Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘पहल’ योजनेचा गिनीज बुकमध्ये समावेश

$
0
0

कोल्हापूरः केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या पहल योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाल्याचे कोल्हापूर व सांगली (एलपीजी) विभागाचे सहायक व्यवस्थापक एम. मोहन राव यांनी सांगितले.

पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयातर्फे 'पहल' (प्रत्यक्ष हस्तांतरीत लाभ ) या नावाने ही योजना १५ नोव्हेंबर २०१४ पासून देशातील ५४ जिल्ह्यात व उर्वरित देशात १ सप्टेंबर २०१५ पासून लागू करण्यात आली. पहल योजनेखाली प्रत्यक्ष गॅस ग्राहकांनी आपला आधार नंबर त्यांच्या गॅस वितरकांकडे व त्याच्या बँक खात्याशी संलग्न करावा लागतो. आजअखेर सुमारे २५३ कोटींची सबसिडी गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा झाल्याचे राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप-ताराराणीतही घराणेशाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी भाजप व ताराराणी आघाडीने शनिवारी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये तीन ​विद्यामान नगरसेवकांचा समावेश आहे. प्रकाश मोहिते व यशोदा मोहिते या दाम्पत्याला उमेदवारी देण्यात आली आहे. या आघाडीनेही घराणेशाहीचा झेंडा लावताना सहा नगरसेवकांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत दोन्ही आघाडीचे प्रत्येकी दहा उमेदवार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा दिली आहे. आरपीआयला एकही जागा दिलेली नाही. उर्वरित यादी दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

उमेदवारी दिलेल्यांमध्ये यशोदा मोहिते, सत्यजीत कदम, किरण शिराळे या विद्यामान नगरसेवकांचा समावेश आहे. नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या पत्नी शीतल रामुगडे यांना कळंबा फिल्टर हाउस प्रभागातून तर नगरसेवक आर.डी पाटील यांची कन्या श्रुती यांना महालक्ष्मी मंदिर प्रभागातून भाजपची उमेदवारी दिली आहे. ताराराणी आघाडीनेही घराणेशाही जपताना दहांपैकी तीन नगरसेवकांच्या घरातच उमेदवारी दिली आहे. यामध्ये नगरसेवक रणजीत परमार यांचे बंधू इश्वर परमार, रवीकिरण इंगवले यांच्या पत्नी तेजस्वीनी, यशोदा मोहिते यांचे पती प्रकाश, नगरसेविका रोहिणी काटे यांचे पती प्रकाश यांचा समावेश आहे. यामध्ये मोहिते, काटे, परमार व विक्रम जरग हे तीन माजी नगरसेवक आहेत.

काँग्रेसचे नगरसेवक ताराराणीचे उमेदवार

काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक सत्यजीत कदम, किरण शिराळे यांच्या गळ्यात ताराराणी आघाडीची उमेदवारी घालण्यात आली आहे. शिवाय रणजीत परमार हेही याच पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यांच्या बंधूंनी ताराराणीची उमेदवारी घेतली आहे. रवीकिरण इंगवले काँग्रेसचे नगरसेवक असले तरी पत्नीला ताराराणी आघाडीची उमेदवारी घेतली आहे. प्रकाश काटे यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या पतींनी मात्र ताराराणीची उमेदवारी घेतली आहे. एका घरात दोन व्यक्तींना उमेदवारी देणार नाही असे सांगणाऱ्या ताराराणी आघाडीने मोहिते दाम्पत्याला उमेदवारी दिली आहे. हे करताना यशोदा मोहिते यांना भाजपची तर प्रकाश मोहिते यांना ताराराणीची उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक विलास वास्कर यांनाही ताराराणी आघाडीने उमेदवारी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीर

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी अनेक भागात पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यातील ४५० पेक्षा अ​धिक गावात यंदा दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या गावात पावसाअभावी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. १९७२ नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम संपूर्ण अर्थकारणावर होण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सव धूमधडाक्यात होत असला तरी दसरा, दिवाळीवर मात्र या गंभीर परिस्थितीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही चार महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जूनपासून सलग दमदार पाऊस झालेला नाही. काही भागात पडलेल्या पावसाने धरणे भरली आहेत. यामध्ये राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी ही धरणे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. पण, पावसाअभावी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

१२१६ पैकी ४५० पेक्षा अधिक गावात पावसाने हजेरी न लावल्याने ३३ टक्यांपेक्षा अधिक पिके वाया गेली आहेत. यामध्ये भात, सोयाबीन, मका व नाचणी या पिकांचा समावेश आहे. सरकारच्या नव्या आदेशाप्रमाणे ३३ टक्के नुकसान झाल्यास दुष्काळ क्षेत्र म्हणून घोषणा होऊ शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे याबाबतचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. १९७२ नंतर प्रथमच एवढी गंभीर स्थिती निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गतवर्षी जिल्ह्यात सरासरी १७९३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत केवळ ७९३ मि.मी. पाऊस झाला आहे.

उसालाही फटका

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी यापुढे शेतीला मात्र अतिशय कमी पाणी मिळण्याची शक्यता आहे. प्रमुख पीक असलेल्या उसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र घटणार असल्याने साखर कारखान्यासमोर संकट उभे राहणार आहे. उसावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असल्याने मोठा फटका बसणार आहे.

पावसाअभावी झालेल्या नुकसानीबाबत संपूर्ण जिल्ह्याचा तातडीने सर्व्हे करण्यात आला आहे. त्याचा अहवाल तयार आहे. काही दिवसांतच तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यसरकारला पाठविण्यात येणार आहे.

-अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोंड्यातील महिला ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनानत संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याच्या पोलिस कोठडीत कोर्टाने सोमवारपर्यंत (ता.२८) वाढ केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांच्यापुढे ही सुनावणी झाली. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी फोंडा येथील रामनाथी आश्रमातील श्रध्दा पवार या महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू केली आहे.

