Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अमोलकडून दोघा नगरसेवकांना मलिदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमाच्या ३५ कोटींसाठी कामगाराचा खून करणाऱ्या अमोल जयवंत पोवार व त्यांचा भाऊ विनायक यांच्या आर्थिक व्यवहाराचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अमोलकडे पैशासाठी तगादा लावलेल्या दोन नगरसेवकांसह आठ ते दहा खासगी सावकारांकडे चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, अमोलकडून मलिदा मिळवलेल्या दोन नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

रमेश नाईक या सेंट्रिंग कामगाराचा खून करून त्याचा मृतदेह पेटवून दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या दोघा भावांना अटक केली आहे. साने गुरूजी परिसरात अमोलचे दोन गृहप्रकल्प सुरू होणार होते. एका प्रकल्पात ओढा असल्याने तो वळवण्यासाठी एका नगरसेवकाने ३५ लाखाची मागणी केली होती. त्याने अमोलला व्याजाने पैसेही दिले होते. दुसऱ्या नगरसेवकाने त्याच्या प्रकल्पांबाबत तक्रारी करून त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. या दोन्ही नगरसेवकांचे पैसे अमोलने चुकते केले होते. हे पैसे चुकते करण्यासाठी त्याने खासगी सावकारांकडून १५ दिवसांला दहा टक्के दराने व मासिक २० टक्के दराने लाखो रूपये व्याजाने घेतले होते. वार्षिक २४० टक्के व्याजाने पैसे घेतले असल्याने अमोलचा स्वतःच्याच मृत्युचा बनाव करून ३५ कोटी विमा मिळवण्याचा इरादा होता.

त्यातच खासगी सावकारांचा तगादा वाढला होता. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रंकाळा टॉवर येथील खासगी सावकार त्याच्यामागे लागले होते. दोन नगरसेवकांना दिलेले पैसे, बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची टक्केवारी या प्रकाराने अमोल त्रस्त झाला होता. अमोलचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमोडल्याने त्याने नाईकचा खून करून स्वतःच्या मृत्युचा बनाव रचला. अमोल व विनायकने खुनाची कबुली दिली असली तरी पुरावा गोळा करण्यासाठी बँका, पतसंस्था, खासगी सावकारांची किती देणी होती? याचा तपास पोलिस करणार आहेत. बँकांची पासबुके, कर्जाची कागदपत्रे, जमिनीचे व्यवहार व रोख रकमा कुणाला दिल्या याचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

दोघांना नऊ दिवस पोलिस कोठडी

आजरा ः दरम्यान या दोघा भावांना शुक्रवारी आजरा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. महादार यांच्यासमोर हजर केले असता त्यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांना कोल्हापूरहून दुपारी दोनच्या सुमारास आजरा पोलिस ठाण्यात व नंतर तीनच्या सुमारास येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अर्चना पाटील यांनी तर आरोपींच्या वतीने धनंजय देसाई यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच हजार विद्यार्थ्यांचा निकाल लटकला

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

शिवाजी विद्यापीठाच्या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या २६०० विद्यार्थ्यांचा जीव अद्यापही टांगणीला आहे. या विद्यार्थ्यांच्या निकालाचा खेळखंडोबा दोन महिने सुरू आहे. महिनाभर अगोदर परीक्षा होत असल्याने अनेक सीनिअर कॉलेजमध्ये अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे टेन्शन आणखी वाढले आहे.

दुष्काळग्रस्त स्थितीमुळे विद्यापीठाने महिनाआधी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ मार्चपासून परीक्षांची सुरुवात होत आहे. काही प्राध्यापकांच्या रजा, कोणतेही जादा तास नसल्याने अनेक अभ्यासक्रमाचे अध्यापन अपूर्ण आहे. या साऱ्या घोळात परीक्षा विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या रिसीटमध्ये तांत्रिक चुका आहेत. काहींचे परीक्षा क्रमांक चुकीचे आहेत. रिपीटर विद्यार्थ्यांच्या निकालातही घोळ असल्याने पुढील सेमिस्टरचा प्रश्न निर्माण झाला आहे. फोटोकॉपीही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी केल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

सिव्हील इंजिनीअरिंगच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या निकालाचा घोळही अद्याप सुरू आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील २३०० विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला. त्यातही अनेक तांत्रिक चुका राहिल्या. काहींना १०० पैकी १२० गुण देण्यात आले. परीक्षा देऊनही काहींच्या मार्कलिस्टवर गैरहजर शेरा दिला आहे. या परीक्षेत २६ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील दिल्याने अनेक विद्यार्थी हवालदिल झाले. संबंधित गुण देण्याबाबत अद्याप परीक्षा विभागाने निर्णय घेतला नाही. या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावरुन गायब झाला आहे.

००००००

पेपर सेटर समितीसमोर

बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या पेपर सेटरला परीक्षा प्रमाद समितीसमोर अहवाल द्यावा लागणार आहे. त्यासाठी इंजिनीअरिंगच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यानंतर २६ गुणांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

०००००००००००

या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेतील पाच क्रमांकाचा प्रश्न सोडविला असेल त्या पद्धतीने गुण दिले जाणार आहेत. त्याचा निकाल तातडीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालातील सर्व दोष मार्गी लावले आहेत.

महेश काकडे, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमिया रूग्णांची लढाई रोजचीच

$
0
0

janhavi.sarate

@timesgroup.com

कोल्हापूर ः थॅलेसेमिया रुग्णांची लढाई रोजचीच आहे. त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार महागडे आहेत.

भारतात दरवर्षी दहा हजार रुग्ण आढळतात. कोल्हापुरातही असे रूग्ण आहेत. त्यांना दर महिन्याला रक्त चढवावे लागते. थॅलेसेमियाबाबत सीपीआरमध्ये आवश्यक हिमॅटोलॉजी लॅब आणि हाडाचे मगज प्रत्यारोपणाची सुविधा नाही. या रोगावरील औषधेही उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना आयुष्याशी झुंज द्यावी लागत आहे.

