Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राम जन्मला गं सखे.., राम जन्मला!चाफळमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थित रामनवमी सोहळा साजरा

0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरांमध्ये सत् सीता रामचंद्र की जय..,प्रभू रामचंद्र की जय.., बोल बजरंग बली की जय.., च्या जयघोष. शेकडो धगधगत्या दिवट्यांच्या व सासन काठ्यांच्या साक्षीने हजारो भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण आणि पुष्पवर्षावात ३६९वा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम जन्म सोहळ्यावेळी भाविकांनी केलेल्या गुलालाचे उधळणीमुळे फुलांचा व गुलालाचा सडा पडला होता. संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण राममय झाले होते.
प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी शुक्रवारी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: गजबजून गेला होता. युवक-युवतीच्या झुंडीच्या झुंडी प्रभू रामनामाचा जयघोष करीत गुलालात न्हावून गेल्या होत्या.
दहा दिवसांचा उत्सव
चाफळ येथील यात्रेचे नवमी, दशमी व एकादशी हे मुख्य तीन दिवस असले तरी चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून या यात्रेस प्रत्यक्ष प्रारंभ होतो. यावेळी ही यात्रा एकूण दहा दिवस चालली. मुख्य दिवशी असलेल्या शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता काकड आरती, साडेपाच वाजता श्रीरामाची पूजा, रामनाम जप, सहा वाजता गीतापाठ, साडेआठ ते दहा वाजेपर्यंत भजन व आरती करण्यात आली. अकरा ते बारा वाजेपर्यंत श्रीराम मंदिराला तेरा प्रदक्षिणा घालत श्रीराम मारुती, शंकर, देवी कृष्णामाई, श्रीकृष्ण, गणपती अशा देवतांच्या आरत्या प्रदक्षिणाचे वेळी चालीवर म्हणण्यात आल्या. प्रभू रामास अभ्यंगस्नान घातल्यावर त्यांची विधीवत पूजा, पौरोहित्य विधी पुरोहितांनी केला. श्रीरामास न्हाऊ घातल्यानंतर रामाला पाळण्यात घालण्यात आले. पाळणा गीतानंतर श्रीरामास अधिकारी स्वामी दुर्गाप्रसाद स्वामी व वासंती स्वामी यांच्या ओट्यात देण्यात आले. यावेळी के. बी. क्षीरसागर यांचे लळिताचे कीर्तन झाले. श्रीराम जन्मसोहळयानंतर सर्व भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
कराडमध्येही नवमीचा उत्सव
कराड शहर व परिसरातही शुक्रवारी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारीक पद्धतीने भक्तिमय वातावरणात पार पडला. येथील शिवाजी हौसिंग सोसायटी, सोमवार पेठेतील गोंदवलेकर महाराजांचे राम मंदिर, कोटातील राम मंदिरांसह परिसरातील ग्रामीण भागातील विविध राम मंदिरांतही हा सोहळा पार पडला. अनेक ठिकाणी राम जन्मोत्सवानंतर महाप्रसादांचेही आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात आंबेडकर विचारांचे अभिवाचनपुरोगामी चळवळीत कार्यकर्त्यांचा उस्फूर्त सहभाग

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र जमून बाबासाहेबांच्या विविध विषयांवरील मौलिक विचारांचे अभिवाचन केले. आंबेडकरांच्या १२५व्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेडकरांनी २० जुलै १९४२ रोजी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्समध्ये केलेल्या भाषणातील अंश, बाबासाहेबांचे नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका आणि योगदान, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत केलेल्या भाषणातील काही भाग, बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मजूर पक्षाची शेतीविषयीची भूमिका, कामगार विषयक धोरण, २८ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईच्या पुरंदरे स्टेडियम झालेल्या सत्कार प्रसंगी केलेल्या भाषणातील अंश, बाबासाहेबांचे मुस्लिम समाजविषयीचे मत आदी विविध विषयांवरील बाबासाहेबांच्या विचारांचे योग्य संदर्भासह विश्लेषण करणारे अभिवाचन करण्यात आले. बाबासाहेबांच्याबरोबर शेवटची १६ वर्षे स्वीय सहायक म्हणून काम करणारे व सतत सावलीसारखे वावरलेले नानाक चंद रत्तु यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे मनोगत व आठवणींनी उपस्थितांची मने हेलावून गेली. अखेरच्या दिवसांतील मनोगत डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे होते. या अभिवाचनात डॉ. सुहास पोळ, नारायण जावलीकर, प्रा. डॉ. भास्करराव कदम, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, कॉ. सलीम आत्तार, कॉ. आशिष सोनावणे, कॉ. शिवाजी पवार, कॉ. मिलिंद पवार, जयंत उथळे, विजय मांडके, प्रा. डॉ. खिलारे आदींनी सहभाग घेतला. अभिवाचन झाल्यानंतर कविता, शाहिरी आणि लोकगीतांचे सादरीकरण झाले.
....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलटण, सज्जनगडावर उत्सव

