Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवसेनेची युती पुणेकरांशी

0
0



सातारा : 'महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, कोणाशी होणार, अशा चर्चा सुरू आहेत. एकच सांगतो शिवसेना निवडणूक लढणार आणि जिंकणार. जे येतील त्यांच्याशी युती करू, अन्यथा आमची युती पुणेकर जनतेशी,' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सोळशी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय 'शिवतेज विचारमंथन' शिबिराचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरे बोलत होते.
साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेते शशिकांत शिबिराला सुतार, शिवसेना प्रवक्त्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे, पुणे शहर संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानुगडे-पाटील, शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, पठाणकोठची घटना ताजी असताना धरमशाला येथे पाकिस्तान बरोबरचा टी-२० क्रिकेट सामना घेण्यासाठी क्रिकेट बोर्डाचा आटापिटा सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्‍यांची भूमिका चांगली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे तेजाचे हिंदुत्व आहे. शिवसेना प्रमुखांनी सांगितले, शेंडी बांधणारे किंवा देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व अभिप्रेत नाही. अतिरेक्यांशी लढणार हिंदुत्व हवे. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणार आमच हिंदुत्व आहे. आम्ही धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही.

.........

शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करा; पुण्यावर भगवा फडकवा

'शिवसैनिक हेच पुण्याचे नेतृत्व आहे. पुण्याच्या मातीतून नेतृत्व निर्माण
झाले आहे. शिवसेना प्रमुखांचा जन्म पुण्याचा. ते म्हणायचे माझी जीभ, माझी तलवार आहे. विचारांचे अंगार त्यातून त्यांनी पुलविले. पुणे महापालिकेवर भगवा फडकावा, हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. जन्मगाव असल्याने त्यांना पुण्याबद्दल विशेष प्रेम होते. निवडणुका जिंकण्यासाठी ताकद कमवा. विरोधकांपेक्षा कामाची मोठी फळी तयार करा. निवडणुकीत शड्डू ठोका. पुण्यावर भगवा फडकविण्याचे शिवसेना प्रमुखांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा. मी त्यासाठी वेळ देणार आहे. विभागप्रमुख, गट प्रमुख, शाखा प्रमुख यांच्याकडे जातीने लक्ष देणार आहे.'

.......

पुणे 'स्मार्ट'च आहे

देशातील शंभर शहरे स्मार्ट सिटी करणार, मुंबई-पुण्याप्रमाणे इतर शहर उभी राहणार, अशी अपेक्षा त्यामागे होती. म्हणून या घोषणेला आपण पाठिंबा दिला. पुणे अगोदरच स्मार्ट आहे. त्याला आणखी काय स्मार्ट करणार? थोडाफार पैसा टाकणार असे वाटते. परंतु पुणे स्वत:च्या ताकदीवरच पुढे जात आहे. पुण्याचे पुणेपण टिकवूण विकास झाला पाहिजे. यासाठी पुणेकरांना चांगल्या सुविधा देऊन त्यांच्याशी खरं बोला जे बोलेनं ते करेन आणि जे करेल तेच बोलेल ही भूमिका घेऊन तुम्ही पुढे निघालात तर पुणेकर तुमच्या बरोबर येतील.

......

एक वॉर्ड एक नगरसेवक हवा

पुणे महापालिका निवडणुकीत ४ वॉर्डांचा की, ३ वॉर्डांचा याच्यावर चर्चा
सुरू आहे. याविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, कल्याण-डोंबविली, नवी
मुंबईत एक वॉड एक नगरसेवक, याप्रमाणे निवडणुका झाल्या. मग पुण्यालाच कशाला पाहिजे प्रभाग? येथेही एका नगरसेवकाचा एक वॉर्ड ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारशेवर शाळा बंद होणार

0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर ः कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारच्या विचारधीन आहे. त्यात एक ते २० पटसंख्येच्या ४०६ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा शाहूवाडी तालुक्यातील आहेत. तसा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर झाला आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त ८१२ शिक्षकांचे समायोजन करताना प्राथमिक शिक्षण विभागाला कसरत करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेच्या २००५ शाळा आहेत. नोकरी, व्यवसायामुळे नागरिकांचे झालेले स्थलांतर आणि इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल यामुळे यामुळे जिल्हा परिषदेच्या ‌अनेक शाळांना पटसंख्या टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा ढासळलेला दर्जाही याला कारणीभूत आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्यावर्षीपासून विविध शैक्षणिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत. तरीही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. केवळ एक काही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढी विद्यार्थीसंख्या आहे. त्यामुळे अशा शाळांचे समायोजन करण्याचे धोरण निश्चित केले.

त्यानुसार शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एक ते २० पटाखालील ४०६ शाळा आढळल्या. यामध्ये एक पट संख्या असलेल्या दोन तर पाच पट संख्येच्या दहा, दहा पटसंख्येच्या १५ तर वीस पटसंख्येच्या ३१ शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा शाहूवाडी व राधानगरी तालुक्यातील आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी किती निधी लागेल याचाही अभ्यास झाला आहे.

चौकट

एक ते २० पटाखालील तालुकानिहाय शाळांची संख्या

आजरा ३७

भुदरगड ४६

चंदगड ५३

गडहिंग्लज १७

गगनबावडा २६

हातकणंगले ६

कागल ८

करवीर १३

पन्हाळा ३९

राधानगरी ६४

शाहूवाडी ८३

शिरोळ १४

एकूण - ४०६

==========

एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समयोजन करण्यासाठी किती प्रवास भत्ता लागेल याचा अभ्यास सरकारस्तरावर सुरू आहे. विद्यार्थ्यांबरोबरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा प्रस्तावही मंत्रीस्तरावर विचारात आहे.

सुभाष चौगले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या उद्योगांचा विकास खुंटणार?

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरमधून राज्य सरकारने कोल्हापूरला वगळल्याने उद्योगक्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. राज्य सरकारने केलेल्या शिफारशीनुसार केंद्राने कोल्हापूरला वगळले, तर उद्योगांचा विकास खुंटणार असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्विटमध्ये कॉरिडॉरसाठी सातारा, सांगली, सोलापूरची शिफारस केल्याचे जाहीर केले. जपान सरकारच्या मदतीने होणाऱ्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये पूर्वी मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, दावणगिरी, हावेरी, चित्रदुर्ग आणि तुमकूर या जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र, अचानक कोल्हापूर वगळल्याचे स्पष्ट झाल्याने येथील उद्योगांसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

दरम्यान, कॉरिडॉर सांगली, सोलापूर जिल्ह्यांतून नेण्यात यावा, ही केवळ शिफारस असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले, 'आघाडी सरकारने कॉरिडॉरचा प्रस्ताव रद्द केला होता. मात्र, आम्ही पुन्हा त्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सरकारने नव्याने आढावा घेऊन सांगली, सातारा जिल्ह्यांची शिफारस केली आहे. आता केंद्र सरकार या संदर्भात सर्वंकष माहिती घेऊन कॉरिडॉरची घोषणा करेल.'

गरज सात हजार एकरची

इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशीपसाठी ७ हजार एकर जागा लागते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीसाठी जागेची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. मात्र, टाउनशीपच्या जागेसाठी प्रस्तावित प्रादेशिक विकास आराखड्यातील दोन जागांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे 'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

उद्योजकांची रविवारी बैठक

कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश रहावा, यासाठी उद्योजकांकडून प्रयत्न केले जात आहेत. यात शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पुढकार घेतला आहे. त्यांनी सोमावारी (७ मार्च) राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांची भेट घेतली आहे. या संदर्भात रविवारी (१३ मार्च) 'स्मॅक', 'मॅक' आणि 'गोशिमा'च्या सदस्यांनी बैठक होईल. लोकप्रतिनिधींनाही या मोहिमेत सहभागी करून घेणार असल्याचे जैन यांनी सांगितले. पक्षांमधील मतभेद बाजूला ठेवून कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जैन यांनी सांगितले.

