Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यापीठ कॅम्पसमध्ये गवत जळाले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अज्ञाताने लावलेल्या आगीत शिवाजी विद्यापीठाचा संगीत आणि नाट्य शास्त्र विभाग आणि तलावाच्या सुमारे दोन एकर परिसरातील गवत आणि रोपे जळाली. शुक्रवारी दुपारी झालेल्या या प्रकारामुळे विद्यापीठात मोठी तारांबळ उडाली. विद्यापीठाला सलग चार दिवस सुटी असल्याने परिसरातील वर्दळ कमी आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या संगीत नाट्यशास्त्र विभाग आणि दूरस्थ शिक्षण विभागाच्या परिसरातील गवताला आग लागली. या आगीत सुमारे एक वर्षांपूर्वी लावलेली रोपेही जळून खाक झाली. झालेल्या या प्रकाराची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना मिळाली. सायंकाळी उशीरापर्यंत आगीच्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफांची आज मानवी साखळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात उद्या (२६ मार्च) कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे मानवी साखळीचे आयोजन केले आहे. गुजरी कॉर्नर येथे दुपारी चार वाजता ही मानवी साखळी करण्यात येणार आहे. दरम्यान, सराफ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढवा, असा सल्ला खासदार शेट्टी यांनी दिला.

सराफ व्यवसायाला अबकारी कर लागू करू नये, या मागणीसाठी गेल्या २४ दिवसांपासून सराफ व्यवसायिकांनी आंदोलन छेडले आहे. केंद्रीय संघटनेने आंदोलन मागे घेतले असले, तरी कोल्हापुरातील संघटना आंदोलनावर ठाम आहे. या संदर्भात उद्या गुजरी कॉर्नर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मानवी साखळीत सराफ व्यावसायिक, कर्मचारी वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. तसेच सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकही सहभागी होत आहेत.

'सरकारला जागे करा'

सराफ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात खासदार शेट्टी यांची भेट घेतली. त्यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, 'आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. माझ्या पातळीवर अर्थमंत्र्यांना भेटणे, लोकसभेत चर्चा घडवून आणणे या गोष्टी मी करेनच; पण तुम्ही तुमच्या स्तरावर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवा. या सरकारला जागे करा. ऐन लग्नसराईच्या कालावधीत लोकांची गैरसोय होत आहे. त्यांचाही दबावगट निर्माण करा आणि सरकारला योग्य निर्णय घेणे भाग पाडा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळ सभासदांची पक्की यादी आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २४ एप्रिलला होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांची पक्की यादी शनिवारी (ता.२६) प्रसिद्ध होणार आहे. कोल्हापुरातील मुख्य कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

महामंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला आठ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत कच्च्या मतदार यादीतील हरकती, दोष आणि दुरुस्ती स्वीकारण्याचे काम २२ मार्चपासून सुरू होते. दरम्यान, सोमवार (ता.२८) पासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करसंकलनाचा आलेख चढाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याला अधिकाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विक्रीकर विभागातर्फे सरत्या आर्थिक वर्षासाठी ९०३ कोटी रुपयांच्या करसंकलनाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी फेब्रुवारीअखेर या विभागातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातून ७८४ कोटी रुपये करसंकलनापोटी वसूल करण्यात यश आले आहे. उर्वरित करसंकलनाच्या माध्यमातून उद्दिष्टपूर्तीसाठी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजन केले आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलापैकी जवळपास ५८ टक्के महसूल विक्रीकर विभागाच्या माध्यमातून संकलित केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात विक्रीकर कार्यालयाच्या कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ९०३ कोटी कर संकलनाचे निर्धारित उद्दिष्ट दिले होते.

राज्याकडे दृष्टिक्षेप

विक्रीकर विभागांतर्गत राज्यातून संकलित झालेला कर ७२ हजार १२८ कोटींच्या घरात आहे. यामध्ये मूल्यवर्धित करापोटी फेब्रुवारी २०१६ अखेर ६४ हजार ३७१ कोटी रुपये संकलित झाले आहेत, तर सेंट्रल सेल्स टॅक्सच्या माध्यमातून सव्वा पाच हजार कोटी रुपये विक्रीकर विभागाच्या खात्यात जमा झाले आहेत.

असे आहेत स्रोत

व्हॅल्यू अॅडेड टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, एन्ट्री टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स या चार महत्त्वाच्या माध्यमातून विक्रीकर विभागातील महसुलाचा स्रोत आहे. २००५ पासून मूल्यवर्धित करप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. उद्योग, व्यापारातून होणारी आर्थिक उलाढाल हा विक्रीकर विभागातील करवसुलीचा महत्त्वाचा स्रोत आहे. परराज्यातून वाहन खरेदी करून ते विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यात आणले जाते. त्यावर कर लागू केला जातो आणि त्या वाहनप्रवेश कराच्या माध्यमातून या विभागाच्या तिजोरीत चांगला महसूल मिळतो. दुसरा महत्त्वाचा स्रोत आहे तो हॉटेलिंग, लॉजिंग या व्यवसायांचा. विक्रीकर विभागाकडे जमा होणाऱ्या ऐषोआराम कराची रक्कमही मोठी आहे. हॉटेलमधील निवासव्यवस्था आणि भोजनसेवा यातून होणाऱ्या विक्रीवर आकारला जाणारा कर हा विक्रीकर विभागाच्या करसंकलनातील लक्षणीय महसूल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जवळपास ४४ आहे. त्यासाठी होणारी ऊस खरेदी आणि त्यातून जमा होणारा कर याचाही विक्रीकर विभागातर्फे करण्यात येणाऱ्या संकलनात महत्त्वाचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर विभागातून मद्यविक्रीतून होणारी करसंकलन आकडेवारी ही राज्यात सर्वाधिक आहे.

दृष्टिपथात दहा वर्षांतील करसंकलन

वर्ष रक्कम (कोटीत)

२००५-२००६ ५२५.१४

२००६ -२००७ ६५८.७३

२००७ -२००८ ७०६.२०

२००८-२००९ ८२६.५७

२००९ -२०१० ९७०.५०

२०१० -२०११ ११३०.५३

२०११ -२०१२ १४३७.०१

२०१२ -२०१३ १५८५.९२

२०१३ -२०१४ १७२५.४०

२०१४ -२०१५ १९००.९८

२०१५ - २०१६ फेब्रुवारी अखेर ७२,१२८

एफआरपीचा परिणाम

जिल्ह्यातील सधन शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षांत महागडी वाहने व दुचाकीसह शेतीसाठी उपयुक्त औजारे घेण्याचे प्रमाण वाढले होते. वाहनविक्रीतून मिळणारा कर हा विक्रीकर विभागाचा करसंकलनाचा आलेख उंचावणारा आहे. सध्या ही संख्या जवळपास चार हजार कोटींच्या घरात आहे. मात्र, उसाला मिळणाऱ्या दरावरून साखर कारखानदारांशी सुरू असलेला संघर्ष आणि एफआरपी रकमेचा तिढा, यामुळे शेतकऱ्यांनी वाहनखरेदीचा निर्णय प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. याचा परिणाम वाहनप्रवेश ​किंवा वाहनखरेदीतून होणाऱ्या कर संकलनावर झाला आहे.



जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची संख्या ५० हजार

व्हॅटअंतर्गत ३३,०१४ व्यापाऱ्यांची नोंद

सेल्सटॅक्सअंतर्गत ३५,५३८ व्यापाऱ्यांची नोंद

लक्झरी टॅक्सअंतर्गत १४१ व्यापाऱ्यांची नोंद

ऊस खरेदीअंतर्गत २७ व्यापाऱ्यांची नोंद

'व्यापारी व उद्योजकांना कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक एप्रिलपासून संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत केली जाणार आहे. सॅपच्या धर्तीवर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ही प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे वस्तू विक्री आणि सेवा या क्षेत्रातील करसंकलनामध्ये गती येणार आहे. व्यापारी घरबसल्या करभरणा करू शकतील. या प्रणालीचा विक्रीकर विभागाच्या महसूलवाढीसाठी चांगला उपयोग होणार आहे. व्यापाऱ्यांना खरेदीदाराचे तपशील पाहता येतील. विवरणपत्रके दाखल करण्यात सुलभता येईल. याचा थेट परिणाम विक्रीकर संकलनाचा आलेख वाढण्यावर होणार आहे.'