0
0


सातारा :
दशरथनंदना....बाळा...जो जो रे..,या सारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रामनवमीचा श्रीराम जन्मसोहळा साजरा झाला. सातारा शहरातील विविध राम मंदिरात या सोहळ्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. रामनवमीच्या दुपारी बारा वाजता जन्मपर्वकाळानिमित्त प्रभू श्रीरामाचे जन्माचे आख्यान, महिलांकडून पाळणा गीताचे गायन, व महाआरती झाली. त्यानंतर सुंठवडा व प्रसाद वाटण्यात करण्यात आला.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मगावी गोंदवले बुद्रुक येथील श्री थोरले राम, व धाकटे राम मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सज्जनगडावर राम मूर्तींच्या दर्शनासाठी व जन्मकाळासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
फलटण येथील नाईक निंबाळकर राज घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला. दुपारी जन्मसोहळ्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोम धरणातफक्त दहा टक्के पाणी

0
0


सातारा
वाई तालुक्यातील धोम धरणात केवळ दहा टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. पाणी योजनांची उपसा केंद्रे कोरडी पडली आहेत. धोम धरण मे महिन्यात पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याच्या नियोजन शून्य कामांमुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप होत आहे.
धरणावर वाईसह पाच तालुके शेती व पिण्याचा पाण्यासाठी अवलंबून आहेत. कमी पावसामुळे खटाव माणसह वाई तालुक्यातही यंदा दुष्काळाची भीषणता एप्रिलमध्येच जाणवू लागली आहे. धोम धरण कोरडे पडत चालले असल्याने त्यावर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे उपसा केंद्र कोरडे पडले आहेत. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात टंचाई जाणवू लागली आहे. धरण कोरडे पडल्याने किमान धरणात साचलेला गाळ काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेक्यांचे गोलमाल अन् टक्केवारी

0
0

Uddhav.godase @timesgroup.com

कोल्हापूर : आमदारांना स्वनिधीसह जिल्हा नियोजन मंडळातील विविध योजना, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम, नावीन्यपूर्ण योजना आदींमधून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणता येतो. सरकारच्या शेकडो योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या गरजा भागवता येतात. प्रत्यक्षात मिळणा‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ऱ्या कोट्यवधी रुपयांपैकी किती खर्च होतात हा संशोधनाचा भाग ठरावा. विकासकामाला आणि बिलांना मंजुरी देणारी प्रशासकीय यंत्रणा, ठेकेदारांचा गोलमाल आणि लोकप्रतिनिधींचा विशिष्ट कामांसाठीचा अट्टाहास यामुळे विकासकामांच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केल्या जातात.

कोल्हापूर जिल्ह्यात ४४१४ अंगणवाड्या आहेत. यापैकी केवळ पन्नास टक्के अंगणवाड्यांना इमारती आहेत. दहा ते बारा टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. उर्वरित अंगणवाड्या समाजमंदिरे, सार्वजनिक सभागृह आणि मंदिरांमध्ये भरतात. देशाचे भावी नागरिक अक्षरशः कोंडवाड्यात शिक्षणाचा श्रीगणेशा करतात. अंगणवाड्यांची दूरवस्था असूनही आमदारांचे याकडे लक्ष जात नाही हे विशेष. शहरांमध्ये दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये भरणाऱ्या अंगणवाड्या पाहिल्यानंतर शैक्षणिक विकास कसा होणार ? असा प्रश्न पडतो. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मनात आणले तर चार वर्षात मतदारसंघातील सर्व अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळू शकतात. मात्र दुर्दैवाने कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अंगणवाडी इमारतीसाठीच्या निधीची मागणीच केलेली नाही. मतदारसंघातील नागरिकांकडून अंगणवाडी इमारतींसाठी मागणी होते. पण आमदारांकडून अंगणवाड्यांऐवजी रस्त्यांना प्राधान्य दिले जाते. ठराविक रस्तेच पुन्हा पुन्हा करून निधी खर्ची घातला जातो.

