Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुजाऱ्यांनी धर्माची दुकानदारी बंद करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भक्तांनी दिलेले दागिने, साड्या घेऊन स्वत:चे धन जमवणाऱ्या पुजाऱ्यांनी धर्माच्या नावावर दुकानदारी मांडली आहे. ज्यांना धर्माचा अर्थच माहीत नाही, ते धर्माच्या गोष्टी करत आहेत. ही विसंगती हाणून पाडण्यासाठी पुजाऱ्यांनाच गाभाऱ्यातून बाहेर काढण्याची गरज आहे' असे प्रतिपादन अॅड. निलिमा वर्तक यांनी केले. गाभाऱ्यात समानता असावी या आशयाच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या या​चिकेसंदर्भात युक्तिवाद करणाऱ्या अॅड. वर्तक यांनी गाभाऱ्यातील महिला प्रवेशाचा वाद आणि पुजाऱ्यांचा धार्मिक देखावा यावर रोखठोक मत व्यक्त केले. 'आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने पुजारी हटाव' या मोहिमेतंर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या.

अॅड. वर्तक म्हणाल्या, 'अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत ज्यांनी आयुष्य वेचले त्यांच्या अभिव्यती स्वातंत्र्यावर गदा आणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्म म्हणजे काय हेच ज्यांना माहिती नाही त्यांच्या हातात धर्माचे अधिकार देणे योग्य नाही. एकीकडे लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करायची आणि दुसरीकडे ध र्माची दुकानदारी मांडायची हा पुजाऱ्यांचा कावेबाजपणा आहे. भारतीय स्त्री ही कणखर, बुद्धीमान आहे. तिच्या चाणाक्षपणाचे अनेक दाखले इतिहासाच्या पानापानात आहेत. स्वातंत्रलढ्यात स्त्री पुरूषांच्या बरोबरीने लढली आहे. पौराणिक कथांमध्ये स्त्रीच्या सक्षमपणाची अनेक उदाहरणे दिसतात. मात्र स्त्री ही कपटी, घर फोडणारी, कलह करणारी अशीच प्रतिमा जाणीवपूर्वक रंगवली जाते. सोशल मीडियावरही स्त्रीचे चारित्र्यहनन केले जाते. मालिकांमध्ये स्त्रीच्या व्यक्तिमत्वाची काळी बाजू दाखवली जाते. हे पुरूषप्रधान मक्तेदारीचे अपत्य आहे.'

अॅड. वर्तक म्हणाल्या, 'आपल्या संविधानाचे मूळ हे विचारात आहे. समानतेचा विचार संविधानातून दिला आहे. मात्र संविधानातील नियम आपल्या सोयीने वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शाहू महाराजांनी संविधानातील समानतेच्या विचाराला कोल्हापुरात अर्थ दिला. समानतेचे बीज असलेल्या कोल्हापुरातच महिलांना मंदिरातील गाभाराप्रवेशासाठी संघर्ष करायला लागावा हे चुकीचे आहे.'

यावेळी डॉ. सुभाष देसाई म्हणाले, 'आजच्या सामाजिक विषमतेबाबत तरूणाईमध्ये असलेली जाणीव प्रगल्भ होत आहे. त्यामुळे भविष्यात तरूणपिढी या विरोधात नक्कीच आवाज उठवेल.'

अंबाबाई मूर्तीचे मूळ स्वरूप महापालिका प्रशासन व देवस्थान यांनी तातडीने घडवावे, दिशादर्शक फलकांवर अंबाबाई असा उल्लेख करावा, गाभाऱ्यात समानता जपावी आणि कोल्हापूर मुंबई मार्गावरील महालक्ष्मी एक्स्प्रेस या रेल्वेचे नाव अंबाबाई एक्स्प्रेस असे करावे असे ठराव यावेळी मांडण्यात आले. यावेळी सीमा पाटील, सुनीता पाटील, डॉ. जयश्री चव्हाण, शैलजा भोसले, सुनीता तळेकर आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला लिपिकाकडून दीड कोटींचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशी नाका येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील लिपिक अपर्णा रवींद्र बोरगावे (वय २८, रा. शारदा विहार, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत संस्थेत वेळोवेळी एक कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार करवीर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. पोलिसांनी बोरगावे यांना अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

अपर्णा बोरगावे या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या सहा वर्षांपासून लिपिक आहेत. मुलांची शालेय फी भरून घेणे, हिशोब ठेवणे, रक्कम बँकेत जमा करणे आणि जमा-खर्चाचा मासिक अहवाल ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१३ ते एप्रिल २०१६ या कालावधीत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची फी आणि वाहतूक बसच्या फीची सर्व रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली नव्हती. या कालावधीत त्यांनी पालकांकडून १ कोटी ९१ लाख ९१ हजार ६२४ रुपये जमा केले. यातील १ कोटी ४३ लाख १९ हजार ३७७ रुपयांचा अपहार केला होता. ही रक्कम संस्थेच्या खात्यावर न भरता याचा स्वतःसाठी इतरत्र वापर केला. ही बाब संस्थेच्या लक्षात आल्यानंतर बोरगावे यांनी यातील ५२ लाख ३७ हजार ७५० रुपये संस्थेकडे जमा केले. मात्र यातील ९१ लाख ४१ हजार ६२७ रुपयांची रक्कम अजूनही परत केलेले नाहीत. बोरगावे यांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ होत असल्याने आणि संस्थेच्या मालकीच्या रकमेचा गैरवापर केल्याने त्यांच्याविरोधात पोलिसात धाव घेतली.

संस्थेचे मुंबई येथील मुख्य अकाउंटंट प्रदीप वसंत धुरी (वय ४०, रा. बांगूरनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई) यांनी करवीर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी बोरगावे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध बांधकामांना तिप्पट घरफाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम प्रमाणपत्र न घेता अवैधरित्या बांधकाम केलेल्या इमारतीवर तिप्पट घरफाळा आकारणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय महापालिकेने चार एप्रिल २००८ पासून बांधकाम प्रमाणपत्र नसलेल्या १४,८५४ इतक्या इमारती मालकांना नोटीस लागू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या मिळकतधारकांकडे बांधकाम प्रमाणपत्र नसल्याने त्यांच्यावर तिप्पट कर आकारणी केली जाणार आहे.

