Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिला डॉक्टरचे मोबाइलवर चित्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचे मोबाइलवरून चित्रण करणाऱ्या डॉ. फनीकुमार किरण कोटा (वय ३१, मूळ गाव, रा. शांतीनगर कॉलनी, हैदराबाद कोटा, तेलंगणा) या निवासी डॉक्टराला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

डॉ. कोटा व संबंधित महिला डॉक्टर हे निवासी डॉक्टर असून सध्या ते सीपीआर हॉस्पिटलमधील तुलसी बिल्डिंगमध्ये एकमेकांच्या शेजारच्या रूममध्ये राहतात. शुक्रवारी मध्यरात्री महिला डॉक्टरांना खोलीच्या दाराजवळ आवाज आला. दरवाजा उघडून त्या व्हरांडयात आल्या. त्यावेळी डॉ. कोटा ये-जा करत होते. तेव्हा व्हरांड्यातील लाइट बंद करत होतो, असे त्यांनी उत्तर दिले.

त्यानंतर महिला डॉक्टर रूममध्ये परतल्या. लाइट बंद केल्यावर दरवाजावरील व्हेंटिलेशन खिडकीत त्यांना छोटी लाइट दिसली. त्यांनी निरखून पाहिले असता मोबाइल दिसला. शूटिंगसाठी डॉ. कोटा यांनी मोबाइल खिडकीत ठेवला असावा, अशी त्यांना शंका आली. त्यांनी डॉ. कोटा यांना तो मोबाइल घेऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांचा मोबाइल नसल्याचे सांगितले. त्यानंतर महिला डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टरांकडे विचारणा केली. वरिष्ठ डॉक्टरांनी डॉ. कोटा यांच्याकडे विचारणा केली पण त्यांनी हात वर केले. त्यानंतर महिला डॉक्टरने मोबाइल घेऊन लक्ष्मीपुरी पोलिसांनी डॉ. कोटा यांना बोलावून चौकशी केल्यावर त्यांनी मोबाइल स्वतःचा असल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना ठरणार किंगमेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत केवळ चार सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला स्थायी ​समिती सभापती आणि परिवहन समिती सभापतीच्या निवडीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही समित्यांमध्ये सेनेला प्रत्येकी एकच जागा मिळाली असली तर सभापती कुणाला ठरवायचे हे सेनेच्या मतावर अवलंबून राहणार आहे. यामुळे या दोन्ही निवडींवेळी मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीत सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून परिवहन स​मिती सभापतिपद पटकावण्याचा सेनेचा मनसुबा असल्याचे कळते.

स्थायी समितीत सोळा सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सदस्य असे आठजण सत्ताधारी आघाडीचे आहेत. विरोधी ताराराणी आघाडीचे चार आणि भारतीय जनता पक्षाचे तीन मिळून सात सदस्य संख्या आहे. शिवसेनेचा एक सदस्य आहे. काँग्रेस आघाडीची सदस्य संख्या आठ, तर भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेना मिळून आठ असे बलाबल होणार आहे. शिवसेनेने भाजप आघाडीला पाठिंबा दिला तर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांचे संख्याबळ समान होणार आहे. परिणामी सभापतिपदी निवडणूक झाल्यास दोघांनाही समान मते पडली तर सोडत काढली जाईल. याउलट शिवसेना सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत राहिली तर सभाप​तिपदीच्या निवडीत कुठल्याच अडचणी येणार नाहीत. स्थायी समिती सभापतीच्या निवडीवेळी शिवसेना सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देऊन त्या बदल्यात परिवहन समिती सभापतिपदावर दावा करू शकते असे सेनेतील काही मंडळींचे म्हणणे आहे.

​शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय मैत्री सर्वश्रृत आहे. शिवाय भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपासून फारसे सख्य नाही. महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांतील वैर टोकाला गेले होते. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, भाजप आघाडी सोबत राहिली नाही. यामुळे आगामी स्थायी आणि परिवहन समिती सभापती निवडीतही शिवसेना भाजप-ताराराणी आघाडीला साथ देईल याची शक्यता कमी आहे. परिवहन समितीत काँग्रेसच्या चार, तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना संधी मिळणार आहे. ताराराणी आघाडीकडून तीन, भाजपकडून दोन सदस्य असणार आहेत. तर सेनेचा एक सदस्य असणार आहे. 'स्थायी'सारखीच स्थिती परिवहनमध्ये पाहावयास मिळणार आहे. भाजत-ताराराणी आघाडीला पाठिंबा देऊन सत्तेत अधांतरी राहण्यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन एक पद मिळवायचे असा सेनेचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलरफुल हॅपी स्ट्रीट्स

$
0
0

कोल्हापूर : ताल धरायला लावणारा ढोल-ताशाचा निनाद, लेझीमच्या ठेक्यावर फेर धरणारे आबालवृद्ध, मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, विविध कलागुण आणि गीत, नृत्यात रमलेला युवा वर्ग, पारंपरिक खेळाचा आनंद लुटणारे नागरिक, सायकलींचा थरार आणि रोप वेसारख्या साहसी खेळाचा आनंद लुटणारी बच्चे कंपनी अशा मौजमजेचा धमाका शहरवासीयांनी रविवारी सकाळी अनुभवला. निमित्त होते, 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'हॅपी स्ट्रीट'चे! खेळ आणि मनोरंजनाची अनुभूती घेऊन येणाऱ्या 'हॅपी स्ट्रीट' या खेळ, मनोरंजनाच्या पर्वाला रविवारी सकाळी झकास सुरुवात झाली आणि बघता बघता हजारो नागरिक या आनंददायी सोहळ्यात सामील झाले. वय, पद या साऱ्या गोष्टींची झूल बाजूला ठेवत अडीच ते तीन तास फुल टू धमाल केली.

बालपणीच्या आठवणींना उजाळा देत कुणी विटी दांडू हाती घेतला, तर कुणी टायर पळविण्याच्या स्पर्धेत सहभागी होत चिअअप केले. रस्सीखेच हा चिमुकल्यांच्या आवडीचा खेळ, बच्चे कंपनी एकमेकांची ताकत आजमावण्यात दंग असताना मोठी मंडळी यामध्ये सहभागी झाले आणि 'जोर लगा के'चा नारा उंचावला. लेझीम, रस्सीखेच, पोत्यात पाय घालून पळणे या खेळ प्रकारातील जल्लोष तर टिपेला पोहचला. तरूणाईचे गीत, नृत्याचे सादरीकरण आणि हात उंचावत संगीताच्या तालावर फेर धरणारे सहकारी या जल्लोषी माहोलने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. शाळकरी मुले, कॉलेजियन्स, ते मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी 'हॅपी स्ट्रीट'चा आनंद लुटला. तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते यल्लम्मा मंदिर चौकपर्यंतचा रस्त्यावर सकाळी सात वाजल्यापासूनच शहरवासियांची रीघ लागली होती.

कोल्हापुरी फेटा, पांढरा कुर्ता-जीन्स परिधान केलेल्या आणि कपाळावर चंद्रकोर कोरलेल्या तरूण तरूणींचे पथक आणि तालबद्ध ढोल ताशा वादनाचा सामूहिक आविष्कार घडवित 'करवीर नाद' या कोल्हापुरातील मानद ढोल ताशा पथकाने करवीरवासियांवर मोहिनी घातली. तब्बल ७५ कलाकरांच्या या पथकाने अडीच तास वादन केले.

भारतीय संगीताच्या फ्यूजनवर आधारित सामूहिक वादन करताना महाराष्ट्रीयन, राजस्थानी, केरला संगीत प्रकार सादर केला. ३५ ढोल आणि १५ ताशांचा या पथकात समावेश आहे. शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवा युवतींची यामध्ये विशेष करून सहभाग आहे. त्याचबरोबर शाळकरी मुले आणि नागरिकांचा यामध्ये समावेश होता. पथकाचे अध्यक्ष अक्षय पोतदार, उपाध्यक्ष संतोष वरेकर, सचिव सत्वधीर देसाई, खजानिस महेश चौगले यांच्यासह ७५ जणांचे पथक 'हॅपी स्ट्रीट'वर अवतरले आणि ढोल ताशा पथकाचा​ निनाद घुमू लागला. कलाकारांचा सामूहिक वादनाचा आविष्कार आणि नागरिकांची मिळणारी दाद असे चित्र 'हॅपी स्ट्रीट'वर निर्माण झाले.

'करवीर नाद'चा घुमला निनाद पारंपरिक वाद्यवृंदाच्या साथीने पथकातील कलाकारांनी महाराष्ट्रीयन, राजस्थानी आणि केरला संगीत प्रकार पेश केला. सप्टेंबर २०१५ मध्ये 'करवीर नाद' या ढोल ताशा पथकाची स्थापना झाली. येत्या २६ जानेवारी रोजी भवानी मंडप येथे ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पथकातील कलाकारांनी २१ डिसेंबर २०१५ पासून रोज सराव करत आहेत.