राज्य सरकारने मार्चमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात अंगणवाड्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत ६० टक्के कपात केली आहे. त्यामुळे यापुढे पोषण आहार, सेविकांचे मानधन, इमारतींचे भाडे वेळेत मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत सर्व आमदारांनी अंगणवाड्यांना प्राधान्य देऊन नियोजन करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनधींनी इच्छाशक्ती दाखवली तर शिक्षणातील पहिला महत्त्वाचा टप्पा सुरक्षित विकसित होऊ शकतो. रस्ते निर्मिती महत्त्वाची आहेच, पण त्यासाठी मंजूर निधी त्याच कामांसाठी खर्च होत नाही ही वस्तुस्थिती आहे. गटर्स बांधणी, विंधनविहिरी, पाणी योजनांकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेपासून ते आमदारांपर्यंत सर्वत्र टक्केवारी टाळून कामे झाली तर कामांचाही दर्जा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदारांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुमारे पन्नास टक्के अंगणवाड्यांना इमारती नाहीत. त्यामुळे मुलांना कोंडवाड्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. आमदारांनी इच्छाशक्ती दाखवली तर चार वर्षात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना इमारती मिळतील.

- आप्पा पाटील, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील झाडांना क्रिडाई देणार पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकात्मिक रस्ते प्रकल्पातून शहरातील ५० किलोमीटरचे रस्ते झाले. त्यांच्याबरोबर दुतर्फा तर काही ठिकाणी रस्ते दुभाजकामध्ये छोटी, मोठी हजारो झाडे लावण्यात आली. आयआरबीची जबाबदारी संपवल्यानंतर त्या झाडांची देखभालही कमी झाली. पाण्याअभावी ही झाडे उन्हाच्या कडाक्यात सुकून चालली आहेत. या सर्व झाडांना आता क्रिडाईने वर्षभर टँकरने पाणी घालण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी नदी अथवा कोणत्या विहिरीतून नव्हे तर शहराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येणार आहे.

या रस्ते प्रकल्पामध्ये शहरातील प्रवेशद्वारांचे रस्ते आयआरबीच्या माध्यमातून करण्यात आले. प्रकल्प राबवला जात असताना रस्त्याच्या दुतर्फा तसेच दुभाजकामध्ये झाडे लावण्याची तरतूद करारात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार आयआरबीने ठिकठिकाणी छोटी, मोठी झाडे लावली. त्याचबरोबर काही ठिकाणी आयलँडही तयार केले. त्यावर हिरवाई तयार करण्यात आली होती. मात्र टोलच्या मुद्द्यावरुन आयआरबीचा संबंध या प्रकल्पातून तोडून टाकण्यात आला. त्यावेळी या रस्त्यांची तसेच झाडांची देखभालीची जबाबदारीही संपली. त्यानंतर महापालिकेच्यावतीने झाडांना पाणी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यापाठोपाठ आलेल्या टंचाईमुळे यामध्ये सातत्य राहिले नाही. परिणामी ही झाडे सुकून चालली. अनेक छोटी झुडुपे तर मरुन गेली. काही सामाजिक संघटना, संवेदनशील नागरिकांनी स्वतः पाणी घालण्याचा प्रयत्न केला. पण ५० किलोमीटरची लांबी मोठी असल्याने ते प्रयत्न अपुरे पडत होते.

ही बाब लक्षात घेऊन क्रिडाईने या सर्व रस्त्यावरील झाडांना वर्षभर पाणी घालण्याचे नियोजन केले आहे. सध्या जाणवणारी पाण्याची टंचाई व शहरात एक दिवस आड होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता पिण्यायोग्य पाणी या झाडांना घालण्यात येणार नाही. महापालिकेच्यावतीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यामध्ये प्रक्रिया करण्यात येत असलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येते. हेच पाणी उपसा करुन टँकरच्या माध्यमातून या झाडांना घालण्यात येणार आहे. त्याची सुरुवात २१ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रस्त्यांवरील झाडांना पाणी घालण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच क्रिडाई महापालिकेच्या खुल्या असणाऱ्या जागा उद्यान स्वरुपात विकसीत करणार आहे. त्याला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, असे क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनय बारड स्मार्टफोन विजेते

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांना होणारा त्रास कमी करण्याबरोबरच समाजासाठी काम करण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'सिटीझन रिपोर्टर अॅप' च्या माध्यमातून दिली आहे. हा उपक्रम खरोखरच वेगळा व शहरवासियांशी नाते जोडणारा असल्याच्या भावना सिटीझन रिपोर्टरनी व्यक्त केल्या. त्याचवेळी प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट बातमी किंवा फोटो देणाऱ्या सिटीझन रिपोर्टरला स्मार्टफोन भेट देण्यात येत आहे. त्यानुसार सिटीझन रिपोर्टर विनय बारड यांना स्मार्ट फोन भेट देण्यात आला.

