Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवा

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पुढील काळातील संभाव्य पाणी टंचाई विचारात घेऊन ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणी असणाऱ्या प्रकल्पांमध्ये सरासरी किमान १५ टक्के किंवा मागणीनुसार पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात ४ मोठे, ९ मध्यम आणि ५३ लघू प्रकल्प असून, यापैकी केवळ १६ जलाशय १०० टक्के भरले आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन पाण्याचा नियोजनबध्द वापर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या, 'ज्या जलाशयांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी सरासरी १५ टक्के किंवा मागणी जास्त असेल तर त्या प्रमाणात पाणी आरक्षित करावे. मनुष्य व प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपसाबंदीचे काटेकोर पालन करावे. तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाने याबाबत दक्षता घ्यावी,' असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, 'जे तलाव कोरडे पडतील त्यामधील गाळ काढण्याची मोहीम प्रशासनाच्या वतीने हाती घेणार असून, तलावातील गाळ काढण्यासाठी महात्मा फुले जलसंधारण योजनेतून त्यासाठी डिझेलचा खर्च दिला जाईल,' असे सांगितले. कोल्हापूर शहरासाठी अवश्यक असणारे २.३ टी. एम. सी. पाणी आरक्षित असून सध्यस्थितीत तेवढे पाणी पुरेसे असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी नगरपालिकानिहाय पाणी आरक्षाणाच्या आवश्यकतेसंबधी चर्चा करण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अजय इनामदार, विजय पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीडशे जणांची वाचली पुणेवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहात विशेष पासपोर्ट ​कॅम्पला प्रारंभ झाला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या १५० जणांनी कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांची पुण्यात जाऊन कागदपत्रे सादर करण्याचा त्रास वाचला. रविवारीही १५० जणांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेतली जाणार आहे.

क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय पुणे यांच्यावतीने कोल्हापुरात शनिवारी व रविवारी विशेष पासपोर्ट सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले. १७ नोव्हेंबर रोजी २५० जणांना ऑनलाईनव्दारे अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. पण कोल्हापुरातील वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जादा ५० अर्जाची नोंदणी करून घेण्यात आली. सकाळी नऊ वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कॅम्पचे उद्धाटन झाले. यावेळी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, रिजनल पासपोर्ट ऑफिसर अतुल गोतसुर्वे, प्रोटोकॉल इनचार्ज जतीन पोटे उपस्थित होते.

पासपोर्टसाठी १० कर्मचारी यंत्रणेसह कोल्हापुरात आले होते. ऑनलाईन अर्ज करण्याऱ्यांना विशिष्ट टायमिंग दिली होती. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कागदपत्रे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पासपोर्टधारकाचा फोटो, बायोमॅट्रीक फिंगर प्रिंटस् घेण्यात येत होत्या. प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण दहा मिनिटांचा वेळ लागत होता.

प्रोटोकॉल इनचार्ज पोटे म्हणाले, 'कोल्हापुरात पासपोर्टसाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्याने विशेष कॅम्प घेण्यात आला आहे. यापूर्वी गेल्यावर्षी सर्किट हाऊसवर पासपोर्ट कॅम्प घेतला होता. पुण्यामध्ये सहा जिल्ह्यांचे कार्यालय असून पासपोर्टवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर यापूर्वी ४५ दिवसांनी वेळ दिली जात होती. पण आता वेळ एक दिवसावर आली. पोलिसांची चौकशी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाल्यावर ही प्रक्रिया आणखीन सुटसुटीत होईल.'

सांगलीला २८ व २९ रोजी कॅम्प

सांगली येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी विशेष पासपोर्ट कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पसाठी ऑनलाईन अर्ज २३ तारखेला भरावयाचे आहेत. या कॅम्पसाठी कोल्हापुरातील पासपोर्टसाठी इच्छुक असलेले अर्ज दाखल करू शकतात, अशी माहिती जतीन पोटे यांनी दिली.

'कोल्हापुरात कायमस्वरुपी पासपोर्ट कार्यालय सुरु करावे यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.'

- धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी अडकली चर्चेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील साखर संकुलातील सरकार, उत्पादक आणि संघटनांची बैठक निष्फळ ठरल्याने ऊस उत्पादकांनी पहिल्या बिलांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कोल्हापूर विभागातील ४१ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असले तरी अद्याप बिले निघालेली नाहीत. यातील काही कारखाने एक नोव्हेंबरपासून सुरू होऊनही बिले बँकेत जमा न झाली नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना पहिल्या बिलांची प्रतीक्षा लागली आहे. एफआरपी एकरकमी की तीन टप्प्यांत यांचा घोळ सुरू असल्याने कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाची बिलेच काढलेली नाहीत. एफआरपीचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहेत.

ढासळलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांसमोरील अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकाकडून तारण मालावर ८० टक्के कर्जपुरवठा होत आहे. त्यातून बिले कशी द्यायची अशा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखानदारांनी तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा ठराव केले होते, त्याला संघटनांनी तीव्र विरोध केला होता. दोन्ही घटक आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही.

दरम्यान, कोल्हापूर विभागातील कारखान्याचा हंगामाने वेग पकडला आहे. काही कारखाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले. तात्यासाहेब कोरे कारखान्याने दररोज १०००० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १२००० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेत विभागात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ जवाहर कारखान्याने ८९०० मेट्रिक टनाचे ऊस गाळप करत १०९२० मेट्रिक टन साखरेचे तर दत्त शिरोळ कारखान्याने ८०५५ मेट्रिक टन गाळपासह ९५७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन महोत्सव फेब्रुवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक परंपरा व नैसर्गिक जैव विविधता लक्षात घेऊन जिल्हा प्रशानाच्या वतीने पर्यटन आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून जिल्ह्याला लाभलेले जंगल, जैवविविधता आणि ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटनवाढीसाठी उपयोग केला जाणार आहे. यादृष्टीने जिल्ह्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये पर्यटन महोत्सवाचेही आयोजन केले जाईल. शनिवारी पर्यटन आराखड्यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर जालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन विकास महामंडळाला महोत्सवाचे नियोजन करण्याचे आदेश दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे शोधून त्यांचा विकास, त्यांचे मार्केटिंग यासाठी नियोजनबध्द प्रयत्न आवश्यक आहेत. धार्मिक पर्यटनासाठी लाखो भाविक येथे येतात. त्यांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास केला जाईल. पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात पर्यटन महोत्सवाचे नियोजन केले आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणांनी आपले प्रस्ताव तयार करून त्याअनुषंगाने नियोजन करावे.'

यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी 'विनावापर शासकीय निवासस्थाने, विश्रामगृहे यांची सुधारणा करून ती एमटीडीसीच्या मदतीने चालविल्यास पर्यटकांना निवासाची उत्तम व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत' अशी सूचना केली. तर खासदार धनंजय महाडिक यांनी 'कोल्हापूर शहराचा मुख्य रस्ता हा लौकिकाला शोभेल असा असावा. शहरात येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था आसावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी' अशी मागणी केली.

