Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हमालांनी साकारली कोटीची शाळा...

0
0

अमित जगताप, पन्हाळा

'हमाल' म्हणजे डोक्यावर पोते अगर टॉवेल नि हातात लोखंडी हुक घेऊन कुटुंबासाठी दिवसभर राब राब राबणारा... मात्र, तो समाजाच्या दृष्टीने उपेक्षित असणारा हा गडी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे पन्हाळा तालुक्यातील दळवेवाडी गावातील हमाल वर्ग. गावातील बहुतांश लोक अशिक्षित आहेत. या गावातील बहुतांश लोक कोल्हापुरात हमाली करतात नि आपला चरितार्थ चालवितात. आपल्याला होणारा त्रास आपल्या मुलाबाळांना होऊ नये, मुले शिकावीत यासाठी काही हमालांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून गावात २००४ मध्ये कै. ज्ञानू गोविंदा दळवी (तात्या) वाचनालय सुरू केले.

लहान वयात हमाली करण्यापलीकडे स्वप्ने बघू न शकणारा तरुण आता क्लासवन अधिकारी होऊ पाहत आहे ते केवळ गावात सुरू झालेल्या वाचनालयामुळे. 'हमालांचे वाचनालय' पाहायला समाजातील सर्व स्तरातील लोक येऊ लागले. त्यातूनच मुंबईच्या 'एम्पथी फाउंडेशन'ने हमालांची शिक्षणाबद्दलची आस ओळखून गावात मुलांसाठी शाळा इमारत बांधून देण्याचे ठरवले. यासाठी विष्णू पंडित यांनी आपली जागा शाळेसाठी बक्षीस दिली आणि बघता बघता शाळेची एक कोटीची इमारत उभारली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्याने गाठली पन्नाशी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आवक आणि मागणी कायम असल्याने शनिवारच्या किरकोळ बाजारामध्ये फळभाजी व पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. फळभाज्यांचे किलोचे दर ३० ते ४० रुपयांवर स्थिर राहिले आहेत. तर कांद्याच्या दरात पुन्हा दहा रुपयांनी वाढ झाल्याने कांद्याने पन्नाशी पार केली आहे. खरीप हंगामातील पेरणीला उशीर झाल्याने कांद्याचा दर असाच वाढत जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रावण महिन्याला एक आठवड्याचा अवधी राहिल्याने फुलांची आवक वाढली आहे.

जुन व जुलै महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने फळभाजी व पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. यामुळे सर्वच भाज्यांचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सीमाभाग, मिरज परिसरासह स्थानिक गावांतील फळभाज्यांची आवक वाढली असल्याने दर चांगलेच खाली आले आहेत. यामुळे काही प्रमाणात गृहिणींना दिलासा मिळाला असला, तरी कांद्याच्या वाढत्या दरामुळे त्यांच्या बजेटवर चांगलाच परिणाम झाला आहे. कांदा उत्पादन क्षेत्रात खरीप पेरणीला उशीर झाल्याने नवीन कांदा बाजारात येपर्यंत दर वाढत राहण्याची शक्यता कांदा विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शनिवार (ता.१५) पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्य केली जात असल्याने पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात. फुलांना मागणी असल्याने हळूहळू बाजारात फुलांची आवक होऊ लागली आहे. यामुळे घाटी दरवाजा व शिंगोशी मार्केट येथील बाजार रंगीबेरंगी फुलांनी फुलून गेला आहे. फुलांना अजून मागणी नसली, तरी श्रावण महिन्यामध्ये मागणी आणि दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांची घोषणाच बाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीसाठी केवळ आरक्षण सोडत निघाली आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी बहुतांशी प्रभागातील सर्वच उमेदवारांची जवळपास नावे निश्चित झाली आहेत. मात्र नाराजी उघड होऊ नये यासाठी या नावांची घोषणा पक्षांनी केलेली नाही. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांनी कमिटीतून अर्ज न्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी-जनसुराज्य, भाजप-ताराराणी आणि शिवसेनेच्या संभाव्य इच्छुकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्यात सर्वच पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित होतील. यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा जोर वाढणार आहे.

तांत्रिक मुद्यावर ३१ जुलैचे आरक्षण सोडत रद्द केल्यानंतर पुन्हा नव्याने सोडत काढण्यात आली. यामुळे पूर्वीच्या आरक्षणामध्ये बदल झाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर विरजण पडले होते. मात्र शेजारच्या प्रभागातून याच नाराजांनी निवडणुकीचा शड्डू ठोकल्याने अनेक प्रभागात लक्षवेधी लढतीची शक्यता निर्माण झाली. बहुतेक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी-जनुराज्य, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडी अशी चौरंगी लढत जवळपास निश्चित आहे.

काँग्रेस कमिटीतून इच्छुकांना अर्ज देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. तर राष्ट्रवादीच्या ताराबाई पार्क व शहर कार्यालयातून जोरदार संपर्क मोहीम राबवली जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांी शुक्रवारी बैठक झाली असली तरी काही ठराविक व्यक्तींनाच निमंत्रीत केल्याची चर्चा आहे. ताराराणीचे प्रमुख स्वतः अनेक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत कोणाला माघार तर कोणाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करत आहेत. पक्षीय पातळीवर निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून प्रथमच सर्व पक्ष ताकदीने निवडणुकीत उतरले आहेत. प्रत्येक भागात पोस्टर ज्वर चढला आहे.

