Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तावडे हॉटेलनजीक बास्केट ब्रीजला मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-मुंबईहून कोल्हापुरात प्रवेश करताना गांधीनगर फाट्यावर वाहतुकीची कोंडी होते. हे टाळण्यासाठी तेथे बास्केट ब्रीज बांधण्यास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या पुलासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला होता.

गांधीनगर फाट्यानजीक होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व कोल्हापुरातील प्रवेश प्रशस्त व्हावा यासाठी पंचगंगा पुलापासूनच नवा बास्केट ब्रीज बांधावा, जो थेट सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरून जुन्या जकात नाक्यापर्यंत येईल, अशी संकल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली आहे. हा बास्केट ब्रीज तातडीने बांधण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीला तत्त्वत: मान्यता देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.

अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक आणि यात्रेकरू कोल्हापुरात येत असतात. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ चा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोकण आणि कर्नाटकात प्रवेश करण्यासाठीही कोल्हापूर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पुणे किंवा साताऱ्याहून कोल्हापुरात येण्यासाठी पंचगंगा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर गांधीनगर फाट्यावरून उड्डाणपुलाच्या खालून यावे लागते. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. शिवाय गांधीनगर मोठी बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कोल्हापुरात प्रवेश करतानाच वाहतुकीच्या कोंडीचा फटका पर्यटकांना बसतो. हे टाळण्यासाठी बास्केट ब्रीज बांधला तर वाहतुकीची कोंड कमी होईल आणि कोल्हापुरात थेट प्रवेश करण्यासाठी प्रशस्त रस्ता तयार होईल, असे खासदार महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण हटावचा धडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील प्रमुख मार्गावर बेकायदेशीररित्या खोकी टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालविण्यात आला. महापालिकेच्या पथकाने दिवसभरात ३८ अतिक्रमणे हटविण्यात आली. रेल्वे उड्डाणपुलाजवळील किरकोळ अपवाद वगळता मोहिमेला कुठे विरोध झाला नाही. पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. शुक्रवारी (ता.१३) सायबर चौक हॉकी स्टेडियम ते इंदिरा सागर हॉल या मार्गावरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. संभाजीनगर बसस्थानक समोरील अतिक्रमण काढले जाणार आहे.

बुधवारी तावडे हॉटेल, दसरा चौक, व टाऊन हॉल परिसरातील अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. अतिक्रमण निर्मूलन पथकाचा कारवाईचा धडाका पाहून गुरूवारी अनेकांनी स्वतहून केबिन काढून घेतल्या. गुरूवारी सकाळी सकाळी ११ वाजता शाहू जकात नाका येथून कारवाईस सुरूवात झाली. जकात नाका परिसरातील शेडस व केबिन्स मिळून १२ अतिक्रमणे हटविण्यात आली. शाहू जकात नाका येथून सुरूवात झालेली मोहिम या मार्गावरून टेंबलाई रेल्वे उड्डाणपुलापर्यंत करण्यात आली. उड्डाणपूल परिसरातील केबिन काढताना एका महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर केबिन विरोधात मोहिम सुरू असल्याचे स्पष्ट केले. या भागातील अनधिकृत केबिन्स हटविल्या. मोहिमेत इस्टेट, अतिक्रमण विरोधी विभाग व ​अग्निशमन दलाचे मिळून १५० कर्मचारी सहभागी झाले.

धैर्यप्रसाद हॉल, पितळी गणपती चौक व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय समोरील मार्गावरही मोहिम राबविण्यात आली. धैर्यप्रसाद हॉल परिसरातील व्यावसायिकांनी पुढे येत केबिन काढून घेतल्या. राजारामपुरी मार्केट विभागीय कार्यालय, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय, अतिक्रमण विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई झाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अ​भियंता एस. के. माने, हर्षजीत घाटगे हे अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते. आयआरबीच्या रस्त्यावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांनी स्वत:हून केबिन काढून घेत महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलवसूलीचा प्रश्न कायमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते सांगली रस्ता महिनाभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होणार असला तरी तेथील टोल वसुलीचा मुद्दा कायम राहणार आहे. पण हा रस्ता आता नागपूर ते रत्नागिरी या महामार्गातील भाग बनणार असल्याने टोलचा प्रश्न संपुर्ण रस्त्यासाठीचा बनणार आहे. केंद्र सरकारच्यावतीने केवळ सांगली रस्त्यासाठी नव्हे, संपुर्ण महामार्गासाठी धोरण राबवले जाणार असले तरी टोलला या परिसरातून विरोधच होणार आहे.

जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबर २०१२ मध्ये दिलेल्या मंजुरीप्रमाणे २०१४ मध्ये काम पूर्ण होण्याची आवश्यकता होती. पण या कालावधीनंतरचाही दिड वर्षाचा कालावधी संपला तरी केवळ ६० टक्क्यापर्यंतच काम झाले आहे. या मुद्द्यांवरुन रखडलेल्या व कमी दर्जाच्या कामाबाबत सातत्याने आंदोलने करण्यात आली. हा रस्ता राज्य सरकारच्या अखत्यारित न ठेवता राष्ट्रीय प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात यावा अशीही मागणी केली जात होती. त्यावर बुधवारी दिल्लीत शिक्कामोर्तब झाले.

कंत्राटदाराला महिनाभराचा कालावधी दिला आहे. या कालावधीत सर्व प्रक्रिया पुर्ण करुन प्रकल्प राज्य सरकारकडे हस्तांतरीत करावा, असे बैठकीत ठरले आहे. त्यानंतर राज्य सरकार हा रस्ता प्राधिकरणाकडे वर्ग करणार आहे. यासाठी कंत्राटदाराने जितके काम केले आहे, त्याचे मूल्यांकन करुन राज्य सरकार तितके पैसे ​देईल. पण एकदा हा रस्ता वर्ग झाल्यानंतर प्राधिकरण त्यांच्या निकषांप्रमाणे रस्त्याची कामे पुर्ण करणार आहे. यामुळे रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण होतील. महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पुर्ण झाली तरी टोलचा मुद्दा राहणार आहे. या संपुर्ण रस्त्याला टोल बसवला जाईल, अशी स्थिती आहे. फक्त प्राधिकरणाकडून केवळ कोल्हापूर सांगली या मार्गासाठी नव्हे तर नागपूर ते रत्नागिरी या मार्गासाठी धोरणात्मक निर्णय असेल, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

