Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भागातील इच्छुक ‘गटारी’चे स्पॉन्सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रावण महिन्याची सुरुवात लवकरच होत असल्याने गटारीच्या तयारीला लागले आहेत. सोशल मीडियावर गटारीचे निमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे या वर्षीच्या गटारीला वेगळाच रंग येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी गटारी स्पॉन्सर केली आहे.

श्रावणाची सुरुवात स्वातंत्र्यदिनापासून होत आहे. आषाढातील शेवटचा दिवस शुक्रवारी आहे. शुक्रवारनंतर जोडून स्वातंत्र्यदिन आणि रविवारीच सुट्टी असल्याने अनेकांनी पर्यटनाचे आणि विविध खाद्यपदार्थांचे बेत आखले आहेत. खवय्यांना मटण, चिकन, मासे यांच्या आगाऊ ऑर्डर दिल्या आहेत. शहरात शुक्रवारी सुमारे पाचशेहून अधिक बकरी, कोंबड्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मटण विक्रेत्यांनी बेळगांव, सांगोला, जत, पुणे आणि कर्नाटकातून बकरी आणली आहेत. गर्दी लक्षात घेता सकाळी सहा वाजल्यापासून मटण विक्रीची दुकाने खुली राहणार आहेत. शहर आणि ग्रामीण भागात मटण विक्रीच्या दरात सुमारे पन्नास ते साठ रुपयांचा फरक आहे. त्यामुळे खवय्याची गर्दी लक्षात घेता कळंबा, वाशी, पीरवाडी, वडणगे, उचगांव, कसबा बावडा परिसरातील मटण विक्रेत्यांची जय्यत तयारी केली आहे. सध्या व्हॉट्सअप, ट्वीटर आणि फेसबुकवरही गटारीबद्दलची वातावरण निर्मिती जोरात सुरू आहे. या तयारीचेच काही फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमुळे गटारीनिमित्त प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्याची संधी इच्छुक उमेदवारांना मिळाली आहे.

मांसाहाराची उलाढाल

गटारीच्या तयारीसाठी कोंबडी बाजारात गर्दी फुलली. अनेकांनी मटण विक्रेत्यांच्याकडे शुक्रवारच्या मटणासाठी आगाऊ नोंदणी केली. चिकनसह मासेही मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आले आहे. अंडी विक्रीतही मोठी वाढ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्मदहन आंदोलन मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्य समाज शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक जे. डी. मधाळे यांच्या निवृत्तीवेतन प्रकरणाबाबत शिक्षण आयुक्तांनी मागवलेला अहवाल आठ दिवसात देण्याचे तसेच सेवापुस्तक देण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचे आंदोलन स्थगित केले आहे.

मधाळे यांच्या प्रकरणाबाबत पवार यांनी शिक्षण संस्था चालक, राजर्षि शाहू महाराज मागासवर्गीय शासकीय, निमशासकीय कर्मचारी अन्याय निवारण समितीचे सदस्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी पवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. यावेळी हे प्रकरण शिक्षण आयुक्तांच्या पातळीवर गेल्याचे निदर्शनास आल्यावर पवार यांनी आता हे प्रकरण माझ्या कार्यक्षेत्रात नसल्याने अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. पण शिक्षण आयुक्तांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागितला आहे. त्यानुसार शिंदे यांनी आठ दिवसात अहवाल द्यावा अशी सूचना केली. तसेच मधाळे निवृत्त झाले तरी अजून सेवापुस्तक मिळालेले नसल्याची बाब बैठकीत मांडली. त्यावेळी पवार यांनी याबाबतचे नियम पाहून नियमानुसार कार्यवाही करण्याची सूचना दिल्या.

यावेळी समितीच्यावतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. शहाजी कांबळे व अन्य सदस्य उपस्थित होते. चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे कांबळे यांनी सांगितले. पण संस्थेने अनेक कर्मचाऱ्यांची गैरकारभाराने लुबाडणूक केली आहे. अनेकांना वेतनश्रेणीस पात्र नसताना पगार दिले जातात. तर अनेकांना पात्र असतानाही योग्य वेतन दिले जात नाही. या सर्व कारभाराबाबत संस्थेविरुद्ध आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथे यांच्याकडून केवळ तीन ग्रॅम सोन्याचे टंच

$
0
0

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचा खुलासा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नगरसेवक निशिकांत मेथे यांनी दोन वर्षात २५ तोळे सोन्याचे नुकसान झाल्याचा आरोप केला असला तरी मेथे यांनी दोन वर्षात फक्त सहा टंच सोने काढले असून ते फक्त तीन ग्रॅम आहे,' असा खुलासा कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, मेथे यांनी सराफ संघाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात येणार आहे. त्यांच्यावर एक कोटीची रूपयाचा बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मेथे यांच्या निषेधार्थ शुक्रवारी सराफ बाजार बंद करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले,' मेथे यांचे घराणे ५० वर्षे सोन्याच्या व्यवसायात आहे. मेथे यांना सोने हातात घेतल्यावर सोने आणि तांबे यातील फरक कळायला हवा होता. टंच केलेल्या सोन्याच्या पुड्या कदाचित मेथे यांच्या घरीच बदललया असण्याची शक्यता आहे. मेथे यांनी दोन वर्षात सराफ संघाकडे लेखी तक्रार केलेली नाही. भारतातील सराफ बाजार पेठांमध्ये सराफ व्यापारी संघाचा टंच फॉर्म ग्राह्य मानला जातो. अशा सोने टंचाबाबत कोणत्याही सराफाची तक्रार आलेली नाही. सराफ संघात ७५० सराफ असून एकाही सराफाने तक्रार केलेली नाही.