पडद्यामागील हालचाली गतिमान

भाजपने ताराराणी आघाडीबरोबर युती केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही आपल्यासोबत घेण्यात यश मिळवले आहे. शनिवारी रात्री ताराराणी आघाडीचे निमंत्रक सुहास लटोरे यांनी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या युतीत सहभागी होण्याबाब सकारात्मक चर्चा झाली असून रविवारी अधिकृत घोषणा करण्यात येईल असे शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी १५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्याचा निर्णय दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगला फोडून १३ तोळे दागिने लंपास

0
0


कोल्हापूरः फुलेवाडी रिंगरोड येथील डायना कॅसल सत्याई नगर येथील लष्करातील जवानाचा बंगला फोडून चोरट्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड हजार रूपये असा सव्वा तीन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रोहिणी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. रोहिणी पाटील यांचे पती मनोहर पाटील हे लष्कारात जवान आहेत. ते सुटीला आले असून दोन दिवसांपूर्वी कुटुंबासमवेत तिरूपती दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या बंगल्यातील भाडेकरू काटकर यांना शनिवारी सकाळी पाटील यांच्या घराचा लोखंडी दरवाजा तोडल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा आम्ही झेंडा बदलणार

0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

पक्षांतर्गत राजकारण, गेल्या पाच वर्षात ठरा​विक जणांना दिलेली संधी आणि आरक्षण सोडतीनंतर स्वतःच्या गमाविण्याची आलेली वेळ अशा विविध कारणांमुळे जवळपास १५ नगरसेवक महापालिका निवडणुकीत पक्षाचा झेंडा बदलण्याच्या पावित्र्यात आहेत. यामध्ये महापालिकेतील काही माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शिवसेनेतही कुरबुरी असून तिकीट न ​मिळाल्यास काही जण अपक्ष म्हणून ताकद आजमावणार आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे सर्वच पक्षाच्या नेते मंडळीसमोर उमेदवार निवडताना कसरत करावी लागावी लागणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य शक्ती हे प्रमुख पक्ष आहेत. डावे पक्षही निवडणुकीची तयारी करत आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी जनसुराज्यची सत्ता असल्याने आघाडीतील नगरसेवकांवर सेना, भाजपच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सक्षम नगरसेवकांना सर्व प्रकारची रसद पुरविण्याच्या तयारीत सेना, भाजपचे नेते आहेत. भाजपकडून ​शहरातील ​विविध भागात फिल्डींग लावली जात आहे.

पाटील पती-पत्नी सेनेकडे ?

रंकाळा तलाव प्रभागातील विद्यमान नगरसेविका रेखा पाटील व त्यांचे पती राजेंद्र पाटील हे शिवसेनेकडून लढण्याची शक्यता आहे. रंकाळा तलाव प्रभाग हा सर्वसाधारण गटासाठी आर​क्षित झाला आहे. सध्या या प्रभागाचे नेतृत्व नगरसेविका रेखा पाटील करत आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर त्या काँग्रेसच्या सहयोगी सदस्य झाल्या. रंकाळा तलाव हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने या प्रभागातून काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख निवडणूक लढविणार आहेत. राजेंद्र पाटील यांनीही या भागासाठी तयारी सुरू केली आहे. नगरसेविका रेखा पाटील फुलेवाडी (सर्वसाधारण ​महिला) प्रभागातून लढण्याची शक्यता आहे.

बुधवार पेठेत घड्याळासह अपक्ष

कोकणे मठ परिसरातील एका माजी नगरसेवकाने यंदाच्या निवडणुकीसाठी घड्याळ हातावर बांधण्याचे ठरविले आहे. तर याच भागातील आणखी एक नगरसेवक सेनेकडे झुकल्याचे वृत्त आहे. कोकणे मठ हा परिसर सर्वसाधारण महिला गटासाठी आर​क्षित आहे. सत्ताधारी आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणामुळे चार नगरसेवक दुसऱ्या आघाडीत सामील झाले आहेत. महावीर कॉलेज परिसरातील एक नगरसेवक ही यंदा पक्षीय चौकट झुगारून देण्याच्या विचारात आहे.

शिवाजी पेठेतील हालचाली

शिवाजी पेठेतील एक माजी स्थायी समिती सभापती यंदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात आहे. दोन ठिकाणी त्यांची तयारी सुरू आहे. खंडोबा तालीम मंडळ परिसरातील एक माजी नगरसेवकाने दुसऱ्या पक्षाच्या किंवा आघाडीकडून लढण्याच्या विचारात आहे. लक्ष्मीपुरी-शाहूपुरी आणि साईक्स एक्स्टेंशन परिसरातील माजी नगरसेवकही यंदा आघाडी बदलण्याच्या विचारात आहे. सध्या त्यांच्या पत्नी महापालिकेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

भूपाल शेटेंनी घेतली सतेज पाटलांची भेट

राष्ट्रवादीचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी रविवारी माजी मंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. शेटे हे जवाहरनगर प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. ते सध्या प्रतिनिधीत्व करत असलेला स्वातंत्र्यसैनिक वसाहत हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी आर​​क्षित आहे. या प्रभागातून त्यांच्या पत्नी शशिकला शेटे या निवडणुकीच्या तयारीत आहेत. भूपाल शेटे यांनी मात्र 'सतेज पाटील यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली. निवडणुकीचा त्याचा संबंध नाही' असे सांगत निवडणुकीच्या तयारीचा इन्कार केला. मात्र, त्यांच्या हालचालींमुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'जनसुराज्य'ची ताकद क्षीण

महापालिकेत जनसुराज्य अपक्ष आघाडीचे मिळून नऊ सदस्य आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना जनसुराज्य अपक्ष आघाडीतील काही सदस्यांनी निवडणुकीसाठी अन्य एका आघाडीशी जुळवून घेतले आहे. यामुळे जनसुराज्य शक्ती अपक्ष आघाडीची ताकत कमी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणांची नव्हे, कृतीची गरज

0
0

रवींद्र दफ्तरदार, सांगली

सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली आहे. पण, प्रत्यक्षात हे कसे व केव्हा घडणार, खरोखरच हा निधी मिळणार आहे का? असे प्रश्न येथे उपस्थित करण्यात येत आहेत.

सांगली जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळांबाबत प्रस्ताव तयार केले जातात. त्यावर बैठका-चर्चा घडून येते. निधीची घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात मात्र फारसे काहीच घडत नाही, असाच आजवरचा अनुभव आहे. मिरजेतील प्रसिद्ध मीरासाहेब दर्ग्या संबंधीही असेच घडले आहे. यापूर्वी तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ३२४ कोटी रुपयांच्या आराखड्याबाबत महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो सरकारला सादर केला होता. त्यानंतर काहीच घडलेले नाही. मीरासाहेब देवस्थान परिसराप्रमाणेच ऐतिहासिक शहर म्हणून मिरज शहराचा विकासाही केला जाणार होता, पण त्याबाबतही काही हालचाल झालेली दिसत नाही.