पनवेल येथील देवद आश्रमाचे अजयकुमार प्रजापती आणि सुमीत खामनकर या दोघांकडेही चौकशी केली आहे. समीरच्या डायरीत सापडलेले काही मोबाइल नंबर संशयास्पद आहेत. समीर व रूद्र यांच्यात संबंध असल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला. गायकवाडच्यावतीने हिंदू विधिज्ज्ञ परिषदेच्या वकिलांनी तर फिर्यादीच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील २०० वकिलांनी वकिलपत्र घेतल्याने सुटीदिवशीही कोर्टाच्या आवारात गर्दी झाली होती.

समीरची कोठडी शनिवारी संपली होती. तपास अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी समीरच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. समीरच्या घरी जप्त केलेले २३ मोबाइल व ३१ सीमकार्डबाबत तपास सुरू आहे. समीरने कोणते शस्त्र वापरले याचा तपास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, 'पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या समीरच्या मूळ संभाषनाचे नमुने जुळतात असा अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गुजरातेतील फॉरेन्सिक लॅबला समीर व ज्योती कांबळे यांच्या संभाषणाचा अहवाल अद्याप न मिळाल्याने तपासाची गरज व्यक्त केली. समीरकडे सापडलेले २३ मोबाइल व ३१ सीमकार्डच्या छाननीचे काम सुरू आहे. या मोबाइलवरून मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, गोवा येथे कॉल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.'

समीरचे वकील एन. एम. सुहासे म्हणाले, 'ज्या कारणासाठी पोलिस कोठडी मागत आहेत त्याचा काहीही तपास पोलिसांनी केलेला नाही. रूद्र पाटील व समीरच्या कनेक्शनचा दावा सरकारी पक्षाकडून केला जात असला तरी २००८ पासून दोघांत कधीही संबंध आलेला नाही. पोलिस वेगवेगळी कारणे सांगून कोठडीची मागणी करीत आहेत. पुणे प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. १६४ जणांकडे चौकशी झाली आहे. ठाण्याला तपास करायचा आहे, असे मागील सुनावणीवेळी सांगितले होते. मग गेल्या तीन दिवसांत पोलिस ठाण्याला का गेले गेले नाहीत? १० दिवस एखाद्या निष्पापाला पोलिस ठाण्यात ठेवणे कायद्याला धरून नाही.'

लई पापं केली...डुबक्या मारुन येतो !

बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे फिर्यादीतर्फे युक्तीवाद करताना म्हणाले, 'समीरने कोणत्याही इंजिनी​अरिंगची पदवी घेतलेली नाही. मोबाइल दुरूस्तीवेळी सीमकार्ड काढून घेतली जातात मग ३१ सीमकार्ड त्याच्याकडे कशी आली? सीमकार्ड ही इ डायरी आहे. पानसरे हे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या खुन्यांना पकडण्यासाठी दबाव येत असल्याने समीरला अटक केल्याचा दावा चुकीचा आहे. सध्या पोलिस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात गुंतले आहेत. त्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ३१ सीमकार्ड साधकांची आहेत. 'लई पाप झाले आहे. कुंभमेळ्यात दोन डुबक्या मारतो,' म्हणणाऱ्या समीरच्या दोन डुबक्याचा अर्थ काय आहे, याचा तपास पोलिसांना करायचा आहे.'

आवाजाचे नमुने जुळले

समीर गायकवाड व ज्योती कांबळे यांच्या आवाजाचे नमुने जुळले असल्याचा अहवाल पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबने पाठवला आहे. पोलिसांना ठोस पुरावा मिळाला आहे. समीर आणि ज्योतीचे मोबाइलवरील संभाषण आणि या दोघांच्या आवाजाचे नमुने जुळले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीच्या दणदणाटात बाप्पाला निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, पाय थिरकरण्यास लावणाऱ्या साउंड सिस्टिम, त्या तालावर सुरु असणारे डान्स ग्रुप व कार्यकर्त्यांचे डान्स आणि हा माहौल अनुभवण्यासाठी रस्त्यांवर लोटलेला जनसागर अशा जल्लोषी वातावरणात येथील गणेशविसर्जन मिरवणुकीला रविवारी प्रारंभ झाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पंचगंगा नदी व रंकाळा तलावाजवळील इराणी खणीमध्ये ६१२ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पोलिस प्रशासनाने डॉल्बीमुक्ती तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या आवाहनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मात्र धाब्यावर बसवले. मिरवणुकीत मंडळ पुढे घेण्यावरुन मिरजकर तिकटी येथे वाद झाले.

शाहू मैदानजवळ तुकाराम माळी तालीम मंडळाचा मानाच्या गणपतीचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर वैशाली डकरे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उन्हाच्या प्रचंड तडाख्यातही अनेक मंडळांनी मिरवणुकांना प्रारंभ केला. सकाळी मिरवणूक मार्गावर असणारी सर्वच मंडळांकडे डॉल्बी​सारख्या साउंड सिस्टिम नव्हत्या. झांज पथक, धनगरी ढोल, नाशिक बाजा या वाद्यांच्या गजरात मंडळे पुढे सरकत होती. या मंडळांमध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता. अनेक ​मंडळांमधील महिलांनी फेटा परिधान करुन ​मिरवणूक मार्गावर ​ठिकठिकाणी झिम्मा, फुगडीचे फेर धरले होते. जयविजय मित्र मंडळाने वारकरी पथकच मिरवणुकीत आणले होते. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ व शाहूपुरीतील शिवतेज मंडळांना डॉल्बी सिस्टिम असलेल्या मंडळांपुढे पोलिसांनी जाऊ न दिल्याने त्यांनी मिरवणुकच थांबवली. ते सोमवारी मिरवणुकीला सुरुवात करणार आहेत‍‍.