खुल्लमखुल्ला डान्स डान्सचा एक फ्रेश प्रकार म्हणून गेल्या काही दिवसात तरूणाईमध्ये लोकप्रिय झाला आहे आणि त्याचे नाव आहे फ्लॅशमॉब. एरव्ही थिरकायला स्टेज हवे असते, मात्र फ्लॅश मॉब या प्रकारचा डान्स थेट प्रेक्षकांच्या गर्दीतच केला जातो. हॅपी स्ट्रीटवर दोन तास रंगलेल्या कलागुणांच्या सफरीची सांगता झाली ती चैतन्य आणि ग्रुपच्या फ्लॅश मॉबने. चैतन्य वज्रमुष्ठी, सुशांत ऐतवडेकर, शुभम पाटील, संग्राम पाटील, समृद्धी सदलगे, अश्विनी जगताप, मयुरी पाटील, जीनल माने आणि कैवल्य काळे यांनी फ्लॅश मॉबमध्ये कॉकटेल गाण्यावर ताल धरला आणि मॉबला धरायलाही लावला. ब्ल्यू जीन्स आ​णि काळा टी शर्ट असा ड्रेसअप केलेल्या या ग्रुपने ​जुम्मे की रात है...आज की पार्टी मेरी तरफ से अशा टॉप गाण्यांवर मॉबमध्येच डान्स केला. चैतन्यग्रुपसोबत हॅपी स्ट्रीटवर धमाल करायला आलेल्यांनीचीही पावले थिरकायला लागली.

आरोग्यासाठी सहजमार्ग आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती मिळणे कठीण होऊन बसले आहे. रोजच्या रॅट रेसमध्ये धावताना स्वतःच्या आणि मनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागला आहे. त्यावरही हॅप्पी स्ट्रीटच्या माध्यमातून अनेकांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात सहभागी सहजमार्ग स्पिरिच्युलिटी फाउंडेशनच्या ध्यान मार्गदर्शन वर्गाला जवळपास ५०० हून अधिक लोकांनी भेट दिली. रिलॅक्सेशन टेकनिकद्वारे संपूर्ण शरीर रिलॅक्स करणे हा ध्यान धारणेतील पहिला टप्पा होता. त्यासाठी एक ऑडिओ टेप ऐकविण्यात येत होती. त्यानंतर पंधरा मिनिटांचे हृदयानुभूती देणारे ध्यान शिकविले जात होते. जवळपास ५०० लोकांनी रिलॅक्सेशन टेकनिकची अनुभूती घेतली, तर त्यातील तीनशे जणांनी ध्यान धारणेचा दुसरा आणि मुख्य टप्पा देखील अनुभवला. ध्यान करणे शिकवणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत होते.

थरार फ्लाइंग फॉक्सचा केवळ रस्सीच्या सहाय्याने शंभर फूट उंचीवरुन जमिनीवर येण्याचा थरार बालचमूने अनुभवला. हिल रायडर्स ग्रुप व माउंटन स्पोर्टसच्यावतीने अॅडव्हेंचर स्पोर्टसची ओळख करुन देण्यासाठी प्रात्यक्षिके सादर केली. हॉकी स्टेडियमच्या पॅव्हेलियनवरुन सोडलेली दोरी व त्या दोरीमध्ये अडकवण्यासाठी असलेले लॉकच्या सहाय्याने एक एक करत उतरणारी मुले, मुली पाहून पॅव्हेलियनवर त्यासाठी रांगच लागली होती. प्रमोद पाटील, विनोद कांबोज यांच्याबरोबर जयदिप जाधव, मयूर लवटे, प्रसाद आडनाईक, शिवतेज पाटील, निखिल कोळी, ऋषिकेश पोवार, राणोजी पाटील, विशाल मोरे, सुहास बेलेकर, संदीप कोळेकर यांच्या टिमने मुलांना या फ्लाईंग फॉक्सची थरारक सफर घडवली. तर समीट अॅडव्हेंचरर्सच्यावतीने क्लायम्बिंगसाठी कृत्रिम वॉल उपलब्ध करुन दिली होती. परेश चव्हाण यांच्या सहाय्याने अनेक मुलांनी त्यावर चढण्याचा, उतरण्याचा आनंद घेतला.



डान्ससोबत व्यायामही 'एक्झरसाइज वुईथ फन' अशी टॅगलाइन असलेल्या एरोबिक्सच्या ठेक्यावर निकिता दोरकर आणि ग्रुपने हॅपी स्ट्रीटवर आलेल्या कोल्हापूरकरांना फिटनेस मंत्रा दिला. निकितासोबत प्रियांका जामसांडेकर, कवन पेडणेकर आणि शलाका शहा यांनी एरोबिक्सवर डान्सस्टेप्स केल्या. त्यापूर्वी निकिता यांनी एरोबिक्सची रंजक माहिती देत हा व्यायामप्रकार अगदी स्वयंपाकघरात काम करताना, बागेत झाडांना पाणी घालताना किंवा ऑफीसमध्ये पाच मिनिटे वेळ काढून लंचब्रेकमध्येही करता येत असल्याचे सांगितले. पाय आणि शरीराची लयबद्ध हालचाल करत एरोबिक्स कसे करायचे हे दाखवत निकिता आणि ग्रुपने उपस्थितांनाही ठेका धरायला लावला. सध्याच्या तणावात रिलॅक्सेशन महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे पुन्हा व्यायाम करतानाही गंभीर होण्यापेक्षा हसतखेळत आणि नाचत व्यायाम करण्याची ही कला म्हणजे एरोबिक्स. थिरकायला लावणाऱ्या म्युझिकचा ताल आणि त्यावर शरीराला ठेका धरायला लावणाऱ्या स्टेप्समुळे डान्सही आणि व्यायामही हा आनंद देणाऱ्या एरोबिक्सने रविवारच्या सकाळी हॅपीस्ट्रीटलाही ताजेतवाने करून टाकले.

स्केटिंगचा थरार हॅप्पी स्ट्रीमध्ये एस के रोलिंग अकॅडमीची ६० मुले-मुली सहभागी झाली होती. यात अडीच वर्षांच्या चिमुकल्यांपासून १०-१२ वर्षांच्या मुलांचा समावेश होता. या सर्व मुलांचे स्केटिंग कौशल्यापासून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. यातील यश पाटील याने लिंबो स्केटिंगसह स्केटिंगची सर्व प्रत्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटवर थिरकली तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिट्ट्यांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट, हिप हिप हुर्रेर्रेचा गजर अशा वातावरणात रविवारची सकाळ शहरवासियांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरली. 'महाराष्ट्र टाइम्स' ने हॉकी स्टेडियमच्या रस्त्यावर आयोजीत केलेल्या 'हॅपी स्ट्रीट' वर शहरवासियांनी धम्माल केली. डान्स, पारंपारिक खेळ, मर्दानी खेळ, सायकलिंग, ढोल वादन अशा कला क्रीडा प्रकारांमध्ये उत्साहाने सहभागी होत तरुणाईने मजा लुटलीच. शिवाय लहानग्यांसह सीनिअर सिटीझन्सनही या अनोख्या उपक्रमाम सहभागी झाले होते.

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजीत केलेल्या हॅपी स्ट्रीटच्या उपक्रमास रविवारपासून सुरूवात झाली. श्री रेणुका मंदिर ते मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या मार्गावर 'हॅपी स्ट्रीट्स'या अनोख्या उपक्रमात तरुणांईने जोश, जल्लोष साजरा झाला. भीमा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, प्रेस्टिज ग्रुप, वेदार्जुन इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, स्कोडा श्राइन ऑटो आणि दि कोल्हापूर अर्बन बँक उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. यासाठी कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर पोलिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहकार्य लाभले.

कुठे विटी दांडू-गोट्या-रस्सीखेच, मन एकाग्रता, सायकलिंग, टॅटू पेटिंग, मर्दानी खेळाचा आखाडा, फुटबॉल, योगा क्लास, एकापेक्षा एक अशा विविध कला, क्रीडा प्रकारांमधून शेकडो कोल्हापूरवासियांनी कडाक्याची थंडी असतानाही रविवारी 'हॅप्पी ​स्ट्रीट्स' वर फुल टू धम्माल केली. मर्दानी खेळाची प्रात्याक्षिकांतही तरुणाईने थरारक प्रात्याक्षिके केली. करवीर नाद या मानद ढोलताशा पथकातून युवकांनी पांरपारिक आणि संस्कृतीचे दर्शन दाखविले. अक्षय डोंगरे, विक्रम रेपे, मनिष आपटे यांनी निवेदन केले.