जिल्ह्यात प्रमुख सर्व रस्त्यांवरून प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी दिशादर्शक, माहिती फलक लावण्यात येणार आहेत. मसाई पठारावरील पर्यटन विकासासाठी इको फ्रेन्डली टेंट उभे करण्यासाठी समितीने मान्यता दिली. पर्यटक माहिती केंद्र स्थापन करण्यासाठी एमटीडीसीला महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सूचनाही समितीने यावेळी दिली. बैठकीसाठी आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या आरोपाने तपासाला वेगळे वळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याने थेट पोलिसांवर खळबळजनक आरोप केल्याने तपासाला वेगळे वळण दिले आहे. कोर्टातील व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुनावणीवेळी ४० मिनिटांचा थरार अनुभव वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह वकिल, कर्मचाऱ्यांनी, पत्रकारांनीही अनुभवला.

समीरच्या न्यायालयीन कोठडीबाबत शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यु. टी. मुसळे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ केली. त्याला कोर्टापुढे हजर न केल्याने ​त्यानंतर सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फसन्सीगवर दंडाधिकारी ए. ए. यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायदंडाधिकारी यादव यांनी समीरला 'काही तक्रार आहे का?' असा प्रश्न केला असता तक्रार नसल्याचे सांगितले. नंतर 'तुला काही सांगायचे आहे का' असे विचारल्यावर समिरने 'मला सांगायचे आहे' असे सांगितले.

समीरचे वकील एम. एम. सुहासे यांनी प्रतिवाद केला. 'समीरला न्यायालयासमोर हजर करण्याची विनंती आम्ही यापूर्वीच केली आहे. त्याला आज प्रत्यक्ष हजर न केल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सींवर हजर केले आहे. जे सांगायचे हा त्याचा हक्क आहे. त्याला म्हणणे मांडण्याची संधी द्यावी' असे ते म्हणाले. तपास अधिकारी, अतिरिक्त अधीक्षक एस. चैत्यन्य यांनीही आक्षेप घेतला. 'परवानगीशिवाय समीरच्या वकिलांनी कारागृहात भेट घेणे हे चुकीचे आहे. तपासातील काही बाबी बाहेर पडू नये यासाठी म्हणणे मांडण्याची परवानगी देऊ नये' अशी विनंतीही चैत्यन्य यांनी केली.

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायदंडाधिकारी यादव यांनी समिरशी संभाषण सुरू केले. 'समीर तू न्यायालयीन कोठडीत असून तपासाबाबत अथवा कबुलीजवाब फौजदारी कायद्यातील तरतुदीनुसार कोर्टापुढे करता येतो. तुला अचानक काही सांगता येणार नाही. जे सांगायचे आहे याची नोंद तपासदरम्यान केली जाईल' अशी सूचना केली. त्यानंतर समीरने 'मला तपासासंबधी सांगायचे आहे' असे सांगितले. त्यावर न्यायदंडाधिकारी यादव म्हणाले, 'जे वक्तव्य करणार आहेस, ते उद्या तुझ्यावर विरुद्धसुद्धा जाईल. तुला म्हणणे मांडण्याची परवानगी आहे.' समीरचे म्हणणे लिहून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी यादव यांनी, 'वेळच्यावेळी तक्रारी कर. नंतर तक्रार करू नकोस. तक्रार निःसंकोचपणे कर' अशी सूचनाही केली. कोर्टाच्या सूचनेनंतर समीरने 'धन्यवाद' म्हणून त्यांचे आभार मानले.

वकिलांचा आक्षेप

विशेष सरकारी अभियोक्ता चंद्रकांत बुधले यांनी त्यास आक्षेप घेतला. 'जेल मॅन्युअलच्या तरतुदीनुसार समीरला कारागृहात म्हणणे मांडण्यासाठी संधी देणे हे न्यायालयाचे अतिक्रमण होईल. समीरला लेखी म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने कारागृह प्रशासनाला आदेश द्यावेत या समीरच्या वकिलांच्या मागणीला कोर्टाने यापूर्वी नकार दिला आहे. न्यायालयीन कोठडीच्यावेळी तो हजर आहे का हे पाहण्यासाठी ही व्हिडिओ कॉन्फरन्स आहे,' याकडेही लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल परवानगीशिवाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासाठी पर्यायी उभारण्यात येत असलेला नवा पूल आंबेवाडीकडील बाजूने बांधण्यास सुरूवात केली गेली असली तरी ज्याठिकाणी हा पूल संपतो ती जागा महापालिकेच्या नव्हे तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याचे शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुलाच्या एका बाजूला परवानगी मिळाली नसतानाच सत्तर टक्क्यांहून अधिक काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे उघड झाले. केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्याशिवाय पुलाचे पुढील काम होणे अशक्य असल्याचे वास्तव शनिवारच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीत समोर आले.

दरम्यान, नव्या पुलाच्या रखडलेल्या कामासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्याच परवानगीची आवश्यकता असल्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे पश्चिम भारताचे विभागीय संचालक महादेवय्या यांनी स्पष्ट केले. १५ कोटी रुपयांच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात या परवानगीसाठी रखडणार आहे. महापालिकेच्या त्यांच्या अखत्यारितील झाडे तोडण्याची, पाण्याची टाकी हलवण्याची परवानगी यापूर्वीच दिल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

शिवाजी पुलाची वयोमर्यादा संपल्याने त्याला पर्याय म्हणून नवा पूल बांधण्यास केंद्र सरकारकडून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर पन्हाळ्याच्या बाजूने कामाला सुरुवात करण्यात आली. ब्रह्मपुरीकडील बाजूला असलेली झाडे, तेथील जुनी पाण्याची टाकी काढल्याशिवाय पूल पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी महापालिकेकडे झाडे, टाकी काढण्याची परवानगी मागितली होती.

त्यावेळीही महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्यावतीने झाडे बुंध्यापर्यंत तोडावीत. मात्र, या जागेवर खोदाईसाठी पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले होते. पूलाचे काम रखडल्याच्या नागरिकांच्या तक्रारींनंतर पालकमंत्री पाटील यांनी सर्किट हाऊसवर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, केंद्रीय पुरातत्व विभागाचे राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.

महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी झाडे बुंध्यापर्यंत तोडण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. तर केंद्रीय पुरातत्व विभागाचे महादेवय्या यांनी 'पुरातत्व विभागाचे हे राष्ट्रीय संवर्धन क्षेत्र आहे. या टेकडीखाली जुनी वसाहत आहे. १९४५ साली झालेल्या उत्खननावेळी हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याच्या १०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे पुलाचे बांधकाम परवानगीशिवाय कसे काय केले?' अशी विचारणा केली. 'मी ही परवानगी देऊ शकत नाही. त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. त्याकरिता रितसर प्रस्ताव पाठवावा', असे सांगितले.

