Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बोगस दाखले येणार अंगलट

$
0
0

नव्या सभागृहातील काही नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रारी

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर ः प्रभाग आरक्षित असो की खुला, नगरसेवक व्हायचे या इराद्याने अनेकांनी महापालिका निवडूक लढविली. खुल्या गटात समाविष्ट असणाऱ्यांनी ओबीसी, एससी प्रवर्गाचे दाखले काढले. पण जातीचे हेच बोगस दाखले आता नूतन नगरसेवकांना अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.महापालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटताच काहीजणांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आली आहे. संभाजीनगर परिसरातील दोन नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गतसभागृहात चार नगरसेवकांना बोगस दाखल्याचा दणका बसल्याच्या पार्श्वभूमीवर नव्या तक्रारीने महापालिकेचे राजकारण चांगलेच रंगण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या गेल्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली. तत्पूर्वी १ नोव्हेंबरला नव्या सभागृहासाठी निवडणूक झाली. दोन तारखेला मतमोजणी झाली. त्यामध्ये कोणत्याच पक्षाला थेट बहुमत मिळाले नाही. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी पंधरा दिवस मोठ्या हालचाली झाल्या. चमत्काराची भाषा झाली, पण कोणताच चमत्कार झाला नाही. १६ नोव्हेंबला नवीन सभागृह अस्तित्वात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आली. काँग्रेसच्या अश्विनी रामाणे महापौर झाल्या. विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. यामुळे विविध समिती सदस्यांच्या निवडीबरोबरच पदाधिकारी निवडी लांबणीवर पडल्या आहेत. नवीन सभागृह अस्तित्वात येऊन अजून महिनाही उलटला नाही. पण पंधरा दिवसातच काही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. याची सुरूवात दिलीप पोवार यांच्यापासून झाली आहे. अनाधिकृत बांधकामप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याचे राजकीय प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने राज्यपातळीवर फिल्डींग लावण्यात येत आहे. ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता संभाजीनगर परिसरातील दोन नगरसेवकांच्या जातीचा दाखला वादात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यामध्ये नगरसेवक संतोष गायकवाड यांचा समावेश आहे.

संभाजीनगर हा प्रभाग अनुसुचित जातीसाठी आरक्षित होता. या प्रभागात तिरंगी लढत झाली. गायकवाड यांनी भाजप ताराराणीच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजय मिळवला. उपमहापौर पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. नंतर तो मागे घेतला. काँग्रेसतर्फे माजी उपमहापौर हरिदास सोनवणे व राष्ट्रवादीतर्फे माजी नगरसेवक रवींद्र आवळे हे रिंगणात उतरले होते. सोनवणे यांनी आता गायकवाड यांच्या दाखल्याबाबत आक्षेप घेतला आहे. गायकवाड यांच्या दाखल्यावर 'मराठा' असा उल्लेख आहे. मग त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रभागातून कशी निवडणूक लढवली असा सवाल करतानाच त्यांच्या दाखल्याबाबत पुरावा गोळा करण्यात येत आहेत. यासाठी जातपडताळणी कार्यालयापासून ते गायकवाड यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेपर्यंतचे अनेक दाखले मिळवले आहेत. यामुळे गायकवाड यांचा दाखला वादग्रस्त ठरला आहे. गायकवाड यांच्याकडे भक्कम पुरावे असतील तरच त्यांचे नगरसेवकपद टिकणार आहे. शिवाय राजकीय वजन असल्याने कारवाईतही विलंब होणार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच परिसरातील आणखी एका नगरसेवकाच्या दाखल्याबाबत आक्षेप घेतला जात आहे,पण त्याची अधिकृत तक्रार नाही.

दाखल्याचा पंचनामा सुरूच

गेल्या सभागृहात अदिल फरास, सचिन चव्हाण, रेखा आवळे व राजेश लाटकर यांच्या बोगस दाखल्याबाबत तक्रारी झाल्या. पाच वर्षे हे नगरसेवक गॅसवर राहिले. यातील चव्हाण यांना सुप्रीम कोटापर्यंत जावे लागले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यांचा ओबीसी दाखला अपात्र ठरल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नाही. तत्पूर्वी दाखला अपात्र ठरल्याने तुकाराम तेरदाळकर , धनंजय सावंत, शोभा भालकर, विजय साळोखे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. रविकिरण इंगवले, सुरेश ढोणुक्षे यांच्या दाखल्याचा पंचनामा दहा वर्षानंतरही सुरूच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरच्या आरोपाचा अहवाल आज कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याने पोलिसांवर केलेल्या आरोपाबाबतचा चौकशी अहवाल शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीवर २१ नोव्हेंबरला सुनावणी होती. व्हिडिओ कॉन्फरन्सवर झालेल्या सुनावणीच्यावेळी समीरने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. ब्रेन मॅपिंग टेस्टच्या मागणीला होकार द्यावा यासाठी एका अधिकाऱ्याचा निरोप एक पोलिस कर्मचारी घेऊन आला होता. पोलिस सांगतील त्यांची नावे घेतल्यास २५ लाखाची ऑफर त्याला दिली होती. पोलिसांची ऑफर न मानल्यास फासावर चढवण्याची धमकी त्या पोलिसांनी दिली होती. आरोपाबाबत न्यायदंडाधिकऱ्यांनी तपास अधिकारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई

$
0
0

पंचगंगा प्रदूषणाबाबत ११ प्रस्तावांनुसार होणार कारवाई,

अन्य कारवाईसाठी सदस्य सचिव येणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी व रंकाळा तलाव प्रदूषणास जबाबदार असलेल्या विविध घटकांवरील आठ महिन्यांपासून थांबलेल्या कारवाईच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) येथील प्रादेशिक कार्यालयाकडून पाठवलेल्या कारवाईबाबतच्या अकरा प्रस्तावांना लवकर मान्यता दिली जाईल, असे एमपीसीबीचे सदस्य सचिव अनबालगन यांनी सांगितले आहे.

महापालिका, इचलकरंजी पालिकेसह डिस्टिलरी, खासगी हॉस्पिटल्स, फाइव्ह स्टार एमआयडीसीतील काही कारखान्यांवरील कारवाई यात प्रस्तावित आहे. तसेच हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे रंकाळा संवर्धनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावांच्या चौकशीची तयारी दर्शवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीमुळे पंचगंगा प्रवाहीत ठेवण्यावर मर्यादा आहेत. पाण्याची पातळी कमी होत आहे. प्रदूषणाची तीव्रता कमी झालेली नाही. महापालिका, इचलकरंजी पालिकेकडून ठोस उपाय नसल्याने सांडपाणी नदीत मिसळते.

त्याचबरोबर अनेक कारखान्यांनीही उपाययोजनांवर भर दिला नाही. प्रदूषण करणाऱ्या घटकांना रोखायचे असेल तर कारवाई आवश्यक आहे. पण गेल्या उन्हाळ्यात ज्यांनी प्रदूषण केले त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र अजून कारवाई झालेली नसल्याने यावेळीही प्रदूषण होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी शुक्रवारी सदस्य सचिव अनबालगन यांची मुंबईत भेट घेतली. जुन्या अकरा प्रकरणांचे प्रस्ताव कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाकडून पाठवण्यात आले आहेत. पण त्यांना मंजुरी न दिल्याने कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रदूषण रोखण्याला मर्यादा येत असल्याची बाब गायकवाड, देसाई यांनी निदर्शनास आणली.