हलगीवादक संजय आवळे यांच्या हलगीच्या कडकडाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कर्व्हज् जीम्सच्या वतीने निकीता दोरकर आणि ग्रुपने अॅरोबिक्स सादर करुन अनेकांना डुलायला लावले. संयोगिताज् तपस्या कला अकादमीच्या आर्पिता डाफळे यांनी भरतनाट्यम सादर करुन भारतीय कलेचे दर्शन घडविले. कनिष्क कांबळे हिने एकपात्री प्रयोग सादर केला. सानिया शिडलकरने नृत्य सादर केले.

शेफाली मेहता आणि ग्रुपने सादर केलेल्या झुंबा डान्सला उपस्थितांनी दाद केली. मराठी अभिनेते सचीत पाटील आणि अभिनेत्री गौरी नलवडे यांनी तरुणाईला डोलविले. विनायक सासने या युवकाने हनुमान चालिसा म्हटली. समृद्धी पाटील आणि ग्रुपने साडी के फॉल सा गीत गायिले. नगरसेविका वृषाली कदम यांनी मशहून मेरे इश्क की कहानी गीत गाऊन उपस्थितांना थक्क केले. डीआयडी ग्रुपने खुर्चीवर नृत्य सादर करुन अनेकांची वाहवा मिळविली. अपूर्वा पाटीलने गीत सादर केले. कराओके ट्रॅकवर राज ओसवालने गीत गायिले. ओजस्व पाटील या बालकाने शिवरायांचा वीरप्रताप स्फूर्तीगीतांतून सादर करुन उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.



उदघाटन अन् जल्लोष उदघाटन कार्यक्रमावेळी व्यासपीठावर महापौर आश्विनी रामाणे, नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेवक संतोष गायकवाड, भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अभिजित मगदूम, वेदार्जुन इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमोल वाडियार, नगरसेवक दुर्वास कदम, नगरसेविका वृषाली कदम यांच्यासह महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, रिस्पॉन्स विभागाचे सीनिअर मॅनेजर मधुर राठोड, मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी, आरएमडी हेड दिगंबर अतिग्रे, ब्रँड विभागाचे अक्षय शिंदे उपस्थित होते. यावेळी गुरुबाळ माळी यांचे काश्मिरी कयामत पुस्तक पाहुण्यांना भेट म्हणून देण्यात आले.

फ्रेंड्स' थिरकले नुकत्याच प्रदर्शित होत असलेल्या 'फ्रेंड्स' सिनेमातील अभिनेते सचित पाटील व गौरी नलवडे यांनाही 'हॅप्पी ​स्ट्रीट'वर रंगलेले हे वातावरण पाहून ​संगीतावर थिरकरण्याचा मोह आवरला नाही. शेफाली मेहता यांच्या झुंबा ग्रुपच्या सादरीकरणावेळी त्यांचे आगमन झाले. झुंबाची चाहती असलेल्या गौरीने शेफाली मेहतांबरोबर ताल धरून त्या स्टेप्सवर दिलखुलास मस्ती केली. सचित पाटीलनेही झुंबाच्या क्रेझची अनुभूती घेतलीच, शिवाय त्याला प्रतिसाद देणाऱ्या कोल्हापूरकरांसोबत सेल्फी घेतली. मेहता यांच्या ग्रुपबरोबर सचित, गौरीने समोरील जल्लोषी कोल्हापूरवासियांसोबतची घेतलेली सेल्फीने या 'हॅप्पी ​स्ट्रीट' ची क्रेझ दाखवून दिली.

सहभागी संस्था, व्यक्ती

करवीर नाद ढोलताशा पथक अनुभूती योगा सेंटर - योगा एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमी एक्स्प्लोर कोल्हापूर-सायकलिंग सहजमार्ग ‌स्पिरिच्युलिटी फौंडेशन चैतन्य आणि ग्रुपचा प्लॅश मॉब गोल्ड जिमतर्फे - क्लिन कोल्हापूर टेंपररी टॅटू - मंदार कुंभार, कलाकार शिवसंस्कार प्रतिष्ठान - मर्दानी खेळ झुंबा डान्स - शेफाली मेहता शिवाजीराव जेऊरकर तपस्या सिद्धी - भरतनाट्यम् व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे ग्रुप हिल रायडर्स ग्रुप, माऊंटनस स्पोर्टस कोल्हापूर जिल्हा मेन, वूमेन रायफल शूटिंग असोसिएशन एरोबिक्स - निकिता दोरकर पारंपारिक खेळ - वणित ढवळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबील सरकारनेच भरावे

$
0
0

कदम यांचा खासदार पाटील यांना टोला

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

म्हैसाळ सिंचन योजनेच्या विजेचे बील सरकारनेच भरलेच पाहिजे, आपण भरतच होतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांवर जबाबदारी टाकण्याची गरज नाही. मात्र त्यासाठी सत्तेत असणाऱ्यांनी आग्रह धरला पाहीजे, असे मत माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले. सरकारी तिजोरीत कधीच खडखडाट नसतो ती रोजच भरत असते, अशी टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला.

कदम म्हणाले, 'टंचाईच्या काळात म्हैसाळ योजनेचे वीजबील सरकारने भरलेच पाहिजे. सरकारला अशक्य असे काहीही नसते. या बाबतचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार कॅबिनेटला असतात. सत्तेत जिल्ह्यातील लोक भरपूर आहेत. जनतेने त्यांना संधी दिली आहे. त्यांनीच आता या कामाचा आग्रह धरावा. आपण मंत्री असताना जनहिताचे सर्व निर्णय तत्काळ घेत होतो. अगदी खडसेंसह सध्याच्या अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलही बिलेही त्या-त्यावेळी भरली आहेत. जे लोक बील भरणार आहेत, त्यांना आपण कधीच नको म्हटलेले नाही. टेंभू-ताकारी व म्हैसाळसची तुलना होऊ शकत नाही. ती करू नये.'

दीड वर्षांत या लोकांनी काय-काय केले, हे लोकच प्रश्न विचारतील. आपण त्याबाबत काही बोलण्याची गरज नाही. या जिल्ह्यातील या लोकांची सरकारमध्ये ताकद आहे की नाही हे जनताच सांगेल असेही उत्तर कदम यांनी एका प्रश्नाला दिले.

महापौर पद महिन्याभरात बदलण्यात येणार आहे. आपण लक्ष घालणार आहात काय? बैठक घेणार आहे काय? या प्रश्नावर उत्तर देताना कदम यांनी सावध भूमिका घेतली. लोकांनी बोलावले तरच मनपात लक्ष घालणार आहे. यासाठी लवकरच नगरसेवकांची बैठक घेऊ, असेही कदम म्हणाले. यापुढे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसही आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहकार मोडून काढू नका

बँकेच्या गैरप्रकारात अडकलेल्या संचालक मंडळावरील बंदीबाबत बोलताना कदम म्हणाले, सहकाराबाबतचे निर्णय तपासणे गरजेचे आहे. देशातील एकूण सहकाराच्या पन्नास टक्के सहकार हा महाराष्ट्रात आहे. सहकारामुळे सर्वसामान्य माणसांची प्रगती झाली. यामधील ज्या चुका आहेत त्यांना जरूर शिक्षा करा मात्र सहकार मोडून काढू नका, असे आवाहनही कदम यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्य जनतेशी बांधिलकी

$
0
0

पाटण येथील कार्यक्रमात शरद पवार यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, कराड

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विकासाच्यामागे धावतो आहे. केंद्र असो अथवा राज्यात असो आपली सत्ता असो वा नसो त्याची आम्हाला कधीच फिकीर व चिंता वाटली नाही. त्यापेक्षा सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांना ताकद देण्याचे काम, त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्याचे काम आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक व कर्तव्य भावनेने केले आहे, यापुढेही करीत राहणार आहे, ' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. पाटण येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. या वेळी माजी खा. लक्ष्मणराव पाटील, माजी ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील, आमदार विक्रमसिंह पाटणकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'केंद्रात कृषिमंत्री असताना कापसाला ५६०० रुपयांपर्यंत भाव दिला. आता तो ३४०० रुपये इतका खाली आणला गेला आहे. केळीला १२ रुपये किलो दर दिला जात होता. आता २.५० रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये मागील निवडणुकीमध्ये झालेली चूक दुरूस्त करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे करण्याची भावना निर्माण झाली आहे. देशातील व राज्यातील तमाम जनतेने राष्ट्रवादीच्या पाठीशी शक्ती उभी करावी. जनतेचा विश्वास हेच आमचे धन आहे.' कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, आयोजक माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी मंत्री जयंत पाटील यांनाही मनोगत व्यक्त केले.

