Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंबाबाईच्या प्रसादाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
0

Janhavi.Sarate@ timesgroup.com

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थानतर्फे भाविकांसाठी लवकरच लाडूचा प्रसाद सुरू होणार आहे. दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. कळंबा कारागृह व्यवस्थापनाला प्रतिलाडू ७ रुपये दराने ठेका देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होताच श्री अंबाबाई मंदिरात लाडूचा प्रसाद भक्तांना देण्यास सुरुवात होणार आहे.

तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर देवस्थान समितीतर्फे भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. यापूर्वी पाच रुपयाला एक याप्रमाणे लाडू विक्री केली जात होती. ऑक्टोबर महिन्यात लाडू बनवण्याचा ठेका बहुउद्देशीय मागासवर्गीय महिला बचत गटाला देण्यात आला. मात्र या गटामार्फत देण्यात येत असलेला लाडू दर्जेदार नसल्याबाबत आणि संस्थेबाबत अनेक तक्रारी समितीकडे आल्या. त्यानंतर त्यांचा ठेका रद्द करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भाविकांना लाडू प्रसादाची प्रतीक्षा होती.

दरम्यान, कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा विचार देवस्थान समितीच्यावतीने पुढे आला. काही बैठकानंतर अखेर ७ रुपयांनी प्रति लाडू बनविण्याचा ठेका कळंबा कारागृहास देण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची स्वाक्षरी झाल्यावर प्रस्ताव पुणे कार्यालयात पाठविला जाईल. त्यानंतर कळंबा कारागृहाला याची ऑर्डर देण्यात येणार आहे. मे महिन्यात पर्यटक भाविकांची गर्दी प्रचंड असते. याचा विचार करत लवकर मंदिरात लाडूचा प्रसाद देण्यास सुरुवात होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे देण्यात येणारा लाडूचा प्रसाद लवकरच सुरु होणार आहे. कळंबा कारागृहातील महिलांना हा ठेका देण्यात आला आहे. ७ रुपये प्रति लाडू असा दर ठरविण्यात आला आहे. दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होईल. - शुभांगी साठे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

लाडू प्रसाद महागला

श्री अंबाबाई मंदिरात प्रसाद म्हणून दिला जाणारा एक लाडू पाच ग्रॅम वजनाचा असतो. ठेकेदार लाडू देवस्थान समितीला ७ रुपये दराने देईल. तर देवस्थान समितीतर्फे लाडू भाविकाला १० रुपये दराने मिळेल अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिता-पुत्राची वळीवडेत आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई आणि पत्नीच्या निधनाचा धक्क सहन न झालेल्या बाप-लेकाने वर्षाच्या आतच गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. वळिवडे (ता. करवीर) येथे गुरूवारी (ता. ५) सकाळी ही घटना उघडकीस आली. मोहन भालचंद्र चरेगावकर (वय ५१, रा. वळिवडे) आणि त्यांचा मुलगा विनायक (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेने वळिवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोहन यांची पत्नी वंदना यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. गुरूवारी वर्षश्राद्ध घालण्याचे नियोजन या दोघांनीही केले होते. मात्र विरहाने अस्वस्थ झालेल्या या दोघांनी आत्महत्या केली. अभ्यासात हुशार असलेला विनायक मागील वर्षी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होता. चांगल्या गुणांनी तो उत्तीर्णही झाला, परंतु आईच्या अनपेक्षित मृत्यूनंतर एकटे पडलेल्या वडिलांना आधार देण्यासाठी त्याने पुढील शिक्षण थांबवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक कामगार आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक कामगार आयुक्त सुहास रामचंद्र कदम व त्यांच्या कार्यालयातील लिपिक संजय जगन्नाथ पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. मंगळवार पेठेतील एका हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा ठेका मंजूर करण्यासाठी कदम यांनी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. गुरूवारी (ता. ५) शाहूपुरी येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयातच केलेल्या कारवाईत लिपिक संजय जगन्नाथ पाटील याला लाच स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सहायक कामगार आयुक्त रजेवर असल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

तक्रारदाराच्या नातेवाईकाचे मंगळवार पेठेत बेलबागेजवळ प्राइम हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा ठेका घेण्यासाठी हंकारे यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला होता. याला मंजुरी देण्यासाठी सहायक कामगार आयुक्त सुहास कदम (वय ४६, सध्या रा. संभाजीनगर, मूळ रा. गिरवी, जि. सातारा) यांनी पंचवीस हजाराची मागणी केली होती. हंकारे यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुरूवारी सापळा रचून ही कारवाई केली. लाचेची रक्कम लिपिक संजय जगन्नाथ पाटील (वय ३२, रा. घनशामनगर, सांगली) याच्याकडे देण्यास सांगितले होते. यातील दोन हजार रुपये लिपिकास देण्याचे ठरले होते.


पाटील याच्या घराची झडती

सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील लिपिक संजय पाटील हा सांगलीत राहत असल्याने पोलिसांनी सांगलीतील घराची झडती घेतली. सुहास कदम यांच्या गैरकारभारांमध्ये संजय पाटीलचाही सहभाग होता. रक्कम स्वीकारण्याचे काम पाटील हाच करीत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृषाली कदम हायकोर्टात, नगरसेवकपद रद्दच्या विरोधात याचिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात पडताळणी समिती व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सावळागोंधळाचा फटका बसल्याचा ठपका ठेवत वृषाली कदम यांनी नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. कदम यांनी गुरूवारी याचिका दाखल केली असून महापालिकेचे आयुक्त, करवीरचे प्रांताधिकारी, तहसिलदार व विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष, उपायुक्त व सचिवांच्या विरोधात तक्रार केली आहे. जात पडताळणी समितीच्या नगरसेवकपद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी याचिका दाखल केली असून शुक्रवारी (ता.६) त्यावर सुनावणी होणार आहे.

जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व्ही.व्ही. माने, उपायुक्त पी.सी.चव्हाण व सदस्य सचिव वृषाली शिंदे यांच्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने बुधवारी महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम व नगरसेवक संतोष गायकवाड यांचे जातीचे दाखले अवैध ठरवले. समितीच्या या निर्णयाविरोधात कायदेशीर दाद मागणार असल्याचे संतोष गायकवाड यांनी सांगितले. यापूर्वी तीनवेळा निवडणूक लढविली. त्यावेळी जातीच्या दाखल्यावरून आक्षेप घेतले नाहीत. जातीच्या दाखल्यावर स्पष्टपणे मांग जातीचा उल्लेख आहे. जातीच्या दाखल्याचे सर्व पुरावे सादर करूनही समितीने दाखला अवैध ठरविला असून त्याविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.

