Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची मागणी

0
0

कोल्हापूर : काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून हल्ले झाल्यानंतर विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचे गेल्या २६ वर्षांपासून पुनर्वसन झालेले नाही. अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करावा आणि त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच धर्मविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन संस्थेच्या वतीने शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली.

काश्मिरी हिंदूंवर १९९० मध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून हल्ले झाल्यानंतर लाखो हिंदूंना काश्मीर सोडून बाहेर पडावे लागले. साडेचार लाखांहून अधिक हिंदू आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. पनून काश्मिर हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करून काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली जात आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय हिंदू संस्थेने निदर्शने केली. याशिवाय शनिशिंगणापूरसारख्या घटनांमधून जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा मोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रीय हिंदू आंदोलनने केला आहे. हिंदूधर्मीयांच्या परंपरांना छेद देत त्यांच्या भावना दुखावणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सातवीच्या अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीविषयी अवमानजनक माहिती लिहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चुकीचा इतिहास मांडला आहे. हे लेखन धर्मद्वेश करणारे असल्याने विद्यार्थ्यांवर चुकीचा इतिहास बिंबवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचीही मागणीही यावेळी करण्यात आली.

निदर्शनात मधुकर नाझरे, संभाजी भोकरे, शिवाजी ससे, संजय कुलकर्णी, राजू यादव, सुरेखा काकडे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीबीचे निदान दोन तासांत होणार

0
0

janhavi.sarate @timesgroup.com

कोल्हापूर : क्षयरोगाच्या निदानानंतर एमडीआर क्षयरोगातील तपासणीसाठी अत्यावश्यक असलेली चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले सीबीनॅट मशीन सीपीआरला राज्य सरकारने मंजूर केले आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे मशिन सीपीआरमध्ये दाखल होईल. त्यामुळे एमडीआरच्या निदानासाठी लागणारा सात दिवसांचा कालावधई दोन तासांवर येईल.

क्षयरोगावरच्या (टी.बी) उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या औषधांच्या मात्रा चुकवल्यास त्या रुग्णाच्या शरीरात औषधाला प्रतिसाद न देणारे जंतू निर्माण होतात. परिणामी याचे रुपांतर एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोगात होते. अशा रुग्णांच्या थुंकी, रक्ताचे नमुने घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीकरता कुरिअरने पाठवावे लागतात. नमुने पाठविल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत किमान सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे एमडीआरच्या रुग्णांचे तत्काळ निदान होत नसल्याने उपचार सुरू होण्यास वेळ लागतो. त्यामुळे जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी सीबीनॅट मशीनसाठी प्रस्ताव पाठविला होता. हे तीस लाखांचे सीबीनॅट मशीन आता दाखल होईल.

मशीनमुळे तपासणीनंतर दोन तासांत रिपोर्ट मिळू शकेल. एमडीआर किंवा एचआयव्ही तपासणी मोफत केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षात क्षय आरोग्य केंद्रामध्ये एमडीआरचे १६० पेशंट असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २० रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत टीबीचे १३ हजार ८७७ रुग्ण आढळले आहेत. दरवर्षी दीड ते दोन हजार नवीन रुग्ण आढळतात. कोल्हापूर टीबीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.

एमडीआरचे निदान होण्यासाठी लागणारा कालावधी, उपचारातील दिरंगाई सीबीनॅट मशीनमुळे टळेल. तपासणीनंतर दोन तासांत रिपोर्ट मिळाल्यानंतर त्वरीत उपचार करणे शक्य होईल. शिवाय, एचआयव्ही तपासणीही मोफत होईल. - डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा क्षय आरोग्य अधिकारी, सीपीआर

रुग्णांना साखर कारखान्यांची मदत केंद्र सरकारने टीबी आणि एचआयव्ही-एड्समुक्त भारताची घोषणा केली आहे. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एमडीआर क्षय रुग्णांच्या औषधोपचारावेळी सकस आहार लागतो. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना तसा आहार मिळत नसल्याने उपचारालाही प्रतिसाद नसतो. त्यामुळे जिल्ह्यातील दीडशे पेशंटना साखर कारखान्यांनी धान्यरुपात मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही कारखान्यांनी यात पुढाकार घेतला आहे.

दहा वर्षाचा मुलगा एमडीआरमुक्त पट्टणकोडोलीतील अलोक पाटील (नाव बदललेले आहे) या दहा वर्षांचा मुलाच्या आई आणि आजीने उपचारात दाखवलेल्या सर्तकतेमुळे तो एमडीआर मुक्त झाला आहे. जर उपचारात सातत्य ठेवल्यास त्याचा परिणाम लगेच दिसतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली सात वर्षे रखडलेला रंकाळा टॉवर ते क्रशर चौकपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला फेबु्वारी महिन्यात सुरूवात होण्याची शक्यता आहे. १८०० मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी दोन कोटी ८२ लाख रुपयांचे एस्टीमेट तयार करण्यात आले आहे. सोमवारी या रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी यापूर्वी तीनदा निविदा काढण्यात आल्या होत्या.

निर्माण कन्स्ट्रक्शनच्या २० टक्के कमी दराच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कंत्राटदाराला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. पहिल्यांदा हा रस्ता आयआरबी मार्फत करण्यात येणार होता. मात्र आयआरबीच्या विरोधात आंदोलनाची व्याप्ती वाढत गेल्याने त्यांनी रस्त्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवली. मात्र या भागातील ड्रेनेज लाइनची कामे, चेंबरची दुरूस्ती यामुळे रस्त्याचे काम रखडले. अर्धवट कामे, धुळीचा त्रास यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीसाठी शिवाजी पेठेतील नागरिकांनी आंदोलने केली होती. पहिल्यांदा हा रस्ता सिमेंटचा करण्यात येणार होता. आठ कोटी रुपयांचे एस्टीमेट तयार करण्यात आले होते. निविदा ही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्याला कंत्राटदाराकडून प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाने हा रस्ता डांबरीचा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. रंकाळा टॉवर ते क्रशर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची निविदा सोमवारी मंजूर करण्यात आली. वीस टक्के कमी दराची निविदा काढण्यात आली असून स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वर्कऑर्डर दिली जाईल अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक संघ झाला कार्पोरेट

0
0

Sachin.Yadav @timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आता कार्पोरेट होत आहे. शिवाजी पार्कातील जुनी इमारतीच्या जागेवर सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून नवी इमारत उभी केली जात आहे. राज्यातील १८ मुख्याध्यापक संघापैकी एक असलेला आणि ७२ वर्षे पूर्ण करीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा लूक बदलणार आहे. राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक सहली आणि खेळाडूंसाठी नाममात्र शुल्कात निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची इमारत हायटेक झाली. त्यानंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाची इमारतही कार्पोरेट होत आहे. मुख्याध्यापक संघाच्या जिल्ह्यातील ७०२ शाळा सभासद आहेत. साडेआठ हजार चौरस फूट जागेत चार मजली इमारत उभारत आहे. पहिल्या टप्प्यात २६ जानेवारीला मुख्याध्यापक संघाचे कार्यालय आणि सभागृहाचे उदघाटन होत आहे. एप्रिलअखेर सर्व इमारत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यात १८ मुख्याध्यापक संघ आहेत. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने सभासदांकडून वार्षिक वर्गणी ५०० रुपये घेतली जाते. त्यासह प्रश्नपत्रिकेतून मिळालेली सुमारे ५० वर्षांच्या रक्कमेतून आणि अन्य निधीतून इमारतीचा निधी उपलब्ध केला आहे. नव्या उभारण्यात येत असलेल्या सभागृहात सुमारे ५०० विद्यार्थी बसू शकतात. संघाच्या पहिल्या मजल्यावर संघाचे कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर इमारत आणि तिसऱ्या मजल्यावर निवासी खोल्या बांधण्यात येत आहेत.

राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या सहलीसाठी संबधित सभागृह नाममात्र शुल्कात उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था संघ करणार आहे. जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना काही कामानिमित्त कोल्हापुरात थांबावे लागते. त्यांच्या निवासाची व्यवस्था तिसऱ्या मजल्यावर करण्यात येईल. या मजल्यावर सहा खोल्या आहेत. चार दुकानगाळ्यासह तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

दृष्टिक्षेपात मुख्याध्यापक संघ जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे आजअखेर १८ अध्यक्ष झाले आहेत. संघाची १९४४ मध्ये स्थापना झाली. १९४४ ते ६३ या कालावधीत एस. व्ही. लिंग्रज यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. १९६० ते ६१ या कालावधीत एस. जी. कुलकर्णी यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या मुख्याध्यापक संघाचे के. बी. पोवार अध्यक्ष आहेत. काही अध्यक्षांना दोन वर्षांचा तर काहींनी तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आणि संघाचे मार्गदर्शक डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सुरू आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्वंच घटकांना फायदा होणार आहे. शैक्षणिक सहली, शिक्षण संस्था, संघटना यांच्या कार्यक्रमासाठी सभागृहाची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, परीक्षा, वक्तृत्व स्पर्धेसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. - के. बी. पोवार, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमाननगरात नातेसंबंधाची वीण घट्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी या परिसरात तुरळक वस्ती होती. या भागात मैला आणून टाकला जात असल्याने माशांचा मोठा प्रादुर्भाव होता. रस्त्याची सोय नव्हती. विद्युत दिव्यांचा तर पत्ताच नव्हता. यामुळे मैलखड्डा पलीकडे तुरळक लोकवस्ती होती. सध्याच्या हनुमाननगर परिसरात त्या काळी जवळपास पन्नास कुटुंबे वास्तव्यास होती. कालांतराने या भागात शेतजमीनीचे रहिवासी विभागात समावेश होत गेला. आपसूकच लोकवस्ती वाढत गेली. पहिल्यांदा स्टेट बँक कॉलनी, त्यानंतर सर्व्हेअर कॉलनी स्थापन झाल्या. प्रशस्त प्लॉट, टुमदार बंगले आणि विविध प्रकारच्या वृक्षामुळे हा परिसराला पहिल्यापासूनच हिरवाईचा लूक लाभला.

आता नोकरदार, बँक व्यावसायिक आणि मध्यमवर्गीयांची लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमाननगरचा विस्तार वाढला आहे. टुमदार बंगला आणि पॉश एरियात आज अपार्टमेंटस उभी राहिलीत. कमर्शियल कॉम्प्लेक्स साकारत आहेत. रिंगरोडमुळे परिसरातील वाहतुकीला गती लाभली आहे. परिसराचे स्वरूप बदलत असताना येथील रहिवासांनी पर्यावरण संवर्धनाची जोडलेली नाळ आणखी घट्ट केली आहे. बंगलो आणि फ्लॅट संस्कृती वाढत असली तरी येथील नागरिकांनी एकमेकासोबत आपुलकीचे आणि स्नेहबंधाची वीण मजबूत केली आहे.

आयटीआयपासून पुढे पाचगावकडे जाणाऱ्या रोडला लागून हनुमानगर वसलेले आहे. हनुमाननगर म्हटले की प्रशस्त बंगले, प्रत्येक घरासमोर नाना विध प्रकारची झाडी, शोभिवंत वनस्पती डोळ्याला सुखावत असते. लहान लहान कॉलन्या, डांबरी रस्त्यांनी चकाचक हा परिसर आहे. हनुमानाचे मोठे मंदिर आहे. हनुमान मंदिरावरून या परिसराला हनुमाननगर म्हणून ओळखला जातो. हनुमानगरनगरमध्ये स्टेट बँक कॉलनी, सर्व्हेअर कॉलनी, शिंदे अंगण, पारिजात कॉलनी, सन्मित्र कॉलनी, युनियन बँक कॉलनी, समृद्धी कॉलनी, हिंदू कॉलनी, सासने कॉलनी, सन्मित्र कॉलनी, निलायम कॉलनीचा समावेश आहे. त्यानगरोत्थान योजनेंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते कळंबा मध्यवर्ती कारागृहपर्यंतचा रस्ता तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात हॉकी स्टेडियम ते हनुमानगरपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. रिंगरोडमुळे या परिसरातील बांधकाम व्यवसायाला गती लाभली आहे. हनुमाननगर परिसरात नवनवीन अपार्टमेंटची भर पडत आहे. आयटीआयच्या पिछाडीस रोडवर आज दुकानगाळे आकाराला येत आहेत. इंटरनेट कॅफे, दवाखाने, सराफी दुकाने, मेडीकल, ऑईल ट्रेडर्स, बेकरीची दुकाने थाटले जात आहेत. रिंगरोडला लागून मोठी अपार्टमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्स साकारत आहेत. शांत परिसर, वाहतुकीची सोय, पायाभूत सुविधांची पूर्तता यामुळे या भागात घरकुल थाटण्याला पसंती दिली जात आहे. कॉलनी अंतर्गत रस्त्यांची सुविधा, ​पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि शहरालगतचा परिसर यामुळे हनुमानगरला प्राधान्यक्रम आहे.

रास्ता रोको, नगराचे नामकरण आणि बससेवा

हनुमानगर आज विस्तारले असले तरी या परिसरात पूर्वीपासून रेडेकर, साळोखे, जाधव अशी मोजकी कुटुंबे वास्तव्यास होती. १९६८ च्या आसपास या भागात येथील जमीनीचा दर प्रति चौरस फूट एक रुपया असा होता. पाच गुंठे, तीन गुंठे क्षेत्राचे प्लॉट त्याकाळी पाडण्यात आले होते. सर्व्हेअर कॉलनी, स्टेट बँक कॉलनीमधील मिळकतधारकांचे प्लॉट हे तीन आणि पाच गुंठ्याचे आहेत. १९८२ च्या आसपास या भागातील नागरिकांनी एकत्र येत हनुमानगर तरूण मंडळची स्थापना केली. शिवाजीराव हिलगे, प्रकाश हळबे, काशीनाथ शेटे, मधुकर तुरंबेकर, मोहन आळतेकर, सयाजी शिंदे, प्रकाश जाधव, रत्नकांत कोळेकर यांचा यामध्ये समावेश होता. भागात पायाभूत सुविधांची वानवा होती. रस्ते नव्हते, विद्युत दिव्याची सुविधा नव्हती. पायाभूत सुविधाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भागातील नागरिक व महिलांनी एकत्र येऊन तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव पाटील कौलवकर यांची मोटार अडवली होती. कौलवकर यांनी प्रशासनाला सूचना करून पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालिन महापौर विलास सासने यांच्या कारकीर्दीत या भागाचे हनुमानगर असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर या भागातील रहिवासांच्या सोयीसाठी हनुमानगर ते भवानी मंडप अशी केएमटीची बस सेवा सुरू झाली. भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. रस्ते कच्चे होते. पायाभूत सुविधा नव्हत्या. तत्कालिन नगरसेवक बाबासाहेब सासने यांनी पुढाकार घेऊन या भागात सुविधा निर्माण केल्या. पिण्याची पाइपलाइन टाकली. त्यानंतरच्या कालावधीत नगरसेवक अशोक रेडेकर, गेल्या पाच वर्षात सतीश लोळगे यांनी या भागात सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी चांगलेच प्रयत्न केले.