दुपारी चार वाजेपर्यंत महाद्वार रोडवर अगदी एखाद दुसरे मंडळ येत होते व गर्दीही कमी होती. त्यावेळी पोलिसांनी मोठया मंडळांना मिरवणूक मार्गावर नेण्यासाठी काहीही हालचाल केली नाही. नंतर मात्र लेसर शो व अन्य लाईट इफेक्ट तसेच डॉल्बी सिस्मिट असणाऱ्या मंडळांनी महाद्वारा रोडवरील मुख्य मिरवणूक मार्गावर येण्यास सुरुवात केली. या प्रकारची ताराबाई रोड, न्यू महाद्वार रोड व मिरजकर तिकटी रोडवर जवळपास तीसहून अधिक मंडळे होती. त्यातील काही मंडळांना पोलिसांनी लवकर पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले. रात्रभर ही मंडळे महाद्वार रोडवर होती. त्यांच्या डॉल्बी सिस्टिमसारख्या यंत्रणेने मुख्य मिरवणूक मार्ग दणाणून सोडला. या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना कानात घालण्यासाठी कापूस दिले. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी मंडळांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात मिरवणुकीत वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, पाय थिरकरण्यास लावणाऱ्या साउंड सिस्टीम, त्या तालावर सुरु असणारे डान्स ग्रुप व कार्यकर्त्यांचे डान्स आणि हा माहौल अनुभवण्यासाठी रस्त्यांवर लोटलेला जनसागर अशा जल्लोषी वातावरणात येथील गणेशविसर्जन मिरवणुकीला रविवारी प्रारंभ झाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पंचगंगा नदी व रंकाळा तलावाजवळील इराणी खणीमध्ये ६१२ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पोलिस प्रशासनाने डॉल्बीमुक्ती तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या आवाहनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मात्र धाब्यावर बसवले. मिरवणुकीत मंडळ पुढे घेण्यावरून मिरजकर तिकटी येथे वाद झाले.

शाहू मैदानजवळ तुकाराम माळी तालीम मंडळाचा मानाच्या गणपतीचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर वैशाली डकरे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उन्हाच्या प्रचंड तडाख्यातही अनेक मंडळांनी मिरवणुकांना प्रारंभ केला.

सकाळी मिरवणूक मार्गावर असणारी सर्वच मंडळांकडे डॉल्बी​सारख्या साउंड सिस्टीम नव्हत्या. झांज पथक, धनगरी ढोल, नाशिक बाजा या वाद्यांच्या गजरात मंडळे पुढे सरकत होती. या मंडळांमध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता. अनेक ​मंडळांमधील महिलांनी फेटा परिधान करुन ​मिरवणूक मार्गावर ​ठिकठिकाणी झिम्मा, फुगडीचे फेर धरले होते. जयविजय मित्र मंडळाने वारकरी पथकच मिरवणुकीत आणले होते. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ व शाहूपुरीतील शिवतेज मंडळांना डॉल्बी सिस्टीम असलेल्या मंडळांपुढे पोलिसांनी जाऊ न दिल्याने त्यांनी मिरवणुकच थांबवली. ते सोमवारी मिरवणुकीला सुरुवात करणार आहेत‍‍.

दुपारी चार वाजेपर्यंत महाद्वार रोडवर अगदी एखाद दुसरे मंडळ येत होते व गर्दीही कमी होती. त्यावेळी पोलिसांनी मोठया मंडळांना मिरवणूक मार्गावर नेण्यासाठी काहीही हालचाल केली नाही. नंतर मात्र लेसर शो व अन्य लाईट इफेक्ट तसेच डॉल्बी सिस्मिट असणाऱ्या मंडळांनी महाद्वारा रोडवरील मुख्य मिरवणूक मार्गावर येण्यास सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीचे बजेट लाखोंच्या घरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सवात बाजारपेठेत कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल झाली. श्रींची मूर्ती प्रतिष्ठापना ते भव्य मंडप, अत्याधुनिक डॉल्बी, साउंड सिस्टीम, आकर्षक लाइट इफेक्ट, डीजे, नृत्य पथके आदीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. महापालिका निवडणूकीची झालर सार्वजनिक तरुण मंडळांवर राहिली. त्याचा परिणाम म्हणून 'होऊ दे खर्च' अशी भूमिका मंडळानी घेतल्याने या वर्षीच्या मिरवणुकीत लाखो रुपयांचा खर्च मुक्तहस्ताने करण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापनेपासून खर्चाची सुरुवात झाली. काही मंडळांनी पाच फूटापासून ते पंधरा फूट उंच आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्या. इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळीनी यासाठी आवर्जून खर्च दिला. देणगी मूर्तीत अनेक इच्छुक उमेदवारांची नावे झळकली. काही मंडळानी भव्य मंडपाची उभारले. त्यासाठीही तीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी काही मंडळांना डॉल्बीचा दणदणाट केला. त्यासाठी उमेदवारांनी अनेक मंडळांना स्पॉन्सर केले. घरगुती गणपती विसर्जनानंतर प्रत्येक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले. मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी फेटे, ड्रेसकोड, श्रीं च्या मूर्तीसाठी केलेले आकर्षक रोषणाई, फुलांनी केलेली सजावट, पारंपारिक वाद्यांत ढोलताशे, धनगरी ढोल, लेझीम पथक यासह डॉल्बीचा दणदणाट राहिला. इंटरनॅशनल लेझर लाइट, साऊंड अॅण्ड शो वुईथ डीजे लिसजॅक, साऊंड वुईथ एलईडी वॉल, रॉजर साऊंड वुईथ डी. जे. लेमन, मेजर एसपी साऊंड वुईथ डीजे बॅजीओ, इंटरनॅशनल फिमेल डीजे, मार्टिन साऊंड अॅण्ड लाइट स्क्रीन, न्यू कॅपिटल साऊंड वुईथ लाइट शो, आर.डी साऊंड, लाइट शो, वॉटर डान्ससाठी कोट्यावधी रुपयांचे खर्च केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरचा मुक्काम सबजेलमध्ये

$
0
0

सबजेल परिसरात कडक पहारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी बिंदू चौक सब जेलला करण्यात आली आहे. त्यामुळे आता समीरच्या मुक्कामाचे ठिकाण बिंदू चौक सबजेल आहे.

