Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर-मुंबई अंतर होणार अर्ध्या तासाने कमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर ते मुंबईपर्यंतच्या प्रवासाचे अंतर नजीकच्या काळात अर्ध्या तासाने कमी होणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा तयार झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणे आता वाहनधारकांना सुलभ जाणार आहे. शिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक (उपक्रम) बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात याची घोषणा केली.

कोल्हापूरला टोलमुक्त केल्याबद्दल आयोजित विजयोत्सव सोहळ्यात बोलताना मंत्री शिंदे यांनी राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सांगितले. नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणावळयापासून नवीन बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या कामामुळे पुर्ण पुण्यापर्यंतचा परिसर बायपास होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे या दरम्यानच्या

खंडाळा घाटातील प्रवास कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी कोल्हापूर ते मुंबई हे अंतरही कमी वेळात गाठता येणार आहे. याबरोबरच सहा पदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यामुळेही मुंबईपर्यंतच्या प्रवासाला लागणारा वेळ बराच कमी होणार आहे.

राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर लोकोपयोगी निर्णय होऊ शकतात, मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते हे युती सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करून दाखवून दिले आहे.

जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकार कामकाज करत आहे. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी यापूर्वी काही मंडळी आयआरबी कंपनीची वकिली करत होते. परिणामी कंपनीचे प्रतिनिधी जुमानत नव्हते. टोलमुक्तीसंदर्भात झालेल्या पहिल्याच बैठकीत आयआरबीच्या प्रतिनिधींनी टोल रद्द करता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. तेव्हा टोलमुक्तीच्या मार्गात आडवे आल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करू, असा इशारा दिल्यावर कंपनीच्या प्रतिनिधींना घाम फुटला होता याची आठवण करून देत मंत्री शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्तीचा शब्द दिला होता. त्याची पूर्तता झाली हा माझ्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असल्याचे नमूद केले. टोलमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी

सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालविवाह रोखण्याची ग्रामसेवकांची जबाबदारी

0
0

janhavi.sarate @timesgroup.com

कोल्हापूर : बालकांचे हक्क व अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने आता गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामपंचायतींवर देण्यात आली आहे. प्रत्येक गावात बालकांच्या संरक्षणाची, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराच्या निवारणाची, तसेच त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी तत्पर राहण्याचे काम ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे. जिल्ह्यात अशा ११९६ गावांत आणि तालुकास्तरीय १२ बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सरकारने बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती केल्यामुळे गावापातळीवरील बालविवाह रोखण्याचे आव्हान ग्रामसेवकांना पेलावे लागणार आहे.

राज्यभरातील ३५ जिल्ह्यांतून जिल्हा बालसंरक्षण कक्ष सुरू झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बालकल्याण संकुलामध्ये कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत तालुकास्तरीय आणि आता गावस्तरीय बालसंरक्षण समित्यांचीही रचना करण्यात आली आहे. बालकांना अत्यावश्यक सेवा व सुविधा देणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण व त्यांच्यात समन्वय, अशा संस्थांतील शासकीय-अशासकीय व्यक्तींचा क्षमता विकास, बालकांच्या संरक्षणासंदर्भातील माहितीचे संकलन, बालसंरक्षणाबाबत समाजात जनजागृती व बालकांसंदर्भातील कायद्यांच्या अंमलबजावणीचे काम या समित्यांना करावे लागणार आहे. कोल्हापुरात एक वर्षांपूर्वी बालसंरक्षण समित्या गठीत झाल्या आहेत. समितीचे अध्यक्ष सरपंच असून अंगणवाडी सेविका सदस्या सचिव म्हणून काम पाहात आहेत.

ग्रामीण भागात सर्वाधिक बालविवाह होण्याचे प्रमाण आहे. हे रोखण्यासाठी ग्रामीणपातळीवर उपाय-योजनांची आवश्यकता आहे. भारतीय प्रतिष्ठान संस्थेच्या प्रकल्पांतर्गत सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसासरकारी आकडेवारीनुसार राज्यात १५ वर्षाखालील मुलींची संख्या १ कोटी ४८ लाखाहुन अधिक आहे. त्यापैकी ६५ हजाराहुन अधिक मुलींचा बालविवाह झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक महसुली गावात ग्राम बालसंरक्षण समिती अनिवार्य करण्यात आली आहे. संबंधित गावचे सरपंच वा त्या ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या सदस्याच्या अध्यक्षतेखालील या समितीत पोलिस पाटील, आशा सेविका, गावातील शाळेचे मुख्याध्यापक वा शिक्षक प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, तसेच गावातील स्वयंसेवी संस्था, बचत गट व महिला मंडळाचे प्रतिनिधी आणि १२ ते १८ वयोगटातील एक मुलगा व एक मुलगीही या समितीत सदस्य आहेत.

बालविवाह, बालकामगार, बालकांचा अनैतिक व्यापार याबाबत अधिक दक्षता घेताना प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबवताना बालकांचे शोषण करणारांवर कायदेशीर कारवाईसाठीही पाठपुरावा करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावात ग्राम बालसंरक्षण कृती दले तयार करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार आता गावपातळवरही बालकांचे संरक्षण करण्याची मोठी चळवळ सुरू झाली आहे.

अद्याप आळा नाही...

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंधक अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात येते. कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने बालविवाहांना अद्यापही पूर्ण आळा बसलेला नाही. ग्रामीण भागात आजही बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामसेवकांकडे एक किंवा दोन गावांची जबाबदारी असल्याने त्यांचे गावातील घडामोडींवर लक्ष असते. त्यामुळे त्यांच्यावर सरकारने जबाबदारी सोपवली आहे.

