Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्नाटकला कोयनेतून आणखी पाणी सोडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकसाठी शुक्रवारी रात्रीपासून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. अगोदर सोडण्यात आलेले एक टीएमसी पाणी अपुरे पडत असल्याने पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात कर्नाटककडून पुढील वर्षी जत आणि सोलापूरला दोन टीएमसी पाणी मिळणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सचिव शिवाजीराव उपासे यांनी 'मटा'ला दिली.

मागील शनिवारपासून (२३ एप्रिल) कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. मात्र, भीषण दुष्काळामुळे कर्नाटक सरकारने आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी केल्याने आणि महाराष्ट्र सरकारचे याबाबतचे आदेश मिळल्याने ४१०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आल्याचे कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे म्हणाले. पुढील सहा दिवसांत हे पाणी देण्यात येईल. राजापूर बंधाऱ्यातून मोजून हे पाणी सोडले जाईल.

कोयनेत २८ टीएमसी पाणी

सध्या कोयना धरणात २८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ५ टीएमसी पाणीसाठा मृत असतो. त्यामुळे उर्वरित २३ टीएमसी पाणी वापरता येणार आहे. विसर्गामुळे पाटण, कराडसह शेजारील सांगली जिल्ह्यांतील नदीकाठांवरील गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही संपुष्टात येणार आहे. यासाठी पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून २१०० आणि दरवाजांतून २००० क्युसेक असे एकूण ४१०० क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्नाटकसाठी कोयनेतून आणखी एक टीएमसी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकसाठी शुक्रवारी रात्रीपासून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. अगोदर सोडण्यात आलेले एक टीएमसी पाणी अपुरे पडत असल्याने पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात कर्नाटककडून पुढील वर्षी जत आणि सोलापूरला दोन टीएमसी पाणी मिळणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सचिव शिवाजीराव उपासे यांनी 'मटा'ला दिली.

मागील शनिवारपासून (२३ एप्रिल) कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. मात्र, भीषण दुष्काळामुळे कर्नाटक सरकारने आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी केल्याने आणि महाराष्ट्र सरकारचे याबाबतचे आदेश मिळल्याने ४१०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री अकरा वाजल्यापासून सुरू करण्यात आल्याचे कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे म्हणाले. पुढील सहा दिवसांत हे पाणी देण्यात येईल. कृष्णा नदीवर दोन्ही राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या राजापूर बंधाऱ्यातून मोजून हे पाणी सोडले जाईल.

जत, सोलापूरला मिळणार पाणी

कर्नाटक व महाराष्ट्र सरकारमध्ये कोयना व अलमट्टी धरणाच्या पाणी नियोजनाबाबत सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी कर्नाटकसाठी आणि कर्नाटकाच्या अलमट्टी धरणातील दोन टीएमसी पाणी जत आणि सोलापूरला देण्यात येणार आहे. मात्र, यंदा कर्नाटकमध्ये पाण्याची मोठी टंचाई असल्याने आता महाराष्ट्रातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या बदल्यात पुढील वर्षी अलमट्टीतून जत आणि सोलापूरला पाणी मिळणार आहे.

कोयनेत २८ टीएमसी पाणी

सध्या कोयना धरणात २८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ५ टीएमसी पाणीसाठा मृत असतो. त्यामुळे उर्वरित २३ टीएमसी पाणी वापरता येणार आहे. विसर्गामुळे पाटण, कराडसह शेजारील सांगली जिल्ह्यांतील नदीकाठांवरील गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही संपुष्टात येणार आहे. यासाठी पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून २१०० आणि दरवाजांतून २००० क्युसेक असे एकूण ४१०० क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात आहे.

राजापूर बंधाऱ्यातून सोडले जाते मोजून पाणी

महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यांतील गावांनी पाणी वापरून उर्वरीत एक टीएमसी पाणी कर्नाटकाला देण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकला जाणाऱ्या पाण्याचे सांगली पाटबंधारे विभागामार्फत दररोज मोजमाप सुरू आहे. एक टीएमसी पाणी कर्नाटकाला विसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त होताच कोयनेतील पाण्याचा विसर्ग तत्काळ बंद केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० नगरसेवकांचा चेंडू नगरविकास खात्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने महापौर, उपमहापौरांसह २० नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयाचा चेंडू नगरविकास खात्याच्या कोर्टात पडणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी 'प्रमाणपत्राबाबतची कार्यवाही सुरू आहे,' अशी पत्रे २० नगरसेवकांनी महापालिकेला शनिवारी सादर केली. सोमवारी याबाबतचा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. वेळेत प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने नगरविकास खाते २० जणांचे नगरसेवकपद रद्द करू शकते.

महापालिका निवडणुकीत नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यात जातपडताळणी वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. ही मुदत शनिवारी (३० एप्रिल) संपली. २० नगरसेवकांना प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक होते. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. पण पुरेशी कागदपत्रे समितीला उपलब्ध केली नसल्याने सुनावणीचे काम सुरू आहे. शनिवारी शेवटचा दिवस असल्याने २० नगरसेवकांनी पडताळणी समितीकडे दाखल्यासंबधी विचारणा केली. पण कागदपत्र पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रमाणपत्र पडताळणीचे काम सुरू आहे असे पत्र समितीने नगरसेवकांना दिले. त्यानंतर ही पत्रे नगरसेवकांनी नगरसचिव उमेश रणदिवे यांना दिली.

या संदर्भात रणदिवे म्हणाले, 'वीस नगरसेवकांनी ३० तारखेपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. पण त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने दिलेले पत्र दिले आहे. ही पत्रे व प्रशासनाचा अहवाल सोमवारी नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे.

प्रमाणपत्र न दिलेले नगरसेवक

महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, निलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसिना फरास, सचिन पाटील, निजाज खान, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनिषा कुंभार

समिती व नगरसेवकांत सेटलमेंट?

सहा महिन्यात जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे, हे माहीत असतानाही जातवैधता पडताळणी समितीने नगरसेवकांकडे पाठपुरावा केलेला नाही. नगरसेवकांनी विलंबाने अर्ज दिला व कागदपत्रे दिली नाहीत असा दावा समितीकडून केला जातो. पण समिती व नगरसेवकांच्या सेटलमेंटमधून 'कायदेशीर' पर्याय पुढे करून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीवेळी अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर आयुक्तांचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंत्री समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ८० टक्के एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) न दिलेल्या जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी रद्द केले आहेत. गाळप परवाना रद्द केलेल्या कारखान्यांमध्ये तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना व रेणुका शुगर्स (पंचगंगा) या कारखान्यांचा समावेश असल्याने कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आयुक्तांच्या आदेशाची प्रत अद्याप प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास मिळालेली नाही. मात्र, आयुक्तांच्या निर्णयामुळे संबंधित कारखान्यांची साखर जप्त होण्याची शक्यता वाढली आहे.

