Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणूक रिंगणात मातब्बर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी मातब्बर रिंगणात उतरले असून सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुका, रॅलीने प्रभागाने निवडणुकीचा फिव्हर अनुभवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेना या प्रमुख चार पक्षांसह राष्ट्रीय समाज पक्ष (रासप), शेतकरी कामगार पक्षही निवडणुकीत उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दुधाळीत ४९ उमेदवारांचे अर्ज दाखल

दुधाळी पॅव्हेलियन प्रभागात सोमवारी ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सिद्धाळा गार्डन प्रभागातून कल्पना पाटील (राष्ट्रवादी), मंदा पाटील (शिवसेना), सुनंदा मोहिते (ताराराणी आघाडी) यांनी अर्ज भरले. तटाकडील तालीम प्रभागात अजित ठाणेकर (भाजप) व राजेंद्र जाधव (शिवसेना बंडखोर) यांनी अर्ज दाखल केले. रंकाळा स्टँड प्रभागातून शेखर कुसाळे (ताराराणी) यांनी अर्ज भरला. पंचगंगा तालीम प्रभागातून एकूण सातजणांनी अर्ज भरले. स्वाती घाटगे (शिवसेना), वैशाली पाटील (भाजप) यांचा समावेश आहे. लक्षतीर्थ प्रभागात माजी नगरसेविका अनुराधा खेडकर (राष्ट्रवादी), तर बलराम कॉलनी प्रभागातून माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले. दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून रवी पाटील (रासप), विश्वास आयरेकर (राष्ट्रवादी) व उदय निगडे (शिवसेना) यांनी अर्ज भरले. चंद्रेश्वर प्रभागातून शोभा बोंद्रे (काँग्रेस), प्रियांका इंगवले (ताराराणी), वैशाली जाधव (शेकाप) यांनी अर्ज दाखल केले. पद्माराजे उद्यान प्रभागातून माजी उपमहापौर विक्रम जरग (ताराराणी), अजिंक्य चव्हाण (राष्ट्रवादी) यांनी अर्ज भरले.

बावड्यात २२ अर्ज दाखल

कसबा बावडा पॅव्हेलियन कार्यालयात १५ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेकडून संध्या पागर (पोलिस लाइन), अरविंद मेढे (भोसलेवाडी), प्रकाश कोळी लक्ष्मी विलास पॅलेस), राहुल माळी (कसबा बावडा पॅव्हेलियन), रवींद्र माने (कसबा बावडा पूर्व बाजू) येथून उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून हेमंत इंगवले (शुगर मिल), सर्जेराव चौगले (कसबा बावडा पूर्व बाजू), चंद्रकांत राऊत (ताराबाई पार्क) यांनी उमेदवारी अर्ज भरला.

राजारामपुरी एक्स्टेंशनमधून १७ अर्ज दाखल

ताराराणी मार्केटमध्ये ४५ उमेदवारांनी ६० अर्ज दाखल केले आहेत. राजारामपुरी एक्स्टेंशन प्रभागातून १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव (राजारामपुरी एक्स्टेंशन), राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर (शिवाजी पार्क), सविता शशिकांत भालकर, माजी नगरसेवक दीपक जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ५६ उमेदवारांचे ८० अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक १९ मुक्त सैनिक वसाहतमधून सोमवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

महालक्ष्मी मंदिर प्रभागातून एकही अर्ज नाही

महालक्ष्मी प्रभागातून चारही प्रमुख पक्षांची उमेदवारी जाहीर होऊनही एकही अर्ज दाखल झालेला नाही. राष्ट्रवादीकडून हसीन फरास, भाजपकडून श्रुती पाटील, काँग्रेस परिनाज मुजावर, शिवसेनेकडून अर्चना भुर्के या उमेदवार आहेत.

चंद्रकांत साळोखे तटाकडीलमधून?

माजी महापौर उदय साळोखे (शिवसेना) यांच्याविरुद्ध त्यांचे बंधू माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे तटाकडील तालीम प्रभागातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. साळोखे यांचे पुतणे अभिजित साळोखे हे चंद्रकांत साळोखे यांचा अर्ज तपासण्यासाठी दुधाळी पॅव्हेलियनमध्ये आले होते. दोन्ही बंधू पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांचे ते भाऊ आहेत.

३४ उमेदवारांचे ५० अर्ज दाखल

राजारामपुरी येथील निवडणूक कार्यालय क्रमांक ४ मध्ये सोमवारी ३४ उमेदवारांकडून ५० अर्ज दाखल करण्यात आले. अमावस्या असूनही उमेदवारांनी बऱ्यापैकी अर्ज दाखल केले. काँग्रेस १३, भाजप ६, ताराराणी आघाडी ५, राष्ट्रवादीकडून ५, राष्ट्रीय समाज पक्ष २, शिवसेना ३ यांच्यासह १६ अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले. अर्ज भरणाऱ्यांत कादंबरी कवाळे, संदीप कवाळे, प्रकाश काटे, जालंधर पवार, प्रवी केसरकर, आदींचा समावेश आहे.

हॉकी स्टेडियममध्ये ४७ अर्ज

विद्यमान नगरसेवक भूपाल शेटे, महेश गायकवाड, सुभाष रामुगडे यांच्या पत्नी यांच्यासह माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी अशा प्रमुखांसह विविध पक्षांच्या नवीन ३९ उमेदवारांनी ४७ अर्ज सादर केले. आतापर्यंत या कार्यालयात ७२ अर्ज दाखल झाले आहेत. शेटे यांनी जवाहरनगरमधून, गायकवाड यांनी आपटेनगर तुळजाभवानीमधून तर शीतल सुभाष रामुगडे यांनी कळंबा फिल्टर हाऊसमधून अर्ज सादर केले.

