Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाईचा निर्णय खपत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऑनर किलिंगमधील प्रतिष्ठेच्या राजकारणापाठीमागे जातीचा नव्हे तर पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा पदर आहे. बाईने निर्णय घेतला तर तो खपवून घेतला जाणार नाही हेच त्यातून दाखवून द्यायचे असते,' असे मत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी व्यक्त केले. यावेळी ऑनर किलिंगचा निषेध करत कुटुंब, नातेवाईक, समाजाकडून त्रास दिल्या जाणाऱ्या आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना सहकार्य म्हणून सरकारकडून तीन लाख रुपये व सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा ठेवाव्यात, विवाहापूर्वी वैद्यकीय चाचणी अनिवार्य करावी, असे ठराव करण्यात आले.

ऑनर किलिंगमधून मेघा व इंद्रजीत या दोघांच्या झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शहीद गोविंद पानसरे विचार मंचच्यावतीने सोमवारी शाहू स्मारकमध्ये ऑनर किलिंग विरोधी परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदिप देशपांडे उपस्थित होते. याप्रसंगी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अनिल चव्हाण होते.

महाजन म्हणाल्या, 'प्रतिष्ठेच्या नावाखाली केले जाणारे खून, सुखाचे संसार केलेल्या जोडप्यांचा सत्कार व नवीन विवाहाचे आयोजन असे तीन कार्यक्रम एकत्रित घेऊन समाजाला एक नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न मंचने केला आहे. माणुसकीच्या वाटेवर चालताना जातीभेद वाईटच असून तो दूर केली पाहिजे. ऑनर किलिंगमध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धतीचा भाग जाणवतो. मुलींकडील नातेवाईक यामध्ये अग्रेसर असतात. त्यांच्याकडून बाईने घेतलेला निर्णय खपवून घेतला जाणार नाही, असे दाखवण्यात येते. यामध्ये खून करुन कोणती प्रतिष्ठा जपली जाते हा मोठा प्रश्न आहे. त्याचा केवळ निषेधच करता येऊ शकतो.'

पोलिस अधीक्षक देशपांडे म्हणाले, 'ऑनर किलिंगसारख्या घटनांमुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना अजूनही असुरक्षित वाटते. याकरिता पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता आणण्याची गरज आहे. त्यासाठी सुरक्षेचे प्रश्न, पोलिसांनी हे प्रकरण कसे हाताळायचे, संवेदनशीलता कशी जपायची याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.' याप्रसंगी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या दांपत्यांनी भावना व्यक्त केल्या. काही कॉलेज तरुणींनीही मते मांडली.

याप्रसंगी सतिश कांबळे, गिरीष फोंडे, मनीषा बुचडे, दिलावर जमादार, इंद्रजीत कुलकर्णी याचे काका रघुनाथ कुलकर्णी उपस्थित होते. प्रदीप आंदोजी यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका कांबळे यांनी आभार मानले. तेजस्विनी पांचाळ यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली.

चौकट

ठार मारण्यासाठी गुंडाला सुपारी

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केलेल्यांना पूर्वी घरातून धमकी देण्यात यत असत. तीच परिस्थिती आजही असल्याचे काहींनी व्यक्त केलेल्या मतांतून दिसून आले. आंतरधर्मीय विवाह केलेल्या एका युवतीने तर आपल्या पतीला मारण्यासाठी एका गुंडाला सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोरच दिली. तर एका युवतीने आमच्या दोघांपैकी कुणी दिसले तर ठार मारणार असा इशारा आपले आईवडील वारंवार देत असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅडव्होकेट जनरल नियुक्तीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या खटला कोल्हापूरबाहेर हलवावा, अशी मागणी आरोपी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याने मुंबई हायकोर्टात केली आहे. समीरच्या मागणीला विरोध करण्यासाठी राज्य सरकारने अॅडव्होकेट जनरलची नियुक्ती करावी, अशी मागणी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

गायकवाडवर कोल्हापूर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. पानसरे हत्येची सुनावणी जिल्हा कोर्टात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर होणार आहे. गायकवाडने हायकोर्टात पानसरे हत्या खटला कोल्हापूरबाहेर हलवावा, अशा मागणीचा अर्ज हायकोर्टात केला आहे. याची सुनावणी १४ जानेवारीला होणार आहे. कोल्हापुरात पुरोगामी चळवळीचे मोठे केंद्र असून, या चळवळीतील नेते सातत्याने सनातन संस्थेविरुद्ध भडक वक्तव्ये करतात. समीरचे वकिलपत्र घेण्यास कोल्हापूर बार असोसिएशनने बहिष्कार घातला होता. त्यामुळे समीरचा खटला कोल्हापूरऐवजी रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड येथे हलवावा, अशी मागणी केली आहे.

