Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डाळी स्थिर, साखर महागली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डाळींच्या साठेबाजीवर सरकारने धडक कारवाई केली असली, तरी अद्याप डाळींचे लिलाव होऊन तो साठा बाजारात आलेला नाही. त्यामुळे तूरडाळीचे दर या आठवड्यात १६० ते १७५ रुपयांदरम्यान असून, अन्य डाळींचे दरही स्थिर आहेत. दरम्यान, दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे साखरेच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ झाली आहे.

दिवाळीच्या काळात फराळासाठी प्रामुख्याने हरभरा डाळीला अधिक मागणी असते. सध्या किरकोळ बाजारपेठेत हरभरा डाळ ७५ ते ८० रुपयांदरम्यान मिळते आहे. मसूर डाळीचा दर प्रतिकिलो ९० रुपये इतका असून, मूग डाळ १३० रुपये, तर उडीद डाळ १७० रुपये दराने उपलब्ध आहे. घाऊक बाजारपेठेत डाळीच्या मालाला उठाव कमी आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात डाळीचे दर थोडे कमी होऊ शकतील, तसेच सरकारने जप्त केलेला साठा बाजारात आणला तरीही किमतीवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यापारी संघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी व्यक्त केली.

दिवाळीच्या काळात फराळासाठी पोहे, रवा, मैदा, साखर व तेल या पदार्थांची मागणी वाढत असल्याने त्यांचे दर वाढतात. या आठवड्यात साखरेच्या दरात किंचित वाढ झाली असून किरकोळ बाजारपेठेत साखरेची किंमत प्रतिकिलोसाठी ३२ ते ३३ रुपये झाली आहे.

मंडईमध्ये कांद्याच्या दरात या आठवड्यात दहा रुपयांची वाढ झाली असून, प्रतिकिलोसाठी मोठ्या कांद्याचा दर ४० ते ४५ रुपयांवर पोहोचला आहे. मिरची व कणसाचे दर उतरले असून, अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत.

दसरा सणात फळांना मोठी मागणी होती. त्यावेळी फळांच्या किमतीत वाढ होती. दस-यानंतर फलांच्या किमती कमी झाल्या आहेत. फळांच्या किमतीमध्ये या आठवड्यात घट दिसून आली. पिकलेल्या संत्र्यांची आवक आता वाढल्याने त्याचे दर प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. मोसंबी, चिकू प्रत्येकी ४० रुपये किलो दराने उपलब्ध असून सीताफळाचा दर ५० रुपये किलो, तर डाळिंबाचा दर ६० रुपये किलो कमी झाला आहे. देशी सफरचंद ८० रुपये किलो दराने उपलब्ध असून केळ्यांचे दर डझनासाठी ३० रुपये इतके आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फोटोग्राफर चौगुलेंची आत्महत्या

0
0

सुसाइड नोटमध्ये भाजप नगरसेवकाचा उल्लेख

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खरी कॉर्नर येथे फोटोग्राफर आनंदराव दत्तात्रय चौगुले (वय ६५, रा. मंजुळा अपार्टमेंट, पोवार गल्ली, मंगळवार पेठ) यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. स्वतःच्या आनंद स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी भाजपचे नगरसेवक आर.डी. पाटील, त्यांचा मुलगा सुनील, महालिका कर्मचारी धनाजी शिंदे यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी नगरसेवक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दुसरीकडे आरडी यांच्यामुळे आत्महत्या केल्याचा बनाव विरोधकांनी केला आहे, असे पत्रक भारतीय जनता पक्षाने प्रसिद्धीस दिले आहे.

चौगुले यांचा शिवस्वरूप जनरल स्टोअर्समध्ये फोटो स्टुडिओ आहे. शनिवारी त्यांचा भाऊ दिनकर चौगुले यांना हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सुसाइड नोटमधील हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासून घेणार असल्याचे जुना राजवाड्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या अटकेची मागणी

फोटोग्राफर आनंदराव चौगुले यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याने आर. डी. पाटील यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी, अशी मागणी ‌शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. याप्रश्नी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही करण्यात आले. भाजपचे नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करतात. चौगुले यांनी आरडी यांच्या दहशतीला कंटाळूनच आत्महत्या केली आहे. याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याच पक्षाच्या हातात राहण्यासाठी पंधरा दिवस चार पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रचाराचे रान उठवले. आरोप-प्रत्यारोपाने प्रचार चांगलाच रंगला. निवडणुकीत चार पक्षाच्या पाच प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह ताराराणी आघाडीची सूत्रे पडद्यामागून हलविणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक यांचाही यामध्ये समावेश आहे.

महापालिकेत दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. ती सत्ता कायम ठेवण्यासाठी मुश्रीफ व सतेज पाटील यांनी प्रचाराचा धुरळा पाडला. अंतर्गत युती करतानाच काही ठिकाणी शिवसेनेची मदत घेतली. काही करून भाजप व ताराराणी आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी व्यूहरचना आखली. पंधरा दिवस आघाडीला टार्गेट केले. देशात व राज्यात सत्ता आणि आता महापालिकेत सत्ता द्या, म्हणत भाजप ताराराणीने प्रचार केला. प्रचारात महागाई, टोल, हद्दवाढ, गुन्हेगारी असे अनेक मुद्दे चर्चेत आले.

निवडणुकीत पक्षाची सत्ता यावी, त्याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी चार नेत्यांनी गल्लीबोळ पिंजून काढला. निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात ठेवली. यामध्ये मंत्री पाटील, मुश्रीफ, सतेज पाटील व क्षीरसागर यांचा समावेश आहे. यश मिळाले तर त्याचे श्रेय यांना मिळणार असून अपयश आल्यास त्याचे धनीही त्यांना व्हावे लागणार आहे. यामुळे या निवडणुकीत या चार नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गरज भासली तर दोन्ही काँग्रेस एकत्र येणार यात शंका नाही. शिवसेनाही त्यांना मदत करण्याची दाट शक्यता आहे.

