डुकरे यांच्या सुळसुळाटामुळे नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे डॉग व्हॅनसाठी आवश्यक कर्मचारीवर्ग नाही. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी २०१२ मध्ये एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. पण त्यानंतर कसलीच कार्यावाही झालेली नाही. डुकरे पकडण्यासाठीही अशीच एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे, पण त्याचीही अंमलबजावणी नाही. स्वच्छतेची यंत्रणाही कोलमडून गेलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात वाढतोय थॉयरॉईडचा धोका

0
0

Janhavi.Sarate@ timesgroup.com

कोल्हापूर : सकस आहाराची कमतरता, बदलती जीवनशैली, जन्मतःच थायरॉईड ग्रंथींची वाढ, वॉटर प्युरिफायरसह अन्य साधनांचा वाढता वापर अशा कारणांमुळे शहरातील २० टक्के महिला थायरॉईडने त्रस्त आहेत. वयाच्या तीशीनंतर होणार आजार आता दहा वर्षाच्या व्यक्तींनाही होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाप्रमाणेच महिलांमध्ये थायरॉईड झपाट्याने वाढत आहे.

थायरॉईड हा शरीरातील ग्रंथीशी संबंधित आजार असून त्यातील रसाचे प्रमाण कमी किंवा जास्त म्हणजे असंतुलित झाल्यास थायरॉइडचा आजार होतो. हा आजार महिलांमध्ये अधिक असून दर दहापैकी दोन महिलांना थायरॉइडचा आजार असल्याचे निदर्शनास येते. सध्या ‌हा आजार १० ते ५० वयोगटामध्ये अधिक दिसून येत आहे. थायरॉईड झालेल्या रुग्णामध्ये वजन वाढणे, डिप्रेशन, केस लवकर पिकणे, लहान मुलींना लवकर वयात येणे अशी लक्षणे आहेत. हा आजार जन्मतः थायरॉईडच्या ग्रंथीची वाढ होणे, गर्भधारणेवेळी आईला थायरॉईडचा आजार असल्यास बाळालाही होऊ शकतो. शरीरातील आयोडिनचे प्रमाण कमी झाल्यास दिसतो. विशेष म्हणजे सध्या सर्वत्र वॉटर ‌प्युरिफायर वापरले जातात. त्यातील शरीराला आवश्यक असणारे घटक निघून जात असल्यामुळेही थायरॉईडसारख्‍्या आजाराला सामोरे जावे लागते. यासाठी वॉटर प्युरिफायरमधील पाणी साठवून ठेवल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी उकळून ओतायला हवे. तरच शरीराला आवश्यक घटक मिळू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हा आजार काही कालावधींचा किंवा खूप काळ असणारा असू शकतो. प्रत्येक वयोगटातील महिलांमध्ये वेगवेगळी कारणे दिसून येतात. थायरॉईड असलेल्या महिलांनी दोन महिन्यातून एकदा रक्तचाचणी करणे आवश्यक आहे. तर ३० वयोगटापुढील महिलांनी किमान वर्षातून एकदा रक्तचाचणी करावी. या आजारचे वेळीच निदान न झाल्यास हायपो थायरॉईईड आणि हायपर थायरॉईडीझम होऊ शकतो. या दोन्हीमुळे शरीरात गंभीर गुंतागुत निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळीच निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते, यासाठी वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे.

शहरातील महिलांमध्ये थायरॉईड आजारचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोल्हापुरातील २० टक्के महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. या आजारचे निदान झाल्याशिवाय योग्य उपचार होऊ शकत नाही. ‌भविष्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यायला हवी.

डॉ. अमित असलकर, आंतरग्रंथी विशेषत्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्कशॉप अधीक्षकांची चौकशी सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागाचे अधीक्षक एम. डी. सावंत यांच्या गेल्या तीन वर्षाच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्य लेखापरीक्षक गणेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठांना पूर्वकल्पना न देता सोमवारपासून वैद्यकीय रजेवर गेलेल्या सावंत यांची रजाही नामंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावंत यांना कामावर रूजू होणे बंधनकारक आहे. त्यांची बदली अन्य विभागात बदली केली जाईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. सावंत यांची चौकशी दोन टप्प्यात होणार आहे.