सध्या तरी राज्य सरकारच्या निविदेनुसार सुरू असलेले दर्जा नसलेले काम या हस्तांतरणानंतर बंद होऊन चांगला रस्ता मिळेल, अशी भावना आहे. यामुळे अपघात कमी होऊन नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. प्राधिकरणाकडून अनेक ठिकाणी टोल लावले जातात. पुणे बेंगळुरु या रस्त्याचे अगदी जवळचे उदाहरण आहे. मात्र स्थानिक टोलबाबतचे प्रकरण वेगळे असल्याने त्याला ठिकठिकाणी कडाडून विरोध केला जातो. या रस्त्यावरही टोलसाठी काही वेगळे निर्णय घेतले गेल्यास आंदोलनाचे हत्यार आम्ही बाजूला ठेवलेले नाही, असा इशाराच खासदार शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे काही भागापुरता टोल हा पुन्हा वादग्रस्त होऊ शकतो. सध्या तरी या रस्त्याचे गुणवत्तापुर्ण काम होण्याची आवश्यकता हा रस्ता हस्तांतरण झाल्यानंतर पुर्ण होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराज्याभिषेकासाठी हिमालयातून पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी बांधवांसाठी अभिमानाचा केंद्रबिंदू असलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध संस्थांकडून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावेळी शिवराज्याभिषेक दिनासाठी ट्रेकिंग करून हिमालयातील भ्रिगू तळ्यातून पाणी आणले जाणार आहे. तर सह्याद्रीच्या कुशीतील गड-किल्ल्यांवरूनही आणलेल्या पाण्याने रायगडावरील शिवपुतळ्यास अभिषेक होणार आहे. या उपक्रमाची माहिती कोल्हापूर हायकर्स संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहा जूनला होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडावर साजरा केला जातो. यावेळी अभिषेकासाठी थेट हिमालयातील भिग्रू तळ्यातून पाणी आणण्याचे नियोजन कोल्हापूर हायकर्स संस्थेने केले आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार २०० फूट उंचीवरील या तळ्यातून पाणी आणण्यासाठी बुधवारी (ता. १८) कोल्हापुरातील गिर्यारोहक रवाना होणार आहेत. हिमालयाच्या पीरपांजाल रांगांमधील या तळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण पाणी अभिषेकासाठी वापरले जाणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य वाढवले त्या सह्याद्रीच्या कुशीतील गड-किल्ल्यांवरूनही पाणी आणण्यासाठी गिर्यारोहक रवाना होणार आहेत. या दोन्ही मोहिमेत ट्रेकिंग करून पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. हिमालयातून पाणी आणण्याच्या टीमचे नेतृत्व सागर पाटील करणार आहेत, तर सह्याद्रीतून पाणी आणण्याच्या मोहिमेचे नेतृत्व शशांक तळप आणि मुकुंद हावळ करणार आहेत. सागर पाटील, मुकुंद हावळ, संजय कुलकर्णी, योगेश शिंदे, प्रीतमसिंह कुराडे आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीबाबत अहवाल द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी नगरविकास विभागातील दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीची नेमणूक करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानुसार लवकरच ही समिती कोल्हापूरला येणार आहे. त्यामुळे सरकार हद्दवाढीबाबत लवकरच निर्णय घेईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

हद्दवाढीबाबत महापालिकेने १८ गावांचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्राय दिला आहे. आता सरकारकडून पुढील ​​प्रक्रिया सुरू करण्याची प्रतिक्षा आहे. गेल्या आठवड्यात येथील शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीची पालकमंत्री पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत सरकारने अधिसूचना काढावी, अशी मागणी केली होती. तसेच हद्दवाढ किती आवश्यक आहे, याचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारकडे सादर करण्याबरोबरच इतर कागदपत्रेही दिली होती. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी हद्दवाढ आवश्यक आहे, पण घाईगडबड होऊ नये म्हणून दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी नगरविकासच्या दोन अधिकाऱ्यांची समिती नेमणार असल्याचे सांगितले होते. आठ दिवसांत ही समिती येईल, असेही सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. १९४४ मध्ये नगरपालिकेच्या स्थापनेनंतर व १९७२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराची एक इंचही हद्दवाढ झाली नाही. शहरवासियांनी सातत्याने हद्दवाढीची मागणी केल्यानंतर निर्णय घेण्यासाठी आश्वासने देण्यात आली. समित्या स्थापल्या. पण त्यानंतर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी केवळ समिती नेमून बाजू ऐकून घेऊन वेळ जाऊ नये यासाठी या समितीकडून सरकारला त्वरीत अहवाल सादर करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना समिती नेमण्यासाठी आदेश दिले आहेत. लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही समिती दोन्ही बाजूचे मत ऐकून घेण्यासाठी तातडीने कोल्हापुरात येणार आहे. नगरविकासकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने या समितीसमोर हद्दवाढीबाबत आवश्यक ती भूमिका मांडण्याची जबाबदारी महापालिका तसेच अन्य घटकांवर येऊन ठेपली आहे. या समितीसमोर हद्दवाढविरोधी समितीलाही बाजू मांडता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ वधू-वरांच्या रेशीमगाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नासाठी होणाऱ्या लाखोंच्या खर्चाला फाटा देत शिवसंस्कार फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २१ वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या.

मार्केट यार्ड येथील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉल येथे गुरुवारी दुपारी १२ वाजून १३ मिच्या मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मधुरिमाराजे छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, प्रतिमा पाटील आदी उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यामध्ये शेतकरी, सरकारी नोकरदार, वकील, व्यवसायिक वर सहभागी झाले होते. या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या विवाहासाठी लागणारे हार-तुरे, मुलांसाठी ड्रेस, मणी मंगळसूत्र, मुलीसाठी शालू, भांडी, सभागृह आणि जेवणाचा खर्च मोफत करण्यात आला. याचबरोबर सरकारच्यावतीने देण्यात येणार अनुदानही यांना मिळवून देण्यात येणार आहे.

हा विवाह यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते गेल्या चार महिन्यांपासून नियोजन करत होते. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी अध्यक्ष विक्रम घाटगे, नीलेश हंकारे, अजित आडसुळे, महावीर पवार, मनोज डफळे, हेमंत साळोखे, रणजित भोसले, चेतन शिंगटे, जावेद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरच्या धडकेत कबनूरची महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा-वाघवे रस्त्यावर भरघाव टॅक्टरच्या धडकेत योगिता संदीप कांबळे (वय २५, रा. कबनूर, ता. हातकणंगले) या ठार झाल्या. या अपघातात त्यांचे पती, दोन मुले आणि आईही गंभीर जखमी झाली. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ट्रॅक्टरचालक प्रशांत मारूती साठे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी वाघवे गावात जत्रा होती. जत्रेला जाण्यासाठी योगिता या पती संदीप (३२), मुलगी तनिष्का (६), मुलगा रूद्र यांच्यासोबत दुपारी पावणेबारा वाजता एसटीने कोतोलीमार्गे वाघवेत आल्या. त्यांना नेण्यासाठी योगिता यांची आई स्वाती विकास कांबळे या वाघवे फाट्यावर आल्या होत्या. सर्वजण फाट्यावरून चालत गावाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या भरघाव ट्रॅक्टरने पाचही जणांना जोरदार धडक दिली. सर्वांना उपचारासाठी खासगी वाहनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. उपचार सुरू असताना योगिता यांचा मृत्यू झाला. पती संदीप याच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेले असून ते गंभीर जखमी आहेत. तनिष्का आणि रूद्र किरकोळ जखमी झाले. स्वाती यांच्या डोक्याला लागले आहे. या घटनेची पन्हाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगद‍्गुरु शंकराचार्य यांचा जयंती उत्सव सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जगद‍्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर यांच्या विद्यमाने जगद‍्गुरु शंकराचार्य यांच्या २५२४ व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते २१ मे रोजी, शंकराचार्य पीठ, शुक्रवार पेठ येथे सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मठाधिपती विद्यानृसिंह भारती यांनी पत्रकार बैठकीत दिली.