सतेज पाटील यांना शह देण्यासाठी आमदार महाडिक यांनी भाजप व ताराराणी आघाडीला एकत्र आणले. यामुळे चार नेत्याबरोबर आमदार महाडिक यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मतदान, उद्या फैसला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमालीची ईर्षा आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.१) मतदान होत आहे. ८१ प्रभागांसाठी ५०६ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. चार प्रमुख पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महापालिका काबीज करण्यासाठी पक्ष नेत्यांनी कंबर कसल्याने प्रत्यक्ष मतदानादिवशी अधिकाधिक मतदान खेचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मतदान फिक्स करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी अक्षरशः रात्र जागवली. पैशाची देवघेव, भेटवस्तूंसह विविध प्रकारची प्रलोभने दाखवत मतदानासाठी फिल्डिंग लावली. सोमवारी (ता.२) मतमोजणी आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्वाचा कस लागणार असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी इलेक्टीव्ह मेरीटला प्राधान्य देत धनदांडगे, पैसेवाल्या उमेदवारांना तिकिटे दिली. ३७८ केंद्रांवर मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत दिग्गज मैदानात उतरल्याने पराकोटीची ईर्षा निर्माण झाली आहे.

महापालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून गल्लोगल्ली पिंजून काढली. काँग्रेसला पुन्हा महापालिकेवर सत्ता टिकवायची आहे तर राष्ट्रवादीने 'एकला चलो रे'चा नारा बुलंद केला आहे. भाजप-ताराराणी आघाडीने स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, एसफोरएसह सुमारे १४० च्या आसपास अपक्ष उमेदवार ताकद आजमावत आहेत. माजी महापौर नंदकुमार वळंजू, उदय साळोखे, जयश्री सोनवणेसह २३ नगरसेवक आखाड्यात आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, माजी शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, ताराराणी आघाडीचे ​शिलेदार सत्यजित कदम, सुनील मोदी यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची ठरलेली आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. पोलिस आपल्या पाठिशी आहेत. जे लोक दबाव आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील. भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी मी स्वतः शहरातून ५० वाहनांतून रॅली काढून मतदारांना आवाहन केले आहे. तक्रारीसाठी नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक

निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी संपूर्ण सज्जता आहे. महापालिका प्रशासन, पोलिस यंत्रणांना या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. मतदारांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा. काही तक्रारी झाल्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे कराव्यात.

जे. एस. सहारिया, आयुक्त, राज्य निवडणूक आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कोल्हापुरात मतांचा पूर, ७२ टक्के मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदान केंद्रावर सकाळपासूनच लागलेल्या लांबच्या लांब रांगा, मतदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे सरसावलेले मतदार, भागाभागातील मतदान खेचण्यासाठी कार्यकर्त्यांत लागलेली चढाओढ, उमेदवारांच्या बाजूने मतांचा टक्का वाढविण्यासाठी समर्थकांकडून दिवसभर वाहनातून होणारी मतदारांची ने-आण, शेवटच्या मिनिटापर्यंत मत फिक्स करण्यासाठीच्या घडामोडी अशा ईर्ष्या जागविणाऱ्या आणि चुरशीच्या वातावरणात कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारणपणे ७२ टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढल्याने हे वाढीव मतदान महापालिकेच्या सत्ता परिवर्तनाकडे झुकणार, की काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजावर पसंतीची मोहोर उमटणार याचा फैसला सोमवारी होणार आहे. दरम्यान, शहरातील अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

पालिकेच्या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१ प्रभागातून तब्बल ५०६ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदार यंत्रबद्ध झाले. मतदान केंद्र आवारात उमेदवारांचा वावर आणि त्याला प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतलेला आक्षेप, त्यावरून पोलिस अधिकारी व उमेदवारांत झालेली किरकोळ शाब्दिक बाचाबाची, काही प्रभागात मतदारांना मोटारीतून मतदानासाठी नेताना समर्थकांती वादावादी असे किरकोळ अपवाद वगळता निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सदर बझार प्रभागातील कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावर सर्व उमेदवार पोहचण्यापूर्वीत मतदार यंत्रे सुरू केल्याने ताराराणी आघाडीच्या उमेदवार शुभांगी भोसले यांनी आक्षेप घेतला. यावरून ताराराणी आघाडीचे समर्थक व निवडणूक अधिकाऱ्यांत खटके उडाले. कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागातही नगरसेवक संभाजी जाधव यांचीही पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. फिरंगाई प्रभागातही दिवसभर प्रचंड तणावाचे वातावरण होते. स्थानिक उमेदवारांतील राजकीय संघर्षावरून कसल्याही प्रकारची ठिणगी पडू नये म्हणून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचा सहभाग लक्षणीय

0
0

प्रचारापासून मतदानापर्यंत महिला कार्यकर्त्या आघाडीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदान केले का? मतदान स्लीप मिळाली का? मतदानासाठी लवकर बाहेर पडा... असे सांगत घराघरातील महिला मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या महिला कार्यकर्त्यांच्या हाकेनेच रविवारी सकाळी अनेक महिलांनी घराचा दरवाजा उघडला. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी एरव्ही दिसणाऱ्या तरूण कार्यकर्त्यांच्या मोहिमेला यंदा महिला कार्यकर्त्यांनी ब्रेक दिला. यावर्षी प्रचाराच्या रणधुमाळीपासूनच महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षवेधी होता. रविवारी मतदानादिवशीही उमेदवारांच्या बूथवर बसण्यापासून ते थेट महिला मतदारांना घरातून केंद्रावर आणण्यातही महिला कार्यकर्त्या आघाडीवर असल्याचे ​चित्र दिसले.

यंदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ४१ प्रभाग महिलांसाठी आर​​क्षित आहेत. त्यामध्ये सरासरी पाच ते दहा महिला रिंगणात आहेत. तर काही सर्वसाधारण खुल्या व प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागातही महिलांनी रण​शिंग फुंकले आहे. त्यामुळे पुरूष उमेदवारांच्या बरोबरीने रिंगणातील महिला उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे.

महिला उमेदवारांच्या प्रचाराची रणनिती जरी त्यांचे पती किंवा पुरूष कार्यकर्ते ठरवत असले तरी महिला मतदारांपर्यंत संपर्क यंत्रणा राबवण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात चांगलाच किल्ला लढवला होता. महिलांच्या प्रश्नाची जाण असलेल्या महिला कार्यकर्त्यांची मोट बांधून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारही आघाडीवर राहिले.

माझा प्रभाग महिला आर​क्षित आहे. ५० टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी मिळाली आहे. मात्र त्यासाठी जाणकार आ​णि विकासाची दृष्टी असलेली महिला सभागृहात जाणे आवश्यक आहे. केवळ प्रभाग आरक्षित झाला म्हणून महिलांनी रिंगणात उतरू नये, असे मला वाटते.