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची वेगळी ओळख परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत श्री हनुमाननगर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची स्थापना केली आहे. संघाचे २५० सभासद आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरात विविध उपक्रम राबवले जातात. संघातर्फे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय रोज सकाळी सहा ते सात या वेळेत योगासनाचा कार्यक्रम घेतला जातो. भागातील नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक संघाला खुर्च्या, पडदे, साऊंड सिस्टीम, पुस्तके ठेवण्यासाठी कपाट अशा भेटवस्तू दिल्या आहेत. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या खासदार फंडातून संघासाठी हॉल बांधण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून दोन लाख रुपये मंजूर केले होते. त्या माध्यमातून कपाऊंडची बांधणी केली आहे. आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून वॉकिंग ट्रक तयार केला आहे.

इको फ्रेंडली वसाहतीत एक नगर एक गणपती येथील रहिवासांनी पर्यावरणांशी नाते जोडले आहे. बंगल्याचे बांधकाम असो की नवीन अपार्टमेंट, त्याची सुरूवात वृक्षारोपनाने केली जाते. 'एक घर, दोन झाड' अशी संकल्पना असून भूमीपूजन करतानाच घराच्या दोन्ही बाजूला दोन रोपांची लागवड केली जाते. नारळ, रामफळ, सीताफळ, फणससह शोभिवंत झाडांनी परिसर नटला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या कृतीशील उपक्रमात खंड पडला नाही. हनुमाननगरचा आज विस्तार वाढला आहे. पण या भागातील रहिवासांनी पहिल्यापासून 'एक नगर...एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे. भागातील नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.

परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय उपचार, आरोग्य शिबिर होतात. तीस पस्तीस वर्षापूर्वी या भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन पथक स्थापन केले होते. रोज ही मंडळी या भागात गस्त घालत. पूर्वी येथे विद्युत दिव्यांची सोय नसताना लाकडी खांब उभारून ​लाइटची सोय केली होती. - शिवाजीराव हिलगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष

हनुमानगरमधील नागरिकांनी जात, धर्माच्या पलीकडे जाऊन नातेबंध जपले आहेत. या भागातील रिक्षा व्यावसायिक मोहन पवार यांचा डिसेंबर २०१४ मध्ये अपघात झाला. त्यामध्ये ते जखमी झाले. पतीच्या अपघाताच्या धक्क्याने पत्नींनेही अंथरूण धरले. त्यांचा मुलगा कॉलेजला शिकणारा. यावेळी हनुमानगरमधील सर्वच नागरिकांनी एकत्र येत तीन महिने त्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले होते. - प्रकाश हळबे, स्टेट बँक कॉलनीतील नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार नरके

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांची फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी किशोर पाटील यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार नरके यांच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा दणदणीत पराभव करून सत्ता कायम राखली होती.

सोमवारी कारखानास्थळावर निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी भू संपादन अधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. सहाय्यक निवडणूक अधिकारी डी.बी. पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा तालुक्यात उपसाबंदी लागू

0
0

आजरा ः आजरा तालुक्यामध्ये दोनस्तरीय उपसाबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. तालुक्यातील पाण्याचे प्रकल्प व त्यातील उपलब्ध पाण्यानुसार हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा ३६, त्यानंतर २२ दिवसांची उपसाबंदी सरसकट लागू केली होती. पण आता हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्यापासून वरच्या बाजूकडील गावांसाठी १५ दिवसांचा तर हिरण्यकेशीला चांदेवाडी नजीक येऊन मिळणाऱ्या चित्रीपासून खाली २२ दिवसांची उपसाबंदी लागू केली आहे. उपसाबंदी निर्णयानुसार याबाबतची काटेकोर व कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश असल्यामुळे कुणाही शेतकरी अथवा गावाची आगळीक पाटबंधारे विभागाकडून खपवून घेतली जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. यावर्षी पाऊसमान कमी असल्याने सर्वत्रच पाण्याचा तुटवडा ऐन उन्हाळ्यात जाणवणार आहे. तालुक्यासह गडहिंग्लज परिसरातील हिरण्यकेशी नदीकाठावरील गावांना पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या चित्री प्रकल्पाचा सांडवा वाहू न शकल्याने यावर्षी कोरडाच राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थ‌कबाकीदारांना सनई चौघड्याने जाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेने एकरकमी परतफेड योजनेच्या वसुलीसाठी काढलेल्या 'सनई चौघडा' गांधीगिरी आंदोलनाला सोमवारी चांगलाच प्रतिसाद मिळाला. बँकेच्या अध्यक्षांसह संचालक व अधिकाऱ्यांनी ठिय्या मारल्याने बड्या थकीत संस्थेकडून सव्वा कोटीचे धनादेश प्राप्त झाले. पाच कोटी रुपयांचा धनादेश सोमवारी (ता.१८) देण्याचे मान्य करण्यात आले. संचालकांनी सुरू केलेल्या या 'सनई चौघड्या'च्या आवाजाने जिल्ह्यातील ४० संस्थांनी एकरकमी योजनेत सहभागी होण्याचे पत्र जिल्हा बँक प्रशासनाला दिले आहे.

आंदोलन टाळण्यासाठी बँकेने संबंधित थकबाकीदारांना याआधी पत्रव्यवहार केला होता. बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संस्थांनी ओटीएसअंतर्गत सहभागी होण्यास तयारी दर्शवली होती. यामध्ये जाहीर केलेल्या बड्या थकीत संस्थांचा समावेश नसल्याने सकाळी १२ वाजता अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उदयसिंहराव गायकवाड तोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष मानसिंग गायकवाड यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर एकूण ४९ कोटी कर्जापैकी ओटीएसमधील पाच टक्के रक्कम धनादेशाद्वारे जमा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. १८ जानेवारीला पाच कोटींचा धनादेश ते बँकेकडे जमा करणार आहेत. गायकवाड यांच्यानंतर संचालकांचा मोर्चा विजयमाला तोडणी वहातूक संस्थेच्या विजयमाला देसाई यांच्या निवासस्थांनी दाखल झाला. देसाई त्याचवेळी बँकेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाल्या होत्या. सीइओ प्रताप चव्हाण यांनी तत्काळ बँकेत जाऊन त्यांची भेट घेतली. देसाई यांनी एक कोटी १६ लाख रुपयांचा धनादेश बँकेकडे सुपूर्द केला.

