Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गडहिंग्लजमध्ये खुर्चीसाठी रणकंदन

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

उपनगराध्यक्ष कावेरी चौगुले यांना व्यासपीठावर बसायला स्थान दिले नसल्याने आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली खदखद व्यक्त करत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. चौगुले यांनी व्यासपीठावर खाली बसत सत्ताधारी जनता दलाचा निषेध केला. वाद-विवाद, निषेध, मंजूर, गोंधळ आणि धिक्कार... अशा वातावरणात सभा झाली. नगराध्यक्ष राजेश बोरगावे अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांना व्यासपीठावर स्थान न देता त्यांना इतर नगरसेवकांप्रमाणे खाली बसविण्यात आले. यावर आक्रमक होत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतला. उपनगराध्यक्षांना खाली का बसविण्यात आले आहे असा सवाल करीत हा गडहिंग्लज नगरीचा अपमान असल्याच मत नगरसेविका दीपा बरगे यांनी व्यक्त केला. मात्र त्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता केवळ निर्णय घेताना अडचणी येतात म्हणून त्यांना खाली बसविण्यात आले, असे स्पष्टीकरण अध्यक्ष बोरगावे यांनी दिले.

उपनगराध्यक्षांना व्यासपिीठावर स्थान द्यायलाच पाहिजे, असा कोणताही कायदा नसून सर्वप्रथम सुशिक्षित पदाधिकाऱ्यानी कायदा समजून घ्यावा, असा नगरसेवक नरेंद्र भद्रपूर यांनी टोला लगावला. विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीने आक्रमक होत आपल्या कार्यशैलीच झलक दाखविली.

अध्यक्ष बोरगावे यांनी मला गडहिंग्लज नगरीला आदर्श घालून द्यायचा असून त्यासाठी बदल अपेक्षित आहेत, असे उत्तर दिले. तसेच अडीच वर्षापूर्वी स्वतःच्या बैठक व्यवस्थेसाठी भांडलो पण सभागृहाचे कामकाज थांबवले नाही, असा टोला विरोधकांना लगावला. यावर आक्रमक होत केवळ महिला असल्याने जाणीवपूर्वक अपमान केला ही अध्यक्षांची कृती निषेधार्ह असल्याचे मत नगरसेवक रामदास कुराडे व हारून सय्यद यांनी मांडले.

उपनगराध्यक्षा चौगुले म्हणाल्या, सत्तेवर आल्यापासून आपले खरे रूप दाखवत असून लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. आम्ही जनतेसाठी काम करीत असून जनतेच्या मनातील नाव पुसणे शक्य नाही. यावर स्वाती कोरी यांनी डिवचण्याची संधी साधून 'तुम्ही खाली बसून सुद्धा काम करू शकता. मानापमान नाट्यात सभागृहाचा वेळ घालवू नका, असा चिमटा काढला. यावर गटनेते कुराडे यांनी पक्षपाती कारभार सुरु असल्याची टीका केली.

मोफत नळजोडणीचा ठराव मांडण्यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. शेवटी गोंधळातच बडदारे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले तर चौगुले यांनी ठराव मांडला. यावेळी सांडपाणी प्रक्रिया, स्मशानभूमी दुरुस्ती, कचरा उठाव, वाचनालय पुरस्काराबाबत चर्चा झाली. तसेच शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. विभागपप्रमुखांनी सभेपूर्वी सर्व माहिती घेवून यावे. सभेदरम्यान आवश्यक माहिती तत्काळ सभागुहासमोर दिली जावी असा आदेश बोरगावे यांनी दिला. गडहिंग्लज शहरात पाणी योजनेतील एकूण ५८०० इतक्या नळजोडण्या आहेत. त्यापैकी ७४० इतक्या नळजोडण्या हद्दीबाहेरील आहेत. ६४.५० टक्के इतकी रक्कम वीजबील व एरीगेशन सेस साठी खर्च होते. यावेळी मोफत नळजोडणीबाबत सभेदरम्यान चर्चा झाली. पॅव्हेलियनचा वापर निवडणूक कामासाठी होत असून निवडणूक आयोगाला विनंती करून त्याचा विनामोबदला वापर थांबवावा असे सूचना जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूवाडीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुर्दशा

0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढली. परंतु सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाबतीत अनास्था राहिल्याने काही ठिकाणचे अपवाद वगळता या स्वच्छतागृहांची अवस्था फारच बिकट आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियानाच्या माध्यमातून चार पाच कुटुंबांना एक अशी गावोगावी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली गेली होती. परंतु स्वच्छतेअभावी ही स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेली आहेत.

निर्मल ग्राम अभियानाचे प्रणेते भारत पाटील यांनी हागणदारीमुक्त गाव मोहीम राबवून संपूर्ण जिल्हा निर्मल करण्याकडे कटाक्ष ठेवला होता. या अभियानातून घरोघरी शौचालये तर उभारली गेलीच पण सर्वार्थाने पाणंदी हागणदारीमुक्त झाल्या. आता मात्र निर्मल ग्रामच्या जोडीने सार्वजनिक शौचालये अस्वच्छता मुक्त करण्याची वेळ आली आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीला सफाई कामगार नसणे, स्वच्छतागृहापर्यंत पाण्याची उपलब्धता नसणे, स्वच्छतागृहे वापरणाऱ्यामध्ये नसलेले सामाजिक भान आणि ग्रामपंचायत स्तरावर असलेली अनास्था यामुळे ही स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. स्वच्छतेअभावी काही गावे दुर्गंधीच्या विळख्यात अडकू लागली आहेत. बहुतांशी स्वच्छतागृहे दगड, माती, जाळ्या, विटांचे तुकडे आणि दुर्गंधीयुक्त पाण्याने भरून गेल्याने वापरात न येण्याजोगी झाली आहेत. काही गावामध्ये या स्वच्छतागृहांचा उपयोग कोंडाळ्यासाठीही झालेला दिसून येत आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहापर्यंत जाणारा रस्ताही अस्वच्छ आहे.