मोटार वर्कशॉपमध्ये, सुविधा काढून घेतल्या

महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम यांनी जिल्हा प्रशासन व जात पडताळणी समितीवर आक्षेप नोंदवित हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असून त्याला स्थगिती मिळावी असे याचिकेत म्हटले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सावळागोंधळाचा फटका बसला असून, या संबंधित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, कदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिका प्रशासनाकडून त्यांना पुरविण्यात येणार मोटार व मोबाइल सेवा काढून घेतली आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून त्यांना वापरासाठी दिलेली मोटार बुधवारी रात्री वर्कशॉपमध्ये जमा करण्यात आली आहे. कदम हे गुरूवारी स्वतःच्या मोटारीने मुंबईला गेले. अधिकाऱ्यांचा सावळागोंधळ आणि राजकीय दबावतंत्रामुळे कारवाई झाली आहे. मंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांना पराभूत करून निवडणूक जिंकली होती. त्या रागापोटी कारवाई झाल्याचा आरोप दुर्वास कदम यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत तणावानंतर शांतता

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि आक्षेपार्ह मजकूर असलेले डिजीटल फलक उतरवण्यावरून इचलकरंजीतील झालेले तणावाचे वातावरण दुपारनंतर निवळले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात विनापरवाना लावलेले फलक पोलिस प्रशासन आणि नगरपरिषदेच्यावतीने उतरविण्यात आले. त्यानंतर सकाळी पोलिस संचलन सुरू असताना कॉ. मलाबादे चौकात मोठा जमाव जमला. मात्र, लोकप्रतिनिधी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत काढून जमाव पांगविला. त्यानंतर झालेल्या शांतता ‌कमिटीच्या बैठकीत सोशल म‌ीडियाच्या माध्यमातून पसरव‌िण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. तसेच परवानगी असलेले फलक उत‌रविण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फलक उतरविण्याची मोहीम पोलिस प्रशासनाने रात्रीपासून हाती घेतली होती. या घटनेची माहिती देत आक्षेपार्ह मजकूर सोशल म‌ीडियावरून पसरविण्यात येत होता. त्यामुळे दुपारी एक वाजता मोठा जमाव कॉ. मलाबादे चौकात जमला. ही माहिती क्षणार्धात शहरात पसरली. त्यामुळे व्यवहार बंद होऊन तणाव निर्माण झाला. यावेळी लोकप्रतिनिधींसह पोलिस अधिकाऱ्यांनी शांतता ‌कमिटीच्या बैठकीत चर्चा करू. कोणतेही आक्षेपार्ह वर्तन करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत विनापरवाना आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी उभारलेले फलक उतरून घेण्यावर एकमत झाले. अन्य फलक ‌उतरले जाणार नाहीत, असे आश्वासन आमदार हाळवणकर यांनी दिले.

ही बैठक सुरू असतानाही शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. शांतता कमिटीची बैठक संपल्यानंतर शहरातील तणाव निवळला. त्यामुळे व्यवहार पुन्हा सुरू झाले.

बैठकीत आमदार हाळवणकर म्हणाले, शिवजयंतीसाठी वस्त्रनगरी सजली आहे. परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी काही विघ्नसंतोषी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. यातून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता धडा शिकवते हा आजवरचा शहराचा इतिहास आहे.'

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, शिवजयंतीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांचे प्रयत्न उधळून लावा, असे आवाहन केले.

अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, चैतन्य एस, प्रांताधिकारी अश्व‌िनी ज‌िरंगे, मनीषा ख‌त्री, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, संतोष कोळी आदी यावेळी उपस्थित होते.

===

इचलकरंजीत शहरात डिजिटल फलकावरुन मोठा तणाव निर्माण झाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे डिजिटल फलक उतरवण्यात आले आहेत. आजपासून नव्याने एकही फलक लावायला परवानगी देण्यात येणार नाही. तसे कुणी लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय संविधानाची तत्वे बसवेश्वराच्या वचन साहित्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय संविधानाची तत्वे लिंगायत समाजाचे संस्थापक बसवेश्वरांच्या वचन साहित्यात दडलेली आहेत,' असे प्रतिपादन प्रा. भीमराव पाटील यांनी केले. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'बसव तत्व व भारतीय संविधान,' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी पत्रकार जयसिंग पाटील होते. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व कोल्हापूर बसव केंद्राच्यावतीने व्याखानमालेचे आयोजन केले आहे.

प्रा. पाटील म्हणाले, 'भारतीय संविधान हे मूल्यांवर आधारित आहे. गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांनी सांगितलेली मूल्ये चिरंतन आहेत. या मूल्यांचा समावेश भारतीय संविधानाचा सरनामा, मूलभूत हक्क व कर्तव्यात केला आहे. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. समाजातील जातीयता, विषमता, लिंगभेद यांना मूठमाती देऊन समतेचे तत्व अंगिकारले. ३५० जातींचा लिंगायत धर्मामध्ये समावेश आहे. बसवेश्वर यांच्या चळवळीची सूत्रे ढोर, चांभार, महार, मातंग या समाजातील लोकांकडे होते. १२ व्या शतकात बसवेश्वरांनी सामाजिक समतेचा संदेश देऊन प्रत्यक्षात समाजामध्ये आचरणात आणला.'

प्रा. पाटील म्हणाले, 'बसवेश्वराचे साहित्य वचननाम्यात दिसून ​येते. भारतीय संविधानातील कलम १२ ते ५१ मधील तत्वे प्रत्येक व्यक्तीच्या मूलभत हक्कांशी संबंधित आहेत. मूलभूत हक्क व कर्तव्ये १२ शतकात बसवेश्वरांनी आपल्या साहित्यात मांडले आहेत. स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता ही शाश्वत मूल्ये दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातील १२ एप्रिल १९२९ च्या अंकात गौतम बुद्ध, महावीर यांच्यानंतर बसवेश्वरांच्या विचारांचा परामर्श घेतांना तीनही महान व्यक्तींना संपवण्याचा प्रकार देशात घडल्याचा उल्लेख केला आहे. डॉ. आंबेडकरांनी घटना लिहिताना भारतीय संस्कृतीतील ज्या महान विभूती होत्या त्यांच्या विचारांचा आधार घेतला आहे. बसवेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास करताना असे लक्षात येते की भा​रतीय संविधान बसवेश्वराच्या वचन साहित्यात दडलेले दिसते.'

यावेळी वीरशैव बँकेच्या अध्यक्षा शकुतंला बनछोडे, सीइओ अनिल नागराळे, व्यंकाप्पा भोसले, कॉ. चंद्रकांत यादव उपस्थित होते. सरलाताई पाटील यांनी प्रास्ताविक तर चंद्रशेखर बटकडली यांनी परिचय करून दिला. यश आंबलेने सूत्रसंचालन केले. सदाशिव देवताळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाचा चेंडू पुरातत्वच्या कोर्टात

0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

ऐतिहासिक आणि संस्थानकालीन वास्तूंची मालिका कोल्हापूरची ओळख बनली आहे. या मालिकेत शाहू जन्मस्थळ, शाहू म्युझियम, अंबाबाई मंदिर, मनकर्णिका कुंड, जिल्ह्यातील गडकिल्ले, जुन्या इमारती अशा अनेकांचा समावेश होतो. पर्यटनविकासासाठी या वास्तूंचे नूतनीकरण करण्यापासून देखभाल, दुरूस्तीबाबत कोणतेही पाऊल उचलायचे असेल तर त्यासाठी पुरातत्व विभागाच्या हिरव्या कंदीलाची गरज आहे.

