Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बंदी उठविल्याने शिरोळमध्ये आनंदोत्सव

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने शिरोळमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडी शर्यत शौकीनांनी चौकाचौकात हलगीच्या कडकडात साखर वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

यात्रा, जत्रा, उरूस यामधील बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्याने शिरोळ तालुक्यातील शर्यत शौकीनातून नाराजी व्यक्त होत होती. सरकारने बंदी उठवावी या मागणीसाठी अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समितीच्यावतीने शिरोळचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली येथे बैलगाडी, चालक, मालक यांच्यासह मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावर बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. शिरोळ येथील ग्रामसभेत ठराव करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात आले होते.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी शुक्रवारी केंद्र सरकारने उठविल्यानंतर बैलगाडी शर्यत शौकीनांनी जल्लोष केला. शिरोळच्या शिवाजी चौकात प्रसाद धर्माधिकारी, सुभाष ताराप, राहुल कदम, हेमंत माने, महेश जाधव, पप्पू संकपाळ, रवी जगदाळे, रोहन जगदाळे, दिनेश जगदाळे, मारूती सांगले, सीताराम रांगोळे, पिंटू दबडे, आनंद संकपाळ, अमर महात्मे, सचिन संकपाळ, ईलाही शेख, तौफिक सय्यद, धोंडिराम गावडे, धमाजी कनवाडे, गजानन गावडे, संजय दाबाडे, धीरज शिंदे, गोटू भाट, विनायक गावडे, प्रवीण पाटील, संभाजीराव जगदाळे यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

वर्षोनुवर्षे उरूस, यात्रामध्ये बैलगाडी शर्यती सुरू होत्या. या शर्यतीवर बंदी घातल्याने ग्रामीण संस्कृती नष्ट होते की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. सरकारने बंदी उठवून बैलगाडी शर्यत शौकिनांना न्याय दिला आहे.

-सचिन मोरे, बैलगाडी चालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाला पुनर्वसनासाठी विविध भागांत पाहणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत महापालिका अधिकारी व फेरीवाला कृती समितीच्यावतीने शहरातील विविध भागांत संयुक्त पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाकडून फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. ही प्राथमिक पाहणी असून, दोन्ही बाजूनी सकारात्मक पर्यायांचा विचार होऊ शकतो. काही पर्यायी जागांबाबतही दोन्ही बाजूनी चर्चा झाली. रस्त्याला समांतर असणारे रस्ते, रस्त्यालगतची जागांचा प्राथमिक टप्प्यात विचार झाला.

छत्रपती शिवाजी चौक ते भवानी मंडप, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड परिसर 'नो हॉकर्स झोन' म्हणून जाहीर झाला आहे. या परिसरातील फेरीवाल्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, या भागात व्यवसाय होत असल्याने तेथून हटण्यास फेरीवाल्यांचा विरोध आहे. यावरून प्रशासन आणि फेरीवाला कृती समितीमध्ये वाद आहे. डिसेंबरच्या अखेरीस महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांवरील कारवाईस एक महिना स्थगिती देण्यात आली होती.

या कालावधीत फेरीवाला कृती समिती व महापालिकेच्या अ​धिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून तोडगा काढण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी या परिसरात पाहणी केली. इस्टेट अधिकारी संजय भोसले, प्रमोद बराले, फेरीवाला कृती समितीचे आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, प्र. द. गणपुले, आदींचा पाहणी पथकात समावेश होता. शिवाजी चौक, भवानी मंडप,ताराबाई रोड, जोतिबा रोड या परिसरात पाहणी करून प्राथमिक टप्प्यात काही पर्यायी जागेबाबत चर्चाही झाली.

'महापालिका अधिकारी व फेरीवाला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीने फेरीवाल्यांच्या पुनर्वसनास मदत होणार आहे. सामोपचाराने याप्रश्नी तोडगा काढता येऊ शकतो. समन्वयाची भूमिका ठेवून फेरीवाल्यांच्या पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आयुक्त व अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे.'

- अश्विनी रामाणे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदीजनांची वाटचाल उत्कर्षाकडे

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : ज्या हातांनी गुन्हा घडला, तेच हात स्वकष्टाच्या कमाईसाठी आता पुढे सरसावले आहेत. कारागृहातील काळ्या सावल्यांतून बाहेर पडून बंदीजनांचे हात रोजगाराला लागले आहेत. कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात हा सुखद बदल घडतो आहे. त्या बदलाला आणखी बळ देण्याचा मार्ग म्हणून बंदीजनांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीचे कायमस्वरूपी केंद्र कारागृह प्रशासन कोल्हापुरात उभे करत आहे. केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे.

बंदीजनांनी बनवलेल्या उत्पादनांना गेल्या दोन वर्षांत मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कारागृह परिसरातच वस्तू विक्री केंद्र बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन लवकरच अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते होणार आहे. गुन्हा कोणताही असो, कायदा कुणालाही माफ करीत नाही. गुन्ह्यासाठी शिक्षा अटळ असते. जाणते-अजाणतेपणात अथवा रागाच्या भरात व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करतो व ओघाने त्याची रवानगी कारागृहात होते. अशा चार भिंतींच्या विश्वातील बंदीजनांची सुधारणा आणि पुनर्वसनाची जबाबदारी कारागृह विभागावर पडते.

पुनर्वसनाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सरकारने ७० वस्तू आरक्षित केल्या आहेत. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी सर्वच सरकारी कार्यालयांना सक्ती केली आहे.

सर्व प्रकारचे फर्निचर, हॉस्पिटल, पोलिसांना लागणाऱ्या गणवेशाच्या कापडाची तसेच चादर, बेडशीट, हँडलूम उत्पादने तयार केली जात आहेत. बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून कारागृह प्रशासनाला २०१४ मध्ये एक कोटी आठ लाख आणि २०१५ मध्ये एक कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सरकारच्या विविध विभागांत मच्छरदाणी पुरवण्यात येणार आहेत. राज्यातील कारागृहांत तयार झालेले २५ हजार नग तयार करण्याचे काम सुरू असून, यापैकी पाच हजार नग म्हणजे ७० मीटर मच्छरदाणी तयार करण्याचे काम कळंबा कारागृहात सुरू आहे. लाकडी फर्निचर तयार करण्यासाठी तयार लाकूड आणण्यात येत आहे. तयार लाकूड आणण्यापेक्षा सॉ मिल उभा करण्यात येणार असून यासाठी सरकारमार्फत सहा लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले आहे.