सी. एम. कांबळे, विक्रीकर आयुक्त, कोल्हापूर क्षेत्र

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेटिंगप्रकरणी स्थायी समिती सभापतीवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रोलिया सामन्यावर बेटिंग घेताना पोलिसांनी अमित बाळासाहेब बुकशेट (वय ३०, रा. जावडेकर कॉम्प्लेक्स, ताराबाई पार्क) व तेजू मोहन महाडिक (३५, रा. मंगळवार) या दोघांना अटक केली. मुख्य बुकी म्हणून स्थायी समिती मुरलीधर जाधव व ताराराणी आघाडीचे ​नगरसेवक ईश्वर परमार यांचा भाऊ संतोष यांच्यासह सातजणांवर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सम्राटनगर येथील अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

किक्रेट सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला. तेथे अमित बुकशेट व तेजू महाडिक यांना ताब्यात घेतले. ऑस्ट्रेलियासाठी एक रूपयास ५० पैसे तर पाकिस्तानसाठी ६० पैसे अशा भावाने बेटिंग घेतले जात होते. पोलिसांनी तेथील लॅपटॉप, मोबाइलसह बेटिंग साहित्य असा ६६ हजाराचा माल जप्त केला.

अटक केलेल्या बुकेशट व महाडिककडे चौकशी केली असता क्रिकेट बेटिंगवरील कटिंग मुरलीधर जाधव, ठाकूर उर्फ प्रकाश बेला, शिवन (रा. हिम्मतबहाद्दूर परिसर), रोहन परांडेकर, चेतन वरूटे, संतोष परमार, नितिन ओसवाल (एनओ) यांच्याकडे देतो, अशी माहिती दिली. मुरलीधर जाधव हे स्थायी समिती सभापती असून यापूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे. संतोष परमार हा नगरसेवक ईश्वर परमार यांचा लहान भाऊ आहे. अटक केलेल्या दोघांकडून जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या बेटिंग अड्ड्यांची माहिती घेतली जात आहे. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित, सहाय्यक फौजदार मस्के, पोलिस कर्मचारी प्रशांत माने, राजू पालखे, संग्राम पाटील, सुभाष वरूटे, प्रकाश पाटील, रूपाली देसाई यांनी कारवाईत भाग घेतला.
पेठेतील सम्राट, बिपिनही रडारवर

जुगारबरोबर क्रिकेट बेटिंगचे चांगलेच पाय रोवले आहेत. कोल्हापुरातील सिंडीकेट थेट मुंबईपर्यंत आहे. येथील बेटिंग घेणारे क्रिकेट सामने पाहण्यासाठी थेट परदेशात जातात. बेटिंगचा धंदा हा मोबाइलवर चालत असल्याने असे अड्डे शोधण्यासाठी पोलिसांना फार प्रयत्न करावे लागतात. पेठेतील 'सम्राट' गुजरीतील 'बिपिन' ही नावे पोलिसांच्या रडारवर आहेत. दोन वर्षांपूर्वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी तिघा मास्टरांना बेटिंग बंद करण्याचे फर्मान काढले होते. काही बुकींना थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात बोलवून खाक्या दाखवला होता. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शहर पोलिस अधीक्षक व्ही. टी. पवार यांनी शुक्रवार पेठेतील एका फ्लॅटवर छापा टाकून बेटिंगवर कारवाई केली होती.

महापालिका वर्तुळात खळबळ

स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यावर बेटिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजताचच महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. जाधव हे बुधवारी, ३१ मार्च रोजी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सभागृहात सादर करणार आहेत. विरोधी पक्ष नेतेपदावर असतानाही जाधव यांच्यावर बेटिंग प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. विरोधी पक्षनेत्यांच्या मोबाइलवर आजही बेटिंगची विचारणा होते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आजही सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहू-पंढरपूर, आळंदी-पंढरपूर पालखी मार्गांचे लवकरच भूमिपूजन

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर, या दोन पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ पुढाली पाच महिन्यांत करून तातडीने पालखी मार्गांच्या कामाला सुरूवात करणार आहोत, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सोलापुरात केली.
सोलापुरातील दोन उड्डाणपूल आणि जिल्ह्यातील विविध महामार्गांसाठी मंजूर झालेल्या सुमारे २७ हजार कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
गडकरी म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. तसेच देहू आणि आळंदीतून येणाऱ्या पालख्यांसोबतही लाखो भाविक पायी चालत विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. दोन्ही पालखी मार्गांचे चौपदरीकरण आणि मार्गांवर वारकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. पाच महिन्यांत या कामाचे भूमीपूजन करून पालखी मार्गांच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर दिंडींच्या मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची, पाण्याची आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाईल. शिवाय राज्य सरकारने पालखी मार्गांवर जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी सर्वसोयींनीयुक्त अशी निवाऱ्याची व्यवस्था करूनही देऊ.
कार्यक्रमाला या प्रसंगी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, विजयसिंह मोहिते-पाटील, संजय पाटील, रवींद्र गायकवाड, रमेश जीगजीणगी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी, महापौर सुशीला आबुटे, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.
गडकरी उवाच...
राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी २२ हजार किलोमीटर झाली आहे.
देशातील ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते २ लाख किलोमीटर करणार.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्गांची लांबी वाढविणार.
अवजड वाहने शहरांमध्ये येऊ नयेत म्हणून गोडाउन शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न.
देशातील १११ नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
जलमार्ग विकसित करून नेटवर्क उभारण्याचे ठरविण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई-अलिबाग रो-रो सेवा सुरू करणार.

शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची तरतूद
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे अस्मानी संकट आले आहे. पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळत नाही. सुमारे ८ हजार कोटींची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आणखी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिंचनाच्या सोयींशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजना आणली आहे. दुष्काळी भागात धरणाच्या जोरावर परिवर्तन करता येणार नाही. धरणाची मर्यादा लक्षात आली आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करायचा असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याच्या साठ्यांचे विकेंद्रीकरण करावे लागणार आहे.'
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना चांगली होती परंतु, ती आता फक्त कागदावरच राहिली आहे. मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णेतील पाणी दिलेच पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्‍यांचे भाषण सुरू असताना गर्दीतील काही लोकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.
सुशीलकुमारांकडून गडकरींचे कौतुक
मागील १५ ते २० वर्षांपासून आपण नितीन गडकरी यांचे काम पाहत आहोत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे तयार करणारा गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्राला कारखानदार मिळाला. महाराष्ट्रासह देशभराने या हायवेचे कौतुक केले आहे. गडकरी पक्षाच्या बाहेर जाऊन राष्ट्राला योगदान देण्याचे काम करतात. गडकरींकडे रस्ते खाते आल्यापासून राज्यातील रस्ते विकासाला चालना मिळाली आहे. सोलापूरमध्ये विकासाची कामे होत असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. पक्षीय भूमिका ही विशाल असली पाहिजे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना अनुभव कमी असला तरी चांगले काम करीत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
गडकरी-शिंदे भेट
नितीन गडकरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या सातरस्ता येथील जनवात्सल्य या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांनी चहापान घेतले. बाहेर आल्यानंतर शिंदे आणि गडकरी या दोघांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहत तुमच्यासाठी कोणतीही मोठी बातमी नाही. संबंधापोटी शिंदे यांच्या घरी आल्याचे गडकरी यांनी सांगितले. मात्र, शिंदे-गडकरी यांच्या भेटीत नेमके काय घडले. कोणत्या विषयावर चर्चा झाली. या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यानजीकच्या अपघातात एक ठार

