Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शेतीसाठी उपसा बंदी करण्याचे कठोर निर्णय घेतले जात आहेत. अनेक ठिकाणी टंचाई आराखड्यातील उपाययोजना तयार केल्या जात आहेत. तर अनेक भागात तीन-तीन दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. सर्वच ठिकाणी पाण्याची काटकसर सुरू असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून मात्र रोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. पुईखडीजवळ, आपटेनगर कळंबा रोडवर असलेल्या गळतींमधून पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेनेच पाइप तसेच पाण्याचे पाट काढले आहेत. दुरुस्तीऐवजी अवलंबलेल्या तकलादू पर्यायांबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी शिंगणापूर योजना राबवण्यात आली. २००० साली ११०० मिलीमीटर व्यासाची ​सिमेंटची प्रिस्टेड पाइप टाकली. मात्र त्या वारंवार फुटू लागल्या. त्यातीलच जुन्या लाइन पुईखडीच्या पायथ्यापासून साळोखेनगर टाकीपर्यंत आहेत. पुईखडीजवळील बाबूराव गॅरेजच्या दारातील गळती इतकी मोठी झाली आहे की पाइपलाइनजवळ मोठा खड्डाच काढून ठेवला आहे. तो ओव्हरफ्लो होत असतो. या पाण्याने रस्ता खराब होऊ नये म्हणून रस्त्याखाली पाइप टाकून पलिकडे पाणी नेले आहे. हे पाणी परिसरातील गटारीतून तसेच पुढे वाहून जाते. हीच स्थिती आपटेनगर जुन्या नाक्याजवळ आहे. ​मुख्य रस्त्याशेजारीच खड्डा काढला आहे. तिथेही गळतीचे पाणी वाहून नेण्यासाठी पाट काढला आहे. येथील पाणी नव्या पाइपमध्ये सोडले आहे. हे पाणी वाहत जाऊन बुदिहाळकरनगरजवळील ओढ्याजवळ जाते. तिथेही पाइप टाकल्या आहेत.

शिंगणापूर योजनेचे पाणी पुईखडीपासून कावळा नाक्यापर्यंत नेले जाते. दिवस, रात्र पाणी वाहत असते. दुपारी तीन वाजता साळोखेनगर टाकीचा व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर पाणी पुईखडीच्या दिशेने असलेल्या पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात राहते आणि ही गळती सुरू होते. सहा ते सात वाजेपर्यंत ही गळती सुरू असते. इतरवेळी त्याचे प्रमाण कमी होते. यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असते. जेव्हा साळोखेनगरपासून पुढील पाइपलाइनचे पाणी काही कारणात्सव बंद केले जाते, त्यावेळीही गळती वाढत असणारच. सध्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या परिस्थितीत महापालिकेकडून या गळती गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. या गळती तातडीने दुरुस्त करुन शहरवासियांना पाण्याची टंचाई जाणवू देऊ नये अशा भावना व्यक्त होत आहेत.


क्रॉस कनेक्शन करण्याचे नियोजन

सरकारच्या सुजल भारत योजनेमधून शिंगणापूर योजनेच्या पाइपलाइन नवीन टाकण्याचे काम करण्यात आले. आपटेनगर ते फुलेवाडी रिंगरोडवरील नवीन पाइपलाइन कार्यान्वित केल्या आहेत. पुईखडीपासून साळोखेनगर टाकीपर्यंत एक किलोमीटरची नवीन लाइन टाकून तयार आहे. फक्त त्याचे क्रॉस कनेक्शन करण्यासाठीचे साहित्य मागवले आहे. त्यासाठी दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. त्याचे नियोजन केले जात आहे. मार्चमध्ये हे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर गळतीचा प्रश्न राहणार नाही.

मनीष पवार, जलअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळ्यासह सेवाकरांतही वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध प्रकारच्या सेवाकरांतही वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. ही वाढ पाच रुपये ते २०० रुपयांपर्यंत असणार आहे. यामध्ये आठ प्रकारच्या सेवा करांचा समावेश आहे. घरफाळ्यातही चाळीस टक्के वाढीचा प्रस्ताव असून गुरूवारी होणाऱ्या स्थायी सभेपुढे हे प्रस्ताव मंजुरीसाठी असतील. यामुळे स्थायीची पहिलीच सभा गाजण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. उत्पन्ननाचे नवीन मार्ग शोधले जात आहेत. सेवा योजनेंतर्गत महापालिकेकडून विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. स्थानिक स्वरूपातील स्वच्छता, हॉटेलमधील कचरा, विविध मंगल कार्यालयातील कचरा उठावासाठी शुल्क आकारले जाते. यात वाढ होणार आहे. हॉटेल, मंगल कार्यालयासाठी आकारण्यात येणाऱ्या कचरा सफाई आणि उठावासाठी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

घरफाळा वाढ, भांडवली मूल्य सुधारणा

महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. यंदापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेली पाच वर्षे घरफाळा वाढ केली नाही. दरम्यान भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी प्रणालीत शहरातील सरसकट मिळकतधारकांना समान आकारणी न होता मिळकतीच्या बाजार मूल्यानुसार कमी जास्त प्रमाणात आकारणी केली जाते. भांडवली मूल्यावर माफक कर आकारणी करताना इमारतीचे स्वरूप, क्षेत्र, आयुर्मान आणि रेडीरेकनरवर कर आकारणी होते. भांडवली मूल्यावर मालक वापरासाठी ०.२५ टक्के आणि कूळ वापरासाठी ०.५० टक्के इतके दर मागील पाच वर्षांत निश्चित केले आहेत. जानेवारी २०१५ च्या रेडीरेकनरनुसार शहराच्या काही भागात सुधारित बाजार मूल्याचा दर हा किमान ८० टक्केपासून १६० टक्क्यापर्यंत आहे. मालमत्ता कराचे दर गेल्या वर्षातील दराच्या दराप्रमाणे कायम ठेवण्यास भांडवली मूल्य जानेवारी २०१५ च्या रेडीरेकनरप्र्रमाणे सुधारित करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव आहे. भांडवली​ मूल्याच्या आधारे बसवलेला कर हा काही झाले तरी मागील वर्षाच्या देय मालमत्ता कराच्या ४० टक्के इतक्या रक्कमेहून अधिक असणार नाही. भांडवली मूल्य सुधारित करण्याचा प्रस्ताव आहे. घरफाळावाढीचा प्रस्ताव स्थायीपुढे असणार आहे. प्रशासकीय पातळीवर सध्या अंदाजपत्रकाचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’ तुपाशी, ‘उत्तर’ उपाशी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