गांधी मैदान कार्यालयात ४१ अर्ज

गांधी मैदान विभागीय कार्यालयात १२ प्रभागातून ४१ उमेदवारांनी अर्ज भरले. सोमवारी १२३ अर्जांची विक्री झाली. फिरंगाई प्रभागातून भाजपकडून शामली रमेश मोहिते यांनी अर्ज दाखल केला. याच प्रभागातून तेजस्विनी इंगवले, संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून भाजपकडून नगरसेविका यशोदा प्रकाश मोहिते, राष्ट्रवादीकडून नगरसेवक महेश सावंत यांनी अर्ज दाखल केला. अपक्ष अजित सूर्यवंशी, प्रताप पाटील यांनीही अर्ज दाखल केला. नाथागोळे प्रभागातून ताराराणी आघाडीकडून प्रकाश मोहिते, भारत मोहिते यांनी, संजय बावडेकर यांनी शिवसेनेकडून, एसफोरए आघाडीकडून गिरीश साळोखे यांनी अर्ज दाखल केला. संभाजीनगरमधून शिवसेनेतर्फे रतन पचेर, राष्ट्रवादीकडून यशोदा आवळे, राजलक्ष्मीनगरमधून भाजपकडून शोभा बामणे, शिवसेनेकडून आरती साळोखे यांनी अर्ज दाखल केले.

नागाळा पार्कमधून ५० अर्ज

नागाळा पार्क विभागीय कार्यालयात दिवसभरात ३२ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले, तर ९५ अर्जांची विक्री झाली आहे. कॉँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, श्रीकांत बनछोडे, इंद्रजित सलगर यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर शशिकांत बिडकर यांनी व्हीनस कॉर्नर प्रभागातून अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे बाळकृष्ण मेढे, भाग्यरेखा पाटील यांचे प्रमुख अर्ज आहेत, तर निलोफर आजरेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

४२६० मतदारांची पुरवणी मतदार यादी

हरकती देऊनही अंतिम मतदारयादीतील मतदारांचा घोळ कायम होता. साधारणपणे ४३०० नावांच्या घोळावरून तक्रारी झाल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने नावांची पडताळणी आणि खातरजमा झाली. ४६ प्रभागांच्या मतदारयादीतील घोळ दुरूस्त करून ही नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. महापालिकेच्या वेबसाइटवर ती प्रसिद्ध केली आहेत.

शस्त्रे जमा होणार, ईव्हीएम मशीन ताब्यात

महापालिका प्रशासनाने मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी केली होती. तथापि, जिल्हा प्रशासनाकडील ईव्हीएम मशिन्स मंगळवारी महापालिकेच्या ताब्यात मिळणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली. परवानाधारक हत्यारे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्यगृहाची शताब्दी कार्यक्रमाविनाच

0
0

आचारसंहितेमुळे कार्यक्रमांकडे प्रशासनाची पाठ, रंगकर्मींचा अपेक्षाभंग

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला १४ ऑक्टोबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तब्बल दहा कोटी रुपये खर्चून या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने हे नाट्यगृह अद्याप खुले होऊ शकलेले नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने या नाट्यगृहाच्या शताब्दीचा क्षणही सांस्कृतिक कार्यक्रमाविनाच जाणार आहे.

मागील दीड वर्षांहून अधिक काळ भोसले नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे. केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती आणि नाट्यगृहाची शताब्दी या दोन्हीचे औचित्य साधून नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये २०१४-१५ वर्षात ७ कोटी, तर २०१५-१६ या वर्षात १.७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि, कामातील दिरंगाईमुळे हे नूतनीकरण वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी ९ ऑगस्ट रोजी भोसले यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त नाट्यगृह खुले करण्याचा मुहूर्त हुकला. त्यानंतर महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नाट्यगृहाचे उद्घाटन करावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, नाट्यगृहाशी संबंधित काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने ऐनवेळी हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. आता आचारसंहिता लागू झाल्याने नाट्यगृहाचे कामकाज ठप्प आहे. त्यामुळे शताब्दीनिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करता येऊ शकणार नसल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.

नाट्यगृहाच्या जनरेटर बॅकअपचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे, आपत्कालीन व्यवस्था सक्षम असल्याबाबत घ्यावे लागणारे प्रमाणपत्रही नाट्यगृहाला प्राप्त झालेले नाही. १९१५ मध्ये बांधण्यात आलेले या नाट्यगृहाला स्वातंत्र्यानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नाव देण्यात आले. १९७१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे नाट्यगृह महापालिकेकडे वर्ग करण्यात आले. तेव्हापासून महापालिकेने केलेले हे नाट्यगृहाचे तिसरे नूतनीकरण आहे. यापूर्वी, १९८४ व २००३ मध्येही नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते.

शताब्दीचा क्षण महत्त्वाचा असल्याने आचारसंहितेचा भंग न होता नाट्यगृहाचे उद्घाटन कसे करता येईल, याबाबत विचार सुरू आहे. मात्र, नाट्यगृहाशी संबंधित कामे अद्याप अपूर्ण असल्याने तेथे कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. तसेच, अन्य संस्थांनाही अशा कार्यक्रमासाठी परवानगी देता येणार नाही.

- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त

महापालिकेची परवानगी मिळाल्यास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची मराठी नाट्य परिषदेची तयारी आहे. भोसले नाट्यगृहाच्या शताब्दीचा सण महत्त्वाचा असून तो सांस्कृतिक कार्यक्रमानेच साजरा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. हा कार्यक्रम विनामूल्य ठेवल्यास नियमभंग होणार नाही. अद्यापही कार्यक्रमाला परवानगी मिळेल, याबाबत आशावादी आहोत.

