Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगलीत चार गावठी कट्टे जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी चार गावठी कट्ट्यासह कपील केशव दयाल शर्मा (वय २३, रा. चिनोर, जिल्हा ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याला अटक केली. सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची ही अग्नशस्त्रे विक्री करण्यासाठी सांगलीत आला होता. त्याला सांगलीच्या रेल्वेस्थानकाच्या बाहेर पकडण्यात आले.
मध्य प्रदेशातील तरुण गावठीकट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक फौजदार राजू कदम आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून शर्मा याला पकडले. कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याने संबधित अग्नीशस्त्रे चंबळच्या खोऱ्यातून आणल्याचे सांगितले आहे, अशी माहिती घनवट यांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेमुलाप्रकरणी सांगलीत धरणे

0
0

कुपवाड : हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयाना केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी. घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीनेही निदर्शने केली. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी संपूर्ण देशभरात जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. सांगलीत ही याचे पडसाद उमटत आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. याच मागणीसाठी बहुजन समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजाची मोलाची कामगिरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारताच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियातील टी-२० मालिकेत विजय संपादन केला असून, यात कोल्हापूरच्या अष्टपैलू अनुजा पाटील हिने दोन्ही सामन्यांत मोलाची कमागिरी बजावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियात महिला संघाचा हा पहिला मालिका विजय आहे. त्यात अनुजाने चांगली कामगिरी केल्याने कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

अष्टपैलू अनुजाने अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात तीन षटकांत १६ धावा देत एक बळी मिळविला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने १४१ धावांचे खडतर आव्हान भारतीय संघापुढे ठेवले होते. त्यात अनुजाने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अवघ्या ८ चेंडूत दोन चौकारांसह १४ धावा करून विजयात निर्णायक कामगिरी बजावली होती.

आज झालेल्या, दुसऱ्या सामन्यात अनुजाने तीन षटकांत वीस धावा दिल्या. मात्र, तिला बळी मिळवता आला नाही. मात्र, क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करत तिने एक फलंदाज धावबाद केला आणि अप्रतिम झेल घेऊन आणखी एक फलंदाज बाद केला. त्यामुळे तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कोल्हापुरात तिचे कुटुंबीय, नातेवाइक आणि मित्रपरिवार यांनी तिच्या कामागिरीबाबत आनंद व्यक्त केला. अनेकांनी तिच्या घरी फोन करून कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

=======

अनुजाची कमागिरी अशीच होत रहावी, अशी अपेक्षा आहे. मालिकेचा आणखी एक सामना व्हायचा आहे. त्यातही तिने निर्णायक कामगिरी करून भारतीय संघातील आपले स्थान आणखी भक्कम करावे, असे वाटते.

शोभा अरुण पाटील, अनुजाची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाईनसाठी मनपाने स्वतंत्र अधिकारी नेमावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी आणल्या जाणाऱ्या थेट पाइपलाईन योजनेला मार्गातील ३५ गावांपैकी काही गावांतील नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. या कामाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी(ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. संबंधित गावांमधील समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिली आहे.

थेट पाईपलाईन योजनेच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर काही गावातील नागरिकांनी या योजनेच्या विरोधात आ‍वाज उठवला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाइपालईनसाठी खुदाई होत आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी आणि ज्या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशा गावांसाठी थेट पाइपलाईनमधून पाणी मिळावे अशा आग्रह काही गावातील नागरिकांनी धरला आहे. याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने योजनेचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक यांच्यासह महापौर अश्विनी रामाणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी(ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाइपलाईनच्या मार्गात येणाऱ्या ३५ गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक दोन गावांसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि गावातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशा सूचना दिल्या. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची हमीही महापालिकेने द्यावी, त्याचबरोबर या कामासाठी ज्या-ज्या विभागांच्या परवानग्या आवश्यक आहेत त्या देण्यातही हयगय होऊ नये, अशी सूचना त्यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालिंदर पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची मांडणी केली. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई आणि भविष्यात होणाऱ्या अडणचणींचा निपटारा करण्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जालिंदर पाटील यांनी उपस्थित केला. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि डाव्या, उजव्या कालव्यामुळे परिसरातील जमिन निकृष्ठ बनल्याचाही प्रश्न त्यांनी मांडला. आमदार सतेज पाटील यांनी थेट पाइपलाइनची गरज व्यक्त करून शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. महापालिकेतील नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्यासह थेट पाइपलाईन मार्गातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांना मनपा नोकरभरतीत आरक्षण

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर एक स्वतंत्र बैठक होणार असून, मुंबईतही बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी यापुढे महापालिकेच्या नोकरभरतीत प्रकल्पग्रस्ताना पाच टक्के आरक्षण लागू करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहात अंतर्गत रेडिओ स्टेशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांजा पार्टीने बदनाम झालेल्या कळंबा मध्यवर्ती कार्यालयात सकारात्मक बदलांना सुरूवात झाली आहे. कैद्यांच्या मनोरंजनासाठी कैद्यांकडूनच चालवले जाणारे अंतर्गत रेडिओ स्टेशन सुरू झाले आहे. 'रेडिओ केसीपी...लय भारी' या टॅगलाइनने सुरू झालेल्या रेडिओ स्टेशनचे उद्‍घाटन शनिवारी कारागृह महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी पहिल्याच कार्यक्रमात गाणी, कविता सादर करून रेडिओ स्टेशनची झकास सुरूवात केली.

कळंबा कारागृहात शिस्त लावण्याबरोबर नवीन उपक्रम सुरू करण्यावर कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी भर दिला आहे. मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी कळंबा कारागृहात अंतर्गत रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. शिक्षा भोगणाऱ्या पाच कैद्यांवर रेडिओ स्टेशनची जबाबदारी दिली आहे. उदय सुतार रेडिओ जॉकी असून जितेंद्र चव्हाण सादरीकरण करतो. शिक्षा भोगणारा नेव्ही ऑफिसर एमिल जोरेम याच्याकडे तांत्रिक जबाबदारी आहे. संतोष सोनवणे व प्रविण जोगदंड अशी पाच जणांची टीम हे स्टेशन चालवत आहे. या रेडिओ स्टेशनची चाचणी झाल्यानंतर अधिकृत उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

'रेडिओ केसीपी (कळंबा सेंट्रल प्रिझन) लय भारी,' अशी या स्टेशनवरील कार्यक्रमांची सुरूवात होते. सकाळी सहा ते सात या वेळेत भक्तीगीते सादर केली जातात. त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत कार्यक्रम होतात. त्यात कैद्यांनी केलेली गाण्याची फर्माईश सादर होते. तसेच कैद्यांच्या कवितांचे वाचन, विनोद आणि नकलाही सादर केल्या जाणार आहे. फर्माईा देण्यासाठी एक रजिस्टर ठेवले आहे. कैद्यांनी सुचवलेली गाणी सादर केली जाणार आहेत. भविष्यात मान्यवरांची भाषणे, कैदयांसाठी विशेष कार्यक्रमही सादर केले जाणार आहे. १५८४ कैद्यांना या रेडिओ स्टेशनचा फायदा होणार आहे.

