Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कूरचा तलाठी भोसले अटकेत

0
0

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील कूर येथील तलाठी श्रीकांत भोसले याला सहा हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली. लाचेची रक्कम न स्वीकारता कारवाईची कुणकूण लागल्याने त्याने तक्रारदाराला पिटाळले होते. मात्र, लाच मागणे हेसुद्धा गुन्हा असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

कोनवडे (ता. भुदरगड) येथील कपिल साताप्पा पाटील यांनी कोनवडे येथील गट नं ६२ मध्ये सात गुंठे जम‌ीन खरेदी केली होती. या जमिनीवर नाव लावण्यासाठी संबंधित शेतकऱ्यायाकडे कूर सज्जाचे तलाठी श्रीकांत बाळासो भोसले (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी सहा हजार रूपये लाच म्हणून मागितली होती. याविरोधात संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

तक्रारदार व तलाठी भोसले यांच्यात तडजोड होऊन सहा हजारांपैकी साडेपाच हजार रुपयांवर जमीन नावावर करून देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार पाटील ही रक्कम देण्यासाठी गेला असता त्यानी ती स्वीकारली नाही. तरीही भोसले यांनी लाच मागितल्याचे पुरावे असल्याने त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ सह १३ (२ अन्वये) लाच मागितल्याचा गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वायदंडे, हावलदार अमर भोसले, जितेंद्र शिंदे, मनोज खोत, संजय गुरव, संदीप पावलेकर, सर्जेराव पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाऱ्याने वाढविली चिंता

0
0

प्रवीण कांबळे, हुपरी

सध्या वेळीअवेळी पडणाऱ्या पावसामुळे ऊस पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात येत आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी चढ्या किंमतीने ओला चारा मिळवावा लागत आहे. उत्पादन खर्च व दूध दरातील तफावत पाहता अनेक प्रश्न दूध व्यवसायिकांसमोर निर्माण झाले आहेत.

ग्रामीण भागामध्ये जोडधंदा म्हणून दूध व्यवसायक केला जातो. यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह केला जातो. परंतु सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच त्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सध्या दुभत्या जणावरांना ओला चारा म्हणून उसाचा पाला घातला जातो. मात्र, पाऊस नसल्याने उसाचा पाला काढण्यास मज्जाव केला जात आहे. जनावरांना दिल्या जाणाऱ्या आहारातील कडबा कुट्टी, गहू, भूसा, हरभरा डाळ, कळणा, सरकी पेंड, गोळी पेंड, मका, वैरण, गव्हाचे कणी, हत्ती गवत, ऊस, कडबा आदींचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच भाताच्या पिकांच्या पिंजराचा चारा म्हणून उपयोग होत असतो. पंरतु भाताच्या पिंजऱ्याचे दर हजारामध्ये पोहचले आहेत. ग्रामीण भागात शेतकरी शाळू, बाजरी, मका अशा प्रकारच्या हिरव्या चाऱ्याचा वापर करतो. सध्या एका गवताच्या पेंडीस १० ते १५ रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिकाच्या गवतावर किंवा चाऱ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. अशा अनेक कारणांमुळे दूध व्यवसायिकांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच उत्पादन खर्च व दूधाच्या किंमती यातील तफावत पाहता दूध व्यवसाय संकटातून जात असल्याचे चित्र दिसत आहे.

उसाच्या पिकांचा चारा म्हणून वापर

अवेळी पाऊस व राज्य सरकारच्या कुचकामी धोरणामुळे साखर कारखान्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे उसाला दर मिळणे मुश्किल झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक चारा म्हणून विकण्यास सुरूवात केली आहे. पाऊस नसल्याने अन्य चारा मिळत नाही. त्यामुळे भविष्यात उसाचा वापर चारा म्हणून केला जात आहे. भविष्यात चा‍ऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

दूध व्यवसायामध्ये अनेक अडचणीमुळे निर्माण झाल्या असून जनावरांच्या आहाराचे दर गगनाला भिडले आहेत. त्याबरोबरच कामगार पगार, जनावरांचे आरोग्य सांभाळणे, चारा विकत आणणे अशा अनेक कारणांनी दूध उत्पादन खर्च व किंमती यातील तफावत पाहिली असता दूध व्यवसाय संकटात सापडला असून यातून मार्ग काढणे गरजे आहे नाहीतर दूध व्यवसाय संपल्या शिवाय राहणार नाही.