कोल्हापूर शहरातील अनेक मिळकतींना घरफाळा लागू नाही. शहर आणि उपनगरात अनेकांनी बांधकाम प्रमाणपत्र न घेता बांधकामे केली आहेत. महापालिका प्रशासनाने, अशा मिळकतींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. अवैध बांधकामावर मालमत्ता कराच्या दुप्पट रक्कमेचा दंड करत एकूण तीन पट आकारणी होणार आहे. अवैध बांधकामावर मिळकत कर तीन पटाने लागू केल्यानंतरही त्या अवैध बांधकामाच्या विरोधातील कारवाई सुरू असणार आहे. कारवाईस कसलीही बाधा येणार नाही तसेच संबंधित बांधकाम नियमित झाले असा अन्वयार्थ लावला जाणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार चार एप्रिल २००८ पासून अवैध बांधकाम केलेल्या इमारती तसेच ज्या इमारतीच्या मिळकत मालकांनी मिळकतीचे बांधकाम प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र सादर केले नाही अशा मिळकतीवरही तिप्पट कर आकारणी केली जाणार आहे. जे मिळकतधारक भोगवटा प्रमाणपत्र अथवा मंजुरीनुसार बांधकाम केले आहे, त्या संबंधीचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाच्या अ​धिकाऱ्यांकडून ते दाखल करावे. त्यांना दंडातून सवलत देण्यात येईल. ज्या मिळकतमालकांकडून भोगवट प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही त्यांच्यावर दुप्पट दंडासह एकूण तिप्पट आकारणी केले जाईल असे पत्रक घरफाळा विभागाचे कर निर्धारक व संग्रहाकांनी प्रसिद्धीस दिले आहे. मिळकतधारकांनी बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र अथवा मंजुरीनुसार बांधकाम केले आहे त्यांनी त्यासंबंधी प्रमाणपत्र घेऊन दहा मेपर्यंत संबंधित विभागाच्या अधिक्षकाकडे नोंद करायच्या आहेत. नागरी सुविधा केंद्र येथे प्रमाणपत्र नोंद करून घेतली जाणार आहे. त्यानंतर दंडाच्या रक्कमेत सवलत दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या महिला सावकारास अटक

$
0
0

कर्जदारास दमदाटी; अपहरणाची धमकी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मासिक वीस टक्के व्याज दराने कर्ज देऊन वसुलीसाठी दमदाटी करून मुलाचे अपहरण करण्याची धमकी देणाऱ्या पुष्पा लक्ष्मण गंधवाले (वय ५५, रा. पाचगाव) या महिला सावकारास करवीर पोलिसांनी अटक केली. गंधवाले यांनी दोन लाख रुपये कर्जाच्या व्याजापोटी ८० हजारांची रक्कम वसूल करून कर्जदारास दमदाटी केली होती. सावकारीमध्ये आता महिलांचाही सहभाग उघड होत असल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे.

बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने खासगी सावकारीच्या तगाद्यानंतर केलेल्या मजुराच्या खून प्रकरणानंतर पोलिसांनी खासगी सावकारांवर कारवाईला सुरूवात केली होती. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पोलिस मुख्यालयात सावकारी विरोधी स्वतंत्र कक्षाचीही स्थापना केली, मात्र तरीही सावकारीला आळा बसल्याचे दिसत नाही. उलट सावकारीच्या क्षेत्रात महिलांचाही सहभाग वाढल्याचे पुढे येत आहे.

घरगुती आर्थिक अडचणीमुळे शीला प्रसाद धारगळकर (वय ४७, रा. श्रीराम बंगला, आरकेनगर) यांनी पुष्पा गंधवाले या महिला सावकाराकडून फेब्रुवारी महिन्यात वीस टक्के व्याज दराने दोन लाख रुपये घेतले होते. ही रक्कम देताना गंधवाले यांनी धारगळकर यांच्याकडून बँकेचा कोरा चेक घेतला होता.

गेल्या दोन महिन्यांत व्याजापोटी ८० हजार रुपयेही घेतले आहेत, मात्र वेळेत पैसे परत न केल्याच्या रागातून गंधवाले यांनी धारगळकर यांना फोनवरून आणि समक्ष भेटून शिवीगाळ व दमदाटी केली. मोठ्या मुलाची गळपटी धरून दमदाटी करीत, व्याजाचे पैसे दिले नाहीत तर लहान मुलगा अथर्व याचे अपहरण करण्याची धमकीही दिल्याची तक्रार धारगळकर यांनी मंगळवारी (ता. ३) करवीर पोलिसांत केली. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पुष्पा गंधवाले यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात शनिवारीखासदार ओवेसींची सभा

$
0
0


सोलापूर

एमआयएमचे खासदार खासदार असदुद्दीन ओवेसी यांची शनिवारी, सात मे रोजी सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. होम मैदानावर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी होम मैदानावर सभा घेण्यास नकार दिल्याने सभेच्या स्थळाविषयी साशंकता आहे. मात्र, शनिवारी सभा होणारच असल्याचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख यांनी म्हटले आहे. २०१७मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागा निर्मळ करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'नमामी चंद्रभागा या योजनेंतर्गत चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. नदी स्वच्छ आणि निर्मळ करण्यावर भर देणार आहे. शुद्धीकरणासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,' अशी माहिती बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देली. पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या मुनगंटीवार यांनी बुधवारी चंद्रभागा नदी व वाळवंटाची पाहणी केली. शुद्धीकरणाच्या आरखड्याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेतली. नदीवर बांधण्यात येणाऱ्या घाटच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली.