महापालिकेच्या नव्या सभागृहात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकाधिक नगरसेवकांना पदाची संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या कोट्यातील सातही पदावर 'दक्षिण'मधील नगरसेवक आरूढ आहेत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावरील ढिली झालेली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यूहरचना आखली आहे. महापौर,गटनेता, सभागृह नेता, आणि परिवहन व महिला बालकल्याण अशा विविध पदावर कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. 'दक्षिण'वर मेहेरनजर करताना कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील प्रभागातील नगरसेवक मात्र पहिल्या वर्षी पदापासून वंचित राहिले. राष्ट्रवादीच्या कोट्याला दोन पदे ​आहेत. त्यापैकी एक पद 'दक्षिण' तर दुसरे 'उत्तर'मध्ये आहे. महापालिकेच्या सत्तापटलावर नजर टाकली तर 'दक्षिण' तुपाशी आ​​णि 'उत्तर' उपाशी' अशी नगरसेवकांची भावना आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला २७ प्रभागात यश मिळाले. दोन अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेसचे संख्याबळ २९ वर पोहचले आहे. काँग्रेसच्या २९ नगरसेवकांवर नजर टाकली तर, १८ नगरसेवक हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील प्रभागातील आहेत. तर कोल्हापूर उत्तरमधून निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकांची संख्या ११ इतकी आहे. कार्यकर्त्यांना पदे आणि त्या माध्यमातून मतदारसंघावर वर्चस्व असे सूत्र त्यामागे आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व होते. मंत्रीपदाच्या कालावधीत विविध योजना, महापालिकेत कार्यकर्त्यांना पदे, गृहिणी महोत्सवचे आयोजन या माध्यमातून त्यांनी पकड ठेवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महापालिका हद्दीतील प्रभागातून मताधिक्क्य मिळाले नाही. शहर आणि उपनगरातील प्रभागात भाजपच्या अमल महाडिक यांना जादा मते मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या बहुतांश प्रभागातही भाजपने आघाडी घेतली. महापालिका निवडणुकीत आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा ताकद दाखवत दक्षिण मतदारसंघातून १८ नगरसेवक निवडून आणले. भविष्यातील राजकारणाचा विचार करून दक्षिण मतदारसंघातील नगरसेवकांची महापालिकेत विविध पदांवर वर्णी लावली आहे. दक्षिणवर मेहेरनजर करताना उत्तरकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. 'उत्तर'मधील एकाही नगरसेवकाला कुठल्याच पदाची संधी मिळाली नाही तसेच प्रभाग समिती सभापतिपदही मिळाले नाही.

............

'दक्षिण'मधील नगरसेवकांची चांदी

महापौर अश्विनी रामाणे (शासकीय मध्यवर्ती कारागृह)

महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम (कळंबा फिल्टर हाउस)

परिवहन समिती सभापती लाला भोसले (राजेंद्रनगर)

गटनेता शारंगधर देशमुख (रंकाळा तलाव)

सभागृहनेता प्रविण केसरकर (शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय)

प्रतिक्षा पाटील (गांधी मैदान प्रभाग समिती सभापती)

छाया पोवार (बागल मार्केट प्रभाग समिती सभापती)

मुरलीधर जाधव (राष्ट्रवादी, सभापती, स्थायी समिती सभापती)


'उत्तर'मध्ये एकच पद

राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याच्या सभागृहात १५ नगरसेवक आहेत. त्यापैकी १० नगरसेवक कोल्हापूर उत्तरमधील आहेत. तर चार नगरसेवक दक्षिण मतदारसंघातील आहेत. राष्ट्रवादीकडे स्थायी समिती सभापती आणि उपमहापौर अशी दोन पदे आहेत. राष्ट्रवादीकडून 'स्थायी'वर वर्णी लागलेले मुरलीधर जाधव यांचा राजारामपुरी एक्स्टेंशन प्रभागही दक्षिण मतदारसंघात आहे. तर यादवनगर प्रभागातील निवडून आलेल्या शमा मुल्ला यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने उत्तर विधानसभा मतदारसंघाला एकमेव पद मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते धमेंद्र यांचा आज कोल्हापुरात गौरव

$
0
0

म टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील संगीत कलामहर्षी अरविंद पोवार कला अकादमीचा चाळीसावा वर्धापन दिन शुक्रवारी (ता.१२) साजरा होणार आहे. यंदा ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांना अकादमीच्या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शिवाजी स्टेडियमवर सायंकाळी सहा वाजता पुरस्कार सोहळा होईल. यावेळी अकादमीचे दीडशेहून अधिक विद्यार्थी विविध वाद्यांचा आविष्कार सादर करणार आहेत.

यापूर्वी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना या पुरस्काराने गौरविले आहे. यंदा धमेंद्र यांना बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भैय्यूजी महाराज, आदींची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमात अरविंद पोवार लिखित 'हे अर्ध्य अनंत कलांचे' या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. पोवार यांना आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

अरविंद पोवार यांच्याविषयी

चित्रकला, शिल्पकला संगीत, गायन असे कलासक्त व्यक्तिमत्व असलेल्या पोवार यांनी वयाच्या नवव्या वर्षी मेळ्यांमधून कलाजीवनाची सुरूवात केली. ​पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याहस्ते बालचित्रकार म्हणून पोवार यांनी चित्रकलेतील पारितोषिक स्वीकारले. चिखलापासून पुतळे तयार करण्याची आवड पोवार यांनी जपली आणि पुढे ते शिल्पकार म्हणून नावारूपाला आले. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात असलेला अभिनेते अरूण सरनाईक यांचा पुतळा पोवार यांनीच घडवला आहे. संगीताकडे ओढा असलेल्या पोवार यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी नाटक कंपनीची स्थापना करून 'नशिबानं हात दिला,' हे नाटक सादर केले. शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासावर बेतलेला 'गीत शिवराय' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजवला. 'गीत महावीर' कार्यक्रमाचे संयोजक, 'संगीत संस्कार' नाटकाचे नाटककार, 'काल रात्री बारा वाजता', 'भाऊबीज', 'प्रतिडाव', या सिनेमांचे संगीतकार, दारासिंग अभिनित 'हिंदकेसरी' सिनेमाचे निर्माते असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या पोवार यांनी कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जतन केला आहे.