२६ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापुरातील ११९६ गावांमध्ये तसेच प्रत्येक तालुकास्तरावर बालसंरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याचबरोबर बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती केली आहे.

शखील शेख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणमुक्तीचे मिशन हाती घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्द करुन कोल्हापूरला दिलेला शब्द पाळला आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या अडचणी सहजपणे समजतात. सरकारने आता पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी ठोस पाऊल उचलावीत', अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरी सत्काराप्रसंगी करवीरवासियांनी केली.

प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर रविवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टोलविरोधी कृती समितीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, निमंत्रक निवासराव साळोखे, बाबा पार्टे यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार झाला. टोल रद्द केल्याबद्दल उपस्थितांनी सत्कारसोहळ्यात टोलमुक्तीच्या लढवय्यांचा जयघोष केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'महायुतीचे सरकार हे लोकशाहीचे सरकार आहे. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श तत्वानुसार राज्य सरकारचे कामकाज सुरू आहे. आमच्या सरकारच्या विरोधात मोर्चा आणि आंदोलने झालेली नाहीत. सामान्य माणसांच्या मनातील अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणतात. आता सीपीआरच्या काही समस्या आहेत. त्यापैकी काही सोडविल्या आहेत. उर्वरित समस्याही येत्या काही दिवसांत मार्गी लावू. कोल्हापूरच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या मदतीने सुरू आहेत.'

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'राजकीय इच्छाशक्ती असल्यास कोणतेही काम मार्गी लागू शकते, याचे उदाहरण मुख्यमंत्री फडणीवस यांनी कृतीतून दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून आजअखेर आश्वासनेच मिळाली. मात्र भाजप, सेनेच्या सरकारने आयआरबीच्या रस्त्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून सर्वसामान्यांच्या मनातील टोलमुक्तीचे स्वप्न पूर्ण केले. आता कोल्हापूरच्या पंचगंगेचा नदी शुद्धीकरणाचा प्रश्न आहे. प्रदुषणामुळे नागरिकांना काविळीचा विळखा घातला आहे. त्यामुळे एक उपक्रम हाती घेऊन पंचगंगेला प्रदुषणमुक्त करावे.

खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'आयआरबीला कोल्हापुरात कोणी निमंत्रण दिले आणि त्यानंतरच्या वाटाघाटी जनतेला माहिती आहेत. सर्वसामान्यांना भेडसवणारा टोलचा प्रश्न महायुतीने मार्गी लावला. आता राज्यातील काही टोलनाक्यांकडे लक्ष वळविले पाहिजे. त्याचे मूल्यांकन, वसुली, फरक यांची चौकशी केली पाहिजे. कोल्हापूरला खंडपीठ किंवा सर्किट बेंचही द्यावे. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्नही मार्गी लावावा.'

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, टोलमुक्त कोल्हापूर झाल्याने आनंदोत्सव साजरा केला आहे. मात्र, आयआरबीवर रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी किमान ३ वर्षांसाठी देण्यास हरकत नाही.'

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, 'आयआरबीच्या वेढ्यातून कोल्हापूरची सुटका झाली. सध्याचे सरकार निश्चित शहराच्या विकासाचे प्रश्न सोडवतील.'

महापौर आश्विनी रामाणे म्हणाल्या, 'महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. आयआरबीने केलेल्या रस्त्याच्या देखभालीची खर्च परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.'

आमदार अमल महाडिक, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, काँग्रसचे गटनेते शारंगधर देशमुख, कृती समितीचे अॅड. बाबा इंदुलकर, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, अॅड, संपतराव पवार, शेकापचे अशोक पवार, बाबा देवकर ,स्वप्नील पार्टे, दीपा पाटील, उद्योगपती चंद्रकांत जाधव, संभाजी जाधव, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महानगराध्यक्ष संदीप देसाई, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, सुरेश जरग, विवेक कोरडे, ज्येष्ठ पत्रकार प्रतापसिंह जाधव, पंडितराव सडोलीकर, उत्तम कांबळे, मनसेचे राजू जाधव, आदी उपस्थित होते. टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी प्रास्ताविक केले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले. रामभाऊ चव्हाण यांनी आभार मानले.

डावे पक्ष गैरहजर

टोलविरोधी कृती समितीतर्फे झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दलाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. टोलमुक्ती आंदोलनात या संघटनांचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनील सुटीसाठी नेहमीसारखा घरी येईल

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
मस्करवाडीतील सूर्यवंशी कुटुंबाचे घर अस्वस्थ आहे. सुनील सियाचिनमध्ये हुतात्मा झाल्याची बातमी त्यांना समजली आहे, पण मृतदेह नाही. त्यामुळे ही बातमी खोटीच ठरो, आणि सुनील नेहमीसारखा सुटीसाठी घरी येवो, अशी आशा सूर्यवंशी कुटुंबाला वाटते आहे.
सारा गाव या कुटुंबाची ही आशा पूर्ण होवो, अशी प्रार्थना करीत आहे. सुनील विठ्ठल सू्र्यवंशी (वय २४) सियाचिनमध्ये गेल्या बुधवारी झालेल्या हिमस्खलनात बेपत्ता झाले आहेत. या दुघटनेतील सर्व जवानांना सरकारने मृत घोषित केले आहे. सुनील यांच्या चार महिन्यांच्या मुलीचे बारसे अजून व्हायचे आहे. त्यांच्या पत्नीला आस आहे, पती परत येईल आणि लाडक्या लेकीचेकोडकौतुक करेल.
सुनील यांच्या मृत्यूबाबत अद्याप लष्कराकडून अधिकृत माहिती सूर्यवंशी कुटुंबाला मिळालेली नाही. वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांच्या आधारे सूर्यवंशी कुटुंबीयांनी वरिष्ठांशी संपर्क साधला असता, कोणावरही विश्वास ठेवू नका शोधकार्य सुरू आहे. तुम्ही सुनील सुखरूप असावा, यासाठी प्रार्थना करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे चिंता वाढली आहे आणि सुनील खरोखरच सुखरूप असावा आणि त्याने पुन्हा एकदा देशाच्या सीमेवर जाऊन संरक्षण करावे अशी अपेक्षा आहे. आम्ही सुनीलसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत, असे कुटुंबीयांनी सांगितले.
सियाचिनमध्ये बुधवारी हिमकडा कोसळून दहा जवान त्याखाली गाडले गेले. या घटनेतील सर्व जवान मृत झाले असल्याचे सरकारने गुरुवारी घोषित केले. या जवानांमध्ये सुनीलचाही समावेश होता. मात्र, लष्कराने अजूनही तपास कार्य थांबवलेले नसल्याने अजूनही सुनील परत येण्याची आशा कुटुंबाला वाटते आहे. सुनील यांचे बंधू तानाजी कराड येथे बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करतात.

