Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्वीकृत’ निवडी बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वीकृत नगरसेवकपदासाठी शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून मोहन सालपे व तौफिक मुल्लानी, राष्ट्रवादीकडून प्रा. जयंत पाटील, भाजपकडून किरण नकाते तर ताराराणी आघाडीकडून माजी महापौर सुनील कदम यांचे पाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. बुधवारी (२० जानेवारी) सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. पाटील व कदम हे यापूर्वी सभागृहात सदस्य असल्याने तीन नवे चेहरे सभागृहात प्रथमच येणार आहेत.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे सुनील पाटील, भाजपचे विजय सूर्यवंशी व ताराराणीचे सत्यजित कदम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे इच्छुकांचे फॉर्म सादर केले. यावेळी चार पक्षाच्या समर्थकांनी महानगरपालिकेत मोठी गर्दी केली होती.

तीन 'कदमां'ची एंट्री

ताराराणी आघाडीने माजी महापौर सुनील कदम यांच्यावर शिक्कामोर्तब केल्याने सभागृहात विरोधी पक्षाला पाठबळ मिळणार आहे. कदम यांच्या निवडीने सत्यजित कदम व सुनील कदम या दोन कदम बंधुच्याकडे ताराराणीचे सर्व सुत्रे जाणार आहेत. सत्यजित कदम यांच्या वहिनी सीमा कदम या देखील निवडून आल्या आहेत. यामुळे एका कुटुंबातील तीन सदस्य आता सभागृहात दिसणार आहेत.

काँग्रेसची सालपे, मुलाणींना संधी

स्वीकृत नगरसेवकपदांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व ताराराणी आघाडीकडून इच्छुकांची मोठी संख्या होती. काँग्रेसकडून माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, दिलीप भुर्के, अजित पोवार धामोडकर, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी, अमर समर्थ, राजू साबळे, विजय देसाई यांनी इच्छा व्यक्त केली होती. पण काँग्रेसने सालपे व मुल्लाणी यांच्या नावे मोहोर उमटवली. सालपे हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असून ते कसबा बावड्यातील राम सोसायटीचे माजी अध्यक्ष आहेत. सालपे यांच्या निवडीमुळे बावड्यातील नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे. मुल्लाणी हे काँग्रेस संघटनेत गेली २१ वर्षे सक्रीय असून ते अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी मुल्लाणी यांना जाहिरात प्रचारात संधी दिली होती. जम्मू काश्मीर निवडणुकीत त्यांनी निरीक्षक म्हणून काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे ते विश्वासू असून जिल्ह्यातील राजकारणात ते सतेज पाटील व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे जवळचे आहेत. त्यांचे नाव थेट चव्हाण यांच्याकडून आल्याचे समजते.

मोदींची संधी हुकली

भाजपनेही किरण नकाते यांना संधी दिली असल्याने माजी नगरसेवक सुनील मोदी यांची संधी हुकली आहे. नकाते आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक असून त्यांच्यासाठी सुहास लटोरे यांनी ताकद वापरली. नकाते यांच्या प्रयत्नामुळे भाजपला तीन प्रभागात विजयाचे खाते खोलण्यास संधी मिळाली. त्याचे फळ त्यांना देण्यात आले. माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, राहुल चिकोडे, विजय जाधव, श्रीकांत गुंठे, अॅड संपतराव पवार यांची नावे चर्चेत होती. पण लटोरे यांच्या आग्रहामुळे नकाते यांचे नाव निश्च‌ित झाले.

राष्ट्रवादीचे 'क्लासट‌ीचर' प्रा. पाटील

निवडणुकीत राष्ट्रवादीला १५ जागांवर समाधान मानावे लगल्याने यावेळी प्रा. जयंत पाटील हे एकमेव स्वीकृत नगरसेवक सभागृहात दिसणार आहे. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोट हाकण्यासाठी काम पाटील यांना आमदार मुश्रीफ यांनी प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीकडून माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी नगरसेवक अजित राऊत, अदिल फरास, उत्तम कोराणे, विनायक फाळके हे इच्छुक होते. पाटील हे जनसुराज्यचे असले तरी राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली आहे. पाटील हे चौथ्यादा स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हसन मुश्रीफांना चौकशीचा घाव वर्मी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वायदेबाजारातून शेतीमालेच दर पाडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. वायदेबाजारातील गैरव्यवहाराची चौकशी करुन त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सेबीकडे केली आहे. वायदेबाजाराचा उपयोग भविष्यातील दरांचा कल समजण्यासाठी व्हावा केवळ सट्टेबाजी आणि गैरव्यवहारासाठी नको आशा भूमिकेतून चौकशीची मागणी केली होती. चौकशीची सुई शरद पवार यांच्याकडे जात असल्याने आमदार हसन मुश्रीफ यांना वर्मी घाव लागला असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकांत म्हटले आहे, 'साखरेचे दर कमी झाल्यानंतर आपण तोंड उघडले नसल्याचा आरोप करणाऱ्या आमदार मुश्रीफ यांनी जुलै ते सप्टेंबरमधील वृत्तपत्रातील बातम्या पुन्हा एकदा वाचाव्यात. दर कमी असल्याने कारखानदारांना साखर विक्री न करण्याचे आवाहन केले होते, त्याचवेळी तुमचे नेते साखर विक्री करण्यासाठी सल्ले देत होते. कारखान्यांना अगाऊ रक्कम देवून कमी दराने साखर खरेदी केली जात होती, साखर खरेदीमध्ये सर्व 'काळा' पैशांतून व्यवहार झाले आहेत. अशा व्यवहारांमुळे १८०० ते २३०० दराने विक्री झालेली साखर खरेदी कोणी केली याची मागणी मुख्यमंत्री, केंद्र‌िय अर्थमंत्री आणि सेबीकडे केली आहे. ज्यांच्या मनामध्ये पाप नाही, त्याला चौकशीची भीती का वाटावी? मुश्रीफ यांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे संशय अधिक बळवाला आहे. ट्रेडिंग करणाऱ्यांचे आयपी अॅड्रेस पाहिल्यानंतर यातील काळेबेरे बाहेर येईल, त्याचमुळे मुश्रीफांचा संताप वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीट्सचा सुपर संडे

$
0
0

कोल्हापूर : 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'हॅपी स्ट्रीट' कार्यक्रमात शहरवासियांची सहभागी होत रविवारची सुटी सार्थकी लावली. एकाचवेळी हजारो जणांचे उंचावलेले हात, 'हॅपी स्ट्रीट...हॅपी स्ट्रीट'चा ठेका आणि संगीताच्या तालावर धरलेला फेर असा मनोजरंजनाचा संडे फिव्हर रंकाळा तलावाच्या काठावर अनुभवायास आला.माऊंटन बाईकिंग क्लबच्या कार्यकर्त्यांच्या थक्क करणाऱ्या सायकलिंग स्टंटनी साऱ्यांनाच अवाक केले. मर्दानी खेळाच्या साहसी प्रात्यक्षिके पाहताना नागरिकांनाही लाठी काठी चालविण्याचा मोह आवरता आला नाही.