मिरज येथील तंतुवाद्य निर्मितीची कलाही सुमारे २५० वर्षांपूर्वीची आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात तिचा नावलौकिक आहे. पण, महागाई, कच्चा मालाचे वाढते दर, तंतुवाद्य निर्मितीतून मिळणारे नाममात्र उत्पन्न इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे आक्रमण आदी कारणांमुळे ही कलाही गेल्या काही वर्षांत संकटात आली आहे. या धंद्यातील कारागीरांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. पण, त्यावरही काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत.

सांगली जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने, तसेच धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. पण, त्याकडे सरकारकडून सदैव दुर्लक्षच होत आले आहे. सागरेश्वर, श्री क्षेत्र शुक्राचार्य, रेवणसिद्ध, श्री क्षेत्र औदुंबर, चांदोली अभयारण्य, शिवकालीन प्रचितगड, गुढेपाचगणीचे पठार आदींच्या विकासासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. पण, त्यासाठी गरज आहे सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. केवळ घोषणा करून जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांचा विकास होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिवशीतील महिलेचा नदीत बुडून मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

सकाळी फिरायला गेलेली महिला भोवळ येऊन नदीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. सुवर्णा बाबुराव भिलुगडे (वय ५२, मूळगाव भीमापूरवाडी. सध्या रा. भिवशी, ता. चिकोडी) असे या महिलेचे नाव आहे.

भीमापूरवाडी येथील बाबुराव भिलुगडे हे त्यांची पत्नी सुवर्णासह गेल्या दोन वर्षांपासून सासरवाडी भिवशी येथे रहात होते. गेल्या चार महिन्यांपूर्वी बाबुराव यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यामुळे सुवर्णा आपले भाऊ डॉ. अण्णाप्पा व बापुसो म्हाळुंगे यांच्याकडे भिवशी येथे रहात होत्या. सुवर्णा नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे सहा वाजता फिरायला गेल्या होत्या. फिरुन येतेवेळी जत्राट नदीवरील पुलावर काहीवेळ त्या बसल्या होत्या. अचानक त्यांना भोवळ आल्याने नदीत कोसळल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या पाण्यातून वहात गेल्या. नातेवाईकांसह नागरिकांनी त्यांची शोधाशोध केल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास सुवर्णा यांचा मृतदेह आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळ्यात चोरट्यांनी तेरा दुकाने फोडली

0
0

म. टा. शिराळा, वृत्तसेवा

शिराळा शहरातील तेरा दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून १ लाख २५ हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे शिराळा शहरासह परिसरात भितीचे वातावरण निर्णाण झाले आहे. चोरट्यांनी दुकानांची शटर उचकटण्यासाठी हायड्रोलिक जॉक किंवा अध्यावत कटरचा वापर केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात चोरीच्या फक्त अफवा होत्या. मात्र, शनिवारी रात्री प्रत्यक्ष चोरी झाल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम हडप केली. गणपती मंदिरातील दानपेटीही लंपास केली आहे. त्यामध्ये सुमारे पंचवीस हजार रुपये होते. परिसरातील दुचाकी शोरूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी फोडून टाकला आहे. शिराळा पोलिसांनी पोलिसांची जादा कुमक मागवून तपासास गती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी, मजुरांना ‘बुरे दिन’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

साखरेचे दर गडगडल्याने पुढील हंगामात ऊसदरावरही अनिष्ठ परिणाम होणार आहेत. जिल्ह्यातील ऊस क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांनाही क्षेत्र घटल्याने यंदा अपेक्षित ऊसतोडणी क्षेत्र उपलब्ध होणार नाही. त्यांच्या पदरात साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या अॅडव्हान्स रकमेतही (उचल) अर्ध्याने कपात होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि शेमजुरांना यंदा 'बुरे दिन' येणार आहेत.

सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या कोयनेसह धोम, कन्हेर, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा झालेला नाही. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड कमी प्रमाणात केली आहे. त्यामुळे यंदा साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी मजुरांनाही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

यंदा दुष्काळामुळे साखर कारखान्यांनी त्यांना देण्यात येणारी अॅडव्हान्सची (उचल) रक्कम निम्म्याने कमी केली आहे. पूर्वी नवरा-बायको जोडीला (एक कोयता) ८० हजार ते लाख रुपयांपर्यंतची रक्कम साखर कारखाने मुकादमांच्या माध्यमातून उचलीपोटी देत असतात. तर बैलगाडीवानाला दीड ते दोन लाख रुपये रक्कम उचल म्हणून त्यांच्या पदरात पडत होती. आता मात्र ती रक्कम निम्म्यावर येऊन ठेपली आहे. ऊसतोडणी मजुर प्रामुख्याने मराठवाड्यातील असतात. तिकडे पाणीटंचाई, जिरायत शेतीमुळे त्यांचे आर्थिक उत्पन्नही अत्यंत कमी असते. त्यात पावसाने ओढ दिल्याने यंदा त्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी ऊस लागवडीचे क्षेत्र घटले, कारखान्यांची अवस्थाही नाजूक

यंदा पावसाने सर्वत्रच रूसवा-फुगवा धरल्याने पावसाची हमखास भरवशाचे नक्षत्रे कोरडीच गेली आहेत. शेताला विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. धरणांतही पाणीसाठा तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हमखास पावसाळ्याचे समजले जाणारे दोन महिने पावसाविना गेल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन बिघडले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने ऊस पिकासारखे बागायत लाभक्षेत्र कोरडेच राहिले आहे. त्यामुळे यंदा मे, जून, जुलै व ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऊस लागणीच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.