0
0

सातारा
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
महामार्गावर शुक्रवारी रात्री टेम्पोचे चाक बदलून गाडीत ठेवत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत टेंम्पो मालक चरण सदाशिव पाटील (वय २९ रा. धामणी ता. तासगाव जि. सांगली) यांचा मृत्यू झाला. चालक सुरज अशोक पाटील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रकचालक वैजनाथ गोविंद कदम (रा. बार्शी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्याधिष्टित शिक्षणपद्धतीदेशाची सर्वात मोठी ताकद- ‘कृष्णा’च्या दीक्षान्त सोहळ्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांचे प्रतिपादन

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
'शिक्षणातून मिळणारी पदवी माणसाला सुशिक्षित बनविते. मात्र, सुसंस्कृत बनवेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच चांगला माणसू घडविण्यासाठी संस्काराची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानाबरोबर जेव्हा संस्कार मिळतात, तेव्हाच व्यक्ती परिपूर्ण बनते आणि अशाच व्यक्तीला समाज मान्यता लाभते. ज्ञान आणि संस्कार यांचा एकत्रित आविष्कार घडविणारी मूल्याधिष्टित शिक्षणपद्धती ही आपल्या देशाची सर्वांत मोठी ताकद आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षान्त सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. सुरेश भोसले, कुलगुरु डॉ. ए. व्ही. नाडकर्णी आदी उपस्थित होते. विद्यापीठातील ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
गडकरी म्हणाले, ज्ञान मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण ज्ञानाबरोबर संस्कारही महत्वाचे आहेत. समाजात आज अनेक लोक आहेत, ज्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही, पण त्या व्यक्ती आज अभ्यासाचे विषय बनले आहेत. त्यांच्यावर पीएचडी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम अशा महापुरुषांनी आणि साधूसंतांनी कोणतीही पदवी घेतली नाही. पण त्यांचे विचार व कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. समाजासाठी उपयोगी पडेल असे कार्य करण्याचा प्रयत्न पदवीधारकांनी व शिक्षित लोकांनी करावा. भारतात गरिबी, कुपोषण अशा समस्या आहेत तर परदेशांत लिव्ह इन रिलेशनशिप, कुमारी माता अशा समस्या आहेत. भारतीय संस्कारांमुळेच आपल्या देशाला अशाप्रकारच्या समस्या भेडसावत नाहीत. देशात केवळ विद्वान लोकांना घडवून चालणार नाही, तर चांगले नागरिकही घडवायला हवेत. लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी रूजवायला हवी. तरच देशात चांगली पिढी निर्माण होऊ शकते. पैसा, साधनसंपत्ती व सत्ता हे जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे शिक्षण घेऊन केवळ पैशाच्या मागे धावण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. या वेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
इव्हॉन यॉन्ग पै सेज
तीन पदकांची मानकरी
एमबीबीएस अधिविभागातील कुमारी इव्हॉन यॉन्ग पै सेज या विद्यार्थीनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व. गोविंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक,सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीसाठी दिले जाणारे डॉ. एम. एस. कंटक अॅवार्ड आणि डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार पटकावून सर्वाधिक तीन पदकांची मानकरी ठरली. विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणाऱ्या स्वर्गीय जयवंतराव भोसले सुवर्णपदकाची मानकरी मिखिला किशोर खेडकर ठरली. कोमल धनंजय कुलकर्णी हिने यू. एस. व्ही. सुवर्णपदक व डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार. स्नेहल महादेव सोमावर, मृण्मयी गिरीश लिमये, प्रणव गजानन देवधर, डॉ. मेहूल पोपटलाल ओसवाल, डॉ. तस्नीम विक्रमसिंग बिष्ट व डॉ. राजश्री बाळासाहेब भोसले यांनीही विविध पारिताषिके पटकाविली. विजेत्यांना नितीन गडकरींच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात पाणी उधळपट्टीला कधी बसणार चाप?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोल्हापुरात पाणी कपातीची घोषणा झाल्यानंतरही कोल्हापूरकरांना पाणी वापराचे गांभीर्य आलेले नाही. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोरड्या रंगांची होळी खेळा आणि पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन सुरू असतानाही शहरात अनेक ठिकाणी राजरोस पाणी पंचमी सुरू आहे, त्याचबरोबर गाड्या धुणे, रस्ते धुणे, नळांची गळती सर्रास सुरूच आहे. या प्रवृत्तीला वेळीच लगाम न घातल्यास याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार.

राज्यभरातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत. लातूरमध्ये रेल्वेने पाणी पुरवण्याची योजना आखली जात आहे, तर उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी तर कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये झरे खोदून पाणी शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट नित्याचीच झाली आहे. या स्थितीत उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असतानाही पाणी वापराचे गांभीर्य नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोल्हापूर हा राज्यातील सर्वाधिक पावसाचा जिल्हा असूनही यावेळी केवळ ४८ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणात आज केवळ २.७० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासह नदीकाठच्या गावांची पाण्याची गरज वाढत असताना उपयुक्त पाणीसाठ्यात मात्र कमालीची घट होत असल्याने पाणी बचतीशिवाय कोणताच पर्याय समोर नाही. नेमके याच्या उलट चित्र कोल्हापुरात दिसत आहे. दररोज रस्ते धुणे, गाड्या धुणे, नादुरूस्त चा‍व्यांमधून गळती, महापालिकेच्या पाइपलाइनमधून होणारी गळती. सदोष एअर हॉल यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

कोल्हापूर शहराला दररोज १२० एमएलडी पाण्याची गरज असते. राधानगरी धरणातून पंचगंगेत येणाऱ्या पाण्याचा उपसा केल्यानंतर या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणासाठी दररोज हजारो रुपयांचा खर्च येतो, त्यानंतर हे पाणी नागरिकांच्या घरी पोहोचते. नदीतून उपसा केल्यानंतर पाइप लाइनमधून होणारी गळती, एअर हॉलमधून होणारी गळती तर सुरू असतेच, पण नागरिकांच्या घरी पोहोचलेल्या पाण्याचेही अपेक्षित गाभीर्य नसते. अनेकांच्या नळांना तोट्याच नाहीत. काही लोक दररोज सकाळ-संध्याकाळ अंगणात पाणी मारतात. काही लोक तर अक्षरशः रस्ते धुऊन काढतात. वाहने धुण्याचे प्रकार रोजच पाहायला मिळतात. घराचे व्हरांडे धुण्याची हौसही याच शुद्ध पाण्यातून भागवली जाते. ग्रामीण भागातही फारसे समाधानकारक चित्र नाही. ठिबक सिंचनाकडे अजूनही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आहे. बहुतांश ठिकाणी शेतीला डुबूक पद्धतीने पाणी दिले जाते. पाण्याचा अपव्यय असाच सुरू राहिला तर कोल्हापूरकरांवरही लवकरच पाणीबाणी येणार हे नक्की.



औरंगाबादेत दंडाची कारवाई

पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना आर्थिक दंड करण्याचा निर्णय नुकताच औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. अंगणात पाणी मारणे, वाहने धुणे, बागांना पाणी देणे, नळांना तोटी नसणे हे आता औरंगाबादकांना चांगलेच महागात पडणार आहे. कोल्हापुरातही अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना चाप बसण्याची गरज आहे.



शुद्ध पाण्याचा अपव्यय

पाणी शुद्धीकरणासाठी दररोज हजारो रुपये खर्च केला जातो. १२० एमएलडी शुद्ध पाणी शहरवासियांसाठी पुरवले जाते, मात्र याचा वापर घरातील कपडे धुण्यापासून, अंगण, रस्ते धुणे, बागांना घालणे, वाहने धुणे आदी कारणांसाठी होत असल्याने शुद्ध पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.



