Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पार्किंग झोनअभावी कोंडी

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना कागल शहरात कुठेही पार्किंग झोनच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कुणीही उठावे आणि कागलमध्ये कुठेही गाडी पार्क करावी अशीच इथली परिस्थिती आहे. अडथळ्यांचा विचार करता पालिकेने आठवडी बाजाराची जागा बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला असला तरीही दुकान, हॉटेल आणि रस्त्याच्या बाजूला कुठेही आणि कशीही वाहने लावल्याने वादावादी आणि कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. बेशिस्त पार्किंगवर कारवाई झाल्याचे उदाहरणच नसल्याने पादचारी आणि इतर नागरिकही त्रस्त झाले आहेत.

कागल शहरात कोण, कुठे, कसा चालतो याबाबत कोणत्याही नियमाचा अवलंब केलाच जात नाही. खर्डेकर चौकातून पूर्वेला एकेरी मार्गाची मागणी असूनही विरुद्ध दिशेने वाहने अव्याहतपणे चालविली जातात. कॉलेजला जाण्याची आणि येण्याची वेळ तर वाहनांच्या गर्दीत चालणेही अवघड होऊन बसते. कारण फुटपाथवर दुकानदारांचे आणि हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. बसस्थानकाशेजारी खासगी वाहने कशीही लावली जातात आणि प्रवाशांची पळवापळवी केली जाते. कधी कधी बसस्थानकातून बाहेर पडतानाच यातायात करावी लागते. कोल्हापूर शहरालगत आणि हायवेला लागून असल्याने दररोज पंधराशे बसच्या फेऱ्या आणि ४० हजार परवाशी ये-जा करतात. शिवाय तालुक्याचे ठिकाण असल्याने ८६ गावांतील हजारो लोक रोज कागलला येतात. याचा विचार करता पार्किंगच्या बेदिलीला पायबंद घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

काही काही वेळा वाहनधारक रस्त्यातच वाहने पार्क करून निघून जातात. पोलिसांनी कारवाई केलीच तर लोकप्रतिनीधी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे पोलिसही हतबल झाले आहेत.

फुटपाथवरही हातगाडीवाल्यांचा कब्जा

आयआरसीच्या नियमानुसार रस्ते किमान साडेनऊ ते दहा मीटर रुंदीचे हवेत. फुटपाथ बनवताना रस्त्यावरचा पट्टा ते फुटपाथचे अंतर केवळ एकच फुटाचे आहे. तेवढ्यात साधी दुचाकीही पार्क होऊ शकत नाही. त्यातच फुटपाथवर दुकानदार आणि हातगाडीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. बाजाराची जागा बदलली; परंतु तिकडे जायला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे जुना बाजारपेठ रस्त्यावर पादचारी आणि दुचाकीधारकांची बाजाराला ये-जा करण्याची वर्दळ कायम आहे. रहिवाशांनीही रस्त्याबरोबर घरे बांधल्याने वाहनेही रस्त्यावरच पार्क करावी लागतात. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

आयआरसी नियमानुसार कागलचे रस्ते रुंद नाहीत. येथील वाहतुकीचे नियोजन मनुष्यबळ आणि सुविधेसह नगरपालिकेने करावयाचे आहे. परंतु पालिकेने नियमानुसार अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. नियोजन केल्यास प्रश्न मार्गी लागेल.

- निशिकांत भुजबळ, पोलिस निरीक्षक

आम्ही दोन वर्षांपासून आराखडा, ठराव करून हरकती मागवून पार्किंगबाबतची कार्यवाही पूर्ण केली. मान्यताही घेतली आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांकडे प्रस्ताव पाठवून तीनवेळा बैठकाही झाल्या; परंतु पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही.

- प्रभाकर पत्की, मुख्याधिकारी, कागल नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘‌संवाद’ रोखणार आत्महत्या

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

'थ्री इडीयट्स' सिनेमातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांवर असलेल्या तणामुळे 'आय क्विट,' असा संदेश देत अनेकांनी आपल्या जीवनाचा आणि करिअरचा शेवट केला, पण विद्यार्थ्यांनी असा चुकीचा मार्ग अवलंबू नये यासाठी आभास फाउंडेशनच्यावतीने संवाद नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

सध्या शालेय आणि कॉलेजियन्स विद्यार्थी विविध कारणांनी तणावग्रस्त बनत आहेत. अभ्यासाचा तणाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, परीक्षेचा तणाव, कौटुंबिक वाद, एकतर्फी प्रेम प्रकरण, रॅगिंग यांसारख्या कारणांनी जी मुले तणावाखाली राहत आहेत त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जवळच्या व्यक्तिशिवाय दुसरा त्रयस्त पर्याय उपलब्ध नाही, पण जेव्हा जवळच्या व्यक्तींशी बोलण्यापासून संकोच किंवा भीती वाटू लागते तेव्हा समस्येचे स्वरूप अधिकच गंभीर बनते आणि तणाव वाढू लागतो.

तणावाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा मुलांकडून चुकीचे मार्ग निवडले जातात. त्यांना यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग संपलेले आहेत असे वाटू लागते आणि आत्महत्येसारख्या मार्गांचा अवलंब केला जातो. गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुला-मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. तर काही प्रसंगात मुले आक्रमक होऊन इतरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतानाच्या घटना घडताहेत. या सगळ्यावर परिणामकारक उपचार म्हणजे सर्वप्रथम त्या मुलांच्या भावना व्यक्त करू देणे. समाजातील तरूणांची ही गरज ओळखून आभास फाउंडेशनच्या वतीने 'संवाद' हे अभिव्यक्ती व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आभास फाउंडेशन प्रयत्नशील आहे.

