Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुन्हा न्यायालयाच्या दारी

$
0
0

प्रक्रिया सरकारमुळेच थांबली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा आदेश वैकल्पिक वाद व न्याय निवारण केंद्रातर्फेच देण्यात आला होता. हा आदेश न्यायालयाचा असताना संवर्धन प्रक्रियेसाठी पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद शाखेच्या अधिकाऱ्यांनी न येण्याचा निर्णय का घेतला? आणि याबाबत जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अमित सैनी यांनी प्रशासनाकडून ठाम भूमिका का घेतली नाही? न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस लागू केली आहे.

मूर्ती संवर्धन प्रक्रिया स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई हक्कदार श्रीपूजक संघटनेच्यावतीने गुरुवारी उच्चस्तर दिवाणी न्यायालयात दरख्वास्त अर्ज दाखल केला. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि पुरातत्व विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

मूर्ती संवर्धन प्रक्रियेवर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया थांबवल्याची माहिती श्रीपूजक संघटनेला कळविण्यात आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर एखादी संघटना आक्षेप घेत असेल तर हा न्यायालयाचा अवमान होऊ शकतो हा मुद्दा उपस्थित करून

श्रीपूजकांनी गुरूवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाने यासंदर्भात दिलेल्या मुदतीत कारणे न दाखवल्यास पुढची कारवाई करू असेही निर्णयात स्पष्ट केले आहे.

मूर्ती संवर्धनासाठी कलाकर्षण विधी संपन्न

श्री अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेतील कलाकर्षण विधी गुरुवारी विधीवत पार पडला. सकाळी दहा वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती आणि प्राणतत्व काढलेला कलश यांची सिंहासनावर प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी उत्सवमूर्तीचे दर्शन खुले झाले. दरम्यान, देवीचा गाभारा पडद्या लावून बंद करण्यात आला आहे. मंदिर आवारातील कारंजा चौकात उभारण्यात आलेल्या यज्ञमंडपात उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

हिंदू जनजागृती समिती म्हणते चर्चेला तयार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अंबाबाई मूर्तीवर केल्या जाणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत आम्ही जिल्हा प्रशासन, श्रीपूजक आणि देवस्थान समितीसोबत चर्चेला तयार आहे. त्यानंतर हिंदू जनजागृती समिती रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबतचा निर्णय घेईल' अशी भूमिका संघटनेचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांची माहिती देण्यासह ही प्रक्रिया इनकॅमेरा करण्याची ग्वाही मिळणे आवश्यक असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. संवर्धन प्रक्रियेला विरोध नसून आमची भूमिका सहकार्याची असेल असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, 'धर्मशास्त्रानुसार मूर्ती जर भग्न झाली तर तिचे विसर्जन करावे असे धर्मग्रंथात नमूद केले आहे. नव्या मूर्तीत देवत्वासाठी आवश्यक प्राणप्रतिष्ठा करता येते असेही धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे झीज झालेली अंबाबाईची मूर्ती विसर्जित करावी, नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करावी. रासायनिक संवर्धन हा एकमेव पर्याय असू शकत नाही. या प्रक्रियेसाठी कोणते रासायनिक घटक वापरणार याची माहिती पुरातत्व खात्याने जाहीर करावी. जर भविष्यात त्या रसायनांचा परिणाम मूर्तीवर झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?'

शिंदे म्हणाले, 'न्यायालयाने तोडगा काढा असे सांगितल्यानंतर रासायनिक संवर्धनाचा निर्णय प्रशासन, श्रीपूजक आणि देवस्थान समितीने घेतला. मात्र, हा निर्णय सर्वांना मान्य असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र अद्याप जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्क‌िल डेव्हलपमेंटचे शिक्षण हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक व रोजभाराभिमुख शिक्षणाची गरज असल्याची स्थिती सार्वत्रिक आहे. मात्र शिक्षण रोजगाराभिमुख असले पाहिजे, पण त्याला नैतिकतेचे अधिष्ठान असले पाहिजे असे मत आजच्या तरुणाईचे आहे. 'शिक्षण रोजगाराभिमुख असावे की नसावे' याविषयी 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने विवेकानंद कॉलेजमध्ये आयोजित 'मटा डिबेट'मध्ये शिक्षणामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. पण कल्पनाशक्तीचे रुपांतर व्यवहारात करणारे शिक्षण हवे असे मत तरुणाईने व्यक्त केले.

सानिया शानेदिवाण : हल्लीची पिढी पदवीनंतर रोजगारासाठी झगडते हे चित्र पहायला मिळते. आपण सर्वजण प्रॅक्टिकल व्हायला लागलो आहे. मात्र ज्ञानामुळे आपण इगोइस्ट होता कामा नाही. शिक्षण घेतल्याबरोबर आपण स्वतःच्या विचार करताना स्वार्थी न बनता समाजाचही विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती शिकत असताना समाजाचा विचार करते. पण पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेल का? याची हमी मिळाली पाहिजे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतः सॉफ्ट स्कीलमध्ये पारंगत झाले पाहिजे. सॉफ्ट स्कील विकसित करण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी कॉलेजांत नवीन कोर्सेस शिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. महाविद्यालयात बी व्होकेशनल कोर्सेस आहेत. पण त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात नाही. या कोर्सेसबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणिव निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते, यासाठी कॉलेजांनी पुढाकार घेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे. सध्याच्या शिक्षणामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र, त्याचे रुपांतर व्यवहारात करणारे शिक्षण हवे. मराठी, हिंदी व इंग्रजीतून पदवी मिळालेल्या विद्यार्थ्याला कथा, लेख, संवाद कसे लिहायचे हे शिकवले पाहिजे. संगणकाचे बेसिक ज्ञानाऐवजी अॅडव्हान्स शिक्षण दिले पाहिजे.

कोमल भंडारी : इंजिनीअरिंग, मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी भरमसाठ फी असते. पण त्यातून रोजगार मिळतो. मात्र आटर्स व कॉमर्समधून शिक्षण घेतल्यानंतर सहा ते सात हजार रुपयांची नोकरीच मिळणार. शिक्षणातून चांगला रोजगार मिळेल याची हमी नाही. त्यामुळे पुस्तकी ज्ञान मिळावे पण त्याचबरोबर चांगला रोजगार मिळावे, असे शिक्षण मिळाले पाहिजे.

