Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहकार संपविलेल्या राष्ट्रवादीला संपवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

सहकार संपविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे पापाचे पाय घेऊन श्रावणबाळ झालेल्या आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्या बगलबच्च्यांना जागा दाखवा. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण स्थानिक स्वराज संस्था पूर्ण ताकतीने लढवा. यातील पहिला टप्पा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उभारलेल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी केले.

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, स्वाभिमानी व मित्रपक्षाच्या 'शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी'चा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. नगरपालिकेच्या शाहू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाप्रमुख देवणे म्हणाले, बाजार समिती वाटून खाणारे गटतट निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांनी उमेदवारी वाटून घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही भ्रष्टाचाराविरोधात पॅनेल उभे केले. हि निवडणूक आपल्याला जिंकायचीच असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढा व सभासदांना आपली भूमिका पटवून द्या. आपल्याला विजय मातोश्रीपर्यंत घेऊन जायचा आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत.

मुरलीधर जाधव म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केले जाते. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव समितीमार्फत दिला जातो. मात्र निवडणुकीच्या माध्यमातून सर्व सहकारी संस्था मोडीत काढणाऱ्यांच्या हातात संस्था ठेवायच्या प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व सहकारी संस्था, भू-विकास बँक बंद पडणारे केवळ भूखंडांचे वाटप करण्यासाठीच एकत्र आलेत. त्याला विरोध म्हणून शिवसेनेने पॅनेल करण्याचे निश्चित केले.

यावेळी माजी आमदार घाटगे, जिल्हाप्रमुख संजय पवार, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्याण्णावर , सुभाष शिरकोळे, बी. एम. पाटील, तानाजी देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा.सुनील शिंत्रे यांनी स्वागत केले. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी सूत्रसंचालन तर सूर्यकांत देसाई यांनी आभार मानले.

आता तुमची बारी आली...

आली रे आली.. आता मुश्रीफ तुमची बारी आली... असे म्हणत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले संग्राम कुपेकर यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचेवर थेट हल्ला केला. राष्ट्रवादीने तालुक्यातील तालुका संघ, बाजार समिती, कुकुटपालन संस्था, भू-विकास बँक, सुतगिरणीसह सर्व सहकार भ्रष्टाचार करून संपविला आहे. गडहिंग्लजचा एक कारखाना तुम्ही संपवला आहात. पण लक्षात ठेवा आम्ही दुसरा कारखाना काढू, असे आव्हानही दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्रकार साईनाथ जाधव यांना मारहाणप्रकरणी सहाजण अटकेत

$
0
0

इचलकरंजी : पत्रकार साईनाथ जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारीनुसार सहाजणांना रविवारी अटक केली. अशपाक युनूस मुजावर (वय २२ रा. कोलेमळा), रियाज शहानूर जमादार (वय ३६, रा. साईनगर), महंमदअली शहाबुद्दीन सनदी (वय २८), हुसेन मेहबुब शेख (वय ३०, रा. हनुमाननगर), सैफअली आयुब मोमीन (रा. रोशन मशिदजवळ) आणि इम्रान महंमद शेख (रा. कोलेमळा) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. शुक्रवारी वृत्तांकन करण्यासाठी गेले असताना जाधव यांना मारहाण करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिनोळी येथे अपघातात बाप व लेकीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

बेळगाव-वेगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीजवळ मोटरसायकल व ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात बाप व लेक जागीच ठार झाले. अशोक यशवंत टक्केकर (वय ५३, रा. यशवंतगनर, ता. चंदगड) व मुलगी पुजा सुनील दळवी (वय २२, रा. म्हाऴेवाडी, ता. चंदगड) या दोघांचा अपघाती मृत्यू झाला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

मयत टक्केकर यांची पत्नीवर बेळगाव येथील खासगी रुग्णांलयात उपचार सुरु होते. त्याचा आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना आणण्यासाठी टक्केकर मुलीसह गेले होते. पत्नीला चारचाकी वाहनातून घरी पाठवून ते स्वतः व मुलगी पुजा स्लेंडर मोटरसायकलने घरी येत होते. शिनोळी औद्योगिक वसाहतीजवळ आले असता स्क्रॅपने भरेलल्या ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकल ट्रकच्या मागील चाकात अडकली. त्यामुळे दोघेही जमिनीवर जोरात आदळले. यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने केएलई रुग्णांलयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

पूजाचे दोन वर्षापूर्वी म्हाळेवाडी येथील सुनिल दळवी यांच्याशी विवाह झाला होता. पूजाचा पती सुनील अॅटलास कंपनीमध्ये नोकरीला आहे. मयत अशोक यांच्या पश्चात आई, दोन मुली, एक भाऊ तर पुजा हिच्या पश्चात पती, सासू, सासरे, मुलगा असा परिवार आहे. ‌िशनोळी येथे रस्त्याची प्रंचड दुरवस्था झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत हा अपघात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’बाबत आज होणार निर्णय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

आजपर्यंत चंदगडच्या जनतेचा विचार करूनच दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत कोणताही कटू निर्णय घेतला नाही. मात्र आता निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा जिल्हा बँक अडचणीत येईल, त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. यावेळी माजी आमदार नर‌सिंग पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, दौलत सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेकडे तारण आहे. तो चालविण्यासाठी दोन निविदा आल्या असून उद्या त्या कार्यकारी मंडळासमोर फोडण्यात येतील. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही कठोर निर्णय घेतला नाही. मात्र उद्या निविदा उघडल्यानंतर ती बँकेच्या दृष्टीने फायद्याची असली तरच मंजुरी दिली जाईल. अन्यथा अन्य पर्यायांचा विचार केला जाईल. मात्र याबाबत आजच्या बैठकीनंतरच निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुश्रीफ म्हणाले, तसेच निविदा मंजूर झालेल्या संस्थेला कारखाना सुरु करण्यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करावे. कारण गेली चार वर्ष बंद असल्याकारणाने तो चालवायला घेण्यास संबधित घाबरत आहेत. मशिनरी गंजली असून काही मशीन्स चोरीला गेल्या आहेत. या कारखान्यावर नेमके किती कर्ज आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