पावसाअभावी धरणांतील पाण्याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांनी उसासारख्या नगदी पिकांकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसणार आहे. सातारा जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण २० साखर कारखाने आहेत. त्यातील अगदी मोजकेच कारखाने गळीत हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे. याचा फटका कारखानदारांसह शेतकरी आणि मजुरांना बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर नगरपालिकेत ई गर्व्हनन्स प्रकल्पाअंतर्गत बायोमेट्र‌िक पद्धतीने विवाह नोंदणी सुरू करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

ऑगस्टपासून ही विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे. बायोमेट्र‌िक पद्धतीत नोंदणीच्या ठिकाणीच वेब कॅमद्वारे वधू वरांचे तसेच साक्षीदारांचे फोटो, अंगठ्याचे ठसे घेण्यात येतात. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी शुल्क भरून विवाह नोंदणी करण्यात येते. यापूर्वी विवाह नोंदणीसाठी अर्ज, फोटो द्यावे लागत होते. तसेच नोंदणीनंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी चार दिवस लागत होते. बायोमेट्र‌िक पद्धतीमुळे नवदाम्पत्यास त्वरित फोटोसह विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे शक्य झाले आहे.

जयसिंगपूर नगरपालिकेत विवाह नोंदणी विभागाच्यावतीने ताराचंद रामेश्वरीलाल रतवा आणि विशाल रघुनाथ माळी या दोन विवाहितांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बल्लाळ, एम. एस. चाबुकस्वार, अभियंता सूर्यकांत कोरे, अनिल तराळ, आप्पासो खामकर, अर्जुन देशमुख, संजय शिंदे, बबन यादव उपस्थित होते.

यापूर्वी विवाह नोंदणीनंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. आता बायोमेट्र‌िक पद्धतीमुळे नवदाम्पत्यास त्वरीत फोटोसह विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.

- एम. एस. चाबुकस्वार, उपमुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उडविला रस्त्यांचा रंग

0
0

रमेश चव्हाण, आजरा

पावसाच्या पहिल्या वर्षावातच आजरा तालुक्यातील रस्त्यांचा तकलादू मुलामा उडून गेला आहे. वारंवार सूचना देऊनही आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये कोणतीही सुधारणा न करता ठेकेदारी साभांळण्याच्या प्रयत्नांचा हा परिपाक असल्याने नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. केवळ रस्त्यांचीच दुर्दशा झाली नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाची दशाही उघड झाली आहे. याचा नाहक त्रास आता आजरा तालुक्यातील येथील महत्त्वाच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य तालुका, जिल्हा व राज्यातील प्रवाशांनाही काही महिने सोसावा लागणार आहे.

नेहमीपेक्षा आधीच पावसाने येथे हजेरी लावली. तालुक्यातील नदी, नाले, ओढे वाहू लागले. यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी रस्त्यांवर केलेली तकलादू डागडुजी मात्र, या पावसाने धुवून गेली आहे. कोल्हापूर, संकेश्वर, बेळगाव, आंबोली-गोवा अशा अनेक महत्त्वाच्या परिसरांना जोडणारे महत्त्वाचे दुवे असणारे मार्ग खड्ड्यांनी भरून गेले. पावासचे पाणी साचून त्यांचे रूंदीकरण तर होत गेलेच पण त्यांची खोलीही वाढली. यामुळे कसरती करीतच वाहनचालकांना येथेन मार्गक्रमण करणे भाग पडते आहे. येथील पंचायत समितीच्या मासिक सभांमधून दरवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा, ठेकेदारांशी असलेली जवळीक, तालुक्याच्या कित्येक भागात असणारी रस्त्यांची दुरवस्था, त्याबाबत लक्ष वेधूनही कामे करताना राहणारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि जबाबदारी टाळून केवळ ठेकेदारांनी नेमलेल्या मजूर व कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात येणारा फाजील आत्मविश्वास आदींमुळे तालुक्यात या विभागाचे कोणतेही काम समाधानकारक नव्हते. टिकेचे धनी होऊनही त्यांनी कार्यपद्धतीत सुधारणाच न केल्याचा उत्तम नमुना म्हणून सध्या झालेल्या दुर्दशेकडे पाहीले जात आहे.

सध्या पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने आजरामार्गे आंबोली, कोकण व गोवा परिसराकडे वाहनांचा ओघ आहे. हा मार्ग वेड्यावाकड्या वळणांचा आहे. अनेक ठिकाणी रस्ता अरूंदही आहे. अशा स्थितीत जागोजागी पडलेले मोठमोठाले आणि असंख्य खड्डे वाहचालकांच्या क्षमतेची परीक्षाच घेत आहेत. भरधाव वाहनांना बाजू देण्यासाठी अथवा ओव्हरटेक करण्यासाठी आवश्यक बाजूपट्ट्याही तुटल्या आहेत. जागोजागी खडी विस्कटून गेली आहे. काही ठिकाणी तात्कालिक व्यवस्था म्हणून मुरमाचा वापर करून भरून घेतलेले खड्डे तसेच काही इंचाचा दिलेला मुलामा उडून गेला आहे.

अपघातांची मालिका

सर्वच रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहनचाकलांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. कोल्हापूर आणि आंबोलीला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठी असते. या रस्त्यांवरील साइडपट्ट्या उंच असल्याने वाहने खाली घेताना सरळ बाजूच्या सखल भागात पडतात. त्यामुळे किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोरेन्सिक लॅब लवकरच

0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

भवानी मंडप परिसरातील करवीर प्रातांधिकारी कार्यालयाच्या परिसरात तात्पुरती फोरेन्सिक लॅब सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी प्रातांधिकारी कार्यालयातील तीन खोल्या पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात फोरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने घेतला होता. कोल्हापूर व नांदेड येथे फोरेन्सिक लॅब सुरू करण्याची घोषणा सव्वा वर्षापूर्वी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर आले. फोरेन्सिक लॅबचे महत्व लक्षात घेता गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी फोरेन्सिक लॅब कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय मे २०१५ मध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

फोरेन्सिक लॅबची घोषणा झाल्यावर पोलिस प्रशासनाने लॅबसाठी जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण जिल्हा प्रशासनाने जागेसाठी दुर्लक्ष केले. सरकारी विश्रामगृहाच्या पिछाडीस असलेल्या बंद असलेल्या सरकारी इमारतीची मागणीही जिल्हा प्रशासनाने नाकारली. जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पदभार स्वीकारल्यावर पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी फोरेन्सिक लॅबसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले. भवानी मंडपातील करवीर प्रातांधिकारी कार्यालय नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे भवानी मंडपातील जुन्या करवीर प्रांताधिकारी कार्यालयातील खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. या जागेत तात्पुरती फॉरन्सिक लॅब उभारण्यासाठी तीन खोल्या पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिल्या आहेत.

पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा म्हणाले, 'जिल्हाधिकारी सैनी यांनी तात्पुरती फोरेन्सिक लॅब सुरू करण्यास भवानी मंडपातील तीन खोल्या दिल्या आहेत. फोरेन्सिक लॅबसाठी लागणारे साहित्य व अधिकारी, तंत्रज्ञ व कामगार आल्यावर लवकरच लॅब सुरू होईल. फोरेन्सिक लॅबची नवीन जागा शोधण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहे. फोरेन्सिक लॅब सुरू झाल्यावर गुन्हे तपासणीच्या कामास वेग होण्यास मदत होणार आहे.

लॅबमध्ये होणारी तपासणी

खुनाच्या गुन्ह्यात मृत व्यक्तीचे रक्त, हत्यार आणि कपड्यावरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील मातीत पडलेले रक्ताचे नुमने तपासासाठी पाठवले जातात. बलात्काराच्या गुन्ह्यात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवरच अवलंबून रहावे लागते. रक्त व अन्य घटकाच्या तपासणीनंतर डीएनएवरून गुन्ह्याचा तपास केला जातो. अनोळखी व बेवारस व्यक्तीच्या मृत्यूचा शोधही डीएनवरूनच घेतला जातो. एखाद्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली असेल तर बॅलेस्टिक रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. हाताचे ठसे, हस्ताक्षराचे नमुनेही पाठवले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाप्यात १३ जण अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या इंजोळे पैकी खडेखोळवाडी येथील इंदुशंकर कृषी पर्यटन केंद्रात सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. छाप्यात पाच मुली आणि सात तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उभे केले असता १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पर्यटन केंद्राच्या मालकासह १३ जणांचा समावेश असून त्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे. अन्य एकजण फरारी आहे. अटक केलेले अन्य सात आरोपी कर्नाटकांतील गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच राजकीय क्षेत्रातील बड्या असामींची मुले असल्याचे समजते.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खडेखोळवाडी येथील मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस 'इंदुशंकर कृषी पर्यटन केंद्र' आहे. येथे कोल्हापुरातील टिना ऊर्फ नर्मिता पंडित ही इंजोळे येथील कृषी पर्यटन केंद्राचे मालक बाबासाहेब कोंडे यांच्या इमारतीत विनापरवाना वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ती ड्रायव्हरमार्फत येणाऱ्या ग्राहकांना वेश्या व्यवसायाकरिता मुली पुरवत होती. काल येथे काही तरूणी रेव्ह पार्टीसाठी तरुणांसमवेत आल्याची माहिती गुन्हा अन्वेषणला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे आणि त्यांच्या पथकाने रात्री उ‌‌शिरा कृषी पर्यटन क्रेंदावर छापा टाकला. तेथे किरण बाळाराम रजपूत (वय ३०, रा. यमकनमर्डी ), आप्पासो रामगोंडा पाटील, (४० रा. संकेश्वर), मंजुनाथ प्रकाश कलगुटगी (३३, रा. सौंदत्ती), नागराज हणमतैय्या (३९, रा. छेडानगर बंगळुरू), हेमंत गुरूर रामयगौडा (३५, रा श्रीनिवासनगर बेंगळुरू), शिवगोंडा यल्लाप्पागोंडा पाटील (३७, रा. भडकमगल्ली, बेळगाव) आणि अरुण मुस्लीमारी (वय ३४, बेंगळुरू) हे मद्यधुंद अवस्थेत नृत्य करताना आढळले.

व्यवसायाची सूत्रे कोल्हापुरातून

टिना ह्या कोल्हापुरातून वेश्या व्यावसायाचा रॉकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी आपल्या लाघवी बोलण्याने अनेक युवतींना फसवून या व्यावसायात ओढले आहे. ओडिशा येथील एका मुलीला त्यांनी फूस लावून आणले आहे. यासह कोल्हापुरातील चार मुलींचा पार्टीमध्ये समावेश होता. चार मुली अल्पवयीन

असल्याने त्यांना बाल सुधारगृहात पाठवले आहे. फुलेवाडी येथील एका घरावर टाकलेल्या छाप्यात उच्चभ्रू घरातील काही महिला सापडल्या होत्या. त्याचप्रमाणे शनिवारच्या छाप्यात या मुली सापडल्याने केवळ चैनीसाठी या मुली पार्टीमध्ये सापडल्याची चर्चा सुरू होती.

दोन क्लार्क व मंत्र्याचा स्वीय सहायक

एलसीबीने केलेल्या कारवाईत कर्नाटक मंत्र्यालयातील दोन क्लार्क व उत्तर बेळगाव परिसरातील वजनदार मंत्र्यांचा स्वीय सहायक सापडल्याची चर्चा आहे. पार्टीमध्ये मंत्र्यालयासह मंत्र्यांचे स्वीय सहायक सापडल्याने मंत्रालयातील एखाद्या कामासाठी पार्टी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीआय’ बीपीएडधारकांच्या मुळावर

0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

शालेय जीवनात विविध खेळ खेळायचे, एक-दोन राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवायचे, पदवी प्राप्त केल्यानंतर बीपीएड, एमपीएड करून शारीरिक शिक्षकाची नोकरी मिळवायची, असा निर्धार केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या बेकारीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सन २००९ मध्ये केंद्र सरकारने सक्तीचा मोफत शिक्षण कायदा (आरटीआय) केला. हा कायदा आहे, तसा राज्य सरकारने स्वीकारल्याने गेल्या तीन वर्षांपासून भरतीच झाली नसल्याने हजारो बीपीएडधारक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी बीपीएडधारकांनी संघटनाही स्थापना केल्या. मात्र, यामध्ये सुसूत्रता नसल्याने सरकारी पातळीवर हा प्रश्न लटकत राहिला आहे.

जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठ संलग्नित चार कॉलेज कार्यरत आहेत. दरवर्षी तेथून सुमारे दोनशे विद्यार्थी बीपीएड पदवी उत्तीर्ण होतात. यापूर्वी बीपीएड पदवीधारक मोठ्याप्रमाणात नोकरीच्या प्रतीक्षेत असताना आरटीआय कायद्यांतर्गत बीपीएड, कार्यानुभव, कला, हिंदी व मराठी शिक्षकांच्या भरतीवर टाच आली आहे. पूर्णवेळ भरती होऊ शकत नसल्याने या विषयातील सर्वच शिक्षक अंशकालीन ठरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पूर्वीच्या कायद्यानुसार पाचवी ते आठवी आणि आठवी ते दहावीच्या ३०० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक भरण्याची तरतूद होती. मात्र, पहिली ते आठवी आणि नववी व दहावी असा टप्पा केल्याने शारीरिक शिक्षण, कार्यानुभव व कला शिक्षक भरती प्रक्रिया कात्रीत अडकली आहे. नववी व दहावी वर्गांकरिता सहा तास मिळणार असल्याने पूर्णवेळ शिक्षक भरती करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरले आहे. भरतीची एककीडे समस्या निर्माण झाली असताना, केंद्र सरकारने देशपातळीवर एकाच अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. एक वर्षात पदवी मिळत असताना, याच पदवीसाठी दोन वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. यामुळे फीमध्येही दुप्पट वाढ झाली आहे. भरती आणि अभ्यासक्रमांबाबत बीपीएडधारक संघटित झाले होते. मात्र, त्यांचे एककीकरण तात्पुरते राहिल्याने समस्या मात्र कायम राहिल्या आहेत.

शारीरिक शिक्षणाचा तास 'ऑफ'

२५० विद्यार्थ्यांमागे शारीरिक शिक्षण विषयाचा एक शिक्षक असावा अशी अध्यादेशात तरतूद आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये अशी भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने बहुसंख्य शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास 'ऑफ' ठरत आहे, तर काही शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या तासाचा उपयोग करतात. भविष्यात भरती न झाल्यास क्रीडा विकासालाच खिळ बसण्याची शक्यता आहे.

आरटीआय कायद्यात सुधारणा न करता, राज्य सरकारने आहे तसा कायदा स्वीकारला आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयातील शिक्षकांची भरती पूर्णपणे थांबली आहे. परिणामी बीपीएड, एमपीएड होऊही अनेक तरुण बेरोजगार आहेत.'

- आर. डी. पाटील, अध्यक्ष, जिल्हा क्रीडा व शारीरिक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्महाउसवर रासलीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण संस्कृतीला साजेशे घर किंवा बंगला बांधायचा. विकेंड साजरा करण्यासाठी महिन्यातून कधीतरी कुटुंबासह तेथे मौजमजा करायची आणि इतरवेळा हेच फार्म हाउस मित्र किंवा इतर मंडळींना वापरण्यास देऊन त्यातून 'माया' जमविण्याचा उद्योग काही मंडळींकडून केला जात आहे. मग या फार्म हाउसचा वापर कशासाठी होतो याकडे काणाडोळा केला जातो. पन्हाळा, शाहूवाडी, आंबा, गोवा मार्गावर आणि चंदगड, गगनबावडा, राधानगरीसारख्या निर्जनस्थळी असे अनेक फार्म हाउस नजरेस पडत आहेत. तिथे कोणत्या प्रकारचे अवैध व्यावसाय चालतात हे खेडखोळवाडी (ता. पन्हाळा) येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) कारवाईने प्रातिनिधिक स्वरूप समोर आले आहे.

शहरातील अनेकांनी शहरापासून दूर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात फार्म हाउस बांधली आहेत. स्थानिक एजंटांच्या मदतीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एखाद्या ग्रामस्थाची जमीन कवडीमोल दराने विकत घ्यायची आणि तेथे आलिशान फार्म हाउस बांधली आहेत. वीकेंड साजरा करावा किंवा आपल्या कुटुंबीयांना आठवड्यातील काही दिवस शांतपणे घालवता यावेत यासाठी ही फार्महाउस बांधलेली आहेत. मा‌त्र, यातील काही फार्म हाऊस नावालाच आहेत. येथे अवैध धंदे चालतात. सर्वच फार्म हाउसवर अवैद्य व्यवसाय होत नसले, तरी अनेक फार्म हाउस केवळ अशा मौजमजेसाठी आहेत. त्यांचे रंजक किस्से चवीने चघळलेही जातात.

नागरी वस्तीपासून दूर असल्याने येथे कोणत्या प्रकारची कृत्य चालते याचा कधी मागमूसही लागत नसतो. यामुळे अशा नागरी वस्तीपासून दूर असलेल्या फार्म हाउसवर नेहमीच उच्चभ्रू व्यक्तींच्या आलिशान गाड्या लागलेल्या असतात. काही फार्म हाउस तर जुगाराचे अड्डेच बनले आहेत. शहरातील काही व्यावसायिक सुटीच्या दिवशी नेहमी अशा ठरलेल्या अड्ड्यांवर जमा झालेले असतात. तिथे रुपयांचा नव्हे तर लाखांचे डाव लागलेले असतात. अशा अड्ड्यांवर अनेकवेळा वादावादीचे प्रसंग घडतात. पण त्यावर कारवाई काहीच होत नाही. यावर सामंजस्याने तोडगा काढल्याने अशा वादांची कधीही पोलिस दप्तरी नोंद झाली नाही. केवळ जुगार नसून वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली लेझर शोच्या प्रकाशात अल्पवयीन युवतींना नृत्यासाठी नेले जाते. तर काही ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय केला जातो. अशा अवैध गोष्टी ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर घडत असतात. फार्म हाउसच्या मालकांना राजकीय वरदहस्त लाभल्याने कारवाई होत नसल्याने ग्रामस्थही गप्प बसतात. शनिवारी मध्यरात्रीची कारवाई केवळ हिमनगाचे टोक असल्याचे बोलले जात आहे. कारवाईचा धडाका असाच सुरू राहिल्यास अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