गीता कुलकर्णी : पारंपरिक शिक्षण हे व्यवसायभिमुख झाले पाहिजे. पण शिक्षणातून नैतिक मूल्ये मिळणे हे सर्वात महत्वाचे आहे. पदवीच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भता आली पाहिजे. कोणत्या मार्गाने जायला पाहिजे आणि तो मार्ग कसा आहे याचे भान शिक्षणातून मिळाले पाहिजे. शिक्षणातून नैराश्य येता कामा नये. शिक्षणातून व्यावहारिक शहाणपण आले पाहिजे, ज्याचा उपयोग स्वतःसाठी व समाजासाठी झाला पाहिजे.

शिवप्रसाद खतकर : शिक्षण घेतल्यानंतर त्याचा वापर करून पैसा मिळाला पाहिजे, अशी प्रत्येकाची भावना असते. मात्र पैशाच्या

मागेच धावायचे यासाठी शिक्षण हवे का? याचा विचार होण्याची गरज आहे. शिक्षणाला नैतिकतेची जोड मिळाली पाहिजे तर समाजाचे स्वास्थ टिकेल.

सागर माने : बारावीनंतर शिक्षणातून रोजगार कसा मिळेले याचे शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी कौशल्ये विकसित करणाऱ्या शिक्षणाचा समावेश केला पाहिजे. बँकिंग, शेती, तंत्रज्ञान, औद्योगिक प्रशिक्षण दिले पाहिजे. पारंपरिक शिक्षण आवश्यक आहे, पण त्यात अधिक वेळ जाता कामा नये. पदवीनंतर विद्यार्थी नोकरी, व्यवसायासाठी सज्ज झाला पाहिजे, असे शिक्षण देण्यासाठी सरकारी पातळीवर आणि कॉलेजांच्या पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.

सूरज चौगुले : नोकरी मिळावी म्हणून विद्यार्थी शिक्षणाच्या मागे धावतात. त्यातून शिक्षणाचा बाजार झाला आहे. शिक्षणातून ज्ञान मिळवायचे आहे. या ज्ञानातूत स्वतःबरोबर समाज घडवायचा आहे हे समाज विसरत चालला आहे हे चित्र बदलायला हवे.

सुचित निकम : शिक्षणाशिवाय रोजगार मिळणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शिक्षण हे घेतलेच पाहिजे. शिक्षण कोणते घ्यावे, कोणती विद्याशाखा निवडावी याचे भान शिक्षणातून मिळाले पाहिजे.

स्वप्नील वाकडे : रोजगारभिमुख शिक्षणाची व्याख्या ठरवली पाहिजे. पदवीपर्यंच्या शिक्षणानंतर सरकारने नोकरी मिळेल असा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. जो गुणवत्ता सिद्ध करेल, त्याला काम मिळेल अशी शिक्षणप्रणाली हवी. शिक्षणातून रोजगार मिळणार की नाही अशा संकुचित विचाराने याकडे पाहू नये. तर शिक्षणाने विद्यार्थी ज्ञानी होईल, या ज्ञानाचा वापर विद्यार्थ्याला आणि समाजाला होईल याचा विचार शिक्षण प्रक्रिया राबवताना झाला पाहिजे.

भाग्यश्री रेडेकर : रोजगार मिळावा हे शिक्षणाचे ध्येय नसावे. आजही पारंपरिक आणि व्यवसायाभिमुख शिक्षण घेणारे विद्यार्थी वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसते. ते आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतात. शिक्षणातून जगण्याचे प्रयोजन सांगितले पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्याचे बौध्दिक सामर्थ्य वाढले पाहिजे. बौध्दिक सामर्थ्यामुळे विद्यार्थी रोजगाराची वाट स्वतः चोखाळण्यास सिद्ध होईल अशा शिक्षणाची गरज आहे.

धीरज कटारे : शिक्षण घेताना वैचारिक पातळी वाढली पाहिजे. आपण शिक्षण घेतल्यानंतर ज्या ठिकाणी काम करत आहे, तिथे आपले आर्थिक ​शोषण होते का? याचा विचार करण्याची पात्रता शिक्षणाने मिळाली पाहिजे. विचारांच्या जोरावर बदल होतात. सध्या स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया अशा योजनांची घोषणा सरकारने जाहीर केली आहे. या योजना यशस्वी व्हायच्या असतील, तर त्याप्रमाणे अभ्यासक्रम असला पाहिजे.

कोमल यादव : सध्या देशाला १० लाख कुशल व्यक्तींची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन शिक्षणप्रणाली राबवली पाहिजे. कौशल्य असलेल्या मनुष्यबळाने भारत महासत्ता बनणार असल्याने रोजगार आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे.

अरुणा आरडे : गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे शिक्षण ही रोजगार शोधण्याची जननी आहे. आपल्या कुटुंबाला स्थैर्य मिळवण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे. स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचा विकास होऊ शकतो. त्यासाठी कॉलेजांत स्कील डेव्हलपमेंट होणारे शिक्षण हवे. जर कॉलेजांत स्कील डेव्हलपमेंटसाठी संधी नसेल तर ती स्वतः शोधण्याण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. प्रवाहाबरोबर जायचे की प्रवाहाविरुद्ध जायचे इतका आत्मविश्वास शिक्षणातून मिळाला पाहिजे.

अभिजित चव्हाण : स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी कॉलेजांमध्ये सोय केली गेली पाह‌िजे तरच याचा फायदा होईल.

स्वस्तिक जिद्रे : भारत शेतीप्रधान देश आहे. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. महात्मा गांधीनीही खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. पण आज सगळे शहराकडे धावत आहेत. शेतीला पूरक उद्योग लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे. शेतीतून पर्यटन, उद्योग अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला जायला हवा.