शनिवारी उद्‍घाटन झाल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत लाइव्ह कार्यक्रम सादर केला. 'नमस्कार रेडिओ केसीपी....लय भरी,' असे निवेदन झाल्यावर कैद्यांनी दो आँखे बारह हाथ चित्रपटातील 'ये मालिक तेरे बंदे हम' हे गीत सादर केले. त्यानंतर नुकतीच जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या जाधव बंधूंनी 'उदं गं अंबे...उद्ं' हा गोंधळ सादर केला.

यावेळी कारागृह महानिरीक्षक उपाध्यक्ष म्हणाले, 'रेडिओवरून मनोरंजन, शिक्षण, व्याख्यान, तंदुरूस्तीसंबंधीचे कार्यक्रम सादर केले जातील. कैद्यांनी शिक्षणांवर लक्ष केंद्रित करावे. सध्या कारागृहात ११९ पदवीधर तर पोस्ट ग्रॅज्युएट केलेले पाच कैदी आहेत. जे कैदी पदवी मिळवतील व योग परीक्षेत पास होतील त्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाळांचा राजा अर्थात आंबा यंदाच्या मोसमात बाजारात.

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फाळांचा राजा अर्थात आंबा यंदाच्या मोसमात बाजारात आला असून, येथील श्री शाहू मार्केट यार्डमध्ये शनिवारी आंब्याच्या पहिल्या पेटीचा मुहूर्ताने सौदा झाला. आंब्याच्या पहिल्या पेटीला ११ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.

मार्केटमधील दस्तगीर मकबूलभाई बागवान यांच्या अडत दुकानात देवगड येथील उमेश जनार्दन तेली आणि पावस येथील सलीम हसन काझी यांच्या आंब्यांची आवक झाली होती. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते आंब्याचा सौदा काढण्यात आला. सोलापूर येथील बकालू यांनी चार डझन आंब्याची पेटी खरेदी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती परशराम खुडे व उपसभापती विलास साठे प्रमुख उपस्थित होते. सौद्यामध्ये इतर पेट्यांना कमीत कमी साडे पाच हजार आणि जास्तीत जास्त साडे अकरा हजार असा दर मिळाला. दीड डझनच्या बॉक्सला कमीत कमी दीड हजार आणि जास्तीत जास्त अडीच हजार रुपये दर मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दालन’ हाउसफुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह परिसरातील बांधकाम प्रकल्पांची माहिती देणाऱ्या 'दालन २०१६' या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, अनेकांनी केवळ स्टॉलला भेटी न देता आपल्या बजेटमधील पसंतीच्या घराचे 'ऑन द स्पॉट बुकिंग'ही केले. येत्या दोन दिवसांत प्रदर्शनाला आणखी प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. प्रदर्शन शाहूपुरी जिमखाना मैदानावर एक फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

'क्रिडाई' या कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने 'दालन २०१६'चे आयोजन केले आहे. दर तीन वर्षांनी होणारे हे प्रदर्शन बांधकाम क्षेत्रातील मंदीला मारक ठरले, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. 'दालन'च्या निमित्ताने बांधकाम प्रकल्पांबरोबर बांधकाम साहित्य आणि अर्थपुरवठा करणाऱ्या बँका सर्वच एका छताखाली आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉल्सबरोबर सिमेंट कंपन्या, बाल्कनी किंवा टेरेस सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, झोपाळे बनविणाऱ्या कंपन्या, विटा बनविणारे कारखाने, टाइल्स, प्लंबिंग साहित्य, फर्निचर, अत्याधुनिक लॉकिंग सिस्टिम असणारे दरवाजे यासह सीसीटीव्ही यंत्रणा बसवून देणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल्सही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूसह परिसरातील सुमारे पाच हजार घरांची माहिती मिळत आहे. यात वन बीएचकेपासून फोर बीएचके, पेंट हाउस, रो हाउसेस असे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाला गर्दी होत असून, अनेकजण सहकुटुंब प्रदर्शनाला भेट देत आहेत. तसेच काही जणांनी मित्र, वडीलधाऱ्यांसोबत येऊन प्रत्येक स्टॉल्सची माहिती घेण्यावर भर दिला आहे. मात्र, प्रदर्शनाला भेट देणारा प्रत्येकजण अतिशय बारकाईने प्रत्येक स्टॉलवर माहिती घेताना दिसत होता. घरांबरोबरोबरच व्यवसायासाठी लागणाऱ्या जागा, दुकानगाळे, ऑफिसेस यांसाठीही चौकशी सुरू होती.


इकोफ्रेंडली विंडोज् आकर्षण

बांधकाम साहित्यांच्या स्टॉल्समध्ये यश पॉली यांच्या यूपीव्हीसी विंडोचा स्टॉल आकर्षण ठरत आहे. साउंड प्रूफ आणि डस्ट प्रूफ असणाऱ्या या विंडो इकोफ्रेंडली असल्याचे यश पॉलीचे अभिजित जाधव यांनी सांगितले. पेट्रोल रिफायनरिंगमधील वेस्टेजपासून बनविल्या जाणाऱ्या साहित्यापासून स्लायडिंग विंडोसह पार्टिशन्स, सिलिंग, डोअर्स, सिक्युरिटी केबिन्स, यूपीव्हीसी फार्म हाउसेस बनविल्या जातात, अशी माहिती जाधव यांनी दिली. बांधकाम व्यावसायिकांना या तंत्रज्ञानाची माहिती आहे. मात्र, सामान्यांना माहिती देण्यासाठी 'दालन'च्या माध्यमातून पहिल्यांदाच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरवाल्यांना उद्यापासून पर्यायी जागांचे सर्वेक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार रोड, ताराबाई रोडसह शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून त्यांना पर्यायी जागा तातडीने देण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला. फेरीवाल्यांचे नजीकच्या ठिकाणी पुर्नवसन करण्यासाठी सोमवारपासून (ता.१) या पर्यायी जागांचे सर्वेक्षण करून ८ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेण्याचे यावेळी ठरले.

शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने फेरीवाला संघटनांच्या नेत्यांची संयुक्त बैठक शनिवारी झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी चौक, आईसाहेब महाराज चौक, कॉमर्स कॉलेज, बिनखांबी गणेश मंदिर अशा ‌अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा झाली. ही जागा देताना त्यांचा व्यवसाय व्हावा या पद्धतीने जागा मिळावी, अशी मागणी फेरीवाल्यांनी केली. त्यानुसार सोमवारपासून पर्यायी जागेची पाहणी करण्याचे ठरले. फेरीवाल्यांनीच काही जागा सुचविल्या असून, त्या देता येतील का, याचीही यावेळी पाहणी करण्यात येईल. ८ फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेऊन त्यावर शिक्का मोर्तब करण्याचे यावेळी ठरले.

बैठकीस आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर. के. पोवार, दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू, अशोक भंडारे, राजेंद्र महाडिक, पोलिस उपअधीक्षक भरतकुमार राणे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'जॉब एक्स्पो'ला प्रचंड प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे श‌निवारी आयोजित केलेल्या 'जॉब एक्स्पो-२०१६' या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत सुमारे ७५०० उमेदवारांनी नोंदणी केली, तर सुमारे ४५०० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. नावनोंदणीसाठी एकच टेबल असल्यामुळे काहीवेळ उमेदवारांमध्ये गोंधळ झाला. वेळेअभावी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेता येणे शक्य झाले नाही, त्यांचे अर्ज जमा करून घेण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाच्यावतीने राईट-वे अॅकॅडमी, एसटीएस व करिअरटाइम डॉट इन यांच्या सहकार्याने सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत 'जॉब-एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले होते. माहिती कक्षाचे समन्वयक डॉ. पी. एन. भोसले व सहसमन्वयक डॉ. एम. के. भानारकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. बँकिंग, फायनान्स, मॅनेजमेंट, बीपीओ, केपीओ, ऑनलाइन डिलिव्हरी, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, आयटी, केमिकल, पेट्रोलियम, हॉटेल मॅनेजमेंट, एचआर, सेल्स व मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट, आदी क्षेत्रांतील ६० नामवंत कंपन्यांनी मेळाव्यास उपस्थिती लावली. दिवसभरात सुमारे ४५०० उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या मुलाखती दिल्या. नावनोंदणी करण्यासाठी एकच टेबल अपुरा पडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये काही वेळ किरकोळ गोंधळ झाल्यानंतर नोंदणी टेबल वाढविण्यात आले.

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक आणि संगणकशास्त्र अधिविभागांत मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावले होते. वेळेअभावी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेता येणे शक्य झाले नाही, त्यांचे अर्ज जमा करून घेतले आहेत. संबंधित उमेदवारांना कंपन्या नंतर मुलाखतीसाठी बोलावून घेणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची यादी मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाकडे कंपन्यांमार्फत लवकरच मिळेल, अशी माहिती माहिती कक्षाचे समन्वयक डॉ. पी. एन. भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा संचालकांना नोटिसा

0
0

केडीसीसी गैरव्यवहारप्रकरणी पुन्हा कारवाईमुळे खळबळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी अकरा संचालकांना शनिवारी विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. बरखास्तीची कारवाई झालेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना दहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार संचालकांना सदस्यत्वासाठी अपात्र का ठरवू नये? अशी विचारणा या नोटिसीत करण्यात आली आहे. नोटिसा लागू केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात बाजू मांडण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे.

बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार, नरसिंगराव पाटील, महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील या प्रमुखांचा नोटीस बजावलेल्यांत समावेश आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या गैर कारभाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार संबंधित संचालकांना दहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील २१ पैकी ११ संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. राज्य सरकार या कारवाईसाठी आग्रही असल्याने शनिवारी (ता. ३०) दराडे यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३(सीए) आणि ७८(ए) नुसार संचालक पदावरून दूर का करू नये? तसेच पुढील दहा वर्षांसाठी इतर कोणत्याही सहकारी संस्थेच्या सदस्यत्वासाठी अपात्र का ठरवू नये? अशी विचारणा नोटिसीत केली आहे.

या निर्णयाला आव्हान देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने आणि माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सहकार खाते जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी याअधी केला होता.

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असले तरी, कारवाई करण्यावर सहकार खाते ठाम असल्याने आगामी काही दिवसांत बँकेतील दिग्गजांवर कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सहकार खात्याकडून होणाऱ्या कारवाईनंतर मात्र जिल्ह्यातील कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही सहकारी संस्थांमध्ये त्यांना पुढील दोन टर्म कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने राजकीयदृष्ट्या दूरगामी परिणाम करणारी ही कारवाई ठरणार आहे.

यांना बजावल्या नोटिसा

बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, नरसिंग पाटील, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, पी. जी. शिंदे, राजू आवळे, अशोक चराटी. नोटिसा पाठवलेले सर्व संचालक कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून, बँकेवर पुन्हा प्रशासकांनी नेमणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीट्सवर फुल टू धमाल

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हॅपी स्ट्रीट'च्या अखेरच्या रविवारी शासकीय विश्रामगृह ते महासैनिक दरबार हॉल परिसरात कोल्हापूरकरांनी अक्षरशः आनंद सोहळा अनुभवला. विटी-दांडू, रस्सीखेच, दोरीउड्या, मर्दानी खेळ अशा पारंपरिक खेळांसह स्केटिंग, सायकलिंग, चॉकबॉल, फनीगेम्स, जिमनॅस्टिक यासह मेडिटेशन योगा, प्राणायामचा आनंद घेण्याची संधी नागरिकांना मिळाली. धावपळीच्या आणि आधुनिकीकरणाच्या जीवनात वृद्धांना बालपणाची आठवण करून देणारे आणि लहानग्यांना जुन्या खेळांची ओळख करून देणारे हॅपी स्ट्रीटचे व्यासपीठ सर्वांसाठी आनंदाचे आणि उत्साहाचे ठिकाण ठरले. 'मटा'च्या या वर्षातील अखेरच्या हॅपी स्ट्रीटवर सर्वांनीच फुल टू धमाल करीत प्रचंड उर्जा सोबत घेतली.

सर्वांना आपले वय विसरून मनसोक्त खेळायला आणि बागडायला लावणारा महाराष्ट्र टाइम्स आयोजित हॅपी स्ट्रीटने कोल्हापूरच्या वैशिष्ठ्यांमध्ये आणखी एक भर घातली आहे. गेली तीन आठवडे भरभरून प्रतिसाद दिलेल्या कोल्हापूरकरांनी अखेरच्या हॅपी स्ट्रीटसाठी शासकीय विश्रामगृह ते महासैनिक दरबार हॉल परिसरात मोठी गर्दी केली.