तालुक्यात अडीचशे शौचालये

जिल्ह्याचा विचार करता प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात १०६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील एकशे पाच गावे निर्मल झाली आहे. तालुका निर्मल व्हायला परळे निनाई हे एकच गाव अपवाद राहिले आहे. तालुक्यातल्या वाड्यावस्त्या मिळून असलेल्या एकशे सहा गावांमध्ये मिळून अडीचशे सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायझिंग बंदला हिंसक वळण

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी जाहीर केलेल्या सुधारीत किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे दहा हजार सायझिंग-वार्पिंग कामगार सोमवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शहरातील सर्व सायझिंग उद्योग बेमुदत काळासाठी ठप्प झाल्याचे त्याची चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा रामनगर येथील आदित्य वार्पिग आणि शिवर्षी वार्पिंग कारखान्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बंदच्या दुस ऱ्याच दिवशी हिंसक वळण लागले. संपाचा वस्त्रोद्योग नगरीवर हळूहळू परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली असली तरी आठवडाभरानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

बंदच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री बहुतांशी सायझिंग वार्पिंग कारखाने बंद राहिले. त्यातूनही रामनगरातील काही कारखाने सुरू असलेल्याचे आंदोलकांना समजले. त्यांनतर त्यांनी सुरू असलेल्या दोन कारखान्यांवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना पांगवले. त्यानंतर संतप्त झालेल्या कारखानदारांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलकांना ताब्यात घेण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांशी वाद घालत पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले. कारखानदारांनी आक्रमक पवित्रा घेत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

आंदोलनामुळे शहरातील सुमारे ९० टक्के सायझिंग बंद पडल्या आहेत. मंदीचे वातावरण असल्याने आणि त्यातच सायझिंग-वार्पिंग कामगारांनी बंद पुकारल्याने वैतागलेल्या यंत्रमागधारकांनी या बंदचे स्वागत करीत असल्याचे दिसून येत आहे.

यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यामागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

येथील थोरात चौक भाजी मार्केटमध्ये सायझिंग-वार्पिंग कामगारांचा मेळावा सोमवारी कॉ. ए. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यामध्ये सायझिंग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. लगेचच मध्यरात्रीपासून सायझिंग उद्योगाची चक्रे पूर्णत: ठप्प झाली. शहरात हायस्पिड स्वरुपाच्या २० ते २५ सायझिंग असून तेथे प्रत्येक सायझिंगमध्ये दररोज सात टन उत्पादन घेतले जाते. तर लहान स्वरुपाच्या शंभरावर सायझिंग असून तेथे चार ते पाच टन उत्पादन घेतले जाते. सध्या यंत्रमागावर बिमे सुरु असून त्यामुळे विणकाम होत आहे. पण आठवड्यात बिम संपल्यानंतर सायझिंग बंदचा फटका बसणार आहे.

कामगारांनी सायझिंगकडे पाठ फिरविल्याने शहरातील नव्वद टक्के सायझिंग बंद पडल्या आहेत. शहरातील वस्त्रोद्योग व्यवसाय आधीच मंदीच्या गर्तेतून वाटचाल सुरू आहे. त्यातच काही कापड अडत्यांच्या पिळवणूकीच्या धोरणामुळे कारखानदाला वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात कापड मागणी करू लागल्याने कारखानदार अडचणीत येऊ लागला आहे. त्यामुळे कारखाना बंद ठेवल्यास कामगार, जॉबर, कांडीवाला यांना पगार द्यावा लागतो. हा खर्च कारखानदाराला सोसावा लागतो. मात्र सायझिंग कामगारांच्या संघटनेने बंद पुकारला आहे. या बंदमुळे वस्त्रोद्योगावर विपरित परिणाम होणार असून येत्या काही दिवसात यंत्रमाग कारखाने बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कारखानदारांमधूनही या बंदचे एकप्रकारे स्वागत केले जात आहे.

दरम्यान, संप सुरु झाला असला तरी याबाबत सायझिंग चालक व कामगार नेते यांच्यात कसलीही चर्चा झालेली नाही. उलट इचलकरंजी सायझिंग असोशिएशनने उद्योजक म्हणून सायझिंग प्रश्नाबाबत चर्चा करण्यास उपविधीत तरतूद नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता सायझिंग चालकांकडून चर्चा कोणाकडून होणार हे महत्त्वपूर्ण बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यांनी पाहिला साक्षात मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन करून परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक ट्रकने कवठेमहांकाळजवळ कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील सातजण जखमी झाले. अपघातातील जखमीनेच अन्य जखमींना बाहेर काढले व क्षणातच मालवाहू ट्रक अपघातग्रस्त गाडीवर कोसळला आणि गाडीचा चक्काचूर झाला.

त्यामुळे साक्षात मृत्यू समोर आला असतानाही सातजणांचा जीव वाचला. जखमींमध्ये धनाजी नाईक, संजय आलासे, दिलीप चौगुले, मनोज सूर्यवंशी, अरिफ मुजावर, चालक रतन कांबळे व नाईकमामा (पूर्ण नांव समजू शकले नाही) यांचा समावेश आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावानजीक मंगळवारी रात्री झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर ट्रक कारवर पलटी झाला. पण केवळ दैवबलवत्तर म्हणून सर्वजण बाहेर पडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, येथील धनाजी नाईक, संजय आलासे, दिलीप चौगुले, मनोज सूर्यवंशी, अरिफ मुजावर, चालक रतन व नाईकमामा हे सर्वजण एमएच चारचाकी गाडीतून संत ज्ञानेश्वरी माऊलींच्या पालखीचे दर्शनासाठी मंगळवारी सकाळी अकलूज येथे गेले होते. पालखीचे दर्शन घेऊन ते रात्रीच्या सुमारास इचलकरंजीकडे परतत होते. शिरढोणनजीक ते आले असताना समोर एक ट्रक उभा असल्याचे निदर्शन आल्यानंतर चालकाने गाडी बाजूस घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक ट्रकने कारला जोराची धडक दिली. ट्रकने सुमारे २०० फुटापर्यंत ही कार फरफरटत नेली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेने सर्वजण गाडीत अडकून पडले. तर ट्रकच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे गाडीतील सर्वांनाच मार लागल्याने सातहीजण जखमी झाले होते. त्यानंतर संजय आलासे हे प्रयत्न करुन काचा फोडून गाडीबाहेर आले. आणि त्यांनी तातडीने सर्व जखमींना गाडीबाहेर काढून बाजूला नेले. सर्वांना बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच अपघातग्रस्त ट्रक कारवरच कोसळला अन् कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. तर ट्रकची डिझेलची टाकी फुटल्याने घटनास्थळी डिझेल पसरले होते. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शकिल पिरजादे, शहाजी भोसले, शशिकांत मोहिते, राजू नाईक, राजू भाकरे आदींसह अनेकजण रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना दुसऱ्या वाहनातून मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा रस्त्यावरच मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोटारसायकल चालवत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने इंद्रजित अरुण ​दिंडे (वय २८, रा. जुना बुधवार पेठ) या युवकाचा रस्त्यावरच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता महावीर कॉलेजसमोरील रस्त्यावर ही घटना घडली.