संशयित आरोपी समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केल्यानंतर १६ सप्टेंबरला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. समीरला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांसह एनआयए, सीबीआय आणि कर्नाटक पोलिसांनीही त्याची कसून चौकशी केली. २३ सप्टेंबरला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी तपासकामासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी समीरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. २६ तारखेला पुन्हा समीरला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी समीरचे मोबाइलवरील संभाषण तापासून आणखी काही संशयितांची चौकशी केली. सोमवारी पुन्हा समीरला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, पण त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने समीरची रवानगी बिंदू चौक सबजेलला करण्यात आली आहे.

गेले १२ दिवस समीरचा मुक्काम जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात होता. सर्व तपास यंत्रणांनी याच ठिकाणी त्याची कसून चौकशी केली. आता मात्र चौदा दिवस समीरचा मुक्काम बिंदू चौक सबजेलमध्ये असणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सबजेल प्रशासनाने जेलच्या बाहेर आणि आतही बंदोबस्तात वाढ केली आहे, त्यामुळे सशस्त्र पोलीसांचा कडक पहारा या परिसरात आहे.

बंदोबस्तात वाढ

संशयित आरोपी समीर गायकवाड याला कोर्टात हजर करताना दोनशे पोलिसांचा कडेकोट बंदबस्त तैनात केला होता. कोल्हापूर पोलिस, राज्य राखीव पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिसांसह अधिकारी कोर्ट परिसरात उपस्थित होते. समीरला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर बिंदू चौक सबजेलमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलांची कोर्टात खडाजंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पानसरे कुटुंबियांच्यावतीने अॅड. विवेक घाटगे युक्तीवाद करण्यास उभे राहताच संशयित समीर गायकवाड यांचे वकील समीर पटवर्धन व एम.एम. सुहासे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर हिंदू विधिज्ञ परिषद व पानसरे कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आलेल्या वकिलांची न्यायालयात चांगलीच खडाजंगी उडाली.

घाटगे यांनी आपण पानसरे कुटुंबियांची बाजू मांडत असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगितले. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे या ७० वर्षांच्या असून त्यांना आपल्या पतीला कोणी व का मारले हे प्रश्न विचारायचे आहेत. पोलिस व संशयित गायकवाड या दोघांच्या वादात आम्हाला पडायचे नाही, असे त्यांनी सांगितले. अॅड. घाटगे हे सरकारी अभियोक्तांना मदत करू शकतात पण युक्तीवाद करू शकत नाही असा आक्षेप पटवर्धन यांनी घेताच संशयित गायकवाड याच्याकडून दोन वकिल युक्तीवाद करतात तर पानसरे यांच्यावतीने युक्तीवाद करण्यास काय हरकत असा सवालही घाटगे यांनी विचारला. त्यावर कायद्याने युक्तीवाद करता येणार नाही. तुम्ही लेखी म्हणणे द्या, असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांनी घाटगे यांना सांगितले.

संशयित हा सनातन संस्थेचा प्रमुख साधक आहे. साधकाने साधना करायवयाची असते की फक्त मोबाइल दुरूस्त करायचे असतात. मडगाव बॉम्बस्फोटामध्ये संस्थेचा स्पष्ट हात दिसून आला आहे. ठाणे येथील स्फोटात दोघांना जन्मठेप झाली आहे. संशयितांचे वकील न्यायालयात एक बाजू सांगतात व दुसरीकडे शाहू स्मारकमध्ये पत्रकार परिषदेत जाऊन संस्थेच्या कामाची वेगळीच माहिती सांगतात. संस्थेच्या कामाच्या दोन्ही बाजू आल्या पाहिजेत. संस्थेच्या या पूर्वीच्या कारवाईची माहिती न्यायालयीन कामकाजात येत नाही. लेखी निवेदन असो व तोंडी यात फरक काय पडतो असा प्रश्न पानसरे कुटुंबाकडून विचारला जात आहे, असा युक्तीवाद घाटगे यांनी केला. पण न्यायालयाने त्यांच्या युक्तीवादाची नोंद घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० वकिलांनी घेतले पानसरेंचे वकीलपत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येसंबंधी खटल्यात फिर्यादीच्या बाजूने इस्लामपूर बार असोसिएशनच्या ७० वकिलांनी सोमवारी वकिलपत्र घेतले, तर अन्य २०० वकिलांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती सोमवारी बार असोसिएशनचे सदस्य अॅड. शमशुद्दीन संदे व अॅड. अरविंद मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. बार असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन पवार यांनी बार असोसिएशनचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

इस्लामपूर येथील विद्रोही सांस्कृतीक चळवळ, अंधश्रध्दा निर्मुलन समिती व इतर सर्व पुरोगामी संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इस्लामपूर शहरातील सर्व वकिलांनी एकमुखी निर्णय घेवून कॉ. पानसरेंच्या खटल्यात फिर्यादीच्या बाजूने लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या वकिलपत्रावर अॅड. शमशुद्दीन संदे, अॅड. अरविंद मोहिते, अॅड. जे. एम. जमादार यांच्यासह ७० वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणखी २०० वकिलांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले, 'यापुढे सनातनवाल्यांनी कोणत्याही क्षेत्रात हस्तक्षेप केला तर त्यांची जागा त्यांना दाखवून देवू. त्यांना मनुस्मृतीचे राज्य आहे असे वाटते. न्यायव्यवस्था आपली घरची आहे अशा समजाने ते वावरत आहेत. त्यांच्या वकिलांचे ते वक्तव्य बेताल आणि मर्यादा सोडून आहे. इस्लामपूर आणि राज्यभरातील वकीलमित्रांनी कॉ. पानसरेंच्या बाजूने उभा राहणे हे सनातन्यांना दिलेले चांगले उत्तर आहे.'