राज्य सरकारने कॉरिडॉर सांगली-सोलापूर जिल्ह्यातून जावा, अशी केवळ शिफारस केली आहे. यानंतर केंद्र सरकार उपलब्ध जागा आणि पायाभूत सुविधांची माहिती घेईल. त्यानंतर कॉरिडॉरबाबत अंतिम निर्णय होईल. यासाठी अजून बराच वेळ लागेल. त्यामुळे कोल्हापूरच्या वाट्याला यातून काय येईल, याकडे लक्ष देता येईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री



कॉरिडॉरमध्ये हायवेला समांतर इंडस्ट्रियल गॅस पाइपलाइनचा समावेश असल्याने विजेला पर्यायी इंधनाची विचार कॉरिडॉरच्या माध्यमातून करता येणार आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची इंडस्ट्रियल टाउनशीपची मागणी कॉरिडॉरच्या माध्यातून पूर्णत्वास येणे शक्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर कोल्हापुरातून जाणे येथील उद्योगांसाठी हितावह आहे.

देवेंद्र दिवाण, अध्यक्ष, गोशिमा



जेथे उद्योगांचा पाया आहे तेथेच नव्याने गुंतवणुकीला चालना मिळू शकते. औद्योगिक वसाहत किंवा कॉरिडॉर उभारणीत परिसरात उपलब्ध पाणी, पायाभूत सुविधा, शैक्षणिक तसेच आरोग्य सुविधांचा विचार केला जातो. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल का? ही बाबही महत्त्वाची ठरते. या सगळ्यांचा विचार करता कॉरिडॉरसाठी कोल्हापूर जिल्हा अतिशय योग्य आहे.

सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक

डेव्हिड कॅमेरून, जेव्हा मुंबईत आले होते, तेव्हा मी त्यांच्यापुढे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या धर्तीवर मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरची कल्पना मांडली. त्याला त्यांनी उत्सुकता दाखविली. त्यांनी तांत्रिक मदत करण्याची तयारीही दर्शविली. मात्र, इतर देशांशी व्यवहार केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याने राज्य सरकार आपल्या स्तरावर असा प्रकल्प रद्द करू शकत नाही, एवढेही चंद्रकांत पाटील यांना यांना कसे माहिती नाही?

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना शहर उपप्रमुखासह पाचजणांना सावकारी वसुलीप्रकरणी अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात लाख रुपयांच्या वसुलीसाठी वृद्धेचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या शिवसेना शहर उपप्रमुख विशाल श्रीपाल देवकुळे (वय ३६, रा. श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. ६७, टाकाळा) याच्यासह पाचजणांना करवीर पोलिसांनी अटक केली. देवकुळे याच्यावर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्पना बाजीराव पाटील (५८, रा. वडणगे ता. करवीर) या वृद्धेची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले.

याप्रकरणी विशालचा भाऊ वीरकुमार श्रीपाल देवकुळे (३८, रा. टाकाळा), ओंकार अशोक सुरवसे (२२,), सुरेश दिलीप कांबळे (२२), दीपक आप्पासाहेब बेळुंके (२९, तिघे रा. टेंबलाई नाका, रेल्वे फाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रविराज उर्फ दीपक बाजीराव पाटील (३७, रा. वडणगे, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी दीपक पाटील हे जुन्या मोटारी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पाटील यांनी विशाल देवकुळे यांच्याकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले. त्यास दहा टक्के व्याज होते. देवकुळे याने व्याजापोटी पंचवीस हजार रुपये काढून घेऊन दीपकला पावणेदोन लाख रुपये दिले. त्यानंतर मुद्दल व व्याज न भरल्याने देवकुळेने दीपकच्या वडणगेतील तीन हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटची कागदपत्रे घेतली होती. पैसे वसुलीसाठी देवकुळे बंधूंनी दीपककडे तगादा लावला. वडणगेतील यात्रेनंतर, मंगळवारी देवकुळेसह पाचजण मोटारीने दीपकच्या घरी गेले. त्यांनी सात लाखांची मागणी केली. दीपकच्या आई, वडील आणि पत्नीला शिविगाळ करण्यात आली. त्यांनी दीपकची आई कल्पना यांना मोटारीत कोंबून पळवून नेले. दीपक घरी परतल्यावर त्यांना आईचे अपहरण झाल्याचे समजले. त्यांनी ताबडतोब करवीर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे, सहाय्यक निरीक्षक पुष्पलता मुंडले, पी. पी. शेवाळे आणि डीबी ब्रँचने सापळा रचला.

त्यानुसार दीपकने विशालला फोन करून आईची सुटका करण्याची विनंती केली. त्यासाठी लगेच ५० हजार रुपये घेऊन येत असल्याचे सांगत उर्वरित रक्कम आठ दिवसांत देण्याची हमी दिला. यावेळी देवकुळेने त्यांना टेंबलाई उड्डाणपुलाजवळ यायला सांगितले. पोलिस दीपकसह तेथे गेले. मात्र देवकुळे आला नाही. पुन्हा दीपक यांनी विशालशी मोबाइलवर संपर्क साधल्यावर त्याने त्यांना टाकाळ्यातील कार्यालयात यायला सांगितले.

दीपक पोलिसांसह कार्यालयात गेल्यावर पाचही संशयितांसह कल्पना पाटील याही तेथे होत्या. पोलिसांना पाहताच त्या रडू लागल्या. संशयितांनी अर्वाच्च्य शिविगाळ करून मारहाण केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कल्पना पाटील यांची सुटका करत पाचही संशयितांना ताब्यात घेतले.

सक्रीय कार्यकर्ता

देवकुळे शिवसेनेचा सक्रीय कार्यकर्ता आहे. २०१० मध्ये त्याने शिवसेनेच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली होती. २०१५ मध्ये विशालच्या आईनेही शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. विशालच्या अटकेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, विशालचा मेव्हणाही पोलिस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या परीक्षेत सापडले १६ कॉपीबहाद्दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहावीच्या परीक्षेत आजअखेर बोर्डाच्या सात पथकांनी केलेल्या पाहणीत १६ कॉपीबहाद्दर भरारी आणि बैठे पथकाला सापडले. हे विद्यार्थी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील आहेत. विद्यार्थ्यांकडे अपेक्षित प्रश्नसंच, पुस्तकातील तसेच वह्यांची पाने आणि नोट्स काढलेली झेरॉक्सची पाने सापडली. १६ पैकी ९ कॉपीबहाद्दर कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बोर्डाच्या सात पथकात तीस कर्मचारी आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचे आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बीजगणित या चार विषयांची परीक्षा झाली. इंग्रजी हा कठीण विषय असल्याने आणि उत्तीर्ण होण्याचे निकष सोपे केले असले, तरी विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती असते. त्यामुळे इंग्रजीच्या परीक्षेदिवशी कॉपीचे प्रमाण मोठे असते. ही शक्यता गृहीत धरुन अधिक दक्षता घेण्यात आली. या परीक्षेला सांगली जिल्ह्यात १ आणि कोल्हापुरात ४ विद्यार्थी सापडले.

मराठीच्या पेपरसाठी कोल्हापुरात २, सातारा जिल्ह्यात १ विद्यार्थी सापडला. हिंदीच्या परीक्षेवेळी साताऱ्यात १ आणि कोल्हापुरात ३ विद्यार्थी सापडले. बीजगणित परीक्षेवेळी सातारा जिल्ह्यात ३ आणि सांगली जिल्ह्यात १ विद्यार्थी सापडला. कोल्हापूर विभागातून ३४९ परीक्षा केंद्रांवर दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा गैरप्रकाराचे प्रमाण कमी आहे. मंडळातर्फे गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे, भरारी पथके नियुक्ती आहेत. तोतया परीक्षार्थी, सामूहिक कॉपी या प्रकारांवरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

- शरद गोसावी, मंडळ सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेसळीच्या संशयाने २५ टन खाद्यतेल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर ऑईल ट्रेडर्स या दुकानातून खरेदी केलेले खाद्यतेल खराब असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दुकान मालकांकडे केली. दुकान मालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशानकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर बुधवारी झालेल्या तपासणीत अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू आढळल्याने साडेचौदा लाख रुपये किंमतीचा २५ टन तेलसाठा जप्त करण्यात आला.

