Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लक्झरियस नवदुर्गा दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एअर कंडीशन बसेस, सकाळी चहा व नाष्टा, दुपारी अल्पोपहार व रात्रीचे जेवन अशा भरगच्च पॅकेजसह महिला मतदारांना नवदुर्गा दर्शनाची पर्वणी उमेदवारांनी उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांकडून जेवणावळी, मंडळे व तालमींना वर्गणी दिल्या जात आहेत. महिलांसाठी वेगळ्या भोजणावळीच्या पंगती उठू लागल्या आहेत.
नवरात्र उत्सवातील महिला मतदारांना कॅच करण्यासाठी धनाढ्य इच्छुक उमेदवारांनी नवदुर्गा दर्शनाची संधी यावेळीही साधली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत नवदुर्गा दर्शनासाठी इच्छुक उमेदवार केएमटी व वडापच्या वाहनांचा वापर करत होते. काही उमेदवार मिनी प्रवासी बसेस वापरत होते. यावेळी मात्र उमेदवारांनी मतदारांना ऑक्टोबर हिटचा त्रास होऊ नये, म्हणून एअरकंडिशन लक्झरी बसेस बुक केल्या आहेत.

उमेदवारांच्या कुटुंबातील महिला सदस्य घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. प्रचारात नवदुर्गा दर्शनासाठी नोंदणी करून घेतली जात आहे. प्रत्येक गल्लीसाठी दोन ते तीन बसेस बुक केल्या जातात. सकाळी आठच्या ठोक्याला बसेस चौकात उभ्या असतात. नवदुर्गा दर्शनाबरोबर सकाळी चहा व नाष्टा दिला जात आहे. दुपारच्यावेळी अल्पोपहार दिला जातो. ज्या महिलांचे नवरात्रांचे उपवास आहेत त्यांना केळी, खजूर,फळे व दूध दिले जाते. सायंकाळच्या सत्रात चहा दिला जात आहे. काही उमेदवारांनी नवदुर्गांचे दर्शन घेऊन दमलेल्या महिलांना घरी जाऊन जेवणाचा त्रास होऊ नये यासाठी रात्रीच्या भोजणाची व्यवस्था केली आहे.

केएमटीला फटका

लक्झरी बसेसमुळे केएमटीकडे यावेळी नवदुर्गा दर्शनासाठी कमी नोंद झाली आहे. ४० क्षमतेच्या प्रवाशी बसेससाठी ३९०० रूपये आकारले जातात. चार तास नवदुर्गासाठी बस उपलब्ध करून दिली जाते. केएमटीकडे सध्या ५० बसेस बुक झाल्या असून गतवेळच्या तलनेत हा आकडा कमी असल्याचे केएमटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या उलट खासगी लक्झरी बसेस भाड्याने देणाऱ्या कंपन्याकडे एअर कंडिशन बसेसची मागणी वाढली आहे. पाच ते सात तासासाठी सात हजार रूपये भाडे आकारले जात आहे. सोमवारी एका कंपनीकडे २२ बसेस तर मंगळवारी १४ बसेस बुक झाल्या होत्या. इच्छुक उमेदवारांकडून एअर कंडिशन बसेसची मागणी वाढल्याचे एका कंपनीच्या मालकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवा प्रभाग, नवे चेहरे

$
0
0

प्रभाग क्रमांक ६२: बुद्ध गार्डन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार विद्यमान नगरसेवकांचा काही भाग मिळून नव्या प्रभागरचनेत बुद्ध गार्डन नवा प्रभाग समाविष्ट करण्यात आला आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून सर्व पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्षानीही आपलं नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यमान नगरसेवक या प्रभागात इच्छुक नसल्यामुळे नव्या प्रभागात नवे चेहरे आणि माजी नगरसेवकांची लढत दिसून येत आहे.

बुद्ध गार्डन प्रभागात जमादार कॉलनी, सम्राटनगरचा काही भागा, शास्त्री नगर, ढोर वसाहत, सासने कॉलनी, सरनाईक कॉलनी, जमादार कॉलनी, यादव कॉलनी या परिसरात हा प्रभाग विस्तारलेला आहे. विद्यमान नगरसेवक राजू घोरपडे, हरीदास सोनवणे, रफीक मुल्ला आणि राजू हुंबे यांचा काही भाग एकत्रित हा नवा प्रभाग क्रमांक ६२, बुद्ध गार्डन असून या प्रभागत विद्यमान नगरसेवक इच्छुक नसल्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहे. या प्रभागात राष्ट्रवादीकडून वहिदा फिरोज सौदागर,भाजपा-ताराराणीच्या तिकीटावर उषा मोहन जाधव, शिवसेनेच्या वतीने विद्या निरंकारी, काँग्रेसच्या चिन्हावर जयश्री माणिक-मंड‌लिक, मुकुंद कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे शबाना पठाण या नव्या चेहऱ्यांना पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहे. तर पक्षाचे तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत माजी नगरसेविका शोभा पाटील, सानिया मुजीब महात, रूपाली कदम यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत मंगळवारी अखेर अर्ज भरला आहे.