समीरच्या अर्जावर होणाऱ्या सुनावणीवेळी पानसरे कुटुंबीयांचे मत कोर्टाने जाणून घ्यावे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी यापूर्वीच कोर्टात केली आहे. पानसरे हत्येचा खटला कोल्हापुरात चालला पाहिजे. समीरच्या मागणीला विरोध करण्यासाठी राज्य सरकारने अॅडव्होकेट जनरलची नियुक्ती करावी, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सुनावणीला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सरकारने लवकर निर्णय घ्यावा यासाठी मेघा पानसरे यांनी तातडीने सोमवारी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवले आहे. समीरवर ३९२ पानाचे आरोपपत्र दाखल केले असून, ६६ साक्षीदार आहेत. त्यात एका शाळकरी मुलाची साक्ष महत्त्वाची आहे. शाळकरी मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी, असे पत्र समीर गायकवाडचे वकील पुनाळेकर यांनी पोलिसांना यापूर्वी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डबल सिग्नलनंतरही संभाजीनगरात कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उपनगरांना जोडणारा प्रमुख रस्ता, राधानगरी, गारगोटीकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने, संभाजीनगर बसस्थानकातून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेस यामुळे संभाजीनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहतुकीला शिस्त लागावी, कोंडी होऊ नये यासाठी संभाजीनगर पेट्रोल पंपानजीक दोन सिग्नल कार्यान्वित केले, पण वाहतुकीच्या कोंडीच्या समस्या काही सुटली नाही. बेशिस्त वाहतूक, रस्त्याकडेलाच वाहनांचे पार्किंग, वडाप वाहतूक व्यावसायिकांचा चौकातच ठिय्या यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.

दररोज रोज सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत चौकात वाहतूक कोंडी ठरलेली आहे. मुळात या चौकातील रस्ता सुद्धा समान पातळीवर नाही. रस्ता चढ उतार असल्याने वाहनधारकांना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे तत्काळ शक्य होत नसल्याने किरकोळ अपघात घडत आहेत. संभाजीनगर पेट्रोलपंपासमोरील चौकात आयसालेशन हॉस्पीटलकडे जाणाऱ्या मार्गावर एका बाजूला चायनिज सेंटरच्या गाड्या, भेळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेत्यांच्या गाड्या आहेत. सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्टॉलवर गर्दी असते. चौकाला लागूनच स्टॉल असल्याने त्यासमोर वाहनांचे पार्किंग केले जाते. काही वेळेला वाहनांचे पार्किंग मुख्य चौकापर्यंत वाढत जाते.

संभाजीनगर चौकातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कळंबा, पाचगाव, साळोखेनगर, जरगनगर, रामानंदनगर, सानेगुरूजी वसाहत, देवकर पाणंद या उपनगरांना जोडणारा हा मार्ग आहे. जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर हा मार्ग बंद आहे. परिणामी संभाजीनगर चौकातील रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून दिवसभर वाहनांची ये जा सुरू असते. पेट्रोल पंपासमोरील रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर, बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाहने लावलेली असतात.

फूटपाथवर फेरीवाले, स्टॉलधारक कळंबा फिल्टर हाऊस समोरील फूटपाथवर फेरीवाले, स्टॉलधारकांनी अतिक्रमण केले आहे. फिल्टर हाऊसच्या समोरील फूटपाथवर तीन विक्रेत्यांनी स्टॉल थाटले आहेत. त्या स्टॉलसमोर वाहने लावलेली असतात. फूटपाथवर स्टॉल थाटल्याने पादचाऱ्यांना फूटपाथवरून ये जा करता येत नाही. फूटपाथवर स्टॉल आणि स्टॉलसमोर अनेकदा दुचाकी वाहने यामुळे रहदारीला अडथळा होत आहे.

वडाप व्यावसायिकही रस्त्यावरच चौकाला लागूनच केएमटी बस थांबा आहे. केएमटी बस थांबा जवळच वडाप व्यवसाय सुरू असतो. संभाजीनगर ते गारगोटीपर्यंतचे वडाप या ठिकाणाहून केले जाते. मुळात चौकात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक खोळंबत असताना पुन्हा रस्त्याच्या एका बाजूला वडापची वाहने लावलेली असतात. निम्मा रस्ता वडाप वाहनांनी, पुन्हा केएमटी बस थांबा यामुळे या गर्दीतून वाट काढत वाहने हाकताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. वडाप व्यावसायिकांच्या घुसखोरीकडे शहर वाहतूक शाखेचे लक्ष नाही. ​काही वेळेला तर वडापची वाहने रस्त्याच्या मध्यभागीच लावलेली असतात.

अशी होईल गर्दी कमी सानेगुरूजी वसाहतकडून कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक संभाजीनगर पेट्रोल पंपासमोरील चौकातून होते. वास्तविक सानेगुरूजी वसाहत, आरकेपुतळा ते टिंबर मार्केटमधील राजाराम चौक मार्गे हिंद तरूण मंडळ रस्ता असा केला तर वाहतूक सुरळीत होऊ शकेल.पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस रस्ता आहे, तो रस्ता दुरूस्त करून त्या मार्गे शिवाजी पेठ, न्यू महाद्वार रोडकडे जाणारी वाहतूक वळविता येऊ शकते. टिंबर मार्केट कमानीसमोर ते निर्माण चौककडे जाणारा रस्त्याचा वापर होण्यासाठी नियोजन केले, तर मुख्य चौकात होणारी वाहतुकीची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवावी. त्यादृष्टीने महापालिका आणि वाहतूक शाखेने नियोजन करणे गरजेचे आहे.

भविष्यकाळाचा विचार करून या भागात उड्डाणपूल उभारणीचा निर्णय घेतला तर ते सोयीचा ठरणार आहे. उड्डाणपुलामुळे एकाच वेळी सध्याची आणि पुलावरून अशा दोन्ही ठिकाणावरून वाहतूक सुरू राहील. परिणामी वाहतुकीची कोंडी टाळता येईल. - विजय घाटगे, संभाजीनगर

अवजड वाहने अन्य मार्गावरून वळविल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल. याकरिता मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते जेलपर्यंतचा रस्ता तयार केला तर या मार्गावरून अवजड वाहने, बसेसची वाहतूक सुरू करायला हवी. तसेच टिंबर मार्केट कमान, रेसकोर्स नाका ते निर्माण चौकपर्यंत एकेरी वाहतूक सुरू केली तर वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होवू शकेल. - धनाजी घोरपडे (संभाजीनगर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.चे दोघेजण लाच घेताना जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ लिपिक विनायक पाटील व एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजनेचे वरिष्ठ सहाय्यक विकास दत्तात्रय लाड (रा. उचगांव, ता. करवीर) या दोघांना अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.