भारती म्हणाले, 'या सोहळ्यात १६ मे रोजी, ह. भ. प. गोविंद महाराज दिंडोरीकर यांचे जन्मकाळ कीर्तन, सायंकाळी ५ वाजता प्रवचन आणि रात्री ८.३० वाजता गायन होणार आहे. याचबरोबर २१ मे पर्यंत रोज सकाळी ७ वाजता शंकरविजय ग्रंथाचे पारायण, हवन, प्रवचन, कुंकूमार्चन, पालखी पूजन, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर २० मे रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैदिक पुरस्कार वाराणसीचे राम घनपाठी, सांस्कृतिक पुरस्कार राजेश्वर शास्त्री जोशी, कीर्तनकार पुरस्कार बडोदाचे गोविंदमहाराज दिंडोरीकर, स्थानिक वैदिक पुरस्कार गजानन फाटक, सामाजिक पुरस्कार राजू मेवेकरी, महिला कीर्तनकार पुरस्कार सविता मुळे आणि होतकरु विद्यार्थी पुरस्कार पुण्याचा पार्थ जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच शंकराचार्य यांचा जयंती हा दिवस केंद्र सरकारने तत्वज्ञान दिवस म्हणून जाहीर केला आहे.'

या उत्सव सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला कार्यवाह शिवस्वरुप भेंडे, अध्यक्ष सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खर्च २५, दाखवला ५५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील जयंती नाला येथे सिवेज पंपिंग स्टेशनसाठी ११ केव्ही उच्चदाबाच्या कनेक्शनच्या एक्स्प्रेस फिडर उभारण्यावरून स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. त्यासाठी महावितरणची २५ लाखांची निविदा असताना महापालिकेने ५५ लाखांपर्यंतची निविदा कशी तयार केली अशी विचारणा करत सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाची चिरफाड केली. सदस्यांच्या आक्रमक भावना विचारात घेऊन स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी फेरप्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, नगररचना विभागाच्या फायली सहाय्यक संचालकाकडून थेट आयुक्तांकडे सादर करा असा आदेश यावेळे सभापतींनी दिला. या फायली उपायुक्ताकडे का जातात अशी विचारणा नगरसेवक कदम यांनी केली. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.

जयंती नाल्यावर पंपिंग स्टेशनला पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठ्यासाठी १४०० मीटर लांबीची, ११ केव्ही क्षमतेची उच्चदाबाची विद्युत वाहिनी व त्यासाठी आवश्यक एक्स्प्रेस फिडर उभारणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने महावितरणकडून अंदाजित खर्च मार्गविला. महावितरणने एकूण खर्च १६ लाख ३८ हजार ५३४ रुपये दाखवला. विविध कर व कामगारांवर होणारा खर्च विचारात घेऊन २५ लाखापर्यंत खर्च होईल असा अहवाल दिला. विद्युत वितरण कंपनीचा खर्च इतका असताना महापालिकेच्या ५५ लाखांच्या अंदाजित खर्चातील तफावतीवरून नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सदस्य सुनील पाटील, सूरमं​जिरी लाटकर, शोभा बोंद्रे, रुपाराणी निकम, प्रतिज्ञा निल्ले, मेहजबीन सुभेदार, रीना कांबळे यांनी वाढीव घरफाळ्याची बिले, आर.ई. इन्फ्रावरील कारवाई, थेट पाइपलाइन योजनेच्या कामाचा आढावा, नाले सफाई यासंबंधी प्रश्न उपस्थित केले.

स्वतंत्र न्यायालय स्थापणार

महापालिकेच्या विविध विभागांतील केसेस कोर्टात अधिक प्रमाणात आहेत. या केसेसचा निकाल तत्काळ लागावा व महापालिकेच्या कामकाजासाठी न्यायाधीश दंडाधिकारी वर्ग एक यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. महापालिकेच्या इमारतीत स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेतील पोलिसाची ​तीन तास कसून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा शिक्षण संस्थेतील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयिताला स्वतःच्या नावावर बुलेट खरेदी करून देणाऱ्या मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कर्मचारी इम्रान आमजुद्दीन नदाफ याची शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन तास कसून चौकशी केली.

संशयित मोहिद्दीन मुल्ला याला वारणा शिक्षण संस्थेच्या फ्लॅटमधून सव्वातीन कोटी रुपये चोरून नेल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केली होती. मुल्लाने वारणेत चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. मोहिद्दीनने दोन बुलेट खरेदी केल्या होत्या. त्यातील एक पोलिस कर्मचारी नदाफ याच्या नावे तर एक बुलेट सासूच्या नावाने खरेदी केली. नदाफ याची चौकशी करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र तो रजेवर होता.

शुक्रवारी सकाळी इम्रान नदाफ कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीला हजर झाला. पोलिस निरीक्षक डी. एन. मोहिते यांनी त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी नदाफ याने, 'माझी आणि मोहिद्दीनची ओळख होती. मात्र त्याने माझी खोटी सही करून माझ्या नावावर बुलेट खरेदी केली. पोलिसांना मोटारसायकल लवकर मिळते म्हणून त्याने माझ्या नावाचा वापर केला. कोडोलीतील प्लॉट विकून मिळालेल्या पैशातून मोहिद्दीनने बुलेट खरेदी केल्याचे मला सांगितले होते' अशी कबुली दिली. दरम्यान, वारणेतील रक्कमेचे गुढ कायम आहे. यापूर्वी चौकशी केलेल्या व्यक्तींकडे पुन्हा चौकशी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा हरदेव सिंह यांचे अनुयायी शोकाकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संत निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचे शुक्रवारी कॅनडा येथील मॉन्ट्रियल शहरात मोटार अपघातात निधन झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कोल्हापुरातील अनुयायांवर दु:खाचा डोंगर कोसळला. निधनाचे वृत्त समजताच शुक्रवारी दुपारनंतर कोल्हापूर परिसरातील सर्वधर्मीय अनुयायी व नागरिकांनी गांधीनगर येथील संत निरंकारी सत्संगभवन येथे गर्दी केली. ताराबाई पार्क येथील निरंकारी केंद्राच्या शाखेत बाबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान दिल्ली येथील मुख्य केंद्रात निरंकारी बाबा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातून त्यांचे अनुयायी जाण्याची तयारी करत आहेत.