शहरातील पाणी वापर

रोजचा उपसा १२० एमएलडी

रोजची गळती ३० एमएलडी

नळ कनेक्शन ९७ हजार ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांनी विकला भाजीपाला

0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

उत्पादन शुल्काला विरोध असणाऱ्या सराफ, सुवर्णकारांनी शनिवारी सांगलीत आठवडा बाजारात भाजी विक्री आणि सुरीला धार लावण्याचे अनोखे आंदोलन केले. आठवडा बाजाराच्या निमित्ताने प्रत्येक शनिवारी भाजीपाला विक्रेत्यांसह अनेकांच्या गर्दीने सराफपेठ गजबजून गेलेली असते. परंतु सराफांच्या बंदमुळे गेल्या पंचवीस दिवसांपासून पेठेत शुकशुकाटच आहे. शनिवारी भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटताच सराफी व्यापाऱ्यांनी त्या दुकानांचा ताबा घेत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

एक व्यावसायिक म्हणून शनिवारच्या बाजारात येवून आठवड्याची भाजी खरेदी करणारे सराफ व्यापारीच भाजी उंचावून दराचा पुकारा करू लागले. कोणी कोबीचा, कोणी शेवग्याच्या शेंगा घेण्यासाठी ग्राहकांना विनंती करीत होते. कांदा-बटाट्याचा दरही मोठ्याने सांगितला जात होता. कोणी चाकू-सुरी, कात्र्यांना धार लावणाऱ्या यंत्राचा ताबा घेऊन धारवाला झाले होते. पाठीमागे एखाद्या प्रसिद्ध सराफ पेढीचा फलक आणि त्याच्यापुढे धारवाला, असे चित्र बघायला मिळत होते. या अनोख्या आंदोलनात मोठ्या संख्येने सराफ व्यापारी सहभागी झाले होते. सांगली जिल्हा सराफ समितीच्या या आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष किशोर पंडीत यांनी केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत माफियाराज !

0
0

कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जनतेने त्यांच्या हातात महापालिका दिली. कारभारी म्हणून ते शहराला विकासाचा चेहरा देत आहेत. पण, अलिकडे वाढलेल्या काही आक्षेपार्ह घटनामुळे महापालिकेत माफियाराज सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावकारी, गुंडगिरी, मटका, बेटिंग, गैरव्यवहार, ढपला, मारामारी अशा अनेक प्रकरणांत नगरसेवकांची नावे येऊ लागली आहेत. हा प्रकार कोल्हापूर शहराला नक्कीच शोभणारा नाही.

....................................

गुरुबाळ माळी

०००००००००

कार्यकर्त्याचा पिंड आणि चेहरा, प्रामाणिकपणे लोकांसाठी धडपड करणाऱ्याला पूर्वी जनता निवडून द्यायची. मग ती निवडणूक कोणतीही असो. महापालिकेपासून ते जिल्हा परिषदपर्यंत आणि पंचायत समितीच काय साध्या बँका आणि कारखान्याच्या निवडणुकीत अशा चेहऱ्यांना जनता नक्की संधी द्यायची. त्यामुळे या संस्थेला एक चेहरा असायचा. संस्थेत कोण कारभार करतो, कोण सत्ताधारी आहे यावरून त्या संस्थेचा चेहरा कळत असतो. त्या संस्थेचे ते केवळ कारभारी अथवा चालक नसतात, तर विश्वस्त आणि ब्रँड अॅम्बेसिडर असतात. पण, अलिकडे अनेक संस्थात ज्या काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे यामुळे संस्थांचे कौतुक कमी आणि बदनामी जास्त होत आहे. मुळातच चांगल्या संस्थांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. शहराच्या दृष्टीने महापालिका ही सर्वांत महत्त्वाची संस्था. शहराच्या विकासाची नाडी या संस्थेच्या अर्थात नगरसेवक आणि प्रशासनाच्या हातात आहे. पण, अलिकडे या संस्थेत ज्या अपप्रवृत्ती घुसल्या आहेत, वाढत आहे. यामुळे जे चांगले चार चेहरे आहेत, त्यांची चर्चा कमी आणि चांडाळ चौकडीची चर्चा जास्त होत आहे.

गेल्या काही दिवसांत कोल्हापूर अधिकच चर्चेत आली आहे. नगरसेवक आणि त्याच्या भावाने कर्मचाऱ्यास केलेली 'मनसे' मारहाण, शिवीगाळ, आजरा जळित हत्याकांड प्रकरणातील आरोपी अमोल पवारला सावकारीच्या माध्यमातून कर्ज देणारे सावकार नगरसेवक, त्याला लुबाडणारे नगरसेवक, बेटिंगबाबत आरोप झाल्याने वादग्रस्त झालेले सभापती, मटका व्यवसायात असणारे नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारात अडकलेले अधिकारी आणि कर्मचारी हा सर्व प्रकार पाहता महापालिकेत नक्की चाललंय तरी काय? अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे. महापालिकेत निवडून येण्यासाठी किमान पन्नास लाख रूपये खर्च करावे लागतात. हा आकडा कमीतकमी आहे. दीड कोटी खर्चून काहीजण निवडून आले आहेत, तर एवढा खर्चू करुनही काहींना या पदापर्यंत पोहचता आले नाही. एवढा पैसा मिळवताना अनेकजण दोन नंबरचा व्यवसाय पसंत करतात. अशांना निवडून देताना जनतेलाही काही वाटत नाही. कारण त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य झालेल्या असतात. मात्र याच पैशाच्या जोरावर सध्या जे काही सुरू आहे ते भयानक आहे. यामध्ये सुक्याबरोबर ओलेही जळत आहे.

निवडून येण्यासाठी जो खर्च येतो तो काहीही करून कमवण्यासाठी काहींची धडपड सुरू होते. यातूनच नको तो मार्ग निवडण्याचे धाडस केले जाते. महापालिका निवडणुकीत अनेक पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली. त्याची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा त्याची निवडून येण्याची क्षमता आहे का हे पाहून तिकीट दिले गेले. यामुळे मटकाचालक, गुंड, बेटिंगवाले निवडून आले. बेटिंगच्या गुन्ह्यात यापूर्वी सापडलेले मुरलीधर जाधव आता सभापती आहेत. एका नगरसेविकेचा पती मटका व्यवसायात आहे. अनेक नगरसेवक सावकार आहेत, मात्र तशी त्यांनी परवाना घेतला नाही. काहींच्या घरात सावकार आहेत. हे सारे अनेकांना निवडून येण्यासाठी उपयुक्त ठरतात. जनता आपल्याला निवडून देते, त्यामुळे आता आपण काहीही करायला मोकळे आहोत या अर्विभावात काहीजण वागत आहेत. यामुळे अनेकांची बदनामी होत आहे.

गुंडांसाठी पदाधिकारी स्वस्त

शहरात गुंड, सावकार, मटकाचालकांच्या ज्या वाढदिवसाच्या जाहिराती झळकतात त्यामध्ये नगरसेवकांचे फोटो सर्रास असतात. या गुंडासाठी हे नगरसेवक, पदाधिकारी एवढे स्वस्त का होतात हेच कळत नाही. यामुळे मात्र अशा गुंडांना विनाकरण बळ येते, प्रतिष्ठा मिळते, त्यांच्या अवैधधंद्यांना अभय मिळते. त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांचे हात थरथरतात. गुंड म्हणून फार कोणत्या नगरसेवकांची प्रतिमा नक्की नाही. पण अनेक नगरसेवकांच्या भोवती जे गुंड वावरत आहेत त्यामुळे नगरसेवकांच्या प्रतिमेला मात्र धक्का बसत आहे. या गुंडांच्या जिवावरच नगरसेवकही मारामारी करण्यात रस दाखवतात. त्यांच्यावर थेट गुन्हे कमी असले तरी अशा घटनांत त्यांचा सहभाग मात्र भरपूर आहे.