प्राध्यापक एल. डी. पाटील म्हणाले, 'सनातन्यांनी मांडलेली त्यांची बाजू अत्यंत टोकाची आहे, दहशतवादी स्वरूपाची आहे. सुरवातीला समीर गायकवाड हा एकटाच आहे असे वाटत होते. मात्र पुनाळकर सारखा वकील ३०-३० वकिलांची फौज उभा करतो म्हणजे हे मोठे षडयंत्र आहे. हुतात्मा झालेल्यांच्या बाजूने लोक उभे राहतात. दहशतवादाला भिक घालत नाहीत हे वकीलमित्रांच्या पुढाकारातून दिसून आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगसाठी कोर्टात अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड याची ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यासाठी पोलिसांच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.२९) या अर्जाबाबत सुनावणी होणार आहे.

समीर गायकवाड याला टेक्निकल सर्व्हेनन्सव्दारे त्याच्या मोबाइलवर लक्ष ठेऊन अटक केली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या २३ मोबाइल व ३१ सीमकार्डव्दारे तपास सुरू केला आहे. समीर तपासाला पहिल्यापासून सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी सुरवातीपासून शास्त्रीय दृष्टीकोनातून तपास सुरू केला आहे. समीर व त्याची मैत्रीण ज्योती कांबळे यांच्यातील संभाषणाची चाचणी सीबीआयच्या मानसोपचार तज्ज्ञांच्यावतीने करण्यात आली असून संभाषणातील आवाजाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची मानसिक तपासणी करण्यासाठी गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबची टीमही दोन दिवस कोल्हापुरात तपासासाठी होती. समीरला प्रश्न विचारून त्यावर ही टीम तपास करणार आहे.

समीरची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याचा​ निर्णयही विशेष तपास पथकाने घेतला आहे. सोमवारी समीरला न्यायालयात हजर केले असताना पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी अमान्य करत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर पोलिसांच्यावतीने ओळख परेड घेण्यासाठी व ब्रेन मॅपिंग टेस्टसाठी न्यायालयात अर्ज देण्यात आले. ओळख परेडची मागणी न्यायालयाने मान्य केली असून ब्रेन मॅपिंग टेस्टींगसाठी मंगळवारी कोर्टात सुनावणी होणार आहे.

उमा पानसरे यांना ओळख परेडसाठी बोलावणार

कोर्टाने समीर गायकवाड याची ओळख परेड घेण्याची मागणी मान्य केली. करवीरचे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करवीर तहसिलदार यांच्यासमोर ओळख परेड होणार आहे. संबधित साक्षीदारांना ओळख परेडसाठी बोलावले जाते. पानसरे हत्याप्रकरणात त्यांच्या पत्नी उमा पानसरे या प्रमुख साक्षीदार होत्या. त्यामुळे त्यांना ओळख परेडसाठी बोलावण्यात येणार आहे. उमा पानसरे यांची तब्येत सध्या ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या ओळख परेडला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनी विरुद्ध पुरोगामी

$
0
0

Udhav.Godse@timesgroup.com

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी पोलिसांनी समीर गायकवाड या संशयित आरोपीस अटक केल्याने पानसरे हत्येचा उलगडा होईल अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र या प्रकरणी फिर्यादी आणि संशयित आरोपी या दोन्ही बाजूंनी कोर्टासह बाहेरही शक्तीप्रदर्शन सुरू झाल्याने या प्रकरणाला सनातनी विरुद्ध पुरोगामी असे स्वरुप प्राप्त झाले आहे.

कॉ.पानसरे यांची हत्या झाल्यानंतर पानसरे कुटुंबीयांसह पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेवर संशय व्यक्त केला होता. हत्येच्या पहिल्या दिवसापासूनच पुरोगामी संघटनांनी सनातन संस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने सनातन संस्थेच्या बचावासाठी हिंदुत्ववादी संघटना सरसावल्या होत्या. डॉ. भारत पाटणकर यांना सनातनच्या नावे धमकीचे पत्र आल्यानंतरही पुरोगामी संस्थांनी कोल्हापुरातील सनातनच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते, तेव्हा सनातनच्या समर्थनार्थ अनेक हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या होत्या. तेव्हाही शहरात पुरोगामी विरुद्ध सनातनी असे चित्र निर्माण झाले होते. पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला अटक करताच पुन्हा सनातनी आणि पुरोगामी असा संघर्ष उफाळून आला आहे.

कॉ. गोविंद पानसरे हे जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य होते, त्यामुळे त्यांच्या हत्येतील संशयिताचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय जिल्हा बार असोसिएशनने घेतला होता. हेच निमित्त पुढे करून हिंदू विधिज्ञ परिषद समीरच्या मागे भक्कमपणे उभी राहिली आणि पत्रकार परिषद घेऊन संशयित समीर गायकवाड निर्दोष असल्याचा दावा केला. समीरसह सनातनच्या साधकांना पोलिसांनी तपास कामात गोवल्यास त्यांच्या पाठिशी वकिलांची फौज उभी करू असा इशाराच त्यांनी दिला. हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील आणि सनातन संस्थेसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही कोर्ट परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इशाऱ्यानंतर कोल्हापूसह सांगलीतून दोनशेहून अधिक वकिलांनी फिर्यादीच्या बाजूने वकीलपत्र घेण्याचे जाहीर केले. जिल्हा बार असोसिएशनच्या २५ ते ३० वकिलांनी थेट युक्तीवादातही सहभाग घेतला. त्यामुळे कोर्ट कामकाजातही संशयित आरोपीच्या बाजूने सनातनी आणि फिर्यादीच्या बाजूने पुरोगामी असे चित्र निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही कोर्ट आवारात हजेरी लावून शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे कोर्टाबाहेरही पुरोगामी विरुद्ध सनातनी असा सामना रंगू लागला आहे.