बाबा हरदेव सिंह निरंकारी मार्गदर्शनासाठी जगभरात भ्रमंती करत होते. या भ्रमंतीमध्ये दरवर्षी एकदा त्यांचा कोल्हापुरात दौरा होत असे. गेल्यावर्षी तपोवन मैदानावर झालेल्या कार्यक्रमासाठी हजारो अनुयायी उपस्थित होते. त्यावेळच्या आठवणी आज कोल्हापुरात जाग्या झाल्या. दरम्यान, दुपारी चारच्या दरम्यान बाबा निरंकारी यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच त्याची खात्री करून घेण्यासाठी सिंधी बांधव केंद्रात फोन करून चौकशी करत होते. अखेर ही घटना खरी असल्याचे समजल्यावर सिंधी बांधवानी दुकाने, कार्यालये बंद केली. गांधीनगर येथील मुख्य केंद्रात सर्वजण एकत्र आले. कोल्हापूर परिसरात जवळपास २५ ते ३० हजार सिंधी कुटुंब आहेत. त्यांनी बाबांना आदरांजली वाहिली. दिल्ली येथे बाबांच्या दफनविधीसाठी जाण्याच्या दृष्टिने नियोजन सुरू होते. संत निरंकारी मंडळाच्या मुख्य केंद्रामार्फत पुढील सूचना आल्या​िशवाय कोणीही दिल्ली येथील मुख्य केंद्रात जाऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोल्हापूरविषयी आदर

दरवर्षी कोल्हापूरला अनुयायांना भेटण्यासाठी येणारे बाबा निरंकारी कोल्हापूरकरांनाही भेटायचे. कोल्हापूरचे संस्थानकालीन वैभव, शाहू महाराजांनी साधलेला सामाजिक एकात्मतेचा समन्वय याबाबत त्याना नेहमीच आदर होता. कोल्हापुरातील अनुयायांशी संवाद साधताना ते सातत्याने कोल्हापुरातील आदरातिथ्य करणाऱ्या प्रेमळ लोकांविषयी भरभरून बोलायचे. कोल्हापुरातील सामाजिक सलोखा, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती ही त्यांना विशेष आवडायची.

निरंकारी संप्रदायाची सूत्रे १९८० साली हाती घेतल्यापासून बाबांचे कार्य अफाट आहे. साऱ्या जगातून त्यांच्या ट्रस्टला आर्थिक मदत येत होती. त्याचा उपयोग ते नेहमीच समाजासाठी करायचे. अनेकांना मदत द्यायचे. कोल्हापुरातील दौऱ्यातही त्यांनी अनेकांना मदत केली आहे. सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नाचा आर्थिक भार उचलायचे. त्यांच्या नसण्याची उणीव आयुष्यभर भासत राहणार आहे. - रमेश लालवाणी

आपला एकेक शब्द झेलण्यासाठी लाखो अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत चांगले संदेश पोहोचवले पाहिजेत या भूमिकेतून ते नेहमी आपल्या अनुयायांना सामाजिक एकोपा राखण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कोल्हापूर दौऱ्यात येथील सामाजिक प्रश्न समजून घ्यायचे. त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करत राहणार. - अमरलाल निरंकारी



कोल्हापूर जिल्ह्यात २७ शाखांच्या माध्यमातून बाबांनी मानवतावादाचा संदेश दिला. आज समाजात जे जातीभेदाचे वास्तव अजूनही दिसत आहे ते समूळ नष्ट करण्यासाठी बाबांनी दिलेला मानवतावादाचा संदेश उपयोगी आहे. समाजाला विचारांनी दिशा देणाऱ्या बाबा निरंकारी यांचे योगदान अमूल्य आहे. - श्रीपती जाधव, मुखी, संत निरंकारी मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने हटवली अडीचशे अतिक्रमणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने गेल्या तीन दिवसात बेकायदेशीर केबिन व फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना २०५ अतिक्रमणे हटविली. शुक्रवारी सायबर चौक ते इंदिरा सागर हॉल या रस्त्यावरील ६९ अतिक्रमणे काढण्यात आली. फूटपाथवरील ५९ केबिन उद्ध्वस्त केल्या. तसेच दहा शेडसही जमीनदोस्त केले.

एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातंर्गत आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यावर बेकायदेशीररित्त्या केबिन थाटण्यात आल्या होत्या. फूटपाथवरही काही जणांनी व्यवसाय सुरू केले होते. या अतिक्रमणच्या विरोधात महापालिका व स्थायी समिती सभेतही चर्चा झाली होती. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत अतिक्रमण हटविण्यायच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाने व अतिक्रमण विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत बुधवारपासून अतिक्रमणच्या विरोधात कारवाई सुरू आहे. गेल्या तीन दिवसात २०५ अतिक्रमणे हटविण्यात आली. ​प्रमुख रस्ते व चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. महापालिकेच्यावतीने आता शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि चौकातील बेकायदेशीर केबिन हटविण्यात येणर आहेत. फूटपाथवरील खोकी काढण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांनी बेकायदेशीर केबीन थाटली आहेत, त्यांनी ती स्वत:हून काढून घ्यावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवंग आंदोलने खपवून घेणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काही कार्यकर्ते सवंग प्रसिद्धीसाठी आंदोलने करीत आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. लोकप्रियतेसाठीची आंदोलने यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, अशा कानपिचक्या शिवसेनेचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या बैठकीत हा इशारा दिला.

संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, 'ज्या पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी वेळ देता येत नाही. त्यांनी स्वतःहून पदमुक्त व्हावे.

चांगल्या कार्यकर्त्यांची जागा अडवून ठेऊ नये. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. प्रत्येक गावांत शिवसेनेचे शाखा आहे. त्यांचे संघटनकौशल्य अधिकाधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न केले पाहिजेत. काहींच्यात आपसी मतभेद असल्यास तातडीने मिटविले पाहिजेत. शिवसेनेची ताकद प्रत्येक तालुक्यात वाढत आहे. या वातावरणाचा फायदा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याने घेतला पाहिजे.'

यावेळी संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्या हस्ते पाचगावला मोफत पाणीपुरवठा केल्याबद्दल विराज पाटील याचा सत्कार झाला. जिल्हाप्रमुख संजय पवार, दुर्गेश लिंग्रज, राजू यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांची सुपारी घेऊन काम करता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजू लाटकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी नगरसचिव उमेश रणदिवे यांच्यावर विरोधकांची सुपारी घेऊन काम करत असल्याचा थेट आरोप केला. दबावाखाली किती चुकीची कामे करणार, दरवेळी कायद्याची भाषा शिकवता, मग महिला बालकल्याणचे एक पद रिक्त असताना सभापती निवड प्रक्रिया कशी राब​वता? अशा शब्दांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी रणदिवे यांच्यावर हल्लाबोल केला. कोर्टाच्या स्थगितीच्या आदेशावरून शारंगधर देशमुख व भाजप गटनेते विजय सुर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी दुपारपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत होती. सदस्य संख्या आठ आहे. चिठ्ठीवर सभापती ठरणार असल्याने दोन्ही गट अस्वस्थ आहेत. दोन्ही गटाकडे संख्याबळ समान (४-४) असल्याने कोर्टाच्या माध्यमातून स्थगिती मिळविण्याच्या प्रकारामुळे दोन्ही गटांत संघर्ष वाढला आहे. यात प्रशासन मात्र भरडले जात असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी यामध्ये हस्तक्षेप करत सदस्यांच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी जिल्हा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचा सभापतिपद निवडीला स्थगिती दिल्याचा आदेश घेऊन नगरस​चिव कार्यालय गाठले. पाठोपाठ सायंकाळी सत्तारूढ १५ ते २० नगरसेवकांनी जाऊन कोर्टाने निवडणुकीस मनाई केली असताना प्रक्रिया का राबविता, अशी विचारणा केली. त्यावर रणदिवे यांनी पॅनेलवरील वकील डी. डी. घाटगे यांचा अभिप्राय घेतल्याचे सांगितले. मात्र सदस्यांनी घाडगे बोगस माणूस आहे. तुम्ही दोघे संगनमताने वृषाली कदम यांना सभापतिपद मिळू नये यासाठी खेळी करता असा आरोप केला. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, अन्य सदस्य यावेळी उप​स्थित होते.

