Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहू समाधीस्थळ, मराठा भवनला विलंब नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू समाधी स्थळ विकास, कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचे काम लवकर सुरू करण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले. त्याचबरोबर शहरात उभारण्यात येणाऱ्या मराठा भवनचा प्रस्तावही तत्काळ तयार करा. भवनसाठी जागा निश्चित होऊनही प्रस्ताव तयार होण्यास विलंब का? अशी विचारणा सदस्यांनी केली. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सभापती फरास यांनी राजर्षी शाहू समाधी, पानसरे यांचे स्मारक व मराठा भवनचा मुद्दा उपस्थित केला. मराठा भवनसाठी जागा निश्चित झाली असताना प्रस्ताव का तयार केला नाही अशी विचारणा केली. यावेळी प्रशासनाने कार्यवाही केली जाईल, असे उत्तर दिले. संभाजीनगर येथील कामगार चाळ मोडकळीस आली आहे, याबाबत काय कार्यवाही केली असा प्रश्न माधुरी नकाते यांनी विचारला. कामगार चाळीतील लोकांना नोटीसा दिल्या आहेत. परंतु चाळीतील लोक बीओटी तत्वावर इमारत विकसित करण्यास तयार नाहीत असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

अतिक्रमण हटविणार

फुलेवाडीतील ४० फुटी (बस रूट) रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम सात दिवसात राबवली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगरसेवक सर्जेराव पाटील यांनी या रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. गेली तीन वर्षे नगरोत्थानचा रस्ता रखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण, बांधकाम झाले आहे. यामुळे केएमटीच्या वाहतुकीस अडथळा येऊ शकतो. पोलिस बंदोबस्त देऊन ही अतिक्रमण का हटविले नाही अशी विचारणा त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदान २५ ऑक्टोबरला

0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

लोकसभा व विधानसभेनंतर आता शहरातत महापालिका निवडणुकीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेची प्रशासकीय तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात प्रभाग रचना जाहीर होणार असून मतदानासाठी २५ ऑक्टोबर हा दिवस सोयीचा असल्याचे महापालिकेने कळवल्याचे वृत्त आहे. यामुळे या दिवशी मतदान होण्याची दाट शक्यता आहे. या दिवशी काही अडचणी आल्यास १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित आहे.

महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०१५ रोजी संपणार आहे. यामुळे आता इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. यावेळी ८१ प्रभाग होणार असून त्यामध्ये ४१ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहेत. प्रभाग रचनेचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसात निवडणूक आयोग प्रभाग रचना जाहीर करण्याची शक्यता आहे. २४ जुलै रोजी प्रभागरचना जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. निवडणूक प्रक्रियेचा कालावधी कमी केल्याने प्रभाग रचना जाहीर करण्यास विलंब होत आहे. निवडणुकीसाठी मतदानाची तारीख निवडणूक आयोग घोषित करते. पण तत्पूर्वी महापालिकेकडून सोयीच्या तारखा मागविल्या जातात. ज्या तारखा महापालिका पाठवते, शक्यतो त्यापैकीच एखादी तारीख मतदानासाठी निश्चित केली जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने २५ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर या दोन तारखा कळवल्याचे समजते. यामुळे या दोनपैकी एका तारखेला मतदान होणार हे निश्चित आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान हाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. इच्छूकही तारीख गृहित धरून प्रचाराचे नियोजन करत होते. मात्र ही निवडणूक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. तिसऱ्या आठवडयात दसरा व ताबूत विसर्जन आहे. यामुळे २४ ऑक्टोबरपर्यंत मतदान होण्याची शक्यता नाही. २५ ऑक्टोबर हीच सोयीची तारीख असल्याने मतदानासाठी हाच मुहूर्त साधला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या तारखेला प्रशासनाबरोबर 'राजकीय समंती' मिळाली आहे. ऐनवेळी काही अडचणी आल्यास १ नोव्हेंबरला मतदान घेण्याचे नियो​जन होईल. पण महापालिकेसाठी या दोनपैकी एका तारखेला मतदान होणार असल्याचे जवळजवळ निश्चीत झाले आहे.

भाजपची व्यूहरचना

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताराराणी आघाडीच्या काही कारभारी नेत्यांशी चर्चा केली. महाडिक गटाची पूर्ण ताकद भाजपला मिळावी यासाठी मंत्री पाटील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवडयात ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांसमवेत बैठक झाली. शिवसेनेला शह देण्यासाठी या हालचाली सुरू आहेत. माजी नगरसेवक सुनील मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपला अधिकाधिक जागा कशा मिळतील, त्यासाठी काय काय करता येईल याबाब सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित शिक्षकांना वेतन द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनुदानास पात्र ठरलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांसाठी वेतन अनुदानासाठी आर्थिक तरतूद पावसाळी अधिवेशात करावी. संच मान्यतेनुसार शिक्षक भरतीला परवानीगी द्या आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांना दिले. शिंदे यांनी निवेदन सरकारकडे पाठवू. संच मान्यता आणि पोषण आहाराचे कामकाज सुरू आहे असे सांगितले.