दोन वर्षांनी परत
दरम्यान सन १९६५ मध्ये याच गावातील एक जवान असाच हिमकडा कोसळल्याने बेपत्ता झाला होता. दोन वर्षांनी तो गावी परत आला होता. असाच प्रकार सुनीलबाबत घडून त्याने परत यावे, असा आशावाद सूर्यवंशी कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालकमंत्र्यांकडून सांगलीबाबत भेदभाव’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
'कोल्हापूरच्या जनतेने मागणी केल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा टोल सरकारने माफ केला. मात्र सांगलीतील जनतेला म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपये दिले जात नाहीत. पालकमंत्र्यांकडून अशा प्रकारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत भेदभाव केला जात आहे,' अशी टीका काँग्रेसचे नेते प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी केली.
'म्हैसाळचे पैसे काँग्रेस नेत्यांनी भरावेत, हे सांगण्यापूर्वी भाजप नेत्यांनी जनतेसाठी स्वतःच्या शिखातून किती पैसे दिले हे आधी सांगावे,' असा प्रतिटोलाही प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी लगावला.
पैसे भरल्याशिवाय म्हैसाळ योजना सुरू करणार नसल्याचे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत सांगितले होते. काँग्रेस नेत्यांकडून योजनेचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्रा. जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती खंडेराव जगताप, अनिल आमटवणे, सांगली बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, सलगऱ्याचे उपसरपंच तानाजी पाटील आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.
या वेळी बोलताना प्रा. जाधव म्हणाले, 'जनतेने निवडणुकीत भाजपला मते दिली. मात्र भाजप सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम व जयंत पाटील यांनी निधी देऊन योजना सुरू ठेवली. काँग्रेस व
राष्ट्रवादीच्या काळातच जनतेला अच्छे दिन होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहासह रखडलेले प्रश्न मार्गी लावू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतणीकरण पूर्ण झाल्यानंतर आता उदघाटनाची प्रतीक्षा सुरू असल्याने अखिल भारतीय नाट्य परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी (ता. ७) रेसिडेन्सी क्लब येथे निवेदन दिले. याशिवाय बांधकाम कामगार संघटना, हिंदू एकता आंदोलन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननचे निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रखडलेले प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची रेसिडेन्सी क्लबवर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदने दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या उदघाटनाकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल महाजन यांनी मागण्यांचे निवेदन दिले. लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेनेही बांधकाम कामगारांचे मेडिक्लेम, दिवाळी भेट, सन्मानधन, पेन्शन योजना, आरोग्य विमा रक्कम मिळावी या मागण्यांचे निवेदन भरमा कांबळे यांच्या शिष्टमंडळाने दिले. रिपब्लिनकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई आणि आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननेही शेतमजूरांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, घरबांधणीसाठी अनुदान, दोन लाखांपर्यंत दवाखान्यातील मोफत उपचार, पेन्शन मिळावी अशा मागण्यांचे निवेदन दिले. युनियनचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कसबे, अनिल सनदी आदींनी हे निवेदन दिले.

हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले यांनी खंडपीठाच्या मागणीचे निवेदन दिले. निवृत्त सहायक फौजदार कुंडलिक कांबळे यांनी त्यांची प्रलंबित पेन्शन मिळावी यासाठी निवेदन दिले. गांधीनगर येथील अशोक चंदवाणी यांनी गांधीनगरातील बेकायदेशीर बांधकामांबाबतचे निवेदन दिले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमावा आणि आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करावी या मागणीचेही निवेदन चित्रपट महामंडळ बचाव कृती समितीने दिले. तर लोकतंत्र सेनानी संघानेही विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. माजी आमदार राजीव आवळे यांनी महामंडळांमधील गैरकारभारावर आक्षेप घेत महामंडळांचा कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निवेदन घेऊन कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी विविध संघटनांच्या वतीनेही मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनी निवेदनांमधील प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अश्वस्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.


राज्यातील महामंडळांच्या गैरकारभाराविरोधात माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह समर्थकांनी ताराबाई पार्कात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने केली. पितळी गणपती चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी त्यांनी केली होती. माजी आमदार आवळे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पितळी गणपती चौकात घोषणाबाजी सुरू केल्यावर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. यावेळी आवळेंसह शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन पोलिसांनी दिले. नंतर आवळे यांनी रेसिडेन्सी क्लब येथे मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या ‘त्या’ मोटारीला दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सोलापुरात एका कार्यक्रमावेळी वापरलेल्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून शंभर रुपयाचा दंड वसूल केला. विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी पाटील फॅन्सी नंबर असलेल्या वाहनातून जात होते. या गाडीचा क्रमांक एमएच १३ सीएफ ८११० असा आहे. नंबर प्लेटवरील नंबर स्पष्ट दिसत नाही. मात्र त्यांचा आकार इंग्रजी अक्षरातील 'बीजेपी' असा दिसत होता.

पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या या गाडीची‌ शनिवारी दिवसभर माध्यमात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पोलिसांनी फॅन्सी नंबर वापरल्याबद्दल संबंधित वाहनचालकाकडून शंभर रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई रविवारी करण्यात आली. रमेश दत्तात्रय मुळे (रा. सोलापूर रोड, बार्शी) यांच्या मालकीची ही गाडी आहे. पाटील यांचे सोलापुरात अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ येथे कार्यक्रम होते. त्यावेळी त्यांनी ही गाडी वापरली होती. गाडीवरील फॅन्सी क्रमांकावरून गदारोळ झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळ कनेक्शनसाठी पुन्हा अनामत कशाला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेकडून नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांकडून पाचगाव ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्यासाठी अनामत रक्कमेची आकारणी करू नये अशी मागणी पाचगाव उपनगर कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात पाचगाव ग्रामपंचायतीला सोमवारी सकाळी निवेदन देण्याचेही बैठकीत ठरले. कृती समितीच्या बैठकीत पाच ठराव करण्यात आले. त्यासंदर्भात पाचगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा माजी सैनिकांनी दिला.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगावमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीकडून नवीन नळकनेक्शन देणे सुरू असून ३५०० हजार रुपये अनामत घेतली जात आहे. मात्र, पाचगावच्या उपनगरातील अनेक कॉलन्यातील नागरिकांनी यापूर्वीच महापालिकेचे नळ कनेक्शन घेतले आहे. त्यांनी महापालिकेकडे अनामत रक्कम भरली आहे. अशा नळ कनेक्शनधारकांकडूनही ग्रामपंचायतीने अनामत रक्कम आकारणी सुरू केली आहे. त्याला पाचगाव उपनगर कृती समितीने विरोध केला आहे.

दरम्यान, याप्रश्नी झालेल्या बैठकीत निवृत्त मेजर सुभेदार जी. एस. पाटील. अॅड. बाळासाहेब पाटील, के. बी. पाटील, प्रा. मनोहर सुर्यवंशी,कृष्णात चौगुले, वीरेंद्र डिग्रजे, विजयसिंह हजारे, विश्वनाथ सुतार आदी उपस्थित होते. अनामत रक्कमेला विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ग्रामपंचायतीने अनामत रक्कम आकारणीचा निर्णय घेतल्यास एक हजार रुपये भरून घ्यावेत आणि पाचगाव गावठाणमधील नागरिकांना ज्या पद्धतीने वर्षाला ३६० रुपये पाणीपट्टी आकारणी केली जाते. तेवढीच पाणीपट्टी आकारावी अशी मागणी करण्यात आली. पाणीमीटर यंत्र शून्य करण्याची अट रद्द करावी. ही अट नागरिकांसाठी जाचक आहे. पाचगाव ग्रामपंचायतीकडे पुरेसा व कुशल मनुष्यबळ नाही. यामुळे पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरित करावी. तसेच उपनगरे महापालिकेकडे वर्ग करावीत असे ठराव करण्यात आले.

दरम्यान, याप्रश्नी कृती समितीचे पदाधिकारी सोमवारी (ता.८) पाचगाव ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेणार आहेत.या अडचणीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिराळी’ला भाताला देणार नवी झळाळी

0
0

भगवान शेवडे, शिराळा
शिराळा तालुक्यात होणाऱ्या शिराळीसह भाताच्या सहा देशी वाणांचे संवर्धन करून त्यांचा व्यावसायिक वापर वाढविण्याचे प्रयत्न कोकरुड (ता. शिराळा) येथील विकास नांगरे यांना चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी शेतातच देशी वाणांची बीज बँक तयार केली आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. त्यामुळे या परिसरात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शिराळ्याचा शिराळी तांदूळ परिचित आहे. अलीकडे मात्र संकरित व जादा उत्पादन देणारे वाण लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने सत्त्वयुक्त, पौष्टिक देशी वाण लुप्त होत आहेत. स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्ये जोपासणाऱ्या या वाणांना पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी विकास नांगरे यांच प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या शेतात त्यांनी देशी बियाणांची बॅँकच बनवली आहे. नांगरे यांची साडेचार एकर शेती आहे. त्यातील दोन एकर क्षेत्र भातासाठी राखीव ठेवून त्यात देशी वाणांची लागवड ते करतात. वीस गुंठे क्षेत्रातील प्रत्येकी पाच गुंठ्यात अन्य वाण लावून त्यांचे संवर्धन केले जाते. दुर्मिळ वाणांची साठवणूक एका खोलीत करण्यात आली आहे. त्यात भात वाणासह देशी कांदा, कडवा पावटा, डुकरी शाळू, मूग, मटकी, बाजरी, खरीप मका, देशी दोडका, काकडी, गवार, भेंडी आदींचे देशी वाणही जोपासले आहेत. स्थानिक शेतकऱ्याने एक पायली बियाणे नांगरे यांच्याकडून नेल्यास, त्यांच्या शेतात उत्पादन निघाल्यावर, त्या मोबदल्यात दोन पायली परतफेड ते घेतात. यातून ते शेतकऱ्यालाही वाण संवर्धनासाठी प्रप्रोत्साहित करतात. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ५० रुपये किलो प्रमाणे ते बियाणे उपलब्ध करून देतात. मधुमेही किंवा अन्य व्याधी असणारे लोकही आवर्जून येऊन भात घेऊन जात आहेत.
इतर काही जिल्ह्यांतील भाताच्या दुर्मिळ जाती एकत्रित करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवाशी लोकांशी संपर्क करून त्यांनी काही जाती उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कोकणातील लांजा, गुहागर, देवरूख, चिपळूण, मलकापूर आदी परिसरातील देशी वाण आणून ते त्यांच्या शेतात लागवड करतात.