थॅलेसेमियामध्ये रक्तातील लाल पेशी कमकुवत होणे किंवा नष्ट होणे असे प्रकार होतात. गुणसूत्रांमधील दोषामुळे (जेनेटिक डिसऑर्डर) हा आजार होतो. काही गुणसूत्रे नसल्यामुळे किंवा खराब झाल्याने शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल पेशींमधील प्रोटीन असते. त्यामुळे या पेशंटमध्ये रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण आणि लाल पेशींचे प्रमाण कमी असते. परिणामी अॅनिमिया, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने हाडे ठिसूळ होणे किंवा हृयाचे आजार संभवतात.

सीपीआरमध्ये थॅलेसेमियाचे सध्या ३५ पेशंट उपचार घेत आहेत. ‌याशिवाय खासगी रुग्णालयात उपचार घेणारे पेशंटही अधिक आहेत. या आजारावर कायमस्वरूपी उपचार म्हणून बोन मॅरो प्रत्यारोपण हा एक इलाज आहे. मात्र ही शस्त्रक्रिया खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ती परवडत नाही. सध्या ही सुविधा वेल्लोर, मुंबई आणि पुणे या ठिकाणीच आहे. या शस्त्रक्रियेसाठी ८ ते १० लाख रुपये खर्च येतो. शिवाय या आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी हिमॅटोलॉजी लॅबची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलध्ये हजारो रुपये मोजून ही तपासणी करावी लागते.

थॅलेसेमिया पेशंटला दर महिन्याला नवे रक्त द्यावे लागते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. ते नियंत्रित करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या आजारावर कायमचा पर्याय म्हणून बोन मॅरोचे रोपण केले जाते. त्यासाठी तंतोतंत जुळणारा बोन मॅरो मिळणे अवघड आहे.

‌थॅलेसेमिया टाळण्यासाठी

हा अनुवंशिक आजार असल्यामुळे तो पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याची अधिक शक्यता असते. पती व पत्नी दोघांनाही थॅलेसेमिया मेजर असल्यास २५ टक्के अपत्यांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्न जुळण्यापूर्वी वधू-वराने थॅलेसेमिक नसल्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

===

थॅलेसेमिया रुग्णांना सीपीआरमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळते. मात्र सुसज्ज हिमॅटोलॉजी लॅब तसेच या रुग्णांमध्ये वाढत जाणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे शरीरातील इतर अवयवांवर त्याचा परिणाम होत असल्यामुळे त्यासाठी काही औषधे असून ती महाग आहे. अशा रुग्णांना ती औषधे सरकारने मोफत देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

डॉ. संगिता कुंभोजकर, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचे मागील पानावरून पुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवाढीला झालेला विरोध आणि घटलेले उत्पन्न यामुळे आर्थिकदृष्ट्या ​अरिष्टात असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांसाठी कोणताही नवीन प्रकल्प नाही. प्रशासनाने सरकारी अनुदानावर अवलंबून स्थानिक संस्था कर, घरफाळा विभाग आणि नगररचना विभागाच्या महसुलीचे अवास्तव लक्ष्य ठेवले आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच इ-प्रशासनावर भिस्त ठेवली आहे. घरफाळा फेरसर्वेक्षण, स्पॉट बिलिंग, वॉटर ऑडीट, पार्किंग आणि होर्डिंग्ज पॉलिसीची अंमलबजावणीतून उत्पन्नात वाढ साधण्याबरोबरच खर्चात काटकसर हे आगामी वर्षाचे महापालिकेच्या कामकाजाचे सूत्र राहील. प्रशासनाकडून शुक्रवारी स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात ही बाब स्पष्ट झाली. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे अंदाजपत्रक आहे. पर्यावरणीय कामासाठी जवळपास ११७ कोटी रुपयांची तरतूद आहे.

महासभेने उत्पन्नवाढीचे प्रस्ताव नामंजूर केल्याने भविष्यात विविध प्रकल्पांसाठी उभारायच्या निधीत अडचणी निर्माण होऊ शकतात हे निदर्शनास आणले आहे. उत्पन्नाअभावी नवीन प्रकल्प, योजना कार्यान्वित करण्याऐवजी सध्याच्या थेट पाइपलाइन योजना, सेफ सिटी, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, मंदिर विकास आराखडा या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवरच प्रशासनाचा भर आहे. आगामी वर्षात आस्थापनेवरील खर्च १८० कोटी ५६ लाख रुपये अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या खर्चात यावर्षी सात कोटींनी वाढ झाली आहे.

ठळक बाबी....

सेफ सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी (सरकारी अनुदानातून)

​संपूर्ण शहरभर एलइडी प्रकल्प

महापालिका कार्यालय उद्यानात सौरउर्जेचा वापर

एप्रिलपासून स्पॉट बिलिंग

पाण्याचे ऑडीट करून वितरणातील त्रुटी शोधणार

तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मोबाइल अॅपची सुविधा

इ हॉस्पिटल प्रणाली, खासगीकरणातून उद्यानांचा विकास

​पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती अंतर्गत शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया

दर सुधारण्याचे प्रस्ताव नामंजूर केल्याने उत्पन्नावर मर्यादा आहेत. यामुळे खर्चात काटकसर आणि उत्पन्नवाढीवर भर राहील. शहरातील मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. खासगीकरणातून उद्यान विकास, रस्त्यावरील इलेक्ट्रीकल पोलवर जाहीरातीच्या माध्यमातून उत्पन्न, संपूर्ण शहरभर एलइडी दिव्यांचा प्रकल्प राबवून आठ कोटींची बचत होणार आहे.

-आयुक्त पी. शिवशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचे पाणी तोडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने पाण्याची बारा कोटीची थकबाकी न भरल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आहे. आठ दिवसांपूर्वी थकबाकी भरण्याची नोटीस देऊनही महापालिकेने काहीच कार्यवाही न केल्याने पाटबंधारे खात्याने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पाण्याचा दर जादा लावला असून तो अमान्य असल्याने थकबाकी वाढल्याचे महापालिकेने कळवले आहे.