माजी रोहयो मंत्री भरमू पाटील यांनी तोच धागा पकडत कारखान्यावर नेमके किती कर्ज आहे याबाबत विचारणा केली. त्यावेळी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी २६० कोटींचे कर्ज असल्याचे कबूल केला. तसेच बँकेचे ६१ कोटींचे कर्ज फेडण्यासाठी हप्ते पडून द्यावेत, असे सुचविली. यावेळी सभासद प्रतिनिधी विजय पाटील यांनी आम्हाला एक महिन्यांची मुदत द्या. या महिन्यात ५० कोटींच्या ठेवी गोळा करू असे सुचविले. त्याला कामगार प्रतिनिधी अनंत पाटील यांच्यासह उपस्थितांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा विषय हमरीतुमरी पर्यंत पोहचला. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनींसाठी जीवावर उदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेली शाहूवाडी तालुक्यातली उखळूपैकी अंबाईवाडी ही गावे नैसर्गिकरीत्या डेंजर झोनमध्ये आलेली आहेत. उखळू, अंबाईवाडी, भिसेवाडी हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कडेला येतो. येथील लोकांचे पुनर्वसनाचे घोडे पुढे न गेल्याने गेल्या वीस वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. जमिनी मिळत नसल्याने काळासारखा डोंगर पाठीशी घेऊन येथील लोक गावातच राहण्याचा हट्ट करत आहेत. प्रशासनाने गावाची पाहणी करून तत्काळ गाव खाली करावा अशा नोटिसा बजावल्या आहेत.

गतवर्षी घडलेल्या माळीणसारखी दुर्घटना होऊ नये.येथून हलायचे असेल तर आधी जमिनी द्या मग पुनर्वसन करा, अशी भूमिका अंबाईवाडीतल्या लोकांनी घेतली आहे. त्यांनी वारूळ, जाखले, पोखले, आळते या भागात जमिनींची मागणी केली आहे. पुनर्वसनातून जमिनीचे निश्चितीकरण झाले तरी हा पावसाळा तरी येथेच काढावा लागणार आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगात सर्वाधिक पावसाचे आगर असलेल्या उखळू गावाच्या वरच्या टोकाला चांदोली अभयारण्याच्यालगत अंबाईवाडी, धनगरवाडा, खोतवाडी व भिसेवाडी अशा कमी लोकवस्तीच्या छोट्या छोट्या वाड्यावस्त्या आहेत. या वाड्यावस्त्यांच्या वरच्या बाजूला डोंगराच्या उंच कडा आणि मोठमोठाले दगड आहेत.

चांदोली अभयारण्याच्या फुटाच्या अंतरावर अंबाईवाडी आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे इथल्या लोकांना जंगली श्वापदांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो आहेच शिवाय या वाडीतल्या खोतवाडी वस्तीमधील पाच ते सात घरे सध्या पूर्ण धोकादायक स्थितीत आहेत. येथील घरांच्या वरच्या बाजूस मोठमोठाले दगड आहेत. काही दगड मातीला चिकटून आहेत तर काही उघडेच आहेत. यातला एक जरी दगड निखळून घरावर कोसळला तर अख्खे घरच उध्वस्त होऊ शकते. मुसळधार पावसामुळे दगड कधी खाली येतील याचा नेम नसल्यामुळे इथले लोक मोठ्या पावसाळ्यापुर्वीच भयभीत झाले आहेत. पावसाच्या या भागात माळीण सारखी घटना घडू शकते या भीतीने येथील लोकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

या वाडीत अद्यापही वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे रॉकेलचा दिवा, कंदील किंवा मेणबत्त्या वापरून त्यांना रात्री काढाव्या लागत आहेत. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी या वाडीला भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी केली होती. मोठ्या पावसात कोणताही धोका न पत्करता रात्रीच्या वेळी सर्वच कुटुंबांना अंबाईवाडीतल्या प्राथमिक शाळेत राहण्याच्या नोटीसाही त्यांनी संबंधित कुटुंबांना दिल्या आहेत.

जायचे तरी कुठे

धोकादायक गावांना नोटिसा देऊन प्रशासन मोकळे होते. मात्र, हक्काची जागा, शेत सोडून दुसऱ्या गावात जाऊन खायचे काय? पुढची व्यवस्था कोणती याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असतात. अशा गावांचे उन्हाळ्यातच पुनर्वसन व्हायला हवे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर सीपीआरमध्ये हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चिंचवडे (ता. करवीर) येथील शेतीच्या वादानंतर वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरच्या आवारात आलेल्या एका गटातील तरुणावर विरोधी गटाने जीवघेणा हल्ला केला. तेथील एका चहावाल्याने त्या तरुणाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, तिथे आलेल्या सीपीआरमधील सुरक्षारक्षकांनी लाठीमार करून हल्लेखोरांना पिटाळून लावले. रविवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर तिथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

चिंचवडे गावात सकाळी सावंत व मोहिते या दोन कुटुंबांमध्ये शेतीच्या जुन्या वादातून मारामारी झाली होती. दोन्ही गटांतील जखमी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देण्यास आले असता त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता सीपीआरमध्ये पाठवले होते. त्यावेळी सीपीआरमध्ये एका गटाची तपासणी केली जात असताना दुसऱ्या गटाला बाहेर थांबण्यास सांगितले होते. त्यावेळी मोहिते कुटुंबातील अंकुश दगडू मोहिते (वय ३२) तिथे आला. त्यावेळी सावंत गटाच्या मालाबाई आनंदा सावंत हिने अंकुशला संपवा, असे सांगताच या गटातील तरुणांनी त्याला पकडून प्रथम रस्त्यावर आपटले. त्यानंतर तो तसाच पडून राहिल्यानंतर त्याला तेथील चहावाला अर्जुन राणे याने हल्लोखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ला गणेश सावंत, सर्जेराव सावंत, भैरू सावंत, सागर सावंत आदींसह अन्य तरुणांनी केल्याचे अंकुश मोहितेने सांगितले.