कोल्हापुरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक ऐवजांच्या विकासाचा चेंडू सध्या पुरातत्व विभागाच्या कोर्टात आहे. काही वास्तू ​​किंवा धार्मिकस्थळे, मूर्तींबाबत पुरातत्व विभागाच्या पुढाकाराने मार्ग काढण्यात आला आहे, तर काही वास्तूंसंदर्भातील सर्वेक्षण मार्गावर आहे. मात्र ऐतिहासिक बांधणी, पुरातन महत्त्व यांना धक्का लागू न देता विकासाचीही कास धरावी या हेतूने पुरातत्व विभाग काम करत आहे.

अंबाबाई मंदिरातील शिळांचा अहवाल पुरातत्वच्या कक्षेत

अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तूतील दगडी ​शिळा गेल्या नोव्हेंबर महिन्यात निखळल्याच्या घटनेनंतर देवस्थान समितीच्या अ​भियां​त्रिकी विभागाच्यावतीने मंदिराच्या आवारातील कमकुवत झालेल्या दगडी शिळांसह दगडी कमानींबाबत नोंदवलेल्या निरीक्षणांचा अहवाल पुरातत्व विभागाला सादर केला आहे. अहवालातील नोंदी तपासण्याचे काम पुरातत्व विभागातील अधिकारी करत आहेत. मंदिराच्या पूर्व दरवाजातून आतील बाजूस पुलाची उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रीलिंग केले आहे. शनि मंदिरासमोरील कोरीव ​शिल्पे असलेल्या शिळेचा काही भाग निखळून खाली पडल्याचे देवस्थान व्यवस्थापनाच्या लक्षात आले. अशा प्रकारे निखळलेली शिळा जोडून पूर्ववत करण्याच्यादृष्टीने देवस्थान व्यवस्थापन आ​णि पुरातत्व विभागाच्या समन्वयातून प्रयत्न करण्यात येणार असून त्याअनुषंगाने देवस्थानतर्फे पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

शाहू म्युझियमबाबत पुरातत्व प्रयत्नशील

शाहू जन्मस्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने शाहू म्युझियमचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा आराखडा पुरातत्व विभागाकडे सादर केला आहे. मात्र त्यासाठीच्या निधीला हिरवा कंदील न मिळाल्याने अद्याप कामाला सुरूवातच झालेली नाही. लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. ऑगस्ट २०११ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिव्हील वर्क पूर्ण झाले आहे. या इमारतींमध्ये शाहू जन्मस्थळ, कुस्ती आखाडा, दरबार हॉल, पागा बिल्डींग, शाहू संदर्भ ग्रंथालय व पुरातत्व ऑफिस इतर दोन इमारतींमध्ये पुरातत्व विभाग शाहू महाराजांचे जीवनदर्शन घडविणार आहे. शाहू जीवन दर्शन आराखड्यात शाहू महाराजांच्या जीवनावर चित्रीत केलेले प्रसंग नामांकित चित्रकारांकडून चित्रित करण्यात आले आहेत. कुस्तीचा आखाडा, रेल्वे स्टेशन आणि छत्रपती शाहू महाराजांसाठी असलेली स्वतंत्र बोगी, साठमारीचे स्ट्रक्चर, हत्ती, लाइट आणि साऊंड शो, शाहू महाराजांवरील डॉक्युमेंटरीचा समावेश आराखड्यात आहे. म्युझियमसाठी १३ कोटींचा ​निधी अपेक्षित आहे. पुरातत्व विभाग याबाबत प्रयत्नशील असून ​निधी मंजूर झाल्यास पुरातत्व विभागाचा हिरवा कंदील मिळू शकतो.

चौकट

मनकर्णिक कुंड आणि पुरातत्व विभाग

अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेले पुरातन मनकर्णिका कुंड बुजवून त्याठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह बांधून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणले आहे, अशी तक्रार काही भाविकांकडून होत आहे. मनकर्णिका कुंड पुरातत्व विभागाच्या अखत्यारित समाविष्ट असल्यामुळे तेथील शौचालय अनधिकृत आहे. हे कुंड नव्याने खुले करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप पुरातत्व विभागाने कोणतीही प्र​तिक्रिया दिलेली नाही.

अंबाबाई मंदिरातील फेरबदलांबाबत पुरातत्व कठोर

पुरातत्व विभाग रचनाकार, विधिज्ञ यांच्यासह नेमलेल्या समितीने मंदिरातील नियमबाह्य फेरबदलांची पाहणी करून तीन वर्षापूर्वी अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारे मंदिरातील ५२ फेरबदल केलेल्या गोष्टी तातडीने काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. अशा प्रकारची रचना करत असताना मंदिराच्या दगडी बांधकामात ग्रीलिंग करण्यात आले आहे, ज्यामुळे मंदिराच्या मूळ वास्तूला धोका निर्माण झाला आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या छोट्या मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या पुजाऱ्यांच्या मागणीनुसार मंदिरांना लोखंडी दरवाजे बसवण्यात आले आहेत. मूळ मंदिर बांधकामानंतर आवारात नव्याने बांधलेल्या मंदिरांवर लोखंडी दरवाजे, ग्रील अशा फेरबदलांचा मारा करण्यात आल्याचे दिसून येते. तीन वर्षांपूर्वी मंदिरातील या फेरबदलांची पाहणी करण्यात आली होती, ज्यामध्ये मंदिराच्या आवारात करण्यात आलेल्या फेरबदलाची संख्या ५२ असल्याचे नोंद करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय पुरातत्व विभागाकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा महर्षी चिरमुले द्रष्टे अर्थतज्ज्ञअरुण शौरी यांचे उद्गार

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा :

साताऱ्या सारख्या छोट्या गावात राहून ८० वर्षांपूर्वी कार्पोरेट सेक्टरमध्ये आयुर्विमा कंपनी, बँका स्थापन करून त्यांची मोठी प्रगती साध्य करणारे अण्णासाहेब चिरमुले द्रष्टे अर्थतज्ज्ञ होते. विमा महर्षी या बहुमानास ते निश्चितपणे पात्र होते म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या चिरमुले पुरस्काराचा मी विनम्रतेने स्वीकार करतो, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ अरुण शौरी यांनी काढले.

वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले ट्रस्टच्या वतीने एका अनौपचारिक समारंभात त्यांना २०१५सालचा चिरमुले पुरस्कार ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले व पी. एन. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.