- प्रफुल्ल महाजन, मराठी नाट्य परिषद

महापालिकेच्या माजी आयुक्तांनी भोसले नाट्यगृहाबाबत सूचनांसाठी रंगकर्मींची बैठक बोलावली. त्यावेळीच हे नाट्यगृह २०१५ मध्ये खुले होईल, असे आश्वासन त्यांच्याकडून दिले होते. मात्र, अद्यापही नाट्यगृह सुरू होऊ न शकल्याने रंगकर्मींना शताब्दीचा क्षण साजरा करता येणार नाही, याबाबत खंत आहे. महापालिकेने आगामी काळात दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून ही तूट भरून काढावी.

- संजय हळदीकर, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळसंदेतील चार कुटुंबे वाळीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

तळंदगे (ता. हातकणंगले) येथे परपंरेनुसार चालत आलेल्या बिरोबा घोडगिरसिद्ध देवाची पूजा, गावडकीच्या या कारणावरून चार कुटुंबांना वाळीत टाकण्याची तक्रार जिल्हा पोलिस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून या प्रकरणी सर्व धनगर समाजावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी शामू येताळे व अन्य चौघांनी केली आहे.

दरम्यान मेंढे-धनगर समाज व शिवाजी येताळे यांच्यासह अन्य कुटूंबियांमध्ये आज दिवसभर या प्रकरणी जोरदार वादावादी व मारहाणीची प्रकार घडला, याबाबत हुपरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाला. निवेदनामध्ये म्हटले आहे की, तळंदगे येथील बिरोबा घोडसिद्ध देवाच्या पूजेचा मान परंपरेनुसार शामू बिरोबा येताळे यांचा होता. या देवस्थानचे प्रमुख व समाजाच्या स्मशानभूमी व्यवस्थापक म्हणून सरकारी दप्तरी त्यांचेच नाव आहे. कै.शामू येताळे यांच्या मृत्यू पश्चात हा मान त्यांचे वारस शिवाजी येताळे, मारूती येताळे, भाऊसो येताळे यांचेकडे बिरोबा देवाची पूजा व गावकी हा पंरपरेनुसार चालत आला आहे. असे असतानाही धनगर समाजातील काहीजणांनी सर्व येताळे कुटूंबियांना देवाचे नावे पैसे गोळा करता याबाबत मिटिंग बोलावून हिशोब दाखवा मगच पैसे गोळा करा, असे सांगून यावेळी दसऱ्याची पूजा करू देणार नाही असे सांगून गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्यात सुरुवात केली आहे. तसेच मंगल शिवाजी येताळे यांच्या नावे असलेला बिअर बार धनगर समाजात का काढला? तो इतरत्र हलवावा या कारणावरूनही धनगर समाजातील काही जण त्रास देवून शिवाजी येताळे यांच्याशी संबंध ठेवल्यामुळे मारूती येताळे, भाऊसो येताळे, बाळू येताळे आणि सुरेश शिनगारे यांना वाळीत टाकण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांनी अभ्यास करावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

एफआरपी कायदा बदलण्याचा अधिकार कुणालाच नसून साखर सम्राट बेकायदेशीररित्या एफआरपी तीन तुकड्यात देण्याचे कारस्थान करीत आहेत. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला असून कारखानदार अथवा राज्य सरकारसह कुणालाही यात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे एफआरपीबाबत बदल करण्याचा विचार करणाऱ्या सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायद्याचा अभ्यास करावा, असा घरचा आहेर खासदार शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर सहसंचालक कार्यालयावर शुक्रवारी (ता.१६) निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येथील बॅ. नाथ. पै. विद्यालयाच्या मैदानावर आयोजित ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, कारखानादारांशी आमचे भांडण एका मर्यादेपर्यंत आहे. आम्हाला कारखाना बंद करायचा नाही. दुष्काळमुळे कारखानदारी अडचणीत येणार नाही. जिल्ह्यातील कारखानदारांनी संघट‌ित होत एफआरपी तीन तुकड्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. वार्षिक सभेत हा ठराव घुसडला असून कारखानदार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र एफआरपी बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकार असून राज्य सरकारने यात बदल केलाच तर त्याला कायद्याचा आधार राहणार नाही. केंद्र सरकारकडून असा बदल झाला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही.' मेळाव्यास अॅड. अरुण शिंत्रे, सखाराम केसरकर, धनाजी पाटील, संभाजी केसरकर, विनायक देसाई यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भनिरोधक गोळ्यांचा आरोग्यास मोठा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गर्भनिरोधक गोळ्या ह्या एचआयव्ही-एड्स आणि गुप्त रोगांपासून संरक्षण करीत नाही. त्यामुळे तरूणींनी अशा गर्भनिरोधक गोळ्या घेऊन स्वतःचे आरोग्य आणि आयुष्य धोक्यात घालू नये, असे आवाहन राजश्री साकळे यांनी केले. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमधील एका कार्यक्रमात साकळे बोलत होत्या.

तरूणींमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे वाढते प्रमाण आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आ​णि धोकादायक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, 'अशा गोळ्या घेण्यापूर्वी तरूणींनी त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती वाचणे आवश्यक आहे. या गोळ्यांचा वापर फक्त आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून केला जातो, नियमित गर्भनिरोधक म्हणून नव्हे. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे मासिक पाळीचे चक्र पुढे जाते. उलटी, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात. अचानक आणि खूप मोठा रक्तस्त्राव होऊ शकतो. काहीजणींना या गोळ्यांची अॅलर्जी असते. त्यामुळे डॉक्टरांच्या परवानगीशिवाय या गोळ्या घेऊ नयेत.'