नुकत्याच संपलेल्या हंगामाच्या सुरुवातील साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाली होती. त्यामुळे एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांनी असमर्थता दर्शवली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ऊस उत्पादक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित राज्य साखर संघ, शेतकरी संघटना, कारखानदार यांच्यामध्ये बैठक होऊन एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऊस गळीत झाल्यास चौदा दिवसांत ८० टक्के आणि हंगाम संपल्यानंतर २० टक्के एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतरही जिल्ह्यातील तीन कारखानदारांनी ८० टक्के रक्कम दिलेली नाही. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केलेल्या कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने नोटिसा दिल्या होत्या. यावर शुक्रवारी साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये थकीत एफआरपीप्रश्नी कारखान्यांना गाळप झालेल्या टनामागे पाचशे रुपये दंड करून कायमस्वरूपी गाळप परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. साखर आयुक्तांच्या निर्णयामुळे कारखानदरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी दिलेली नसताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उर्वरित २० टक्के एफआरपी एक मेपर्यंत देण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी २० टक्के एफआरपी दिलेली नसताना शेतकरी संघटनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये एक

मेपासून २० टक्के एफआरपी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही कारखान्यांनी एफआरपी देण्याचे नियोजनही केले आहे. मात्र, त्यापूर्वी थकीत एफआरपीसाठी तीन कारखान्यांवर कारवाई केल्याने उर्वरित एफआरपी शेतकऱ्यांना त्वरित मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्कस नावाचं घर

$
0
0

अनुराधा कदम

Anuradha.kadam@timesgroup.com

दि ग्रेट बाँबे सर्कस कोल्हापुरात दाखल झाली आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मांडलेला हा सर्कसचा संसार म्हणजे दाहीदिशांनी एका तंबूत राहत असलेल्या कलावंताचे कुटुंबच. गेल्या ५६ वर्षांपासून हसवणारे साडेतीन फुटाचे आणि वयाची सत्तरी गाठलेले तुलसीदास यांच्यापासून ते वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या अवखळ पूनम जाधव या मुलीपर्यंत दोनशेजणांना टापू तंबूत नांदतो. दिवसभराचे तीन खेळ हेच यांचे आयुष्य.

००००००००००००००

हजारो मैलांवर असलेल्या घरातील कुटुंबीयांची आठवण आली की क्षणभर डोळे पुसायचे...हुंदका गिळायचा आणि पुन्हा तंबूतल्या वास्तवाशी नाळ जोडायची. कुणाचे आईवडील सर्कसमध्ये होते म्हणून पुढची पिढीही तंबूतच वाढली. तर कुणाच्या घरची परि​स्थिती बिकट आ​णि शिक्षण नाही म्हणून सर्कशीतील रोजगार स्वीकारला. तर अनेकांच्या हातात पदवी असूनही नोकरी नाही म्हणून सर्कसमधील करामती शिकून हेच करिअर बनवले. सर्कशीत का आलो यासाठी प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असली तरी आता सगळ्यांचा प्रवास मात्र इथेच आमचा तंबू म्हणत एका समान वळणावर विसावला आहे.

म्हैसाळमध्ये जन्मली बाँबे सर्कस

देशभर फिरणारी ही बॉम्बे सर्कस जन्माला आली ती सांगली जिल्ह्यातील मिरज पट्ट्यातील म्हैसाळ या गावी. बाबुराव कदम या मऱ्हाठमोळ्या अवलियाने सर्कस पाहून प्रभावीत होत आपलीही एक सर्कस असावी असा ध्यास घेतला. १९२० साली या सर्कसचा पहिला तंबूही त्याच गावात लागला. मात्र पहिला प्रयोग रंगला तो मुंबईत. त्या काळात मनोरंजनाची माध्यमं अ​तिशय कमी असल्यामुळे दि ग्रेट बॉम्बे सर्कसला प्रचंड प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली. पंतप्रधान पंडित नेहरूंनी या सर्कसमधील कसरतींचे कौतुक केले. १९५० चा काळ असेल, एका प्रयोगाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अगदी गृहिणीप्रमाणे चिमुकल्या राजीव आणि अमिताभ बच्चनसोबत सर्कस पहायला आल्या होत्या. आज आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान हे सर्कसच्या तंबूसाठी म्हणून ओळखले जाते. मात्र १९६३ साली या मैदानावर पहिला तंबू लागला तो बॉम्बेसर्कसचाच. त्याकाळी करवीर संस्थानच्या महाराणी विजयमाला राणीसाहेब यांनीही या सर्कसचा आनंद घेतला. आता १२ वर्षांनी ही सर्कस आपला ताफा घेऊन कोल्हापुरात आली आहे. कदम यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा या सर्कस व्यवसायाकडे वळला नाही. परंतु त्यांचे भागीदार असलेल्या बालगोपालन या फॅमिलीतील संजीव बालगोपालन हे सध्या या सर्कस व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत.

सर्कसनेच दिले आयुष्य

स्वत:ची दु:खं पोटात घालून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे विदूषक...तोंडाला रंग फासून आणि चट्ट्यापट्ट्याचे कपडे घालून विनोदाचे कारंजे उडवणारे हे रसायन म्हणजे सर्कसची जान. बाँबे सर्कसमध्येही सहा विदूषकांची फौज तुफान हसवते. तुलसीदास चौधरी हा बिहारमधील एक १३ वर्षाचा ६० वर्षांपूर्वी मुलगा बॉम्बे सर्कस पहायला गेला. सहावीपर्यंत कशीबशी शाळेची गाडी सुरू होती. अभ्यासात फारसा रस नसलेल्या तुलसीदास यांना सर्कसमधील विदूषकांने आकर्षित केले. तुलसीदास यांची उंचीही दोन फुटावर वाढली नव्हती. ते बुटकेच राहणार हे पक्के होते. मग त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून बॉम्बे सर्कसमध्ये यायचे ठरवले. गेल्या ५६ वर्षांपासून तुलसीदास या सर्कसचा एक भाग बनले आहेत. आता हेच आयुष्य असे म्हणत हा सत्तरीचा पठ्ठ्या विदूषकांच्या वेशात तंबूत आला की बच्चे कंपनीच नव्हे तर आईबाबाही हसण्याच्या गावी फिरून येतात. तीच गोष्ट सितू राजेश या मुलीची. तिचे आईबाबा याच सर्कसमध्ये काम करायचे. त्यांच्या कसरती पाहत सेतू मोठी झाली आणि आज बॉम्बे सर्कसमध्ये काम करतेय. केरळच्या मुलाशी लग्न झाल्यानंतरही तिचे तंबूशी नाते तुटले नाही. तिची मुलं केरळमध्ये शिकताहेत. तर पतीही सर्कसमध्येच काम करतात. सर्कसमधील कलाकारांनी भेटताना पूनम जाधव हे मराठी नाव कानावर पडलं आ​णि न राहवून पूनमशी गप्पा मारल्या. सर्कसमध्येच सूरज जाधव या सांगलीतील युवकाशी सूर जुळल्याचे पूनमने सांगितले. ती मूळची बंगालची. गेल्याच वर्षी त्यांचे लग्न झाले.