लक्ष्मीपुरीतील कोल्हापूर ऑइल ट्रेडर्स येथील खाद्यतेलाच्या सेवनानंतर परिसरातील काही नागरिकांना घशाचा त्रास सुरू झाला. काही नागरिकांनी दुकान मालकाकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांनी तक्रार करणाऱ्या नागरिकांना धुडकावून लागले. नागरिकांनी शिवसेनेचे कार्यकर्ते शशी बिडकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संपत देशमुख यांना त्याची माहिती दिली. दुकानातील खाद्यतेलांचे नमुने घेण्याची विनंती केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी केलेल्या दुकानाच्या तपासणीत विविध ब्रँड्सची लेबल्स आणि रिकामे डबेही सापडले. दुकानात केवळ पामतेल आणि सरकी तेलाचा साठा असताना तेलाच्या इतर ब्रँड्सची लेबल्स कशासाठी? याची विचारणा अधिकाऱ्यांनी दुकान मालक अलहबीब अकबानी यांच्याकडे केली. भेसळयुक्त तेल ब्रँडेड लेबल्सच्या नावाने विक्री केल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

'भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी १४ लाख ५८ हजार रुपयांचा २५ टन खाद्यतेल साठा जप्त केला आहे. तेलाचे सहा नमुने तपासणीसाठी घेतले असून ते पुणे येथे पाठवण्यात येतील. तपासणीनंतर दोषी आढळल्यास दुकान मालकाचा परवाना रद्द होऊ शकतो. भेसळीच्या गुन्ह्यावरून कोर्टात तक्रारही दाखल करू,' असे माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी सांगितले. महेंद्र पाटील, बिभीषण मुळे, श्रीनिवास केदार आदींनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीचे ई तिकीट, ‘अॅप’वर वेळापत्रक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी आर्थिक वर्षात नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करत केएमटी प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने 'टॉप गिअर' टाकला आहे. नव्या अंदाजपत्रकात इलेक्ट्रॉनिक तिकीट सिस्टिम, मोबाइल अॅपद्वारे बसेसच्या वेळापत्रकाची उपलब्धता, प्रवासी वाहतुकीत २५ टक्क्यांनी वाढ करत उत्पन्नात भर घालणे, जास्तीत जास्त प्रवासी उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता योजना आणि शहरांतर्गत महिलांना सुरक्षितपणे व विनाअडचण प्रवास करता यावा साठी महिलांसाठी विशेष बससेवेचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांवर तिक‌िट दरवाढीचा बोजा लादण्यात आला नाही.

आयुक्त पी. शिवशंकर यांनी सादर केलेल्या केएमटीच्या २०१६-१७ या आ​र्थिक वर्षाच्या ७८कोटी ४५ लाखाच्या अंदाजपत्रकास परिवहन समितीने मान्यता दिली. परिवहनची मान्यता मिळाल्याने हे अंदाजपत्रक आता स्थायी समितीला मान्यतेसाठी सादर होणार आहे. संभाव्य हद्दवाढ विचारात घेऊन त्याप्रमाणे नवीन मार्गाची रचना व उत्पन्नाचा आराखडा तयार करण्यात येईल. दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये वाढ करण्यासाठी प्रवासी वाढ अभियान योजना व कर्मचारी प्रोत्साहन भत्ता या नव्या योजना सादर केल्या आहेत असे परिवहन सभापती लाला भोसले यांनी सांगितले.

उत्पन्नावर मर्यादा येत असतानाही तिकिटांत सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांना तिकिटे ही इलेक्ट्रॉनिक तिकिट सिस्टीमद्वारे वितरीत करण्याचे नियोजन आहे. इंधन खर्चात बचत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना डिझेल बचतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केएमटीच्या लेखा विभागाचे संपूर्ण कम्प्युटरायझेशन होणार आहे. त्यामुळे अकाउंट्स विभागाकडील सिस्टिम अद्ययावत, गतीमान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरातील स्वच्छतागृह हटवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेले पुरातन मनकर्णिका कुंड बुजवून त्याठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह बांधून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. मनकर्णिका कुंड पुरातत्व विभागाच्या अखत्यारित समाविष्ट असल्यामुळे शौचालय अनधिकृत आहे. ते तातडीने हटवले नाही तर हिंदू विधीज्ञ परिषदेच्यावतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने दिला. या प्रकाराला जबाबदार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पश्चिम महाराष्ट्र देवस्थन समितीचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. जुना राजवाडा पोलिसठाण्यात तक्रार दाखल केल्याची महिती कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सुनील घनवट म्हणाले, 'अंबाबाई मंदिरातील जी जागा महापालिकेने देवस्थानला उद्यानासाठी दिली. त्याजवळ शौचालय बांधले. मंदिराचे पावित्र्य पाहता हे अयोग्य आहे. जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांना देवस्थान, महापालिकेच्या संगनमताने बांधलेल्या या शौचालयावर आणि देवस्थान समितीतील आर्थिक घोटाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वेळ नाही.'

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले, 'मंदिराच्या आवारात शौचालय बांधणे हा घृणास्पद प्रकार आहे. महापालिकेत सत्ता असलेले लोकप्रतिनिधी यासाठी पुढाकार का घेत नाहीत? भाविकांसाठी अन्य ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करावी.'

अ​धिवक्ते समीर पटवर्धन म्हणाले, 'देवस्थान पुरातत्व खात्याच्या संरक्षित वास्तूमध्ये समाविष्ट आहे. मात्र पुरातत्व विभागाची परवानगी न घेता शौचालय बांधले आहे. हा गुन्हा आहे. आमच्या तक्रारींची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल.'

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, पानसरे खून खटल्यातील गोपनीय गोष्टी माध्यमांसमोर खुल्या करणारे पोलिस महानिरीक्षक संजयकुमार यांना देवस्थानच्या घोटाळ्यातील चौकशी प्रक्रियेची माहिती देताना गोपनीयता आठवते. देवस्थानच्या २५ हजार एकर जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांना, दागिन्यांची खोटी नोंद करणाऱ्यांना ते पाठीशी घालतात. घोटाळ्याची चौकशी सुरू होऊन वर्ष उलटूनही माहिती जाहीर केलेली नाही.'

महेश उरसाल, बंडा साळोखे, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळग्रस्त माय-बापांसाठी सरसावली तरुणाई

0
0

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

कोल्हापूर : 'तुमी आमचं मायबाप....तुमी हाय म्हणून आमी पोटभर खातो...तुमी नसाल, त आमचं काय? तवा आत्महत्या करू नका...तुमच्या अडचणींचं उत्तर आमी शोधू...तुमच्या मागं खंबीरपनं उबं राऊ...पन आत्महत्या करू नका...,' ही आर्त विनवणी आहे महाराष्ट्रातल्या तरुणांची. आत्महत्याग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा विडा या तरुणांनी उचलला आहे. विनायक हेगाणा हा कोल्हापूरचा तरुण या मोहिमेचं नेतृत्व करत असून, शे-दोनशे नव्हे, तर महाराष्ट्रातील तीन हजार तरुणांचे जाळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत आहे. विदर्भ मराठवाडा यात होरपळून निघाला आहे. वैफल्यग्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला आहे. या शेतकऱ्यांना आत्मत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्रातील काही तरुण पुढे आले आहेत. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात शिकणारा विनायक चंद्रकांत हेगाणा हा शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडचा. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ झालेल्या विनायकला आपण घेत असलेले शिक्षण या शेतकऱ्यांच्या कामी आले नाही तर त्याचा काही उपयोग नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्याने गेल्या दीड-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर काम सुरू केले. बीड, वर्धा, यवतमाळ येथील गावांना भेटी देऊन विनायकने तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तेथील काही सामाजिक संस्थांची मदत घेऊन शेतकरी आणि ग्रामस्थांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखविले.