कला अकादमीची वाटचाल

१९७५ साली पोवार यांनी स्थापन केलेली संगीत कला महर्षी अरविंद पोवार कला अकादमी टाकाळा येथे कार्यरत आहे. संगीतप्रेमातून त्यांनी संगीत शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्यांच्या तालमीत हजारो शिष्यांना सूर मिळाला. सतार, संतूर, सिंथेसायझर, गिटार, तबला या वाद्यवादनातून आजवर २५ हजार ३४७ विद्यार्थी घडले आहेत. अगदी पाचवर्षाच्या बालकलाकारापासून ते सत्तरीतील ज्येष्ठ ना​गरिकांपर्यंतचे विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसाळ योजना आठ दिवसांत सुरू होणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
म्हैसाळ योजनेला लागलेले ग्रहण सुटण्याच्या मार्गावर आहे. वसंतदादा आणि महांकाली साखर कारखान्यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये अॅडव्हान्स जमा केल्याने आतापर्यंत योजनेसाठी २ कोटी २१ लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे जमा झाले आहेत. मोहनराव शिंदे आरग आणि डफळे जत ह्या कारखान्यांनी अॅडव्हान्स पाणीपट्टी भरण्याचे मान्य केले असून, त्यांचे पैसे दोन ते तीन दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आठ दिवसांत म्हैसाळ योजना सुरू करण्याचे संकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून ही योजना बंद असून, पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा वाढला आहे. राजकीय पक्षांची आंदोलने सुरू झाली आहेत, पण फुकट पाणी देणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. टंचाई असली तरी ही योजना चालविण्यास एकही रुपया देण्यास सरकारने स्पष्ट नकार दिला. पाटबंधारे विभागाने अॅडव्हान्स पाणीपट्टी वसूलीची मोहीम उघडली खरी पण शेतकरी पैसेच भरायला तयार नाहीत. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी योजनेला कुलूप लावायची धमकी देऊनही चार महिन्यांत तीन तालुक्यांत मिळून २१ लाख रुपये गोळा झाले होते.
योजनेच्या कार्यक्षेत्रातील वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे व डफळे साखर कारखान्यांनी हात आखडता घेतला होता. अखेरीस ही कोंडी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याने फोडली. मंगळवारी एक कोटी अॅडव्हान्स पाणीपट्टी जमा केली. बुधवारी लगेचच महांकाली शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयराव सगरे यांनीही एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. योजनेचे वीज कनेक्शन जोडण्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. लाभक्षेत्रात येणाऱ्या मोहनराव शिंदे व डफळे साखर कारखान्यांनी अॅडव्हान्स भराण्याची तयारी केली आहे. चार दिवसांत या दोन साखर कारखान्याचे मिळून आणखी दोन कोटी पाटबंधारे विभागाकडे जमा होण्याची शक्यता आहे. तासगाव तालुक्यातील गव्हाण आणि विस्तारित गव्हाण योजनेच्या लाभक्षेत्रातील खासकरून मणेराजुरी येथील शेतकऱ्यांनी अॅडव्हान्स पाणीपट्टीसाठी जवळपास ५० लाख रुपये गोळा केले आहेत. हे पैसे शेतकरी येत्या दोन दिवसांत पाटबंधारे विभागाकडे जमा करणार आहेत. मोहनराव शिंदे कारखाना व डफळे साखर कारखाना आणि तासगाव तालुक्यातील पैसे आल्यानंतर जवळपास पाच कोटींच्या आसपास अॅडव्हान्स पाणीपट्टी जमा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळ्याजवळील वाडीभागाई राज्यात प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
शिराळा तालुक्यातील सतराशे लोकसंखेच्या वाडीभागाई गावाला ग्रामपंचायत सशक्तीकरण अभियानात व राष्ट्रीय गौरव ग्रामसभा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या स्पर्धेत राज्यातील २७, ८७३ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे तीनही गट सक्रिय असतानाही राजकारण बाजूला ठेवून विकासकामांवर भर देण्यासाठी गावकरी एकत्रित आले. सरपंच रामचंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायातीचे सर्व सदस्य ग्रामस्थ गाव विकासासाठी एकत्रित येऊन निर्णय घेत होते. त्याचा परिणाम म्हणून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांमध्ये सामाजिक उपक्रमांबाबत जागृती झाली. ग्रामसभा, महिला ग्रामसभा, कोपरासभांद्वारे गाव प्लास्टिकमुक्त करण्यात आले. वाडीभागाई गावात आज घरोघरी छोट्या कचराकुंड्या पाहावयास मिळत आहेत. सार्वजनिक कचरा एकत्रित करण्यासाठी घंटागाडी, कचराकुंड्या आहेत. घंटा गाडीतून रोजच्या रोज कचरा घनकचरा प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे. आठवड्यातून एकदा गावातील सर्व शाळा एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवित आहेत. यापूर्वी गावाला तंटामुक्ती, निर्मलग्राम, पुरस्कार मिळाले आहेत. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीही गाव पात्र ठरले आहे.
गावाचा विकास साधताना कोणत्याही राजकीय गटातटाचा विचार केला नाही. तरुणांना आणि महिलांना मोहिमेत सहभागी केल्यामुळे यश मिळाले. निर्णयप्रक्रियेत शेवटच्या घटकालाही सहभागी करून घेतले. आता राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारासाठी प्रयत्न करणार आहे, असे सरपंच रामचंद्र पाटील म्हणाले. तर, वॉर्डसभा, ग्रामसभा याबाबत गावात प्रबोधन केल्यामुळे मोहिमेत लोक सहभागी झाले. ग्रामस्थांचा सहभाग, प्रशासनाचे सहकार्य यामुळे पुरस्कारासाठी गावाची निवड झाली आहे. २४ एप्रिलला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात गावचा गौरव करण्यात येणार आहे, असे ग्रामसेवक बी. जी. नागरगोजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीडब्ल्यूडी’चा टोल हटेना

$
0
0

Grurubal.Mali @timesgroup.com

कोल्हापूर : सतत सात वर्षे आंदोलनाचे रान पेटवून नागरिकांनी कोल्हापूरला टोलमुक्त केले. पण कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम खात्यात सुरू असलेला 'टोल' मात्र बिनबोभाट सुरू आहे. प्रत्येक कामासाठी बारा टक्के कमिशन देण्याचा अलिखित नियमच कंत्राटदार पाळत असताना त्यामध्ये आणखी 'पाच' टक्के 'टोल'ची भर पडत असल्याने कामाच्या दर्जावर परिणाम होत आहे. बांधकाम खात्यातील 'मजबूत' साखळी कंत्राटदारांना सळो की पळो करून सोडत आहे. नियुक्तीसाठी कोटीत मोजलेली रक्कम वसुलीसाठी अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने प्रकल्पाच्या दर्जावर परिणाम होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती, तलाव, सभागृहे यांसह अनेक कामांसाठी दरवर्षी किमान शंभर कोटींपेक्षा अ​धिक निधी येतो. या निधीतून कंत्राटदारांकडून कामे करून घेतली जातात. खात्याकडे मोठा निधी असल्याने कंत्राटदारांची संख्याही मोठी असते. तरीही ठराविक कंत्राटदारांचीच मक्तेदारी आहे. अधिकाऱ्यांना जादा टक्केवारी देणाऱ्या कंत्राटदारांना भरपूर कामे मिळतात. नियमांवर बोट ठेऊन काम करणाऱ्यांना येथे फारशी संधी मिळत नाही.

खासदार, आमदारांसाठी असलेल्या निधीतून दरवर्षी कोल्हापुरात साधारणतः ३५ कोटी रुपये येतात. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. शिवाय खासदार, आमदार फंडासह राज्य आणि देशाच्या विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी आणतात. कोल्हापुरात किमान दरवर्षी शंभर कोटींचा निधी येतो. हा निधी पाटबंधारे खात्यामार्फतच खर्च केला जातो. यातील बारा ते सतरा कोटी रुपये अधिकाऱ्यांच्या घरी जातात. काही लोकप्रतिनिधीही टक्केवारीत आघाडीवर आहेत. मात्र त्यांची संख्या फार कमी आहे. किरकोळ टक्केवारीत ते लक्ष देत नाहीत.