सात दिवसांत तीन लाखांची कमाई

कारागृहात तयार होणाऱ्या सर्वच कुटिरोद्योगातील वस्तूंची विक्री करण्यासाठी सर्वच कारागृहांजवळ विक्री केंद्र सुरू केले होते. राज्यातील सर्व कारागृहांतील विक्री केंद्रामध्ये येरवडा कारागृहानंतर कळंबा कारागृहाचा द्वितीय क्रमांक आला आहे. येथील विक्री केंद्रातून सात दिवसांत तीन लाख ५३ हजार, ४७४ रुपयांच्या वस्तूंची विक्री केंद्रातून झाली आहे. याबाबत राज्य कारागृह अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला आहे.

'कारागृहात अनेक गुन्ह्यांतील बंदीजन असले, तरी त्यांचे पुनर्वसन करणे महत्त्वाचे असते. शिक्षा संपल्यानंतर त्यांनी समाजात चांगली वर्तणूक करण्यासाठी कारागृहातील त्यांचे कामकाज उपयोगी ठरणार आहे. यासाठीच विविध स्वरूपाच्या कुटिरोद्योगाला चालना दिली जात आहे.'

- शरद शेळके, कळंबा कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस वाहतुकीचा धोका

0
0

प्रकाश कारंडे, कागल

तसं पाहिलं तर त्यात कुणी अतिमहत्त्वाचे आहे असे नाही किंवा कुणी अत्यावश्यक सेवा देते असेही नाही. मात्र सगळ्या रस्त्यांवर यांचीच मालकी आहे. सगळ्यांनी यांच्या मागून यायचे आणि वाट दिली तरच पुढे जायचे. कारण हे आहेत ऊस वाहतूकदार ट्रॅक्टरचालक. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले की जिल्ह्यातच काय सर्वत्र दिसणारे हे चित्र. दरवर्षी यावर केवळ चर्चा होते कारवाई मात्र शून्य असते. हंगाम काळात ऊस वाहतूकदार वाहतुकीचा नियम पाळत नाहीत असे चित्र समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कर्णकर्कश आवाजातील गाणी आणि भरधाव वेग हा तर नित्याचा आणि ट्रॅकटरचालकांचा सवयीचा भाग आहे. एखाद्या गावातली बाजारपेठ, रुग्णालय आणि शाळा आली तरीदेखील या आवाजात जराही उतार होत नाही. ज्याचा सर्वसामान्यांनाही त्रास होतो. एका ट्रॅक्टरमध्ये किती ऊस भरावा याला काही मर्यादा आहेत. परंतु ऊस लवकर घालवण्याच्या नादात शेतकरी वाहनचालकाला चिरीमीरी देतात. वाहनचालक स्वत:च्या फायद्यासाठी अधिक ऊस भरतात. बांधणी निसटते आणि रस्त्याने ऊस पडतच कारखान्यापर्यंत जातो. याबाबत तक्रार केल्यास जाणीवपूर्वक हयगयीने गाडी चालवून, मुद्दाम उशिरा ऊस जमा करुन शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान केले जाते. ऊस वाहतूक करणारे वाहन पंक्चर झाल्यास अथवा मध्येच बंद पडल्यास त्याच्या बाजूला फांद्या लावल्या जातात. चढण असल्यास चाकाला मोठे दगड लावले जातात. येणा-जाणाऱ्यांना वाहन दिसावे हा हेतू असला तरी काम झाल्यावर दगड न काढताच ट्रॅक्टरचालक निघून जातात. ज्यामुळे कितीतरी दुचाकीस्वार पडल्याची उदाहरणे आहेत.

हंगाम सुरु झाल्यानंतर साखर कारखान्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठीच्या सूचना कराव्या लागतात. वाहनधारकांना तसे सांगण्यास सहकार्य मागावे लागते. परंतु यातले काहीच न करता उलट वाहन विकत घेतानाच त्यांना दिलेल्या माहीतीपत्रकात किती टन भरायचे याच्या सूचना केलेल्या असतात. वाहनधारकच ते पहात नाहीत, असे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय अंगावरची बाजू ढकलून मोकळे होते. शिवाय भरारी पथके नेमून अशा नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी लागते. परंतु हा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून किती वाहनांवर कारवाई केली याचे उत्तरच या विभागाकडे नाही. त्यामुळेच ऊस वाहतूकदारांचा बेमालूमपणा वाढला आहे. शेतकरी आणि ट्रॅक्टरचालक आहेत म्हणून थोडीशी सवलत देवून दुर्लक्ष होते, असे या कार्यालयाचे अधिकारीच कबूल करतात. याबाबत बोलताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांना कारवाईचे टार्गेट देतो. परंतु प्रत्येकानेच सुरक्षा म्हणून काळजी घेतली पाहिजे. १० ते २३ जानेवारी या सुरक्षा पंधरावड्यात आम्ही किमान १० कारखान्यांत जावून सुरक्षेबाबत व वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणार आहोत.

हातकणंगलेतील रेंदाळचा वचक

१९९२-९३ च्या काळात रेंदाळ गावाने एकमुखी ठराव करुन गावातून मोठ्या आवाजात ट्रॅक्टर वेगाने घेवून जाण्यास बंदी घालण्यात आली. तसे पत्रही कारखाना प्रशासनाला देण्यात आले. सुरवातील नियम न पाळणाऱ्यांना वॉच ठेवून चोपही देण्यात आला. त्याची ख्याती आजही जुन्या चालकात आहे. ते आवर्जून याचा उल्लेख इतर चालकांपुढे करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांच्या दरात प्रचंड तफावत

0
0

janhavi.sarate@timesgroup.com

कोल्हापूरः हॉस्पिटलला संलग्न असलेल्या औषध दुकानांमध्ये आणि इतरत्र मिळणाऱ्या दुकानांतील औषधांच्या दरात प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्ण दाखल झाला की, हॉस्टिपलमधील सुविधांबरोबरच औषधांच्या दरात प्रचंड फसवणूक केली जात असल्याचे वास्तव समोर येते.

काही महिन्यांपूर्वी 'सत्यमेव जयते,' कार्यक्रमातून आमीर खानने औषधांमधून रुग्णांची कशी लूट केली जाते, याचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर प्रचंड वादंग माजले. औषधांमध्ये प्रचंड नफा मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस मेडिकल स्टोअर्स वाढलेली दिसून येत आहेत. मात्र, काही मोजकीच सर्वसामान्यांना परवडेल अशा कमी दरात जनेरिक मेडिकल स्टोअर्सही उभारत आहेत.

औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी केंद्र सरकारची यंत्रणा अधिकारांचा योग्य वापर करताना दिसून येत नसल्याने औषधांच्या किमतीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. हॉस्पिटलशी संलग्न औषध दुकानात आयव्ही सेटची किंमत १०० रुपये आकारली जाते. मात्र, तोच सेट इतरत्र १० पासून ४० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. ग्लोव्हजची किंमत बाहेर २० पासून ४० रुपयांपर्यंत असून, बिलामध्ये ६५ रुपये आकारले जातात. सिफो फेरेझोन इंजेक्शनची छापील किंमत ७०० रुपये असून हेच औषध हॉस्पिटलशी संलग्न औषध दुकांनामध्ये ७०० रुपयांना विकले जाते. बाहेरील मेडिकल स्टोअर्समध्ये हेच औषध ३०० रुपयांपर्यंत मिळते. याचबरोबर मेरो पेनम हे इंजेक्शन ९०० ते १३०० रुपयांपर्यंत छापील किमतीला विकले जाते, तर इतत्र ते ६०० रुपयांपर्यंत मिळते. फार्नियाची नेस १४०० ते ३ हजार रुपयांत विक्री होते, ती इतर मेडिकलमध्ये ७०० ते एक हजारापर्यंत मिळते. अशा पद्धतीने औषधांमधूनही रुग्णांची प्रचंड फसवणूक होते. हॉस्पिटल संलग्न औषध दुकानांमधीलच कंपन्यांची औषधे डॉक्टरांकडून लिहून दिली जात असल्यामुळे ती औषधे इतरत्र मिळत नाहीत. त्यामुळे नाइलाइजाने महाग औषधे रुग्णांच्या नातेवाइकांना तिथून घ्यावी लागत असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.

२४ हजारांची स्टेंट दीड लाखाला

अँजिओप्लास्टीसाठी रुग्णांकडून सव्वा ते दीड लाख रुपये घेतले जात होते. त्यासाठीच्या स्टेंटची प्रत्यक्षात किंमत १६ ते २४ हजारांपर्यंत आहे. हे रोखण्यासाठी अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पाठपुरवा करून त्याचा ड्रग्जमध्ये समावेश करून त्यांच्या किमती २४ हजारांपर्यत आणण्यात यश आले असून लवकरच ही स्टेंट बाजारात २४ हजारांपर्यत मिळणार आहे.

हॉस्पिटलला लागून असलेले औषध दुकाने केवळ नफा मिळविण्याच्या उद्देशाने थाटली जातात. त्या दुकानातील आणि बाहेरील होलसेल दुकानातील औषधांच्या दरात प्रचंड तफावत आहे. हे रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे पाठपुरवा सुरू आहे.

मदन पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन

'प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. ब्रॅँडेड कंपन्यांना करावी लागणारी जाहिरातबाजी, त्यावरील कर, कमिशन, वाहतूक खर्च अशा विविध खर्चांचा बोजा रुग्णांवर पडतो. याउलट जेनेरिक औषधे यातील कित्येक खर्चांपासून मुक्त असल्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध होतात. सरकार यावर लक्ष ठेवू न शकल्याने अवास्तव फी व औषधे आणायला लावून रुग्णाला बिछान्यावर खिळवून ठेवतात.'

- रुग्णांचे नातेवाईक

कशी होते रुग्णांची लूट

सल्लागार, विशेषज्ञ आणि चिकित्सकांना संदर्भासाठी ३०-४० टक्के कमिशन

नवीन डॉक्टरने रुग्णालयात उपचार घ्यायला लावले तर त्यात ३०-४० टक्के कमिशन

सिंक टेस्टस् (अनावश्यक चाचण्या)

रुग्णांना वैद्यकीय निरीक्षणाखाली अॅडमिट करणे

अनावश्यक सिझेरियन्स आणि हिस्ट्रेक्टॉमी

प्रतिष्ठित रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिले जाणारे कमिशन

अनावश्यक औषधे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेक शिकवा’ प्रभावी करणार

0
0

मुलींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारी या कालावधीमध्ये 'लेक शिकवा लेक वाचवा' अभियानास सुरूवात केली आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे म्हणून सरकार सध्या 'बेटी बचाव'चा नारा सुरू आहे. शिक्षण विभागानेही मुलींची गळती रोखण्यासाठी 'लेक शिकवा, लेक वाचवा,' अभियानाचे धडे गिरवायला सुरूवात केली आहे. यापुढे हे अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी तसेच एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून दरवर्षी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा,' अभियान राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. २६ जानेवारीअखेर हे अभियान राबवले जाणार आहे.

राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींना अखंडित शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणांची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजवणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची गळती रोखणे हे या अभियानाचे उद्देश आहेत. या अभियानाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

लेक शिकवा अभियान प्रत्येक गावामध्ये शाळेच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. प्रभात फेरी, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड ढेकणेचा पलायनाचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा न्यायालयाच्या आवारातून बेडीला हिसका मारून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा पुण्यातील अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३८, रा. भोर) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तातील पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला पकडले. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. स्वतःच्या खुनाचा बनाव करून सेंट्रिंग कर्मचाऱ्याचा खून केल्याप्रकरणी कोर्टात त्याला सुनावणीसाठी आणले होते. त्याचा थरारक पाठलाग करीत असतानाच पंधरा फुटावरून उडी मारून त्याच्यावर झडप घालणारे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र केरबा चौगुले जखमी झाले आहेत.

ढेकणेने स्वतःच्या खुनाचा बचाव करण्यासाठी उचगांवमधील सेट्रिंग कामगार दत्तात्रय नायकुडे यांचा १६ मे रोजी खून केला होता. कोल्हापूर रेल्वे स्थानकावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी त्याला २१ मे रोजी पकडले होते. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एल. खंबायते यांच्या कोर्टात सुरू आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल मधुकर लालासो मोहिते, राजेंद्र केरबा चौगुले, रवींद्र जगताप आणि सुप्रिया चौगुले या चौघांनी त्याला बंदोबस्तात ढेकणेला आणले. दुपारी अडीचला सुनावणी झाली. त्यानंतर त्याला बेडी घालून कोर्टाच्या खोलीबाहेरील बाकड्यावर बसवले. त्याच्याजवळ चौगुले बेडी धरून बसले होते. मोहिते कोर्टाची कागदपत्रे आणायला गेले तर जगताप व चौगुले वऱ्हांड्यात होते. यावेळी ढेकणेने अचानक बेडीला हिसका दिला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पळाला. कोर्टात मोठ्या संख्येने असलेल्या वकील आणि पक्षकारांना धक्के देत तो पळू लागला. यावेळी चौगुले यांनी प तिसऱ्या मजल्यावरील जिन्यातून १५ फूट खाली दुसऱ्या मजल्यावर उडी मारून ढेकणेवर झडप घातली. त्यातूनही तो निसटला. तरीही चौगुले यांनी पाठलाग सुरू केला. चौगुले यांच्या मदतीला त्यांचे सहकारी आले. ढेकणे तळमजल्यात आला. मुख्य दरवाजातून बाहेर जाण्याऐवजी तो मागच्या दरवाजाकडे धावला आणि चौगुले यांनी झडप टाकून त्याला पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे अश्लिल व्हिडिओ काढणारा डॉक्टर अटकेत