सकाळी सात वाजल्यापासूनच सहकुटुंब येणाऱ्या जत्थ्यांनी खेळांची मजा लुटली. तरुण-तरुणींच्या ग्रुपनीही जल्लोषात हजेरी लावून हॅपी स्ट्रीटवरील रांगोळी, मर्दानी खेळ, सायकलिंग, मोडिटेशन, चॉकबॉल, भोवरा, फेस पेंटिंग, फनी गेम्सचा पुरेपूर आनंद लुटला. हॉकी स्टेडियमजवळ झालेल्या पहिल्या हॅपी स्ट्रीटपासून ते सलग चौथ्या हॅपी स्ट्रीटपर्यंत हजारो कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावून आनंदाची लयलूट केली.



रांगोळ्यांनी फुलला रस्ता

स्वराली आर्टस, शिवाजीराव जेऊरकर, न्यू मॉडेल इंग्लिश मेडिअम स्कूल, महेश पोतदार, सयानी पाटील आणि अर्चना भोसले, संजय वसे, माधवी सावर्डेकर, आरती सूर्यवंशी, श्री रानमळे, अजय ठाकूर यांच्यासह दळवीज आर्टसच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळ्या आणि पेटिंग्ज लक्षवेधी ठरले. व्यक्तिचित्रे, कार्टून्स, फ्री हॅन्ड रांगोळी यासह रांगोळीचे विविध प्रकार रस्त्यावर साकारल्याने रस्ताही बोलका झाला होता.

हास्याचे फवारे

नाना-नानी हास्य मंचच्या सदस्यांनी हॅपी स्ट्रीटच्या कार्यक्रमाची सुरूवात हास्याचे काही प्रकार सादर करत केली. त्यांच्या हास्य प्रयोगामुळे हजारो कोल्हापूरकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. तर हास्य मंचचे शहा यांनी हास्यावर एक कविता सादर केली.

जिमनॅस्टिकचा थरार

पेठवडगाव येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रशिक्षक कुबेर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिमनॅस्टिकचे सादरीकरण केले. यावेळी सादर केलेले मानवी मनोरे आणि विद्यार्थ्यांच्या चपळ हालचाली पाहून जिमनॅस्टिक पाहणाऱ्यांनाही खेळण्याची इच्छा झाली.

आनंदातही प्रबोधन

हॅपी स्ट्रीवरील आनंदातही सामाजिक भान ठेवून प्रदूषण, पर्यावरण रक्षण, मुली वाचवा, स्वच्छता याचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला. कोरगावकर ट्रस्टने जंगलातील प्राणी-पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून जंगल सुरक्षेचा संदेश दिला, तर कामधेनू बहुउद्देशीय महिला मंडळानेही विविध सामाजिक विषयांवरील प्रबोधनात्मक फलकांसह हॅपी स्ट्रीटवर रॅली काढली. हार्टस्प्रिंग फांडेशनने फनिगेम्ससोबत चेन स्नेचिंग आणि स्त्रीभ्रूण हत्येबाबत प्रबोधन केले.

लहानग्यांना मिळाले खेळण्यांचे गिफ्ट

हॅपी स्ट्रीटचे सहप्रायोजक वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने लहान मुलांसाठी भोवरा, गोट्या आणि खेळण्याचे गिफ्ट देण्यात आले. दीड हजार मुलांना गिफ्ट मिळाल्याने लहानग्यांच्या आनंदात आणखीनच भर पडली. यावेळी वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर आणि भिमा बिल्डर्स यांच्या वतीने उपस्थितांना पिण्याचे पाणी पुरवण्यात आले.

पारंपरिक खेळांना आबालवृद्धांची गर्दी

विडी-दांडू, दोरीउड्या, पोत्यात पाय घालून पळणे, भोवरा फिरवणे या पारंपरिक खेळांनी अनेकांनी पुन्हा लहान होण्याची संधी दिली, तर अलिकडच्या पिढीला माहीत नसलेले हे खेळ आपल्या कुटुंबीयांसह खेळता आले. अगदी सहकुटुंब आणि मित्रांच्या समवेत खेळताना अनेकांचे चोहरे खुलले होते. पुन्हा लहान होण्याची संधी मिळाल्याने वृद्धांच्याही चेहऱ्यावर बालपणाचा आनंद पाहायला मिळाला. वनिता ढवळे यांनी या खेळांचे संयोजन केले.

वेस्टर्न आणि पारंपरिक कलांचा संगम

हॅपी स्ट्रीटसवरील स्टेजवर रविवारी अगदी वेस्टर्न डान्सस्टेप्सपासून ते शास्त्रीय कथ्थकनेही ताल धरला. शुभांगी आणि ग्रुपने केलेल्या कथ्थकने वातावरणात एकदम क्लासिकल नूर भरला तर वर्व अकादमीच्या नुपूर, संतोष आणि राणा यांच्यासह बालकलाकारांनी वेस्टर्न म्युझिकवर ब्रेकडान्सकडे लक्ष वेधले. ट्री हाऊस प्ले ग्रुपच्या चिमुकल्यांनी डान्स करत हम भी कुछ कम नही असा माहोल तयार केला. तिशाचे अथर्वशीर्ष, ओम शेटेचे गोंधळनृत्य, मोरया ग्रुपचा वक्रतुंड डान्स, अथर्व आणि निशाने केलेला आयो रे म्हारो ढोल, अविनाश अवस्थीने गिटारवर छेडलेले गुलाबी आँखे जो तेरी देखी हे रोमँटिक गाणे असा वेस्टर्न आणि पारंपरिक कलांचा अनोखा संगम हॅपी स्ट्रीटच्या मंचावर जुळला.

यांचे लाभले सहकार्य

चार आठवडे प्रचंड गर्दीने उत्साहाने ओसंडलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स' च्या 'हॅपी ​स्ट्रीटस' या उपक्रमाचे भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रेस्टीज ग्रुप, वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, स्कोडा श्राइन ऑटो, दि कोल्हापूर अर्बन बँक हे प्रायोजक आहेत. तर कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर पोलिस आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर रेडीओ मिर्ची होता. साऱ्या उपक्रमामध्ये सूत्रसंचालन अक्षय डोंगरे आणि विक्रम रेपे यांनी केले. याशिवाय अनेक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग ​घेतला.