बदलीसाठी कोटीची उड्डाणे

बांधकाम विभागात नोकरी म्हणजे कमाई समजली जाते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रुबाब वेगळाच असतो. विशिष्ट ठिकाणी बदली आणि नियुक्तीसाठी येथे लाखांत नव्हे तर कोटीत रक्कम मोजावे लागतात. मुख्य अभियंता नियुक्तीसाठी पाच कोटी, अधिक्षक अभियंता दोन कोटी, कार्यकारी अभियंता एक कोटी तर उपअभियंता पदासाठी २५ लाख दर आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी ५ ते १० लाखांचा दर असल्याची चर्चा विभागात आहे. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर ती वसुलीसाठी अधिकारी कंत्राटदाराच्या मानेवर सुरी ठेवतात. साखळीत कामाचा दर्जा मात्र काहीच राहत नाही.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी मनावर घेतल्याने कोल्हापूर टोलमुक्त झाले. त्यांच्या नागरी सत्काराबरोबरच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याच खात्यात हा टोल जोरात सुरू आहे. रितसर काम केल्यानंतरही बिल अदा करताना या खात्यातील अधिकारी, कर्मचारी पाच टक्के मागतात. टक्केवारी दिल्यानंतरही कंत्राटदारांना खिंडीत गाठून वसुली केली जात आहे. किरकोळ कामे घेणाऱ्या कंत्राटदारांना याचा अधिक त्रास होतो. बिल लवकर मिळावे म्हणून कंत्राटदारांना येथे पैसे द्यावेच लागतात. कोल्हापूरला टोलमुक्त करणाऱ्या पालकमंत्र्यांनी हे खातेही टोलमुक्त करावे ही कंत्राटदारांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटवितो, तुमचा हस्तक्षेप नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील प्रमुख रस्ते, चौक परिसरातील अनधिकृत केबीन्स, हातगाड्या, चायनिज सेंटरच्या वाढत्या प्रमाणावरून स्थायी समिती सदस्यांनी गुरुवारी प्रशासनावर हल्लाबोल केला. अनधिकृत केबिन्समुळे वाहतुकीस अडथळा, पार्किंगची कोंडी होत असताना प्रशासन गप्प का? रस्त्यावर खुर्च्या टेबल टाकून रस्ते अडवले असताना कारवाई का केली जात नाही असा सवाल सदस्यांनी प्रशासनाला केल. पंधरा दिवसात अतिक्रमण काढू. कारवाई सुरू झाल्यानंतर नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली. सभापती मुरलीधर जाधव अध्यक्षस्थानी होते.

नव्या सभागृहाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच स्थायी समितीच्या सभेत तब्बल ४० विषय होते. सभेत सदस्यांनी आरोग्य, विद्युत विभाग, उद्यान विभागाच्या कामकाजाचा पंचनामा केला. नगरसेवक उमा इंगळे, सत्यजित कदम, निलेश देसाई यांनी अतिक्रमीत केबिन्सचा मुद्दा मांडला. कावळा नाका ते तावडे हॉटेल कमान या रस्त्यावर केबिन्स्, हातगाड्या वाढल्याचे निदर्शनास आणले. रात्रीवेळी चायनिज सेंटरवर लोक दारू पितात. त्याचा रस्त्यावर पार्किंग, स्थानिकांचा त्रास वाढला आहे. महाराणी ताराराणी गार्डनमध्येही रात्री गैरप्रकार सुरू असतात अशा तक्रारीचा पाढा सदस्यांनी वाचला. उद्यानातील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके नेमावेत, पोलिस स्टेशनला पत्र द्यावे असे देसाई यांनी सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी १५ दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल असे सांगितले.

नगरसेवक अजित ठाणेकर यांनी ड्रेनेज लाइनची समस्या मांडली. अमृत योजनेत ड्रेनेज लाइनचा विचार केला नाही. शहरातील १५० किलोमीटर लाइन जुनी आहे. त्या वारंवार चोकअप होतात. ड्रेनेज लाइनचा स्वतंत्र प्रस्ताव ठेवावा अशी सूचना त्यांनी केली. नगरसेवक सुनील पाटील यांनी कामगारांच्या बदल्यांचा विषय उपस्थित केला. ठराविक जणांच्या बदल्या झाल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्यांच्या बदल्या कधी होणार या त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने कर्मचाऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. कामगारांच्या बदल्यांना स्थगिती मिळाल्याचे सांगितले. महापालिकेतर्फे या आठवड्यापासून सी व डी वॉर्डात पाण्याचे स्पॉट बिलिंग होणार आहे. सध्या ४५ मिटर रीडर असून आवश्यकता बसल्यास आणखी रिडर ठोक मानधनावर घेऊ असे प्रशासनाने सांगितले.

उमा इंगळेंचा उपोषणाचा इशारा

फेरीवाला धोरणाच्या नावाखाली नवीन केबिन्स, हातगाड्या फोफावत आहेत. बापूसाहेब मोहिते यांच्या स्मृतीस्तंभाजवळ रात्रीच्यावेळी काहीजण दारू प्यायला थांबलेले असतात. रस्त्यावर खुर्च्या टेबल मांडून बिनदिक्कत व्यवसाय सुरू आहे. अनधिकृत केबिन्स हटविल्या नाहीत तर उपोषण करू असा इशारा नगरसेविका उमा इंगळे यांनी दिला.

कामचुकारांचे फोटो प्रसिद्ध करू

नादुरुस्त घंटागाड्या, विद्युत दिव्यांची देखभालीकडे मेहजबीन सुभेदार, प्रतिज्ञा निल्ले, रिना कांबळे, मनीषा कुंभार यांनी लक्ष वेधले. अधिकारी, वायरमन फोन उचलत नाहीत अशी तक्रार झाली. वायरमनची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणल्यावर तत्काळ २० वायरमनची भरती करावी अशी सूचना सभापती जाधव यांनी केली. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची छायाचित्र प्रसिद्ध करू असा इशारा सभापतींनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेफ्टीला जोड स्टाइलची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात सध्या हेल्मेट सक्तीचा विषय जोर धरू लागला आहे. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षेसाठी योग्य असलेल्या या हेल्मेटना मात्र, आता स्टाइलची जोड मिळाली आहे. आपल्याकडे असलेली बाइक, आपली शरीरयष्टी आणि त्याला साजेसं स्टाइलिश हेल्मेट घेऊन आपल्या लूकमध्ये भर टाकण्याकडे तरुणांचा सध्या कल वाढला आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हेल्मेटच्या खरेदीची चर्चा सुरू झाली. तरुणांनी या सक्तीलाही स्टाइलची जोड देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. स्टाइलिश हेल्मेटच्या मागणीमुळे बाजारातही तशा हेल्मेटची आवक वाढली आहे. स्टाइलिश हेल्मेट्समध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रकार पहायला मिळतात. प्रत्येक प्रकाराला वेगळ्या रंगाची जोड असल्याने कलर चॉइसही भरपूर आहे.