'देशाचे हित कायम डोळयासमोर ठेवून विविध क्षेत्रात मी मोलाचे कार्य करीत आलो आहे. त्या माझ्या कार्याबद्दल हा मोलाचा पुरस्कार देऊन विश्वस्तांनी माझा या पूर्वीचे पुरस्कारार्थी डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, डॉ. नारायण मूर्ती अशा मान्यवरांच्या पंक्तीत समावेश केला आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून यापुढेही अशीच निरलसपणे देशसेवा करण्याची जबाबदारी आहे,' असेही शौरी म्हणाले.

प्रारंभी अरुण गोडबोले व पी. एन. जोशी यांनी युनायटेड वेस्टर्न बँकेने स्थापन केलेल्या चिरमुले ट्रस्ट, पुरस्काराची संकल्पना व इतिहास सांगितला आणि नंतर महावस्त्र, एक लाख रुपये व सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीपीआर’च्या अतिक्रमणांबाबत महिन्यात निर्णय घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील अतिक्रमणाबाबत वैद्यकीय शिक्षण संचालकांना प्रस्ताव पाठवून एक महिन्यात निर्णय घ्यावा' असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात सीपीआर हॉस्पिटल अभ्यागत समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, महेश जाधव आदींसह अभ्यागत समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'सीपीआर परिसरात जी अनधिकृत अतिक्रमणे आहेत, याबाबत वैद्यकीय कॉलेज परिसरातील मार्गदर्शक सूचींचा विचार करावा. एकत्रित गाळ्यांबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालकांना पाठवावा. त्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास एक महिन्यात पुढील निर्णय घेऊन अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत. सीपीआर रुग्णालयाचा कारभार सुधारत आहे. अधिक सक्षमतेने हे रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी कराय. कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आपल्या अडचणी मोकळेपणांनी मांडा. सीपीआर हे खुप जुने रुग्णालय आहे. त्यामुळे ते समन्वयाने चालवा. आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून रुग्णांची सेवा करावी.'

याचबरोबर शेंडा पार्कातील रुग्णालयाची संरक्षक भिंत, सीपीआर रुग्णालयातील ह्रदयशस्त्रक्रिया विभाग, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रिया, रिक्त पदे, रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ आदी विषयांवर पालकमंत्री पाटील यांनी यावेळी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांची आगळी गणेशभक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोकणचा चाकरमानी मुंबईत नोकरी व्यवसाय करत असला तरी कोकणात बहुतांश सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घाटमाथ्यावरील आहेत. त्यातही रत्नागिरीतील बहुतांशी कर्मचारी कोल्हापुरातीलच आहेत. अशाच एका कोल्हापूरकर ग्रुपने आपल्या नेहमीच्या रस्त्यावरील एका गणपती मंदिरातील दुखावलेली मूर्ती पाहून नविन मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला आणि तो नुकताच तडीस नेला.

सरकारी कार्यालये, शिक्षक, बॅँक आदींमध्ये कार्यरत असलेले हे नोकरदार दर आठवड्याला कोल्हापूरहून रत्नागिरीला ये जा करतात. सोमवारी सकाळी लवकर निघायचे आणि शुक्रवारी किंवा शनिवारी संध्याकाळी परत यायचे. बहुतेकजण फॅमिली कोल्हापुरात ठेवून रत्नागिरीत रूम किंवा फ्लॅट घेऊन राहतात. काहीजण एसटीचा वापर करतात, तर काहीजण मोटारीचा वापर करतात, परंतु अनेकांचा प्रवास ग्रुपनेच होतो. बहुतेकजण ब्रेक जर्नी म्हणून आंबा घाटात थांबतात. या ठिकाणी काजळी नदीच्या मुखाजवळ विश्रांतीसाठी चांगली ऐसपैस जागा आहे. मधल्या काळात या ठिकाणी जेवण आणि अन्य कारणासाठी थांबणाऱ्यांची संख्या वाढू लागली. या ठिकाणचे पावित्र्य रहावे म्हणून तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र माने यांनी २००१ मध्ये येथे छोटेखानी गणपती मंदिर बांधले. कोल्हापुरातून निघाल्यानंतर बहुतेक कोल्हापूरकर चाकरमानी गणपतीचे दर्शन घेवूनच पुढे जातात. रत्नागिरीतील धर्मादाय कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असणारे शिवराज बंडोपंत नायकवडी हेही आपल्या सहकाऱ्यांसमवेत या गणपती दर्शनानंतरच पुढे जातात. एकदा दर्शन घेत असताना नायकवडी यांना मूर्तीच्या हाताला सिमेंट लावलेले, त्याचबरोबर सोंडेपाशी आणि पायाच्या बोटांजवळ मूर्ती दुखावलेली दिसली. नायकवडी आणि त्यांच्या शरद शिंदे, निलेश ठोंबरे, उमेश पाटील, प्रकाश गवाणकर या मित्रांनी या मंदिरात नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची भेट घेऊन परवानगी घेतली. पाठोपाठ कोल्हापुरातील नरोत्तम लाटा यांच्याकडे पूर्वीच्या मूर्तीएवढी उंचीची आणि मंदिरात शोभून दिसेल अशा मूर्तीची ऑर्डर दिली. लाटा यांनी खास जयपूरहून मूर्ती बनवून घेतली. नुकतीच तिची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराला जाळीचा दरवाजा बसवून कुंड बनविण्याचाही मनोदयही नायकवडी यांनी व्यक्त केला आहे.

निमित्त ठरले पुरेसे ...

मूळचे कोल्हापूरचे असणारे अॅड. व्ही. एन. जाधव रत्नागिरीला प्रॅक्टिस करतात. अॅड. जाधव यांनी मार्लेश्वर फाट्याजवळ असणाऱ्या लक्ष्मी मंदिराची दुरूस्ती केली होती. या मंदिराला एका ट्रकने ठोकरले होते आणि सुमारे सहा महिने मंदिर अशाच अवस्थेत होते. यातून प्रेरणा घेऊन नायकवडी यांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.



रत्नागिरीला जाताना आंबा घाटातील मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊनच पुढे जायचा परिपाठ होता. मूर्ती दुखावल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्धार केला आणि मित्रांच्या सहकार्याने तो तडीस नेला. आकर्षक आणि देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे समाधान वाटते.

शिवराज नायकवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी अन्नछत्रने घेतली १०० झाडे दत्तक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाण्याअभावी मोठी झाडे काही दिवस तग धरतील. पण झुडुपांच्या प्रकारात मोडणाऱ्या मेंदीची रोपे अक्षरशः वाळून जात आहेत. हिरवीगार पाने पाचोळा बनत असल्याचे पाहून अशा मेंदीबरोबरच इतर झाडांना जीवदान देण्यासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने १०० झाडे दत्तक घेतली आहेत. या झाडांना पाऊस सुरू होऊपर्यंत आठवड्यातून ठराविक वेळेस पाणी देण्यात येणार आहे.