अनुदानाचा वापर

कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी मे महिन्यामध्ये अनुदान स्वरूपात निधी देण्याची घोषणा जिल्हा परिषदेने केली आहे. पाच ते दहा लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने अनेकजण कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. प्रत्यक्ष योजनेला सुरुवात होण्यापूर्वीच खेडखोळवाडी येथील कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या केंद्रावर अशा प्रकारच्या अवैध धंद्यांची माहिती मिळाली आहे. कृषी पर्यटन केंद्राचा असा वापर होणार असेल, तर या केंद्राचा वापर केवळ पर्यटन केंद्रासाठी करावा असे प्रतिज्ञापत्र घ्यावे अशी चर्चा पोलिस मुख्यालयात होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षलागवड ६६ हजारांवर

0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

पर्यावरण रक्षणासाठी समाजातील विविध संस्था, संघटना आपापल्यापरीने वृक्षारोपण करून हातभार लावत असतात. सामाजिक वनीकरण विभाग मात्र सातत्याने प्रत्येक वर्षी विविध योजनांच्या माध्यमातून वनीकरणाची मोहीम गावागावांपर्यंत पोहोचवत आहे. अनेक ठिकाणी सातत्याने केलेल्या वनीकरणानंतर त्या परिसरात आता हिरवाई दिसू लागली आहे. या वर्षातही उद्दिष्टाप्रमाणे दोन महिन्यांत ६६ हजार १०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. सामूहिक जमिनी, निवडलेल्या पायवाटांवर तसेच राधानगरी तालुक्यात रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने जोतिबा, पन्हाळा यांसारख्या डोंगरांच्या परिसरात केलेल्या वनीकरणामुळे सध्या तिथे हिरवाई दिसू लागली आहे. तसेच घाट ढासळण्याच्या घटनांना अटकाव करण्यासाठीही त्याचा फायदा होत आहे. या विभागाला दरवर्षी वनीकरणाचे उद्दिष्ट असते. यंदाही तीन प्रमुख योजनांतून वनीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांत जास्त रोजगार हमी योजनेसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम करण्यात आले आहे. राधानगरी तालुक्यात ही योजना राबविण्यात आली. तालुक्यातील १९ हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यातील प्रत्येक हेक्टरवर २५०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. यातून या वर्षात सर्वाधिक २७ हजार ५०० रोपलावण झाली आहे.

याशिवाय जिल्ह्यातील निवडलेल्या पायवाटा, सामूहिक जमिनींवर वनीकरणाचीही योजना आहे. अशा प्रकारातून पन्हाळा, करवीर व भुदरगड या तालुक्यांमध्ये २९ हेक्टरवर वनीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक हेक्टरवर ९०० रोपांची लागवड करण्यात आली असून, २६ हजार १०० रोपांची लागवड झाली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वनीकरणाचीही योजना आहे. त्यामध्ये पाच किलोमीटरच्या रस्त्याचे उद्दिष्ट होते. प्रत्येक किलोमीटरला २५०० प्रमाणे १२ हजार ५०० रोपलागवड करण्यात आली आहे. याशिवाय शाळांच्या माध्यमातूनही वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात शाळांचा परिसर पाहून ५० शाळा निवडल्या आहेत. त्यांना प्रत्येकी २० रोपे देण्यात येणार असून त्यांनी ती जगवायची आहेत. यातून शाळा परिसरात हिरवाई फुलवण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीची शक्यता भाजपने धुडकावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकाच घरात राहायचे, सारे फायदे घ्यायचे आणि शिव्या देऊन आडमुठेपणाही करायचा अशा वागणाऱ्यांबरोबर महानगरपालिकेत युती होणार नाही,' असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबरोबर युतीची शक्यता रविवारी धुडकावून लावली. ताराराणी आघाडी सोबतच्या युतीनंतर पाटील यांनी शिवसेनेबरोबरच्या युतीसाठी चर्चेची शक्यता व्यक्त केली होती. पण पाटील यांनीच 'आमच्याशी नीट वागणाऱ्यांबरोबरच युती,' असे स्पष्ट सांगितल्याने युतीची शक्यता संपुष्टात आली आहे.

भाजपने ताराराणी आघाडीशी युती केल्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही भाजपला जोरदार उत्तर देण्यात आले होते. 'ताराराणी आघाडीबरोबर युती तोडल्यासच भाजपबरोबरच्या आघाडीचा विचार करता येईल,' अशी अट शिवसेनेने घातली होती. पण भाजपने सेनेबरोबर चर्चा करण्याचे दूरच पण स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआय यांच्याशी चर्चा सुरू केली. त्यानुसार ताराराणी आघाडीचे सुहास लटोरे यांनी स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रविवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच्या युतीची अधिकृत घोषणा करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक सक्षम पर्याय शहरवासीयांसमोर ​ठेवल्याचे सांगितले.

या वेळी पाटील यांना भाजपचा जुना मित्र शिवसेनेबाबतच्या युतीबाबत विचारले असता, ते म्हणाले, 'एकाच घरात रहायचे, त्याबाबतचे सारे फायदे घ्यायचे आणि दररोज शिव्या देऊन भांडणेही करायचे असा आडमुठेपणा करणाऱ्यांसोबत युती नाही. आम्हाला अटी घालण्याचे कारणच नाही.' या वेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, सुहास लटोरे, सुनील कदम, सुनील मोदी, संजय स्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेपूर्वी टोलपासून मुक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महानगर-पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी कोल्हापूरचा टोल रद्द होईल,' असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केला. रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन झाल्यानंतर २३९ कोटीच्या खर्चाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. आता हा खर्च 'आयआरबी'ला कसा द्यायचा यादृष्टीने मंगळवारी (११ ऑगस्ट) मुंबईत मंत्री समिती व टोलविरोधी कृती समितीची पहिली बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे टोलमुक्ती लवकर होण्याची शक्यता आहे.