कोल्हापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका रोज १२० एमएलडी पाणी उचलते. भोगावती व पंचगंगा नदीतून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथे हे पाणी उचलले जाते. त्यासाठी महापालिका पाटबंधारे खात्याला दरवर्षी साधारणता साडेतीन ते चार कोटी रूपये बिल देते. यावर्षीच्या बजेटमध्ये महापालिकेने पाणीपट्टीसाठी साडेतीन कोटीची तरतूद केली आहे. ऑक्टोबर २०१५ अखेर १२ कोटी ९४ लाखाची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ऑक्टोबर २०१५ मध्ये एक कोटीचा धनादेश जमा केला. पण अजूनही ११ कोटी ९४ लाखाची थकबाकी आहे. ही थकबाकी ११ मार्चपर्यंत न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याची नोटीस पाटबंधारेने महापालिकेस दिली होती. ४ मार्चला ही नोटीस देवूही आठ दिवसानंतरही काहीच थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पाणी उचलण्यासाठी महापालिकेने शिंगणापूर बंधारा बांधला. महापालिकेचा बंधारा असल्याने पाण्याचा दर कमी असल्याचे महापालिकेचे मत आहे. पण पाटबंधारे खात्याला ते मान्य नाही. जादा दर लावल्याने थकबाकी मोठी दिसत आहे. आठ दहा वर्षांपासून दराबाबत वाद सुरू आहे. पण त्याबाबत निर्णयच होत नसल्याने थकबाकी वाढत आहे.

=======

दरवर्षी काही रक्कम थकीत राहत असल्याने आणि दरात तफावत असल्याने थकबाकीचा आकडा मोठा वाटत आहे. प्रत्यक्षात ही थकबाकी कमी आहे. दहा दिवसात सर्व थकबाकी भरणे अशक्य आहे. तरी​ही महापालिकेने तातडीने एक कोटी​ भरले असून बजेटमध्ये साडेतीन कोटीची तरतूद केली आहे.

मनीष पवार, जलअभियंता

=========

आज कमी दाबाने पाणी पुरवठा

शिंगणापूर बंधाऱ्यातील पातळीत घट झाली आहे. यामुळे येथून होणारा उपसा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात अपुरा व कमी दाबाने पुरवठा करण्यात येणार आहे. पाटबंधारे खात्याने धरणाचे पाणी सोडले असून ते रविवारी दुपारपर्यंत येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकसोबत चला नव्या प्रवासाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाइकच्या साथीने नोकरी, व्यवसाय आणि घर यामधील जबाबदाऱ्यांची लढाई नेटाने लढत स्वत:ला घडवणाऱ्या महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने 'एक राइड स्वत:साठी' हा मंत्र जपणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित वुमेन बाइक रॅलीत सहभागी होण्याची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी (ता.१३) सकाळी महिला एका नव्या प्रवासाला निघतील आणि हा प्रवास असेल त्यांच्या स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा. संजय घोडावत ग्रुपच्या फ्रूस्टार प्रायोजक आणि भारत पेट्रोलियमच्या स्पीड पेट्रोलतर्फे या रॅलीसाठी सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे. शाहू मॅरेथॉनतर्फे रॅलीचे स्वागत होणार आहे.

रॅलीला सकाळी आठ वाजता गांधी मैदान येथून प्रारंभ होणार आहे. राजाराम कॉलेजच्या मैदानावर रॅलीची सांगता होणार आहे.

रॅलीतील प्रमुख उपस्थित

महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला मधुरिमाराजे छत्रपती, माजी खासदार निवेदिता माने, प्रतिमा पाटील, उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, स्वाती देशमुख, माजी महापौर

सई खराडे, शर्मिला मोहिते, राजलक्ष्मी नरके, उद्योजिका अश्विनी चव्हाण, आयटी असोसिएशनच्या अध्यक्षा अश्विनी दानिगोंड, सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, पुष्पलता मंडले, मेजर गौरी चव्हाण.

बाइक बंद पडल्यास मोफत सेवा

रॅलीच्या मार्गात कुणाची बाइक बंद पडली किंवा काहीही अडचण आल्यास मोफत दुरूस्ती सेवा पुरवण्यात येणार आहे. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट टू व्हिलर मेकॅनिक अँड रिपेअर हाउस ओनर्स असोसिएशनतर्फे ही सुविधा मिळणार आहे. या असोसिएशनतर्फे २० मेकॅनिक प्रतिनिधींची टीम संपूर्ण रॅलीच्या मार्गावर उपलब्ध असणार आहेत. यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय अस्वले, नाना गवळी, माधव सावंत, रवी कोंडेकरी, बबन सावंत, सुभाष बुचडे, अमर भोसले, संजय पाटणकर यांनी नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनभावनांचा कडेलोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुमारे तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात नसल्याने जनभावनांचा शनिवारी कडेलोट झाला. सतंप्त जमावाने जकात नाका, इतिहासकालीन पाण्याच्या हौदासह अडथळा ठरणारी झाडे जमीनदोस्त केली. यासाठी केलेल्या रास्ता रोकामुळे तणावात भर पडून महापालिका अधिकाऱ्यांचा निषेधही करण्यात आला. पुरातत्त्व खात्याच्या जटील अटींमध्ये अडकलेल्या पुलासाठी आंदोलन केले. मात्र, या खात्याचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने त्यांचाही निषेध करण्यात आला. यावेळी झालेल्या घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाला होता. मुद्दे मांडण्यावर काहीवेळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्येही तू...तू... मै... मै... वारंवार होत होते.