दरम्यान, मुनगंटीवार यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. आर्य वैश्य समाजामार्फत त्यांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी सदगुरु श्री. श्री. साखर कारखान्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस दहा लाखांचा धनादेश अर्थमंत्र्‍यांकडे सुपूर्द केला. जगन्नाथ महाराज संस्थान वेगाव (ता. मारेगाव जि. यवतमाळ) यांच्या मार्फत गोपाळपूर येथे बांधण्यात आलेल्या भक्ती निवासाचे वास्तू पूजन व सदगुरु जगन्नाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.

...............

बँका अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या

बँका अर्थ व्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असल्याचे मत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पंढरपूर येथे व्यक्त केले. दि पंढरपूर अर्बन को-ऑफ बँक लि. पंढरपूरच्या प्रदक्षिणा रोड येथील नूतन इमारतीचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.

अर्थमंत्री उवाच...

पंढरपूरमध्ये भाविकांना आवश्यक सर्व सुविधा देणार.

पंढरपुरात अद्ययावत संकीर्तन सभागृह बांधण्यासाठी निधी.

भीमा शंकरच्या १८० कोटींच्या‍ विकास आराखड्या मान्यता.

पंढरपूर येथे अद्ययावत संकीर्तन सभागृह

एक जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती येणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणंदच्या नगराध्यक्षपदावरराष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

लोणंद नगरपंचायतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष बुधवारी संपुष्टात आला. नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील यांची तर उपनगराध्यक्षपदावर भाजपाचे लक्ष्मणराव शेळके-पाटील यांची वर्णी लागली.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील यांना ११ तर काँग्रेसच्या स्वाती भंडलकर यांना ६ मते पडली. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या स्वाती भंडलकर, राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील व राष्ट्रवादीच्या बंडखोर दीपाली क्षीरसागर या तिघी रिंगणात होत्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झालेल्या हरकतींवर मंगळवारी सुनावणी होऊन तिन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले होते.

लोणंद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीने नगराध्यक्षपदाचा तिढा मंगळवारी रात्रीपर्यंत सुटलेला नव्हता. यासाठी आमदार मकरंद पाटील यांचे लोणंदमध्ये बैठकीचे सत्र सुरू होते. माळी समाजाबरोबर बैठक ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसरीकडे काँग्रेसने आपले सर्व सहा नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले होते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी कोण कोणाबरोबर युती करून जादूई आकडा गाठणार याची उत्सुकता लोणंदकरांना लागून राहिली होती.

राष्ट्रवादी, भाजपा, अपक्ष असे समीकरण असताना नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने स्नेहलता शेळके-पाटील यांचा अर्ज दाखल केल्याने दीपाली क्षीरसागर यांनी बंडखोरी करीत काँग्रेस नगरसेवकांच्या मदतीने अर्ज दाखल केला होता. तसेच काँग्रेसच्या स्वाती भंडलकर यांनीही अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, राष्ट्रवादीशी समझोता केल्याने अवघी दोन सदस्य संख्या असतानाही भाजपच्या लक्ष्मणराव शेळके-पाटील यांची वर्णी लागली आहे. या अनपेक्षित यशामुळे भाजपाच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अणे विदर्भवाद्यांचे नेते हा मोठा विनोद!

$
0
0

जयंत पाटील यांची श्रीहरी अणेंवर टिका

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'ज्या माणसाने २३ वर्षांपूर्वी गावाकडचे घर, जमीन विकून मुंबईला कुलाब्यास घर घेतले. आयुष्यभर हायकोर्टात वकिली केली. गेल्या पन्नास वर्षांत त्यांचा विदर्भाशी काहीही संबंध आला नाही, असा माणूस आता विदर्भवाद्यांचा नेता होतो, हा मोठा विनोद आहे,' अशी टीका माजी ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी श्रीहरी अणे यांच्यावर केली.

इस्लामपूर (जि. सांगली) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. आ. पाटील म्हणाले, 'या पूर्वी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहाने साजरा करीत होतो. आता या दिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही भीती वाटते. राज्याच्या विभाजनाबाबतची जी परीस्थिती निर्माण झाली आहे ती चिंताजनक आहे. श्रीहरी अणेंनी नागपूरची जमीन घर विकून मुंबईत कुलाब्याला घर घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून ते इथेच वास्तव्याला आहेत. या पूर्वीही ते नागपुरात नव्हते. त्यांचे शिक्षण जमशेदपूरला झाले. त्यामुळे कित्येक वर्षे त्यांचा विदर्भाशी संबंध नाही आणि आता ते वेगळया विदर्भवाद्यांचे नेते झाले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत जे गावाकडे फिरकले नाहीत त्यांना आता गावाकडची ओढ लागली आहे', अशीही टीका पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खाशाबांचा सहावीला धडा

$
0
0

सातारा ः संघर्षमय जीवनातून ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात ओळख थोरांची या उताऱ्यात खाशाबा जाधव यांच्यावरील धड्याचा समावेश केला आहे.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, या संजय दुधाणे लिखित पुस्तकातून हा उतारा घेण्यात आला आहे. ओळख थोरांची या उताऱ्यात खाशाबा जाधव यांच्या चरित्राची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. खाशाबांचे मूळ गाव कोणते, त्यांचे माता-पिता कोण, त्यांना कुस्तीची आवड कशी निर्माण झाली, त्यांना कुस्तीचे बारकावे कोणी शिकविले आदींची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे. खाशाबा जाधव यांचा शालेय शिक्षणासाठी रोजचा पाच किलोमीटरचा प्रवास, प्रवास-सरावाची सांगड घालण्यासाठी खाशाबा नेमके काय करीत, असे खाशाबांच्या जीवनातील सर्व क्षण या धड्यात नमूद आहेत. खाशाबा जाधव हे भारताचे पहिले ऑलिंपिक कांस्यपदक विजेते खेळाडू होते. या स्पर्धेकरिता त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला आणि देशासाठी पदक पटकावले. अभ्यासक्रमात खाशाबांवर धडा आल्याने मुलांना प्रेरणा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सक्षमीकरणाची मोट बांधू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विविध योजना, मोहीम यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर अनेक उपक्रमांची आखणी केली आहे. समाजातील शेवटच्या महिलेपर्यंत या योजनांची माहिती पोहोचावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे महिलांच्या सक्षमीकरणाची मोट बांधण्याची गरज आहे' असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