फुटबॉल जगल‌िंग

अन्शील चौगुले याने सादर केलेल्या फुटबॉल जगलींगले वेगळे टॅलेंट उपस्थितांना दाखवले. या हटके परफॉर्मन्सला हजारो प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. कधी फुटबॉल पायाच्या नखावरून थेट डोक्यावर तर कधी खांद्यावर, पाठीवर तर कधी हातावर फुटबॉल खेळवत अन्शीलने अवाक् केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीट्सवर जल्लोषाला उधाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डान्स, गाणी, मिमिक्री, पोवाडा, गोंधळगीत, तबला असा कलागुणांनी ओसंडून वाहणारा मंच तर समोर रस्त्यावर रस्सीखेच, मल्लखांब, जिमनॅस्टिक, आठवणीतले खेळ, फेसपेटिंग, ध्यान, पोट्रेटपेंटिंग अशा एकापेक्षा एक उपक्रमांचा आनंद घेत मटा हॅपीस्ट्रीटवर रपेट मारणाऱ्या कोल्हापूरकरांच्या उत्साहाला उधाण आले. तीन ते साडेतीन तास हा उत्साहाचा समुद्र फेसाळत होता आणि सहा महिन्यांच्या चिमुकल्यांपासून ते ऐंशी वर्षांच्या आजीआजोबांपर्यंत प्रत्येकाने हॅपीस्ट्रीटस अक्षरश: एन्जॉय केले. गेल्या चार रविवारपासून शहरातील विविध भागात भरवण्यात आलेल्या मटा हॅपी स्ट्रीटस या आनंददायी उपक्रमाचे हॅपी एंडिंग रविवारी ३१ रोजी सर्किट हाऊस ते सैनिक दरबार हॉल या रस्त्यावर झाले.

ओन्ली डान्स

वेगवेगळ्या ग्रुपने सादर केलेल्या डान्सवर तरुणाईने ठेका धरला. सावनी जोशी यांच्या 'कमली कमली' गाण्याला संतोष जोशी यांनी गिटार साथ दिली. राधिका कालेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडा सादर केला. सायली ग्रुप, ओंकार अॅकॅडमी, डीआयडी फिटनेस अॅकॅडमी, ट्री हाउस ग्रुपचा डान्स, समीक्षा हंबारी, सुरज सासने, कनिष्क कांबळे व समृद्धी सातपुते या मुलींनी बाजीराव मस्तानी फेम पिंगा गं बाई पिंगा, श्रेया रामाणे व प्रिया पाटील यांचा डान्स, सायली ग्रुपच्या बहारदार डान्सने उपस्थितांनाही ताल धरायला भाग पाडले. ओम शेटे याने अंबाबाईचा गोंधळ तर सोहम खत्री याने तबला आणि अनिरूद्ध बर्वे यांनी मृदंग जुगलबंदी सादर केली. ऋचा भोसले या चार वर्षाच्या चिमुकलीने वेस्टरिंग फिरवत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. किरण कर्नाड यांनी कहेना है...तर देवयानी जोशी हिने देतं कोण देतं कोण मराठी गाणं सादर केले. तसेच नमिता जैन, ध्रुव मोदी, पूनम महाडिक तसेच यंग सीनिअर सुहास पोतनीस यांच्या गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

योगा विथ डान्स

सध्या म्युझिकवर असलेल्या एरोबिक्स आणि झुंबाकडे अधिक कल असल्याचे जाणत सुप्रिया खोटलानी यांच्या ग्रुपने डान्स विथ योगा सादर करत एक वेगळा प्रयोग सादर केला. ग्रुपच्या ठेक्यावर स्ट्रीटवरील गर्दीची पावलेही आपसूक थिरकली.

ऑन द स्पॉट मिमिक्री

रेडिओ मिर्ची टीम लवकरच मिर्ची स्टार उपक्रम घेत आहे. त्याची माहिती देण्यासाठी मिर्ची आरजे मनीष, प्राजक्ता, अभिराज स्टेजवर आले आणि त्यांनी गर्दीत कुणी मिमिक्रीस्टार असेल तर मंचावर येण्याचे आवाहन केले. दिनेश माने यांनी स्टेजवर एंट्री घेत मिमिक्री सादर केली. त्यांना अक्षय डोंगरे यांनी साथ दिली आणि बघताबघता मिमिक्रीची जुगलबंदीच रंगली.

आम्हीही तरुणच

किरण कर्नाड, सुहास पोतनीस आणि विद्यानंद शहा यांनी कराओके ट्रॅकवर रोमँटिक गाणी सादर करत आम्हीही तरूणच असा संदेश दिला. कर्नाड यांनी कहना है...आज तुमसे ये पहिली बार गाण्याने बहार आणली. तर सत्तरीच्या शहा यांनी त्या ​तिथे पलिकडे तिकडे...माझिया प्रियेचे झोपडे हे मराठी भावगीत पेश केले. सुहास पोतनीस यांच्या एक लडकी भीगी भागीसी या गाण्याने धमाल आणली आणि अवघे पाउणशे वयोमान या गाण्याच्या ओळी जीवंत केल्या.

फेस पेंटिंगसाठी झुंबड

मंदार कुंभार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांच्या चेहऱ्यावर चित्रे रेखाटली आणि टॅट्यूही रंगवले. अनेकांनी हॅपी स्ट्रीटची अक्षरे रंगवून घेतली, तर काही जणांनी आपल्या नावाची अक्षरे, मोरपीस, पानेफुले, वाघ, ससा अशा प्रतिमा रंगवून घेतल्या. टॅट्यूसाठी इच्छुकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या.

जिमनॅस्टिकचा थरार

पेठवडगाव येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रशिक्षक कुबेर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिमनॅस्टिकचे सादरीकरण केले. यावेळी सादर केलेले मानवी मनोरे आणि विद्यार्थ्यांच्या चपळ हालचाली पाहून जिमनॅस्टिक पाहणाऱ्यांनाही खेळण्याची इच्छा झाली. आकर्षक आणि थरारक मानवी मनोऱ्यांना उपस्थितांनी दाद दिली. उपस्थित मुलांनीही जिमनॅस्टिकच्या गादीवर उड्या मारीत धमाल केली.