- रेणुका साळोखे, शिवाजी पेठ

यावर्षी महापालिकेत ४१ महिला नगरसेवक म्हणून जातील. तसेच काही सर्वसाधारण प्रभागातही महिला उमेदवार आहेत, त्यांनाही संधी मिळू शकते. महिलांचा प्रचारातील सहभाग जसा वाढतोय तसा तो मतदानामध्येही वाढतोय हे आजच्या महिलांच्या लक्षणीय संख्येतून दिसले.

- वंदना पाटील, कसबा बावडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईने बजावला हक्क

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीत तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसला. शहरातील ३७८ मतदान केंद्रांवर मतदारांना स्लीप देण्यापासून ते मतदारांना मतदानासाठी घरातून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यातही तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. गेल्या काही वर्षांत राजकारणात तरुणांचा टक्का वाढत असल्याने अनुयायी आणि समर्थक तरुणांचीही संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली मतदानादरम्यान जाणवली.

निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांची संख्या होती. ३७८ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच प्रचंड उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. सकाळी सात वाजता मतदान केंद्रांबाहेर वोटर स्लीप देण्यासाठी व्यवस्था करण्यापासून ते मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुणांनीच सांभाळली. सर्वच ८१ प्रभागांत मतदान प्रक्रियेत तरुणांचा सहभाग जाणवला. विशेषतः शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह परिसरातील इतर पेठांमध्ये तरुणांचे ग्रुप कामाला लागले होते. सदर बाजार, कदमवाडी, शाहू कॉलेज, बावडा या ठिकाणी उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांकरवी एकगठ्ठा मतदान करवून घेण्यावर भर दिला होता, त्यामुळे सकाळी आठपासूनच घोळक्याने मतदार मतदान केंद्रांवर पोहोचत होते. अनेक ठिकाणी तरुण उमेदवार रिंगणात असल्याने उमेदवारांची तरुण मंडळे, परिसरातील ग्रुप पांढऱ्या कपड्यात झळकत होते. सकाळच्या पहिल्या टप्प्यात तरुणांनी स्वतःचे मतदान करून दुपारपर्यंत इतर मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.

तरुणांचा मतदानाचा उत्साह दिवसभर सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. मतदानानंतर सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जात होते, तर काही तरुणांनी आपल्या ग्रुपसोबत एकत्रित मतदान करून बाहेर आल्यानंतर सेल्फी काढले. यात तरुणीही मागे नव्हत्या. विशेषतः महिलांसाठी राखीव असलेल्या मतदार संघांमध्ये मतदान केंद्रांवर तरुणींची संख्या अधिक होती. महिला उमेदवारांसोबत थांबण्याबरोबरच वृद्धांचे मतदान करवून घेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पेठांमध्ये विशिष्ट रंगांच्या साड्या, ड्रेसमध्ये समूहाने येणाऱ्या तरुणीही होत्या. तरुणांनी दिवसभरात पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना पसंती दिली होती.

निवडणुकीत सक्रिय सहभाग

एकूण मतदानापैकी तीस टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान तरुणांचे असल्याने या निवडणुकीत तरुणाईचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला. वृद्ध, अपंग मतदारांना उचलून मतदान केंद्रात नेत असल्याचे चित्र जवळपास सर्वच प्रभागांत पाहायला मिळाले. तरुणांचा राजकारणातील वाढलेला टक्का आणि तरुण उमेदवारांची संख्या वाढल्यामुळेच मतदान प्रक्रियेतही तरुणाईचा प्रचंड मोठा उत्साह आणि सहभाग जाणवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची ‘दिवाळी गिफ्ट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सणात प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. राज्यात १८ हजार ५४३ एसटी बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत. गेल्या वर्षी १७ हजार ५५० एसटी सेवेत होत्या. यावर्षी ९९३ बस जादा सोडल्या आहेत. पुणे विभागात ४२८४ एसटी सेवेत असून, गतवर्षीपेक्षा २२१ बसेस कमी केल्या आहेत. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत एसटी सेवा बजावणार आहेत.

दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात गतवर्षीपेक्षा ९९३ जादा एसटी सोडण्यात येणार असल्याने भारमानात अधिक वाढ होणार आहे. तुलनेने एसटीच्या उत्पन्नात लाखो रुपयांनी वाढ अपेक्षित आहे. आंतरराज्य वाहतुकीसाठी १४७० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यातील आंतरराज्य वाहतुकीसाठी ही सेवा असेल.

पुण्यासाठी खास सोय

पुण्याहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (संचेती चौक) शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड (वल्लभनगर) येथून बसेस सोडण्यात येतील. याशिवाय २१५० अतिरिक्त बसेस सोडण्यात येतील. गेल्या वर्षी १९८५ अतिरिक्त बसेस सोडल्या होत्या.

जादा बसेसचे आरक्षण राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहेत. प्रवाशांची संख्या अधिक झाल्यास त्या वेळी जादा बसेस सोडण्याचा विचार केला जाईल.'

- सुहास जाधव, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फैसला होणार तीन तासांत

0
0

सकाळी दहापासून मतमोजणी; प्रशासन सज्ज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीची सत्तेची सूत्रे कुणाकडे जाणार याचा फैसला सोमवारी दुपारी एकपर्यंत लागणार आहे. सातही विभागीय निवडणूक कार्यालयांच्या प्रभागातील मतमोजणी यंदा एकाच ठिकाणी होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथील इमारतीत सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. एकाचवेळी ८१ प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने दुपारी एकपर्यंत सर्व निकाल अपे​​क्षित आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार यंत्रे बंदोबस्तात शासकीय तंत्रनिकेतन येथील इमारतीत ठेवण्यात आली. याठिकाणी सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतमोजणीसाठी साधारणपणे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता मतमोजणी स्थळावर उपस्थित राहण्याच्या, तर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ओळखपत्रासह नऊ वाजता हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पहिल्यांदा टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. पोस्टल मतदानाची संख्या ८४६ आहे. मतमोजणी ठिकाणी मोबाइल, कॅमेऱ्याचा वापर करता येणार नाही असे निवडणूक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तीन ते सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, कमी मतदारसंख्या असलेल्या प्रभागाचा निकाल ११.३० पर्यंत लागण्याची शक्यता आहे. जवळपास बारा प्रभागांतील मतदार संख्या ही चार हजाराच्या आसपास आहे. ज्या प्रभागाची लोकसंख्या सहा हजाराहून अ​धिक आहे, त्या प्रभागासाठी मतमोजणीच्या सहा फेऱ्या होणार आहेत.