प्रारंभी मेधा जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रीती पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रा. तेजस्विनी पाटील, प्रियंका पाटील, मनिषा मोरे, प्राची कुगिरे यांच्यासह सीएसई, आय. टी, मेकॅनिकल या शाखांमधील दोनशे युवती उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणासुदीसाठी बजेटचे नियोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यावर्षी पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दसरा, दिवाळी सण कसे साजरे करायचे, याचे नियोजन करण्यात येत आहे.अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील कडधान्य पिकांवर परिणाम झाल्याने आवक मंदावल्यामुळे डाळींच्या दरात वाढ झाल्याने याची सर्वसामान्यांना झळ पोहोचत आहे. दर वाढल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

कोल्हापूर धान्य बाजारात कडधान्याची आवक मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटक परिसरातून होते. राजस्थानहून कडधान्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही आवक न आल्यामुळे दरवाढीचे परिणाम आवक येईपर्यंत तरी कायम राहणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाक अळणी झाला आहे. महिनाभरापासून सातत्याने डाळींच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांचे पुरते कंबरडे मोडले आहे. होलसेल व किरकोळ बाजारात डाळींची आवक कमी होत असल्याने भाववाढ होत असल्याचे व्यापारी महेश नष्टे यांनी सांगितले.

वाढत्या महागाईमुळे मध्य‌मवर्गीयांना जगणे नकोसे झाले आहे. खाद्यतेलाच्या किमतीतही दोन ते चार रुपयांची वाढ झाली असून, सध्या किरकोळ बाजारात सूर्यफूल ९४ रुपये, सरकी ७४ रुपये आणि शेंगतेल १२० रुपये लिटरने विक्री होत आहे.

गहू, तांदूळ, साखर, तेल, कडधान्य, भाजीपाला, मांस-मच्छी या सगळ्याच वस्तूंचे दर वाढल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. चार महिन्यांपूर्वी तूरडाळ ८८ रुपये प्रतिकिलो होती. आज तिचा दर १५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. गहू २ रुपयांनी, साखर १ रुपयांनी, गोडेतेल ४ रुपये, तांदूळ ५ ते ७ रुपये अशी दरांची चढती भाजणी आहे.

चार महिन्यांपूर्वी चार माणसांचे कुटुंब पाच हजारांत चालत होते. आता वाढत्या महागाईमुळे परिस्थिती बिघडल्यामुळे त्यासाठी सात हजार रुपये मोजावे लागत आहे. भाजीचीही तीच अवस्था आहे. कांद्याचे दर ७० रुपयांवरून खाली आले असले तरी अचानक कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे खाऊ गल्ल्यांतून कांदाभजीच गायब झाली आहे. बाजारात तूरडाळीची किंमत जास्त असल्याने अनेकांकडून मिक्स डाळींचाच पर्याय शोधला जात आहे.

साठेबाजांवर कारवाई करा

भाववाढ नैसर्गिक कारणांमुळे झाली नसून, साठेबाजीमुळे झाली आहे. विरोधी पक्षात असताना भाववाढीला लगाम घातला जाईल, साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात येईल असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सत्तेवर येताच एकाही साठेबाजावर कारवाई केलेली नाही. त्या उलट सध्या विरोधी पक्षात असलेल्या कॉँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षांनीही याबाबत मौन बाळगले असून यात मात्र सामान्य माणूस भरडला जात आहे.

यंदा पावसाअभावी जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात महिन्याचे बजेट कसे बसवायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.'

-निवास भालेकर, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठमारीची ‘अगड’ भक्कम हवी

0
0

Sagar.Yadav@timesgroup.com

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पैलूची साक्ष देणारे ठिकाण म्हणजे छत्रपती शाहू स्टेडियमच्या प्रांगणात असणारे साठमारीचे अगड. कोल्हापुरात एकमेव शिल्लक असणाऱ्या या साठमारी अगडला आज (ता. १४) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याच्या 'अॅडव्हेंचर गेम्स' या संकल्पनेतील शाहूकालीन साठमारी खेळाच्या इतिहासाचा अस्सल साक्षीदार असणाऱ्या या अगडच्या जतन संवर्धन आणि संरक्षणाची गरज आहे.

'साठमारीचा खेळ म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशीच झुंज,' मदमस्त हत्तीला भाल्यांनी टोचून आपल्या अंगावर घेत त्यापासून चपळाईने बचाव करणे असे साठमारी या खेळाचे स्वरुप आहे. शिवछत्रपतींच्या पूर्वीपासून साठमारीचा खेळ खेळला जात असल्याचे उल्लेख इतिहास ग्रंथात मिळतात. या खेळाला अधिक रोमांचक बनविण्यासाठी त्यांनी आपल्या कल्पनेनुसार साठमारीचे 'अगड' उभारले.

येथे असणाऱ्या रावणेश्वर साठमारीच्या नावावरून त्याला रावणेश्वर तलाव म्हणून ओळखले जात होते. राजर्षी शाहू महाराज यांनी तलावाच्या दक्षिणेला असणाऱ्या सुमारे १ हेक्टर मोकळ्या जागेवर 'रावणेश्वर साठमारी अगड' बांधून घेतले. २१ नोव्हेंबर, १९१३ रोजी याच्या बांधकामास सुरुवात झाली. दोन वर्षानंतर म्हणजेच १४ ऑक्टोबर, १९१५ रोजी याचे बांधकाम पूर्ण झाले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डी. एम. विचारे यांनी तयार केलेल्या नकाशानुसार रावसाहेब के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्ट्रॅक्टर तय्यब अली फिदा हुसेनव बळवंतराव घोरपडे यांनी ही साठमारी बांधली. ११ बुरुज आणि भक्कम तटबंदीने परिपूर्ण अशी ही साठमारी आहे.