बौध्दिक सामर्थ्यामुळे विद्यार्थी रोजगाराची

वाट स्वतः चोखाळण्यास सिद्ध होईल

कम्प्युटरच्या बेसिक्सऐवजी अभ्यासक्रम

आजच्या काळानुसार अॅडव्हान्स करा

शेतीला पूरक उद्योगांसाठीचे अभ्यासक्रम करावेत

बँकिंग, शेती, तंत्रज्ञानासह औद्योगिक प्रशिक्षण द्या

प्रचलित शिक्षणातील नैतिक मूल्येही तपासा

सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंटसाठी शिक्षण मिळावे

सध्याचे शिक्षण व्यवहारात जगायला शिकवत नाही. शिक्षणाने रोजीरोटीचा प्रश्न पहिल्यांदा सोडवला पाहिजे. शिक्षणाने जगता आले पाहिजे. पूर्वी ज्ञानासाठी शिक्षण घेतले जात असले तरी शिकल्यामुळे नोकरी मिळते याची शाश्वती होती. सध्या काळ बदलला आहे. व्यवस्था बदलली आहे. पारंपरिक शिक्षणाने रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध होतात. त्यामुळे चार भिंतीतील शिक्षणाबरोबरच चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण महत्वाचे आहे.

- डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य

शिक्षण म्हणजे साक्षर होणे नसून शहाणे होणे असे आहे. शिक्षणातून जगायचे कसे हे शिकवले पाहिजे. शिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ते जगण्यासाठी उपयुक्त असले पाहिजे. त्यासाठी धोरणे आखली पाहिजे. एकवीसाव्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सुसंस्काराची जोड असली पाहिजे.

- डॉ. डी. ए. देसाई

श्रमाला प्रतिष्ठा देणारे शिक्षण हवे. पारंपरिक शिक्षणाला व्यवसाय, रोजगाराची जोड दिली पाहिजे. तसे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. भूगोलच्या विद्यार्थ्याला टूरिझम, मराठीच्या विद्यार्थ्याला भाषांतराचे कौशल्य शिकवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी शिकत-शिकत कौशल्ये विकसित करतील. ज्ञानाची पातळी उंचावून श्रमाला प्रतिष्ठा मिळेल.

प्रा. एच. पी. पाटील

सध्याच्या शिक्षणाने खऱ्या अर्थाने रोजगार प्राप्त होतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. पदवी शिक्षणानंतर बेकारांचे तांडे बाहेर पडत आहेत. युवकांच्या उर्जेला वाट देण्यासाठी बदलत्या व्यवसायिक शिक्षणाची जोड दिली पाहिजे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल, देश बड्या राष्ट्रांच्या पंगतीत बसू शकेल.

प्रा. संदीप पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटिरांना आले सुगीचे दिवस

$
0
0

मतासाठी तीन हजारांचा दर; जेवणावळींना ऊ‌त

यशवंत पाटील, कोल्हापूर

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली ग्रामपंचायत प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी संपली असली तरी आता छुपा प्रचार जोरात सुरू झाला आहे. एकेका मतासाठी चुरस असल्याने एका मतासाठीचा आकडा तीन हजारांवर पोहोचला आहे. तर धाब्यांवरील जेवणाचे कुपन, दारू आणि अन्य आश्वासने देऊन मतदारांना भुलविण्याच्या योजना अंमलात आणल्या जात आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. जाहीर प्रचार करण्यासाठी उमेदवार सर्व त्या प्रकारे प्रयत्न करताना दिसत होते. खेड्यात सध्या शेतीकामाला मोठ्या प्रमाणात वेग आल्याने मतदार सकाळी व सायंकाळीच घरी भेटत असल्याने उमेदवारांनी सकाळ-संध्याकाळचीच वेळ निवडली. जाहीर प्रचार, पदयात्रा, कोपरा सभा घेऊन उमेदवारांकडून आपणच कसे योग्य आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता जाहीर प्रचार संपल्याने छुप्या प्रचाराला वेग आला आहे.

एकच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करत आहेत. जिल्ह्यातील अनेक उमेदवार बाहेरगावी राहत असल्याने उमेदवारांनी त्यांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. याशिवाय स्थानिक मतदारांसाठी दररोज सायंकाळी जेवणावळ्या, पैसे वाटप असे प्रकार सुरू आहेत. अनेकांनी तर धाबे, हॉटेल, परमिट बार बुक करून ठेवल्याने मतदारांची चांगलीच चंगळ झाली आहे. उमेदवार रात्रीचा दिवस करत आहेत.

गावचे राजकारण हे सेवा सोसायट्या, दूध संस्था यावर चालत असल्याने उमेदवार मतदार वळविण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकेका मतासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. स्पर्धक उमेदवार जणू बोली लावल्याप्रमाणे मतदारांना पैसे वाटप करून कॅश करत आहेत. मतदानात विशेषकरून भाऊबंदकी, शेजारी, पाहुणे यांचा मोठा हातभार मिळत असल्याने अनेक उमेदवारांनी त्यांच्यात राबता सुरू ठेवला आहे. मतदानाला दोनच दिवस राहिल्याने उमेदवार व त्यांचे समर्थक रात्र-रात्रभर जागरण करून आपल्याकडे मतदार वळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुका उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या शनिवारी ​जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी १४७२ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यासाठी २१०५ मतदान यंत्रे वापरण्यात येणार असून ४८५८ कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ४१६ ग्रामपंचायतींपैकी ४६ ग्रामपंचायतींमधील निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर ४८ पोटनिवडणुकीतील ८ ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

४१६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ हजार ९३ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील ७९४४ उमेदवारांनी माघार घेतली तर ३५९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे निवडणूक रिंगणात सध्या ७७९० उमेदवार आहेत. त्यांना ८ लाख ६४ हजार ९२ मतदार मतदान करणार आहेत. यासह पोटनिवडणूकही असून या सर्वांसाठी १४७२ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.

यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांबरोबर सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ४०० यंत्रे मागवली आहेत. निवडणुकीचे साहित्य त​हसीलदार कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी ते साहित्य ग्रामपंचायतींमध्ये पोहच करण्यात येणार आहे. करवीर, कागल, पन्हाळा, गडहिंग्लज, भुदरगड या ठिकाणी निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. यासह अन्य ग्रामपंचायतींमधील ४७ ग्रामपंचायत ​संवेदनशील आहेत. सोमवारी (२७ जुलै) त्या त्या तालुक्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी महसूल विभागाच्या बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस बिलांअभावी शेतकरी हवालद‌िल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पावसाच्या विलंबाने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ऊस बिले दिली नाही, ऊस तोडणीची व वाहतुकीची बिलेही काही कारखान्यांनी दिली नसल्याने शेतकरी हवलादील झाला आहे. एफआरपीची रक्कम मिळाली नसल्याने कारखान्यांनी अद्याप बिले काढलेली नाहीत.