तक्रारदार एका शिक्षणसंस्थेत १५ वर्षे नोकरीत आहेत. सरकारी नियमानुसार १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे २९ जानेवारी २०१५ रोजी प्रस्ताव पाठवला होता. शिक्षण अधिकाऱ्यांकडून आदेश काढण्यासाठी कनिष्ठ लिपीक विनायक पाटील यांनी तीन हजाराची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने पाच जानेवारी २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सहा जानेवारीला तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विनायक पाटील यांनी तक्रारदाराला अडीच हजार रूपये पाकिटातून आणून दे असे सांगितले. पण सहा तारखेला पाटीलने पैसे घेतले नाहीत. परंतु पडताळणीत विनायक पाटील यांच्या टेबलचे काम पाहणारे एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेचे वरिष्ठ सहाय्यक विकास लाड यांचे ​नाव निष्पन्न झाले.

मंगळवारी तक्रारदार पाटील यांना भेटायला गेले असता ते नव्हते. पाटील यांच्या टेबलचे काम पाहणाऱ्या विकास लाड यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेतील कामाची ऑर्डर दिली व तक्रारदारांकडून विनायक पाटील यांच्या सांगण्यावरून अडीच हजाराची लाच स्वीकारली. यावेळी रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उप अधीक्षक उदय आळफे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीधर सावंत, मनोहर खनगांवकर, दयानंद कडूकर यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनचे काम रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीजवळ थेट पाइपलाइन योजनेचे काम मंगळवारी बंद पाडण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाइपलाइन योजनेच्या कामाला आक्षेप घेत काम रोखले. काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, पाइपलाइन योजनेमुळे बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई यांसह अन्य कारणावरून पाइपलाइन योजनेचे काम बंद पाडण्यात आले. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. जल अभियंता मनीष पवार यांनी आयुक्त पी.शिवशंकर यांना या घटनेची माहिती दिली.

ठिकपुर्लीजवळ सध्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या भागातील पाइपलाइन योजनेच्या कामावरून राधानगरी पंचायत समितीनेही काही आक्षेप नोंदविले होते. त्या आक्षेपानंतर पाणी पुरवठा विभागाने खुलासा करून सरकारी जागेतून पाइपलाइन टाकली जाणार आहे. शिवाय पाइपलाइनमुळे ज्या शेतकऱ्यांच्या कपाउंडचे नुकसान होईल ते दुरूस्त करण्याची ग्वाही दिली आहे. रस्त्याच्या कडेने पाइपलाइन टाकली जाणार असून रस्ता दुरूस्ती व अन्य कामासाठी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाच कोटी रुपये इतकी रक्कम अनामत म्हणून भरली आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळम्मावाडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कधी होणार ? पाइपलाइनला गळती लागून शेतजमीन व पिकांचे नुकसान झाल्यास त्याच्या भरपाईची जबाबदारी कुणावर असा प्रश्न उपस्थित करत कामाला विरोध केला आहे. कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी ठिकपुर्लीजवळ पाइपलाइन टाकण्यास विरोध करत काम बंद पाडले. यापूर्वीही काहीजणांनी हा मुद्दा उप​स्थित केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून त्या संदर्भात खुलासा करण्यात आला होता. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम प्रशासनाचे आहे. पुनर्वसनाचा प्रश्न महापालिकेच्या अखत्यारित येत नाही. शिवाय संपूर्ण पाइपलाइन ही सरकारी जागेतून टाकली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसमर्पण करण्याचा इशारा

$
0
0

म. टा. वॄत्तसेवा, शिराळा
चांदोली धरण व प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची मंगळवारी दुसऱ्या दिवशी एकही प्रशासकीय अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रकल्पगस्तांमध्ये नाराजी दिसून आली. गौरव नायकवडी यांनी चांदोली धरण व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री व महसूल व पुनर्वसन मंत्री यानी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलक महिला व पुरुष धरणामध्ये जलसमर्पण करतील, असा इशारा दिला आहे. ३५वर्षे अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या चांदोली धरण व प्रकल्पग्रस्तांना हिंसेचा मार्ग अवलंबण्यास भाग पाडू नये, असेही त्यांनी प्रशासनाला ठणकावले आहे.

प्रकल्पग्रस्तांना नाईक यांचा दिलासा
शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नार्इक यानी आंदोलन स्थळी भेट देऊन बुधवारी पुनवर्सन राज्यमंत्री व सचिवांची भेट घेऊन वसाहतनिहाय विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आंदोलकाना दिली. नार्इक म्हणाले, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यामुळे धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेल आहेत.
उर्वरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटीत राहिले पाहिजे. कायद्याची चाकोरी, व्यवहाराची सांगड, पैशाची तरतुद यांची मोट बांधून आपल्या हक्कचे प्रश्न सोडवू या. सरकारकडे जमिनी असूनही त्या प्रकल्पग्रस्तांना दिल्या जात नाहीत. विस्थापित ४४४ कुटुंबाना एक गुंठाही जमीन मिळालेली नाही. धरणग्रस्तांना सरकार पडीक व खडकाळ जमिनी दाखवून फवणूक करीत आहे. या संदर्भात विधानसभेत वेळोवेळी लक्षवेधी सूचनाही मांडलेल्या आहेत.
जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत एकजुटीने संघर्ष चालू ठेवू. हुतात्मा संकुलाचे मार्गर्शक वैभव नायकवडी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सदानंद’ संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रभुणे