निवेदनात म्हटले आहे, सरकारने विनाअनुदानित पात्र शाळांची यादी २०१२-१३ मध्ये प्रसिद्ध केली आहे. मात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षकांना अद्याप सुधारित यादीनुसार वेतन मिळालेले नाही. अपात्र ठरलेल्या शाळांनी दुबार मूल्यांकनामध्ये त्रूटी पूर्ण केल्या आहेत. त्या शाळांचाही निधी देण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी. त्रयस्थ समितीने पात्र असताना ४६९ शाळा अपात्र ठरवल्या आहेत, अशा अपात्र शाळांना २०११ पासून सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी मूल्यांकन करण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्याच प्रमाणे २०१४-१५ मधील शाळांचे मूल्यांकन करावे. संच मान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी द्यावी आदी मागण्या केला.

यावेळी संच मान्यतेनुसार भरती प्रक्रिया व पोषण आहार देण्याचे कामकाज सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले. शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, एम. एस. जाधव, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाची चाचपणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी आवश्यक वातावरण आहे की नाही याची चाचपणी गेले दोन दिवस सुरू आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजीचे (आयआयटीएम) संशोधक विमानातून ही चाचणी करीत आहेत. राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविता येईल का याबाबतच्या नोंदी ही टीम घेत आहे. २००९ नंतर दुसऱ्यांदा असा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

पाहणीनंतर या चाचणीचे नमुने महाबळेश्वर येथे हवामानविषयक अद्ययावत प्रयोगशाळेत पाठविणे सोपे होणार आहे. त्यासाठी कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात असलेली टीम ढगांचा आकार, प्रकार आणि ढगांशी संबंधित माहिती नोंदवित आहे. तशा प्रकारची उपकरणे विमानालाच बसविली आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अशा प्रकारचे परीक्षण केले जात आहे. एकदा माहिती मिळाल्यानंतर पुरेशी आकडेवारी विभागाकडे जमा होणार आहे. त्यानंतर कृत्रिम पावासाचा प्रयोग करणे सोपे होणार आहे. हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी समजला जात आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेकडूनही ढग आणि त्याठिकाणी असलेल्या आर्द्रतेबाबतची माहिती घेतली जात आहे. गंगा नदीच्या पट्ट्यात २०१४ मध्ये अशाचप्रकारे सर्वेक्षण केले होते. सुमारे ७५ तास ढगांच्या स्थितीसंदर्भात माहिती घेतली जाणार आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्याआधी ढगांचा योग्यप्रकारे अभ्यास केला जातो. किमान दोन किलोमीटर रुंद आणि ४ ते ५ किलोमीटर उंची असलेले ढग कृत्रिम पावसासाठी योग्य ठरतात. त्यादृष्टीने ढगांच्या नोंदी करण्यात येत असून हा अभ्यास सुमारे ७५ तासांचा आहे.

- जीवन प्रकाश कुलकर्णी, निवृत्त संशोधक, आयआयटीएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’चा निर्णय प्रलंबित

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) कारखाना विक्रीस काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. सोमवारी केडीसीसी संचालकांच्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र जमीन विक्रीचा नवीन पर्याय समोर आल्याने सोमवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दौलतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. बैठकीत कारखान्याचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे बँकेच्या वरिष्ठ सुत्राकडून सांगण्यात आले.

दौलत सहकारी साखर कारखाना विक्रीस काढण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला कर्मचाऱ्यांनी प्रचंड विरोध केला. दौलत विकण्याऐवजी दौलतच्या मालमत्तेतील जमीन विक्री केल्यास कर्जफेड होऊ शकते. त्यामुळे जमीन विक्रीचा पर्याय पुढे करण्यात आला होता.

गेले चार हंगाम दौलत कारखाना बंद असल्याने जिल्हा बँकेचे ६५ कोटी रुपये कर्ज थकीत गेले आहे. थकीत कर्जामुळे दौलतवर जिल्हा बँकेने कब्जा केला आहे. बँकेचे कर्ज वसूल करण्यासाठी कारखाना विक्री करण्याचा निर्णय जाहीर केला होता. जिल्हा बँकेच्या निर्णयाला शेतकरी व सभासदांनी विरोध केला होता. विरोध कायम ठेवताना दौलत बचाव कृती समितीने कारखान्याची २०६ एकर स्वमालकीची जमिन असून यापैकी ५० एकर जमिनीची विक्री केल्यास बँकेचे कर्ज वसूल होऊ शकते. कारखाना खासगी मालकीचा करण्यापेक्षा हा पर्याय चांगला असल्याने बैठकीत निर्णय होण्यासाठीलक्ष लागले होते.