0
0

सीपीआरमधील निवासी डॉक्टर अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचे मोबाइलवरून चित्रण करणाऱ्या डॉ. फनीकुमार किरण कोटा (वय ३१, मूळ गाव, रा. शांतीनगर कॉलनी, हैदराबाद कोटा, तेलंगणा) या निवासी डॉक्टराला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

डॉ. कोटा व संबंधित महिला डॉक्टर हे निवासी डॉक्टर असून सध्या ते सीपीआर हॉस्पिटलमधील तुलसी बिल्डिंगमध्ये एकमेकांच्या शेजारच्या रूममध्ये राहतात. शुक्रवारी मध्यरात्री महिला डॉक्टरांना खोलीच्या दाराजवळ आवाज आला. दरवाजा उघडून त्या व्हरांडयात आल्या. त्यावेळी डॉ. कोटा ये-जा करत होते. तेव्हा व्हरांड्यातील लाइट बंद करत होतो, असे त्यांनी उत्तर दिले.

त्यानंतर महिला डॉक्टर रूममध्ये परतल्या. लाइट बंद केल्यावर दरवाजावरील व्हेंटिलेशन खिडकीत त्यांना छोटी लाइट दिसली. त्यांनी निरखून पाहिले असता मोबाइल दिसला. शूटिंगसाठी डॉ. कोटा यांनी मोबाइल खिडकीत ठेवला असावा, अशी त्यांना शंका आली. त्यांनी डॉ. कोटा यांना तो मोबाइल घेऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांचा मोबाइल नसल्याचे सांगितले. त्यानंतर महिला डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टरांकडे विचारणा केली. वरिष्ठ डॉक्टरांनी डॉ. कोटा यांच्याकडे विचारणा केली पण त्यांनी हात वर केले.

त्यानंतर महिला डॉक्टरने मोबाइल घेऊन लक्ष्मीपुरी पोलिसांकडे मध्यरात्री दोनच्या सुमारास तक्रार केली होती. मोबाइलला कोड असल्याने तो सुरू होत नव्हता. पोलिसांनी डॉ. कोटा यांना बोलावून चौकशी केल्यावर त्यांनी मोबाइल स्वतःचा असल्याची कबुली दिली. मोबाइल सुरू केल्यावर संबंधित महिला डॉक्टरांच्या रूममधील शूटिंगच्या आठ क्लिप मिळाल्या. तसेच महिला डॉक्टराचे फोटोही मिळाले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून डॉ. कोटा यांना अटक केली.

विनयभंगाचा गुन्हा

पोलिसांनी डॉक्टर कोटा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, पण आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला नाही. या कायद्याखाली अटक केली असती तर केस स्ट्राँग झाली असती. आयटी अॅक्टखाली तपास करण्यासाठी पुरावे गोळा करावे लागत असल्याने पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सोपस्कार पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यवतमाळजवळ अपघातात कागलचे दोघेजण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

यवतमाळजवळील कळंब येथे शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात येथील निवृत्त जवान आणि त्यांची विवाहीत मुलगी जागीच ठार झाले. तर त्यांचा मिलिटरीतला जवान जावई व दोन नातू गंभीर जखमी झाले. पांडुरंग बापू साठे (वय-६५) आणि त्यांची मुलगी स्वाती सुनील मांगले (वय-३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. साठे यांचे जावई सुनील बंडू मांगले (वय-४०),नातू दीपक (वय-१२)आणि वैभव (वय-६) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील वैभववर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

साठे कागलच्या येशीला पार्क येथे राहतात. जवळच त्यांचे जावई मांगले राहतात. ते नागपूरला मिलिटरीत आहेत. हे सर्वजण साठे यांच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाला एकत्र जमले होते. ४ जानेवारीला कागल येथेच लग्न झाले आणि बुधवारी कडगाव, ता.गडहिंग्लज येथे स्वागत समारंभ झाला. सुनील मांगले यांनी काही महिन्यांपूर्वी स्विफ्ट डिझायर गाडी खरेदी केली होती. ती कायमस्वरूपी नागपूरला नेण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे मिलीटरीतच वाहन चालक म्हणून निवृत्त झालेले आणि त्यानंतर कागलच्यया शाहू कारखान्यातही चालक म्हणून काम केलेले पांडुरंग साठे यांनी गाडी घेऊन नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साठे मुलगी,जावई आणि दोन नातवांसह पंढरपूर,तुळजापुर येथे देवदर्शन करीत आज सकाळी कळंब येथे आले. तेव्हा मातीच्या ढिगाऱ्याजवळ उभारलेल्या ट्रकला स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली. त्यात दोघे जागीच ठार झाले.

साठे यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगा आणि सून असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका मतावर स्थायी-परिवहनची समीकरणे बदलणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत केवळ चार सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला स्थायी ​समिती सभापती आणि परिवहन समिती सभापतीच्या निवडीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही समित्यांमध्ये सेनेला प्रत्येकी एकच जागा मिळाली असली तर सभापती कुणाला ठरवायचे हे सेनेच्या मतावर अवलंबून राहणार आहे. यामुळे या दोन्ही निवडींवेळी मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीत सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून परिवहन स​मिती सभापतिपद पटकावण्याचा सेनेचा मनसुबा असल्याचे कळते.

स्थायी समितीत सोळा सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन सदस्य असे आठजण सत्ताधारी आघाडीचे आहेत. विरोधी ताराराणी आघाडीचे चार आणि भारतीय जनता पक्षाचे तीन मिळून सात सदस्य संख्या आहे. शिवसेनेचा एक सदस्य आहे. काँग्रेस आघाडीची सदस्य संख्या आठ, तर भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेना मिळून आठ असे बलाबल होणार आहे. शिवसेनेने भाजप आघाडीला पाठिंबा दिला तर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांचे संख्याबळ समान होणार आहे. परिणामी सभापतिपदी निवडणूक झाल्यास दोघांनाही समान मते पडली तर सोडत काढली जाईल. याउलट शिवसेना सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत राहिली तर सभाप​तिपदीच्या निवडीत कुठल्याच अडचणी येणार नाहीत. स्थायी समिती सभापतीच्या निवडीवेळी शिवसेना सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देऊन त्या बदल्यात

परिवहन समिती सभापतिपदावर दावा करू शकते असे सेनेतील काही मंडळींचे म्हणणे आहे.

​शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय मैत्री सर्वश्रृत आहे. शिवाय भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपासून फारसे सख्य नाही. महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांतील वैर टोकाला गेले होते. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, भाजप आघाडी सोबत राहिली नाही. यामुळे आगामी स्थायी आणि परिवहन समिती सभापती निवडीतही शिवसेना भाजप-ताराराणी आघाडीला साथ देईल याची शक्यता कमी आहे. परिवहन समितीत काँग्रेसच्या चार, तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना संधी मिळणार आहे. ताराराणी आघाडीकडून तीन, भाजपकडून दोन सदस्य असणार आहेत. तर सेनेचा एक सदस्य असणार आहे. 'स्थायी'सारखीच स्थिती परिवहनमध्ये पाहावयास मिळणार आहे. भाजत-ताराराणी आघाडीला पाठिंबा देऊन सत्तेत अधांतरी राहण्यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन एक पद मिळवायचे असा सेनेचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीसाठी साडेचार कोटी

0
0

Sandip.Kulkarni
@timesgroup.com

नगर : येथील पोलिस मुख्यालय कॉलनीमधील ५१२ घरांच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ५३ लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या आधारे या कामाला निधी मिळविण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस प्रशासनानेही यासाठी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांच्या घरांसंबंधी अनुकूलता दर्शविल्याने या कामाला आता वेग येत आहे.

ड्रेनेज उघडे असल्यामुळे परिसरात दुर्गंधी, ठिकठिकाणी वाढलेले गवत, प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली बिकट अवस्था, तसेच सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव अशी दूरवस्था पोलिस कॉलनीची झाली आहे. याबाबत 'मटा'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गृहराज्यमंत्री शिंदे यांनी कॉलनीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांनी १८ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीला पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले होते. या बैठकीमध्येच बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पोलिस स्टेशन, पोलिस कॉलनीतील घरे, यांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो, याचा कच्चा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव 'मटा'च्या हाती लागला असून त्यानुसार पोलिस मुख्यालय परिसरात असणाऱ्या पोलिस कॉलनीतील ५१२ घरांची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल चार कोटी ५३ लाख रुपये लागणार आहेत. यामध्ये कॉलनीमधील खराब रस्ता दुरुस्तीसाठी २२ लाख, पाण्याच्या अंतर्गत पाइपलाइन साठी १० लाख, बाह्यविद्युत वाहिनी कामासाठी पाच लाख, अंतर्गत विद्युत कामासाठी २० लाख, संरक्षक भिंतीसाठी १८ लाख, प्लोरिंगसाठी २२ लाख ५० हजार, भिंतींना प्लॅस्टर करण्यासाठी १८ लाख व पेटींगसाठी १० लाख, ड्रेनेज दुरुस्तीसाठी २२ लाख ५० हजार, सेफ्टी टँकसाठी १५ लाख, पाण्याच्या टाकीसाठी ४० हजार, घराचे दरवाजे दुरस्तीसाठी १२ लाख ५० हजार तर खिडक्यांच्या दुरुस्तीसाठी दोन लाख, जमिनीची लेव्हल करण्यासाठी पाच लाख, प्लॅम्बिंगच्या कामासाठी २० लाख रुपये लागणार आहेत.

पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची घरे राहण्याच्या दृष्टीने योग्य करण्यासाठी किती रक्कम लागेल, याचे फक्त अंदाज व्यक्त करुन प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुंबई येथील पालकमंत्र्यांच्या बैठकीत सादर केला होता. अद्याप मुख्य प्रस्ताव करणे बाकी आहे. परंतु बांधकाम विभागाकडे निधी नसल्यामुळे दुरुस्ती करण्यात अडचणी आहेत, अशी माहिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

अर्थात ही कामे आणि आकडे अद्याप कागदावरच आहेत. मात्र, कॉलनीच्या इतिहासत प्रथमच येथे काम करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र रस दाखविल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने पाठपुरावा झाल्यास या कॉलनीचा दुरूस्ती होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीच्या भवितव्याची चिंता नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बदलत्या नव्या पिढीला सोबत घेत या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. काही धोके असले तरी मराठीचे भवितव्य उज्ज्वल आहे. यासाठी प्रसारमाध्यमांबरोबरच मराठीच्या हिताची काळजी करणाऱ्या सर्वच घटकांनी मराठी समृद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सूर २७ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमलनात 'मराठीचे भवितव्य आणि प्रसार माध्यमांची भूमिका' या ​विषयावरील परिसंवादात शनिवारी व्यक्त करण्यात आला.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादात महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर , श्रीराम प​चिंद्रे, चारूदत्त जोशी आदींनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार होते.

जाधव म्हणाले, 'समाजाचा घटक म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनात माध्यमांचे योगदान उल्लेखनीय आहे. आता केवळ यावर समाधान मानून चालणार नाही. मराठीची चिंता बाळगणाऱ्या सर्वच घटकांनी आता सुनियोजित प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. हे करताना भाषेचा अस्सलपणा कसा टिकवून ठेवता येईल, हेही पाहावे लागेल. मराठी हीच आपल्या प्रसारमाध्यमांची अंत:प्रेरणा असल्याने मराठीच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांची नोंद ठळकपणे घ्यावी लागेल. गेल्या शंभर वर्षात अनेक आवर्तने घेत मराठी पुढे जाते आहे. जागतिकीकरणानंतर ती महत्वाच्या वळणावर आहे. नव्या आव्हानांना सामोरे जात ती टिकवली पाहिजे. कारण मराठी भाषा टिकली तर वाड.मयीन संस्कृती टिकेल.'

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील मराठी भाषेविषयी बोलताना चारूदत्त जोशी म्हणाले, 'प्रत्येक वाहिन्यांनी आता विविध विभागातील प्रेक्षकांसाठी विविध कार्यक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यात सर्वच प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जात आहे. काही बदल स्वीकारून मराठी भाषेचे अस्तित्व येथेही नक्कीच टिकणार आहे. माध्यमक्षेत्रात अजूनही कुशल आणि मराठीची जाण असणारे मनुष्यबळ मिळत नाही.' पचिंद्रे म्हणाले, 'मराठी भाषा जेव्हा अन्य राज्यातील लोक बोलतात तेव्हा त्यात त्या त्या प्रदेशाचा लहेजा येतो. तो टाळता येणार नाही.