सादरीकरण

पृथ्वीराज शहापुरे आणि रवि शहापुरे यांच्या सायकल ग्रुपने सायकलिंग केले. महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉलची प्रत्यक्षिके केली. कोल्हापूर माऊंटन बायकिंग क्लबने प्रात्यक्षिके सादर केली. जय शिवाजी फुटबॉल क्लबने फुटबॉलची प्रात्यक्षिके केली. अजिंक्य पाटगावकर यांनी स्पेशल युथ योगाचे सादरीकरण केले. कलामंदिरच्या विद्यार्थ्यांनी चित्रांचे रेखाटन केले. जालनावाला स्पोर्टस अॅन्ड ट्रेनिंग स्टेंटरच्या विद्यार्थ्यांनी तायकॉन्दोची प्रत्यक्षिके केली. एस. के. रोलर अकॅडमी आणि इंडियन बार्कले स्केटिंग अकॅडमीने स्केटिंगची प्रात्यक्षिके केली. सहजमार्ग स्पिरिच्युअॅलिटी फाउंडेशनचे मेडिटेशन, एरो मॉडेलिंग, संगीता सावर्डेकर यांचे नेल आर्ट आणि मेहंदी, गो वाइल्डची वाइल्ड फोटोग्राफी, सुरेश सुतार यांचे स्कोरबॉल सर्कल, कौवल्य योग ग्रुपचे योगा आणि प्राणायाम, बिभीषण पाटील व्यायामशाळेची रस्सीखेच, चाणक्य मार्शल आर्टचे कराटे डेमो, दळवीज आर्ट आणि कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांची चित्रकला अशी विविधता अनुभवायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखकांना प्रतिप्रश्न करणाऱ्या वाचकांची गरज

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

वाचकांकडे आकलनाची समज नसेल तर, साहित्यही तेवढेच सुमार दर्जाचे असते. वाचन संस्कृतीत वाचक महत्वाचा घटक आहे. लेखकांना प्रतिप्रश्न विचारणारा धाडसी वाचक निर्माण झाला पाहिजे, असे सांगून वाडमय संस्कृतीत वाचक जितका सक्षम हवा तितकाच साहित्य लेखन करणारा लेखकही सक्षम असायला पाहिजे, असे मत साहित्य अकादमीचे सदस्य व ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे यांनी यांनी व्यक्त केले.

विट्यातील मुक्तागण वाचनालय व साहित्य सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रघुराज मेटकरी यांच्या माजी विद्यार्थी या पुस्तकाचे प्रकाशन अविनाश सप्रे आणि विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अविनाश सप्रे म्हणाले, मराठी साहित्य दर्जेदार लिहिले पाहिजे. साहित्यात वैचारिक व सृजनशील साहित्य, असे दोन प्रवाह आहेत. वैचारिक साहित्य वाचकांच्या जीवनाला चांगली दिशा देते, तर सृजनशील साहित्य वाचल्यानंतर संवेदनशीलता व मानसिकता घडविता येते. दलित साहित्यातून उपेक्षितांचे जीवन जगासमोर आले. चांगले साहित्य वाचकांना बरेच काही देऊन जाते. साहित्यातील अनेक पुस्तके वाचकांना शरण येण्यास लावतात.

मराठीत एकापेक्षा एक दर्जेदार लेखक आहेत. मात्र दुर्दैवाने अशा दर्जेदार लेखकांचे साहित्य इतर भाषेत पोहचत नाहीत.

दिल्लीतही साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अपेक्षित लॉबी नाही. त्यामुळे कसदार साहित्य असूनही मराठी मागे पडते. मराठी साहित्य इतर भाषेत पोहचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी सप्रे यांनी व्यक्त केली. या वेळी रघुराज मेटकरींच्या साहित्यातील योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, माझे विद्यार्थी, पुस्तकाचे लेखक रघुराज मेटकरी यांचे लेखन चांगले आहे. समाजाच्या विविध छत्रात मेटकरींचे अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. असे यशस्वी विद्यार्थी घडविणारे ते शिक्षक आहेत. लेखन हे व्रत आहे. लेखकाने ते जन्मभर जपले पाहिजे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकारी बदलाच्या वावड्या उठवू नका

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. वास्तविक येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पदाधिकारी बदलाबाबत आणि विशेषकरुन उपाध्यक्षांचे राजीनाम्याबाबत, पवार सांगतील त्यानुसार आम्ही निर्णय घेणार होतो आणि तसा सांगावा योग्य व्यक्तीजवळ धाडला होता. पवार यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच बदलाबाबत घायकुतीला आलेल्यांनी किमान त्यांचा अपमान होईल, अशा वावड्या उठवू नयेत, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

उपाध्यक्ष पदावर सातारा विकास आघाडीची (साविआची) व्यक्ती आहे. साविआची म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीची व्यक्ती आहे. कोणत्याही पदाला काही कालावधी हा समजून उमजून घेण्याकरीता जात असतो, त्यामुळे विद्यमान पदाधिकारी बदलाची टूम कोणी आणि का काढली हे समजून येत नाही. उपाध्यक्षपदी रवी साळुंखे यांना बसविताना अंतिम चर्चा पवार यांच्याशी केली होती, गल्लीपेक्षा दिल्लीत आम्ही नेहमीच आम्ही एकत्र येत असतो मध्यंतरी त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे आम्ही त्यांना गल्लीतल्या गोष्टी कानावर टाकल्या नाहीत, परंतू सुतोवाच केले होते, त्यावेळी दिल्लीत चर्चा करू असे त्यांनी सांगितले होते, हा सांगावा आम्ही योग्य व्यक्तीकडून आला होता, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रयत कारखान्याची निवडणूक सहा मार्चला

0
0


कराड : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर संस्थापक असलेल्या शेवाळवाडी (म्हासोली) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. सहा मार्चला निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

रयत साखर कारखान्याच्या संचालक मंडळात एकूण २१ संचालक राहणार आहेत. ऊस उत्पादक गटातून १५ संचालक राहणार आहेत. यामध्ये शेवाळवाडी म्हासोली गट- ३ जागा, उंडाळे गट- ३, कुंभारगाव गट- ३, कोळे गट- ३, तांबवे गट- ३ जागा आहेत. या शिवाय उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटातून १, अनुसूचित जाती जमाती, महिला राखीव प्रतिनिधी २, इतर मागासवर्गीय गटातून १, भटक्या विमुक्त जाती जमाती १ अशा २१ जागा आहेत. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ३ फेब्रुवारी आहे. अर्जांची छाननी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रातांधिकारी कार्यालयात होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २० फेब्रुवारीअखेर आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. सहा मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होईल. मतमोजणी आठ मार्च रोजी होईल.