हरिओमनगर परिसरातील १०० झाडे व रंकाळा तलावाच्या पूर्व बाजूच्या उद्यानातील मेंदीच्या झाडांना आठवड्यात ठराविक वेळेस पाणी देण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली. भागातील नगरसेवक शारंगधर देशमुख व ज्येष्ठ नागरिक अॅड. नाझरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. तीव्र उन्हाचा बसत असलेल्या फटक्यापासून वाचवण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले. यावेळी संजय जोशी, राजेश सुगंधी, गिरीष कुलकर्णी, प्रशांत तहसिलदार, विराज कुलकर्णी, तानाजी पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणगाव स्मारकासाठी सव्वाशे कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारक उभे करण्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ कोटी रुपये या स्मारकास देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पंधरा दिवसात हा आराखडा मंत्रालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत' अशी माहिती दिल्याचे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष, आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परत जाण्यासारखा गंभीर प्रकार यापुढे घडू नये यासाठी प्रक्रिया राबवून तातडीने सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना महिनाभरात जातपडताळणी प्रमाणपत्रे देण्याचे आदेशही दिले आहेत.

​समितीने गेले तीन दिवस जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, ​जिल्हाधिकारी, महापालिका कार्यालयांना भेटी दिल्या. १३ टक्क्यांप्रमाणे अनुशेष भरला आहे का? समाजकल्याण विभागाचा निधी किती खर्च झाला आहे, दलित वस्तींवर योग्य प्रमाणात खर्च झाला का? याचा आढावा घेतल्याचे सांगत खाडे म्हणाले, 'माणगाव येथे शाहू महाराज व आंबेडकर यांची झालेली भेट ऐतिहासिक आहे. त्या ठिकाणी आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत १२५ कोटी रुपये खर्चून संयुक्त स्मारक उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अंदाजित खर्चासह आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. हा आराखडा पंधरा दिवसात मंत्रालयात पोहचेल अशी व्यवस्था केली आहे. त्यानंतर सरकारकडून या स्मारकासाठी आवश्यक इतका निधी मंजूर करुन घेतला जाईल.'

खाडे म्हणाले, 'जिल्हा परिषदेमध्ये अगदी कमी अनुशेष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचेही काम चांगले झाले आहे. महापालिकेच्या कारभारात मात्र गेल्या सहा वर्षांपासून अनुशेषबाबत पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. रोस्टर तपासणी केलेली नाही. राजेंद्रनगरमधील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत योग्य ते आदेश दिले आहेत. याशिवाय सरकारच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहांबरोबर जे भाडेतत्वावर आहेत. अशा सात वसतिगृहांना स्वतःची जागा देण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे. जात पडताळणीचे प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परत गेल्याची घटना गंभीर आहे. पुढील वर्षी हा प्रकार होऊ नये यासाठी विविध संगर्वातील सर्व विद्यार्थ्यांना महिनाभरात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.'

'नागरिकांना सुविधा देण्याच्यादृष्टीनेही समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छतागृहे व सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी महापालिकेला आदेश दिले आहेत' असे खाडे यांनी सांगितले. घराघरामध्ये शौचालये बांधणीसाठी योजना राबवण्यास सांगितले आहे. शिवाय डासमुक्त गाव तयार करण्यासाठी प्रायोगिक पातळीवर एक गाव घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार भविष्यात याबाबतची योजना सर्वत्र राबवण्याचा मानस असल्याचे खाडे यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या मुलांनाशिक्षणासाठी कर्जजिल्हा मध्यवर्ती बँकेचा निर्णय

0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा बँकेस यंदा तब्बल ८४ कोटी ७० लाख रुपयांचा नफा झाला आहे. कर्मचारी, सभासद संस्था, सचिव अशा सर्वांसाठीच संचालक मंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीतील निर्णयांनी लॉटरी फुटल्यासारखे झाले. शेतकऱ्यांच्या मुलांकरीता शिक्षणासाठी दहा ते पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना एक पगार बक्षिस म्हणून देण्यात येत असल्याची घोषणाही अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, २०१५-१६मधील नफ्याच्या विभाजणावर शिक्कामोर्तब झाले आहे. बँकेच्या सर्व ४००५ सभासद संस्थांना भागभांडवलाच्या १२ टक्के विकास निधी, कर्मचाऱ्यांना एक पगार बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुलांना १० टक्के व्याजाने कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी किमान २ एकर शेती आवश्यक आहे. वैद्यकीसह उच्च शिक्षणासाठी भारतात शिकण्यासाठी १० तर बाहेरील देशातील शिक्षणासाठी २५ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज वेळेत फेडणाऱ्यास व्याज सवलत अथवा माफीही दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी ३५ लाख रूपये खर्च होणार आहेत.

बँकेचे सभासद असणाऱ्या संस्थांना संस्था विकास निधीसाठी भागभांडवलाच्या १२ टक्के निधी या नफ्यातून देण्यात येणार आहे. पतसंस्था ११८८, विकास संस्था ७६७, दूध संस्था ५३०, कारखाने १७, यंत्रमाग संस्था ८८, पाणीपुरवठा संस्था १६७, औद्योगिक संस्था १६३, ग्राहक संस्था १०७, अर्बन बँक १२९, पगारदार संस्था १७२, सुतगिरणी १५, मजूर संस्था ३१२ या संस्थांना विकास निधीपोटी ११ कोटी ३० लाखांचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व संस्थांचे १०८ कोटी ९८ लाख भागभांडवल बँकेकडे आहे. सोसायट्यांच्या सचिव व शिपायांनाही एक पगार बक्षिस देण्यात येणार आहे. ३२७ जणांना ४० लाख देण्यात येणार आहेत.

बाळासाहेब होनमोरेंचे अभिनंदन

पीक कर्ज पुनर्रचना व्याज सरकारने भरण्याबाबत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये वाचवल्याबद्दल बँकेच्या बैठकीत संचालक बाळासाहेब होनमोरे यांचे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीवरून अ​​​धिकाऱ्यांची खरडपट्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर परिसरातील हटविलेल्या झोपडपट्ट्या, शहरातील सार्वजनिक शौचालयांची अस्वच्छता, स्वच्छतागृहांअभावी होणारी महिलांची कुचंबणा, अनुशेष भरती यावरून अनुसूचित जाती कल्याण समिती सदस्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. नोटिसा न काढता झोपड्या हटविणाऱ्या अ​​​धिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि संबंधित झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाच्या कार्यवाहीचा अहवाल महिन्यात सादर करण्याचे आदेश समितीचे प्रमुख आमदार सुरेश खाडे यांनी दिले. ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झोपडपट्टीवासीयांचे संसार उघड्यावर पडले त्या अधिकाऱ्यांचे व अनुशेष भरती प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेशही समितीने दिले.