पर्यायी पुलाचा बांधकामामध्ये केंद्रीय पुरातत्त्व खाते आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. उत्खननासाठी परवानगी न मिळाल्याने गेल्या दीड वर्षापासून काम अर्धवट आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झाडे तोडण्यावरून कृती समितीची दिशाभूल केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनीच स्वतः झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने जकात नाक्याचा अडथळा दूर केला. मात्र, पाण्याचा हौद काढण्यास नकार दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन तीव्र केले. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कार्यकर्त्यांनी विरोध करत जेसीबी अडवून ठेवला. यावेळी अधिकारी व कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी दिली नसल्याचे बांधकाम विभागाच्यावतीने सांगण्यात आले, तर स्वतः आयुक्तांनी झाडे तोडण्यास बांधकाम विभागाला पत्र दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. शेवटी झाडे तोडण्यास परवानगी द्यावी, असे पत्र सोमवारी देण्याचे निश्चित झाले. पत्र मिळताच वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक घेऊन झाडे तोडण्यास परवानगी देण्याचे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले. यावेळी आंदोलनावर पडदा पडला असे वाटत असतानाच कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच झाडे तोडण्यास सुरुवात केली.

सर्व अडथळे दूर केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठकही घेण्याचे निश्चित केले आहे. पुलाच्या पुढील टप्प्याच्या कामासाठी आता पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनात कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, लाला गायकवाड यांच्यासह उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक राजू लाटकर, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, दीपा पाटील, वैशाली महाडिक, दिलीप देसाई, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, माजी नगरसेवक प्रकाश गंवडी, बाबा इंदूलकर, अजित सासने, विजय घाडगे, श्रीकांत भोसले, सतीशचंद्र कांबळे, नामदेवराव गावडे, महादेव पाटील, सुरेश जरग आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राजर्षी शाहूंच्या आठवणींना उजाळा

पुलाला अडथळा ठरणारा जकातनाका काढताना नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र, त्यानंतर इतिहासकालीन हौद पाडण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. राजर्षी शाहू महाराजांनी शहरात ठिकठिकाणी हौद बांधून पाण्याची सोय केल्याच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत तीन कोटीची रोकड जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

मिरज रोडवरील बेथेलहेमनगरमधील एका घरातून सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन कोटी सात लाख त्रेसष्ट हजाराची रोकड जप्त केली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मैनुद्दीन उर्फ राजा अबुबकल मुल्ला (वय ४०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो सांगलीतील सुयोग मोटर्समध्ये क्रेनवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करतो. मुल्ला मूळचा जाखले (ता. पन्हाळा) येथील रहिवाशी आहे. तो सध्या पत्नी निलोफरसह बेथेलहेमनगरमध्ये रेखा मधुकर भोरे या नातेवाईकाकडे रहात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मिरज रोडवरील भोकरे इन्स्टिट्युटच्या मागे बेथेलहेमनगर आहे. येथील एका साध्या घरात तब्बल तीन कोटी सात लाखांपेक्षा अधिक रक्कम सापडल्याने त्या भागातील लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. पोलिस उपअधीक्षक रावसाहेब देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या निरिक्षक सुवर्णा पत्की यांच्या पथकांनी स्टेट बँकेतून नोटा मोजण्याची आणि नोटांची खराखोटेपणा तपासणारी यंत्रं आणून नोटांची मोजदाद केली. यासाठी बँकेतील कर्मचारीही उपस्थित होते.

पोलिस खात्याला नो पार्किंगमधील वाहने उचलण्यासाठी क्रेन पुरवठा करणाऱ्याय कंपनीत काम करणारा मैनुद्दीन हा नंबर नसलेल्या बुलेटवरुन जात असताना पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याजवळ एक लाख एकोणतीस हजाराची रोकड सापडली. अधिक चौकशीत त्याने घरातही मोठी रक्कम असल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने भोरे यांच्या घरावर छापा घातला. त्यावेळी हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल पाहून पोलिसही चक्रावले. संबंधित रक्कम कुणाची आहे, कोठून आणि कशासाठी आणली याबाबतची माहिती मुल्लाकडून घेतली जात आहे. साधा कामगार म्हणून काम करणाऱ्या मुल्लाने दोन नव्या कोऱ्या बुलेट घेतल्याने त्याच्याबद्दल संशय होता.

======

अहवाल इडी आणि प्राप्तीकरकडे

पोलिस अधीक्षक फुलारी यांनी सांगितले की, मुल्ला याच्याकडची रक्कम नेमकी कोठून आणि कशासाठी आणली गेली आहे. याचा उलगडा करण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी आणि इडीच्या कार्यालयाला कारवाईचा अहवाल पाठवला आहे. त्यांच्या चौकशीनंतरच या रकमेबाबतचा खुलासा होईल. दरम्यान पोलिस यंत्रणाही मुल्ला याच्याकडे कसून चौकशी करुन संबधित रकमेबाबतची नेमकी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दुकाने पालिकेकडून सील

$
0
0

कोल्हापूर ः जनता बझारच्या इमारतीत पोटकुळांनी सुरू केलेले व्यवसाय विनापरवाना सुरू असल्याच्या कारणावरून परवाना विभागाने शुक्रवारी संबंधितावर कारवाई केली. राजारामपुरी येथील जनता बझारच्या इमारतीतील हॅवेल्स गॅलक्सी व स्टेटस ही दुकाने सील केली.