नगरसेवक निशिकांत मेथे यांनी अध्यक्ष रणजित परमार व राजेश राठोड यांचे नाव वगळून गुन्हा दाखल का केला असा सवाल केला. सराफ संघाकडे टंच काढण्याबाबतचे रजिस्टर वह्या असल्याने न्यायालयीन लढाईत आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडू. या प्रकरणात सराफ संघाची बाजू योग्य आहे.' पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राजेश राठोड, सचिव सुहास जाधव, किरण गांधी, नंदकुमार ओसवाल, नमित गांधी, जितेंद्र राठोड, संजयकुमार ओसवाल, बिपिन परमार, सुशिलकुमार गांधी, अनिल पोतदार, मनोज राठोड, नितिन ओसवाल उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघाविरुद्ध गुन्हा दाखलचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोन्याचे टंच काढून नगरसेवक निशिकांत मेथे यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जिल्हा सराफ असोसिएशनची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. माजी उपाध्यक्ष संजय खद्रे यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल होणार आहे.

जिल्हा सराफ असोसिएशनचा टंच काढण्यासाठी खास विभाग होता. नगरसेवक मेथे यांचा सराफ व्यवसाय असून त्यांनी २०१२ ते २०१४ दरम्यान सोन्याचे टंच काढून घेतले. टंच काढून घेतल्यानंतर ते सोने सराफांना परत दिल जाते. त्यातील काही सोने भिशिच्या रूपाने मेथे यांनी साठवून ठेवले होते. आर्थिक अडचणीमुळे दिवाळी दरम्यान भिशीच्या रूपाने साठवलेले सोन आटवले. तेव्हा त्याचा टंच शून्य आला. त्यामुळे हे सोन बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्कालिन पदाधिकारी राजेश राठोड यांच्याकडे तक्रार कली. त्यांनी वस्तुस्थिती पाहून मेथे यांचे अभिनंदन केले. नंतर हा विभाग बंद करण्यात आला.

टंच काढणारा विभाग असोसिएशनचा असल्याने त्याची जबाबदारी कार्यकारिणीवर असते. मेथे यांचे ३० तोळ्यांचे नुकसान झाल्याने मेथे यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने माजी उपाध्यक्ष संजय खद्रे, माजी सचिव सुरेश ओसवाल, रामचंद्र संकपाळ, माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड, शिवराज पोवार, गणपतीसिंह देवल, हितेश ओसवाल, दीपक साळोखे, धर्मपाल जिरगे, किरण गांधी, सत्यजित सांगावकर, हिंदूराव शेळके, नंदकुमार ओसवाल, नमिन गांधी, जितेंद्र राठोड, महेंद्र ओसवाल, संजय ओसवाल, बिपिन ओसवाल, सुशिल गांधी, मनोज राठोड, नितिन ओसवाल यांना दोषी धरले आहे.

टंच काढणे म्हणजे काय?

सोन्याची शुध्दता तपासणीसाठी टंच काढले जाते. टंच काढण्यासाठी सोनार ५०० मि.ली. म्हणजे अर्धा ग्रॅम सोने देतात. टंच काढल्यानंतर अर्धा ग्रॅम सोन्याची पुडी परत सराफाला बांधून दिली जाते. सध्या टंच काढण्याची पध्दत परंपरागत आहेत. भविष्यात सराफ संघ टंच काढण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी आणणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरगिरीतून ठरतेय इच्छुकांची रणनीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या भागाभागांमध्ये महापालिका निवडणुकीची चर्चा जोरात सुरु आहे. उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या भागातून कोण निवडणूक लढवणार, त्याला कोणाचा पाठींबा आहे का, तो कोणाला भेटतो याची खबरबात ठेवण्यासाठी इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी हेरगिरी सुरु केली आहे. या हे​रगिरीतून इच्छूक आपली रणनीती ठरवू लागले आहेत.

सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असली तरी पक्षांची उमेदवारी आत्ताच निश्चित होऊ लागली आहे. अनेक इच्छूक या नाही तर त्या पक्षाकडे असे सर्व दरडीवर हात ठेवून आहेत. त्यामुळे कुणाचा पत्ता कोण कापतो याची आता गुप्त इर्षा सुरु आहे. यातूनच हेरगिरीचा मार्ग इच्छुकांनी अवलंबला आहे. अनेक इच्छुकांचे कार्यकर्ते त्या प्रभागात तसेच शेजारच्या प्रभागातही चौकाचौकातील चर्चेत सहभागी होताना दिसत आहेत. त्या भागातील कल काढण्याचा हा मार्ग असला तरी त्यापेक्षा तेथील चर्चेतून कोणता इच्छूक, कोणत्या नेत्याला भेटला. कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता कोणत्या इच्छुकाच्या पाठीशी आहे. सातत्याने कोण कुणाकडे जात आहे याची माहिती मिळत असते.काही कार्यकर्ते तर अनेक ठिकाणी पहायला मिळतात. तेथील कार्यक्रमात सहभागी होत असतात. पुढील चार महिने अनेक इच्छुकांचे कान व डोळे हे कार्यकर्तेच होणार आहेत. त्यांच्या माहितीवरुन इच्छूकही कोणत्या नेत्याच्या जास्त संपर्कात रहायचे याची रणनीती ठरवू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलप्रश्नी आकडेमोड सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पातील करारांतर्गत आयआरबी​ कंपनीने केलेल्या कामाची आकडेमोड महापालिकेने सुरू केली आहे. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत आयआरबीला किती रक्कम द्यावी लागणार आहे हे सोमवारी महापालिकेला सादर करावे लागणार आहे. आयआरबी कंपनीने करारानुसार प्रत्येक रस्त्याची किंमत निश्चित करण्यात आली असून त्यानुसार रस्त्याची किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे करारानुसार आयआरबीने किती टक्के काम केले आहे, त्याची किंमत ठरवली जाणार आहे.