दरम्यान, दिल्लीतील परवानगीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याने खासदार धनंजय महाडिक यांना बोलवण्यात आले. त्यांच्याशी चर्चा करुन प्रस्ताव पाठवण्याचे ठरवण्यात आले. याप्रसंगी आमदार अमल महाडिक तसेच अन्य अधिकारी उप​स्थित होते.

हवेतच उभारला पूल

रोमन साम्राज्याशी असलेल्या कोल्हापूरच्या इतिहासाची साक्ष देणारा ब्रह्मपुरी टेकडी परिसर केंद्रिय पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केला आहे. शिवाजी पुलाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या या पुलाचे दक्षिणेकडील भाग महापालिकेच्या अख्यत्यारित येतच नाही. त्यामुळे कामाला सुरुवात करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हवेतच पूल उभारला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ महागला; टोमॅटोची पन्नाशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीची धामधूम संपताच बाजाराने पुन्हा उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. तांदळाची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात तांदूळ प्रतिकिलो ४ ते ५ रुपये दरांनी महागले आहेत. गेल्या आठवड्यात वाढलेले टोमॅटोचे दर पन्नाशीच्या घरात कायम आहेत, तर ओल्या वाटाण्याने शंभरी गाठली आहे. भाज्यांची आवक वाढली असली तरी, दर उतरलेले नाहीत. शाळू आणि हायब्रीडचेही दर वाढल्याने दिवळीनंतरच्या बाजारात दराने उसळी मारल्याचे दिसत आहे.

दिवाळीदरम्यान तांदळाचे दर काहिसे उतरले होते, मात्र ही उतरण फार काळ टिकली नाही. आठवड्याच्या आतच पुन्हा तांदळाचे दर वाढले आहेत. सर्वच प्रकारच्या जातींचे तांदूळ प्रतिकिलो ४ ते ५ रुपयांनी महागले आहेत. सध्या बाजारात तांदळाची आवक कमी असल्याने दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तांदळाबरोबरच ज्वारी आणि हायब्रीडचे दरही चार ते पाच रुपयांनी वाढले. महिंद्रा २४ रुपये, तर बार्शी शाळू ३० ते ३६ रुपये प्रतिकिलो दर आहेत. थोडासा दिलासा देणारी बाब म्हणजे गव्हाचे दर २५ ते ३० रुपयांवर स्थिर आहेत. साखर २७ ते ३० रुपयांवर स्थिर आहे. खाद्यतेलांचे दरही सध्या स्थिर आहेत. खोबरेल तेल २०० रुपये, शेंगतेल १२०, सूर्यफूल १०० आणि सरकी तेल ८० रुपयांवर आहे. डाळींचे दर मात्र अजूनही उतरलेले नसून ते चढ्या दरावर स्थिर आहेत. त्यामुळे तूरडाळ रु. १७०, मूगडाळ रु. १२०, उडीद डाळ रु. १८०, हरभरा डाळ रु. ८०, मसूर डाळ रु. ८० या दराने किरकोळ बाजारात विक्री सुरू आहे.

दिवाळीपर्यंत डाळींच्या दरवाढीने हैराण केलेल्या ग्राहकांना दिवाळीनंतर टोमॅटोच्या दरवाढीचा सामना करावा लागला आहे. प्रतिकिलो साठ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या टोमॅटोने थोडासा दिलासा दिला आहे. प्रतिकिलो दहा रुपयांची घसरण टोमॅटोच्या दरात झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, दर मात्र अपेक्षित प्रमाणे उतरलेले नाहीत. भेंडी, कारली आणि दोडक्याचे दर प्रतिकिलो ६० ते ७० रुपये आहेत. गवार आणि वरणा ८० रुपयांवर कायम आहे. फ्लॉवर, सिमला मिरची, दुधी भोपळा आणि बटाट्याचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत आहेत. पालेभाज्यांची आवक बाजारात वाढली असली तरी, दर मात्र त्या प्रमाणात कमी झाले नसल्याचे दिसत आहे.

सांगली मार्केटमध्ये सोयाबीन आवक वाढली

कुपवाड : सांगली मार्केट कमिटीच्या आवारात हळद, गूळ, मिरची आणि सोयाबीनची आवक वाढली आहे. गूळ आणि सोयाबीनची आवक अधिक आहे. कोल्हापुरी गुळाला सरासरी २४५० रुपये तर सोयाबीनला ३६६० रुपये इतका दर मिळाला आहे.

डाळी अजूनही महागच

राज्य सरकारने डाळींचे दर अटोक्यात ठेवण्यासाठी नियंत्रण आदेश लागू केला असला तरी, प्रत्यक्षात बाजारात मात्र याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. डाळींचे वाढलेले दर गेल्या महिन्याभरात अपवाद वगळता उतरलेले नाहीत. पुरवठा विभागाने जिल्ह्यात कारवाई केलेली तूरडाळ केवळ ६७ किलो होती, त्यामुळे कारवाईतील तूरडाळ १०० रुपये प्रतिकिलो विकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा काहीच फायदा कोल्हापूरकरांना मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्यागत पर्वासाठी १०२ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नाशिक येथील कुंभमेळ्याप्रमाणेच नृसिंहवाडी येथे ऑगस्ट २०१६ मध्ये कन्यागत महापर्व होणार असून, यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद, महावितरण, पर्यटन विकासासह सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या प्रस्तांवाचा आढावा घेऊन या कामांसाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या पर्यटन विषयक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत कन्यागत महापर्व २०१६ च्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. नृसिंहवाडी येथील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर कन्यागत महापर्व संपन्न होतो. या धार्मिक विधीला सन १७५६ पासूनची परंपरा असून राज्यासह कर्नाटक आणि गोव्यातूनही लाखो भाविक हजेरी लावतात. यावेळी हा सोहळा ऑगस्ट २०१६ मध्ये होणार असून, यासाठी आठ ते दहा लाख भाविक एकत्र येतील असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. महापर्व काळात रस्ते, पार्किंग, शौचालय व्यवस्था, भक्त निवास, सांस्कृतिक हॉल, अंतर्गत गटर्स, नदी घाट, लाईट, आदी सुविधा चोख असाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. ग्रामीण भागातील यात्रास्थळे ग्रामविकास विभागाकडून विकसित करावयाची असल्याने कन्यागत महापर्व काळातील कामांसाठी जिल्हास्तरावर समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. कन्यागतच्या खर्चाचा आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून, यासाठी वेळप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिरिक्त खर्चाची तरतूदही करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली. बैठकीसाठी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सैनी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार निर्मितीची नवी ‘मुद्रा’

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : युवकांच्या हाताला काम मिळावे, रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारच्यावतीने राबविणअयात येत असलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या विनातारण कर्ज योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील ४१७३ लघूउद्योजकांनी ५३ कोटी १६ लाख रुपयांच्या पुरवठ्याचा लाभ घेतला आहे. पाच वर्षाच्या मुदतीने आणि दहा टक्के व्याजदराने मिळत असलेल्या कर्ज पुरवठ्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. सुलभ आणि सुटसुटीत कर्ज योजनेतून आणखी रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. योजनेंतर्गत बँक ऑफ इंडियाने सर्वात जास्त १७ कोटी ६१ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करत अग्रक्रम कायम राखला आहे.