माधवी नाईक म्हणाल्या, 'केंद्र, राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळया योजना राबवत असून कोल्हापूर शहरातील महिलांनी संघटित होऊन बचत गटांच्या माध्य्मातून वेगवेगळे व्यवसाय स्थापन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याकरिता पुढाकार घ्यावा. भाजप सरकारतर्फे मुद्रा योजना, घरकुल योजना, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी मोफत गॅस जोडणी या योजनांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे. गर्भातील मुलगी वाचवण्यासोबत तिला शिक्षणातून सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. सरकारच्या या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळवून देण्यासाठी भाजप कोल्हापूर महिला आघाडीने कोल्हापुरात मोट बांधावी.'

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीमध्ये अनिता काळे, प्रमोदीनी हार्डीकर (सांगलीकर), रजनी क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मधुमती पावनगडकर यांनी प्रास्ताविक केले. अमिता कुलकर्णी, सुनिता सूर्यवंशी यांनी संयोजन केले. प्रभावती इनामदार यांनी आभार मानले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस भारतीताई दिगडे, माजी अध्यक्ष महेश जाधव, नगरसेविका गीता गुरव, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर, अश्विनी बारामते, भाग्यश्री शेटके, मनीषा कुंभार, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, प्रभा टिपुगडे, विजयमाला जाधव, आकुताई जाधव, पद्मीनी डोंगरकर, अनिता वैद्य आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरसुंडी यात्रेत भांगेतूनसोळा जणांना विषबाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या यात्रेत देवाचा प्रसाद म्हणून भांग पिलेल्या सोळा जणांना विषबाधा झाल्याचे समोर येताच खळबळ उडाली. संबधित सर्वजण तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील असून, तिघांना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भांगेमध्ये गांजाचा वापर केला जातो. प्रमाणापेक्षा अधिक भांग घेतल्याने आणि उन्हाचा तडाखा असल्याने संबधितांवर याचा परिणाम झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ यात्रा प्रसिद्ध आहे. प्रत्येक भक्त गुलालाने माखलेला असतो. बुधवारी यात्रेचा मुख्यदिवस असल्याने या दिवशी भांगेचा प्रसाद प्रत्येकाला दिला जातो. अनेकांचे भांग घालण्याचे नवस असते. काही गावचे लोक एकत्र येवून एकत्रित भांग तयार करतात. भांगेमध्ये गांजा हा मुख्य घटक असतो. गांजाबरोबर जायफळ, गूळ, बडीशेफ, दूध आदी पदार्थ घालून त्याचे मिश्रण केले जाते. गांजा किती प्रमाणात घातला यावर त्या भांगेची तीव्रता ठरते. अशी भांग प्रमाणापेक्षा अधिक घेतली आणि त्यात उन्हाचा तडाखा बसला तर संबधितांना त्रास सुरू होतो. बुधवारी चिंचणी गावातील भाविकांच्या बाबतीत नेमके हेच झाले. किरण पाटील, गुंडाप्पा हाक्के, शितल बाळासाहेब जाधव, दत्ताजी पाटील, विकास पाटील, पिंटू गावडे, विशाल पाटील, अनिल पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, विजय गावडे, पंडीत दुधाळ, सचिन गावडे, अमोल भोसले, संपत जाधव आदींना भांग घेतल्यानंतर त्रास जाणवायला लागला. कोणी असंबध बडबडू लागले तर काहींना चक्कर येऊ लागली. पोटात दुखू लागले. उलट्या होऊ लागल्या. या प्रकाराने सर्वांचीच तारांबळ उडाली. या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. किरण पाटील, शितल जाधव आणि गुंडाप्पा हाक्के आदींना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संबधितांच्या प्रकृतीला धोका नसला तरी भांगेचा अंमल उतरण्यास काही कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ विकासाचा मास्टर प्लॅन तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूरच्या विमानातळाच्या विकासाला गती मिळणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून नव्या पॅसेंजर टर्मिनलच्या उभारणीला मंजुरी देण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी आमदार सतेज पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे. विमानतळाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

कोल्हापूरच्या विमानतळाचा रखडलेला प्रश्न लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी ४ मार्चला केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये विमानतळ विकासासंदर्भात आग्रही भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने देशातील १६० छोट्या विमानतळांचा विकास करण्याचे नियोजन करत आहेत. त्यात कोल्हापूर विमानतळाचा समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी पत्रात केली होती. तसेच विमानतळासाठी उपलब्ध जागा, त्याची किंमत आणि वन खात्याकडे असलेल्या जमिनीची माहितीही या पत्रात देण्यात आली होती.

आमदार पाटील यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्री राजू यांनी त्यांना विमानतळ विकासाची ग्वाही दिली आहे. राजू यांनी उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूरच्या विमानतळासंदर्भातील प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. सध्याची विमानतळाची धावपट्टी एटीआर-७२ टाइपच्या विमान सेवेसाठी वापरता येऊ शकते. तसेच विमानतळावरील टर्मिनल केवळ २५ प्रवाशांचीच व्यवस्था करू शकणार आहे. मात्र, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने या डिसेंबर २०१५ मध्येच विमानतळाच्या संपूर्ण जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. या विमानतळाच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यात १३७०बाय ४५ मीटरची धावपट्टी २३०० बाय ४५ मीटर करण्याचे नियोजन आहे. यामुळे कोल्हापुरातून कोड सी टाइपची विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होऊ शकते. तसेच या सेवेच्या तीन कॅट-सी विमानांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३०० प्रवाशांची व्यवस्था करू शकेल, अशा नव्या टर्मिनलची उभारणी करण्यात येईल. तसेच नवीन एटीसी टॉवर उभारण्यात येणार असून, तेथे तांत्रिक सुविधेसह अग्निशमन यंत्रणाही असणार आहे.