अनुसूचित जाती, जमातीतील अधिकाऱ्यांच्या बढती, अनुशेष तसेच कल्याणकारी योजनांचा आढावा समितीने घेतला. आमदार सुजित मिणचेकर, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये यांच्यासह समिती सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेला भेट दिली. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव ‌आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

महिला भाविक पर्यटकांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्याकडे सार्वजनिक शौचालयांना पाण्याची उपलब्धता कधी करून देणार? अशी विचारणा केली. सगळी कार्यवाही होण्यास सहा महिने लागतील, असे उत्तर डॉ. पाटील यांनी देताच समिती सदस्य भडकले. महिनाभर तुम्ही राहत्या त्या भागातील पाणी पुरवठा खंडीत केला तर काय कराल? अशी विचारणा करत सार्वजनिक शौचालयांना महिन्यात पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच शाळा, बगिचा महापलिका, गर्दीच्या ठिकाणे महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारावीत अशा सूचना केल्या. प्रभागातील स्वच्छतेचा अहवाल ज्या त्या नगरसेवकांचा अ​भिप्राय घेऊन महिन्यात सादर करावेत, असे आदेश दिले.

उपअभियंत्यापासून आयुक्तही अडचणीत

राजेंद्रनगरमधील हटविलेल्या झोपड्यावरून उपशहर अभियंता एस. के. माने यांच्यापासून आयुक्त पी. शिवशंकर हे सगळेच अडचणीत आले. कुठल्या नियमाच्या आधारे कारवाई केली, अशी विचारणा करत समितीप्रमुखांनी महापालिका कायद्याची प्रतच समोर ठेवली. आमदार खाडे व गजभिये यांनी काही कलमांचे वाचन करत अ​​धिकाऱ्यांची कोंडी केली. उपशहर अभियंता एस. के. माने यांची तुमच्यावर काय कारवाई करायची? अशा शब्दांत खरडपट्टी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकांवर बहिष्कार, विद्यार्थ्यांची शाळा बंद

0
0

निवडणुकांवर बहिष्कार, विद्यार्थ्यांची शाळा बंद

गावगुंड, रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून मसुचीवाडीचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

मसुचीवाडी गावाने गुरुवारी गावगुंड आणि रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून या पुढील सर्व सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार आणि गावातील शाळेत मुले, मुली न घालण्याचा निर्णय विशेष ग्रामसभा बोलावून घेतला. जिल्ह्यातील पुढारलेले आणि सधन गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाळवा तालुक्यातील बोरगावच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

गावगुंड आणि रोडरोमीओंच्या त्रासाला कंटाळून असा निर्णय घेतल्याने या बाबत जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. इस्लामपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर बोरगाव आहे. त्याच्या पूर्वेला चार किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठावर मसुचीवाडी गाव आहे. बोरगावमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि आता महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झाली आहे. त्यामुळे गावानजीक चांगल्या शिक्षणाची सोय असल्याने मसुचीवाडी मधील अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी बोरगावमध्ये शिकतात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून बोरगावमधील काही गुड प्रवृत्तीची मुले मसुचीवाडीच्या मुलींना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. शाळेत येण्याच्या व जाण्याच्या वेळेत रस्त्यावर उभे राहणे, बसमध्ये धक्के मारणे, अश्लील बोलणे, जाणीवपूर्वक गाडी आडवी मारणे, असे प्रकार सुरू आहेत. या बाबत मसुचीवाडीच्या ग्रामस्थांनी बोरगावच्या काही पुढारी, गावातील प्रतिष्ठितांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. गाव पुढारी या ग्रामस्थांना थेट त्या मुलांना तुम्ही काहीही करा, आम्ही आडवे पडणार नाही, असा सल्ला देत आहेत. बोरगावच्या एकाही नेत्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. टवाळखोरांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली तरी पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. मुलींना वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा मुली त्रास सहन करून भीतीपोटी गप्प राहतात. त्यामुळे आता ग्रामस्थांनीच पुढाकार घेवून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मसुचीवाडीचे सरपंच, सुहास भगवान कदम व उपसरपंच, संभाजी रामचंद्र कदम म्हणाले, 'या बाबत जोपर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार कायम राहील. एकही विद्यार्थी बोरगावच्या शाळेत घालणार नाही. त्यांचे दाखले काढून घेणार आहे.'

या बाबत पोलिस ठाण्यात फक्त अदलपात्र गुन्हे दाखल आहेत. या पूर्वी मारामारीच्या घटना घडल्या होत्या. ग्रामस्थांनी आता निवेदन दिले आहे. संबंधितांचा शोध सुरू आहे असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करू.

प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, इस्लामपूर

भौगोलिक रचनेचा गैरफायदा

मसुचीवाडी गाव कृष्णाकाठावर आहे. मसुचीवाडीतील लोकांना बोरगावमध्ये येऊनच इतर ठिकाणी जावे लागते, अशी रचना आहे. त्याचा गैरफायदा बोरगावचे कथित गुंड घेत आहेत. मसुचीवाडीत हायस्कूलची सोय आहे. मसुचीवाडीहून बोरगावमध्ये हायस्कूलसाठी सात विद्यार्थी, इंग्रजी माध्यमाच्या प्रायमरी स्कूलसाठी दहा विद्यार्थी, ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेजसाठी ३० मुली आणि १३ मुले आणि बोरगावरून इस्लामपूरला जाणाऱ्या ३० मुली विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निलेश देसाई, संदीप नेजदार यांचे नगरसेवकपद रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जातीचे खोटे दाखले जोडून महापालिका निवडणूक लढविलेल्या नगरसेवक निलेश देसाई व डॉ. संदीप नेजदार यांना विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने झटका दिला. समितीने शुक्रवारी या दोघांचेही दाखले अवैध ठरविल्याने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. शिवाजी मार्केट प्रभाग सभापती अफजल पिरजादे व नगरसेविका सविता घोरपडे यांचे जातीचे दाखले वैध ठरले. पडताळणी समितीसमोर, देसाई आणि नेजदार हे कुणबी जातीचे पुरावे सादर करू शकले नाहीत.

नव्या सभागृहात आतापर्यंत चार सदस्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. यापूर्वी महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम आणि संतोष गायकवाड यांचे जातीचे दाखले अवैध ठरल्याने नगरसेवकपद रद्द झाले आहे. महापालिकेचे ३३ प्रभाग ओबीसी व एससी प्रवर्गासाठी आरक्षित होते. ३३ पैकी १३ नगरसेवकांनी मुदतीत (ता.३० एप्रिल) प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित वीस सदस्यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सुनावणी कार्यवाही सुरू आहे.