संबंधितांनी व्यवसाय परवान्याचे नूतनीकरणही करून घेतले नाही. ताराबाई रोडवरील अंबाबाई यात्री निवास, राधिका मेन्स वेअरवरही कारवाई केली. परवाना व्यवसायाची १ लाख दोन हजार १२० रुपये थकबाकी वसूल केली. परवाना विभागाचे अधीक्षक सचिन जाधव, ​संभाजी कांबळे, अमर यादव, भगवान मांजरे, आदींनी कारवाईची मोहीम राबवली. परवाना विभागाकडून वसुली मोहीम सुरू झाली आहे. व्यवसायधारकांनी व्यवसाय परवान्याचे तत्काळ नूतनीकरण करून घ्यावे, अन्यथा दुकाने सील केली जातील, असा इशारा ​देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद शाळा ‘पीपीपी’वर खासगी संस्थांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळा व आरक्षणामध्ये ताब्यात आलेले भूखंड 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (पीपीपी ) तत्वावर अनुदानीत व विनाअनुदानीत शैक्षणिक संस्थांना चालविण्यास देण्याचे धोरण निश्चितीसाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत या धोरणाबाबत एकमत झाले. महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीत संबंधित संस्थेकडून एकरकमी प्रिमीयम व प्रती चौरस फूट भाडे व कालावधीबाबत निर्णय झाला. महापालिकेच्या रिकाम्या शाळा व आरक्षणामध्ये ताब्यात आलेले भूखंड पीपीपी तत्वावर दिल्याने इमारती, जागा वापरात येणार आहे. शिवाय महापालिकेस उत्पन्न प्राप्त होणार आहे. चर्चेत उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता संभाजी देवणे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजीत कदम, नियाज खान, नगरसेवक संजय मोहिते यांनी सहभाग घेतला. उपायुक्त विजय खोराटे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले यांनी धोरणाबद्दल माहिती दिली. यावेळी परवाना विभागाचे अधिक्षक सचिन जाधव, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एस.के.पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून फुलणार ‘दुनिया मोरांची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चित्रकार, छायाचित्रकार विजय टिपुगडे यांच्या 'दुनिया मोरांची' या छायाचित्र प्रदर्शनाचा प्रारंभ रविवारी (ता. १३) होत आहे. प्रदर्शन शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात १९ मार्चपर्यंत सकाळी ९.३० ते रात्री ९ पर्यंत खुले राहणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात 'निवडक कलासाधना' आणि 'दुनिया मोरांची' या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.

रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'गुरुशिष्य' परिवारातर्फे दरवर्षी विविध उपक्रम होतात. यावर्षी टी. के. वडणगेकर यांचे शिष्य विजय टिपुगडे यांनी टिपलेल्या मोरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

टिपुगडे यांनी आतापर्यंत मोराच्या दीड हजारांहून अधिक मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे अडथळे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या कामात येणारे काही अडथळे सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यानी शनिवारी जमीनदोस्त केले. पुलाजवळील जकात नाका आणि ऐतिहासिक हौद पाडण्याबरोबरच दोन झाडेही तोडण्यात आली. या अडथळ्यांमुळे शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे काम अनेक महिने रखडले होते. यासंबंधी पाठपुरावा करुन हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आणि कोल्हापूरच्या नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने समितीच्यावतीने हे सर्व अडथळे स्वतःहूनच हटविण्याचा इशारा दिला होता.

शनिवारीही येथील ऐतिहासिक हौद पाडण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावर रास्ता रोको केला. यामुळे सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबून राहिली. त्यामुळे सीबीएसजवळील दाभोलकर कॉर्नर ते केर्लीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बराच काळ वाहतूक रेंगाळत राहिली.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि पुरातत्व विभागाच्या परवानगीच्या कात्रीत सापडल्यामुळे जून २०१५ पासून पर्यायी शिवाजी पुलाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. हे काम त्व‌रित सुरू करण्यासाठी कृती समितीच्यावतीने शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. त्यावेळी बांधकाम विभागाने जकात नाका पाडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता ए. ए. आवटे आणि कर्मचारी जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले. कृती समितीच्या कार्यकर्त्यांसमोरच जकात नाका पाडायला सुरुवात झाली. जकात नाका पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी हौद व झाडे पाडण्याची मागणी केली.

मात्र ऐतिहासिक हौद आणि झाडे तोडण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी महापौर अश्विनी रामाणे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको केला. पुलाचा प्रश्न जिव्हाळ्याचा बनल्याने तेथे उपस्थित नागरिकही उत्स्फूर्तपणे रास्ता रोकोत सहभागी झाले. त्यामुळे काही क्षणात पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या.

रास्ता रोकोवेळी तेथे उपस्थित असलेले शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाही जबरदस्तीने रस्त्यावर ठाण मांडण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले. यावेळी कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांत चांगलीच वादावादी झाली. महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांनी सरनोबत यांची सुटका करुन एका शेडमध्ये बसवले.

यावेळी ही झाडे जमिनीबरोबर तोडण्याची परवानगी आमच्याकडे मागावी, तसे पत्र महापालिकेला द्यावे, अशी सूचना सरनोबत यांनी बांधकाम विभागाला केली. ते पत्र मिळाल्यानंतर त्वरित झाडे तोडण्यास परवानगी देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम विभागाचे आवटी यांनीही तसे पत्र देत असल्याचे सांगितले. असा सर्वमान्य तोडगा निघाल्यानंतर सर्व अधिकारी निघून गेले. अधिकारी निघून जाताच कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच झाडे तोडायला सुरुवात करुन दोन झाडे पाडली.

========

सोमवारी बांधकाम विभाग झाडे तोडण्याची परवानगी मागणार

वृक्ष प्राधिकरण समितीची सोमवारी बैठक

पुरातत्व अधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ

कार्यकर्ते अधिकाऱ्यांत तूतू....मैमै

पोलिस व अग्निशमन दालाचा मोठा फौजफाटा

०००००००


ऐतिहासिक हौद जमीनदोस्त

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर राजर्षी शाहूकालीन हौद पाडण्यास काही इतिहाससंशोधकांनी तर झाडे पाडण्यास पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. मात्र विरोध करणाऱ्यांसमोरच कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हौद आणि झाडे पाडली.