सोमवारच्या बैठकीस बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ कागल येथील मोर्चामध्ये व्यस्त असल्याने दौलतबाबत ठोस विचारविनिमय झाला नाही. बैठक संपल्यानंतर कृती समितीच्या प्रा. सुभाष देसाई यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. मात्र याबाबत ठोस निर्णय न झाल्याचे सांगण्यात आले. 'दौलतच्या विक्रीबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र याबाबत निर्णय झाला नाही. कारखान्याचे पुनर्मूल्यांकन होऊन पुन्हा निविधा प्रसिद्धीच देणार असल्याचे बँकेच्या वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची वात

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवन परिसरात प्रज्ज्वलित करण्यात येणाऱ्या महाज्योतीसाठी तमदलगे (ता. शिरोळ) येथील रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने अखंड सुतापासून ७५० फूट लांबीची वात तयार केली आहे. या महाज्योतीचे प्रज्ज्वलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याहस्ते १४ जुलै रोजी होणार आहे. ही माहिती सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, की कुंभमेळ्याचे औचित्य साधून मुंबई येथील श्री जयगोपाल गायत्री सिद्धपीठ ट्रस्ट आणि पुणे येथील मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठान यांच्यातर्फे तपोवन येथे महाज्योत प्रज्ज्वलित केली जाणार आहे. देशाचे अखंडत्व अबाधित रहावे, रोगराई, भूकंप, दुष्काळ यापासून संरक्षण व्हावे आणि विश्वातील मानवांचे कल्याण व्हावे, या हेतूने ही ज्योत प्रज्वलीत करण्यात येणार आहे. ही वात तयार करण्यासाठी तब्बल ३ हजार ६१७ किलोमीटर लांबीचा धागा वापरण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरासह परराज्यातून भाविक येतात. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरणार आहे. वात गोलाकार असून जाडी तीन इंच आहे, तर लांबी ७५० फूट इतकी आहे. वात बनविण्यासाठी ३०० किलो कापूस लागला आहे.

या वातीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. ज्योत लावण्यासाठी कमलपुष्पाच्या आकाराचा ५७६ चौरस फुटांचा दीप बसविण्यात आला असून ज्योतीची वात वरखाली करण्यासाठी आधुनिक तंत्राद्वारे उपकरण बनविले आहे. या ज्योतीला एका तासाला एक लीटर तिळाचे तेल लागणार असून अंबानी उद्योगसमूह तेल पुरविणार आहे. ही ज्योत अखंड १०८ दिवस म्हणजे २९ ऑक्टोबरपर्यंत तेवणार आहे असेही अशोकराव माने यांनी सांगितले. या पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष अनिल कांबळे, सागर माने, अरविंद माने, प्राचार्य सी. डी. काणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोधसाठी १० लाख

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ग्रामपंचायत बिनविरोध करा ; दहा लाखांचे बक्षीस मिळवा' अशी अभिनव योजना खासदार धनंजय महाडिक यांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील कोणतीही ग्रामपंचायत निवडणूक सर्वसंमत्तीने व दबावविरहित बिनविरोध केल्यास दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार महाडिक यांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय इर्ष्या कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जुलै महिन्यांच्या अखेरीस सर्व ग्रामपंचायतींचे मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान ग्रामीण भागात टोकाची इर्ष्या निर्माण होते. यामुळे काहीवेळा तणावाच्या वातावरणाला संपूर्ण गावाला सामोरे जावे लागते. अशा सर्व गोष्टींना फाटा देण्यासाठी आणि सामाजिक संबंध सलोख्याचे निर्माण करण्यासाठी अभिनव योजना हाती घेतली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवडणूक लोकशाहीच्या चौकटीमध्ये आणि कोणत्याही दबाव तंत्राचा वापर न करता बिनविरोध करावी लागणार आहे. अशी ग्रमापंचायत बिनविरोध झाल्यास दहा लाख रुपयांचा विकास निधी मिळणार आहे. 'निवडणूक बिनविरोध झाल्यास विकासकामांना गती मिळते. कोणत्याही विकासकामामध्ये राजकारणांचा शिरकाव होत नसल्याने गावांच्या विकासाला गती येते. विकासाचा वेग साधण्यासाठीच ही योजना सुरू केली आहे,' असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठिबक सिंचनाखाली ऊसशेती आणणार

0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्ध्व कृष्णा उपखोरे विभागाने (के- १) एकात्मिक राज्य जल आराखडा तयार केला आहे. आराखड्यात प्रकल्पात आतापर्यंत झालेली कामे आणि भविष्यातील कामाचे नियोजन केले आहे. लवादानुसार ६ हजार ९०० दशलक्षघनमीटर पाणी अडविण्याचे नियोजन पूर्ण केले असून उपखोऱ्यात भविष्यात ६७३ स्थानिक प्रकल्प आणि उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत हरकती आणि सूचनांवर १० जुलैला कराडमधील वेणूताई चव्हाण सभागृहात चर्चा होणार आहे.