मात्र हिंदी व इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली येणारे शब्द टाळता येणे शक्य आहे. बदलत्या काळासोबत भाषेचा प्रवाह बदल स्वीकारत असताना त्यातील चुकांना मात्र माध्यमांनी अधोरेखित केले पाहिजे.' ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी प्रसारमाध्यमांतील मराठी भाषेच्या प्रवाहाचा परामर्ष घेतला. ते म्हणाले,' मराठीचे सध्याचे दुखणे हे आहे की अन्य भाषेतील शब्दांचा अतिरेक वाढला असून त्यामुळे व्याकरणाची बैठक ठिसूळ होत आहे. याबाबत माध्यमांनी प्रबोधनाची भूमिका घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांधून समाजापर्यंत पोहोचणाऱ्या मराठीचा दर्जाच मराठीचे भवितव्य अभेद्य राखू शकणार आहे.'

अध्यक्षीय भाषणात पवार म्हणाले, 'मराठीच्या आस्तित्वाला धक्का लागण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मराठीमध्ये अन्य भाषेतील शब्दांची भेसळ होत असल्याची तक्रार केली जात असली तरी दर वीस वर्षांच्या टप्प्यावर मराठी भाषा समृद्ध झाल्याचे जाणवते. मात्र काळासोबत पावले टाकताना भाषेच्या बदलत्या प्रवाहासोबत चालण्याची मानसिकता ठेवली नाही तर नव्या पिढीची नस सापडणार नाही. एका नव्या वळणाने भाषेला प्रवाहित करणे, ही माध्यमांची प्रमुख जबाबदारी ठरते.' दि. बा. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्याम कुरळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संक्रांतीच्या तोंडावर साखर महागली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार दिवसांवर सक्रांत सण आल्यामुळे राज्यात सर्वत्रच साखरेची मागणी वाढली आहे. यामुळे ऐन सणामध्ये साखरेच्या दरात दीड ते दोन रूपयांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात सणामुळे तिळ, गूळ आणि सारखेला अधिक मागणी असून तीळ व गुळाचे दर स्थिर आहेत. तर पालेभाज्यांमध्ये हरभरा, गाजर, वांगी, कांदापात अशा भाज्यांची आवक वाढली आहे.

लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, राजारामपुरी भाजी मार्केटमध्ये शिरोळ, हातकणंगले परिसरासह सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरातून आवक होते. पालक, मेथी, पोकळा, करडा, शेपू, चाकवत, कांदापात, तांदळी या भाज्यांची आवक या आठवड्यात कमी असल्यामुळे दरामध्ये दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

कडधान्ये, खाद्यतेल स्थिर

डाळींचे दर या आठवड्यात स्थिर राहिले आहेत. उडीद डाळ १६०, मूगडाळ १२०, मटकी १२०, मसूर डाळ ९०, पांढरी मसूर १००, मटकी डाळ १२०, हरभरा डाळ ८० रुपये असे प्रतिकिलोचे दर राहिले. तूरडाळ १६४ रूपये किलो, हिरवा मूग १००, बेळगावी मसूर १८०, छोले ८०, शेंगदाणे ८० ते ९०, मटकी १६०, चवळी ६० ते ७५, पावटा १०० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात उतरलेले शेंगतेलाचे दर ११० रुपयांवर स्थिर आहेत.

द्राक्षे, बोरांची आवक

या आठवड्यात द्राक्षारोबर बोरांचीही आवक झालेली आहे. अन्य फळांमध्ये स्ट्रॉबेरी १६० रुपये किलो, सफरचंद ८० ते ११० रुपये, डाळिंब ५० ते ८०, मोसंबी ६० ते ८० रुपये, चिकू ५० ते ६०, पपई २० ते ५० रुपये प्रतिनग असे दर आहेत. सफरचंदामध्ये इंडियन, फॉरेन, डेलिसन ‌आणि महाराज असे चार प्रकार बाजारात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदी उठवल्याने शौकीन सुसाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बैलगाडी शर्यतींवर घातलेली बंदी केंद्र सरकारने काही अटी आणि नियम घालून उठवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही बंदी उठवण्याची मागणी शेतकरी आणि बैलगाडी शर्यतीच्या शौकिनांकडून केली जात होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने अखेर काही अटी घालून शर्यतींवरील बंदी उठ‍वल्याचा अध्यादेश जारी केला आहे. कोल्हापूर परिसरातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.

बैलगाड्यांची शर्यत हा ग्रामीण संस्कृतीतील अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. वर्षभरातील यात्रा-जत्रा आणि काही सण-उत्सवांमध्ये सकाळी शर्यत, संध्याकाळी कुस्ती आणि रात्री तमाशा ही परंपरा ठरलेली असायची. बैलगाडी किंवा घोडागाडी शर्यतीत जनावरांचा छळ केला जातो या कारणातून केंद्र सरकारने अशा शर्यतींवर बंदी घातली होती. शर्यतींवर सरसकट बंदी घातल्याने शेतकऱ्यांनी ही बंदी उठवून विना लाठीकाठी शर्यतींना परवानगी मागितली होती. अनेक शेतकरी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयातही गेले होते.

अखेर केंद्र सरकारने अनेक अटींसह शर्यतींना परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, इचलकरंजी, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी आणि कागल परिसरात बैलगाडी शर्यतींची परंपरा आहे. सीमाभागातही मोठ्या शर्यतींचे आयोजन केले जाते. अनेक शौकीन शेतकऱ्यांकडे लाखो रुपयांचे शर्यतीचे बैल आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सर्जा-राजाची जोडी सुसाट पळवता येणार असल्याने शैकिनांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोल्हापूर परिसरात बहुतांश ठिकाणी विना लाठीकाठी शर्यती होत होत्या, त्यामुळे नव्या नियमांचे स्वागतच केले जात आहे. या नियमांमुळे जनावरांना इजा होणार नाही याची खात्री मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडूनही परवानगी मिळण्यास सोयीचे होणार आहे.

या निर्णयामुळे खंडित झालेली मर्दानी खेळाची परंपरा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांसह यावर अवलंबून असलेल्या इतर घटकांनाही होणार आहे. यापुढे प्राणीमित्र संघटनांना सोबत घेऊनच बैलगाडी शर्यतींचे आयोजन करून छळमुक्त शर्यती होतील.