देसाई (ताराराणी आघाडी) यांनी ताराबाई पार्क प्रभागातून तर डॉ. नेजदार (काँग्रेस) यांनी कसबा बावडा हनुमान तलाव प्रभागातून निवडणूक लढविली होती. हे दोन्ही प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यांनी निवडणूक लढविताना कुणबी दाखला जोडला होता. मात्र प्रत्यक्ष सुनावणीवेळी देसाई यांनी कुणबी जातीचे पुरावे सादर केले नाहीत. शिवाय त्यांच्या नातेवाईकांच्या जातीच्या दाखल्यावर हिंदू मराठा असा उल्लेख आहे. देसाई यांच्या जातीच्या दाखल्याबाबत राजू जाधव यांनी आक्षेप घेतला होता. डॉ. संदीप नेजदार यांनीही कुणबी जातीचा आधार घेतला होता. मात्र त्यांच्यासह वडीलांच्या, आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख आहे. त्यांच्याकडील कुठल्याच दाखल्यावर कुणबी असा स्पष्ट नोंद असलेला पुरावा नाही.

महापौरांसह पाच सदस्यांच्या दाखल्याचा निर्णय प्रलंबित

महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक किरण शिराळे, सचिन पाटील, नगरसेविका हसीना फरास, दीपा मगदूम यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सध्या कार्यवाही सुरू आहे. या पाचही सदस्यांच्या जातीच्या दाखल्याचा निर्णय प्रलंबित आहे. शनिवारी काही सदस्यांच्या जातीच्या दाखल्याचा​ निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंखपुष्पीतून वाढते हिमोग्लोबिन

0
0

maruti.patil @timesgroup.com

कोल्हापूर : शंखपुष्पी वनस्पतीची पाने आणि फुलांचे रोज सेवन केल्यास महिलांमधील हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते, असे संशोधान ‌शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र विभागाने केले आहे. या प्रयोगावर अधारित संशोधन पेपर अमेरिकन व युरोपियन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. आहारातील कमी प्रथिनांमुळे अनेकांमध्ये हिमोग्लोबिन व कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. विशेषतः १२ ते ४० वयोगटातील मुली व महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. यावर शंखपुष्पीचा चांगला उपयोग होतो.

शंखपुष्पी वनस्पती सर्वत्र आढळते. आयुर्वेदामध्ये तिची मुळे, बीया आणि पानांचा ब्रेन टॉनिक म्हणून वापर केला जातो. हे महत्त्व ओळखून वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती देशमुख यांनी संशोधन पेपर तयार केला. तो अमेरिकन जर्नल 'फार्मासिटीकल रिसर्च'मध्ये 'स्टडीज ऑफ क्लायटोरिया टर्नेटिया' नावाने तर युरोपियन जर्नल ऑफ एक्स्प्रेमिंटल प्रायव्होजन- २०१४ मध्ये 'हिमॅटोलॉजिकल पॅरॉमिटकल ऑफ इंडियन गोट्स पेड ड्राइड टायटेरिया यूज बेस्ड डाएट' नावाने प्रसिद्ध झाला आहे.

या वनस्पतीची कोवळी पाने खाल्यास हिमोग्लोबिन वाढते. जास्त दिवसांच्या पानांचे चूर्ण घेतल्यास कॅल्शियम व हिमोग्लोबिन वाढत असल्याचा निष्कर्ष देशमुख यांनी काढला आहे. कॅल्शियम, आयर्न, झिंक, पोटॅशियम या मूलद्रव्यांसोबत मोठ्या प्रमाणात 'अ' व 'ब' जीवनसत्व असल्याचेही आढळून आले आहे. पानामधील क्युरासिटीन घटक फुप्फुसाच्या कॅन्सरवर गुणकारी असल्याचा निष्कर्ष काढला आहे. गायी व शेळ्यांना चारा म्हणून तिचा वापर केल्यास दूध उत्पादनातही भरपूर वाढ होऊन जनावरे सुदृढ होण्यास मदत होईल, असाही दावा देशमुख यांनी केला आहे.

असे झाले संशोधन

शंखपुष्पीचे औषधी गुणधर्म ओळखण्यासाठी शेळ्यांवर प्रयोग केले. चार किलोच्या प्रत्येकी तीन शेळ्यांचे तीन ग्रुप करण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या ग्रुपला प्रत्येकी २५० ग्रॅम पाने व एका ग्रुपला दहा ग्रॅम निळ्या व पांढऱ्या फुलांचे चूर्ण देण्यात आले. तिसऱ्या ग्रुपला गव्हाचा भरडा देण्यात आला. प्रयोगा दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये पहिल्या दोन्ही ग्रुपमध्ये हिमोग्लोबिन व कॅल्शियम वाढल्याचे दिसून आले.


सह्याद्री किंवा अन्य पठारी भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान घेऊन त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येतो. अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या ज्ञानाचे संकलन करणे गरजेचे आहे. वनस्पतीशास्र विभागाने अशा ४०० वनस्पतींचे डाक्युमेंटेशन केले आहे.

प्रा. वर्षा जाधव, वनस्पतीशास्र विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून; डॉक्टर पती, प्रेयसीसह अन्य तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

अनैतिक संबंधात अडथळा आणणाऱ्या डॉक्टर पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने खून केल्याप्रकरणी डॉक्टर पती, प्रेयसी यांच्यासह अन्य तीन डॉक्टरांवर सोलापुरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निनावी अर्जाचा तपास करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. प्रसन्ना अग्रहार आणि त्यांची मैत्रिण मेघरॉय चौधरी याच्यासह डॉ. एस. प्रभाकर, डॉ. भाऊसाहेब गायकवाड आणि डॉ. अमित कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होटगी रोडवरील अंत्रोळीकर नगरातील नीलमोहोर अपार्टमेंटमध्ये डॉ. प्रसन्ना अग्रहार यांचे घर आहे. त्याचे मेघरॉय चौधरी हिच्याशी अनैतिक संबंध होते. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड असणाऱ्या डॉ. प्रसन्ना यांची फोटोटोग्राफीच्या निमित्ताने मेघरॉयशी ओळख झाली होती. डॉ. अग्रहार हे सोलापुरातील डॉ. एस. प्रभाकर यांच्या गंगामाई हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन आहेत. या दोघांच्या अनैतिक संबंधात डॉ. प्रसन्ना यांची पत्नी डॉ. रश्मी ( मूळ रा. बेंगळुरू) अडसर ठरत होती. या दोघांनी २०१० मध्ये लग्न केले होते. मूळ कोलकत्ता येथे राहणारी आणि व्यवसायाने शिक्षिका असलेली व वाइल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असलेली मेघरॉय चौधरी हिच्याशी डॉ. प्रसन्न यांचे सूत जुळले.

दरम्यान प्रसन्ना आणि मेघरॉय या दोघांनी २६ मे २०१५ ते १ जून २०१५ या कालावधीत डॉ. प्रसन्ना यांच्या घरात डॉ. रश्मी अग्रहार हिचा काटा काढण्याचा कट रचला आणि ९ जुलै २०१५ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या ण्ङ्माच्ङ्मा सुमारास डॉ. रश्मी अग्रहार घरी असताना या दोघांनी तिचा खून केला.