उमेदवारांची जंत्री कुणाच्या फायद्याची

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव टेंबलाईवाडी प्रभागात बारा उमेदवार रिंगणात असल्याने निकाल कुणाच्या बाजूने झुकणार याविषयी उत्कंठा वाढली आहे. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर जिवबा नाना जाधव पार्क हा प्रभागही अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे.

भाऊबंदकीमुळे कुणाला घरी बसावे लागणार

तटाकडील तालीम प्रभागात माजी महापौर उदय साळोखे आणि माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे हे दोघे भाऊ एकमेकाच्या विरोधात लढत आहेत. उदय साळोखे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत तर चंद्रकांत साळोखे अपक्ष उमेदवार आहेत. फिरंगाई तालीम प्रभागातही जावा-जावांमध्ये लढत आहे. नगरसेवक रवीकिरण इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी या भाजप आघाडीकडून तर अजय इंगवले यांच्या पत्नी प्रज्ञा या अपक्ष म्हणून लढत आहेत. राजारामपुरीत सख्खे चुलत-भाऊ बहीण एकमेकांविरोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप कवाळे तर शिवसेनेकडून रुपाली कवाळे चुलत भाऊ बहीण निवडणूक लढवित आहेत.

तीन जोड्या प्रवेश करणार ?

यंदा तीन जोड्या महापालिका रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष राजू लाटकर शिवाजी पार्क प्रभागातून तर त्यांच्या पत्नी सूरमंजिरी लाटकर शाहू कॉलेज प्रभागातील उमेदवार आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून माजी नगरसेवक प्रकाश मोहिते नाथागोळे तालीम प्रभागातून तर त्यांच्या पत्नी यशोदा मोहिते या संभाजीनगर प्रभागातील निवडणूक लढवित आहेत. माजी उपमहापौर हरिदास सोनवणे संभाजीनगर प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री सोनवणे या नेहरूनगरमधून निवडणूक लढवित आहेत. या ​जोड्या महापालिका सभागृहात प्रवेश करतात याचा निर्णय सोमवारी दुपारपर्यंत लागणार आहे.

महापालिकेच्या ८१ प्रभागांसाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रशासनामार्फत मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी केली असून, मतदार यंत्रांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार आहे.'

- पी. शिवशंकर, आयुक्त

मतमोजणीची प्रक्रिया अशी...

सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ

पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मोजणी

एकाचवेळी ८१ प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात

कमी मतदार संख्येच्या प्रभागाचा निकाल ११.३० पर्यंत शक्य

तीन ते सहा फेऱ्यांत होणार मतमोजणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावस्थळी पोलिसांची धाव

0
0

संयमाने, प्रसंगी जरब दाखवून हाताळली परिस्थिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संवेदनशील प्रभागात जरा जरी खट्ट झाले अथवा पैसे वाटत असल्याच्या अफवेची माहिती मिळताच पोलिस धाव घेत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. अनेक भागांमध्ये तणाव असतानाही पोलिसांनी अतिशय संयमाने व जरब दाखवून परिस्थिती हाताळण्यात यश मिळविले.

शहरातील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिसंवेदनशील ठिकाणी स्वतः पोलिस निरीक्षक, तर अन्य ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांना नियुक्त करण्यात आले होते. शहरात काम केलेल्या व अन्य ठिकाणी बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात बोलावण्यात आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पो​लिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी र​विवारी दिवसभर संवेदनशीन प्रभागांना भेट दिल्याने अधिकारी व कर्मचारी अलर्ट राहिले. फिरंगाईसह शिवाजी पेठेतील प्रभागात अधीक्षक शर्मा यांनी स्पीकरवर समर्थक व कार्यकर्त्यांना दमवजा सूचना दिल्या. बुध्द गार्डन व जवाहरनगर प्रभागाच्या सीमेवर पैसे वाटत असल्याची अफवा उठल्यानंतर तणाव निर्माण झाला. तिथे अधीक्षक शर्मा यांनी धाव घेऊन उमेदवारांच्या समर्थकांना पांगवले.

रंकाळा स्टँड प्रभागात शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळील खर्डेकर विद्यालयाच्या बाहेर उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. एका उमेदवाराचा समर्थक पैसे वाटप असल्याची माहिती मिळाल्यावर दोन उमेदवारांच्या समर्थकांनी धाव घेतली. पैसे वाटप करणाऱ्या समर्थकाला मारहाण होण्यापूर्वी निरीक्षक औदुंबर पाटील यांनी समर्थकांना हाकलले. पण दोन उमेदवारांच्या समर्थकांनी राडा करण्यासाठी तयारी केली. ही घटना शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी कळताच त्यांनी मोठा पोलिस ताफा पाठवला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे व शंभर पोलिसांनी सर्व समर्थकांना हाकलून लावले.

खोलखंडोबा प्रभागात नगरसेवक किरण शिराळे व नगरसेवक श्रीकांत बनछोडे यांच्यात समर्थकांत तणाव निर्माण झाला; पण पोलिस उप निरीक्षक युवराज आठरे यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान केंद्रात आत बाहेर करणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांना हाकलून काढले. सदर बझार परिसरातील पैसे वाटण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली.

सदर बझार प्रभागातील कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्रावर सर्व उमेदवार पोहचण्यापूर्वी मतदार यंत्रे सुरू केल्याने ताराराणी आघाडीच्या उमेदवार शुभांगी भोसले यांनी आक्षेप घेतला. यावरून ताराराणी आघाडीचे समर्थक व निवडणूक अ​धिकाऱ्यांत खटके उडाले. कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागातही नगरसेवक संभाजी जाधव यांचीही पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. फिरंगाई प्रभागातही दिवसभर प्रचंड तणावाचे वातावरण होते. स्थानिक उमेदवारांतील राजकीय संघर्षावरून ​कसल्याही प्रकारची ठिणगी पडू नये म्हणून पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

यंदाच्या निवडणुकीत मातब्बर उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी गेले महिनाभर फिल्डींग लावली होती. मतदानावदिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्येक प्रभागाचा धावता दौरा करत आढावा घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारच्या सत्रात मतदानासाठी नागरिकांच्या रांगा कायम होत्या. संध्याकाळी चारनंतर पुन्हा एकदा घडामोडी वेगावत शिल्लक मतदारांचा शोध मोहिमेने वेग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीसाठी पोलिस अलर्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी लागणार असून, निवडणुकीच्या निकालानंतर वाद होणाऱ्या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांत पोलिस दाखल होतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिली. सोमवारी दिवसा व रात्री पोलिस रस्त्यांवर बंदोबस्त करणार आहेत.

महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून अनेक प्रभागात तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. मतदान शांततेत झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी सोमवारी निकालानंतर पोलिस अधिक दक्ष राहणार आहेत. प्रचाराच्या कालावधीत काही ठिकाणी कार्यकर्ते हातघाईवर आल्याने त्यांच्यातील वादाची ठिणगी सोमवारी उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी ३७८ मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हाच बंदोबस्त संवेदनशील ठिकाणांवर वर्ग करण्यात आला. आहे. यापूर्वी कोल्हापुरात काम केलेल्या व सध्या ग्रामीण भागात कार्यरत आहेत, अशांना निवडणुकीच्या कामासाठी शहरात बोलावण्यात आले आहे.

रविवारी मतदान संपल्यानंतर प्रत्येक चौकात व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांना फिक्स पॉइंट देण्यात आले आहेत. पोलिसांची ५० हून अधिक वाहने शहरातून फौजफाटासह गस्त घालणार आहेत. ज्या ठिकाणी वाद होतील, तेथे मोठ्या संख्येने पोलिस पाठवण्यात येणार आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाग्यावर ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार आहे.

पुंगळ्या काढणाऱ्यांवर कारवाई

निवडणूक निकालानंतर

जल्लोषात पुंगळ्या काढून वाहने भरधाव वेगात चालविणाऱ्या हुल्लडबाज युवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पार्किंगचे ठिकाणे

१. राजाराम तलावासमोरील मोकळी जागा, २. शिवाजी विद्यापीठ गेट क्रमांक ६ ची आतील बाजू. ३. टेंबलाई मंदिराच्या उजव्या

व डाव्या बाजूकडील मोकळी जागा. ४. भाई माधवराव बागल हायस्कूलचे मैदान.

बंद केलेले मार्ग

सायबर चौक ते सरनोबतवाडी व हायवे कॅन्टीन ते सायबर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच रेल्वे उड्डाण पूल ते हायवे कॅन्टीस हा रस्ताही बंद करण्यात येणार आहे.

मार्गातील बदल

शाहू जकात नाकामार्गे कोल्हापूर शहरात येणारी सर्व वाहने राष्ट्रीय महामार्गावरून उचगाव, तावडे हॉटेलकडे वळविण्यात येणार आहे.

सायबर चौक ते शाहू नाकाकडे जाणारी वाहतूक सायबर चौक, एसएससी बोर्ड, राजेंद्रनगर मार्गे शाहू जकात नाक्याकडे वळवण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुरहूर आणि चिंता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्याभरात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यापासून ते टोकाच्या प्रचारापर्यंत उमेदवारांनी मोठा खटाटोप केला. ५०६ उमेदवारांनी महापालिकेच्या सभागृहात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून काम केले. पडद्यासमोरील आणि मागील अनेक जोडण्या केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याचीही जबाबदारी उमेदवारांनी पार पाडली. आता मशिनबंद झालेल्या मतांचा कौल काय लागणार याची उत्सुकता असल्याने उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे.

उमेदवारीसाठी पक्षाचे तिकीट मिळवण्यापासून ते प्रचाराचे नियोजन करून मतदारांना आपल्याकडे खेचण्यापर्यंत उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. ५०६ उमेदवारांनी अखेरच्या आठवड्यात अक्षरशः रात्रीचाही दिवस केला. सर्वच प्रमुख पक्षांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना प्रचारात उतरवल्याने आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला होता. स्थानिक पातळीवर तर प्रचार इतका शिगेला पोहोचला होतो, की यातूनच काही वादाचे प्रसंगही उद्भवले होते. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलिसांना अखेरपर्यंत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांवरही करडी नजर ठेवावी लागली होती. प्रभागांमध्ये वाढलेली प्रचंड चुरस, पाण्यासारखा पैशाचा वापर, आमिषांचा पाऊस आणि छुप्या जोडण्यांमुळे उमेदवारांना अखेरच्या क्षणापर्यंत दक्ष राहावे लागले.

काही उमेदवारांना विजयाची खात्री असल्याने मतदान संपताच त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारीही सुरू केली आहे. चुरशीच्या प्रभागांमध्ये उमेदवार आणि समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत मतांचा आढावा घेतला. मतांच्या आकडेवारीत आपल्याला मिळणारी आणि विरोधकांना जाणा-या मतांवरही चर्चा रंगल्याचे चित्र होते. उमेदवारांच्या चेह-यावर उत्सुकता, हूरहूर आणि चिंताही दिसत होती.

मिरवणुकांना अटकाव

निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. शहरातील मद्यविक्रीही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे उमेदवारांना जल्लोषी मिरवणुका काढता येणार नाहीत. परिणामी प्रभागात एकाच ठिकाणी थांबून समर्थकांना जल्लोष साजरा करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यात धूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा परिसरात सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदानासाठी रांग लावून उत्साहाची पावती दिली. माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शुगरमिल, बावडा पूर्व, हनुमान तलाव, लक्ष्मी विलास पॅलेस आणि रमणमळा या पाच प्रभागात असलेल्या चुरशीची प्र​चिती मतदारांच्या रांगांमध्ये ​दिसून आली. गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि राजेश लाटकर यांच्यात झालेल्या वादाचे सावट मतदानादिवशी भोसलेवाडी-कदमवाडी भागातील तणावाच्या रूपाने दिसले. मात्र कसबा बावडा परिसरात मतदान शांततेत झाले.

बावड्यातील प्रिन्स ​शिवाजी मंदिर आ​णि बलभीम विद्यामंदिर या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लावल्या होत्या. सकाळी फिरायला जाणाऱ्या मतदारांनी जॉ​गिंग ट्रॅक मतदान केंद्राकडे वळवल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात महिला मतदारांची संख्या मतदानासाठी तुरळक असते. महिला दुपारच्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदानाला येतात. यावेळी मात्र बावडा परिसरात सकाळच्या टप्प्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण उमेदवारांची सकाळच्या टप्प्यात फारशी गर्दी दिसली नाही. दुपारनंतर तरुण मतदार एकत्रितपणे मतदानासाठी बाहेर पडले.

रमणमळा परिसरातील शाहू हायस्कूलमधील केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत गर्दीचा ओघ कमी होता, मात्र त्यानंतर गर्दी वाढू लागली. माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे याठिकाणी प्रत्यक्ष उप​स्थित असल्यामुळे वातावरणाला जोर चढला. लक्ष्मीविलास पॅलेस प्रभागात पाच केंद्रावरही सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी झाली. दुपारी बाराच्या दरम्यान या सर्व केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. हनुमान तलाव या प्रभागात अवघ्या तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच आहे. या भागात सव्वासहा हजार मतदार आहेत. त्यामुळे मतदानाच्या उत्साहासोबत अंदाज वर्तवण्याच्या चर्चेलाही उधाण आले होते.