या वर्षी शेतकऱ्यांनी वेळेत ऊस उचल होण्यासाठी मिळेल त्या सहकारी साखर कारखान्याची टोळी मिळविली आणि भरमसाठ खर्च करत ऊस कारखान्याला घातला. ज्यांना टोळ्या मिळाल्या नाहीत त्यांनी स्वत:च तोड करून ऊस कारखान्याला घातला.

पदरमोड करून ऊस कारखान्याला घातलेल्या शेतकऱ्यांना आता उदारीसाठी दुस ऱ्यासमोर हात पसरावे लागत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने खरीपाच्या हंगामासाठीही पैसे मिळत नाहीत. सोसायटींची बिले थकल्याने आता तेथूनही कर्ज मिळेना झाले आहे. पीककर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज केल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला दिला जात नाही. त्यामुळे पतसंस्थांमधून भरमसाठ व्याज देऊन कर्ज उचलत आहेत. कारखान्यांनी हात वर केल्याने आता कशाच्या भरवशावर पुढील हंगामात ऊस कारखान्याला पाठवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

बिद्री साखर कारखान्यानेही काही वाहतुकदारांची तोडणी, वाहतूक बिले दिलेली नाहीत. मासा बेलेवाडी येथील संताजी घोरपडे साखर कारखान्याने तर वाहन धारक तोडणी कामगारांची बिले दिलेली नाही. त्यातच काल झालेल्या बैठकीत सरकारने पॅकेज दिले नाही तर काहीही झाले तरी अॅडव्हान्स द्यायचा नाही असा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांबरोबरच वाहतूकदार, तोडणी कामगारही ‌चिंतेत आहेत.

ऑगष्ट महिना सुरू होत असतानाही अपवाद वगळता अनेक कारखान्यांनी आपली बिले अदा केलेली नाहीत. आता दुसरा हंगाम कसा सुरू होणार आणि एफआरपीनुसार बिले दिली नाहीत तर कोणती कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपावर तोडगा मंगळवारी

$
0
0

सायझिंग कामगारांच्या संपप्रश्नी कामगार मंत्रालयात बैठक

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सायझिंग कामगारांच्या संपावर तोडगा काढून उद्योग पुर्ववत सुरु करण्यासाठी मालक व कामगार संघटनांची मंगळवारी (ता. २८) कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. मंगळवारपर्यंत संप सुरूच राहणार असल्याने वस्त्रनगरीतील सायझिंग-वार्पिंग कारखाने बंदच राहणार आहेत.

राज्यातील कामगारांच्या किमान वेतनाची पुर्नरचना २९ वर्षांनंतर झाली. परंतु सायझिंग व वार्पिंग उद्योगांच्या संदर्भात सदर किमान वेतनाची अंमलबजावनी करण्यात अडचणी असल्यामुळे १७० सायझिंग कारखान्यामधील चार हजार कामगार बेमुदत संपावर गेलेले आहेत. याचा परिणाम झाल्याने इचलकरंजीतील यंत्रमाग, प्रोसेसिंग, व अनुषंगिक उद्योग हळूहळू बंद पडणार असल्यामुळे औद्योगिक शांतता धोक्यात येणार आहे. यामधील वार्पिंग सेक्शन पीस रेटवर आधारित आहे. उर्वरीत सायझिंग उद्योग टाईम रेटवर आधारित आहे. परंतु किमान वेतनाची पुर्नरचना काढणाऱ्या अधिसूचनेमध्ये हे दोन्ही उद्योग एकत्रित करण्यात आल्यामुळे अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन यामध्ये तातडीने मार्ग काढण्यासाठी सायझिंग, वार्पिंग कामगार संघटना व सायझिंग असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलविण्याची विनंती आमदार सुरेश हाळवणकर यांनी आज मुंबई येथे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेवून केली. त्यानुसार मंगळवारी या बैठकीचे आयोजन केले असून बैठकीस प्रधान सचिव कामगार, कामगार आयुक्त, सायझिंग-वार्पिंग कामगार संघटना, तसेच इचलकरंजी सायझिंग असोसिएशन यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

यंत्रमागाच्या वीजदरात वाढ होणार नाही

राज्यातील यंत्रमागाच्या वीजदर कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही. यंत्रमागाच्या वीजदरात राज्य सरकारने वेगळी कॅटेगिरी केलेली असून यंत्रमागाच्या वीजदरात कोणतेही कर आकारणी होऊ नये, यासाठी कारणीभूत ठरणारे परिपत्रक राज्य सरकार रद्द करेल व आवश्यकता वाटल्यास त्यापोटी सबसिडी देण्यात येईल अशी ग्वाही ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली आहे.

नुकतीच वीज नियामक आयोगाने वीजदराची पुर्नरचना केली असून यंत्रमागाच्या वीजदरासाठी वेगळी कॅटेगिरी केली आहे. तथापि, महावितरण कंपनीच्या पाच मार्च,२०१३ च्या परिपत्रकास अनुसरुन विद्युत नियामक आयोगाने वेळोवेळी मंजूर केलेला वाढीव वीजदर (स्थिर आकार व वीज आकार) यंत्रमागधारकांनी भरणे बंधनकारक राहील, अशी अट घातली आहे. या परिपत्रकातील अटीमुळे राज्य सरकारने यंत्रमागधारकास सवलतीचा वीजदर जाहीर केला असला तरी फिक्स्ड चार्जस, डिमांड चार्जेस, इंधन आधिभार, इलेक्ट्रीसिटी ड्युटी, राज्य शासनाचा कर असे विविध कर आकारले जातात. यामुळे प्रत्येक्षात राज्य सरकारने वीजदर कमी केले असले तरी, वाढीव वीजदर भरावे लागण्याची शक्यता आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधानसभेच्या मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात ऊर्जा खात्याच्या चर्चेवेळी लक्षात आणून दिली होती.

९० टक्के कारखाने बंद

सायझिंग वार्पिंग कामगारांनी पुकारलेल्या संपाबाबत चर्चा करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बोलविलेली बैठक मालक प्रतिनिधी न आल्यामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही सायझिंग पूर्णत: बंद राहिल्या. हा संप असाच सुरु राहिला तर येत्या चार-पाच दिवसात यंत्रमागाचा खडखडाटही थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासनाने यंत्रमाग कामगारांसाठी सुधारीत किमान वेतन जाहीर केले आहे. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी चालढकल होत आहे. सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सर्वच कामगारांनी एकजुटीने सहभाग घेतल्याने शहरातील सुमारे १७० सायझिंग पैकी ९० टक्के सायझिंग बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर संपाच्या तिसऱ्या दिवशी या संपाला हिंसक वळण लागून दगडफेकीचे प्रकार घडले. तसेच कामगारांना दमदाटी करण्यात आली.