या प्रस्तावांना लवकर मंजुरी देऊन कारवाईची प्रक्रिया सुरु केली जाईल. याशिवाय अन्य घटकांच्या प्रदूषणाबाबत स्वतः येऊन कारवाई प्रस्तावित करु असे आश्वासन दिले आहे. रंकाळ्यातील प्रदूषण रोखण्याबाबत कृतिशील सहकार्य असेल असे स्पष्ट करताना त्यांनी खर्चाच्या दोन प्रस्तावांच्या चौकशीची तयारी असल्याचेही सांगितले. त्यामुळे रंकाळा निधीच्या प्रस्तावाची चौकशी एमपीसीबीमार्फत होणार हे स्पष्ट झाले आहे. पंचगंगेपाठोपाठ रंकाळ्याच्या प्रदूषणाचा प्रश्नही सातत्याने डोके वर काढत आहे. त्यावर मात करण्यासाठी वारंवार उपाययोजना केल्या असल्या तरी तलावाचे प्रदूषण पूर्णपणे रोखण्यात अद्याप यश आलेले नाही.

कशी होते कारवाई ?

प्रदूषणाबाबत एमपीसीबी पंचनामे करते

कारणे दाखवा नोटीसचे अधिकार प्रादेशिक कार्यालयांना

त्यापुढील कारवाईसाठी मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवतात

कायदा विभागातून सल्ला घेतला जातो

त्यानंतर सदस्य सचिव प्रस्तावित केलेल्या कारवाईला मंजुरी देतात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनी रॅकेट सांगलीपर्यंत

$
0
0

बहाद्दूरवाडीत छापा, संशयित फरारी;

अकोल्यातील डॉक्टर दाम्पत्याचा सहभाग



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहाद्दूरवाडीपर्यंत पोहचले आहेत. बहाद्दूरवाडी येथील शिवाजी महादेव कोळी हा या किडनी रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन अकोल्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज तपासासाठी बहाद्दूरवाडीत छापा टाकला. मात्र ‌शिवाजीचा मुलगा विजयने वडील अकोल्याला पोलिसांत हजर होण्यासाठी गेले आहेत, अशी माहिती पथकाला दिली.

अकोला पोलिसांनी आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा छडा लावला आहे. अकोल्यातील डबकी रोड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद आहे. अकोला पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयितांनी बहाद्दूरवाडी येथील शिवाजी कोळी हा या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शुक्रवारी अकोला गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिवाजीला ताब्यात घेण्यासाठी आष्टा पोलिसांच्या मदतीने बहाद्दूरवाडीत छापा टाकला. मात्र पथक पोहचण्यापूर्वीच शिवाजी परागंदा झाला होता. पथकाने शिवाजीचा मुलगा विजयकडे चौकशी केली असता त्याने वडील अकोल्याला हजर होण्यासाठी गेले आहेत. त्यांनी २००० साली मुंबईत किडनी दान केली होती. त्यानंतर काय घडले, हे आम्हाला माहीत नाही, अशी माहिती पोलिस पथकाला दिली.

याबाबत आष्ट्याचे निरीक्षक प्रताप पोमण म्हणाले की, अकोल्याचे पथक आज संशयिताला अटक करण्यासाठी आले होते. अकोला, नागपूर व यवतमाळ परिसरात किडनीचे रॅकेट असल्याने तपास इथंपर्यंत पोहचला. किडनी विक्रीतून मिळालेली रक्कम कमी मिळाली म्हणून कुणीतरी तक्रार केल्याने हा प्रकार उघड झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅकेट असावे, असा अंदाज आहे.

डॉक्टर दाम्पत्याचे नाव चर्चेत

अकोलाः दरम्यान, अकोला येथील संतोष शंकर गवळी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जुन्या शहरातील रहिवासी आनंद भगवान जाधव (३०) व देवेंद्र सिरसाट या दोघांना बुधवारी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य लोकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. या किडनी रॅकेटमध्ये यवतमाळ येथील डॉ. मंगला व डॉ. सुहास श्रोत्री या दाम्पत्याचेही नाव पुढे येत आहे. किडनी काढण्यासाठी संबंधित व्यक्तीला तयार केल्यानंतर त्यांची तपासणी या डॉक्टर दाम्पत्याच्या मदतीने केली जाते व त्यानंतर त्याला विदेशात किंवा देशातील अन्य भागात किडनी काढण्यासाठी हे दाम्पत्यच घेऊन जात असल्याचे समजते. या डॉक्टर दाम्पत्याचे यवतमाळातील टिळकवाडी येथे हॉस्पिटल होते. ते बंद करून हे डॉक्टर दाम्पत्य नागपुरात त्यांच्या नातेवाईकाकडे स्थायिक झाल्याचे समजते. त्यांच्या मदतीनेच रुग्णांच्या नागपुरातही तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे.

किडनी रॅकेटच्या टार्गेटवर गरीब !

आर्थिक गरजवंतांना हेरायचे. त्यांना उधार पैसे द्यायचे आणि त्याच्या वसुलीसाठी तगादा लावायचा वेळ प्रसंगी धाकदपटशा करायच्या आणि अधिक पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांच्या किडनीचा सौदा करायचा असा गोरखधंदा किडनी रॅकेटने सुरू केला आहे. यात आता आणखी पाच जणांनी अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आल्याने या रॅकेटचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरही असल्याचे दिसते.

पाच जणांच्या तक्रारी

किडनी रॅकेटमध्ये आतापर्यंत पाच जणांनी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेऊन किडनीच्या बदल्यात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे किडनी रॅकेटची व्याप्ती आणखी वाढली आहे. संतोष गवळी, शांताबाई खरात, संतोष कोल्हटकर, देवा कोमलकर व अमर नामक युवक यांनी स्वत:हून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

धमकीचा प्रयत्न

दरम्यान, या प्रकरणात नाव आलेल्या बहाद्दूरवाडीतील शिवाजी कोळी यांच्या घरी माहिती व चित्रीकरणासाठी गेलेल्या दूरचित्रवाणीच्या काही पत्रकारांना शिवाजी यांचा मुलगा विजय कोळी यांनी धमकावले. चित्रीकरण करू नका नाहीतर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांनी यावेळी‍ संबंधित पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित शाळांचा संप सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनुदानपात्र शाळा, तुकड्यांना तत्काळ अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शनिवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. जिल्ह्यातील १२५ शाळांपैकी ८० शाळा बंद ठेवत शिक्षकांनी संपामध्ये सहभाग घेतला.

अनुदानपात्र शाळा, तुकड्यांना तत्काळ अनुदान मिळावे, न्यायालयाकडून पात्र शाळांना अनुदान द्यावे, अघोषित शाळांची यादी प्रसिद्ध करावी, २८ ऑगस्ट २०१५ चा जाचक निर्णय रद्द करावा, उच्च माध्यमिक शाळा अनुदा‌नाची प्रक्रिया सुरू करावी, स्वयंअर्थसाहय्यित शाळा धोरण हद्दपार करावे या मागणीसाठी राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. राज्यासह जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळा बेमुदत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शनिवार (ता.५) पासून सकाळी ११ वाजता सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडीस प्रारंभ झाला. कोल्हापुरातील आंदोलनाचे नेतृत्व राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसूण महागला, द्राक्षांची आ‍वक सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डाळी आणि टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर दर काहीसे खाली येऊन स्थिर झालेले असताना लसूण महागला आहे. लसूण दर १५० ते १७० रुपयांपर्यंत प्रतिकिलो गेला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत धान्य बाजारातील दर स्थिर राहिले आहेत, तर भाज्यांची आ‍वक पुरेशी असल्याने भाज्यांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणेच कायम आहेत. फळ बाजारात संत्र्यांची आवक कायम असल्याने वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे संत्र्यांची चव चाखायला मिळत आहे. द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीची आवक नुकतीच सुरू झाली आहे.

गेल्या महिन्याभरात डाळी आणि गहू, तांदळाचे दर वाढत असताना शाबूच्या दरात मात्र कमालीची घसरण झाली आहे. ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले शाबूचे दर सध्या ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो आहेत. गहू २६ ते ३० रुपये, ज्वारीमध्ये महिंद्रा २४ रुपये, बार्शी ३५ रुपयांवर स्थिर आहे. डाळी आणि कडधान्यांचे दर या आठवड्यात स्थिर राहिले आहेत. उडीद डाळ १८० मूगडाळ १३०, मटकी १२०, मसूर डाळ ९० यासह तूरडाळीचे दरही १७० ते १८० रुपयांवर स्थिर आहेत.