कदमवाडी-भोसलेवाडी या प्रभागात गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक सत्य​जित कदम आणि राष्ट्रवादी काँग्रसेचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या तणावाचे सावट आज जाणवत होते. या प्रभागातील पाचही केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली असली तरी एक प्रकारची शांतता होती. माझी शाळा केंद्रावर एका मतदाराला यादीत नाव न सापडल्याने वादावादी झाली. स्लिपवर मतदान केंद्र चुकीचे पडल्याने दोन महिला मतदारांनी हुज्जत घातल्याने वाद वाढला.

बावड्यात ७१.०९ टक्के मतदान

कसबा बावड्यात सकाळपासूनच मतदानासाठी झालेल्या गर्दीने सरासरी ७१.०९ इतकी टक्केवारी गाठली. यामध्ये शुगरमिल याप्रभागामध्ये सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के मतदान झाले. बावडा पूर्व प्रभागात ७४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर हनुमान तलाव प्रभागात ७४ टक्के मतदान झाले. लक्ष्मी विलास पॅलेस या प्रभागात ७१ टक्के मतदान झाले. पोलिस लाईन या प्रभागात बावडा परिसरातील निच्चांकी ५८ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवार पेठेत किरकोळ वादावादी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठ आणि आसपासच्या परिसरातील प्रभागात कमालीची चुरस होती. मतदानाचा धडाका, मतदान केंद्र परिसरात एकाच ठिकाणी उमेदवार बराच वेळ थांबण्यास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने झालेली वादावादी, उमेदवारांच्या विजयासाठी पै पाहुण्यांचे राजकारण असे चित्र पाहावयास मिळाले.

कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागात कमालीची चुरस दिसली. अहिल्याबाई होळकर विद्यालय मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी उसळली होती. सकाळपासूनच रांगा लागल्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वच उमेदवारांची यंत्रणा कार्यरत होती. उमेदवारांसह समर्थकांनी केंद्रासमोरील रस्त्यावर गर्दी केली. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी याबाबत उमेदवारांना सूचना केल्यावर उमेदवार आणि अधिकाऱ्यांची वादावादी झाली.

सिद्धाळा : सिद्धाळा गार्डन प्रभागात महाराणी ताराराणी विद्यालयातील मतदान केंद्र परिसर गजबजला होता. गल्लीबोळात विखुरलेल्या प्रभागामुळे मतदानाला येतानाही एकत्रितपणे मतदार बाहेर पडत होते. सौभाग्यवतींच्या विजयासाठी पतीराज पायाला ​भिंगरी बांधल्यासारखे धावपळ करत होते. मतदारांची ने आण, वाहनांची व्यवस्था सर्व घटकांवर लक्ष ठेवत मतदानाची आकडेमोड सुरू होती.

संभाजीनगर : संभाजीनगर प्रभागातील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या. वारे वसाहत, संभाजीनगर, गजानन महाराज नगर, एनसीसी ऑफीस परिसरातील भागातील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. केंद्रावर पाच बूथ होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ३२००च्या आसपास मतदान झाले होते. नगरसेविका माधुरी नकाते या भाजप आघाडीच्या उमेदवारासाठी तर महेश बराले राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सक्रिय राहिले.

कळंबा फिल्टर हाऊस : चार हजार लोकसंख्येच्या कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी आणि मध्यमवर्गीयांच्या वस्तीच्या प्रभागात मतदानाची लगबग दिसली. आयटीआयच्या होस्टेल इमारतीतील तिन्ही मतदान केंद्रावर रांगा लागल्या. दुपारी एक वाजेपर्यंत पन्नास टक्केच्या आसपास मतदान झाले.

मध्यवर्ती कारागृह आणि रायगड कॉलनीत चुरस : शासकीय मध्यवर्ती कारागृह आणि रायगड कॉलनी प्रभागात कमालीची चुरस दिसली. चौरंगी लढतीत नगरसेवक मधुकर रामाणे, सतीश लोळगे यांच्या कुटुंबांतील महिला रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजप आघाडीकडून सुवर्णाराधा साळोखे, शिवसेनेकडून छाया म्हस्के आव्हान आहे. रायगड कॉलनीत काँग्रेसच्या वैभवी जरग यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत आहे.

मंगेशकरनगरात धडाका : मंगळवार पेठेतील काही भाग आणि मंडलिक वसाहत, महालक्ष्मीनगर प्रभागातील एकगठ्ठा मतदान, पाचही उमेदवारांनी मतदान खेचण्यासाठी लावलेली यंत्रणेमुळे मंगेशकरनगर प्रभागात मतदानाचा धडाका दिसला. शाहू दयानंद हायस्कूल आणि जय शिवराय विद्यालयातील पाच केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. स्थायी समितीचे माजी सभापती विजय सूर्यवंशी यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची आहे. त्यांच्यासमोर नवखे उमेदवार आहेत.

रामानंदनगरात बूथ क्रमांकावरून आक्षेप

रामानंदनगर- जरगनगर प्रभागातील जरगनगर विद्यालयात मतदान केंद्र होते. रामानंदनगर, जाधव पार्कमधील मतदारांना लांबून शाळा गाठावी लागली. बूथ क्रमांक एकमधील १२०० मतदारांची नावे बूथ क्रमांक दोनमध्ये होती. त्याला उमेदवारांनी आक्षेप घेतला. तेथे मतदारांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेच्या चाव्या कुणाकडे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सत्तेच्या चाव्या पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच हातात जाणार की भाजप व ताराराणी आघाडीकडे, याचा फैसला सोमवारी होणार आहे. थेट सत्तेपर्यंत पोहोचण्यात दोन्ही काँग्रेसना काही जागा कमी पडण्याची शक्यता आहे. भाजप-ताराराणी आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी त्यांना सत्तेत जाण्यापासून तीन पक्षांची गट्टी अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेना-भाजप आघाडीला मदत करायची की दोन्ही काँग्रेसला, याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. पुढील सभागृह ‌त्रिशंकू होण्याची शक्यता आहे.