फिर्यादी आणि संशयित आरोपीचे समर्थक आपआपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण या सगळ्यात दोन्ही बाजुंनी संघर्ष वाढत असल्याने पानसरे हत्या प्रकरणातील तपासाला पुरोगामी विरुद्ध सनातनी असा रंग चढू लागला आहे. 'कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होईल असे कोणतेही कृत्य आम्ही केलेले नाही. कॉ. पानसरेंवरील प्रेमापोटी काही कार्यकर्ते कोर्ट परिसरात उपस्थित असतात. तपास यंत्रणा गतीमान रहाव्यात अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे काही कार्यकर्ते सुनावणीदरम्यान उपस्थित असतात.

- रघुनाथ कांबळे, कार्यकर्ते, भाकप

'कॉ. पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. तो निर्दोष असल्याचा आमचा दावा कायम आहे, त्यामुळे त्याच्या बचावासाठी हिंदू विधिज्ञ आणि हिंदुत्ववादी संघटना पुढे येण्यात गैर काहीच नाही.

- अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, सदस्य, हिंदू विधिज्ञ परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीची कसोटी

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

कोल्हापूरः महापालिकेच्या राजकारणात आतापर्यंत शिवसेना व भाजपची ताकद नगण्य होती, त्यामुळे दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने चांगली बाजी मारली. ताराराणी आघाडीला बाजूला करत हसन मुश्रीफ, विनय कोरे व सतेज पाटील यांनी महापालिकेवर झेंडा फडकवला. आता मात्र भाजप-सेनेची राज्यात असलेली सत्ता व ताराराणी आघाडीबरोबर केलेली महायुती या पार्श्वभूमीर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची प्रथमच कसोटी लागणार आहे. सतेज पाटील यांना एकाकी झुंज द्यावी लागणार असून, मुश्रीफ यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

ताराराणी आघाडी थेट निवडणुकीत कधीही भाग घेत नव्हती. अनेकांना मदत करायची आणि निवडून येईल त्याला ताराराणी आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आणायचे हा आमदार महादेवराव महाडिक यांचा फॉर्म्युला होता. त्यानुसार सतरा वर्षे त्यांनी महापालिकेत एकहाती सत्ता उपभोगली. पण दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि जनसुराज्यने ताकदीने महापालिका निवडणूक लढवत ताराराणी आघाडीला आव्हान दिले. काँग्रेसच्या झेंड्याखाली असलेल्या ताराराणी आघाडीला खिंडार पाडत महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. या सर्व प्रक्रियेत शिवसेना व भाजपची ताकद कमी असल्याने त्यांना कुठेच स्थान मिळाले नाही.

पाच वर्षांपूर्वी दोन्ही काँग्र्रेसमध्येच लढत झाली. निकालानंतर हे पक्ष एकत्र आले. सेना-भा​जपला अतिशय कमी जागा मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही. गेल्या पंचवीस वर्षांत या दोन पक्षांची महापालिकेत ताकद कमी असल्याने काँग्रेसला बहुमत मिळवणे सोपे झाले. आता मात्र दोन्ही काँग्रेसला प्रथमच ही निवडणूक जड जाणार आहे. नव्या समीकरणात काँग्रेसला आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात लढावे लागणार आहे. राज्यात भाजप-सेनेची सत्ता आहे. यामुळे प्रथमच आ​र्थिक मदत चांगली होणार आहे. जे आजपर्यंत होत नव्हते, त्याची झलक भाजपने दाखविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला विधानसभेत घवघवीत यश मिळाले असल्याने या पक्षाची शहरात हवा आहे. पक्षात गटबाजी कायम असली तरी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याच हातात निवडणुकीची संपूर्ण सूत्रे एकवटल्याने त्याचाही फायदा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे आमदार महाडिक यांनी ताराराणी आघाडीला खांद्यावर घेतले आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा महापालिकेशी फारसा संबंध नाही. मालोजीराजे अलिप्त राहिले आहेत. हातात राज्याची सत्ता नाही, त्यामुळे सतेज पाटील एकाकी पडले आहेत. यामुळे पाटील यांची आता खरी कसोटी लागणार आहे. हीच अवस्था मुश्रीफ यांची झाली आहे. खासदार धनं​​जय महाडिक यांनी हात वर केल्याने मुश्रीफांना एकाकी किल्ला लढवावा लागत आहे. शिवाय सत्ता नसल्याने आर्थिक झरे आटले आहेत. त्याचा परिणाम खर्चावर होणार आहे. दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने चांगलाच हात सैल सोडल्याने त्यांच्या जागा वाढल्या. आता जनसुराज्यची हवा विरली आहे. कोरे यांचा करिश्मा संपल्याने प्रा. जयंत पाटील व राजेश लाटकर या दोन कारभाऱ्यांच्या जिवावर राष्ट्रवादीची व्यूहरचना आखली जात आहे. महाडिक गटाची छुपी मदत मिळणार नसल्याने राष्ट्रवादीला प्रथमच स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. याउलट राज्यात भाजप-सेनेची सत्ता आल्याने व ताराराणी आघाडीने भाजपच्या हातात हात दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाडिक गटाची ताकद आणि आर्थिक मदत यामुळे भाजपला प्रथमच सत्तेची स्वप्ने पडत आहेत.

कारभाऱ्यांसमोर आव्हान

सध्या सर्वच पक्षांच्या निवडणुकीची सूत्रे नेत्यांच्या बरोबरीने कारभाऱ्यांच्या हातात आहेत. त्यामुळे या कारभाऱ्यांसमोर यशस्वी होण्याचे आव्हान आहे. काँग्रेसचे शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रा. जयंत पाटील व राजेश लाटकर, तर ताराराणी आघाडीचे सुहास लटोरे, सुनील मोदी व सुनील कदम हे कारभारी सध्या निवडणुकीची सूत्रे हलवत आहेत. शिवसेनेच्या हालचालींवर शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस हे लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

कोल्हापूरः डॉल्बीच्या आवाजाच्या धक्क्याने बाबूजमाल दर्ग्याजवळ राजारामपुरीतील तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान त्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. वैभव आदिनाथ ऐनापुरे (वय ३२, रा. राजारामपुरी)असे त्याचे नाव आहे. वैभव मित्रांसोबत मिरवणूक पाहण्यासाठी गेला असता, त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला ता‌तडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले असता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, बहीण, चुलते असा परिवार आहे.