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलला डॉक्टरांची गरज

$
0
0

Janhavi.Sarate @timesgroup.com

कोल्हापूर : सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांची अवस्था बिकट आहे. अद्यावत उपकरणे आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे रुग्णालयातील सुविधांचा बोजवार उडाला आहे. सरकारने अनेक मोफत सुविधांची घोषणा केली असली, तरी पालिकेच्या हॉस्टिपल्समध्ये या सुविधाच उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

आधुनिक उरपकरणे आणि मनुष्यबळाचा अभाव...गेली वीस वर्षे डॉक्टरांना ५०० रुपये मानधन...हॉस्पिटलमधील प्राथमिक सुविधांकडे पालिकेचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक मूलभूत आरोग्य सुविधांची वानवा आणि प्रशासनाची उदासिनता यामुळे गोरगरिबांचा दवाखाना, अशी ओळख असलेल्या हॉस्पिटलची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले, पंचगंगा व आयसोलेशन हॉस्पिटल अशी तीन मोठी, तर २५ लहान आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहे. यातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सर्जिकल, मेडिकल, स्त्रीरोग विभाग आणि नवजात शिशूगृह, असे विभाग आहेत. या हॉस्टिपलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर सुविधेअभावी त्याच्यावर अर्धवटच उपचार होतात आणि त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयाचा मार्ग धरावा लागत आहे.

अत्यल्प दरात या हॉस्टिपलमध्ये रुग्णसेवा मिळत असल्या तरी, हॉस्पिटलमध्ये एकच जुने सोनोग्राफी मशिन असून, ते सुस्थितीत नसल्यामुळे गर्भवती महिलांची सोनोग्राफी या हॉस्पिटलमध्ये केली जात नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयातून सोनोग्राफी करावी लागते. तसेच डिजिटल एक्स-रे मशिनची सुविधाही या हॉस्टिपलमध्ये नसून, दर तीन महिन्याला मशिनची मागणी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

अचानक प्रस्तूती दरम्यान रक्तदाब वाढल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यासमुळे रुग्णाला रात्री-अपरात्री सीपीआरमध्ये दाखल करावे लागते. अनेक पदे रिक्त असल्यामुळे उपचाराबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. केवळ ७ डॉक्टरांवर सध्या ‌हॉस्पिटलचे कामकाज सुरू आहे. यातील केवळ २ ते ३ डॉक्टर दिवसा उपलब्ध असतात. गेली २० वर्षे केवळ ५०० रूपये मानधनावर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलविले जात आहे.

या रुग्णालयाला उभारी घेण्यासाठी चांगली इमारत, व्हेंटीलेटर, तज्ज्ञ डॉक्टर, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, जनरेटर या सुविधा आवश्यक आहे. रुग्णालयात असणाऱ्या वैद्यकीय सुविधा एकेकाळी दर्जेदार होत्या. मात्र, महापालिका प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीही दवाखान्याकडे दुर्लक्ष केल्याने आज या हॉस्पिटलला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. महापालिकेने हॉस्पिटलचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिल्यास आणि आरोग्य सुविधेला प्राधान्य दिल्यास या हॉस्पिटलला उभारी मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या मेगा हॉलिडेमुळे ग्राहकांची होणार गैरसोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्च एन्डची लगबग बँकामध्ये सुरू असतानाच २४ ते २७ मार्चच्या सलग चार दिवसांच्या सुटीमुळे बँका मेगा हॉलिडे साजरा करणार आहे. सलग सुटीमुळे ऐन मार्चएन्डमध्ये आर्थिक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सलग सुटीमुळे आर्थिक व्यवहारावर परिणामांची शक्यता गृहीत धरून बँक प्रशासनाने एसएमएसद्वारे अधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. परीक्षांच्या कालावधीत सलग सुटी असल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी ग्राहकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकासह नागरी व सहकारी बँकामध्ये मार्च एन्डची धावपळ सुरू झाली आहे. थकीत कर्ज, देवाण-घेवाण आदी गोष्टींचा ताळेबंद जमवण्यासाठी सर्वच पातळीवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. वसुली मोहीम वेगवान करण्याबरोबरच ठेवी गोळा करण्यासाठीही बँक कर्मचारी धावाधाव करत असतानाच महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या पार्श्वभूमीवर सलग सुटीची फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमोलच्या कार्यालयाची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विम्याची रक्कम हडपण्यासाठी आणि कर्ज चुकवण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव करणारा बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याच्या कार्यालयाची पोलिसांनी रविवारी(१३ मार्च) झडती घेतली. अमोलसह त्याचा भाऊ विनायक पवार याला पोलिसांनी पुन्हा एकदा उत्तूर, आजरा परिसरात फिरवले. घटनास्थळावरून साक्षीदार मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अमोलला कर्जपुरवठा करणारे सावकार आणि काही नगरसेवकांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासणीनंतर संबंधितांची चौकशी होणार आहे.

पोलिसांनी केलेल्या झडतीत मिरजकर तिकटी येथील कार्यालयातून बँका, पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांची छाननी सुरू असून, कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी सावकारांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. अमोल पवार याच्या बांधकामांसाठी मदत करून मोठी रक्कम वसूल करणाऱ्या दोन नगरसेवकांचीही नावे पोलिसांना मिळाली आहे. गरज पडल्यास संबंधित नगरसेवक आणि खासगी सावकारांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी रविवारी मुख्य संशयित आरोपी अमोल पवार याच्या पत्नीचा जबाब नोंदवला आणि अमोलच्या कामांची माहिती घेतली.

दरम्यान, घटनास्थळावर नेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याबरोबरच साक्षीदार शोधण्याचेही प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. मयत रमेश नाईक याला सोबत घेऊन ज्या ठिकाणी फिरले होते तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.