चौकशी अधिकारी पाटील यांना दहा दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल देण्याच्या सूचना आहेत. सावंत यांच्यावर वर्कशॉप विभागातील खरेदी विक्री आणि टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यांच्या काळात २ कोटी ८४ लाखाच्या व्यवहाराचा हिशेब लागत नाही. महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी सावंत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला होता. कंटेनर खरेदी, घंटागाडी, जेटींग मशिन, महापालिकेच्या वाहनासाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टस खरेदीत अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दोन टप्प्यात होणार चौकशी

आयुक्तांनी चौकशी अधिकारी पाटील यांना प्राथमिक चौकशी अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्पेअर पार्टस खरेदी, मशिनरीज खरेदी टेंडर प्रक्रिया, कंटेनर, घंटागाडी खरेदी व दुरूस्तीमध्ये सावंत यांनी अफरातफर केली आहे. या सगळ्या बाबी तांत्रिक आहेत. त्याची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील वीस दिवसांत तांत्रिक बाबीच्या अनुषंगाने चौकशी होईल. एका महिन्यात चौकशीचे काम पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आहेत. सावंत यांची चौकशी घरी जाऊनही करता येऊ शकते.


बडतर्फ करण्यापासून गुन्हा दाखल करण्याचे अ​धिकार

प्राथमिक चौकशीत सावंत दोषी आढळले तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे अधिकार आहेत. शिवाय दोषी अधिकाऱ्यां विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. सावंत यांनी वरिष्ठांना कसलीही कल्पना न देता सोमवारपासून रजेवर गेले आहेत. आयुक्तांनी त्याची ही गंभीर दखल घेऊन रजा नामंजूर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी ब्रेड निर्धास्त खा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्लीत केलेल्या एका सर्वेक्षणात ब्रेडमध्ये कॅन्सरला निमंत्रण देणारे रासायनिक घटक आढळल्याने देशात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सकाळच्या नाश्त्यापासून दुपारी मिसळ आणि संध्याकाळी दाबेली, पावभाजीमधून पोटात जाणारा ब्रेड किंवा पाव कितपत सुरक्षित आहे, याविषयी कोल्हापूरकरांमधून चिंता व्यक्त होत आहे. त्याचवेळी कोल्हापुरात कोणत्याही बेकरीमध्ये अशा प्रकारच्या आरोग्यास हानीकरक केमिकल्सचा वापर होत नसल्याचा दावा कोल्हापूर बेकर्स असोसिएशनने केला आहे. त्याला अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिल्याने कोल्हापूरचा ब्रेड सुरक्षित असल्याचे मानले जात आहे.

रोजच्या आहारात पावाचा समावेश असलेल्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याबाबत तपासाचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्नमेंट या संस्थेने दिल्लीतील सहज उपलब्ध असलेल्या ३८ ब्रँड्सची तपासणी केली. यामध्ये ब्रेडसह पाव, बन्स, तयार बर्गड ब्रेड आणि पिझ्झा बेस यांचाही पॅकेजिंग करण्याआधी अभ्यास करण्यात आला. तेव्हा यापैकी ८४ टक्के नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या घटकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरात सगळीकडे ब्रेडच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याबाबत कोल्हापूर बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि हिंदुस्तान बेकरीचे एम. आर. शेख म्हणाले, 'मोठ्या शहरांमध्ये ब्रेड जास्त दिवस टिकण्यासाठी तो बनवितानाच केमिकल्सचा वापर केला जातो. यामुळे दोन-तीन दिवस टिकणारा ब्रेड आठ-नऊ दिवस टिकू शकतो. कोल्हापुरात दूध, मैदा, साखर, ईस्ट याचा वापर करूनच ब्रेड बनविले जातात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले जात आहे.'

माधुरी बेकरीचे चंद्रकांत वडगावकर म्हणाले, 'मेट्रो सिटींमध्ये आठ आठ दिवस ब्रेड टिकावा, अशा प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची मागणी असते. त्या मागणीप्रमाणे तेथे पुरवठा होत असतो. दिवसाला दहा, वीस हजार ब्रेड तयार करणाऱ्या बेकऱ्या तेथे आहेत. कोल्हापुरात तशी मागणी नाही. आमच्याकडे फार फार तर दिवसाला पाचशे ब्रेड तयार करणाऱ्या बेकरी आहेत. त्यामुळे येथे तशा प्रकारे केमिकल्सचा वापर करून ब्रेड बनविला जात नाही.'