जनसंपर्क आणि सामाजिक कार्याच्या जोरावर सानिया महात यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती, मात्र तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवित आज ‌उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निरंकारींची बंडखोरी

माजी नगरसेविका उषा जाधव यांनी कॉमर्स कॉलेज परिसरात १९९५ साली निवडणुक लढवून विजयी झाल्या होत्या. तर उमेश निरंकारी हे गेल्या वीस वर्षांपासून भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी शहर ‌चिटणीस म्हणून अनेक जबाबदारी पार पाडली. मात्र पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी विद्या निरंकारी यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या रूपाली कदम यांना शेतकरी कामगार पक्ष, माकप, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी व इतर संघांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तर उमेदवारांमध्ये माजी नगरसेविका शोभा पाटील व उषा जाधव यांनाच या निवडणूकीचा अनुभव असून इतर इच्छुक महिला उमेदवारांना प्रथम संधी मिळत असल्यामुळे प्रत्येकजण आपलं अस्तित्व आणि आपली ताकद पणाला लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डमी उमेदवारांची माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर प्रभागा प्रभागात राजकीय घडामोडी वेगावल्या आहेत. उमेदवारी माघारीची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. १६) असल्याने इच्छुक उमेदवारावर दबावापासून ते विविध प्रकारची आमिषे दाखवली जातात. प्रबळ उमेदवारांनी विजयाचे गणित जुळवताना कमकुवत उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. ८१ प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सगळीकडेच माघारीसाठी पडद्याआडच्या घडामोडी सुरू आहेत.

नेत्यांच्या माध्यमातूनही दबाव आणला जात आहे. गुरूवारी दिवसभरात बहुतांश प्रभागातून डमी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी अंतिम दिवस असल्याने त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. उपमहापौर ज्योत्स्ना मेढे, माजी महापौर कादंबरी कवाळे, नगरसेविका रेखा पाटील, रोहिणी काटे आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

गांधी मैदान विभागीय कार्यालयातून गुरुवारी १० प्रभागातून २० उमेदवारांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक ५६ मधून श्यामली मोहिते, सतीश सावंत, प्रभाग क्रमांक ५७ मधून सचिन आडसुळे, भारत मोहिते, स्नेहल साळोखे, प्रभाग क्रमांक ५८ मधून प्रमोद भाले, प्रवीण सोनवणे, प्रभाग क्रमांक ७० मधून शिल्पा पाटील, प्रभाग क्रमांक ७१ मधून रेखा पाटील, प्रभाग क्रमांक ७२ मधून रिना पाटील, वंदना भोर, प्रभाग क्रमांक ७३ मधून वर्षा दाभाडे, उज्जवला माने, प्रभाग क्रमांक ७४ मधून नेहा खुपीरकर, सारिका लोखंडे, प्रभाग क्रमांक ७९ मधून नीलम खतकर, शरयू पाटील, सुरेखा साळोखे, संगीता गुर्जर, प्रभाग क्रमांक ८० मधून मीरा सरनाईक या उमेदवारांनी माघार घेतली.

राजारामपुरी जगदाळे हॉल कार्यालय क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३४, ३७ आणि ६५ येथून एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. तर प्रभाग क्रमांक ३५ स्वाती हजारे व हसीना मुल्ला तर प्रभाग ३६ मधून जयराज‌सिंह निंबाळकर, कादंबरी कवाळे, संग्राम कवाळे, आकाश कवाळे, हेमलता माळी. प्रभाग ४०मधून सुनिता वास्कर, ज्योती धोंगडे, सचिन पाटील, संजय माने. प्रभाग ४१ मधून रेवती पोवार, वनीता पाटगावकर, दिपीका नलवडे, अक्षता राऊत. प्रभाग ४२ मधून स्नेहा गुरमुर, स्वाती कोगेकर, धनश्री शेटके. प्रभाग ६२ मधून अश्विनी दाभोळे, शर्वरी पाटील, निलोफर देसाई. प्रभाग ६३ मधून सुनंदा जाधव, प्रभाग ६४ मधून झाकीर हुसेन बारगीर, रोहिणी काटे. प्रभाग मधून ६६ विजयमाला निकम, सुप्रिया साबळे यांचा अर्ज माघार घेणाऱ्यांत समावेश आहे. कसबा बावडा पॅव्हेलियन कार्यालाच्या अखत्यारितील ११ प्रभागातून १५ उमेदवारांनी माघार घेतली. कसबा बावडा लाइन बझार प्रभागातून दहा पैकी पाच जणांनी निवडणूक रिगणातून बाजूला झाले. नागाळा पार्क कार्यायलातील ११ प्रभागातील १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये उपमहापौर ज्योत्स्ना मेढे यांनी बिंदू चौक व ट्रेझरी ऑफीस येथून माघार घेतली. ...................... आपटेनगर, राजारामपुरी प्रभागात जास्त उमेदवार

आपटेनगर-तुळजाभवानी आणि राजारामपुरी प्रभागात सर्वाधिक सोळा उमेदवार आहेत. दौलतनगर प्रभागातील चौदा उमेदवारांपैकी चार जणांनी गुरूवारी माघार घेतली. शुक्रवारी नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. तर सुभाषनगर, नेहरूनगर प्रभागात प्रत्येकी चार तर कसबा बावडा हनुमान तलाव प्रभागात उमेदवारांची संख्या पाच इतकी आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांची संख्या १६ पेक्षा कमी असल्याने कोणत्याही मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे वापरण्याची गरज भासणार नाही असे सध्याचे चित्र आहे.

३७८ केंद्रावर मतदान ​प्रक्रिया

८१ प्रभागासाठी ३७८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान केंद्र निश्चितीसाठी निवडणूक निर्णय अ​धिकाऱ्यांची गुरूवारी बैठक झाली. १७ ऑक्टोबरला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एका केंद्रावर ११०० ते १३०० मतदारांचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणामुळे फळ मार्केट तेजीत

$
0
0

प्रतिकिलो दरात २० ते ३० रुपयांची वाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवातील उपवास व प्रसादासाठी मागणी वाढल्याने फळांच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. सफरचंद, मोसंबी, चिकू, डाळिंब या प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या फळांमध्ये प्रतिकिलो २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, केळींचा दरही प्रतिडझन वीस रुपयांनी वाढला आहे. दसरा सण संपेपर्यंत हीच परिस्थिती राहील, अशी शक्यता आहे.