पारंपरिक खेळ, मनोरंजनाचा खजिना उलगडणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट' या कार्यक्रमासाठी भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रेस्टीज ग्रुप, वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, स्कोडा श्राइन अॅटो, दि कोल्हापूर अर्बन बँक हे प्रायोजक आहेत. कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर पोलिस आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमासाठी रेडीओ मिर्ची मीडिया पार्टनर आहे.

रंकाळा चौपाटीवर शहरातील विविध भागातील नागरिकांची गर्दी एकवटली. प्रत्येकाला कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकता लागलेली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धुक्याने लपटलेल्या चौपाटीवर 'हॅपी स्ट्रीट'चे व्यासपीठ अवतरले आणि सुप्त कलागुणांच्या मुक्त आविष्काराची उधळण सुरू झाली. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, कॉलेजियन्स, यंग सिनीअर्स प्रत्येकजण 'हॅपी स्ट्रीट'च्या मंचावर सहभागी झाला. मुख्य व्यासपीठावर कलागुणांच्या सादरीकरणाला बहर आला. गीत, नृत्य, मिमिक्री, नकलातून क्षणाक्षणाला हास्याचे फवारे फुटू लागले. तरूणाईची दिलखेचक नृत्य आणि ठेका धरयला लावणारा झुंबा डान्सने साऱ्यांनाच थिरकायला लावले. मुख्य व्यासपीठासमोर गर्दी ओसांडून वाहत होती. गीत, गायन आ​णि नृत्याचा आनंद लुटत ना​गरिकांची रंकाळा चौपाटीवरून सैर सुरू झाली. 'हॅपी स्ट्रीट'च्या या आनंददायी सफरीत कुणी पारंपरिक खेळात हरवले. तर कुणी लेझीम पथकाच्या तालावर फेर धरला.



हवेत सायकल चालविण्याचा स्टंट

सायकल चालविण्याचा आनंद प्रत्येकांनी लुटलेला आहे. मात्र सायकल स्टंट विषयी साऱ्यांनाच आकर्षण असते. सायकल हवेत उंचावणे, एकाच चाकावर सायकल चालविणे, भरधाव वेगाने सायकल पळवत अचानक अर्धगोलाकार गिरकी घेणे अशा साहसी प्रकारांनी साऱ्यांनाच थक्क केले. कोल्हापूर माऊंटन बाइकिंग क्लबच्या गौरव जोशी सोहम भोसले, ओजस शिंदे, पृथ्वीराज पाटील, शंतून पावसकर, दिनेश भानोडिया यांनी सायकल स्टंटची प्रात्यक्षिके सादर केली.

मातीकामाची वाहवा

स.म लोहिया हायस्कूलचा विद्यार्थी अभिषेक अनंत घोलकर या शाळकरी विद्यार्थ्याने मातीकामाचे दर्शन घडविले. मातीच्या गोळ्याला आकार देत सुबक मूर्ती तयार केल्या. देवदेवतांच्या मूर्ती बनविल्या. अभिषेक हा पाचवीच्या वर्गात शिकतो. पहिल्यांदाच तो 'हॅपी स्ट्रीट'मध्ये सहभागी झाला होता. त्याने बनविलेली बाहुबलीची मूर्ती साऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरली. 'हॅपी स्ट्रीट'मधील अनुभव वेगळा आहे. वेगळे काही तरी केले की लोकांकडून त्याचक्षण कौतुकाची पोचपावती मिळते हा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला होता.

स्केटिंगची जादूच न्यारी

स्कॉड, इनलँड स्केटिंग करताना मुलांनी साधलेला ताल सर्वांना मोहून गेला. पदपथावरुन त्यांनी सादर केलेले कसब पाहून सर्वजण अचंबित होत होते. सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग आणि जे. जे. रोलर स्केटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी आपले कसब सादर केले. राज्य आणि राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कोल्हापूरचे नाव अजरामर केलेल्या बालचमुनी चांगलीच गर्दी खेचली होती.

पंधरा वर्षानंतर सायकल चालवण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. मुलीला घेवून डबलसीट केलेली सफर अविस्मरणीय अशीच होती. मुलीलाही डबल सीट प्रकाराची माहिती मिळाली. सायकलफेरी दरम्यान तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान मिळाले. अशी उपक्रमामुळे नाते संबंधातील वीण अधिक घट्ट होईल. - अमित पाटणेकर, आर. के. नगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्लक्षानेच कोल्हापूर विद्रूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील अनेक चौकांना ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आहे. शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, दसरा चौक तर सामाजिक चळवळींचे साक्षीदार आहेत. चौकाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी सुशोभिकरण करण्यात आले. लोकवर्गणीतून आयलँडची उभारणी झाली. मात्र अतिउत्साही कार्यकर्ते आ​णि नेते मंडळीचा 'हम करे सो कायदा' या प्रवृत्तीमुळे शहरातील प्रमुख चौकात आणि मार्गावर अ​नधिकृत फलक थाटले जातात. बेकायदेशीररित्या होर्डिंग्ज उभारणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई होत नसल्याने चौकाचौकात फलकांचे पेव फुटले आहे. परिणामी शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.

वास्तविक महापालिका कार्यक्षेत्रात फलक उभारणीसाठी इस्टेट विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. होर्डिंग्ज उभारणी संदर्भात नियमावली आहे. इस्टेट विभागाकडून मान्यता घेताना जागा भाडे म्हणून १५० रुपये रक्कम भरावी लागते. त्याशिवाय प्रती चौरस फुट भाडे आकारणी केली जाते.

शहरातील प्रमुख चौक आणि रस्यावरून फेरफटका मारला तर सगळीकडे होर्डिंग्ज दिसतात. राजकीय नेते, तालीम संस्थाचे पदाधिकारी, सार्वजनिक मंडळाची कार्यकारिणी, पतसंस्थेचे संचालक ते गल्लीबोळातील स्वयंघोषित युवा नेत्यांच्या शुभेच्छा फलकांची मालिका नजरेस पडते. वाढदिवस अध्यक्षपदी निवडीचे निमित्त साधून पोस्टरबाजी केली जाते.

परवानगी अडगळीत महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयामार्फत कारवाईची मोहिम राबवली जाते. पण प्रशासनाकडून फलक उतरविण्यापलीकडे दुसरी कारवाई होत नाही. परिणामी शहर आणि परिसरात 'उदंड झाली होर्डिंग्ज' असे चित्र नजरेस पडत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रमुख चौक, दुभाजकही होर्डिंग्जमधून सुटली नाहीत. दसरा चौक, बिंदू चौक, ताराराणी पुतळा परिसर, मिरजकर तिकटी, संभाजीनगर पेट्रोल पंप, महाद्वार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोड, राजारामपुरी मुख्य मार्ग, बीटी कॉलेज चौक परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.