लवादाने कृष्णा खोऱ्याची विभागणी पाच उपखोऱ्यांत केली आहे. सध्या उर्ध्व कृष्णा उपखोरेचा (के. १) आराखडा प्रसिद्ध केला आहे. २०३० मध्ये पिण्यासाठी, औद्योगिकीकरण, शेतीसाठी किती गरज असेल याचा विचार करून आराखडा तयार केला आहे. दर पाच वर्षांनी या आराखड्याचे पुनर्विलोकन अपेक्षित आहे. लाभधारकांशी चर्चा केल्यानंतर हा प्रारूप आराखडा सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

संपूर्ण ठिबक सिंचन

सध्या ११० राज्यस्तरीय प्रकल्प व १० स्थानिकस्तरीय असे २१३ प्रकल्प पूर्ण केले आहेत. ४० राज्यस्तरीय प्रकल्प व २३७ स्थानिकस्तरीय प्रकल्प चालू आहेत, तर भविष्यात ६७३ स्थानिक प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन आहे. उपखोऱ्यातील उसाचे क्षेत्र २. ८७ लक्ष हेक्टर इतके आहे. या सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन प्रस्तावित आहे. टेंभूच्या सर्व लाभ क्षेत्रावर बारमाही पिकांना ठिबक सिंचन अनिवार्य केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाऊद भारतात यायला खरंच तयार होता का?

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

'कुख्यात दाऊद इब्राहिम भारतात परत येण्यास खरंच तयार होता की नाही, हे निश्चित कसे करणार?', असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात दाऊदबद्दल घेतलेल्या निर्णयाचे पुन्हा एकदा समर्थन केले.

शरद पवार यांनी दाऊदला भारतात आणण्याची संधी दवडली, अशा बातम्या सध्या अनेक माध्यमांमध्ये झळकत आहेत. याच अनुशंगाने प्रश्न विचारला असता पवार यांनी अनेक प्रतिप्रश्नांची सरबत्तीच पत्रकारांवर केली. ज्याने असंख्य लोकांची हत्या केली, अशा गुन्हेगाराच्या अटी आपण का मान्य करायच्या?, दाऊदला अटींवर भारतात परत आणण्याचा निर्णय कितपत योग्य ठरला असता?, असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. राम जेठमलानी दाऊद संदर्भातील प्रस्तावर आपल्याकडे घेऊन आले होते, असेही पवार यांनी पुन्हा एकदा मान्य केले.

पुन्हा दिले मध्यावधीचे संकेत

शरद पवार यांनी राज्यात विधानसेभेच्या मध्यावधी निवडणुकांचेही संकेत नव्याने दिले. भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये असलेलं प्रेम आणि स्नेहभाव पाहता आमच्या कार्यकर्त्यांना पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे पवार म्हणाले. मध्यावधीचे भाकीत करायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोलाही पवार यांनी एका प्रश्नावर लगावला.

काहीही करू न शकणारे सत्तेत बसलेत

जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होतो तेच आज सरकारमध्ये बसले आहेत. मात्र शेतकऱ्यांचा त्यांनी पूर्णपणे अपेक्षाभंग केला आहे. काहीही करू न शकणाऱ्यांकडेच राज्याची आणि देशाची सूत्रे गेलीत, हे यावरून स्पष्टपणे दिसत आहे, असा हल्ला यावेळी पवार यांनी केला. राज्यात दुष्काळसदृश स्थिती पाहायला मिळत आहे. १८ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. तेथील बळीराजा अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत तातडीने शेतकऱ्यांना पुरेशी मदत सरकारने करायला हवी, अशी मागणी पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिका बरखास्तीला सामोरे जावे लागेल’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'चुकीच्या पद्धतीने कर्ज उभारणीचा प्रयत्न, आर्थिक कारण पुढे करून बीओटीचे प्रस्ताव कराल तर महापालिका बरखास्तीला सामोरे जावे लागेल,' असा इशारा स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिला. बीओटी करणार असाल तर स्वाभिमानी आघाडी सरकारच्या माध्यमातून तो हाणून पाडण्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही पवार म्हणाले.

महापालिकेत पुन्हा बीओटीची चर्चा सुरू झाली आहे. यात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जयंत पाटील पार्टीचे दोन सदस्य, प्रशासनातील काही अधिकारी सहभागी आहेत. महापालिकेच्या जागा कवडीमोल किंमतीने विकण्याचा डाव आखला जात आहे. सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या माध्यमातून बीओटी आणि कर्ज उभारणीचे प्रस्ताव बेजबाबदारपणे मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, याचा परिणाम महापालिका बरखास्त होईल. हे दोन्ही विषय अत्यंत गंभीर आहेत, विषय कोणताही असो, महासभेच्या अजेंठ्यावरच आणावे लागेल.