नवरात्राच्या सुरुवातीस घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास करतात. त्यानंतर ललितापंचमी व अष्टमीदिवशीही अनेकांचा उपवास असतो. उपवासाच्या दिवशी प्रामुख्याने फलाहार करण्यात येत असल्याने फळांना मागणी वाढत आहे. त्यामुळे दसऱ्यापर्यंत फळांचे दर चढेच राहतील, असा अंदाज आहे. ज्यांच्या घरी देवीचे घट बसतात, त्यांनी प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी केल्याने किमती वाढल्या आहेत. देशी सफरचंदाचे दर प्रतिकिलोसाठी १२५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. परदेशातून येणारी सफरचंद प्रतिकिलो १८० रुपये इतक्या दराने उपलब्ध आहेत. मोसंबी व चिकूचे दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागील आठवड्यात पपईचे दर घटल्याने प्रतिनग १५ रुपयांना पपई मिळत होते. या आठवड्यात मात्र तोच दर प्रतिकिलो ४० व प्रतिनग २५ रुपये इतका आहे. केळीचे दर प्रतिडझन ३० रुपयांवरून ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच संत्र्यांचे बाजारात आगमन झाले असून संत्र्यासाठी प्रतिकिलोचा दर १५० रुपयांवर स्थिर आहेत. आयात संत्री प्रतिकिलो १८० रुपयांना उपलब्ध आहेत.

निवडणूक प्रचाराचा परिणाम?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांनी सणांचे औचित्य साधून आपल्या प्रभागांतील मतदारांसाठी नवदुर्गा दर्शन व इतर धार्मिक स्थळांच्या भेटी आयोजित केल्या जात आहेत. या दर्शनावेळी उमेदवारांकडून मतदारांना फळवाटपही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, प्रभागामध्ये असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून घरोघरी फळांचा प्रसाद पोहोचविण्यात येत आहे. प्रचारांच्या या रणनीतीमुळेही फळांची मागणी वाढली असून त्याचा परिणाम फळांचे दर वाढण्यात झाला आहे.

फळे पूर्वीचे दर (प्रतिकिलो) आताचे दर (प्रतिकिलो) सफरचंद ७०-८० रु. ८०-१२५ रु. मोसंबी ४०-५० रु. ७०-८० रु. चिकू ५० रु. ७० रु. सीताफळ ११० रु. १२० रु. डाळिंब ७०-८० रु. १००-१२० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे कत्तलप्रकरणी सात दिवस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

चिपरी (ता.शिरोळ) येथे गोहत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघाजणांना सात दिवस पोलिस कोठडीचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिले. बुधवारी छापा टाकून या चौघाजणांना जयसिंगपूर पोलिसांमया पथकाने अटक केली होती.

याकूब अल्लाबक्ष कुरेशी (वय ६३), सल्लाउद्दीन कादर कुरेशी (वय ३२), जहिरा इब्राहिम कुरेशी (वय ५०, सर्व रा.फलटण) व रफीक अब्दुलरजाक बेपारी (वय ३८, रा.चिपरी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना गुरूवारी दुपारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिस कोठडीचे आदेश दिले. याप्रकरणातील पलायन केलेल्या अन्य चौघाजणांना लवकरच गजाआड करण्यात येईल असे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेंद्रिय शेतीच शेतकऱ्यांना तारेल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शेतीचे प्रयोगशाळेत रुपांतर करुन शेतकऱ्यांना आता सेंद्र‌िय शेतीची कास धरावीच लागेल कारण रासायनिक खतामुळे देशातील जमीन आणि शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असे भीषण वास्तव आंरराष्ट्रीय ख्यातीचे सेंद्रीय शेती तज्ज्ञ डॉ. एल. नारायण रेड्डी यांनी मांडले.

ते कणेरी मठावर आयोज‌ित केलेल्या राज्यस्तरीय सेंद्र‌िय शेती कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी अदृश्य काडसिध्देश्वर महाराज होते.

डॉ. एल. नारायण रेड्डी म्हणाले,पिकाला आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता सेंद्र‌िय खतात आहे. त्याच्या अतिवापराने जमीन अथवा पिकावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. उलट फायदाच होतो. त्यामुळे शास्वत शेती उत्पादनासाठी आणि असंख्य रोगांना दूर ठेवण्यासाठी सेंद्र‌िय शेती ही काळाची गरजच होवून बसली आहे.

अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी आपल्या भाषणात जल, जमीन, जंगल, जनावर आणि जनता या पाच 'ज' चे संवर्धन आवश्यक असल्याचे उदाहरणासहित नमूद केले. त्यांचे मानवाच्या कल्याणासाठी योगदान स्पष्ट करुन त्यांच्या संवर्धनाची गरजही विषद केली.