टोलमुक्तीबाबत सरकारने मंत्री समिती अंतर्गत एक तांत्रिक समिती नेमली आहे. त्यांच्याकडून प्रकल्पाचा सर्व्हे करून झालेला खर्च, अपुऱ्या कामाचा खर्च, निकृष्ट कामांचा किती खर्च वजा होणार, असा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये टोल विरोधी कृती समितीचेही प्रतिनिधी होते. या तांत्रिक समितीने तयार केलेल्या अहवालानुसार रस्ते प्रकल्पासाठी २३९ कोटी रुपये 'आयआरबी'ला देणे लागतात, असे सध्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंगळवारी बैठक आयोजित केली आहे.

पालकमंत्री पाटील रविवारी शाहू स्मारकभवनमध्ये आले होते. त्यावेळी ते म्हणाले, 'महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता ३० सप्टेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी टोल रद्द होईल. त्यासाठी मंगळवारी पहिल्या टप्प्यातील बैठक होत आहे. त्यात 'आयआरबी'चीही भूमिका महत्वाची आहे. मूल्यांकनाची किंमत कमी असली, तर 'आयआरबी' मोठ्या रकमेचा दावा करू शकते. या करारामध्ये लवादाची सुविधा असल्याने त्यांना किती हवे, किती द्यायचे यावर बऱ्याच चर्चा होतील. पण निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा विषय संपवला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवा पसरवणाऱ्या १० ग्रुप अॅडमिनना अटक

0
0

सुनील दिवाण/ मटा ऑनलाइन वृत्त, पंढरपूर

गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावांत चोर शिरल्याच्या अफवांनी अत्यंत घबराटीचे वातावरण आहे. परराज्यातून फासेपारध्यांची मोठी टोळी राज्यात घुसली आहे. गावात चोरटे शिरले आहेत, अशा अफवांचं पिक मराठवाड्यात आलं होतं. गावातील लोक हातात कुऱ्हाडी घेऊन रात्ररात्र जागी राहत आहेत. यावर पोलिसांनी अनेक वेळा खुलासे करूनही दहशत कमी झालेली नाही. या अफवा सोशल मीडियातून पसरवल्या जात असल्याचे लक्षात येताच सोमवारी रात्री अशा १० तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अफवांचे मूळ शोधताना पोलिसांनी मोबाइल तपासण्यास सुरुवात केली. त्यात पंढरपूर तालुक्यातील आनवली व गोपाळपूर परिसरात पोलिस इन्स्पेक्टर दयानंद गावडे यांना अर्ध्या तासात असे मेसेजद्वारे अफवा पसरविणारे आणि ते मेसेज फॉरवर्ड करणारे १० तरुण आढळले. त्यानंतर पोलिसांनी मेसेज पाठवणारे ग्रुप अॅडमिन आणि फॉरवर्ड करणाऱ्या १० तरुणांवर गुन्हा दाखल केला.

मेसेजेसमुळे अनुचित प्रकार

व्हॉट्सअॅपवरील अफवांमुळे सोलापूर जिल्ह्यात काही अनुचित घटनाही घडल्या. भीती पोटी अनेक गावांमधील ग्रामस्थांनी रात्रीच्या गस्ती सुरू केल्या होत्या. तसंच सोलापूरच्या कातेवाडीत चोरट्यांच्या भीतीने जमावाने एक सुमो पेटवली. आणि सुमोतील प्रवाशांना मारहाण केली. अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थाच नागरिक हाती घेत होते. त्यामुळे अफवा पसरवू नका, असं आवाहन पोलीस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलवसुलीला स्थगिती

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीवाडी टोलनाका रद्दसाठीच्या आंदोलनापूर्वी सोमवारी सकाळीच तीस आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशोका कंपनीलाही सरकारी निर्णय होईपर्यंत टोल वसुली करु नका, असे तोंडी आदेश जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिले आहेत. यामुळे सोमवारपासूनची टोलवसुली तात्पुरती का होईना पण थांबल्याचे चित्र आहे.

टोलनाक्यावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर टोल विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने टोल विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हा कोर्टाने अशोका कंपनीला लवादाने दिलेला २०३२पर्यंतचा टोलवसुलीचा निर्णय कायम करीत नुकताच कंपनीच्या बाजूने निर्णय दिला होता. यामुळे कंपनीने टोलवसुलीच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली होती. सरकारकडून या निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेला अर्जही कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी टोलवसुली सुरू होणार, हे गृहीत धरून आंदोलनकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली होती. त्याबाबत पहिली बैठकही झाली होती.

सांगली जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली होती. याची दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल भरावा लागणार नाही, सरकार हायकोर्टात जाईल, अशी ग्वाही देऊन दिलासा दिला होता. कोर्टाने निर्णय दिला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाची टोलवसुलीला परवानगी घेणे आवश्यक आहे. ती परवानगी अद्यापही दिली गेलेली नाही. त्यामुळे सध्यातरी वसुलीवाले नाक्यावर आणि आंदोलक आपल्या जागी गप्प असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, आंदोलनाला रविवारी रात्री पोलिसांनी परवानगी दिली आणि त्याच रात्री तशी परवानगी नाकारलीही होती. सोमवारी सकाळी कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, निमंत्रक सतिश साखळकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, आशिष कोरी, महेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांच्यासह तीस जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना दिलेली आंदोलनाची परवानगीही रद्दही केली.

दुपारी बारा वाजता काही कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले, तेव्हा अशोक बिल्डकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टोल नाक्याचे कार्यालय सुरु केले होते. कार्यालयाच्या बाहेर सडा मारुन रांगोळीही घातली होती. कार्यालयाच्या बाहेर कोर्टाच्या निर्णयाचा आदेश लावला होता. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दिवसभर सर्वकाही शांत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images