केंद्र सरकारने 'मेक इन इंडिया' संकल्पनेत पंतप्रधान मुद्रा योजनेची घोषणा केली होती. युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्याबरोबरच स्वावलंबी बनवण्यासाठी मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सीची (मुद्रा) स्थापना केली होती. लघू उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी साह्यभूत ठरणाऱ्या योजनेतंर्गत शिशू, किशोर आणि तरुणांचा समावेश केला होता. योजनेंतर्गत अनुक्रमे ५० हजार, ५० हजार ते पाच लाख आणि पाच लाख ते १५ लाख रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील लघू उद्योजकांनी ५३ कोटी रुपयांचे कर्ज उचल केली आहे. योजनेत जिल्ह्यातील राष्ट्रीयिकृत बँकासह ग्रामीण बँकांनीही भूमिका बजावली आहे. लघू उद्योजकांना अतिशय कमी कादपत्रे, जामिनदार आणि तारणाशिवाय पाच वर्षाच्या मुदतीने कर्जपुरवठा केला जात आहे. तसेच प्रोसेसिंग शुल्काशिवाय मुद्रा कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळत असल्याने उद्योजकांना योजना फायदेशीर ठरत आहेत. सामान्य स्थितीत कोणत्याही कर्जाला १२ ते १४ टक्के व्याजदर असताना मुद्रा योजनेत केवळ दहा टक्के व्याजदर असल्याने योजनेला अधिक पसंती दिली जात आहे. शिशू योजनेत घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर त्यांचा किशोर व तरुण योजनेत समावेश होणार आहे. यामुळे रोजगार निर्मितीला पोषक वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

सुलभ आणि विना कागदपत्र कर्ज दिले जात आहे. यामुळे लघू उद्योजकांची उद्योग व्यवसायासाठीची मागणी वाढत आहे. राष्ट्रीयिकृत बँकांसह ग्रामीण बँकांनी केलेल्या कर्जपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

- एम. जी. कुलकर्णी, व्यवस्थापक अग्रणी जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिराची श‌िळा निखळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तूची कोरीव शीळा शुक्रवारी रात्री निखळली. शनिमंदिरसमोरील कोरीव ​शिल्पे असलेल्या शीळेचा काही भाग निखळून खाली पडल्याचे देवस्थान व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर पुरातत्त्व विभागाला कल्पना देण्यात आली, तसेच अशाप्रकारे निखळलेली शीळा जोडून पूर्ववत करण्याच्यादृष्टीने देवस्थान व्यवस्थापन आणि पुरातत्त्व विभाग यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

अंबाबाई मंदिरात दर शुक्रवारी रात्री पालखी मिरवणूक असते. या वेळी तोफ उडवली जाते. मात्र शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मंदिराच्या मूळ वास्तूतील शीळेचा चौकोनी कोपरा निखळून चबुतऱ्यावर पडल्याचा आवाज या परिसरातील पूजासाहित्य दुकानदारांनी ऐकला. पालखी मिरवणूक झाल्यानंतर शीळा निखळल्याबाबत देवस्थान व्यवस्थापनाला कळवण्यात आले. त्यानुसार देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी शीळेचा निखळलेला भाग जपून ठेवला.

शनिवारी सकाळी यासंदर्भात देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने पुरातत्त्व विभागाला माहिती देण्यात आली. अंबाबाई मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने देवस्थानला शीळेची दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या निर्णयानुसार या शीळेच्या दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही होण्याची पावले उचलण्यात येतील.

अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तूतील शनिमंदिराच्या डाव्याबाजूकडील शीळा कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. तसेच मंदिराच्या कोरीव ​शिल्पकृती असलेल्या या शीळांच्या दुसऱ्या टप्प्यातील अनेक शीळांचे कोपरे निखळलेले आहेत. अंबाबाई मंदिराची शीळा ज्या ठिकाणी निखळली आहे, तेथे पडलेल्या ​चिरा वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात मंदिराची ही बाजू निखळण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन मंदिराच्या शीळा संवर्धित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मंदिर अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अंबाबाई मंदिरात अनधिकृत बांधकाम किंवा ​ग्रीलिंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अडकपद्धतीचे बांधकाम असलेल्या मंदिराच्या शीळांवर फॅ​बिकेशनचा परिणाम होत असल्यामुळे भविष्यात मंदिराचे जतन करण्यासाठी हा प्रकार थांबला पाहिजे.

- उमाकांत राणिंगा, मंदिर अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबुलीसाठी पोलिसांनी धमकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमच्या म्हणण्याप्रमाणे सांगितलेस तर २५ लाख रूपये देईन. माफीचा साक्षीदार केला जाईल. नकार दिला तर फासावर चढवीन, कुटुंबाला त्रास देईन,' असा पोलिसांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा सनसनाटी व खळबळजनक आरोप कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याने केला. शनिवारी कळंबा कारागृहातून कोर्टातील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुनावणीवेळी त्याने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. 'सामाजिक संघटनांचा आमच्यावर दबाव असल्याने आम्ही म्हणेल त्यांची नावे घे,' असे पोलिसांकडून सांगितले असल्याचे त्याने कोर्टासमोर सांगितले. त्यामुळे समीरने केलेल्या आरोपांची पोलिसांनी चौकशी करून त्याचा अहवाल पाच डिसेंबरच्या सुनावणीवेळी द्यावा, असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. यादव यांनी दिला.

व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीच्यावेळी समीरचे वकील एम.एम. सुहासे, समीर पटवर्धन यांनी समीरला काही गोपनीय माहिती द्यावयाची आहे, असे कोर्टाला सांगितले. पण विशेष सरकारी अभियोक्ता चंद्रकांत बुधले व पानसरे कुटुंबियांचे वकील अॅड. विवेक घाटगे यांनी आक्षेप घेत जेल मॅन्युएलच्या विरोधात असल्याचा युक्तीवाद केला. समीरचे म्हणणे मांडू न देणे म्हणजे त्याच्या मानवी हक्कावर गदा आणण्यासारखे होईल याकडे अॅड पटवर्धन यांनी लक्ष वेधले.