इंद्रजित दिंडे याला मंगळवारी रात्री छातीत दुखत होते. त्याने मेडिकल शॉपमधून औषधाची गोळी खाल्ली होती. बुधवारी सकाळी तो सेक्युरिटी गार्ड कंपनीत जुना बुधवार पेठेतून नागाळा पार्क येथील कार्यालयात नोकरीस जात होता. मोटारसायकल चालवत असताना महावीर कॉलेजजवळ त्याच्या छातीत कळ आली. त्याने मोटारसायकल थांबवली. त्यानंतर तो रस्त्यांवर कोसळला. त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याचे नातेवाईक व मित्रांनी सीपीआर हॉस्पिटल परिसरात गर्दी केली होती. इंद्रजित जुना बुधवार पेठ सार्वजनिक गणशोत्सव समितीचा खजानिस होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडिल असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरपाई मिळणार महिन्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जंगली प्राण्यांमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी वेळेत देता यावे, यासाठी वनविभागाच्या वतीने नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक महिन्याच्या कालावधीत नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळणार आहे. काही दिवसातच हे सॉफ्टवेअर सुरू करण्यात येणार आहे.

वन विभागाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या या सॉफ्टवेअरची सध्या चाचणी सुरू आहे. त्यामुळे जुलैच्या अखेरपर्यंत ते कार्यान्वित होऊ शकते. त्याबरोबरच मोबाइलवरून देखील या सॉफ्टवेअरमध्ये माहिती पाठविता येणार आहे. आत्तापर्यंतच पद्धतीनुसार झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेऊन वनरक्षक ती वनविभागाकडे सादर करत होते. त्यामुळे अधिक वेळ लागत होता. जर एखाद्या दुर्गम भागात घटना घडली तर त्याठिकाणी जाऊन माहिती गोळा करेपर्यंत वेगळीच स्थिती असलेली आढळून येत असे. शिवाय त्यासाठी चार ते पाच आठवड्यांचा कालावधी लागत होता.

नव्याने येणाऱ्या सॉप्टवेअरमध्ये घटनास्थळावरूनच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती अपलोड करता येणार आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येणार आहे. त्याला एक दिवसात मंजुरी देण्यात येणार असून शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहचविली जाईल.

वनविभागाच्या वतीने वनकर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साहित्य देण्यात आले आहे. त्याबरोबरच त्यांना जीपीएस सुविधेचाही वापर करता येणार आहे. नवीन सॉप्टवेअरमुळे पारदर्शकता आणखी वाढणार आहे. त्याबरोबरच वनअधिकाऱ्यांवर विश्वासही वाढण्यास मदत होणार आहे. वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले तर एखादा शेतकरी देखील वनविभागाला फोन करून माहिती देऊ शकतो. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी ताबडतोब पाहणी करून अहवाल देऊ शकतात. सध्या सर्व प्रक्रिया कागदोपत्री सुरू आहे त्यामुळे बराच वेळ लागतो. नियमानुसार शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई एक महिन्याच्या आत मिळाली पाहिजे. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे वेळेत नुकसानभरपाई देण्यात अडचणी येतात. आता कागदोपत्री आकडेवारी बंद केली जाणार आहे. वनअधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवतील. हा अहवाल कागदोपत्री न देता तो सॉप्टवेअरच्या माध्यमातून दिला जाणार असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत नुकसानभरपाई देण्यासाठी या सॉफ्टवेअरचा खूप उपयोग होणार आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या तक्रारी देखील कमी होणार आहेत. नुकसानभरपाईसाठी महिनाभर थांबण्याचीही आवश्यकता नाही. योग्य कागदपत्रे आणि खात्री झाल्यास ताबडतोब मदत दिली जाईल.

- एम. के. राव, मुख्य वनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिका‍ऱ्यांकडून लाचखोर लिपिक बडतर्फ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाला तडकाफडकी निलंबीत केल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असताना निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण एका महिन्याच्या रजेवर गेले आहेत. निलंबनाच्या कारवाईबाबत राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने राज्याच्या मुख्य सचिवांना तसेच महसूल विभागाच्या सचिवांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, लाच प्रकरणात शिक्षा झालेल्या एका लिपिकावर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी बडतर्फीची कारवाई केली होती.

मंगळवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी एक महिन्याच्या रजेची मागणी केली होती. पण सध्या अधिवेशन सुरु असल्याने इतकी रजा मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने ती घ्यावी असे सांगितले होते. त्यानंतर चव्हाण महिन्याची रजा देऊन कार्यालयातून निघून गेले होते. पूर्वी भूसंपादन विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या सतीश सूर्यवंशी यांनाही बडतर्फ केले आहे. हातकणंगले तहसीलमध्ये असताना त्यांना लाच घेत असताना पकडले होते. त्यानंतर दोन वर्षांची शिक्षा झाली होती व पाच हजार दंड किंवा सहा महिने साधी कैद अशी शिक्षा होती. या शिक्षेला हायकोर्टात स्थगिती दिली असल्याचे समजते. दोषमुक्त केले नसल्याच्या मुद्द्यावर बडतर्फ केले होते.

लिपिक सुशांत पाटील यांनी पाणी टंचाईच्या कामाबाबत कुचराई केली आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई केली असून खात्यांतर्गत चौकशी सुरु केली आहे. संघटनेने चर्चा न करता आंदोलनाचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. मी चर्चेसाठी नेहमीच तयार आहे.

- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना नेत्यांकडून अर्थपूर्ण तडजोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप-शिवसेनेच्या राज्यस्तरावरील युतीत चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. कोल्हापूर महापालिकेसाठीही युती व्हावी अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मेळावे घेऊन केले जाणारे बेछूट आरोप चुकीचे आहेत. स्वतःला धर्मवीर बिरुदावली धारण करून असे कोणी धर्मवीर होते का ?' अशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. प्रा. संजय मंडलिक यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या शहरातील नेत्याने टेंबे रोडवर मध्यरात्री तीन वाजता अर्थपूर्ण तडजोड केल्या आरोपही बैठकीत करण्यात आला.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस संतोष भिवटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप देसाई, गणेश देसाई, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत उपस्थितीत ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या परिसरात त्यांच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आलेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांच्याविरोधात या नेत्याने अर्थपूर्ण तडजोड केली. सेनेच्या वरिष्ठांकडे संबंधितांनी तक्रार केल्याचे सांगितले. त्यांच्या भितीने बिल्डर, उद्योगपती, व्यापारी त्रस्त आहेत, असा आरोप केला.