शालेय आणि कॉलेजमधील तणावग्रस्त मुला-मुलींसाठी अ‌भिव्यक्तीचे व्यासपीठ ‌मिळावे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. 'संवाद'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ वनमजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

वन विभागाच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ७५ वनमजुरांबाबत निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले असताना येथील अधिकाऱ्यांकडून मात्र नाहक पत्रव्यवहार करुन आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरु आहे. १० ऑगस्टपासून वनमजुरांनी आंदोलन सुरु केले आहे. १४ दिवसानंतरही केवळ पत्रव्यवहार सुरु असल्याने त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

७५ वनमजुरांपैकी १७ निवृत्त झाले आहेत. या सर्वांना निवृत्ती वेतन देण्यात यावे यासाठी १७ मजूर व ४ जणांचे वारस वन कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. पण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले आहे. विनाकारण प्रशासकीय घोळ व पत्रव्यवहार सुरु केला आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचीच अवहेलना होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. याबाबत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार नेते प्रकाश शिंदे यांनी केला आहे.

ज्या खात्यात तीस वर्षाहून अधिक काळ प्रामाणिक नोकरी केली तिथे निवृत्तवेतनासाठी भांडावे लागते. ही दुर्दैवी बाब आहे, अशी आगतिकता ७३ वर्षीय गणपती खांबे व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक यांनी पाठींबा दिला आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही पाठींबा देऊन वन​अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा प्रयत्न करु असे सांगितले आहे. याशिवाय जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, वनपाल वनरक्षक संघटनेचे नंदकुमार घाटगे, व्यंकाप्पा भोसले आदींनीही पाठींबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाला लुटणाऱ्या दोन महिलांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलगा आजारी आहे असे सांगून लिफ्ट मागून मोटारचालकाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या मनीषा परशराम ननवरे व अनिता विलास नाईक (दोघी रा. नेर्ली तामगाव, ता. करवीर) या दोन संशयित महिलांना करवीर पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास पंचगंगा नदी परिसरात ही घटना घडली. सचिन आनंदराव पोलादे (वय ४० रा. मंगळवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली.

सचिन पोलादे हे ताराबाई पार्क येथून साने गुरूजी वसाहत येथे मोटारीने निघाले होते. तोरस्कर चौकात दोन महिलांनी पोलादे यांची मोटार अडवली. आमचे लहान बाळ आजारी असून आम्हाला पंचगंगा हॉस्पिटलजवळ सोडा अशी विनंती केली. त्यानंतर पोलादे यांनी दोन्ही महिला व लहान बाळाला मोटारीत घेतले.

मोटार गायकवाड वाड्याजवळ आल्यावर दोन्ही महिलांनी मोटार थांबवण्यास सांगितली. पोलादे यांनी मोटार थांबवली. तू माझी अब्रू लुटत होता म्हणून ओरडीन अशी धमकी दोन्ही महिलांना पोलादेंना दिली. त्यानंतर पोलादे यांच्या हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, एक मोबाईल व ​पाकिटामधील पाचशे रूपयाची नोट काढून घेतली. त्यानंतर दोनही महिला पळून गेल्या.

यानंतर पोलादे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी घडलेली घटना सांगताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी जुना बुधवार पेठ धाव घेत दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले व अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक करणाऱ्या कंपनीची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दीडपट व दामदुप्पट रक्कमेचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील व्हिजन मिडिया आय टी सेल्युशन या कंपनीच्या कार्यालयाची गुंतवणूकदारांनी मोडतोड केली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

सहा महिन्यापूर्वी व्हिजन मिडियाने शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील शारदा चेंबर्सच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय सुरू केले होते. 'एसएमएस करा आणि दुप्पट रूपये कमवा' अशी योजना कंपनीने केली होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपनीच्या उत्पादनाच्या जाहिरातील एसएमसएसव्दारे पाठवल्यानंतर व्हिजन मिडियाकडून गुंतवणूक करणाऱ्यांना पंधरा दिवसांनी दुप्पट रक्कम मिळायची. युवक, युवती, संगणक प्रशिक्षण करणाऱ्या संस्थांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. प्रारंभी अनेकांना रक्कम मिळाल्यानंतर गुंतवणुकीचा ओघ वाढला होता.

रविवारी सकाळी पंधरा दिवसानंतर अनेक गुंतवणूकदार दाम दुप्पट रक्कम घेण्यासाठी कार्यालयात आले होते. यावेळी व्हिजन मिडियाचे वेणू कृष्णन व वेणु मुरूगम यांच्याशी संपर्क होत नव्हता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही गुंतवणूकधारकांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. कर्मचाऱ्यांच्यात चर्चा सुरू झाली. फसवणूक झालेल्या गुंतवणुकधारकांनी कार्यालयातील साहित्य नेण्यास सुरूवात केली. चिडलेल्या युवकांनी कार्यालयातील काचा फोडल्या. तसेच मोडतोड सुरू केली. ही घटना समजताच शाहूपुरी पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी गुंतवणूकदारांना कार्यालयातून बाहेर काढले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुंतवणूकधारकांनी गर्दी केली होती. कार्यालयात १५ कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांच्यात युवतींची संख्या मोठी होती. त्यांचाही तीन महिने पगार दिलेला नसल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

अशी होती दामदुप्पट योजना

गुंतवणुकदाराने पाचशे रूपये गुंतवणूक केल्यानंतर व्हिजन मिडिया कंपनीकडून मोबाईलवर ५०० रूपयांचा बॅलन्स मिळायचा. त्यानंतर कंपनीकडून आलेल्या नामांकित कंपनीच्या जाहिरातीचे एसएमएस ५०० लोकांना पाठवायचे. एसएसएम पाठवून झाल्यानंतर पंधरा दिवसांनी एक हजार रूपये मिळायचे. जितक्या रक्कमेची गुंतवणूक व्हायची तितके एसएमएस पाठवायचे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपबरोबर युतीसाठी दारे उघडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती व्हावी ही 'मातोश्री'ची इच्छा आहे, असे सांगत युतीसाठी दारे उघडी असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी स्पष्ट केले. भाजप हा शिवसेनेचा मित्रच आहे, अशा शब्दांत राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्तुतिसुमनेही उधळली. राऊत यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मात्र अवाक् झाले.

गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी परस्परांवर भरपूर चिखलफेक केली. त्यातूनच दोन्ही पक्षांनी निवडणूक स्वतत्रंपणे लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यातील वाग्युद्धाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी रविवारी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक मानली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सुरू केलेल्या शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार वैभव नाईक, संपर्क नेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव उपस्थित होते.