- दीपक बेडगे, डेअरी व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्कराचा धुमाकूळ

0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

उमगाव व न्हावेली (ता. चंदगड) येथे टस्कर हत्तीने धुमाकूळ घालत ऊस, भात, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग भीतीच्या छायेखाली असून टस्कराच्या भीतीने लोक गटागटाने शेताकडे जात आहेत. टस्कराने सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गेल्या आठवड्याभरात उमगाव येथील यशवंत चंदगडकर यांची केळी, काजू भात व भुईमूग, गोविंद गावडे व श्याम फडणीस यांच्या उसाचे नुकसान केले आहे. न्हावेली येथील अशोक पेडणेकर यांचे लागवड केलेले भात व रोपवाटीकेचेही नुकसान केले आहे. टस्कर हत्ती व ग्रामस्थ असा संघर्ष सुरु आहे. मोठ्या आशेने शेतकरी पिक चांगले येण्यासाठी शेतामध्ये रात्रीचा दिवस करतो. मात्र हत्तींकडून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला. टस्कराचे खाणे कमी, शेतातून जाताना त्याच्या पावलामुळे पिके जमीनदोस्त होत आहे. शेतकऱ्यांच्या वाटणीला जंगली प्राण्यांकडून रोजचा त्रास आहे. एकीकडे पिके हाताशी आल्यानंतर होणारे नुकसान शेतकरी सोसत असताना आता रोपलावण झाल्यानंतरच हत्तीने शेतामध्ये धुडगूस घालायला सुरूवात केली आहे.

हत्तींचे चंदगड तालुक्यात आगमन सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये होते. मान्सूनच्या सुरवातीला हत्ती परतीच्या मार्गावर असतो. मात्र यावर्षी या टस्कर हत्तीने सर्व नियम मोडत चंदगड तालुक्यामध्ये मुक्काम केला आहे. सद्या त्याचा मुक्काम झांबरे परिसरातील उमगाव व न्हावेली परिसरात असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. वनविभागाच्या वतीने हत्तींला जंगलात ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी नेहमीच्या प्रयत्नांना हत्ती सद्या जुमानत नसल्याने तो पुन्हा-पुन्हा पिकांचे नुकसान करत आहेत. पिकांबरोबर मानवी वस्तीमध्येही हत्ती रात्रीच्या वेळी येत असल्याने या भागातील लोक जीव मुठीत धरुन वावरत आहेत. येथे ात दाट जंगल, पाण्याची मुबलकता व हत्तीला खाण्यासाठी पुरेसे खाद्य असल्यामुळे हत्ती या भागात ठाण मांडून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञावंत शोधासाठी शिक्षक सरसावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टॅलेंट सर्चच्या नावाखाली ​वेगवेगळ्या संस्था विविध प्रकारच्या परीक्षा घेतात. मुलांना अनेकदा आर्थिक भुर्दंड बसतो. अशा परीक्षांमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागू नये, तसेच विविध प्रकारच्या परीक्षांसाठी मुलांना पहिलीपासूनच तयारी करून घेण्यासाठी महापालिकेतील शिक्षक पुढे सरसावले आहेत.पहिल्याच्या वर्गातील मुलांसाठी 'महापालिका टॅलेंट सर्च' अशी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशासनाधिकाऱ्यांशी त्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. प्राथ​मिक शिक्षक समितीने याकामी पुढाकार घेतला आहे.

शिक्षकच तयार करणार अभ्यासक्रमाचे मटेरियल

​सामान्य ज्ञान परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना भीत वाटू नये, पहिलीपासून त्यांना या परीक्षेची सवय लागावी हा या मागील उद्देश आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयत्न असणार आहे. महापालिकेच्या पहिलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्या विचारात घेऊन शहरातील विविध केंद्रांवर अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. साधारणपणे २०० विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र असणार आहे. या परीक्षेसाठी मुलांची तयारीही शिक्षक करून घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे परीक्षेसाठी आवश्यक मटेरियल (अभ्यासक्रम घटक) शिक्षक तयार करणार आहेत. समानार्थी शब्द, जोड शब्द, शब्द तयार करणे, विरूद्धार्थी शब्द, वाक्य रचना अशा विविध घटकावर आधारित मटेरियल असणार आहे.

परीक्षेसाठी मटेरियल तयार करणे, परीक्षा घेणे यासाठी जो खर्च येणार आहे, त्याची जबाबदारी महापालिका शाळेतील शिक्षकांनी उचलली आहे. प्राथमिक शिक्षक समितीने याकामी पुढाकार घेतला आहे. परीक्षांचे नियोजनही शिक्षकच करणार आहेत. 'महापालिका टॅलेंट सर्च' या नावांनी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव, प्रशासनाधिकारी सुर्वे यांच्याशी परवानगीबाबत चर्चा केली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष व शिक्षक सुधाकर सावंत यांनी सांगितले.