आमदार पाटणकारांच्या कामांचे कौतुक

१९८३च्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने विक्रमसिंह पाटणकर यांच्या हाती या तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. रस्ते व दळणवळणाचा प्रश्न गंभीर होता. २४६गावे, वाड्यावस्त्या अंधारात खितपत पडलेल्या होत्या. १९८३साली मी विरोधी पक्षनेता असताना विक्रमसिंह पाटणकर यांनी तालुक्यातील १४७ रस्त्यांचा प्रश्न आपल्यासमोर मांडला. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या समवेत आपण या रस्त्यांच्या कामांसाठी बैठक आयोजित केली व एका बैठकीत या सर्व १४७ रस्त्यांच्या कामाचा प्रश्न निकालात काढला. तालुक्यात पवनचक्क्यांचे जाळे सर्व प्रथम विक्रमसिंह पाटणकर यांनी उभे करून संपूर्ण देशाला अपारंपारिक ऊर्जा निर्मितीची दिशा दिली, असेही पवार म्हणाले.

पाटणला एक कोटींचा निधी देणार

सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर घार्गे, नरेंद्र पाटील हे तीन विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या निधीतून रामराजे नाईक निंबाळकर यांनी दक्षिण कराडसाठी, घार्गे यांनी माणसाठी तर नरेंद्र पाटील यांनी पाटणसाठी प्रतिवर्षी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. नरेंद्र पाटील यांनी त्यांचा जास्त निधी पाटण तालुक्यासाठी उपलब्ध करून द्यावा. मी स्वत: राज्यसभेचा खासदार आहे. माझ्या निधीतून पाटण तालुक्यातील विकासकामांसाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देतो, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसाबंदी नावापुरतीच

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्यात तीनही नद्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाने नियोजन आणि चिकोत्रात उपसाबंदी करुनही चिकोत्रा खोऱ्यात ३६ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. केवळ पाटबंधारे विभागाने प्रयत्न करून हा प्रश्न सुटणारा नाही. तर दर महिन्याला पिण्यासाठी सोडल्या जाणाऱ्या पाणी शेतकरी विवीध मार्गानी उपसाबंदी असतानाही चोरुन वापरतात आणि ग्रामपंचायतींचेही दुर्लक्ष होत आहे. महसूल विभाग डोळेझाक करतो त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

चिकोत्रा धरणातील पाण्यावर ३६ गावांमधील २७०० हेक्टर ऊस तहानलेला आहे. परिणामी शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. याला कारणा म्हणजे १४ टक्के ऊस आणि ८६ टक्के रब्बी पिके असा नियम असताना शेतकऱ्यांनी वशिल्याने ८६ टक्के ऊस आणि १४ टक्के रब्बी पिके घेतली आहेत. भरीत भर म्हणून लाभक्षेत्राच्या बाहेरही पाणी नेले आहे. त्यामुळे आता आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणून शेतकरी पिण्यासाठीही पाणी मिळत नाही म्हटल्यावर चोरुन आकडा टाकून पाणी उपसतात. गलगले भागातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी ४० इंजिनपंप खरेदी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उपसाबंदीला पर्याय शोधल्यानेच आता सजग होण्याची गरज आहे. कारण ४८० पैकी दर महिन्याला ४० एम.सी.एफ.टी. पाणी केवळ पिण्यासाठीच सोडण्याचे नियोजन झाले आहे.

दुर्लक्षच कारणीभूत

नदीकाठाला असणाऱ्या जॅकवेलला इंटक टाकावे लागते. ज्यामुळे नदी कोरडी पडली तरी पिण्याच्या जॅकवेलला पाणी कमी पडत नाही. परंतु यावर्षीच पाणटंचाई जाणवली. त्यामुळे ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेतलेली नाही. बऱ्याच गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले नसल्यास वेदगंगा नदी कोरडी पडते. २० वर्षात नदी ठणठणीत कोरडी पडल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वझऱ्यातील आगीत २५ शेळ्या मृत्युमुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्याच्या पश्चिमेकडील भुदरगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वझरेपैकी वाडीत शेडला लागलेल्या आगीत २५ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. शनिवारी (ता.९) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांसह पंचनामे केले. सुमारे अडीच-तीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या शेतक ऱ्याला तातडीची पाच हजार रुपये मदत तहसीलदार ठोकडे यांनी जाहीर केली.

वझरेपासून एक किलोमीटर अंतरावर भिकाजी घमे यांचे शेत आहे. तेथेच घर बांधून ते राहतात व शेळीपालन करतात. शेळ्यांसाठी त्यांनी घराच्या पाठीमागील बाजूकडे शेड उभारले आहे. त्यामध्ये २६ शेळ्या बांधल्या होत्या. शेळींना डासांचा त्रास होऊ नये म्हणून दररोज शेकोटी केली जाते. मात्र ही शेकोटी पूर्णपणे विझली नसल्याने रात्री वाऱ्याच्या झोताने त्यातील उडालेल्या ठिणगीने खोपवजा शेड पेटू लागले. आजरा सूतगिरणीमध्ये कामाला असणारा एकजण रात्री १२च्या सुमारास गावी परतत होता. त्याला गावच्या जंगलाकडील बाजूला काहीतरी पेटत असल्याचे दिसले. त्याने ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिल्यावर मदतीसाठी सर्वजण धावले.

दरम्यान रात्री घमे कुटुंबीय जेऊन झोपी गेले होते. पण शेडला लागलेल्या आगीत होरपळू लागल्याने शेळ्या मोठमोठ्याने ओरडू लागल्या. या आवाजाने घरातील लहान मुलांना जाग आली व त्यांनी आरडा-ओरडा करून सर्वांना जागे केले. दरम्यान शेड पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी नजिकच्या पाणी योजनेतून पाणी आणून आग विझविण्यात आली. मात्र आगीमध्ये शेडमध्ये बांधलेल्यापैकी २५ शेळ्या होरपळून गेल्याने मृत्यूमुखी पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्याग्रस्त मुलांचे पालकत्व घेऊ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

जैन धर्मियांतील सर्व पंथांनी मतभेद विसरून एकत्र आल्यास सामाजिक स्तरावर जैन धर्म देशाच्या प्रगतीला दिशा देऊ शकतो. तसेच जैन समाजाच्या सद्यस्थितीतील प्रगतीमध्ये व राष्ट्राच्या उभारणीमध्ये भारतीय जैन संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत असून येथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व भारतीय जैन संघटना जबाबदारीने पार पाडेल, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी केले. ते कुंभोजगिरी, बाहुबली (ता. हातकणंगले) येथे भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित राज्य अधिवेशनामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते.

मुथा म्हणाले, संपूर्ण देशामध्ये भारतीय जैन संघटनेने ३० वर्षांपासून समाजसेवेचे व्रत अंगिकारले आहे. त्यामध्ये देशातील तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, गुजरात, नेपाळ या राज्यात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघटना वेळीच दाखल होऊन भरीव अशी मदत केली आहे. यापुढेही महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सर्व्हेक्षण करून त्यावर उपाय शोधण्यासाठी भारतीय जैन संघटना कार्यरत राहणार आहे. बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतील गाळ काढून ते तलाव स्वच्छ करत हजारो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. सध्या धार्मिक कार्यावर प्रचंड पैसा खर्च होतो. हा पैसा समाजाच्या सामाजिक संशोधनावर व व्यवस्थापनावर खर्च करण्यासाठी भारतीय जैन संघटना अग्रेसर राहणार आहे, असेही मुथा यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, 'भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांची सामाजिक बांधिलकी जोपसण्याची वृत्तीचे इतर सामाजिक संघटनेने अनुकरण गरजेचे आहे. या संघटनेने आपल्या कार्यातून महाराष्ट्र सरकारला दिशा देण्याचे काम केले आहे.'

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख म्हणाले, 'जैन समाज हा लोकसंख्येच्या अर्धा टक्केदेखील नाही. तरीही देशाच्या विकासामध्ये जैन समाजाचे भरीव योगदान आहे. यापुढे स्टुंडट एज्युकेशनल टूर ही संकल्पना राज्यभर राबविणार आहे.

यावेळी उद्योगपती संजय घोडावत यांनी संघटनेच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

राज्याध्यक्ष पारस ओसवाल यांनी जैन समाजासाठी शिक्षण व व्यवसायावर लक्ष द्यावे, असे आवाहन करून येथून पुढे संघटना शैक्षणिक प्रबोधन, महिला सबलीकरण असे अनेक विद्यायक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी अनिल पाटील यांनी संपादित केलेल्या बी. जे. एस. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गुजरात अध्यक्षा मालतीबेन मेहता, कैलासमलजी दुग्गड, अॅड. प्रकाश सुराणा, महेश कोठारी, हस्तीमल बंब, अशोक संघवी, राकेश जैने, सूदर्शन जैन, विक्रांत नाईक, डॉ. शीतल पाटील, सुरेश पाटील-सांगली, बी. टी. बेडगे, बाबासो पाटील, जनता उद्योगसमुहाचे आण्णासो शेंडूरे, डी. सी. पाटील, स्वरूपा पाटील-यड्रावकर, चंदनलाल बाफना, धनराज बाकलीवाल, रावसो भिलवडे आदींसह जैन धर्मिय मोठया संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढ‌ीव बिलप्रश्नी ऊर्जामंत्र्यांना भेटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सरकार निर्णय पायदळी तुडवीत, यंत्रमाग व्यावसायिकांना वाढीव दराने वीज बील वसुली सक्तीची केल्याच्या निषेधार्थ वीज बिल न भरण्याचा निर्णय सत्त्वशील माने यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग व्यावसायिकांनी घेतला आहे. याची गंभीरपणे अन् तात्काळ दखल ऊर्जा मंत्रालयाने घेऊन त्यांना शिष्टमंडळासह १२ जानेवारीला मुंबई येथे बैठकीस बोलावले आहे.