कर्मचाऱ्यांना मारहाणीतही नगरसेवकच

शिवाजी पेठेतील दोन-तीन नगरसेवक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात माहीर. आज ते नगरसेवक नसले तरी त्यांच्या घरातच हे पद असल्याने त्यांची दादा​गिरी अजूनही सुरूच आहे. अशा नगरसेवकांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस कर्मचारी संघ कधीच करत नाही. एकाने तर अधिकाऱ्याला खुर्ची फेकून मारली होती. तो तेव्हा नगरसेविकेचा पती होता. त्याचा हा जर रूबाब असेल तर इतरांचे काय? कर्मचाऱ्यांवर दादागिरी करतच बोलणारे नगरसेवक कमी नाहीत. खून, अपहरण अशा प्रकरणातही नगरसेवक अडकले. एका नगरसेवकावर तर राजकारणातून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्याला महासभेत पोलिस बंदोबस्तात यावे लागत होते. आता सावकारी, बेटिंग प्रकरणात त्यांची नावे येत आहेत. यातूनच ठराविक नगरसेवकांच्या 'कर्तृत्वा'मुळे बदनामी मात्र सर्वांचीच होत आहे.

ठराविकच तुपाशी...

बहुसंख्य नगरसेवकांचा भर पैशाच्या कमाईवर राहतो. कारण काही ठराविक नगरसेवक महापालिकेत एवढे कमवतात की सर्वांना वाटते की महापालिका म्हणजे चरण्याचे मोठे कुरण आहे. दोन ​महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांना निनावी पत्रे आली. त्यामध्ये पाच वर्षांत कोणत्या नगरसेवकाने किती पैसे खाल्ले याची आकडेवारीच मांडण्यात आली होती. हे पत्र पाहता यामागे एखादा नगरसेवकच होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, यातून एक स्पष्ट झाले की, सर्व नगरसेवक उपाशी राहतात, ठराविक जणच तुपाशी राहतात. याच नगरसेवकांची चर्चा जास्त होते. त्यामुळे या नगरसेवकांची श्रीमंती नजरेत भरते. गणेशोत्सवाची वर्गणी देण्यासही काही नगरसेवकांकडे पैसे नसतात, त्यांची व्यथा बाहेर येत नाही. यामुळे नगरसेवकांचा एकच चेहरा सतत समोर येत असल्याने बदनामी होते ती सर्व नगरसेवकांची. याच नगरसेवकांमुळे महापालिकेचा नको तो चेहरा पुढे येतो. विशेष म्हणजे असे ठराविक नगरसेवक असतानाही तेच सतत चर्चेत येत असल्याने महापालिका गुंडाच्या दावणीला बांधल्याचे चित्र समोर येते.

अधिकारीही लँडलॉर्ड

नगरसेवकाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रवृत्तीही खाबूगिरीचीच आहे. ते सापडत नाहीत म्हणून त्यांचे हे 'कार्य' अंधारात राहते. अनेक अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय कोणत्याच फाइलवर सही करत नाहीत. मुद्दाम फाइल अडवतात. 'मी नाही त्यातला..,' असा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून तर आज ज्या प्रमाणे अनेक नगरसेवक लँडलॉर्ड आहेत, टीडीआर सम्राट आहेत, त्याप्रमाणे अधिकारीही लँडलॉर्ड आहेत. त्यांच्यामुळेही महापालिकेची बदनामी होत आहे.

सध्या नगरसेवक अथवा नेत्यांना कशाचेच सोयरसुतक राहिले नाही. कुणालाही पदे मिळतात. एकदा मटकावाला महापौर होतेय म्हटल्यावर अनेकांनी विरोध केला. त्याला महापौरच काय साधा नगरसेवक होऊ दिला नाही. एका नगरसेवकाला पदापासून दूर ठेवले. पण, गेल्या दहा वर्षांतील इतिहास तपासला तर किती मटकेवाले पदावर बसले, मटका वसुली करणारेच नव्हे तर दारू दुकानदार, मटका व्यवसायातील भागीदार मोठमोठ्या पदावर विराजमान झाले ते लक्षात येईल. त्यांनी म्हणे शहराला विकासाचा चेहरा दिला. त्यांनी शहराला विकासचा चेहरा दिला की नाही माहित नाही पण त्यांच्या चेहरा बदलण्यात मात्र ते यशस्वी झाले हे नक्की.

शहरात गल्लीबोळात गुंडांचे लोण वाढत आहे. या गुंडांकडे मताचे पॉकेट आहे. त्यामुळे नगरसेवक, नेते त्याच्याशी चांगले संबंध ठेवतात. मग गुंडच व्यासपीठावर रूबाबात मिरवतो. सध्या सावकारीचा आरोप असलेले टोणपे आणि साखरे यांच्या वाढविसाला शहरभर जे फलक लागले होते त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो होते, हे पाहिल्यावर शहराची प्रगती लक्षात येते. राष्ट्रीय नेत्यांच्या अविर्भावात लागणारे गुंडांचे फोटो आ​णि त्यावर आमचे नेते, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक म्हणून झळकणारे नगरसेवक यामुळे महापालिकेत काय चालले आहे? याची झलक पहायला मिळते.

जनतेच्या प्रश्नासाठी जीव तोडून भांडणारे नगरसेवक कमी नाहीत. त्यांचा आवाजही मोठा आहे. पण हे चांगले नगरसेवक अनेकदा अंधारात राहतात. बहुतेकवेळी केवळ राजकारणातून नगरसेवकांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात. सावकारीपासून ते बेटिंगपर्यंच्या प्रकरणात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे काही संबंध नसताना नगरसेवक बदनामीच्या जाळ्यात अडकतात. पण सध्या जे काही घडते आहे ते फारच चिंताजनक आहे, यामुळे महापालिकेचा चेहराच बिघडत चालला आहे.

gurubal.mali@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानिक कारागीर वाऱ्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या उत्पादित मालाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख असली, तरी गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफ व्यावसायिकांच्या बेमुदत बंदमुळे सोन्या-चांदीचा व्यवसाय काळवंडला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सराफ व्यावसायिकांसह कारगिरांना सर्वांत जास्त फटका बसला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नाजूक कलाकुसर करण्यावर हातखंडा असलेल्या या कारागिरांनी 'गड्या आपला गाव बरा' असे म्हणत संपाच्या काळात गावाकडचा रस्ता धरला आहे. यामध्ये बहुतांश बंगाली कारागिरांचा समावेश असून, स्थानिक कारगीर मात्र चांगलेच हवालदिल झाले आहेत.

उत्कृष्ट कलाकसुरीमुळे कोल्हापूरच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना देशातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यामुळे या व्यवसायात सुमारे १५ हजार सराफ व्यावसायिकांचा समावेश आहे, तर केवळ कलाकुसर करणाऱ्या कामगारांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. घाटकाम, मणी, बांगडी, अंगठी अशा प्रत्येक क्षेत्रात कुशल असलेल्या कामगारांना बहुतांश बंगाली कामगारांबरोबर स्थानिक कारागिरांचाही मोठा सहभाग आहे. उत्तरेश्वर पेठ, सानेगुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, आदी भागांतील कुशल कारागीर या व्यवसायात सहभागी आहेत.