जुजुबी कारवाईने धाक कमी

महापालिकेच्या इस्टेट विभागाकडील नोंदीनुसार गेल्या चार महिन्यात शहर आणि परिसरात १६६७ अनधिकृत फलक उभारल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप, नगरसेवक, आमदार व पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या फलकासाठी अनकेदा परवानगी घेतली जात नसल्याचे सामोरे आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यावरही अनेकदा दबाव टाकला जातो. इस्टेट विभागाकडूनही कडक कारवाई केली जात नाही. बेकायदेशीररित्या होर्डिंग्ज उभारणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी दाखल करण्याचे अधिकार आहेत.

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जच्या विरोधात कारवाई केली जाते. गेल्या चार महिन्यांत १६६७ होर्डिंग्ज हटविण्यात आली आहेत. महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात हायकोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. - सचिन जाधव, अधिकारी, इस्टेट विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानव्याचा अंश वाढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माणसांचे मोल जात, धर्म, देव आणि लिंगभेदांवरून ठरवले जात आहे. धर्मनिरपेक्ष देशात जाणीवपूर्वक धर्माचे आणि जातींचे लेबल घट्ट करून समन्वयाची परंपरा पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे माणूस म्हणून जगण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्म, जात, देव आणि लिंगभेदाची बेडी तोडून जगता आले पाहिजे आणि यासाठीच माणसातील मानव्याचा अंश वाढायला हवा,' अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी व्यक्त केली. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनातील बीजभाषणात ते बोलत होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही संकल्पना घेऊन शाहू कॉलेजच्यावतीने आयोजित या संमेलनात लेखक राजन खान यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावर बोलताना देशातील डाव्या चळवळींच्या आपयशाची कारणमींमासा केली.

राजन खान म्हणाले, 'देशातील डाव्या चळवळी जशा राजकारणात अपयशी ठरल्या, तशाच त्या समाजकारणातही अपयशी ठरल्याचे आहेत. डाव्यांच्या बेईमानीनेच उजव्या शक्ती वाढल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. डाव्यांची कट्टरता संपल्याने आणि त्यांनी तत्वांशी तडजोड केल्यामुळेच डावे नेते सत्तेत सामिल झाले. काही विशिष्ट धर्मनिष्ठ पक्षांमुळेच देशात धर्म, जात, देव आणि लिंगभेदाची चौकट घट्ट झाली आहे. शाळा, शिक्षण आणि सरकारही धर्मवादी असल्याने घटनेची अंमलबजावणी होत नाही. माणसांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी जाती-धर्माचे लेबल सोडून माणसांची चळवळ वाढावी. माणसात मानव्याचा अंश वाढला पाहिजे.'

देशात सध्या सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या वादावरही बोट ठेवत राजन खान यांनी लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आल्याचे स्पष्ट केले. 'कलुषित राजकारण आणि धर्मांधतेच्या कोलाहलात माणूस म्हणून जगताना एकटेपणाची भावना वाढत चालली आहे' असे ते म्हणाले.

संमेलनाचे उदघाटक डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'आज देशात घटनेची सत्ता आहे की धर्मसत्ता आहे असा प्रश्न पडतो आहे. धर्मांध सत्ताधाऱ्यांकडून घटनेतील धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्याचा कुटील डाव सुरू आहे. तो थोपविला पाहिजे. राज्यघटना सर्वोच्च असल्याने धर्मसंसद चालू राहू नये यासाठी दक्षतेची गरज आहे.'

संमेलनात शिक्षण व अभिव्यक्ती या विषयावर चर्चासत्र झाले. अखेरच्या सत्रात निमंत्रित कवींचे कवीसंमेलनही रंगले. यावेळी मेघा पानसरे, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, साहित्यिक राजा शिरगुप्पे आदी उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. सुनील चंदनशिवे यांनी आभार व्यक्त केले.



मलाही भीती वाटते

करुणेची परंपरा असलेल्या आपल्या देशात दहशतीचाही मोठा इतिहास आहे' असे सांगून राजन खान म्हणाले, 'सरकारच्या किंवा प्रस्थापितांच्या विरोधात बोलणाऱ्यांना हिंसेने संपवले जाते. त्यामुळे अलिकडे बोलताना मलाही भीती वाटते. भीती वाटली तरीही बोलणे आणि लिहिणे थांबविणार नाही.



खासदारांना परीक्षा हवी

देशाच्या संसदेत निवडून जाणाऱ्या खासदारांना घटनेचे ज्ञान नसते, त्यामुळे अनेक खासदार कुठेही आणि काहीही बोलतात' असे टीका राजन खान यांनी केली. 'काही खासदारांच्या बोलण्याने दंगली घडू लागल्या आहेत. त्यामुळे देशाची घटना समजावी, त्यानुसार काम व्हावे यासाठी खासदारांना निवडून येताच घटनेची परीक्षा देणे बंधनकारक करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रांच्या दुनियेत रंगले बालकलाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, डोंबाऱ्यांचा खेळ, समुद्र किनारी खेळणारी मुले, माझं कोल्हापूर अशा अनेक विषयांच्या चित्रातील दुनियेत दहा हजारहुन अधिक बालकांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. निमित्त होतं भिमा फेस्टिव्हल अंतर्गत रंग उमलत्या मनाचे या शालेय चित्रकला स्पर्धेचे. रविवारी हुतात्मा गार्डन येथे बाल चित्रकारांना व्यासपीठ देणाऱ्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

चॅनल बी च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही फेस्टिव्हल अंतर्गत 'रंग उमलत्या मनाचे' ही शालेय चित्रकला स्पर्धा झाली. स्पर्धेचे बारावे वर्षे होते. स्पर्धेचे उदघाटन खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, सुहास लटोरे, राजराजे कुपेकर यांच्या उपस्थितीत झाले.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते. पहिली व दुसरी, तिसरी आणि चौथी, पाचवी आणि सहावी, सातवी आणि आठवी, नववी आणि दहावी असे गट होते. गतीमंद गटासाठी आणि अपंग गटासाठी स्वतंत्र विषय दिले होते.

हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत कलेचा अविष्कार दाखवून ‌दिला. स्पर्धेदरम्यान अभिषेक जोशी, स्वप्निल दळवी, गौरव काईंगडे, अ‌भिजीत पडळकर या कलाकारांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला. नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार, सुनील कदम, किरण शिराळे, शेखर कुसाळे, किरण नकाते, राजश्री शेळके, राजू दिंडोर्ले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघटनेतर्फे कँडल मार्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डची सक्ती केली आहे. या आणि इतर जाचक नियमांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेतर्फे सोमवारी (ता. १८) शहरात कँडल मार्चचे आयोजन केले आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले की, 'ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ठराव करण्यात आला की, केंद्र शासनाने दोन लाखांच्या खरेदीवरील पॅन कार्ड सक्ती, फॉर्म नंबर ६० व ६१ भरून घेणे व सहा वर्षे असे रेकॉर्ड सांभाळावे, अशा जाचक निर्णयाच्या विरोधात सराफ सुवर्णकार संघटनेचा शांततेच्या मार्गाने विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

ओसवाल म्हणाले, 'त्या अनुषंगाने शहरात सराफ संघाच्या कार्यालयापासून कँडल मार्च काढण्यात येणार आहे. तो महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाइन, माळकर तिकटी शिवाजी चौक ते परत कार्यालय असा कँडल मार्चचा मार्ग असेल. दरम्यान, खासदार व आमदारांना यासंबंधी निवेदन देऊ. जिल्ह्यातील सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी सायंकाळी पाच वाजता शहर व्यापारी संघाच्या कार्यालयाजवळ उपस्थित राहावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कशाला हवाय सिलिंडर?