दरम्यान, रयत कारखान्याची स्थापना झाल्यापासून प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. नव्या राजकीय पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा कारखान्याच्या सभासदांसह शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बरखास्त संचालकांना आज नोटीसा

0
0



म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सहकारी संस्थांमधील बरखास्त संचालक मंडळातील संचालकांना दहा वर्षे अपात्र ठरवणाऱ्या वटहुकमाची अंमलबजावणी सांगलीत सुरू होत आहे. सांगली जिल्हा बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातील सध्या संचालकपदावर असणाऱ्या उपाध्यक्षांसह सहा विद्यमान संचालक व सोळा माजी संचालकांना सोमवारी नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आजी-माजी संचालकांना अपात्रतेच्या नोटीसा बजाविल्यानंतर खुलासा सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशनानुसार राज्याच्या सहकार आयुक्तांनी सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीचे आदेश काढले होते. तत्कालीन सहनिबंधक (सहकारी संस्था) शैलेश कोतमिरे यांची बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, भ्रष्टाचार व अनियमीत कारभारामुळे राज्यातील सहकारी बँकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. असा कारभार करणाऱ्या माजी संचालकांना यापुढे दहा वर्षे सहकारी बँकांची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने नुकताच घेतला आहे. दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद असल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा मसुदा पाठविण्यात आला होता. या मसुद्याला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७३ अ (क) मध्ये सुधारणा करून पोटकलम (३ अ) नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. या नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा दणका जिल्हा बँकेच्या २१ आजी-माजी संचालकांना बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमी लावणी

0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

घुंगरांचे बोल...ढोलकीचा ताल...घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत महाराष्ट्राच्या नृत्यपरंपरेचा बाज जपणाऱ्या लावणीने रविवारी सायंकाळी कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक भूमीत विक्रमी शिखर गाठले. तपस्यासिद्धीतर्फे नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकाचवेळी ५७३ नृत्यांगनांनी लावणी नृत्याविष्कार सादर करत पहिलाच विश्वविक्रम रचत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. दोन वर्षांपूर्वी भरतनाट्यम कलाविष्कारात एकाचवेळी २१०० नृत्यांगनासोबत तपस्यासिद्धी कलाअकादमी संस्थेने विश्वविक्रम रचला होता.

ढोलकीच्या तोड्यावर ताल धरत नऊ लावण्यांचा मुखडा आणि अंतरा यावर १२ मिनिटे ४६ सेकंद या वेळेत एकाच वेळी जास्तीत जास्त ५७३ नृत्यांगनांनी नृत्य करण्याचा विक्रम झाल्याचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जॅक ब्रूकमॅन यांनी जाहीर करताच शिवाजी स्टेडियमचा कानाकोपरा टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेला. रंगीबेरंगी नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने अशा मऱ्हाठमोळ्या पोषाखात या विक्रमी लावणी मानवंदना कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी विक्रमी नृत्यमुद्रेनंतर एकमेकींना अलिंगन देत आनंद साजरा केला.

=====

एकाच वेळी ५७३ नृत्यांगनांचा लावणी नृत्याविष्कार

मऱ्हाठमोळा पोषाख आणि पारंपरिक नृत्यमुद्रा

१२ मिनिटे ४६ सेकंद ठरले उत्सुकतेचे

चार वर्षाच्या चिमुकलीसह ३० वर्षाच्या महिलेपर्यंत सहभाग

चार रिहर्सलनंतर मुख्य नृत्याविष्कार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनी मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे

0
0

कोल्हापूर :

'महिला आज सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. लष्कर, पोलिस, प्रशासन, शैक्षणिक,सामाजिक, खेळ, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी कर्तबगारी सिद्ध केली आहे. मात्र पुरूषप्रधान संस्कृती, कर्मट विचारसरणी आणि अनिष्ठ प्रथा यामुळे महिलांना कमी लेखले गेले. समाजाने अनिष्ठ प्रथा आणि बुरसट विचारसरणीला मूठमाती देत स्त्री-पुरूष समानतेचा नवा धडा गिरवला पाहिजे. मंदिर असो की शनि ‌िशंगणापुरातील चौथऱ्यावरील प्रवेश, त्या ठिकाणी महिलांनाही मुक्तपणे मोकळीक असावी, ते स्त्री-पुरूष समानतेचे 'पुढचं पाऊल' ठरेल. त्या माध्यमातून समाजात कुणी वरिष्ठ नाही, कुणी अनिष्ठ नाही. सगळे एकसमान आहेत, हा भाव रूजेल,' असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे राजर्षी शाहू कॉलेज येथे आयोजित 'मटा डिबेट' मध्ये उमटला. 'महिलांना मंदिर प्रवेश' या विषयावर आयोजित ​'डिबेट'मध्ये कॉलेज युवक-युवतींनी मुक्तपणे मते मांडली. महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध हा मध्ययुगीन विचाराचे द्योतक असल्याची टीका कॉलेजियन्सनी केली.

विशाल वाघमोडे : स्त्री पुरूष समानतेची मूल्ये प्रत्येकाने जपली पाहिजेत. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरूषांनी सामाजिक चळवळी केल्या. स्त्री पुरूष समानतेची शिकवण दिली. संत वाङमयातही समतेचे धडे मिळतात. महापुरूषांचा वारसा सांगताना त्यांचे विचार अंगिकारले पाहिजेत. महिलांना कमी न मानता समानतेची वागणूक मिळाली पाहिजे.

सुरेखा पिंगळे : मं​दिरात महिलांना प्रवेश बंदी करणे हे जुनाट विचारसरणीचे लक्षण आहे. अशा विचारांना मूठमाती दिली पाहिजे. मंदिरात जिथे पुरूषांना प्रवेश आहे तिथे महिलांनाही प्रवेश मिळाला पाहिजे. मंदिरात भेदाभेद कशासाठी ? कुठल्याच क्षेत्रात उच्च नीच भेदभाव असू नये. महिलांनीही आपल्या हक्कांसाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. स्वतः खंबीर बनले पाहिजे. घटनेने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत.

रुबीना मुल्ला : स्त्री पुरूष समानतेकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. मंदिरात एखाद्याला प्रवेश द्यायचा, दुसऱ्याची अडवणूक करायची ही कुठली रीत ? महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिले, मंदिर प्रवेश झाला म्हणजे महिलांचे प्रश्न सुटले असे होत नाहीत. आजही महिलांची ठिकठिकाणी अडवणूक केली जाते. समाजाच्या विविध घटकांत स्त्रीयांनाही पुरूषा इतकाच दर्जा मिळाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने समानता नांदेल.

काजल हेगडे : महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात मनाई, शनि चौथऱ्यावरून दर्शन घेतले म्हणून वादंग असे प्रकार २१ व्या शतकात कसे काय घडू शकतात. शनि चौथऱ्यावर महिलांना बंदी करायची झाल्यास देशातील ठिकठिकाणच्या मंदिरात पुरूषांना प्रवेश करणे अवघड होईल. देवी म्हणून ज्यांची पूजा, अर्चा केली जाते, मंदिरे उभारली आहेत, त्या सगळ्या मुळात महिला आहेत. मग अशा मंदिरात पुरूषांना प्रवेश का ? असा प्रश्न उपस्थित केला तर समाजाकडे काय उत्तर असणार आहे.