या प्रयत्नांना व्यापक स्तरावर नेण्यासाठी आणखी तरुणांची गरज भासणार असल्याने विनायकने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सोशल मीडिया, स्वयंसेवी संस्थांच्या भेटी यातून विनायकने तीन हजार तरुणांचे जाळे तयार केले आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील सधन जिल्ह्यांमधील तरुणांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचाही समावेश आहे. या सर्व तरुणांना टप्प्याटप्प्याने एक प्रशिक्षण देण्यात येत असून, हे तरुण विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विनायकची धडपड पाहून शिवाजी विद्यापीठातील प्रा. कबीर खराडे यांनी त्याला www.shivarsansad.in ही वेबसाइट सुरू करून दिली आहे. सध्या या वेबसाइटवर मोहिमेची प्राथमिक माहिती आणि संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. भविष्यात वेबसाइट आणखी डेव्हलप करून त्याद्वारे अधिक लोकांना या मोहिमेशी जोडण्याचे नियोजन विनायक आणि त्याचे सहकारी मित्र करत आहेत.

मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, यात तरुणींचा सहभाग लक्षणीय असून, तीन हजारांमध्ये दीड हजारांहून अधिक तरुणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. त्या अतिशय मोकळेपणाने यात काम करण्याची इच्छा व्यक्त करतात असे विनायकने सांगितले. प्रिया पाटील ही विद्यार्थिनी तरुणींच्या संपूर्ण नेटवर्कचे काम पाहते.

तरुणांनीच रोखाव्यात आत्महत्या; 'शिवार संसद संस्थेचे आवाहन

पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या तरुणांची संख्या खूप मोठी आहे. यात सर्व स्तरांतील तरुण आहेत. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मुलेही पुण्यात शिकण्यासाठी आहेत. या तरुणांची फळी आपल्या मोहिमेत खूप उपयोगी पडेल, असे विनायक हेगाणा याला वाटते. तोच धागा पकडून त्याने पुण्यातील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात आजवर विनायकची तीन प्रेझेंटेशन्स झाल्याचे विनायकने सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याकडून काही तरी प्रयत्न झाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन काम सुरू करणारा विनायक सुरुवातीला एकटाच होता. मात्र, त्याच्या प्रयत्नांची माहिती जसजशी नागरिकांना होत गेली तशी त्याला मदत मिळत गेल्याचे विनायकने सांगितले.

विनायकला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, फेडरल बँकेचे महेश निकम, कृषी पत्रकार रावसाहेब पुजारी, सुहास राजेभोसले यांची मदत मिळत आहे. त्याचबरोबर त्याच्या महाविद्यालयातील त्याचे मित्र, माजी विद्यार्थी या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वुमेन्स बाइक रॅलीची महिलांमध्ये उत्सुकता शिगेला

0
0

दररोज कामाच्या निमित्ताने बाइक चालविणाऱ्या कोल्हापुरातील महिला रविवारी (ता.१३) बाइक चालविणार आहेत. मात्र, ही बाइकची राइड असणार आहे ती त्यांच्यातील आत्मविश्वास आणि स्वावलंबनाला सलाम करण्यासाठी. बाइकच्या साथीने नोकरी, व्यवसाय आणि घर यामधील जबाबदाऱ्यांची लढाई नेटाने लढत स्वत:ला घडवणाऱ्या महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने एक राइड स्वत:साठी हा मंत्र जपणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित केलेल्या वुमेन बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांचा उत्साह वाढत आहे.

कॉलनी, अपार्टमेंट, सोसायटीतील महिलांसोबत कार्यालयीन ग्रुप, भिशी मेंबर, मुलांच्या पालकांचे ग्रुप एकत्र येऊन या बाइक रॅलीत सहभागी होणार आहेत. नोकरदार महिला, कॉलेज तरूणी आणि गृहिणींमध्ये आता या रॅलीचीच चर्चा सुरू आहे. महिला शक्ती आणि एकजुटीचे दर्शन घडवणारी ही बाइक रॅली रविवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. संजय घोडावत ग्रुपच्या फ्रूस्टार आणि भारत पेट्रोलियमच्या स्पीड पेट्रोलतर्फे या रॅलीसाठी प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे.

'मटा'च्या वतीने कोल्हापुरात याआधी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद 'महाराष्ट्र टाइम्स वुमन्स बाइक रॅली'लाही मिळाला आहे. जागतिक महिलादिनानिमित्ताने रविवारी बाइक रॅलीच्या माध्यमातून महिला शक्ती आणि एकजुटीचे अनोखे दर्शन घडणार आहे. रॅलीला सकाळी साडेसात वाजता गांधी मैदान येथून प्रारंभ होणार असून राजाराम कॉलेजच्या मैदानावर सांगता होणार आहे. महिलांच्या एकजुटीचे दर्शन आणि त्यांच्यातील स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कर्तृत्वाचे पंख लेवून विविध क्षेत्रांत गगनभरारी घेणाऱ्या महिला शक्तीच्या सन्मानार्थ होणाऱ्या या बाइक रॅलीविषयी शहरात प्रचंड उत्सुकता आहे. रॅलीमध्ये शहर आणि परिसरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थिनी, युवती व महिला संघटना, नोकरी, व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलाही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. कॉलेजमधील एनएसएस व एनसीसीमधील विद्यार्थिनी कॅडेट्स युनिटच्या वेशभूषेत रॅलीत सहभागी होणार आहेत. महिला शक्तीचा गजर करत रॅली मार्गस्थ होईल. कोल्हापुरात दुचाकी चालविणाऱ्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, पण तरीही वेळ पडली तर अजूनही बाइक काढू शकणाऱ्या यंग सीनिअर महिलावर्गालाही सलाम करण्यासाठी महिला बाइक रॅलीचे व्यासपीठ 'मटा'तर्फे देण्यात आले आहे.



स्थळ - गांधी मैदान, शिवाजी पेठ, कोल्हापूर

दिनांक - १३ मार्च २०१६

वेळ - सकाळी ७.३० वा.

बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, ​​बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोडमार्गे दसरा चौक, व्हीनस कॉर्नर , लक्ष्मीपुरी, उमा टॉकीजमार्गे बागल चौक, राजाराम रोड, राजारामपुरीमार्गे राजाराम कॉलेज.

राजाराम कॉलेज येथे महिलांसाठी स्पॉट गेम्सचे आयोजन केले आहे.

कॉल करा 6622319 वर किंवा SMS करा Bikerally KHP 58888 वर

किंवा लॉगऑन करा http://mtonline/womenbikerally

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लावणीला महिलांची उत्स्फूर्त दाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिलखेचक अदाकरी, ढोलकीचा ठेका, घुंगराचा बोल, महिलांचा अपूर्व उत्साह आणि सोबतीला रंकाळ्यावरील वाऱ्याची झुळूक अशा उत्साही वातावरणात रंकाळा पदपथ उद्यानावर लावणी महासंग्राम कार्यक्रम झाला. दिलखेचक सादर केलेल्या लावण्यांनी महिला रसिक डोलले.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सादर केलेल्या गाण्याला आणि विविध कार्यक्रमाला महिला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागतिक महिला दिनानिमित्त महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने महासंग्राम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहभागी कलाकारांनी 'रात्र धुंदीत जागवा,' 'कैरी पाडाची,' 'नाद खुळा,' 'साजूक तुपातली,' 'छत्तीस नखरेवाली,' आदी गाण्यांवर अदाकारी सादर केल्या.