असा होणार विकास

तीन कॅट-सी विमानांच्या पार्किंगची व्यवस्था

२३०० बाय ४५ मीटरची विस्तारीत धावपट्टी

तीनशे लोकांची सुविधा होईल, असे नवे टर्मिनल

तांत्रिक आणि अग्निशमनची व्यवस्था असलेला नवा एटीसी टॉवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीची जय्यत तयारी

$
0
0

तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या ८ मे रोजी अक्षय्य तृतीयेला होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात पोवाडे, लोकनृत्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शिवकालीन साहित्यांची प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. शिवजयंती रविवारी असली, तरी चार दिवसांपूर्वीच वातावरण शिवमय होऊ लागले आहे.

जय शिवराय मित्र मंडळ, दौलतनगर

दौलतनगर येथील जय शिवराज मित्र मंडळ (अण्णा मोगणे स्पोर्टस्) यांच्या वतीने ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ७ मे रोजी सायंकाळी सातपासून 'रात्र शाहिरांची' हा कार्यक्रम होणार असून, त्यात शिवशाहीर सुरेश पाटील, निवृत्ती कुंभार, प्रकाश लोहार यांचे पोवाडे होणार आहेत. ८ मे रोजी सकाळी दहा वाजता शिवजन्म सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी चित्रपट महोत्सव होणार आहे. ९ मे रोजी शिवकालीन मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन होणार आहे. सर्व कार्यक्रम विद्यापीठ रोडवरील विजय बेकरी चौकात होणार आहेत.

गजराज मित्र मंडळ, कदमवाडी

कदमवाडीतील गजराज मित्र मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. ५ मे रोजी वक्तृत्व स्पर्धा, ६ मे रोजी चित्रकला स्पर्धा, तर ७ मे रोजी म्हैस व रेडकू पळविणे या स्पर्धा होणार आहेत. तसेच ८ मे रोजी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८५०८४७४६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

विजय स्वतंत्र मंडळ, कसबा बावडा

कसबा बावडा माळ गल्लीतील विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या वतीने ८ ते १२ मे पर्यंत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती दिवशी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिवंत पावनखिंड देखावा हे शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असणार आहे. ९ मे रोजी लहान व मोठ्य गटात वक्तृत्व स्पर्धा होतील. तसेच १० मे रोजी पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम, म्हैस व रेडकू पळविणे स्पर्धा होणार आहेत. ११ मे रोजी रांगोळी, फॅन्सी ड्रेस व रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. १२ मे रोजी धावण्याची स्पर्धा, संगीत खुर्ची व इतिहास संशोधक मधुकर पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

0000000000000000000000000000000

डॉल्बीमुक्त उत्सव

श्री उत्तरेश्वर शिवभक्त कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक भान ठेवून यंदा शिवजयंती डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या वतीने उद्या (५ मे) शिवरायांनी किल्ल्यांवर केलेल्या जलस्रोत संवर्धनाच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांसाठी 'गनिमी कावा' हा शिवरायांवरील चित्रपट दाखविण्यात येईल. ६ मे रोजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'घरगुती गॅस सुरक्षा व उपाय' याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येतील. तसेच गडकोट किल्ल्यांचे अभ्यासक भगवान चिले यांचे रात्री आठ वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. ७ मे रोजी गुणवंतांचा सत्कार व पानसुपारी कार्यक्रम होणार आहे. ८ मे रोजी दुपारी चार वाजता पारंपरिक भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजलघटीचा रेड सिग्नल

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com
कोल्हापूर - अपुरा पाऊस आणि प्रचंड पाणी उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची घटली आहे. ही पातळी एक मीटरने घटली आहे. एक मीटरची घट ही धोक्याची समजली जाते. त्यातही चंदगड, शिरोळ आणि करवीर तालुके डेंजर झोनमध्ये आहेत. चंदगड (- ०.९६), शिरोळ (- ०.८४), करवीर (- ०.८१) या तालुक्यातील पातळी एवढ्या खाली आली आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील सरासरी - ०.६५ इतकी घटली आहे. या महिन्यातही उन्हाचा तीव्र कडाका जाणवू लागल्याने भूजल पातळीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

वैशाख वणवा सुरू झाला आहे. त्यातच पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता अद्यापही म्हणावी तशी रुजलेली दिसत नाही. अनेक ठिकाणी बोअर मारले जात आहेत. जमिनीतच नसेल तर पाणी येणार कुठून? हा साधा विचारही करायला लोक तयार नसल्याने भूजल पातळी घटत जाणार असल्याची भीती आहे. जलयुक्त शिवार योजना आणि कृषी खात्याकडून राबवण्यात येणाऱ्या पुनर्भरण योजनामुळे पाणी पातळी वाढू शकते, मात्र त्यासाठी काही काळ जाण्याची आवश्यकता आहे.

दुष्काळात राज्य होरपळत आहे. कधी नव्हे ते कोल्हापूर जिल्ह्यालाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या उपश्यावर बंधने येत आहेत. शहरात दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भूजल पातळीवर नजर ठेवून आहे.

या यंत्रणेच्यावतीने ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील ९९ विहिरी आणि ११२ बोअरवेल निश्चित करण्यात आले आहेत. यंदा ५० टक्के पाऊस पडल्याने भूजल पातळीवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच बेसुमार पाणी उपसा झाल्याने भूजल पातळी घटली आहे.

मार्च महिन्यातील भूजल पातळी सर्वेक्षण प्राप्त झाले आहे. त्यात चंदगड तालुक्यातील भूजल पातळी कमालीची (-०.९६) घटली आहे. चंदगडमधील पाच वर्षांतील सरासरी पातळी ८.१५ मीटर इतकी आहे. ती पातळी मार्च २०१६ मध्ये ९.११ मीटरवर पोहोचली आहे. शिरोळ तालुक्यातील सरासरी पातळी ४.८४ मीटर आहे. ती मार्च २०१६ मध्ये ५.६८ मीटरवर पोचली आहे. भूजल पातळीत (-०.८४) घट झाली आहे. करवीर तालुक्यात मोठे पर्जनमान्य असले तरी तेथील भूजल पातळी (-०.८१) घसरली आहे. करवीरमधील पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळी ३.६१ मीटर आहे. ती ४.४१ मीटरवर पोहोचली आहे.