...........

मंगळवारच्या कार्यक्रमाला स्थगिती

कोर्टाने मंगळवारच्या निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र यापूर्वी कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार प्रक्रिया सुरु आहे, असे उत्तर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व रणदिवे यांनी दिले. यामुळे समाधान न झालेल्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन म्हणणे मांडले. दरम्यान भाजप आघाडीचे सदस्य दुपारी तीनच्या सुमारास अर्ज दाखल करायला गेले असता नगरसचिव कार्यालयात अधिकारी नव्हते. याबाबत त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली.


गटनेत्यांकडूनच समिती सदस्यांची नावे निश्चित होतात. काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी सदस्य निवडीचा अधिकार न बजावता संपूर्ण प्रक्रियेला खो घातला. देशमुख यांनी कोर्टाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आहे.

विजय सुर्यवंशी,गटनेता, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून समस्यांची निर्गत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्यांच्या सोडवणुकीमध्ये बहुतांश वेळ जात असल्याने पाल्यांच्या विकासावरील लक्ष विचलित होत आहे. अशावेळी पालक आणि पाल्यांमध्ये संवाद घडणे आवश्यक आहे. कुटुंबातील वातावरण तणावविरहित ठेवण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोनाची बीजे रोवण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा,' असे आवाहन प्रा. शशिकांत कापसे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स आणि ओम सायन्स अॅकॅडमीतर्फे 'अकरावी सायन्सकरिता यशाचा कानमंत्र' या दोनदिवसीय मोफत कार्यशाळेत ते बोलत होते. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम, परीक्षेतील बदलाची माहिती, पेपर कसा सोडवावा, उत्तरपत्रिका कशी लिहावी. कोणत्या घटकांचे पाठांतर करावे, लेखन कौशल्य आणि वेळेच्या नियोजनासह तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, याचा कानमंत्र कार्यशाळेत मार्गदर्शक प्रा. कापसे यांनी दिला. रविवार पेठेतील जैन गल्ली येथील अॅकॅडमीच्या हॉलमध्ये कार्यशाळा सुरू आहे.

प्रा. कापसे म्हणाले, 'दहावीत ९० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी बारावी सायन्समध्ये केवळ ५५ टक्के गुण मिळवितात. याबाबत मी चार वर्षे संशोधन केले असून, विद्यार्थ्यांमध्ये २८ प्रकारच्या समस्या दिसून आल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यात एक शास्रज्ञ दडलेला असतो. मानसिक ताण, अभ्यासाचे नियोजन कुटुंबामध्ये सातत्याने संवाद ठेवल्यास या समस्या त्वरित निकालात निघू शकतात. दहावीनंतर बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यावेळी अभ्यासात चिकाटी आणि ध्येय निश्चित केल्यास उज्ज्वल करिअर घडू शकते. पालकांनी मुलांकडून जरूर अपेक्षा ठेवाव्यात. मात्र, यासाठी त्यांनी त्यांच्याशी संवाद ठेवण्याची गरज आहे. संवादातून अनेक समस्यांची निर्गत होऊन मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करता येते.'

प्रा. सुहास देशपांडे म्हणाले, 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) एकूण ७२० गुणांची घेतली जाते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी ५०० गुण मिळवावे लागतील. यासाठी विद्यार्थ्यांनी अकरावी व बारावीला पीसीएमबी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथॅमेटिक्स, बायोलॉजी) ग्रुप ठेवावा लागेल. 'नीट'बरोबरच सीईटी व जेईई परीक्षांचीही तयारी करण्यासाठी अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमांचा सखोल अभ्यास करावा. प्रत्येक पाठावर २५ प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची तयारी करण्यासाठी पाया मजबूत असायला हवा. असे झाल्यास कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास यश मिळते. यासाठी सराव आणि वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.'

प्रा. प्रदीप जनवाडे म्हणाले, 'आयटी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मॅथ्स विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपग्रह, दळणवळण यामधील सांख्यिकी आकडेमोडींचा अंतर्भाव होतो, तर सीईटी परीक्षेसाठी 'ए' ग्रुपमध्ये मॅथ्स अनिवार्य आहे. मॅथ्सचा इतर विषयांशी समन्वय असल्याने कम्प्युटर प्रोग्रॅम, c++ प्रोग्रॅमध्ये वापर होतो. अॅडव्हान्स कम्प्युटर टेक्निक्समध्ये मॅथ्समधील समीकरणांचा वापर केला जात असल्याने या विषयांतून विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.'

यावेळी प्रा. शगुप्ता मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. रविवारी होणाऱ्या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.


मी दहावीची परीक्षा दिलेली असून, निकालाचे वेध लागले आहेत. चांगले गुण मिळणार याची शंभर टक्के खात्री असल्याने कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याच विचारात होतो. मटाच्या कार्यशाळेतून एक दिशा मिळाली आहे. केवळ अकरावी प्रवेशाबाबतच नाही, तर नीट, सीईटी व जेईई प्रवेश परीक्षेचीही चांगली माहिती मिळाली.

रविराज पाटील, विद्यार्थी

दहावीनंतर करिअरला सुरुवात होते. अशावेळा अनेकांकडून वेगवेगळे मार्गदर्शन मिळते. मात्र, मटाच्या कार्यशाळेतून नेमके काय करायला हवे, याबाबतच उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले. याचा फायदा पुढील अभ्यासाची दिशा ठरविण्यात उपयोगी ठरेल. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करून महाराष्ट्र टाइम्सने आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे.

प्रणाम राजाज्ञा, विद्यार्थी

कार्यशाळेतून चांगल्या टिप्स मिळाल्या. अनेकवेळा पालकांकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव निर्माण होतो. काहीवेळा पालक व विद्यार्थ्यांमध्ये संवादच घडून येत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांबरोबर कसा संवाद साधावा याची उत्कृष्ट माहिती मिळाली.

सविता नाईक, पालक

पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधताना कुटुंबातील वातावरण कसे खेळीमेळीत राखावे याबाबद कार्यशाळेतून चांगली माहिती मिळाली. अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा याचेही बहुमोल मार्गदर्शन मिळाले. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी अशा कार्यशाळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या करिअरला चांगले वळण दिले आहे.

मीना विभूते, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजी का धगधगतेय?

$
0
0

बाळासाहेब पाटील

इचलकरंजी जिल्ह्यातील सर्वांत मोठे शहर. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून या शहराचा नावलौकिक. वस्त्रनगरी, मँचेस्टर आणि अनेक जातीधर्मांच्या, प्रांतांच्या सीमेपलीकडे जाऊन एकत्र नांदणारं शहर असा या शहराचा लौकिक होता. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हे शहर धगधगतं आणि स्फोटक होत चाललं आहे. हे सगळं वातावरण राजकीय धुळवडीला पोषक असलं तरी सर्वसामान्य माणूस आणि उद्योजक या वातावरणात भरडला जातोय, याचे कुणालाच सोरसुतक नाही.