अशोक देसाई यांनी कोणत्या नेत्यासोबत मी मांडवली केली हे सिद्ध करा, अन्यथा कोर्टात खेचू असे सांगितले. युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शंभूराजे हे एकमेव धर्मवीर होऊन गेले. अशाप्रकारे स्वतःला धर्मवीर म्हणवून घेणाऱ्यांमुळे संभाजीराजेंचा अपमान होतो. वयोवृद्ध ज्येष्ठ पत्रकाराला घरात बोलावून मारहाण करणे, उद्योजक, सरकारी कर्चमाऱ्यांची पिळवणूक असे प्रकार सुरू असल्याचे सांगितले.

हे रांगत निवडून आले...

नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी शिवसेनेचे नेते मुन्ना, अण्णा, पेठेचे साहेब, कसबा बावड्याचे बंटी, महापालिकेतील भाई यांच्या मदतीने रांगत रांगत निवडून आल्याची टीका केली. रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत साळोखे, दत्ता टिपुगडे, संजय पवार, दिलीप पाटील यांनी शिवसेना घरोघर नेली. त्यांच्यावर या नेत्याने कुरघोडी केल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यकर्त्यांआडून गोळीबार

0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

शिवसेना व भा​जप या पक्षात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता चांगलाच उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. या गोळीराबारात जो बार भरला जात आहे, त्यामध्ये अनेक जुन्या गुपित घटनांचा बार आहे, हे बार मात्र नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनाही घायाळ करत आहेत. या गोळीबाराचा दणका मात्र आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक शिवसेना व भाजपने वीस वर्षानंतर प्रथमच स्वतंत्रपणे लढवली. यामुळे एकमेकांना ताकद कळाली. मोदी लाटेवर स्वार होत इतरत्र भाजपला चांगले यश मिळाले. पण कोल्हापुरात मात्र शिवसेनेने करामत केली. त्यांना दहापैकी सहा जागा ​मिळाल्या. भाजपपेक्षा आपलीच ताकद जास्त आहे, याची या पक्षाला पुन्हा एकदा खात्री झाली. पण राज्यातील सत्ता स्थापनेत चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळाले. सेनेला जिल्ह्यात अतिशय चांगले यश मिळूनही साधे राज्यमंत्रीपद देखील मिळाले नाही. मंत्रीपद मिळताच अनेक ठिकाणी झालेल्या सत्कार समारंभात पाटील यांनी महापालिकेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली. एकीकडे युती करण्याची भाषा सुरू असताना दुसरीकडे उमेदवारी जाहीर होऊ लागल्याने सेनेचे नेते नाराज होऊ लागले. यातून भा​जपच्या नेत्यांवर टोलेबाजी सुरू झाली. आमदार राजेश क्षीरसागर यात आघाडीवर राहिले. यातून उघडपणे नसले तरी मंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यात छुपे युद्ध सुरू झाले आहे.

शिवसेना व भाजप नेत्यांच्या युध्दात आता कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत एकमेकांवर गोळीबार सुरू केला आहे. यामध्ये अशोक देसाई, सुनील जाधव, प्रा. विजय कुलकर्णी, गणेश देसाई, आर. डी. पाटील अशा अनेक कार्यकर्त्यांची नावे पुढे कली जात आहेत. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या पत्रकबाजीत मात्र दोन्ही पक्षाची अनेक गुपिते उघड केली जात आहे. निवडणूक काळात कोणी काय केले? याचा पंचनामा सुरू झाल्याने पक्षातील कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.

....तर नरकेंना संधी

शिवसेना व भाजपला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. यामुळे दोन्ही पक्षांना महापालिका निवडणुकीत असेच यश मिळेल अशी आशा आहे. पण पक्षापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक ताकदीवरच निवडणुकीचे यशापयश अवलंबून असल्याचा इतिहास आहे. तरीही एकमेकांना डिवचत आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचे काम नेते करत असल्याने कार्यकर्ते मात्र नाराज होत आहेत. चंद्रकांत पाटील व क्षीरसागर यांच्यातील वाद नवीन नाही. आता पुन्हा तो उघड्यावर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे, पण हा वाद वाढला तर क्षीरसागर यांच्याऐवजी आमदार नरके यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते प्रकल्प २५० कोटींचाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहुचर्चित रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाचा अहवाल पूर्ण झाला असून, नोबेल कंपनीने रस्त्यांचे मोजमाप, प्रत्यक्षातील काम आ​णि दर या आधारे आयडियल रोड बिल्डर्सने (आयआरबी) केलेल्या प्रकल्पाची किंमत २५० कोटी रुपये निश्चित केल्याचे वृत्त आहे. हा अहवाल गुरुवारी रस्ते मूल्यांकन उपसमितीकडे सादर करण्यात येणार आहे.

फेरमूल्यांकन उपसमितीच्या मान्यतेनंतर अहवाल सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवला जाईल. महापालिकेने प्रकल्पाचा स्वतंत्र अहवाल तयार केला आहे. त्यात अपुऱ्या कामांची किंमत निश्चित केली जाणार आहे. ही रक्कम मूल्यांकनाच्या रकमेतून वजा करण्याची मागणी महापालिका करणार आहे.

रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकनसंदर्भात गुरुवारी (२३ जुलै) दुपारी तीन वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत नोबेलच्या मूल्यांकन अहवालावर चर्चा होणार आहे. अहवालात त्रुटी न आढळल्यास तो सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे सादर केला जाणार आहे.

जागा ७५ कोटींची

रस्ते प्रकल्प महापालिका, आयआरबी आणि एमएसआरडीसी अशा त्रिसदस्यीय पातळीवर झाला आहे. प्रकल्प राबविण्यासाठी आयआरबीला आर्थिकदृष्ट्या भक्कमपणा येण्यासाठी महापालिकेने टेंबलाईवाडीतील तीन लाख चौरस फुटांची जागा ९९ वर्षांच्या करारावर दिली आहे. महापालिकेने या जागेची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे ७५ कोटी रुपये इतकी केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासायनिक संवर्धन प्रक्रिया स्थगित

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याविरोधात हिंदू जनजागृती समितीने बुधवारी थेट पंतप्रधानांनाच साकडे घातले. या नंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ही प्रक्रिया थांबविण्याचा आदेश औरंगाबादमधील अधिकाऱ्यांना दिला. श्री पूजकांनी मात्र संवर्धन प्रक्रिया कोर्टाच्या आदेशानुसार होणार असल्याचे सांगत पाठिंबा व्यक्त केला आहे.

देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणे धर्मशास्त्रविरोधी आहे, असा आक्षेप हिंदू जनजागृती समितीने घेतला आहे. मंदिरात धर्मशास्त्रानुसार नवीन मूर्तीची स्थापना करावी, अशी मागणी समितीने पंतप्रधानांकडे ई मेलद्वारे केली आहे. हा ई मेल पाठविल्यानंतर वाद निर्माण झाल्याने केंद्रीय पुरातत्त्व विभागाने औरंगाबाद येथील राज्य शाखेतील अधिकाऱ्यांना फोनवरून संवर्धन प्रक्रिया थांबविण्याचा आदेश दिला. बुधवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ झाला असतानाच, सायंकाळी साडेचारनतंर घडलेल्या या घडामोडींमुळे प्रक्रिया थांबविण्यात आली.