हेल्मेटच्या प्रकारांमध्ये स्पोर्टस् लूक, हाफ फेस (लेडीज आणि जेन्टस दोघांनाही वापरता येणारे), वर्व (फक्त लेडीज वापरू शकतील असे), स्पोर्टस् लूकमध्ये ग्राफिक्स, ड्युएल ग्लास विथ गॉगल, असे नानाविविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये चारशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आपल्या बजेटनुसार हेल्मेट खरेदी करता येते. गेल्या काही वर्षांत लाइटवेट हेल्मेटला मागणी वाढली होती. त्यामुळे कंपन्यांनीही तशाच प्रकारची हेल्मेट्स बनविण्यास सुरुवात केल्याने सध्या उपलब्ध हेल्मेट्स लाइटवेट आहेत. त्यामुळे हेल्मेटमुळे मानेचा किंवा मणक्याचा त्रास होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळत आहे.

हेल्मेटच्या सक्तीचा विषय सध्या चर्चेत असला, तरी गेल्या काही वर्षांत ज्यांना हेल्मेटचे महत्त कळाले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर हेल्मेटची खरेदी केल्याचे दिसते. मात्र, सक्तीमुळे अर्थातच हेल्मेटची चौकशी, खरेदी वाढली आहे.

- आशिष तुर्खिया, कलापी

आयएसआय मार्क

हेल्मेट ही सुरेक्षेशी निगडीत वस्तू आहे. त्यामुळे त्याचा दर्जाविषयी कोणतीही तडजोड होता कामा नये. म्हणूनच हेल्मेट खरेदी करताना ते आयएसआय मार्क असलेले आणि ब्रॅँडेड कंपनीचेच खरेदी करावे, असे आवाहन सरकारकने केले आहे. रस्त्यांवर विशेषतः हायवेवर हेल्मेटची खरेदी करणारे दिसतात. मात्र, त्यांच्याकडील हेल्मेटच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

राइडला हेल्मेट सक्तीचे

कोल्हापुरात हर्ले डेव्हिडसन आणि रॉयल एन्फिल्ड बाइक चालविणाऱ्यांचे ग्रुप आहेत. त्यांच्यासाठीचे हेल्मेट्स अर्थातच वेगळे आहेत. विक एन्डला ग्रुपच्या राइड्स होतात. त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यावर सनग्लासेस असतात. त्यामुळे ही मंडळी बहुतांशपणे हाफ फेस हेल्मेट्सच वापरतात. मात्र, राइडला जाताना हेल्मेट असलेच पाहिजे, हा राइडचा पहिला आणि महत्त्वाचा नियम पाळला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चळवळीतूनच लोकशाही बळकट होईल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संसद, प्रशासन, न्यायव्यवस्था या लोकशाहीतील तीन स्तंभांनंतर चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांची भूमिका जरी महत्त्वाची असली तरी समाजात हक्क व अधिकारांबाबत लोकप्रबोधनासाठी संघर्षातून परिवर्तन करणारी जनचळवळ हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ मानला पाहिजे. जागृत लोकशाहीच्या बळकटीसाठी समाजात जनचळवळीला महत्त्व दिले पाहिजे' असे प्रतिपादन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले.

आंतरभारती शिक्षण मंडळ आणि स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पाटगावकर कुटुंबीयांच्यावतीने देण्यात येणारा कुसूम पुरस्कार महाराष्ट्रात महिलांसाठी राईट टू पी चळवळ चालविणाऱ्या मुमताज शेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शिरसाठ बोलत होते. चंद्रकांत पाटगावकर यांच्या पत्नी कुसूम यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा पुरस्काराचे द्वितीय वर्ष आहे.

'लोकशाहीतील लोकचळवळीचे महत्त्व' या विषयावर शिरसाठ म्हणाले, 'लोकशाही बळकट होण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि जनचळवळ यांची युती प्रभावशाली ठरू शकेल. संसद, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या स्तंभांच्या काही मर्यादा आहेत. माध्यमांवरही काही बंधने, दबाव आहे. तुलनेने समाजाला भान देण्यासाठी जनचळवळींचा रेटा परिणामकारक काम करतो. चळवळींमुळे कार्यवाही, अंमलबजावणी करणाऱ्या क्षेत्रावर अंकुश राहू शकतो. सध्या देशात प्रत्येक क्षेत्रात संख्यात्मक वाढ होत आहे. मात्र गुणात्मक विकास हे मोठे आव्हान आहे. विकासाची कोणतीही संकल्पना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सुविधा, हक्क, अधिकार याबाबत अद्याप समाजाचा शेवटचा स्तर अनभिज्ञ आहे. जनचळवळींना माध्यमांची साथ मिळाली तर हा स्त्रोत सर्वत्र पोहोचेल.'

सत्काराला उत्तर देताना मुमताज शेख म्हणाल्या, 'आपल्या समाजातील एक महिला महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरते हे मुस्लिम समाजात मान्य नव्हते. त्यामुळे समाजासह कुटुंबाकडून झालेला विरोध स्वीकारून माझ्या संघर्षाला सुरूवात झाली. पण सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने महिला कामासाठी बाहेर पडत असताना त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे, या मुद्यावरून चळवळीचा पाया रचला आहे. सध्या ३२ संघटना मिळून ही चळवळ प्रवाही ठेवत आहेत. या पुरस्काराने नवे बळ आणि काम करण्याची ऊर्मी मलाही मिळाली आहे.'

यावेळी पल्लवी कोरगावकर, सुचेता कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे आदी उपस्थित होते. सुचेता पडळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढदिवसादिवशी हार, गुच्छ न आणता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धनादेश व रोख रक्कम द्या या शिव शाहू मंच ट्रस्टच्या आवाहनाला श्रीमंत युवराज संभाजीराजे यांच्या वाढदिवशी चांगला पाठिंबा मिळाला. कार्यकर्त्यांनी धनादेश, रोख रक्कम व धान्य रूपात मदत केली. पुण्यातील कार्यकर्त्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा धनादेश संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला.