चर्चा झाली पाहिजे, महासभेचे धोरण निश्चित झाल्यावरच अंतिम निर्णय होईल. आर्थिक नियोजन न करता ठराविक लोकांना बरोबर घेऊन बीओटीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडली आहे. याला जबाबदार सत्ताधारी राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रभाग सभा घ्या, अन्यथा घरचा रस्ता धरा

मिरज : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील नगरसेवकांनी सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांत एकही एरिया सभा घेतलेली नाही. यामुळे महापालिका कायद्यानुसार पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते. मात्र, जिल्हा सुधार समिती सर्व नगरसेवकांना जनतेच्या न्यायालयात खेचणार आहे. यानंतरही नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी एरिया सभा न घेतल्यास त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून घरी घालविण्याचा इशारा मिरजेत झालेल्या सभेत जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे व रवींद्र चव्हाण यांनी दिला. सुधार समितीने माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीत महापालिकतील एकाही नगरसेवकाने मागील दोन वर्षांत एरिया सभा घेतली नसल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या कारभारात सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी सुधार समितीने एरिया सभांसाठी प्रबोधन मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मिरजेत रविवारी पहिली सभा पार पडली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पाच जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्याने या दिवशीच सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

0
0

कराड : येथील कृष्णा नदीवरील कालगाव-पेरले पुलाच्या दक्षिण बाजूच्या रस्त्यासाठी पेरले (ता. कराड) येथील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्याचा आर्थिक मोबदला देण्यासाठी टाळाटाळ सुरू असून, हा आर्थिक मोबदला १५ जुलै अखेर न दिल्यास पेरले येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कृष्णा नदीवर कालगाव-पेरले पुलाचे सुमारे ९५ टक्के काम झाले आहे. पेरले पुलाच्या दक्षिण बाजूकडील पूर्व-पश्चिम या बायपास रस्त्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी गावठाणातील आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या आहेत. सरकारने ताबा घेवून दोन वर्षे झाली. पूलापासून बायपास रस्ता ही झाला. मात्र, तो कच्च्या स्थितीत आहे. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या विस्ताराविरोधात मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

कराड येथील विमानतळ विस्ताराला विरोध करणारी आणि शास्त्रीय व कायद्यामधील तरतुदींना सुसंगत पर्याय देणाऱ्या विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जोरदार निदर्शने केली. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक व अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला होता.

विमानतळ विस्ताराबाबत २०११पासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत अनेक बैठका झाल्या. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणासह तोडगा काढणारी बैठक घ्यायचे ठरले पण, अंतिम विचार विनिमय आणि कायदेशीर तरतुदींची पडताळणी होऊन पर्याय न काढताच निर्णय घेतले गेले.विमानतळ विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर न्याय कारवाई होण्यासाठी तसेच विस्तारीकरण कायद्याच्या कक्षेत बसतनाही भूसंपादनाच्या प्रत्येक कलमांच्या अंमलबजावणीवेळी बाधितांनी यावर आक्षेप घेतले आहेत.

या आक्षेपालाही सुनावणी देण्यात आली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप करून न्याय भूमिका घ्यावी व विचार विनिमयातून झालेल्या निर्णयाच्या आधारावर, पर्यायावर चर्चा करून पुनर्वसनाबरोबर प्रकल्प अधिकाऱ्यांसह बैठक घडवून आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कराड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चासाठी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठोस निधीशिवाय माघार नाही

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

जत तालुक्यातील बेचाळीस गावांनी पाण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मारलेला ठिय्या मंगळवारी दुसऱ्या दिवशीही तितक्याच निर्धाराने कायम होता. पाण्याबाबत निधीचे ठोस काही पदरात पडल्याशिवाय जागा सोडणार नाही, असे समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजीराव सावंत, वि. द. बर्वे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, भाऊसाहेब पवार यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

... तर जनतेने माफ केले नसते

'भाजपच्या नेत्यांनी आमचे आंदोलन हायझॅक करण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्यासाठी तडफणाऱ्या जनतेने त्वरीत नेत्यांचा कावा ओळखून ठिय्या मारला. आमच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले, अन्यथा जनतेने आम्हाला माफ केले नसते,' अशी प्रतिक्रिया समितीच्या नेत्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

'सेना पाणीप्रश्न तडीस लावणार'

कुपवाड : ४२ गावांच्या पाण्यासाठी शिवसेनाच सरकार पातळीवर झगडत आहे, बाकी भाजपसह इतर सर्व पक्ष राजकीय पोळी भाजून घेत आहेत. राष्ट्रवादीचे घोंगडे उतरवून भाजपाचे घोंगडे चढवून राष्ट्रवादीने जनतेला पाणी दिले नाही, असे भाजपाचे खासदार संजय पाटील यांचे विधान हास्यास्पद आहे, शिवसेना जतकरांचा पाणीप्रश्न तडीस लावणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते नगरसेवक गौतम पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. दिर्घ पातळीवरच्या उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अखेर मलकापूरला शुद्ध पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

फिल्टरमध्ये बेड असलेल्या ठिकाणची वाळू संपल्या मुळे व त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणीयोजनेचे फिल्टर हाउस बंद होते. त्यामुळे नागरिकांना बऱ्याच महिन्यापासून फिल्टर केलेले पाणी मिळाले नव्हते. या फिल्टरमधला गाळ व वाळू बदलण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना आता फिल्टर केलेले पाणी मिळतेय परंतु नेहमीप्रमाणेच एक दिवसाआडच पाणी पुरविले जात आहे.