स्ट्रॉबेरी, द्राक्षांची आ‍वक

थंडी सुरू होताच लालचुटूक स्ट्रॉबेरीची आवक सुरू होत असते. यावेळी किरकोळ बाजारात जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांसह महाब‍ळेश्वरमधून आलेली स्ट्रॉबेरी दाखल झाली आहे. तीस ते चाळीस रुपये प्रतिबॉक्स स्ट्रॉबेरीचे दर आहेत. द्राक्षांचीही आवक सुरू झाली असून, १५० ते २०० रुपये प्रतिकिलो असे द्राक्षांचे दर आहेत.

बेदाणा आवक वाढली

कुपवाड : सांगली मार्केट कमिटीत बेदाण्याची आवक गेल्या आठवड्यापेक्षा २५०९ क्विंटलनी जास्त झाली आहे. सरासरी दर तेरा हजार रुपये इतका मिळाला आहे. राजापुरी, परपेठ हळदीची आवक मात्र घटली असून चोरा हळदीच्या आवकेत वाढ झाली आहे. राजापुरी हळदीचा सरासरी दर १०२२५ रुपये इतका आहे, तर परपेठ हळदीला ९६७५ रुपये इतका दर निघाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनी रॅकेटमुळे मिरज पुन्हा चर्चेत

$
0
0

हरीश यमगर, कुपवाड

अकोल्यातील किडनी रॅकेटमुळे मिरजेत दहा वर्षांपूर्वी खळबळ उडवून देणारे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. १९९७-९८ मध्ये मिरजेच्या वानलेस (मिशन) हॉस्पिटलमध्ये किडनी बदलण्याचे केंद्र सुरू झाले. या सेंटरचे कामही अत्यंत उत्कृष्ट होते. किडनीच्या अनेक शस्त्रक्रिया सेंटरमध्ये यशस्वी झाल्या. त्यामुळे सेंटरची ख्याती सर्वदूर गेली. मात्र त्याचवेळी हॉस्पिटलभोवती एक-दोन किलोमीटर परिसरात किडनी तस्करी करणारे रॅकेट कधी तयार झाले, हे समजलेच नाही.

या रॅकेटने हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांशी जवळीक वाढविलेली असते. किडनी आवश्यक असलेला रग्ण कोण आहे, त्याची अर्थिक स्थिती काय आहे, याची इत्यंभूत माहिती हाती लागली की रॅकेट त्या रुग्णाच्या नातेवाईकांना गाठते. त्यानंतर स्वतःहून किडनी विकणाऱ्याचा माग काढला जातो किंवा एखाद्या गरिबाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याला जाळ्यात ओढायचे नि काम फत्ते करायचे. असाच प्रकार वाईहून वानलेस हॉस्पिटलमध्ये किडनी उपचारासाठी दाखल झालेल्या एका रग्णाच्या बाबतीत २००२-२००३ मध्ये घडला होता.

वॉनलेसमध्ये दाखल असलेल्या वाईच्या रुग्णावर किडनी बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. परंतु रूग्ण वाचला नाही. धार्मिक भावनांचा आधार घेऊन रुग्णाच्या नातेवाईकाने पोस्टमार्टेम करण्यास नकार दिला. परिस्थितीचा विचार करुन संबंधित डॉक्टरांनीही पोस्टमार्टेम न करताच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. परंतु त्यानंतर हॉस्पिटलला भलत्याच प्रकरणाला सामोर जावे लागले. रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलनेच पैसे घेऊन किडनी उपलब्ध करुन दिल्याचा दावा करत शस्त्रक्रियेवेळी हलगर्जीपणाचा आरोप ठेवला. मानवी हक्क आयोगापासून ते लोकायुक्तांपर्यंत तक्रारी केल्या. यानंतर वॉनलेसमधील सेंटरचे काम थंड पडले. सरकारने तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली. समितीने या प्रकरणात काही गैर झाले आहे का? याची माहिती घेतली. त्यावेळी चौकशीत हॉस्पिटलचा गलथानपणा समोर आला.

सर्वच गोष्टी संबंधित डॉक्टरसमोर घडत नसल्याने प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका जबरदस्त बसतो. नेमके तेच वॉनलेसमधील सेंटरच्याबाबतीत घडले. मानवी हक्क आयोगाने वास्तव समोर आल्यानंतर कुणाला थेट शिक्षा सुनावली नाही, परंतु हॉस्पिटलच्या कारभारावर सडकून ताशेरे ओढले आणि संबंधित सेंटर कायमचेच बंद झाले.

अॅम्ब्युलन्सवाल्यांची दादागिरी

सरकारी रूग्णालयांना खासगी रुग्णवाहिकांचा वेढा पडल्याचे चित्र सवयीचेच झाले आहे. या रुग्णवाहिका फैलावायला कारणीभूत सत्य समोर आले ते सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून मृतदेहाची वाहतूक करायची नाही, या नियमाचे. त्यामुळे नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय उरत नाही. त्याला जोडून खासगीवाल्यांची मनमानी आलीच. सुरुवातील गोड बोलून मृतदेह गाडीत घ्यायचा, हॉस्पिटलमधून गाडी रस्त्यावर आली की मनात येईल ते भाडे सांगून त्या रकमेची मागणी करायची. भाडे परवडत नसेल तर मृतदेह रस्त्यावर काढून ठेवायची धमकी द्यायची. असे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे नातेवाईकांची अवस्था बिकट होते. त्यात रात्रीची वेळ आणि दूरच्या गावात जायचे असेल तर आणखी स्थिती वाईट.

रक्त विकणारेही रॅकेट

केवळ किडनी तस्करीचे रॅकेटच नामवंत किंवा सरकारी हॉस्पिटल परिसरात फोफावते असे नाही. खासगी हॉस्पिटल चालकांनीही पेशंट आपल्याच हॉस्पिटलमध्ये यावा, यासाठी खासगी रुग्णवाहिका, रिक्षा चालकांना कमीशन सुरू केलेले असते. रक्त विकत मिळवून देणारे रॅकेटही कार्यरत असते. अनेकदा नातेवाईकांची रक्त स्वतः देण्याऐवजी विकत घेण्यालाच अधिक पसंती असते. ज्यांच्याकडे मुबलक पैसे आहेत त्यांचे ठीक आहे, पण ज्यांना सरकारी हॉस्पिटलशिवाय इतर ठिकाणचे उपचार परवडत नाहीत, अशा रुग्णांनाही रक्ताची गरज भासते. अशा गरजूंना तर रक्त विकत देण्याचे आमीष दाखवून पैसे घेऊन पोबारा करणारेच जास्त भेटतात, अशी माहिती आहे. अशांनी कोणाकडे दाद मागायची? हाही एक सवालच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी सेंटर तपासणी युद्धपातळीवर

$
0
0

लिंग निदान चाचणीप्रकरणी प्रशासन सतर्क

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रसवपूर्व लिंग निदान चाचणीसाठी लॅपटॉपवरूनही सोनोग्राफी करण्यात येत असल्याने प्रशासनाने सतर्कता घेतली आहे. आठ महिन्यात शहरात ४६४ तर ग्रामीण भागात ४२७ सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली. पीसीपीएनडीटी अंतर्गत केस दाखल करत असताना पोलिसांची मदत घेण्यात यावी. पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्या कार्यशाळा घेण्याबरोबरच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्यातही सजगता निर्माण करावी,' असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.

जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी दक्षता पथक समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे, जिल्हा सरकारी वकील अॅड. मंगसुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. आडकेकर, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी उपस्थित होते. 'जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील बालकांमध्ये दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१२ आहे. यामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, गगनबावडा व राधानगरी या तालुक्यांमध्ये हे प्रमाण अधिक कमी आहे. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय, सजगता व संवेदनशीलता निर्माण करुन पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर व काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे,' असे सैनी यांनी सांगितले.