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. आत्महत्या केलेल्या काही कुटुंबांच्या घरी भेट देऊन संभाजीराजे यांनी यापूर्वी सांत्वन केले आहे. सांत्वनाला आर्थिक मदतीची जोड मिळाली यासाठी शिवशाहू मंच ट्रस्टचे अध्यक्ष संजय पवार व फत्तेसिंह सावंत यांनी संभाजीराजे यांच्या वाढदिनी हार व गुच्छ न आणता मदत करावी असे आवाहन केले होते. संभाजीराजे यांना दिवसभर राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी सायंकाळी त्यांनी भवानी मंडपात शुभेच्छा स्वीकारल्या. अनेक कार्यकर्त्यांनी रोख रक्कम व धनादेशाच्या स्वरूपात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला. पुण्यातील रामचंद्र वाकडकर, विराज तावडे, कुणाल वेढे पाटील, सुनील जोरे, सतीश शेलार यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी दोन लाख १० हजार रुपयांचा धनादेश संभाजीराजे यांना दिला. दोन टन धान्यही कार्यकर्त्यांनी जमा केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी पाश आवळतोय

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

गरज सरेल म्हणून धुणीभांडी करणाऱ्या बाईपासून ते अनेक व्यापारी आणि उद्योजकही खासगी सावकाराकडून उसने पैसे घेतात. मात्र त्यांच्या व्याजाचा दणका इतका असतो की कर्जदार त्यातच रूतत जातात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही म्हणून अखेर मृत्युला कवटाळतात. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडू लागल्या आहेत. कोल्हापूर आणि इचलकरंजीत नुकतेच अटक केलेले खासगी सावकार हे हिमनगाचे टोक असून अनेक सावकार राजरोसपणे पैशाच्या जोरावर राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्हाइट कॉलर म्हणून धुमाकूळ घालत आहेत.

कोल्हापूरचा माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, अस्लम शेख, इचलकरंजीचा माजी नगरसेवक बादशहा बागवान इचलकरंजीत तर कोल्हापुरात उमेश जाधव या ३१ वर्षाच्या तरूण खासगी सावकाराला अटक झाली आहे. कवाळे, शेख व बागवान या तिघांची खासगी सावकार म्हणून मोठी दहशत आहे. कवाळे यांच्यावर यापूर्वी 'मोका'खाली कारवाई झाली होती. खासगी सावकारकीसाठी दहशत, मारामारी करणे असे गुन्हे यांच्यावर आहेत. राजारामपुरी व पाचगांवमधील वास्कर बंधूवरही यापूर्वी खासगी सावकारकीसह अन्य गुन्ह्यांबद्दल 'मोका' कारवाई झाली होती. कवाळे, वास्कर, शेख, बागवान ही सावकारकीची मोठी नावे असली तरी गल्लीबोळात सावकारकीचे पीक फोफावू लागले आहे. कोल्हापुरात एमएम, पेठेतील राहुल, बापू, ताराराणी चौक व राजरामपुरीतील सावकारांची मोठी दहशत आहे.

माणसाला अडचणीतून सुटका करवून घेण्यासाठी अनेकांपुढे हात पसरावे लागतात. गरजेला पैसे उपलब्ध व्हावा म्हणून खासगी सावकाराच्या वळचणीतला जावे लागते. त्यातून पाच टक्के ते २० टक्क्यापंर्यंत व्याजाची आकारणी होती. एकीकडे बँका वार्षिक नऊ ते १४ टक्के व्याजाने कर्ज देत असताना दुसरीकडे खासगी सावकारांच्या व्याजाचा दर वार्षिक ६० टक्के ते २४० टक्के इतका होत आहे. मुदलेच्या तिप्पट व्याज जाऊनही मुद्दल आहे तशीच राहत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. 'कोपरापासून ढोपरापर्यंत खासगी सावकारांना सोलून काढणार,' अशी घोषणा मंत्र्यांकडून होत असली तरी कायदा प्रभावी नसल्याने खासगी सावकारकी फोफावू लागली आहे.

शहरातील सर्व झोपडपट्ट्या, गल्ली बोळात, पेठा, व्यापार पेठांत खासगी सावकर आहेत. किरकोळ विक्रेत्याला सकाळी पाचशे रूपये व्यवसायाला दिले की रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे रूपये गोळा करणारे सावकार आहेत. भिशी, लिलाव भिशी, बचत गटाच्या माध्यमातूनही खासगी सावकारकी फोफावते आहे. मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार घायाकुतीला येतो. पाच लाखापासून कोटी रूपये देणारेही बडे सावकार आहेत. त्यासाठी कोरा स्टँप, जमिनी, बंगले नावावर करून घेतले जातात. दर महिन्याला व्याज वसुलीसाठी पंटर नेमले जातात. व्याज न दिल्यास संबंधित व्यक्तीच्या घरातील साहित्य फेकून देणे, कर्जदाराला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत, पण कर्जदार तक्रार करत नसल्याने व खासगी सावकारांचे पोलिसांचे लागेबांधे असल्याने खासगी सावकारांची चलती जोरात सुरू आहे.

जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार

शिरोळ २, हातकणंगले ७४, आजरा २, चंदगड २, भुदरगड १, गडहिंग्लज ६, करवीर १६, कोल्हापूर शहर ११२, पन्हाळा ४, राधानगरी १, कागल १

सावकारी नियंत्रण कायदा

खासगी सावकारकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे कैद व २५ हजार रूपये दंडाची तरतूद आहे. सावकारकीचा परवाना नसणाऱ्याला पाच वर्षे कैद व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. स्टँप लिहून घेतल्यास तीन वर्षे कैद व २५ हजार रूपये दंड आहे. शिक्षा कमी असल्याने खासगी सावकार मोकाट आहेत. व्याजाच्या वसुलीसाठी खुनाची धमकी देऊन कर्जवसुली केल्याबद्दल खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल खासगी सावकारावर अटकेची कारवाई होते. मात्र अटकेनंतर जामीन मिळाल्यानंतर पुन्हा सावकारकी सुरू होते. त्यामुळे पोलिसांकडूनच खटला दाखल करताना हयगय होता कामा नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


तक्रार दाखल केल्यास खासगी सावकारांवर ताबडतोब कारवाई केली जाईल. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी निर्भयपणे तक्रार दाखल करावी. इचलकरंजी व कोल्हापुरात गेल्या आठवड्यात अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

भरतकुमार राणे, शहर पोलिस उप अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलचाचणीतून होणार शाखा निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कलचाचणी ८ फेब्रुवारीपासून सुरू केली असली तरी प्रत्यक्षात शाळास्तरवर ती १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

इयत्ता दहावीची कलचाचणी ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.करिअर निवडीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कलचाचणीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालासोबतच दिले जाणार आहे. सरकारने १० नोव्हेंबर २०१५ च्या निर्णयानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचे आदेश काढले. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो, त्याच शाळास्तरावर ही कलचाचणी घेतली जात आहे. शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या कम्प्युटरवर आधारित विद्यार्थ्यांची बॅच केली जात आहे. त्यासाठी ४० मिनिटांचा वेळ असेल. 'हो', 'नाही', 'माहीत नाही' अशा तीन पर्यायांतील एक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. एका विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांला १५२ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विद्यार्थ्यांची कलचाचणी बॅच फाईलमध्ये तयार करून सायंकाळी ही फाइल बोर्डाच्या वेबसाइटवर अपलोड केली जाते. शाळास्तरावर सकाळी ११ ते ५ या वेळेत ही परीक्षा घेतली जात आहे. दरम्यान, ज्या शाळांमध्ये कम्प्युटरची सुविधाच अद्यापही उपलब्ध झालेली नाही, त्या ‌शाळांमधील विद्यार्थ्यांची कलचाचणी ही त्या परिसरातील जवळच्या शाळांमध्ये घेण्यात येणार आहे.