यंत्रमाग व्यवसायिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वीज बिलांचा प्रश्न गंभीर आहे. अनेकांनी याचा धसका घेऊन व्यवसायच बंद केला आहे. ऊर्जा मंत्री बबनराव बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जून रोजी ४.५५ रुपयांनी सुरू असलेले वाढीव वीज बील कमी करुन २.६६ रुपयांनी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने यंत्रमाग व्यावसायिकांना दिलासा मिळाला. सरकारने याचे परिपत्रकही काढले आहे.

मात्र वीज बील कंपनीने हा शासन निर्णयच धाब्यावर बसवत गेली सहा महिने ४.५५ रुपयांनी वाढीव विज बिले पाठवून कोट्यवधीची लूट केली असल्याचे यंत्रमाग व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

ऊर्जा मंत्रालयातून आपल्याला फोनद्वारे संपर्क करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी शासन निर्णय देऊनही ही वीज कंपनी मनमानीपणे वाढीव बिले वसूल करून यंत्रमाग व्यवसाय बंद पाडण्याच्या भूमिकेत आहे. हे दुर्दैवी आहे. २.५५ रुपयांनी दर झाल्याची घोषणा आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी सहा महिने होत नाही याकडे त्यांनी का लक्ष दिले नाही? हा प्रश्नच आहे.

मला १२ तारखेला बोलावले आहे. माझा या व्यवसायाशी गेली १० वर्षांचा अनुभव आहे. यातील बारकावे मला माहीत आहेत. मी या व्यवसायाच्या अडचणीचा पाढाच त्यांच्यापुढे वाचणार आहे. यामधून सकारात्मक निर्णय होतील, असा विश्वासही माने यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पक्षांतर्गत तडजोड म्हणून पन्हाळा नगरपरिषदेसाठी सव्वा वर्षांच्या नराध्यक्षपदाचा फार्म्युला सर्वमान्य असताना आसिफ मोकाशी यांनी पद सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जनसुराज्यच्या ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे, अशी माहिती जनसुराज्यशक्ती पक्षप्रतोद व नगरसेवक विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या नगरपरिषदेवर जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. नराध्यक्ष आसिफ मोकाशी यांच्या निवडीवेळी काही वाद व मतभेद निर्माण झाले होते. त्या मतभेदाचे रुपांतर दोन गटात झाले. मोकाशी यांनी आपला स्वतंत्र मोकाशी गट निर्माण करण्यात आला. या स्वतंत्र गटामुळे माजी मंत्री विनय कोरे यांना विधानसभेत मताधिक्याचा पन्हाळ्यावर फटका बसला. तरीसुद्धा मोकाशी गटाशी उर्वरित सर्व नगसेवकांनी वेळोवेळी साथ देत पन्हाळाची विकासाची कामे व होणारे ठराव मंजूर केले. नुकत्त्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत मोकाशी गटाने आपले आस्तित्व स्वतंत्र्य ठेवले. या अविश्वास ठरावाचे पडसाद उमटले. दरम्यान,माजी मंत्री विनय कोरे, आमदार हसन मुश्रीफ व पक्षाचे प्रतोद विजय पाटील व आजी-माजी नगरसेवक यांनी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांना राजीनामा देण्याविषयी विनंती केली. तथापि मोकाशी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे गेली सहा महिने पन्हाळ्याच्या विकासकामांना पूर्णपणे विराम मिळाला आहे.

पन्हाळा सध्या जनसुराज्यची सत्ता आहे. मात्र, असिफ मोकाशी विनय कोरेंना जुमानत नाहीत. त्यांना पदावरून हटविण्याचा मुहूर्त साधारणत: विधानपरिषद निवडणुकीनंतरचा असेल अशी अटकळ बांधली जात होती. तरी खरी ठरली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे ११ आणि असिफ मोकाशी यांच्या गटाचे ६ नगरसेवक आहेत. तरीही मोकाशी यांनी कोरे यांना शह देत आजपर्यंत आपले पद शाबूत ठेवले होते. ठराव दाखल झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. सैनी याबाबत कायदेशीर मत मागवणार आहेत.

माझे नगराध्यक्ष पद हे पूर्ण कार्यकाळ राहील. माझ्या पदाला कोणताही धोका राहणार नाही. अविश्वास ठराव दाखल झाला असला तरी तो मंजूर होईल असे वाटत नाही. त्यामुळे मला काळजी नाही.

- आसिफ मोकाशी, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेआधी नियोजन गरजेचे

$
0
0

दीपक जाधव, पन्हाळा

श्रीक्षेत्र जोतिबा मंदिराच्या आवारात देवबाव, कापूरबाव, चोपडाईबाव तसेच यमाई मंदिर परिसरातील प्राचीन मुरधीधर तळे, यमाई तळे (जमदग्नी तीर्थ) हे नैसर्गिक जलाशय आहेत. यांना बारमाही पाणी असते. या नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरज्जीवन केल्यास जोतिबावरील पाण्याचा प्रश्न ताततडीन मिटेल. ज‌ोतिबाची यात्रा आली की या कामांच्या मागे प्रशासन लागते. जोतिबा यात्रेआधी वाहनतळ, सनसेट पॉईंट व दीपमाळ आदींची नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

उत्तर कोपऱ्यात देवबाव आहे. या तीर्थातील पाण्याचा वापर देवांच्या अंघोळीसाठी केला जातो. जोतिबा मंदिराच्या दक्षिणेस व दक्षिण प्रवेशद्वाराच्या पश्चिमेस चोपडाईबाव जलाशय आहे. या विहिरीच्या पूर्व बाजूला मंदिरातील पाणी भुयारी गटारीद्वारे आणून सोडले जाते. तेथेच पाणी मुरते. या जलाशयाचे नूतनीकरण व्हावे. यमाई मंदिर परिसरातील विहीरवजा तळे आहे. १७३० मध्ये राणोजी शिदे यांनी यमाई तळे बांधल्याचा उल्लेख आहे. यमाई मंदिराच्या वायव्येस थोड्याच अंतरावर मुरलीधराचे तळे आहे. कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी १७४३ मध्ये याचे बांधकाम केल्याचे उल्लेख आहे. १९५० मध्ये प्रितीराव चव्हाण, हिम्मतबहाद्दर यांनी हे विस्तीर्ण तळे बांधले आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारे देशातील एक अव्वल दर्जाचे पर्यटन केंद्र या स्वरूपात जोतिबा व परिसराचा विकास करण्याची योजना आखली होती. यानुसार एखादा पिकनिक पॉइंट असावा म्हणून चव्हाण तळ्याचा विकास केला जाणार होता. मात्र, तो रखडला आहे.

वाहनतळ, सनसेट पॉइंट दुरुस्ती गरजेची

डोंगरावरील सर्व जलाशयांचा विकास नूतन आराखड्यात केल्यास नवसंजीवनी मिळेल. डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वेगवेगळे वाहनतळ निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३५० चौरस मीटर जागा राखीव आहे. डोंगरावर येणारी वाहने कोठेही लावली जातात. ठिकठिकाणी वाहनतळ गरजेचे आहे. डोंगरपठारे, टेकड्या यांचा फायदा घेऊन सूर्यास्तदर्शन होण्यासाठी सनसेट पॉइंट केल्यास पर्यटक आकर्षित होतील. मंदिरासमोर पूर्वी चार दीपमाळा होत्या. सुंदर जोतिबा योजनेच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे यातील दोन व श्री काळभैरव मंदिरासमोर दोन, सेंट्रल प्लाझा उद्यानात हलविल्या त्याचीही दुरवस्था झाली आहे. सेंट्रल प्लाझा समोरील दगडी दीपमाळ अर्धा रविवारी रात्री भाग निखळून पडला आहे. दीपमाळेच्या शेजारी दुकाने आहेत. रहदारीचा मार्ग आहे. रात्रीच्यावेळी ही दीपमाळेचा दगड पडल्याने जीवितहानी टळली. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहिष्णूतेची परंपरा भक्कम करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दादरी प्रकरण, पुरस्कार वापसी यामुळे असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले असले तरी लोकशाहीची मूल्ये, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद या बळावर सहिष्णूतेची परंपरा भक्कमपणे निर्माण करता येईल,' असा सूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७ व्या साहित्य संमेलनात उमटला. 'महाराष्ट्र सहिष्णू आहे का? ' या विषयावर प​रिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.

विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी महाराष्ट्रातील संतांनी समतेची शिकवण दिली असली तरी अनेकांनी वर्णाश्रम आणि जातीयतेची चौकट भक्कम केल्याचे निदर्शनास आणले. ते म्हणाले, 'खैरलांजी प्रकरण, विचारवंतांची हत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जातीविरोधात विवाह केल्यामुळे टाकला जाणार बहिष्कार या घटना विषण्ण करणाऱ्या आहेत. दुष्काळांनी शेतकरी होरपळत असताना राजकीय नेत्यांच्या वारसदारांचे विवाह सोहळे धूमधडाक्यात होतात.यावरून महाराष्ट्र खरोखर सहिष्णू आहे का ? असा प्रश्न पडतो. स्त्री-पुरुष समानता निर्माण झाल्याशिवाय आणि जातीभेदाच्या ​भिंती संपल्याशिवाय समाजात समानता नांदणार नाही.'

सहिष्णूता आणि असहिष्णूता यातील फरक स्पष्ट करताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, 'माणसांशी माणसासारखे वागणे, त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे सहिष्णूता होय आ​णि माणसाने माणसांचा द्वेष करणे म्हणजे असहिष्णूता होय. मात्र, ज्या कोयना विद्युत प्रकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा डोलारा उभा राहिला आहे, त्या कोयनेतील प्रकल्पग्रस्तांचे ५०-५५ वर्षांतही पुनर्वसन झाले नाही. १९६० मध्ये ३०१ गावे विस्थापित झाली. आजही १७०० कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या हालअपेष्टा पाहिल्या की, त्यांच्याप्रति समाज सहिष्णूतेने वागला का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'अनेक क्षेत्रांत आजही पुरुषी आणि जातीय वर्चस्व आढळते, हे असहिष्णूतेच लक्षण आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी सहिष्णू राहिला असता तर टोलमुक्ती झाली असती का?' पुरस्कार वापसीप्रश्नी मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, 'दादरी प्रकरणानंतर पंतप्रधानांनी मौन सोडणे आवश्यक होते. पंतप्रधानांचे मौन आणि काहींची चिथावणीखोर वक्तव्ये यामुळे स्थिती बिघडली. मात्र बिहार निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर पुरस्कार वापसी थंडावली आहे.'

शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत म्हणाले, 'साहित्यात खऱ्या अर्थाने शेतकरी, त्यांच्या समस्यांची नाळ कुठेच आढळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालाचे भाव, दुष्काळ प्रश्न भेडसावत असताना बुद्धीवादी, साहित्यिक काहीच भू​मिका मांडत नाहीत. पुरस्कार वापसी करणारे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई कधी करणार? श्रमजीवी वर्गाला प्रतिष्ठा निर्माण झाली तरच सहिष्णूता निर्माण होईल.

मराठी माणसाचे दोष

महात्मा फुले यांना झालेला विरोध, आगरकरांची काढलेली अंत्ययात्रा याचे दाखले देत महाराष्ट्रात असहिष्णूता पूर्वीपासून चालत आल्याचे विचारवंत अशोक चौसाळकर यांनी सांगितले. मध्ययुगीत कालखंडाचा पोकळ अभिमान, हिंसेचे समर्थन, भिनलेली जातीयता आणि न्यूनगंड हे मराठी माणसातील चार दोष दूर करणे गरजेचे होते, हे आचार्य विनोबा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी एस एम जोशी यांना सांगितले. हे दोष दूर करूनच चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे चार दोष घेऊनच शिवसेनेचा जन्म झाला आणि राजकीय वाटचाल झाली. हिंसेचे समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीनेच कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून केला. राज्यकर्त्यांच्या पाठबळामुळे चुकीच्या गोष्टी फोफावत असल्या तरी त्यावर मात करून समानतेचा धागा गुंफत महाराष्ट्रात सहिष्णूतेची परंपरा निर्माण केली पाहिजे, असे चौसाळकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरसिंगरावांमुळेच ‘दौलत’ कर्जात

$
0
0

आमदार हसन मुश्रीफ यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलकर्णी (ता.चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ व पार्टीकल बोर्डमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार नरसिंग गुरूनाथ पाटील यांनी केला आहे. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेच 'दौलत' कारखाना कर्जाच्या खाईत लोटला असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. वयाचा मान राखून त्यांच्या टीकेकडे संचालक मंडळ दुर्लक्ष करत होते. मात्र अशा टीकेतून बँकेचे नुकसान होणार असल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा बँकेकडे 'दौलत'चे ६४ कोटीचे कर्ज थकीत आहे. कर्ज वसूल होत नसल्याने कारखाना सिक्युरीरायझेशन अॅक्टखाली चार वर्षापूर्वी ताब्यात घेतला आहे. प्रशासक मंडळ व नवीन संचालकांना कारखाना भाडेत्वावर देण्यासाठी निविदा प्रसिद्ध करुनही प्रतिसाद मिळाला नाही. बँकेच्या अटींचे केवळ कुमुदा शुगर्सने पालन केल्याने कारखाना २९ वर्षाच्या भाड्याने देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कंपनी मार्चपूर्वी २५ कोटी रुपये बँकेला देणार असल्याने बँकेचा परवान्यावर कोणतेही गंडातर येणार नाही. बँकेच्या हिताचा निर्णय असताना केवळ आरोप करणे चुकीचे असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंकलेखनाची ही शेवटची संधी...

$
0
0

संगणकावरील अभ्यासक्रमास सुरुवात

दीपक मांगले, गडहिंग्लज

राज्यातील बहुतांश कार्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रणाली लागू करण्यात येत असून शालेय शिक्षण विभागाने टंकलेखन परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार टंकलेखन प्रशिक्षणाची शेवटची संधी विद्यार्थ्याना प्राप्त होणार आहे. टंकलेखन मशीनवर जून २०१६ मध्ये शेवटची परीक्षा होणार आहे. तर जानेवारी २०१६ पासून सुधारित अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरु झाली आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारी नोकरीत आवश्यक असलेले टंकलेखन बंद आता संगणकावर लेखन करण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे टंकलेखनाचा खडखडाट कायमचा बंद पडला आहे.

राज्यातील बहुतांश सरकारी नोकरभरतीसाठी टंकलेखन परीक्षा आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या संगणकाच्या युगातही टंकलेखन यंत्रणा अद्याप आपले अस्तित्व टिकवून होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेतल्या जात असून इंग्रजी, मराठी व हिंदी या तीन विषयात या परीक्षा होतात.

मात्र संगणकाचे फायदे लक्षात घेऊन तरुण पिढीचा कल हा संगणक शिक्षणाकडे जास्त आहे. तसेच बहुतांशी कार्यालयांत सगणक वापरला जातो. त्यामुळे टंकलेखन अडगळीत गेल्याचे चित्र दिसून येते. परिणामी संगणकाचा वाढता वापर पाहता टंकलेखन परीक्षा व त्याच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्यात याव्यात असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सादर केला आहे.

परदेशातून टंकलेखन यंत्रणा फार पूर्वीच हद्दपार झाली असून भारतात अल्प प्रमाणात आजही याचा वापर केला जातो. मात्र आज भारतामधून सुद्धा ही यंत्रणा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. टंकलेखन उत्पादन करणारी

गोदरेज ही एकमेव कंपनीने सुद्धा गेल्या दशकभरात याचे उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे.

गडहिंग्लज व उपविभागात नऊ टंकलेखन शिकवणाऱ्या संस्था कार्यरत असून या सर्व संस्थेच्या परीक्षा गडहिंग्लजमध्ये घेतल्या जातात. गडहिंग्लजमध्ये लक्ष्मी टाइप रायटिंग इन्स्टिट्यूट ही संस्था १९८१ पासून तर विजय टाइप रायटिंग इन्स्टिट्यूट ही संस्था १९८५ पासून कार्यरत आहे.

वर्षभरात जवळपास दीड हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रवेश घेतात. या संगणक आणि टंकलेखन यांची तुलना केल्यास संगणक अग्रेसर आहे यात शंकाच नाही. मात्र तरीही टंकलेखनामुळे येणारी अचूकता व वेग मर्यादा संगणकातील 'बॅकस्पेस'मुळे साधता येणार नाही. राज्यशासनाकडून या संस्थाचालकांना कम्प्युटर टायपिंग सुरु करण्याचे सूचना मिळाल्या आहेत.