गेल्या दोन वर्षापासून मलकापूर शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. नागरिकांना फिल्टर केलेले पाणी मिळालेलेच नव्हते. सध्या ते मिळत आहे. परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा खेळ संपून दररोज पाणी केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांमधून कायमपणे विचारला जात आहे. मलकापूर शहराला कडवी नदीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीयोजनेवरील विद्युत मोटारी बंद पडण्याचा सिलसिला अधेमधे सुरूच राहतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावर होण‍ार परिणाम

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडी येथील उपसा केंद्राजवळील पाण्याची पातळी खालावत चालल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, खालावत चाललेल्या पाणी पातळीबाबत मुख्याधिकारी सुनील पवार यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाला पत्र पाठविले जाणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा या नद्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पंचगंगा नदी प्रदुषित झाल्याने व पाणी मैलायुक्त असल्याने येथील उपसा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेवरच अवलंबून रहावे लागते. काही दिवसापूर्वी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने शहराला आठवडाभर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच वणवण करावी लागली होती. सध्या पावसाने ओढ दिल्याने नद्यांच्या पाण्याची पातळी घटत चालली आहे. मजरेवाडी येथील उपसा केंद्राजवळील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे उपसा करण्यासाठी आवश्यक पाणीस्तर खाली गेल्यास येथील उपसा पूर्णत: बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पंचगंगा नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून देण्यात आला आहे. गत आठवड्यात पंचगंगा नदीतील पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर शहरात जुलाब, उलटीची साथ सुरु झाली होती. त्यामुळे उपसा बंद ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाषांतराची भरतेय धडकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हातकणंगले तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविद्या अडचणीची ठरत असून महा-ई-सेवा, संग्रामसेवा केंद्रे यासारख्या केंद्राकडे अर्ज भरत असताना काल रूई येथे इंग्रजीमध्ये शब्दांचे मराठीत भाषांतर होत असताना चुकीचे येत आहे. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कारण ऑनलाइन प्रक्रियेबाबत खुद्द निवडणूक अधिकारी, ऑपरेटर, उमेदवार यापैकी कोणालाही अधिक माहिती नाही. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

ग्रामपंचातय निवडणुकीसाठी प्रथमच ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणूकीसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर त्रासदायक ठरत आहे. तालुक्यातील २० महा-ई-सेवा व संग्राम केंद्रे आदी ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक विभागाने सर्व महा-ई-सेवा व संग्राम केंद्रांतील चालकांना एकवेळ प्रशिक्षण दिले आहे. तसेच निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाही याबाबत अधिक माहिती नाही. तसेच उमेदवारांना अर्ज भरतेवेळी वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, ग्रामपंचायत थकबाकी नसल्याबाबताचा दाखला, शौचालय व दोन अपत्ये असलेबाबतचा दाखला, बँकेचे खाते, मागासवर्गीय दाखले अशा प्रकारचे सर्व दाखले अर्ज भरताना आवश्यक आहेत. सर्व दाखले गोळा करताना उमेदवारांची त्रेधातिरपट उडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच ऑनलाइन अर्ज भरताना सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून घेतली जातात. त्यामध्ये एखादा दाखला कमी असल्यास उमेदवाराबरोबर ऑपरेटरचाही गोंधळ उडतो. रूई येथे एका उमेदवाराचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्रजीमध्ये Khot टाईप केले असताना मराठीमध्ये खोत ऐवजी खोट असा उल्लेख आला. त्यानंतर संबंधित उमेदवार व ऑपरेटरने ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असता, आम्ही याबाबत काही करू शकत नाही असे सांगून हात झटकले. अशा व अनेक गंभीर चुका होत असून उमेदवाराच्या अर्जाबद्दल खुद्द निवडणूक अधिकारीही खात्री देवू शकत नाही. अशा अनेक कारणांमुळे उमेदवारांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करत असताना मागासवर्गीय, ओ.बी.सी. समाजातील अनेकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. दाखले अपलोड करताना काही त्रुटी आल्यास अर्ज भरता जाऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारांच्या अर्जाचा छानणीची जबाबदारी कोण घेणार? ऑपरेटर व प्रशासन यांनी विचार करणे गरजेचे आहे.