यावेळी प्रयोगशील शेतकरी अशोक इंगवले, पशुतज्ज्ञ प्राचार्य डॉ. नितीन मार्केंडेय, डॉ. शिवरत्न रोटे, धनंजय वार्डेकर, अरुण पाटील, एम. एस. पाटील, एम. आर. चौगुले, अशोक चौगुले आदी उपस्थित होते. मेंढपाळाप्रमाणे ५०० गायींचा मुक्त गोठा प्रयोग यावेळी यशस्वी कसा होतो ते प्रात्याक्षिकाद्वारे दाखवण्यात आले. एक एकरमध्ये १०० पिके घेतलेला सेंद्र‌िय प्लॉटची शिवारफेरीही यावेळी झाली. ८०० गायींचा अद्यायावत गोठाही यावेळी दाखवण्यात आला. सोमनाथ शेटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगाची मुश्रीफांना नोटीस

$
0
0

जिल्हाधिकारी आणि आमदार मुश्रीफ वादाला वेगळे वळण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान आचारसंहिता काळात निवेदन स्वीकारण्यावरून आमदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यात तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त सहारियांनी फोनवरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले होते. राज्य निवडणूक आयोगाने मुश्रीफांच्या 'त्या' विधानाची गंभीर देखल घेऊन खुलासा करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी नकार देत आमदार मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आणि शिष्टमंडळाला अडीच तास ताटकळत ठेवले होते. त्यावेळी मुश्रीफ यांनी थेट निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांबाबत सहारियांनी अवमानकारक भाषा वापरल्याचे मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांकडे सांगितले होते.

मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक निवडणूक आयुक्तांशी झालेली बातचित प्रसारमाध्यमांना दिली, असा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे. त्याचबरोबर आयुक्त सहारिया यांनी आमदार मुश्रीफ यांच्याशी मोबाईलवरून बोलताना जिल्हाधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह असे कोणतेही विधान केले नसल्याचेही राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत मुश्रीफ यांनी वर्तमानपत्राद्वारे तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा निवडणूक आयोगाचा अवमान केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी नोटिसीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे पाठवले असून, आमदार हसन मुश्रीफ यांना नोटीस बजावण्याची सूचना केली आली आहे. लवकरच ही नोटीस मुश्रीफ यांना पाठवली जाणार आहे. ....

'राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेले पत्र नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लवकरच ते पत्र आमदार हसन मुश्रीफ यांना पाठवणार आहोत. - डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी ....

'राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही नोटीस मला अजून मिळालेली नाही. निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याशी मी मोबाइलवरून बोललो होतो, पण माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय. नोटीस मिळाल्यानंतर मी उत्तर देईन. - आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ट्यूटर होणार उपलब्ध

$
0
0

तंत्रज्ञान अधिविभागाचा चेन्नईच्या एम-ट्यूटर कंपनीशी सामंजस्य करार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, टॅबलेट्सवरही अभ्यास करता येण्यासाठी चेन्नईच्या एम-ट्यूटर प्रा. लि.या कंपनीबरोबर सोमवारी सामंजस्य करार केला. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि एम-ट्यूटर यांच्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, एम-ट्यूटर ही संकल्पना विद्यार्थ्यांसह शिक्षकांना उपयुक्त आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा वर्षअखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. भविष्यात टप्प्याटप्प्याने अभियांत्रिकीच्या सर्वच वर्षांच्या व विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नंतर इतर विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांसाठीही एम-ट्यूटर सेवेचा विस्तार करावा. पहिले एक वर्ष ही सुविधा विद्यार्थ्यांना मोफत द्यावी. कंपनीचे व्हाइस-प्रेसिडेंट (अलायन्स) भारत सुंदरम् म्हणाले,ट्युटोरिअल्सवर आधारित असेसमेंट प्रश्नही विचारण्यात येतील. या एम-ट्यूटरमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल.

या वेळी एम-ट्यूटर कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट शेनबाग राज आर., विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जी.एस. कुलकर्णी, विद्यापीठाच्या इंडस्ट्री-इंटरॅक्शन सेलचे समन्वयक डॉ. एस.एस. कोळेकर आदी उपस्थित होते. तंत्रज्ञान विभागाच्या इंडस्ट्री इंटरॅक्शन कक्षाचे हर्षवर्धन पंडित यांनी स्वागत केले. तंत्रज्ञान अधिविभागाचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. साहू यांनी आभार मानले. ...............

विद्यार्थ्यांना होणार फायदा

या करारानुसार बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एम-ट्यूटर कंपनी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित अॅप तयार करण्यात येणार आहे. विद्यापीठाची वेबसाईट, कंपनीची वेबसाइट यांच्यासह डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्ट फोन्स व टॅब यांवरही अॅपडाऊनलोड करून अभ्यास करता येणार आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांवर १५-१५ मिनिटांचे ट्युटोरिअल्स तयार करण्यात येतील. त्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल व अॅनिमेशनचा प्रभावी वापर करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंगाली मूर्तिकारांची मुलुखगिरी...

$
0
0

Sagar.Yadav@timesgroup.com

'स्त्रीशक्ती'चा आदर करणाऱ्या नवरात्रोत्सवात आदिशक्ती देवीच्या मूर्तीला विशेष महत्त्व असते. देशात प्रांतनिहाय मूर्तींची विविधता बदलत जाते. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घडविण्यात येणाऱ्या दुर्गादेवीच्या मूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत. यामुळे या मूर्तिकलेचा ट्रेंड आता सर्वत्र पसरत असून पश्चिम बंगालमधील मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्ती तयार करून घेतल्या जात आहेत. यासाठी तेथील कालाकारांची सर्वत्र मुलूखगिरी सुरू आहे.

देशभर साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीच्या सणाचे स्वरूप प्रांतानिहाय बदलत जाते. सणात पूजल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तीची रचनाही विविध राज्यांत निरनिराळी असते. स्थानिक संस्कृती, परंपरा, धर्म, इतिहास याचा परिणाम तिथल्या मूर्तिकलेवर पाहायला मिळतो. बंगालमध्ये नवरात्रोत्सव 'दुर्गा देवीचा उत्सव' म्हणून साजरा केला जातो. या उत्सवासाठी देवीच्या मोठमोठ्या मूर्ती तयार केल्या जातात.