रात्री साडेअकराच्या सुमारास तो बाबूजमाल दर्ग्याजवळ आला असता काही काळ तेथे एका दुकानाच्या पायरीवर बसला. त्याचवेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रथमोपचार करत त्याला तातडीने रंकाळवेसमार्गे सीपीआरमध्ये आणले. त्यावेळी उपचार सुरू असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्षाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार करणे आवश्यक असल्याने पुढील पंधरा दिवसात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारामध्ये बाराजणांना मंत्रीपदाची संधी देण्यात येणार असून त्यामध्ये एक मंत्रीपद आरपीआय (आठवले) गटाला मिळेल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री पाटील यांच्या घोषणेमुळे मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. पाटील यांच्या या घोषणेने सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय शिवसेनेच्या जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला संधी मिळेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.शाहू स्मारक येथे आरपीआयच्या (आठवले गट) निर्धार मेळावा झाला.

पाटील म्हणाले, 'आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले दिल्ली सोडण्यास इच्छूक नसल्याने, त्यांच्या गटातील कोणाला मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय प्रलंबित आहे. एक वर्षाच्या आत मंत्रीमंडळाचा विस्तार करणे गरजेचे असल्यामुळे पंधरा दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीआधी निवडणूक धमाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक नोव्हेंबर रोजी मतदान होत असून दोन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत. सोमवारच्या मध्यरात्रीपासून महापालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या एकूण ८१ प्रभागासाठी ही निवडणूक होत आहे. ४,५२,९०८ इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना, ताराराणी आघाडी-भारतीय जनता पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी हे चारही प्रमुख पक्ष ताकतीनिशी निवडणुका लढविणार असल्याने येते महिनाभर प्रचाराचे घमासान रंगणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी दुपारी चार वाजता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिका प्रशासनानेही तत्काळ हालचाली गतीमान करत अ​​धिकाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना करतानाच निवडणुकीसाठी सात विभागीय कार्यालये मंगळवारपासून सुरू होतील असे स्पष्ट केले. सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली. पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या मोटारी, मोबाइल सेवा काढून घेतल्या जातात. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, 'राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. सात विभागीय कार्यालयामार्फत निवडणुकीचे कामकाज होणार आहे. सात विभागीय कार्यालयासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सोबतील महापालिकेची यंत्रणा निवडणुकीत कामात असेल.' निवडणुकीसाठी उलपे हॉल कसबा बावडा, नागाळा पार्क हॉल, ताराराणी मार्केट, जगदाळे हॉल राजारामपुरी, दुधाळी पॅव्हेलियन, गांधी मैदान कार्यालय, ध्यानचंद हॉकी स्टेडियम ही सात विभागीय निवडणूक कार्यालय असतील. मंगळवारपासून येथील कामकाज सुरू होणार आहे.

सर्वच पक्षांमध्ये चढाओढ

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी निश्चिती, प्रचाराची रणनिती आखण्यात आली आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत नियोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व जनसुराज्य शक्ती पक्षाने सोमवारी सायंकाळी ९ उमेदवारांची नावे जाहीर केली. यापूर्वी राष्ट्रवादी जनसुराज्य आघाडीने ४१ जणांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने १८ जणांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहेत.

अर्जासोबतच जातीचे प्रमाणपत्र

आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणीकरिता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागेल. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कायद्यातील बदलामुळे आत्महत्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बॉम्बे अॅक्टमध्ये दुष्काळ या शब्दाचा अतंर्भाव होता, मात्र १९६३ च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करुन दुष्काळ ऐवजी टंचाई शब्दाचा वापर केला. कायद्यामध्ये झालेल्या बादलामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागूनही सरकारी निकषामध्ये मदत मिळत नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्तेच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे मत शेती तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. कामाची जबाबदारी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत असून यामध्ये महसूल विभागावर असल्याचा आरोप मुळीक यांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या.

डॉ. मुळीक म्हणाले, 'बॉम्बे अॅक्टमुळे दुष्काळ किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये कर्जांची पुनर्रचना होत होती. मात्र नंतर झालेल्या कायद्यातील बंदलामध्ये दुष्काळा ऐवजी टंचाई शब्दाचा अतंर्भाव करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणारे खावटी कर्ज देणे बंद झाले. कायद्यामध्ये बदल करताना तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात न आल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. टंचाईमध्ये केवळ कृषी उत्पन्नाचा समावेश केला गेला. यामध्ये फळबागा व पशूपालनाचा समावेश नसल्याने पशूधन पालक व फळबागायतदार शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली. '

'प्रशासकीय पातळीवर झालेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्तेमध्ये वाढ होत आहे. मात्र ज्या विभागात सहकार क्षेत्राचे जाळे घट्ट आहे, त्याठिकाणी तुलनेने आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. मुळीक यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शेती पदवीधर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, डॉ. जी. पी. पाटील, विजय भोसले, डॉ. नामदेव मदने, डॉ. एन. बी. जांभळे, अरुण मराठे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील तलाव तहानलेले

$
0
0

udaysing.patil@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक असली तरी बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याची तहान अवलंबून असणारे जिल्ह्यातील लघूपाटबंधाऱ्यांची अवस्था खूपच भयावह आहे. जिल्ह्यातील ५३ पैकी केवळ १९ तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सर्व तलावांमधील पाणीसाठा ७३ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. चंदगड तालुक्यातील १३ पैकी ६ तलाव भरले आहेत. मात्र चार तालुक्यातील २० पैकी एकही तलाव भरलेला नाही.