विद्यार्थी व शिक्षकांना गौरविणार

या परीक्षेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांना बक्षिसांनी गौरविले जाणार आहे. तसेच ज्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होतील, त्या शाळेतील शिक्षकांचाही गौरव केला जाणार आहे. बक्षीस रक्कमेसाठी येणारा खर्चही शिक्षकांच्या वर्गणीतून केला जाणार आहे. दहा उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. महापालिका शाळेतील पहिलीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापिकेची सोन्याची चेन लंपास

0
0

कोल्हापूरः ताराबाई पार्क रेसिडन्सी क्लबजवळ मोपेडवरून निघालेल्या प्रा. माधुरी अजय चव्हाण (वय ४४, रा. न्यू पॅलेस परिसर) यांची दोन तोळ्याची सोन्याची चेन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. प्रा. चव्हाण या कॉलेज सुटल्यावर ताराबाई पार्क रेसिडन्सी क्लबमार्गे घरी न्यू पॅलेस परिसरात जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यात सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली. प्रा. चव्हाण यांनी आरडाओरड केला, पण चोरटा मोटारसायकलवरून पसार झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.

दोघा संशयितांना चोरीप्रकरणी अटक

कोल्हापूरः किराणा मालाच्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी रविराज महेश कसबेकर (रा. टेंबलाई नाका) व अरूण मल्लाप्पा शिंदे (वय ३२, रा. टाकाळा) या दोन संशयितांना अटक केली. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. टेंबलाई उड्डाण पूल येथील किराणा मालाच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला ब्रेक

0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

पावसाळी अधिवेशनात कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव पाठवण्यास विलंब झाला आहे. वेळेत प्रस्ताव न गेल्याने पोलिस आयुक्तालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य अधिवेशन मे महिन्यात कोल्हापुरात झाले. या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ कोल्हापुरात उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय स्थापनेला हिरवा कंदील दाखवताना पावसाळी अधिवेशनात पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा कोल्हापुरात केली होती. या घोषणेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले. पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी प्रस्ताव तयार करून विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याकडे पाठवला. वर्मा यांनी आणखी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यासाठी वेळ घेतल्याने हा प्रस्ताव पावसाळी अधिवेशानात वेळेत पोहचला नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तालय स्थापन होण्याबाबत ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्मा यांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार केला तर तो हिवाळी अधिवेशनात पाठवला जाईल. त्यामुळे २०१६ मध्ये पोलिस आयुक्तालय प्रस्तावाची प्रक्रिया सुरू होईल. कोल्हापूर व इचलकरंजी शहरांच्या मध्यभागी असलेल्या शिरोली व गोकुळ शिरगांव या औद्योगिक वसाहती यांचा समावेश करून कोल्हापुरात आयुक्तालय होऊ शकते. पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यावर पोलिसांची जादा कुमक मिळू शकते. तसेच पोलिस आयुक्तालयासाठी पोलिस आयुक्त व अन्य १० किंवा ११ तालुक्यासाठी पोलिस अधीक्षक पद मिळू शकते. सध्या कोल्हापूर पोलिसांच्यावर असलेला ताण लक्षात घेऊन पोलिस आयुक्तालय होण्याची गरज आहे. पोलिस आयुक्तालय झाल्यावर पोलिस अधीक्षक व विशेष पोलिस महानिरीक्षक या दोन्ही पदांचे महत्व कमी होत असल्याने पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला विलंब लावला जात असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी पोलिस आयुक्तालय स्थापनेसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

प्रशासकीय पातळीवर दर्जा वाढणार

पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यास जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय व ग्रामीण भागासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय सुरू होऊ शकते. तसेच कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील गुंडगिरीवर वचक बसवण्यासाठी पोलिस आयुक्त गुन्हेगारांना थेट हद्दपार करू शकतात. सध्या हद्दपारीच्या प्रस्तावाची फाइल जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. पोलिसांची जादा संख्या, नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करता येईल. पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर कोल्हापूर शहराचा दर्जा प्रशासकीय पातळीवर वाढणार आहे.

का हवे पोलिस आयुक्तालय?

वाढता क्राईम रेट

इचलकरंजी व कोल्हापुरातील वाढती गुंडगिरी

इचलकरंजी सतत तणावग्रस्त

चळवळीतील कार्यकर्त्यांचा खून

एव्हीएच आंदोलनाच्यावेळी झालेली पोलिसांचीदमछाक

टोल आंदोलन

ऊसदर आंदोलन

'यापूर्वी पोलिस आयुक्तालयाचे पाठवण्यात आलेले प्रस्ताव नामंजूर झाले. त्यामुळे प्रस्ताव परिपूर्ण करण्यासाठी पोलिस अधीक्षक शर्मा व आपण कार्यरत आहोत. आयुक्तालयासाठी प्रत्येक विभागाचा अहवाल घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव पूर्ण होताच सरकारकडे पाठवण्यात येईल.

- संजय वर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड महिन्यानंतर चाकूहल्ल्याचा गुन्हा

0
0

कोल्हापूरः न्यायालयाच्या आदेशानुसार चाकू हल्ल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. चाकूहल्ल्याची घटना दीड महिन्यापूर्वी ३० जून रोजी रात्री पावणेदोन वाजता साकोली कॉर्नरजवळ घडली होती.