विमा पॉलिसी अधिकाऱ्यांकडून चौकशी नाही

अमोल आणि विनायक पवार यांच्या गुन्ह्याचे मूळ विम्याची ३५ कोटींची रक्कम हडप करण्यात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अमोलने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीचा ३५ कोटींचा विमा उतरवून ४ लाख ९६ हजारांचा पहिला हप्ताही भरला आहे. मात्र, अमोलच्या अटकेनंतर अजूनही विमा कंपनीने याबाबत पोलिसांशी संपर्क साधलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्पन्न कमी, महापालिकेपुढे आव्हानांचा डोंगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खर्चात काटकसर आणि उत्पन्नात वाढ या सूत्रावर प्रशासनाने महापालिकेचे अंदाजपत्रक तयार केले. उपलब्ध निधीच्या माध्यमातून शहरवासियांना ई-गर्व्हनन्सद्वारे गतीमान प्रशासन आणि सध्याचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर भर आहे. मात्र, मर्यादित आर्थिक उत्पन्नामुळे या साऱ्या गोष्टींची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आस्थापनाचा वाढलेला खर्च, बेभरवशाचे सरकारी अनुदान, मोठ्या प्रकल्पासाठी कर्ज उचलल्याने त्याची परतफेड करण्यासाठी वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांची परतफेड, प्रशासन आणि नगरसेवकांतील विसंवाद, महापालिकेतील आघाड्यांचे राजकारण या साऱ्यांमध्ये समन्वय ठेवून, महापालिकेचा गाडा हाकावा लागेल.

प्रशासनाने ३५७ कोटीचे महसुली अंदाजपत्रक मांडताना पाच कोटींची शिल्लकी दाखवली आहे. मात्र, येत्या आ​र्थिक वर्षात उत्पन्न वाढीसाठी महापालिकेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे सरकारी अनुदानावरच अवलंबून राहावे लागत आहे. आगामी वर्षात स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून मिळणारे अनुदान, मुद्रांक शुल्क आणि अससेमेंट या साऱ्याचे गणित आखत प्रशासनाने १२४ कोटी रुपये महसूल अपेक्षित धरला आहे. घरफाळ्यातून ४६ कोटी ५५ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. नगरचना विभागाच्या माध्यमातून ५० कोटीचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. प्रशासनाने, कागदपत्रांच्या आधारे महसुलीचा आकडा वाढविला आहे. शहरातील मिळकतींचे सर्व्हे करून उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न चांगला आहे. मात्र, यासाठी प्रशासनाला वर्षभर यंत्रणा प्रभावीपणे राबवावी लागणार आहे.



कर्मचाऱ्यांना द्यावे प्रशिक्षण

विविध घटकातून उत्पन्न वाढ अपे​क्षित धरली असताना महापालिका कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अधिक जबाबदारीने, पारदर्शी व तत्पर सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. याकरिता कामकाजात गतीमानता आणण्यासाठी प्रशासन कम्प्युटर प्रणाली, रोड मॅनेजमेंट सिस्टीम, मोबाइल अॅप, ई-हॉस्पिटल प्रणाली सुरू करण्याच्या विचारात आहे. ई-ऑफिससाठी पहिल्यांदा कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलाची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. अनेक कर्मचारी तांत्रिकपेक्षा मॅन्युअल कामकाजाला पसंती देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीला विरोधासाठी आज हायवे रोखणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी रविवारी पाचगाववासियांनी कडकडीत बंद पाळला. दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवलेच, शिवाय मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली. दरम्यान, सोमवारी (१४ मार्च) सकाळी अकरा वाजता हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

हद्दवाढीला विरोध करण्यासाठी प्रस्तावित गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन २५ फेब्रुवारीपासून आंदोलन चालवले आहे. गावागावात बंद पाळण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणही करण्यात आले होते. या आंदोलनातील शेवटचा टप्पा म्हणून सोमवारी (१४ मार्च) सकाळी अकरा वाजता महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दिवसभर रस्ता रोको करण्याचे समितीचे नियोजन आहे.

दरम्यान, पाचगाववासियांनी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी रविवारी कडकडीत बंद पाळला. सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गावाच्या परिसरात मोटरसायकल रॅली काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बॅडमिंटन कोर्ट’वर ‘अन्नछत्र’ ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकीकडे मंडईत काही भाजीपाले विक्रत्यांचा पसारा दिवसेंदिवस वाढत असतानाच कपिलतीर्थ मार्केटमधील 'बॅडमिंटन कोर्ट'ही हडपण्याचा डाव आखला जात आहे. भाविकांच्या सोयीसाठी 'अन्नछत्र' सुरू केलेल्या 'ट्रस्ट'चा डोळा बॅडमिंटन कोर्टवर पडला आहे. त्यांनी महापालिकेतील कारभारी नगरसेवकांच्या माध्यमातून हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या सर्वसाधारण सभेत कोर्टची जागा भाडेतत्वावर देण्याचा ठराव आणण्यासाठी संबंधितांच्या महापालिकेत चकरा वाढल्या आहेत.

शहराच्या मध्यवस्तीतील हे एकमेव बॅडमिंटन कोर्ट आहे. राज्यात दुसऱ्या मजल्यावर कोर्टची उभारणी हाताच्या बोटावर मोजण्या इतपथ शहरामध्ये आहे. कोल्हापुरात चार दशकापूर्वी कपिलतीर्थ मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावर बॅडमिंटन कोर्ट तयार केले. कोर्टसाठी सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. कोर्ट तयार करताना सागवानी लाकडाचा वापर केल्याने खेळाडूंची दमछाक होत नाही. मजबूत आणि आकर्षक अशी बैठक व्यवस्था आहे. सध्या येथे दोन टप्प्यात ११ बॅचेस होतात. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आ​णि दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत या काळात प्रत्येकी एकेक तासाच्या बॅचेस होतात.

दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील कारभाऱ्यांनीच 'कोर्ट'वर अन्नछत्र सुरू करण्यात पुढाकार घेतला आहे.महापलिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका वजनदार नेत्याचा प्रमुख कारभारी नगरसेवक आणि विरोधी पक्षातील एका नगरसेवकाच्या माध्यमातून बॅडमिंटन कोर्टवर अन्नछत्र सुरू करण्याचा डाव आखला आहे. वास्तविक बॅडमिंटन कोर्टची इमारत ही महापालिकेच्या मालकीची आहे. कोर्ट व जागा खेळासाठीच राखीव ठेवावी याकरिता बॅडमिंटन खेळणाऱ्या व्यक्ती, शालेय विद्यार्थी व खेळाडूंनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची यापूर्वी भेट घेतली आहे. अधिकाऱ्यांनी ठोस काही सांगितले नाही.