पूनम तिवले : महिला आज अबला राहिल्या नाहीत. त्यांनी स्वबळावर ​विविध क्षेत्रे काबीज केली आहेत. बुद्धीमत्ता आणि कर्तबगारीने प्रगतीची शिखरे गाठत आहेत. पुरूषांना आता धास्ती वाटू लागली आहे, म्हणून ते अनिष्ठ चालीरिती, रितीरिवाजात महिलांना कैद करू पाहतात. पण समाजाची मानसिकता बदलत आहे. प्रत्येक कुटुंबातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते. त्यांना क​​रिअर घडविण्याचे स्वातंत्र्य आहे. महिलांना विरोध करणाऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा.

माधुरी वराळे : स्त्री स्वातंत्र्यासाठी, सामाजिक समतेसाठी विविध चळवळी झाल्या. आता स्त्री पुरूष समानतेची चळवळ घरोघरी झाली पाहिजे. आजही अनेक कुटुंबात मुलांना जास्त खाऊ घातले जाते, कौडकौतुक केले जाते. मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हटले जाते. यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. मुली कुटुंबांची जबाबदारी खंबीरपणे पेलू शकतात. मुली कुटुंबांचा भरभक्कम आधार बनल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

प्रियांका चोपडे : मंदिरात महिला, पुरूष भेदाभेद कशासाठी ? दुसऱ्यांना कमी लेखण्याची ही प्रवृत्ती कसली ? वाईट विचार मनी ठेवून व्यवहार केला तर देव तरी प्रसन्न होणार आहे का ? महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे सामाजिक प्रगतीचे लक्षण नव्हे. महिला एकजूट झाल्या तर चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल.

अनंत पाटील : लहानपणापासून, शालेय जीवनातच समानतेच्या संस्काराची रूजवात केली पाहिजे. सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी कर्त्या मंडळींनी पुढाकार घ्यायला हवा. घरोघरी स्त्री-पुरूष समानता निर्माण झाली तर, समाजात बदल होईल. महिलांची अडवणूक करून कुठलाच समाज प्रगती करू शकत नाही.

दत्ता मोहिते : महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिला संघटित होत नाहीत. म्हणून विरोधकांचा आवाज वाढत आहे. महिला न्याय हक्कासाठी एकत्र आल्या, संघटित शक्ती निर्माण केली तर मंदिर प्रवेशासह अन्य प्रश्नही निकालात निघतील. यावेळी नरसिंग शिंदे या विद्यार्थ्यानेही मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनी ६२ अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या लोकशाही दिनात ६२ अर्ज दाखल झाले. या अर्जांवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.

यात महसूल विभागाशी संबंधीत ११, पोलिस विभागाशी संबंधीत ५, जिल्हा परिषद ४, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (दूग्ध), जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांशी संबंधित प्रत्येकी एका अर्जासह सर्वसाधारण ३७ व लोकशाही दिनाशी संबंधी २५ असे एकूण ६२ अर्जांचा समावेश होता. पूर्वीच्या १४१ अर्जांपैकी ३६ अर्ज निकाली काढण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, करवीरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाई भरकटते कुठे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरातून कॉलेजसाठी बाहेर पडायचे. कॉलेजपर्यंत यायचेही. पण तिथून चेहरा झाकला जाईल असा स्कार्फ बांधून मित्रांसोबत दुचाकीवरुन भटकंतीला बाहेर पडायचे. मजा मारायची व कॉलेज सुटण्याच्या वेळेत परत घरी परतायचे. कॉलेजच्या नावाखाली मजा मारण्यासाठी कुटुंबियांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार अनेक युवक, युवती सर्रास अवलंबत आहेत. पण अपघात असो वा अन्य काही गैरप्रकार. नंतर असे कुटुंबियांच्या नजरेत धूळफेक करण्याचा प्रकार समोर येईल या धास्तीने एकमेकांचा संबंध नसल्याचे दाखविण्याचे गंभीर प्रकारही समोर येत आहेत.

रविवारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर मोटरसायकलवरुन जाणाऱ्या युवक व युवतीचा अपघात झाला. अपघातात युवती जागीच ठार झाली. एसटीमधून प्रवास करणारे अनेक अनोळखी प्रवाशी एसटीला अपघात झाल्यास माणुसकी म्हणून धावून जात असतात. रविवारच्या प्रकारात सोबत असलेली युवती ठार झाल्याचे समजल्यानंतर तिच्यासोबतचा मित्र असेल, नातेवाईक असेल वा अन्य कुणीही. माणुसकी म्हणून तिच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात एखाद्या मेलेल्या जनावराला रस्त्यावरुन फरफटावे तशी 'त्याने' तिच्या मृतदेहासोबत वर्तणूक केल्याची चर्चा जनतेत आहे. या चर्चेतून हा प्रकार माणुसकीला काळीमा नव्हे तर 'त्याच्या' मध्ये माणूसपणच नसल्याचे धडधडीत समोर येत आहे. या घटनेनंतर इतका निर्दयीपणा कशासाठी? या प्रश्नाने समाजातील प्रत्येक संवेदनशील मनाला धक्का बसत आहे.

अशीच एक घटना यापूर्वी शुक्रवार पेठ ते पंचगंगा नदी या रस्त्यावरील गायकवाड वाड्याजवळ झाली होती. त्यावेळी मोटरसायकलवरील युवक ठार झाला होता आणि त्याच्यासोबतची युवती गायब झाली होती.

कॉलेजच्या वेळात लेक्चर्स बंक करुन बाहेर फिरायला जाणाऱ्या कॉलेज युवक, युवतींची संख्या हल्ली वाढत आहे. पन्हाळा, चंबुखडी, विमानतळाचा परिसर, रामलिंगचा डोंगर, गिरगाव, कात्यायनीचा परिसर अशा एकांत ठिकाणी अनेक कॉलेजियन्स जात असतात. या घटनांमध्ये अनेक शक्यता ​दिसतात. रविवारच्या घटनेतील युवक, युवतीमध्ये ​मित्रत्वाचे संबंध असावेत. तसेच ते जाहीर होऊ नयेत असे वाटत असल्याने त्या युवकाने अपघात झाल्यानंतर आपल्यावर काही बालंट येऊ नये म्हणून तिथून पोबारा केला. या प्रकारच्या पोबाऱ्यामुळे त्या युवकाची त्या युवतीबरोबर निखळ मैत्री होती का? याचीही शंका येते. मैत्रीच असती तर त्याने पोबारा न करता पुढील प्रकारांना सामोरे गेला असता. ते कोणत्या कारणासाठी महामार्गावरुन जात होते? यावरुनही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. कॉलेज प्रशासनाकडूनही अशा विद्यार्थ्यांवर वॉच ठेवल्यास अनेक प्रकार कमी होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images