उदयसिंग राजेंद्र गायकवाड (वय २५, रा. रंकाळा टॉवर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड व त्यांचा मित्र योगेश साळोखे हे दोघे रात्री बोलत असताना पुष्पक पांडुरंग गुरव व परेश दिवसे (दोघे रा. साकोली कॉर्नर) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुष्पकने उदयसिंगच्या डोक्यावर व चेहऱ्यावर चाकूचे वार केल्याने तो जखमी झाला. गायकवाड यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्याने गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस आधीच ‘गटारी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारपासून (ता.१५) श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने गटाची अमावास्या जोरात साजरी करण्यासाठी अनेक खवय्यांनी हॉटेल्स बुक करण्याबरोबरच घरगुती बेत यासह निर्सगरम्य ठिकाणची फार्म हाऊस बुक केली आहेत. मात्र गुरुवार व शुक्रवारी मासांहार करता येत असल्याने काहींनी एकदिवस अगोदरच गटारी साजरी करत मासांहारावर येथेच्छ ताव मारला. तर काहींनी शनिवार व रविवारी दोन दिवस सुटी असल्याने काहींनी विकेंड साजरा करण्याचा बेत आखला आहे. पार्टीची जय्यत तयारी करण्यासाठी काहींनी मटण, मासे आणि चिकनची आगाऊ ऑर्डर दिली आहे.

शनिवारपासून श्रा‍वण महिन्याला सुरुवात होणार आहे. हिंदू संस्कृतीमधील महत्त्व असलेल्या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात. तसेच या महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो. बहुतांश महिला व्रत-वैकल्य करत असल्याने मांसाहार बनवण्यास त्यांचा विरोध असतो. यामुळे काही जणांना सक्तीने शाकाहार करावा लागतो. महिन्याभराची चटक आषाढ महिन्यातील आमवस्येला भागवली जाते. मात्र गुरुवार व शुक्रवार आमवस्या जोडून आल्याने बुधवारी रात्री अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले होते. पार्ट्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसत होती.

मांसाहारी खवय्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मटण, चिकन व मासे विक्रेत्यांनी आगाऊ ऑर्डर दिला आहे. यामुळे बॉयलर, खडकी पक्षांना मागणी वाढली आहे. या दिवसी होणारी गर्दी लक्षात घेवून विक्रेत्यांनी ज्यादा व्यक्तींची नेमणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठासाठी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी स्वातंत्र्यदिनादिवशी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सिटीझन फोरमच्या वतीने पक्षकारांच्या झालेल्या बैठकीत देण्यात आला. पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना आणि वकीलांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनात हा मेळावा झाला.

खंडपीठासाठी आता निकराचा लढा उभारावा लागणार आहे. जिल्हा बार असोसिएशनच्या बरोबरीने पक्षकार संघटना या लढ्यात ताकदीने उतरणार आहे. लोकभावनांचा विचार केला जात नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा एकमताने घेण्यात आला.

सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव म्हणाले, 'खंडपीठ झाल्यास पक्षकारांना अधिक फायदा होणार आहे. यासह कोल्हापूरच्या अर्थकारणाला अधिक चालना मिळणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र उच्च न्यायालयातून अद्याप त्याबाबचा निर्णय झालेला नाही. न्यायालयानेही इस्ट इंडिया बार असोसिएशनकडे अभिप्राय मागितला. त्यांना कोल्हापूरच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची जाण नाही. खंडपीठाचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शर्थीचा लढा उभारला जाईल. जिल्हा न्यायालयात गमिनी काव्याने आत्मदहन केले जाईल.'

निवासराव साळोखे म्हणाले, 'गेली पंचवीस वर्षे आंदोलन संवेदनशीलपणे सुरु आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात महामार्ग रोको, रेल्वे रोको करुन आंदोलनाची व्याप्ती दिल्लीपर्यंत वाढविली पाहिजे.' कॉ. दिलीप पवार म्हणाले, 'सरकारने उच्च न्यायालयात प्रस्ताव देताना कोल्हापूरसह पुण्याचाही उल्लेख केल्याने अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने फक्त कोल्हापूरच्या बाजूनेच ठराव देण्याची गरज होती.' बार असोसिएशनचे अध्यक्ष आर. एन. चव्हाण, भगवान काटे, वसंत मुळीक, बबन रानगे, पद्माकर कापसे, बाजीराव नाईक यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रदूषणमुक्ती प्रस्ताव रद्द

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने ३९ गावांसाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र या योजनेतून केवळ शहरीभागासाठी निधीची तरतूद केली जात असल्याने जिल्हा परिषदेला एक रुपयांचाही निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेने राज्य सरकारमार्फत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविलेला १०८ कोटी रूपयांचा प्रस्ताव फेटाळला आहे. या योजनेतून केवळ शहरी भागासाठी निधी उपलब्ध करता येत असल्याने जिल्हा परिषदेचा प्रस्ताव नाकारल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा परिषद राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडे (नाबार्ड) निधी मागण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील १७४ गावांमुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण होत असल्याचा स्पष्ट झाले होते. यापैकी नदीकाठ आणि शहराशेजरील ३९ गावांचा २०१२-१३ मध्ये सर्वे करण्यात आला होता. या ३९ गावांसाठी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. एका खासगी कंपनीकडून सर्वे व प्रस्ताव तयार करण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या होत्या. याचिकेवरील सुनावणीदरम्यान जिल्हा परिषदेने सातत्याने योजनेचा संदर्भ दिला होता. योजनेतून निधी उपलब्ध झाला की प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे, अशी भूमिका जिल्हा परिषदेने मांडली होती.