युरियाचा एखादा डोस वगळता अन्य कोणती रासायनिक खते व औषधाची फवारणी भातपिकावर होत नाही. त्यामुळे आमचे उत्पादन सेंद्रिय वा नैसर्गिकच आहे. देशी बियाणे कंपनीमार्फत बाजारात यावेत, यासाठी माझे प्रयत्न असून, त्या दृष्टीने एका कंपनीला शिराळी भात, जोंधळा, मासाड, जाडा, गुलाबी, वांडरे, दोडग आदी भाताचे वाण दिले आहेत. भविष्यात त्यांचे ब्रॅँडिंग करून बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न आहे, असे विकास नांगरे यांनी सांगितले.


यूपीएससी सोडून शेती
वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे- पाटील यांचे विकास सख्खे बंधू आहेत. एलएलबीची पदवी घेतल्यानंतर विकास यांनीही दिल्ली येथे 'यूपीएससी' परीक्षेचा अभ्यास केला; परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी गावी येऊन शेती व अन्य व्याप सांभाळण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.



भात वाणांची वैशिष्टे -

शिराळा जोंधळा - आकार हुबेहूब जोंधळ्यासारखा व सुवासिक. अन्य तांदळात थोडासा टाकून शिजवला तरी सर्व भाताला सुवास सुटतो
शिराळा जाडा - तुलनेने जाड व सत्त्वयुक्त तांदूळ. थोडा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे वाटते.
गुलाबी मासाड - याला झडगे भातही म्हणतात. याचे आवरण काळसर गुलाबी. याची भाकरीही चवदार लागते.
वांडरं भात- सत्त्वयुक्त. याचे काड जनावरांसाठी उपयोगी.
दोडगं भात- याचे चुरमुरे चांगले होतात. दाणे लांब, जाडे असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधांच्या कार रॅलीतून दिला डोळस संदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
येथील राउंड टेबल ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंधांच्या कार रॅलीमध्ये ८० अंध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. ही आगळी वेगळी कार रॅली बेळगावकरांच्या औत्सुक्याचा विषय ठरली.
पोलिस उपायुक्त अनुपम अगरवाल यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीतील प्रत्येक कार चालविणाऱ्या व्यक्तीशेजारी अंध व्यक्ती बसली होती आणि अंध व्यक्ती सांगेल त्या प्रमाणे वाहनचालक वाहन चालवत होते. या रॅलीसाठी अंध व्यक्तींना समजेल अशा पद्धतीन ब्रेल लिपी मध्ये नेव्हिगेशन सिस्टीम तयार करण्यात आली होती. या सिस्टीमद्वारे अंध व्यक्ती सूचना देईल त्या प्रमाणे वाहनचालक वाहन चालवत होता.
रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक कारवर एक सामाजिक संदेश देण्यात आला होता. रॅलीबरोबरच समाजात जनजागृती व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश होता. बेटी बचाव, प्रदूषण टाळा, झाडे लावा, बेळगाव स्मार्ट सिटी स्वच्छ ठेवा, पाण्याचा वापर जपून करा असे संदेश लिहिण्यात आले होते. या रॅलीमधून जमा झालेला निधी राउंड टेबल ऑफ इंडिया शैक्षणिक कार्यासाठी वापरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणोत्सव अडथळ्यांचा अहवाल तयार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यातील अडथळ्यांबाबत पाहणी व अभ्यास नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचा सविस्तर अहवाल किरणोत्सव अभ्यास समितीच्यावतीने ८ फेब्रुवारी रोजी महापालिका प्रशासनाला देण्यात येणार आहे.

१६ जानेवारीपासून अडथळ्यांच्या अभ्यासाची प्रक्रिया सुरू होती. मुख्य गर्भकुडीपासून रंकाळा परिसरापर्यंत ३५० मीटर अंतरातील किरणोत्सव मार्गात येणाऱ्या अडथळ्यांच्या नोंदी या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया टोलट स्टेशन स्टडी या सर्व्हेक्षणद्वारे करण्यात आली. किरणोत्सव मार्ग पाहणी समितीच्यावतीने प्रा. किशोर हिरासकर, शीतल वरूर, उदय गायकवाड यांच्यासह केआयटी कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांनी ही पाहणी केली.

मूळ इमारतींच्या उंचीसह वाढीव बांधकाम, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, शेड, पत्रा यासंदर्भातही नोंदी करण्यात आल्या आहेत. किरणोत्सव मार्गावरील जमिनीचा उंचसखल भाग आणि त्यावर उभ्या असलेल्या इमारतींच्या उंचीचे मोजमापन करण्यात आले. या पाहणीअंतर्गत केलेल्या नोंदीनुसार किरणोत्सव मार्ग विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येणार आहे. या मार्गावर भविष्यात बांधकाम करण्यास अटकाव करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनेही काम होण्याची शक्यता आहे.

