Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वस्त्रोद्योगाला सेनवॅट नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केंद्रीय अबकारी कर खात्याकडून 'सेनवॅट'मध्ये दुरुस्ती करणारे परिपत्रक जारी केल्याने येथील वस्त्रोद्योगात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, करमुक्त असलेल्या वस्त्रोद्योगास पुन्हा कर लागणार नसल्याचा खुलासा केंद्रीय अबकारी कर खात्याचे सचिव अक्षय जोशी यांनी केल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला. केंद्रीय अबकारी कर खात्याचे सचिव अक्षय जोशी यांनी १७ जुलैला एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात अबकारी कराबाबत (सेनवॅट) नेमका अर्थ निघत नसल्याने वस्त्रोद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर 'सेनवॅट' लागणार, अशी अफवा पसरली, प्रोसेसर्सना १२.५ टक्के अबकारी द्यावा लागणार, अशीही बातमी उठली. अधिक चौकशी करता समजलेली माहिती अशी, टेक्सराईझ यार्न उत्पादित करणाऱ्या कारखानदारांकडून आयातीत सुतावर १२.५ टक्के कर अर्थ खात्याने लावला होता; पण वस्त्रोद्योग करमुक्त ठेवण्याचे सरकारचे धोरण असल्याने हा कर लागू पडणार नाही, असे टेक्सराईस यार्न उत्पादकांचे म्हणणे होते. नवीन परिपत्रकात असलेल्या मजकुरावरून नेमका अर्थ निघत नसल्यामुळे वस्त्रोद्योगास सेनवॅट लागणार, अशी अफवा पसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखला मिळणार गावात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तहसील कार्यालयाशी संबंधीत सर्व प्रकराचे दाखले प्रत्येक गावनिहाय देण्याचे नियोजन करीत संपूर्ण तालुक्यात दाखलामुक्त गाव योजना राबविण्याचा निश्चय आजरा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी केला आहे. यामुळे तालुक्यातील कोणालाही सर्वसाधारण दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारत वेळ, पैसा व कष्ट करण्याची वेळ येणार नाही. तालुक्यातील ९२ महसूली गावांमध्ये ही योजना लवकरच राबविली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रत्येक व्यक्ती व कुटुंबाला अनेकविध कारणांसाठी छोट्या-मोठ्या दाखल्यांची सतत गरज भासत असते. त्यासाठी गरजेनुरूप आजरा तहसील कार्यालयाला खेटे मारण्याची वेळ येते. राष्ट्रीयत्व, जन्म-मृत्यू नोंद, उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले जातीचे प्रमाणपत्र अशा विविध स्वरूपाच्या दाखल्यांचा यामध्ये समावेश होतो. गावच्या पुढाऱ्यांपासून ते तहसील परिसरातील मध्यस्थांकरवी यासाठी स्वाभाविक प्रयत्न करावे लागतात. यामध्ये बऱ्याचदा प्रतीक्षा करीत वेळ व पैशाचा अपव्यय होतो. नाहक तिष्ठत रहावे लागते व याचनाही करावी लागते. या सर्व त्रासामधून सर्वसामान्यांची सुटका करण्याचे नियोजन तहसीलदार ठोकडे यांनी केले आहे.

साधारणत: शालेय प्रवेश, शुल्क-सवलती आदींसाठी आवश्यक दाखल्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, ग्रामस्थांच्या निवडणूका, बँकांची कर्जे, शेतीप्रकरणे आदीसाठी असे दाखले आवश्यक असतात. अशा दाखले वाटपाचे त्यासाठीच दोन टप्पे केले गेले आहेत. कुटुंबनिहाय आत्यंतिक महत्त्वाच्या पण किरकोळ स्वरूपाच्या दाखल्यांचे वाटप या नियोजनांतर्गत सध्या सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यात केले जात आहे. यामुळे सद्यस्थितीत अत्यावश्यक दाखले मिळण्याची सोय सर्वसामान्यांची झाली आहे. सध्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभी टप्पा सुरू आहे. या दरम्यानची गरज ओळखून सुमारे १२ हजारांवर विविध स्वरूपाच्या दाखल्यांचे वाटप केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात गावनिहाय याद्या करून दाखले देण्याचे नियोजन आहे. गावची लोकसंख्या व त्यानुसार अत्यावश्यक दाखल्यांची पूर्तता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिधापत्रिकाही नव्या

तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना नव्या शिधापत्रिका देण्याचाही उपक्रम ठोकडे यांनी घतला आहे. तालुक्यात ४६ हजार शिधापत्रिका वाटपाचे नियोजन असून आतापर्यंत निम्म्यांचे वाटप जाले आहे. शिधापत्रिका अतिशय जीर्ण झाल्यामुळे त्याची हाताळणी अशक्य बनलेली आहे. त्यामुळे नव्या शिधापत्रिका देणेही गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगाची नशा जीवावर

$
0
0

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था चांगली असल्याने वाहनाचा वेगही जास्त असतो. मात्र, हाच वेग कधी गाडीचालकाचा तर कधी पादचाऱ्याच्या जीवावर उठत आहे. मडिलगे येथील खिंडीतील वळणावर असे धोकादायक वाहनचालक सुसाट गाड्या चालवून अनेकांना जखमी करत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा आणखी प्रोत्साहन मिळत आहे.

मडिलगे खिंडीतील वळणावर सतत छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे प्रशासनाने सदरील कॉर्नरच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यासोबतच अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून वारवार होते, पण जनतेच्या मागणीस दाद देतो कोण, गारगोटी शहरातून येणाऱ्या रस्त्यावर आणखी कित्येक वळणे धोकादायक बनली आहेत. या वळणांच्या ठिकाणी सतत छोटे-मोटे अपघात होत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. कोल्हापूर मार्गावर मडिलगेच्या स्मशानभूमीजवळ असणारे दोन कॉर्नर जीवघेणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवांनी वैतागले शाहूवाडीकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला आहे. दिवसभर रोप लावणीसह शेतीची इतर कामे जोमाने सुरु असल्याने थकून भागून आलेला बळीराजा घरी येऊन विश्रांतीसाठी डोके टेकवणार तोच घराघरात चोर शिरल्याच्या अफवा घुसत आहेत. चोरांच्या अफवांमुळे तालुक्यातल्या गावोगावी पसरल्याने सर्वसामान्य लोक पुरते वैतागले आहेत. व्हॉट्स अप आणि सोशल मीडिया मधूनही चोरांचे विविध करिष्मे फॉरवर्ड होत असल्यामुळे लोक भयभीत झाले आहेत.