राऊत म्हणाले, 'शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात दोन्ही पक्षाबाबत चर्चा होत असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांची युती व्हावी अशी वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत महापालिकेच्या निवडणुकीत युती होण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आमचे सहा आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत. वरिष्ठ नेतृत्व स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आदेश लादत नाही,' असे राऊत म्हणाले.

महागाई कमी होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी पावले उचलली आहेत. स्टील, सिमेंटचे दर कमी आले आहेत. गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली आहे, पण तेही दर कमी येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षेआधी ‘फेल’

$
0
0

मंदार मोरोणे, नागपूर

राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित पायाभूत विकास चाचण्यांचे वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याआधीच कोलमडले आहे. २४ ते ३१ ऑगस्टदरम्यान या चाचण्या होणे अपेक्षित होते; पण प्रश्नपत्रिकांची छपाईच न झाल्याने ही चाचणी परीक्षा आता सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ऐन वेळी असा निर्णय घ्यावा लागल्याने राज्य सरकारला नामुष्कीच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्देशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त केली आहे की नाही, याची तपासणी विविध शैक्षणिक प्रगती चाचण्यांमधून होणार आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सूचनांनुसार २४ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत या चाचण्या घ्यावयाच्या होत्या; मात्र या चाचण्यांसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका केंद्रीय स्तरावर छापल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणारा कागद खरेदी करणे व इतर प्रक्रिया राबवण्यासाठी ई-निविदा मागवल्या गेल्या. प्रश्नपत्रिका छापण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परीक्षा घेणे शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लक्षात आले. त्यामुळे परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे दीड कोटी प्रश्नपत्रिका छापल्या जाणार असून, त्या राज्यातील शाळांपर्यंत पोहोचवण्यात येतील. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा यामध्ये घेण्यात येणार आहेत. भाषा आणि गणित या दोन विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी आधीच्या वर्गात शिकलेल्या अभ्यासक्रमावर ही परीक्षा आधारलेली असेल. मुलांची लेखन, वाचन आणि आकलनात किती प्रगती झाली व त्यांच्या क्षमतेत किती वाढ झाली याचे मूल्यमापन करण्यासाठी अशा चाचण्या घेतल्या जातील. अशा प्रकारची या वर्षातील ही पहिली चाचणी असेल. यानंतर, १६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दुसरी चाचणी, आणि एक ते १५ एप्रिल २०१६ या कालावधीत तिसरी चाचणी घेतली जाईल.

प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिकांची छपाई करावी लागणार आहे. त्यासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत ही चाचणी घेणे शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शाळांमध्ये पायाभूत चाचण्या घेण्यात येतील.

- गोविंद नांदेडे, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींनी काढले पायताण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेतील गोंधळाचा धडा यंदाही पुढे गिरवलेला दिसला. अहवाल वाचन आणि चुकीच्या ताळेबंदाच्या मुद्द्यावरून सभासदांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. चप्पल, खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या भिरकविण्याचा लांच्छनास्पद प्रकारही घडला. या प्रकारामध्ये किरकोळ दगडफेकही झाली. शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांकडूनच सभेत गुंडासारखी मारामारी करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकार घडल्याचे चित्र रविवारच्या सभेत दिसले.

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राउंडवर रविवारी ही सभा पार पडली. विरोधकांनी गेल्या वर्षीच्या सर्व साधारण सभेचे सर्व इतिवृत्त वाचण्याचा आग्रह धरला तर सत्ताधाऱ्यांनी विरोध करत 'मंजूर मंजूर,' अशी घोषणाबाजी सुरू केली. याचवेळी चप्पल, पाण्याच्या बाटल्या आणि खुर्च्या फेकाफेकी करीत शिक्षकांनी आपले संस्कार दाखविले. याचदरम्यान स्टेजवरून सभासद खाली आले आणि सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्ये शिक्षक पुंडलिक पाटील यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण करण्यात आली. सतत अंगावर धावून जाणे आणि सापडेल त्या वस्तूच्या फेकीफेकीमुळे सभेत प्रचंड तणाव होता. दोन तास गोंधळातच सर्व विषय मंजूर करत सभा पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोर समजून मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

फुलेवाडी बालिंगा रोडवर चोर समजून फिरस्त्याला केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा आज अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याआधीच मारहाण केल्याप्रकणी ४०० ते ५०० जणांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

करवीर तालुक्यात आंबेवाडी, हळदी व फुलेवाडी बालिंगा रोडवर चोर समजून १८ ऑगस्ट रोजी निष्पाप व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती. फुलेवाडी बालिंगा रोडवर मारहाण झालेल्या फिरस्तालाही जमावाने बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये फिरस्ता गंभीर जखमी होता. जमावाने केलेल्या जबर मारहाणीत त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर फिरस्त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सीपीआर हॉस्पिटलमधून पुण्यात ससून रूग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु आज सकाळी सव्वा आठ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याचा महिलेवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दागिने चोरताना विरोध केल्याने चोरट्याने केलेल्या हल्ल्यात कळे (ता. पन्हाळा) येथील वंदना आनंदा पाटील (वय४२) या गंभीर जखमी झाल्या. या चाकूहल्ल्याच्या निषेधार्थ कळे ग्रामस्थांनी कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग सुमारे तीन तास रोखून धरला. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन गाव बंद केले. संतप्त झालेल्या जमावाने कळे पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. दिवसभर गावात वातावरण तणावपूर्ण राहिले. पन्हाळा तालुक्यात घडलेली ही चौथी घटना आहे.

पोलिसांनी सांगितले की, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारात वंदना गोठ्यात दूध काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार केल्याने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात हनुवटीवर गंभीर दुखापत झाली. झालेला हा प्रकार कळताच त्यांच्या मुलांनी धाव घेतली. त्या वेळी वंदना यांनी घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिसरातील शेतात चोरट्याचा शोध घेतला. मात्र चोरटा सापडला नाही. सातत्याने घडत असलेल्या घटनांचा तपास पोलिस करीत नसल्याचा निषेध करीत आणि निषेधाच्या घोषणा देत ग्रामस्थांनी कळे पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. कोल्हापूर- गगनबावडा रस्ता बंद केला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. या वेळी एका तरुणाने प्रक्षोभक भाषण केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारणावरुनही काही वेळ तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी कोल्हापूर-अणुस्करा मार्गही रोखला.