तसेच शहरात अकरा मजली इमारतींना जरी परवानगी देण्यात आली तरी हा नियम किरणोत्सव मार्गातील इमारत बांधकामाच्या बाबतीत लागू न करण्याची नियमावली बनवण्याच्या दृष्टीनेही समिती सदस्यांच्या अहवालात शिफारस करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना भेटू

0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
'सीमाभागातील जनतेवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार आणि आमदार मिळून पंतप्रधान मोदींची भेट घेऊ. शिवसेना पूर्वीपासून सीमावासीयांच्या बरोबर आहे आणि भविष्यातही सीमावासीयांबरोबर राहील,' अशी ग्वाही उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहताना काढले.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १९६९ साली हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना सोमवारी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आदरांजली वाहण्यात आली. सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हुतात्मा दिन कार्यक्रमात हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले आणि दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. हुतात्मा अमर रहे, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी मुंबईचे शिवसेना आमदार सुनील शिंदे, माजी आमदार वसंतराव पाटील, किरण ठाकूर, अरविंद नागनुरी, प्रकाश शिरोळकर, मालोजी अष्टेकर आदी उपस्थित होते.
'सीमाभागात मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे द्यावीत, असा उच्च न्यायालय आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने आदेश दिला आहे, पण बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम दुटप्पी धोरण स्वीकारत आहेत. मराठी भाषिकांच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची बेळगावमधून हकालपट्टी करावी आणि येथे केंद्रातील अधिकारी नेमावा,' अशी मागणी किरण ठाकूर यांनी केली.
'कोणत्याही संघर्षाला शिवसेना तयार आहे. येळ्ळूर घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाने सीमावासीयांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजेत. केवळ समन्वयासाठी मंत्र्यांची नेमणूक करून चालत नाही,' असा टोला भाजपचे नाव न घेता मुंबईचे आमदार सुनील शिंदे यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्याचा नवा मार्ग शोधा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
'युवकांनो, पराभवाने खचून जाऊ नका, जगण्याचा नवा मार्ग शोधा,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी मिरज येथे केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्या सौ. शैलजा साळुंखे होत्या.
फुटाणे यांनी सांगितले, 'एकाच मार्गाचा हट्ट न धरता इतर मार्गांकडे सकारात्मकपणे पाहिले पाहीजे. यासाठी आपल्याकडे चांगली निर्णयक्षमता असावी लागते. ही क्षमता पुस्तक वाचनामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. पुस्तकांतील शब्दांतून संस्कार घडतात व यातूनच चांगला माणूस तयार होतो. आपण आपल्यातील क्षमता ओळखायला शिकले पाहिजे व त्यानुसार मार्गक्रम केला पाहिजे.'
'युवकांनी २५ वर्षांपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊ नये. आधी आपले करिअर निश्चित करून ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तारुण्याच्या काळात आपल्याला संघर्ष करण्यासाठी उभे राहण्याची शक्ती महाविद्यालयातून मिळते,' असा सल्लाही फुटाणे यांनी दिला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. प्रा. सौ. घोडके यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. खोत यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत न्यायसंकुलात कामकाज सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक वर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यात असलेल्या पहिल्या दिवसाचे औ​त्सुक्याची प्रचिती जिल्हा न्याय संकुलातील इमारतीत सोमवारी पहायला मिळाली. कसबा बावडा रोडवरील पहिल्याच दिवशी न्यायसंकुल या नव्या इमारतीत सुनावणीचा श्रीगणेशा करण्यासाठी ​वकिलांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी आम्ही केस चालवली अशा शब्दात वकील आपल्या भावना व्यक्त करत होते.

रविवारी मुंबई हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नवीन न्यायसंकुलातील इमारतीचे उदघाटन झाले. उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी कोर्टाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची घोषणा न्यायालय प्रशासनाने केली होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू झाले. तत्पूर्वी आवारातील चारचाकी पार्किंग अवघ्या अर्ध्या तासात फुल्ल झाले. इमारतीच्या बेसमेंटला न्यायाधीशांची वाहने आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी पार्क झाल्या. इमारतीच्या उजव्या बाजुलाही दुचाकी व चारचाकी गाड्यांची मोठी गर्दी झाली होती.

प्रशस्त पायऱ्या, दोन्ही बाजूने रूंद रॅम्पवर प्रवेश करताना इमारतीची भव्यता न्याहाळत वकिलांनी कोर्टाच्या इमारतीत प्रवेश केला. तळमजल्यावरही वकिलांचे काही ग्रुप नव्या इमारतीचे कौतुक करताना दिसत होते. मध्यभागी असलेल्या जिन्यावरून प्रत्येक मजल्यावर जाण्याची सोय केली आहे. इमारतीत चार लिफ्ट न्यायाधीशांसाठी तर चार लिफ्ट वकील व पक्षकारांसाठी आहेत. कोर्ट शोधण्यासाठी वकिलांची धावपळ सुरू होती. सकाळी अकरा वाजता ३९ कोर्टात कामकाज सुरू झाले. दोन आठवड्यांचे कामकाज नियमीत केले असल्याने दिवसभराच्या सुनावणीचे वेळापत्रकबरहुकूम काम सुरू राहिले.

'कोर्टाचा परिसर हिरवाईने नटलेला असावा यासाठी पाच हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे', असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड विवेक घाटगे यांनी सांगितले. जिल्हा न्यायाधीश, न्यायालयीन प्रशासनाने त्यासाठी तयारी दर्शवली असून वकिलांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे असे ते म्हणाले.