त्यानंतर डॉ. अग्रहार यांनी या बाबतची माहिती डॉ. एस. प्रभाकर, डॉ. भाऊसाहेब गायकवाड आणि डॉ. अमित कुलकर्णी यांना घरी बोलावून सांगितले आणि त्यांच्या मदतीने डॉ. रश्मी यांच्या मृत्यूबाबत पोलिसांना कोणतीही खबर न देता व प्रेताचे शवविच्छेदन न करता डॉ. रश्मी यांच्या नातेवाईकांना बोलावून रश्मीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे भासवून त्याच दिवशी सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला.

दरम्यान, विजापूर नाका पोलिस स्टेशनला आलेल्या निनावी अर्जावरुन शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर जिरगे यांनी तपास केल्यानंतर आणि चौकशीअंती डॉ. रश्मी यांचा पती डॉ. प्रसन्ना, मैत्रिण मेघरॉय चौधरी यांनी खून करून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गंगामाई हॉस्पिटलमधील डॉ. प्रभाकर, डॉ. गायकवाड आणि डॉ. कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मूळ बेंगळुरू येथे राहणार डॉ. प्रसन्ना अग्रहार याचे अहमदनगर येथे हॉस्पिटल होते. ते हॉस्पिटल विकून तो सोलापुरात येऊन गंगामाई मध्ये न्यूरो सर्जन म्हणून काम करीत होता. ९ जुलै २०१५ मध्ये प्रसन्ना याने पत्नीचा खून केला. परंतु एका निनावी पत्रामुळे त्यांचे हे बिंग फुटले आणि चारही डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व डॉक्टर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

डॉ. प्रसन्ना व डॉ. रश्मी या दोघांचाही यापूर्वी विवाह झालेला होता. त्यानंतर या दोघांनीही पहिल्या पती आणि पत्नीपसून घटस्फोटही घेतला होता. या घटस्फोटानंतर २०१० मध्ये शादी डॉट कॉम, या साइटवर दोघांची ओळख झाली त्यातून दोघांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा असून, तो गतीमंद आहे. अंत्रोळीकर नगरात हे दोघेही राहत होते. डॉ. प्रसन्ना यांनी रश्मी यांच्या नावाने उतरविलेल्या विम्याची रक्कमही घेतली असून, रश्मी यांच्या आईवडिलांना बोलावून रश्मीच्या मृत्यूबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे डॉ. प्रसन्ना यांनी लिहून घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझी लढाई हिदूंशी नाही!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

माझी लढाई हिंदूंशी नाही तर समाजा-समाजात भेदभाव करणाऱ्या त्या दहा टक्के लोकांशी आहे, असे सांगत एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर सडकून टीका केली. सोलापुरातील जाहीर सभेत ओवेसी बोलत होते.

देशात आज सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. ४० कोटी जनता पाण्यासाठी तडफडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र विदेशी दौऱ्यावर आणि मन की बात मध्येच गुंग झाले आहेत. भाजप सरकार मुस्लिमांच्या प्रगतीच्या आड येत असून, त्यांना मतपेटीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही खासदार ओवेसी यांनी केले.

कोणत्याही पक्षाला न भिता एमआयएमला मतदान करा. आता दलाल आणि दलांचे पर्व संपले आहे. हरियाणामध्ये जाट, गुजरातमध्ये पटेलांना आरक्षण दिले जाते. कोर्टाचे आदेश असतानाही मुस्लिमांना आरक्षण का दिले जात नाही? हाच का सब का साथ, सब का विकास, असा सवालही ओवेसींनी मोदींना केला. मुस्लिमांना वेठीस धरू नका, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. आता तीच आरएसएस शहाणी झाली आहे. चड्डीवरुन पॅन्टवर आली आहे, असेही ते म्हणाले.

मालेगावचा निकाल आला तेव्हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध का केला नाही. निकालामुळे तमाम मुसलमानांवर अन्याय झाला. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीने मालेगाव वासियांची माफी मागितली पाहिजे. गाईच्या हत्येवर बंदी राहिलीच पाहिजे. परंतु सर्व सामान्यांची भूक आपण कशी भागविणार खाण्यापिण्यावरही बंदी कशासाठी. मी तर बदनाम आहेच परंतु, तुम्ही कुठल्या राजा हरीशचंद्राची औलाद आहात, अशा भाषेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जयहिंद आणि जयभीमचा नारा देत खासदार ओवेसींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

खासदार ओवेसी यांच्या सभेसाठी हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. खासदार ओवेसी सोलापुरात आल्यापासून ते सोलापूर सोडेपर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी-आंबेडकरांविषयीचेभाजप-कॉँग्रेसचे बेगडी प्रेम

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत भाजप व कॉँग्रेसचे प्रेम बेगडी आणि फसवे आहे. सध्याचे सरकार महात्मा गांधींचा आदर्श सांगत असले तरी त्यांच्या मनात मात्र नथुराम गोडसेंविषयीच आदर आहे,' अशी टीका महात्मा गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात तुषार गांधी बोलत होते.

गांधी म्हणाले, 'नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करणाऱ्यांना रोखण्याचे सामर्थ्य सरकारमध्ये नाही. कॉँग्रेसच्या राजवटीत डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे केवळ आदर्श पाळत असल्याबाबत दिखावा झाला. निर्णय मात्र झाले नाहीत. आजचे सरकार निर्णय घेत असल्याचे चित्र उभे करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र या राष्ट्रपुरुषांच्या विचारांच्या विरोधात त्यांची मानसिकता आहे. '

गांधी हत्येची कागदपत्रे खुली करा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दलची कागदपत्रे सरकारने जनतेसाठी खुली केली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भातीलही सर्व कागदपत्रेही खुली करण्याची मागणी गांधी यांनी केली. महात्मा गांधी यांची हत्या होऊन ६० वर्षे झाली आहेत तरीसुद्धा त्यांच्या हत्येचा तपशील जनतेसाठी खुला केला जात नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. भाजप सरकारमधील काही लोकं गांधीजींचे मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या प्रतिमेची पूजा करतात. गांधीजींवर ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीची दिव्य शस्त्र म्हणून पूजा केली जात आहे. सरकारवर नियंत्रण आणण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून काही प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गुजरातमध्ये २००२मध्ये झालेल्या दंगलीला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कॉँग्रेस पक्षाची भूमिकाही सोंगाड्यासारखी असून, आज विरोधी पक्ष सक्षम नसल्यामुळेच सत्ताधाऱ्यांचे फावत आहे. आता जनतेलाच विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागणार आहे.

'दाभोलकर, पानसरें'चा तपास संथ

महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा पोलिस यंत्रणा संथगतीने तपासाची कामे करीत होती. आजही नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास पोलिसांकडून संथगतीने सुरू आहे. आता पोलिसांची भूमिका निष्पक्ष राहिली नाही, असेही तुषार गांधी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images