महापौर आश्विनी रामाणे, शांतादेवी डी. पाटील, प्रतिमा सतेज पाटील, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, नियाज खान, महाजन पब्लिसिटीचे प्रफुल्ल महाजन, नगरसेवक प्रताप जाधव, तौफिक मुल्लाणी, वृषाली कदम, प्रक्षप्रतोद प्रवीण केसरकर, छाया पोवार आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते असे रॅली ः एकटी ग्रुप, गार्डन क्लब, संवेदनाशक्ती एचआयव्ही, उत्तेजनार्थ ः प्राथमिक शिक्षण मंडळ, केआयटी कॉलेज ग्रुप. ग्र्रुप डान्स स्पर्धा ः युवती गट क्रमांक १ -संग्राम भालकर ग्रुप कला अकॅडमी, नीलम सारडा ग्रुप, फोनिक्स ग्रुप, उत्तेजनार्थ- अपूर्वा मालपेकर ग्रुप. गट क्रमांक २ (महिला) - राजनंदिनी पत्की ग्रुप, वंदे मातरम, आदी शक्ती ग्रुप. फॅशन शो ः निलम सारडा ग्रुप, समृद्धी ग्रुप, शिवानी शिंगाडे ग्रुप, राधेय ग्रुप. मिस युवती स्पर्धा - निकीता पिसे, पूर्वा कोडोलीकर, आयेशा सय्यद. मिसेस गृहिणी स्पर्धा- हेमा जाधव, स्नेहा सारडा, प्राजक्ता देशपांडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहाच्या आवारातच प्रॅक्ट‌िस थिएटर

0
0

Appasaheb.Mali @timesgroup.com

नाट्यप्रयोग सादर करावयाचा आहे, पण सरावासाठी हॉल नाही, सादरीकरणासाठी आवश्यक रंगमंच नाही अशा तक्रारी भविष्यकाळात उद्भभवणार नाहीत. कारण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्याच आवारात खास प्रॅक्टीस थिएटर साकारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील विकासकामात त्याचा समावेश आहे.

नाट्यगृहाच्या उजव्या बाजूला पार्किंग मजला उभारणार असून त्यावर प्रॅक्टीस थिएटर असेल. परिसरात पेव्हिंग ब्लॉक व त्यात डिझाइनयुक्त हिरवळ असेल. लॉनमध्ये बैठकव्यवस्था असेल. चार कोटी वीस लाख रुपये खर्चून कुस्ती म्युझियमची निर्मितीही होणार आहे. सध्याच्या अस्ताव्यस्त खाऊगल्लीलाही नवा लूक मिळणार आहे. नाट्यगृहाच्या उजव्या बाजूच्या जागेत पार्किंग म​जला असणार आहे. त्या ठिकाणी १०० कार आणि ३०० दुचाकी वाहनांची सोय होईल. या मजल्यावर प्रॅक्टीस थिएटर साकारणार आहे. प्रॅक्टीस थिएटरची रचना वैशिष्ट्यपूर्ण असेल. मध्यवर्ती ठिकाणी सादरीकरण मंच, चारही बाजूला बैठक व्यवस्था असून त्याला कलात्मक टच असेल. थिएटरला साउंड सिस्टीमची जोड असणार आहे. प्रॅक्टीस थिएटर कलावंतासाठी उपयुक्त ठरणार आहे. येथे कलादालन असणार आहे. सूरत अंजली असोसिएटसने त्याचा आराखडा तयार केला आहे.

महापालिकेने नाट्यगृह व खासबाग मैदान नूतनीकरणाचा दुसऱ्या टप्प्यातील आराखडा सरकारकडे सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या नूतनीकरणावर दहा कोटी रुपये खर्ची पडले आहेत. चौदा कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. यासाठी जुलै २०१६ पर्यंत निधी उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे भविष्यात नाट्यगृह व खासबाग मैदान परिसराचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.

अस्ताव्यस्त पार्किंग, कुठेही लावलेल्या केबिन हे चित्र बदलून या भागाला शाही लूक मिळणार आहे. नाट्यगृहाला लागूनच दगडी कमान उभारण्यात येणार असून त्यामधून खाऊगल्लीत प्रवेश असेल. सध्याच्या केबिनऐवजी गाळे करणे आणि दगडी कमानीच्याद्वारे शोभा वाढविली जाणार आहे. राजर्षी शाहू खासबाग मैदानासाठी मिरजकर तिकटी परिसराकडून प्रवेशद्वार असेल. या भागातच कुस्ती म्युझियम असेल. या म्युझियमच्या माध्यमातून कुस्तीचा इतिहास उलगडणार आहे. कुस्ती संदर्भातील माहिती, कोल्हापुरातील गाजलेल्या कुस्तींची छायाचित्रे, मल्लांची माहिती, त्यांचे फोटोग्राफ्स कोल्हापूरचे योगदान याचे एकत्रित दर्शन घडेल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे यांनी दिली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसाला निसर्गाच्या जवळ आणा

0
0

कोल्हापूर : 'जग ग्लोबल झालं, पण माणूस निसर्गापासून दूर गेला. या माणसाला निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी तुमच्या कामातून तुम्ही काही करू शकत असाल, तर करा,' असा सल्ला ख्यातनाम आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी तरुणांना दिला. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्यावतीने बेरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बेरी बोलत होते.

बेरी यांनी त्यांच्या 'लय' या नव्या निवासस्थानाविषयीची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. हे निवासस्थान बांधण्यामागील संकल्पना, त्यासाठी वापरलेल्या टाकाऊ वस्तू आणि बांधकामाचे टप्पे याची सविस्तर माहिती बेरी यांनी दिली. शाहू स्मारकमध्ये झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

बेरी म्हणाले, 'माणूस निसर्गापासून दूर जात आहे. तसाच तो इतर माणसांपासून आणि स्वतःपासूनही दूर जात आहे. त्याला निसर्गाजवळ, माणसांजवळ आणि विशेष म्हणजे स्वतः जवळ आणण्याची गरज आहे. आपण सिंपल, सुटसुटीत आणि इकोफ्रेंडली घर बांधू शकतो का, याचा विचार झाला पाहिजे.' यावेळी बेरी यांनी स्लाइड शोमध्ये जागेचा अवास्तव वापर करून बांधलेली घरे आणि इको फ्रेंडली घरे यांची विचार करायला लावणारी छायाचित्रे दाखविली.

बेरी म्हणाले, 'सध्या माणूस स्वतःला महत्त्वाचा समजतो. त्यामुळे आपण काहीही करू शकतो, अशा अविर्भावात तो काहीही करत आहे. आता माणसाने ऊर्जा वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करावा.'

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बेरी यांनी समर्पक उत्तरे दिली. प्राचार्य डॉ. विजय घोरपडे, आर्किटेक्ट विभागप्रमुख आर. जी. सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातून फुलणार ‘दुनिया मोरांची’

0
0

कोल्हापूर : चित्रकार, छायाचित्रकार विजय टिपुगडे यांच्या 'दुनिया मोरांची' या छायाचित्र प्रदर्शनाचा प्रारंभ रविवार, ता. १३ रोजी होत आहे. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात 'निवडक कलासाधना' आणि 'दुनिया मोरांची' या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.

रेखासम्राट टी.के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'गुरूशिष्य' परिवारातर्फे दरवर्षी विविध उपक्रम होतात. यावर्षी टी.के. वडणगेकर यांचे शिष्य विजय टिपुगडे यांनी टिपलेल्या मोरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शन १९ मार्चपर्यंत सकाळी ९,३० ते रात्री ९ वाजेपर्यत खुले आहे.

मोराचे आकर्षण सर्वानाच असते. मोराच्या सौंदर्यांची भुरळ पडणार नाही असा माणूस दुर्मिळच. मूर्तीमंत सौंदर्य असणाऱ्या मोरांचा लखलखता निळाशार रंग, मनोहारी पिसारा मन मोहीत करतो. पिसारा फुलवून नाचणारा मोर याशिवाय मोराच्या इतरही काही मुद्रा विलोभनीय असल्या तरी त्या सहजपणे पाहायला मिळणे कठीण असते. त्यासाठी नियमित पाठपुरावा करण्याची चिकाटी, एकाग्रता, कलेची नजर आणि मुख्य म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासास धक्का न बसू देण्याची मोठी जबाबदारी पेलावी लागते. हे काम टिपुगडे यांनी केले असून त्यांनी आतापर्यत मोराच्या दीड हजाराहून अधिक मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत. यातील निवडक छायाचित्रांची मांडणी रसिकांसाठी करण्यात येणार आहे.