$
0
0

Anuradha.kadam @timesgroup.com

कोल्हापूर : चार महिन्यांच्या अंतरानंतर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी मागणी करणाऱ्या ग्राहकांना सध्या, 'कशाला हवाय सिलिंडर?', 'गेल्या चार ते पाच महिन्यांत सिलिंडर का घेतला नाही?', 'आता सिलिंडर हवा असेल तर पत्त्याचा पुरावा आहे का?' अशा प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या पण कोल्हापुरात घर असलेल्या गॅसधारकांकडून किमान चार महिन्यांच्या कालावधीनंतर सिलिंडर घेतला जात असेल तर सुरक्षेच्या कारणास्तव गॅस वितरण केंद्राद्वारे ही माहिती संकलित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर काही गुन्ह्यांमध्ये केला जात असल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले आहे. गॅस सिलिंडरचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅसचा अनधिकृत वापर टाळण्यासाठी अशाप्रकारची माहिती संकलित करण्याबाबत गॅस वितरण केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या कोल्हापुरातील अनेक कुटुंबातील एखादा सदस्य नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी आहे. मात्र, अशा कुटुंबांचे कोल्हापुरातही घर आहे. यामध्ये तरुण मुलांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकदा आई-वडिलही मुलाकडे वास्तव्यास जात आहेत. हा कालावधी चार महिने ते एक वर्षापर्यंतचा असल्यामुळे कोल्हापुरातील घरी सिलिंडरची गरज लागत नाही, परिणामी ​सिलिंडरची मागणी नोंदवली जात नाही. जेव्हा असे कुटुंबीय कोल्हापुरात येतात, तेव्हा सिलिंडरची गरज लागल्याने केंद्राकडे सिलिंडरची मागणी केली जाते.

तसेच कोल्हापुरातच सेकंड होम घेणारे नव्या घरातही गॅस कनेक्शन घेतात. मात्र, नेहमी त्या घरात जात नसल्यामुळे सिलिंडरची देवघेव दर महिन्याला होत नाही. काही कारणाने सेकंड होममध्ये रहायला आल्यावर सिलिंडरची मागणी नोंदवली जाते. सेकंड होम काही कारणास्तव विकल्यानंतरही त्या पत्त्यावरील सिलिंडर घरपोच न मागवता स्वःता आणले जाते. नागरिकांच्या गरजांमधून ही सोय योग्य असली तरीही याचा गैरफायदा काहीजणांकडून घेतला जातो. त्यामुळे चार ते सहा महिन्यांनंतर सिलिंडरची मागणी करणाऱ्या ग्राहकांकडून माहिती मागवण्यात येत आहे.



घरगुती गॅस सिलिंडरच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ही माहिती घेण्यात येत आहे. गुन्हेगारी व अनधिकृत कामासाठी गॅसचा वापर टाळवा आणि गरजूंना घरगुती वापरासाठी वेळेवर सिलिंडर मिळावे यासाठीच या माहितीचा उपयोग करण्यात येणार आहे. - शेखर घोटणे, अध्यक्ष, गॅस वितरक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापतिपदासाठी हालचाली वेगावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून आता चारही पक्षांमध्ये कवित्व सुरू आहे. नेत्यांनी कारभाऱ्यांना संधी दिल्याची उघड चर्चा सुरू झाली असतानाच पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचे दर्शन यानिमित्ताने घडले. ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्षातील कारभाऱ्यांतील मतभेद, शह-काटशहाची खेळी चव्हाट्यावर आली आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीनंतर आता स्थायी समिती, परिवहन समिती सदस्य निवडी आणि त्यानंतर सभापतीसाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत.

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून चारही पक्षात राजकारण रंगले. भारतीय जनता पक्षाच्या बँडेड कार्यकर्त्याना बाजूला सारून ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनी मर्जीतील कार्यकर्त्याची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावली. निवडीच्या निमित्ताने ताराराणी आघाडीचे कारभारी सुहास लटोरे, सुनील मोदी यांच्यातील कुरघोडी उफाळून आली. मोदी यांचा पत्ता कापण्यासाठी लटोरे यांनी खेळी साधत किरण नकाते यांना पद मिळवून दिले. संभाजीनगर आणि नेहरूनगर प्रभागातील उमेदवारांना निवडून आणण्यात नकाते यांचे योगदान मोलाचे ठरले. नकाते यांना पुढे करून ताराराणी आघाडीतील एका गटाने मोदी यांचा महापालिकेतील प्रवेश रोखला. भाजपमध्येही कार्यकर्त्यांच्या पातळीवर हालचाली असल्या तरी वरिष्ठ पातळीवरील राजकारण हे ताराराणी आघाडीशी मिळतेजुळते, त्या गटाला झुकते माप देण्याचे असल्याचे निवडीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र नवख्यांना संधी मिळाल्याने अनेकजण हिरमुसले. काँग्रेसमध्ये उघड मतप्रदर्शन नसले तरी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि मर्जीतल्यांना संधी दिल्याची चर्चा खासगीत आहे.

महापालिकेच्या २० जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत समिती सदस्यांची नावे सादर होतील. बहुतांश सदस्यांना 'स्थायी'त इंटरेस्ट आहे. आघाडीच्या सत्तेच्या सुत्रानुसार स्थायी सभापतिपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. यासाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या चारवर गेली आहे.