भुई थोपटण्याची घिसाडघाई नको

यंत्रमाग वीज ग्राहकांसाठी वेगळी कॅटेगिरी करण्याची जे काम मागील सरकारला गेल्या १५ वर्षांत जमले नाही, ते युतीच्या सरकारने आठ महिन्यांत केले असून यंत्रमागधारकांच्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी वेगवेगळी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांनी याची दखल घ्यावी, तसेच शासनाचे निर्णय होण्यापुर्वीच साप, साप म्हणून भुई झोपटण्याची घिसाडघाई करु नये, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचाच रडतखडत विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार राजेश क्षीरसागर गेल्या निवडणुकीत ३८०० तर यावेळच्या निवडणुकीत २३ हजार मतांनी निवडून आलेत. याउलट पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गेल्यावेळी सात हजार आणि त्यानंतर अवघी २२०० मते घेऊन रांगत निवडून आलेत', असा टोला शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी लगावला.

घोटाळ्यांवर घोटाळे करून भाजपने आपणही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंक्तीत असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीवेळी राज्यात टोल आणि एलबीटी पंधरा दिवसांत घालविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे भाजपला मताधिक्य मिळाले. मात्र, आता त्याचा विसर पडल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.

प्रा. विजय कुलकर्णी म्हणाले, 'टोल, एलबीटी पंधरा दिवसांत घालविण्याचे आश्वासन भाजपने दिल्याने त्यांना मताधिक्य मिळाले. फेरनिवडणुका नकोत म्हणून आम्ही पाठिंबा दिला. मात्र वर्षभरात घोटाळ्यांवर घोटाळे भाजपने केले.'

पद्माकर कापसे यांनी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी प्रा. संजय मंडलिक यांच्या निवडणुकीसंदर्भात केलेला आरोप खोटा असून व्यापारी, बिल्डर कोणापासून त्रस्त आहेत हे सांगावे, असे आव्हान दिले.

किशोर घाटगे म्हणाले, 'निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळतो. मात्र आयुष्यभर भाजपसाठी राबलेल्या सुभाष वोरा, प्रभाकर गणपुले, राजाराम शिपुगडे, अरुण अथणे, प्रभाकर शुक्ल, केशव स्वामी यांचा विसर लाटेवरच्या ओंडक्यांना पडला आहे.'

उपशहरप्रमुख सुनील जाधव म्हणाले, 'कसबा बावडा हा सेनेचा स्थापनेपासून बालेकिल्ला आहे. डॉ. डी. वाय. पाटील हे क्षीरसागर यांच्या गुरुस्थानी आहेत. आमदार क्षीरसागर यांनी निधीतून कसबा बावड्यात विकासकामे केली आहेत. लाटेवरील ओंडक्यांना पडलेली बावड्यातील दीड हजार मते पुन्हा चुकूनही पडणार नाहीत.'

लाटेमुळे मिळाली मते

शहरप्रमुख शिवाजी जाधव म्हणाले, 'ज्यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वतःच्या तिसऱ्या अपत्याला दत्तक देण्याची तयारी दाखवली होती आणि महापालिकेत कधीही निवडून येऊ न शकणाऱ्यांना लाटेमुळे काही मते मिळाली. अशांना सत्तेच्या उन्मादात आपण निवडून येऊ असे वाटू लागले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ हजार व्यापारी ‘अभय’पासून दूरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभय योजनेची मुदत संपण्यास आठवडाभराचा कालावधी असताना शहरातील १२००० हून अधिक व्यापाऱ्यांनी अजून सवलतीसाठी अर्ज केलेले नाहीत. अभय योजनेतंर्गत ३१ जुलैपर्यंत एलबीटीची थकीत रक्कम भरल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ होणार आहे. तीन जून रोजी अभय योजनेला सुरूवात झाली, पण २३ जुलैअखेर शहरातील केवळ २०० व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. त्या माध्यमातून १७ लाख रुपये जमा झाले आहेत.

एक एप्रिल २०११ पासून एलबीटी लागू करण्यात आली आहे. तथापि व्यापाऱ्यांचा एलबीटी भरण्यास पहिल्या​पासून विरोध राहिला आहे. यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटीची पूर्ण रक्कम भरली नाही. काहीजणांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. स्थानिक संस्था कराची थकीत रक्कम भरण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. तीन जून ते ३१ जुलै या कालावधीत एलबीटीची थकीत रक्कम भरल्यास त्यावरील व्याज आणि दंड माफ होणार आहे.

अभय योजनेचे अर्ज महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात स्वीकारल्या जातात. यासाठी आवश्यक अर्जही नागरी सुविधा केंद्रात मिळतात. योजनेच्या अर्जासोबत विवरणपत्रे, बँकेत एलबीटीचा भरणा केलेले चलन, रजिस्टरची झेरॉक्स प्रत नागरी सुविधा केंद्रात भरावयाचे आहे. महापालिका मुख्य इमारत, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय, गांधी मैदान विभागीय कार्यालय, राजारामुपरी मार्केट विभागीय कार्यालय आणि ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र आहेत. शहरातील कुठल्याही भागातील व्यापारी,व्यावसायिकांना कुठल्याही नागरी सुविधा केंद्रात अर्ज भरता येतो. आयडीबीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सीस बँक आणि एचडीएफसी बँकेत एलबीटी भरण्याची सुविधा असल्याची माहिती एलबीटी विभागाचे अधिकारी दिलीप कोळी यांनी दिली.

'अभय' साठी व्यापाऱ्यांचे एक​त्रित अर्ज

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापारी व उद्योजक २४ जुलै रोजी एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून व्यापारी-औद्यो​गिक संघटनांशी चर्चा करून जागृती केली आहे. व्यापारी-उद्योजकांनी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता महापालिका चौकात जमावे, असे आवाहन व्यापारी मित्र संस्थेचे अजित कोठारी यांनी केले आहे.