पावसानंतर भूजल पातळीत वाढ होऊ शकते, असे भू वैज्ञानिक एस.ए. शिंदे यांनी सांगितले असले तरी आताची परिस्थिती धोकादायकच म्हणावी लागेल.

कोल्हापूर जिल्ह्यात वीस ते पंचवीस वर्षांत दूधगंगा, वारणा धरणाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच छोटी धरणे आणि बंधारे झाले असल्याने कोल्हापूरची भूजल पातळी ही विदर्भ व मराठवाडयाच्या तुलनेत चांगली आहे. पण गेल्या काही वर्षांत प्रथमच उणेमध्ये भूजल पातळी घटली आहे. पावसानंतर या पातळीत सुधारणा होऊ शकते. कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाच्यावतीने पुनर्भरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियान योजनांमुळे पातळीत जादा वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी फुटल्यामुळेपन्नास लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

हिडकल धरणातून बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी चार फूट व्यासाची जलवाहिनी मुचंडी येथे फुटल्यामुळे रात्री दोन वाजता गोंधळ उडाला . पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पाच घरांचे नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून त्या पाच घरांतील चाळीस सदस्य बचावले. पाण्याचा जोरदार प्रवाह घरात शिरल्यामुळे पाच घरातील संसारोपयोगी वस्तूंचे लाखोंचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार पन्नास लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुचंडी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष विनोद शिवाजी कोळडीगौडा यांच्या घराजवळील पंधरा फूट अंतरावरील हिडकल धरणातून बेळगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. पाण्याच्या जोरदार आवाजामुळे त्यांच्या घरातील लोकांना जाग आली. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांच्या घराचे छप्पर, घरातील सामान यांचे नुकसान झाले. त्यांच्या घराबरोबरच इतर चार घरांनाही पाण्याच्या प्रवाहाचा फटका बसला. पाचही घरांना तळ्याचेच स्वरूप आले होते. पाच घरांच्या सभोवतीचा परिसर जलमय झाला होता. पाण्याचा जोर इतका होता की त्यामुळे घरगुती साहित्य साठ मीटर दूर अंतरावर जाऊन पडले होते. कोळडीगौडा यांनी त्वरित हिडकल धरणाच्या कार्यालयाला फोन करून जलवाहिनी फुटल्याचे कळवले. त्यानंतर अर्ध्या तासाने पाण्याचा प्रवाह थांबला.

पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता एन. प्रसन्न मूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार जलवाहिनी फुटल्यामुळे दहा लाख लिटरहून अधिक पाणी वाहून गेले. दुर्लक्षामुळे जलवाहिनी फुटली नाही. जलवाहिनी सोळा वर्षांपूर्वीची असून, गेल्या पाच वर्षांत पाच वेळा जलवाहिनी फुटली आहे. वेल्डिंग असलेल्या ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून नुकसान झालेल्या पाच कुटुंबाना प्रत्येकी दहा हजार रुपये तातडीची मदत म्हणून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१४ हजार शेतकऱ्यांना कर्ज पुनर्रचनेचा लाभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची पुनर्रचना करताना संबधित कर्जाचे पहिल्या वर्षाच्या व्याजाची सर्व आणि त्या नंतरच्या उर्ववरित चार वर्षांतील व्याजातील सहा टक्के रक्कम भरण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील १४ हजार ३१ शेतकऱ्यांना सुमारे साडेसहा कोटींचा लाभ मिळणार आहे.

सरकारने एका वर्षापूर्वीच पीक कर्जाच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला होता. परंतु, त्या निर्णयानुसार पाच वर्षे साडेतेरा टक्के दराने व्याज भरावे लागणार होते. त्यामुळे कर्ज पुनर्रचनेला प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात येताच सरकारने कर्ज पुनर्रचनेत वाढणारी व्याजाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतल्याने पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील १४ हजार ३१ शेतकऱ्यांना सुमारे साडेसहा कोटींचा लाभ मिळणार आहे.

सांगली जिल्हा बँकेने प्रथम मांडली अडचण

सरकारच्या पीक कर्ज पुनर्रचनेच्या निर्णयानुसारची कार्यवाही ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करायची होती. परंतु पीक कर्जपुरवठा करणाऱ्या एकाही सोसायटीने कर्ज पुनर्रचनेसाठी प्रस्ताव दिला नसल्याने १८ एप्रिल रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक बाळासाहेब होनमोरे, जिल्हा उपनिंबधक प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक सुनील चव्हाण आदींसह बॅँक अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी कर्ज पुनर्रचनेनंतरच्या १३.५ टक्के व्याजाची जबाबदारी कोण घेणार? हा शेतकऱ्यांना भूर्दंड आहे, असे मुद्दे उपस्थित झाले होते. हेच कर्ज पुनर्रचनेतील अडचणीचे मुद्दे राज्यात सर्वप्रथम सांगली जिल्हा बँकेच्या वतीने सरकारकडे मांडण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारला कर्ज पुनर्रचनेबाबत नव्याने निर्णय घ्यावा लागला. याचा लाभ राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. यासाठी संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी विशेष प्रयत्न केले. होनमोरे यांनी सर्वप्रथम सांगलीतील आढावा बैठकीत हा मुद्दा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडत कर्जाचे व्याज सरकारने भरावे, अशी मागणी केली होती. पालकमंत्र्यांचे लक्ष वेधताना होनमोरे यांनी पीक कर्जांची पुनर्रचना करताना केवळ मुद्दलाची पुनर्रचना करावी व पुढील व्याजही सरकारने भरावे, अशी मागणी केली. मात्र, असे काही चालणार नाही. व्याजाची सवलत हवी असेल तर कर्ज भरा अन्यथा नियमाने कर्जाची पुनर्रचना करा, महाराष्ट्रात कोठेही असा मुद्दा आला नाही, असे काही तरी मुद्दे सांगलीतच काढतात, अशी टिप्पणी पालकमंत्र्यांनी केली होती.