श्री पूजक संघाच्या वतीने अजित ठाणेकर यांनी पत्रकारांना सांगितले, 'अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया शुक्रवारपासून (२४ जुलै) प्रारंभ होणार होती. तत्पूर्वी धार्मिक विधींना सुरुवात झाली. गुरूवारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या आठ तज्ज्ञांची समिती कोल्हापुरात येणार होती. दरम्यान हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमार्फत प्रक्रियेला विरोध करणारे पत्र केंद्रीय पुरातत्त्व विभाग व पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती मिळाली.

तज्ज्ञांना केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत दूरध्वनीद्वारे संबंधित प्रक्रिया करण्यास कोल्हापूरला न जाण्याचे आदेश दिल्याचे समितीमार्फत श्रीपूजकांना सांगण्यात आले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जतमध्येही पाण्यासाठी शेतकऱ्यांची दिंडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

जत तालुक्याप्रमाणे आता कवठेमहांकाळ भागातील शेतकरीही पाण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, टेंभू सिचन योजनेतील अपूर्ण कामांना निधी उपलब्ध करून ही कामे लवकर संपवावीत ही त्यांची मागणी आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले , 'सध्या बाजार समितीची निवडणूक सुरू आहे, ती संपल्यावर ही दिंडी काढली जाईल. टेंभूच्या लाभ क्षेत्रातील २१ गावांतील लोकांना एकत्र करून जत तालुक्यातील लोकांनी ज्याप्रमाणे पायी दिंडी नुकतीच काढली होती. त्याच धर्तीवर आमचीही दिंडी निघेल. या सिंचन योजनेतील नागजपर्यंतचे पाटाचे काम पूर्ण झाले आहे. मिरज-पंढरपूर व विजापूर-गुहागर या राज्य महामार्गावरचे काम झाले की पाणी ढालगावपर्यंत येण्यात कसलीच अडचण नाही. २५-३० कोटी रुपयांचा निधी जरी उपलब्ध झाला तरी कवठेमहांकाळ हद्दीत पाणी येऊ शकेल.'

'टेंभू योजनेशी संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले, नागज, आरेवाडी भागात कामे सुरू आहेत. सर्व कामे पूर्ण होण्यात ६० कोटी रुपयांची गरज आहे. लंगरपेठ, ढालगावपर्यंत हे पाणी जाऊ शकते. सध्या २५-३० कोटी रुपये जरी मिळाले तरी टेंभूचे पाणी नागज हद्दीत पडू शकते. ढालगाव, लंगरपेठ, दुधेभावी, घोरपडी तलाव भरण्याचीही व्यवस्था होऊ शकेल,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा प्रस्तावच नव्हता

0
0

सांगली बाजार समिती निवडणुकीबाबत शेट्टींचे स्पष्टीकरण



म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'भाजपकडून कोणताही प्रस्तावच आला नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा संस्था चालविणारा नाही. त्यांचा संस्था मोडण्यात हातखंडा असल्याची जोरदार टीका करत खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीने काँग्रेसप्रणित आघाडीचा पर्याय निवडला असल्याचे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, सदाभाऊ खोत यांनी सांगली बाजार समितीसाठी वसंतदादा रयत पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी ७० उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचाच पॅटर्न बाजार समितीत पुढे आला आहे. परंतु राष्ट्रवादीप्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेलकडे भाजप, काँग्रेसचे मदन पाटील गट अशी मर्यादित संख्या आहे तर काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत आघाडीकडे भाजपबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, धर्मनिरपेक्ष जनता दल यांची संख्या वाढली आहे. भाजपचे माजी मंत्री घोरपडे आणि माजी आमदार दिनकर पाटील हे वसंतदादा आघाडीत सामील झाले आहेत. उमेदवारी देताना पक्षाचा नाही तर व्यक्तीचा विचार केला आहे, असे सांगून घोरपडे यांनी जतला - सात, कवठेमहांकाळला - चार आणि मिरज तालुक्याला - पाच असे उमेदवार देण्यात आले असून, सर्व चेहरे नवे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'गेल्या पंचवर्षिक मध्ये मार्केट कमिटीचे नेतृत्व करताना दिलेल्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता करता आली.'

वसंतदादा रयत आघाडीचे उमेदवार

सर्वसाधारण गट- अण्णासाहेब कोरे, कुमार सिदगोंडा पाटील, देवगोंडा बिरादार, मच्छिंद्र वाघमोडे, तानाजी पांडुरंग पाटील,जीवन पाटील. इतर मागास वर्ग - संतोष पाटील. महिला राखीव - जयश्री भीमराव पाटील , सुगलाबाई बिरादार. भटक्या विमुक्त जाती - प्रशांत शेजाळ. प्रक्रिया संस्था - संभाजी मेंढे. ग्रामपंचायत गट - रामगोंडा संती, दीपक शिंदे. अनुसूचित जाती - अजित बनसोडे. ओबीसी-अभिजित चव्हाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाचा गोंधळ सुरूच

0
0

३५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल दुरुस्तीच्या फे‍ऱ्यात

सचिन यादव, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात ८० हून अधिक अभ्यासक्रमाच्या निकालाचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. सुमारे ३५ हजार विद्यार्थी निकाल दुरुस्तीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अनेकांना चुकीची मार्कलिस्ट मिळाली आहेत. परीक्षा दिली असतानाही अनुपस्थित असल्याचा रिमार्क मार्कलिस्टमध्ये आहे. चुकीचा परीक्षा आणि पीआरएन क्रमांक मिळाला. वेबपोर्टलवरील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. विद्यापीठातील अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागल्याने त्यांचा मनस्ताप वाढला आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल), परीक्षा विभाग, कम्प्युटर विभागातील कर्मचाऱ्यांत अंतर्गत धुसफूस सुरू आहे.