तेथील महिलांची ओरड व धावाधाव सुरू झाल्याने सीपीआरमधील सुरक्षारक्षक घटनास्थळी धावत आले. त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही काहीकाळ जुमानले नाही. त्यामुळे रंगराव पाटील, रंगराव मोरे, आर. पी. जाधव, बसवराज चौगुले यांनी लाठीमार करत हल्लेखोरांना पिटाळून लावले. तोपर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिसही दाखल झाले. काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले, तर काहीजण पळून गेले. हल्लेखोर सावंत यांचे शहर परिसरात नातेवाईक असण्याची शक्यता आहे. चिंचवडे येथील मारामारीबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, तर सीपीआर परिसरातील हल्ल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पकड ढिली, एकसंधतेला तडा!

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

जिल्ह्याचे असो वा महापालिकेची राजकारण. राष्ट्रवादीअंतर्गत आमदार हसन मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. तिकीट वाटप, उमेदवारी निवड असो वा पदाधिकारी नियुक्ती त्यांच्या इशाऱ्यानुसार ठरायची. मात्र, गेल्या सात-आठ महिन्यांत महापालिका राजकारणात त्यांची पकड ढिली झाल्याचे जाणवत आहे. शहरातील राष्ट्रवादीत, नगरसेवकांतील एकसंधतेला तडा गेला आहे. महापालिका राजकारणात मुश्रीफांचेच 'हार्ट' समजले जाणारे राजू लाटकर आणि आदिल फरास यांच्यातील वितुष्ट हे त्याचे ताजे उदाहरण आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरू असताना राष्ट्रवादीत मात्र सत्तासंघर्ष रंगला आहे.

माजी महापौर तृप्ती माळवी यांच्यावरील लाचखोरीच्या प्रकरणानंतर पक्षाची प्रतिमा सावरेपर्यंत पुन्हा एकदा राष्ट्रवादीपुढे स्थायी समिती सभापतिपदावरून अंतर्गत संघर्ष उभा ठाकला आहे. पद न मिळाल्यामुळे नाराज नगरसेवकांची संख्या जास्त आहे. आता पक्षांर्तगत कुरबुरी वाढत आहेत. मुश्रीफ यांना जवळचे समजले जाणारे फरास आणि लाटकर हे महापालिकेतील कारभारी म्हणून ओळखले जातात. आता कारभारीच एकमेकांविरोधात कुरघोडी करत आहेत. राष्ट्रवादीतील नगरसेवकांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. पद आणि सत्तेसाठी सारे एकाच माळेचे मणी हेच दाखवून दिले.

गेल्या पाच वर्षांत काँगेस आणि राष्ट्रवादीत नेत्यांच्या मर्जीतील नगरसेवकच पदाधिकारी बनले. त्यांना महापौर, स्थायी समिती सभापती आणि सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली अशी भावना अनेकांच्या मनात बळावली आहे. काही नगरसेवक तर पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र, नेत्यांशी जवळीकतेमुळे त्यांनी सभापतीपर्यंत मजल मारली. यामुळे सीनिअर नगरसेवक दुखावले. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळचे कार्यकर्ते आज पक्षात दिसत नाहीत. पक्षाचे विविध सेल कार्यान्वित असल्याचे आढळत नाही. मंत्रिपद गेल्यामुळे मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर मर्यादा आल्या आहेत. पक्षाच्या नावावर महापालिकेत पदे भूषविणाऱ्यांचा पक्षासाठी किती उपयोग झाला, किती पक्ष वाढला? हा संशोधनाचा विषय आहे. मुळात शहरात राष्ट्रवादीची भक्कम पायाभरणी झाली नाही. शहरात राष्ट्रवादीचे २७ नगरसेवक असूनही विधानसभा निवडणुकीत पक्ष दहा हजार मते घेऊ शकत नाहीत. यावरून पक्ष एकसंध नसल्याचे स्पष्ट झाले होते.

सत्तांतरामुळे राजकीय गणिते बदलणार

पक्षवाढीला नेत्यांच्या सोयीच्या राजकारणामुळे मर्यादा पडली आहे. आज महापालिकेतील राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांना पक्षाच्या कार्याशी, तत्त्वांशी काही देणेघेणे नाही. ते मुळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत. त्यांनी सत्ता ​आणि पदासाठी राष्ट्रवादीला पसंती दिलेली. गेल्या निवडणुकीदरम्यान दोन्ही काँग्रेसची राज्यात होती. त्यांनी महापालिकेत सत्तेसाठी गोळाबेरीज करताना बहुतांश नगरसेवकांना पदाचे आमिष दाखवले. मुश्रीफ यांनी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवली. रसद आणि पदासाठी अनेकजण राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले. आता मात्र राजकीय संदर्भ बदलले आहेत. राज्यातही सत्तांतर झाले आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येत्या निवडणुकीत अनेकजण हातावर 'घड्याळ' बांधण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही मुरते निम्मे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका शहरवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी देत नाही; पण शहरवासीयांचे आरोग्य राखण्यासाठीही सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यविषयक अनेक बाबींकडे लक्ष दिले जात नसताना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यानंतरही उपसा केल्या जात असलेल्या पाण्यातील केवळ निम्म्याच पाण्याचे बि​लिंग होत असून अजूनही निम्मे पाणी कोठे जाते याचा शोध महापालिकेला लावता आलेला नाही. शहराच्या पर्यावरणाबाबतच्या सद्यःस्थितीचा अहवालात या गंभीर बाबी मांडल्या गेल्या आहेत.