संग्रामसिंह पाटील-कौलवकर यांनी पाच लाख, मयूर संघाचे डॉ. संजय एस. पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले. डॉ. पाटील परगावी असल्याने त्यांनी कर्ज भरण्यास तयार असल्याचे सांगितले.

चौकट

यानंतरचे टार्गेट ग्रामीण भाग

बी. के. डोंगळे टार्च संस्था, यूथ पतसंस्था-मलकापूर, इचलकरंजी सिमेंट व नवरंग संस्था या ग्रामीण भागातील मोठ्या संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार आहेत. सोमवारी झालेल्या वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील संस्थांच्या वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरचा शड्डू घुमणार कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावलापावलावर लागणाऱ्या तालमी, सकाळ सायंकाळी घुमणारा शड्डूंचा आवाज, डाव-प्रतिडावांचे दिलेले जाणारे प्रशिक्षण असा माहोल कायमच कोल्हापूर शहराने अनुभवला. एकेकाळी शहरात हजारांहून अधिक पैलवान कुस्तीच्या सरावामध्ये मग्न असल्याचे दिसत होते. त्यातील काहीजणांवर विशिष्ट लक्ष केंद्रीत करुन त्यांच्याकडून महाराष्ट्र केसरीची तयारी करुन घेतली जात होती. त्यातून अनेकांनी मानाची गदा पटकावून कोल्हापूरची 'कुस्ती पंढरी' ही बिरुदावली मानाने मिरवली. मात्र आता ही बिरुदावली केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचे येथील पैलवानांच्या कामगिरीवरुन दिसत आहे. २००० पासून म्हणजे तब्बल १६ वर्षे या मानाच्या किताबाने हुलकावणी दिली आहे. महाराष्ट्र केसरी गदेचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी तालीम संघासह सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र केसरीसाठी यावर्षी कोल्हापूरच्या चार मल्लांनी शड्डू ठोकला होता. त्यामध्ये कौतुक डाफळे (पिपळगाव), समीर देसाई (गारगोटी), महेश वरुटे (कोल्हापूर) व सचिन जामदार (कोपार्डे) यांचा समावेश होता. यापैकी कौतुक तिसऱ्या, समीर चौथ्या तर सचिनचे दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात आले. तर महेशच्या दुखापतीने ऐनवेळी उचल खाल्याने तो आखाड्यापासून दूर राहिला. या चारही मल्लांच्या सुमार दर्जाच्या कामगिरीमुळे कोल्हापूरचे आव्हान संपुष्टात येवून महाराष्ट्र केसरी गदेची प्रतीक्षा लांबणीवर पडली. विविध गटात कोल्हापूरने गेल्याच पाच सहा वर्षापासून निर्माण केलेला दबबा कायम राखला असला, तरी खुल्या गटात मल्लांची पिछेहाट झाली आहे. याला कुस्ती क्षेत्राशी निगडीत असलेले सर्वच घटक जबाबदार आहेत.

नुतनीकरणाच्या नावाखाली अनेक तालमींचा चेहरामोहरा बदलला असला, तरी चार दोन तालमी वगळता अनेक तालमीतील लाल मातीचा आखाडाच बंद झाला आहे. कुस्ती करण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता असते, अशी मेहनत करुन घेण्यास आणि करण्यास पैलवान आणि वस्ताद दोन्हीमध्ये कोठेतरी कमतरता जाणवत आहे. कुस्ती पंढरी लाभलेल्या विशेषणामुळे अनेकजणांनी येथील लाल मातीत घाम गाळला. त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या पैलवानांचे तगडे आव्हान असायचे. असे पैलवान निर्माण करण्यासाठी तालमी संघासह वस्ताद एका विशिष्ट मल्लावर लक्ष केंद्रीत करुन त्याची तयारी करुन घेत होते. लक्ष ठेवलेल्या मल्लाच्या तयारीसाठी सर्वांचेच योगदान मिळत गेले आहे. मात्र हीच सांघिक भावना लयास गेल्याने तगडे पैलवान घडवण्यात खीळ बसली आहे. विनोद चौगले या स्थानिक मल्लाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. त्यानंतर चंद्रहार पाटीलने डबल महाराष्ट केसरी तर समाधान घोडकेने २०१० मध्ये प्रतिष्ठेची गदा पटकावली. दोन्ही मल्ल परजिल्ह्यातील असले, तरी त्यांचा सराव कोल्हापुरात होत असल्याने एक प्रकारचे समाधान लाभले. यावेळी चारही मल्ल उपांत्य फेरीपूर्वीच बाहेर पडल्याने न्यू मोतीबागच्या बाला रफीक शेखकडून अपेक्षा होती, पण तोही उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने कोल्हापूरवर नामुष्की ओढवली. 'कुस्ती पंढरी' ची बिरुदावली कायम ठेवायची असल्यास यापुढील काळात तगड्या चार दोन मल्लांवर लक्ष केंद्रीत करुन तयारी करुन घ्यावी लागेल. यासाठी शहर व जिल्हा तालीम संघासह वस्तादांच्या भूमिकेतही बदल करावा लागेल.

कुस्तीपेक्षा राजकारणासाठी वेळ

कुस्ती क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशामुळे अनेकजण गब्बर झाले. सरकारच्या विविध सुविधा आणि सवलती मिळवत त्यांनी आर्थिक सुबत्ता मिळवली. इतर व्यवसायात जम बसून त्यांनी कुस्ती व्यतिरक्तही आपला दबबा निर्माण केला. पण ज्या कुस्ती क्षेत्राने त्यांना भरभरुन दिले, त्यांचे आजच्या कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रातील योगदान शून्यच असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक मल्लांना प्रोत्साहन देवून त्यांच्याकडून तयारी करुन घेण्यापेक्षा हे कुस्तीतील गब्बर केवळ राजकारणासाठी अधिक वेळ देत आहे, हे कोल्हापूरच्या कुस्तीचे दुर्दैव मानावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळप्रकरणी मुरगूडमध्ये गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड येथील विवाहितेस घर बांधण्यासाठी दोन लाख व चार तोळे सोने घेऊन यावे यासाठी गेल्या वर्षापासून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सविता बाळासाहेब बरकाळे (वय २१, रा. बारडवाडी ता. राधानगरी) हिने सासरच्या चौघांविरूद्ध फिर्याद दिली आहे.