जगलिंग हा आयटम सादर करणाऱ्या पूनमला महाराष्ट्राची सून हे नाव खूप आनंदून टाकल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसतं. उत्तराखंडचे पितोरा गावचे ​विजयकुमार हे पंधरा वर्षांपासून सर्कसमध्ये आहेत. बेताच्या परि​स्थितीमुळे त्यांना सर्कसकडे वळावं लागलं. मात्र आता त्याचा पश्चाताप नव्हे तर आनंदच वाटतो. सोलापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरे या गावचे ४५ वर्षांचे हरी जावळे दहावी नापास झाले म्हणून सर्कसच्या वाटेवर आले. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही. सोलापुरात सर्कस पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना वाटले की हेच काम करावे. हरी विदूषक बनून सातत्याने हसवत आहेत. रिंगमास्टर पवित्र हे केरळचे. आता प्राणी नाहीत, पण एकेकाळी २६ हत्ती, चार वाघ, सात सिंह यांच्यासोबत पवित्र यांनी काम केले आहे. प्राण्यांवर बंदी आणल्यामुळेच सर्कसला उतरती कळा लागल्याचे ते सांगतात. शिक्षण नाही म्हणून किंवा शिक्षण असून नोकरी नाही म्हणून किंवा परि​स्थिती बेताची आहे म्हणून किंवा फक्त आणि फक्त सर्कसमधील जीवन आवडले म्हणून तंबूमध्येच आनंद शोधणारी ही माणसं खरोखरच भारी आहेत.

शिवधनुष्य पेलणे अवघड

दररोजचा दीडलाखाचा खर्च पेलत सर्कस नावाचे जग चालवणे हे दिव्यच असल्याचे या सर्कसचे मालक संजीव बालकृष्णन सांगतात. एका दिवसासाठी मैदानाचे भाडे सात हजार मोजावे लागते. पाण्यासाठी रोज सात टँकर मागवले जातात. वीज, पाणी, रोजचा देखभाल खर्च, प्राण्यांचा चारा असे गणित जुळवावे लागते. उंट, कुत्रा, कबूतर असे मोजके प्राणी आहेत. वर्षाकाठी बारा दौरे आखले जातात. गावागावातील अनुभव खूप बोलके असतात. समाजाकडून सर्कसला अजून प्रोत्साहन मिळायला हवे,, अशी अपेक्षा व्यक्त करताना ते आजच्या सिनेमा, टीव्ही, नाटक या माध्यमांपेक्षा सर्कसमधील जीवंतपणाकडेही लक्ष वेधतात. पदरमोड करण्यापेक्षा सर्कसच बंद करावी, असं खूप वाटते. पण, गेल्या ऐेंशी वर्षापासून आमच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांच्या पोटाचा प्रश्न समोर येतो आणि विचार बदलतो, असं ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशाचे विश्लेषण महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अपयशाचे विश्लेषण करणे ठिकच आहे, पण यशाचेही विश्लेषण करण्याची सवय लावल्यास खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करता येते,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे होते.

विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविण्यात बाजी मारल्याबद्दल विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे अभिनंदन करून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'आपण यशस्वी झाला आहात, त्या यशाचे विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे आहे. यश हे सावलीसारखे आहे. आपण काम करीत राहा, यश आपोआप तुमच्या मागे येत राहील. तुम्ही यशाच्या मागे धावू लागलात, तर मात्र ते केवळ तुमची दमछाक करते. या यशरुपी सावलीला नित्य आपल्या पाठीशी राखण्यासाठी नेहमी प्रकाशाच्या दिशेने चालत राहा.'

डॉ. अभयकुमार साळुंखे म्हणाले, 'समाज सुसंस्कृत व सुजाण करण्याच्या सकारात्मक भावनेतून कार्यरत राहणे खूप महत्त्वाचे आहे. सामाजिक दायित्वाची भावना त्यातूनच प्रबळ होत असते. शिवाजी विद्यापीठाचा चारा व धान्य वाटपाचा उपक्रम हे त्याचेच द्योतक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’ न्यूट्रीयन्टसकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले पाच गळीत हंगाम बंद असलेला दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना शुक्रवारी गोकाक येथील न्यूट्रीयन्टस अॅग्रो फ्रुट्स कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सभेत तत्त्वतः मान्यता दिली. या कंपनीने कारखाना ४५ वर्षांसाठी भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असून सप्टेंबरमध्ये कारखाना सुरू होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

न्यूट्रीयन्टस अॅग्रो फ्रुट्स कंपनी बँकेला थकबाकीच्या ६७ कोटी ५० लाख रुपयांपैकी ५० टक्के रक्कम मार्च २०१७ पूर्वी देणार आहे. त्यातील २५ टक्के रक्कम तातडीने दिली जाणार असून उर्वरित रक्कम ३१ मार्चपूर्वी देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के रकमेचे व्याज व मुदलाचे सहा वार्षिक हप्ते निश्चित करून मुद्दल रकमेवरती १२ टक्के व्याज अदा करणार आहेत. त्यानुसार बँकेची थकबाकी व्याजासह २०२३ अखेर पूर्णतः परतफेड होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

या प्रक्रियेसाठी अॅनटेरो इंडस्ट्रिज, राजारामबापू पाटील साखर कारखाना, चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ, देविदास पाटील बेळगाव, व्यंकटेश सल्पायर्स सांगली, राशी शुगर इंडिया लि. यांनी निविदा अर्ज घेतले होते. त्यातील न्यूट्रीयन्टस कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट व बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट तसेच बँकेचे कायदे सल्लागार यांच्या अभिप्रायानंतर कंपनीला तत्त्वतः मान्यता पत्र दिले जाणार आहे. 'न्यूट्रीयन्टस'ने कारखान्यातील पार्टीकल बोर्ड व त्याच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर इतर वित्तीय संस्थांची परतफेड २०१७ ते २०२२ या कालावधीत केली जाणार आहे. एसडीएफची २०१७ मध्ये ७२ लाख ५० हजार तर त्यानंतर २०२२ पर्यंत प्रतिवर्षी एक कोटी ७२ लाख व दहा टक्के व्याज अशी परतफेड होईल. पाच ते सहा वर्षे कामगारांची देणी थकलेली आहेत. युनियन किंवा वैयक्तिक कामगारांशी चर्चा करून तडजोड करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा करण्यात येणार आहे. कारखान्याचा ताळेबंद कंपनी ऑडिटर्सकडून निश्चित करून देणी दिली जाणार आहेत. चर्चेतून कमी होणारी देणी भाड्यातून वजा केली जाईल.