ब्रोमेटवर येणार बंदी

पोटॅशियम ब्रोमेट हे आरोग्यास सर्वांत हानीकारक रसायन आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये यावर बंदी आहे. मात्र, भारतात अद्याप त्यावर बंदी नाही. ब्रेडमध्ये २० टीपीएम (किलोमध्ये २० मिलिग्रॅम) ब्रोमेट वापराला परवानगी आहे. इतर काही बेकरी प्रॉडक्टमध्ये हीच मर्यादा ५० टीपीएम इतकी आहे. दिल्लीतील सर्वेक्षणात ब्रेडमध्ये ब्रोमेटचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ब्रोमेटवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप त्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही.

कोल्हापुरातील कोणत्याही बेकरीतील ब्रेड किंवा पावाची टिकण्याची मर्यादा अवघी दोन ते तीन दिवस आहे. त्यानंतर तो खराब होतो. महानगरांसारखी इथे ब्रेडची मोठ्या प्रमाणावर मागणी नाही. आज बनविलेला माल आजच्या आज संपतो. त्यामुळे येथे केमिकल वापरून ब्रेड बनविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

- एम. आर. शेख, अध्यक्ष, कोल्हापूर बेकर्स असोसिएशन (हिंदुस्तान बेकरी)

आमच्याच नव्हे, तर कोल्हापुरातील सर्व बेकऱ्यांमध्ये ताजेपणावर भर दिला जातो. रोजच्या रोज ताजा माल संपावा, यासाठी प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे आठ-दहा दिवस ब्रेड टिकावा या आग्रहाखातर कोणीही केमिकल्सचा वापर करून ब्रेड बनवत नाही.

- चंद्रकांत वडगावकर, माधुरी बेकरी

पोटॅशियम आयोटेड आणि ब्रोमेट यातील ब्रोमेट सर्वाधिक घातक आहे. महानगरांमध्ये अन्न पदार्थांमध्ये ब्रोमेट वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, कोल्हापुरात आजवर आम्ही पाहणी केलेल्या बेकऱ्यांमध्ये कोठेही ब्रोमेट वापरल्याचे आढळलेले नाही.

- एस. एम. देशमुख, सहायक आयुक्त, अन्न, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा वर्ल्ड हेरिटेज शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील अनेक हिल स्टेशन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांपैकी एक असलेल्या पन्हाळा गडाचा समावेश जागतिक वारसास्थळांत होऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिव आणि जागतिक वारसास्थळ समितीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी व्यक्त केला. डॉ. जैन यांनी अन्य सहका ऱ्यांसह कोल्हापुरात श्री

अंबाबाई दर्शन घेतले. त्यानंतर भारत सरकारच्या राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. रिमा हुजा व अन्य सदस्यांनी पन्हाळागडाची पाहणी केली. कोल्हापुरात आल्यानंतर त्या त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील गडकोटांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी श्रीमंत युवराज छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार ही समिती राज्यातील रायगड, पन्हाळा, शिवनेरी, सिंधूदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांची पाहणी करणार आहे. समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू झाला. डॉ. जैन मंगळवारी पन्हाळागडाची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरात आल्या. प्रारंभी त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. न्यू पॅलेस, जुना राजवाडा, भवानी मंडप यांचीही पाहणी केली. ही तिन्ही ठिकाणे पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत चांगली असल्याचे मत त्यांनी नोंदवले. राजस्थानमधील पाच किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये झाला असून त्यांच्या संवर्धनासाठी चांगला निधी आला आहे. महाराष्ट्रातील किल्लेही वारसास्थळ बनू शकतात, यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. परदेशातील पर्यटक वारसास्थळांकडे आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी १४ सुविधांची पूर्तता होण्याची गरज असते. त्यादृष्टीने पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग व पुरातत्व विभागातर्फे हा विशेष अभ्यास दौरा सुरू आहे. डॉ. जैन व डॉ. हुजा यांचे शिष्टमंडळ पाच किल्ल्यांना भेट देणार आहेत.

डॉ. जैन व डॉ. हुजा यांनी पन्हाळागडावरील तीन दरवाजा, अंबरखाना, सज्जा कोटी, संभाजी महाराज मंदिर आदी स्थळांना भेटी देऊन माहिती घेतली. इतिहास संशोधक भगवान चिले आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. डॉ. जैन यांनी सज्जा कोटीसह काही स्थळांचे फोटोही घेतले. डॉ. जैन व डॉ. हुजा शिवनेरी व रायगडची पाहणी हेलिकॉप्टरने करणार आहेत. त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे व संभाजीराजे पाहणी करणार आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत इतिहास अभ्यासक मालोजीराजे जगदाळे, राज्य दुर्ग समितीच्या सदस्य सचिव सुवर्णा तळेकर, अमर पाटील, प्रमोद मांडे उपस्थित होते.