०००००००००००००

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन नंबरचे मोठे शहर. हे शहर केवळ वीज गेली की शांत असते. एरवी यंत्रमागांच्या खडखडाटाने शहर गजबजल्यासारखे असते. या शहराने जवळपास ५० हजार लोकांना रोजगार दिला आहे. कधी काळी महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून या शहराची ओळख अखंड देशभर होती. संस्थानकाळातील अनेक इमारती, मोठ्या शैक्षणिक संस्था, शहराच्या जवळून वाहणारी पंचगंगा नदी आणि आसपासचा सुपीक भाग यामुळे हे शहर जिल्ह्यातील रोजगाराचे महत्त्वाचे शहर मानले जाते. कालानुरुप प्रत्येक शहराचा चेहरामोहरा बदलत जातो. शहरातील हितसंबंध बदलत जातात. राजकीय नेतृत्वात बदल होत जातो तसेच तेथील राजकीय वातावरण बदलत जाते. इचलकरंजीच्या बाबतीत हेच होत गेले.

सात वर्षांपूर्वी येथे मोठी जातीय दंगल झाली. कर्फ्यू लागला. या काळात दंगलीला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून सुरेश हाळवणकर यांना अटक झाली. त्यांची सुटका झाली त्यावेळी त्यांची चक्क कळंबा जेलपासून जंगी रॅली काढण्यात आली. पुढे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांचे त्यांनी पानिपत केले आणि या रॅलीचे विजयी रॅलीत रुपांतर झाले. हाळवणकर आमदार झाले. त्याबरोबर हातकणंगले आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा सेटबॅक बसला. ज्या इचलकरंजीतून ही दंगलीची ठ‌िणगी पडली त्या इचलकरंजीच्या अंगाखांद्यावर अजूनही दूरगामी परिणाम करणाऱ्या जखमा आहेत.

सध्या इचलकरंजी हे धगधगते आणि स्फोटक वातावरण असलेले शहर झाले आहे. एखादा फलक काढण्यावरून पोलिस आणि प्रशासनाशी एखाद्याचा वाद झाला तर क्षणात हजारो तरुण रस्त्यावर येतात. घोषणाबाजी होते. पोलिसही हतबलतेने हा सगळा उन्माद पहात राहतात. या उन्मादाला राजकीय नेतेही सोयीनुसार खतपाणी घालतात. इचलकरंजीत त्याची तीव्रता जास्त जाणवते.

गेल्या वर्षभरापासून येथे किमान चार ते पाच वेळा स्फोटक वातावरण निर्माण झाले. अगदी परवा-परवापर्यंत अख्खे शहर फलकांनी झाकले होते. यात मटकेवाले, खंडणीचे गुन्हे दाखल असलेलं, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न करणारे असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे चेहरे झळकत होते. फलक लागत असताना संपूर्ण पोलिस खाते आणि पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते. फलकांनी अख्खी इचलकरंजी झाकली तेव्हा प्रशासन जागे झाले. पोलिसांनी फलक उतरून घ्यायला सुरुवात केली. ही माहिती समजताच एका क्षणात हजारो लोकांचा जमाव मलाबादे चौकात जमला. घोषणाबाजी सुरू राहिली. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा शहराचे नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याने शांतता कमिटीच्या बैठकीतच 'कोणत्याही परि‌स्थितीत फलक उतरून घेतले जाणार नाहीत. कुणी एसपी जरी आला तरी काढू नका,' असे आदेश चक्क एसपी प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत दिल्याचे एका उद्योजकाने सांगितले.

याबाबत बोलताना हा उद्योजक म्हणाला, 'या नेत्याच्या वक्तव्यावर काही उडाणटप्पू लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजविल्या असल्या तरी सामान्य लोकांनी त्याकडे नाराजीनेच पाहिले. आज आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी येथील काही नेते या सगळ्या घटनांकडे पहात असले तरी ही हा विषारी साप ते उशाला घेऊन झोपत आहेत,' असा इशाराही त्याने दिला.

सर्वमामान्य लोक रात्री नऊनंतर बाहेर फिरायला जायला घाबरतात. एखाद्या शाळकरी मुलाने त्याच्या सायकलने धडक दिली आणि तुम्ही त्याला 'का रे? ' म्हटले की तो घरी जातो आणि गल्लीतील आठ-दहा मुले घेऊन तुमच्यावर चालून येतो. ही संस्कृती कुठली?,' असा सवाल करताना तो म्हणाला, 'आपण जे पेरू ते उगवते. काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी काही तरुण रस्त्यावर दुचाकी आडवी लावून बसले होते. त्यावेळी एक चारचाकी आली. त्यांनी गाडी बाजूला घ्यायला सांगितले. मात्र, गाडी आमची नव्हेच. असे सांगून तरुणांचे टोळके बसून राहिले. तो चारचाकीवाला खाली उतरला, त्याने दुचाकी बाजूला काढली. त्यानंतर त्याला त्या टोळक्याने बेदम मारले. ही प्रातिनिधिक घटना असली तरी हा उन्माद राजकीय संरक्षणातून आला आहे. आपण काहीही केले तरी आपल्या केसालाही धक्का लागत नाही, हे या टोळक्यांना माहीत आहे. पोलिस प्रशासन राजकारण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. एक अशी तळघरातील सुप्त यंत्रणा येथे कार्यरत आहे की, एका क्षणात येथे हजारो लोकांना एकत्र आणून नंगानाच घालण्याची व्यवस्था केली आहे,' असे सांगून त्या उद्योजकाने जणू गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जाळेच उलगडून सांगितले. कदाचित त्यामुळे हे उन्मादी तरुण राज्यकर्त्यांचे कच्चे भांडवल ठरल्याचे स्पष्ट होते. सध्या या कच्च्या भांडवलावर येथील राजकीय प्रवास अनेकांना करायचा आहे. त्यामुळेच येथील नेते तरुण म्हणतील तसे वागायला तयार आहे.

एखादा राजकीय नेता समाजाला दिशा देतो, असे म्हटले जाते. मात्र आता इचलकरंजीतील तरुण राजकीय नेत्यांना दिशा बदलायला भाग पाडत आहेत. त्याबाबत या नेत्यांची कोणतीही ना नाही. असेच मत येथील एका नगरसेवकाने व्यक्त केले. तो म्हणाला, 'कधी काळी आम्ही विशिष्ट विचारसरणीचे म्हणून आम्हाला एक नेता दारातही उभा करून घेत नव्हता. पण आज त्याला समजले आहे की आमच्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच तो पोस्टर लावून आमची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.'

एकीकडे राज्यातील वस्त्रोद्योगातील महत्त्वाचे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख असताना अनेक कारणांनी या शहराची बदनामी होत आहे. मुळात या शहरातील मराठा, लिंगायत आणि कोष्टी समाजात परंपरागत हातमाग व्यवसाय होता. हळूहळू या व्यवसायाचे आधुनिकीकरण होत गेले. हातमागाचे यंत्रमाग झाले. आज अद्ययावत तंत्रज्ञानाचे अनेक लूम कारखाने इचलकरंजीत आहेत. मात्र, कारणपरत्वे हा व्यवसाय मूळ लोकांकडून राजस्थानी लोकांकडे हस्तांतरित झाला. आज यंत्रमाग, सायझिंग, सूतबाजार, कापडमार्केट राजस्थानी लोकांकडे आहे. यामध्ये त्यांचे वर्चस्व आहे. इचलकरंजीचे अर्थकारण या वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळेच या व्यवसायाशी संबधित अनेक पोटव्यवसाय येथे आहेत. या व्यवसायात प्रामुख्याने वहीफणी, नॉटिंग आणि मेडिंग ही महत्त्वाची कामे आहेत. मुळात या कामांमध्ये कमी श्रमात खूप पैसा मिळतो. त्यामुळे अनेक गुंडांचा यावर डोळा असतो.