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाबाबत उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवतींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे सांगून या अभियानाअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.

४७ सोनोग्राफी सेंटर बंद

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात १३१ तर ग्रामीण भागात १६० सोनोग्राफी सेंटर आहेत. या पैकी ४७ तापुरती बंद आहेत. ग्रामीण भागातील सोनोग्राफी सेंटर मधील एप्रिल ते जून या काळामध्ये १५८, जुलै ते सप्टेंबरमध्ये १६०, ऑक्टोबर मध्ये ५२, तर नोव्हेंबर मध्ये ५७ सेंटरची तपासणी करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात एप्रिल ते जूनमध्ये १७५, जुलै ते सप्टेंबरमध्ये १७८ ऑक्टोबरमध्ये ६०, तर नोव्हेंबरमध्ये ५१ सेंटरची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किडनी रॅकेट बहादूरवाडीतील संशयित फरारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटमधील संशयित शिवाजी महादेव कोळी हा अकोला पोलिसांत हजर व्हायला गेल्याचे त्याच्या मुलाने सांगितले असले तरी प्रत्यक्षात तो फरार झाला आहे. अकोला येथून आलेले पोलिस पथक अद्यापही सांगली जिल्ह्यात तळ ठोकून आहे. वाळवा तालुक्यातीलच काही गावात या पथकाची चाचपणी सुरू असल्याचे समजते.
एका अधिकाऱ्याने शिवाजी कोळी अकोल्याच्या जवळपास आहे. उद्यापर्यंत तो हजर होईल असे सांगितले. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी वैषाली शिंदे यांनी या प्रकरणाबाबत आमच्याकडे काहीही माहिती नाही असे सांगितले.

श्रीलंकन चलनाचे इंगित काय?

शिवाजी कोळी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. सध्या तो येथील केबीपी कॉलेजमध्ये प्रयोगशाळा परिचर आहे. अलीकडे शिवाजीचे राहणीमान सुधारल्याचे त्याच्या गावातील अनेकांनी सांगितले. नुकताच श्रीलंकेला जाऊन आलो, असे म्हणून श्रीलंकेच्या चलनी नोटा, नाणी तो लोकांना दाखवायचा. त्याचा मुलगा विजय व्हेटरनरी डॉक्टर म्हणून काम करतो. त्याने पानपट्टीचा व्यवसायही सुरू केला आहे. गावाबाहेर त्याच्या शेतात शिवाजीचे छोटेसे घर आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या राहणीमानात जाणवण्याइतका फरक झाला आहे.
पूर्वी शिवाजी कर्जबाजारी असे. व्याजाने पैसे घ्यायचे आणि घरखर्च चालवायचा, अशा प्रमारामुळे तो पिचला होता. त्यामुळे त्याने स्वतःची किडनी विकली असावी, असा अंदाज आहे. त्याच्या मूळगावी बहाद्दूरवाडी येथे तो फारसा कुणाची परिचित नाही. बरीच वर्षे तो इस्लामपुरात राहत होता. अलीकडेच तो बहाद्दूरवाडीत वास्तव्याला गेला आहे. गावापासून लांब वस्तीवर राहत असल्याने त्याचा गावाशी संपर्क येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकडो हातांमुळे वाचला त्याचा ‘सर्जा’

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवर येऊन राबणारे हात थंडीवाऱ्यात ऊस तोडणीसाठी राबत असतात. या राबणाऱ्या हातांना अनेक सकटांना सामोरे जावे लागते. मात्र, कधी कधी ही संकटे कुटुंबसह जीवाभावाच्या बैलांवरही बेतते. काळजाचा ठोका चुकतो. पण माणुसकी धावून येते आणि आलेल्या प्रसंगातून सहज बाहेर पडतो... असाच काहींसा प्रसंग घडला कागलनजीक. उसाने भरलेल्या गाडीचा कन्ना मोडला आणि गाडी उलटली. या गाडीवर बसलेला गाडीवान, त्याची पत्नी आणि चार वर्षाचे बालक रस्त्यावर फेकले गेले. त्यांना किरकोळ इजा झाली असली तरी गाडी बैलांवर उलटली होती. दोन -तीन टन ऊस बैलावर पडला होती. ही परिस्थिती पाहून उसाखाली अडकेला बैल जगला असेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, त्यावेळी रस्त्यावरचे लोक जमा झाले आणि अवघ्या काही मिनिटात बैलावर पडलेला ऊस काढला आणि बैलाला सहीसलामत वाचवले.

वेळ सायंकाळची चारची. कागल निढोरी राज्यमार्गावर दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोबा गर्दी. प्रत्येकालाच घरी जाण्याची मोठी गडबड. इतक्यात शाहू साखर कारखान्याच्या वळणावर सुमारे चार टनाचा बोजा घेवून जाणाऱ्या बैलगाडीच्या कन्न्याच्या मोठा आवाज झाला. बैलगाडीचे चाक निखळले. उसाने भरलेल्या बैलगाडीवर चार वर्षाचे बालक, त्याची आई आणि गाडीवान बसला होता. बाळ फेकले गेले आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, ते बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले. बाळाची आईही गाडीपासून बाजूला झाली पण, संपूर्ण उसाखाली बैल मात्र सापडला होता. क्षणार्धात सर्वांनी आपली वाहने थांबवली आणि अवघ्या पाचच मिनिटात बैलावरील ऊस बाजूला काढून बैलाला जीवदान दिले. आपला जिवाभावाचा सर्जा उठून उभा राहिलेला पाहिला आणि बीडहून आलेले गोकुळ मगदूम यांच्या डोळ्यात अश्रू आले.

अवघ्या पाचच मिनीटात बैलाच्या अंगावरील संपूर्ण ऊस बाजूला झाला आणि नागररिकांनी बैलाला उचलून बाजूला घेतले. तरीदेखील बैल उठेना ते पाहून मालकाच्या तोंडचे तर पाणीच पळाले. परंतु, नागरीकांनी त्यांना धीर दिला. बैलाला बळेबळेच उभे केले आणि भेदरलेला बैलही उठून चालू लागला. ते पाहून मालक गोकुळ यांचा जीवही भांड्यात पडला.

गाडीच्या नुकसानीकडे ढुंकुनही न बघत गोकुळ यांना बैलाची सुरक्षितता पाहून त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. यावेळी काही अतिउत्साही युवक मदतीऐवजी फोटो काढून व्हॉट्स अॅप पाठविण्यात मग्न होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे

$
0
0

शेट्टींची नरमाईची भूमिका ; शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकरकमी एफआरपी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सहा डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता. अल्ट‌िमेटमपूर्वीच सरकारने मूल्यांकनामध्ये केलेली वाढ आणि परचेस टॅक्स माफ करण्याचे आवश्वास यामुळे संघटनेने नरमाइची भूमिका घेतली आहे. दोन तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत बैठक होणार आहे. बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे रविवारपासून सुरू होणारे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर होणार आहे.

शुगर कंट्रोल अॅक्टनुसार एकरकमी एफआरपी देण्याचे बंधन असताना बाजारातील साखरेच्या दरामध्ये झालेली घट विचारात घेवून साखर कारखानदारांनी तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता. तसे ठरावही वार्षिक सभेत मंजूर केले होते. मात्र कारखानदारांच्या निर्णयाला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये सहा डिसेंबरपर्यंत कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यासाठी अल्ट‌िमेटम दिला होता. यानंतर ऊस गळीत हंगामाने जोर पडकला आहे. जिल्ह्यातील अनेक कारखाने सुरू होऊनही महिन्याचा कालावधी झाला असताना अद्याप शेतकऱ्यांना पहिले बिल मिळालेले नाही.

एफआरपीबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने आंदोलनाला सुरुवात होणार का? चर्चा सुरू असताना शेतकरी संघटनेने घुमजाव केल्याचे दिसत आहे. एफआरपीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन सर्वच घटकांना दिले होते. साखरेचे मूल्यांकन वाढवण्याबरोबरच परचेस टॅक्स माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बैठकीविनाच घेतला असला, तरी याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.

एफआरपी देण्यास साखर कारखानदारांना अडचणी नाही. मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांत बैठक होणार आहे. यामध्ये एकरकमी एफआरपीचा निर्णय न झाल्यास मिळेल, त्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेणार

- खासदार राजू शेट्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतबाह्य औषधे अंगणवाड्यांना

$
0
0

केंद्रप्रमुख डॉ. पठाण यांना कारणे दाखवा नोटीस

म. टा वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील गावभागातील अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य जंतनाशके औषधे वितरीत केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. काही पालक व अंगणवाडीसेविकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सदरची औषधे नगरपरिषदेकडील आरसीएच केंद्राकडून देण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. या संदर्भात आरसीएच केंद्रप्रमुख डॉ. यास्मिन पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

येथील जुना वैरण बाजारातील पालिकेच्या इमारतीत इचलकरंजी नगरपरिषद अर्बन आरसीएच नागरी आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातून अंगणवाडीतील बालकांसाठी सेनझोल नावाचे जंतनाशक औषध वितरीत करण्यात आले होते. सदरचे वितरण गावभाग परिसरातील अवधूत आखाडा, कलावंत गल्ली, त्रिशुल चौक, सारवान गल्ली व मुजावर गल्ली येथील अंगणवाड्यामधून बालकांना देण्यात आली होती. सदरचे औषध हे मुदतबाह्य असल्याचे इम्रान मैंदर्गी या पालकाच्या निदर्शनात आले. त्यांनी या संदर्भात अन्य पालकांकडे चौकशी केली असता मुदत संपलेल्या सुमारे २५ बाटल्या आढळून आल्या. जंतनाशक औषधाची निर्मिती नोव्हेंबर, २०१२ ची असून ऑक्टोबर, २०१४ रोजी त्याची मुदत संपली आहे. सुमारे १४ महिन्यांपूर्वी मुदत संपलेली असताना अशी औषधे बालकांना वाटल्याच्या धक्कादायक प्रकार घडल्याने पालिका प्रशासनास खडबडून जाग आली. तर काही अंगणवाड्यातील सेविका व मदतनीसांनी ही बाब लक्षात आल्याने त्यांनी या औषधांचे वितरण थांबविले.

याबाबत आरसीएच केंद्राकडे काही पालकांनी विचारणा केली असता तेथे असलेल्या डॉ. पठाण यांनी पालकांशी हुज्जत घातली. असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी तत्काळ आरसीएच केंद्रात धाव घेतली. जंतनाशक औषधांचा कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पिटलकडून पुरवठा करण्यात आलेला आहे. मात्र त्यांच्याकडील आलेली औषधे मुदतबाह्य नव्हती. त्यामुळे वाटण्यात आलेली औषधे आली कोठून याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

या संदर्भात उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी दिलेली माहिती अशी, एचएस २६ आणि एचएस १९७ अशा दोन बॅचची जंतनाशक औषधे मिळाली. त्यापैकी एक औषध एचएस २६ बॅचची मुदत ३१ डिसेंबर, २०१५ आहे. या बँचची औषधे आरसीएचकडून पुरविण्यात आली आहेत. मात्र एस १९७ बॅचची मुदत ऑक्टोबर १४ मध्ये मुदत संपलेली औषधे कोठून आली व ती वितरीत कशी झाली याचा अहवाल वैद्यकीय अधिकार्यांकडून घेणेत येईल. आणि त्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे.

एचएस १९७ बॅचची मुदत ऑक्टोबर १४ असून सदर बॅचची औषधे आरसीएच नगरपरिषदेकडून पुरविण्यात आलेली नाहीत असे उपमुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही औषधे आणली कोणी आणि त्याचे वितरण कोणी केले याचा छडा लावणे गरजेचे आहे. ही बाब जर उघडकीस आली नसती तर ही घटना चिमुकल्यांच्या जीवानाशी आली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगाव येथे अपघातात कोडोलीचा तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

उदगांव (ता. शिरोळ) येथे टाटा टेंपो व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोडोलीचा तरूण जागीच ठार झाला. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जयदीप जयसिंग पाटील (वय २०) असे तरूणाचे नाव आहे. जयदीपचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.

जयदीप हा सांगली येथे भारती विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो होस्टेलमध्ये राहात होता. महाविद्यालयास दोन दिवस सुटी असल्याने तो शनिवारी दुपारी मोटारसायकलीवरून कोडोलीकडे जात होता. निमशिरगाव जैनापूरमार्गे सांगली-कोल्हापूर बायपास रोडने जात असताना कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या टेम्पो (क्रं.एम.एच.०९ सीए २९४) शी मोटारसायकलची धडक झाली. उदगाव येथील सतीश कुकडे यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. अपघाताची वर्दी टेम्पो चालक अकबर हुसेनसाब जमादार (रा. उजळाईवाडी, कोल्हापूर) याने जयसिंगपूर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून जयदीपचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.

जयदीपचे नेत्रदान

जयदीपचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच पाटील कुटूंबिय व मित्रांनी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. अशा दु:खाच्या प्रसंगीही मोठ्या धीराने कुटूंबियांनी जयदीपच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. सांगली येथील नेत्रसेवा फाउंडेशनच्या दृष्टीदान नेत्रपेढीस याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर नेत्रपेढीचे पथक रूग्णालयात दाखल झाले. जयदीपच्या नेत्रदानामुळे दोघा अंधांना दृष्टी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सदोष घरगुती विद्युत मीटर तसेच वाढीव बिलामुळे कुरूंदवाड येथील वीजग्राहक हैराण झाले आहेत. विद्युत मीटर त्वरित बदलून मिळावीत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही न केल्यास १५ जानेवारी रोजी मोर्चा काढून महावितरणमया कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांच्यासह वीज ग्राहकांनी कुरूंदवाड येथे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सदोष मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक वीज बिलात दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे. ग्राहकांना सदोष मीटरमुळे वाढीव बिले भरावी लागत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे. महावितरणने विद्युत मीटर रिडींगचे काम खासगी संस्थेला दिले आहे. मात्र वेळेवर मीटरचे रिडींग घेतले जात नाही, अशीही वीज ग्राहकांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचा धडाका

$
0
0

२२ कोटींची विकासकामे प्रस्तावित; १२ कोटींची कामे

म. टा. वृत्तसेवा, कागल

सर्वसामान्यांसाठी माझ्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. आता जरी थेट सत्तेत नसले तरी आपल्या विकासकामांची गती मुश्रीफ यांनी जराही कमी होऊ दिलेली नाही. एकीकडे तब्बल २२ कोटीची विकासकामे आता मंजूर केली असून त्यातील १२ कोटींच्या विकासकामांना सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेत सर्वसामान्यांवर अन्याय झाला म्हणून आणि अन्य महत्त्वाच्या विषयांसंदर्भात सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्यास सुरूवात केली आहे.

कागल विधानसभेची रचना तशी विचित्र पद्धतीची आहे. तालुक्याचा विचार करता मुरगूड,कागल ,कापशी असे तीन भाग पडतात. त्यामुळे मतदारसंघावर चौफेर लक्ष ठेवावे लागते. यामध्ये कुठे कमी पडलो असे मुश्रीफ यांना वाटत नाही. सत्तेत असताना विकासकामे कशा पद्धतीने करता येऊ शकतात हे त्यांनी नियमांपेक्षा जास्त निधी आणि इतर आमदार खासदारांचा निधी कागल तालुक्यात आणून दाखवले आहे. कामगार, विशेष सहाय्य, विधी, न्याय वक्फ, पाटबंधारे आदी खात्याचे मंत्री असताना ही खाती काय आहेत आणि त्याचा सामान्य जनतेला कसा उपयोग होऊ शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या काळात राज्यात अग्रेसर म्हणून नावाजलेल्या गरीबांच्या मोफत ऑपरेशनसाठी त्यांनी पगारावर नेमलेले आठ कर्मचारी आजही कामावर आहेत. आठवड्याला १५ ते २० पेशंटवर आजही मोफत उपचार केले जातात.