मुरगूड पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बारडवाडी येथील सविता हिचा विवाह मुरगूड येथील बाळासाहेब सदाशिव बरकाळे याच्याशी जुलै २०१४ मध्ये झाला होता. त्यांनंतर दोन महिन्यानंतर सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी दोन लाख व चार तोळे सोने घेऊन यासाठी सविताचा शारिरीक व मानसिक छळ केला आहे. त्यामुळे पती, बाळासाहेब सदाशिव बरकाळे, सासरा सदाशिव, सासू वालूबाई, (सर्व रा. मुरगूड) तर नंणद छाया मारुती करपे (रा. पिरळ ता. राधानगरी) या चौघाविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्ती गावांना टंचाईच्या झळा

0
0

प्रवीण कांबळे, हुपरी

हातकणंगले तालुक्यामध्ये पंचगंगा व वारणा या दोन बारमाही नद्या असल्यामुळे अनेक गावामध्ये सध्या तरी पाणी टंचाईची समस्या जाणवत नसली तरी नसून तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही गावांमध्ये मात्र येत्या काळात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होवून सार्वजनिक विहीर, खासगी विहीर, विंधण विह‌िरींचा उपयोग करून टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने यंत्रणा सक्रिय झाली आहे. दरम्यान पाणी टंचाई वर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जाहीर करणेत आलेला पाणी टंचाई आरखडा हा अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे १६ गावे व २७ वाड्यावर ५५ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

हातकणंगले तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या सधन तालुका म्हणून ओळखला जातो.

पंचगंगा व वारणा ह्या दोन बारमाही नद्या या तालुक्याला लाभलेल्या वरदान आहेत. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या नद्यांचा वापर मोठा प्रमाणात होतो. या नद्या वाहत्या असल्यामुळे पाण्याची कमतरता कधीही भासलेली नाही. पंरतु सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळसदृष्यस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येत्या काळात पाणी टंचाईची शक्यता निर्माण होणार आहे. सद्या तरी तालुक्यामध्ये पंचगंगा व वारणाकाठच्या गावांसह अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत नाही. कारण अनेक ठिकाणी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत.

दरम्यान तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मजले, आळते, नरंदे, नेज, मनपाडळे, खोतवाडी, बिरदेववाडी, तारदाळ, मौजे तासगाव, मौजे वडगाव, कापूरवाडी, अंबपवाडी, हेरले या गावांना मात्र पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे. कारण या ठिकाणी पाण्याचे असलेले नियोजन अल्प प्रमाणात आहे. येत्या काळात या गावांना पाणी टंचाई भासू नये.

प्रशासनाच्या वतीने खासगी विहीर अधिग्रहण करून त्याची स्वच्छता करत गाळ काढत खोली करणे, सार्वजनिक विहीरी, नवीन विंधण विहीरी निर्माण करणे, त्या विहिरींची दुरूस्ती करणे अशा प्रकारचा कामासाठी मोठया प्रमाणात निधीची उपाययोजना करणेत आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली तरी यासाठी उपाययोजना करण्यात आल्यामुळे तालुक्याला पाणी टंचाईची समस्या अल्प प्रमाणात जाणवले.

विंधण विहिरीसाठी अल्प निधी

मजले, तासगाव, अंबप, अंबपवाडी, दुर्गेवाडी, वाठार तर्फे वडगाव, हेरले, माले, नरंदे, सावर्डे, खोतवाडी, कासारवाडी आदी गावांसाठी एका विंधण विहीरींकरिता प्रशासनाने फक्त ५० हजारांचा निधी जाहीर केला आहे. हा निधी अल्प प्रमाणात असल्यामुळे यातून विंधण विहीर कशी होणार. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

शहरातील अतिक्रमणावर पालिका प्रशासनाने हातोडा मारला. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तासह प्रशासनाने कडक भूमिका घेत एकाच दिवसात अनेक ठिकाणची अतिक्रमण हटविली. अतिक्रमण मोहिमेसाठी प्रशासनाने पोलिस संरक्षणासह जय्यत तयारी केली होती. पहिल्यादाच इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. परिणामी आज शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला. पालिका प्रशासनाची अतिक्रमण मोहीम पाहण्यासाठी जागोजागी नागरिकांनी गर्दी केली होती.

मार्केटयार्डपासून जेसीबीच्या सहाय्याने कारवाईला सुरूवात करण्यात आली. चहाचे गाडे, डिजिटल बोर्ड, पानपट्टी, दुकानाच्या पायऱ्या, पत्रे जेसीबी मशीनच्या सहय्याने काढण्यात आली. दरम्यान काही दुकानदारांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी काही दुकानदारांशी वादावादीचे प्रसंग उद्‍भवले. मात्र मुख्याधिकारी शर्मा यांनी कठोर भूमिका घेत अतिक्रमण काढले. अतिक्रमण विभागाची आश्वासक कार्यपद्धती पाहून बहुतांश दुकानदारांनी स्वतः पुढाकार घेऊन अतिक्रमण काढले. यावेळी स्पीकरवरून सूचना देण्यात येत होत्या.

शहरातील बहुतांश दुकानदार व व्यावसायिकांनी रस्त्यासमोरील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. काही दुकानदारांनी थेट गटारीवरच बांधकाम केल्याचा घटना आहेत. तसेच काही दुकानदार आपल्या दुकानातील वस्तूंचे प्रदर्शन मांडत होते.

शहरातील आजरा रोड, संकेश्वर रोड, कडगाव रोड, लक्ष्मीरोडसह संपूर्ण बाजारपेठ परिसराची गेली आठवडाभर पालिका प्रशासनाने अतिक्रमण दुकानदारांचा सर्व्हेक्षण केले होते. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार सुमारे ८० ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आढळून आले होते. शहराच्या गटारीवर असणाऱ्या या अतिक्रमित घटकांवर करवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार गेले आठवडाभर पालिका प्रशासनामार्फत स्पीकरवरून नागरिकांना अतिक्रमित भाग स्वतः काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच आज अतिक्रमण विभागातर्फे कारवाईचे संकेत देण्यात आले होते. आज सकाळी संकेश्वर रोडपासून अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरवात केली. यावेळी अतिक्रमण विभागप्रमुख प्रफुल्लकुमार वनखंडे, पाणी पुरवठा विभागप्रमुख जमीर मुश्रीफ, आरोग्य विभागप्रमुख रमेश मुन्ने आदींसह शंभरावर पालिका कर्मचारी उपस्थित होते. पोल‌िस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नगराध्यक्षांचे अतिक्रमण काढले

आजपर्यंत झालेल्या कारवाया या दिखाऊपणाच्या असतात अशी उपस्थितात चर्चा होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी अथवा राजकीय वजन असलेल्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्या मालकीचे इमारतीबाहेरील पायरीवर तसेच प्रांत कार्यालयासमोरील शिवसेना शाखेवर हातोडा पडताच शहरात स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला वेग आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ ए‌कर उसाला आजऱ्यात आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील धनगरमोळा आणि किणे परिसरातील सुमारे ११ एकरातील ऊस जळून खाक झाला. धनगरमोळा येथील १० एकराला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र किणे येथील एक एकरातील ऊस शॉर्ट सर्किटने जळाला आहे. या दुर्घटनेत १६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