सध्याच्या धावत्या स्पर्धेत टिकण्यासाठी या संस्था चालकांना नवीन घटकाचा स्वीकार करावाच लागणार आहे. त्यानुसार तालुक्यातील तीन संस्थांनी सुधारित अभ्यासक्रमांसाठीच्या सर्व अटींची पूर्तता करून मान्यता घेतलेली आहे. तर उर्वरित संस्था चालक त्यादृष्टीने हालचाली करीत आहेत.

सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार संस्थाचालकानी टंकलेखन मशीनसह अद्यावत संगणक कक्ष उभारले आहेत. टायपिंगसह एमएस-ऑफिस, प्रिंटर, फक्स, इंटरनेट यांचाही समावेश सुधारित अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

'गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्पुटर टायपिंग बेसिक कोर्से' असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. मात्र सरकारी नोकरीसाठी अतिशय महत्वाचा घटक असलेल्या टंकलेखनाच्या जाण्याने सरकारी कार्यालयातील खडखडाट मात्र कायमची बंद होणार आहे.

टंकलेखन बंद करून त्यातील संगणकीय सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश अतिशय चांगला आहे. सरकारच्या धोरण स्वगतार्ह आहे. आजच्या स्पर्धात्मक युगातील प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम असलाच पाहिजे, त्यादृष्टीने येणाऱ्या नवीन बदलाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या हे गैरसोयीचे आहे. टायपिंग प्रशिक्षणासाठी २५०० शुल्क होते मात्र, आता सुधारित अभ्यासक्रमसाठी पाच हजार रुपये आकारले जाणार आहेत.

- बबन झोकांडे, टायपिंग इन्स्टिट्यूट चालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रीय डेअरी प्लॅन’ अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारने सन२०१०-२०११मध्ये देशातील दूध उत्पादकासाठी सुरू करण्यात आलेली 'राष्ट्रीय डेअरी प्लॅन' ही महत्त्वकांक्षी योजना सध्याचे सरकार व दूध महासंघाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आली आहे. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे राज्यातील दूध व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष व महानंदाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले, 'शरद पवार यांनी त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीत देशातील दुग्ध व्यवसाय उर्जितावस्थेमध्ये आणण्यासाठी १७३३४ कोटी रुपयांची राष्ट्रीय डेअरी योजना जाहीर केली होती. जागतिक बॅँकेच्या सहकार्याने सहा वर्षांकरीता ही योजना जाहीर करण्यात आली होती.

या योजनेसाठी जागतिक बॅँकेने १५८४ कोटी, केंद्र सरकारने १७६ कोटी व ही योजना राबविणाऱ्या १४ राज्यांतील १७४ दूध संघाचा हिस्सा २८२ कोटी तर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे २०० कोटी, असा एकूण २२४२ कोटींचा निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध झाला होता. या निधीतून देशभर दूध उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार होते. ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायास चालना देणे. दुधाळ जनावरांच्या दुग्धोत्पाद क्षमतेत वाढ करणे व त्या अनुशंगाने सर्व प्रयत्न करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आला होता. त्यानुसार देशाच्या सर्वच राज्यात या योजनेचा पहिला टप्पा यशस्वी राबविण्यात आला.

निधीबाबत संभ्रमावस्था

पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय पातळीवर नियोजन जवळजवळ पूर्ण झाले आहे. देशातील सर्वच राज्यातील सरकारे व त्या-त्या राज्यातील दूध महासंघांनी आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्फत चर्चा करुन राष्ट्रीय डेअरी योजनेचा दुसरा टप्पा राबविताना निधीचे नियोजन केले आहे. मात्र राज्यात योजनेच्या अंमलबजावणीविषयी संभ्रम अवस्था आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलाढाल ५० लाखांची

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूरः व्यायामासाठी अनुकूल हवामान, मोठ्या प्रमाणात आवक आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे मार्केट यार्डमध्ये रोज फळांची ५० लाखाची उलाढाल होत आहे. केळी, संत्री, चिकू, डाळींब, स्ट्रॉबेरीची मोठी आवक झाली आहे. फळ विक्रीच्या व्यवसायातून शहरात अंदाजे दोन हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो.

मार्केट यार्ड येथे सात ते आठ मुख्य फळ व्यापारी आहेत. त्या खालोखाल ३० ते ३५ डिस्ट्रीब्युटर आहेत. रोज सकाळी सहा वाजता फळांचा लिलाव सुरू होतो. फळांची वाहने जशी येतात तसा लिलाव सुरू असतो. उधार जास्त व रोखीने कमी व्यवहार असतो. उधार मालांसाठी जादा दोन टक्के रक्कम मुख्य व्यापाऱ्यांना द्यावी लागते.

कोल्हापूरसह परराज्यातून फळे येतात. मार्केट यार्डमधून जिल्ह्यात फळे पाठवली जातात. कोकण ही कोल्हापूरची प्रमुख बाजारपेठ आहे. कोकणातील आंब्याची कोल्हापुरात आवक होते तर परजिल्हा व राज्यातील फळे कोकणात जातात. रोज हजारो टन फळांची आवक होते. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणाला तर मार्गशीर्ष व रमजान या महिन्यात फळांना जास्त मागणी असते.

रोज ७५ टन केळांची आवक

सर्वांत जास्त मागणी केळीला असून रोज ७५ टन केळांची आवक होते. जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी व सांगोला येथून केळीची आवक होते. बारमाही पीक असल्याने नुसत्या केळांची उलाढाल १० ते १५ लाख रूपयांची असते. काही व्यापारी थेट शेतात जाऊन केळी खरेदी करतात.

कर्नाटकातून चिकूची आवक

कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बेळगाव येथून बारा महिने चिकूची आवक होते. आठवड्यात २० टनाची आवक होते.

एका टनाचा दर १० ते १२ हजार इतका असतो.

सफरचंद काश्मीरमधून

ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशातून सफरचंद येतात. त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत काश्मीरमधून सफरचंद येतात. गणेशोत्सव, नवरात्रात सफरचंदांना जास्त मागणी असते.

रोज ६० ते ७० टन संत्र्याची आवक

नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात संत्र्याची रोजची आवक ६० ते ७० टन इतकी होते. नागपूर व अमरावतीहून संत्री मोठ्या प्रमाणात येतात. आंब्याखालोखाल सर्वांत जास्त आवक संत्र्याची होते.

सर्वांत महाग डाळींब

डाळींबाची आवक कमी व मागणी जास्त असल्याने हे फळ सर्वांत महाग आहे. बारामती, पंढरपूर, सोलापुरातून डाळींबाची आवक होते. रोज ३० टन डाळींबाची आवक होते. ६० ते ७० हजार रूपये टन असा दर आहे. किरकोळ डाळींब १०० रूपये किलो दराने विकले जाते. कोल्हापुरात डाळींबाची निर्यात चेन्नई, बेंगळूर शहरात होते. डाळींबाचे सर्वांत जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते.

हाऊसफुल्ल आंबा सिझन

आंब्याचा सिझन हा सर्वांत हाऊसफुल्ल सिझन असतो. आंब्याची आवक व मागणी जास्त असते. मार्च अखेरीस कोल्हापुरात आवक सुरू होते. एप्रिल, मे व जून महिन्यात रोज ६० ते ७० ट्रक आंबा मार्केट यार्डमध्ये येतो.. काही विक्रेते फक्त अंब्याच्या सिझनमध्ये जास्त कष्ट करून वर्षाच्या कमाईची बेगमी करतात.

स्ट्रॉबेरी रोज एक टन आवक

सध्या महाबळेश्वरातून रोज एक टन स्ट्रॉबेरीची आवक होते. ५० हजार रूपये टन असा स्ट्रॉबेरीचा दर आहे. पॅकबंद स्ट्रॉबेरीचीही विक्री होते.

पपई

जयसिंगपूर, शिरोळसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पपईची आवक होते. पाच हजार रुपये टन असा पपईचा दर आहे.

बार्शीतून कलिंगडाची आवक

सांगोला, बार्शी येथून मार्केट यार्डमध्ये रोज कलिंगडची आवक होते. सध्या कलिंगड बारमाही ​मिळत आहे. दहा हजार रुपये टन असा कलिंगडचा दर असून रोज पाच ते दहा टन कलिंगडाची आवक होते.

फळांची आवक जास्त असली तरी मार्केट यार्ड येथून फळांचा लिलाव होत असला तरी हा व्यवहार उधारीवर जास्त व रोखीने कमी आहे. फळे खपल्यावर मुख्य व्यापाऱ्यांच्या हातात पैसे येतात. विश्वासाच्या जोरावर फळ विक्रीचा व्यवसाय केला जातो.

- डी. एम. बागवान, मुख्य व्यापारी, मार्केट यार्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोलकीच्या तालावर..!

$
0
0

महेश पाटील Mahesh.Patil@timesgroup.com

महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांतील वाद्यप्रकारात अनन्यसाधारण स्थान असलेली ढोलकी नवख्या, हौशी कलावंतांनाही शिकता येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग आणि ढोलकीपटू यासीन म्हाब्री फाउंडेशन यांच्यावतीने याचा खास तीन महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. ढोलकीचा ताल शिकण्याची हौशी कलावंतांची इच्छा ५ फेब्रुवारीपासून पूर्ण होणार आहे.