बंदबाबत तीन-चार दिवसांत तोडगा निघेल या आशेवर कारगीर होते. मात्र, राष्ट्रीयस्तरावरून बंद अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कारागिरांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली. पंधरा दिवस दररोज बंदची माहिती घेऊन कारागीर सराफ व्यावसायिकांच्या दुकानासमोर फिरत होते. कामच मिळत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ लागला. तसे स्थानिक व बंगाली कारागीर हवालदिल होऊ लागले. कारागिरांची ही अगतिकता ओळखून व्यावसायिकांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला. मात्र, ही नाममात्र उपाययोजना असल्याने कारागिरांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश बंगाली कारागिरांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला, तर स्थानिक कारागीर दररोज गुजरीत येरझाऱ्या घालत आहेत. रोजीरोटी बंद झाल्यामुळे कारागीर बेमुद बंद मागे घेण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

बंदचा सेल्समनना फटका नाही

मोठ्या शोरूमसह छोट्या सराफ व्यावसायिकांनी काउंटरवर सेल्समनची नेमणूक केली आहे. त्यामुळे व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. बंदच्या काळात शोरूमसह छोटी दुकाने बंद असली, तरी येथील सेल्समनना महिन्याचा पगार द्यावा लागणार आहे. त्यामुळे बंदचा फटका सेल्समनना बसला नसल्याचे दिसून येत आहे.

चौकट...

मेहनतानाच बंद

सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर सुबक कलाकुसर करण्यासाठी पाच ते दहा टक्के वेस्टेज दिले जाते. महिन्याला ५० ग्रॅमचे काम झाल्यास त्यांना पाच ग्रॅमच्या स्वरूपात वेस्टेज मिळते. या वेस्टेजमधून त्यांना महिन्याला मेहनताना मिळत असतो; पण या मेहनतान्यामधून घरभाडे व महिन्याचे रेशन चालत असते. मेहनतानाच बंद झाल्याने बंगाली कारागिरांनी गावी जाणे पसंत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा वरदान की...?

0
0

दरवर्षी उन्हाळा जसजसा जवळ येईल तसा पाणी टंचाई नियोजनाबाबत वृत्तपत्र, शासकीय पातळीवर व लोकमानसांत चर्चा, ओरड सुरु होते. ही बाब न चुकता दरवर्षी मार्च महिन्यानंतर घडताना दिसून येते. याबाबत कायस्वरूपी आणि दीर्घ मुदतीच्या ठोस उपाययोजनांची कार्यवाही करण्याची मानसिकता कोणत्याही पातळीवर दिसून येत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. नेहमीप्रमाणे जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. यानंतर ही चर्चा, ओरड थांबते. याची पुन्हा आठवण येते मार्चमध्ये. असे नित्यनेमाने दरवर्षी का घडते व कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? यासाठी प्रशासनाची, लोकप्रतिनिधींची वैचारिक मांडणी, मानसिकता दिसून येत नाही. ही बाब सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडली आहे, असे दिसते व हे असेच चालायचे अशी मानसिकता त्यांची तयार झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गसंपन्न आणि भरपूर पाऊसमान असलेल्या पश्चिम घाटाची सीमा लाभली आहे. त्यामुळे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचे मुबलक जलस्त्रोत हे वरदान आहे. तसेच जवळजवळ सर्वच नद्यांवर मोठे, मध्यम व लघू प्रकल्प बांधून पूर्ण आहे. अपेक्षित शंभर टक्के जलसाठा काही अपवाद वगळल्यास दरवर्षी होतो. पाणीटंचाई, दुष्काळाची झळ सहसा जिल्ह्याच्या वाट्याला येत नाही, अशी आजपर्यंतची परिस्थिती होती. तथापि, या टंचाईच्या झळा आता काही प्रमाणात बसू लागल्याचे चित्र आहे. त्याचे कारण आपण सर्वजण जाणतोच.

साधारण ९० च्या आसपास पंचगंगा नदीचे पाण्याचे स्त्रोत मुख्यत्वे राधानगरी (८.५ अघफू), तुळशी (३.५ अघफू) व काही प्रमाणात कासारी व कुंभी प्रकल्पातून होते. त्याकाळात जलसंधारण विभागाकडून उपलब्ध पाण्याचे शेती व पिण्यासाठी (कोल्हापूर व इचलकरंजी) काटेकोर नियोजन मे महिन्यामध्ये केले जात असे. याचे मुख्य कारण म्हणजे विभागामार्फत काटेकोर व नियो‌जनबद्ध, अंमलबजावणी. यामध्ये प्रत्येक पाळकामध्ये धरणातून पाणी सोडतांना उपसाबंदी, कोल्हापूर पद्ध्धतीचे बंधारे अडविल्यानंतर लाकडी बरग्यांच्यामध्ये ठासून माती भरणे जेणेकरून पाणी गळती रोखणे, लहानमोठी गळती तत्काळ काढणे इत्यादी उपाययोजना केल्या जात असत. या उपाययोजना व सर्वांची पाण्याची निकड आणि महत्त्व यांची मानसिकता यामळे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पाणी पुरविले जाणे शक्य होत होते.

पाण्याचे हे द‌ुर्भिक्ष संपविण्यासाठी व दरवर्षी लागू होणाऱ्या रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामास उपसाबंदीमुळे कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे तत्कालीन पंचगंगा, भोगावती, तुळशी खोऱ्यातील लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांमुळे काळम्मावाडी प्रकल्पातून पंचगंगा खोऱ्याच्या वाट्याचे पाणी पंचगंगा खोऱ्यामध्ये वळविण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक झाले. त्यांच्या याच प्रयत्नामुळे गैबी बोगद्याची संकल्पना पुढे आली व सरकारलाही काळम्मावाडी प्रकल्पात दरवर्षी जसजसा टप्प्याटप्प्याने पाणीसाठा वाढू लागला तसतसे पंचगंगा खोऱ्यासाठी पाण्याची अधिकची उपलब्धता वाट्याप्रमाणे गैबी बोगद्यातून होऊ लागली व पाण्याची ओरड कमी होत गेली आणि संपलीही.

विपुल उपलब्धतेनंतरच पाण्याची अव्यवस्था, नासाडी, शेतीसाठी व पिण्याचे पाण्याचा अनिर्बंध उपसा व त्यात भरीस भर म्हणून जलसंधारण खात्याकडून को. प. बंधाऱ्यांमध्ये पाणी गळती मुक्त, न अडविणे इत्यादी बाबींची सुरूवात झाली नसावी. परंतू पिकांची पाण्याची ओढ कमी झाली या गोंडस सबबीने पाणी अपव्ययाची बोळवण करण्यात आली. तसेच पिण्याचे पाणी अनिर्बंधपणे उपसा केल्यामुळे जनतेला मुबलक पाणी वापरायला मिळत गेले. परिणामी सांडपाण्याचा भस्मासूर पंचगंगा नदी प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरली. हे दूषीत पाणी राजाराम बंधाऱ्यात मिसळत असल्यामुळे व त्यामधून पिण्याचे पाणी उपसा केले जात असल्यामुळे नदी प्रवाहीत ठेवणे किंवा नव्याने पाणी सोडून घेणे इत्यादी पाणी अपव्ययाच्या अनिर्बंध गोष्टी घडू लागल्या. हे प्रकार गैबी बोगद्यातून पंचगंगा खोऱ्यात मुबलक पाणी मिळू लागल्यावर घडू लागले हे प्रकर्षाने दिसून येते.

गेली दोन दशके या अनिर्बंध पाणी वापराची सवय प्रशासन, शेतकरी आणि सामान्य जनतेला यांना इतकी झाली आणि अंगवळणी पडली की यामुळे कुणाचा पायपूस कुणाला राहिला नाही. आता पाणीबाणी जाहीर करून सर्वजण स्वत:चीच शुद्ध फसवणूक करत आहेत.