उद्योजक आणि यंत्रमाग व्यवसाय जागृती समितीचे अध्यक्ष विनय महाजन सांगतात, 'इचलकरंजीत मूळच्या यंत्रमागधारकांकडून राजस्थानी समाजाकडे व्यवसाय हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे स्थानिक संबंध संपुष्टात आले. एक प्रकारची वेगळी संस्कृती उदयाला आली. तुम्हाला येथे व्यवसाय करायचा असेल तर आम्ही सांगू तसे वागा, असाच प्रकार सध्या आहे. यातून जवळपास सर्वच व्यावसायिक खंडणीने त्रस्त आहेत. सगळ्यांच्याच मनात प्रचंड खदखद आहे. पण, हतबलतेमुळे कुणीही पुढे यायला तयार नाही. इचलकरंजीचे अर्थकारण वस्त्रोद्योगावर अवलंबून असेल तर सध्या हा वस्त्रोद्योग ज्वालामुखीसारखा खदखदत आहे. आपण इचलकरंजीला वस्त्रनगरी म्हणतो. पण, उद्योजकांच्या दृष्टीने ही नगरी अशांतनगरी आहे.'

परप्रांतीय कामगारांकडून खंडणी

येथे वस्त्रोद्योगावार आधारित अनेक व्यवसाय आहेत. यात आता स्थानिक कामगारांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. स्थानिक कामगारांना अॅडव्हान्स द्यावा लागतो. हा कामगार बेभरवशी असल्याचे यंत्रमागधारकांचे मत आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानवरून आलेले कामगार तळ ठोकून राहतात. भरपूर काम करतात. अॅडव्हान्सचे ओझे नाही. ही आशादायक गोष्ट असली तरी या कामगारांकडून खंडणी वसूल करणारी टोळी मोठी आहे. एका कामगाराकडून महिन्याकाठी किमान पाचशे रुपये अशी लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जाते. परप्रांतात आल्यानंतर भीतीपोटी हे मजूर बिनबोभाटपणे पैसे देतात.

अशा अनेक विळख्यांनी इचलकरंजीला वेढले आहे. दरवेळी काही संघटना आणि संवेदनशील व्यक्ती राजकीय नेत्यांना जाऊन भेटतात. वस्तुस्थिती कानावर घालतात. दुसरीकडे पोलिस प्रशासन कारवाई करण्यास उत्सूक नाही. या सगळ्याची सरमिसळ इतकी झाली आहे की धगधगत्या इचलकरंजीच्या आत या सगळ्या यंत्रणा बोथटपणे कार्यरत आहेत. 'चलता है,' ही घातक प्रवृत्ती सगळ्यांसाठी पुढील काळात मारक ठरणार आहे.

=====

काही व्यवसायिक आणि गुंडांची अभद्र युती

अनेकदा येथील गुंड पोसलेल्या मुलांना घेऊन कारखानदारांकडे जातात. या मुलांना कमी श्रमात महिन्याकाठी १५ हजार रुपये मिळत असतील तर ते या गुंडांचे चेलेच बनून राहतात. अशा प्रकारे एकेक करत गुंडांची आणि व्यावसायिकांचे संबंध आले आहेत. आता या गुंडांचा सहारा घेणे यंत्रमाग व्यावसायिकांची अपरिहार्यता झाली आहे. एखाद्या गोष्टीत अडचण आली तर हेच गुंड ती चुटकीसरसी सोडवितात. त्यातून एक अभद्र व्यवहार उदयाला आला आहे. या व्यवहारात जास्तच फाटले तर खंडणीचे गुन्हे दाखल होतात. मात्र, यातून फारसे पुढे काहीच निष्पन्न झालेले नाही. मुळात यंत्रमाग व्यावस‌ायिकांना एकत्र येऊन या सगळ्याला तोंड देणे शक्य असूनही ते तसे करत नाहीत.

balasaheb.patil@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ४८ पदांची भरती प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा ४८ पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, राजर्षी शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्स, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, रसायनशास्र, आदी विभागांतील अध्यापकांची भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या अस्थापना विभागाच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली असून, २४ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

नोकरभरतीबाबत सरकारच्या धोरणावर सातत्याने टीक होत आहे. टीचिंग आणि नॉन टीचिंग नोकरभरतीबाबत दोन-दोनवेळा अध्यादेश निघाल्याने प्रशासनाचीही चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. अनेक अधिविभागांसह प्रशासनात रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. अखेर टीचिंग विभागातील भरतीस सरकारने मान्यता दिली असली, तरी रिक्त पदांपैकी निम्मी भरतीप्रक्रिया राबविली जात असल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे. झूलॉजी, भूगोल व समाजशास्र अधिविभागांतील प्रोफेसर पदाच्या तीन जागा खुल्या वर्गातून भरण्यात येणार आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या तीन जागा भरण्यात येणार आहेत. दोन खुल्या व एका अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवाराची निवड होणार आहे.

स्टॅटेस्टिक्स, भूगोल, बॉटनी विभागातील प्रत्येकी असोसिएट प्रोफेसरपदी अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारी निवड होणार आहे. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागात तीन पदांची भरती होणार आहे. याचबरोबर डेप्युटी डायरेक्टर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट प्रोफेसर, आदी ४८ पदांची भरती होणार आहे. यापैकी अनेक पदांसाठी विद्यापीठाने वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, पात्र उमेदवारांअभावी भरतीप्रक्रिया रखडली होती. काही जागांसाठी तर विद्यापीठाला चार ते आठवेळा जाहिरात द्यावी लागली होती. इच्छुक उमेदवारांना २४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ची ताक उत्पादनात एन्ट्री

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

कोल्हापूर : संपूर्ण राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने पशुधन धोक्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील मुबलक पाणी आणि चाऱ्यामुळे येथील दुग्ध उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. दररोजच्या दूध संकलनामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सातत्य राखले आहे. 'गोकुळ'च्या नावे स्वतंत्र ब्रँडने दूध विक्री करून बाजारपेठेवर बस्थान बसविलेल्या संघाने ताकनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या प्रयत्नाला चांगलेच यश आले असून, दररोज सहा हजार लिटर ताकाची विक्री होत असून, त्यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हामध्ये 'गोकुळ'च्या ताकाने ग्राहकांना चांगलाच थंडावा दिला आहे.

गतवर्षी झालेल्या कमी पावसाचा फटका सर्वच घटकांना बसू लागला आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याला कोल्हापूर जिल्हा मात्र अपवाद ठरला आहे. जिल्ह्यातील धरण प्रकल्पांतील पाणीसाठ्यामुळे येथील पशुधनाला मुबलक पाणी व चारा मिळत आहे. यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर कोणताही परिणाम झालेला नाही. दररोज नऊ लाख ८० हजार लिटर दूध संकलन होत असून, यातून इतर उपपदार्थांची निर्मिती केली जात आहे.