अधिसभेत एमकेसीएलच्या कार्यप्रणालीबाबत तक्रारी झाल्या. त्याबाबत त्रिस्तरीय समितीची नेमणूक केली. ही समिती एमकेसीएला मुदतवाढ की पुन्हा परीक्षा विभागाला कामकाज द्यायचे, याबाबत निर्णय घेणार आहे. समितीने काहीही निर्णय घेतला तरी विद्यार्थ्यांचा मनस्तापाचा प्रश्न अजूनही कायम आहे. परीक्षेचे काम सुरळीत होण्यासाठी एमकेसीएलची स्वतंत्र यंत्रणा राज्यातील विद्यापीठाने स्वीकारली. मात्र सध्या विद्यापीठात परीक्षेच्या कामकाजासाठी असलेल्या यंत्रणेत धुसफूस सुरू आहे. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या कार्यपद्धतीवरुन सेवक संघाचा वाद झाला. कम्प्युटर विभाग वेळेवर काम करीत नाही. फिडींगसाठी चुकीची माहिती दिली जाते, अशा तक्रारी करण्यात आल्या. कम्प्युटर विभागाला कायमस्वरुपी संचालक नसल्याची ओरडही कायम आहे. परीक्षेच्या कामासाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक चुका आहेत. परीक्षेच्या निकालाचे कामकाज करण्यासाठी इंटरनेट सुविधा आहे. यासाठी वर्षाला सुमारे ३५ ते ४० लाख दिले जातात. मात्र सध्या प्रशासन आणि बीएसएनएल यांच्यातही समन्वयाचा अभाव असल्याने निकालावर परिणाम होत आहे. परीक्षा आणि कम्प्युटर विभागातही समन्वय नाही. २ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ३२ हजार विद्यार्थ्याना निकाल मिळाला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे लांबले ८० वर परीक्षांचे निकाल

परीक्षा विभागाकडे डेटा ट्रान्स्फरमध्ये गोंधळ सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या ऑड क्रमांकाची माहिती नाही. काही चुकीचा डेटा फीड झाला आहे. निकालाच्या कामकाजात डेटा प्रोसेस, फॉरमॅट, कन्वर्टर, दोन वेबपोर्टलमधील तांत्रिक अडचणीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे निकालात दुरुस्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाचे वेबपोर्टल आणि मुंबईच्या बेवपोर्टलमध्ये कनेक्टिव्हीटी नाही. दोन्हीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने निकालातील दोष वाढत चालले आहेत.

बीएसएनएलचे स्पीड अधिक हवे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थीकेंद्री भूमिका घ्यायला हवी. एमकेसीएल, कम्प्युटर आणि परीक्षा विभागात समन्वय नाही. परीक्षेचे कामकाज कोणाला द्यावे, हा विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय आहे.

- सुमित जोंधळे, शहरमंत्री, अभाविप

परीक्षा विभागाने आतापर्यंत ४८४ अभ्यासक्रमाचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत. तांत्रिक बाबींमुळे काही अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहेत. लवकरच निकाल जाहीर केले जातील.

- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक

शेकडो चुका एमकेसीएलने केल्या आहेत. एमकेसीएलमुळे विद्यापीठाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. कॉलेजचाही मनस्ताप वाढला आहे.

- अतुल ऐतावडेकर, सेक्रेटरी, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीच्या वारीसाठी ५१ हजार लाडू

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

पंढरपूरच्या वारीसाठी कागलमधून तब्बल ५१ हजार बुंदीचे लाडू आज देण्यात आले. येथील कागल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सात्ताप्पा रामचंद्र कदम बंधू आणि त्यांच्या मित्रमंडळीनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठीची तयारी गेल्या पाच दिवसांमध्ये पूर्ण झाली. सुरेश जंगटे त्यांचे कुटुंबिय आणि २५ लोकांनी यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. बुधवारी लाडूने भरलेला ट्रक पंढरपूरकडे रवाना झाला.

कदम बंधू आणि त्यांचे सहकारी दरवर्षी पंढरीच्या वारीला जातात. मागील वर्षी वारीला गेल्यानंतर तिथे काहीजणांनी वारकऱ्यांना दिलेले केळी, फराळ आणि पाण्याच्या बाटल्या दिलेल्या त्यांनी पाहील्या. त्यावेळी आपणही वारीतील वारकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटले. यावर्षी सम्राट नागरी पतसंस्थेचे संचालक भगवान कदंम, नंदकुमार माळकर, करणसिंह रणवरे आणि इतरांच्या पुढाकाराने ५१ हजार लाडू बनवण्यात आले. यासाठी २५ जणांची टीम वारकऱ्यांच्या ड्रेसकोडसह रवाना झाली.

यावर्षी लाडू देण्याचा हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. इतर दानशूरांची प्रेरणा घेवून हा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. इथ‌ून पुढे दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी काही ना काही पाठवत राहू आणि स्वत: हजर राहून त्याचे वितरणही करु.

-सात्ताप्पा कदम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगीच्या अळ्या फ्रीजमध्ये

0
0

जय‌सिंगपुरातील रुग्णाच्या घरात तपासणी

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपुरात डेंगीचा रूग्ण आढळल्याने नगरपालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील शाहूनगर भागात सर्वेक्षण करण्यात आले. डेंगीची लागण झालेल्या संतोष कांबळे याच्या घरातील फ्रीजच्या ट्रे मधील पाणी साठ्यात डासांच्या अळ्या आढळल्या. पथकाने परिसरातील घरामध्ये पाणी साठ्यांची पाहणी केली. तसेच कोरडा दिवस पाळण्यामया सूचना केल्या. परिसरात औषध फवारणीही करण्यात आली.

शहरात डेंगीचा रूग्ण आढळल्याने मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी शाहूनगरमध्ये पाणी साठ्यांच्या पाहणीच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या होत्या. यानंतर शाहूनगरमधील सूदर्शन चौक परिसरात आरोग्य विभागाच्या जिल्हा हिवताप कार्यालयाचे पर्यवेक्षक ए. डी. माने, किटक तज्ज्ञ सतीश ढेकळे, वाय. बी. माने, जावेद मुल्ला, तसेच जयसिंगपूर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक एस. व्ही. कांबळे, पी. डी. शिवणे यांनी ३२५ घरांचे सर्व्हेक्षण केले. सिंटेक्स टाक्यांबरोबरच अन्य पाणी साठ्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी दुषित पाणी साठे रिकामे करण्यात आले. तर अन्य पाणी साठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

संतोष कांबळे या डेंगी रूग्णाच्या घरात पाहणी केली असता फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. शाहूनगर परिसरात पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबूवन औषध फवारणीही करण्यात आली.

नागरिकांनी घरातील अनेक दिवसाचे ड्रम, बॅरेल यातील पाणी साठे रिकामे करावेत. फ्रीजखालील पाणी साठ्याचे ट्रे धुवून वापरावेत. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही साठून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यामुळे घर व परिसरातील अनेक दिवसांचे पाण्याचे साठे नागरिकांनी नष्ट करावेत, असे आवाहन पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य द्या

0
0

घटप्रभा उपखोऱ्यातील लाभधारकांच्या कार्यशाळेत आमदार कुपेकरांची सूचना

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज उपविभागाच्या विकासासाठी सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वजन एकत्र येतात हा इतिहास आहे. सद्यस्थितीत झालेल्या प्रकल्पांमुळे परिसराचा बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. मात्र कार्यशाळेच्या निमित्ताने उर्वरित पाणी प्रश्न सुटावा अशी अशा आहे. तत्पूर्वी रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य द्या, अशी सूचना आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी व्यक्त केले.