$
0
0

सांगली : मकरसंक्रांती दिवशी श्री क्षेत्र औदुंबर येथे भरणाऱ्या सदानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे.
सदानंद साहित्य मंडळाच्या वतीने हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते. संमेलनाचे यंदाचे ७३वे वर्षे आहे. १५ जानेवारीला दुपारी चार वाजता मुख्य साहित्य संमेलनास सुरुवात होईल.
संमेलनात भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक डी. के. किणीकर यांचा सत्कार होणार आहे. त्याचदिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत कवी संमेलन होणार आहे. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जयसिंगपूर कॉलेजच्या इंग्रजी विभाग प्रमुख व कवियत्री डॉ. सुनंदा शेळके असतील. सांगली परिसरातील प्रसिद्ध आणि मोठी परंपरा असलेले साहित्य संमेलन म्हणून सदानंद साहित्य संमेलनाची ओळख मराठी साहित्य विश्वात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजू शेट्टी शेतकऱ्यांचे दुश्मन ; रघुनाथ पाटील यांची टीका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
'स्वतःला शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांचे वारसदार म्हणवून घेणारे उलट्या दिशेने निघाले आहेत. वायदेबाजारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा जावई शोध स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लावला आहे. खासदार झाल्यावर त्यांना पंख फुटले आहेत. वायदेबाजाराला विरोध करून ते व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. वायदेबाजाराला विरोध करणारे हे शेतकऱ्यांचे दुश्मनच आहेत,' अशी घाणाघाती टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.
शेतकरी संघटनेच्या वतीने १५ जानेवारीपासून तीन दिवस शिर्डी येथे शेतकरी महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनातील उपक्रमांची माहिती पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना दिली. या वेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि त्यांच्या भूमिकांवर सडकून टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केले. ते म्हणाले 'स्वतः कायदेतज्ज्ञ असलेले मुख्यमंत्रीच कायदे मोडत आहेत. एफआरपीचे तुकडे करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. एफआरपी ही एकरकमीच मिळाली पाहिजे. वायदेबाजार ही पद्धत शेतकऱ्यांच्या हिताची आहे. कोणत्या शेतीमालाची सद्यस्थिती काय आहे. दर वाढण्याचा कालावधी कोणता आहे. याची माहिती जाहीरपणे छापून येते. त्याचे अवलोकन करून शेतकरी आपला माल बाजारात आणू शकतो. पण, शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढत शेतीमालाच्या दरासाठी आंदोलन करणारे वायदेबाजाराला विरोध करीत आहेत. असा आचरटपणा करणारे नेमके कोणाचे शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत?'
म्हैसाळ योजनेच्या पाणीपट्टी वसुलीबाबत बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. कारखान्यांना पाणीपट्टीची कपात ऊसबीलातून करण्याची धमकी दिली जात आहे. कारखान्यांनी या भानगडीत पडू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मराठा टायगर्स’बाबत शांततेचे आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
येळ्ळूरमधील मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित 'मराठा टायगर्स' चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिस उपाआयुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल, असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये. सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा सुरू आहे. सीमाप्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतेही मत प्रदर्शन करू नये. चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून आनंदोत्सव करून दुसऱ्या बाजूच्या भावना दुखावू नयेत, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, मराठी भाषिक गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या न्याय मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत आहेत. मराठी भाषिक दर वर्षी कन्नड राज्योत्सव दिनी काळादिन पाळत आले आहेत. बेळगावात अधिवेशन घेतले जाते त्यावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून सीमामेळावा आयोजित केला जातो. अद्याप मराठा टायगर्स चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्या चित्रपटात काय आहे, याची माहिती देखील नाही, असे असताना जिल्हा प्रशासन आणि कन्नड नेते निष्कारण चित्रपटाचा मुद्दा वादाचा बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी महापौर आणि सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केली.
बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, मोतेश बार्देष्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकांकिका स्पर्धेत ‘नथिंग टू से’ची बाजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
बेळगावात कॉपिटल वन आयोजित आंतरराज्य खुल्या एकांकिका स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. 'नथिंग टू से' राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगली आणि 'प्रेम अ भंग' रंगयात्रा नाट्य संस्था, इचलकरंजी यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.
द्वितीय क्रमांक 'लव्ह' सिद्धांत थिएटर्स, कुडाळ आणि तृतीय क्रमांक 'गिमिक' रसिक रंगभूमी रत्नागिरी यांनी पटकाविले .
लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या एकांकिका स्पर्धेत एकूण ३२ संघांनी भाग घेतला होता. पारितोषिक वितरण समारंभाला अभिनेते प्रसाद पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघाना आणि उत्कृष्ठ वैयक्तिक कामगिरी बजावलेल्याना पुरस्कार वितरीत करण्यात आले. संयोजक शिवाजी हंडे, किरण ठाकूर, प्रा. विनोद गायकवाड, सचिन धोपेश्वरकर आणि परीक्षक अभय कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा मर्यादित शालेय मराठी एकांकिका स्पर्धेत 'डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू हेल्पलाईन' ज्ञान प्रबोधन मंदिरने प्रथम क्रमांक मिळवला. 'म्या भी शंकर हाय' बालिका आदर्श हायस्कूल आणि 'परी ग परी' मराठी विद्यानिकेतन यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले.
आंतरराज्य शालेय मराठी एकांकिका स्पर्धेत 'झाडवाली झुम्बी' शिंदे अकादमी, कोल्हापूरने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. 'झेप' बहुरूपी कलामंच, कोल्हापूर आणि 'झेप' बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविले.
बेळगावात लोप पावत चाललेल्या नाट्य चळवळीला उभारी देण्यासाठी कॉपिटल वन संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांपासून एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धामुळे नाट्य चळवळ अधिक सशक्त होण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया संयोजक शिवाजी हंडे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अपयशांमुळेच कलाक्षेत्रात रमलो’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
महाविद्यालयीन जीवनात इतरांप्रमाणे भविष्याविषयी निश्चिती नव्हती. सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर भौतिकशास्त्राच्या परिक्षेला अर्ध्यातून बाहेर आलो. हे अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी ठरली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले. मिरजेत संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सौहार्द स्नेहसंमेलनात केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या उपस्थितीत सुबोध भावे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भावे म्हणाले, त्यावेळी परिक्षेत पास झालो असतो तर चित्रपट क्षेत्राकडे वळलो नसतो. अनेक नोकऱ्या केल्या, पण त्यात रमलो नाही. पहिल्यांदा नाटकात काम केले, तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. नाटक म्हणजे आरसा आहे. नाटकाने मला माणूस समजून घ्यायला शिकविले.. या वेळी डॉ. चंद्रकांत पाटील, व्यवस्थापकीय संचालक सुमंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक सागर कुलकर्णी, संपतराव जाधव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चटणी घेऊन कार्यालयात घुसू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थीना नियमबाह्य अपात्र ठरवून त्यांचे बंद झालेले अनुदान एक महिन्याच्या आता सुरु करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कायदा सुव्यवस्था बिघडेल. होणाऱ्या परिणामाला तहसीलदार आणि समिती जबाबदार राहील. आम्ही बेमुदत उपोषण करुच शिवाय चटणी घेऊन थेट तहसील कार्यालयात घुसू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी तहसीलदार शांताराम सांगडे यांना दिला. यावेळी तहसीलदार सांगडे यांनी वरिष्ठाना आपला अहवाल पाठवतो, आणि जो निर्णय येईल त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हाधिकारी, तहसीलदार हे वातानुकुलीत खोलीत बसून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि संजय घाटगेंच्या सांगण्यावरुन पेन्शन बंद करीत आहेत असा आरोप करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दीडच्या सुमारास तहसीलदार कार्यालयाच्या गेटसमोर शंखध्वनी केला. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले,गारिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम पालकमंत्री पाटील, संजय घाटगे आणि समिती करीत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रताप माने, आशा माने, कोल्हापूर शहरअध्यक्ष राजेश लाटकर, नाविद मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्यात नद्यांनी गाठला तळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