घरेलू, बामधकाम कामगारांच्या समस्या, ग्रामपंचायतीच्या इमारती, दफनभूमी, स्मशानशेड, अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कामे आता शिल्लक आहेत. कागल शहराचा चेहरा मोहरा बदलताना 'सर्वांग सुंदर' कागलचे स्वप्न सत्यात उतरवत आणले आहे. स्विमींग टँक, नाट्यगृह, बोटिंग क्लब, आणि राज्यातील एकमेव घनकचऱ्यापासून वीज प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प असे प्रोजेक्ट यशस्वी राबवले आहेत.

रमाई योजनेअंतर्गत १००२ घरे मोफत वाटली आहेत. सर्वसामान्य ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी ३२५ कोटी रुपये खर्चून सरसेनापती संताजी घोरपडे या खासगी साखर कारखान्याचीही अध्ययावत तंत्रज्ञान वापरुन निर्मिती केली आहे. १५ वर्ष सत्तेतला आमदार आणि मंत्री आणि आता एक वर्षाचा विरोधी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे सत्ता नसताना कसा अन्याय येतो याचा अनुभव वारंवार येतो असे ते सांगतात.

निधी देताना पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय विरोधी युती सरकार नेहमीच करते असे त्यांनी स्पष्ट केले. आता यापुढे निधीसाठी संघर्ष करणार असून जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळवण्याचे काम सुरु आहे. मंत्री असताना शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक आणि कापशीच्या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता उर्वरित निधीसाठी मी प्रयत्न करणार आहे.

कागल मतदारसंघात गडहिंग्लजच्या कडगाव-कौलगे मतदार संघात सात गावे आणि उत्तूरला पाणीटंचाई जाणवते. त्याला पर्याय म्हणून पुढच्या पावसाळ्याच्या आता पाण अडवून वाढवण्याचा मानस आहे. आंबेओहळ आणि बारवे-नागनवाडी प्रकल्प 'वॉर रुम' मध्ये टाकले असून ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहे. चिकोत्रा धरण भरण्यासाठी नागनवाडीजवळील म्हातारीचे पठार ही पश्चिम वाहिनी वळवून धरणाला कायस्वरुपी पाण्याचा स्रोत उपलब्ध करुन देणार आहे. इंडोकाउंटसारख्या प्रतिथयश कंपन्या आणून उत्तूर परिसरात बेरोजगारी हटवण्याचा प्रयत्न आहे. कागलमध्ये आणखी पाच हजार घरे बांधून देण्याचा मानस आहे. याशिवाय मतदारसंघातील माद्याळ, भेरेवाडी, वडरगे, साके, सावर्डे सारख्या डोंगराळ भागातूल १० हजार हेक्टरवर ठिबक सिंचन योजना सुरु करण्याची माझी महत्त्वाकांक्षी योजना आहे.

- आमदार हसन मुश्रीफ

केवळ आश्वासने हीच मुश्रीफ यांची ‌नीती

कागल मतदारसंघातील उत्तूरचा आंबेओहळ आणि दिंडेवाडी बारवेचा नागनवाडी प्रकल्प हे गेली पंधरा वर्षे मुश्रीफ आमदार व मंत्री असल्यापासून प्रलंबित विषय आहे. पाटबंधारे मंत्री असताना हे पूर्ण करणे हा त्यांचा हातचा मळ होता. परंतु सत्तेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून देवून आता पूर्ण करणार आहोत.

सत्ता नसताना मुश्रीफांनी हे हे करतो म्हणणे म्हणजे मोठा विनोदच आहे. निवडणुका आल्या की आश्वासने द्यायची आणि निवडून आल्यावर पाच वर्ष त्याकडे ढुंकूनही बघायचे नाही अशीच नीती मुश्रीफांची राहिली आहे.

जिथे सत्ता असते तिथे विकास हा होतच असतो. लोकशाहीमध्ये आमदार आणि मंत्र्यांनी रस्ते, मंदिरे बांधणे आणि नागरिकांना पायाभुत सुविधा देणे हे अनिवार्य आणि कर्तव्याचा भाग आहे. परंतु, याला विकास म्हणताच येत नाही, विकास हा सर्वसमावेशक झाला पाहिजे. कुठलाही माणूस गरजू न रहता त्याला स्वत:च्या पायावर उभा रहाण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु, कागल तालुक्यात सरकारी योजनांचे पैसे आपणच देतो आहोत असे भासवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. बेकारी हटवण्याची भाषा एकीकडे होत असताना कागलमधील पंचतारांकीत एम.आय.डी.सी.तील उद्योजक उद्योग बंद करुन परराज्यात चालले आहेत. गडहिंग्लजमधील एम.आय.डी.सी ओसच पडली आहे.

कागल तालुक्यात चार एकराचा स्लॅब असताना तो निवडणुकीपूर्वी आठ एकर करण्याची भीमगर्जना करणाऱ्या मुश्रीफांच्या पंधरा वर्षाच्या सत्तेत जमले नाही आणि आताही त्यांना जमणारे नाही. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही रखडले आहे. त्याचा विनाकारण सरकारी तिजोरीवर बोजा यांच्यामुळेच वाढला आहे. अंबेओहळ प्रकल्प मार्गी लागला असता तर परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटला असता.

सत्तेत असतानाही खासगी कारखाना काढण्याचे मनसुबे मुश्रीफांचे लपलेले नाहीत. त्यांनी हा कारखाना खरोखरच शेतकऱ्यांचा आहे हे कृतीतून दाखवायचे असेल तर सहकारी करण्याची तयारी ठेवावी आमही त्यांना शेतकरी हितासाठी सहकारी साखर कारखाना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करु.

- बाबासाहेब तावरे, जिल्हा परिषद सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बखरीमधून संभाजी महाराजांची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बखर, पुस्तके, कांदबरी आणि नाटकांमधून बखरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचे विकृतीकरण करुन बदनामी केली. त्यांनी लिहिलेल्या विकृत इतिहासाचे वाचन केले गेले. मात्र अॅड. अनंत दारवटकरांनी संशोधनाच्या माध्यमातून संभाजी माहाराजांचा खरा इतिहास समोर आणला आहे. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे लेखन करताना अॅड. दारवटकर यांनी वकिलाच्या भूमिकेतून नव्हे तर न्यायाधिशाच्या भूमिकेतून लेखन केले आहे,' असे प्रतिपादन शाहू चरित्रकार डॉ. प्रा. रमेश जाधव यांनी केले. अॅड. अनंत दारवटकर लिखित 'अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज' खंडाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते.

शाहू स्मारक येथील मिनी सभागृहात प्रबोधन सेवाभावी संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. जाधव म्हणाले, 'फंदफितुरीमुळे संभाजी महाराजांनी बाळाजी चिटणीसांना मारल्याने मल्हारी चिटणीसांनी संभाजींचे चित्रण व्यसनी आणि बदफैली असे लिखाण केले. यानंतर लिहिलेल्या कादंबऱ्या, नाटके आणि पुस्तकांमध्ये बखरीचा संदर्भ घेवून त्यांची बदनामी केली. त्यानंतर 'अनुपुराण'मध्ये संभाजींबाबत चांगले ​लिखाण झाले.