एकीकडे तालुक्यातल्या २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावोगावचे वातावरण ऐन पावसाळ्यात तापू लागले तर दुसरीकडे गेल्या चार दिवसापासून मात्र चोरांच्या अफवांनी तालुका ढवळून गेला आहे. पूर्वेकडील कापशी, वडगाव, शिवारे, माणगाव या गावात चोरांच्या भीतीने गावं आणि शिवारं रात्री रात्री गस्तीने जागू लागल्या असतानाच त्याचे लोण आता तालुक्यातल्या मलकापूर, आंबा, आळतूर, परळे निनाई, कडवे, शिरगाव, साळशी, पिशवी, अंबर्डे, शिराळे मलकापूर, रेठरे, शित्तूर वारुण, कांडवण या भागातही पसरले आहे. शनिवारी तर दूर नांदेडहून विशाळगड देवदर्शनासाठी आलेल्या लोकांना दिवसाढवळ्या चोर समजून बांबवडेतल्या

जनसमुदायांकडून मार खावा लागला होता. एखादा पाहुणा म्हणून जरी दुसऱ्या गावात गेला तरी त्या गावात संशयाचे वातावरण पसरत असल्याने पाहुणा म्हणून दुसऱ्याच्या गावात जायलाही कोणी धजावत नाही. शेतातील कामे करायला महिला वर्ग तर एकट्या दुकट्याने जायला कोणी धाडस करीत नाही तर रात्री आठ नंतर टू व्हीलरवरून कोणी प्रवास करीत नसल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे. मलकापूर, बांबवडे, सरुड, कापशी, भेडसगाव, कोतोली, शाहूवाडी यासारख्या मोठ्या गावामधून तर तरुणांकडून गल्लोगल्ली गस्ती पथकाद्वारे पहाटेपर्यंत गस्ती घातल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटमारी सोशल मीडियावरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरामध्ये सोशल मीड‌ियावरून फिरणाऱ्या संदेशामुळे गोंधळाचे तसेच घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या अफवांमुळे तालुक्यातील गावा गावात युवक वर्गाने मोठया प्रमाणात गस्त घालण्यास सुरूवात केल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, रस्त्यांवरून फिरणाऱ्या मनोरूग्णांना याचा त्रास होत आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता चोरीच्या अशा कुठल्याही घटना घडल्या नसून व्हॉट्स अॅप आणि अन्य माध्यामंतून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पेठवडगांव परिसरामध्ये सोशल मीड‌िया वरून फिरणाऱ्या संदेशाबाबत चौकशी केली असता गेल्या महिन्यामध्ये वाटमारी, चोरी असे कोणतेही गुन्हे दाखल नाहीत तर सांगली, सातारा जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने असे प्रकार होऊ लागल्यामुळे तत्काळ या घटनेची खातरजमा करून पत्रक प्रसिद्ध करून नागरिकांना दिलासा दिला. याबाबत कोल्हापूर पो‌लिस प्रशासन मात्र निवांत असल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्याभरापासून सोशल मीड‌ियावरून गुन्हेगारी शिक्का असलेल्या एका जमातीमधील लहान मुलांना पकडल्याचे त्यांचे व त्याने आमच्या जमातीचे तीन हजार जण परिसरात कार्यरत झाले असून 'वाटमारी व चोऱ्या होणारच, कितीही गस्त घाला..' अशा प्रकारची आव्हानात्मक भाषा असलेला संदेश सर्वत्र फिरत आहे. या संदेशावरून वडगाव परिसरामध्ये खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक गावात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरूवात झाली. या गस्तीमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ लागला आहे. तसेच रात्रीच्या वेळी घरांतून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अशा सोशल मीड‌िया वरून पसरणाऱ्या अफवांवर पोलिस प्रशासनाने कोणतेही नियोजन लावले नसल्याचे चित्र दिसत आहे.

तसे सांगली,सातारा जिल्ह्यांमध्ये सोशल मीड‌ियावर कोल्हापूर जिल्ह्यामधील वडगांव परिसरात चोर पकडले व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये कडेगाव, ढेबेवाडी अशा अनेक गावांमध्ये चोर पकडल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे सोशल मीड‌ियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांची यंत्रणा कार्यरत होत आहे. सांगली, सातारा पोलिसांनी या सोशल मीड‌ियावरून आलेल्या अफवेचे खंडण करून सर्व घटनांची खातरजमा केली. त्यानंतर सोशल मीड‌ियावरून आलेला संदेश अफवा असून यावर कोणी विश्वास ठेवू नये. वडगांव परिसरामध्ये या अफवेमुळे मोठया प्रमाणात खळबळ उडाली असून कोल्हापूर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी गस्त घालताना कोणती गंभीर घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.

वडगाव परिसरात वाटमारी, चोरी असे कोणतेही प्रकार घडलेले नाहीत. ही सोशल मीड‌ियावरून आलेली अफवा आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. व सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे प्रकार होऊ नयेत. याबाबत गावा-गावात बैठका घेणार.

- विष्णुपंत जगताप, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धबधबे घालताहेत साद

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

गर्द हिरवाईने नटलेला सह्याद्री आणि सह्याद्रीच्या कुशीत खळाळणारे बर्की, मानोली आणि केर्ले येथील धबधबे पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनले आहेत. पावसाच्या हलक्या सरी पडत असल्यामुळे धबधबे कोसळू लागले आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या ह्या धबधब्यांचा जलप्रपात अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. गर्द झाडीतून धबधब्याकडे घडणारी पदभ्रमंती पर्यटकांना स्वर्गसुख देतेच आहे आणि धबधब्याकडे जाताना सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.