चौथी घटना

पन्हाळा तालुक्यात किसरुळ येथे वैरणीसाठी गेलेल्या महिलेवर हल्ला, पुनाळ येथील एका महिलेला बेशुद्ध करुन आठ तोळ्याचे दागिने लंपास, करंजफेण येथे घरात घुसून महिलेला मारहाण आणि दागिने लंपास आणि सोमवारी कळे येथे घडलेली चौथी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीने गडहिंग्लजकर हैराण

$
0
0

शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेची गरज

दीपक मांगले, गडहिंग्लज

वाढत्या वाहन संख्येने आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने गडहिंग्लजकर बेजार झाले असून शहरात वाहतूक शाखेची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. कारण येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, अतिरिक्त जिल्हा पोलिस मुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय यासारखे बहुतांश विभागांची जिल्हा कार्यालये आहेत. गडहिंग्लज नगरपालिकेमार्फत साने गुरुजी वाचनालय व वीरशैव चौक येथे पोलिस चौकीसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मदत होईल.

शहरात अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रकला, शिक्षण तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान अशी मिळून तीसभर संस्था आहेत. बहुतांश सरकारी कार्यालये सुद्धा गडहिंग्लज मध्येच आहेत. सुसंस्कृत नागरिक, मुबलक पाणी, चांगले हवामान त्यामुळेच शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त अनेकांनी गडहिंग्लज शहरात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. इथल्या सुविधा, वातावरण यामुळे बहुतांश लोकांनी आपल्या घरकुलासाठी गडहिंग्लज योग्य वाटत आहे. त्यामुळे शहराच्या भौगोलिक विचार करता गडहिंग्लज शहर उपनगरांनी वेढलेला आहे. परिणामी शहराची लोकसंख्या आणि त्यामुळे वाहनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत गडहिंग्लजकरांना वाहुतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

अरुंद रस्ते व वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक समस्या होत आहे. मुख्य मार्गासह चंदगड, आजरा, गारगोटी व संकेश्वर राज्यमार्ग हा नेहमी गजबजलेला असतो. त्यातच रस्त्यावरील अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग त्यामुळे आणखीन अडचण होत असून शहरातील प्रमुख चौकात खास नियोजन करणे अपेक्षित आहे. मुख्य राज्यमार्गावर मार्केट यार्ड, वीरशैव चौक, आयलॅन्ड व दसरा चौक हे प्रमुख चौक आहेत. गडहिंग्लज शहरात मार्केट यार्ड परिसर म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठी व शेतकरी वर्गासाठी अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. मात्र गेल्या वर्षभरातील अपघाताचे प्रमाण पाहता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण पालिकेच्यावतीने मुख्य मार्गावर मधोमध हायमास्ट दिवा उभा करण्यात आला होता. मात्र बंद असलेल्या वेळी अपघातास कारणीभूत ठरत आहे.

शहरातील चौक टप्प्याटप्प्याने सुशोभित करण्याची मोहीम हाती घेत आहोत. पहिल्या टप्प्यात दसरा चौक सुशोभीकरणासाठी प्रायोजक तयार आहेत. यामध्ये चौक सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे तसेच बसस्थानकासमोरील कारंज्याचे नूतनीकरण यागोष्टींचा समावेश आहे. यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडेल.

- राजेश बोरगावे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक, अधिकाऱ्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

शिवाजी सहकारी बँकेतील अपहरप्रकरणी संचालकांसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेली कित्येक वर्ष कारवाईसंदर्भात कृती समितीचे आंदोलन सुरु होते. लेखापरीक्षक धोंडिराम चौगुले यांचे वर्दीवरून पोलिसात नोंद झाली आहे. यामध्ये संचालक, जनरल मॅनेजर, शाखाधिकारी, कॅशिअर, वसुली अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, १९९८ ते २०१० या कालावधीत शिवाजी बँकेतून बोगस कर्ज खाते, कर्जमाफीतील सवलतीत गैरव्यवहार तसेच अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यामध्ये संचालक व कर्मचाऱ्यांची नावे अशी सुधीर देसाई (जनरल मॅनेजर), आबासो देसाई, सुधाकर देसाई, कृष्णा कांबळे, गजानन कळेकर (सर्व शाखाअधिकारी), तुकाराम पाटील, सुनील मोकाशी, संजय कर्नेकर, विजय शिंदे, आप्पासो नार्वेकर( सर्व कॅशिअर), अरुण देसाई (वसुली अधिकारी), प्रमोद रणनवरे, बाबासो पाटील, दिलीप माने, तानाजी मोहिते, प्रकाश चव्हाण, किसन कुराडे, दत्ताजी नलवडे, बाजीराव देसाई, किरण कदम, बाळासो चव्हाण, भरत पाटील, संजय मोकाशी, चंद्रकांत कांबळे, गुरुनाथ पाथरवट, गोविंदराव देसाई, विष्णू शिंदे, प्रेमला खोत व विजयमाला रणनवरे (सर्व संचालक). संबधितांनी ठेवतारण कर्ज अपहार (३४.९५ लाख), आयडीबीआय बँक अपहार (१ कोटी ५७ लाख), आंबेडकर सुतगिरणी अपहार (१ कोटी), आंबेडकर सुतगिरणी गैरव्यवहार (१ कोटी २१ लाख), रोख रक्कम अपहार (७.५० लाख), जिल्हा उद्योग केंद्र अपात्र अनुदान (२७१ लाख), ना देय प्रमाणपत्र अदा (१२ लाख), बोगस कर्ज (२१ व १७ लाख), सेव्ह‌िंग खाते अपहार (२ लाख), केंद्र सरकार कर्जमाफी (३ कोटी ९० लाख), महाराष्ट्र सरकार कर्जमाफी (८१ लाख), ताळमेळ अपहार (७० लाख) असे एकूण १३ कोटी, ३१ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार उघडकीस आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.