पाण्यावर जादा खर्च

महापालिकेकडे ९७ हजार ५२१ पाणी कनेक्शन आहेत. त्यातील ९४ हजार ५४० कनेक्शन घरगुती आहेत. नदीमधील पाणी प्रदूषित असले तरी जलशुद्धिकरण केंद्रातून ते शुद्ध करण्याची गरज आहे. पण जलशुद्धिकरण केंद्रामध्ये तपासलेले नमुने अयोग्य दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित आहेच. शिवाय प्रक्रियेनंतरही ते अशुद्ध रहात असल्याची बाब या अहवालात मांडली आहे. यानंतर वितरण व्यवस्थेनंतर नळाला येणाऱ्या पाण्याचे नमुनेही अयोग्य असल्याचा अहवाल आहे. हा अहवाल गळतीमुळे असल्याचे महापालिकेचे मत आहे. म्हणजे शहरातील सर्व वॉर्डमधील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचेच दिसते. एकीकडे पाण्याबाबत ही स्थिती असताना त्यावरील खर्च मात्र कमी झालेला नाही. १८ कोटी ५ लाख ९४ हजारांचा खर्च अधिक वाटत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. नदीपात्रापासून वितरण व्यवस्थेपर्यंत चारवेळा वीज खर्च, त्यानंतर इमारतीतील उपसा, सांडपाणी प्रक्रियेसाठी उपसा हा सारा खर्च पर्यावरणावर परिणाम करणारा आहे.

प्रदूषणप्रश्नी उदासीनता

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध उत्सवांसाठी वापरण्यात येणाऱ्या साउंड​ ​सिस्टिमबाबत काही बंधने आहेत. पण अन्य ध्वनी तसेच वायू प्रदूषणाबाबत काहीच उपाय केलेले नाहीत. जे उद्योग, व्यवसाय ध्वनी व वायू प्रदूषण करत असतात, त्यांना त्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा बसविण्यास महापालिकेने सक्ती केली पाहिजे. शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अवजड वाहनांना शहरात आणण्याबाबत काही प्रमाणात निर्बंध घातले पाहिजे.

नवीन घरांसाठी

सोलर, छतावरील पाण्याची साठवणूक, प्रकाशाच्यादृष्टीने प्रशस्त खिडक्या या मुद्द्यांचा नवीन घरे बांधताना विचार केला पाहिजे. पूररेषेत बांधकामे करू नयेत तसेच तेथील खरेदीही करू नये यासाठी पूररेषा जाहीर केल्यास त्याची माहिती होईल. अंगणात काँक्रिटीकरण, कोबासारखे प्रकार न करता माती राहू द्यावी. बांधकामात उष्णतारोधक साहित्याचा वापर केला जावा, असे सुचवले आहे.

उद्याने व वृक्षांसाठी

वृक्षतोड होणाऱ्या ठिकाणी नवीन लागवड करण्याची आवश्यकता असून, स्मशानभूमीसाठी विशेष वृक्ष लागवडीच्यादृष्टीने महापालिकेने प्रयोग केला पाहिजे. जैवविविधता मंडळ स्थापन केले तर पर्यावरण वाचविण्याच्यादृष्टीने एक पाऊल पडेल. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी बांधकामे, उद्याने, शेती यांच्यासाठी वापरावे.

आरोग्याकडे दुर्लक्ष

पाण्यावर खर्च जास्त होत असताना आरोग्याबाबत मात्र फार लक्ष दिले जात नाही. घनकचऱ्याचे व्यवस्थापन व प्रक्रिया करण्याबाबत प्रशासन हातावर हात धरून पहात आहे. गेल्या अहवालातच जे उद्योग, व्यवसायातून कचरा निर्माण करत आहेत, त्यांना त्यावर प्रक्रिया करण्याची सक्ती करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनाअनुदानित ७८ शाळा आजपासून बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने सोमवार (ता. २०) पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील सुमारे ७८ शाळा या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. माध्यमिक शाळा बंद राहणार असल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांना अघोषित सुटीच मिळणार आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत समितीच्या झालेल्या चर्चेत या शाळांना अनुदानासाठी तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय दिला जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे विनाअनुदानित कृती समितीचे आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बेमुदत शाळा बंद आंदोलन सोमवारपासून सुरू राहणार आहे. राज्य सरकारने या मागण्यांबाबत बुधवारपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईत चक्का जाम करण्याचा इशाराही समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे. या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर कृती समितीचे १०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपोषणास बसले आहे. शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांची मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अजूनही अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान मिळालेले नसल्याने अर्थसंकल्पात तरतुदीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेविरोधी कार्यक्रमात गोंधळ, हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' रद्द करावा, या मागणीसाठी रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत खुर्च्यांची फेकाफेक, मारहाण असे प्रकार घडले. या कार्यक्रमात भाषण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली.

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित या परिषदेत आमदार आव्हाड यांचे भाषण सुरू असताना 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत 'भाषण बंद करा,' असे धमकावत 'शिवप्रतिष्ठान'चे १०-१२ कार्यकर्ते व्यासपीठावर धावले. हे लक्षात येताच परिषदेला उपस्थित असलेल्या काहींनी नाट्यगृहातील खुर्च्या त्या कार्यकर्त्यांच्या दिशेने भिरकावल्या. काहींनी व्यासपीठावर धाव घेऊन 'शिवप्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांना बदडले. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे समजल्याने शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव एकत्रित येऊन मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत सोमवारी सांगली बंदची हाक देण्यात आली. 'लोकसभेत आणि राज्यात सत्ताबदल झाला की काय होतेय, याचा हा प्रत्यय आहे. याचा वणवा मंत्रालयातील सहाव्या मजल्यापर्यंत पोहचवू,' असे आव्हाड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यापूर्वी मित्रपक्षांना साद घातली जाईल. त्यांनी योग्य प्रतिसाद दिला तर ठीक, अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहे,' अशा इशारा शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी भाजपला दिला आहे. येथील टाउन हॉलमधील दिवंगत बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी आयोजित निर्धार महापालिका मेळाव्यात ते बोलत होते.

दुधवडकर म्हणाले, 'महापालिका निवडणूक युती करून लढायची किंवा नाही याबाबत मित्र पक्षांशी जवळीक साधली जाईल, पण विधानसभेसारखी वागणूक मिळाली तर खपवून घेणार नाही. विधानसभेसाठी जिल्ह्यात मित्रपक्षांनी मोठी ताकद लावली होती. याठिकाणी सभाही घेतली होती. पण, शिवसेनेने आपली ताकद आणि जिल्ह्यावरील पकड दाखवून दिली आहे. कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांना लाल दिवा मिळावा अशी मागणी केली आहे. पण, आमदारांच्या कर्तृत्वाची पक्षीय पातळीवर दखल घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची शान राखली जाईल असाच निर्णय पक्षनेतृत्वाकडून घेतला जाईल.' ते पुढे म्हणाले, 'महापालिकेची सर्वांत मोठी जबाबदारी ही शहरप्रमुखांवर आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.'