काल दुपारच्या सुमारास धनगरमोळा येथील उसाला आग लागली. तोडणीला आलेल्या उसाच्या लावणीच्या क्षेत्राला जोरदार वाऱ्यामुळे आग लागली. या परिसराशेजारी चिरे काढणाऱ्या मजुरांसह गावातील २५-३० जणांच्या जमावाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न अपुरे पडले. संतोष शेटगे यांच्या खोडव्याच्या लावणीचा ऊस तोडलेला असल्याने व नुकतीच लावण केलेल्या शेतात पाणी सोडले असल्याने आग आटोक्यात आली. पण दरम्यान १५ शेतकऱ्यांचा १० एकरातील ऊस जळून खाक झाला. शंकर पाटकर, गोपाळ मोरूसकर, ईश्वर माडभगत, प्रकाश नारायण मोरूसकर, बाळू माडभगत, शिवाजी मेघुलकर, दीपक पाटकर, अशोक पाटकर, सखाराम माडभगत, गोपाळ खरूडे, नारायण कविटकर, यशवंत जाधव, मार्यान बारदेसकर, हालेस बार्देसकर, तुकाराम शेटगे व तानाजी जाधव अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. यापैकी अशोक पाटकर, गोपाळ खरूडे व यशवंत जाधव यांच्या इंजिनांचे व पाइपलाइनचेही आगीत नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळम्मावाडी धरण रामभरोसे

0
0

प्रकाश कारंडे,कागल

संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या ज्या धरणावर अवलंबून आहेत त्या काळम्मावाडी धरणाची सुरक्षाच धोक्यात आहे. मानवनिर्मित अनेक संकटे धरणाला वेढलेली आहेत. एकीकडे सहलीसाठी आलेल्या शाळेच्या लहान मुलांना आणि पर्यटकांना धरणावर बंदी केली जाते आणि चक्क धरणाच्या काठावर ओल्या पार्ट्या आणि प्रेमी युगुलांना मोकळा वावर दिला जातो. धरण पूर्ण झाल्यापासून आजपर्यंत रिक्त जागांवर सुरक्षा रक्षकांची भरतीच न झाल्याने केवळ १० टक्के सुरक्षा रक्षकांवर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. यावर्षीही ५० जण निवृत्त होत आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

धरणाच्या गेटपासून ते ते धरणाच्या वैभवात भर टाकणारी बागच आज उद्ध्वस्त झाली आहे. सुटीदिवशी येणाऱ्या शाळेच्या मुलांच्या ५० हून अधिक गाड्या प्रवेश मिळत नाही म्हणून परत जातात. कोल्हापूरहून परवानगी आणा असे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूला मुख्य प्रवेशाच्या ठिकाणाहून दोन्ही रस्त्यांनी, कालव्यावरुन दोन रस्ता आणि राजापूर रोडवरुन नऊ नंबरच्या ठिकाणी जाता येते. येथे सुरक्षा रक्षकच नसल्याने येथे धरणाच्या पाण्यात मनसोक्त डुंबता येते. ओल्या पार्ट्या केलेल्या चुली, दारूच्या बाटल्या, पत्रावळ्या, प्लास्टिकचे ग्लास आणि अन्न विखुरलेले दिसते. सकाळच्या कॉलेजच्या वेळेत हेच ठिकाण 'लव्हर्स पॉईंट'आहे. विशेष म्हणजे धरणाच्या सुरक्षा चौकीच्या हाकेच्या अंतरावर हे सगळे चालते. याठिकाणी पोलिस चौकी आहे मात्र त्यात एकही पोलिस नाही. सरकारकडून केवळ दोनच पोलिस धरणाच्या मुख्य गेटवर पहारा देत असतात.

धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या वसाहतींची पूर्णच वाताहत झाली आहे. याठिकाणी धरण पूर्ण व्हायच्या काळात साडेसहा हजार लोकसंख्या रहात होती. आता निवृत्त आणि इतर कारणांनी ही संख्या रोडावली आहे. केवळ २० कुटुंबे येथे राहतात. त्यामुळे येथील सातवीपर्यंतच्या शाळेत केवळ दोन ते तीन विद्यार्थी प्रत्येक वर्गात असतात. रहाणाऱ्यांना वसाहतीची दुरुस्ती करायची म्हटल्यास स्वत: पैसे मोजावे लागतात. मंजुरीसाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. वसाहतीत आरोग्याची वाणवा असून याठिकाणी दिव्याखाली अंधारच म्हणजे वीजेची सोयच नाही. त्यामुळे वसाहतीच्या इमारतींतील साहित्यांची चोरी वाढली आहे. धरणासाठी ८० च्या आसपास स्टाफ आहे. परंतु कर्मचाऱ्यांनीच केलेल्या अर्जावर सही व्हायला १५ ते २० दिवस लागतात. कारण येथील अधिकारी कधी येतात आणि कधी जातात ते कुणालाच माहीत नाही.

'तेरी भी चूप, मेरी भी चूप'

धरण क्षेत्रात काही दिवसापूर्वी दोन ट्रक स्टिलची चोरी झाली. त्यातील वाटा न मिळाल्याने चोर माफीचा साक्षीदार झाला. याची पोलिसात फक्त ४० हजारांची चोरी अशी नोंद झाली. ज्याचा तपास सुरु आहे असे म्हणतात. परंतु तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा समेट झाल्याची चर्चा यात आहे.

सध्या धरणाच्या सुरक्षेच्या उपलब्ध क्षमतेच्या ९० टक्के कर्मचारी निवृत्त झाले आहेत. ही नोकरी सरकारी नसल्याने हंगामी मजूर व पहारेकरी मिळत नाहीत व टिकतही नाहीत. यावर्षी ५० कर्मचारी निवृत्त होणार असल्याने आम्ही निवृत्त जवानांच्या नोकरीचा प्रस्ताव ठेवून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे.'

-नितीन सूपेकर, कार्यकारी अभियंता, दूधगंगा कालवे विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळ‌िक्रेची हद्द होणार निश्चित

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील बाळीक्रे गावच्या शेतजमिनीच्या नकाशाचा घोळ १४० वर्षानंतर संपला आहे. येथील तरुणांनी पुणे आयुक्तापर्यंत केलेली धडपड व महाराष्ट्र टाइम्सने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जिल्हा भूमिअभिलेख कडून जुने-नवे नकाशे, वहिवाटी याची शेतकऱ्यांसमोर शहानिशा सुरु झाल्याने हा रखडलेला प्रश्न लवकरच सुटणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने दोन मार्च, २०१५ च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृताची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आली आहे.

बाळीक्रे गावाला ९६८ एकर शेतजमीन आहे. याचा सर्व्हे १८७५ मध्ये झाला. त्याचे नकाशे तयार झाले. त्यानंतर नव्याने १८९८ मध्ये पुन्हा सर्व्हे झाला. मात्र त्याचा अंमलच झाला नाही. तरीही या दोन्ही नकाशात प्रचंढ तफावत राहिली. नकाशा, सर्व्हे नंबर, वहिवाट यामध्ये ताळमेळच लागत न्हवता. त्यामुळे शेतीची मोजणी करणे भूमिअभिलेख विभागाला अडचणीचे झाले.

केवळ सात-बारानुसार शेतकरी इतर व्यवहार करत होते. सध्या उपलब्ध असणाऱ्या १८९८ च्या नकाशात गट नंबरच नाहीत आणि सर्व्हे नंबर जुळत नाही. परिणामी जमिनीचे शंभरावर दावे पडून आहेत. आता तर हद्दीवरुन मारामाऱ्या होऊ लागल्या होत्या.