एकतर्फी कारभारामुळेच वाटोळे....

बहुजनांची एकमेव बँक असा उल्लेख असलेल्या शिवाजी बँकेच्या एकूण सहा शाखा होत्या. मात्र १९९८ पासून गैरव्यवहाराला सुरूवात झाली. बँकेवर बहुजन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी कायम पकड ठेवली. मात्र सक्षम विरोधक नसल्याने कारभारात अनियमितता येत गेली. अगदी अस्तित्वात नसलेले उद्योग व कर्जदार दाखवून केंद्र व राज्य सरकारची आलेली कर्ज माफी लाटण्यात आली. कोणताही संबध नसलेल्या खातेदारांच्या खात्यावर रक्कम वर्ग दाखवून लाटण्यात आली. या सर्व घटनाक्रमाला शिवाजी बँक कृती समितीने विरोध केला. मोठ्या प्रमणात आंदोलने झाली. मात्र थातूर-मातुर उत्तरे देत प्रत्येकवेळी वेळ दवडण्याचा प्रकार घडला. वादावादीबरोबर अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले.

कर्मचाऱ्यांचेही आंदोलन

संचालक व अधिका ऱ्यांच्या मनमानीला कंटाळून कर्मचाऱ्यानीही आंदोलन केले. मात्र परिस्थितीत कोणताही फरक पडला नाही. त्याबंतर बँक अवसायनात गेली व प्रशासक नेमण्यात आला. प्रशासक नियुक्तीनंतर वसुलीला सुरूवात झाली. मात्र बिंग बाहेर पडेल हे जाणून संचालकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबले. अगदी सर्वसाधारण सभेत प्रोसिडिंग काढून कारवाई करण्यास आक्षेप घेण्यात आला. दरम्यानच्या काळात कॉसमॉस बंकेसोबत विलीनीकरणाचा प्रस्ताव आला. मात्र कर्मचारी भरती, बँकेतील प्रचंड अनियमितता व संचालकांचे असहकार्य धोरण यामुळे त्यांनीही बँकेकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी अवसायनात गेलेल्या बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस बजावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत दंगा मास्तरांचाच...

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेतील मारहाण, चप्पल फेकाफेकी आदी प्रकारांचा पाढा यंदाही कायम राहिला आहे. दंगा करणाऱ्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याची धाडसी कारवाई आजतागायात शिक्षक बँकेच्या इतिहासात झालेली नाही. परस्परविरोधी तक्रारी झाल्यास नाट्यमय घडामोडींवर पडदा टाकण्याचे कौशल्य संघटनेच्या नेत्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बेताल वर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरच आला आहे.

बँकेस तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ताळेबंदात दाखविलेला नफा चुकीचा आहे. अध्यक्षांनी प्रवासासाठी केलेला प्रत्यक्षात खर्च आणि ताळेबंदात दाखविलेल्या खर्चात मोठी तफावत आहे. कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा हिशोब दाखविला नसल्याच्या कारणावरुन सभेत मारहाण, चप्पल फेकाफेकीचा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकरणावरुन सत्तारुढ आणि विरोधी गटाचे नेते परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची चर्चाही करतील. मात्र शिक्षक बँकेतील सूडबुद्धीचे राजकारण आणि राजकारणी शिक्षकांच्या वर्तनाचा काठीण्य पातळीचा प्रश्न शिक्षक बँकेच्या अभ्यासक्रमात तसाच राहणार आहे. वैयक्तिक स्वार्थ आणि पदे मिळाली नसल्याच्या निषेधार्थ अनेक शिक्षक नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुखांनी अनेक आघाड्या सोडल्या आणि नवीन संघात दाखलही झाले. तो मी नव्हेच, असे सांगणाऱ्या अनेक जिल्हानेत्यांनी अनेक जिल्हाध्यक्षांकडून रात्रीच्या वेळी पत्रे लिहून घेतली. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरुळीत पार पाडण्यासाठी नेत्यांनी फिक्सिंगचे फंडे वापरले. प्रश्न विचारला की उत्तरे आणि वादावादी असा दोन ते तीन तासांचा शालेय चित्रपट अनेक सभासदांनी अनेकदा अनुभवला आहे. मात्र बँकेचा चोख हिशोब, पारदर्शी कारभार, शिक्षकांचे वर्तन आणि ठोस कारवाईचा मुद्दा कोणत्याही संघटनेच्या नेत्यांनी पाच वर्षे अविरतपणे चालविलेला नाही. शिक्षक बँकेच्या राजकारणात अनेक रिमोट कंट्रोल आहेत. त्याचा फटका बँकेचे कामकाज आणि सर्वसाधारण सभेवर होत आहे. सत्तारुढ आणि विरोधकांच्यात अंतर्गत धुसफूस कायमची आहे. सर्वसाधारण सभेच्या वेळीच या वादांना तोंड फुटते. वर्षभर मात्र जाब विचारण्याचे धाडस केले जात नाही. सभेत गोंधळ सत्तारुढ आघाडीच्या सभासदांनी केली की विरोधकांनी केला, हे पाच वर्षे सिद्ध होत नाही. यापुढे शिक्षक बँकेच्या सभा सीसी टिव्हीमध्ये बंदिस्त करण्याची गरज आहे आणि चप्पलफेक आणि वाद घालणाऱ्या शिक्षक सभासदांना नेत्यांच्या समोरच जाब विचारायला हवा. प्रत्येक सभेला पोलिस बंदोबस्त तर हवाच आणि दंगेखोर शिक्षकांना चोप द्यायला पोलिसांनीही हात आखडता घेण्याची काहीच गरज नाही.

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा आजचा हा प्रकार घडला आहे. आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार होतो. मात्र गोंधळामुळे विरोधकांचेही समाधान झालेले नाही.