टिपुगडे यांनी स्थापन केलेल्या 'कलासाधना मंच'ची यावर्षी दशकपूर्ती आहे. या दशकात त्यांनी चित्रकला, रंगावली, छायाचित्र अशा माध्यमात काम केले. या मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडविले. असंख्य कलाकृती साकारल्या. या कलाकृतींची प्रदर्शने झाली. पुरस्कारही मिळाले. यातील निसर्गचित्रांचे 'रंग दंग' आणि छायाचित्रांचे 'सह्याद्रीच्या कुशीत' या पुस्तकांसह निवडक रंगावलींचा छायाचित्र संच प्रसिध्द झाला आहे. आता दशकभरात साकारलेल्या कलाकृतीतील निवडक कलाकृती पुस्तकरूपाने प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फ डिफेन्स कार्यशाळा नोंदणीसाठी प्रतिसाद

0
0

कोल्हापूर : महिलांसाठी मोफत आयोजित केलेल्या स्वसंरक्षण कार्यशाळेच्या नोंदणीसाठी महिला आणि युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. १३ मार्चला ही कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यासाठी अद्यापही नोंदणी करता येईल. मिसाइल ग्रुप आणि कुकी दो ज्युदो कराटे ऑर्गनायझेशन यांच्यावतीने महिला दिनानिमित्त संकटकाळी किंवा असुरक्षित ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रसंग महिलांवर आला तर त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंचाच स्वसंरक्षणासाठी शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल, याची प्रात्यक्षिकासह माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. १३ मार्चला दुपारी तीन ते सहा यावेळेत दसरा चौक येथील नेहरू हायस्कूल येथे महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबअंतर्गत ही कार्यशाळा होत आहे.

सध्या कामाच्या निमित्ताने महिलांचे शहरात फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा रात्री उशीरा महिलांना एकटीने प्रवास करावा लागतो. उपनगरात राहणाऱ्या महिला, युवती यांना दुपारी व रात्रीच्यावेळी घरी एकटीने जावे लागते. अशा परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडला तर प्रतिकार करण्यासाठी महिलांना तातडीने शस्त्र उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे महिलांच्या वापरातील काही वस्तूंचाच वापर शिताफीने स्वसंरक्षणासाठी करता येऊ शकतो. यासंदर्भात या कार्यशाळेत माहिती व अशा नित्य वापरातील वस्तूंचा रक्षणासाठी वापर करण्याच्या टिप्स देण्यात येणार आहेत.

ज्युदो कराटेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश वडणगेकर आणि अविनाश पाटील, मिसाइल ग्रुपचे संस्थापक सद्दाम मुजावर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी सतीश वडणगेकर (९८५००४५५३७) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरातील बिल्डर बंधू जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विम्याच्या ३५ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यासाठी स्वतःच्या मृत्युचा बनाव करणाऱ्या दोघा बांधकाम व्यावसायिक बंधूंच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्या. अमोल जयवंत पवार (वय ३१) व विनायक जयवंत पवार (३५, दोघे रा. अपराध कॉलनी, सानेगुरूजी वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अमोल पवारने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. या दोघांनी सेंट्रिंग कामगार रमेश कृष्णाप्पा नाईक (वय १९ रा. गडहिंग्लज) याचा खून केल्याचे गुरूवारी उघड झाले.

पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती दिली. आजरा- आंबोली रस्त्यावर आर्दाळजवळ लक्ष्मीपुलाखालील ओढ्यात २९ फेब्रुवारीला जळालेली मोटार आढळली होती. तीत चालकाच्या हाडाचा सांगाडा मिळाला. मोटारीचा इंजिन आणि चेसिस क्रमांक तपासला असता कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अमोल पवारच्या मालकीची मोटार असल्याचे लक्षात आले. मोटारीतील हाडाचा सांगाडा पवार यांचा आहे का, या दृष्टीने तपास सुरू केला. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक पोवार यांनी बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या बँका, पतसंस्था व खासगी सावकारांच्या कर्जाची माहिती घेतली. तसेच अमोलने मोठ्या रकमेचा विमाही उतरवल्याचे लक्षात आले.

दरम्यान, पोलिसांना अमोल हा जिवंत असून तो बेंगळुरू, चैन्नई आणि कोची या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार विकास जाधव, रमेश खुणे यांचे पथक रवाना झाले. त्यांनी कोची येथून अमोलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रमेश नाईकचा खून केल्याची कबुली दिली.

दोघा भावांना पोलिसांनी अटक केली असून पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, गडहिंग्लज पोलिस उप अधीक्षक सागर पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते आदी उपस्थित होते.


मृतदेहाच्या हातात घड्याळ बांधले

खोदाईच्या कामासाठी दिवसाला १७०० रूपये पगार देण्याचे आमिष दाखवून अमोल व विनायक यांनी रमेशला मोटारीतून आजरा आंबोली रोडवर नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून केला. या दोघा भावानी रमेशला अमोलचे कपडे घातले. तसेच अमोलने स्वतःचे घड्याळ मृतदेहाच्या हातात बांधले. त्यानंतर रमेशचा मृतदेह मोटारीत घालून ओढ्याच्या खड्ड्यात ढकलून दिला. खड्ड्यात जाऊन मोटारीचे बॉनेट उघडून इंजिन, मोटारीच्या सीटवर डिझेल टाकून पेटवून दिली. मोटार आणि रमेशचा मृतदेहही जळून खाक झाला. त्यानंतर दोघे भाऊ पळून गेले.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ नगरसेवकांची जातपडताळणी

0
0

२७ नगरसेवकांची जातपडताळणी

पडताळणी समितीकडून कसून चौकशी

Appasaheb.mali@timesgroup.com

महापालिका निवडणुकीत आरक्षण बदलानंतर आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या २७ नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात पडताळणी समितीने चौकशी सुरू केली आहे. ज्या नगरसेवकांच्या दाखल्याविषयी तक्रारी आल्या आहेत त्यांच्या दाखल्याच्या सत्यतेसाठी पोलिसांनी शाळेपर्यंत शोधमोहीम राबवली. तसेच प्रभागातील यंग सीनियर्सकडेही चौकशी झाली आहे. १७ किंवा १८ मार्चला एकाच दिवशी १८ नगरसेवकांची समितीसमोर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.

चौकशीत काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी, विरोधी ताराराणी आघाडी, भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका सदस्याची चौकशी झाल्याचे वृत्त आहे. चौकशीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत माजी पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्यांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी, प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होताच ओबीसी दाखला जोडत निवडणूक लढविली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत संबंधित प्रवर्गातील नगरसेवकांला महापालिकेकडे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

महापालिकेचा निकाल दोन नोव्हेंबरला जाहीर झाला आहे. त्यानुसार एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचवेळी जात पडताळणी समितीलाही उमेदवारांनी मागणी केलेल्या तारखेनुसार सहा महिन्याच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. दीड महिन्याचा कालावधी उरल्याने पडताळणी समितीकडून चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जात प्रमाणपत्र दाखल्यासाठी मागणी केलेल्या तसेच ज्या नगरसेवकाविरोधात तक्रारी आहेत त्यांची चौकशी करण्यात आली. जातीच्या दाखल्याचे पुरावे, कागदपत्रे तपासली आहेत.

पडताळणी समितीकडून चौकशी आणि सुनावणीची तारीख जवळ आल्याने आक्षेप असलेल्या नगरसेवकांची धांदल उडाली आहे. कागदपत्रासाठी त्यांची यंत्रणा वेगावली आहे. २७ पैकी १५ हून अधिक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यामध्ये महिला सदस्यांचा समावेश आहे. आरक्षण बदलल्यामुळे ओबीसीचा दाखला काढत आई, पत्नी यांना उमेदवारी देत निवडून आणले आहे. महापालिकेच्या एकूण ३३ आरक्षित प्रभागांपैकी २७ जणांची चौकशी झाल्याने सारेच अस्वस्थ आहेत.

.......

महापालिकेची एकूण सदस्य संख्या ८१

सर्वसाधारण प्रवर्ग पुरूष : २४

सर्वसाधारण प्रवर्ग महिला : २४

इतर मागास प्रवर्ग पुरूष : ११

इतर मागास प्रवर्ग महिला : ११

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरूष : ०५

अनुसू​चित जाती प्रवर्ग महिला : ०६

पडताळणी समितीकडून कसून चौकशी

Appasaheb.mali@timesgroup.com

महापालिका निवडणुकीत आरक्षण बदलानंतर आरक्षित प्रवर्गातून निवडून आलेल्या २७ नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात पडताळणी समितीने चौकशी सुरू केली आहे. ज्या नगरसेवकांच्या दाखल्याविषयी तक्रारी आल्या आहेत त्यांच्या दाखल्याच्या सत्यतेसाठी पोलिसांनी शाळेपर्यंत शोधमोहीम राबवली. तसेच प्रभागातील यंग सीनियर्सकडेही चौकशी झाली आहे. १७ किंवा १८ मार्चला एकाच दिवशी १८ नगरसेवकांची समितीसमोर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.