यंदा पावसाने दगा दिल्याने पन्हाळा तालुक्यात दुष्काळसद्रुश स्थिती आहे. वारणा, कोदे, कुंभी, कासारी या मुख्य धरणातील व पडसाळी आणि पोंबरे येथील लघुपाटबंधारेमध्ये यंदा कमी पावसामुळे पाण्याचा साठा पूर्ण क्षमतेने झाला नाही.

हिवाळ्यापासून या जांभळी,धामणी,कासारी आणि वारणा या तालुक्यातील नद्यांमध्ये पाणी सोडण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे.त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जांभळी, धामणी, कासारी आणि वारणा,मोरणा तीरावरील गावांना पाण्याची कमरता भासू लागली आहे. काही पिके वाया गेली आहेत. उर्वरित बागायत क्षेत्रातील पिके धोक्यात आहेत. केवळ खड्ड्यातील पाणी शेतकऱ्यांना पिकांचा जीव जगण्यासाठी उपयोगी पडत आहे. पाण्यासाठी वाड्या-वस्तीतील कुंटुंबियांना भटकंती करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी डोंगरदरऱ्यातील स्त्रोत शोधावे लागत आहे. तुटवड्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

डिसेंबर-जानेवारी या हिवाळी महिन्यापासून तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात जाणवणाऱ्या बिकट परिस्थितीची चाहूल आतापासूनच लागली आहे. सरासरी १२० दिवस पडणारा पाऊस यंदा ६० दिवसांत आसपास पडला. त्यामुळे ५० टक्के जलसाठ्यात घट झाली. यामुळे तालुक्यातील मुख्य धरणांमधील व घुपाटबंधाऱ्यातील जलसाठाही कमी झाला आहे. तालुक्यातील १३ पाझर तलावांपैकी बहुतांशी तलावात कमी पाणी तर काही कोरडेच आहे. जिरवणीचा पाऊस झालेला नाही त्यामुळे भूजलपातळीही खालावली आहे. काही ठिकाणी सद्या नदीपात्र कोरडी पडली आहेत. त्यामुळे आतापासूनच पन्हाळा शहर व तालुक्यातील खेडी व वाडी-वस्तीतील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.आताच अशी स्थिती असेल तर एप्रिल-मे च्या सुमारास भीषण पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कासारी नदीने तळ गाठला आहे.ने गिळवडे धरण २० ते ३० टीएमसीच्या जवळपास भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीतील शिकारीच्या सखोल चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी अभयारण्य परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भेकर शिकारप्रकरणी शिवसेनेने सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिकारीची चौकशी करून यातील दोषी वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि वन विभागातील गैरकारभारांना आळा घालावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिले.

राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्य परिसरात वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आश्रयानेच राजरोसपणे शिकारी सुरू असल्याचे वास्तव दोन महिन्यांपर्वी घडलेल्या घटनेमुळे पुढे आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन वन कर्मऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील झाली, मात्र यातून काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मंगळवारी मुख्य वन संरक्षक क्लेमेंट बेन यांना शिकारीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. योग्य चौकशी करून दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय अभयारण्याचे तपासणी नाके सक्षम करून परिसरातील गस्त वाढवावी आणि गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

विजय देवणे यांनी क्लेमेंट बेन यांच्याकडे निवेदन देऊन समृद्ध जंगल आणि अभयारण्य परिसरात शिकारींचे प्रकार गंभीर प्रकार घडू नयेत यासाठी जंगलाकडे जाणारे लहान रस्ते बंद करावेत आणि अतिसंवेदनशील परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालावी असे आवाहन केले. यावेळी क्लेमेंट बेन यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी प्रवीण सावंत, भिकाजी हळदकर, अशोक पटील, के. के. राजिगरे, धनाजी यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग कारखान्यांना आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

तारदाळ (ता. हातकणंगले) येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यांना लागलेल्या आगीत आगीमध्ये सुमारे पावणेतीन कोटीचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. ही आग शॉर्टसर्कीटने लागली असल्याचे सांगितले जाते.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तारदाळ येथे प्रवीण खामकार यांच्या मालकीची प्रणिती पॉवरलूम को-ऑप. सोसायटी नामक संस्था आहे. याठिकाणी अत्याधुनिक १३ एअरजेट लूम आहेत. या यंत्रमाग कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मागावरील कापड, सुतामुळे आग क्षणार्धात भडकली. आग लागल्याचे पाहून काम करणारे कर्मचारी ओरडत कारखान्याबाहेर आले तर काहींनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिका अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची व्याप्ती मोठी असल्याने पंचगंगा कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करावे लागले. तिन्ही बंबावरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. सुमारे तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. एकापाठोपाठ एक सर्वच अत्याधुनिक यंत्रमागावरील सूत, विणलेल्या कापडाला आग लागली. कारखान्यातील आठ लूमसह इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक साहित्य, मशिनरी, कापडाचे तागे आदी वस्तू जळून खाक झाल्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण खामकर यांनी सांगितले. याबाबतची फिर्याद सोसायटीचे चेअरमन सुनील बाबासो पाटील (वय ३२ रा. सोलगे मळा) यांनी शहापूर पोलिसात दिली आहे.

दरम्यान, तारदाळ येथीलच श्रीरामनगरमधील लखन दायमा यांच्या यंत्रमाग कारखान्यालाही मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. यामध्ये इलेक्ट्रीक साहित्य, मशिनरी, कापड असा सुमारे २५ लाखाचे नुकसान झाले. दोन्ही ठिकाणी शहापूर पोलिसांनी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या दिवशीही पडला हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम आज दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार हनुमंतराव पाटील व पालिका प्रशासनाने शहरातील उर्वरित अतिक्रमित ठिकाणे हटविली. संपूर्ण तालुक्यात अतिक्रमण हटाव मोहिमेची चर्चा सुरु असून या ठिकाणी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र नगरपालिकेच्या कॉप्लेक्समधील अतिक्रमण सुद्धा हटविण्यात यावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी काही महिलांनी अतिक्रमण काढू नये अशी विनंती केली. मात्र, प्रशासनाने नकार देताच त्यांना अश्रू आवरता आले नाही.

पालिकेच्यावतीने मुख्य रस्त्यासह विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये काल मार्केटयार्ड पासून अतिक्रमित ठिकाणे हटविण्यास सुरवात झाली. बसस्थानकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात पालिका प्रशासनाला यश आले. आज दुसऱ्या दिवशी लक्ष्मी रोडवरून अतिक्रमण हटविण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी अनेक दुकानदारांनी पुढाकार घेऊन अतिक्रमण हटविले. बाजारपेठ, नेहरू चौक, शिवाजी चौक ते ताशिलदार गल्लीपर्यंत सर्व अतिक्रमण काढण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी अतिक्रमण काढू नये म्हणून शर्मा यांना विनंती केली. काही महिलांना रडू आवरले नाही.

दरम्यान बसस्थानकासमोरील गाळेधारकांनी शर्मा यांची भेट घेऊन अतिक्रमण न हटविण्याची विनंती केली. बसस्थानकासमोरील गाळ्यांसंदर्भात याआधी ठरलेल्या ठरावानुसार समान जागेत विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नगरपालीकेपासून बसस्थानकावर जाण्यासाठी नियोजित रस्त्यावरील 'त्या' सात गाळ्यांना या जागेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांनाच अशा प्रकारे अभय का दिले जात आहे असा सवाल करीत अन्य दुकानदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मुसळे तिकटी परिसरात असलेल्या मशिदीसमोरील अतिक्रमणसुद्धा यावेळी हटविण्यात आले. कडगाव रोडवरील एमआर हायस्कूल शेजारील अतिक्रमण हटविताना या गाळेधारकांनी आपण जिल्हा परिषद जागेत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील मुख्यमार्गावरील साने गुरुजी वाचनालयाशेजारील 'बहुचर्चित' गाळ्यांवर काल कारवाई होणार होती. त्यासाठी पालिका अतिक्रमण विरोधी विभाग त्या ठिकाणी गेले पण ते अतिक्रमण काढले गेले नाही. यानंतर शहरात त्या अतिक्रमणाबद्दल उलटसुलट चर्चा सुरु होती.