सह्याद्रीच्या डोंगररांगातील निसर्गसौंदर्याने नटलेला आंबा व बर्की परिसर पर्यटकांना पावसात चिंब करतो. ट्रेकिंगची मजा लुटल्यानंतर तीनशे फुटावरून फेसाळणाऱ्या बर्की इथल्या धबधब्याखाली उभे राहिल्यानंतर जलप्रपाताचा खरा आनंद मिळतो. बर्की गावापासून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

दीड किलोमीटरच्या या पायवाटेच्या प्रवासात पर्यटकांना वाटेत शुभ्र आणि खळाळ वाहणारे निर्झर, गर्द झाडीतून निघणारा मार्ग, औषधी वनस्पतींचा खजिना, विविध पक्ष्यांचे आवाज आणि वरून कोसळणारा पाऊस अनुभवावयास मिळतो. नानाविध वृक्षवेलींचे सानिध्य आणि वृक्षवेलीतून ओथंबणारे पावसाचे टपोरे थेंब आख्खे शरीर गारठून टाकतात. याशिवाय मध्येच कुठेतरी सापांची सळसळ आणि कुठेतरी पायाला घट्ट चिकटून बसलेले जळू परतीच्या प्रवासात कधी गळून पडतात याचे भानही पर्यटकांना रहात नाही. केर्ले आणि मानोली इथल्या धबधब्यातला आनंद लुटताना मन प्रसन्न होऊन जाते. केर्ले इथला धबधबा पाहताना नक्कीच निसर्गाची नवलाई अनुभवावयास येते.

बर्की धबधब्याकडे जायला दोन मार्ग आहेत. कोल्हापूरहून कळे ,बाजार भोगाव ,करंजफेण मार्गे चाळीस किलोमीटरचे अंतर आहे. कोल्हापूर, मलकापूर, पांढरेपाणी,येळवण जुगाई, मांजरे मार्गे सत्तर किलोमीटर अंतरावरून धबधब्याकडे जाता येते. बर्की फाट्यापासून गावात दीड किलोमीटर कच्च्या रस्त्याने जाता येते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. गावात गेल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने कमी दरात पार्किंगची व्यवस्था केली आहे. केर्ले इथल्या धबधबब्याकडे जाताना मलकापूर पासून चौदा किलोमीटर अंतर तर मानोली धबधब्याकडे जाताना आंबा इथून अवघे एक किलोमीटर अंतर जावे लागते.

गावरान मेनू

बर्की आणि मानोली इथल्या धबधब्याकडून परत येताना भुकेलेल्यांना आस्वाद घेण्यासाठी गरमागरम चहा, नाचणीची, ज्वारीची भाकरी, चपाती, उकडलेली अंडी, झुणका, मिरचीचा ठेचा, गावरान कोंबड्याचा तांबडा,पांढरा रस्सा मिळतो. मानोली धबधब्यातून आनंद लुटून आल्यानंतर आंबा येथे खवय्यांसाठी खूप रिसॉर्ट्स आहेत.

पोलिसांचे गस्ती पथके सज्ज

धबधब्याकडे जाताना तरुणाईचा एकच जल्लोष असतो. हौशी युवक मद्याच्या बाटल्या घेवून बेधुंद होतात. त्याचा त्रास निसर्गावर तर होतोच शिवाय त्यांच्याकडून स्थानिक महिलांना आणि पर्यटनासाठी आलेल्या तरुणींनाही होत असतो. पूर्वानुभव लक्ष्यात घेता शाहूवाडी पोलिसांनी शनिवारी व रविवारी बर्की फाट्यावरच गस्ती पथक ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपशाला ‘बारकोड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाळू ठेकेदारांच्या बोगस पावत्यांमुळे मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून मंगळवारी वाळू ट्रक वाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वाहतूकदारांच्या मागणीचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने बेगमपुरी वाळूच्या धर्तीवर येथेही विविध रंगाच्या व बारकोड असलेल्या पावती देण्याची व्यवस्था तीन दिवसात करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच बोगस पास देणाऱ्या ठेकेदारावरही दंडात्मक कारवाई करण्याची ग्वाही दिली. तोपर्यंत वाहतूकदारांचा बंद सुरु राहणार आहे.

जिल्हा वाळू ट्रक वाहतूकदार संस्था व जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्यावतीने मंगळवारी शिरोली टोल नाक्याजवळील वाळू विक्रीच्या डेपोपासून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहतूकदारांवर केल्या जात असलेल्या अन्यायाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. यावेळी वाळू वाहतूकदार हे प्रामाणिकपणे व्यवसाय करत असून त्यांना चोराच्या नजरेतून पाहू नये. तसेच बोगस पावत्या ठेकेदार देतात व त्याचा फटका वाहतूकदारांना बसतो. यासाठी प्रथम त्यांच्यावर कारवाई करावी व नंतर वाहतूकदारांना जबाबदार धरावे अशी मागणी सुभाष जाधव व विजय पाटील यांनी केली. त्यानंतर पवार यांनी चर्चा करत असताना सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथील ठेकेदार व जिल्हाधिकारी कार्यालय विविध रंगाच्या रॉयल्टीच्या पावत्या देते. तसेच त्यावर बारकोडही असतो. त्यामुळे पावती बोगस होण्याचा प्रश्न नसतो हे समोर आले. पवार यांनी येथील जिल्हा खनीकर्म अधिकारी अभय भोगे यांना या पद्धतीने पावत्यांची यंत्रणा राबवण्याचे आदेश दिले. त्यासाठी तीन दिवसाचा कालावधी दिला. त्यानंतर पुन्हा वाहतूकदारांशी चर्चा करण्यात येणार असून त्यावेळी या पद्धतीबाबत जिल्हा प्रशासनाकडून समाधान झाल्यास संप मागे घेण्यात येईल, असे जाधव व पाटील यांनी सांगितले. तोपर्यंत वाहतूक बंदच ठेवण्यात येणार आहे. शिष्टमंडळामध्ये महेश जाधव, प्रकाश व्हटकर, संजय जाधव, भाऊ घोगळे, प्रकाश केसरकर, विशाल राजापुरे, रमेश कांबळे आदी जिल्ह्यातील वाहतूकदार सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाईप्रकरणी लिपिक निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामाच्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक सुशांत पाटील यांना सोमवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्या विभागातील इत​र वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई न होता थेट लिपिकावर झालेल्या कारवाईमुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतील कर्मचाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अशा मनमानी कारभाराविरोधात ३० जुलै रोजी एक दिवसाचे रजा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये काही फरक न पडल्यास १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबतची माहिती पाठवण्यास सैनी यांनी सांगितले होते. ही माहिती वेळेत पाठवली गेली नसल्याबद्दल विचारणा करत त्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवला. त्यानुसार सोमवारी रात्री सैनी यांनी पाटील यांना निलंबित केल्याचा आदेश दिला. महसूल कर्मचाऱ्यांमधून या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, नगरपालिका विभागातील प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्याच विभागातील लिपिक गुरुप्रसाद जाधव यांना धक्काबुक्कीची घटना घडली.