जलसंधारण खात्याकडून दरवर्षी साधारण १५ आक्टोबरला धरणामध्ये उपलब्ध असलेला साठा गृहीत धरुन रब्बी व उन्हाळी हंगामाचे शेती व पिण्याचे पाण्याचे नियोजन केले जाते. आता हे नियोजन केवह कागदोपत्रीच असते, असे वाटते. कारण नियोजनाप्रमाणे त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. ज्यामध्ये शेतीसाठी अनिर्बंध उपसा, को. प. बंधारे नीट न आडवणे, गळती कमी करणे, ठरलेल्या पाळकाप्रमाणे धरणातून पाणी न सोडणे या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी प्रशासन आणि जनतेने नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी व मानसिकता बाळगणे ही काळाची गरज आहे. कारण आता भविष्यात सीमेवर नाही तर नदी खोऱ्यात मारामारी, खून, जमावबंदी झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

(लेखक जलसंधारण विभागाचे निवृत्त अभियंता आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेटिंगशी संबध नाही, कोणत्याही चौकशीस तयार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने क्रिकेट बेटिंगप्रकरणी अटक केलेल्यांना मी ओळखत नसून बेटिंगमध्ये माझा काडीचाही संबध नाही,' असा खुलासा स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. क्रिकेट बेटिंगसंदर्भात पोलिसांच्या चौकशीस आपण तयार असून, पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करावा. पोलिसांनी 'दूध का दूध, पाणी का पाणी' करावे अशी विनंतीही त्यांनी पोलिस दलाला केली आहे.

जाधव म्हणाले, मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या हेतूने विरोधकांनी हे कृत्य केले आहे. २०१५ च्या निवडणुकीत विरोधकांनी बेटिंग प्रश्नावर खोडसाळपणे निनावी पत्रे पाठवून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला होता. तरीही प्रभागातील सूज्ञ नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून निवडून दिले. मी स्थायी समितीचा सभापती झाल्याने विरोधकांना पोटदुखी झाली आहे. या गुन्ह्याचा आपण कायदेशीर मार्गाचा अभ्यास करणार असून, माझे नाव घेणाऱ्या दोघा संशयितांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मला बदनाम करण्याच्या प्रवृत्तीबद्दल विधानसभेत पक्षाच्यावतीने प्रश्न उपस्थित करणार आहोत.

पोलिसांना तपासासाठी सहकार्य करणार असून माझे मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासण्यास तयार आहे. संशयितांनी माझे नाव घेतल्यानंतर माझ्याकडे पोलिसांनी चौकशी करायला हवी होती. कोल्हापूर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या खाबुगिरीचे पुरावेही गोळा करून जनतेसमोर जाहीर करणार आहे. या विभागातील सर्वांच्या मिळकतीची चौकशी करावी. या विभागाच्या कार्यपध्दतीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेश्माचे लक्ष्य एशियन चॅम्पियनशिपचे

0
0


दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप, एकदा एशियन चॅम्पियनशिप आणि यूथ ऑलिम्पिक या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. अनुभवाने कमी, स्वतःच्या कमकुवत बाजू माहिती नसल्याने पदकाला गवसणी घालणे शक्य झाले नाही. मात्र, यंदा एशियन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी जोरदार तयारी केला असल्याने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवून देईन, असा विश्वास कुस्तीपटू रेश्मा माने हिने व्यक्त केला आहे.

येत्या ३१ मेपासून ५ जूनपर्यंत फिलिपिन्समध्ये एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेच्या तयारी संदर्भात रेश्माशी महाराष्ट्र टाइम्सने संवाद साधला. रेश्मा भरभरून बोलली. तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता. तयारी अशी केली आहे की, स्पर्धेत सहभागी होऊन देशासाठी पदक मिळवणारच, असा विश्वास तिने व्यक्त केला.

ती म्हणाली, 'उत्तर प्रदेशात गोंदा येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये शेवटच्या दहा सेकंदात मला पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या मोनिया हिच्याकडून पराभव स्वीकारताना पंचांनी शेवटच्या दहा सेकंदांत तिला दिलेल्या एका पॉइंटविषयी मला आक्षेप होता. मात्र, पंचांचा निर्णय मान्य करण्यापलिकडे पर्याय नव्हता. आजही मोनियाला मी हरवू शकते. येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय चाचणीत ती सहभागी होणार आहे. एशियन चॅम्पियनशिपसाठीच्या निवडीसाठी मोनियादेखील स्पर्धेत उतरणार आहे. माझ्या वजन गटातील चौघींमधून एकीची स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या चाचणीत मी चांगली कामगिरी केली आणि स्पर्धेत देशासाठी पदक मिळविले, तर गोंदा येथील पराभवाची सल भरून काढल्यासारखे होईल. त्यासाठीच माझा कसून सराव सुरू आहे.'

रेश्मा सध्या हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या न्यू मोतिबागमध्ये सराव करते. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिची तयारी सुरू आहे. उत्सुकता म्हणून रेश्माला, तिचा दिनक्रम कसा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर तिने सकाळी उठल्यापासून रात्रीच्या झोपेर्यंतचे तिचे शेड्युल सांगितले. रेश्माच्या घरात तिचा मोठा भाऊ अतुल आणि लहान भाऊ अमोल यांच्याबरोबर तिच्या काकांची ऋषिकेश आणि नम्रता ही पाचही मुले कुस्तीत आपले करिअर करत आहेत. त्यामुळे रेश्मा आणि तिची सगळी भावंडे पहाटे तीन वाजता उठतात. रेश्माच्या काकी या सगळ्यांना थंडाई आणि नाष्टा तयार करून देतात. हा खुराक सोबत घेऊनच ही पाचही भावंडे पहाटे चार वाजेपर्यंत न्यू मोतिबाग तालीम गाठतात. तेथे सकाळी सात वाजेपर्यंत चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्माचा सराव सुरू असतो. पाच ते सहा किलोमीटर रनिंग आणि पाचशे ते सहाशे जोर आणि इतर व्यायाम प्रकारांसह तिचा सराव सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असतो. सातनंतर थंडाई पिऊन बेलबागेतील शोभा पोवार यांच्याकडे रेश्मा योगासनांचे धडे गिरवते. सव्वा आठपर्यंत तिचा हा क्लास सुरू असतो. त्यानंतर डब्यातून आणलेला नाष्टा करून रेश्मा नऊ ते दहा यावेळेत गौरव मंगल कार्यालयातील जिममध्ये ताकद वाढविण्याचे व्यायाम प्रकार करते. ताकदीच्या बाबतीत असणारी कमतरता भरून काढण्याचा तिचा प्रयत्न आहे.

सकाळी दहानंतर साधारण अकरा वाजेपर्यंत ती वडणगे येथील आपल्या घरी परतते. दुपारी बारापर्यंत जेवण करून त्यानंतर फळे खाऊन चारवाजेपर्यंत झोप घेतली जाते. चारनंतर पुन्हा रेश्माचे पाय न्यू मोतीबागमध्ये सरावसाठी वळतात. पाच ते सात संजय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुन्हा कुस्तीतील डावपेच आणि इतर सराव सुरू असतो. या सरावानंतर घामामुळे निघून गेलेली शरीराची ऊर्जा भरून काढण्यासाठी उसाचा रस किंवा मोसंबीचा रस घेतला जातो. त्यानंतर आठ वाजेपर्यंत घरी पोहोचल्यानंतर जेवण करून रात्री नऊपर्यंत रेश्मा आणि तिची भावंडे झोपी जातात.

बदाम, खसखस, बडिशेप, वेलदोडे, दूध आणि साखर यांचे मिश्रण करून केलेली थंडाई हा पैलवानांचा मुख्य खुराक. यात रेश्मा तालमीतील व्यायाम झाल्यानंतर आणि संध्याकाळी आठवाजेपर्यंत घरी आल्यानंतर थंडाई घेते. सकाळच्या तुलनेत संख्याकाळी थोडी कमी थंडाई, असे रेश्माच्या आहाराचे गणित आहे. आहारात आठवड्यातून तीनवेळा मांसाहार असतो. यात अंडी, मटण, चिकन आणि मासे यांचे वैविध्य ठेवले जाते. झोपेचे गणित मात्र काटेकोरपणे पाळले जात असल्याचे रेश्माने सांगितले. रात्री घरात नऊ वाजता सगळ्या लाइट बंद होतात. तेव्हाच पहाटे तीन वाजता उठणे होते, असे रेश्माने सांगितले. त्याचबरोबर तालमीत, जीममध्ये आणि योगासनांमध्ये शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असल्याचेही तिने सांगितले.