वादग्रस्त गाळ्यांचा निर्णय शनिवारी

सत्ताधारी गटाने नगरपालिकेच्या गाळ्यांमधील अतिक्रमित व्यवसायसुद्धा तातडीने बंद करावेत तसेच बसस्थानकासमोरील वादग्रस्त गाळ्यांचा निर्णय घेण्याचे निश्चित झाले. यासाठी शनिवारी (ता.१६) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याचे सूतोवाच करण्यात आले.

अतिक्रमणविरोधी विभागाची कारवाई

अतिक्रमण विभागामार्फत दुकानावरील दोन शेड , दोन डिजिटल बोर्ड, १७ जाहिरात पोल, गटारीवरील १७ बांधकामे, आठ खोकी काढण्यात आली. तर १०७ दुकानदारांनी स्वतःहून शेड काढले. तसेच चार डिजिटल बोर्डस व १७ खोकी स्वतःहून काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण विरोधी विभागप्रमुख प्रफुल्लकुमार वनखंडे, पाणी पुरवठा विभागप्रमुख जमीर मुश्रीफ, आरोग्य विभागप्रमुख रमेश मुन्ने आदींसह शंभरावर पालिका कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण मोहिमेतील यशाचे सर्व श्रेय प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी शर्मा यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिले. मोहिमेवर जाण्यापूर्वी तसेच आटोपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम शर्मा यांनी केले. याबाबत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिकोत्रातील पाणी मेघोली धरणात सोडा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पाटबंधारे खात्याने सर्व्हे करून म्हातारीच्या पठारावरील पाण्याचा प्रवाह चिकोत्रा प्रकल्पामध्ये वळविल्यास मेघोली धरण भरण्यास कोणताही परिणाम होणार नाही, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे चिकोत्रा धरणाचा जलस्रोत बळकट करण्याचा कामास काहीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी या तातडीने या कामाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी भुदरगडचे शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी केली आहे.

यावेळी अशोक पाटील म्हणाले, चिकोत्रा प्रकल्पात दरवर्षी कमी साठा होतो. त्यामुळे म्हातारीच्या पठावरील पाण्याचा प्रवाह या प्रकल्पात दरवर्षी कमी साठा होतो. त्यामुळे म्हातारीच्या पठावरील पाण्याचा प्रवाह या प्रकल्पात वळविल्यास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल. या विस्तीर्ण म्हातारीच्या पठावरील पाणी सध्या पश्चिमेकडे वाहून जाते. तेच पाणी मोठा बांध घालून उत्तर-पूर्व दिशेने चिकोत्रा प्रकल्पामध्ये पाडणे शक्य आहे.

म्हातारीच्या पठावरील पाणी अडविल्यास मेघोली धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही, असे मेघोली ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे मेघोली ग्रामस्थांनी चिकोत्राकडे पाणी वळविण्यास विरोध केला.

मेघोली धरण या पाण्यावर अवलंबून नाही असे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. पाटबंधारे खात्याच्या सर्वेनुसार मेघोली धरण पूर्ण भरण्यास १०० एम.सी.एफ.टी. पाणी लागते म्हातारीच्या पठावरील २५० एम.सी.एफ.टी. पाणी अन्यत्र वाहून जाते. त्यातील १०० एम.सी.एफ.टी. पाणी चिकोत्राकडे वळविण्यास काही वावगे होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखड्याला मुहूर्त कधी?

$
0
0

दीपक जाधव, पन्हाळा

जोतिबा विकास आराखडा तयार करताना सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. अद्यावत सुविधा,आकर्षित करणारे तीर्थक्षेत्र असे स्वरूप व्हावे. त्याचप्रमाणे विकास आराखडा तयार करताना ग्रामस्थ,पुजारी,व्यापारी यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.जोतिबा मुख्य मंदिरात वातानुकूलित यंत्रणा नसल्याने अनेक भाविकांना त्रास होतो याचाही विचार होणे गरजेचे आहे. यात्रा काळात होणारे नियोजन आणि त्यावर झडणाऱ्या चर्चा केवळ त्याकाळापुरत्या मर्यादित न राहता आता यातून कायमस्वरूपी विकास होणे गरजेचे आहे. जोतिबावर वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यकम होत असतात. त्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता असे होणे गरजेचे आहे.

जोतिबावर वाढणारी भाविकांची संख्या, पौर्णिमा, रविवार, श्रावणषष्ठी, चैत्र यात्रेत भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे नळपाणीयोजनेवर ताण पडतो. ग्रामपंचायत उत्पन्न पाहता देखभालही परवडत नाही. कासारी नदीवरून या नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा होतो. तेथे ५० अश्वशक्तीच्या दोन टर्बाइन मोटर आहेत. जोतिबावरील नवीन वसाहतीत असणाऱ्या पाच लाख लिटरच्या टाकीत हे पाणी शुद्धीकरण होऊन पडते. तेथून सायफन पद्धतीने पाणीपुरवठा होतो.

गायमुख तलावावर १६ तास मोटरी सुरु राहिली तरच ही पाच लाख लिटरची टाकी भरते. जमिनीतील जुन्या पाईपलाइन खराब झाल्या आहेत. सांडपाण्याचा प्रश्न डोंगरावर दिवसेंदिवस गंभीर होत आहे. डोंगरावरील ८० ते ९० टक्के सांडपाणी धनगरवाडाजवळील शेतातून जातो. तेथून पाणी शेतात जाऊन मुरते. ओढ्या नाल्यातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे रस्ता खराब झाला आहे. पाणीयोजनेची विकास आराखड्यात चांगली सुरु झाली तर अनेक समस्या संपतील.