२९ ला लक्षवेध दिन

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २९ जुलै रोजी लक्षवेध दिन पाळण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलींचा शाळेचा प्रवास सुकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळेला जायचे तर घरापासून शाळेची चार ते पाच किलोमीटरची वाट तुडवावी लागते. मुसळधार पावसात तर कधी रणरणत्या उन्हात, गारठून टाकणाऱ्या थंडीत शाळा गाठताना त्रास होतो. शाळा लांब म्हणून शाळेला जाण्यावरच बंधने येतात. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणात खो आणणाऱ्या अनेक कारणांपैकी एक असते ते घर ते शाळेचे लांब असलेले अंतर. पण वूमेन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेलफेअर फाउंडेशनतर्फे राबवण्यात आलेल्या सायकलदान उपक्रमामुळे हा प्रवास सुकर होणार आहे. फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील ३०० गरीब आणि अनाथ मुलींना सायकल देण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात पन्हाळा तालुक्यातील आंबवडे आणि बांबरवाडी येथील मुलींपासून करण्यात आली आहे. फाउंडेशनने यासाठी बँक ऑफ बडोदा मदत घेतली असून पहिल्या टप्प्यात आंबेवाडी आणि बांबरवाडीत सायकल देण्यात आल्या.

यामध्ये वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि परिस्थिती जेमतेम असलेल्या मुलींना सायकल देण्यात आली. बँक ऑफ बडोदाचे गोवा व महाराष्ट्र रिजनचे उपमहाप्रबंधक एस. आर. सामंत, मुख्य प्रबंधक राजन तिरकी, सहाय्यक महाप्रबंधक एस. आर्या, प्रकाश जुबाले, सचिन ठाकूर, आशीष बन्सल आदी उपस्थित होते.

शाळेची वाट जर जास्त अंतराची असेल तर मुलींचे पायी शाळेत जाणे हे पालकांच्या चिंतेचे कारण असते. मुलींना सुरक्षित शाळेत जाता यावे आणि त्यांचे घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा रस्ता सोपा व्हावा हा या उपक्रमामागील हेतू आहे.

- प्रशांत कुलकर्णी, अध्यक्ष, वूमेन्स फाउंडेशन

मी ९वीत शिकते. माझ्या घरापासून शाळेचे अंतर ४ किलोमीटर आहे. अनेकदा शाळेत पोहोचायला उशीर होतो आणि घरी यायलाही वेळ लागतो. गैरसोयीमुळे माझे शिक्षण थांबेल की काय अशी भीती वाटत असतानाच ही सायकल मिळाली.

- शुभांगी चव्हाण, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात डेंगीसदृश्य बारा रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात डेंगीसदृश्य बारा रुग्ण आढळले आहेत. शहरातील मध्यवस्तीसह उपनगरातील रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. बारापैकी दोन रूग्ण डेंगी बा​धित आहेत. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेचा आरोग्य विभागाकडून अद्याप म्हणावी तशी स्वच्छता मोहिम राबविल्याचे आढळत नाही.

शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली, नागाळा पार्क, स्वामी समर्थनगर, सदरबाझार, कळंबा अशा विविध भागात डेंगीसदृश्य आजाराचे रूग्ण आढळले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जून महिन्यात सात रुग्ण डेंगी सदृश्य आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यांच्यापैकी दोन रूग्णांना डेंगी झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जूनपाठोपाठ जुलै महिन्यातही पाच रुग्ण आढळल्याने या आजाराची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन काही रूग्ण घरी परतले आहेत. नगरसेवक शारंगधर देशमुख यांनीही आरोग्याच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. शहरात का​विळीचे रूग्ण वाढत आहेत. पाणी पुरवठा व आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना केली आहे.

कोल्हापूर जनशक्तीचे आज आंदोलन

हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होऊ लागली आहे. शहरांमध्ये डेंगी, मलेरिया व काविळीचे रुग्ण आढळत आहेत. शहरातील भरलेले कोंडाळे, साचलेल्या गटारी यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर जनशक्तीचे समीर नदाफ यांनी दिली आहे.

शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. डेंगी होण्यास कारणीभूत असणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात औषध फवारणीची मोहिम राबविली जाणार आहे. सुदैवाने मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो यासारख्या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या नोंदी नाहीत. स्वच्छतेला प्राधान्य देताना खबरदारी म्हणून टायर जप्तीची मोहिम राबवली जाणार आहे.

- दिलीप पाटील, आरोग्याधिकारी, महापालिका

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

पाणी उकळून प्यावे

घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.

जुन्या टायरी साठवू नयेत.

डासांची निर्मितीची ठिकाणे नष्ट करावीत.

खिडक्याभोवती डासप्रतिबंधक जाळी बसवावी

पाण्याची भांडी व्यवस्थित ठेवून त्यावर झाकणे बसवावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅपवरून वेश्या व्यवसायप्रकरणी कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्हॉट्सअॅपवरून गिऱ्हाईकांना मुलींचे फोटो दाखवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या साने गुरूजी महादेवनगरजवळील सर्व्हे कॉलनीतील बंगल्यावर अनैतिक मानवी व्यापार कक्षाने छापा टाकून तिघांना अटक केली. सोमवारी रात्री बारा वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी वेश्या अड्डा चालवणाऱ्या स्वाती विनोद केसरकर (वय ३५, रा. सर्व्हे कॉलनी), अमर सुरेश महापुरे (३७, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) आणि गिऱ्हाईक शशांक सुजित पवार (२९, रा. वरुणतीर्थ वेश, शिवाजी पेठ) या तिघांना अटक केली आहे.