जतनासाठी प्रयत्न व्हावेत

रावणेश्वर येथील साठमारीला आज (बुधवार) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे साठमारीच्या शताब्दी वर्षानिमीत्त शहरातील हेरिटेज यादीत तिचा समावेश करून तीच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. शिवाय राजर्षी शाहूंचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळापासून सक्रीय असणाऱ्या कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए) यंदा आपला अमृत महोत्सव साजरा करत आहे. यामुळे हा दुग्धशर्करा योग म्हणून साठमारीची शताब्दी साजरी व्हावी अशी मागणी इतिहासप्रेमीतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सलामी छाननीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुणाची थकबाकी, कुणाचे अतिक्रमण, कुणाचे जातीचे दाखले तर कुणी लपवलेली माहिती अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून विरोधकांना छाननीच्या टप्प्यात गारद करण्याची रणनीती आखली आहे. तगड्या उमेदवार कोठे कात्रीत सापडतो का यासाठी अनेक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र यंत्रणाच ती कागदपत्रे मिळवण्यासाठी पाठीमागे लागली होती. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या छाननीमध्ये अनेकांचे उमेदवारी अर्ज अशा आक्षेपांबरोबर तांत्रिक चुकांमुळेही अवैध ठरण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया केल्यानंतर छाननीचा महत्त्वाचा टप्पा आहे. यावेळी संबंधित उमेदवाराचे नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याबरोबरच विरोधक वेगवेगळ्या पद्धतीच्या हरकती नोंदवत असतात. त्यासाठी विरोधकांची यंत्रणा अनेक दिवसांपासून कामाला लागलेली असते. जातीचा दाखला मिळवला असेल तर तो चुकीच्या पद्धतीने मिळवल्याच्या तक्रारीबरोबरच महापालिकेची थकबाकी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. याबरोबरच अनेकजण उमेदवारांच्या घराचे अतिक्रमण दाखवूनही त्याचा अर्ज अवैध कसा ठरेल हे पाहत असतात. काही उमेदवारांची नावे यादीत नसल्याने काही पक्षांना उमेदवार बदलावा लागल्याची उदाहरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखल्यांअभावी झाली गोची

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोणतेही आरक्षण पडो, आपला दाखला तयार आहे म्हणत दरवेळी महापलिकेच्या निवडणूक रिंगणात काही चेहरे उतरतातच. त्यातही ओबीसी आरक्षणासाठी कुणबी दाखला काढून निवडणूक लढविणाऱ्यांना यंदा काही प्रमाणात चाप बसला आहे. बोगस दाखले न देण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना दिल्याने यावेळी अनेक इच्छुकांचे दाखलेच निघाले नाहीत. त्यामुळे दरवेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आणि इच्छुकांना मुरड घालत हात चोळत बसावे लागले. दाखला मिळेल असे गृहित धरून प्रचाराचा धडाका सुरू केलेल्यांना प्रशासनाच्या भूमिकेचा चांगलाच दणका बसला आहे.

गेल्या दोन महापालिका निवडणुकीत अनेकांनी आर्थिक व्यवहाराबरोरच इतर काही मार्गांचा अवलंब करत ओबीसी दाखला मिळवला. त्या आधारावर अनेकजण निवडून आले. अनेकांनी न्यायालयात पाच वर्षे किल्ला लढवत आपला पाच वर्षाचा नगरसेवक पदाचा कालावधी पार केला. अनेकांना हे बिंग माहीत असल्याने नेहमीप्रमाणे दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दाखला मिळणार हे गृहित धरून दुसरीकडे प्रचारालादेखील सुरूवात केली. मात्र पालकमंत्र्यांच्या एका आदेशाने या प्रयत्नावर पाणी फिरले. आणि बोगस दाखल्यासाठी मांडला जाणारा बाजार मोडला.

महापालिकेची यंदाची निवडणूक पक्षीय पातळीवर प्रथमच चुरशीने होत आहे. यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशावेळी विरोधकांना काही प्रभागात उमेदवारच मिळू नये यासाठी प्रयत्न झाले.

भाजप- ताराराणी आघाडीचा मार्ग सुकर

निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी हक्कांच्या प्रभागात उमेदवार मिळू नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना ओबीसीचे संशयापस्पद दाखले न देण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेकांना दाखला मिळाला नाही​, त्यामुळे त्यांना रिंगणात उतरता आले नाही. मात्र, भाजप व ताराराणी आघाडीची उमेदवारी घेतलेल्या काही इच्छुकांना मात्र ओबीसी दाखले मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅकेजमुळे दिलासा

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांना पॅकेजचा लाभ झाला आहे. ७५ टक्केपेक्षा जास्त एफआरपी दिलेल्या कारखान्यांना २९१ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. पॅकेजची रक्कम थेट कारखान्यांना न देता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. पॅकेजचा सर्वाधिक लाभ शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याला झाला आहे. दसरा-दिवाळी सणाच्या आधी एफआरपी रक्कम मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सातत्याने घसरत गेल्याने एफआरपी देणे कारखानदारांना अडचणीचे बनले होते. यामुळे कारखानदारांसह ऊस उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. कारखानदारांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे पॅकेजची मागणी केली होती. यानुसार केंद्राने सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र पॅकेज देताना अनेक जटील अटींचा समावेश होता.