यावेळी मुश्रीफ यांनी तेथील नेत्यांना काय हवे आहे हे माहिती नाही, पण शेतकऱ्यांना कारखाना सुरू झाला पाहिजे, असे वाटते. जिल्ह्यात इतरत्र उपसाबंदी असताना तिथे मात्र कोणतीही उपसाबंदी नाही. त्यामुळे तेथील ऊस चांगल्या पद्धतीने पोसवला असून, येत्या हंगामात त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळेल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित पवारची ओळख परेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सावकारी कर्जाचा तगादा चुकवण्याबरोबरच ३५ कोटींची विम्याची रक्कम हडपण्यासाठी स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव रचणारा संशयित आरोपी अमोल पवार याची कळंबा कारागृहात ओळख परेड झाली. शनिवारी झालेल्या ओळख परेडसाठी चार साक्षीदार उपस्थित होते. आजरा तालुका तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या ओळख परेडमध्ये साक्षीदारांनी अमोलला ओळखले.

बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पवार (वय २१, रा. अपराध कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) याने कर्जाचा बोजा चुकवण्यासाठी स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता. भाऊ विनायक पवार याच्या मदतीने २८ फेब्रुवारीला उत्तूर-आजरा मार्गावर रमेश नाईक या मजुराचा खून करून कारमध्ये ठेवून कार पेटवली होती. या घटनेत स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यासाठी अमोल पवार याने रमेश नाईक (वय १९, रा. गडहिंग्लज) या निष्पाप मजुराचा खून केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर अमोल पवार आणि त्याचा भाऊ विनायक पवार यास ताब्यात घेतले होते. पोलिसांनी पन्नासहून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. याप्रकरणी आजरा तालुका तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी शनिवारी (ता. ३०) कळंबा कारागृहात संशयित अमोल पवार याची ओळख परेड घेतली.

कारागृह प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने दुपारनंतर सुरू झालेल्या ओळख परेडमध्ये पोलिसांनी चार साक्षीदारांसमोर अमोलसह सहाजणांना उपस्थित केले. ९ वर्षे, ७० वर्षे, २८ वर्षे आणि ३० वर्षे वयाचे चार साक्षीदार उपस्थित होते. यातील दोन साक्षीदार मृत रमेशसोबत काम करणारे मजूर होते, तर दोघे गडहिंग्लज येथील रमेशच्या घराशेजारी राहणारे होते. चारवेळा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या कपड्यात सादर केलेल्या अमोल पवारला साक्षीदारांनी ओळखले.

२९ फेब्रुवारीला घडलेल्या खुनाच्या घटनेआधी अडीच तास अमोल पवारने पांढऱ्या रंगाच्या कारमधून रमेश नाईक याला सोबत नेल्याचे साक्षीदारांनी सांगितले. विनायक पवारची मात्र ओळख परेड घेतलेली नाही. ओळख परेडसाठी आजरा तहसीलदार ठोकडे, तलाठी सागर भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह कारागृहातील अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातवैधता दाखल्यांचा घोळ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने महापौर, उपमहापौरांसह २० नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयाचा चेंडू नगरविकास खात्याच्या कोर्टात पडणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी 'प्रमाणपत्राबाबतची कार्यवाही सुरू आहे,' अशी पत्रे २० नगरसेवकांनी महापालिकेला शनिवारी सादर केली.

सोमवारी याबाबतचा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. वेळेत प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने नगरविकास खाते २० जणांचे नगरसेवकपद रद्द करू शकते.

महापालिका निवडणुकीत नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यात जातपडताळणी वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. ही मुदत शनिवारी (३० एप्रिल) संपली. २० नगरसेवकांना प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक होते. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. पण पुरेशी कागदपत्रे समितीला उपलब्ध केली नसल्याने सुनावणीचे काम सुरू आहे. शनिवारी शेवटचा दिवस असल्याने २० नगरसेवकांनी पडताळणी समितीकडे दाखल्यासंबधी विचारणा केली. पण कागदपत्र पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रमाणपत्र पडताळणीचे काम सुरू आहे असे पत्र समितीने नगरसेवकांना दिले. त्यानंतर ही पत्रे नगरसेवकांनी नगरसचिव उमेश रणदिवे यांना दिली.

या संदर्भात रणदिवे म्हणाले, 'वीस नगरसेवकांनी ३० तारखेपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. पण त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने दिलेले पत्र दिले आहे. ही पत्रे व प्रशासनाचा अहवाल सोमवारी नगरविकास खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. नगरविकास खातेच याबाबत आता निर्णय घेऊ शकते. तोपर्यंत या सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रमाणपत्र न दिलेले नगरसेवक

महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, निलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसिना फरास, सचिन पाटील, निजाज खान, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजवादी महाराष्ट्राची अपेक्षा फोल

$
0
0

uddhav.godase@timesgroup.com
कोल्हापूर - 'भाषेच्या मुद्यावरून संयुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी १०७ हुताम्यांनी बलिदान दिले. समाजवादी महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. शोषणमुक्त राज्यासह शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे फायदे पोहोचावेत अशी अपेक्षा होती. पण, दुर्दैवाने अन्नधान्य आणि पाणीचंटाईसह विचारांचीही टंचाई राज्याच्या वाट्याला आली. विभाजनाची भाषा उघडपणे बोलली जात आहे. राज्याच्या पुरोगामीत्वावरही शंका उपस्थित व्हावी असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे समाजवादी महाराष्ट्राची अपेक्षा फोल झाली', अशी खंत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केली.

'राज्य निर्मिती करताना बेळगाव, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राचा आग्रह धरला होता, मात्र बेळगावसह परिसरातील लाखो मराठी भाषिकांना स्वभाषिक राज्यापासून वंचित ठेवले. आजही सुरू असलेला सीमावासीयांचा लढा न्यायप्रक्रियेत असला तरी राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित आहे, असे सांगून ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कामगारांनी, श्रमजीविंनी आणि सर्वसामान्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, त्यांच्या वाट्याला फारसे काही आल्याचे दिसत नाही.'

कामगार कायद्यात बदल करून भांडवलदारांच्या सोयीची धोरणे राबवली जात आहेत. कामगारांना त्यांची बाजू मांडण्याचीही संधी मिळू नये, असे घातक बदल होत असताना कामगार चळवळीही निद्रीस्त आहेत. 'विकासाच्या बाबतील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अभिमान बाळगावा अशी स्थिती नाही. आरोग्य, सिंचन, शिक्षण अशा महत्त्वाच्या मुद्यांवर पिछाडीवर आहोत. सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते, पण यातून किती जमीन सिंचनाखाली आली याचे ठोस उत्तर मिळत नाही. गेल्या वीस वर्षांत देशात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे राज्य ही आपली नवीन ओळख निर्माण झाली आहे याची शरम वाटते,' असेही ते म्हणाले.