सुनील मोदी करणार आत्मचिंतन

स्वीकृत नगरसेवकपदापासून वगळल्यानंतर माजी नगरससेवक सुनील मोदी यांनी व्हॉट्सअॅपवर काही मित्रांशी पत्राद्वारे भावना व्य्त केल्या आहेत. 'स्वीकृत'च्या घडामोडीवर मत व्यक्त करताना मोदींनी म्हटले आहे, 'स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निर्णयामुळे आघाडीबाहेरील काही व्यक्तींना निश्चितच आनंद झाला असेल. आघाडीतील काही व्यक्तींना आतून आनंद झाला असेल. तर आघाडीतील काही घटकांना सुनील मोदीसाठी कुरघोडी केल्याचे समाधान वाटत असेल पण या सर्वांच्या व्यतिरिक्त आघाडीतील व आघाडीबाहेरील अनेक लोकांना वाईटही वाटले. माझ्या दृष्टीने या निवडी कोणावरही दोषारोप ठेवण्याच्या नाहीत. माझ्यासाठी हे आत्मचिंतन करण्याचे दिवस आहेत. या आत्म​चिंतनातून माझे मन व बुद्धी संतुलित निर्णय घेण्यास सक्षम आहे असा माझ्यावरच माझा विश्वास आहे. आत्मचिंतन करून भविष्यकाळात योग्य पारदर्शक व माझ्या कार्याला स्थिरता निर्माण होईल असाच निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे' असे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे आली रुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वेरुळाच्या दुरुस्तीसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवार सकाळपर्यंत केलेल्या मेगाब्लॉकमुळे शनिवारी रात्री येणारी सांगली पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आली. तर तीन एक्स्प्रेस मिरजपासून सोडण्यात आल्या. रविवारी सकाळी मुंबईहून येणारी सह्याद्री व महालक्ष्मी एक्स्प्रेस उशीरा पोहचल्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मात्र, रविवारी दिवसभर वाहतूक सुरळीत झाली.

मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील जयसिंगपूर व हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेरुळाच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला. मध्यरात्री एक वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे शनिवारी रात्री सांगलीहून कोल्हापूरला येणारी पॅसेंजर रद्द करण्यात आली. तर रविवारी सोलापूरहून येणारी रेल्वेगाडी मिरजपर्यंत थांबवण्यात आली. मुंबईहून सकाळी सहाच्या सुमारास येणारी सह्याद्री एक्स्प्रेस मिरजमध्ये थांबवण्यात आली होती. मेगाब्लॉक संपल्यानंतर कोल्हापूरला सोडण्यात आली. महालक्ष्मी एक्स्प्रेसही थोड्या उशिराने आली. पहाटे कोल्हापूरहून पुण्याला जाणारी तसेच हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेगाड्या मिरजेपासून सोडण्यात आल्या. हैदराबाद रेल्वेचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना मात्र पहाटे उठून मिरजेला जावे लागले. कडाक्याच्या थंडीमध्ये प्रवाशांना धावाधाव करावी लागली. काही प्रवाशांनी तर आरक्षण रद्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेट्टींचे व्यापारी, सटोडियांशी लागेबांधे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'साखरेचे दर वाढत असताना अर्थमंत्री आणि सेबीकडे व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची मागणी करणाऱ्या तथाकथीत शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखरेचे दर कमी असताना अशी मागणी का केली नाही? त्यांच्या अशा मागणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्याचा परिणाम साखर दरावर होणार आहे. शेट्टी यांची मागणी शेतकऱ्या अडचणीत आणणारी असून त्यांचे सटोडीया, साखर व्यापारी व कार्पोरेट कारखानदारांशी लागेबांधे असल्यानेच ते अशी मागणी करत आहेत' अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. शेतकरी विरोधी भूमिकेमुळे 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' असा टोलाही मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

वायदेबाजर आणि साठेबाजीवरून गेल्या दोन दिवसांपासून खासदार शेट्टी आणि आमदार मुश्रीफ यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. जिल्हा बँकेवरुन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्नानंतर खासदार शेट्टी यांनी वायदेबाजाराची चौकशी करण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. एफआरपीचा प्रश्न निकालात निघण्यापूर्वी मुश्रीफ यांनीही अनेकवेळा शेतकरी नेते म्हणून शेट्टी यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. 'चौकशी घाव मुश्रीफांच्या वर्मी' या टिकेला मुश्रीफांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, अर्थमंत्री व सेबीकडे वायदेबाजाराची चौकशी करण्याची मागणी शेट्टींनी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे साखरचे दर कमी झाले तर, कारखान्यांना एफआरपी देणे मुश्कील होणार आहे. कारखानदारांना अडचणीत आणण्याची शेट्टी यांची खेळी आहे. सेबीआय चौकशीमागील शेट्टींचे सत्य काय आहे, याची माहिती मला समजल्यामुळे त्यांचा त्रागा होत आहे. साखरेचे दर वाढत असताना असे करण्याची गरज काय यावर शेट्टी गुळमुळीत उत्तर देत त्यावेळची वृत्तपत्रे वाचण्याचा सल्ला देत आहेत. तसा सल्ला शेट्टी यांच्याकडे आम्ही मागितला नाही. त्यावेळी तक्रारी का केल्या नाहीत ? हे सांगावे. संशयाची सुई आपल्याकडे येत असल्याने ते आता नेहमीप्रमाणे दुसऱ्याचे नाव घेवून जनतेची, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अशा सर्व प्रकरणाची चौकशी करुन सत्य बाहेर काढावे या मागणीमुळे खासदार शेट्टी अस्वस्थ का झाले ? असाही प्रश्नही मुश्रीफ यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावगीतांनी दरवळली सायंकाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भावगीतांच्या एकाहून एक आशयघन शब्दफुलांनी रविवारची सायंकाळ दरवळली. 'टिक टिक वाजते' फेम गायिका सायली पंकज आ​णि स्वप्नील गोडबोले यांच्या सुगमसंगीताने भारलेल्या वातावरणात भावगीतांच्या श्रवणीय अनुभूतीने रसिकांना मुग्ध केले. 'शुक्रतारा मंदवारा', 'बगळ्यांची माळफुले' यांसारख्या गीतांची बरसात करत या द्वयीने शब्दस्वरांचे चांदणे फुलवले.

ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम संस्थेच्यावतीने आयोजित पेटाळ्यातील गडकरी सभागृहात पं. सुधाकरबुबा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाची सांगता सुगमसंगीताच्या मैफलीने झाली. महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर आणि संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र अष्टेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला. उदय कुलकर्णी यांनी स्वागत केले. कलाकारांचा परिचय विवेक शुक्ल यांनी करून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात गायक स्वप्नील यांच्या गणेश वंदनेने करण्यात आली. गोडबोले यांनी सादर केलेल्या विठू माउली,माय भवानी यासारख्या भक्तीगीतांनी उपस्थितांना भक्तीरसात चिंब केले. तर सायली यांच्या जीव दंगला, श्रावणात घननिळा या गीतांनी उपस्थितांना डोलायला लावले. मनीष आपटे यांनी सूत्रसंचालन केले. केदार गुळवणी, सचिन जगताप, प्रशांत देसाई, धीरज वाकरेकर, संजय साळोखे, शिवाजी सुतार यांनी संगीतसाथ दिली. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले.

श्रीकांत लिमये यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, संतोष कोडोलीकर, श्रीकांत डिग्रजकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांना ‘संजीवनी’ डोस

$
0
0

भूखंड विकसित करण्यासाठी ३१ पर्यंत मुदतवाढ

दीपक मांगले, गडहिंग्लज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांसाठी दिलेल्या भूखंडांना विकसित करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. एमआयडीसीमार्फत उद्योग संजीवनी योजनेला विशेष मुदतवाढ योजना जाहीर झाली केली असून ३१ जानेवारी, २०१६ पूर्वी इच्छुक भूखंडधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज व करारनामा सादर करणे बंधनकारक आहे.