जिथे जातील, ​तेथील समस्या धडाडीने मांडणारे 'सिटीझन रिपोर्टर' संतोष सूर्यवंशी, उमेश जामदार, रणजीत घरपणकर, श्रीधर ढवळे यांना विशेष प्रमाणपत्र तर विनय बारड यांना स्मार्ट फोन 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक विजय जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नागरिकांमधील पत्रकारांना बळ देण्यासाठी तसेच समाजाला भेडसावणाऱ्या छोट्या छोट्या समस्याही प्रशासनासमोर ताकदीने येण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने सुरू केलेल्या 'मटा सिटिझन अॅप' ला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनही आता सतर्क झाले असून समस्या प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांचा संबंधित विभागाकडून निपटाराही केला जात आहे. अशा दर आठवड्यातील निवडक सिटीझन रिपोर्टरना विशेष प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यापुढे जाऊन त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट बातमी किंवा फोटो देणाऱ्या सिटीझन रिपोर्टरला स्मार्ट फोन भेट देण्यास सुरुवात केली आहे.

या 'अॅप' बाबत सिटीझन रिपोर्टर अतिशय सकारात्मक दृष्टीकोणातून पहात आहेत. प्रत्येक दिसणारी समस्या अथवा वेगळा उपक्रम ते 'मटा' कडे तातडीने पाठवत आहेत. त्या समस्या तातडीने व मुद्द्यांसह मांडून या सामाजिक जबाबदारीला 'महाराष्ट्र टाइम्स' कडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असल्याच्या भावना सिटीझन रिपोर्टरनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिशील शेतकऱ्यांचा सत्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेपू, शेवगा या सारख्या भाज्यांमध्ये पोषक घटक असतात. पाश्चिमात्य देशात त्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. पण आपल्याकडे या भाज्यांना महत्व दिले जात नाही, हे दुर्देव आहे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

निसर्गमित्र संस्थेच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरणपूरक शेती आणि कडधान्य उत्पादनासह विविध उपक्रम राबवण्याऱ्या कृतीशील शेतकऱ्यांचा विशेष सत्कार मानपत्र देऊन करण्यात आला. यामध्ये सुजाता गाट, प्रा. ​अनिल मोहिते, वेदिका पाटील यांचा समावेश आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ वास्तूविशारद शिरीष बेरी यांनी पर्यावरणपूरक वास्तू व जीवनशैली विषयावर मार्गदर्शन केले. टाकाळा येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला.

डॉ. जाधव म्हणाल्या, 'जितके अन्नपदार्थ कलरफुल तितके त्याला अधिक स्थान दिले जाते. मात्र अतिरिक्त रंग आणि अजिनोमोटोसारखे घातक पदार्थ शरीराला हानीकारक असतात. त्याचा धोका ओळखून सावध रहावे. मोड आलेली कडधान्ये नियमित खाण्याची आवश्यकता आहे.' याप्रसंगी विद्यापीठ मराठी शाळा, पोर्ले विद्यामंदिर, कंदलगाव विद्यामंदिर यांचा सत्कार मानपत्र व औषधी रानभाज्या पुस्तक देऊन केला.

कडधान्य व डाळी पाककृती स्पर्धेतील वृंदा भगवान, शालिनी वोरा, सुलभा मिरजकर, शोभा गुर्जर, शोभा पाटील, लिला पाटील, शैलजा गिरीगोसावी, सरीता पाटील, सीमा पाटील, नीता उरुणकर, यशोदा पाटील, नेहा मुळे, कावेरी कांबळे, ऐश्वर्या कांबळे, रेखा गोरल या विजेत्यांना सोलर कुकर व बहुगुणी शेवगा पुस्तिका व प्रशस्तीपत्र देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांनी स्वागत केले. कार्यवाह अनिल चौगुले यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. स्मिता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य अशोक वाली यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा संचालकांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खेबवडे येथील श्रीराम नागरी पतसंस्थेच्या बारा संचालकांवर चौकशी अधिकाऱ्यांनी २७ लाख ८६ हजार १७५ रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यातील दहा संचालकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीस लागू करण्यात आल्या आहेत. आम आदमी पार्टीचे नारायण पोवार यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

पोवार म्हणाले, 'आम आदमी पार्टीच्यावतीने आंदोलन केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी नियुक्त केलेले चौकशी अधिकारी पी. व्ही. पोवार यांनी पतसंस्थेच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. बारा संचालकांना प्रत्येकी दोन लाख ३२ हजार १८० रुपये अशी जबाबदारी ​निश्चित केली आहे. त्यातील एक संचालक मृत आहेत. तर शिवाजी महादेव पाटील यांनी अपील केले आहे. दहा संचालकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. जयसिंग चौगुले, जालंदर चौगुले, सुभाष काटकर, शशिकांत पाटील, चंदर पाटील, जीवन चौगुले, विश्वास पाटील, छाया चौगुले, अश्विनी पाटील, बाळासाहेब चौगुले यांचा यात समावेश आहे.'