सिंचन धोरणाचा अभाव

'महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे', या पी. साईनाथ यांच्या वक्तव्याला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट केवळ आस्मानी नाही, तर ते सुल्तानीही आहे. सिंचनासाठी नियोजनातील अभाव यासाठी कारणीभूत आहे. राज्यकर्त्यांनी धरणे बांधली तर कालवे नसतात आणि कालवे बांधले तर धरण नसते, असे धोरण शेतकऱ्यांच्या जिवावर उठते. कृषी उत्पन्नाच्या बाबतीत आयात-निर्यातीचे धोरणही शेतकऱ्यांचे मरण स्वस्त करीत आहे. रायगड जिल्ह्यातील हेटवणे प्रकल्पातून पाणी मिळावे अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याऐवजी पाणी खाडीत सोडले जाते. याबाबत राज्यकर्ते कधी विचार करणार?' असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.

डॉ. पाटील म्हणाले, 'पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती होती. मात्र याच राज्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. या हत्यांमधील मारेकरी आणि सूत्रधार पोलिसांना सापडत नाहीत. अशा घटनांबाबत राज्यकर्ते भेकड भूमिका घेतात. विघातक शक्तींचा निःपात करण्याची क्षमता राज्य सरकारकडे दिसत नाही. लोकशाहीचा गाभा असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच धक्का पोहोचला आहे.'

विदर्भाची मागणी आत्मपरिक्षण करायला लावणारी

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर भूमिका मांडताना डॉ. एन. डी. पाटील यांनी या मागणीच्या मुळाशी जाऊन अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली. 'स्वतंत्र विदर्भाची मागणी काही लोकांकडून होत आहे. ही मागणी व्यापक स्वरुपाची नसली तरी, दुर्लक्षित करण्यापेक्षा याच्या मुळाशी जाऊन अनुशेष पूर्ण केल्यास कदाचित हा प्रश्न मागे पडेल. यावर राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा स्मारकाकडेफडणवींसाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

महाराष्ट्र दिना दिवशी फडणवीस सरकारकडून हुतात्मा स्मारकाकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यांचा विसर कोणालाच पडता कामा नये. स्मारकाकडे फडणवीस सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

देशमुख म्हणाले, 'हुतात्म्यांचा विसर ही चांगली गोष्ट नाही. वेगळ्या विदर्भाला वैदर्भीय जनतेने कधीच साथ दिली नाही. खासदार अणेंपासून जांबुवंतराव धोटेंपर्यंत अनेकांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर निवडणुका लढविल्या मात्र, त्यांना जनतेने कधीच प्रतिसाद दिला नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी फक्त मुठभर शहरी लोकांची आहे. येथील जनतेला संयुक्त महाराष्ट्र सोबतच राहायचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीच्या पोटातील आठवणींना उजाळापाण्यात लुप्त वास्तूंच्या अवशेषांची अभ्यासक, हौशी पर्यटकांना भुरळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. पाणीपातळी जशी कमी होईल. तसे धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या वास्तूंचे एक-एक अवशेष उघड होत आहेत. धरणामुळे विस्थापित झालेले ग्रामस्थ आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धरणावर गर्दी करू लागले आहेत. ग्रामस्थांसह इतिहास, भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी, हौशी पर्यटक आणि पक्षीनिरीक्षकांची उजनीकडे रीघ लागली आहे.

उजनी धरणाच्या बांधकामावेळी तालुक्यातील पूर्वीच्या २९ गावांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यावेळी सदर गावातील नागरिकांनी शक्य असेल ते साहित्य आपल्या पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेत नेले होते. त्यावेळी प्रामुख्याने घरांचा मूळ साचा जागेवरच राहिला होता. शिवाय गावातील सार्वजानिक इमारती तशाच पडून होत्या. मंदिरांमधील मूर्ती नव्या जागेत गेल्या मात्र, मंदिरे तशीच जागेवर पडून होते.

आता पाणी कमी झाल्यानंतर घरे, मंदिरे जैसे थे अवस्थेत पुन्हा दिसू लागली आहेत. वांगी परिसरातील पाण्यात बुडालेल्या श्री शारदाभवानी मातेच्या पुरातन मंदिराचे दर्शन होऊ लागले आहे. कुगाव परिसरातील जुने वाडे पाण्याबाहेर दिसू लागले आहेत. तरप पोमलवाडी परिरात जुन्या ब्रिटिश रेल्वे पुलाचा वरील भाग नरजेस पडू लागला आहे. याशिवाय पाण्याखाली गेलेली लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ देवाची मंदिरेही पाण्याबाहेर डोकावू लागली आहेत. इंदापूर (जि. पुणे) येथील पळसदेवचे श्री पळसनाथाचे प्राचीन मंदिरही पाण्याबाहेर पडले आहे.

धरणाच्या पोटात गायब झालेल्या वास्तूंचे दर्शन होऊ लागल्याने पुनर्वसित भागातील नागरिकांच्या जुन्या आठवणी ताज्या होताना दिसत आहेत. हे नागरिक त्या ठिकाणांना भेटी देऊ लागले आहेत. हौशी पर्यटक मोठ्या उत्सुकतेने धरणात बुडालेली घरे, मंदिरे, पूल आदी पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. सदर स्थळे पाण्याखाली बुडून साधारणत: चार दशके उलटून गेली आहेत. तरीही वाडे व मंदिरांचे बहुतेक अवशेष अद्यापही मजबूत अवस्थेत आहेत. या वास्तूंच्या बांधणीचा अभ्यास करण्यासाठी इतिहास, भूगोल, विषयाचे अभ्यासकही गर्दी करू लागले आहेत. पाणथळ भागात पक्षी गर्दी करीत असल्याने पक्षी निरीक्षकही मोठ्या संख्येने उजनीला भेट देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर नाक्यावरभरधाव वेगाला ब्रेक

$
0
0

कराड

कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील भरधाव वाहनांच्या वेगाने अनेक बळी घेतले आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी येथील उड्डाणपुलावरून प्रायोगिक तत्वावर दुहेरी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होती. या मागणीला बगल देत प्रशासनाने कोल्हापूर-पुणे महामार्गावर रम्बलर बसवण्यासाठी पुढाकार घेतला. रम्बलरच्या जाडीमुळे भरधाव वाहनांचा वेग सध्या तरी कमी झाला असून, काही प्रमाणात स्थानिक वाहनांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका हे अपघात प्रवण क्षेत्र असून, गेल्या काही वर्षांत येथे भरधाव वेगामुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांची मालिका रोखण्यासाठी वाहनधारक व नागरिकांनी या ठिकाणी रम्बलर बसवण्याची मागणी केली होती. शहर मनसेने तर या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करावी यासाठी निवेदन दिले होते. उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्यास कोल्हापूर नाक्यावरील अपघातांची मालिका कायमची खंडित होऊन वाहनधारकांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा देत निवेदन दिले होते.