ही परंपरा छावा, संभाजी, शापित राजहंस अशा पुस्तकामधून संभाजींचे चित्रण उत्कृष्ट झाले. मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन करुन घेण्यास यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टी दाखवली. ती आताच्या आणि पूर्वीच्याही काँग्रेस नेत्यांमध्ये नाही. मराठ्यांच्या इतिहास लेखनाची १९६० पासून सुरू झालेली प्रक्रिया आजही दारवटकरांच्या रुपाने सुरू आहे. दारवटकर पेशाने वकिल असूनही त्यांनी वकिलाची भूमिका न बजावता न्यायाधिशाच्या भूमिकेत लिखाण केले आहे. संभाजींनी दिलेरखान व औरंगजेबपुत्राबरोबर केलेल्या जवळकीबाबत बखरकरांनी मांडलेला खोटा इतिहास त्यांनी मोडीत काढला आहे.

बहुजन समाजातील लेखकांनी लिखाण करताना अभिजनांची मान्यता मिळायला पाहिजे ही भूमिका सोडून दिली पाहिजे. त्यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे दारवटकरांच्या लिखानातून दिसून येते.'

लेखक अॅड. दारवटकर म्हणाले, 'खोटा इतिहास बदलून खऱ्या आणि वस्तुनिष्ठ भक्कम पुराव्यातून 'अद्वितीय संभाजी' साकारले आहे. मात्र ज्यांना संस्कृतमधील एका सुभाषिताचा अर्थ सांगता येत नाही, त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून गौरव केला जात आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे.'

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, 'पाच खंडांमध्ये संभाजींच्या इतिहासाची मांडणी करताना खंडात केवळ माहिती नसून साधनांची चिकित्सा केली आहे. सत्यशोधक विचाराचे भाऊसाहेब पवार, वा. सी. बेंद्रे यांच्यानंतर दारवटकरांनी संभाजींचा खरा इतिहास मांडताना खोटा इतिहास मोडीत काढला आहे. यावेळी डॉ. प्रा. जे. बी. शिंदे, चंद्रकांत पाटील, डॉ. सुभाष देसाई, इंद्रजीत सावंत, जयश्री चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजीव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलोख्याचा इतिहास पाठ्यपुस्तकांतून गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'धर्मनिरपेक्ष देशात विविध धर्मियांमधील सौख्य कायम राहावे यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. समाजात पडणारी फूट रोखून देशविधायक काम करणाऱ्यांचा इतिहास मात्र आजच्या सरकारला नकोसा झाला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात शाळा-महाविद्यालयांतील पाठ्यपुस्तकांमधून असा सामाजिक सलोखा जपणारा इतिहास गायब होत आहे.', असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केला.

श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कॉ. अवि पानसरे व्याख्यानमालेत त्या 'धर्मांधता, अल्पसंख्याक आणि स्त्रिया' या विषयावर बोलत होत्या.

सेटलवाड म्हणाल्या,'प्राचीन काळापासूनच देशाची प्रकृती धर्मनिरपेक्ष अशी आहे. सर्वधर्मिय लोक गुण्यागोविंदाने राहत होते, त्यामुळेच देशाची घटना धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर झाली. इतिहासातील अनेक घटना देशाच्या मूळ प्रकृतीला पोषक असल्या तरी धर्मांध व्यवस्थेकडून त्या जाणीवपूर्वक लपवल्या जात आहेत. गांधीजींनी अस्पृश्यता, मानवाधिकार हे मुद्दे जोरकसपणे मांडले आणि धार्मिक राष्ट्रवादाला विरोध केला. याच मुद्द्यांवरून नाराज झालेल्या धर्मांध शक्तींनी १९३४ पासून महात्मा गांधीजींवर हल्ले केले.

त्या पुढे म्हणाल्या,'अलिकडे समाजात फूट पाडण्यासाठी इतिहासाचा वापर केला जात आहे. सामाजिक इतिहासाचे दाखले शालेय अभ्यासक्रमात देण्याऐवजी ज्यांनी देशात धार्मिक फूट पाडण्याची कारस्थाने केली अशा संघवादी व्यक्तींची चरित्रे आणि त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात घातली जात आहेत. जी स्थिती भारतात आहे, तीच स्थिती पाकिस्तानात आहे. मोहंजोदरोचा इतिहास पाकिस्तानातील शाळांमध्ये शिकवलाच जात नाही. पौराणिक ग्रथांमध्येच विज्ञान असल्याचे दाखले देण्याचे प्रकार गंभीर असून देशाच्या संसदेत काही मंत्री आणि खासदार हिंसेचे समर्थन करतात ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे.

अल्पसंख्याक धर्मांधताही धोकादायक

देशात केवळ बहुसंख्यांकांचीच धर्मांधता धोकादायक नाही, तर अल्पसंख्याकांचीही धर्मांधता धोकादायक आहे. हिंसा, विषमता, आर्थिक पिळवणूक आणि अफवा पसरवणारे सर्वच देशाच्या लोकशाहीला धक्का देणारे आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडून असे कृत्य होत आहे, ते सर्वच धोकादायक असल्याचा उल्लेख तिस्ता सेटलवाड यांनी केला.

शिक्षण आणि आरोग्याचे खासगीकरण

केंद्र सरकारकडून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. यातून बहुजनांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळणार नाही. केवळ श्रीमंतांचीच मुले अधिकारी बनतील आणि पुन्हा एकदा बहुजनांचा शिक्षणाचा हक्क नाकारला जाणार आहे. त्याचबरोबर मनरेगाचे काम कमी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा दावा तिस्ता सेटलवाड यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरची पोटदुखी वाढली

$
0
0

त्रिफळा व आवळा चूर्णची कोर्टाकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील प्रमुख संशयित सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात पित्ताचा व गॅसचा त्रास होत असून त्याची पोटदुखी वाढली आहे. पोटदुखी कमी होण्यासाठी त्याने त्रिफळा चूर्ण व आवळा चूर्णची मागणी केली असून कोर्टाने त्याची मागणी मान्य केली. कोर्टाने कारागृह प्रशासनाला आयुर्वेदीक औषध देण्यास सांगितले आहे. दरम्यान, समीरच्या न्यायालयीन कोठडीत १९ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. डांगे यांच्यासमोर शनिवारी सुनावणी झाली. समीरचे वकील संजीव पुनाळेकर व अॅड विरेंद्र इचलकरंजी यांनी समीरला पोटदुखीचा त्रास होत आहे, ता आयुर्वेदीक औषधे घेत असल्याने त्याच्या नातेवाईकांमार्फत त्रिफळा चूर्ण व आवळा चूर्ण पाठवून द्यावे, अशी विनंती अर्ज केला.

या अर्जाला विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी आक्षेप घेतला. हा अर्ज म्हणजे वेळकाढूपणा आहे. त्याने कारागृहाकडे तक्रार करावी. कारागृहाच्या नियमानुसार आयुर्वेदीक औषधे देता येत नाहीत असा दावा केला. पण अॅड. पुनाळकर यांनी आयुर्वेदीक औषधे देता येतात असे स्पष्ट केले.

त्यानंतर चार वाजून २५ मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. न्यायदंडाधिकारी डांगे यांनी समीरला माहिती दिली. समीरने पोलिसांच्याविरूध्द जी तक्रार नोंदवली होती त्यावर पोलिसांनी चौकशी करून अहवाल कोर्टाला पाठवला आहे. त्या अहवालाची प्रत कारागृहात मिळेल असे डांगे यांनी सांगितले. त्यानंतर समीरने आपल्याला पित्त व गॅसचा त्रास होत असल्याचे सांगून पोटाचा त्रास होत असल्याने त्रिफळा व आवळा चूर्णची मागणी केली. न्यायदंडाधिकारी डांगे यांनी जेलर केंबळे यांना कारागृहाच्या नियमानुसार आयुर्वेदिक औषधे देता येतात का? की कोर्टाची ऑर्डर हवी, असे विचारले.