राज्यभर जल आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर घटप्रभा उपखोऱ्यातील (के-३) लाभधारक घटकांची सल्लामसलत कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पालिकेच्या शाहू सभागृहात आयोजित या कार्यशाळेत अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंके, विजय घोगरे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण, विजय पाटील, अजय इनामदार, जे. जे. बारदेस्कर, नितीन सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार कुपेकर म्हणाले, घटप्रभा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पा करिता कृष्णा पाणी वाटप लवादानुसार सात टीएमसी पाणी उपलब्ध झाले होते. घटप्रभा खोऱ्यात ११.२८ टी. एम. सी. सिंचन प्रकल्प घेणेत आलेले आहेत. यामध्ये जंगमहट्टी, फाटकवाडी, चित्री या मध्यम सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तर भूसंपादनाच्या अडचणीमुळे आंबेओहाळ, उचंगी व सर्फनाला हे प्रकल्प अपूर्ण आहेत. सर्वप्रथम हे प्रकल्प पूर्ण करावेत, अशी मागणी आमदार कुपेकर यांनी केली.

पावसाची अनियमितता घेऊन पाणी वापरावर मर्यादा घालून घेणे गरजेचे आहे. सरकारने धोरणात्मक बदल करून गडहिंग्लज उपविभागात उद्योगांना सवलती देऊन उद्योग वाढीस चालना द्यावी. यादृष्टीने उद्योग धंद्यांना आवश्यक पाण्याची दखल या आराखड्यात करावी. तसेच औद्योगिककरणांमुळे नद्या प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. याउपर सद्यस्थितीत पाणी उपलब्ध असूनसुद्धा ते वेळेत न अडविल्याने लोकप्रतिनिधीना रोषाला सामोरे जावे लागते, याची खबरदारी सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी भविष्यकाळातील पाणी नियोजनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण कार्यशाळा असल्याचे मत नोंदविले. शिवसेनेचे प्रा.सुनील शिंत्रे म्हणाले, लघु पाटबंधारे तलावातील गेली कित्येक वर्ष साठलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांना वापरण्यासाठी द्यावा. ज्यामुळे कमीतकमी खर्चात पडीक जमीन सुपीक होईल.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर, जि. प. सदस्या शैलजा पाटील, अर्जुन आबिटकर, सुभाष धुमे, मदन देशपांडे, राम पाटील, अरुण देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रतिआमदारांची बडदास्त

सध्या चंदगड तालुक्याच्या आमदार संध्यादेवी कुपेकर असल्या तरी त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकरच आमदारांच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारी कार्यक्रमही त्याला अपवाद नाहीत. आज झालेली कार्यशाळाही त्याला अपवाद नव्हती. हा सरकारी कार्यक्रम असूनही डॉ. बाभूळकरांकडे कोणतेही संविधानिक पद नसतानाही त्यांना व्यासपीठावर मध्यभागी व त्यांच्या बाजूला आमदार कुपेकर यांना स्थान दिले. त्यामुळे नेमक्या आमदार कोण असा सवाल उपस्थितांना नेहमीप्रमाणे पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी योजनेतील लाभार्थ्यांवर अन्याय

0
0

आरपीआय आठवले गटाचे तहसीलदारांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या वतीने संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, राष्ट्रीय अपंग अशा विविध घटकातील लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर झाली आहे. यामध्ये काही अपात्र लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा नव्याने सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे जागेवर न जाता केल्याने अनेक पात्र लाभार्थ्यांना पेन्शनमधून वगळण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांचा पुन्हा सर्व्हे करुन त्यांना पूर्ववत पेन्शन द्यावी, या मागणीचे निवेदन आरपीआय आठवले गटाच्यावतीने करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले. तहसीलदार खरमाटे यांनी याप्रकरणी चौकशी करुन पुन्हा पेन्शन सुरू करण्याचे आश्वासन दिले.

राज्य सरकारच्या वतीने गरजू व निराधार व्यक्तींना लाभ देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सरकारच्या योजनांच्या लाभ घेणाऱ्यांमध्ये शहरातील राजेंद्र नगर, भारत नगर, साळोखे पार्क आदी भागात रहिवासी आहेत. मात्र सरकारच्या योजनांचा अपात्र लाभार्थी उपभोग घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व्हे करण्यास सुरुवात केली होती. मात्र पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यासाठी निवड केलेल्या अधिकाऱ्यांनी जाग्यावर जावून सर्व्हे न करता मन मानेल त्याप्रमाणे लाभार्थी अपात्र ठरवले. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे अनेक लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाली आहे. यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या चुकीची वर्तणुकीमुळे सर्वसामान्यांना फटका बसत आहे. निराधार आणि गरीबांना पुन्हा पेन्शनचा लाभ देण्यासाठी सर्व्हे करण्याची मागणी केली. योग्यरितीने पुन्हा सर्व्हे केल्यास समाजातील खऱ्याखुऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्यामुळे हा सर्व्हे लवकरात लवकर करावा.

यावेळी तहसीलदार खरमाटे यांनी संपूर्ण प्रकरणांची चौकशी करुन पुन्हा पेन्शन देण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, संजय लोखंडे, दत्ता मिसाळ, मुस्ताक मलवारी, सुखदेव बुध्याळकर, कुंडलिक कांबळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडगिरीमुळे सीपीआर वेठीला

0
0

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने धास्ती; कडक कारवाईची गरज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये घुसून चाकू हल्ल्याचा प्रयत्न, मारामारी, सामाजिक संघटनांचा मुजोरपणा यांसह रिक्षा आणि वाहनचालकांच्या दादागिरीमुळे सीपीआर परिसर अशांत बनला आहे. राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून हॉस्पिटलच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस नियमांची पायमल्ली होत आहे.

अपघात, खून, मारामारी अशा घटनांतील व्यक्तींना सीपीआर हॉस्पिटलमधील अपघात कक्षात उपचारास दाखल करण्यात येते. अशा घटनांवेळी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या परिसरात येतात. खून आणि मारामारीच्या घटनांमध्ये संबंधितांच्या समर्थकांकडून परिसरात अरेरावी केली जाते. शुक्रवारी रेसकार्स नाका येथील मारामारीच्या घटनेतील जखमी झालेल्याच्या भावाने चाकू घेऊन अपघातकक्षात धाव घेतली होती. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने गंभीर घटना टळली. रविवारी तर सीपीआरच्या आवारात दोन गटांत राडा झाल्याने एकजण गंभीर जखमी झाला.