अनैतिक मानवी व्यापार कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांना साने गुरुजी वसाहत परिसरात एका बंगल्यात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या सहाय्याने त्यांनी छापा टाकला. यावेळी स्वाती केसरकर, अमर शहापुरे व शंशाक पवार यांना ताब्यात घेतले. बंगल्यातून तीन मोबाइल जप्त केले. गुजरात आणि मिरजेतील दोन पीडित महिलांनाही ताब्यात घेतले. स्वाती केसरकर व अमर महापुरे हे कोल्हापुरातील गिऱ्हाईकांना व्हाट्सअॅपसवर वेश्यांचे फोटो पाठवून गिऱ्हाईक ठरवत होते. संबधित वेश्यांना गुजरात, मुंबईमार्गे कोल्हापुरात आणले जात होते. त्यानंतर गिऱ्हाईकांना बंगल्यात बोलावले जात असे. दर आठवड्याला मुली बदलत असत, अशी माहिती तपासात उघड झाली. अटक केलेल्या स्वाती केसरकरचा पती विनोद याचा दहा वर्षापूर्वी लक्षतीर्थ वसाहत येथे खून झाला होता.

नगरसेवकाचा कॉल

पोलिसांनी बंगल्यातून तीन मोबाइल जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलचे कॉल्स, व्हाट्सअॅप मेसेज तपासले जात आहेत. एका नगरसेवकानेही कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडवली करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

युतीच्या उमेदवाराची प्रत्येक प्रचारावेळी अडवणूक करायची आणि नंतर मांडवली करून प्रचार करायचा अशी कार्यपद्धती असलेल्या आणि 'खोबरं तिकडे चांगभलं' करणाऱ्यांना इतरांवर टिकेचा नैतिक अधिकार नाही असा टोला शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी लगावला आहे. 'शिवसनेने लक्ष अभियानांतर्गत महापालिकेवर भगवा फडकावण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार झालेल्या मेळावे, बैठकांबाबत टिका करणाऱ्या भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई यांनी पहिल्यांदा स्वतःचा इतिहास तपासावा. कोल्हापूर भाजप म्हणजे लाटेवरचे ओंडके आहे' अशी टीका प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, आरोप करणाऱ्यांनी हिंदू एकता संघटनेच्या अॅम्ब्युलन्सचा हिशेब, महायज्ञ व मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनाला विरोध केला होता. प्रा. विजय कुलकर्णी यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकावर टीका करण्याचा त्यांना अधिक नाही. ज्यांना महापालिका निवडणुकीत दीडशेचा आकडा पार करता आला नाही, डिपॉझिट जप्त झालेल्यांनी स्वबळाची भाषा करणे हास्यास्पद आहे. कुलकर्णी भेकड नसून कट्टर हिंदूत्त्ववादी असल्याचे भान ठेवावे. भाजपच्या चिक्की, बोगस पदवी, दोन बायका अशा भानगडींमुळे महापालिका किंवा चुकून विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर जनता लाटेवरच्या ओंडक्यांना ४० हजार मते द्यायची की त्यांचे डिपॉझिट जप्त करायचे हे जनता ठरवेल. दुधात मिठाच्या खड्याची भाषा करणारे लोकसभेवेळी प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात कोठे होते ? कोणाच्या साटे-लोट्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली नाही याचे उत्तर द्यावे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी स्वबळाची भाषा केल्यावरच सेनेने त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले. अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची धमक शिवसेनेत आहे. भाजप कुणाची बेडकुळी फुगवून ताकद दाखवत आहे हे आम्हाला माहित आहे.

पैसा, तिकिटाचे आमिष का दाखवता ?

'उमेदवार मिळत नाहीत म्हणून आयते उमेदवार शोधण्यासाठी शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांना भेटून पैसा, विकासकामांसाठी निधी, जिल्हा कमिटी, तिकिटाचे आमिष दाखविले जात आहे. आम्ही मयत, जावळ, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला नक्कीच जातो. पण निवडणुका जवळ आल्या म्हणून जात नाही किंवा तिथे उमेदवार जाहीर करत नाही असे उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चे प्रवेश दहा टक्क्यांवरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुर्बल आणि वंचित कुटुंबातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक आणि पहिलीत प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला खासगी संस्थांकडून यंदा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या फेरीत शहरात केवळ साडेनऊ टक्के प्रवेश झाले आहेत. शहरातील ४० शाळांत ८१९ प्रवेश क्षमतेपैकी केवळ ७९ प्रवेशच झाले आहेत.

बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) नुसार दुर्बल आणि वंचित बालकांना प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. त्यानुसार १६ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सोलापूर आणि पुणे येथील काही खासगी संस्थाचालकांनी या प्रक्रियेला विरोध करुन कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली. आरटीईचे प्रवेश नर्सरी की पहिलीत द्यायचे यावरून वादंग माजले. अखेर शाळेतील एंट्री पॉइंटनुसार नर्सरी किंवा पहिलीत ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे ठरले. १५ जुलै रोजी कोर्टाच्या सुनावणीत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. या प्रक्रियेत पहिल्या फेरीत केवळ साडेनऊ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळ निविदा मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने नर्सरी बाग येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाख रुपयांची कामे होणार आहेत. या संदर्भातील निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

स्थायी समिती सभापती फरास हे त्यांच्या सभापतिपदाच्या कालावधीत या कामाची सुरूवात करण्यासाठी आग्रही आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत शाहू समाधी स्थळ विकसित करण्याबाबतची ठेकेदार बी.के. पाटील यांची ४.५० टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुधारणासाठी महापालिकेच्या फंडातून एक कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रकही मंजूर केले. महापालिकेच्या उद्यानात खेळणी बसविण्यासाठी रणजित घोरपडे यांची २२.०३ टक्के कमी दराची निविदा मान्य झाली. फेअरडील कंपनीच्या लवादाकडील कायदेशीर कामासाठीची वकील फी देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. हे पाचही विषय ऐनवेळी मांडले होते. नगरसेविका दीपाली ढोणुक्षे यांनी शिवाजी विद्यापीठ प्रभागातील अनधिकृत बांधकाम व टॉवर सील करण्याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यावर प्रशासनाने संबंधितांना नोटीस लागू केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. एनसीसी भवन येथील सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी रस्ता, ड्रेनेज लाइन नियमानुसार नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणले.राजेंद्रनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील बंद विद्युत दिव्यांच्या प्रश्नाकडे जयश्री साबळे, इंद्रजित बोंद्रे यांनी लक्ष वेधले.