स्वातंत्र्यपूर्व काळात विजापूरच्या आदिलशहाच्या जहागीरीचे हे गाव म्हणून ओळखले जायचे. केवळ या संदर्भाने त्याच्या १९७५ च्या मोडीतील नकाशाचा उलगडा झाला. प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना दिशा मिळाली. दरम्यान, १८९४ व १९३३ मध्ये इंग्रजांनी केलेल्या मोजणीचा अंमल कुठेही झाला नाही. १९५१-५२ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गावच्या मध्यभागातून रस्ता केला त्याचाही उल्लेख नकाशात दिसत नाही.

गटनंबर नुसार नकाशा नसल्याने कृषीविभागाच्या मृद संधारण विभागाकडून गावात आजपर्यंत बांधबंदीस्ती किंवा सपाटीकरण झाले नाही. पाणंदी, रस्त्यांचे प्रमाणीकरणच झाले नाही. जमिनीच्या सीमारेषाच नसल्याने शेजाऱ्यांत हेवेदावे, वादविवाद वाढले. म्हणून 'शेतकरी अन्याय निवारण समिती' स्थापन करुन गावातील उमेश देसाई, श्रीनिवास देशपांडे, संजय कुरणे, योगेश देशपांडे आ‌दींंनी पुढाकार घेवून तहसीलदार, प्रांताधिकारी, पुण्याचे महसूल व भूमिअभिलेख विभागीय आयुक्त व उपसंचालक आणि राज्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यापर्यंत कैफियत मांडली.

गावची वस्तुस्थिती विनामूल्य मोजून अतिक्रमणे काढावीत. नकाशांसह सर्व दस्तऐवज मराठीत उपलब्ध व्हावेत व खातेदारांना नंबर मिळावेत अशी मागणी झाली. पुण्याचे भूमिअभिलेख उपसंचालक गिरीश राव यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीची दखल घेवून कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाने येथे भेट दिली. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न निकाली निघाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष लोकांची भेट घेऊन १८७५ व १८९८ चे नकाशे समोर ठेऊन हद्दी पाहिल्या. शेतकऱ्यांचे जबाब घेतले. तेव्हा १८९८ चा सर्व्हे नकाशा चुकीचा असून १८७५ चा योग्य असल्याचे निदर्शनास आले. आता १८७५ च्या नुकाशानुसार लवकरच कार्यवाही करुन शेतकऱ्यांचा सोडवण्यात येईल.

- ए. वाय. भोसले, जिल्हा भूमी अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीईने हिरावला हक्क

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

स्वयंअर्थसहायित व कंत्राटी शिक्षकासारखी शासकीय धोरणे देशाच्या शिक्षण व्यवस्थेसमोरील अंधकार किती भयानक आहे हे दर्शवित आहेत. स्थानिक स्तरापासून तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते-मंत्र्यांची विसंगतपूर्ण विधाने आणि आचरण याचेच द्योतक आहे. अशा शासकीय धोरणातूनच जन्मलेला राइट टू एज्युकेशन कायदा शिक्षणाचा हक्क देणारा नाही, तर सामान्यांचा शिक्षण हक्क हिरावून नेणारा कायदा आहे. अशा स्थितीत शासनानेही नाकारलेल्या शाळांमधून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुनील सुतार यांच्यासारखे गुणवंत शिक्षकच सर्वसामान्यांचे तारणहार ठरणार आहेत, असे प्रतिपादन 'आयफेटो'चे अध्यक्ष व शिक्षक-नेते प्रभाकर आरडे यांनी आजरा येथे केले. सुतार यांच्या सत्कारानिमित्त आजरा तालुका शिक्षक समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी शिक्षणाधिकारी आनंदराव जोशिलकर अध्यक्षस्थानी होते.

आरडे म्हणाले, पैसा आणि संपत्तीवर आधारित नवी वर्गीय व्यवस्था निर्माण करून सामान्यांना शिक्षण नाकारण्याचे कारस्थान विविध स्तरावर सुरू आहे. शैक्षणिक स्तरावरील इतका मोठा गोंधळ आणि भांबावलेपण घेऊन महासत्ता होणे कठीण आहे. कारण गुणवत्ता, शील, चारित्र्यासह जगविण्यास सहाय्यभूत शिक्षण केवळ पैसा आणि संपत्तीच्या आधारे देता येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाण जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जवळपास नाहीच, पण खासगी शाळांत मोठे आहे. माणसांना जगण्याचे आणि त्यासाठी संघर्ष करण्याचे प्रसंगी सोशिक राहण्याचे शिक्षण देणाऱ्या शाळा कोणत्या आहेत याचा बोध शासनाने यावरून घ्यावा व शिक्षण हक्क नाकारण्याचे कारस्थान थांबवावे. प्रामाणिक व निस्वार्थी कामाची नोंद घेणारे समाजात अनेकजण आहेत. त्यामुळे शासनाच्या या धोरणामुळे डगमगून न जाता शिक्षकांनी आपले ज्ञानदान व गुणवत्ता फुलविण्याचे कर्तव्य बजावतच राहिले पाहिजे.

सुतार यांचा पत्नी, आई व वडिलांसमवेत शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलिफ फंडास सहा हजार रूपयांची व आपल्या होन्याळी प्राथमिक शाळेस लेसर प्रिंटर प्रदान केला.

तालुक्यापेक्षा खड्डेच मोठे

गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे काम करीत राहण्याऐवजी बरेच शिक्षक कागदे रंगविण्यात इतिकर्तव्य मानतात. याचे उदाहरण म्हणून एका तालुक्यात वृक्षारोपणाचा अहवाल दिल्यानंतर शिक्षकांनी दिलेल्या अहवालातील खड्ड्यांचे आकारमान मोजण्यात आले, तेव्हा ते तालुक्याच्या आकारमानापेक्षाही मोठे भरले, असे आरडे यांनी सांगतात उपस्थितांत हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडगा काढा, अन्यथा निवडणूक

0
0

आजरा कारखाना मेळाव्यात चराटीचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेल्या वर्षभरात झालेल्या विशेषत: जिल्हा बँक व आजरा तालुका संघ निवडणूकीत सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्वांच्या पाठिंब्याने उतरलो होतो. जिल्हा बँकेत जिंकलो, पण संघात पराभव झाला. पण हा पराभव तांत्रिक होता. विरोधकांनी त्यावेळी तीन हजार मतदार वाढविले होते. तरीही १२००-१५०० मतांनी हरलो. पण आता आजरा साखर कारखाना निवडणुकीसाठी चार-पाच महिने हातात आहेत. निवडणूक लादावी, हा उद्देश नाही. पण बिनविरोधसाठीची चर्चा व तडजोड सन्मान्य असली पाहिजे. अन्यथा कारखाना निवडणूक लढवायचीच, असा निर्धार जिल्हा बँक संचालक व अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केला.