हॉस्पिटलमध्ये एक पोलिस चौकी असून तेथे दोन सत्रात प्रत्येकी दोन असे एकूण चार पोलिस कार्यरत असतात. गंभीर घटनांच्यावेळी दोन पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. सीपीआर हॉस्पिटल प्रशासनानेही सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र गंभीर घटनांवेळी सुरक्षारक्षक हतबल होतात. गेल्या वर्षी करवीर तालुक्यातील 'पाचगाव' च्या घटनांमध्येही सीपीआर केंद्रबिंदू होते. यावेळी खून झालेल्या व्यक्तींच्या समर्थकांनी थेट हॉस्पिटलवर दगडफेक करण्यात मजल मारली होती. पाचगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी आंदोलकांनी अपघात कक्षासमोरच ठिय्या मारला होता.

साधारणतः महिन्यातून दोन-तीन वेळा मारामारीच्या अशा घटनांवेळी दोन गट समोरासमोर येत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण होते. यावेळी संबधित पोलिस ठाणे अथवा लक्ष्मीपुरी पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागते. एकीकडे अपघात कक्षासमोर तणाव निर्माण होत असला तर दुसरीकडे जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कार्यालयासमोर काही संस्थांनी बेकायदेशीर हातगाड्या, दुकाने उभारून मांडवली सुरू केली आहे. सीपीआर परिसरात राजरोस अतिक्रमण सुरू असतानाही प्रशासन हाताची घडी घालून गप्प बसले आहे.

प्रसूतीगृहासमोर अनाधिकृत रिक्षा स्टॉपवर रुग्णांना नेण्यावरून सतत वाद होत असतात. न्यायालयात खटल्यासाठी आरोपी आणलेल्या व्हॅनचा स्टॉपही सीपीआर परिसरात असतो. हॉस्पिटल परिसर सायलेंट झोन असूनही दुचाकी मोठ्या प्रमाणावर पार्क केल्या जातात. काही मोटारीही सीपीआरच्या आवारात पार्क केल्या जातात. त्यामुळे परिसर सतत तणावाखाली असतो. सीपीआरच्या आवारातील मारुतीच्या मंदिराजवळील वार्ताफलकावर गुंड आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे फलक लावले जातात.

पोलिस बळ हवेच

सीपीआर परिसरावर नियंत्रण ठेवण्याचे काम राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. महविद्यालयातील डॉक्टर मंडळी अध्यापनाच्या कामात गुंतल्याने आणि अधिकारांचा वापर केला जात नसल्याने दिवसेंदिवस या परिसरात अशा घटना वाढू लागल्या आहेत. मध्यंतरी हॉस्पिटल परिसरात चोवीस तास पोलिस व्हॅन असायची. मात्र सध्या असा बंदोबस्त नसल्याने हा परिसर अशांत बनला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडप तहसीलदार तपासणार

0
0

उत्सवाच्या काळात होणार नियमांची अंमलबजावणी

सतीश घाटगे, कोल्हापूर

रस्ते, फूटपाथसह सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी येत्या गणेशोत्सवापासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवापूर्वी सात दिवस आधी तहसीलदारांच्या अध्यक्षेतीखालील त्रिसदस्यीस समिती गणेश मंडळांनी घातलेल्या मंडपाची तपासणी करणार आहे. मंडप उभारणीसाठी घेतलेल्या परवान्याची प्रत मंडपातील दर्शनी जागेवर लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने उत्सवांच्या कालावधीत रस्त्यांवर मंडप उभारू नयेत असे आदेश बजावले आहेत. रस्त्यांवर मंडप उभारल्याने वाहतुकीच्या कोंडीच्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अवैधरित्या मंडप उभारणी केल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उत्सवापूर्वी दोन महिने पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी कोल्हापूर शहरासाठी करवीर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. समितीत महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि पोलिस प्रशासनाच्या विशेष शाखेच्या निरीक्षकांचा समावेश आहे. उत्सवापूर्वी प्रत्येक मंडळाने शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाच्या अहवालानंतर महापालिकेची परवानगी घेऊन मंडप उभारणी करावी अशी सूचना केली आहे. उत्सवापूर्वी सात दिवस आधी तहसीलदार, त्यांच्या समितीने प्रत्येक मंडपाला भेट देऊन तपासणी करावी. तपासणीवेळी मंडपात उभारणीबाबत घेतलेला परवाना दर्शनी भागात लावून ठेवावा असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. जी मंडळे नियमबाह्य मंडप उभारतील, त्यांचा अहवाल महापालिकेच्या आयुक्तांना पाठवावा लागणार आहे. जी मंडळे नियमांचा भंग करतील, त्यांचा परवाना महापालिकेने तत्काळ रद्द करावा. अटीचा भंग करणाऱ्या आयोजकांना नव्याने परवानगी देण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरात मुख्य रस्ते, पार्किंगच्या जागांसह वाहतुकीला अडथळा येईल अशा सहाशे ते सातशे ठिकाणी छोटी-मोठी मंडळे मंडप उभारतात. मंडळांना परवानगी घेऊन मंडप उभारणी करावी लागेल. उत्सवापूर्वी सात दिवस आधी त्रिसदस्यीय समिती सर्व मंडपांची तपासणी करून आयुक्तांना अहवाल देईल. यंदा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल अशी स्थिती आहे. निवडणुकीतील इच्छुक उमेदवार सार्वजनिक उत्सवांत उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र नियमबाह्य मंडप उभारणीचा फटका निवडणुकीत बसू नये यासाठी सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे.

महापालिका कारवाई करणार

'न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्रिसदस्यी समिती नियुक्ती केली आहे. समितीचे अध्यक्ष करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे असून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील विशेष शाखेचे निरीक्षक हे अन्य दोन सदस्य असतील. गणेशोत्सवापूर्वी सात दिवस अगोदर मंडळांनी मंडपाची परवानगी घेतली आहे का याची तपासणी केली जाईल. जर मंडळांनी परवानगी घेतली नसली तर समिती आयुक्तांकडे अहवाल देईल. त्यानंतर आयुक्त विनापरवाना मंडप लागणाऱ्यांवर कारवाई करतील', असे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सांगितले.

सुमारे १२००

शहरातील मंडळे

सुमारे ६००

रस्त्यावर मंडप घालणारे

सुमारे ७०

पार्किंग, महापालिकेच्या जागेवरील मंडप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images