इमारत सहा मजली असल्याने पक्षकार व वकिलांना सुनावणीची माहिती व्हावी यासाठी सर्व मजल्यांवर डिस्प्लेेचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. तसेच कोर्टाच्या इमारतीत व बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायसंकुलाच्या लिफ्टमध्ये बिघाड; अपघात टळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उदघाटनानंतर नवीन न्यायसंकुलात इमारतीत पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडली. मात्र लिफ्ट कोसळल्याची अफवा पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरणाचे निर्माण झाले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

नवीन इमारतीत एकूण आठ लिफ्ट आहेत. त्यामध्ये न्यायाधीशांसाठी चार तर वकील व पक्षकारांसाठी चार लिफ्ट आहेत. पहिल्याच दिवशी सर्व लिफ्ट सुरू होत्या. न्यायाधीशांच्या लिफ्टची क्षमता चार तर वकिलांच्या लिफ्टची क्षमता ११ जणांची आहे. मात्र पहिल्याच दिवशी इमारत पाहण्यासाठी गर्दी असल्याने क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती लिफ्टमधून ये जा करत होत्या.

लिफ्टमनची भरती केली नसल्याने शिस्तीचा अभाव होता. त्यामुळे सोमवारी दुपारी क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती लिफ्टमध्ये बसल्याने लिफ्ट वरच्या मजल्यावर जाण्याऐवजी खाली पहिल्या मजल्यावर वेगाने आली. त्यामुळे लिफ्टमधील पक्षकार, कर्मचारी व वकील घाबरून गेले. यानंतर लिफ्ट कोसळली अशी अफवा पसरली. न्यायालयातील कार्यालयीन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लिफ्टकडे धाव घेतली. त्यानंतर लिफ्ट पुन्हा सुरळीत सुरू झाली.

याबाबत जिल्हा न्यायालयाच्या रजिस्टार एस. एस. संकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता, 'क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती लिफ्टमध्ये असल्याने तांत्रिक बिघाड झाला' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक उतरले रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागातील भरती बंदी आदेशानुसार पायाभूत रिक्त पदांवर २ मे २०१२ नंतर भरती झालेल्या शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ‌कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने सोमवारपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.

एकूण ३३४ शिक्षकांच्या पदांना मान्यता झाल्या आहेत. मात्र त्याचे अद्याप वेतन सुरू नाही. ते त्वरीत सुरू करावे, २०११ ते २०१५ पर्यंतच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी, टप्पा अनुदानावरील शाळांतील मूल्यांकन आणि वैयक्तिक मान्यता नसल्याने वेतन मिळावे, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील प्रशासन स्वतंत्र करावे, सेवेची २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना सरसकट विनाअट निवडश्रेणी मिळावी, एमफिल, पीएचडीधारक शिक्षकांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याबाबत सरकारने शिफारस करण्यासाठी अभ्यास समिती नेमली आहे. समितीकडून अहवाल मागवून घेण्यासाठी आदेश व्हावेत यांसह इतर मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आज रिक्त पदांवर भरती झालेल्या शिक्षकांनी आंदोलन केले. मंगळवारी (ता. ९) मान्यता होऊनही वेतन नसलेले शिक्षक आंदोलन करणार असून वैयक्तिक मान्यता नसलेले, अर्धवेळ आणि सीएचबीचे शिक्षकही आंदोलनात सहभागी होणार असल्याचेती अध्यक्ष एस. बी. उमाटे यांनी सांगितले.

यावेळी प्रा. आर. के. पाटील, प्रा. आर. व्ही. नाईक, आर. आर. पारशेकर, एस. एस. जाधव, ए. व्ही. खरात, प्रा. पी. एस. डवरी, टी. एस. मेटकरी, एल. व्ही. मोहिते, एस. डी. धामणे, प्रा. व्ही. पी. पांचाळ, प्रा. पी. बी. बेरगळ आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनई-चौघडा वाजवून लाखाची वसुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी पाच पतसंस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे विद्युत सहकारी पतसंस्थेने एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तर विवेकानंद पतसंस्थेने जागृतीनगर येथील प्रॉपर्टी ताब्यात घेवून वसुलीची परवानगी दिली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे जिल्हा बँकेकडे दोन कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.

सोमवारी पाच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सनई चौघड्यासह अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारला. बीटी कॉलेज येथील मंगल त्रिमूर्ती पतसंस्थेकडे ७३ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. वसुलीसाठी चेअमरन जयसिंग पाटील यांची शाहूपुरी येथील दुकानात पथकाने भेट घेतली. संस्था अवसायनात निघाली असल्याने कर्जदाराची स्थावर मालमत्ता विक्री करुन कर्ज भागवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पतसंस्थेचे अवसायक अतुल पोवार, संचालक अष्टेकर यांच्यासह बँकेत तडजोडीसाठी येण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शाहू मार्केट यार्ड पतसंस्थेकडील दोन कोटी ३४ लाख कर्ज वसुलीसाठी पथक मार्केट यार्डात गेले. संस्थेचे चेअमरन शंकरराव वाकरे यांचे निधन झाल्याने त्यांचे वारस गौरव यांच्याकडे संपर्क साधण्यात आला. त्यांनी जडजोडीसाठी बँकेत येण्याचे मान्य केले. जागृती नागरी पतसंस्थेचे चेअरमन शंकरराव पोवार यांचे वारस राजू यांनी मार्चपर्यंत कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली. विद्युत महाशक्ती तांत्रिक नागरी पतसंस्थेने एक लाख रुपयांचा धनादेश संचालक मंडळ, वसुली अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. वसुली मोहिमेमध्ये बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष विनायक पाटील, संचालक राजेंद्र पाटील, अनिल पाटील, सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष पाटील, विलास गाताडे, सीईओ पी. बी. चव्हाण, डॉ. ए. बी. माने, जी. एम. शिंदे, आर. जे. पाटील, रणवीर चव्हाण, बी. एस. केखले सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर आराखड्यातून ७२ कोटींची कामे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखडाच्या पहिल्या टप्प्यात ७२ कोटींची विकासकामे होणार आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील विकासकामांची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयांना दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या कामांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात मंदिर विकास आराखड्याला मान्यता देऊन मार्चपूर्वी पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी उपब्लध करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महिन्याभरात पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांना फेरप्रस्ताव सादर केला होता. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प पारूप आराखडा हा २५५ कोटींचा आहे.