साधारणत: मे अखेरीस येथील साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चराटी यांनी तालुक्यातील गटा-तटांच्या सर्वसमावेशक स्वरूपातून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी निवडणूक पूर्व मेळावा आजरा येथील अण्णा-भाऊ सभागृहामध्ये घेतला. यावेळी गोकुळचे संचालक रवींद्र आपटे, विद्यमान कारखाना संचालक दिगंबर देसाई, राजू जाधव, आनंदराव कुलकर्णी, नागोजी पाटील माजी संचालक विश्वनाथ करंबळी, सदानंद व्हनवट्टे, विजय सावेकर, भारतीय जनता पक्षाचे रणजित पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील आदी नेते, सरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विलास नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कारखान्यामध्ये कोणाची मक्तेदारी नको आहे. तालुक्याचा कारखाना आहे. त्यामुळे तालुक्याचे सर्वसमावेशक संचालक असणे गरजेचे आहेत. पण काहीजण या भूमिकेच्या विरोधात वागत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही या सर्वसमावेशक गटात सहभागी होण्यास उत्सुक आहे. येत्या चार दिवसात नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाची अथवा गटाची अस्मिता न बाळगता तडजोडीसाठी व सर्वसमावेशक संचालक निवडीसाठी प्रयत्नशील राहू. निवडणूकीच्या पाच विभागातील विभागनिहाय गटा-तटाच्या शक्तीसामर्थ्य व सभासदांच्या संख्येबाबत चर्चा होत असली तरी विरोधी गटाकडूनच सभासद केलेले नाहीत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यान, संकुल अडगळीतच

0
0

दीपक जाधव, पन्हाळा

सुंदर जोतिबा योजनेतील सेंट्रल प्लाझा उद्यान व व्यापारी संकुल (दुकानगाळे) ही दोन कामे नको त्या ठिकाणी केल्याने ही दोन्ही ठिकाणे निरूपयोगी झाली आहेत. सर्वच दुकानगाळे पडून आहेत. वावर नसल्याने प्लाझा उद्यानाची दैना झाली आहे. परिसर समितीने केलेला हा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला. नूतन आराखड्यात प्लाझा यमाई मंदिराच्या मागे नैसर्गिक वातावरणात हवा, अशी मागणी होत आहे.

२० लाख रुपये खर्चून व्यापारी संकुल बांधले. त्यात ४५ दुकानगाळ्याचे बांधकाम पूर्ण झाले. गेल्या २० वर्षांपासून ते वापराविना आहेत. गाळ्यात तर घुशी व कुत्र्यांचा मुक्काम आहे. गाळ्यांचे दरवाजे गंजून खराब झाले आहेत. त्यामुळे शटर्स उचकटली आहेत. काहींनी कुलपे तोडून उचकटली आहेत. जोतिबा चैत्र यात्रा काळात पूर्वी खुल्या जागेवर अतिक्रमण होत होते. ते टाळण्यासाठी हे व्यापारी संकुल उभे केले आहे. तिन्ही बाजूंनी एकास एक असे दुकानगाळे बांधले. ते रिकामेच राहिले आहेत. भाविकांचा जाण्या-येण्याचा मार्ग एका बाजूला व व्यापारी संकुल एका बाजूला असल्याने व्यापाऱ्यांनी त्याकडे जाणे टाळले आहे.

१५ मार्च, २००३ ला सेंट्रल प्लाझा या उद्यानाचे उद्‍घाटन झाले. येथे येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बागबगीचा नसल्याने १९९० मध्ये उद्यानाची योजना आखली. ३५ हजार चौरस मीटरमध्ये हे उद्यान झाले. या ठिकाणी १० ते १५ हजार भाविक सहज बसू शकतात. २००६ पर्यंत या उद्यानाची देखभाल व्यवस्थित होती. त्यानंतर बागेस अवकळा प्राप्त झाली. प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात ही बाग पूर्ण करपते. केवळ पावसाच्या पाण्यावर ३ ते ४ महिने येथे हिरवाई येते. चैत्र यात्रेत या उद्यानाचा वापर होणे अपेक्षित होते. मात्र, ऐन यात्राकाळात हे उद्यान भकास होते.

या उद्यानातील खांबावरील दिवे बंद आहेत. संरक्षण भिंतीलगात नारळाचा कचरा व इतर घाणीचे साम्राज्य आहे. आराखड्यात दर्शन मंडपास प्राधान्य द्यावे, अशी भाविकांची मागणी आहे. डोंगरावर दर्शन मंडप नाही. मंदिराभोवती रांगेत उभे राहून भाविकांना ताटकळत दर्शन घ्यावे लागते. उन्हाळ्यात उन्हाचा पावसाळ्यात थंडी, दाट धुके यांचा सामना कारावा लागतो. तीव्र उन्हात तर रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना चक्कर येते. याआधी पर्यायी दर्शन मंडपाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडला. परंतु तो भुयारी होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयाच्या ठिकाणाहून समिती खालून नंदीच्या मंदिरापर्यंत हा मार्ग होता.

मंदिराच्या पायाखाली कठीण दगड फोडण्यासाठी ब्लास्ट‌िगची आवश्यकता होती. मंदिराच्या पायास हाणी पोहचण्याचा धोका असल्याने हा प्रस्ताव बारगळला. पंढरपूर धर्तीवर जोतिबावर दर्शन मंडपाची व्यवस्था करायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्कूल टिचर’चे नाव बदला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उर्मिला टॉकीज येथे प्रदर्शित होत असलेल्या 'स्कूल टिचर' चित्रपटाचे नाव बदला, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांची भेट घेवून केली.

चित्रपटाचे नाव शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे आहे. या चित्रपटामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या नात्यातील पवित्रपणाला बाधा आणणारी आहे. शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे व मनावर विपरीत परिणाम करणारे चित्रपटाचे शिर्षक बदलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चित्रपटाची अश्लील पोस्टर्स चित्रपटगृहात व अथवा बाहेर लावू नयेत अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. असोसिएशनचे अध्यक्ष संजय यादव, सचिव संजय वराळे, सुभाष देसाई, प्रशांत कासार यांच्यासह शिक्षकांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन’वर तातडीने कारवाई करा’

0
0

कोल्हापूरः समाजात हिंसेला प्रेरणा देणाऱ्या तसेच लिखाण करणाऱ्या अभिनव भारत संघ आणि सनातन संस्थेची चौकशी करून सरकारने कारवाई करण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत केली.

डॉ.पाटणकर म्हणाले, 'अॅड.संजीवन पुनाळेकर यांनी केलेल्या 'ज्यांनी पत्र उघड केले त्यांना भर चौकात जाहीरपणे फाशी दिली पाहिजे,' या वक्त्यावाबाबत आक्षेप घेत हिंसेला प्रेरणा देणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांच्या खुनातील सूत्रधारांना शिक्षा झाली पाहिजे. ३० जानेवारीपर्यंत पोलिसांनी या कृत्यांमागचे मास्टर माईंड पकडले नाहीत तर त्याचा शोध जनता अहिंसेच्या मार्गाने घेईल. हा हिंसेने अहिंसेशी सुरू केलेला संघर्ष आहे, अशी स्थिती आहे.'

ते म्हणाले, 'हिंसा करून लपून राहणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही जनता पोलिसांना नक्कीच अहिंसेच्या शांततामय भूमिकेतून मदत करणार आहे. त्यासाठी जनताच मुख्य सूत्रधाराला शोधण्यासाठी प्रयत्न करेल.' यावेळी अॅड.पंडितराव सडोलीकर नंदकुमार गोंधळी, अनिल म्हमाने, संदीप संकपाळ, सुनील कांबळे आदी ‌उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images