नेचर अॅड नीड कंपनीचा जैव वैद्यकीय कचऱ्याचा ठेका २०१३ मध्ये रद्द करण्यात आला आहे. परंतु आजअखेर संबंधित ठेकेदार महापालिकेच्या जागेत काम करत आहे. ठेकेदाराने अनधिकृतपणे दहा हजार चौरस फूट जागेवर सिटी सर्व्हे ऑफीसला स्वतःचे नाव लावले आहे. सिटी सर्व्हे ऑफीसने महापालिकेला कळवूनही अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. ठेका संपूनही गेली दोन वर्षे ठेकेदार अनधिकृतपणे महापालिकेची जागा वापरत आहे. ठेकेदार शहरातील हॉस्पिटलकडून आगाऊ पैसे वसूल करत आहे. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व संबंधित ठेकेदारावर तातडीने फौजदारी करावी, अशी मागणी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी केली. नेचर अँड नीडच्या कामकाज पद्धतीवरून बैठकीत जोरदार चर्चा झाली. नगरसेवकांचा आक्रमकपणा पाहून प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याची ग्वाही दिली. जैव वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी नवीन कंपनी नेमल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फरासांचा राजीनामा शुक्रवारी

स्थायी समिती सभापती आदिल फरास हे शुक्रवारी (ता.२४) सभापतिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यावरून गेले काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू होती. शाहू समाधी स्थळ, कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारक, वॉटर एटीएमच्या केंद्राचे उद्घाटनची कामे शुक्रवारी सकाळी होणार आहेत. सायंकाळी सभा​पतिपदाचा राजीनामा देणार असल्याचे फरास यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातन ठेवा जपण्यासाठी...

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला गुरुवारपासून (२३ जुलै) सुरुवात होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्रीय पुरातत्व विभाग करणार आहे. या प्रक्रियेमध्ये मूर्तीमध्ये रासायनिक द्रव्य मूर्तीत सोडले जाणार आहे. सहा ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रक्रियेदरम्यान मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उत्सवमूर्ती दर्शनासाठी खुली राहील.

अशी होणार प्रक्रिया

अंबाबाईच्या मूर्तीवर यापूर्वी प्रस्तावित असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या वज्रलेपापेक्षा केमिकल कॉन्झर्वेशन ही प्रक्रिया अचूक आणि शास्त्रीय असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वज्रलेप प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यापासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील अभिषेक बंद करण्यात आले आहेत. तरीही नैसर्गिकपणे मूर्तीची झीज होत असल्याने मूर्तीचे संवर्धन करणे आवश्यक होते. मूर्ती संवर्धनाच्या या नव्या प्रक्रियेत रासायनिक द्रव्य मूर्तीवर लेप स्वरूपात न लावता ते सच्छिद्र भागांमध्ये इंजेक्शनद्वारे सोडले जाते. त्यातून मूर्तीचा अंर्तभाग भक्कम होतो. वरील बाजूने कोणताही रासायनिक द्रव्याचा लेप न लावल्याने मूर्तीचे बाह्यसौंदर्यही लोप पावत नाही.

या रासायनिक संवर्धनाचा खर्च देवस्थान समितीने केला आहे. संवर्धन प्रक्रियेदरम्यान हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे ​विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. गाभाऱ्यातील मूळ मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू असताना उत्सव मूर्तीवर नित्योपचार सुरू राहतील. रासायनिक संवर्धन प्रक्रिया राज्य पुरातत्व विभाग करेल. त्यावर केंद्रीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याची रचना केली आहे.

वज्रलेपाचा वाद

अंबाबाई मूर्तीला वज्रलेप करावा या देवस्थान समितीच्या निर्णयाला सन २००० मध्ये श्रीपूजकांनी न्यायालयात जाऊन विरोध केला. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या वज्रलेप समितीने घेतलेल्या निर्णयाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची सहमती होतील. मात्र या निर्णयाला भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू यांच्या अहवालाचा आधार घेऊन आक्षेप घेऊन श्रीपूजकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. इर्डियॉस (इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओरिएंटल स्टडीज) या संस्थेच्या अहवालात १९५५ साली मूर्तीवरील वज्रलेपामुळे मूर्ती खराब झाली असू पुन्हा वज्रलेप करू नये असे नोंदविण्यात आले होते.

सन २००२ च्या दरम्यान राज्य सरकारने एक अध्यादेश काढला की, मूर्तीवर वज्रलेप करायचा की नाही याबाबची मते जाणून घेण्यासाठी एक समिती नेमली जावी. पुरातत्व विभागानेही मूर्तीला वज्रलेप पेलणार नसल्याचा अहवाल १२ जून २०१४ रोजी दिला.

त्यावर उपाय म्हणून केमिकल कॉन्झर्व्हेशनची सूचना केली. अशा पद्धतीने तुळजापूर आणि पंढरपूर येथील मूर्तीही संरक्षित केली गेली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाने सर्वेक्षणाअंती हेच स्पष्ट केले होते.

काय म्हणतात तज्ज्ञ

वज्रलेप प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आणि नंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महाराष्ट्रातील मुख्यालय असलेल्या औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली केली. राज्य पुरातत्व विभागातील अधीक्षक व रसायनशास्त्रज्ञ एम. आर. सिंह, विभाग अधीक्षक डॉ. विनोदकुमार, राज्य पुरातत्त्व खात्याचे अधिकारी विलास वहाने यांच्या नेतृत्वाखाली मूर्तीच्या सद्यःस्थितीची पाहणी केली होती. मूर्तीची जुनी छायाचित्रे घेऊन पूर्वीच्या वज्रलेपाचेही नमुने घेतले होते. मूर्तीचे कान, हातावरील काही भागांची झीज झाली असली तरी रासायनिक प्रक्रियेसाठी मूर्तीची स्थिती योग्य आहे असल्याचे यात दिसून आले. आताच्या प्रक्रियेचा मूर्तीवर विपरीत परिणाम होणार नाही.