दशभूजा असणारी भव्य मूर्ती ही बंगालची खासियत आहे. दुर्गा, काली, महाकाली अशा विविध रूपांत या मूर्ती साकारल्या जातात. बंगाली पद्धतीचे दागिने, मोठमोठे टोप, आभूषणे यांनी परिपूर्ण अशी हे देखणी मूर्ती असते. नेत्रदीपक रंगसंगती, प्रमाणबद्ध रचना अशी या मूर्तिकलेची वैशिष्ट्ये आहेत. शस्त्रास्त्रे धारण केलेली सिंहावर आरूढ झालेली आणि राक्षसाचा वध करणाऱ्या पारंपरिक मूर्तीला बंगाली पद्धतीच्या मूर्तिकलेमुळे वेगळेच रूप प्राप्त होते. यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यात कोलकाता येथील मूर्तिकारांना खास बोलावून देवीच्या मूर्ती तयार करून घेतल्या जातात.

पर्यावरणपूरक मूर्ती

विशेष म्हणजे देवीची ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक असते. प्लास्टर व तत्सम गोष्टींचा वापर टाळून ‌माती, गवत व तत्सम गोष्टींचा वापर यासाठी केला जातो. १० ते ५० फुटांपर्यंतच्या मूर्ती कोलकाता येथील कालाकार तयार करतात. एक मूर्ती तयार करण्यासाठी चार दिवस ते आठवडाभराचा कालावधी लागतो. कोलकाता येथील नदिया जिल्ह्यातील मूर्तिकार राजकुमार पाल गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांतील कोल्हापूर, मिरज, सांगली, बेळगाव आदी ठिकाणी मूर्ती बनविण्याचे काम करतात. यामुळे नवरात्रीपूर्वी सुमारे महिना, दोन महिने दौऱ्यावर असतात. दुर्गा देवीसोबतच गणेश, कार्तिक, लक्ष्मी, सरस्वती अशा मूर्तीही ते घडवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबूजमाल तालमीत नाल्या हैदर कलंदर पंजाची प्रतिष्ठापना गुरुवारी रात्री करण्यात आली. नाल्या हैदरच्या प्रतिष्ठापनेनंतर मोहरम सणास प्रारंभ झाला असून शहरातील प्रमुख तालमी, मंडळे व दर्ग्यात मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना पाचव्या व सातव्या दिवशी होणार आहे.

तब्बल ३१ वर्षानंतर नवरात्रोत्सव आणि मोहरम सण एकत्र आले आहेत. बुधवारी रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर कुदळ पाडण्यात आली. गुरुवारी दिवसभर बाबूजमाल दर्ग्यात पंजा बांधण्यासाठी कार्यकर्ते कार्यरत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारपासून नाल्या हैदर पंजा भाविकांसाठी दर्शनासाठी खुला होणार आहे. बाबूजमाल दर्ग्याच्या मुख्य कमानीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाल्या हैदर पंजाची प्रतिष्ठापना झाल्यावर घुडणपीर, अवचितपीर, नंगीवली, बाराईमाम, वाळव्याची स्वारी, आप्पा शेवाळे, सरदार तालमीतील चाँद साहेब, खंडोबा तालमीतील हसन हुसेन, राजेबागस्वार पंजाची प्रतिष्ठापना होणार आहे. २३ ऑक्टोबरला खत्तलरात्र हा मोहरम सणातील प्रमुख दिवस आहे.

सुबहानी दर्ग्यात विविध कार्यक्रम

टी.ए. बटालियन येथील पिरानेपीर मेहबूब सुबदानी दर्ग्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पंजाची स्थापना करण्यात आली. २१ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता टी.ए. बटालियनची मानवंदना स्वीकारून पंजा भेटीस बाहेर पडणार आहे.

गुरुवारी इस्लामी महिना मोहरमची सुरुवात झाली आहे, असे पत्रक उलेमा हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. मुस्लिम बोर्डिंग येथे बैठक झाली. बैठकीला अब्दुल वाहिद सिद्दीकी, गणी आजरेकर, उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदर्शन सीसीटीव्हीवर

$
0
0

चवऱ्या, मोर्चेलचा पालखीसोहळ्यात वापर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची धैर्यलक्ष्मी रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. मयूर मुनिश्वर, रवी माईनकर, श्रीनिवास जोशी, प्रसाद लाटकर यांनी ही पूजा बांधली. सकाळी देवीला शासकीय अभिषेक करण्यात आला, तर रात्री भाविकांच्या गर्दीत देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला.

गुरुवारी सकाळपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. मुख्य दर्शनरांगेत चार स्क्रिन लावण्यात आल्यामुळे गाभाऱ्यातील देवीच्या थेट दर्शनाची सोय होत आहे. तसेच देवस्थानतर्फे भाविकांना रोज शिरा वाटप करण्यात येत आहे. महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून, सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांची कसून पाहणी करून मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे.

दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मेण्याच्या आकारातील पालखी फुलांनी सजविण्यात आली होती. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे देवस्थानला सोन्याच्या चवऱ्या आणि मोर्चेल देण्यात आले. गुरुवारी पालखी सोहळ्यात या चवऱ्या आणि मोर्चेलचा समावेश करण्यात आला.