'तो' उद्योगपती कोण ?

भारतीय जनता पक्षाशी जवळीक असलेल्या एका उद्योगपतीलाही ट्रस्टने याकामी साकडे घातल्याचे वृत्त आहे. महापालिकेची १८ मार्च रोजी सर्वसाधारण सभा आहे. या सभेत बॅडमिंटन कोर्टची जागा 'अन्नछत्र'ला देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यासाठी खेळी सुरू आहेत. यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या महापालिकेत खेपा वाढल्या आहेत.भाविकांची संख्या वाढत असून, अन्नछत्रासाठी शेजारील जागा आवश्य असल्याचे कारण पुढे करत प्रस्ताव रेटला जात आहे. ट्रस्टने कोर्ट इमारतीत भिंतीलगत तेलाचे डबे, इतर साहित्यही ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची बांधकाम विभागाला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलास अडथळा ठरणाऱ्या जकात नाक्याची इमारत, शाहूकालिन पाण्याचा हौद पाडल्याच्या प्रकरणी महापालिका प्रशासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले आहे. हेरिटेज वास्तूंमध्ये समावेश असलेला शाहूकालीन पाण्याचा हौद हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मान्यता दिली नव्हती. तरीही शनिवारी बांधकाम विभागाची यंत्रणा वापरून हौद पाडण्यात आला. यासंदर्भात आयुक्त पी. शिवशंकर यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस काढून चोवीस तासात खुलासा मागविला आहे.

दरम्यान, शनिवारी घडलेल्या प्रकारचे फुटेज तपासले जाणार आहेत. त्यासाठी वृत्त वाहिन्यावरील फुटेज, फोटो संकलित केले जात आहेत.दुसरीकडे कोल्हापूर शहर पुरातत्व संवर्धन समिती सोमवारी घटनास्थळाची पाहणी करेल. पुरातत्व विभागाकडून पाण्याचा हौद पाडल्याच्या घटनेची माहिती घेतली जात आहे. हेरिटेज वास्तू व जकात नाका पाडल्याप्रकरणी महापौरांसह हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. जकात नाक्यावर हातोडा मारण्यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक आघाडीवर होते. त्यांच्याविरोधात काय भूमिका घ्यायची असा पेच प्रशासनासमोर आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आंदोलकांवरील कारवाईबाबत टोलवाटोलवी सुरू झाली आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीची आज बैठक

दरम्यान, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक सोमवारी होईल. शनिवारच्या घटनेनंतर प्राधिकरण समितीच्या सदस्यांना महापालिकेने दूरध्वनी करून बैठकीची माहिती दिली आहे. एरव्ही प्राधिकरण समितीची बैठक असेल तर त्याआधी तीन दिवस लेखी कळविले जाते. मात्र, पुलाचा विषय ज्वलंत असल्याने तातडीची बैठक होत आहे.



महापालिकेची बांधकाम विभागाला नोटीस पाठविण्याची कारवाई एकतर्फी आहे. बांधकाम विभागाने पाण्याचा हौद पाडलेला नाही. आंदोलक कोण आहेत हे महापालिकेला माहीत आहे. महापालिकेच्या नोटीसीबाबत बांधकाम विभागाने शनिवारीच तसा खुलासा सादर केला आहे.

आर. के. बामणे (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग)

'महापालिकेने, सार्वजनिक बांधकामाला पुलाला अडथळा ठरत असलेला जकात नाका हटविण्याची मान्यता दिली होती. शाहूकालीन पाण्याच्या हौदाचा समावेश हेरिटेज वास्तूंमध्ये आहे. हौद हटविण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे ही वास्तू हटविण्यास बांधकाम विभागाला मान्यता दिली नव्हती. हौद जमीनदोस्त झाल्याने बांधकाम विभागाला नोटीस काढली आहे.'

पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत सापडलेले तीन कोटी खासदाराचे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

बेथेलहेमनगरमधील घरात सापडलेल्या ३ कोटी ७ लाख ६३ हजार रुपयांच्या रोकडप्रकरणी बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याला रविवारी कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, मोटारसायकल चोरटा असलेल्या मुल्ला याने ही रक्कम कर्नाटकातील चिक्कोडी परिसरातून चोरली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटकातील एका खासदाराच्या संस्थांसाठी रक्कम घेऊन आलेल्या मोटारीवर डल्ला मारून मुल्लाने हे पैसे पळवल्याची माहिती पुढे आली आहे.

शनिवारी दुपारी तीन कोटींपेक्षा अधिक रोकड मिरजेतील बेथेलहेमनगरमधील एका सध्या घरात शनिवारी दुपारी सापडली. इतकी मोठी रक्कम मुल्ला याने कोठून आणली? असा प्रश्न समोर आला. पोलिसांनी अद्यापही याबाबत नेमकी माहिती दिलेली नाही. मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल करून रविवारी त्याला कोर्टासमोर हजर केले. मूळचा पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील राहणारा मोहिद्दीन सध्या बेथेलहेमनगरमध्ये नातेवाईक रेखा भोरे यांच्याकडे राहतो आहे. तो सराईत मोटारसायकल चोरटा असून त्याच्याविरुद्ध कोल्हापूर, कोडोली, खडकी, पन्हाळा आदी ठिकाणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, कर्नाटकातील चिक्कोडी परिसरातील एका खासदाराच्या संस्थांसाठी काही रक्कम जाणार होती. ही गाडी चिक्कोडीजवळ थांबली असताना मोहिद्दीनने त्या गाडीतून हे पैसे चोरले. चोरलेल्या रकमेतून त्याने दोन बुलेट खरेदी केल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images