३९ गावांसाठीचा १०८ कोटी ९३ लाख रूपयांचा हा प्रकल्प गेल्यावर्षी राज्य सरकारला सादर केला होता. तो सादर करताना राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून निधी अपेक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा परिषदेने योजनेचा अभ्यास केला नसल्याचे आता पुढे आले आहे. ज्या योजनेतून ग्रामीण भागासाठी निधीच दिला जात नाही. त्या योजनेसाठी जिल्हा परिषदेने गेली

अडीच वर्षे वेळ घालवला आहे आणि या काळात प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच योजना सादर करताना अधिकाऱ्यांनीही योजनेचा नीट अभ्यास केला नसल्याचे अन्य पर्याय उपलब्ध होईपर्यंत पंचगंगा प्रदूषण होत राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआरबी’ला तंबी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'टोलझोल तातडीने संपवा, अन्यथा करारभंगाचा गुन्हा दाखल करू,' असा सज्जड दम बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) कंपनीला मुंबईतील बैठकीत दिला. कोल्हापुरातील प्रकल्पाचा खर्च ८०० कोटी रुपये असल्याचा दावा कंपनीने केला. 'कंपनीने सबुरीने घ्यावे, अन्यथा सरकार स्वस्थ बसणार नाही,' अशा शब्दांत शिंदे यांनी तो फेटाळला. सोमवारी (१७ ऑगस्ट) पुन्हा बैठक होणार आहे.

रस्ते प्रकल्प मूल्यांकनाच्या दोन अहवालांचा अभ्यास करून प्रकल्प खर्च निश्चित करणे आणि ही रक्कम कशी भागवायची याचा निर्णय घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची बुधवारी बैठक झाली. करारात निश्चित केलेल्या प्रत्येक रस्त्याची किंमतीनुसार मूल्यांकन व्हावे, अशी मागणी आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी केली.

आयआरबीने निकृष्ट काम केल्यामुळे प्रकल्पाचा खर्च १०२ कोटींपर्यंत होईल, असे समिती सदस्य आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले. सोमवारी होणाऱ्या बैठकीत प्रकल्प खर्च आणि देय रक्कम कशी निश्चित केली, याबाबत आयआरबी आणि महापालिकेला म्हणणे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टोल कंत्राट एकतर्फी असल्याने त्याचीच चौकशी करण्याची मागणी टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी केली. कंपनीने करारातील अटी व शर्तींचा भंग केला आहे, असा दावा कृती समितीचे प्रतिनिधी व आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी केला. प्रकल्पाची किंमत कंपनी अवास्तव सांगत असल्याचेही त्यांनी सांगितले.

१०२ कोटी घ्या, विषय संपवा

नोबेल कंपनीने १८२ कोटीचे प्रत्यक्ष कामाचे मूल्यांकन केले आहे. निकृष्ट दर्जाची कामे ६० कोटी व अर्धवट कामासाठी २० कोटी, ही रक्कम वजा केली ‌असता कंपनीला १०२ कोटी रुपये देणे लागते. ते कंपनीला मान्य असल्यास आजच हा विषय संपवितो, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र आयआरबीने त्यास स्पष्ट नकार दिला.

नोबेलचा अहवाल

प्रकल्पाची एकूण किंमतः

२३९ कोटी

प्रत्यक्ष खर्च ः १८२ कोटी

निकृष्ट दर्जाची कामे ः ६० कोटी

अर्धवट कामे ः २० कोटी

भूखंडाची किंमत ः ७५ कोटी

आयआरबीचे म्हणणे

आतापर्यंतचा खर्च ः ८०० कोटी

कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन

क्लॉजप्रमाणे ः २७३ कोटी

हस्तांतर खर्च ः ६० कोटी

(वसुली करू न दिल्यामुळे नुकसान तसेच २७३ कोटींचे व्याज व दंडाची एकत्रित रक्कम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त निवडीच्या चौकशीचे आदेश

0
0

कराड : कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवस्थानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवस्थान पंच कमिटीच्या विश्वस्त निवडीच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना दिल्याची माहिती तक्रारदार व पाल ग्रामपंचायत सदस्य राहुल ढाणे यांनी दिली असून, याबाबत ३० दिवसांत चौकशी अहवाल पूर्ण नाही झाला तर हायकोर्टात जाणार असल्याचेही ढाणे यांनी स्पष्ट केले आहे.