शासकीय अभिषेकालाही आचारसंहितेचा फटका

नवरात्रकाळात रोज सकाळी देवीला शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येतो. यावर्षी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे सकाळी होणाऱ्या शासकीय पूजेसाठी देवस्थान ​समितीला कुणीही शासकीय अधिकारी संमती देत नसल्याचे चित्र आहे. व्हीआयपी अधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक होत नसल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनरांगेत जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत नसल्यामुळे भाविक समाधानी आहेत.

नवरात्रानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

सकाळी ७ ते ८: भावे काका यांचे श्रीसुक्त पठण, ८ ते ९: मयुरा जाधव यांचे मंत्रपठण, ९ ते ११: साइक्स एक्स्टेंशन येथील भवानी महिला भजनी मंडळ, ११ ते १: नेहरूनगर येथील दत्तमाउली महिला भजनी मंडळ, दुपारी १ ते ३: इचलकरंजी येथील पार्वती महिला भजनी मंडळ, ३ ते ५: जरगनगर येथील निरुपमा महिला भजनी मंडळ, सायंकाळी ५ ते ७: गोल्डन मेमरीज्, चैताली अभ्यंकर, पुणे, सायंकाळी ७ ते ८: मंजुषा कुलकर्णी, मुंबई ८ ते ९: दीपा उपाध्ये, कोल्हापूर यांचे भरतनाट्यम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माघारीसाठी रात्र जागली, दबावाचाही वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत काही तासावर येऊन ठेपली असताना घडामोडी वेगावल्या आहेत. उमेदवारांच्या माघारीसाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारची रात्र जागवली. दबावतंत्रापासून ते स्वीकृत नगरसेवकांपर्यंतची आमिषेही काहींना दाखवण्यात आली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घातल्याने घडामोडी वेगावल्या आहेत. बंडखोर आणि इच्छुक उमेदवारांच्या माघारीसाठी साम, दाम आणि दंड नीतीचा अवलंब काही प्रभागात सुरू आहे. शुक्रवारी या घटनांना आणखी वेग येणार आहे. नेत्यांचा माघारीचा आदेश झुगारत इच्छुक मोबाइल स्वीच ऑफ ठेवत पसार झाले आहेत. गुरुवारी १३० उमेदवारांनी माघार घेतली. अजून ६५८ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी लढतीचे चित्र स्पष्ट होईल.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खरा अडाणी कोण? याचा शोध घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्याला अक्षरज्ञान आहे तो ज्ञानी, असा समाज प्रचलित आहे. मात्र निरक्षर अज्ञानी, अडाणी असतो असा गैरसमज आहे. वास्तविक अडाणी हा शब्द शेती संस्कृतीमधील असून, ज्याला शेतीचे ज्ञान नाही असा तो अडाणी. मग अक्षरओळख असलेल्याला कोणतेच जीवनज्ञान नसताना तो ज्ञानी कसा?' असा सवाल डॉ. राजन गवस यांनी केला.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन मंडळ आयोजित वाचन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या न्यू कॉलेजतर्फे वाचन सप्ताहाचे ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

प्रा. गवस म्हणाले, 'अक्षरज्ञान प्राप्त लोकांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी, वास्तुशास्त्राचे थोतांड वाढविलेले आहे. प्राचीन निसर्गानुरुप ज्ञानी जीवनशैलीचा नाश करुन, श्रमप्रतिष्ठेचा ऱ्हास केलेला आहे. पंख्याखाली बसून पैसे मिळविणारा प्रतिष्ठित व कष्ट करुन मनगटाच्या बळावर पैसा मिळवणारा माणूस जास्त शिकून जास्त लाचार झाला आहे. लोकसाहित्य हे महाकाव्याइतके प्रभावी असून त्याची जोपासना केली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा सुयोग्य दृष्टिकोन विकसित होण्यासाठी काळजात हात घालणारे निसर्गप्रधानतेचे साहित्य वाचले पाहिजे. कठीण काळात तग धरण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनाने हजारो रस्ते खुले होतात. त्यातून आयुष्याचा सुंदर मार्ग शोधता येतो. यासाठी पुस्तकाशी स्वत:चे नाते जोडणे आवश्यक आहे.' प्राचार्य डॉ. नलवडे यांचेही भाषण झाले. प्रा. टी. के. सरगर यांनी प्रास्ताविक केले. रणजीत दुर्गुले यांने पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनुराधा रावत हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून रंकाळा स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने शुक्रवारी राबविलेल्या रंकाळा परिसर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शहरातील विविध कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी परीक्षा काळातही सहभागी झाले. सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यात सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. मे २०१५ मध्ये स्वच्छता मोहीम इराणी खण परिसरात राबविली होती. त्याची व्याप्ती वाढवून इराणी खणीसह मोहिते खण, रंकाळा पदपथ, खणविहार मित्र मंडळ, संध्यामठाकडील पद्माराजे गार्डन, रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत घनकचरा, प्लास्टिक कचरा, काटेरी झुडपे, गाजरगवत, काचा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या. सुमारे तीन तास राबविलेल्या या मोहिमेत सुमारे दहा टन कचरा गोळा झाला. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे २५ सफाई कामगारही मोहिमेत सहभागी झाले. महापालिकेच्या वतीने दोन डंपर, एक जेसीबी मशीन, पाण्याचा टँकर, दोन धूर फवारणी यंत्रे, पाच कीटकनाशक फवारणी यंत्रे, आदी साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाकडून झाडू, विळे, टोपल्या, पोती, हातमोजे देण्यात आले.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'रंकाळा कोल्हापूरचे वैभव आहे. त्याची स्वच्छता करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. भविष्यातही रंकाळ्याची स्वच्छता मोहीम नित्यपणे राबविली जाईल.' यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, विद्यापीठाच्या स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. वासंती रासम, डॉ. भगवान माने, प्राचार्य डॉ. एस. एस. गवळी, प्राचार्य डॉ. एच. एस. वनमोरे, आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुतांश लढती बहुरंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुतांश प्रभागात बहुरंगी लढती होणार आहेत. शुक्रवारी अर्ज माघारीनंतर ८१ प्रभागासाठी ५०६ उमेदवार रिंगणात राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी-ताराराणी आघाडी या चार प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे.