संकुल आणि उद्यानाची दुरूस्ती गरजेची

जोतिबा परिसराचे सौंदर्य खुलविणारे उद्यान आणि व्यापा ऱ्यांची सोय करण्यासाठी बांधललेले व्यापारी संकुल आता पुरते उजाड झाले आहे. या संकुलाची दुसरूस्ती होऊन उद्यानाचे पुनरज्जीवन करणे गरजेचे आहे.

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा केल्यामुळे जोतिबा परिसरात स्वच्छ व सुंदर होईल. प्रारंभी गावातील गल्ली-बोळातील रुंदीकरण झाले पाहिजे. गावातील रस्त्याचे काम हाती घेतल्याशिवाय कोणतेही योजना डोंगरावर राबवून उपयोग नाही. सरकारने विकास आराखडा करताना ग्रामस्थ, पुजारी यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे योग्य होय.

- रिया सांगळे, सरपंच, जोतिबा डोंगर

जोतिबा विकास आराखडा संदर्भात १५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा शासन दरबारी नव्याने पाठवला आहे. तो लवकरच मंजुरी होवून येईल यामध्ये अनेक भाविकांना,व्यापारी तसेच स्थानिक रहिवाशी यांना मूलभूत विकासात्मक कामे विश्वासात घेऊन होतील लवकरच जोतिबा मंदिर जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक होईल.

- सुदेश देशपांडे, मंदिर विकास आराखडा इंजिनिअर

व्यापाऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही ठोस काम नाही. सुंदर जोतिबा विकासाच्या माध्यमातून अनावश्यक ठिकाणी दुकानगाळे उभा करून शासनाने निधी वाया घालवला. या गाळ्यांची दैना झाली आहे. आम्हास विश्वासात घेवून हे काम केले नाही.

- आनंदा लादे, अध्यक्ष, ज्योत‌िर्लिंग व्यापारी असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा प्रदूषणमुक्तीच्या खर्चाबाबत चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठी खर्ची पडलेल्या रक्कमेच्या विनियोगाच्या चौकशीसाठी गुजरातमधील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील (बडोदा) पर्यावरण विभागाची समिती या आठवड्यात कोल्हापूरला येणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने डिसेंबर २०१५ मध्ये प्रदूषणमुक्तीच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराजा सयाजीराव विद्यापीठ प्रदूषणमुक्तीच्या खर्चाची आणि झालेल्या कामाची चौकशी करणार आहे. महापालिकेने चौकशी समितीकडील सदस्यांकडे प्रदूषणमुक्तीचे आराखडे, अहवाल, नकाशे सादर केले आहेत.

राष्ट्रीय तलाव संवर्धन योजना टप्पा एक अंतर्गत रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी आठ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तर संवर्धन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा १२७ कोटीचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यातील आठ कोटी रुपयांच्या खर्चाची व दुसऱ्या टप्प्यातील १२७ कोटीच्या प्रस्तावित प्रकल्पाची चौकशी होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी अन्यत्र वळविणे, रंकाळा तलावातील जलपर्णी काढणे, निसर्ग व पक्षी निरीक्षण केंद्राची उभारणी, गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती या कामांचा समावेश आहे. प्रदूषमुक्तीच्या कामासाठी उपलब्ध निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार सुनील केंबळे यांनी केली होती. याचिकाकर्ते केंबळे यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित लवादने चौकशीचे आदेश दिले होते.

बडोदा विद्यापीठातील प्रो.पटेल यांच्या नेतृत्वाखाली समिती कोल्हापूरला येणार आहे. महापालिकेने यापूर्वीच रंकाळा तलाव प्रदूषण मुक्ती व संवर्धनाचा दोन्ही आराखडे (डीपीआर) समितीकडे पाठविले आहेत. आठ कोटी ६५ लाख रुपयांतून झालेली विकास कामे, प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती सादर केली आहे. यामध्ये नकाश, कामाचा अहवालाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कार्यक्षेत्रातील अपंगाच्या पुनर्वसनासाठी महापालिकेतर्फे वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने या संदर्भात अपंगाकडून अर्ज मागविले आहेत. इस्टेट विभागाकडून अपंगाच्या रोजगार निर्मितीसाठी केबिन्स उभारणी तर महिला व बालकल्याण विभागाकडून अपंगांना मोफत चलन वलन साधनांचे वाटप, महापालिका कार्यालयात सार्वजनिक सोयी पुरविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे शहरातील अंपग खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आ​​णि कास्य पदकप्राप्त खेळाडूंना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपयांची बक्षीसे देण्याची योजना आहे. शिवाय इस्टेट विभागाने शहरातील अपंगाना विविध योजनेसाठी जागा दिली जाणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील अपंगांनी पूर्ण नाव, पत्ता, वय, शिक्षण, जन्मतारीख, अपंगत्वाचा प्रकार, त्या संबधीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व १५ वर्षापासून महापालिका कार्यक्षेत्रात राहात असल्याचा पुरावा या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून अर्ज करावयाचा आहे. संबंधितांनी साध्या कागदावर आयुक्तांच्या नावांनी अर्ज लिहून तो आरोग्य प्रशासन कार्यालय, मुख्य इमारत महापालिका येथे २० जानेवारीपर्यंत सादर करावयाचा आहे. अर्ज सादर करताना त्या पाकिटावर संबंधित विभागाचा उल्लेख करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images