नारायण गाडगीळ, शेतकरी, पाचगाव

बऱ्याच संघर्षानंतर अखेर केंद्र सरकारने बैलगाडी शर्यतींना परवानगी दिल्याने सर्व शेतकरी आणि बैलगाडी शैकिनांनी याचे स्वागत केले आहे. यामुळे जातिवंत बैलांची पैदास होण्यास मदत होणार आहे. शर्यती हा ग्रामीण संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असल्याने ही परंपरा जपण्यासही मदत होईल.

प्रसाद धर्माधिकारी, शर्यती बचाव संघर्ष कृती समिती

सरकारने घातलेल्या नियम आणि अटींचे काटेकोर पालन करू. लवकरच आम्ही कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील शेकऱ्यांची संघटना तयार करून विना लाठीकाठी शर्यतींना देशपातळीवर नेऊन पोहोचवू. बैल हा आमच्या घरातील सदस्य आहे, त्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी नक्कीच आम्हाला आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागतच आहे.

अशोक जंगम, शेतकरी, औरवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद सत्तेसाठी भीक मागणार नाही

0
0

आमदार हसन मुश्रीफ यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रसला आम्ही प्रामाणिकपणे मदत केली आहे, त्यामुळे पैरा फेडल्यानंतर आता जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वारंवार भीक मागायला जाणार नाही. सत्तेत सहभागी करून न घेतल्यास आमच्याकडे अनेक पर्याय आहेत,' अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महापालिकेत स्वीकृत सदस्य होण्यासाठी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी शनिवारी मुलाखत दिली. एक जागा असताना पक्षात इच्छुकांची संख्या वाढल्याने संधी द्यायची कोणाला याबाबत नेत्यांची मोठी अडचण झाली आहे.

स्वीकृत सदस्यांच्या निवडी २० जानेवारीच्या सभेत होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने शनिवारी मुलाखती घेतल्या. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मुलाखती घेतल्या. स्वीकृत सदस्यसाठी पक्षाच्यावतीने अनेकांनी इच्छा व्यक्त केली. त्यामध्ये आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, उत्तम कोराणे, आदिल फरास, शहराध्यक्ष राजू लाटकर, अजित राऊत यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्कटदाबीविरोधात कृतीची वेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाजारीकरणाच्या युगात समाजमनाचा संवेदनशील कप्पा सजग ठेवायचा असेल तर साहित्यिकांच्या लेखणीतून चौकस नागरिकांची वैचारिक बैठक पक्की होण्याची गरज आहे. विचारांनी जग बदलण्याची ताकद केवळ साहित्यात आहे. सर्व क्षेत्रांत सुरू असलेल्या वाढत्या मुस्कटदाबीविरोधात लेखकांनी कृती करण्याची हीच वेळ आहे. ती केली नाही तर आपला अशा प्रवृत्तीला पाठिंबा आहे, असा अर्थ घेतला जाईल. तेव्हा साहित्यिकांनी सजगपणे समाजाचा आवाज बनले पाहिजे,' अशी रोखठोक भूमिका ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी मांडली.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन वाजपेयी यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी वाजपेयी बोलत होते. अध्यक्षस्थानी भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे होते, तर 'नॅक'चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १० जानेवारीपर्यंत संमेलन सुरू राहणार आहे. यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराजांच्या विचारप्रसारासाठी योगदान देणारे ​ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, बाबूराव धारवाडे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव यांचा कृतज्ञता गौरव करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर अश्विनी रामाणे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, उपाध्यक्ष गोविंद पाटील, स्वागताध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, आदी उपस्थित होते.

वाजपेयी म्हणाले, 'भौतिक सुखाच्या स्पर्धेत माणुसकीचे मोल कमी होत आहे. सामाजिक व सांस्कृतिक अंत:करणाचा संकुचित होत चाललेला आयाम विस्तारित करायचा असेल तर साहित्यात सामाजिक भूमिका घेणारे लेखन झाले पाहिजे. आजकाल सर्वत्र विरोधाचे प्रमाण वाढले आहे. सरकारच नव्हे तर समुदाय आणि काही संघटनाही अभिव्यक्तीविरोधात आततायीपणा करीत आहेत; पण विरोध करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, लेखक वास्तव लिहितात, प्रसंगी बोलतात, मात्र ते त्यांचे मत लादत नाहीत. सत्याची जाणीव करून देण्यासाठी अशी लेखणी गरजेची आहे. आपल्याकडे खुलेपणाने चर्चा करण्याची परंपरा असताना समाजातील सध्याचा अभिव्यक्तीबाबत होणारा हा विरोधाचा प्रवाह चुकीचा आहे.'

ते पुढे म्हणाले, 'पूर्वी मतभेद होते; पण त्या टीकेत आक्रमकता नव्हती. साहित्याचीही एक सामाजिक भूमिका असते आणि ती मांडण्यासाठी लेखकाच्या लेखणीला स्वातंत्र्य दिले पाहिजे याचा स्वीकार झाला पाहिजे. लेखनाची प्रभावी ताकद भाषेत आहे. सामाजिक व सांस्कृतिक अतिरेक रोखण्याचे बळ भाषेत आहे हे खरे असले तरी भाषेच्या बाबतीतील बेजबाबदारपणा धोक्याचा ठरू शकतो. लोकशाही देशात लेखकाची समस्या ही केवळ त्याची राहत नाही तर ती लोकशाहीसह परंपरा, सृजन आणि ज्ञानाधिष्ठित गोष्टींचीही होते. त्यामुळे आशयघन आणि शास्त्रार्थ लेखनाची जबाबदारी पेलत असताना प्रभावहीन साहित्याची निर्मिती होणार नाही याचे आत्मभान साहित्यिकांनीही बाळगावे.'

अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, 'साहित्याचे प्रयोजन हा त्या त्या लेखकाचा विचार आहे. मात्र, साहित्यिक स्वतःच्या विचाराशी, मूल्यांशी एकनिष्ठ आहे हे मानले की, पुढचे वाद करण्यात अर्थ नाही. जे साहित्य विचारांना चालना देते, अन्यायाविरोधात बंड करण्याचे मानसिक बळ देते, जगण्याचा अर्थ सांगते ते चांगले साहित्य अशी साहित्याची व्याख्या करता येईल. मराठी संस्कृतीच्या सर्वंकष विकासावर मराठी भाषा व साहित्याचा विकास अवलंबून आहे. प्रतिभेच्या कक्षा रुंदावण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रांतील संवाद वाढला पाहिजे, त्यासाठी साहित्य आणि लेखक यांची भूमिका महत्त्वाची आहे.'