मात्र या राजकीय पक्षासमोर ४५ हून अधिक प्रभागात १५० हून अ​धिक अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १४७ उमेदवारांनी माघार घेतली. गुरूवारी आणि शुक्रवारी मिळून २७७ उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेतली. यामध्ये बहुतांश डमी उमेदवारी अर्जाचा समावेश होता. दरम्यान उमेदवारी माघारीवरून गेल्या दोन दिवसांत प्रचंड घडामोडी झाल्या. इच्छुक आणि अपक्ष उमेदवारांवर दबाव तंत्राचा अवलंब, नेत्यांची फोनाफोनी, आर्थिक आमिषपासून स्वीकृत नगरसेवकपदाची ऑफर अशा घटनांनी दिवस गाजला. उमेदवारी अर्ज

माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही प्रभागात दबाव टाकण्याचे काम सुरू होते. महापालिका निवडणुकीसाठी एकूण ८०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदन पाटील अनंतात विलीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

माजी मंत्री़ मदन पाटील (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे मुंबईतील कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर सांगलीतील कृष्णा नदीकाठी वसंतदादा पाटील समाधी परिसरात सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांच्या दोन्ही मुलींनी भडाग्नी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ची कोल्हापुरात धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहा नोव्हेंबरला होणाऱ्या ऊस परिषदेपूर्वी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांसोबत राहावे. कारखानदारांशी संगनमत करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला तर आगामी वर्ष धोक्याचे असेल, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी एफआरपीसाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या भव्य मोर्चावेळी शेट्टी बोलत होते. मोर्चाला प्रचंड संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभांगीसाठी एकवटली स्त्री शक्ती

$
0
0

समाजातून मदतीचा ओघ सुरूच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुणी तिच्या घरातील महिन्याचा बाजार भरून दिला आहे, तर कुणी तिच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे. काही महिलांनी एकत्र येत आपल्या ठेवणीतील साड्या तिच्या हातात दिल्या आहेत. तर मुलांचे चांगले कपडे बाजूला काढून तिच्या घरी पोहोच केले आहेत. डॉल्बीच्या फटका बसल्याने आयुष्य गमावलेल्या संदीप टिळे यांची पत्नी शुभांगीला आयुष्यात नव्याने उभे करण्यासाठी समाजातील स्त्रीशक्ती एकवटली आहे. ऐन २८ व्यावर्षी नियतीचा आघात झालेल्या शुभांगीला आधार देण्यासाठी महिलांनी केलेल्या मदतीने खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीला कृतीचे कोंदण दिले आहे.

सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत. स्त्रीशक्तीचा उत्सव शिगेला पोहोचला असताना शुभांगी आणि तिच्या कोलमडलेल्या कुटुंबासाठी ही मदत खूप मोलाची ठरत आहे. पाच वर्षापूर्वी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पहायला आलेले टिळे कुटुंबीय पापाची तिकटी येथे एका इमारतीच्या पायरीवर उभे होते. डॉल्बीच्या आवाजामुळे त्या इमारतीच्या गच्चीचा भाग संदीपच्या अंगावर कोसळला आणि त्याला अपंगत्व आले. त्यानंतर पाच वर्षे संदीपची सुश्रृषा आणि आर्थिक संघर्ष अशा कात्रीत शुभांगीने आयुष्याची लढाई केली. गेल्या आठवड्यात संदीपने अखेरचा श्वास घेतल्यानंतर दोन लहान मुलांसोबत आयुष्य कसे काढायचे हा यक्षप्रश्न घेऊन शुभांगी काळजीत होती. मात्र तिच्यासाठी समाजातील दातृत्वशील महिलांनी आधाराचा हात पुढे केला आणि शुभांगीला बळ दिले आहे.

गीता हासूरकर यांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर शुभांगीच्या मदतीसाठी आवाहन केले आणि त्यांच्या मैत्रीणींनी मिळून दहा हजार रूपये जमा केले. ही रक्कम गीता यांनी शुभांगी यांना दिली आहे. एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर, वडीलांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने श्राद्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला फाटा देत शुभांगीच्या घरातील महिन्याचे धान्य भरून दिले आहे. तर चरणकर कुटुंबातील महिलांनी शुभांगीच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य दिले आहे. गीता ग्रुपतर्फे महिलांनी आपल्या ठेवणीतील साड्या, मुलांचे कपडे शुभांगीला द्यावेत असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महिलांनी प्रतिसाद देत साड्या आणि कपड्यांची मदत केली आहे.

राहण्याचीही व्यवस्था

ताराबाई पार्क येथे राहणाऱ्या सुभाष घाटगे यांनी आपल्या आउटहाउसमधील दोन खोल्या शुभांगी आणि तिच्या मुलांना राहण्यासाठी देण्यात येतील असे सांगितले आहे. तसेच संदीप यांच्या दोन्ही मुलांना कोल्हापुरात चांगल्या शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही घाटगे यांनी टिळे कुटुंबापुढे प्रस्ताव ठेवला आहे. शुभांगी दोन मुलांसह कोल्हापुरात रहायला आली तर तिला चांगले काम मिळवून देण्यासाठी घाटगे कुटुंबीय पाठबळ देणार आहे.