चौकशीत काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी, विरोधी ताराराणी आघाडी, भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका सदस्याची चौकशी झाल्याचे वृत्त आहे. चौकशीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत माजी पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्यांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी, प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होताच ओबीसी दाखला जोडत निवडणूक लढविली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत संबंधित प्रवर्गातील नगरसेवकांला महापालिकेकडे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

महापालिकेचा निकाल दोन नोव्हेंबरला जाहीर झाला आहे. त्यानुसार एप्रिलपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याचवेळी जात पडताळणी समितीलाही उमेदवारांनी मागणी केलेल्या तारखेनुसार सहा महिन्याच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. दीड महिन्याचा कालावधी उरल्याने पडताळणी समितीकडून चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जात प्रमाणपत्र दाखल्यासाठी मागणी केलेल्या तसेच ज्या नगरसेवकाविरोधात तक्रारी आहेत त्यांची चौकशी करण्यात आली. जातीच्या दाखल्याचे पुरावे, कागदपत्रे तपासली आहेत.

पडताळणी समितीकडून चौकशी आणि सुनावणीची तारीख जवळ आल्याने आक्षेप असलेल्या नगरसेवकांची धांदल उडाली आहे. कागदपत्रासाठी त्यांची यंत्रणा वेगावली आहे. २७ पैकी १५ हून अधिक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. यामध्ये महिला सदस्यांचा समावेश आहे. आरक्षण बदलल्यामुळे ओबीसीचा दाखला काढत आई, पत्नी यांना उमेदवारी देत निवडून आणले आहे. महापालिकेच्या एकूण ३३ आरक्षित प्रभागांपैकी २७ जणांची चौकशी झाल्याने सारेच अस्वस्थ आहेत.

.......

महापालिकेची एकूण सदस्य संख्या ८१

सर्वसाधारण प्रवर्ग पुरूष : २४

सर्वसाधारण प्रवर्ग महिला : २४

इतर मागास प्रवर्ग पुरूष : ११

इतर मागास प्रवर्ग महिला : ११

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरूष : ०५

अनुसू​चित जाती प्रवर्ग महिला : ०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वच्छतेच्या कामासाठी तीनशे रूपये देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री राजेंद्रनगर परिसरात घडली. गुन्ह्यातील संशयित फरारी आहेत.

राजेंद्रनगर परिसरात काही कुटुंबे मोलमजुरी करून गुजराण करतात. बुधवारी रात्री मोटारसायकलवरून एक व्यक्ती परिसरात आली. नवीन इमारतीत फरशी पुसण्याचे व वाळलेले गवत काढायचे असून प्रत्येक व्यक्तीला तीनशे रूपये मजुरी मिळेल असे संशयित व्यक्तीने सांगितले. फिर्यादी महिलेने तीन ते चार महिला कामावर येतील असे सांगून ती अन्य महिलांना बोलवायला गेली. दरम्यान, महिलेची मुलगी व तिचा नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाला संशयिताने मोटारसायकलवरून नेले. दरम्यान, संबंधित महिला परत घरी आली असता कामाची विचारणा करायला आलेली व्यक्ती, मुलगी व नातेवाईक मुलगा दिसला नाही. तिने ही घटना परिसरातील नातेवाईकांना सांगितली. त्यांनी शोध घ्यायला सुरूवात केली.

दरम्यान, संशयित राजेंद्रनगर परिसरातील स्टार अशियाना इमारतीजवळ मुलगा व मुलीला घेऊन आला. इमारतीशेजारील स्वच्छता करण्यासाठी त्याने शेजारच्याकडून खराटा मागून घेतला. या दोघांनी थोडा वेळ काम केल्यानंतर संशयिताने मुलीला मोटारसायकलवरून परिसरातील माळावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही घटना कुणालाही सांगायची नाही, असा दम देत त्याने मुलीला सोडून दिले.

दरम्यान, मुलीचा नातेवाईक असलेला १५ वर्षाचा मुलगा अर्धा तास वाट पाहून पुन्हा राजेंद्रनगर परिसरातील घरात आला. त्याने ही घटना मुलीच्या आईला सांगितली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात येऊन ही घटना सांगितली. मुलीचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी शोध सुरू केला. रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही मुलगी रडत घरी निघाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने बलात्कार झाल्याचे सांगितल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला सीपीआर हॉस्पिटलला नेण्यात आले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूच्या संशोधकाने उलगडले वेरुळ चित्रांचे रहस्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंधराशे वर्षांनंतरही वेरूळमधील गुफाचित्रे आजही सुरक्षित असल्याचे रहस्य कोल्हापूरच्या युवा संशोधकाने शोधून काढले आहे. गुफेमधील भिंतीवर लेप करताना माती व चुन्याबरोबरच गांजा वापरल्याने ती आजही सुरक्षित असल्याचा शोध प्रा. मिलिंद सरदेसाई यांनी पुराव्यासह लावला आहे. देसाई मूळचे पन्हाळ्यातील आहेत. सध्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

औरंगाबादपासून तीस किमी असलेल्या वेरूळ येथे पंधराशे वर्षांपूर्वी लेणी कोरली आहेत. पाचव्या ते दहाव्या शतकात तेथे अनेक प्रकारची चित्रे कोरली आहेत. स्थापत्य व शिल्पकलेचा हा सर्वोत्तम संगम आहे. यातील बौद्ध लेणी दक्षिणाभिमुख आहेत. या लेण्यामधून कलात्मकतेचा भव्य आविष्कार घडतो. त्यामधील १२ क्रमांकाच्या गुफेतील चित्रे एवढ्या वर्षानंतरही आहे तशीच कशी आहेत याबाबत उत्सुकता होती. त्यातून त्याचे रहस्य शोधण्याचे काम केंद्रीय पुरातत्व विभागाने हाती घेतले. त्याची जबाबदारी प्रा. सरदेसाई व या विभागाचे व्यवस्थापक राजदेव सिंग यांच्यावर सोपवण्यात आली. या दोघांनी अनेक महिने मेहनत घेऊन संशोधन सुरू ठेवले. त्यासाठी तेथे असलेल्या ३४ गुफांपैकी बाराव्या गुफेचा अभ्यास केला. देशातील अनेक ठिकाणच्या पर्यटनस्थळांना भेट देऊन त्यांनी नव्या रहस्यावर प्रकाश टाकला.

या गुफेत हिंदू, जैन आणि बौद्ध अशा तीन प्रकारची चित्रे आहेत. दगडावर चित्रे काढण्यापूर्वी त्यावर चुना-मातीच्या मिश्रणाबरोबर दहा टक्के वनस्पती मिसळून त्याचा लेप दिल्याचे लक्षात आले. याचे सॅम्पल घेऊन दोघांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी त्याची पडताळणी केली. तेव्हा त्यांना यात वापरलेली वनस्पती गांजाच असल्याची खात्री झाली. अमेरिका व युरोपमधील अनेक पर्यटनस्थळांच्या इमारतीच्या बांधकामात पूर्वी याचा वापर होत असे. हे तपासल्यानंतर वेरूळच्या चित्रात गांजा वापरल्याचे स्पष्ट झाल्याने याबाबतचे संशोधन मार्चच्या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या माध्यमातून त्यांचे हे संशोधन जगभर पोहचले आहे.

या संशोधनाबाबत देसाई त्यांनी सांगितले की, पुरातत्व विभागाने आमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आम्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फोरियर ट्रान्सफॉर्म, इन्फारेड स्पेक्टॉकॉपी व स्टेरिओ मायक्रोस्कोप या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहचता आले.