महापालिका, एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी यांच्यामध्ये रस्ते विकास प्रकल्पाचा करार झाला आहे. करार करताना प्रत्येक रस्त्याची लांबी, रुंदी ठरली असून त्यानुसार प्रत्येक रस्त्याचा खर्च निश्चित केला आहे. त्यानुसार किंमत ठरविण्याची मागणी आयआरबीने केल्यानंतर महापालिका करारानुसार प्रत्येक रस्त्याच्या लांबी रुंदीची, आणि प्रत्यक्षात झालेले काम प्रत्यक्षात कागदावर उतरवित आहे. शुक्रवारपर्यंत सगळी माहिती संकलित केली जाणार आहे. कंपनीने करारानुसार रस्त्याची कामे केली नाहीत. तेरापैकी बहुतेक रस्त्याची लांबी रुंदी कमी आहे. तसेच ५४ कोटीची खराब कामे आहेत. अर्धवट कामांचे मूल्यांकन २१ कोटी इतके आहे. ही रक्कमही मूल्यांकनातून वजा करावी अशी मागणी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महापालिका व टोल विरोधी कृती समितीने केली आहे.

टोलमुक्ती संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयआरबी आणि महापालिका या दोघांनाही प्रकल्पाच्या किंमतीचा अहवाल सोमवारी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत टोलप्रश्नी कंपनीची रक्कम भागविण्यासाठी पर्यायावर विचार झाला. सध्याच्या भूखंडासह आणखी एक भूखंड देऊन प्रकल्प खर्च भागविण्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर टोल विरोधी कृती समितीने त्याला विरोध केला आहे. सरकारने, महापालिकेवर कसलाही बोजा टाकू नये. एमएसआरडीसीच्या चुकीमुळे प्रकल्पात चुका झाल्या आहेत. सरकारनेच प्रकल्पाची किंमत भागवावी अशी आग्रही भूमिका मांडल्याचे कृती समितीचे प्रतिनिधी व फेर मूल्यांकन उपसमितीचे सदस्य राजेंद्र सावंत यांनी सांगितले.

भूखंडाचे नव्याने मूल्यांकन

महापालिकेने टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फुटाचा भूखंड आयआरबी कंपनीला दिला आहे. महापालिकेने या जागेचे सध्याच्या बाजारभावानुसार ७५ कोटी रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. सध्या टोलप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सरकारी पातळीवरून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने टेंबलाईवाडी येथील त्या भूखंडाचे नव्याने मूल्यांकन निश्चित करण्याचे ठरविले आहे. मूल्यांकन करणाऱ्या एका खासगी संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णवेळ देणा‍ऱ्यांना तिकीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीत कसबा बावड्याचा गड राखण्याच्या दृष्टीने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी शुगर मिल आणि लक्ष्मीविलास पॅलेस या प्रभागातील नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांच्या मनातील उमेदवाराच्या अपेक्षा जाणून घेत पाटील यांनी उमेदवाराची निवड करताना पूर्णवेळ काम करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील गटाचा उमेदवार कोण असणार, या चर्चेला उधाण आले आहे. जोडधंदे करत नगरसेवकपदाचे लोणी खाणाऱ्यांचा विचार यंदा बावड्यात होणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेकजण रिंगणातून आपोआप बाहेर पडणार आहेत. सतेज पाटील यांनी नागरिकांची भेट घेऊन भागातील समस्यांचाही आढावा घेतला. गेल्या पाच वर्षांत बावड्यातील प्रभागात नगरसेवकांनी काय काम केले याचीही माहिती पाटील यांनी नागरिकांकडून घेतली. काँग्रेसचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी येत्या दोन ते तीन दिवसात ते बावड्यातील सर्व प्रभागातील नागरिकांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, उमेदवाराबाबत बोलताना पाटील यांनी काही गोष्टी नागरिकांना स्पष्ट सांगितल्या. जो उमेदवार निश्चित केला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जाईल. निवडून आल्यानंतर नगरसेवकाने त्याचा मोबाइल नंबर पुढची पाच वर्षे बदलायचा नाही अशी अट घातली जाणार आहे. तसेच दर सहा महिन्यांनी नगरसेवकाने नागरिकांना केलेल्या कामाचा अहवाल देणे बंधनकारक राहील आणि पुढच्या सहा महिन्यात नगरसेवक काय काम करणार आहे याचीही यादी नागरिकांना द्यावी लागेल.

बावड्यात आजवर विरोधकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता तसे होणार नाही असे सांगून पाटील म्हणाले, 'बावडा पाटील गटाचा बालेकिल्ला आहे आणि तो महापालिकेच्या निवडणुकीतही भक्कम राहील यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. त्यासाठी बावडेकरांचा पाठिंबा महत्त्वाचा असून नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतरच उमेदवाराच्या नावावर शिक्कोमोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे यावेळचा उमेदवार हा नागरिकांचा असेल.'