होनमोरे यांनी अतिशय ठामपणे आपली बाजू मांडत सरकारनेच व्याज भरणे का आवश्यक आहे, हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अगोदरच दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जांची पुनर्रचना करणे म्हणजे त्याला मदत करणे नव्हे तर कर्जाच्या खाईत लोटल्यासारखे होणार आहे. मुळात चालू वर्षाचे व्याज भरायचे व त्यानंतर पाच वर्षे १३.५ टक्के इतक्या मोठ्या दराने व्याज भरायचे हे परवडणारे नाही, असे ठापपणे सांगत या बाबतचे लेखी निवेदनही त्यांनी दिले. पुणे येथे झालेल्या बैठकीतही बँकेच्या वतीने हीच बाजू मांडण्यात आली. अखेर सरकारला या बाबतचा निर्णय घ्यावा लागला. सरकारच्या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे डोक्यावरून खांद्यावर येण्यास मदत होणार आहे.

-----------

६१ हजार ५०२ शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना

शेतकऱ्यांच्या २०१२-१३ व २०१४-१५मधील थकित कर्जाची विशेष बाब म्हणून पुनर्रचना करावी, असा प्रस्ताव सरकार रिझर्व्ह बँकेस देणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे. २०१२-१३मधील ३० हजार २३५ शेतकऱ्यांचे सुमारे १३७ कोटी. २०१४-१५मधील २१ हजार २६७ शेतकऱ्यांच्या १३४ कोटी, असे सुमारे २७१ कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्रचना होणार आहे. हे झाले तर या ६१ हजार ५०२ शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यातील अडथळाही दूर होणार आहे. या निर्णयाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

--- -------------

सांगली जिल्ह्याला असा होणार लाभ

- कर्ज पुनर्रचनेस पात्र शेतकरी १४०३१

- पुनर्रचनेस पात्र कर्जाची रक्कम १९.६१ कोटी

-पहिल्या वर्षाची व्याज सवलत २.४५ कोटी

-पुढील चार वर्षांची सवलत चार कोटी

-शेतकऱ्यांना मिळणारा लाभ सुमारे ६.५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदम, गायकवाडांचे नगरसेवकपद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काँग्रेसच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला. त्यानुसार महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दोघांचे नगरसेवकपद रद्द केले. जातीच्या दाखल्याच्या कारणास्तव नगरसेवकपद रद्द होण्याचा या बॉडीतील हा पहिलाच प्रकार आहे. आणखी काही नगरसेवकांचे पद रद्द होण्याची शक्यता आहे. पडताळणी समितीने उपमहापौर शमा मुल्ला, स्वाती यवलुजे, शिवसेना गटनेते नियाज खान, भाजपचे विजय खाडे यांचे जातीचे दाखले वैध ठरवले आहेत.

निवडणूक झाल्यानंतर दिलेल्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे २० नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार होती. त्यातील पाच नगरसेवकांचे वैधता प्रमाणपत्र मंगळवारी मिळाले. उर्वरित १५ नगरसेवकांच्या प्रमाणपत्रासाठी सुनावणी आ​णि इतर प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी झालेल्या प्रक्रियेनंतर समितीने बुधवारी पाच नगरसेवकांच्या दाखल्याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाठवले. त्यातील गायकवाड यांचा दाखला अवैध ठरवल्याचा निर्णय दिला होता. संभाजीनगर हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यात गायकवाड यांनी महापालिकेची निवडणूक लढवताना मांग जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढवली होती. त्याबाबत माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांनी गायकवाड मागासवर्गीय नसून खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रे दाखल करुन करवीर तहसिलदार कार्यालयाकडून दाखला मिळवला आहे, अशी तक्रार केली होती. त्यानुसार त्यांच्या दाखल्याची चौकशी सुरू झाली होती. हे प्रकरण पडताळणी समितीसमोर आल्यानंतर सादर केलेल्या कागदपत्रांची समितीने शहानिशा करुन बुधवारी त्यांचाही दाखला अवैध असल्याचे महापालिकेला कळवले. त्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर गायकवाड यांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या उपमहापौर शमा मुल्ला, शिवसेनेचे गटनेते नियाज खान, भाजपचे विजय खाडे, काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांचे दाखले वैध असल्याचे पत्र महापालिकेला मिळाले आहे. याची माहिती नगरविकासकडे दिली आहे. अजूनही नऊ नगरसेवकांचे वैधता प्रमाणपत्र यायचे आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडीचे प्रत्येकी नगरसेवक आहेत. आणखी काही नगरसेवकांचे जातीचे दाखले अवैध ठरण्याची शक्यता आहे.

संतोष गायकवाड, प्रभाग क्रमांक ५८, संभाजीनगर, ताराराणी आघाडी

वृषाली कदम, प्रभाग क्रमांक ६८, कळंबा फिल्टर हाऊस, काँग्रेस

....

रडारवरील नगरसेवक

अश्विनी रामाणे, संदीप नेजदार, दीपा मगदूम (सर्व काँग्रेस)

अफजल पिरजादे, हसीना फरास, सचिन पाटील (सर्व राष्ट्रवादी)

निलेश देसाई, किरण शिराळे, सविता घोरपडे (ताराराणी आघाडी)

...

सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असताना केवळ संबंधित कार्यालयाकडून समितीसमोर योग्य ते पुरावे सादर केले नसल्याने जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला. कार्यालयाकडील चुकीचा फटका आपल्याला बसला असून कोर्टात दाद मागणार आहे.