=====

पंधराशे वर्षांनंतरही वेरूळमधील चित्रे सु​रक्षित राहण्यामागे गांजा हीच वनस्पती आहे. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे ती वापरलेल्या वस्तूला किंवा घटकाला कीड लागत नाही. त्यात डिंकासारखे गुणधर्म असतात. शिवाय कोणत्याही वातावरणाचाही त्यावर परिणाम होत नाही. अजंठा लेणीत त्याचा वापर न झाल्याने तेथील चित्रे काही प्रमाणात खराब झाली आहेत.

- प्रा. मिलींद सरदेसाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाजपत्रकात नाविन्याचा अभाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवाढीला झालेला विरोध आणि घटलेले उत्पन्न यामुळे आर्थिकदृष्ट्या ​अरिष्टात असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांसाठी कोणताही नवीन प्रकल्प नाही. प्रशासनाने सरकारी अनुदानावर अवलंबून स्थानिक संस्था कर, घरफाळा विभाग आणि नगररचना विभागाच्या महसुलीचे अवास्तव लक्ष्य ठेवले आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच इ-प्रशासनावर भिस्त ठेवली आहे. घरफाळा फेरसर्वेक्षण, स्पॉट बिलिंग, वॉटर ऑडीट, पार्किंग आणि होर्डिंग्ज पॉलिसीची अंमलबजावणीतून उत्पन्नात वाढ साधण्याबरोबरच खर्चात काटकसर हे आगामी वर्षाचे महापालिकेच्या कामकाजाचे सूत्र राहील. प्रशासनाकडून शुक्रवारी स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात ही बाब स्पष्ट झाली. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे अंदाजपत्रक आहे. पर्यावरणीय कामासाठी जवळपास ११७ कोटी रुपयांची (२८ टक्के) रकमेची तरतूद आहे.

महासभेने उत्पन्नवाढीचे प्रस्ताव नामंजूर केल्याने भविष्यात विविध प्रकल्पांसाठी उभारायच्या निधीत अडचणी निर्माण होऊ शकतात हे निदर्शनास आणले आहे. उत्पन्नाअभावी नवीन प्रकल्प, योजना कार्यान्वित करण्याऐवजी सध्याच्या थेट पाइपलाइन योजना, सेफ सिटी, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, मंदिर विकास आराखडा या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवरच प्रशासनाचा भर आहे. आगामी वर्षात आस्थापनेवरील खर्च १८० कोटी ५६ लाख रुपये अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या खर्चात यावर्षी सात कोटींनी वाढ झाली आहे. प्रशासनाने स्थानिक संस्था करांतर्गत मिळणारे सरकारी अनुदान व मुद्रांक शुल्क विचारात घेऊन एलबीटी उत्पन्न १२४ कोटीपर्यंत अपेक्षित धरले आहे. यावर्षी एलबीटीच्या माध्यमातून ९० कोटीपर्यंत महसूल जमा झाला आहे.

००००००००००

४३५ कोटी ५९ लाख ९७ हजार ३४३ रुपये

अव्वल शिल्लकीसह महसुली व भांडवली जमा रक्कम अपेक्षित

४३० कोटी ३ लाख ४४ हजार खर्च

५ कोटी २६ लाख ५३ हजार ३४३ शिल्लक

विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचा जमाखर्च (अपेक्षित)

६७४ कोटी ३३ लाख २६ हजार ६९८ रपये जमा रक्कम

५७६ कोटी १५ लाख ३१ हजार रुपये खर्च

०००००००

४८ कोटी ५२ लाख ९५ हजार ५१५ जमा

वित्त आयोगाच्या माध्यमातून

४७ कोटी ९० लाख रुपये खर्च

००००००

५० कोटी ९८ लाख आणि ४६ कोटी ४४ लाख रुपये

नगररचना व घरफाळा विभागातून कराचे उद्दिष्ट

....................

अंदाजपत्रकातील ठळक बाबी....

सेफ सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी (सरकारी अनुदानातून)

​संपूर्ण शहरभर एलइडी प्रकल्प

महापालिका कार्यालय उद्यानात सौरउर्जेचा वापर

एप्रिलपासून स्पॉट बिलिंग

पाण्याचे ऑडीट करून वितरणातील त्रुटी शोधणार

तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मोबाइल अॅपची सुविधा

इ हॉस्पिटल प्रणाली, खासगीकरणातून उद्यानांचा विकास

​पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती अंतर्गत शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया

करवसुलीचे अवास्तव उद्दिष्ट

पुन्हा सरकारी अनुदानावरच मदार

प्रशासनाकडून स्थायीला अंदाजपत्रक सादर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवाढीला झालेला विरोध आणि घटलेले उत्पन्न यामुळे आर्थिकदृष्ट्या ​अरिष्टात असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांसाठी कोणताही नवीन प्रकल्प नाही. प्रशासनाने सरकारी अनुदानावर अवलंबून स्थानिक संस्था कर, घरफाळा विभाग आणि नगररचना विभागाच्या महसुलीचे अवास्तव लक्ष्य ठेवले आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच इ-प्रशासनावर भिस्त ठेवली आहे. घरफाळा फेरसर्वेक्षण, स्पॉट बिलिंग, वॉटर ऑडीट, पार्किंग आणि होर्डिंग्ज पॉलिसीची अंमलबजावणीतून उत्पन्नात वाढ साधण्याबरोबरच खर्चात काटकसर हे आगामी वर्षाचे महापालिकेच्या कामकाजाचे सूत्र राहील. प्रशासनाकडून शुक्रवारी स्थायीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात ही बाब स्पष्ट झाली. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे अंदाजपत्रक आहे. पर्यावरणीय कामासाठी जवळपास ११७ कोटी रुपयांची (२८ टक्के) रकमेची तरतूद आहे.

महासभेने उत्पन्नवाढीचे प्रस्ताव नामंजूर केल्याने भविष्यात विविध प्रकल्पांसाठी उभारायच्या निधीत अडचणी निर्माण होऊ शकतात हे निदर्शनास आणले आहे. उत्पन्नाअभावी नवीन प्रकल्प, योजना कार्यान्वित करण्याऐवजी सध्याच्या थेट पाइपलाइन योजना, सेफ सिटी, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, मंदिर विकास आराखडा या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवरच प्रशासनाचा भर आहे. आगामी वर्षात आस्थापनेवरील खर्च १८० कोटी ५६ लाख रुपये अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या खर्चात यावर्षी सात कोटींनी वाढ झाली आहे. प्रशासनाने स्थानिक संस्था करांतर्गत मिळणारे सरकारी अनुदान व मुद्रांक शुल्क विचारात घेऊन एलबीटी उत्पन्न १२४ कोटीपर्यंत अपेक्षित धरले आहे. यावर्षी एलबीटीच्या माध्यमातून ९० कोटीपर्यंत महसूल जमा झाला आहे.

००००००००००

४३५ कोटी ५९ लाख ९७ हजार ३४३ रुपये

अव्वल शिल्लकीसह महसुली व भांडवली जमा रक्कम अपेक्षित

४३० कोटी ३ लाख ४४ हजार खर्च

५ कोटी २६ लाख ५३ हजार ३४३ शिल्लक

विशेष प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचा जमाखर्च (अपेक्षित)

६७४ कोटी ३३ लाख २६ हजार ६९८ रपये जमा रक्कम

५७६ कोटी १५ लाख ३१ हजार रुपये खर्च

०००००००

४८ कोटी ५२ लाख ९५ हजार ५१५ जमा

वित्त आयोगाच्या माध्यमातून

४७ कोटी ९० लाख रुपये खर्च

००००००

५० कोटी ९८ लाख आणि ४६ कोटी ४४ लाख रुपये

नगररचना व घरफाळा विभागातून कराचे उद्दिष्ट

....................

अंदाजपत्रकातील ठळक बाबी....

सेफ सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी (सरकारी अनुदानातून)

​संपूर्ण शहरभर एलइडी प्रकल्प

महापालिका कार्यालय उद्यानात सौरउर्जेचा वापर

एप्रिलपासून स्पॉट बिलिंग

पाण्याचे ऑडीट करून वितरणातील त्रुटी शोधणार

तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मोबाइल अॅपची सुविधा

इ हॉस्पिटल प्रणाली, खासगीकरणातून उद्यानांचा विकास

​पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती अंतर्गत शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images