बंडखोरीची वाट नको

सध्या शहरातील अनेक प्रभागांत बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. मात्र, बावड्यातील प्रभागांमध्ये चर्चा आणि एकमेकांच्या समन्वयातून उमेदवार ठरवले जाणार आहेत. त्यामुळे बंडखोरीचा विचार करू नका, असे सतेज पाटील यांनी सांगितले. काँग्रेसने मला मंत्रिपद दिले. त्यामुळे पक्षाला आणि ज्या बावडेकरांच्या पाठिंब्यावर मी मंत्री झालो त्या बावडेकरांना कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षनेतृत्वाकडे नाव देण्यासाठी धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पक्षीय पातळीवर निवडणुका लढवल्या जाणार असल्या तरी, अनेक अपक्षही मैदानात उतरणार आहेत. मात्र, एखाद्या आघाडी किंवा पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली असून पक्षनेतृत्वाकडे आपले नाव पोहोचवण्यासाठी धडपड वाढली आहे. राजकीय पक्षांशी संबंधित असलेले, पण पडद्यामागे राहून हालचाली करणाऱ्या व्यक्तींच्या गाटीभेठी घेण्यास इच्छुकांनी सुरुवात केली आहे. निवडणूक मैदानात उतरण्यापूर्वी तिकिटासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी-जनसुराज्य, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमने-सामने येणार आहेत. प्रथमच पक्ष व आघाड्या स्वतंत्रपणे लढत असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात तगडे उमेदवार मिळतील की नाहीत, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. नव्याने निर्माण झालेल्या प्रभागामुळे अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बाधून निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. पक्षांनीही 'इलेक्टिव्ह मेरिट'नुसार उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याने पहिल्या टप्प्यात तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नवीन प्रभाग अस्तित्वात आल्याने अनेकांचे जुन्या प्रभागातील गट्टा मतदान नवीन प्रभागात समाविष्ट झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे तिकीट कापून अर्धी लढाई मारण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी कोणाला द्यायची, हे पक्षनेतृत्वावर अवलंबून असले, तरी त्यांच्यापर्यंत नाव पोहोचवण्यासाठी इच्छुक विविध क्लृप्त्यांचा वापर करत आहेत. राजकीय क्षेत्रापासून लांब असलेल्या मात्र पक्षनेतृत्वासाठी घनिष्ठ मैत्री असलेल्या व्यावसायिक, डॉक्टर, वकील यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाव पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. यामुळे बिगर राजकीय व्यक्तींच्या केबिनमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. काहीवेळा दोन्ही इच्छुक उमेदवार आमने-सामने येत असल्याच्या मजेशीर घटना समोर येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेताळमाळ’च्या उमेदवारीचा घोळ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पद्माराजे उद्यान प्रभागातील वेताळमाळ तालीम परिसरातील उमेदवारीचा घोळ राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चेनंतर गुरुवारी सुटलेला नाही. राष्ट्रवादीचे महापौर झालेल्या या प्रभागात पक्षाने सक्षम उमेदवाराची अट तेथील नेत्यांना घातली आहे. त्यामुळे याबाबतचा तोडगा निघण्यासाठी काही दिवस जाण्याची आवश्यकता आहे.

वेताळमाळ तालीम परिसरातून एक उमेदवार देण्याबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार यंदा अजिंक्य चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. पण चव्हाण हे भाजप-ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तिथे राष्ट्रवादीचे दोन सक्षम नेते असताना ताराराणीचा उमेदवार निवडून देण्याचा प्रकार पक्षाला न रुचणारा असाच आहे. त्यामुळे मुश्रीफ गुरुवारी आल्यानंतर अजित राऊत व उत्तम कोराणे यांच्याशी चर्चा करणार होते. त्यानुसार राऊत यांनी गुरुवारी त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुश्रीफ हे कोराणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

राऊत व कोराणे हे दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत परिसराचा एक नगरसेवक या पद्धतीतून ताराराणी आघाडीचा उमेदवाराला निवडून द्यायचे म्हणजे त्यांना पाठींबा दिल्यासारखेच आहे. यासाठी तिथून राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार द्या असे नेत्यांनी सांगितल्याचे समजते. यातून एक तर चव्हाण यांना राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी लागेल किंवा राऊत, कोराणे यांच्यापैकी एक उमेदवार देऊन निवडणूक लढवावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलामी थेट विकासकामांतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी यावर्षी प्रभागाची नवी रचना झाली. विद्यमान नगरसेवकांचे अनेक भाग नव्या प्रभागात समाविष्ट झाले, तर काही नवीन भाग प्रभागात आले. नव्या भागातील मतदारांना तेथील नवीन इच्छुक उमेदवारांनी गाठण्याआधी विद्यमान नगरसेवकांनी थेट काम सुरू करून आगामी पाच वर्षांची जणू सलामीच दिली आहे. कुणाच्या रस्त्यावर मुरुम पसरणे, सफाई होत नसलेल्या भागात कर्मचारी पाठविण्याबरोबरच अडीअडचणी सोडविण्यासाठी संपर्क केला जात आहे. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा फंडा अवलंबला असला तरी या भागांमधील मतदारांना मात्र नव्या रचनेचे फायदे मिळू लागले आहेत.