यावेळी जयवंत पोवार, संदीप देसाई, किरण भोसले, इलाई शेख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई मारहाणीची चौकशी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई दर्शनावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ही नियुक्ती केली. मारहाणप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आलेल्या देसाई यांना केस ओढून मारहाण झाली होती. त्यांच्या अंगावर कुंकवातून तिखट फेकले होते. भाविक आणि श्रीपूजकांकडून शिवीगाळही झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतली आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले.

शुक्रवारी पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सकाळी तातडीने पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची नियुक्ती केल्याची माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून गाभारा व मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारी यांना तपासणीसाठी दिले आहे. फुटेजमधील ऑडिओही तपासण्यात येणार आहेत. पोलिसांनी मंदिर प्रवेशाचे स्वतंत्र व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. तेही तपासण्यात येणार आहे. शनिवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

काय आहे कायदा?

हिंदू मंदिर दर्शन कायद्यानुसार कोणत्याही हिंदूला मंदिरात दर्शन घेता येते. सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारल्याप्रकरणी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. यावर महिलांना राज्यातील सर्व मंदिरांत प्रवेश मिळेल, अशी हमी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे देसाई यांच्या गाभारा प्रवेशावेळी सरकारच्यावतीने जिल्हा प्रशासनाने त्यांना दर्शन घेण्यासाठी सरंक्षण दिले होते.

गाभाऱ्यातील पोलिसांचे जबाब सुरू

देसाई यांना झालेली अडवणूक व त्यांना मारहाण झाली त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले आहे. ४५ ते ५० कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात येणार आहेत.

बंदची सर्व जबाबदारी आयोजकांवर

सर्वोच्च न्यायालयाने बंदवर बंदी घातली आहे. तरीही अंबाबाई गाभारा प्रकरणी प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय महालक्ष्मी देवस्थान शांतता समितीने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. बंदकाळात सार्वजनिक मालमत्ता नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर राहील, असे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांचेही पाणीबचाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिक विकास महामंडळाने महिनाभरापूर्वीच केलेल्या उपाययोजना, उद्योजकांकडून पाणी काटकसरीने वापरण्यासाठी मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदा औद्योगिक वसाहतींना दुष्काळाच्या झळा कमी बसणार आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या पाणी पुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असले, तरी एमआयडीसीने आधीच काळजी घेतल्याने या कपातीचा परिणाम उद्योगांवर होणार नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.

धरणातील ​पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तीन प्रमुख एमआयडीसींनी पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याच काल (१४ एप्रिल) झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांता पाटील यांनी औद्योगिक वसाहतींसाठी २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे याचा फटका एमआयडीसींना बसण्याची शक्यता व्यक्त होती. मात्र, एमआयडीसीने उद्योजकांना विश्वासात घेऊन गेल्या महिनाभरापासून केलेल्या पाणी बचतीच्या कामामुळे उद्योगांना टंचाईची झळ कमी बसणार आहे.

कोल्हापूर परिसरात शिरोली, गोकुळ शिरगांव व कागल पंचतारांकित या औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींना दूधगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. दूधगंगा नदीतून उपसा झालेले पाणी कागल एमआयडीसीतील जॅकवेलमध्ये घेऊन तेथून तिन्ही एमआयडीसींना पुरविले जाते.

याबाबत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, 'आपल्याकडे टेक्स्टाईलचा अपवाद वगळता प्रोसेसड् इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर नाहीत. फाउंड्री उद्योगाल पाणी लागत असले, तरी ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लागत नाही. त्यामुळे कपातीची त्याची झळ बसणार नाही.'

गोशिमाचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण म्हणाले, 'दूधगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने ३१ व १ मार्च रोजी अचानक औद्योगिक वसाहतींचा पाणी पुरवठा बंद झाला होता. मात्र, एमआयडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू करून दिला आहे. त्यामुळे कपात झाली, तर त्याचा खूप मोठा परिणाम होणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल वसुलीची जय्यत तयारी

0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावर खासगीकरणातून विकसित करण्यात आलेल्या रस्त्यावर टोल नाके उभारणीचे काम सुरू झाले आहे. रस्त्यांची कामे अपूर्ण असूनही टोल आकारणीसाठीची पावले कंपनीने उचलण्यास सुरूवात केली आहे. या टोलविरोधात परिसरातील नागरिक एकवटत आहेत. राज्यात टोलबंदीची घोषणा करणाऱ्या भाजप महायुती सरकारकडून या रस्त्यावर टोल आकारणीला परवानगी मिळणार की टोल रद्द होणार असा प्रश्न आहे.

सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या कोल्हापूर-सांगली रस्त्यावर आजवर झालेल्या शेकडो अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शिरोली ते सांगली या रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी होऊ लागल्यावर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने खाजगीकरणातून 'बांधा, वापरा व हस्तांतरीत करा' या तत्वावर मे. सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स इंडिया लिमिटेड या कंपनीला याचे काम दिले. त्यासाठी १९६ कोटी ५ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष २०११ मध्ये कामाला सुरुवात झाली. दोन वर्षाच्या बांधकाम कालावधीसह २२ वर्षे ९ महिन्यांसाठी टोल आकारणी होणार आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये काम पूर्ण होणे आवश्यक असताना तांत्रिक अडचणी, जमिनीच्या हस्तांतरणाच्या दिरंगाईने कामे संथगतीने सुरू आहेत. कंपनीने ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ७० टक्के काम झाल्याचा दावा नागरिकांचा आहे. आजही अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरणच सुरू आहे. काही कामे अपूर्ण आहेत.

कंपनीने ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल आकारणीसाठी तयारी सुरू केली. त्यासाठी सहालोंडी (ता. हातकणंगले) व अंकली पुलावर टोलनाके उभारणी येत आहे. केबिन्स उभारल्या जात आहेत. रस्ते बांधणीला सुरुवात होऊन पाच वर्षे पूर्ण झाली असल्याने कंपनीने टोल वसुलीस सुरुवात करण्यासाठी तयार करत आहे. दोन वर्षे बांधकामाचा कालावधी धरून टोलवसुली करावयाची असल्याने टोल २० वर्षे वसूल होणार की १७ वर्षे होणार हे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केलेले नाही. नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी यांनी केली. या मार्गात कोल्हापूर व सांगली रस्त्याचा समावेश होणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तृप्ती देसाईंकडून लोकभावना भडकावण्याचा प्रयत्न’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणी येथे येऊन आम्हाला समतेचा विचार शिकवण्याची गरज नाही. महिलांना अंबाबाई मंदिरात प्रवेशाची न्यायालयानेच परवानगी दिली आहे; पण केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वतःची हौस भागविण्यासाठी तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेशाचे नाटक केले,' असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच अंबाबाईच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात होता. कोल्हापूर ही पुरोगामी नगरी आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारी ही नगरी आहे. त्यामुळेच महिलांना मंदिर प्रवेशासाठी कोणी कधी विरोध केला नाही. मंदिर प्रवेश करण्याऐवजी प्रसिद्धीसाठी देसाई यांनी स्टंटबाजी केली. पुरुषांनी सोवळे नेसून, तर महिलांनी साडी नेसून गाभाऱ्यात जाण्याची पंरपंरा आहे. त्यासाठी कोणाची परवानगी काढण्याची गरज नाही. मंदिर प्रवेशासाठी परवानगी असताना रॅली काढूनच मंदिरात येणार, असे म्हणत देसाई यांनी वाद वाढवला.

कोल्हापूर शांत शहर असताना येथे लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला बदनाम करण्याचा त्यांचा डाव होता. शहरात कधी हिंदू-मुस्लिम दंगल घडलेली नाही. लोक बंधुभावाने राहतात. परंपरा जपण्यासाठी प्रसंगी जनहित याचिका दाखल करू, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार कोटींचे इफेड्रीनसहसोलापुरात चार आरोपी अटकेतचिंचोळी एमआयडीसीतील ‘एव्हॉन’चे गोदाम सील

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सुमारे दोन हजार कोटींची इफेड्रीन पावडरचा गोदामामध्ये बेकायदा साठा करून ठेवल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने सोलापूर मोहोळ रस्त्यावरील चिंचोळी एमआयडीसीमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड, कंपनीचे गोदाम सील केले. गोदामातून सुमारे १८ हजार ६२७ किलो ६०० ग्रॅम इफेड्रीन व सुडो इफेड्रीन पावडर, हा अंमली पदार्थ जप्त केला.

ठाण्यात कारवाई करून अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक सोलापुरात येऊन थडकले त्यांनी सोलापूर-पुणे रोडवरील मोहोळ नजीकच्या चिंचोळी एमआयडीसीमधील एव्हॉन कारखान्यातून धानेश्वर राजाराम स्वामी (वय २८, रा. उमा नगरी गृहनिर्माण संस्था, सोलापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून ५ किलो ५०० ग्रॅम इफेड्रीन पावडर आढळली. स्वामीने दिलेल्या माहितीच्या आधारे चिंचोळी एमआयडीसीमधील एव्हॉन कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर राजेंद्र जगदंबाप्रसाद डीमरी (वय ४८, रा. सुंदरम नगर अपार्टमेंट निर्मिती विहारी जुळे सोलापूर, विजापूर रोड) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनंतर पुन्हा ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने चिंचोळी एमआयडीसी येथील कंपनी गाठली. तेथे केबीनमध्ये ठेवलेला ७ किलो ६०० ग्रॅम वजनाची इफेड्रीन पावडर सापडली. धानेश्वर स्वामी याच्याकडे अधिक चौकशी केली असता कंपनीच्या पाठीमागील गोदामात ठेवलेली ९ हजार ५०० किलो सुडो इफेड्रीन पावडरही मिळून आली. ती ही पथकाने जप्त केली.