दरम्यानच्या काळात रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोल्हापूर नाका परिसरात अनेक कामांनी वेग घेतला असून, येथील कोल्हापूर नाक्याच्या १८ ठिकाणी रम्बलर बसवण्यात आले आहेत. रम्बलरची जाडी जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी करावा लागतो. वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक हादरा बसू लागल्याने वेगावर नियंत्रण येऊन शहरातून बाहेर येणाऱ्या व शहरात जाणाऱ्या वाहनधारकांचा मार्ग मोकळा होत आहे. रम्बलर बसवल्याने काही प्रमाणात वेगावर नियंत्रण ठेवण्यात रस्ते विकास महामंडळास यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठीदोन गावांत हाणामारीनाथाचीपाग, तामकणे गावातील घटना; १६ जण गंभीर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यातील विविध ठिकाणचा पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. सोमवारी सकाळी पाण्यासाठी नाथाचीपाग व तामकणे गावातील ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत सोळा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कोयना प्रकल्पामुळे विस्थापित होऊन नाथाचीपाग येथे पुनर्वसित झालेले धनगर समाजाचे ग्रामस्थ व तामकणेतील ग्रामस्थ यांच्यामध्ये सोमवारी पिण्याचे पाणी पळवून नेण्याच्या कारणावरून जोरदार मारामारी झाली. पिण्याच्या पाण्यावरून दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या मारामारीमध्ये दोन्ही गावातील १६ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर पाटण ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी सहा जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस व उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन केले. समन्वयाने तोडगा काढण्यात येईल. मात्र प्रशासनाला सहकार्य करा, असेही त्यांनी सांगितले. तामकणे गावातील लोकांकडून दमदाटी करून आमच्या हक्काचे पिण्याचे पाणी पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात असून, या पाण्यावर पाणीपुरवठा योजना आखली जात असल्याचा आरोप नाथाचीपागमधील धनगर समाजातील ग्रामस्थांनी केला.

कोयना धरण प्रकल्प उभारणीवेळी विस्थापित झाल्याने तामकणे गावापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर धनगर समाजाची कुटुंबे नाथाचीपाग येथे पुनर्वसित झाले आहेत. त्याठिकाणी शेतीवर मोलमजुरी करून ते लोक जीवन जगत आहेत. त्यांचे अद्याप योग्य पुनर्वसन झालेले नाही. नाथाचीपाग वसाहतीजवळ जखीणीचा ओढा आहे. या ओढ्यावरील गायमुख या ठिकाणावरून तामकणे येथे इंटेक चेंबर बांधून पाइपलाइनने तामकणे गावासाठी यापूर्वी पाणी नेले आहे. तामकणे गावापासून हाकेच्या अंतरावर चिटेघर बंधारा पाण्याने पूर्ण भरलेला असूनही नाथाचीपाग गावातून हे पाणी नेण्यात आले आहे. आता तामकणे गावच्या नळपाणीपुरवठा योजनेसाठीही नाथाची पाग गावातील हक्काचे पिण्याचे पाणी नेण्यात येत असून, येथे नव्याने पाणीपुरवठा योजना आखण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

भीषण दुष्काळाने माण आणि खटाव तालुके होरपळून निघत आहेत. सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने जनावरांना ना पाणी, ना चारा अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा छावण्यांना मंजुरी मिळावी, यासाठी महिनाभरापासून जिल्ह्यातून ११ प्रस्ताव दिले असतानाही एकालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पावसाळ्यात पुरेसे पर्जन्यमान न झाल्याने चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. दुष्काळी भागात पिण्यासही पाणी नाही, मग शेतीला द्यायचे कोठून, अशी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. त्याचा फटका आता जनावरांना बसू लागला आहे. दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठे असलेल्या काही ठिकाणी चाऱ्याचे उत्पादन झाले. मात्र, सरकारने तालुकानिहाय एकूण जनावरे आणि एकूण चाऱ्याचे गणित बसविल्याने पुरेसा चारा उपलब्ध असल्याचे अनुमान पुढे आले. मात्र, काही मोठ्या शेतकऱ्यांकडेच चारा उपलब्ध झाला, तर लहान शेतकरी पाणी, चाऱ्यासाठी भटकताना दिसत असल्याची स्थिती आहे.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी गेल्या महिन्यांपासून केली आहे. जिल्हा पुरवठा विभागानेही एप्रिल महिन्यात मंत्रालयात पाठपुरावा केला. मात्र, त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मदत व पुनर्वसन विभागाचे असेच दुर्लक्ष झाले, तर जनावरे विकण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

माण तालुक्यातील राजवडी, बिजवडी, वडगाव, मार्डी, शेवरी, बिरोबानगर (पांगरी), पाचवड, जाशी, भालवडी, जाधववाडी, येळेवाडी या अकरा गावांतून चारा छावणी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. त्या संदर्भात मंत्रालयातही पाठपुरावा सुरू आहे.

विदर्भ, मराठवाड्यात शेकडो चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. त्याला कोट्यवधीची मदतही मिळत आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातून होणाऱ्या चारा छावण्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्या विरोधात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची वेळ आता आली आहे.

दीड लाख शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

राष्ट्रीय कृषी विमा योजना ही शेतकऱ्यांच्या तोट्याची ठरू लागली आहे. कोट्यवधींचे नुकसान होऊनही २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन वर्षांपासून विम्या कंपन्यांकडून कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विम्याचे हप्ते नियमित घेऊन कंपन्यांना फायदा होत असतानाही जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ६०१ शेतकरी आजही भरपाई रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. ही योजना 'हप्ता कोटीत अन् भरपाई हजारांत' अशी ठरू लागली आहे.

शेतकरी या योजनेत विमा हप्ता भरून सहभागी होतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विमा हप्ता घेऊन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १६ कोटी ४७ लाख रुपये विमा हप्तापोटी भरले आहेत. या रकमेतून दोनही वर्षातील १ लाख १४ हजार ५६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांकरिता ९६ कोटी तीन लाख रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही.

सात शेतकऱ्यांना २८ हजारांची भरपाई

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये ८८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी १५ कोटी २७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. मात्र, जाचक निकषांमुळे शेतकऱ्यांना या हंगामात सात शेतकऱ्यांना केवळ २८ हजार रुपये भरपाई मिळाली आहे. हप्ता रक्कम कोटीत तर मदत हजारांत केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्केट यार्डात पोलिसाकडूनच लूट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

मार्केट यार्ड परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मालाचा ट्रक लावून जेवणासाठी निघालेल्या ड्रायव्हर आणि क्लिनरला अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी मारहाण केली. त्यांच्याकडील २२ हजार रुपयांची रक्कम लुटली. यावेळी झालेल्या झटापटीत संबंधित ड्रायव्हरच्या हातात एक नेमप्लेट लागली. विशेष म्हणजे ही नेमप्लेट याच कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलची असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नसली, तरी या प्रकारामुळे कोल्हापुरात 'कुंपणच शेत खात आहे,' असे बोलले जात आहे.