जुन्या प्रभागात ज्या मतदारांनी नगरसेवकाला मतदान केले नव्हते अथवा त्या भागात काम करून काही फायदा होणार नाही हे माहिती होते, त्या भागात नगरसेवकांनी दुर्लक्ष केले होते. काही नगरसेवकांनी तर अशा भागातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली होती. 'उद्या करतो, या आठवड्यातील गडबड कमी होऊ दे, माणसेच मिळत नाहीत' अशा पळवाटा शोधून काम करायचे नाही व दुसरीकडे त्या नागरिकांना थेट दुखवायचेही नाही असे काम अशा नगरसेवकांनी केले होते. पण नव्या रचनेत अनेक प्रभागातील भाग जोडले गेले, तोडले गेले. तोडले गेलेले भाग नजीकच्या प्रभागात जोडले गेल्याने तेथील विद्यमान नगरसेवकांना मतदारांचे नवे पॉकेट तयार करण्याची संधीच मिळाली आहे.

विद्यमान नगरसेवकांनी पूर्वीच्या प्रभागात कामे जवळपास पूर्ण करत आणली आहेत. आचारसंहिता सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत नव्या भागातील मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्या भागातील शिल्लक विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. कमी कालावधीत रस्ते, नवीन गटारीसारखी मोठी कामे होणार नाहीत. पण ​तेथील स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, औषध फवारणी यासारखी कामे करता येणे शक्य आहे. त्यानुसार विद्यमानांनी अशा भागांमध्ये कर्मचाऱ्यांची टीम लावून कामे केली जात आहेत. यामुळे यापूर्वी अनेकदा सांगूनही परिसराची स्वच्छता होत नसताना नव्या रचनेनंतर मात्र स्वच्छतेसाठी दररोज कर्मचारी येऊ लागले आहेत. औषध फवारणीचीही तीच परिस्थिती आहे. जुन्या नगरसेवकाने दुर्लक्ष केलेल्या अनेक भागात रस्ते नाहीत. तिथे नवीन रस्ता नाही, पण तेथील नागरिकांना सोयीचे होण्यासाठी मुरुम पसरण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे भरून घेण्याचे कामही जोरात सुरू आहे. यामुळे पूर्वीपेक्षा परिस्थिती चांगली होत असल्याच्या भावना त्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. त्याचवेळी जुन्या नगरसेवकाच्या नावाने बोटेही मोडली जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची वाढली भाऊगर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी यांच्याकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, विद्यमान नगरसेवकांचा विचार करता पुन्हा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेस नेत्यांतील राजकारणामुळे पक्षाचे नगरसेवक 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. शिवसेनेकडून लढणाऱ्यांची संख्या मोठी आहे, इच्छुकांची संख्या २०० च्या आसपास पोहोचली आहे. भाजपची पहिली यादी तयार आहे, तर ताराराणी आघाडीने बहुतांश ठिकाणी उमेदवार निश्चित केले आहेत.

काँग्रेसमध्ये २० ऑगस्टनंतर घडामोडींना वेग

काँग्रेस कमिटीतूनच इच्छुकांना अर्ज दिले जात आहेत. अर्ज वितरण आणि स्वीकृती काँग्रेस कमिटीतच सुरू आहे. काँग्रेसकडून लढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच दिवसात १५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. काँग्रेसकडून नवख्या उमेदवारांकडून अर्ज नेले जात आहेत. ​काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक मात्र घाई करताना दिसत नाहीत. महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, नगरसेवक सचिन चव्हाण, राजू पसारे, चंद्रकांत घाटगे यांनी अर्ज नेले आहेत. काँग्रेसचे ३३ नगरसेवक आहेत. मात्र, पक्षातील राजकारणामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. २० ऑगस्टला काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग येणार आहे.

राष्ट्रवादीकडे आतापर्यंत १४० जण इच्छुक

राष्ट्रवादीकडे आजअखेर १४० जणांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. गटनेता राजू लाटकर, आदिल फरास, बाळकृष्ण मेढे,, रमेश पोवार, प्रकाश गवंडी, जालंदर पोवार, सतीश लोळगे, प्रकाश कुंभार, प्रकाश पाटील, महेश जाधव, सचिन खेडकर, विश्वास आयरेकर आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, प्रदीप पोवार यांनीही अर्ज नेले आहेत.

शिवसेनेच्या गळाला काही नगरसेवक

शिवसेनेकडूनही लढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गुरुवारअखेर २०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक पुन्हा लढणार आहेत. महापालिकेत सध्या शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. सेनेने निवडणूक संपर्क कार्यालय सुरू केले आहे. पुढील आठवड्यात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतरच उमेदवारी निश्चितीबाबत घडामोडींना वेग येणार आहे.

भाजपची यादी सोमवारनंतर

भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीकडून निवडणूक ताकदीने लढविली जाणार आहे. भाजपने उमेदवारांची चाचपणी केली आहे. भारतीय जनता पक्षाची यादी सोमवारनंतर अंतिम केली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारपासून कोल्हापुरात आहेत. रविवारी किंवा सोमवारी त्यांची ताराराणी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे. दरम्यान, भाजपने पहिल्या टप्प्यात ११ जणांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. तर ताराराणी आघाडीने संभाव्य उमेदवारांना प्रचाराच्या सूचना केल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांवर भाजप लक्ष ठेवून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापलेकाने पळवला वाहतूक शाखेचा जॅमर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या मोटारीला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जॅमर लावल्यानंतर मोटारीचा मालक व त्यांच्या मुलाने जॅमर पळवून नेला. पोलिसांनी अॅरॉन सदाशिव भोसले (वय २१), सदाशिव आण्णाप्पा भोसले (६५, रा. कनाननगर) व अॅरॉनच्या मित्रांविरूध्द लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली.