एव्हॉन कंपनीचे रजिस्टर पोलिसांनी तपासले असता त्यामध्ये कुठेही अंमली पदार्थ साठ्या बाबतच्या नोंदी आढळून आल्या नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी कंपनीने नार्कोटिक्स विभाग, अन्न व औषध प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. सोलापुरातील इफेड्रीनचा साठा मुंबईला नेण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई मारहाणप्रकरणी ७ जणांवर गुन्हा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

श्री अंबाबाई दर्शनावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सात जणांपैकी पाच जण हे मंदिरातील पुजारी असून दोन जण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणी प्रकरणाच्या चौकशीसाठी गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून गाभारा व मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारी यांना तपासणीसाठी देण्यात आले होते. पोलिसांनी मंदिर प्रवेशाचे स्वतंत्र व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. हे फुटेज देखील तपासण्यात आल्याचे कळते. त्यानंतर शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. अखेर आज सकाळी पाच पुजारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.

बुधवारी, १३ एप्रिल रोजी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आलेल्या देसाई यांना केस ओढून मारहाण झाली होती. त्यांच्या अंगावर कुंकवातून तिखट फेकले होते. भाविक आणि श्रीपूजकांकडून शिवीगाळही झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतली आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाई मारहाण, ७ जणांवर गुन्हे दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह इतर महिलांना मारहाण आणि धक्काबुक्की करणाऱ्या सात जणांवर शनिवारी जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी यांचा अहवाल अजून आलेला नसून, पोलिसांनी स्वतःहून फार्यादी होऊन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणातील संशयितांची चौकशी होणार आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबहाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून बुधवारी मंदिरात मोठा गोंधळ उडाला होता. देसाई यांना मंदिरात रोखून मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करणाऱ्या सात जणांवर जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. यामध्ये पाच श्रीपुजकांसह इतर दोघांचा समावेश आहे.

गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये केदार मुनीश्वर, श्रीश मुनीश्वर, चैतन्य आष्टेकर, मयूर मुनीश्वर, निखिल शानभाग या पाच श्रीपुजकांचा समावेश आहे. किसन कल्याणकर आणि जयकुमार शिंदे या दोघांनी तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. गाभारा प्रवेशासाठी विरोध करणे, हळदी-कुंकू आणि शाई फेकून मारणे, जीवितास धोका निर्माण करणे, बंदोबस्ताला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून कामात अडथळा निर्माण करणे असे आरोप लवाण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांनी फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश आंबेडकरांच्यानेतृत्वाखाली एकत्र येऊखासदार रामदास आठवले यांची भूमिका

0
0


म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'देशात रिपब्लिकन ऐक्य व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मी तयार आहे. त्यांना हा प्रस्ताव मान्य असल्यास मी दोन पावले मागे जाईन. निवडणुकीसाठी कोणाबरोबर युती करायची या बाबतचा निर्णय ज्या-त्या वेळी होईल. मात्र, या मुद्द्यावरुन पक्षात फूट पडणार नाही याची मी खात्री देतो,' अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गटाचे) नेते खासदार रामदास आठवले यांनी जाहीर केली आहे.

भारतभीम यात्रेचे शनिवारी वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे आगमन झाले. पेठनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जाहीर कार्यक्रम झाला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, राहुल महाडीक व अरुण कांबळे आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, 'रिपब्लिकन ऐक्य व्हावे, ही माझीही प्रामाणिक इच्छा आहे. कोणत्या पक्षासोबत युती करायची आणि एकत्र आलेल्या या पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायचे, याबाबत संभ्रम आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर जर या पक्षाचे नेतृत्व स्वीकारणार असतील तर आम्हाला आनंद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्ही तयार आहोत. निवडणुकीसाठी कोणत्या पक्षासोबत युती करायची ते निवडणुकींपूर्वी सर्वानुमते ठरवू. मात्र, एकत्र आल्यावर ते एकत्रीकरण टिकवण्यासाठी मी प्रयत्न करेन. सर्वांचा निर्णय मला मान्य असेल. सर्व समाजाची इच्छा आहे. आरपीआयच्या नेत्यांनी एकत्र यावे, त्याला माझा सकारात्मक प्रतिसाद असेल आणि आहे व तो कायम राहील. '