जिल्ह्यातील १४ धरणांपैकी एक अपवाद वगळता सर्व धरणांमधील पाणीसाठा ७० टक्क्यांवर आहे. त्यामुळे हा पाणीसाठा समाधानकारक आहे, असे मानले जात आहे. यातील पाण्यांवर त्या त्या नदीकाठची गावे अवलंबून असतात. त्यांना पाण्याची चिंता करण्याची फार गरज भासणार नाही. पण ज्या भागात नदी किंवा धरणांचे पाणी मिळणार नाही. तिथे लघु पाटबंधारे तलाव, कालवे, विहिरी फार महत्त्वाच्या असतात. तसेच विहिरींची संख्या असली तरी त्यावर पूर्ण गाव अवलंबून राहू शकत नाही.

मात्र लघु पाटबंधारे तलावावर त्या परिसरातील अनेक गावे अवलंबून राहतात. तेथील पाण्याचा साठा जवळपास पुढील वर्षभरासाठी उपयोगी पडत असतो. अनेक ठिकाणी त्यावर पिण्याच्या पाण्याची योजना राबवलेली असते. काही तालुक्यातील तलावांची अवस्था चांगली असली तरी इतर तालुक्यांतील तलावाच्या परिसरातील गावांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणीला २० जणांची हजेरी

$
0
0



आठ ऑक्टोबरला पुढील तारीख, महिनाअखेर अहवाल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या २२ जणांना लवाद व करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी नोटीस बजावली होती. यापैकी २० जणांनी मंगळवारी वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. अपुरी कागदपत्रे असल्याने त्यांनी पुढील तारखेची मागणी केली. यानुसार सर्व जबाबदार व्यक्तींना आठ ऑक्टोबर सुनावणीची अखरेची तारीख दिली आहे. या सुनावणीनंतर लवाद, मालगावे ऑक्टोबरअखेर सर्वांवर जबाबदारी निश्चित करुन आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे सादर करणार आहेत.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या २२ संचालक व सचिव यांना शुक्रवारी (ता.१२) लवाद प्रदीप मालगावे यांनी नोटीस बजावली आहे. माजी सभापती दिनकर कोतेकर, माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, विद्यमान संचालक नंदकुमार वळंजू, निवृत्त सचिव संपतराव पाटील यांच्यासह २२ संचालक व सचिवांवर समितीचे २६ लाख ७५ हजार २६१ रुपयांचे नुकसान केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. नोटिसवर संचालक व सचिवांना म्हणणे मांडण्याची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत दिली होती.

यापैकी विद्यमान संचालक नंदकुमार वळंजू वगळता ठपका ठेवलेले सर्व संचालक सचिव वकिलांच्या लव्याजम्यासह हजर झाले होते. मात्र म्हणणे मांडण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने त्यांनी सुनावणीसाठी पुढील तारखेची मागणी केली. यानुसार ठपका ठेवलेल्या २२ जणांना आठ ऑक्टोबरची अखरेची तारीख दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींना शिस्तभंगाचा धसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातलेल्या पाच शिक्षक सभासदांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा धसका कारवाईला सामोरे जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या तीन संघटनांच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे 'पुन्हा असे होणार नाही, एकदा संधी द्या,' अशी विनवणी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेला करण्यात येणार आहे.

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही शिक्षकांनी गोंधळ घातला. त्याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षक सभासदांच्या चौकशीचे आदेश दिले. त्याबाबत आजरा, गडहिंग्लज आणि राधानगरी गटशिक्षणाधिकाऱ्यांची त्रिस्तरीय समिती नेमली. चौकशी समितीने ३८ शिक्षक सभासदांची चौकशी करुन गोंधळास कारणीभूत असलेल्या पाच शिक्षकांवर ठपका ठेवला आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, झटापट, खुर्च्या फेकणे, सभासदांना चप्पल दाखविण्याचा प्रकार केल्याचा समितीने अहवाल दिला. जिल्हा परिषदेच्या झालेल्या सभेत जिल्हा परिषदेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत पाच शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा दिला आहे.

कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी सावध पवित्रा घेत नरमाईची भूमिका घेतली आहे. कारवाईची टांगती तलवार असल्याने बँकेच्या राजकारणात असलेल्या संभाजीराव थोरात, ए. के. पाटील आणि राजाराम वरुटे यांच्या गटातही अस्वस्थता आहे. यापुढील वार्षिक सभा दंगाविरहित होण्याचे लेखी आश्वासन देण्यात येणार आहे. बँकेत सत्ताधारी असलेल्या प्राथमिक शिक्षक संघाचे रामचंद्र बचाटे (अध्यापक वि.मं. सडोली दुमाला), प्रकाश पाटील (अध्यापक वि. मं. धोंडेवाडी), प्राथमिक शिक्षक समितीचे सुरेश कोळी (वि. मं. सावरवाडी) विनायक चौगले (वि. मं. सोनाळी) आणि पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तुषार पाटील (वि. मं. आरळे) या शिक्षक सभासदांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई रोखण्यासाठी शिक्षक संघटनांचे नेते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनवणी करणार आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांवर होणारी कारवाई अटळ असल्याने या शिक्षक सभासदांनी नरमाईची भूमिका घेत सीइओंची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या शिक्षक सभासदांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी

शिक्षक सभासदांवर कारवाई करु नये, अशी विनंती यापूर्वीही केली होती. वार्षिक सभेच्या गोंधळात अशी घटना होऊ शकते. त्यासाठी कोणत्याही शिक्षकांवर कारवाई करु नये. त्याबाबत जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा विनंती करण्यात येणार आहे.

- राजाराम वरुटे, नेते, प्राथमिक शिक्षक संघ

बँकेच्या सभेत काही घटना अनावधाने झाल्या आहेत. त्याचा फटका म्हणून शिक्षकांवर कठोर कारवाई करु नये. त्यासाठी पुरोगामी संघटना जिल्हा परिषदेला निवेदन देणार आहे.

- प्रसाद पाटील, पुरोगामी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images