-राजमोहन पाटील, अध्यक्ष, दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस उलटूनही मृत मासे खणीतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना वाशी नाका परिसरातील पदपथ उद्यानालगतच्या खणीत मासे मृत्यूमुखी पडले आहेत. टिलाप जातीचे मासे रविवारी मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते. मासे मृत्यूमुखी पडून दोन दिवस उलटले तरी खणीतून अजूनही मासे काढण्यात आले नव्हते. मृत माशांमुळे रंकाळा तलावातील पाणी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जुना वाशी नाका परिसरातील राज कपूर पुतळ्यासमोरील नवीन पदपथ उद्यान विकसित करण्यात आले आहे. खण आणि तलावा दरम्यान दगडी भराव घालून पूल बांधण्यात आला आहे. यामुळे खणीतील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. खणीत केरकचरा, प्लास्टिक पिशव्या टाकल्यामुळे व येथे मिसळत असलेल्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित बनले आहे. दूषित पाण्याचा फटका माशांना बसला आहे. खणीतील टिलीप जातीचे मासे मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडले आहेत. रविवारी सुटी असल्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी काही प्रमाणात मासे बाहेर काढले. पण अजूनही ठिकठिकाणी मृत मासे नजरेस पडत होते. रंकाळा तलावातील खणीत मासे मृत्यूमुखी पडल्याचे सोमवारीही महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना माहित नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलत कारखान्याची विक्री थांबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखाना विक्रीसाठी ​कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागविलेल्या निविदा प्रक्रियेत सौंदत्ती येथील शिवशक्ती शुगर्स लिमिटेडने ९९ कोटी रुपयांची निविदा भरली. मुंबईतील तासगावकर शुगर्स प्रा. लिमिटेड २२५ कोटी रुपयांची निविदा भरली, पण ते एकावेळी भरणार नसल्याने त्यांचाही प्रस्ताव मान्य होणार नाही. बँकेला २२० कोटी रुपये अपेक्षित असल्याने सध्या तरी कारखाना विक्री होऊ शकला नाही. त्यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याबाबतची चर्चा तातडीने सुरू झाली; पण ​फेरनिविदा मागवायची की भाडेतत्त्व अवलंबायचे याचा निर्णय मात्र ३१ ऑगस्ट रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे.

शिवशक्ती व तासगावकर शुगर्स यांनी निविदा सादर केल्या होत्या. सोमवारी निविदा उघडण्यात आल्या. तत्पूर्वी थिटे पेपर्सच्या वादाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी राखीव रकमेपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या निविदाधारकास कोणतीही अडचण न येता ताबा दिला जाईल, असे सांगितले. तसेच सुरक्षित व असुरक्षित देणींचा मुद्दाही उपस्थित झाला. हायस्कूल व कॉलेज इमारतीसाठी दिलेले क्षेत्र वगळून खरेदीदाराला उर्वरित जागेचा ताबा दिला जाईल असे स्पष्ट केले. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर निविदा उघडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकाचौकांत घुमणार ‘कोल्हापुरी फटका’

$
0
0

सोशल मीडियावरील टिपुगडेंचे प्रबोधन येणार ऑन व्हिल्स

महेश पाटील, कोल्हापूर

'बोलायचं नसतं या रं... दादा... समदं येगळं मला दिसतया...' या शाहीर बापूसाहेब विभूते यांच्या कवनातून, थेट रांगड्या कोल्हापुरी भाषेत संवाद साधत कम्प्युटराइज्ड व्यंगचित्रांचे फटकारे उडवत कलासाधना मंचच्यावतीने महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागर सुरू आहे. चित्रकार विजय टिपुगडे यांची संकल्पना आणि मांडणी असलेल्या या अभिनव व्यंगचित्रांनी तरुणाईत जनजागृतीचा वसा धरला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात चौकाचौकांत जाऊन सुदृढ लोकशाहीसाठी हा प्रबोधनाचा जागर केला जाईल.

लोकसभा, विधानसभा निवडणूक असो किंवा महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो. निवडणुकीतील बारकावे टिपत अनिष्ठ गोष्टींवर प्रहार करण्याचे कसब पोस्टर्स, व्यंगचित्रांतून कलावंत मंडळी करतात. मात्र, अलीकडच्या काळात डिजिटल झालेल्या निवडणुकीत व्यंगचित्रे, पोस्टरचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे तरुणाईच्या भाषेतच फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कलासाधना मंचने प्रबोधन सुरू केले आहे. अगदी रांगड्या भाषेत निवडणुकीतील वाईट प्रथा, पद्धतींना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. 'आता तरी थांबवा, खा मटण, दाबा मटण' अशी थेट मतदारांच्या प्रलोभन वृत्तीवर टीका असो किंवा 'निवडणूक लढविणे म्हणजे म्हादबा रोडला शायनिंग मारण्याइतकं सोपं नाही' असं इच्छुकांना सुनावणं असो. मोजक्या शब्दात विजय टिपुगडे यांनी निवडणुकीचा आढावाच घेतला आहे. आतापर्यंत एकूण तयार ६५ स्लाइड्सपैकी २७ स्लाइड्स त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत.

यासंदर्भात टिपुगडे म्हणाले, 'मी गेल्या तीन-चार निवडणुका बघितल्या. गेल्या निवडणुकीपासून असं लक्षात आलं की सर्वसामान्यांना मनातील भावना उघडपणे बोलता येत नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे पूर्वीचा व्यंगचित्रांचा फॉर्म मी डिजिटाइज केला. जुन्या पिढीत नैराश्याची भावना असते. मात्र, नव्या मुलांमध्ये बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे तरुणाईपर्यंत हा विषय मला पोहोचवायचा होता. अपवाद वगळता तरुणाईला परिवर्तन पाहिजे, शांततेच्या मार्गाने ते घडायला हवे.'

निवडणूक प्रक्रियेला गती आल्यावर सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, दिलिप देसाई, शाहीर आझाद नायकवडी आदींच्या सहकार्यातून एका व्यासपीठाची उभारणी केली जाईल. या माध्यमातून फिरत्या व्हॅनमधून चौकाचौकात या प्रबोधनात्मक स्लाइड्चे प्रदर्शन केले जाईल असे टिपुगडे यांनी सांगितले.