१७ व्यावसायिकांची ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल

५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापारी, व्यवसायिकांना एलबीटी माफ करण्याची घोषणा केली आहे. वार्षिक ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्यांना एलबीटी भरावी लागणार आहे. कोल्हापुरात वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक असणाऱ्या व्यावसायिक, उद्योजकांची संख्या १७ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाधीस्थळ कामाचा आज प्रारंभ

$
0
0

प्रतिभानगरमध्ये कॉ. पानसरे स्मारकाचे भूमिपूजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळ विकासकामाचा प्रारंभ, कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचे भूमिपूजन आणि एक रुपयात एक लिटर पाणी (वॉटर एटीएम) उपक्रमाचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. शाहू समाधीस्थळ व पानसरे स्मारकाच्या कामाच्या शुभारंभ सोहळ्याला शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर वैशाली डकरे व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी केले आहे.

'राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांची समाधी नर्सरी बाग येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात व्हावी असा उल्लेख मृत्यूपत्रात केला आहे. महापालिकेने शाहू समाधी स्थळासाठी​ अंदाजपत्रकात ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. चबुतरा, परिसर सुशोभिकरण, म्युझियमचा विकासकामात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाख रुपयांची कामे होणार आहेत. शाहू समाधीस्थळासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे. समाधीस्थळ विकास आराखडा हा सात कोटीच्या आसपास आहे,' अशी माहिती फरास यांनी दिली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेने पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेलगत जागा निश्चित केली आहे. याठिकाणी डाव्या आघाडीतर्फे पानसरे यांच्या जीवनकार्यावर आधारित म्यूरल्स साकारले जाणार आहे. पानसरे यांच्या पुरोगामी विचारांचा, त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत राहावी, त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी हा स्मारक उभारणीमागील उद्देश आहे.

'राजर्षी शाहू महाराजांचे समाधी स्थळ हे कोल्हापूरवासीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शुक्रवारी होणा‍ऱ्या समाधीस्थळ विकास कामाच्या उद‍्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे. लोकोत्सव साजरा करण्यासारखा हा क्षण आहे,' असे आवाहन मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांनी केले आहे.



कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ

वॉटर एटीएमचे उद‍्घाटन : स्थळ- प्रांत कार्यालयासमोर भवानी मंडप. वेळ सकाळी ९ वाजता.

पानसरे स्मारक भूमिपूजन : स्थळ वि. स. खांडेकर शाळेजवळ प्रतिभानगर वेळ- सकाळी १०.३० वाजता.

शाहू समाधीस्थळ विकासकाम : स्थळ- नर्सरी बाग. वेळ- सकाळी ११.३० वाजता.

अंबाबाई मंदिरावर मल्टीडिजिटल लायटिंग

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचे सौंदर्य आणखी खुलविण्यासाठी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्याचा प्रस्ताव आहे. मंदिर आणि परिसरात मल्टीडिजिटल लायटिंग करण्यात येणार असून याकरिता महापालिकेने ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोषणाई करण्यास देवस्थान समितीने मान्यता दिली आहे. पुरातत्व विभागाची मान्यता अजून मिळायची आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांनो, ब्रँडिंग करा

$
0
0

रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक रामास्वामी यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगांना मोठी संधी आहे. या ठिकाणी कापड उद्योग आणि शेतीवर आधारीत उद्योगांचा चांगला विकास झाला आहे. त्यामुळे उद्योजकांनी बँकिंग योजनांचा फायदा घेत आपल्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणे गरजेचे आहे,' असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विभागीय संचालक एस. रामास्वामी यांनी व्यक्त केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समावेशन आणि विकास विभागाच्यावतीने उद्योजक आणि बँक यांच्यासाठी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

रामास्वामी म्हणाले, 'कोल्हापूर ही उद्योजकांची नगरी आहे. या ठिकाणी अत्यंत कौशल्याने विविध उद्योग साकारले आहेत. इचलकरंजीमध्ये कापड उद्योगाचा झालेला विकास आश्चर्यकारक आहे. याठिकाणी विविध कंपन्यांचे तयार होणारे ब्रॅण्ड आपल्याला मोठमोठ्या शहरात दुप्पट किंमतीत मिळतात. याठिकाणच्या इतर उद्योगांनी आपल्या उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार केला पाहिजे. नवीन उद्योगांच्या माध्यमातून दर्जा निर्माण करणे आणि रोजगारनिर्मिती असे उद्देश ठेवले तर उद्योगांचा झपाट्याने विकास होईल. या उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकाही तयार आहेत. त्यासाठी उद्योजकांनी पायाभूत सुविधांवरही भर दिला पाहिजे. उद्योजकांची उद्योग उभारण्याची क्षमता असेल तर त्यांना बँक आणि इतर गोष्टीही उपलब्ध होतील.'

ते पुढे म्हणाले, 'उद्योगांच्या विस्तारासाठीही आता बँका आर्थिक मदत करत आहेत. त्यांच्या मदतीला कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात असल्यामुळे चांगले मनुष्यबळ उद्योगांना उपलब्ध होईल. आजारी उद्योगांनाही सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे.'

बँक ऑफ इंडियाचे राजेंद्र चव्हाण म्हणाले, 'छोट्या आणि मोठ्या उद्योगांच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मिती होण्यास हातभार लागेल. बँकांनाही विविध प्रकारची कर्जे द्यावयाची आहेत. त्यासाठी चांगले पर्याय समोर आले पाहिजेत. बँक ऑफ इंडियाने लीड बँक म्हणून चांगले काम केले असून भविष्यातही शेतकरी आणि उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी बँक सक्षमपणे पार पाडेल.'

कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, आदी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच उद्योजक उपस्थित होते.

कर्ज घेतात आणि परतफेडही करतात

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमित सैनी म्हणाले,' जिल्ह्यातील उद्योजकांना जेवढे फायदे देता येतील तेवढे देण्याचा प्रयत्न बँकांनी करावा. याठिकाणचे उद्योजक कर्ज घेतात आणि परतफेडही करतात, त्यामुळे बँकांनी घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या शिशू, किशोर आणि तरुण या योजनांचा फायदा उद्योजकांनी घ्यावा. महिला उद्योजकांसाठीही आर्थिक हातभार देण्यात येणार आहे. त्याबरोबरच मत्स्यव्यवसाय आणि मध गोळा करण्याच्या उद्योगांनाही बँकांनी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन २३९ कोटी रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोबेल इंटरेस्टस कन्सल्टिंग इंजिनीअर्सने एका​त्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयडियल रोड बिल्डर्सने (आयआरबी) केलेल्या प्रकल्पाची किंमत २३९.५२ कोटी रुपये निश्चित केली आहे. या प्रकल्पावर ५५० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा दावा केला आयआरबीने केला होता. मात्र, अहवाल शुक्रवारी फेरमूल्यांकन उपसमितीसमोर मांडण्यात आला.