अटी शिथील करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळाने भेट घेतली होती. मात्र सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २१ कारखान्यांपैकी १५ कारखान्यांना सॉप्ट लोणच्या माध्यमातून विविध बँकेमार्फत कर्जपुरवठा करुन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. शेतकऱ्यांना जमा झालेल्या रक्कमेचा अहवाल प्रत्येक कारखान्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सादर केले आहेत. पॅकेजचा लाभ प्रस्ताव सादर न केल्याने उदयसिंगराव गायकवाड कारखाना व सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यांना लाभ झालेला नाही. तर महाडिक शुगर्स व इंदिरा गांधी तांबाळे कारखान्यांना पॅकेजमधून अपात्र ठरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच देऊन मत मागू नका

0
0

मत विकत घेणाऱ्यांविरोधात थोपटले दंड

Appasaheb.mali @timesgroup.com

कोल्हापूर : 'उमेदवारांनी मतासाठी या घरात भेटवस्तू, पैसे देण्याचा प्रयत्न करू नये. अपमान करून घेऊ नका. लाच देऊन मत मागू नका,' ही कुठल्या स्वयंसेवी संस्थेची जागृती मोहिम नाही. तर महापालिका निवडणुकीतील अनिष्ठ प्रथांच्या विरोधात नागरिकांनी स्वत:हून सुरू केलेली जनजागृती आहे. निवडणुकीत पैसे वाटप आणि जेवणावळीच्या प्रथा वाढल्या असताना आणि मतदानासाठी आमिषे दाखविण्याच्या प्रकारात वाढ होत असताना शहरातील विविध भागातील नागरिकांनी घराच्या प्रथमदर्शनी या आशयाचे निवेदन प्रसिद्ध करत मत विकत घेऊ इच्छिणाऱ्यांच्या विरोधात जणू दंडच थोपटले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी यंदा कमालीची चुरस आहे. सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. इलेक्टीव्ह मेरीटला प्राधान्य देत सर्वच पक्षांनी कमी अधिक संख्येने धनदांडगे, मटकेवाले, दारूवाले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीटे दिली आहेत. बहुतांश प्रभागात अपक्षही सरसावले आहेत. 'जिंकण्यासाठी वाटेल ते' म्हणत अनेकांनी हात सैल सोडला आहे. धनदांडग्या उमेदवारांच्या प्रभागात रोज जेवणावळी सुरू आहेत. प्रभागातील लहान मुलांच्या बारशाचा कार्यक्रम असो की कुणाच्या लग्नाचा वाढदिवस उमेदवारांच्या खर्चाने धुमधडाक्यात साजरा होत आहेत. मतदान फिक्स करण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविली जातात. काही ठिकाणी पाकिट वाटप तर कुठे वस्तू भेट स्वरूपात दिल्या जात आहेत. समाजातील सगळेच घटक मात्र उमेदवारांच्या आमिषाला बळी पडत नाहीत. काहींनी आमिषे झुगारून लावली आहेत.

निवडणुकीतील अनिष्ठ प्रथांच्या विरोधात उभे ठाकताना शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, ताराबाई पार्क या परिसरातील काही नागरिकांनी 'कृपया उमेदवारांनी मतासाठी या घरात भेटवस्तू, पैसे देण्याचा प्रयत्न करू नये. अपमान करून घेवू नका. लाच देऊन मत मागू नका. माझ्या नावावर पैसे घेणाऱ्यांना पैसे देवू नयेत,'अशी निवेदने दारासमोर, दुकानाच्या प्रथमदर्शनी चिकटवली आहेत. अशा पत्रकांचे वाटपही केले आहे. डॉ. निशिकांत तांबट, संग्राम पोवार, किशोर मोरे, शरद तांबट, दिलीप मनछोडिया, प्रभाकर तांबट आदी नागरिकांनी या निवेदनाच्या माध्यमातून मतदारांत जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमिषाला बळी पडू नये म्हणून...

राजारामपुरी ९ व्या गल्लीतील ६९ वर्षीय डॉ. निशिकांत तांबट म्हणाले, 'मतदान हा पवित्र हक्क आहे. काहीजण पैशाच्या बळावर सर्वसामान्यांचे मत विकत घेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षात हे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांना आळा बसावा, लोकांनी कसल्याही आमिषाला बळी पडू नये. त्याचबरोबर उमेदवारांनीही मत विकत घेण्याच्या फंदात पडू नये. यासाठी घराच्या प्रवेशद्वारासमोरच निवेदने लावून जागृती अभियान करण्याचा प्रयत्न आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल इंडियाची पाटी कोरीच

0
0

Janhavhi.Sarate @timesgroup.com

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज आणि कम्प्युटरची सुविधा नसल्यामुळे भविष्यातील डिजिटल इंडियाची पाटी अजूनही कोरीच असल्याचे अधोरेखित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन समोर ठेवून अनेक आदेश काढले खरे, पण प्राथमिक सुविधांच्याबाबतीत अजूनही सरकारी शाळा नापास ठरत आहेत.

पूर्वीच्या सरकारने गाव तिथे शाळा असा उद्देश ठेवून शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये आणि या शाळांमधील विद्यार्थी अपडेट राहावा यासाठी प्रयत्न केला. नव्या सरकारतर्फे शाळांमध्येही डिजिटल इंडियासाठी प्रयत्न केले जावू लागले आहेत. मात्र शाळांमध्ये अद्यापही प्राथमिक सुविधांचाच अभाव असल्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार याबाबत साशंकताच आहे. जिल्हा परिषद अथवा महापालिकेच्या शाळांमध्ये लाईटची सुविधा, संगणक अशा प्राथमिक सुविधांचीच वानवा असल्यामुळे इथला विद्यार्थी इतर खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अपडेट राहणे अशक्य आहे.

तंत्रज्ञान युगामध्ये जिल्हा परिषदेच्या निम्या शाळांमध्ये तर महापालिकेच्या ४६ शाळांमध्ये अद्यापही संगणक पोहचलाच नसल्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संगणक साक्षर होणार का? असा प्रश्नही पालकांना पडत आहे.

स्पर्धा वाढत असल्यामुळे महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा लोकवर्गणीतून काही शाळांना उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यासाठी सरकारकडून कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने येणाऱ्या अनेक आव्हानाना तोंड द्यावे लागत आहे. मात्र जर शाळांमधील प्राथमिक सुविधांकडेच सरकारने पाठ फिरविल्यास स्पर्धेच्या युगात शाळा टिकणे कठीण आहे.