शहर विकासाच्या आणि नागरिकांच्या सोयीच्या अनेकविध घोषणा महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. बजेट सादर होऊन सहा महिने होत आले, पण अद्याप प्रकल्प मूर्त रूपात साकारण्यासाठी हालचाली दिसत नाहीत. सध्या तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्या आहेत. पायाभूत सुविधांची उपलब्धता करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. महापालिकेचे कोलमडलेले बजेट, नियोजनाचा अभाव यामुळे विकासकामे रखडली आहेत. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नवे पर्याय अणि कर प्रणालीत सुधारणा करून विकासकामांचा ट्रॅक रूळावर आणण्यासाठी प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे.

राजकीय नेते दूर सारा

अनेक तरुणांनी, संस्थांनी आम्ही तुमचे हे डिझाइन प्रबोधनासाठी वापरून का? अशी विचारणा केली आहे. अशा व्यक्तींना ही प्रबोधन स्लाइड्स वापरताना कोणत्याही राजकीय नेत्यांच्या बॅनरवर जाऊ नयेत अशी सूचना केल्याचे टिपुगडे यांनी सांगितले. तरुणांकडून प्रबोधनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे टिपुगडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदी-कुंकू घ्या, मत मलाच द्या

$
0
0

श्रावणात वाढले प्रभागात हळदी-कुंकू समारंभ

अनुराधा कदम, कोल्हापूर

महिलांना एकत्र करण्याचे हुकमी निमंत्रण म्हणजे हळदी-कुंकू. हळदी कुंकवाला या म्हटले की कोणतीही महिला नाही म्हणत नाही. महिलांचा हाच वीकपॉइंट हेरून सध्या प्रभागांमध्ये श्रावणानिमित्त हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने राजकीय प्रचाराचे रंग भरले जात आहेत. विशेषत: ज्या प्रभागामध्ये महिला उमेदवार इच्छुक आहेत किंवा जो प्रभाग खास महिलांसाठी राखीव आहे, त्या प्रभागांमध्ये १५ ऑगस्टपासून हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांनी प्रचाराचा नारळ फोडण्याचे काम सुरू झाले आहे. हळदी-कुंकू आणि सौभाग्याचे वाण देत 'मलाच मत द्या' हे दानही इच्छुक उमेदवार मागत आहेत.

निवडणुकीचे रणशिंग फुंकले की प्रभागातील एकगठ्ठा मतांना आपल्याकडे वळण्याची फौज कामाला लागते. पाणी प्रश्न, महागाई, कचऱ्याची समस्या यांचा थेट संबंध असतो तो महिला मतदारांशी. त्यामुळे महिलांच्या मताला आपल्या बाजूने वळवण्यासाठी उमेदवारांकडून अनेक क्लुप्त्या लढवतात. त्यापैकीच एक हळदी-कुंकू कार्यक्रम. सध्या उपनगरातील प्रभागांसह गल्ली आणि पेठांमध्येही हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या नियोजनाची लगबग वाढली आहे. श्रावण महिन्यातील मंगळवार, शुक्रवार या दिवसांना असलेले मांगल्याचे महत्व लक्षात घेऊन या हळदीकुंकू समारंभाची निमंत्रणे पोहोचवली जात आहेत.

पुढील महिन्यात गौरी गणपती आणि त्यानंतर नवरात्रौत्सव, दसरा असे सण आहेत. त्यावेळीही महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हळदी-कुंकू समारंभ हा प्रचारातील इनफॅक्टर ठरणार आहे.

अर्थात निमंत्रण जरी हळदी-कुंकवाचे असले तरी त्याआडून इच्छुक उमेदवार प्रचार करीत आहेत. त्यासाठी केवळ चिमूटभर हळदी-कुंकू देण्याबरोबरच महिलांना चांदीची जोडवी, कुंकवाचे करंडे, आरतीचे तबक, निरंजने, गृहोपयोगी वस्तूंची भेटही दिली जात आहे. या भेटीला 'सौभाग्यवाण' असे नाव देत सध्या या देवाणघेवाणीला उधाण आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यापासून श्रावणमासारंभाचे कारण देत भागाभागात हळदी-कुंकू कार्यक्रमाची निमंत्रणे देण्यात इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते दंग झाले आहेत. यामध्ये भागातील काही महिलांना एकत्र करून इतर महिलांना जमवण्याचे काम दिले जात आहे.

हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या नावावर थेट मतदान करा असे न म्हणता छुपा प्रचार केला जात आहे. मतदार महिलाही यानिमित्ताने इच्छुकांसमोर आपल्या समस्यांची गाऱ्हाणी मांडत आहेत. एकीकडे इच्छुकांकडून उमेदवारीच्या रिंगणात उतरत असल्याचे सांगणे आणि दुसरीकडे महिला मतदारांनी आपल्या समस्या मांडणे यामुळे वरवर दिसणाऱ्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला छोटेखानी सभेचेच रूप येत आहे.

उपस्थिती लक्षणीय

एरव्ही एखाद्या आरोग्यपूर्ण व्याख्यानाला महिलांना बोलवले तर त्या अनेक कौटुं​बिक कारणे सांगून पाय मागे घेतात. मात्र, गेल्या आठवड्यापासून प्रभागात इच्छुकांनी बोलवलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला मात्र महिलांची वाढती गर्दी होत आहे. राजारामपुरीतील एका प्रभागात इच्छुक महिला उमेदवाराने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला पानाचा विडा, गजरा आणि हळदी-कुंकू घेण्यासाठी तब्बल साडेतीनशे महिलांनी उपस्थिती लावली. त्यामुळे हळदी-कुंकू या शब्दाला महिलांच्या मनात असलेल्या आदराचा फायदा घेत आता सर्वच प्रभागात अशा समारंभाचे नियोजन करण्याचे आदेश नेत्यापांसून इच्छुकांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पट्टणकोडोलीत आढळले नवजात अर्भक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील इंगळी रोडवर असणाऱ्या खटकोळ पाणंद येथे काटेरी झुडपात स्त्री जातीचे अर्भक सापडले. या अर्भकाला पाहण्यासाठी अनेकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
पट्टणकोडोली येथील इंगळी रोडवर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक भगवान कांबळे जात असताना रस्त्या कडेला असणाऱ्या काटेरी झुडपामध्ये त्यांना लहान बाळाच्या रडण्यचा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना तेथे स्त्री जातीचे अर्भक असल्याचे निर्दशनास आले. त्यांनी त्या नवजात अर्भकाला बाहेर काढून तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांकडे सुपूर्द केले. डॉक्टरांनी त्या अर्भकावर उपचार करत पेटीत ठेवले. तसेच ही घटनेची पोलिस ठाण्यात वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला व अज्ञात विरोधात गुन्हा नोंद केला. अर्भकाच्या शरीरावर जखमा असल्याने पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीनंतर गोंधळ