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'कोल्हापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन जागांसह कोरगावकर, वळंजू यांनी चांगले यश मिळविले. बाजार समितीप्रमाणेच महापालिकेतही यश मिळवायचे आहे. वळंजूंनी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, पण त्यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. चांगल्या लोकांना फोडाण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण, खरा शिवसैनिक फुटणार नाही. जागृतीसाठी प्रत्येक वॉर्डात प्रयत्न करण्यात येणार आहे.'

वळंजू म्हणाले, 'शिवसेनेत प्रवेश केला नसला तरी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत काम केले आहे. बाजार समितीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे लोकांनी तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.' यावेळी दीपक गौड, विजय कुलकर्णी, पूजा भाटे, स्मिता माळी, उदय पोवार, शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगकर्मींना वेध ‘राज्यनाट्य’चे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑक्टोबरनंतर उघडणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या मंचाचे वेध कोल्हापुरातील हौशी रंगकर्मींना लागले आहेत. त्यासाठी सध्या प्राथमिक टप्प्यावर रंगकर्मींची जुळवाजुळव सुरू झाली असून हौशी नाट्यकर्मींच्या वर्तुळात राज्य नाट्य स्पर्धेची चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रयोगांना अद्याप अडीच महिन्यांचा अवधी असला तरी संहिता निवडीपासून कलाकारांच्या नावाचा शोध मात्र सुरू झाला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून सुरूवात होते. तर नोव्हेंबरच्या सुमारास प्रत्यक्ष राज्यनाट्य स्पर्धेच्या फेरीचे दालन खुले होते. कोल्हापुरात साधारणपणे १३ हौशी नाट्यसंस्था कार्यरत असून दरवर्षी किमान दोन ते तीन नाट्यसंस्था नव्याने निर्माण होऊन राज्यनाट्य स्पर्धेत उतरतात. यावर्षीच्या राज्यनाट्यस्पर्धेची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी हौशी रंगकर्मींच्या गोटात या स्पर्धेच्या उत्साहाचे कारंजे फुलण्यास सुरूवात झाली आहे.

संहितेबाबत तीन वर्षाची अट शिथिल करण्यात आल्याचा परिणामही यंदा स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या संहितांवर होणार आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून राज्य नाट्य स्पर्धेत हौशी नाट्यसंस्थाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. यामध्ये सादरीकरणासोबत नेपथ्य, प्रकाशयोजना यामध्ये प्रयोगशीलता दिसत आहे. त्यामुळे स्पर्धेला अवधी असला तरीही नवीन प्रयोग काय करता येईल याचा विचार सुरू झाला आहे.

राज्य नाट्यस्पर्धेसाठी कुठले नाटक करायचे यावर एकदा शिक्कामोर्तब झाले की त्यानंतर लगबग सुरू होते ती तालमींची. त्यामुळे तालमीसाठी जागेचा शोध घेण्यासाठीही रंगकर्मींची शोधमोहिम येत्या काही दिवसात सुरू होण्याची चिन्हे आहेत. हौशी रंगकर्मी आपला इतर व्याप सांभाळून नाटकाची हौस पूर्ण करत असल्यामुळे दोन महिन्यांचा वेळ तालमीसाठी मिळावा या गणितातून वेळेचे नियोजन करण्याचे आडाखेही बांधले जात आहेत.

यंदा 'केशवराव'मध्येच रंगणार स्पर्धा

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेली राज्यनाट्य स्पर्धा केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे रंगली. मात्र यावर्षी नोव्हेंबरपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृह नव्या रूपात खुले होत असल्यामुळे यंदाची राज्यनाट्य स्पर्धा केशवराव नाट्यगृहाच्या मंचावर पार पडणार आहे, याचाही उत्साह रंगकर्मींमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’ची चौकशी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या १५ वर्षांत विविध ठिकाणचे मिळून तब्बल २०३ जागांचे टीडीआर दिले आहेत. यापैकी संशयित प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. खोटे रेकॉर्ड तयार करून कमी असलेली जागा जादा दाखवून महापालिकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट त्या माध्यमातून सामोरे येण्याची शक्यता आहे. टीडीआर प्रकरणात नगरसेवकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत साखळी कार्यरत आहे.

साने गुरूजी वसाहतीतील क्रीडांगणासाठी आरक्षित दोन एकर जागा असताना खोटे रेकॉर्ड तयार करून पाच एकर जागेचे टीडीआर घेतल्याचे सामोरे आल्यानंतर प्रशासनाने २००० पासूनच्या टीडीआर प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरविले आहे. महापालिकेने विकासकामासाठी शहरांतील विविध जागांवर आरक्षण टाकले आहे. उद्यान, क्रीडांगण, शाळा, बालोद्यान, स्मशानभूमी अशा ​विविध कामांचा त्यामध्ये समावेश आहे. अशा २०३ जागांचे टीडीआर दिले आहेत.

कळंबा स्मशानभूमीसाठीच्या जागेचा टीडीआरही चुकीच्या पद्धतीने दिला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ७५ लाख रुपयांचे काम करून घ्यायला हवे होते. मात्र, केवळ सहा लाख रुपये भरून घेतले आहेत. जरगनगर येथील १०० फुटीचा रस्ता लेआऊटमध्ये मंजूर असताना त्याला टीडीआर दिली आहे. येथे विकासकाकडून कसलेही पैसे भरून न घेता ५५,००० चौरस फूट जागेचा टीडीआर दिला असल्याचा आक्षेप आहे. कळंबा स्मशानभूमीच्या जागे संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला टीडीआरला पाठीशी घालणाऱ्यांनी हुसकावून लावल्याची घटना ताजी आहे.