परदेशी पर्यटक वाढतील

पन्हाळ्यातील वास्तू या ​सुस्थितीत आहेत. पुरातत्व विभागाने प्रत्येक वास्तूला कुंपन घातले आहेत. पन्हाळ्यावर विकास करण्यास जागा राहणार आहे. अंबरखाना, सज्जा कोटी या वास्तू सुस्थितीत आहेत. पन्हाळा ​गडाला इतिहासही आहे. जगभरातील पर्यटक इंटरनेटवर जागतिक वारसास्थळ असलेल्या वास्तूंनाच भेटी देतात. पन्हाळ्याचा समावेश झाला तर जगभरातील इतिहास संशोधक, अभ्यासक व पर्यटक मोठ्या संख्येने पन्हाळ्याकडे आकर्षित होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरउर्जेसाठी प्रोत्साहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजेऐवजी सौरउर्जा वापरण्यास प्रोत्साहन देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सौरउर्जा उपकरण व उपसा संच खरेदीसाठी कर्ज देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कंत्राटदार शेतकरी सभासदांसाठी तोडणी वाहतूक कर्ज योजना जाहीर केली आहे.

जिल्हा बँकेने व्यवसाय वाढवण्यासाठी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ​पीक कर्जाबरोबर जनावरे, उपसा सिंचन, ट्रॅक्टर ट्रेलर, शेतघर, गोठा, बैलजोडी गाडी, शेतकरी निवास, शेतजमीन खरेदी, वाहन खरेदी, किसान सहाय्य अशा विविध प्रकारचा कर्जपुरवठा केला जातो. वीजेचा वापर करुन शेतकरी उत्पादन घेत असतो. त्यामुळे प्रदूषण होऊन त्याचा पर्यावरणावरही परिणाम होतो. दुर्गम भागात वीजेची सोय नसल्याने अनेक शेतकरी प्रगत शेतीपासून वंचित राहतात. त्यासाठी पर्याय म्हणून सौर उर्जेचा वापर ही काळाची गरज झाली आहे.ही उर्जा नैसर्गिक असल्याने त्याचा विनामूल्य वापर व शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन आर्थिक प्रगतीस हातभार लागणार असल्याने त्याची उपकरणे व उपसा संच खरेदीचे कर्ज शेतकऱ्यांना बँकेने उपलब्ध करुन दिले आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यात ऊसकरी शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात असलेल्या २१ साखर कारखान्यांसाठी ऊस आणण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूकदारांची नियुक्ती केली जाते. हा कंत्राटदार कारखान्याशी करार करतो. मजुरांची आवश्यकता असल्याने मजूर उपलब्ध होण्यासाठी कंत्राटदारांना कारखाने अॅडव्हान्स किंवा ऊसतोडणीसाठीच्या रकमा अदा करतात. गाळप सुरू झाल्यानंतर त्यांच्या तोडणी बिलातून रक्कम वसूल केली जाते. कंत्राटदार अशा पद्धतीने घेणाऱ्या कर्जाचा व्याजदर मोठा असतो. त्यांना वेळेत कर्जही मिळत नाही. त्यांच्यासाठीही आता जिल्हा बँकेने विकास संस्थेमार्फत ऊस तोडणी व वाहतूक कर्जासाठी एक लाख ते पाच लाखापर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कर्ज प्रकाराचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन कागदावरच

0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः जिल्हाधिकारी कार्यालय ते गाव असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा करून पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे. प्रत्यक्षात कागदावर आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन चांगले असले तरी व्यवस्थापनात सहभागी असलेले प्रांताधिकारी आणि तहसिलदार हा मधला दुवा मात्र फोन स्वीच ऑफ अथवा डायव्हर्ट करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आपत्ती व्यवस्थापनातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना त्यांची जाणीव व कारवाईची ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