मार्केट यार्ड परिसरात रात्री अंधार असतो. याचा फायदा घेऊन अनेकवेळा लुटीचे प्रकार घडतात. काही वेळा तक्रारच दाखल होत नाही. सोमवारी रात्री घडलेला प्रकार शहरातील सर्वसामान्यांना विचार करायला लावणार असल्याची चर्चा मार्केटयार्ड परिसरात होती. रात्रीच्या अंधारात पैशांचे 'शेवाळे' संबंधित कॉन्स्टेबला दिसले नसल्याने त्याचा पाय घसरला आणि तेथे लुटालुटीचा 'वसंत' ऋतू फुलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संबंधिताची नेमप्लेट ड्रायव्हरच्या हाती लागली. त्याने पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली, तर संबंधिताने 'मी यांच्यातील वाद मिटवायला गेलो होतो,' असा वेगळाच सूर आळवला. वरिष्ठांनीही 'आम्ही चौकशी करू' असे उत्तर देऊन संबंधित तक्रारदाराला माघारी पाठविल्याचे समजते. यासंदर्भात अद्याप तक्रार दाखल झालेली नसली, तरी संबंधित गाडी सांगली पासिंगची असल्याची माहिती आहे. गाडीमालकही या प्रकारामुळे घाबरला असल्याने तक्रार दाखल करण्यास तयार नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांसाठी जादा साडेसात लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निधी नाही म्हणून ओरड करणाऱ्या नगरसेवकांना प्रभागातील विकासकामासाठी ऐच्छिक निधीसह एकूण तेरा लाख रुपयांहून अधिक निधी मिळणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये या वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. उपनगरातील विकासकामांना प्राधान्यक्रम देण्याचे धोरण महापालिकेने ठरविले आहे. याकरिता उपनगरांशी संबंधित ५४ नगरसेवकांना ऐच्छिक निधीसह जादाचे साडेसात लाख रुपये मिळणार आहेत. महापौर अश्विनी रामाणे यांच्या सहीने उपसूचनेसह बजेट प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.

महापौर, अन्य पदाधिकारी व चारही विभागीय मार्केट समिती सभापतींना जादा निधी मिळणार आहे. उपनगरातील नगरसेवकांना नेहमीच कमी निधी मिळतो अशी ओरड केली जाते. सध्याच्या बजेटमध्ये त्यांना झुकते माप दिले आहे. पॅचवर्क कामासाठी तीन कोटी रुपये उपलब्ध असून त्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवकाला समान निधी वितरीत केला जाणार आहे. ऐच्छिक निधी सोडून सत्तारूढ काँग्रेसच्या सदस्यांना साडे सात लाख रुपये तर भाजप, आघाडीच्या सदस्यांना साडे पाच लाख रुपयापर्यंत जादा निधी मिळेल. उपनगरातील नगरसेवकांना ऐच्छिक निधी सहा लाख तर शहरी भागातील नगरसेवकांना पाच लाख रुपये निधीची तरतूद आहे. यशवंतराव चव्हाण कम्प्युटर लॅबसाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

शाहू समाधीस्थळासाठी ५० लाख

नर्सरी बागेत छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ बांधण्यात येत आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात स्वनिधीतून समाधीस्थळ बांधकामास सुरूवात केली आहे. समाधीस्थळाच्या बांधकामासाठी निधीची कमतरता भासू नये याकरिता बजेटमध्ये ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमधूनच हा निधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी २५ लाखांची तरतूद केली गेली होती.

पानसरे स्मारकसाठी वीस लाख रुपये

सागरमाळ परिसरातील वि. स. खांडेकर विद्यामंदिराच्या प्रांगणात कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी महापालिकेने बजेटमध्ये वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेने स्पष्ट तरतूद केली नव्हती. स्मारकाचा आराखडा तयार आहे. महापालिकेने बजेटमध्ये निधीची तरतूद केल्याने स्मारकाच्या कामास सुरूवात होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

स्मशानभूमीसाठी २५ लाख रुपये

महापालिकेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीसह अन्य ठिकाणच्या स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारसाठी पंचगंगा स्मशानभूमी येथे जागा अपुरी पडत आहे. शेडचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी बजेटमध्ये २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

शिवसेनेशी पॅचवर्क, भाजप-ताराराणी आघाडी अंतरावर

महापालिका बजेटमध्ये निधी वाटपात शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलण्यात आल्याचा आरोप सेना नगरसेवकांनी केला होता. महापालिकेच्या बजेट सभेत सेना नगरसेवकांनी सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. महापालिका सत्ता स्थापनेत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सत्तारूढ काँग्रेस आघाडीला सोबत करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांनी दोन्ही काँग्रेसवर हल्लाबोल करत विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीशी जवळीक साधली. या साऱ्या घडामोडीवर सत्तारूढ काँग्रेस आघाडीने पुन्हा एकदा शिवसेनेच्या सदस्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेच्या चारही नगरसेवकांना ऐच्छिक आणि इतर विकास कामासाठी मिळून तेरा लाख रुपयाहून अ​धिक निधी दिला जाणार आहे. सेनेशी पॅचवर्क करतानाच सत्तारूढ गटांनी विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना निधी वाटपात समानता ठेवली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या नगरसेवकांपेक्षा भाजप, आघाडीच्या नगरसेवकांनी दोन ते अडीच लाख रुपये कमी मिळणार आहेत. मात्र या संदर्भात महापालिका पदाधिकाऱ्यांनी, भाजप, ताराराणी आघाडीचे गटनेते व नगरसेवकांसोबत चर्चा केल्याचे सांगितले. महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वीस कोटी रुपयांच्या निधी वाटपात दोन्ही काँग्रेस आघाडीच्या सदस्यावर अन्याय केल्याची ओरड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधार महिलेला हक्काचे घर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी चौकात उपाशीपोटी फिरणाऱ्या आणि हलाखीत जगणाऱ्या तामिळनाडूमधील एका निराधार महिलेला कोल्हापुरातील एकटी संस्थेच्या पुढाकाराने तिचे हक्काचे घर आणि कुटुंबीय मिळाले. गेल्या चार महिन्यांपासून अवनि संस्थेच्या एकटी या रात्रनिवाऱ्या राहणारी दमयंती अखेर तिच्या तामिळनाडूमधील घरी पोहोचली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे फुलले. पोटच्या पोरांना तिने कुशीत घेतले आणि हरवलेल्या गोकुळात ती रमून गेली.