रविवारी कोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदानात मोठा उत्साह होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार याचे संकेत सकाळीच मिळाले. गर्दी नाही असे केंद्र कोल्हापुरात फारसे दिसलेच नाहीत. या निवडणुकीत पाच प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांचा समावेश आहे. यशाचे धनी होण्यासाठी त्यांनी सायंकाळी साडेपाचपर्यंत पायाला भिंगरी बांधली होती. यामुळे निवडणुकीत प्रथमच मोठी चुरस निर्माण झाली होती. पैशाचा प्रचंड वापर झाल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे. निवडणुकीत पहिल्यापासूनच दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची छुपी युती झाली होती. अखेरच्या टप्यात तर त्याला उघड स्वरूप आले. तिघांनी मिळून भाजप-ताराराणी आघाडीला लक्ष्य केले. निकालातही याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

निकालाची उत्कंठा शिगेला

आरोप, प्रत्यारोप आणि राजकीय ईर्षेमुळे तीव्र स्पर्धा निर्माण झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालाविषयी शहरावासियांत कमालीची उत्कंठा लागली आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे सोमवारी (ता.२) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे.

यादीतील घोळामुळे मतदारांची धावाधाव

मतदार यादीतील घोळ पूर्णता दुरूस्त न झाल्याने मतदानादिवशी मतदारांची धावाधाव झाली. दुसऱ्या प्रभागात नावाचा समाविष्ठ, नावातील चुका यामुळे मतदान केंद्रात अधिकाऱ्यांशी वादावादीचे प्रसंगही घडले. एकाच कुटुंबांतील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ठ झाली होती. प्रशासनाकडून यादीतील घोळ दुरूस्त केल्याचा दावा केला असला तरी तो फोल असल्याच्या तक्रारी ना​गरिकांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे

0
0

काँग्रेसने जिंकल्या २७ जागा; भाजप - ताराराणी आघाडीला ३२ जागांवर यश


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत अटीतटीच्या आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेस पक्षाच्या हाती राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या निवडणुकीत काँग्रेस २७ जागा जिंकत महापालिकेतील मोठा पक्ष बनला आहे. तर भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने ३२ जागा जिंकत मुसंडी मारली. राष्ट्रवादीला मात्र यंदाच्या निवडणुकीत फटका बसला. त्यांना केवळ १५ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत केवळ चार जागा जिंकलेल्या शिवसेनेला नामुष्की पत्करावी लागली. निकाल जाहीर होताच सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या.

यंदाच्या सभागृहात ६१ चेहरे नवीन आहेत. ते पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार आहेत. सध्याच्या सभागृहातील ११ नगरसेवक पुन्हा सभागृहात असतील. बारा विद्यमानांसह २५ माजी नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. तीन अपक्षांनीही ताकद दाखवली.

माजी महापौर नंदकुमार वळंजू, उदय साळोखे, जयश्री सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर शारंगधर देशमुख, संभाजी जाधव, महेश सावंत यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. चुरशीच्या लढाईत फिरंगाई प्रभागात नगरसेवक रवीकिरण इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी त्यांच्या जाऊबाई व अजय इंगवले यांच्या पत्नी प्रज्ञा यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे संख्याबळ ११ ने घटले आहे.

एकूण जागा ८१

काँग्रेस २७
भाजप ताराराणी आघाडी ३२
(भाजप १३, ताराराणी आघाडी १९)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १५
शिवसेना ४
अपक्ष ३

गेल्या वेळचे बलाबल
एकूण जागा ७७
काँग्रेस ३३
राष्ट्रवादी २६
जनसुराज्य-अपक्ष ९
शिवसेना-भाजप आघाडी ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरांना मतदारांनी नाकारले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाने तिकिट नाकारल्यामुळे शिवेसनेच्या तीन तर काँग्रेसच्या एका उमेदवाराने बंडखोरी केली होती. प्रत्यक्षात एकाही बंडखोराला विजयापर्यंत पोहचता आले नाही. यामध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर, राजेंद्र पाटील, रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष राजू जाधव यांच्यासह काँग्रेसच्या राजू पसारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मात्र फटका बसला.

सिद्धाळा गार्डनमधून पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या राजेंद्र पाटील यांनी शिवबंधन तोडून बंडखोरी केली. त्यांच्या पत्नी वैशाली सिद्धाळा गार्डन प्रभागातून उभ्या होत्या. मात्र त्यांना मतदारांनी फारशी साथ दिली नाही.

व्हीनस कॉर्नर प्रभागातील उपशहप्रमुख शशिकांत बिडकर यांनी बंड केले होते. मात्र त्यांनाही मतदारांनी नाकारले. याठिकाणी सेनेचे अधिकृत उमेदवार राहुल चव्हाण यांनी बंडखोर बिडकर यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांना पराभवाचा दणका दिला. तटाकडील प्रभागातून रिक्षासेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यांना प्रभागातील विशेषतः महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. तरीही त्यांना फार मोठी मजल मारता आली नाही. मात्र शिवसेनेचे उमेदवार उदय साळोखे यांना जबर किमंत मोजावी लागली. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजू पसारे यांना उमेदवारीच नाकारण्यात आली होती. त्यांनी बंडखोरी केली, मात्र त्यांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीला कुठे धक्का, कुठे सेफ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक पद्धतीने प्रतिनिधित्व केलेल्या घराणेशाहीला कोठे धक्का, तर काहीजणांनी आपला गड शाबूत राखला आहे. काँग्रेसच्या जयश्री चव्हाण, राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर व भाजप-ताराराणीच्या सत्यजित कदम यांच्या भावजय सीमा कदम यांना निवडून आणून गड शाबूत राखण्यात यश आले आहे, तर राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार, बाळासाहेब मेढे-पवार, प्रकाश पाटील तर भाजप-ताराराणीच्या प्रकाश मोहिते, प्रकाश नाईकनवरे तर काँग्रेसचे हरिदास सोनवणे यांच्या घराणेशाहीला धक्का बसला आहे.