शाहिरी, वाघ्या मुरळी, लावणी, धनगरी किंवा कोळी नृत्य अशा महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांत चर्मवाद्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पखवाज, मृदंग यांप्रमाणे ढोलकीच्या तालावर विविध लोककला सादर केल्या जातात. अस्सल महाराष्ट्रीयन वाद्य असलेल्या ढोलकीचे दर्शन लोकसंगीत, भक्तिसंगीतात दिसते. विविध चित्रपटांमधील गाण्यांतही घडते. कलाक्षेत्र म्हणजे ठराविक प्रकार सर्वांच्या नजरेसमोर असतात. मात्र त्यापलीकडे जाऊन समाजात प्रचलित असलेले कलाप्रकार कलाक्षेत्रात पुढे आले आहेत. लोककलांचा अभ्यास करून करिअरची एक नवी संधीही मिळू शकते.

त्या अनुषंगाने ढोलकी थापा आणि पखवाज किंवा अन्य चर्मवाद्ये यात फरक काय? पारंपरिक गाण्यांमध्ये त्याचा वापर कसा होतो? पारंपरिक ढोलकी तमाशात गण, गवळण, बतावणी, लावणी, वग अशा ठिकाणी कशी महत्त्वाची ठरते हे समजून घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग आणि ढोलकीपटू यासीन म्हाब्री फाउंडेशनच्यावतीने प्रौढ व निरंतर शिक्षण विभागप्रमुख प्रा. डॉ. गोरखनाथ कांबळे, ढोलकीवादक पांडुरंग घोटकर, ढोलकी अभ्यासक प्रकाश खांडगे, कृष्णा मुसळे, यासीन म्हाब्री फाउंडेशनच्या सल्लागार आणि अभ्यासक्रमाच्या समन्वयक हेमसुवर्णा मिरजकर यांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रमासाठी पंधरा जणांची एक बॅच असेल.

पाच फेब्रुवारीपासून आठवड्यातील तीन दिवस प्रशिक्षण दिले जाईल. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत हे प्रशिक्षण असेल. संजय साळोखे, भार्गव कांबळे आणि गौतम राजहंस प्रशिक्षण देतील. अभ्यासक्रमातून ढोलकीच्या वादाचे बेसिक आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश शुल्क आहे. त्यासाठी इच्छुकांनी यासाठी हेमसुवर्णा मिरजकर यांच्याशी (मो. ९३२५५७७७७९) किंवा १४० बी, जवाहरनगर, कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ढोलकी हे सर्वांना परिचित असलेले, लोककलेतील एक प्राधान्य असलेले वाद्य आहे. सर्वसामान्यही ते वाजवू शकतात. चर्मवाद्याच्या इतिहासापासून त्याच्या वापरापर्यंतची माहिती या अभ्यासक्रमातून मिळेल. थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा स्वरुपात हा अभ्यासक्रम आहे. याशिवाय बाहेरून मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना बोलविले जाणार आहे.

- हेमसुवर्णा मिरजकर, (अभ्यासक्रम समन्वयक) सल्लागार, यासीन म्हाब्री फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परमीट दरवाढीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर

$
0
0

कोल्हापूर : राज्य सरकारकडून परमीटच्या दरात पाचपट करण्यात येणारी प्रस्तावित दरवाढ रद्द करावी, यासह अन्य मागण्यासाठी काँग्रेस ऑटो रिक्षा जिल्हा युनियन (इंटक) तर्फे आरटीओ कार्यालयावर रिक्षासह मोर्चा काढण्यात आला. आरटीओ कार्यालयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

ऑटो रिक्षाचालक सकाळी अकरा वाजल्यापासून आरटीओ कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले. काँग्रेस कमिटी येथून मोर्चा सुरु झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारात रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन आरटीओ कार्यालयात होते. जिल्हाधिकारी, जिल्हापोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असल्याने पोलिसांनी हा मोर्चा सिंचन भवन कार्यालयाजवळच अडविला. त्यावेळी काही ऑटो रिक्षाचालक संतप्त झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी केवळ निवेदन स्वीकारण्यात येईल, असा निरोप संघटनेला देण्यात आला. रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर आरटीओ कार्यालयातून बाहेर पडतानाच संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन दिले. त्याबाबत निवेदन राज्य सरकारला पाठविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

आरटीओने ऑटो रिक्षाचे वाढविलेले शुल्क कमी करावे. रिक्षा विम्याची रक्कम ५० टक्के कमी करावी. शेअर ए रिक्षाच्या थांब्यावर केएमटीने अतिक्रमण केले आहे. अशा मंजूर थांब्यावर महापालिकेकडून तात्काळ फलक लावावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात अध्यक्ष विश्वास नांगरे, उपाध्यक्ष अर्जुन कांबळे, मधुकर चौगले, उत्तम कापसे, विवेक पोतदार,राहुल पोवार, सुभाष शेटे, राजू मुल्ला, रशीद पठाण आदींचा सहभाग होता.

शिवसेनेची निदर्शने लांबणीवर शिवसेनेच्या वतीने याप्रश्नी करण्यात येणारी निदर्शने काही कारणामुळे रद्द करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी आरटीओ परिसरात निदर्शने रद्द झाल्याची माहिती देण्यासाठी थांबले होते. शिवसेनेचे सभासद असलेल्या काही ऑटो रिक्षाचालकांची मात्र तारांबळ उडाली. अनेकांनी आरटीओ कार्यालयाला फेरफटका मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहाचे डर्टी पिक्चर कायम

$
0
0

जान्हवी सराटे janhavi.sarate@timesgroup.com

कोल्हापुरात स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबणा होत आहे. मार्केट परिसर, महाद्वार रोड, शहरातील उद्याने, धार्मिकस्थळे आणि गर्दीच्या परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. गेल्या अनेक वर्षांत महापालिकेच्या पदाधिकारी, नेत्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या घोषणा केल्या. मात्र आजतरी त्या वल्गनाच ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षामध्ये महापौर बदलल्या, पण महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अजूनही प्रशासनाच्या लाल फितीत अडकून पडला आहे. नव्या वर्षात नव्या महापौर आणि आयुक्त सर्व्हे करून मग बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत आहेत.

शहरात उभारण्यात आलेल्या फायबरच्या स्वच्छतागृहात पुरेसे पाणी, औषध फवारणी केली जात नाही. अस्वच्छतेमुळे या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. तसेच पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही स्वच्छतागृह बंद करण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील महिलांनी आवश्यक तेथे स्वच्छतागृहाची उभारणीची मागणी केली. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

‌सन २०१२ च्या अंदाजपत्रकात महिला स्वच्छतागृहांसाठी १५ लाखांची तरतूद केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्यावतीने त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. सन २०१३ च्या अंदाजपत्रकातही पहिल्यावर्षीच्या १५ लाख रुपयांमध्ये ​अतिरिक्त ३५ लाख रुपयांची भर घालत महिला स्वच्छतागृहांसाठी ५० लाखांची तरतूद केली. यामध्ये अंबाबाई मंदिर, बिंदू चौक, मध्यवर्ती बसस्थानक यासह ४० प्रमुख ठिकाणे निश्चित करण्यात आली.

मात्र, केवळ निधीची तरतूद झाली असली तरी त्याचे नियोजन झाले नाही. त्यामुळे आता निधी आहे, पण नियोजन नाही असे चित्र आहे. भविष्यात महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर केवळ घोषणा, निधी तरतूद यापुढे जाऊन नियोजन आणि कार्यवाही करण्याबाबत महापालिका प्रशासनाने एक समिती सक्रिय करण्याची गरज आहे. कायमस्वरूपी स्वच्छतागृहासाठी जागा मिळत नसल्यामुळे स्वच्छतागृहाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे कारण पुढे केले जात आहे.

गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर महापालिकेत सात महिला महापौर झाल्या. महिला बालकल्याण समिती आणि प्राथमिक शिक्षण सभापती पदांवर महिला कार्यरत होत्या. आयुक्त व उपायुक्तपदीही महिला होत्या. तरीही महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटू शकलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी नव्या महापौरांनी महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे.



१५ लाखाचा निधी पाण्यात महापालिकेतर्फे शहरात चाळीस ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी १७ ठिकाणी फायबर स्वच्छतागृह उभारली आहे. यासाठी १५ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र पाण्याचा निचरा होत नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने शहरातील सर्व फायरबर स्वच्छतागृह बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी तसेच संबधित लोकांशी चर्चा केली आहे. कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी लवकरच आयुक्तांसोबत जागेची पाहणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. - अश्विनी रामाणे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images