खोटी कागदपत्रे रंगविणारी यंत्रणा

सानेगुरूजी वसाहत परिसरातील दोन एकर जागा असताना कुलमुखत्यारधारक धैर्यशील यादव याने पाच एकर जागेचे खोटे रेकॉर्ड तयार केले. वास्तविक उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सर्व्हेअर, मोजणी कर्मचारी ते महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालय, नगर रचना विभाग अशा प्रत्येक टप्प्यावर चुकीच्या गोष्टींना पांघरून घालण्याचे काम झाले आहे. कुणाही अधिकाऱ्याला वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावेसे वाटले नाही. टीडीआर घेणारे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सारा प्रकार घडला आहे.

विविध विकासकामांसाठी शहरातील २०३ जागांचे टीडीआर दिले आहेत. यामधील संशयित वाटणाऱ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. संशयित प्रकरणे आणि त्या संदर्भातील पुरावे उपलब्ध असतील, तर अशा प्रकरणात लक्ष घातले जाणार आहे.

- पी. शिव शंकर, आयुक्त

'महापालिकेने गेल्या पंधरा वर्षात ज्या जागेवर आरक्षण टाकून टीडीआर​ दिले आहे. त्या सर्व टीडीआर संबंधित फायली आयुक्तांनी ताब्यात घ्याव्यात. अनेक प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे. या सर्व फायलींची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी केल्यास महापालिकेतील अधिकारी, टीडीआरमधील सहभागधारक सामोरे येतील.

- भूपाल शेटे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणविषयक अहवालात त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याबरोबरच शहरातील पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने सुचवलेल्या विविध पर्यायांकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणविषयक कायद्यांच्या अंमलबजावणी, पर्यावरणविषयक बाबींसाठी जागेचे आरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणावर परिणाम करणारी बांधकामे, आवाज व ध्वनी प्रदूषण अशा विविध मुद्यांवर महापालिकेने प्रभावीपणे काम केलेले नसल्याचे शहराच्या पर्यावरण सद्यस्थितीच्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालामध्ये आकडेवारीच्यादृष्टीने काही त्रुटी प्रकर्षाने दिसून येतात.

शहराच्या २०१४-२०१५ मधील पर्यावरणाच्या सद्यस्थितीचा अहवाल सरकारकडे पाठवण्यासाठी सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. यामध्ये शहराच्या पर्यावरणविषयक बाबींमध्ये सुधारणा करण्याच्यादृष्टीने गेल्या अहवालामध्ये नमूद केलेल्या उपायांचा लेखाजोखाही मांडण्यात आला आहे. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामाव्यतिरिक्त फार मोठे काम झाल्याचे दिसून येत नाही. जे कायदा राबवणार त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरणविषयक कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळाही घेण्यात आलेली नाही. पिण्याचे पाणी, पंचगंगा नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन याबाबत सुचवलेल्या विविध पर्यायानुसार महापालिकेने अंमलबजावणी केलेली नाही. नदीमध्ये जनावरे धुणे, कपडे धुणे, आंघोळ करण्यास बंदी करण्याबाबत सुचवले होते. त्याबाबतही ठोस कारवाई करता आलेली नाही.

प्रदूषण रोखण्यावर प्रश्नचिन्हच

दर महिन्याला घेतल्या जात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या १३४४ नमुन्यापैकी १९४ नमूने ​हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले आहे. ए, बी, सी, डी, ई अशा सर्वच वॉर्डमध्ये वर्षभर ही परिस्थिती असल्याने शहरवासियांच्या आरोग्याच्यादृष्टीने ही गंभीर बाब आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्याबाबत सुचवलेल्या पर्यायाची अंमलबजावणी केली नसल्याचेच यातून दिसून येते. घनकचरा व्यवस्थापनाबाबत जे उद्योग, व्यवसाय विविध प्रकारच्या कचऱ्याची निर्मिती करतात, त्यांच्यावरच विल्हेवाट व प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोपवण्याबाबतही काही निर्णय घेतलेले नाहीत. अविकसित बागा विकसित करण्यात आलेल्या नाहीत. शहरातील दुर्मिळ वृक्षसंपदेबाबत आराखडा तयार करण्याबाबत उदासिनता दाखवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गुंड कराडमध्ये ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

गुंडांच्या वैमनस्यातून शहरात सोमवारी दोन्ही गुंड ठार झाले. बाबर उर्फ बब्बर शमशाद खान याने भर दिवसा गोळ्या झाडून नामचीन गुंड आणि धान्य व्यापारी उमाकांत उर्फ बबलू माने (४०) याचा खून केला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बब्बरला जमावाने पकडून ठेचून मारले. पोलिसांनी अधिकृतरीत्या पुष्टी केली नसली तरी टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे मानले जात आहे.

बबलू माने मंडई परिसरातील आपल्या घरासमोर वृत्तपत्र वाचत बसला असताना सकाळी साडेआठच्या सुमारास बब्बरने (वय ४५, रा. बैल बाजार रोड, कराड) तेथे जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. छातीत गोळी घुसल्याने बबलू गंभीर जखमी झाला. त्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच तो मरण पावला. गोळीबाराचा आवाज ऐकून बबलूच्या आई अनुसया भीमराव माने (वय ६०) घराबाहेर आल्या आणि त्यांनी बब्बरला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरही बब्बरने गोळ्या झाडल्या. पायात गोळ्या घुसल्याने अनुसया जखमी झाल्या.

या नंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या बब्बरला जमावाने पकडले. तो पायाने अधू असल्याने त्याला पळून जाता आले नाही. जमावाने त्याला मरेपर्यंत मारहाण केली. कोणीतरी त्याच्या डोक्यात सिमेंटची पाइप मारल्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ही पाइप जप्त केली आहे. वर्मी घाव बसल्याने बब्बरचा जागीच मृत्यू झाला.

कराड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. माने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना तेथे पिस्तूल, रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. रक्ताने माखलेली सिमेंटची पाइपही सापडली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अनुसया यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले.

जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख तातडीने कराडमध्ये दाखल झाले. त्यांनी तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात राज्य राखीव दलाची एक तुकडी, दोन स्ट्रायकिंग फोर्स, दंगा नियंत्रण पथक व क्युआरटीची तुकडी तैनात केली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचपट दंड आकारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोगस पावती देऊन ट्रकचालकांची फसवणूक करणाऱ्या वाळू आवटीदारांवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा वाळू ट्रक वाहतूकदार संस्थेच्या शिष्टमंडळाने केली. याप्रश्नी त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदन दिले. पावती असणाऱ्या ट्रकवर कारवाई केली जाणार नाही, पण बोगस पावती असणाऱ्या ट्रकवर पाचपट दंड आकारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सै​नी यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांशी बोलताना स्पष्ट केले. संस्थेच्यावतीने कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, कृष्णात पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात चारशे ट्रकधारक वाळू वाहतूक करतात.

शिरोळ व कराड येथून वाळू आवटीदाराकडून ट्रकमालक ११ हजार रूपये अथवा बारा हजार रूपयाला अडीच ब्रास वाळू खरेदी करतात. वाळू खरेदी, डिझेल, वाळू भरणी व उतरणी, हमाली, टोल, चालकाचा पगार, भत्ता असा प्रत्येक फेरीला १७ हजार ते १८ हजार रूपये खर्च येतो. ट्रकचालकाला प्रती फेरी १५०० ते १८०० रूपये भाड्यापोटी मिळतात. वाळू ट्रकमधून कोल्हापुरात घेऊन येताना कराड, शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील तहसिलदार, तलाठी, मंडल अधिकारी ट्रक आडवून रॉयल्टीची मागणी करतात. पावती दाखवली तरीही ती बोगस आहे. पावती क्रमांक चुकीचा आहे, असे सांगून ३० हजार ते ४० हजार रूपये दंड आकारला जातो. दंडामुळे ट्रक चालक मेटाकुटीस आले आहे. पोलिसी आणि महसुली कारवाईमुळे वाहतूकदारांना भयंकर त्रास होत आहे. यातून तातडीने मार्ग काढण्याची मागणी वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेदरम्यान केली. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष प्रकाश व्हटकर, गौस मुल्ला, विशाल राजापुरे यांच्यासह ट्रकचालक उपस्थित होते.

आवटीदारांचे हात वर

वाळू आवटीदार पैसे भरून वाळू ट्रकमध्ये भरतात आणि पावती संपली आहे. तुम्ही वाळू ट्रक घेऊन जावा. कुणी आडवले तर आम्ही बघून घेतो, असे सांगतात. तहसिलदारांनी ट्रक आडवल्यावर आवटीदार हात झटकतात. आवटीदार पैसे घेतात. रॉयल्टीचा पास देतात, पण तहसिलदारांनी ट्रक पकडला की रॉयल्टीचा पास बोगस असल्याचे सांगतात. पावती खरी आहे की बोगस आहे हे ट्रकधारकांना समजत नाही. ट्रकचालकांची फसवणूक कणाऱ्या आवटीदारावर कारवाई करावी आणि त्यानंतर आम्हाला दोषी धरावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात डेंगीचा रुग्ण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर शहरात शाहूनगर भागात संतोष मारूती कांबळे (वय ३४) हा डेंगीचा रूग्ण आढळला. दरम्यान शहरात त्वरित स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी भाजपने केली असून याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आले. यानंतर पालिकेच्यावतीने परिसरात तातडीने सर्व्हेक्षण करण्यात आले.

संतोष कांबळे हा शाहूनगरमध्ये सुदर्शन चौक परिसरात राहतो. बुधवारपासून त्याला ताप येत असल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातील रक्ततपासणीमध्ये त्याला डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. संतोषच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शहरात वेळेत स्वच्छता व औषध फवारणी होत नाही. शहरात कचऱ्याचे ढीग पडून असल्याने विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे येत्या आठ दिवसात शहरात स्वच्छता अभियान राबवावे. औषध फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव रोखावा. अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली.

यावेळी सुरेश शिंगाडे, राजेंद्र दाईंगडे, मिलिंद भिडे, नंदू कदम, विठ्ठल पाटील, सुनील ताडे, चंद्रकांत जाधव, रतन शिकलगार, संजय चव्हाण, संभाजीराजे नाईक, योगेश अंधारे, शकिल मणेर, राजेश शिंदे उपस्थित होते.

पालिकेकडून पाहणी

डेंगीचा रुग्ण आढळल्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शाहूनगरमध्ये १३२ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये चार ठिकाणी पाण्याच्या साठ्यांमध्ये आळ्या आढळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अच्छे दिन जनतेच्या मुळावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने केलेल्या घोषणा या वल्गनाच ठरल्या आहेत. स्वत:साठी अच्छे दिन आणून मोदीप्रणित भाजपा सरकार जनतेच्याच मुळावर उठले आहे. थापा मारण्याशिवाय आजतागायत या सरकारने काहीच केलेले नाही. गोरगरीबांचा हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उकल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी सोमवारी दिला. त्याचबरोबर झोपडपट्टीवासियांना घरकुलांचा ताबा व केशरी शिधापत्रिकारधारकांना धान्य न दिल्यास पुन्हा मोर्चा काढू असा इशाराही दिला.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवनपासून सुरु झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन फिरुन प्रांत कार्यालयावर आला असता तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मोर्चात गांधी टोप्या आणि शासनाच्या विरोधातील फलक लक्ष वेधत होते.