पाल ग्रामपंचायत सदस्य राहुल ढाणे, संतोष पाटील, सयाजीराव पाटील, तानाजी माने आणि विकास खंडाईत यांनी गेल्या २५जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांनी या ट्रस्टचे अध्यक्ष देवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकरी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चुकीच्या मार्गाने विश्वस्तपद मिळविले आहे. वंशपरंपरागत असा कोणताही नियम नसताना देवराज पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने अध्यक्षपद मिळविले असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर इतर माहितीही या तक्रार अर्जासोबत दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये ‘हसत खेळत इंग्रजी’

0
0

कराड तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या ३२७ शाळांतील मुलांसाठी किवळ, ता. कराड येथील माई चॅरिटेबल ट्रस्ट व मुंबई येथील बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने हसत खेळत इंग्रजी बोलण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण व डीव्हीडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी गुरुवारी दिली.

साळुंखे म्हणाल्या, 'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाबद्दल नेहमीच भीती असते. या भितीमुळे त्यांच्यात न्यूनगंड तयार झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील मुले इंग्रजीमध्ये मागे पडताना दिसतात. परंतु, इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा झाली असल्याने या विषयात ग्रामीण भागातील मुलांनीही प्रावीण्य मिळवावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सुरुवातीला कराड तालुक्यातील जि. प. व नगरपालिकेच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात असून, टप्प्याटप्प्याने तो जिल्ह्यातील सर्व शाळांत राबविला जाणार आहे.' कराड तालुक्यातील इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गांना इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना येत्या १७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे प्रशिक्षण व मोफत डीव्हीडी वाटपाचा कार्यक्रम येथील वेणूताई चव्हाण स्मृतिसदन येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापती अमित कदम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, कराड तालुक्याचे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वयानुरूप व अभ्यासक्रमावर आधारित डीव्हीडी तयार करण्यात आल्या आहेत. या डीव्हीडीमधील कार्यक्रम दाखवण्यासाठी शाळेने स्वत: मोठा टीव्ही उपलब्ध करावयाचा आहे. शिक्षकांची मदत व सहकार्य आणि डीव्हीडीतील कृती पाहून लहान वयापासूनच इंग्रजी बोलण्याचा सराव या विद्यार्थ्यांना मिळणार आहे,' असेही साळुंखे यांनी या वेळी सांगितले.

सुरुवात कराडपासून

किवळ येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शाळांना कम्प्यूटर देण्यात आले आहेत. योग प्रशिक्षणाचे धडेही दिले जात आहेत. तसेच अनेक शैक्षणिक उपक्रमांतही या ट्रस्टचा सक्रिय सहभाग असतो. आताही डीव्हीडी व प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात इंग्रजीचा प्रसार होण्यासाठी चालना देणारा उपक्रम या ट्रस्टने हाती घेतला आहे. सुरुवातीला कराड तालुक्यात सुरू होणारा हा उपक्रम पुढे जिल्हाभर राबवला जाणार असल्याने संपूर्ण जिल्हाभर हसत खेळत इंग्रजी शिकण्याची चळवळ उभी राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत एलबीटीची १२० कोटी थकबाकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

एलबीटीची थकबाकी भरण्यास राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत 'अभय योजनेची' मुदत वाढवून दिली, तरीही व्यापाऱ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले आहे. अद्यापही १२० कोटी इतकी एलबीटीची थकबाकी कायम असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

तथापि, एलबीटीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, 'अभय योजनेच्या या मुदत वाढीमुळे मोठ्या प्रमाणात म्हणजेच सुमारे ६५०० व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे, तसेच त्यांनी विवरणपत्रेही सादर केली आहेत. १२०० ते १३०० व्यापाऱ्यांची नोंदणी बाकी आहे. दोन दिवसांत तीही पूर्ण करून १०० टक्के करभरणा करून अभय योजनेची पूर्तता केली जाईल. महापालिकेने केलेल्या १२० कोटी रुपयांच्या अपेक्षा म्हणजे स्वप्नरंजन आहे. व्यापार स्थलांतर, बाहेरची खरेदी आणि परत गेलेला माल यामुळे व्यापार केवळ ६० टक्केच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एलबीटीचे वार्षिक वस्तुनिष्ठ उत्पन्न ६० ते ७० कोटीच आहे.'