त्यानंतर न्यायदंडाधिकारी यादव यांनी समीरला म्हणणे मांडण्यास सांगितले. समीर म्हणाला, 'नऊ ऑक्टोबर २०१५ रोजी ब्रेन मॅपिंग टेस्टच्या सुनावणीच्यावेळी मला कोर्टात आणले. त्यावेळी माझ्या तोंडावर बुरखा होता. मला काही दिसत नव्हते. मी कोर्टाकडे जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना एक व्यक्ती माझ्याजवळ आली. मी पोलिस आहे. माझ्या साहेबांचा तुला निरोप आहे. तू ब्रेन मॅपिंगसाठी होकार दे. तू नकार दिलास तर तुला आम्ही फासावर चढवू. तुझ्या कुटुंबाला त्रास देईन, असे मला ती व्यक्ती म्हणाली व निघून गेली. त्यानंतर मला कोर्टात आणले. माझ्या तोंडावरील बुरखा काढला. पण ती व्यक्ती कोण होती हे मला बुरख्यामुळे कळाले नाही.'

अॅड. घाटगे म्हणाले,', समीरने सनसनाटीपणासाठी आरोप केला आहे. ब्रेन मॅपिंग चाचणीच्यावेळी त्याला कोर्टाने सर्व माहिती दिली होती. समीरने काही सांगण्यासही नकार दिला होता.'

समीर निर्विकार

समीरने आपल्याला काही सांगायचे असल्याचे सांगितल्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यादव यांनी स्टेनोला बोलावून घेतले. त्यानंतर समीरने पोलिसांवर आरोप केला. व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुमारे ४० मिनिटे सुनावणी झाली. युक्तिवाद आणि न्यायदंडाधिकारी जेजमेंट लिहित असताना समीर निर्विकार होता. तो व्हिडिओ कॉन्फरन्सवर सर्वांना न्याहाळत होता. त्याने न्यायाधीशांचे आभारही मानले. न्यायाधीश विचारतील तसे तो उत्तरे देत होता.

सीसीटीव्हीचा फटका

मध्यवर्ती इमारतीत सीसीटीव्हीची सोय नसल्याने समीरच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी पोलिसांना तपास करावा लागणार आहे. रॅम्पवरून समीरच्या शेजारी जेलचे सहाय्यक फौजदार सदानंद सलगरे व एक पोलिस निरीक्षक होता. समीरच्या पुढे साध्या वेषातील एलसीबी पोलिस व पोलिस निरीक्षक अमृत देशमुख होते. समीरला कोर्टात पोलिस पळवत नेत होते. हा कालावधी अवघ्या १५ ते २० सेंकद असतो. इतक्या कमी वेळेत समीरला कोणी धमकी दिली असा प्रश्न आहे.

समीर म्हणाला

फासावर चढवण्याची धमकी

ब्रेन मॅपिंगला होकार देण्याचा दबाव

माफीचा साक्षीदार करून सोडविण्याचे आमिष

आम्ही म्हणतो त्यांची नावे घेण्यासाठी दबाव

बुरख्यामुळे 'ती' व्यक्ती ओळखली नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पास देतो, प्रथम तिकीट मिळवा

$
0
0

मुश्रीफांनी दिला सतेज पाटील यांना सल्ला

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तिकीट कोणाला मिळते यावर सर्व राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. गडहिंग्लज तालुक्यातही विधानपरिषदेचे पडसाद उमटू लागले आहेत. फुटबॉलच्या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची व्यासपीठावरून शाब्दिक फटकेबाजी गडहिंग्लजकरांनी अनुभवली.

विधानपरिषद निवडणुकीचे मैदान जवळ आले असून, राजकीय अस्तित्वासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. विद्यमान आमदार महादेवराव महाडिक सलग अठरा वर्षे ठाण मांडून आहेत, तर सतेज पाटील यांना विधानसभेला झालेला लाजिरवाणा पराभव पुसून काढायचा आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

याचा संदर्भ देत पाटील यांनी फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मुश्रीफांना मी निवडणुकीचा चांगला सराव केला आहे. या सामन्यात गोल मारण्यासाठी मला पास द्या, अशी अपेक्षा केली. यावर आम्ही पास द्यायला तयार आहोत, पण तुम्ही प्रथम तिकीट मिळविण्यासाठी जोरदार तयारी करा, असा सल्ला आमदार मुश्रीफ यांनी पाटील यांना दिला.

एकंदर परिस्थितीचा विचार करता काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पक्ष व नेत्यांवरील निष्ठा स्पष्ट होईल. काँग्रेसचे तिकीट मिळावे यासाठी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे आणि सतेज पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महानगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली असली तरीही ती अतिशय गौण आहे, असे सांगत महाडिक यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे.

महाडिक यांनी महापालिका निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना तिकीट मिळू नये यासाठी सतेज पाटील प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे शंभरावर मतदान असल्याकारणाने मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यात फटकेबाजी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात चारच कामे

$
0
0

राजगोळी खुर्दमध्ये 'संसद आदर्श ग्राम'ला हवी गती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संसद आदर्श ग्राम योजना सुरू करून वर्ष उलटले. मात्र, अजूनही कामांना अपेक्षित गती आलेली नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांनी दत्तक घेतलेल्या राजगोळी खुर्द गावात वर्षभरात महत्त्वाची चार कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे सुरू आहेत, तर बहुतांश कामांचे प्रस्ताव शासनदरबारी पडून आहेत.

देशाच्या विकासात ग्रामीण परिसराच विकासही महत्त्वाचा असल्याने गावांच्या विकासावर लक्ष्य केंद्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१४ रोजी संसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली. देशातील प्रत्येक खासदाराने कोणत्याही एका गावाची निवड करून त्याचा विकास करण्याची संकल्पना या योजनेत आहे. तातडीने या योजनेची अंलमबजावणीदेखील सुरू झाली. त्यानुसार खासदार धनंजय महाडिक यांनी चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गाव दत्तक घेऊन कामांना सुरुवातही केली.

एकूण ८३ कामांचे कागदोपत्री नियोजन खासदार महाडिक यांनी केले आहे. यातील महत्त्वाची चार कामे मार्गी लागली आहेत. सहा कामांची सुरुवात झाली आहे, तर विविध विभागांमधील तीसहून अधिक कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत.

राजगोळी खुर्दमधील विहीर आणि बोअरवेलची दुरुस्ती, दलित वस्तीतील गटर्स बांधणी, जमीन सुधारणा आणि बचत गटांना स्वयंरोजगार प्रशिक्षण अशी सुमारे दहा लाख रुपये खर्चाची कामे पूर्ण झाली आहेत.