यावेळी आवाडे म्हणाले. भाजपाकडून काँग्रेसच्या योजनांना मोडता घालत प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे. वीज दर कमी करण्याऐवजी वाढ केली. तसेच सवलती बंद केल्याने वस्त्रोद्योग व्यवसायाला घरघर लागली आहे. यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या आमदारांच्या कमिटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यावरुन ते स्वत: आणि सरकार किती जागृत आहे याची प्रचिती येते. मोठा निधी आणू अशी वल्गना करुन आता आयजीएम कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. भाजपा सरकारने अनेक घोषणा केल्या. पण सत्तेत आल्यानंतर त्या सर्व फोल ठरल्याने केंद्र व राज्य शासनाबरोबरच आमदार हाळवणकर हे निष्क्रीय असल्याची जाणीव जनतेलाही झाली आहे. पण आता यापुढे मतांचे राजकारण चालणार नाही. काँग्रेसने सदैव आम आदमीला केंद्रबिंदू मानले असून त्यांच्या हक्कासाठी सदैव पाठीशी राहिली आहे. याच बळावर शासनाला जाग आणून आपले हक्क मिळवूया. त्यासाठी सर्वांनी अशीच साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शशांक बावचकर, संजय केंगार, मोहन काळे आदींची भाषणे झाली.

माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात, केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य दरमहा मिळालेच पाहिजे, जुलै २०१४ मध्ये मंजूर केलेल्या संगांयो लाभार्थ्यांचे अनुदान ताबडतोब जमा करावे, तसेच फेरसर्वेक्षण करुन बंद केलेले अनुदान पुर्ववत सुरु करावे, झोपडपट्टी पुनर्वसनातील घरकुलांचा ताबा ताबडतोब मिळावा, सर्वच फेरीवाल्यांना गाळे मिळावेत, रिक्षाचालकांसाठीच्या कल्याणकारी योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, बांधकाम कामगारांचे हक्क मिळालेच पाहिजेत, वीज दरवाढ रद्द करावी व अनुदाने कायम ठेवावीत, मोलकरीणींचे मुलांना शिष्यवृत्ती व लॅपटॉप ताबडतोब मिळाले पाहिजेत, अंगणवाडी सेविकांना कायम करावे, तसेच पुर्ववत मानधन मिळावे या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाशराव सातपुते, शहर काँग्रेस उपाध्यक्ष विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सतीश डाळ्या, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अशोकराव सौंदत्तीकर, किशोरी आवाडे, अंजली बावणे, रवी रजपुते, राहुल आवाडे, प्रा. शेखर शहा, मुकूंद पोवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टीकार्ड द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर परिसरातील सुधारक जोशीनगर झोपडपट्टीतील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड द्यावीत, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाने करवीर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

संभाजीनगर येथून कोल्हापूर शहर अध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा करवीर तहसीलदार कार्यालयावर आला. झोपडपट्टीवासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जोशी नगर झोपडपट्टीत ३८० हून अधिक कुटुं​बे ५० ते ६० वर्षापासून वास्तव्य करत आहेत. घोषित असलेल्या झोपडपट्टटी असूनही १९९५ च्या कायद्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रॉपर्टीकार्ड देण बंधनकारक असताना प्रॉपर्टीकार्ड दिले जात नाही. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघमारे, सुभाष कापसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैरा फेडायचा, पण कुणाचा?

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत नेमकी कोणाला मदत करायची​? कोणाचा पैरा फेडायचा या संभ्रमावस्थेत सध्या आमदार हसन मुश्री​फ आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयाला हातभार लावणाऱ्या सतेज पाटील यांना 'हात' द्यायचा की जिल्हा बँकेत अध्यक्ष होण्यासाठी मदत करणाऱ्या विनय कोरेंच्या नावाने गुलाल उधळायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीतील घडामोडींवर विधानपरिषदेचा फैसला होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आदेशाने आजऱ्यात उमेश आपटे यांनी मुश्रीफांना मदत केली. यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. साहजिकच सतेज पाटील यांनी केलेल्या या मदतीचा पैरा आपण फेडणार आहोत असे मुश्रीफ सतत सांगत आहेत. 'गोकुळ' च्या निवडणुकीत ते पैरा फेडतील अशी अपेक्षा सतेज पाटील यांना होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे विधानसपरिषद निवडणुकीत तरी मुश्रीफ हे सतेज पाटील किंवा ते सांगतील त्या उमेदवाराच्या मागे ताकद लावतील का? याबाबत मुश्रीफांचा निर्णय झालेला नाही. अजून निवडणुकीला वेळ आहे, पण आतापासून त्याची चर्चा होत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. तशी त्यांनी जमवाजमवही केली होती. पण ऐनवेळी विनय कोरे यांनी आपली मते मुश्रीफांच्या पदरात टाकल्याने मुश्रीफ अध्यक्ष होऊ शकले. त्यामुळे मुश्रीफांना आता कोरे यांचाही पैरा फेडावा लागणार आहे. त्याची कोरे सतत आठवण करून देत आहेत. कोरे विधानपरिषद लढवण्यासाठी इच्छूक आहेत. सतेज पाटील देखील ऐनवेळी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुश्रीफ करामत करणार?

बाजार समिती​त मुश्रीफ कोरे व पाटील एकत्र आले, अशीच युती आगामी महापालिका व विधानपरिषद निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. दोघांनाही मदत करत एकाचवेळी दोघांचा पैरा फेडण्याची करामत मुश्रीफ करू शकतात. पण ते न करता राष्ट्रवादी पक्षही ही निवडणूक लढवू शकतेा. महापालिका निवडणुकीत काय काय घडामोडी होणार यावरच मुश्रीफांची पुढील वाटचाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुश्रीफ कोणाचा पैरा फेडायचा या कात्रीत सापडले आहेत.

महाडिक यांचे काय?

आमदार महादेवराव महाडिक यांनी गेल्या काही महिन्यात मुश्रीफांना पुढे चाल देण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये मुश्रीफ यांना मदत होईल अशीच भूमिका महाडिक यांनी घेतली. विधानसपरिषद निवडणुकीत मुश्रीफांनी मदत करावी यासाठीच त्यांना न दुखावण्याचे धोरण महाडिकांनी कायम ठेवले. त्याच्या परतफेडकीच्या प्रतीक्षेत महाडिक राहणार आहेत.

'भाजप-ताराराणी' घोषणा?

महापालिका निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडी यांची होणार आहे. त्यादृष्टीने चर्चा होऊन आता आठ दिवसात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक सुहास लटोरे व माजी महापौर सुनील कदम हे या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. या आघाडीला महाडिक गटाची मदत मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images