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

महापालिकेची निवडणुकीसाठी संपर्क प्रमुखांपासून ​जिल्हाप्रमुखांपर्यंत स्वबळाचा नारा दिलेला असताना पक्षाच्या सचिवपद सांभाळणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्याकडून भाजपबरोबर युतीची दारे खुली असण्याच्या निर्देशाने सेनेबरोबर भाजपमध्ये अस्वस्थतेबरोबर शंकाकुशंकाही निर्माण झाल्या आहेत. भाजपच्या अध्यक्षांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांची बदनामी करुन झाल्यानंतर आता युतीची चर्चा करण्याचा हा प्रकार संदिग्धता पसरवण्यासाठी केला असण्याचा संशय भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. तर सेनेमध्ये वरिष्ठ पातळीवरुन दिले जाणारे आदेश हे अंतिम असले तरी युती करण्याची इच्छा नसल्याचे मत व्यक्त केले जात असले तरी भविष्यात युती घडवण्यासाठी भरपूर मानसिकता करावी लागणार असल्याचे दिसते.

राज्य पातळीवर असलेली शिवसेना व भाजपची युती विधानसभा निवडणुकीपुर्वी तुटली. त्यापासून निर्माण झालेला कडवटपणा वेळोवेळी विविध पातळीवर व्यक्त होत आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात तो मोठ्या प्रमाणात उफाळून आला. एकमेकांवर पत्रकबाजीतून करण्यात आलेल्या आरोपातून दोघांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर ​राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला विचारात न घेता भाजपने येथील स्थानिक ताराराणी आघाडीशी युती केली. त्यामुळे शिवसेनेने युती आपल्याकडून नव्हे तर भाजपकडून तुटल्याचे सांगितले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी भाजपने ताराराणी आघाडीशी काडीमोड घेतल्यास युती करण्यास अडचण नसल्याचे सांगत आपली दारे खुली असल्याचे सांगितले होते. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, आम्हाला ते कोण अटी घालणार? अशी विचारणा करून हा विषय संपल्याचे स्पष्ट केले. यामुळे दोन वेगवेगळ्या पातळीवर निवडणुकीची तयारी केली जात असताना राऊत यांच्या वक्तव्यातून भाजपला अजूनही वेळ गेली नसल्याचा एकप्रकारे इशाराच दिल्याचे समजले जाते.

भाजप मात्र या वक्तव्याकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पहात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बदनामीची मोठी सल आहे. जर शिवसेनेला युतीची काळजी वाटत होती तर या बदनामीवेळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला नसल्याची मोठी खंत आहे. आतापर्यंत मोठी बदनामी शिवसेनेने केली आहे. त्यानंतर भाजपने सारे टप्पे पूर्ण केल्यानंतर आता घडवून जात असलेली चर्चा पोकळ असल्याचे मानले जात आहे. युती करण्याच्यादृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये केव्हा चर्चा झाली नसल्याचे व ती आता करण्यात रस नसल्याचे मोठे वास्तव दोन्ही पक्षांना माहिती आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरुन काही आदेश दिले जाऊ शकतात. यानुसार जर भविष्यात युतीच्यादृष्टीने चर्चा सुरू झाली तरी दुभंगलेल्या मनांचे काय? हा प्रश्न उरतोच.

यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात अशाच पद्धतीने संदिग्धता पसरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाद्वारे झाला. आताही भाजप आणि ताराराणी आघाडी निवडणुकीची सक्षमपणे तयारी करत असताना हे वक्तव्य संदिग्धता पसरविण्यासाठी केले गेले असण्याचीच शक्यता आहे.

- महेश जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

आम्ही ८१ जागा लढवण्यासाठीची सारी सज्जता केली आहे. आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत विचारात घेता युती करण्याची इच्छा नाही. पण वरिष्ठांकडून देण्यात आलेले आदेश पक्षामध्ये अंतिम असतात.

- राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोर समजून मारहाण; फिरस्त्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोर समजून फुलेवाडी-बालिंगा रोडवर मारहाण करण्यात आलेल्या फिरस्त्याचा सोमवारी पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. नागरिकांनी केलेल्या मारहाणीचा हा पहिला बळी ठरला आहे. या प्रकरणी संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

करवीर, कागल, शिरोळ तालुक्यांत जमावाने चोर समजून काही निर्दोष व्यक्तींना मारहाण केली होती. जमावाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) फुलेवाडी-बालिंगा रोडवर एका फिरस्त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुण्याला हलविण्यात आले होते. सहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजता या फिरस्त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. काही जागरुक नागरिकांनी मारहाण प्रकरणाच्या सीडी पोलिसांच्याकडे जमा केल्या आहेत. पोलिसांनी मारहाणीचे क्लिपिंग डाऊनलोड केले आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले.

मारहाणीच्या तीन घटना

ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ गस्त घालत आहेत. करवीर तालुक्यात आंबेवाडी, हळदी व फुलेवाडी बालिंगा रोडवर चोर समजून बुधवारी निष्पाप व्यक्तींना मारहाण करण्यात आली. कागल येथील महालक्ष्मी दूध संस्थेत काम करणाऱ्या परराज्यातील कर्मचाऱ्यांना आंबेवाडी फाट्यावर जमावाने मारहाण केली होती. मित्राकडे जेवायला आलेल्या शिरोळ तालुक्यातील पाचजणांना हळदी गावात मारहाण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images