नळ-पाणीपुरवठा, शौचालय बांधकाम, इंदिरा आवास घरकुल योजना, बायोगॅस बांधणी, रस्ते आणि बचत गटांना कर्जवाटप अशी सुमारे दोन कोटी रुपयांची कामे प्रगतिपथावर आहेत. ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी, ग्रामीण रुग्णालय, अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, वाचनालय इमारत, तलावातील गाळ काढणे, आदी कामांसाठी सरकारी पातळीवरून प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास ही कामे तातडीने सुरू होऊ शकतात. संसद ग्राम खरेच आदर्श बनवायचे असेल, तर तातडीने कामांना मंजुरी मिळवणे आणि त्यासाठी खासदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

...तर भविष्यात उत्साह मावळेल

सध्या सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त करून नियोजित कामांची पूर्तता वेळेत व्हावी अशी अपेक्षा राजगोळी खुर्द ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कागदावरील कामे जर कागदावरच राहिली तर मात्र या योजनेबाबत प्रश्न उपस्थित होतील आणि भविष्यात उत्साह मावळेल, त्यामुळे सांसद आदर्श ग्राम योजनेला गती मिळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे विक्रीचा पांजरपोळवर आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील भटक्या आणि निराधार जनावरांना निवारा उपलब्ध व्हावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रशस्त पांजरपोळची उभारणी केली होती, मात्र अलिकडे या संस्थेत विश्वस्त आणि संचालकांचा मनमानी कारभार सरू असल्याचा आरोप राजर्षी शाहूराजे फाऊंडेशनने केला आहे. पांजरपोळमधून मागील दाराने जनावरांची विक्री होत असून, याच्या चौकशीची मागणीही फाऊंडेशनने केली.

शहरातील भटक्या जनावरांना एकाच ठिकाणी थांबवून त्यांच्या चारा-पाण्याची सोय व्हावी यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सन १९०६ मध्ये प्रशस्त जागेत पांजरपोळ या संस्थेची उभारणी केली होती. जनावरांच्या सुरक्षेबरोबरच रस्त्यांवरील मोकाट जनावरांचा त्रासही यामुळे होत नव्हता. पांजरपोळमधील जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी शाहू महाराजांनी ४०० एकर जमिन या संस्थेला दिली होती. गेल्या काही र्षांपासून पांजरपोळमधील विश्वस्त रमनभाई पटेल आणि संचालकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप राजर्षी फाऊंडेशनने केला आहे. पांजरपोळमध्ये विशिष्ठ समाजाच्याच देणगीदारांची नावे लिहिली जातात. जनावरांना पुरेसा चारा दिला जात नाही, त्याचबरोबर जनावरांच्या संखेची योग्य नोंदही नसून, मागील दाराने जनावरांची विक्रीही होत असल्याचा गंभीर आरोप शाहूराजे फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पांजरपोळची पाहणी करून केला.

चार महिन्यांपूर्वी मुडशिंगी येथील एका शेतकऱ्याने एक म्हैस पांजरपोळकडे सुपूर्द केली होती. शेतकऱ्याने महिन्याभरानंतर पुन्हा त्या म्हैशीबाबत विचारणा केली असता, माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र पंधरा दिवसात दलालाकडून तीच म्हैस विकत मिळाल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्याचे शाहू फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या गैरकारभारांची चौकशी करावी अशी मागणी शाहूराजे फाऊंडेशनने केली आहे. विश्वस्तांना गोमूत्र आणि शेणाने आंघोळ घालण्याचा इशाराही फाऊंडेशनने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीतर्फे मंदिर पाहणी

$
0
0

बालाजी मंदिरावरील छत मोडकळीस आल्याचे उघड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तूतील दगडी ​शिळा निखळल्याच्या घटनेनंतर देवस्थान समितीच्या अ​भियां​त्रिकी विभागाच्यावतीने रविवारी मंदिराच्या स्थापत्यरचनेची पाहणी करण्यात आली. यावेळी मंदिराच्या आवारातील कमकुवत झालेल्या दगडी शिळांसह दगडी कमानींबाबत नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांचा अहवाल पुरातत्व विभागाला देण्यात आला.

दरम्यान, मंदिराच्या पूर्व दरवाजातून आतीलबाजूस भाविकांसाठी लोखंडी पूल उभारण्यात आला आहे. या पूलाची उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रीलिंग करण्यात आले आहे. याठिकाणी साक्षी विनायकाजवळ असलेल्या बालाजी मंदिरावरील छत मोडकळीस आले आहे. या छताला लोखंडी बारचा टेकू देण्यात आला आहे. मात्र येथील दगडी कमानीची अवस्था पाहता हा भागही निखळण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तूची कोरीव शीळा शुक्रवारी रात्री निखळली. शनि मंदिरसमोरील कोरीव ​शिल्पे असलेल्या शीळेचा काही भाग निखळून खाली पडल्याचे देवस्थान व्यवस्थापनाच्या लक्षात आले. अशाप्रकारे निखळलेली शिळा जोडून पूर्ववत करण्याच्यादृष्टीने देवस्थान व्यवस्थापन आ​णि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयातून प्रयत्न करण्यात येणार असून त्याअनुषंगाने देवस्थानतर्फे पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मंदिराच्या मूळ वास्तूतील शिळेचा चौकोनी कोपरा निखळून चबुतऱ्यावर पडल्याचा आवाज झाला. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी शिळेचा निखळलेला भाग जपून ठेवला. पुरातत्व विभागाच्या निर्णयानुसार या शिळेच्या दुरुस्ती होईल.

अंबाबाई मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील संरक्षक वास्तूच्या पंक्तीत येते. त्यामुळे मंदिरातील ​शिळा निखळण्यामागील कारणांची माहिती देवस्थान व्यवस्थापनाकडून मागवून घेतली आहे. त्यातील अहवालानुसार निखळलेला भाग दुरूस्त करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

- पी. एम. महाजन, संचालक, पुरातत्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरचा ‘ब्लेम गेम’

$
0
0

दबावासाठीच पोलिसांवर आरोप केल्याचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ब्रेन मॅपिंगला तयार हो. तुला २५ लाख रुपये देतो आणि माफीचा साक्षीदार करतो, नाहीतर तुला फासावर चढवू', असा पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप करून कॉ.पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाडने खळबळ उडवून दिली होती. समीरचा हा आरोप म्हणजे पोलिसांवर दबाव टाकून तपासात दिशाभूल करण्याचा प्रकार असून, जामीन मिळवण्यासाठीचा हा पूर्वनियोजित खटाटोप असल्याचे मत जाणकार वकिलांनी व्यक्त केले आहे.