चार महिन्यांपूर्वी चुकीच्या रेल्वेत बसल्यामुळे दमयंती कोल्हापुरात आली. भाषेच्या अडचणीमुळे ती शहरात फिरू लागली. दरम्यान वेरळा विकास संस्था आणि एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिची विचारपूस केली. एका दुभाषिकेच्या मदतीने तिला बोलतं करण्यात यश आले. ती महिला तामिळनाडूमधील आरासूर गावातील असल्याचे लक्षात आले. दमयंती जयमूर्ती वन्नीरगंवडर असे तिने नाव सांगितले. संस्थेच्या रात्रनिवाऱ्यात तिला आणले आणि तिला तिच्या घरी पोहोचवण्याच्या प्रयत्नांना वेग आला. संस्थेचे कौन्सिलर फ्रान्सिस डिसोझा यांनी यासाठी पुढाकार घेतला. कोल्हापुरातील कुमठेकर कुटुंबीयांचे नातेवाईक रणजित कुमठेकर हे चेन्नईमध्ये राहतात. त्यांच्या मदतीने आरासूर गावातील माहिती मिळवण्यात आली. अखेर आदिल फरास आणि जयेश ओसवाल यांच्या आर्थिक मदतीमुळे दमयंतीचा तिच्या घरी जाण्याचा प्रवास सुकर झाला.

चार महिन्यांच्या विरहानंतर दमयंतीला घरी पाहताच तिचे कुटुंबीयदेखील आनंदी झाले. तिचे कुटुंबीयही दोन महिन्यांपासून शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दमयंती जीवंत असल्याची आशाही त्यांनी सोडली होती. आईला पाहताच तिचा मुलगा सत्यराज, मुलगी व्हल्ली यांनी आईला मिठीच मारली. एकीकडे आई घरी आल्याचा आनंद आणि इतक्या दिवसांची वाट पाहून आई सुखरूप असल्याचे आनंदाश्रू असे वातावरण दमयंतीच्या घरी दिसून आले. दमयंतीने रात्रनिवाऱ्यातील आठवणी कुटुंबीयांना सां​गितल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

$
0
0

Satish.Ghatage

@timesgroup.com

एक जुलैला राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीचा विश्वविक्रम करण्याची सरकारने घोषणा केली असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. प्रशासनातील २२ विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार १२८ ठिकाणे निश्चित केली असून, आठ लाख ४२ हजार ७७६ झाडे लावण्यात येणार आहेत.

दरवर्षी एक ते सात जुलै या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जातो. या काळात वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. पण राज्य सरकारने एक जुलै या एकाच दिवशी राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाची नोंद गिनिज वर्ल्ड बुकमध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोपांची उपलब्धता, खड्डे खोदणे, रोपे उपलब्ध करण्याची प्रत्येक विभागावर जबाबदारी सोपविली आहे. वृक्षलागवडीचे क्षेत्र निश्चित करून त्या क्षेत्रांचे अक्षांश-रेखांश तसेच शक्य असेल तेथे जीपीएस लोकेशन संगणकीय प्रणालीचा वापर करून वृक्षलागवडीची स्थळे निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक टी. पी. पाटील या योजनेचे सचिव आहेत. ​वृक्षलागवडीसाठी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले आहे. महसूल विभागातील प्रत्येक तलाठ्याला पाच रोपांचे टार्गेट दिले आहे. तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय, महापालिका, नगरपालिका, पोलिस ठाणी, हॉस्पिटल, महाविद्यालय, शाळा, मैदाने, बसस्थानके यांना रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

पशू दुग्धपालन मत्स्य (पदुम) विभागाला एक लाख १७५० रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दूध संघ, डेअरी व संस्थांना प्रत्येकी २० रोपे लावण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात पाच हजार डेअरींमार्फेत एक लाख वृक्षलागवड होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्यावतीने प्रत्येक ग्रामपंचायतीला १०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात १०३० ग्रामपंचायती असून, एक लाख तीन हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. प्रत्येक खासगी व सरकारी शाळेला २० झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असून, साडेतीन हजार ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये ७० हजार रोपे लावणार आहेत. कृषी विभागाला ६२ हजार वृक्षलागवडीचे टार्गेट आहे. विकसित होत असलेल्या पाणलोट क्षेत्रात १२ हजार, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मोकळ्या व पडिक जागा, शेतीच्या बांधावर ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

कोट...

'भारतात ३३ टक्के जंगलक्षेत्राची गरज आहे; पण प्रत्यक्षात १८ टक्के जंगल आहे. जंगलाव्यतिरिक्त पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नागरिक व सामाजिक संस्थांनी या उपक्रमात पुढाकार घ्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेतला जाणार आहे.'

टी. पी. पाटील, उपसंचालक, सामाजिक वनिकरण विभाग

००००

विभागनिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

विभागाचे नाव एकूण ठिकाणे लागवडीचे उद्दिष्ट

महसूल ४६८ ३२८५

पदुम ५१७५ १,०१,७५०

नगरविकास २४१ ८०२५

सहकार व पणन १५५४ १०,३२५

सांस्कृतिक व पर्यटन ३ १५०

उच्च व तंत्रशिक्षण १२४ ५८६०

गृह ३० ५९०

परिवहन ३९ ११४०

उद्योग २१५० ४३,०००

ऊर्जा ११६ ६१००

विधी व न्याय २०१ १,००२०

सार्वजनिक आरोग्य ९३ २८२५

सार्वजनिक बांधकाम २५ १४९०

ग्रामविकास ११२८ १,०४,९६०

जलसंधारण २० ४००

शालेय शिक्षण व क्रीडा ३६०० ७२,०००

जलसंपदा १५ २७००

सामाजिक न्याय ४४ ८८०

कृषी ५०२४ ६२,०००

वन ३५ ३,७०,२७६

सामाजिक वनीकरण २५ ३५,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जूनपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या मुख्य अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून २४ अभ्यासक्रमांचे निकाल लागले आहेत. ज्या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाला विलंबाने सुरुवात झाली, त्यांच्या परीक्षा व निकालाला वेळ लागणार आहे. मात्र नियमित अभ्यासक्रमाचे निकाल जूनपर्यंत लावण्यात येणार असून १५ जुनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. निकाल वेळेत लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्रीय झाले आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने लवकर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ मार्चपासून विविध अभ्यासक्रमाच्या ६०४ परीक्षांना प्रारंभ झाला. सुमारे अडीच लाख परीक्षार्थींचा यामध्ये समावेश आहे. एम.एड., बी.बी.ए, बी.सी.ए, बी. ए. बी. एडच्या अभ्यासक्रमांना उशीरा सुरुवात झाल्याने या परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. मात्र इतर अभ्यासक्रमांचा निकाल अपेक्षीत वेळेतच लागणार आहे. परीक्षा लवकर घेण्याचा निर्णयाचा सर्वाधीक फायदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला झाला असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रथमच १५ जुनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

व्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याने परीक्षा आणि निकाल त्वरीत लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. यापूर्वी परीक्षा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत विविभ अभ्यासक्रमाच्या २४ परीक्षांचे निलाक जाहीर करण्यात आले आहे. बी.ए., बी.एस्सी, बी. सी. एस. सत्र ५ व ६ च्या अभ्यासक्रमांचे निकाल आठवड्याभरात लागण्याची शक्यता आहे. ज्या अभ्यासक्रमाचे निकाल लागले आहेत, अशा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images