भविष्यात सरकारच्यावतीने ई लर्निंगचे साहित्य पुरविले जाण्याची शक्यता असल्यामुळे सरकाने सर्व शाळांना ई लर्निंगचे साहित्य खरेदी न करण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्षात ई लर्निंग कधी सुरू होणार याकडेही प्रशासन डोळे लावून बसले आहे.

'महापालिकेच्या एकूण ५९ शाळांपैकी १३ शाळांमध्ये संगणकांची सुविधा करण्यात आली असून ६ शाळांमध्ये ई लर्निंग सुरू आहे. व्यावसायिक वीज आकारणीमुळे शाळांना वीज बिलाची अधिक रक्कम भरावी लागते.

- प्रतिभा सुर्वे, प्रशासन अधिकारी, महापालिका

'भविष्यात ई लर्निंगची सुविधा सरकारच्यावतीनेच करण्यात येण्याची शक्यता असल्यामुळे इ लर्निंगचे साहित्य खरेदी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रम गोखले यांना ‘विष्णुदास भावे पदक’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कुपवाड येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे यंदाचे ५०वे 'आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक' यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाले आहे. रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात नाट्यसंमेलनाध्यक्ष फैय्याज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी दिली. गौरव पदक, ११ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गोखले यांनी गेली ५८ वर्षे ७५ हिंदी, ६० मराठी आणि २० गुजराती, कन्नड, तेलुगू चित्रपटांत काम केले आहे.

'पुरस्कार मिळाल्याचा आनंद'

'मला प्रचंड आनंद झाला आहे. नाट्यक्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणखी काय हवे? राष्ट्रपती पदकाने सन्मान व्हावा, तशी माझी भावना आहे,' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला.

नाट्यक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'विष्णुदास भावे' पुरस्कार विक्रम गोखले यांना मंगळवारी जाहीर झाला. प्रतिवर्षी रंगभूमी दिनाच्या दिवशी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस मानाच्या भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात गोखले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तरुणांबरोबर आपल्याला काम करायला आवडते. सध्याचे दिग्दर्शक खूप हुशार आहेत. विविध विषय समोर येत आहेत. दिग्दर्शक, अभिनेते विचार करून कलाकृती तयार करत आहेत. त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. पण, त्याचवेळी विनोद ठासून भरल्याशिवाय नाटक, चित्रपट करता येत नाही, अशीही सध्या व्याख्या तयार झाली असून ती खूप गंभीर आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीडी गहाळप्रकरणी कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नीतिश तुकाराम पाटील ता तरुणाच्या अपघाती मृत्युच्या नुकसानभरपाईपोटी आलेला २४ लाखांचा डीडी गहाळ केल्याप्रकरणी अखेर जिल्हा प्रशासनाने संबंधित दोषींवर कारवाई केली आहे. एका लिपिकेला निलंबित केले आहे. तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, तर डीडीचा पाठपुरावा सुरू असून, येणाऱ्या चार दिवसात डीडी मिळेल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी दिली.

नितिश तुकाराम पाटील हा तरुण मस्कतमध्ये इलेक्ट्रेशियन म्हणून काम करीत होता. सल्तनत ऑफ ओमान येथे एका अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नीतिशच्या आई-वडिलांनी मस्कत न्यायालयात धाव घेतली होती. या दाव्याचा निकाल नीतिशच्या बाजूने लागल्यानंतर नीतिशच्या वारसांना भरपाई द्यावी असा निर्णय कोर्टाने दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऑनलाइन फार्मसी ऑफलाइन लाइफ' , 'ऑनलाइन औषध खरेदी जीवाला धोका' असे लक्षवेधी फलक हाती घेऊन जिल्हा केमिस्ट असोसिएशनने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ई-फार्मच्या विरोधात पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने इ-फार्मसीच्या विरोधात देशव्यापी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्टेशन रोडवरील केमिस्ट भवनपासून सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात झाली. फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, महानगरपालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, स्टेशन रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. औषध परवाना नाही, मग ऑनलाइन औषधांची विक्री कशी, युवा पिढी व्यसनाधीनाचा धोका, ई फार्मसी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बरगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

शहरातील होलसेल आणि रिटेल ७५० विक्रेते आणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांहून अधिक विक्रेते सहभागी झाले. अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप कदम, असोसिएशनचे सचिव संजय शेटे, उपाध्यक्ष सुधीर खराडे, खजिनदार शिवाजी ढेंगे, सहसचिव भुजिंगराव भांडवले, संघटन सचिव जयवंतराव शेडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, महाराष्ट्र कंझ्युमर्स प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन अध्यक्ष धैर्यशील पाटील सहभागी झाले. अत्यावश्यक रुग्णांना कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन केमिस्ट भवन मधून औषधे उपलब्ध करुन देण्यात आली. गरजूंची गैरसोय टाळण्यासाठी इचलकरंजी, चंदगड, कागल, राधानगरी, मलकापूर, कोडोली, जयसिंगपूर, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड येथे औषधांची व्यवस्था करण्यात आल्याचे असोसिएशने सांगितले.

ऑनलाइन फार्मसीला विरोधासाठी...

जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, 'देशात बेकायदेशीररित्या चालविल्या जाणाऱ्या ऑनलाइन फार्मसीला विरोधच आहे. ई फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स, ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या धोकादायक औषधांची विक्री सुरु आहे. मात्र प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ई फार्मसीतील औषध विक्रेत्यांचा कायमस्वरुपी विरोधच राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांकडून ७० हजारांचे तयार कपडे लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाव्दार रोड कसबा गेट पोलिस चौकी परिसरातील कपड्याच्या दुकानातील ७० हजार रूपये किंमतीचे तयार कपडे चोरट्याने चोरून नेले. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आशिष विलासराव पोवार (रा. शुक्रवार पेठ, बुरूड गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोवार यांचे कसबा गेट पोलिस चौकीजवळ बेसमेंटमध्ये नारायणी लेडीज कलेक्शन दुकान आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजवण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या दुकानाचे शटर मधल्या बाजूस थोडे वर आल्याचे लक्षात आले. त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी लेगिन्स, ड्रेस मटेरियल, जीन्स टॉप, स्टोल असा ६९ हजार ५०० रूपये किंमतीचा माल लंपास केला. शटर उचकटून आत प्रवेश करून चोरट्यांनी चोरी केली असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञान वाहनाच्या धडकेत म्हाकव्याचा तरुण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने म्हाकवे (ता. कागल) येथील विनायक उर्फ नवनाथ एकनाथ गुरव (वय २५) हा युवक ठार झाला. पुणे-बेंगलोर महामार्गावर कागलनजीक झालेल्या या अपघाताची नोंद कागल पोलीसांत झाली असून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

विनायक हा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सोक्टास कंपनीमध्ये कामास होता. त्याचा एक सहकारी रोज त्याच्या सोबत असायचा परंतु तो सुट्टीवरव असल्याने आज सोबत नव्हता.विनायक आज ड्युटी संपवून तो आज सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरुन गावाकडे जात होता. येथील जोडपुलाजवळ तो आला असता अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने तो खाली पडला व डोक्यावरुन चाक गेल्याने जागीच ठार झाला. अविवाहित असलेला विनायक दोनच दिवसांपूर्वी मुलगी पाहून आला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोहत्याप्रकरणी चिपरीत चौघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

चिपरी (ता.शिरोळ) येथे छापा टाकून जयसिंगपूर पोलिसांनी गोहत्या करणाऱ्या चौघाजणांना अटक केली. यावेळी १५ गायी, बैल व अन्य जनावरांचे सुमारे दोन टन मांस तसेच दोन बोलेरो पिकअप व्हॅन व टेम्पो जप्त करण्यात आले. सकाळी साडेपाच वाजण्यामया सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी अन्य चौघा जणांनी पलायन केले.

याकूब अल्लाबक्ष कुरेशी (वय ६२), सल्लाउद्दीन कादर कुरेशी (वय ३२), जहिरा इब्राहिम कुरेशी (वय ५०, सर्व रा. फलटण) व रफिक अब्दुलरजाक बेपारी (वय ३८, रा. चिपरी) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिपरी येथील रफिक बेपारी हा मटण विक्रेता आहे. बसस्टँडजवळील त्याच्या घरी गोहत्या होत असल्याची माहिती बुधवारी पहाटे चार वाजता जयसिंगपूर पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक सत्यराज घुले, प्रकाश घोडके, सहायक फौजदार प्रकाश देसाई, बजरंग माने, हवालदार फिरोज बेग, प्रकाश हंकारे, अनील चव्हाण, मनोज मोहिते, असिफ मुलाणी, सुनील माळी यांच्या पथकाने बेपारी याच्या घरावर छापा टाकला.

यावेळी खोलीत मांसाचे तुकडे करण्याचे काम सुरू होते. पोलिसांना पाहून चौघाजणांनी पलायन केले. तर पथकाने अन्य रफिक बेपारी याच्यासह अन्य चौघाजणांना ताब्यात घेतले. यावेळी गायी व बैलांची तसेच मांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन वाहने जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांवर फौजदारी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उसाची एफआरपी एकरकमी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तथापि, अनेक कारखान्यांनी आपल्या वार्षिक सभेमध्ये एफआरपी तीन हप्त्यांमध्ये देण्याचे ठराव मंजूर करून घेतले आहेत. या कारखान्यांवर कायदेभंग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांना बेड्या ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला. बुधवारी शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

कारखान्यांच्या वार्षिक सभेत झालेले अनेक ठराव हे कायद्याविरोधात असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, तसेच थकीत एफआरपी दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी देऊ नये, असे पाटील यांनी या वेळी सांगितले. साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. त्यासाठी आयात साखरेवर कर लादावा, असेही पाटील म्हणाले. साखरेला भाव मिळण्यासाठी उसापासून थेट इथेनॉल करण्यास परवानगी द्यावी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून उत्पादन खर्च व पन्नास टक्के नफ्याप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम मिळावी, या मागण्यांचाही पाटील यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

या वेळी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अजित पाटील यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या प्रसंगी शंकर गोडसे, शंकर गायकवाड, तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

या मेळाव्यानंतर शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रघुनाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. आगामी हंगामामध्ये ऊस तोडणीनंतर पुढील १४ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना एफआरपी मिळावी. कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याच स्तरावर घ्यावा. गुळाची आडत शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून वसूल करावी इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच तोळे दागिने लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठ वेताळमाळ तालीम येथे भरदिवसा चोरट्यांनी तिजोरीतील पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपये चोरून नेले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. सुनील आनंदराव अपराध यांनी​ फिर्याद दिली आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

वेताळमाळ तालमीच्या समोरील बोळात अपराध यांचा बंगला आहे. अपराध हे सत्यशोधक बँकेत नोकरीला गेले होते तर त्यांची तिन्ही मुले शाळेला गेली होती. अपराध यांच्या पत्नी सुचित्रा बंगल्याच्या दाराला कडी लावून त्या शेजारच्या घरात देवीच्या कार्यक्रमाला गेल्या. शेजारच्या घरातून एक तासानंतर त्या घरी परतल्या असता बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला. तसेच तिजोरी उघडी दिसली. चोरट्याने घराचा दरवाजा उघडून तिजोरीत असलेल्या चावीचा वापर करून लॉकर उघडले. लॉकरमधील पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपये लंपास केले. अपराध यांनी चोरीची घटना जुना राजवाडा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images