दृष्टिक्षेपात मूर्तीची झीज

मूळ मूर्तीवर अभिषेक करणे १९९७ सालापासून बंद

तेव्हापासून घंटा चौकात उत्सवमूर्तीवरच अभिषेक

वज्रलेपाच्या वादातील कालापव्ययामुळे अंबाबाई मूर्तीची झीज

२००५ साली मूर्तीच्या कपाळावर नागाचा फणा दिसत होता

नंतरच्या पाच वर्षांत हा फणा पुसट होत गेला

मूळ मूर्तीवर अभिषेक व कुंकूमार्जन १८ वर्षांपूर्वी बंद करूनही झीज वाढली

महाद्वारावर बांधले २२ फुटांचे तोरण

अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनासाठी मंदिरात मंगळवारी धार्मिक विधींना प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त कोल्हापूरचे व्यापारी रमेश माळकर यांनी महाद्वार प्रवेशद्वाराच्या कमानीला २२ फुटांचे तोरण बांधले. प्लायवूडवर गणपतीची प्रतिकृती आणि ११ नारळ लावण्यात आले आहेत. बुधवारपासून धार्मिक विधी प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता महापूजा होणार आहे.

३०० वर्षापूर्वी अंबाबाई मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली. तत्पूर्वी कित्येक वर्षे आधी ही मूर्ती घडवली गेली आहे. पुढच्या पिढीसाठी मूर्ती सुस्थितीत ठेवायची असेल तर ती आतूनही कणखर बनवण्याची गरज आहे. कोणत्याही मूर्तीचे वैशिष्ट्य हे सुबकतेवर अवलंबून असते. झीज झाल्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे सौंदर्यही लोप पावत आहे. त्यामुळे धार्मिक भावना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा आयाम जुळून येणाऱ्या रासायनिक संवर्धनाचा पर्याय भाविकांनीही स्वीकारला पाहिजे.

-योगेश प्रभुदेसाई, मूर्ती अभ्यासक

अंबाबाई मूर्तीची झीजल्याने वज्रलेप सहन करू शकणार नव्हती. मात्र, देवस्थान समितीने हे लक्षात न घेतल्याने श्रीपूजकांनी न्यायालयाचे दार ठोठावले. दोन तपांनंतर मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक संवर्धनाचा योग्य पर्याय सापडला आहे. मूर्ती संवर्धनासाठी तो अत्यंत निर्णायक ठरेल.

-माधव मुनीश्वर, श्रीपूजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगेच्या पातळीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरला आहे. मंगळवारी दुपारनंतर शहर परिसरात काही जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे मात्र पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत असून इचलकरंजी व रुई बंधारे पाण्याखाली गेले. पाणीपातळी वाढत राहिली तर कसबा बावडा येथील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत हातकणंगले वगळता सर्व तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे, पण त्याचे प्रमाण कमी-अधिक आहे. गेल्या आठवड्यापासून रिमझिम सरी पडत होत्या. त्यामध्ये जोर नव्हता. पण शहर परिसरात मंगळवारी दुपारनंतर काही जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या अन्य भागाप्रमाणेच शहर परिसरातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे दुचाकीधारकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसांमुळे बऱ्याच दिवसांनंतर रस्त्यावर पाण्याची डबकी साठलेली पहायला मिळाली.

त्याचवेळी जिल्ह्यातील सर्वांत जास्त पाऊस गगनबावडा तालुक्यात पडत आहे. गेल्या २४ तासात तिथे ३९ मिलीमीटर पाऊस झाला. यासह इतर तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळीही वाढून मंगळवारी रात्री १३ फूट २ इंचावर पोहचली आहे. यामुळे इचलकरंजी व रुई बंधारे पाण्याखाली गेले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. वारणा तसेच जांबरे प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. अन्य सात धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. चित्री, चिकोत्रा व दूधगंगा धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्याजवळ आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई दर्शन उद्यापासून बंद

$
0
0

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर गुरुवारपासून (२३ जुलै) होणाऱ्या रासा​यनिक संवर्धन प्रक्रियादरम्यान दर्शन बंद राहणार आहे. दरम्यान, उत्सवमूर्तीचे दर्शन सुरू राहणार असून, संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑगस्टला दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे.

अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. १५ दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सध्या पर्यटक भाविकांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात अधिक आषाढ महिना असल्याने भाविकांची संख्या जास्त होती. त्यामुळे संवर्धनप्रक्रियेसाठी महिना संपण्याची प्रतीक्षा करण्यात आली होती. १५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. पर्यटक भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये तिसऱ्या दिवशीही तणाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

शहरात उडालेला टोळीयुद्धाचा भडका व त्यातून झालेल्या दुहेरी खूनप्रकरणी शहर पोलिसांनी बबलू माने व बाबर खान यांच्या टोळ्यांशी संबंधित सुमारे ३५ ते ४० जणांकडे कसून चौकशी सुरू ठेवली आहे. अद्याप कोणालाच या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली नाही. मात्र, या चौकशीतून सद्य:स्थितीत दोघांत असलेले पूर्ववैमनस्य हेच खूनाचे प्रमुख कारण असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून मिळत आहे. मात्र सखोल तपासांती ठोस संशयित निष्पन्न झाल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण पुढे येईल आणि गुन्ह्याची उकल होईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

टोळी युद्धातून झालेल्या या दुहेरी खूनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे रात्री दहानंतर शहरातील रस्त्यावर स्मशान शांतता पसरते. तणावाच्या वातावरणातही शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहिली आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विशेषत: मुलींनी शाळा, कॉलेजसाठी शहरात येण्याचे टाळले होते.