डॉ. जगन्नाथ पाटील यांचेही भाषण झाले. व्ही. बी. पाटील यांनी स्वागत केले. स्वरनिनादच्या कलाकारांनी शाहू गौरवगीत व ज्ञानेश्वर मुळे यांची 'रात्रंदिन हा दंगा दंगा,' ही स्वरबद्ध कविता सादर केली. डॉ. रमेश जाधव यांनी सत्कारमूर्तींच्यावतीने मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्कशॉप कर्मचाऱ्यांची आयुक्तांकडून झाडाझडती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागात कामाची दिखावेगिरी करणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांची आयुक्त पी.शिवशंकर यांनी चांगलीच कानउघडणी केली. तब्बल तीन तास या विभागाची झाडाझडती घेताना कामचुकारांना चांगलेच धारेवर धरले. कामाची स्टाइल तातडीने बदलण्याचे आदेश त्यांनी दिले.

वर्कशॉप विभागातील अनेक कर्मचारी काम न करता केवळ टाइमपास करत असल्याची माहिती आयुक्तांना मिळाली होती. त्यामुळे आज सुटी असतानाही त्यांनी अचानक या विभागाला भेट दिली. बहुसंख्य कर्मचारी विश्रांतीच्या मूडमध्ये होते. हे सारे रंगेहाथ सापडले. कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. हजेरीची तपासणी बरोबरच कार्यविवरण रजिस्टर पाहिले. याची नोंद न करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास तातडीने नोटीस देण्याचा आदेश दिला. यावेळी ट्रक विभाग, कार विभाग, इलेक्ट्रीक विभाग,टायर विभाग, स्पेअरपार्ट स्टोअर विभागातील कामांची माहिती घेतली. स्पेअरपार्ट विभागाकडील जुन्या सर्व स्टॉकची यादी करुन आवश्यकतेनुसार माल खरेदीसाठी इन्व्हेंटरी कंट्रोल रजिस्टर तयार करुन त्यानुसार स्टॉकबुक अद्ययावत करण्याच्या आयुक्तांनी सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलचे दोघेजण यवतमाळजवळ ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

यवतमाळजवळील कळंब येथे शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात येथील निवृत्त जवान आणि त्यांची विवाहीत मुलगी जागीच ठार झाले. तर त्यांचा मिलिटरीतला जवान जावई व दोन नातू गंभीर जखमी झाले. पांडुरंग बापू साठे (वय-६५) आणि त्यांची मुलगी स्वाती सुनील मांगले (वय-३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. साठे यांचे जावई सुनील बंडू मांगले (वय-४०),नातू दीपक (वय-१२)आणि वैभव (वय-६) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. वैभववर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

साठे कागलच्या येशीला पार्क येथे राहतात. जवळच त्यांचे जावई मांगले राहतात. ते नागपूरला मिलिटरीत आहेत. हे सर्वजण साठे यांच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाला एकत्र जमले होते. ४ जानेवारीला कागल येथेच लग्न झाले आणि बुधवारी कडगाव, ता.गडहिंग्लज येथे स्वागत समारंभ झाला. सुनील मांगले यांनी काही महिन्यांपूर्वी स्विफ्ट डिझायर गाडी खरेदी केली होती. ती कायमस्वरूपी नागपूरला नेण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे पांडुरंग साठे यांनी गाडी घेऊन नागपूरला जाण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साठे मुलगी,जावई आणि दोन नातवांसह पंढरपूर,तुळजापुर येथे देवदर्शन करीत आज सकाळी कळंब येथे आले. तेव्हा मातीच्या ढिगाऱ्याजवळ उभारलेल्या ट्रकला स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली. त्यात दोघे जागीच ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमाल करा हॅपी स्ट्रीटवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या हॅप्पी स्ट्रीट उपक्रमाचा आज (रविवार) सकाळी सातला प्रारंभ होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. पारंपरिक खेळांसह मर्दानी खेळ, संगीत आणि नृत्याचा मनसोक्तपणे आनंद घेण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सने उलब्ध केली आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते रेणुका मंदिर या मार्गावर रंगणाऱ्या या उपक्रमात धमाल करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. अबालवृद्धांना एकत्रितपणे या उपक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. याच उत्साहात रविवारी(ता.१०) सकाळी ७ ते ९ या वेळेत हॅपी स्ट्रीटवर विविध खेळ, गाणी, नृत्य, सायकलिंग, स्केटिंग आदींसह हास्य क्लब, योगा यांचाही अनुभव घेता येणार आहे. फुटबॉल, स्केटिंग, बॅडमिंटन या खेळांबरोबरच गोट्या, लगोरी, ​विटी-दांडू, लंगडी, टायर पळवणे अशा जुन्या खेळांचाही आनंद घेता येणार आहे. अभिनय, गायन, नृत्य, चित्र, शिल्प अशा विविध कलाप्रकारांनाही हे व्यासपीठ खुले असेल.

भीमा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, प्रेस्टिज ग्रुप, वेदार्जुन इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, स्कोडा श्राइन ऑटो आणि दि कोल्हापूर अर्बन बँक उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. यासाठी कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर पोलिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहकार्य मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी अथवा प्रवेश शुल्क नाही.

अभिनेत्यांचा सहभाग

विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची कला पाहण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.

येथे रंगणार हॅपी स्ट्रीट

१० जानेवारी ः ध्यानचंद हॉकी स्टेडियम रस्ता

१७ जानेवारी ः रंकाळा चौपाटी

२४ जानेवारी ः सायबर चौक ते एनसीसी भवन

३१ जानेवारी ः रमणमळा चौक ते पितळी गणपती मंदिर

(वेळ ः सकाळी ७ ते ९)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्कटदाबीविरोधात कृतीची हीच वेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाजारीकरणाच्या युगात समाजमनाचा संवेदनशील कप्पा सजग ठेवायचा असेल तर साहित्यिकांच्या लेखणीतून वैचारिक बैठक पक्की होण्याची गरज आहे. विचारांनी जग बदलण्याची ताकद केवळ साहित्यात आहे. सर्व क्षेत्रांत सुरू असलेल्या वाढत्या मुस्कटदाबीविरोधात लेखकांनी कृती करण्याची हीच वेळ आहे. ती केली नाही तर आपला अशा प्रवृत्तीला पाठिंबा आहे, असा अर्थ घेतला जाईल,' अशी रोखठोक भूमिका ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी मांडली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन वाजपेयी यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी वाजपेयी बोलत होते. सांस्कृतिक अतिरेक रोखण्याचे बळ भाषेत आहे हे खरे असले तरी भाषेच्या बाबतीतील बेजबाबदारपणा धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा वाजपेयी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images