राज्य सरकारने, तुळजापूर, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० टक्के अनुदान दिले आहे, त्याच धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी अनुदान मिळावे अशी मागणी महापालिकेने केली होती. महापालिकेच्या १९ मार्च २०१३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने मंदिर विकास प्रकल्प आराखड्याचा ठराव मंजूर केला होता.

एकूण तीन टप्प्यात निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महापालिकेने याचा पाठपुरावा सुरू केला आहे. मंदिर विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रशासकीय स्तरासह मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात मंदिर विकास आराखड्याची सकारात्मक नोंद घेतल्याने या कामाला गती येईल अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाऊसिंगजी रोडवर शुकशुकाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर सव्वाशे वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या भाऊसिंगजी रोडवरील राधाबाई बिल्डिंगमधील जुन्या कोर्टाने प्रथमच शांतता अनुभवली. सीपीआर हॉस्पिटल्सच्या परिसरातील सर्व कोर्ट नव्या न्यायसंकुलात हलविल्याने जिल्हा न्यायालयाची मुख्य इमारत व राधाबाई बिल्डिंग परिसरात शुकशुकाट जाणवत होता. वकील व पक्षकारांची वाहने पार्किंग नसल्याने भाऊसिंगजी रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी झाली.

या कोर्टातून फर्निचर व कागदपत्रे हलवण्याचे काम सोमवारीही सुरू राहिले. त्यामुळे तुरळक गर्दी दिसत होते. फॅमिली कोर्टही याच इमारत असल्याने येथे न्यायदानाचे काम सुरूच राहणार आहे. सीपीआर चौक ते टाउन हॉल या भागात वकिलांची आणि पक्षकारांची वाहने नसल्याने वाहतूक कोंडी जाणवली नाही. मात्र येथील हॉटेल, चहागाड्या, झेरॉक्स मशिन सेंटर, टायपिंग सेंटरमधील व्यवसायांवर परिणाम जाणवला. सीपीआर हॉस्पिटलमधील पार्किंगही निम्म्याने रिकामे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळच्या गुलाबाचा परदेशात रूबाब

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

व्हॅलेंटाइन डेसाठी शिरोळमध्ये उत्पादित झालेले जवळपास ३७ लाख गुलाब देशविदेशांत पाठविण्यात येणार आहेत. नांदणीतील घोडावत अॅग्रोचे २० ते २५ लाख आणि कोंडिग्रेतील श्रीवर्धन बायोटेकमधील १२ लाख गुलाब जगभरातील व्हॅलेंटाइन डेची शोभा वाढवतील. घोडावतमधील लाल व इतर आकर्षक रंगाचे गुलाब जपान, यूके, ग्रीस, दुबई, हॉलंडमध्ये पाठविण्यात येणार आहेत. तर श्रीवर्धन बायोटेकममध्ये उत्पादित १५ लाख गुलाबांपैकी १२ लाख फुले ऑस्ट्रेलिया, ग्रीस, लंडन, जपान येथे निर्यात करण्यात येत आहेत. बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर येथील बाजारपेठेतूनही श्रीवर्धन बायोटेकच्या फुलांना मोठी मागणी आहे.

घोडावत अॅग्रोत सुमारे दीडशे एकर क्षेत्रात फुलशेती विकसीत केली आहे. येथील फुलांना देश-विदेशात मोठी मागणी आहे. व्हॅलेंटाइन डेसाठी सुमारे १२ ते १४ लाख लाल रंगाची गुलाब फुले तसेच उर्वरित इतर रंगाची फुले बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहेत. दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, हैदराबाद, विजयवाडा, राजमुंदरी, इंदौर, नागपूर, लखनौ, चेन्नई, सुरत आणि गोवा येथील बाजारपेठेतही येथील फुले पाठविण्यात येणार आहेत.

कृषी, औद्योगिक व व्यापार क्षेत्रातील संजय घोडावत यांचा प्रदीर्घ अनुभव या प्रकल्पास लाभला आहे. त्यांच्यासमवेत नीता घोडावत व प्रकल्पाचे कार्यकारी संचालक श्रेणिक घोडावत यांच्या नियोजना‌तून फुलांचे दर्जेदार उत्पादन घेण्यात आले आहे.

००००००००



श्रीवर्धन बायोटेकमध्ये १० डिसेंबरपासूनच व्हॅलेंटाइन डेची तयारी सुरू आहे. ग्रीन हाऊसमधील फुलांचे मागणीप्रमाणे पॅकिंग करून लाल तसेच अन्य रंगाची फुले परदेशी बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत. यंदा हवामानामुळे गुलाब फुलांचा दर्जा चांगला आहे. परदेशी बाजारपेठेतून लाल तसेच अन्य रंगाच्या फुलांना मोठी मागणी आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, ग्रीस, लंडन, जपानमध्ये फुले निर्यात करण्यात येत आहेत.

गणपतराव पाटील, श्रीवर्धन बायोटेक

०००००००००

गुणवत्ता तसेच नेटके वाहतूक नियोजन यामुळे घोडावत अॅग्रोने देश विदेशातील बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार उत्पादनामुळे घोडावत अॅग्रोच्या गुलाबांना देशविदेशातून मोठी मागणी आहे. सुमारे २५ लाख फुले व्हॅलेंटाइन डेसाठी पाठविण्यात येतील. यामुळे परकीय चलन भारतात येण्यास मदत होईल.

अनिल कोटेचा, मुख्य कार्यकारी अधिकारी, घोडावत अॅग्रो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images