उपपदार्थांमध्ये दूध पावडर व लोण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. दररोज ३२ टन लोणी तयार करताना जे ताक निर्माण होते, त्यामध्ये म्हशीचे दूध मिसळून दररोज सात हजार लिटर ताक तयार केले जात आहे. दीड टक्के फॅट आणि ५.५ एसएनएफचे ताक तयार केले जात आहे. जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेले ताक स्वादिष्ट आणि रुचकर असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. गोकुळ दुधाची विक्री होते, त्याच ठिकाणी ताक मिळत असून अर्धा व एक लिटर पॉलिथीन पिशवीमधील ताक चार दिवस टिकून राहण्याची क्षमता आहे. गोकुळ संघाने दूध, दूध पावडर, श्रीखंड, लोणी उत्पादनाबरोबरच ताक उत्पादन करून आणखीन एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.

कोट...

प्रायोगिक तत्त्वावर जानेवारीपासून ताक उत्पादनास सुरुवात केली होती. ताक उत्पादनातून संघाला चांगले उत्पन्न मिळत. सध्या सहा हजार लिटर ताकाची विक्री होत असून, पुढील वर्षी १५ हजार लिटर ताक विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

आर. सी. शहा, महाव्यवस्थापक, 'गोकुळ'

चौकट

'गोकुळ'चे दररोजचे उत्पादन

दूध संकलन - ९ लाख ८० हजार लिटर

दूध पावडर - ४२ टन

लोणी - ३२ टन

स्टेबल बटर - ८ टन

पनीर - एक टन

दही - दोन टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विविध संस्था, संघटना आणि तरुण मंडळांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. पन्हाळा येथून घोड्यावरून ज्योत आणण्यापासून बुलेट रॅली, प्रतिमापूजन, संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांनी संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाहू यूथ फाउंडेशनतर्फे बुलेट रॅली

शाहू यूथ फाउंडेशनतर्फे शनिवारी सकाळी पन्हाळगड येथून घोड्यावरून ज्योत आणण्यात आली. तसेच बुलेट रॅली काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत, भगवे फेटे बांधून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सामाजिक प्रबोधन करणारे फलक लावले होते. छत्रपती मालोजीराजे यांच्याहस्ते पन्हाळा येथील शिवाजी मंदिर येथे ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तसेच स्त्रीशक्तीच्या माध्यमातून या ज्योतीला साथ मिळावी या भावनेतून मालोजीराजे यांनी ज्योत छत्रपती मधुरिमा यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर ती कार्यकर्त्यांनी घोड्यावरून कोल्हापुरातील खरी कॉर्नर येथे आणली. यावेळी आयोजित केलेल्या बुलेट रॅलीमध्ये २१० बुलेटस्वार सहभागी झाले होते. संभाजी महाराजांचा जयजयकार करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीची सांगता झाली. शंतनू मोहिते, स्वप्निल यादव, संदीप पाटील, इंद्रजित माने, सुशांत हराळे, प्रसाद वैद्य, कुलदीप साळोखे, शेखर घोरपडे, सागर जाधव यांनी संयोजन केले.

शिवराष्ट्रतर्फे रॅली

शिवराष्ट्र हायकर्सतर्फे संभाजी महाराज जयंतीनिमित्त बाइक रॅलीचे आयोजन केले होते. गांधी मैदान येथून रॅलीला प्रारंभ झाला. रुईकर कॉलनी येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित शौर्यगाथा सांगण्यात आली.


महापालिकेतर्फे पुष्पहार अर्पण

महापालिकेच्यावतीने रुईकर कॉलनी येथील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळयास उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, गटनेता सत्यजित कदम, नगरसेविका सीमा कदम, उमा इंगळे, रिना कांबळे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, आपत्य व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे, चंद्रकांत जाधव व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल होणार हायटेक

$
0
0

Janhavi.Sarate

@timesgroup.com

कोल्हापूर ः शहरातील गरजूंना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल काही दिवसांत हायटेक होत आहे. सीडी ४, सीबीनॅट आणि सी आर्म मशीन अशी अत्याधुनिक मशीन या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून, दिवसेंदिवस हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हॉस्पिटलची धडपड सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्सने 'आरोग्य सुविधा सलाइनवर' या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची सरकारने तातडीने दखल घेत अत्याधुनिक तीन मशीन पुरवठा केले आहेत. महापालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन हॉस्पिटल अशी तीन मोठी हॉस्पिटल आहे. यातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सर्जिकल, मेडिकल, स्त्रीरोग विभाग आणि नवजात शिशूगृह असे चार विभाग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात रुग्णसेवा मिळत आहेत. गेले काही महिने साधनांअभावी हॉ‌स्पिटलला उतरती कळा लागली होती. मात्र, हॉस्पिटलच्या प्रशासनाने पाठपुरावा करून अत्याधुनिक मशिन्स मिळविण्यात यश आले आहे. तसेच एका कंपनीकडून हॉस्पिटलला शुद्ध पाण्याचे मशीनदेखील देण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षांत मेडिकल वॉर्डमध्ये १९५९, सर्जिकल वॉर्डमध्ये ११९८, नवजात शिशूगृहात ११२१ आणि सूतिकागृहात ८,१८३ रुग्णांची नोंदणी असून, एकूण १२ हजार ४६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर १८६७ मातांची नॉर्मल डिलिव्हरी, तर ‌सिझर ११७६ महिलांची करण्यात आले आहे. १०३७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, १७५८ जनरल सर्जिकल शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एकूण ६१ हजार ९७५ रुग्णांची बाह्यतपासणी करण्यात आली आहे.

सीडी ४ चाचणी मशीन

एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीची सीडी ४ चाचणी करणे बंधनकारक असते. शरीरातील पांढऱ्या पेशी मोजण्याचे काम करते. सीडी ४ पेशी ३५० -४०० आत असल्यास त्या व्यक्ती एआरटीची औषधे सुरू करतात. पेशी ४०० वर असतील तर त्याचे औषधोपचार व आहाराबाबत समुपदेशन केले जातात. यापूर्वी ही तपासणी सीपीआरमध्ये होती, पण सध्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपलब्ध आहे.

सीबीनॅट मशीन

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ३० लाख रुपये किमतीचे क्षयरोग निदान करणारे सीबीनॅट मशीन दाखल झाले आहे. यापूर्वी पुण्यात क्षयरोगाची थुंकी तपासण्यास पाठविण्यात येत होती. त्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत होता. या मशीनमुळे अवघ्या दोन तासांत निदान होणार आहे.

सी आर्म मशीन

हे अत्याधुनिक एक्स-रे मशीन असून शस्त्रक्रिया विभागात हे महत्त्वाचे आहे. खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत सरकारी हॉस्पिटलमध्येही रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सी आर्म मशीन बऱ्याच कालावधीनंतर दाखल झाले आहे.

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये विविध अत्याधुनिक साधनसामग्री दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर हॉस्पिटलला अत्याधुनिक साधने मिळाली आहेत. यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे सुकर होणार आहे.

डॉ. प्रकाश पावरा, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images