नोबेलच्या अहवालानुसार एकूण रस्ते बांधणीसाठी १८२.८८ कोटी रुपये व प्रकल्पातील अन्य कामासाठी ५६.६४ कोटी इतके मूल्यांकन केले आहे. क्राँक्रिट रस्त्यांना तडे गेल्याचे नोबेलने यावेळी निदर्शनास आणून दिले. कंपनीचा अहवालात किरकोळ सुधारणा सूचवत उपसमितीने मान्य केला. हा अहवाल आता सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील स​मितीकडे सादर केला जाणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे सुरेश रामचंदानी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात उपसमितीची बैठक झाली. बैठकीत महापालिका व असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सने सादर केलेल्या निगेटिव्ह व्हेरिएशनमध्ये प्रामुख्याने प्रकल्पातील त्रुटी, दर्जाहीन कामे फोटोंसह दाखविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवर्धनप्रक्रियेचा तिढा सुटणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रकिया करण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी व तंत्रज्ञ आज, शुक्रवारी काम सुरू करतील, अशी ग्वाही केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक डॉ. राकेश तिवारी यांनी दिल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्या संदर्भातील पत्र महाडिक यांना मिळाले आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धनाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंबाबाई मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेवर ​हिंदू जनजागृती समितीने आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद शाखेच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला येण्याचे रद्द केल्याची माहिती श्रीपूजक संघटनेला कळवली होती. गुरुवारी दुपारनंतर केंद्रपातळीवर घडामोडी झाल्या.

न्यायालयीन आदेश आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करावी, त्यात विलंब व अडथळा होऊ नये यासाठी खासदार महाडिक यांनी गुरुवारी दिल्लीतील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. तिवारी यांनी संवर्धन विभागाचे संचालक जन्वील शर्मा यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. संवर्धन प्रक्रियेसाठी देवस्थान समितीने जमा केलेला निधी तातडीने औरंगाबाद विभागाकडे वर्ग केला जाईल आणि औरंगाबादचे अधिकारी एम. के. सिंह यांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच जनावरांचा मृत्यू

$
0
0

कराडः अंधारवाडी (ता. कराड) येथील डबाण नावच्या शिवारात उंब्रज-कोरीवळे रोडलगत असणाऱ्या पत्र्याच्या शेडला अचानक आग लागल्याने आगीत एक बैल, चार म्हैशी, शेतीची अवजारे, चारा, कडबा गंज तसेच संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेत अन्य दोन म्हैशी व एक बैल भाजून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत. या घटनेने अंधारवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोपट नारायण जाधव व शिवाजी मारूती जाधव या दोघांचे पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये दोघांची मिळून शेतीसाठी लागणारी अवजारे, कडबा गंज, चारा तसेच म्हशींचा गोठा होता. गुरुवारी रात्री अचानक शेडला आग लागली. या आगीत जाधव कुटुंबीयांचे सुमारे १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. लागलेल्या आगीबाबत घटनास्थळी उलटसुलट चर्चा सुरू होती. तर या आगीबाबत ग्रामस्थासह जाधव कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलिसांत झाली असून, अधिक तपास उंब्रज पोलीस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी तरुणाला कोठडी

$
0
0

कुपवाड : महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अपहरणानंतर त्याचा खून करून मृतदेह शिराळा भागात टाकल्याचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अरुण शिवाजी माळी (वय२७) या कवलापूरच्या तरुणाला संजयनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. कोर्टाने त्याला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबधाबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील करण अनिल खेडकर (वय१६) याचे मंगळवारी महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर अपहरण झाले होते. या बाबत त्याच्या आईने संजयनगर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर बुधवारी करणचा मृतदेह शिराळा तालुक्यातील एका पुलावरुन फेकून दिल्याचे समोर आले. त्यानंतर संजय नगर पोलिसांनी कवलापुरातील वाहन चालक अरुण माळी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. संशयिताने बांबू डोक्यात घालून त्याचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाड मारहाणप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शिवसन्मान जागर परिषदेत राडा केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानच्या अविनाश चिनके आणि विशाल चव्हाण या दोघांना शुक्रवारी अटक केली. परिषदेत घुसलेल्यांपैकी या दोघांना उपस्थितांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधून त्यांना सोडताच शहर पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई केली. सांगलीतील शिवसन्मान परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख केल्याने गेल्या रविवारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिषदेत घुसून आव्हाडांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तेथे जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. विधानसभेतही आमदार सुधीर गाडगीळ यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन लक्षवेधी मांडली आहे. प्रतिष्ठानने एक दिवसाचा सांगली बंद पुकारल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पाळून आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल असून आतापर्यंत परिषदेचे निमंत्रकांसह बारा जणांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आषाढीसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या

$
0
0

सांगलीः आषाढी वारीसाठी मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी दोन जादा रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत रोज सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी साडेसात वाजता या रेल्वेगाड्या धावणार आहेत. त्यामुळे मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांची सोय होणार आहे. मिरजमार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांची संख्या मोठी आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह कोकण आणि सीमा भागातील हे वारकरी असतात. मिरज रेल्वे स्थानक वारकऱ्यांनी अक्षरश: फुलून जाते. पूर्वी या मार्गावर नॅरोगेज होती, पण ती इतिहास जमा होऊन आता ब्रॉडगेज लाइन सुरू झाली आहे. त्यामुळे वेळ वाचून अधिक चांगली सुविधा मिळत आहे.