कॉ.पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर याला शनिवारी (ता.२१) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडण्याची मुभा दिली होती. यावेळी त्याने पोलिसांवर आरोप केला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस अधिकाऱ्यांनी समीरच्या आरोपाची चौकशी सुरू केली असून, समीरच्या हालचालीही तपासल्या जात आहेत. यापूर्वी शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. २५ लाख रुपयांची ऑफर देत पोलिसांनी पिस्तूल विक्रीची कबुली देण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती नागोरीने कोर्टासमोर दिली होती. या दोन्ही घटनांमधील साम्यही त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करीत आहे. नागोरीने २५ लाख आणि पोलिसांचा दबाव हे दोन मुद्दे पुढे केले होते. समीरनेही २५ लाख रुपयांची ऑफर आणि पोलिसांकडून धमकी मिळाल्याचे दोन मुद्दे पुढे केले आहेत. पोलिसांनाच कोर्टासमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आणि मूळ प्रकरणाला वेगळे वळण देत जामीन मिळवण्याचा प्रयत्न समीरचा असल्यानेच त्याने पोलिसांवर ब्लेम गेम केल्याची चर्चा सुरू आहे.

समीरच्या हालचालींचा माग

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी समीरच्या आरोपातील तथ्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ९ ऑक्टोबरला समीरला कोर्टात सादर करण्यासाठी जे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते त्यांची चौकशी सुरू केली आहे. कोर्टाच्या आवारातून कोर्ट रुममध्ये पोहोचण्यासाठी अवघे २० सेकंद लागतात. याचे चित्रीकरण पोलिसांनी केलेले नाही. प्रसार माध्यमांनी कोर्टाबाहेर केलेले चित्रीकरण मिळवून समीरच्या हालचाली तपासण्याचे काम सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८० धार्मिक स्थळे नियमित?

$
0
0

महापालिकेचा अहवाल; संस्थांना करावी लागणार अर्जप्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात सद्यस्थितीत अनधिकृत असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एकूण १८० स्थळांचे नियमितीकरण होऊ शकेल असा अहवाल महापालिकेने तयार केला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे नियमित करण्याबाबतच्या सूचनेच्या अनुषंगाने प्रशासनाने अशा प्रार्थनास्थळांची यादी तयार केली आहे. स्थानिक विश्वस्त संस्थांनी कोणत्याही प्रकारची महापालिकेकडे नोंदणी आणि परवाना न घेता ठिकठिकाणी या धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली आहे.

वाहतुकीला अडथळा नसणाऱ्या, वादग्रस्त जागेत नसलेल्या प्रार्थनास्थळांची बांधकामे नियमित होऊ शकतील. मात्र या धार्मिक स्थळांचे नियमितकरण करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने हरकती व सूचना मागविल्या आहेत. १८० स्थळांची यादी रविवारी प्रसिद्ध करण्यात आली असून एका महिन्याच्या आत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. नियमितीकरणाचा लाभ शहरातील मोठ्या मंदिर आणि मस्जिदींना होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील, सार्वजनिक आणि सरकारी जागेवरील २९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या व नियमितीकरणास पात्र असलेल्या धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. हायकोर्टाच्या सूचनेनुसार जिल्हा​​धिकारी कार्यालयाने या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिला आहे. नियमितीकरणास पात्र ठरणाऱ्या स्थळांमध्ये गणेश मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंह मंदिर, साई मंदिर, कृष्ण मंदिर, मस्जिद (वाल्मिकी आवास व केसापूर पेठ), विठ्ठल मंदिर यांचा समावेश आहे.

वाढीव बांधकामावर कारवाई

रस्त्याच्या कडेला, चौकालगत ही मंदिरे उभारण्यात आली आहेत. प्रार्थनास्थळांची उभारणी करतानाच अनेक संस्थांनी महापालिकेचा कसलाही परवाना न घेता वाढीव बांधकाम केले आहे. पत्र्याचे शेड उभारले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार अशा अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे. नियमितीकरणामुळे मूळ मंदिर वगळता अन्य वाढीव बांधकामावर टांगती तलवार कायम राहिल. सरकारी जागेवर अनेकांनी मोठ्या मंदिराची उभारणी करत संचालक मंडळ स्थापन केले. सभागृहाची उभारणी केली. जागा सरकारी, पण काहीजणांनी स्वतःच्या नावांनी परिसर विकसित केले आहेत.

मुदतीत हरकती आवश्यक, अन्यथा विचार नाही

हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून उपलब्ध सूचना आणि हरकतींचा विचार केला जाणार आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती, सूचनांचा विचार केला जाणार नाही असे प्रशासनाने म्हटले आहे.

नियमितीकरणास पात्र धार्मिक स्थळे

दत्त मंदिर (दत्त कॉलनी), राम मंदिर (संभाजीनगर बसस्थानकसमोर), दत्त मंदिर (नेहरूनगर), गणपती मंदिर (राजलक्ष्मीनगर), तुळजाभवानी मंदिर (तुळजाभवानी हौसिंग सोसायटी), गणेश मंदिर (जुनी मोरे कॉलनी व श्रीकृष्ण कॉलनी), गणेश मंदिर (सुर्वेनगर), त्रिमूर्ती मंदिर (साळोखेनगर), योगेश्वरी मंदिर (योगेश्वरी कॉलनी), साई मंदिर (हडको कॉलनी), गजानन महाराज मंदिर (गणेश कॉलनी), साईबाबा मंदिर (मोहिते कॉलनी), खणेश्वर, गणपती मंदिर व कृष्ण मंदिर (पतौडी घाट), गजानन महाराज मंदिर (गजानन महाराज नगर), म्हसोबा देवालय, संतोषी माता व गणपती मंदिर (कामगार चाळ शेजारी), मस्जिद (वा​ल्मिकी योजना), महादेव मंदिर (महादेव गल्ली, संभाजीनगर व भूसंपादन कार्यालयासमोर), मारूती मंदिर (आहार हॉटेल, मंगळवार पेठ), मारूती मंदिर (पाटाकडील तालीम मंडळ जवळ), महादेव मंदिर (सोमेश्वर गल्ली, मस्कुती तलाव), विठठल मंदिर (गंजी गल्ली), बोहरी मस्जिद (शिवाजी रोड), दत्त मंदिर (शाहूनगर) जैन मंदिर (व्यापारी पेठ शाहूपुरी), महादेव मंदिर, तुकाराम मंदिर, हनुमान मंदिर (कसबा बावडा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दबावासाठीच समीरचा आरोप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप करून कॉ. गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाडने खळबळ उडवून दिली आहे. समीरचा हा आरोप म्हणजे पोलिसांवर दबाव टाकून जामीन मिळवण्यासाठीचा हा पूर्वनियोजित खटाटोप असल्याचे मत जाणकार वकिलांनी व्यक्त केले आहे.

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी समीरच्या आरोपातील तथ्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ९ ऑक्टोबरला समीरला कोर्टात सादर करण्यासाठी जे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते त्यांची चौकशी सुरू केली आहे. कोर्टाच्या आवारातून कोर्ट रुममध्ये पोहोचण्यासाठी अवघे २० सेकंद लागतात. याचे चित्रीकरण पोलिसांनी केलेले नाही. प्रसार माध्यमांनी कोर्टाबाहेर केलेले चित्रीकरण मिळवून समीरच्या हालचाली तपासण्याचे काम सुरू केले आहे.