शुभांगीसाठी महिलांनी एकत्र यायचे ठरवले आणि ​बघता बघता दहा हजार रूपये जमा झाले. हे पैसे ग्रुपमधल्या महिलांनी स्वतासाठी साठवलेल्या पूंजीतून दिले आहेत. यानिमित्ताने महिला एका महिलेच्या पाठीशी उभी राहिली तर आयुष्य उभे करू शकते याचे समाधान आहे.

- गीता हासूरकर, गीता ग्रुप सदस्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅफिकच्या विळख्यात शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवैध पार्किंग, एकापाठोपाठ येणाऱ्या बसेस, दुचाकी आणि मोटारींची प्रचंड वर्दळ यामुळे शहरातील मुख्य शाळांचा परिसर नेहमीच धोकादायक ठरत आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळात तर येथील परिस्थिती भयंकरच असते. गर्दीतही अनेक वाहनधारक भरधाव वेगाने जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. शाळा आणि शिक्षण संस्थांनी महापालिका आणि वाहतूक शाखेला वेळोवेळी पत्रव्यवहार करून दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्यामुळे आता संस्थाच यावर उपाययोजना करत आहेत.

पेटाळा परिसरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल, विमला गोयंका, कोल्हापूर हायस्कूल आणि महाराष्ट्र हायस्कूल, शाहू मैदान परिसरातील प्रायव्हेट हायस्कूल आणि राजारामपुरीतील उषाराजे गर्ल्स हायस्कूल व तवनाप्पा पाटणे हायस्कूल या परिसरातील रस्ते अरूंद आणि वाहनंची प्रचंड वर्दळ असलेले आहेत. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी कशी कमी होईल यासाठी महापालिका व वाहतूक शाखेने प्रयत्न करण्याची तातडीने आवश्यकता आहे.

एक ते दीड वर्षांपूर्वी पेटाळा परिसरात एका बारा वर्षाच्या मुलीचा बस अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार होऊनही प्रशासनाने यातून काहीही धडा घेतलेला नाही. रहदारीवेळी या परिसरात एकही वाहतूक पोलिस दिसत नाही.

पेटाळ्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी एकदम बाहेर पडू नयेत यासाठी प्रत्येक शाळा सोडण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत १० ते १५ मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. तरीही शाळा परिसरात परिसरात ‌विद्यार्थी वाहतूक रिक्षा लावल्या जात असून ही मुख्य मार्गावर प्रचंड गर्दी होते. तर प्रायव्हेट हायस्कूलच्या बाहेरील बाजूस अॅपे रिक्षांचा स्टॉप आणि हातगाड्यांमुळे प्रचंड कोंडी होते.

स्कायवॉकला विरोध

पेटाळा परिसरात एकत्रित पाच शाळा आहेत. परिसरात दहा ते बारा हजार विद्यार्थी एकदम बाहेर पडतात. चाळीस पायऱ्या चढू व उतरून रस्ता मुले क्रॉस करू शकणार नाहीत. त्याचा मुळात फार वापर होणार नाही. त्यामुळे या परिसरातील होत असलेल्या स्कायवॉकला परिसरातील लोकांनी विरोध असल्याचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव जी.एम.कुलकर्णी यांनी सांगितले.

दिवसेंदिवस या परिसरात वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे संस्था स्तरावरच काही उपाययोजना केल्या जात असल्या तरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे.

- चित्रा कशाळकर, सचिव, न्यू एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झोपमोड कराल तर मत नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्ज माघारीनंतर महापालिकेच्या निवडणूक लढतीचे प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र ज्या उमेदवारांना पक्षाचे तिकिट यापूर्वीच जाहीर झाले अशा उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. उमेदवारांच्या सततच्या पाठलागामुळे मतदार धास्तावले आहते. उमेदवारांच्या ससेमिरा टाळण्यासाठी 'कृपया दुपारच्यावेळेत निवडणुकीसंबंधी भेटू नये, आमचे मत तुम्हालाच आहे, अन्यथा मत देणार नसल्याचा चक्क फलक लावून सूचनावजा इशाराच दिला आहे. कोल्हापुरात सध्या या फलकाची खुमासदार चर्चा रंगली आहे.

शहरात सध्या महापालिकेच्या आठव्या सभागृहासाठी निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी प्रभाग आरक्षण सोडतीपासूनच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. ज्या उमेदवारांचे विशिष्ट पक्षाचे तिकिट निश्चित होते, अशा उमेदवारांच्या तर प्रचाराच्या दोन तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. एकेका प्रभागात चारपेक्षा जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत आहे. यामुळे बिचाऱ्या मतदारांची चांगलीच अडचण झाली आहे.

सर्वच उमेदवारांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने, एकेक मत लाखमोलाचे ठरणार आहे. यामुळे प्रत्येक मतदारांशी संवाद साधण्यासाठी उमेदवार सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत मतदारांची भेट घेत आहे. यामुळे मतदारांचा एकातंच हरवून गेला आहे.

उमेदवारांचा हा पिच्छा टाळण्यासाठी चक्क त्यांनी भेटण्याच्या वेळेचा फलकच लावला आहे. 'मतदार झोपेत असतात, बेल वाजवू नये. अन्यथा मत मिळणार नाही. (आणि काळजी करु नये आमचे मत तुम्हालाच आहे.)' असा मजेशीर मजकूर लिहिला आहे. या मजेशीर फलकांची शहरात चांगलीच खुमासदार चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images