१६ ऑगस्टपासून नोंदणी न केलेल्या व हा कर न भरलेल्या व्यापाऱ्यांना दंड-व्याजासह एलबीटी वसुलीसाठी प्रसंगी जप्तीचा बडगा कायम असल्याचे अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'महापालिका हद्दीत १५ हजार करपात्र व्यापाऱ्यांपैकी ८८७० व्यापाऱ्यांनीच नोंदणी केली आहे. तर त्यातील अंदाजे ६५०० व्यापाऱ्यांनीच करभरणा केला आहे. विवरणपत्रे केवळ ३३०० दाखल झाली आहेत. याशिवाय गेल्या एप्रिलपर्यंत थकबाकीचे १२० कोटी रुपये आणि पुढील चार महिन्यांचे महापालिकेला १६८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. पण व्यापाऱ्यांकडून आजअखेर केवळ ३९ कोटी रुपये जमा झाले आहेत. करभरण्यास सध्या थोडी गती आली आहे, पण थकबाकी १२० कोटी रुपये 'जैसे थे'च आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्याचा महिलेवर किसरूळमध्ये हल्ला

0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

शेतातील वैरण कापताना अज्ञात चोरट्याने मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने सरला अरूण तळेकर (वय ३०, रा. किसरूळ, ता. पन्हाळा) या गंभीर जखमी झाल्या. गुरूवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सरला तळेकर या सकाळी साडेनऊच्या दरम्यान जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. वैरण कापत असताना अंगात रेनकोट आणि तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तळेकर यांनी हातात असलेल्या खुरप्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चोरट्याने तळेकर याच्या मान व डोक्यावर वार केले. प्रतिकार करताना त्यांनी हातावर वार झेलल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तळेकरांसोबत असणारे कुत्रे भुंकू लागल्याने चोरट्यांने पळ काढला. जखमी अवस्थेत तळेकर घरी आल्या. ही घटना कळताच गावकऱ्यांनी १०८ क्रमांकावर रूग्णवाहिकेशी संपर्क साधून सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

तळेकर यांचे सासरे आजारी असून त्यांचे पती, दीर सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सेवेत होते. सरला यांच्या बोटाला दुखापत झाली असून शुक्रवार बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कळे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार मीना जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोडरोमिओंना उठाबशा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कॉलेज, बसस्थानक व मुलीच्या येण्या जाण्याच्या वाटेवर थांबून ‌टिंगल करणाऱ्या रोडरोमिओंना मुरगूड पोलिसांनी चांगलाच चोप देत उठाबशा काढायला लावल्या. सुसाट गाड्या पळवणे, मुलींची छेड काढणे, एसटी बसमध्ये दंगा करणे, महिला वाहकांना उद्धट बोलणे असे अनेक प्रका गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. या रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलवून घेतले तर काहींच्या घरापर्यंत जात त्यांचे प्रताप निदर्शनास आणून दिले.

गेले काही दिवस कॉलेज रोडवरील रोडरोमिओंसाठी मुरगूड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉलेजना जातानाची आणि घरी जाण्याच्या वेळेत पोलिसांचे अखंड पेट्रोलिंग सुरु आहे. साध्या वेशातील पोलिस बसमध्ये असतात. आज काही तरूण महिला वाहकाशी उद्धट वर्तन करत होते. तसेच बसमध्ये दंगा करत होते. हे युवक बानगे येथील असल्याचे निसर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याच्या आवारात आणले. दारातच त्यांना बैठका मारायला लावल्या. त्यानंतर कॉलेज आवारात आणून मुलींच्या पुढ्यातही बैठका मारायला लावून पुरते घाईला आणले. त्यानंतर ज्या बसस्थशनक पसिरात दंगा मस्ती केली जात होती तेथेही प्रवाशी, महिला आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांसमोर बैठका मारायला लावल्या. त्यानंतर अनवानी पायाने मुख्य रस्त्यावरुन फिरवत त्यांच्या घरी नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना मध्यस्थाला अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

प्रवासी वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई न करण्यासाठी पोलिस नाईक सुभाष शामराव सरनोबत (४९, रा. माणिक बाग, गडहिंग्लज) यांच्यासाठी हजार रुपयांची लाच स्वीकारताना रावसाहेब राजाराम पाटील (वय ३५, रा. हूनगिनहाळ, ता.गडहिंग्लज) या मध्यस्थाला रंगेहात पकडण्यात आले. पोलिस उपअधीक्षक उदय आफळे व पद्मा कदम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार अतुल सोनबा कडूकर (वय २१, रा.आसगोळी, ता.चंदगड) यांची जिप (एमएच११ एच ८०७५) मधून नेसरी ते चंदगड या दरम्यान प्रवासी वाहतूक करतात. नेसरी (ता.गडहिंग्लज) येथील पोलिस हवालदार सुभाष सरनोबत यांनी तक्रारदार कडूकर यांच्या गाडीवर कारवाई करू नये यासाठी लाच मागितली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगमवाडीतील जमिनीसाठी उपोषण

0
0

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील जंगमवाडी येथील ४३ एकर जमीनचे मूळ मालक असलेल्या २२ शेतकऱ्यांना वहिवाटीस आणि मशागतीस काहीजणांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याने संबंधितांनी गुरुवारपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. श्रीमंत गोविंदराव नारायण घोरपडे यांनी जंगमवाडी येथील ४३ एकर जमीन सन १९७७ साली जाहीरनामा प्रसिद्ध करुन १९८२ साली जंगमवाडी, रांगोळी व हुपरी येथील रहिवाशी २२ शेतकऱ्यांना खरेदी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीमध्ये जबरी चोरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