२००५ आणि २००६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने दैना उडाली होती. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यान्वित झाले. वर्षभर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असला तरी खऱ्या अर्थाने या कक्षाचे काम पावसाळ्यात जास्त असते. एक जून ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थेशी संबंधित सर्व विभाग अलर्ट असले तरी काही प्रांताधिकारी आणि तहसिलदार आपले काम नव्हेच, या अविर्भावात कार्यरत असतात. एखाद्या गावात, शहरात, रस्त्यांवर घडलेली घटना त्यांना सर्वांत शेवटी समजते. एखाद्या गावात घडलेली आपत्तीजनक घटना ग्रामसेवक किंवा तलाठ्यांनी माहिती तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना माहिती कळवणे आवश्यक असते. त्यानंतर ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवली पाहिजे. पण, गेले काही वर्षे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती कळाल्यानंतर आपत्तीची माहिती प्रांताधिकारी, तहसिलदार, तलाठ्यांना कळवली जाते. हा उलटा प्रवास घडण्यास मधली यंत्रणा निष्काळजीपणे काम करत असते. मधल्या यंत्रणेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही. तसेच आपत्ती व्यवस्था यंत्रणा राबवताना सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महापालिका, पालिका, आरोग्य, वीज मंडळ, वन विभाग, ग्रामपंचायत, सार्वजनिक वाहतूक या यंत्रणांत समन्वय असावा लागतो. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसर नियुक्ती करावयाची असते. पण आपत्तीशी संबधीत विभाग कार्यालयातील जी व्यक्ती काम करण्यास हयगय करते अशा व्यक्तींची नियुक्ती आपत्ती व्यवस्थापन कामांसंबंधी करते. त्यामुळे पूर्णक्षमतेने, काळजीपूर्वक काम केले जात नाही. पण, सर्व यंत्रणा एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यात कमी पडत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कागदावरच दिसून येते.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाइल २४ तास ऑन हवेत

गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापनात हेतुपुरस्सर हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. पावसाळ्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोबाइल व टेलिफोन २४ तास सुरु ठेवणे बंधनकारक आहे. कामात कुचराई केल्यास कारवाई केली जाईल. पूर आणि आतिवृष्टीमुळे काही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष आणि पोलिस नियंत्रण कक्षास देणे बंधनकारक आहे. टाळाटाळ झाल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल.

असे आहे सूक्ष्म गाव आपत्ती व्यवस्थापन

प्रत्येक गावाचे सूक्ष्म गाव आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे. गाव आपत्ती व्यवस्थापन समितीवर जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, वायरमन, टेलिफोन कर्मचारी, आरोग्य सेविका, पाटबंधारे कर्मचारी, पशुसंवर्धन कर्मचारी, विकास सोसायटी चेअरमन, नावाडी, स्वस्त धान्य दुकानदार, मुख्याध्यापक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, समाजसेवक यांची नोंद असते. त्यांचे सर्वांचे मोबाइल आणि फोन नंबरची यादी करण्यात आली असते. गावातील आपत्ती व्यवस्थापनात या सर्वांनी एकत्र काम करून तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधून आपत्तीची माहिती व मदतीची मागणी करायची असते.

आपत्कालीन व्यवस्थेसाठी उपलब्ध साधनसामग्री

रबर बोट १३ (शिरोळ ७, करवीर २, महापालिका ३, गडहिंग्लज नगरपालिका १)

जिल्हा परिषदेकडील नावा ६७

लाइफ जॅकेट १५०

लाइफ रिंग १५०

अस्का टॉवर लाइट १२ (नऊ नगरपालिकेला प्रत्येकी १, पाटबंधारे व बांधकाम विभागांना प्रत्येकी १)

आपत्कालीन व्यवस्थेतील कामे

पुरग्रस्त गावात धान्यसाठा करून ठेवणे

पुराच्या काळात पिण्याचे पाणी, औषधोपचार, वीज व भोजणाची सोय करणे

स्थलांतरासाठी जागा निश्चित करणे

महापालिका, नगरपालिका, गावांतील धोकादायक इमारतीची यादी करणे

शहरातील नाले, गटारींची स्वच्छता करणे

झोपडपट्ट्यांचा अभ्यास करणे

कर्नाटक व महाराष्ट्रात समन्वय ठेवणे

पूरपरिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. दैनंदिन पाणी साठा, विसर्ग, पर्जन्यमान यांचे नियोजन करण्यात येत आहे. राधानगरी, काळम्मावाडी, कोयना, वारणा, अलमट्टी धरणांवरील पाणीसाठा व विसर्ग यांची माहिती एका क्षणात धरणांवरील अधिकारी व तीनही जिल्ह्यातील आपत्ती कक्षांना कळवले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images