- जितेंद्र यादव, रूई

ऑनलाइन फॉर्म भरत असताना उमेदवारांच्याकडून हार्ड कॉपी घेणार असल्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यास तत्काळ दूर करून कोणालाही त्रास होणार नाही याची पूरेपूर काळजी घेणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी घाबरून जाऊ नये

- द‌ीपक शिंदे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत शेतमजुराचा खून

0
0

इचलकरंजी : येथील आमराई मळा परिसरातील भारत गॅस गोडावून जवळील कुरबेट्टी यांच्या शेतात अंकुश उर्फ माणिक आण्णाप्पा वाघमारे या शेतमजूरचा डोळ्यात चटणीपूड टाकून आणि धारदार शस्त्राने वार करुन खून झाल्याची मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. मयत अंकुश याच्या अंगावर मारेकऱ्यांनी सुमारे १० ते १२ वार केले असून सकाळच्या सुमारास हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सांगली रोडवरील आमराई मळा परिसरात कुरुबिट्टे यांचे उसाचे शेत आहे. याच शेतात अंकुश हा काम करीत होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुरबेट्टी आणि अंकुश यांच्यात मोबाइवर बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर उशीरापर्यंत अंकुशचा फोन बंदच लागत असल्याने कुरबेट्टी व त्यांचे सहकाऱ्यांनी शेतात जाऊन अंकुशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेतात पाला-पाचोळ्याचा मोठा थर दिसून आला. त्याठिकाणी त्यांनी जाऊन पाहिले असता पाला-पाचोळ्याखाली अंकुशचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत पडला असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती तातडीने गावभाग पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जातून ठेव घेतल्यास कारवाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक व अन्य कर्जातून सुरू केलेली पाच टक्के ठेव कपात करून घेऊ नये, असा आदेश कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक राजेंद्र कुमार दराडे यांनी दिले आहेत. तसेच ठेव कपात केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक यु.एस. सहा यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन बॅकेच्या ठेव कपातीच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच बँकेवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले होते. यानंतर दराडे यांनी आदेश काढले आहेत.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक व विविध कर्जाला पाच टक्के कपातीचा निर्णय घेतला होता. सेवा सोसायट्या पाच टक्के शेअर्स कपात करून घेतात. त्याचबरोबर आता जिल्हा बँकेनेही पाच टक्के ठेव कपातीचा घाट घातल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. तसेच या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. ९ जुलै रोजी बॅकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता.

दरम्यान विभागीय सहनिंबधक राजेंद्र कुमार दराडे यांनी बँकेला आदेश दिले आहेत. कर्जाच्या रकमेतून शेअर्स रक्कम व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपामया कपाती बंधनकारक करता येत नाहीत. व्यवस्थापनाने कर्जाच्या रक्कमातून ठेव कपातीचा निर्णयाने शासकीय ध्येय धोरण, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व नाबार्डच्या मार्गदर्शन सूचना व बँक उपविधीचे उल्लंघन झाल्याने, बँकेने ठेव कपात करून घेऊ नये असे आदेश दिलेले आहेत.

बँकेच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. यात आम्ही चुकीचे काहीच केले नाही. सहकार खात्याने जो आदेश काढला आहे, तो आम्ही मानणार नाही, आम्ही ठेव घेणारच. त्यांना कोणती कारवाई करायचे ती त्यांनी खुशाल करावी.

- आमदार हसन मुश्रीफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हीएच कंपनी विरोधात एकत्र या

0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील वादग्रस्त एव्हीएच प्रकल्पाच्या हद्दपारीसाठी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जनतेने एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. जोपर्यंत प्रकल्प हद्दपार होत नाही. तोपर्यंत नागरीकांनी गरज भासेल त्यावेळी हाकेला साथ दिली पाहिजे. कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांची कंपनीकडून सत्यता पडताळावी व सत्य जनतेसमोर आणावे, असे आवाहन असे आवाहन आंदोलन कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी केले. चंदगड येथील रवळनाथ पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

रामराजे कुपेकर यांनी प्रास्ताविकात एव्हीएच आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शंभर जणांची कमिटी स्थापन केल्याचे सांगितले. डॉ. बाभूळकर पुढे म्हणाल्या, 'एव्हीएचसाठी नियुक्त केलेल्या निरीच्या चौकशी समितीमध्ये सरकारने स्थानिक दोन तज्ज्ञांचा समावेश करावा. या कमिटीने प्रकल्पाला भेट देऊन परिसरातील नद्या, डोंगर, बंधारे यांची पाहणी करावी. आजूबाजूला रहात असलेल्या लोकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. कंपनी विरोधात सादर केलेल्या कागदपत्रांची तज्ज्ञ कमिटीकडून तपासणी करून घ्यावी. त्यामुळे एव्हीएचचच्या अंतिम लढाईसाठी सज्ज व्हावे. ज्याच्यासाठी हा प्रकल्प करत आहात. त्यांनाच तो नको असल्याने लोकभावना लक्षात घ्यावी.'