समीरचा बचाव करताना त्याला मोठे बोलण्याची व बढाया मारण्याची सवय असल्याने त्याने मोबाइलवरील संभाषणात पानसरे हत्येचा उल्लेख केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होता. आता बचावासाठी वापरलेला मुद्दाच समीरच्या अडचणींमध्ये भर घालणारा ठरणार आहे. पोलिसांवर केलेला आरोपही त्याच्या बढाया मिरवण्याच्या सवयीतून आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात १३० धार्मिक स्थळे अनधिकृत

$
0
0

कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने काढली नोटीस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि शहरातील फूटपाथ, रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार आहे. कोल्हापूर शहर आणि उपनगरातील सुमारे १३० धार्मिकस्थळे ही अनधिकृतपणे उभारण्यात आली आहेत. सुप्रीम व हायकोर्टाने या संदर्भात आदेश काढला असून बेकायदेशीर मंदिर, मस्जिदीवर कारवाई होणार आहे. कारवाई अंतर्गत ही धार्मिंकस्थळे त्या ठिकाणाहून हटविली जाणार आहेत. कारवाईच्या अनुषंगाने महापालिकेने नोटीस काढली असून एका महिन्याच्या आत या संदर्भातील हरकती आणि सूचना महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने अनधिकृत मंदिराची यादी तयार केली असून त्याचा अहवाल जिल्हा​धिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालायकडे सादर केला आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यात येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी झाली आहे. रस्त्याच्या कडेला, रहदारीच्या ठिकाणी, फूटपाथवर आणि चौकात राजकीय वरदहस्त लाभल्याने धार्मिक स्थळांची उभारणी बिनदिक्कतपणे झाली आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. २९ सप्टेंबर २००९ रोजी राज्य सरकारला अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याचा आदेश दिला आहे. आदेशात संबंधित धार्मिक स्थळे निष्कासित करणे, स्थलांतरित करण्याचे स्पष्ट आदेश आहेत.

महापालिकेने शहर आणि परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शहरातील विविध भागातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर, साई मंदिर, गणेश मंदिर, सन्नत जमात मस्जिदचा समावेश आहे. कारवाई होणाऱ्या मंदिरात उद्योग भवन समोरील गणेश मंदिर, ताराराणी चौक येथील हनुमान मंदिर, शाहूपुरी जिमखाना कंपौड लगतचे पंचमुखी हनुमान मंदिर, विक्रमनगर येथील सन्नत जमात मस्जिदचा समावेश आहे.

अ​न​धिकृत धार्मिंक स्थळे

जाऊळाचा गणपती (रंकाळा टॉवर), पितळी गणपती मंदिर (ताराबाई पार्क), सुर्येश्वर महादेव मंदिर (राजघाट रोड), साईबाबा मंदिर (काळकाई गल्ली), हनुमान मंदिर (सुभाषनगर), महादेव मंदिर (सोमराज कॉम्प्लेक्स), दत्त मंदिर (आयरेकर गल्ली), म्हसोबा मंदिर (सणगर गल्ली), मारूती मंदिर (हैदर रोड), महादेव मंदिर (कोष्टी गल्ली), तुरबत (तुरबत चौक), नागनाथ मंदिर (गवत मंडई), म्हसोबा मंदिर (पटेल चौक), मारूती मंदिरे (नंगीवली चौक, राजाराम चौक, वारे वसाहत, कुंभार गल्ली) बिरदेव मंदिर (यादवनगर मेन रोड), मस्जिद (वायपी पोवार नगर), दर्गा (लोणार वसाहत).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यावर टंचाईचे सावट

$
0
0

Balasaheb.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः दुष्काळाचे सावटही न पाहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्या‌वर दुष्काळ घिरट्या घालत आहे. एकीकडे अन्नधान्य उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होत असताना उसासारखे हुकमी पीकही धोक्यात आले आहे. खरीप पिके वाया गेल्यानंतर परतीच्या पावसावर अवलंबून असलेले रब्बी पीकही पूर्णत: वाया गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. पाणीसाठा अपुरा असल्याने पाणीटंचाईबरोबरच चारा टंचाईलाही सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान केवळ ४७. २२ टक्के पाऊस झाला आहे. तर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न उभा आहे.

जिल्ह्याचा पश्चिम भाग तसा अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा आहे. मा‌त्र, राधानगरी, शाहूवाडी, आजऱ्याचा कोकणालगतचा भाग आणि चंदगडचा पश्चिम भाग वगळता अन्य ठिकाणी पावसाचे प्रमाण जेमतेम राहिले आहे. ऑगस्टनंतर भात पीक पोटरीच्या, भूईमूग शेंगा धरण्याच्या, ऊस फुटव्याचा अवस्थेत असतो. पावसाने ओढ दिल्याने ही पिके वाया गेली.

जिल्ह्यात उसाखाली क्षेत्र ११७१२५ हेक्टर आहे. यंदा १४५२८६ हेक्टरवर लागवड झालेला ऊस व खोडवा पीक आहे. सध्या उसाला आवश्यकता असतानाही पाणी मिळेना झाले आहे, त्यामुळे ऊसपीक वाळून जात आहे.

रब्बीला फटका

खरीपाचे उत्पादन घेतल्यानंतर साधारणत: परतीच्या पावसामुळे जमिनीत ओल असते. जिल्ह्यात शाळू, हरभरा, वाटाणा, मसूर, मोहरी, शेंगमुळा आदी पिके घेतली जातात. मात्र, पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता नाहीशी झाली आहे.

उपलब्ध पाणीस्रोत पडणार कोरडे

जिल्ह्यात वेगवेगळया प्रकारे पिकांना वा पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. काही स्रोतांचे नियोजन स्थानिक पातळीवर आणि काही स्रो‌तांचे पाटबंधारे विभागाकडे असते. यातील जिल्ह्यातील ५३ लघुपाटबंधारे रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहेत. मात्र, यातील ४० बंधाऱ्यातील पाणीपातळी चिंताजनक आहे. यातील निम्म्याहून अधिक बंधारे ५० टक्क्यांपेक्षा कमी भरले आहेत.

भातपीक वाया

जिल्ह्यात भातपिकाखाली क्षेत्र १ लाख ११ हजार ६१० हेक्टर असून एक लाख ३ हजार १५६ हेक्टरवर भात पिकाची पेरणी झाली होती. मात्र, ओढे, ओहळ आणि नदीकाळचा परिसर वगळता अन्य ठिकाणचे भातपीक वाया गेले. सरासरी उत्पन्नामध्ये साधारणत: ६० ते ६५ टक्क्यांनी घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images