शाळास्तरावर बुधवारपासून कलचाचणी घेण्याचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ४० मिनिटांचा अवधी दिला जात असून एका कम्प्युटर दिवसभरात सहा विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते.

महेश नेर्लीकर, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा प्रकल्पात आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कसबा बावडा येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी गुरूवारी दुपारी मोठी आग लागली. ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आणली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना नोटीस बजावली आहे. शुक्रवारी दुपारी कचरा डेपोतील कचऱ्याला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. आग भडकून धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. सर्व परिसर धुराने वेढला होता. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रात्री साडेआठ वाजता आग विझवण्यात यश आले. घटनास्थळी ताबडतोब प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी धाव घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर सायंकाळी आगीचे प्रकार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची नोटीस पाठवली. या संदर्भात देसाई म्हणाले की, दरवर्षी कचरा डेपोतील आगीचे प्रमाण नियंत्रणात असते, पण महापालिका शास्त्रीयदृष्ट्या कचरा विघटनाची यंत्रणा राबवत नाही. टाकाळा येथील खणीत इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी महापालिकेने मुद्दाम आग लावली आहे. आगीत जळलेली राख इनर्ट मटेरिअल म्हणून टाकण्याचा डाव आहे, असा आरोपही देसाई यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळावाढीचा चेंडू महासभेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळ्यामध्ये ४० टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा प्रशासनाच्या प्रस्तावावार कसलाही निर्णय न घेता स्थायी समिती सभेने या विषयाचा चेंडू महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कोर्टात टाकला आहे. आता २० फेब्रुवारीला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरफाळा वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होईल. भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारल्यानंतर एक एप्रिलपासून घरफाळ्यात चाळीस टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी घरफाळा वाढीला यापूर्वीच विरोध दर्शवित शहरवासियावर एक रुपयाचीही करवाढ लादणार नाही अशी भूमिका मांडली आहे. यावरून प्रशासन आणि नगरसेवकांत संघर्ष घडणार आहे.

महापालिकेने २०११ मध्ये भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. गेल्या पाच वर्षात कोणतीही वाढ झाली नसल्याने येत्या आर्थिक वर्षापासून चाळीस टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे. प्रशासनाने भांडवली मूल्य सुधारित करणे व मालमत्ता कराचे दर मागील वर्षाप्रमाणे कायम ठेवण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर ठेवला होता. स्थायीची मान्यता घेऊन येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजूर करून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्याचे भांडवली मूल्य आणि पाच वर्षांपूर्वीचे भांडवली मूल्यावर आधारित ही करवाढ अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांत रेडीरेकनरचे दर वाढल्याने शहरातील विविध भागात घरफाळा करात दुप्पट, तिप्पट वाढ होणार आहे.

भांडवली मूल्यावर आधारित ही करप्रणाली चुकीची असून वाढीव घरफाळ्याच्या ओझ्याने कंबरडे मोडणार असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला असून करवाढीला विरोध केला आहे. परिणामी सोमवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत याबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून होते. स्थायी सभेने या विषयावर कसलाही निर्णय न घेता सर्वसाधारण सभेवर निर्णय सोपवला. प्रशासकीय पातळीवरून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारल्याने करवाढ अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले. पण त्यावर कसलीही चर्चा न करता स्थायीने सर्वसाधारण सभेकडे चेंडू टोलविला आहे.


घरफाळा वाढीला नागरिकांचा विरोध आहे. यामुळे या विषयावर महासभेत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. स्थायी समितीने याप्रश्नी कुठलाही निर्णय न घेता घरफाळ्याचा विषय सभागृहाकडे सोपविला आहे. शहरात असंख्य मिळकतींची नोंद झाली नाही. अशा मिळकतींचे असेसमेंट गरजेचे असून तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. रंकाळा टॉवर ते क्रशर चौक रस्ता डांबरीकरणाच्या २ कोटी ८२ लाख रुपयांच्या कामास मान्यता दिली आहे. दोन महिन्यात रस्ता तयार करण्याच्या सूचना आहेत.

मुरलीधर जाधव (सभापती, स्थायी समिती सभापती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी’त लिप‌िकच शिरजोर

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

कोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांपेक्षा शिपाई आणि लिप‌िकांकडूनच कंत्राटदारांची लूट होत आहे. जिल्ह्यातील चारशेवर कंत्राटदार येथील साखळीला कंटाळले आहेत. या साखळीशिवाय पानच हलत नसल्याने त्यांचा नाइलाज झाला आहे. अनेक प्रमुख अधिकारी चांगले असले तरी​ वर्ग दोन आणि तीनच्या 'बाबूं'नी जी 'घडी' बसवली आहे, त्यामुळे साहेबांना मान डोलवण्यापलीकडे फारसे काही करावेच लागत नसल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला थेट निधी येतो. सरकारच्या अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात. त्यामुळे दरवर्षी शंभर कोटींपेक्षा अधिक निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो. यामध्ये बांधकाम विभागाला जादा निधी मिळतो. याशिवाय महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विभागाला मिळणाऱ्या निधीतून जे प्रकल्प उभारले जातात, त्या सर्वच कामात टक्केवारी ठरलेली असते. प्रत्येक कामासाठी दहा ते पंधरा टक्के कमिशन घेतल्याशिवाय येथे फाइलच पुढे सरकत नाही.

जिल्हा परिषदेचे ६९ सदस्य आहेत. पण ग्रामीण भागातील अनेक सदस्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सरकारी बाबूंचा मनमानी कारभार सुरू आहे.

सारी कामे कंत्राटदाराकडेच

प्रस्ताव तयार करण्यापासून ते ते सर्व विभागात फिरून त्याला मंजूरी घेण्याचे जबाबदारी ग्रामसेवकापासून ते त्या-त्या विभागातील लिपीक व अधिकाऱ्याची असते. पण सारी गरज कंत्राटदारालाच असल्याने प्रस्ताव त्यानेच तयार करायचा. मंजूरीच्या सह्या त्यानेच घ्यायच्या. राज्य सरकारकडून निधी आला नाही तर मुंबईला फेऱ्या त्यानेच मारायच्या. हे झाल्यानंतर कामाचा ठेका देताना आणि बिल अदा करताना मात्र शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी आपल्या टक्केवारीसाठी त्याला सळो की पळो करून सोडायचे अशी येथे पद्धतच झाली आहे.