लक्ष्मीपुरी कोंडाओळ सिग्नलजवळ वाहतुकीची कोंडी झाल्यावर शहर वाहतूक शाखेतून संजय रंगराव जाधव यांना वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या मोटारीला जॅमर लावण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिस नाईक संजय जाधव कोंडा ओळ येथील एका मोबाइल कंपनीच्या दारातील मोटारीला जॅमर लावत असताना मोटारीचे मालक सदाशिव भोसले आले. त्यांनी जाधव यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

भोसले व त्यांचा मुलगा अॅरॉन यांनी जाधव यांना शिवीगाळ केली. तसेच जॅमर लावलेले चाक अॅरॉन याने जाधव यांच्या समोर काढून जॅमरसह मोटार घेऊन पलायन केले. जाधव यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात भोसले पिता-पुत्राविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सदाशिव भोसले यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला २२५ कोटी रुपयांचे ‘अमृत’?

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

स्मार्ट सिटी योजनेतील निराशेनंतर अटल मिशन फॉर रिज्युव्हिनेशन अँड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन (अमृत) योजनेतून पहिल्या टप्प्यात शहरातील जवळपास २२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेला निधी मिळू शकतो. शहरात स्वच्छ पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन, पार्किंग, नवीन उद्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी या योजनेतून निधी मिळू शकतो.

या योजनेत मंजूर प्रकल्पाचा निधी २०ः४०ः४० अशा टप्प्याने दिला जाणार आहे. योजनेच्या यादीमध्ये कोल्हापूरबरोबर सांगली मिरज कुपवाड, इचलकरंजी यांचासमावेश आहे. महापालिकेने यापूर्वी राज्य सरकारच्या सुजल योजनेतून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिंगणापूर योजनेची गळकी लाइन बदलण्यात यश आले, पण वितरण नलिकांबाबतचा प्रस्ताव रेंगाळला. विनागळती व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण नलिकेचा १४ कोटींचा हा प्रस्ताव यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नदीप्रदूषण टाळण्यासाठी ड्रेनेजलाइन अत्यावश्यक आहे. सध्या शहरातील ३५ टक्के भागात ड्रेनेज लाइन नाही. जुनी ड्रेनेज लाइन बदलण्याची आवश्यकता आहे. ५० टक्के ड्रेनेज लाइन नवीन टाकण्यासाठी महापालिकेने २११ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव 'अमृत' योजनेतून मंजूर होऊ शकतो. पाण्याबरोबरच हवा प्रदूषण रोखण्यासाठीही 'अमृत' योजनेतून पाठबळ दिले जाऊ शकते. तर शहरात उद्यानांची निर्मिती करून जास्तीत जास्त ​वनराई फुलवण्याचा प्रयत्न होणार आहे. पार्किंगची सुविधाही यामध्ये नमूद केली आहे. खास मुलांसाठी रिक्रिएशन्स सेंटरवरही या योजनेमध्ये फोकस ठेवण्यात आला आहे.

५० हजार कोटींची तरतूद

शहरातील पूरस्थिती कमी करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज यंत्रणाही या योजनेत राबवता येऊ शकते. या योजनेत समावेश होणाऱ्या शहरांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा निधी विविध शहरांनी सादर केलेल्या प्रकल्पांना टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. त्यासाठी २० ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

कुपवाड : सहा वर्षांच्या मुलाचा टॉन्सिल ऑपरेशनंतर तत्काळ मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी शुक्रवारी डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सांगलीतील डॉ. भूषण कुलकर्णी आणि ज्योती कुलकर्णी यांच्या नाक, कान, घसा हॉस्पिटलमध्ये ३० एप्रिल रोजी दिगंबर चंद्रकांत आरते (वय ६, रा. कसबेडिग्रज) या मुलाचा मृत्यू झाला होता.

डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या हॉस्पीटलमध्ये दिगंबर आरते याचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ सहा डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. दिगंबर आरते याचे टॉन्सीलचे ऑपरेशन झाल्यानंतर तो शुध्दीवर येवू लागताच रडायला लागला.त्यामुळे त्याला आणखी एक इंजेक्शन देण्यात आले. त्या इंजेक्शननंतर त्याची प्रकृती ‌िचंताजनक झाली. घशातून रक्तस्त्राव होऊन तो फुफुसापर्यंत पोहचला.त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस पतसंस्था बंद करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

राज्यात तब्बल दोन लाखांहून अधिक पतसंस्था आहेत. परंतु, यातील तब्बल एक लाख पतसंस्था केवळ जिल्हा बँकेसाठी मताचा अधिकार रहावा म्हणून कागदोपत्री सुरू आहेत. त्यांच्याकडे ना कार्यालय, ना संचालक मंडळ, त्यामुळे अशा सर्व बोगस पतसंस्था येत्या सप्टेंबर अखेर बंद करणार असल्याची घोषणा सहकार, वस्त्रोद्योग व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. शुक्रवारी यशवंत उद्योग समुह आयोजित सहकार मेळाव्यात पाटील बोलत होते.