ट्रेझरी ऑफिस प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार व माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार यांना पराभव पत्करावा लागला, तर बहुचर्चित बिंदू चौक प्रभागातून माजी महापौर ज्योत्स्ना मेढे-पवार यांचे पती बाळासाहेब यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला आहे. घराणेशाहीला सर्वांत मोठा धक्का सोनवणे व मोहिते कुटुंबीयांना बसला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी महापालिकेच्या जवळपास २० ते २५ वर्षे सलग नेतृत्व केले आहे. यामध्ये पती-पत्नी, सासरा यांचा समावेश होता. मात्र, मतदारांनी मोहिते व सोनवणे या दोन्ही कुटुंबीयांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले आहे. माजी महापौर जयश्री सोनवणे व माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांचा पराभव झाला आहे. प्रकाश मोहिते व यशोदा या पती-पत्नीचा पराभव करून टिंबर मार्केट परिसरात असणारी त्यांच्या सुभेदारीला सुरुंग लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे सारे बाण गेले हवेत

0
0

Satish.Ghatage@timesgroup.com

कोल्हापूर : संपूर्ण निवडणुकीत भाजपवर तोंडसुख घेऊन ४१ प्लसचा दावा करत महापालिकेवर भगवा फडकाविण्याच्या घोषणा करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी यंदाही झिडकारले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बालेकिल्ल्यात तर सेनेचा अक्षरशः सुफडासाफ झाला. काँग्रेस- राष्ट्रवादीशी केलेली छुपी युती, निष्ठावंत शिवसैनिकांवर झालेला अन्याय, मुंबईहून कमी मिळालेली आर्थिक रसद यामुळे शिवसेनेचा पराभव झाल्याची कारणे समोर आली आहेत.

वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेनचे तब्बल सहा आमदार निवडून आले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आमदार क्षीरसागर यांना २७ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. रस्ते विकास प्रकल्पातील टोलविरोधी आंदोलनात सेना नेहमीच अग्रभागी होती. त्यामुळे सेनेला निवडणुकीपूर्वी पोषक वातावरण होते. यापूर्वीच्या निवडणुकीत सेनेचा नैसर्गिक मित्र भाजपने ताराराणी आघाडीशी निवडणुकीपूर्वीच युती केली. त्यामुळे शिवसेना एकाकी पडली. राज्याच्या सत्तेत भाजपकडून शिवसेनेला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे निवडणुकीत शिवसेना उट्टे काढण्यासाठी आसुसली असल्याची स्थिती होती.

निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील गटबाजी संपुष्टात आणली तरी निवडणुकीवर आणि उमेदवारी यादीवर क्षीरसागर यांचाच प्रभाव राहिला. जिल्हाप्रमुख संजय पवार नागाळा पार्क तर विजय देवणे कैलासगड स्वारी मंदिर प्रभागात अडकून पडले. मुलाखतीसाठी सर्वाधिक इच्छुक सेनेकडे असले तरी त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार दिले गेले नाहीत.

काही प्रभागात प्रबळ उमेदवार मिळवण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना डावलून उसने उमेदवार देण्यात आले. त्यापैकी राहुल चव्हाण हा एकमेव उसना उमेदवार सेनेच्या हक्काच्या उत्तर मतदारसंघात निवडून आला.

कोल्हापूर दक्षिण प्रभागात सेना कुमकुवत असूनही प्रज्ञा उत्तूरे (तवण्णाप्पा पाटणे प्रभाग), अभिजित चव्हाण (क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), नियाज खान (शास्त्रीनगर-जवाहरनगर) हे उमेदवार विजयी झाले. शास्त्रीनगर प्रभागात अल्पसंख्याक समाजातील नियाज खान यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे समर्थक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचा पराभव केला.

आमदार क्षीरसागर यांचा एकखांबी तंबू ८१ प्रभागांत पोहोचण्यास कमी पडला. क्षीरसागर यांचे निवासस्थान असलेल्या खोलखंडोबा प्रभागात सेनेच्या उमेदवाराच्या पराभवाची पुनरावृत्ती झाली. सिद्धार्थनगर, शिपुगडे तालीम, बाजारगेट या क्षीरसागर यांच्या प्रभावाखालील प्रभागातही उमेदवारांचे दणकून पराभव झाला.

जिल्हाप्रमुख पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव यांच्याकडे जबाबदारी असलेल्या प्रभागातही सेनेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. फक्त शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी तवण्णाप्पा पाटणे प्रभागात सेनेचा उमेदवार निवडून आणला हाच त्यांच्यादृष्टीने एकमेव आशेचा किरण ठरला आहे.

टीकेचा फायदा दोन्ही काँग्रेसना

शिवसेनेने प्रचारात विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याऐवजी भाजप-ताराराणी आघाडीला लक्ष्य केले. त्यांच्यावतीने राज्यातील मंत्री, नेते प्रचारात उतरले होते. त्यांनी ताराराणी आघाडी, भाजपवर कडवी टीका केली. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभाही झाली. मात्र सेनेच्या भाजप-ताराराणी आघाडीवरील टिकेचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. दोन्ही काँग्रेस, भाजप-ताराराणी आघाडीकडे निवडणूक लढवण्यासाठी जी सेकंड टीम होती, ती सेनेकडे कमी पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्षांनी चारली दिग्गजांना धूळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीत १४१ अपक्ष असले तरी तीन अपक्षांनी बाजी मारली आहे. तीन अपक्षांनी राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांवर दणदणीत विजय मिळविला. पक्षीय उमेदवारांवर मात करीत अपक्षांनी मि‍ळविलेला विजय धक्कादायक ठरला.

निलोफर आजरेकर

कॉमर्स कॉलेज या प्रभाग क्रमांक २६मधून मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांची सून निलोफर आश्किन आजरेकर यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्या अपक्ष लढल्या. त्यांना १५९४ मते मिळाली. त्यांच्यासमोर ताराराणी आघाडी पक्षाचे गुलजारबी बागवान, शिवसेनेच्या पूजा भोर, काँग्रेसच्या गायत्री माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यरेखा पाटील यांचे आव्हान होते.

राहुल माने

बलराम कॉलनी या प्रभाग क्रमांक ५२ मध्ये चुरशीने पाच उमदेवारांच्या लढत झाली. या प्रभागात राहुल माने या तरुण उमेदवाराने २२६४ मते मिळवून प्रस्थापितांना धक्का दिला. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या नंदकुमार सूर्यंवशी यांना ८०० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार लोहार यांना ६० मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश खाडे यांना गेल्या निवडणुकीत १७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत त्यांनी जय्यत तयारी केली. १३५९ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेच्या संजय चव्हाण यांना केवळ ४६ मतांवर समाधान मानावे लागले.

राजू दिंडोर्ले

आपटेनगर-तुळजाभवानी या प्रभाग क्रमांक ७५ मध्ये दिग्गजांना अनपेक्षित धक्का दिला ते राजू दिंडोर्ले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी ८४४ मते मिळवून बाजी मारली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय सावंत यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका संगीता सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव सावंत आणि शिवसेनेचे संजय राणे यांचे आव्हान होते. त्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे रवींद्र राऊत, अपक्ष अशोक सावंत, धीरज शिंदे, राहुल काळे यांचेही आव्हान होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images