स्वातंत्र्यदिनी सोडत होणाऱ्या भिशीचे वाटप करण्यासाठी आणलेली दोन लाखाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार इचलकरंजीतील आसरानगरमध्ये बुधवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यामध्ये शिवाजी ज्योतिबा आरेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रत्यक्षात दोन लाख रुपयांच्या चोरीची नोंद असली तरी चाकूचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी सुमारे १४ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची चर्चा घटनास्थळी होती. याबाबत सत्यता पडताळणीचे काम रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून सुरु होते. याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सांगली रोडवरील आसरानगर भागात दुमजली इमारतीत आरेकर हे कुटुंबासह राहतात. किराणा दुकान, पिठाची चक्की आदी व्यवसायाबरोबर ते भिशी चालवितात. १५ ऑगस्ट रोजी भिशीचे वाटप केले जाते. त्यानुसार भिशीच्या रकमेचे वितरण होणार होते. त्यासाठी त्यांनी मोठी रोकड आणून घरामध्ये ठेवली होती. बुधवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी डुप्लीकेट चावीने दुकानाचे शटर उघडून तसेच मुख्य दरवाजा आतून उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांचा आवाज ऐकून शिवाजी आरेकर दुकानात आले. यावेळी तिघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळाला चाकू लावला. या दरम्यान, आरेकर यांच्या पत्नी याही त्याठिकाणी आल्या. आरेकर दाम्पत्याने स्वत:जवळील दागिने देण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी रोकड असलेल्या डब्याची मागणी केली. आरेकर यांच्या पत्नीने रोकड असलेला डबा आणला. चोरट्यांच्या हाती तो देत असताना शिवाजी व चोरट्यांच्यात झोंबाझोंबी झाली. त्यांना मारहाण करीत ढकलून दिले व पसार झाले. आरेकर कुटुंबियांनी दुकानातून बाहेर येऊन आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून भागातील नागरिकांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे परिसरातील काही संशयितांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुमणी पोखरतेय वारणाकाठ

0
0

भगवान शेवडे, शिराळा

उसाची अंतिम बिले मिळालेली नाहीत त्यातच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशा संकटात सापडलेल्या वारणा खोऱ्यातील आणि प्रामुख्याने वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांना हुमणी किडीने आणि मावा किडीने हैराण करून सोडले आहे. संपूर्ण वारणाकाठ हुमणी किडीने त्रस्त झाला असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात पिकांना मोठा फटका बसत आहे. सुमारे ४०० हेक्टरचा परिसर हुमणी किडीने पोखरला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीवरचे पंप काढले आहेत. आता पावसाने ओढ दिल्यामुळे ते विद्युतपंप पुन्हा बसवले आहेत. पाण्याची व्यवस्था करूनही पावसाचे पाणी शेतातून बाहेरच पडले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तिहेरी संकटात सापडलेल्या शेतक-यांना होणारे नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय नाहीत.वारणा नदीकाठावरील हातकंणगले तालुक्यातील तळसंदे पासून शाहुवाडी तालुक्यातील चांदोली धारणापर्यंतच्या गावातील शेतीला हा तिहेरी सामना करावा लागत आहे. हुमणी किडीवर, औषध फवारणी करुनही पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नसल्यामुळे हुमणी किडीने आणि लोकरी माव्याने पुन्हा जोराचा हल्ला चढवला आहे. प्रामुख्याने ऊसासह भुईमूग,भात पिंकावर हुमाणीकिडीचा जास्त प्रादुर्भाव दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीने उसावर मावा किडीचाही प्रादुर्भाव झाला आहे. उसाची बिले अद्याप न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आता किडीवर नियत्रण आणण्यासाठी आर्थिक तरतूदही नाही. त्यामुळे होणारे नुकसान डोळ्याने पाहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हातात आहे. वारणा नदी काठावरील शिराळा तालुक्यातील कोकरूड गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून हुमणी किडीवर नियंत्रण आणण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न सुरु ठेवला आहे. शिराळा तालुका कृषी अधिकारीही त्यासाठी प्रयत्नशील होते.या पट्ट्यातील शेतकरी पिकांची फेरपालट शक्यतो करीत नाहीत त्याचाही परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उसाच्या पिकासह भुईमूग, भात पीक हुमणी किडीने लक्ष केल्याचे एकीकडे दिसत असतानाच दुसऱ्या बाजूला ऊसावर लोकरी मावा किडीने हल्ला चढवला आहे. दमदार पावसाच्या सरी न पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली आहेच त्याचबरोबर लोकरी माव्याने डोके वर काढले आहे. उभ्या उसात सरसकट औषध फवारणी करणे शक्य नसल्यामुळे कमी उंचीच्या उसात औषध फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images