अध्यक्षस्थानी कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाष एरम होते. म्हणाले, मागील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने तक्रारी असणाऱ्या संस्थांची चौकशी न करता उलट चौकशांवर स्टे आणले. चौकशीचे नाटक करायचे आणि अमुक यांना भेटा असे सांगायचे, त्यामुळे ते सरकार पिशवी सरकार होते. मात्र, भाजप सरकार सत्तेवर येताच आम्ही स्टे उठवून संस्थांची चौकशी सुरू केली. राज्यात दोन लाखांहून अधिक पतसंस्था आहेत. यातील एक लाख पतसंस्था बोगस आहेत. केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मताचा अधिकार रहावा म्हणून त्या सुरू आहेत. या संस्थांचे ना कार्यालय आहे, ना संचालक मंडळ, केवळ कागदोपत्री त्या सुरू आहेत. त्यामुळे या सर्व पतसंस्था येत्या सप्टेंबरअखेर बंद करणार आहे. सहकाराला शिस्त लागण्यासाठी भ्रष्ट कारभार करणाऱ्या पाच-पंचवीस संस्थाचालकांना जेलमध्येही टाकण्याचा विचार आहे.

सहकारी बँका व पतसंस्थांमध्ये लाखो, कोटी रूपये पडून आहेत. ते वापरात यावेत आणि उद्योग निर्मितीतून रोजगार उपलब्ध व्हावा, या साठी बँका, पतसंस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत लवकरच नवे सहकारी धोरण राबविण्यात येणार असून, २०१६च्या अधिवेशनात ते संमत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टंचाईच्या उपाय योजना राबविण्यासाठी बँका, पतसंस्थांनी सरकारला आर्थिक सहकार्य कारावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पाऊस

राज्यातील सलग दुष्काळग्रस्त असलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. गरज पडल्यास पश्चिम महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी संबंधितांना उपाय योजना करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याच्या काही भागात सलग चौथ्या वर्षीही दुष्काळाची स्थिती आहे. यंदा राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, सलग दुष्काळ असलेल्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येतो. आवश्यकता पडल्यास राज्याच्या अन्य भागातही हा प्रयोग राबविण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

शहर विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव त‌यार करून तातडीने तो प्रशासनाला सादर करावा. त्यासाठी राजकीय पातळीवर पुरेसे सहकार्य करू अशी, ग्वाही वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

केसरकर गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता हद्दवाढीसंदर्भात येथील नगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील व तहसीलदार हनुमंतराव पाटील, बड्याचीवाडी सरपंच गीता देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

केसरकर म्हणाले, विविध आघाड्यांवर सातत्याने अग्रेसर असलेल्या गडहिंग्लज शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवून देणे आवश्यक आहे. त्यानंतर महिनाभरात बैठकीचे आयोजन करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. 'लेक वाचवा' कार्यक्रमांतर्गत दहा हजार रुपयांच्या ठेव पावत्यांचे वितरण केसरकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, मुख्याधिकारी तानाजी नरळे, विजय देवणे, अॅड. श्रीपतराव शिंदे, प्रा.सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा छाप्यातील संशयितांना न्यायालयीन कोठडी

$
0
0

पन्हाळा : कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली उच्चभ्रू वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या खडेखोळवाडी (ता. पन्हाळा )येथे अटक केलेल्या १० आरोपींची १० दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

खडेखोळवाडी येथील आडबाजूस असणाऱ्या बाबासो कोंडे यांच्या' इंदुशंकर कृषी पर्यटन केंद्रात' अवैध प्रकार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. त्यानुसार शनिवार आठ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकून स्टेरिओवरील गाण्याच्या तालावर अर्धनग्न अवस्थेत नृत्य करत असलेल्या चार युवतीसह बेळगाव येथील किरण रजपुत, आप्पासो पाटील, मंजुनाथ कलगुटगी, नागराज हणमतैय्या, हेमंत रामयगौडा, शिवगोंडा पाटील, अरुण मुस्लिमारी यांच्यासह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणारी टीना उर्फ नर्मिता पंडीत आणि पर्यटन केंद्राचा मालक बाबासो कोंडे यांना अटक केली होती. या प्रकरणात मुली पुरवणारा आणि फरारी झालेला चालक मुबारक नदाफ याला दोनच दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनपाल मारहाणप्रकरणी सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वनपालास मारहाण केल्याप्रकरणी चौथे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मधुकर गणपती पाटील (रा. कोगनोळी), शांताराम गणपती पाटील, राजाराम आनंदा पांगिरे, सरदार माणकू पाटील, शामराव संतू पाटील (चौघेही रा. मोरेवाडी, ता. भुदरगड) या पाच आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

खटल्याची हकीगत अशी ः फिर्यादी आनंदा आबाजी पाटील (वय ५७, रा. मोरेवाडी) हे वनपाल म्हणून सेवेत आहेत. सन १९९५ मध्ये मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आनंदा पाटील यांचे भाऊ नामदेव पाटील व आरोपी मधुकर गणपती पाटील यांनी निवडणूक लढवली हाती. निवडणूक निकालावर नामदेव पाटील यांनी दाद मागितली होती. त्यामुळे आरोपी त्यांच्यावर चिडून होते. आनंदा व नामदेव पाटील कूर येथील फॉरेस्ट ऑफिसमध्ये बसले असताना आरोपींनी पाटील बंधूंवर हल्ला केला. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गारगोटी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर खटला चालला. त्यांनी आरोपींना चार वर्षांची शिक्षा दिली. त्याविरुद्ध आरोपींनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती.