औद्योगिक विकास महामंडळाने वितरीत केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाचा ठराविक मुदतीत विकास करणे अपेक्षित असते. यामध्ये विहित मुदतीत मंजूर नकाशाप्रमाणे नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करणे व प्रत्यक्षात उत्पादनास सुरवात करणे बंधनकारक असते. गरजेनुसार इच्छुक उद्योजकांनी आपले उद्योग या भूखंडावर उभारले. काहींनी भविष्यकाळातील तरतूद म्हणून हे भूखंड घेऊन ठेवले. तर काहींनी आर्थिक मंदीची झळ लक्षात घेऊन उद्योग सुरु केले नाहीत. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे उद्योग उभारणीमध्ये मरगळ पसरली होती. तर बहुतांश ठिकाणी औद्योगिक वसाहतीतील भूखंड सवलतीच्या दरात मिळाले. मात्र अनेक त्रुटीअभावी प्रत्यक्षात उद्योग उभारण्यास अडचणी निर्माण होत होत्या. महामंडळाकडून याबाबत राबविण्यात येणारी परवाना प्रक्रिया किचकट असून वेळखाऊ आहे. सत्तेवर येताच सरकारने परवाने प्रक्रिया सुलभ करण्यची अनेक आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात त्याचा व्यावसायिकांना फायदा झाल्याचे दिसत नाही.

त्यामुळे भूखंड विकासाला खीळ बसली असून अधिकतर भूखंड वापरविना पडून आहेत. तत्पूर्वी सरकारकडून वापराविना पडून असलेले भूखंड परत घेण्याची कार्यवाही सुरु झाली होती. त्यानुसार काही भूखंडधारकांना नोटीसही देण्यात आली. मात्र भूखंडधारकांनी उद्योग उभारणीतील त्रुटी मांडून मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली.

उद्योग संजीवनी योजनेंतर्गत रिकामे भूखंड व अशंत: बांधकाम असलेल्या भूखंडधारकांना ३१ जानेवारी, २०१७ पर्यंत योजना लागू राहणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१६ पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज व करारनामा सादर करणे बंधनकारक आहे. पुढील आठ दिवसात अर्ज मंजूर होईल. तर इमारत नकाशा मंजुरीसाठी ३० एप्रिल २०१६ पर्यंत मुदत असून पुढील १५ दिवसांत नकाशा मंजूर होईल. इमारत दाखला बीसीसी ३१ जानेवारी, २०१७ पर्यंत प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. प्रचलित दराप्रमाणे ५ टक्के प्रति वर्षाप्रमाणे सशुल्क मुदतवाढ तर ३१ ऑगस्ट, २०१३ नंतर १० टक्के प्रतिवर्ष शुल्क आकारून मुदतवाढ देण्यात येईल. मुदतवाढीचा प्रस्ताव सादर न केल्यास भूखंड काढून घेण्याची प्रक्रिया सुरु होईल. मुदतवाढीचे सर्व अधिकार संबधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन चुकांमुळे घोळ

$
0
0

शेती उताऱ्यांवरील नोंदीत तफावतीमुळे अडचणी

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी गेल्या काही महिन्यांपासून व सातबारा आणि आठ अ दाखले ऑनलाइन करून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात दस्त नोंदणी कार्यालयामध्ये ई-म्युटेशन पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीमध्ये दस्त नोंदणी झाल्यानंतर तत्काळ उतारा देण्याची सोय असतानाही महसूल प्रशासनाच्या वतीने केलेल्या ऑनलाईन उताऱ्यामध्ये गंभीर चुका आढळून येत आहे. शेतजमीनीस हेक्टर ऐवजी चौरस मीटर व बिनशेती क्षेत्रास चौरस मीटर ऐवजी हेक्टर अशा नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे दस्त नोंदणी करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महाराष्ट्र सरकारने जनतेच्या सोयीसाठी सर्वच विभागामध्ये ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याच्या सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महसूल व वनविभांतर्गत सर्वच जिल्ह्यात इ-म्युटेशन पद्धत राबविणेत येत आहे. तलाठी व पटवारी यांच्या मार्फत सातबारा व आठ अ या उतारे अपडेट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंरतु ऑनलाइन नोंदी करत असताना गंभीर चुका केल्याचे निर्दशनास येत आहे. सातबारा व आठ अ या उताऱ्यामध्ये शेतजमीन हेक्टर आरऐवजी चौरस मीटर व बिनशेती झालेल्या चौरस मीटर ऐवजी हेक्टरआर अशा नोंदी झाल्याचे दिसून येत आहे. या नोंदीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास कर्ज प्रकरण, खरेदी दस्त, करारपत्रे, वाटणीपत्र इत्यादी करताना ऑनलाइन उताऱ्यांमध्ये व जुन्या हस्तलिखित उताऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात तफावत दिसून येत आहे. या तफावतीमुळे सर्व प्रकारचे दस्तऐवज नोंदणी करताना सातबारा व आठ अ अपडेट असले तरच दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. अन्यथा दस्त नोंदणी नाकारली जाते. उतारे अद्यावत केले नसल्यामुळे जिल्ह्यात दस्त नोंदणीस मोठा ब्रेक लागला आहे. तसेच वारस नोंदीही ऑनलाइनमध्ये पूर्णपणे अपडेट केल्याचे दिसून येत नाही. शेतकरी दस्त नोंदणी कार्यालयात गेल्यानंतर उताऱ्यांतील तफावतींमुळे इ-म्युटेशन पद्धतीमध्ये दस्त नोंदवू शकत नसल्याचे नोंदणी अधिकारी सांगत आहेत. व सर्व उतारे गावकामगार तलाठ्यांकडून दुरूस्त करण्याचा सल्ला देत आहेत.

इ-म्युटेशन पद्धत ही शेतकरी वर्गाला अडचणीची ठरत असून तलाठयांनी सातबारा व आठ अ उतारे ऑनलाइनवर अपडेट नसल्यामुळे या उताऱ्यांमध्ये मोठा घोळ निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे दस्त नोंदणीची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच ठरलेले व्यवहार मोडीत निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच महसूलही बुडत आहे.

अॅड.भरत श्रीपाल गाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर निर्यातीनेच गुंता सुटेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सध्या साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. अशा स्थितीत साखरेची निर्यात करणे आवश्यक आहे. निर्यात वाढ झाली तरीच दराचा गुंता सुटेल. एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. कारखान्यांनीही साखरेबरोबरच उपपदार्थांची निर्मिती करावी, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. शेतकरी, कष्टकरी, संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सा. रे. पाटील आग्रही होते. दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून आदर्श निर्माण करून सहकार चळवळीस त्यांनी दिशा दिली असेही ते म्हणाले.

शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक-संचालक, माजी आमदार दिवंगत डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन झाले. तर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन माजी वन व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केले. अध्यक्षस्थानी सहकार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

पवार म्हणाले, की देशातील सरासरी एकरी ऊस उत्पादन २९ टन इतके आहे. तर महाराष्ट्राचे ३४ टन आहे. शिरोळ येथील दत्त कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत सा. रे. पाटील यांनी ऊसविकासाच्या विविध योजना राबविल्या. त्यामुळे कारखान्याची उत्पादकता वाढली. येथील सरासरी एकरी उत्पादन ४३ टनांवर पोहोचले. देशातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नवीन जातींची लावण करण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास ऊस उत्पादन वाढेल.'

पालकमंत्री पाटील म्हणाले, की राज्य सुरळित चालायचे असेल, तर सहकार मोडून चालणार नाही. राज्यातील लोकसंख्येपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक सहकार चळवळीशी संबंधित आहेत. त्यामुळे सहकार चळवळ ही राज्याची आर्थिक नाडी बनली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती सर्वसामान्यांचा पैसा जाऊ नये, यासाठी दहा वर्षे मागे जाऊन सहकार चळवळीचे शुद्धीकरण करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. त्यासाठीच सहकारातील प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या २५ संस्था निवडून त्यांना सरकार मदत करणार आहे. भ्रष्टाचार केलेल्यांच्याबाबतीत शासन कठोर होईलच. त्यामुळे हे सरकार सामान्य शेतकऱ्यांचे आहे, याची खात्री बाळगा, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात यांची भाषणे झाली. जांभळी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. आभार दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मानले.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, खासदार प्रकाश हुक्किरे, खासदार प्रभाकर कोरे, आमदार उल्हास पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, सुमन पाटील, सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, जयवंतराव आवळे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, शिरोळ पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज, कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील उपस्थित होते.

शिवार फुलवा!

शेतीवर परिणाम होईल असे राजकारण करू नका, शेतीवर लक्ष केंद्रीत करा, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उसाचे एकरी उत्पादन वाढवा. शिवार फुलवा, सुखाचा संसार करा तरच राज्य सुजलाम सुफलाम होईल, असा सल्ला उपस्थित शेतकऱ्यांना पवार यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा नदीवरील उपसाबंदी उठवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पंचगंगा नदीतील प्रदुषित पाणी उपसा करण्याससुद्धा पाटबंधारे विभागाने बंदी घातली आहे. ही बंद उठवावी यासाठी गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बंदी न उठविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी विकास समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलनही केले. इचलकरंजी ते तेरवाड बंधारा या दरम्यान नदीतील पाणी उपसा करण्यावर पाटबंधारे विभागाने बंदी घातली आहे. पंचगंगा नदीकाठच्या गावातील सांडपाणी आणि औद्योगिक रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदी प्रदुषित झाली असून या प्रदुषित पाण्यामुळे प्रचंड संख्येने मासे मृत्यूमुखी पडत आहेत. यावेळी जोरदार न‌िदर्शने करण्यात आली. कोल्हापूर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. या अधिकाऱ्यांना मागण्यांबाबत घेराव घातला असता प्रांताधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आंदोलनात आप्पा पाटील, विश्वास बालिघाटे, विजय भोजे, सुरेश शेडबाळे यांच्यासह अब्दुललाट, शिरढोण, शिरदवाड, शिवनाकवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानुसार आज शेतकरी विकास समितीच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी उपसा बंदी उठवण्याबाबत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वस्तुस्थिती मांडून मागण्यांबाबत त्वरीत निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात आप्पा पाटील, विश्वास बालीघाटे यांच्यासह शेतकऱ्यांची समावेश होता.

गणेशनगरातील सारण गटारीचे काम बंद पाडले इचलकरंजी: येथील गणेशनगर गल्ली क्रमांक नऊमधील सारण गटारीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले. यावेळी संतप्त जमावाने मक्तेदारास जाब विचारला असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याला रोषाला तोंड द्यावे लागले. मात्र यानिमित्ताने खाबुगिरीचा पुन्हा एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

विविध मागण्या

पाण्याला उग्रवास येत असल्यान हे पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. असे असताना पाटबंधारे विभागाने इचलकरंजी ते तेरवाड बंधारा दरम्यानचे पाणी उपसाबंदी उठवावी. दुषित पाणी उपसा करत असल्याने पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी माफ करावी आदी मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’चा उजळाईवाडीत गृहप्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाची नवीन गृहप्रकल्प योजना उजळाईवाडी (ता. करवीर) येथे लवकरच सुरू होणार आहे. शासनाकडून उजळाईवाडीतील जागेसाठी मंजुरी मिळाली असून, ४५ घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. घरांची तात्पुरती रक्कम ठरताच याची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे, तर आर. के. नगर परिसरात सुरू असलेला म्हाडाचा गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, तीन महिन्यात लाभार्थ्यांना ताबा देण्यासाठी म्हाडाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

सर्वसामान्यांना माफक दरातील घरे मिळावीत यासाठी म्हाडाच्यावतीने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृह प्रकल्पांची योजना राबलली जाते. म्हाडाच्या कोल्हापुरातील अधिकाऱ्यांनी उजळाई‍वाडी येथील जागेत ४५ घरांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, सध्या संबंधित जागेच्या लेआऊटचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून गृहप्रकल्पचा आराखडाही तयार केला आहे. काही तांत्रिक कामांची पूर्तता झाल्यानंतर उजळाईवाडी येथील गृहप्रकल्पाची जाहिरात प्रसिद्धीला देण्यात येणार आहे. म्हाडाने आर. के. नगर येथे सुरू केलेला ३० घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, मार्च अखेर काम पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकूण ३४२० स्क्वेअर मीटर परिसरातील ५३८ स्क्वेअर फुटांचा भूखंड आणि त्यामध्ये २५० स्क्वेअर फुटांचे बांधकाम करून दिले जात आहे. बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या रस्ते आणि गटर्सचे काम सुरू आहे.

चाळीस हजारांची अट

म्हाडाची गृहप्रकल्प योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असल्याने यासाठी मासिक उत्पन्न चाळीस हजारांच्या आत असावे अशी अट आहे. उत्पन्नाचे दाखले आणि रहिवासाचे दाखले या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहेत, त्याचबरोबर सोडतीत नाव आल्यानंतरच पैसे भरून घेण्याची योजना सुरू होत असते अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाधिक लोकांना माफक किंमतीत स्वतःचे घर मिळावे यासाठी म्हडाकडून नवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत. उजळाईवाडी परिसरात लवकरच ४५ घरांचा नवीन प्रकल्प सुरू होणार असून, आर. के. नगर परिसरातील ३० घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

- मुकुंद पंडित, उपअभियंता, म्हाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी बाबूंना खासगी मदतनीस

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये जागा अपुरी असल्याने माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत येणाऱ्या वेतन भविष्य निर्वाह निधी पथकाचे कामकाज विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुरू आहे. भविष्य निर्वाह पथकमध्ये अंशकालीन महिला कर्मचाऱ्यांना एक खासगी कर्मचारी मदतनीस दिला आहे. सरकारी सर्व कागदपत्रांची हातळणी करत त्यांनी कार्यालयात चांगलाच जम बसवला असल्याने सरकारी बाबूंना खासगी मदतनीस अशी अवस्था झाली आहे. याच कार्यालयातील शिपायाच्या रुबाबही एखदा आमदाराला लाजवेल असाच असल्याने वेतन भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाचे 'भविष्य' अंधकारमय बनले आहे.