पूर्वी पंधरा लाखांपेक्षा अधिक खर्चाची कामे असतील तर त्याचे इ टेंडर काढावे लागत होते. पण सरकारने त्याची मर्यादा तीन लाखांपर्यंत कमी आणली. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला असला तरी येथे मात्र सरकारी बाबू आपल्या साखळीतील कंत्राटदारालाच कामे मिळवून ​देण्यासाठी दोन लाख नव्वद हजारांचेच काम दाखवात. काम मोठे असल्यास त्याचे विभाजन केले जाते. मजूर संस्था आणि सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांच्या नावाने इतरांना काम देत 'आंबा' पाडण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेत सर्रास सुरू असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुईकर कॉलनीतील बंगल्यात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनी येथे बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची शक्यता आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व घड्याळे असा चार लाख ४७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

रुईकर कॉलनीत दिलीपसिंह तात्यासाहेब मोहिते (प्लॉट नं. ५९) यांचा बंगला आहे. त्यांनी सहा महिन्यापूर्वी घाटगे-पाटील कारखान्यातील पर्चेस ऑफीसर व्ही. एम. जोशी यांना बंगला भाड्याने दिला आहे. जोशी यांच्या आई आजारी असल्याने ते कुटुंबियासह पुण्याला गेले आहेत. गेले आठवडाभर बंगला बंद होता. शुक्रवारी सकाळी बंगल्याची झाडलोट करणारे शरद भानुदास पाटील (रा. कारंडे मळा) हे बंगल्यात आले. त्यांनी कुलूप उघडून प्रवेश केला असता पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. तसेच पहिल्या मजल्यावर बेडरूममधील कपाटाचे दरवाजे उघडे दिसली. खोलीत साहित्य विस्कटल्याने दिसल्याने त्यांनी जोशी यांना मोबाइलवरून माहिती दिली. जोशी यांनी कारखान्यातील सिक्युरिटी ऑफीसर जी. बी. घोडके यांना माहिती दिली. ते बंगल्यात आले. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याला चोरीची कल्पना दिली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी चोरटा मागील दरवाजाने बंगल्याच्या आवारात आला. त्याने खिडकीचा गज वाकवून बंगल्यात प्रवेश केला. बेडरुममधील कपाटातील दागिन्याचे बॉक्स मोकळे असल्याने त्याने चोरी केली असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइनबाजारमध्ये अतिक्रमण हटाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रोडवरील लाइन बाजार परिसरातील महापालिकेच्या मुलीची शाळा क्रमांक सहाने शुक्रवारी मोकळा श्वास घेतला. शाळेच्या भोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले​ होते. चहाच्या टपरी, पानपट्टीने शाळेभोवती विळखा घातला होता. महापालिकेच्या ताराराणी मार्केट विभागामार्फत शुक्रवारी दुपारी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली.

महापालिकेची कसलीही परवानगी न घेता शाळा परिसरात आणि रस्त्यालगत लोखंडी केबिन थाटण्यात आल्या होत्या. वडापाव, चहाची टपरी, पानपट्टीने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही अतिक्रमण हटविण्याची मागणी सातत्याने होत होती. रोडलगत अतिक्रमणे थाटल्याने चौकात वाहतुकीची कोंडी व्हायची.

महापालिकेने मोहिम राबविताना बारा लोखंडी केबिन काढल्या. केबिन हटवताना काहीवेळा तणाव निर्माण झाला. मात्र बेकायदेशीर केबिनधारकावर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी पोलिस बंदोबस्त होता. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यावेळी कनिष्ठ अभियंता बी. एन. दबडे, एम. जी. फुलारी, एस. पी. पाटील, मिरा नगीमे यांच्यासह अग्निशमन विभाग, अतिक्रमण निर्मूलन पथक, इस्टेट विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सोमवारपासून मोहिम तीव्र होणार

शहरातील प्रमुख मार्गावर मोठ्या संख्येने केबिन, खोकी उभारण्यात आली आहेत. अन​धिकृत के​बिनचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. शहरातील उद्याने, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, बिंदू चौक, खाऊ गल्ली, महावीर उद्यान, महावीर कॉलेज, आरटीओ ऑफीस कार्यालय परिसर, सासने मैदान परिसर येथे बेकायदेशीररित्या केबिन उभारल्या आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे. चारही विभागीय कार्यालयांमार्फत सोमवारपासून कारवाईची मोहिम तीव्र होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र संचालकांना तात्पुरता दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने सहकार कायद्यामध्ये काढलेल्या नवीन अध्यादेशाला स्थगिती मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकार पक्षाने मुदत मागितली आहे. त्यामुळे आजची सुनावणी अपुरी राहिल्याने संचालकांना वीस दिवसांचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

सोमवारी (ता. १५) याबाबतची सुनावणी होणार होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने सुनावणी होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

विमा संरक्षण असलेल्या बँकांवर २००६ नंतर प्रशासक नियुक्त झाल्यास संचालक मंडळापुढील दहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. सरकारच्या वटहुकूमाला जिल्हा बँकेच्या अकरा संचालकांनी स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी न्यायाधीश धर्माधिकारी व पटेल यांच्यासमोरील सुनावणीवेळी सरकार पक्षाच्यावतीने सीनिअर कौन्सिल अनिल साखरे व विनित नाईक तर जिल्हा बँकेतर्फे अॅड. श्रीनिवास पटवर्धन यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैनीसाठी एटीएमची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चैनीच्या सवयीतून गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील तिघांसह सहा जणांच्या टोळीने बँकांची एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जयसिंगपूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या टोळीने १० फेब्रुवीरी रोजी पिंपळगावचे येथील (ता. भुदरगड) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

या टोळीचा मुख्य विजय नामदेव पाटील (वय २६, रा. सम्राट कॉलनी, कोल्हापूर) असून तो मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील कडगावचा आहे. तसेच महादेव मारुती लोहार (१९, रा. नामदेव गल्ली, कडगाव), सुनील बाळासो पाटील (१९, रा. कडगाव), बलराज रघुनाथ केसरकर (१८, रा. हसुर बुद्रुक, ता. कागल), सागर तानाजी कमलाकर (३०, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. सर्वांनी कर्ज फेडण्यासाठी त्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. सहाही संशयित फॅब्रिकेशन व्यवसायातील आहेत. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक डी. एन. मोहिते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पोलिस निरीक्षक मोहिते यांना जयसिंगपूर शिरोळ रस्त्यावरील बँकेच्या एटीएम मशिनवर दरोडा घालण्यासाठी टोळी येणारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक रमेश खुणे, विकास जाधव, उपनिरीक्षक गजेंद्र पालवे यांच्यासह पथकाने सापळा रचला. रात्री पावणेदोन वाजता पांढऱ्या रंगाची मोटार एटीएम सेंटरजवळ आली. मोटारीतील सहा तरुणांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मोटारीच्या तपासणीत दोरी, कटावणी, लहान गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, गॅस कटर, मिरची पावडर सापडली. चौकशीत ते एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पकारवाईत जयसिंगपूरचे सहायक निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक सुशिलकुमार वंजारी, सहाय्यक फौजदार दिलीप वासमकर, पोलिस हवालदार संजय हुंबे, हणमंत ढवळे यांच्यासह पोलिस सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images