वृषाली कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉटलंड यार्डकडून होणार पुंगळ्यांची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांमधील पुंगळ्यांच्या बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये विसंगती आढळल्याने या तिन्ही प्रकरणातील पुंगळ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठवण्यात येणार आहेत. सीबीआयने दाखल केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मंजूर केला आहे, तर संशयित आरोपी समीर गायकवाडवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया पुढील सुनावणीपासून (२० मे) सुरू करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले.

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांमध्ये साम्य असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला होता. त्यानुसार तिन्ही हत्यांमधील गोळ्या आणि पुंगळ्या बॅलेस्टिक रिपोर्टसाठी मुंबई आणि बेंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवल्या होत्या. मात्र रिपोर्टमध्ये विसंगती आढळल्याने स्कॉटलंड यार्ड पोलिसांची मदत घेण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी हायकोर्टात केली होती. त्यानुसार पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच स्कॉटलंड यार्डकडून तपासाला परवानगी दिली, तर बुधवारी (ता. ४) झालेल्या सुनावणीत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनीही मंजुरी दिली.

'बेळगाव कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर दाभोलकर हत्येतील दोन पुंगळ्या, कॉम्रेड पानसरे हत्येतील एका गोळीसह चार पुंगळ्या आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतील दोन पुंगळ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे तपासणीसाठी पाठवणार आहे', अशी माहिती सीबीआयचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयातील कामकाज सुरू राहण्याला कोणतीही आडकाठी नसल्याचे स्पष्ट केल्याने पुढील तारखेपासून संशयित आरोपी समीर गायकवाडवर आरोपपत्र निश्चित करण्यासंदर्भात मांडणी करा, असे स्पष्ट निर्देश न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सरकार पक्षाला दिले. २० मे रोजी होणाऱ्या सुनावणीत समीरवर आरोपपत्र निश्चित करण्याच्या दृष्टीने युक्तिवाद होणार आहे.

समीरच्या विरोधातील पुरावे सादर करून दाखल केलेल्या आरोपांवरून युक्तीवाद होतील. त्यानंतर आरोपपत्र निश्चित होईल, अशी माहिती सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांनी दिली. संशयित आरोपी समीरला सुनावणीस उपस्थित राहण्याची परवानगी कोर्टाने दिली असल्याने पोलिसांनी कोर्ट कामकाज सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच समीरला सशस्त्र पोलिस बंदोबस्तात कोर्टात हजर केले. सुनावणीसाठी तपास अधिकारी एस. चैतन्य, सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी एस. आर. सिंग, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, अरविंद चौधरी, दयानंद ढोमे, मेघा पानसरे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे आदी उपस्थित होते. समीर गायकवाड याच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी काम पाहिले.


वेळकाढूपणाचा आरोप

तिन्ही हत्यांचा पसस्पर संबंध सांधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. देशातील दोन प्रयोगशाळांमधील पुंगळ्यांचे रिपोर्ट विसंगत आल्यानंतर आता स्कॉटलंड यार्डकडे पुंगळ्या पाठवणे म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी केला. एकाही हत्येतील शस्त्र पोलिसांना मिळालेली नाही, त्यामुळे केवळ पुंगळ्याच्या आधारावरील रिपोर्ट परिपूर्ण कसा ठरणार, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.


समीरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

समीर गायकवाड याला जामीन मिळावा यासाठी अॅड. संजीव पुनाळेकर यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (ता. ६) सुनावणी होणार आहे. यापूर्वीही एकदा हायकोर्टाने समीरचा जामीन अर्ज फेटाळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला (केडीसीसी) दररोज ३५ कोटी रुपयांच्या रोख रकमेची आवश्यकता असते. मात्र केंद्र सरकारकडून रोख व्यवहारांवर आणलेल्या मर्यादेमुळे कोषागारातून रोख रक्कम उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्राहकांची कुचंबणा होत असून रोख रकमेचा तुटवडा जाणवू नये अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. जेटली यांनी अनुकूल शेरा दिल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले आहे.

काळ्या पैशाला प्रतिबंध बसावा यासाठी केंद्र सरकारने मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे अनेक बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही या निर्बधांची झळ बसत असल्याने खासदार महाडिक यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. 'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागाचा कणा असून शेतकऱ्यांपैकी ७० टक्के शेतकरी बँकेशी निगडीत आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार बँकेतून होत असल्याने रोख व्यवहारासाठी बँकेला सहकार्य करावे', अशी मागणी महाडिक यांनी त्यांच्याकडे केली. त्याबाबत जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच अनुकूल शेराही दिला आहे. रोख रकमेचा तुटवडा पडणार नाही, असे निर्देश देण्याचे आश्वासनही दिले असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय किचन पद्धतीत कामगारांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार ठेकेदार या संघटनेने सेंट्रल किचन पद्धतीस ‌तीव्र विरोध केला होता. या प्रश्नाबाबत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांना कामावरुन कमी केले जाणार नाही, असे आश्वसन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

सेंट्रल किचनला विरोध करण्यासाठी संघटनेच्यावतीने गेल्या चार महिन्यांपासून वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. या प्रश्नाबाबत ४ मे रोजी शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत सेंट्रल किचन पद्धतीमधील दोष दाखवून देण्यात आले. यासंबंधी झालेले संशोधन, अभ्यास याचा अहवाल सादर केला. यावर शिक्षणमंत्री तावडे यांनी या विषयी विधी विभागाकडून माहिती घेण्यात येईल आणि ८ ते १० दिवसात संघटनेला कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच जोपर्यंत यासंबंधी ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणाचेही काम काढून घेऊ नये असा आदेश देण्यात येईल असे सांगितले.

यावेळी अखिल भारतीय महासंघाचे दिल्लीतील सचिव कॉ. जे. भगवान, सीआयटीयुचे जनरल सेक्रेटरी डॉ. कराड, प्राचार्य ए. बी. पाटील, कॉ. भगवान पाटील, वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हा, शहर व तालुकास्तरावर बैठका घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images