राज्यात काम करायला इंस्ट्रेट नाही

जाती-धर्मांतील दरी कमी करण्यासाठी भारतभीम यात्रेचे प्रयोजन आहे. नरेंद्र मोदींचे सरकार आरक्षणाला धक्का लावणार नाही. ज्या दिवशी ते आरक्षणाला धक्का लावतील, त्या दिवशी त्यांचे सरकार असणार नाही. निवडणुकीच्या काळात केंद्रात मंत्रिपद देतो, असे अनेकांनी मला सांगितले पण, अद्याप दिले नाही. मंत्रिपद दिले नाही तरीही पाच वर्षे मी त्यांच्या सोबत राहीन. मला राज्यात काम करायला इंट्रेस्ट नाही. मी देश पातळीवर काम करावे, अशी माझ्या समर्थकांची इच्छा आहे, असेही आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाईंवरसांगली गुन्हा दाखल

0
0


कुपवाड :

फेसबुकवर पोस्ट टाकल्याच्या कारणावरून अपशब्द वापरून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरुद्ध शनिवारी सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मिरज तालुक्यातील बुधगाव येथील कार्यकर्ते अशरफ सलीम वांकर यांनी फिर्याद दिली आहे.

महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनांवरून चर्चेत असलेल्या तृप्ती देसाई यांच्या भूमिकेबाबत सोशल मीडियामधून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. बुधगाव येथील अशरफ वांकर यांनीही देसाईंच्या आंदोलनाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकून आपले मत व्यक्त केले होते. याच कारणावरुन देसाई यांनी शनिवारी सकाळी मोबाइलवरुन संपर्क साधून वांकर यांना अपशब्द वापरले. 'मी महाराष्ट्रभर फिरत आहे, माझे काय बरेवाईट झाले तर सर्वप्रथम तुझे नाव पोलिसांना कळविणार आहे,' असेही त्या म्हणाल्या. या बाबत वांकर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी देसाई यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी ५९ टँकर दाखलपाचवी पाणी एक्स्प्रेस रवाना

0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेहून लातूरला शनिवारी पाचवी पाणी एक्स्प्रेस (जलदूत) रवाना झाली. दहा टँकरची पाचवी फेरी पोचल्याने शनिवारअखेर लातूरकराना २५ लाख लिटर पाणी देण्यात आले. पाइपलाइनसह इतर आवश्यक यंत्रसामुग्री बसविण्याचे काम आज (रविवार) पूर्ण होईल असा अंदाज आहे. दरम्यान, कोटा येथून निघालेले आणखी ५० टँकर मिरजेत दाखल झाले आहेत.

पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या टँकरमध्ये पाणी भरण्याची चाचणी सोमवारी होईल. सर्व अडचणींवर मात करून मंगळवारी पाणी भरलेल्या ५० वाघिणी घेऊन पाणी एक्स्प्रेस (जलदूत) लातूरकडे रवाना होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. ठेकेदार शशांक जाधव व वाघेश जाधव मागील आठ दिवस अहोरात्र नवीन लाइनचे काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत भीषण आगीतकारखाना खाक

0
0


कुपवाड :

मिरज एमआयडीसीतील कारखान्याला आग लागून सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळपर्यंत धुमसत होती. सत्तरपेक्षा अधिक गाड्यांच्या माध्यमातून पाण्याचा मारा करूनही आग विझविण्याचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. या आगीत सरकी पेंड, सरकी बिया, खाद्य तेलाचा आठशे टनांपेक्षा अधिकचा साठा जळून खाक झाला आहे. जयसिंगपूर येथील शशिकांत गुलाबचंद मालू यांचा मिरज एमआयडीसीत समृद्धी पॉली एक्स्ट्रजन प्रायव्हेट लिमिटेड हा मोठा उद्योग आहे. सरकी पेंड आणि सरकी खाद्य तेलाचे उत्पादन केले जाते. स्टॉक मोजणीच्या निमित्ताने चार दिवसांपासून उद्योग बंद होता. शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास शेजारच्या कारखान्याची रखवाली करणाऱ्या व्यक्तीला मालू यांच्या कारखान्यातून धूर येत असल्याचे दिसले. त्यानंतर अग्निशमन दलांची धावपळ सुरू झाली. एमआयडीसी, सांगली महापालिका आणि तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी सात बंबांच्या माध्यमातून सत्तर बंब इतक्या पाण्याचा मारा केला तरी आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीत १०० टन सरकी पेंड, ७५० टन सरकी बिया, १२ टन सरकी तेल, ६० हजार रिकामी पोती जळून खाक झाल्याचे मालू यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images