वाखरी तळावर अडीचशे स्वच्छतागृहे

पंढरपूरः विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती यांच्यातर्फे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी २५० स्वच्छतागृहे व स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आलेली आहे. वाखरी येथील विश्वशांती गुरुकुल या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात उभारण्यात आलेले 'श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी सागर' जलाशय दरवर्षी आषाढी वारीच्या वेळेला नवमी व दशमी या तिथींना वारकऱ्यांच्या स्नानासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिकारकांचा इतिहास वेबसाइटवर येणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास सांगली जिल्ह्याच्या वेबसाइटवरुन मराठी व इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे तरुण पिढीला मार्गदर्शन मिळेल. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला संघर्श, ब्रिटिशांच्या विरुद्ध उभा केलेली सशस्त्र सेना, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थापन केलेले प्रती सरकार, यांचा इतिहास, दुर्मिळ फोटो व ग्रंथ वेबसाइटवर आणणेचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.

गायकवाड यांनी हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 'क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर, कामगार, धरणग्रस्त व दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर प्रस्तापितांच्या विरोधात जो संघर्ष करून अनेक प्रश्न तडीस नेले. अण्णांनी खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू केल्या. साखर कारखाना, शिक्षण संस्थांची उभारणी करून लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले. जनतेसाठी संघटीत ताकद उभी करून सरकारकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या. अमेरिकेसारख्या देशात जावून व्यवस्थापनातील उच्च पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे शिकविले जाते तेच हुतात्मा पॅटर्नमध्ये प्रॅक्टिकली राबविले जाते. व्यवसाय तोट्यात आला की, खर्च कमी करा, साधेपणाने रहा, हा व्यवस्थापनाचा मूलमंत्र इथे प्रामाणिकपणे जपला जातो. जगातल्या तज्ज्ञ व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी महिनाभर राहून हुतात्मा पॅटर्नचा अभ्यास करावा,' असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत १२० टन बनावट मीठ जप्त

$
0
0

सांगलीः सांगली रेल्वे स्टेशनवर कंपनीच्या ट्रेडमार्कचा गैरवापर केलेली १२० टन मीठाची पॅकेटस् गुरुवारी सापडली. माहेश्वरी सॉल्ट या कंपनीचा ट्रेडमार्क वापरून सागर सॉल्ट या नावाने हे पुडे तयार करून फसवणूक केली जात होती. रेल्वेचे मिरज पोलिस निरीक्षक आर. एस. भिंगारदिवे यांनी दिली. फसवणूक कॉपी राइट कलम ५२ 'अ' प्रमाणे आत्माराम चौधरी, अल्लारखा याकुबभाई राजेशकुमार जैन, अक्षय राजेश राजमाने (रा. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी या कंपनीचा सुपरवायझर अक्षय राजमाने याला अटक झाली आहे. १२० टन मिठापैकी १५ पोती जप्त करण्यात आली आहेत. राहिलेली पोती येथील यार्ड व्यवस्थाकांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

या बाबत नरेशकुमार बालकिशन करवा ( रा. तुतीकेरू, तामिळनाडू) या मीठ व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली होती. सांगली रेल्वे स्थानकातील गुड शेडमध्ये मीठ ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. मिठाच्या या पुड्यावर सागर सॉल्ट कंपनीचे लेबल लावण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबर खानच्या खुनाची कबुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

गुंड बाबर शमशाद खान याचा पाइप डोक्यात मारून व दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी विशाल हिंदूराव कांबळे (वय २५, रा. मंगळवार पेठ, कराड) याला अटक केली, त्याने बाबर खानच्या खुनाची कबुली दिली आहे. बबलू मानेच्या दोन सर्मथकांना पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली होती त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कांबळेला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सागर चंद्रकांत माने व ऋषिकेश आनंदा शेंद्रे यांना शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. पाडूळकर यांनी २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बबलूच्या खुनाचा शिजला होता कट?

सल्या चेप्यावरील हल्याच्या कटात सहभाग असलेल्या बबलू मानेला बाबरकडून संपविण्याचा कट हा पूर्वनियोजित होता. बाबरने बबलूचा 'गेम' करण्यासाठीच त्या दिवशी पिस्तूल स्वत: बरोबर आणले होते. त्याच्यासोबत अन्य काहीजण असावेत. पेपर वाचन करून घराकडे निघालेल्या बबलूला थांबवत बाबर त्याच्यासोबत काहीतरी बोलला. बाबर व बबलूमध्ये झालेले हे बोलणेच या गुन्ह्याची उकल करणारे ठरेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. जखमी बबलूला हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याने त्याच्या मित्रांजवळ गोळीबारापूर्वी त्याच्यात व बाबरमध्ये नेमके काय बोलणे झाले, याची माहिती दिली आहे. या संभाषणाची माहिती आणि वादाचे कारण पोलिसांनाही समजले आहे. अतिशय नियोजनबद्ध रित्या केलेल्या बबलूच्या खुनाच्या कटात कोणा-कोणाचा सहभाग आहे? या कटाचा सूत्रधार कोण आहे? बाबरकडे पिस्तूल आले कोठून? या बाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नापिकी, बँकेचे कर्ज, घेतलेले कर्ज परतफेड करण्याची क्षमता नसणे आणि पेरलेले पीकच हाती न लागण्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) तयार केलेल्या २०१४ च्या अहवालातील हे दाहक वास्तव समोर आले आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे धक्कादायक चित्र आहे. देशातील ५ हजार ६५० आत्महत्यांपैकी महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण २ हजार ५६८ आहे.

देशात झालेल्या आत्महत्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे. त्यातही नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचा निष्कर्ष अहवालात काढला आहे. त्याचेही प्रमाण राज्यातील एकूण आत्महत्यांमध्ये ५० टक्के आहे. यामध्ये दोन हेक्टर ते दहा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे विविध कारणे आहेत. त्यामध्ये कौटुंबिक कारणे, आजारपण, व्यसन सेवनामुळे आत्महत्या होण्याचे प्रमाणही आहे. पण, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे शेती कर्जाची थकबाकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी यांचे आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे कमी क्षेत्र आहे त्यांचे आणि १ हेक्टर ते २ हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. एनसीआरबीच्या अहवालात चार गट तयार केले असून अल्प भूधारक, कमी क्षेत्रधारण करणारे शेतकरी, मध्यम क्षेत्रधारण करणारे शेतकरी आणि मोठे शेतकरी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. १ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्यांचा समावेश अल्पभूधारकांत करण्यात आला आहे. त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण सर्वसाधारणपणे २८ टक्के आहे. १ हेक्टरपेक्षा अधिक पण २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक ४४. ५ टक्के आहे. तर २ ते १० हेक्टर क्षेत्रातील मध्यम शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे २५. २ टक्के आहे. १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images