या सरावानंतर तिच्यापुढे असलेल्या आव्हानांविषयी विचारले असता, रेश्मा म्हणाली, 'सध्या राज्यातील स्पर्धांमध्ये माझ्यासमोर कुणाचे आव्हान नाही. सरावाची पातळी इतकी उंचावल्यामुळेच राज्यातील स्पर्धा सोप्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या महापौर केसरी स्पर्धेतही फारसे आव्हान नव्हते. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार तयारी करावी लागत आहे आणि ती मी करत आहे.' राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये उतरताना एक मानसिक खंबीरपणा अतिशय गरजेचा असतो. त्याचीही तयारी झाली आहे. त्यामुळे आता पुढील स्पर्धांसाठी संपूर्ण तयारीने मैदानात उतर आहे. त्याचबरोबर विदेशी पैलवानांचा सराव, त्यांची तयारी, त्याच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू पाहून तयारी सुरू असल्याने कोठेही कसर राहणार नसल्याचे रेश्माने सांगितले. मुळात एखाद्या खेळाडूचा सराव म्हणजे त्याची तपश्चर्या असते. पहाटे तीन वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत रोज अठरा तास रेश्मा करत असलेल्या तपश्चर्येला यश मिळावे आणि तिने कोल्हापूरचे नाव आणखी मोठे करावे, अशीच तमाम कुस्तीप्रेमींची भावना आहे.

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी चित्रपट महामंडळाचे ३ हजार ९०४ मतदार ठरवणार ‘संचालक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र सभासदांची पक्की यादी शनिवारी कोल्हापुरातील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली. २४ एप्रिल २०१६ रोजी होत असलेल्या मतदानासाठी या यादीनुसार, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रातील ३ हजार ९०४ सभासद पात्र ठरले आहेत.

सन २०१६ ते २०२१ या कार्यकालासाठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी २४ एप्रिलला मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. आठ मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. कच्च्या मतदार यादीवरील हरकती, दोष व दुरुस्ती स्वीकारण्याचे काम २२ मार्चला पूर्ण झाले. त्यामुळे पक्क्या मतदारयादीत किती सभासद पात्र ठरतील याबाबत महामंडळाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ यांच्यात उत्सुकता होती.

नियमित वर्गणी भरणाऱ्या आणि महामंडळाच्या सभासद निकषपूर्तीत योग्य ठरणाऱ्या सभासदांना निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार मिळणार होता. त्यानुसार यादीतील पक्क्या सभासदांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सोमवारपासून अर्जविक्री

सोमवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू होत असून महामंडळाच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयासह पुणे व मुंबई येथील शाखा कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत अर्ज उपलब्ध असतील अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष ​मिलिंद अष्टेकर यांनी दिली.

मुंबईतील सभासदांचे प्राबल्य शक्य

कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या तीन केंद्रांतील सभासदांची एकत्रित संख्या जरी तीन हजार ९०४ असली तरी त्यापैकी सर्वाधिक सभासद मुंबई केंद्रातील आहेत. मुंबई केंद्राच्या सभासदांची संख्या २१५६ आहे, तर कोल्हापूर केंद्रातील पात्र सभासदांची संख्या ९५७ असून, पुणे केंद्रात ७९१ सभासद पात्र ठरले आहेत. निवडणुकीत मुंबईचे पारडे जड राहण्यासाठी सभासदांच्या संख्येमुळे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृताचा विमा उतरवून ३० लाख लाटण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मृत व्यक्तीच्या नावे विमा उतरवून ३० लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित विजय पाखरे (रा. परखंदळे, ता. पन्हाळा) व हमिदाबी युनुस इनामदार (रा. समतानगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक विकास गंगाधर पाटणकर (वय ४५, रा. नागाळा पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या ताराराणी चौक शाखेत संशयित विजय पाखरे याने २४ जुलै २०१४ रोजी एका तरुणाचा ३० लाख रुपयांचा विमा उतरवायचा असल्याचे सांगितले. पाखरे हा हमिदाबी इनामदार व एका तरुणाला घेऊन आला. तो तरुण दावल इनामदार असल्याचे त्याने बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितले. विम्यासाठी त्याने ५६०० रुपयांचा हप्ता भरला. तसेच हमिदाबी इनामदारकडून २०१४ व २०१५ चे आयटी रिटर्नसही भरून घेतले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दावल इनामदारची चौकशी सुरू केली असता त्याचा १९ जून २०१३ रोजीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. दावलच्या मृत्यूनंतर एक वर्षाने बोगस तरुण उभा करून विमा काढल्याचे निष्पण्ण झाल्यावर पाखरे, हमिदाबी व अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात वादळी पाऊस

0
0



सोलापूर

सोलापूर शहर आणि परिसरात रविवारी रात्री दहा वाजता वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

सुरू झाला आहे. सोलापूर शहरासह, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या काही भागात

आणि अकलूजमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. जोरदार

वाऱ्यांमुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे वीजपुरवठा

खंडित झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरजवळ अपघात ६ ठार; २० जण जखमी

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

विजयपुरा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील होर्ती तांडा येथे रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण

अपघात झाला. भरधाव मालट्रकची ट्रॅक्टरच्या ट्रॉली धडक बसल्याने झालेल्या या अपघातात सहा जण जागीच

ठार झाले, तर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांची नावे अशी, मेरून बेग (रा. बीड) मुमताज बेग (रा. बीड) विमल डभळ (रा. परभणी) विराज दभळ (रा.

परभणी) आरोही ढाले (रा. बीड) मकसुम बेग (रा. बीड ) हे सहा जण जागीच ठार झाले, तर वीस जण गंभीर

जखमी झाले आहेत. जखमींची नाव समजू शकली नाहीत.

या बाबत अधिक माहिती अशी, जमखंडी येथील नंदी शुगर कारखाना येथून शनिवारी सकाळी ट्रॅक्टरच्या

ट्रॉलीमधून २५-३० ऊसतोडणी कामगार सोलापूरकडे निघाले होते. या वेळी एका कारला साइड देताना मालट्रकच्या

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने मालट्रकची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक बसली. भीषण धडकेने ट्रॉली

उलटली. ट्रॉलीत झोपलेल्या कामगारांपैकी सहा जण जागीच ठार झाले. मालट्रक चालकाचाही मृत्यू झाला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी विजयपुरा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तर जखमींना सोलापूर

आणि विजयपुरा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार धनंजय महाडीक भीमा कारखान्यांचे चेअरमन

0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

भीमा सहकारी साखर कारखान्यावर एकतर्फी मोठा विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे

कोल्हापूरचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार धनंजय महाडीक यांची सोमवारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आणि सतीश

जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पंढरपूर आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोल्हापूर

जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रचाराने गाजली होती. महाडीकांच्या विरोधात निवडणूक लढविणारे परिचारक-राजन पाटील

यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, महाडीक गटाने सर्व

जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. प्रांताधिकारी संजय तेली यांचे अध्यक्षतेखाली नवनियुक्त संचालकांची बैठक

घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्ष पदासाठी धनंजय महाडीक आणि उपाध्यक्ष पदासाठी सतीश जगताप यांनी

उमेदवारी सादर केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडी घोषित करताच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

या वेळी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आला. आपण निवडणुकीत

ज्या घोषणा केल्यात त्याची पूर्तता या कालावधीत करू, अशी ग्वाही धनंजय महाडीक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images