अॅड. संतोष मळवीकर म्हणाले, 'एव्हीएच कंपनीने आपले हस्तक गावा-गावांत पसरविले आहेत. ते लोकांच्या मनात कंपनीविषयी जिव्हाळ्याची भावना निर्माण करत आहेत. अशा लोकांच्यापासून सावध रहा. अमिषाला बळी पडू देवू नका. एव्हीएचवरून भविष्यात भांडणे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा तालुक्यातील गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आता आली असल्याचे सांगितले.

'गोकुळ'चे संचालक राजेश पाटील म्हणाले, 'सरकारच्या समितीवर आमचा विश्वास नसून या समितीमध्ये कंपनीच्या जवळचे लोक आहेत. त्यामुळे पुन्हा संघर्ष केल्याशिवाय पर्याय उरला नाही.' यावेळी माजी जि. प. सदस्य बाबूराव हळदणकर, विष्णू गावडे, तृप्ती वणकुंद्रे यांनी भूमिका मांडली. यावेळी अरुण पिळणकर, दयानंद काणेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गेल्या आठ दिवसांपासून वेगाने घडामोडी सुरू असलेल्या गडहिंग्लज नगरपरिषदेत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत जनता दलाने अन्य पक्षांच्या सहाय्याने सत्तांतर घडवून आणले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूणा शिंदे यांचा एका मताने पराभव करत जनता दलाच्या राजेश बोरगावे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या सुंदराबाई बिलावर यांनी अपेक्षेप्रमाणे बंडखोरी करत जनता दलाला साथ दिली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या सत्तेला शह देण्यासाठी जनता दल आणि अन्य पक्षांनी हातमिळवणी केली. त्याला शिवसेनेने बळ दिले. संजय घाटगे यांनी या निवडीत महत्त्वाची भूमिका निभावली.

नगराध्यक्षपदाचे भिजते घोंगडे' लांबणीवर ठेवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटाला पराभवाची नाचक्की सोसावी लागली. अत्यंत चुरशीने झालेल्या गडहिंग्लज नगरपालिका निवडणूकीत अखेर सत्तांतर झाले. निवडीनंतर गुलालाच्या उधळणीत 'काळभैरीच्या नवान चांगभल'च्या जयघोषात जनतादलाचे कार्यकर्ते न्हाऊन निघाले.

नगरपालिकेत १७ पैकी राष्ट्रवादीचे नऊ, जनतादलाचे सात व जनसुराज्यचा एक नगरसेवक आहेत. गेली साडेतीन वर्ष पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती तर जनतादल विरोधी म्हणून कार्यरत होते. पहिल्या अडीच वर्षाच्या काळात मंजुषा कदम नगराध्यक्षा होत्या. मात्र दुसऱ्या टप्प्यात नगरध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे तीन इच्छुक उमेदवार असल्याने समान संधीचे वाटप करीत पहिल्या सत्रात लक्ष्मी घुगरे यांना संधी दिली. राष्ट्रवादीकडून अरुणा शिंदे आणि विरोधी जनतादल गटातून राजेश बोरगावे यांनी अर्ज दाखल केला होता.

तहसीलदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी आकरा वाजता शाहू सभागृहात सभेला सुरवात झाली. हात उंचावून मतदान घेतले. त्यात ९ विरुद्ध ८ मतांनी बोरगावे निवडून आले. विरोधी बाकावर बसलेल्या जनतादलाला सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रवादी गटातील सुंदराबाई बिलावर यांचे मत निर्णायक ठरले. बिलावर या गेल्या काही दिवसांपासून प्रकृती असवस्थ असल्याकारणाने कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना वाहनातून सभागृहांपर्यंत आणताना जनतादलाकडून विशेष काळजी घेतली.

पालिकेला छावणीचे स्वरूप

नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पालिका इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिकासह परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होती. पोल‌िस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील (गडहिंग्लज) व अंगद जाधवर (चंदगड) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला. बॅरिकेट लावून रस्ता अडविण्यात आला होता.

बहिणीनंतर भाऊ नगराध्यक्ष

लक्ष्मी घुगरे आणि राजेश बोरगावे हे सख्खे-चुलत भावंडे आहेत. बोरगावे यांच्या आधी राष्ट्रवादीकडून घुगरे यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. आज बहिणीच्या हातातून सत्ता भावाकडे आली. यानिमित्ताने गडहिंग्लजकरांनी एक योगायोग पाहायला मिळाला. तहसीलदार पाटील यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष बोरगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी यांचे अभिनंदन केले.

मुश्रीफांना रोखण्यासाठीच

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने हसन मुश्रीफ नगराध्यक्ष ठरवत होते. मागील काही वर्षांतील घोळ पाहता, सदस्यांमध्ये नाराजी होती. शिवाय कागल विधानसभेची गणिते पाहता गडहिंग्लज शहर महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडीत संजय घाटगे, विजय देवणे यांनी लक्ष घालून एकही सदस्य नसताना जनता दलाला मोठी मदत केली. हे केवळ मुश्रीफ यांना रोखण्यासाठी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images