बनावट पिस्तूलप्र्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूरः बनावट पिस्तूल व मॅगेझिन बाळगणाऱ्या तिघा संशयितांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. सतीश सिद्धेश्वर तोरगलकर (वय ४०, रा. घुमट गल्ली, पेठवडगाव, ता. हातकणंगले), राजू सर्जेराव जाधव (३४, कैकाडी गल्ली, पेठ वडगांव), संदीप प्रकाश माने (१९, अंबाबाई मंदिरजवळ, पेठ वडगांव) अशी संशयितांची नावे आहेत. गुरुवारी रात्री दीड वाजता शिवाजी पूल चौक येथे कारवाई करण्यात आली. तिघे संशयित रत्नागिरी येथून मोटारसायकल व मोपडने कोल्हापुरात येत होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री गस्त घालत असताना रात्री दीड वाजता त्यांनी संशयितांची वाहने तपासली. झडती घेतली असता त्यांच्याजवळ ७५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल, ९ एम.एम. पोलिसांनी जप्त केले.

गांजाप्रकरणी कैद्याला अटक

कोल्हापूरः कळंबा कारागृहात गांजा, तंबाखू जर्दाच्या पुड्या व मोबाइल फोनची बॅटरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सद्दामहुसेन नजिर देसाई (वय २३) या कैद्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. २८ जुलैला देसाई न्यायालयीन कामकाजानंतर कारागृहात जात असताना अंगझडतीमध्ये त्याच्याकडे गांजा मिळाला होता. देसाई याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद असून, त्याला कळंबा कारागृहात ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकांसह चार प्रवासी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा रस्त्यावर केएमटी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक व चार प्रवासी जखमी झाले. अपघात शुक्रवारी सकाळी सात वाजता घडला.

बस माळ्याची शिरोलीकडे जात होती, तर ट्रक गगनबावड्याकडून कोल्हापूरकडे येत होता. बालिंगा येथील पेट्रोलपंपासमोर मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची बसला धडक बसली. यामध्ये बसचालक मोहन मधुकर परदेसी (वय ५५, रा. मंगळवार पेठ), ट्रकचालक कुलदीप शिवाजी जाखले (३० उचगाव), बसमधील प्रवासी सुरेश साळोखे (५४, रा. बागल चौक), महेश्वरी माळी (लक्षतीर्थ वसाहत), सलोनी पडवळ (रा. फुलेवाडी), विशाल माळदकर (गोंधळी गल्ली) जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत भीषण आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील वखारभाग परिसरात असलेल्या भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे आठ ते १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी शहर व परिसरातील सुमारे शंभराहून अधिक अग्निशमन बंब पाण्याचा मारा केला. पहाटेच्या सुमारास लागलेली आग सुमारे दहा तासापर्यंत धुमसत होती.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वखारभाग परिसरात भिकुलाल मर्दा याचे अरविंद हाऊस नामक दुमजली इमारत आहे. याठिकाणी खालच्या मजल्यावर पाठीमागील बाजूस कापडाचे गोदाम तर समोर व वरच्या मजल्यावर कार्यालय आहे. याठिकाणी त्यांच्या विविध उद्योगातील विविध क्वॉलिटीचे प्रक्रिया केलेले तयार कापड याठिकाणी पॅकिंग केले जाते. त्यांचा अरविंद नामक ब्रँण्ड असून याठिकाणाहून तो देशभरात पाठवलो जातो. शहर व परिसरातील सर्वात जुने व प्रसिद्ध उद्योजक म्हणून मर्दा यांची ओळख आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोदामातून धूर व आगीचे लोळ येत असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच घटनेची माहिती मर्दा यांनाही दिली. गोदामात मोठ्या प्रमाणात पॅकिंग कापडाचे गठ्ठे असल्याने आग मोठ्या प्रमाणात फैलावत गेली. आग विझवण्यासाठी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी, जयसिंगपुर, वडगांव, नगरपालिका, घोडावत उद्योग समूह, जवाहर साखर कारखाना, दत्त कारखाना, पंचगंगा कारखाना, पार्वत औद्योगीक वसाहत आदी ठिकाणचे अग्निशमन दल बंबासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तर कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी गोदामातील महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. पहिल्या मजल्यावर कापड साठा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. तर आगीचे लोळ दुसऱ्या मजल्यावरही पोहचल्याने वरील कापडच्या गाठी तसेच कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग धुमसत असल्याने धुराचे लोट उंचच्या उंच दिसत होते.

आगीची तीव्रता इतकी भयानक होती की गोदामातील लोखंडी कपाट, छताचे लोखंड चॅनेल वितळून वाकले होते. तर आगीच्या तीव्रतेने छताचे पत्रे फुटून उडून गेले. तर काँक्रिटच्या भिंतींना तडे जाऊन भिंती पडत होत्या. तर आगीच्या झळांनी परिसरातील झाडांची पाने करपली होती. मोठ्या प्रमाणात एकावर एक असा साठा असल्याने पाण्याचा मारा करुनही आग विझवण्यास अडथळे येत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने भिंती पाडून गोदामातील साहित्य बाहेर काढण्यात येत होते. सुमारे दहा तासाहून अधिक काळ सुरू असलेली ही आग विझवण्यसाठी शंभराहून अधिक बंबांद्वारे जवानांनी पाण्याचा मारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images