यापूर्वीही अनेकदा बाचाबाची

उमेश माने व सल्या चेप्या टोळीचा गुंड बाबर खान या दोघांत यापूर्वी प्रत्यक्ष हाणामारी झालेली नसली तरीही सल्या चेप्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटात उमेश माने संशयित होता. यावरून सल्या चेप्या टोळीशी संबंधित गुंडांमध्ये व उमेश माने याच्याशी संबंधित अशा दोघा सर्मथकांत अधूनमधून बाचाबाचीचे प्रकार घडत होते.

शस्त्र तस्करी रोखण्याचे आव्हान

कराड शहरात अनेक घटनांमध्ये घातक शस्त्रांचा त्यातही पिस्तुलाचा तसेच गावठी कट्ट्यांचा वापर वाढत चालला आहे. संजय पाटील यांच्या खुनाच्या गुन्ह्यात हल्लेखोरांकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली होती. सल्या चेप्यावर झालेल्या हल्ल्यानंतरही सल्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांकडून तीन रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली होती. या शिवाय शहर पोलिसांनी वेळोवेळी पिस्तूले व रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे जप्त केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात धार्मिक विधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या धार्मिकविधींना बुधवारपासून मंगलमय वातावरणात सुरूवात झाली. करवीर संस्थानचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्याहस्ते अंबाबाईची महापूजा करण्यात आली. मंदिराच्या आवारातील कारंजा चौकात उभारण्यात आलेल्या यज्ञमंडपात सकाळी सात वाजल्यापासून आजच्या दिवसातील मुख्य विधी असलेला श्रीकर नारायण विधानाने विधींना सुरूवात करण्यात आली. ६ ऑगस्टपर्यंत हे धार्मिक विधी सुरू राहणार आहेत.

या यज्ञमंडपात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळी अकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. धार्मिकविधीचे मुख्य आचार्य सुहास जोशी आणि श्रीपूजक संजीव मुनीश्वर यांच्या पौरोहित्याखाली छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्याहस्ते देवीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर यज्ञमंडपातील देवीच्या उत्सवमूर्तीची आरती करण्यात आली.

मूर्ती रासायनिक संवर्धनाची प्रक्रियेच्या संकल्पासाठी शेखर मुनीश्वर यांनी सपत्नीक पुण्यवचन विधी केला. त्यानंतर मुख्य यज्ञमंडपात स्थानशुद्धीसाठी उदकशांती विधी करण्यात आला.

श्रीकर नारायण विधानाचे यजमानपद माधव व मृणाल मुनीश्वर यांनी भूषविले. तसेच देवी भागवत संहिता पारायण शुभारंभही झाला. धारवाडचे पंडित राजेश्वरशास्त्री जोशी, औंदुबरचे पंडित वेंकटरमणशास्त्री दीक्षित उपस्थित होते. अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर, केदार मुनीश्वर, आदींनी संयोजन केले.

दर्शन बंद राहणार

संवर्धन प्रक्रियेला स्थगिती आली असली तरी यज्ञमंडतातील धार्मिक विधी सुरूच राहणार असल्याचे हक्कदार श्रीपूजक संघाने स्पष्ट केले. तर पूर्वनियोजनानुसार गुरूवारी सकाळी दहानंतर अंबाबाईचे दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. यज्ञमंडपातील उत्सवमूर्तीचे दर्शन खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जैवविविधते’तून रोजगार

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

शोभेच्या झाडांच्या नावाखाली परदेशी (तण) वाढवण्याची स्पर्धा सुरू झालेली असल्यामुळे स्थानिक पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञांची कमतरता जाणवत असून जैवविविधतेबाबत मार्गदर्शन करुन ती टिकवण्यासाठी गेल्यावर्षीपासून येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजने जैवविविधता संवर्धनाचा करिअर ओरिएंटेड कोर्स सुरू केला आहे. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात स्थानिक नागरिकांसह त्या-त्या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

सह्याद्रीच्या पट्ट्यात परदेशी वनस्पतींपेक्षा सुंदर आणि औषधी वनस्पती आहेत. मात्र अशा जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी वनखात्याकडे तज्ज्ञ लोकांची वाणवा आहे. त्यामुळे निलगिरी, आकेशिया, उंदीरमाशी (गिरीपुष्प) अशा निरुपयोगी आणि स्थानिक जैवविविधतेला बाधा आणणाऱ्या वृक्षांची लागण मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र यामुळे जैवविविधतेचे महत्त्व कमी केले जात आहे. औषधी वनस्पती, फळझाडे, वेली, गवत, शेवाळ, बुरशी अशा जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या वनस्पतींची माहिती अभ्यासक्रमात दिली जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये जैवविविधता नष्ट न करता अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देता येणार आहे.

अभ्यासक्रमांमध्ये नर्सरी, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस, झाडांची कलमे करणे, टिश्यू क्लचर आणि जंगली झाडांचे पुनरुत्पादन करणे आदी विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रम त्या-त्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाबरोबर जंगली वृक्षांची माहिती स्थानिक धनगर व रहिवाश्यांकडून घेतली जाणार आहे.

पहिल्या वर्षी प्रमाणपत्र मिळवलेल्या टिश्चू क्लचरचे तत्रंज्ञान अवगत करुन त्यांना मासिक २० ते २५ हजरांचे उत्पन्न सुरू झाले आहे. तीन वर्षाची पदवी प्राप्त झाल्यानंतर नर्सरी किंवा हायटेक नर्सरी काढण्याची संधी प्राप्त होऊ शकते. हायटेक नर्सरीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून २५ लाखांपर्यंतचे अनुदान मिळण्याची तरतूद आहे. कॉलेजने घेतलेल्या सुरू केलेल्या अभ्यासक्रमामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जतन करण्यास मोठी मदत मिळणार आहे.

अशी असेल पदवी

तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी डिप्लोमा प्रमाणपत्र व तिसऱ्या वर्षअखेरीस अॅडव्हान्स डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल. तीन प्रमाणपत्राची पात्रता पदवी परीक्षेस समकक्ष ठरेल. याच्या अधारे त्यांना नर्सरी, पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस, विविध कलमे करणे व टिश्यू क्लचर रोपवाटिका उभारण्यासाठी शासनमान्यता मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images