यावेळी जेलर यांनी कोर्टाची ऑर्डर मिळाली तरी चालेल असे सांगितले. दरम्यान, समीरने मागील सुनावणीच्यावेळी काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असून त्यासाठी मी अर्ज केला आहे असे डांगे यांच्या निदर्शनास आणले. त्यावर डांगे यांनी तुझा अर्ज मला अद्याप मिळालेला नसून अर्ज मिळाल्यावर त्यावर निर्णय घेता येईल असे स्पष्ट केले. पोलिसांच्या चौकशी अहवालाबाबत दोन दिवसांत निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएन’ यांच्या नावाला पसंती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद उमेदवारीचा निर्णय पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिशी राहण्याचा आदेशच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला. मुंबईतील घडामोडी पाहता आमदार महादेवराव महाडिक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. महाडिक-सतेज पाटील वादात पी.एन पाटील यांचे नाव पुढे आल्याचे समजते. उमेदवारी सोमवारी सकाळीच जाहीर होणार आहे. तसे संकेत चार इच्छुकांच्या बैठकीत देण्यात आले.

काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार महाडिक यांच्यासह जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारीनंतर बंडखोरी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून चारही इच्छुकांची शनिवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी संयुक्त बैठक घेतली. बंडखोरी करू नका असा आदेश त्यांनी बैठकीत दिला.

उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत चव्हाण यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. गांधी यांनी चारही इच्छुकांची माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी बंडखोरी टाळण्याचे आदेश त्यांनी प्रदेश काँग्रेसला दिले आहेत. चौघेही उमेदवार प्रबळ असले तरी उमेदवारी एकालाच मिळणार असल्याने इतरांनी त्याला मदत करावी असे गांधी यांनी सांगितल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

चव्हाण यांनी प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा केली. पी.एन. व महाडिक यांच्याशी त्यांनी दोनदा चर्चा केली. कुणाला उमेदवारी मिळाल्यास कुणाची बंडखोरी शक्य आहे याबाबत चौघांनीही चव्हाण यांना कल्पना दिली. मुंबईतील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांची उमेदवारी कापल्याचे समजते. महाडिक-पाटील वादात पी.एन. यांचे नाव पुढे आल्याचे समजते. तसे झाल्यास सतेज पाटील किंवा आवाडे यांच्यात जिल्हाध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो. सध्यातरी उमेदवारीसाठी तिघांतच स्पर्धा आहे.

यड्रावकरांकडून अर्ज

राजेंद्र पाटील व संजय पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी अर्ज घेतले. यामुळे गेले दोन तीन दिवस त्यांच्या बंडखोरीची जी चर्चा सुरू आहे, त्याला बळकटी आली आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांची बंडखोरी अवलंबून आहे. एकीकडे राष्ट्रवादी हा काँग्रेससोबत राहील, असे आमदार हसन मुश्रीफ सांगत असतानाच यड्रावकरांनी अर्ज घेतल्याने उलट सुलट चर्चेला वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गव्हर्न्मेंट मेडिकल’मध्ये रॅगिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील होस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगला विरोध करणाऱ्यांना सीनिअर विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याने जयंत रमेश तोंडे (वय २०, मूळ गाव पाथर्डी, जि. अहमदनगर) हा पहिल्या वर्षातील विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोन मित्रही जखमी झाले आहेत. कॉलेज प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले आहेत. अँटी रॅगिंग समितीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. सुमित राय, उपेंद्र सिंग, राहूल मीना, राहूल जाजोविया, जितेंद्र वर्मा, निनाद भालेराव व हेमंत चव्हाण या संशयित विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी निवेदनाव्दारे कॉलेज प्रशासनाकडे केली आहे.

जयंत तोंडे दुसऱ्या वर्षात पहिल्या टर्मला शिकत आहे. जयंतने नगर येथे नवीन बाईक खरेदी केली होती. त्याचा इंजिनीअरिंगचा मित्र अंकित सुभाष खेडकर (रा. पाथर्डी) याच्यासमवेत बाईक घेऊन तो शुक्रवारी रात्री होस्टेलवर परतला. रात्री बारा वाजता धुळीने माखलेली ही बाईक जयंत मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात स्वच्छ करत होता. यावेळी सीनिअरचे काही विद्यार्थी होस्टेलच्या आवारात शेकोटी पेटवून पार्टी करत होते. त्यातील एकाने जयंतला बॅटरी बंद करायला सांगितले. मात्र मोबाइलचे फंक्शन माहीत नसल्याने बॅटरी बंद होत नाही असे त्याने स्पष्टीकरण दिले. त्यावेळी ज्युनिअर्सनी आमच्या ऑर्डर पाळल्याच पाहिजे, असा वाद या विद्यार्थ्यांनी घालायला सुरूवात केली. सीनिअरचे हे सर्वविद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातील एकजण जळते लाकूड घेऊन जयंतला मारायला धावला. जयंतच्या मदतीला त्याचे मित्र धावून आले. त्यांनी वाद मिटवून जयंतला खोलीत आणले. यावेळी सीनिअर विद्यार्थ्यांनी बिल्डिंगच्या दाराला लाथा मारत आणि शिविगाळ करीत जयंतला बघून घेण्याच्या धमकी दिली.

शनिवारी सकाळी जयंत होस्टेलच्या मेसमध्ये सव्वाआठ वाजता नाष्टा करायला गेला. यावेळी रात्री रॅगिंग करणारे सीनिअर्स जयंतची वाट पाहत होते. रात्री वाद घालणारे तुझे मित्र कुठे आहेत, असे विचारत त्यांनी त्याला धमकावले आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जयंतला खुर्चीने मारले. मारहाणीत जयंतचे कपाळ नाक-डोळे आणि कानाला जखम झाली. त्याचा मित्र अंकित खेडकर व कृष्णा सुदाम रणखांबे (वय २०, रा. बीड) हेही जखमी झाले. सोडवायला गेलेल्या विवेक साखळकर, मयुरेश सानप यांनाही मारहाण झाली. जयंतला मारहाण झाल्याची माहिती कळताच दुसऱ्या वर्षातील विद्यार्थीही जमले. यावेळी सीनिअर व ज्युनिअर विद्यार्थ्यांत मारामारी होऊन राडा झाला. जखमी अवस्थेतील अंकित खोलीत परतला. या घटनेची माहिती कळताच रेक्टर डॉ. राऊत व डॉ. कोळी त्याच्या रूममध्ये गेले. सीनिअर्सच्या भीतीमुळे जयंतने मोटारसायकलवरून पडल्याने जखमी झाल्याची माहिती दिली. पण चौकशीअंती त्याने रॅगिंग आणि मारहाणीचा प्रकार सांगितला. दोघांनी जयंतला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. दरम्यान, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद सीपीआर हॉस्पिटलमध्ये आले. यावेळी दुसऱ्या वर्षातील १४० विद्यार्थ्यांनी सीनिअर विद्यार्थ्यांवर तातडीने कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. निवेदनात त्यांनी रॅगिंग व मारहाणीची तक्रार केली. डॉ. रामानंद यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केल्याचे सांगितले. या समितीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

सात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू

अँटी रॅगिंग समितीने संशयित सात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे. समिती राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद देणार आहे. जखमी जयंतने पालकांच्या संमतीनंतर फिर्याद देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती अधिष्ठाता रामानंद यांनी दिली. चौकशीसाठी समितीला आठ दिवसाची मुदत आहे. तसेच त्रिसदस्यीय समितीचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे डॉ. रामानंद यांनी सांगितले.

मारहाण व रॅनिंगची घटना लक्षात घेऊन डॉ. दत्ता पावले, रेक्टर डॉ. विजय ‌कासा, डॉ. संगिता कुंभोजकर यांची त्रिसदस्यीय समिती ​नेमली आहे. समितीने काम सुरू केले आहे. अँटी रॅगिंग समितीही स्वतंत्र चौकशी करणार आहे.

- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images