वेतन पथक कार्यालयाकडून नियमित पगार बिले, थकीत बिले व भविष्य निर्वाह निधी आदींची कामे चालतात. इतर कार्यालयाप्रमाणे प्रत्येक फाइलवर वजन ठेवल्याशिवाय फाइलीला पाय फुटत नाही. पगार व थकीत बिलांची कामे सोप्या पद्धतीने चालतात, मात्र भविष्य निर्वाह निधीच्या बिलांची कामे जटील असल्याने कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यांनी टोप येथील एका हायस्कूलचा लिपिक मदतनीस म्हणून ठेवला आहे. हायस्कूलच्या कामापेक्षा त्यांचा संपूर्णवेळ याच कार्यालयातून बसून जात असल्याने त्यांनी चांगलेच येथे बस्तान बसवले आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मदत करण्याबरोबरच संपूर्ण सकारी कागदपत्रे व संगणक हाताळण्याची संधी साधत ते मर्जीतील लोकांची कामे करण्यास माहीर बनले आहेत. मदतनीसाचे काम करण्याबरोबरच वरकमाइही करुन देत असल्याने कार्यालयीन अधीक्षकांनाही हा लिपिक 'लाखमोलाचा' वाटत आहे. त्यामुळे त्यांनी याकडे कानाडोळा करण्यातच धन्यता मानली आहे. फंडाची फाइल मंजूर करण्यासाठी स्वतंत्र टेबल असून या टेबलचे लिपिक फाइलवरील 'वजन' पाहूनच आपली मोहोर उमटवतो. लिपिकाच्या जादा वजनाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या एका अभ्यागताने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता. याची माहिती मिळताच हा लिपिक बावडा परिसरातील एका रुग्णालयात दाखल झाला.

येथील शिपायाचा रुबाब तर औरच आहे. उंची कपडे परिधान केलेला शिपायाचे नाव आणि आमदारांच्या नावात साधर्म्य असल्यामुळे त्याच्या परवानग‌ीशिवाय अधीक्षकांची भेटच होऊ शकत नाही. यांच्या कर्तृत्वामुळेच पंधरा दिवसांपूर्वी कार्यालयांतून अनेक फाइल गायब झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेतल्यानंतर या फाइल पुन्हा कार्यालयात दाखल झाल्या कशा ? हे अद्याप गुलदस्त्यातच राहिले आहे.

गैरव्यवहारांची साखळी

राजारामपुरी येथील एका हायस्कूलचा पगार बंद झालेल्या तज्ज्ञ लिपिकाने भविष्य निर्वाह पथकांमध्ये चांगलेच बस्तान मांडले आहे. माध्यमिक शिक्षक विभाग, वेतन पथक ते उपसंचालक कार्यालयापर्यंत त्याने एक साखळी निर्माण करून ठेवली आहे. या लिपिकाच्या माध्यमातून गैरव्यवहार केले जातात. त्यामुळे पटसंख्या कमी असूनही हायस्कूलचे समायोजन करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधासाठी विरोध नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशाला महासत्ता बनवायचे असेल तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी टोकाची भूमिका सोडली पाहिजे. संवादाच्या माध्यमातून सामंजस्याची भूमिका घेवून देशाची अर्थव्यवस्था भक्कम होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी विरोधासाठी विरोध न करता टोकाची भूमिका सोडून द्यावी,' असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी कॉँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केले. 'यातून आम्ही भाजपबरोबर संधान बांधले आहे, असा अर्थ माध्यमांनी काढू नये,' अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मुस्लिम बोर्डिंगच्या प्रांगणात 'सध्याची राजकीय परिस्थिती आणि प्रसार माध्यमांची भूमिका' हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते. पवार म्हणाले, 'लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना जीएसटी विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला भाजपने जोरदार विरोध केला होता. मात्र हेच विधेयक त्यांना आवश्यक ‍वाटत आहे. विरोधी पक्ष त्याला विरोध करत आहेत. त्यामुळे संसदेच्या १३० तासांपैकी केवळ दहा-बारा तासांचे कामकाज झाले असून त्यातील दोन तास दुखवटा पाळण्यात गेले आहेत. अशा विरोधामुळे संसदीय लोकशाहीला महत्त्व देत नसल्याचा संदेश जात असून तो धोकादायक आहे.'

पवार पुढे म्हणाले, 'राज्यकर्त्यांकडून लोकांची अपेक्षित कामे होत नाहीत हे दुर्दैव आहे. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने बदल केल्याने शेती उत्पादक नाराज आहेत. गहू, कापूस, ऊस, तांदूळ उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने आत्महत्येच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. सध्याच्या सरकारने कृषी धोरणामध्येच बदल केल्याने आत्महत्या वाढतच आहेत.'

यावेळी पवार व महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या नियोजित जागेचे हस्तांतर पत्र पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. प्रेस क्लबचे अध्यक्ष विकास कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सतीश घाटगे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पर्रिकरसाहेब, नेमकं काय करणार आहात?'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

'दहशतवादी हल्ले सहन करण्याची भारताची क्षमता संपली आहे असं संरक्षणमंत्री म्हणत असतील तर यापुढं ते नेमकं काय करणार आहेत, याचा खुलासा त्यांनी करावा,' असा खोचक टोला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना हाणला आहे.

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जयपूर येथे बोलताना पर्रिकर यांनी भारताची सहन करण्याची क्षमता आता संपल्याचं वक्तव्य केलं होतं. पर्रिकर यांच्या या वक्तव्यावर पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'पर्रिरकरांचं वक्तव्य ऐकून मला धक्का बसला. भारत हा चर्चा, संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवणारा लोकशाही देश आहे. अशा देशाचे संरक्षणमंत्री आमची सहनशीलता संपली असं म्हणत असतील तर त्यांना काहीतरी वेगळी कृती अभिप्रेत असावी. तसं असेल तर त्यांनी त्याचा खुलासा करायला हवा. अन्यथा, शेजारी देशांचा गैरसमज होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या चर्चा प्रक्रियेला खीळ बसू शकते,' अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोर भेटीचे मात्र त्यांनी समर्थन केले. मोदी यांनी जे काही केलं तो राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग होता. त्यांच्या पाकिस्तान भेटीमुळं दोन्ही देशांतील शांतता चर्चा पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे,' असं पवारांनी नमूद केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images