Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उर्दू पटसंख्येची अट शिथिल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्पसंख्याक मराठी भाषा फाउंडेशन वर्ग २०१५-१६ करिता ८ वी व १० वी उर्दू या वर्गाची विद्यार्थी पटसंख्येची अट शिथिल करावी, या मागणीसाठी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी यांना निवेदन देण्यात आले.

यासंबंधी सोसायटीचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, 'अल्पसंख्याक मराठी भाषा फाउंडेशन वर्गांतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी उर्दू माध्यम या वर्गासाठी मुख्य मराठी, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारक पात्र शैक्षणिक अर्हता असलेल्या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत होती. त्यांना २०११-१२ पासून जुलै ते मार्च महिन्याकरिता महिन्याला तीन हजार ए‌कत्रित मानधन देण्यात येत होते. त्यावेळेस ८ ते १० वी या तीन वर्गाच्या ए‌कत्रित पटसंख्येबाबत कोणतीही अट नव्हती. त्यामुळे अल्पसंख्याक शाळेतील मराठी फाउंडेशन शिक्षक नियुक्तीमुळे सरकारच्या या योजनेची उद्दिष्ट्ये साध्य होण्यास मदत होत होती. मात्र सरकारच्या २७ एप्रिलच्या आदेशानुसार योजनेचा लाभ घेता येणार नाही. या शैक्षणिक वर्षामध्ये या आदेशानुसार मानधन पाच हजार रूपये करण्यात आले, पण विद्यार्थी संख्या ८ वी ते १० वी करिता १८० ते २०० पर्यंत एक शिक्षक नियुक्त करता येईल असे निर्देश देण्यात आले आहे.'

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना विकासामध्ये ‌किंवा प्रगतीमध्ये सहभागी करून घेणे हा सरकारचा मूळ उद्देशच या पटसंख्येच्या जाचक अटीमुळे बाजूला गेला आहे. हा आदेश रद्द करून पूर्वीप्रमणेच आदेश जारी करावा, शिक्षक नियुक्ती करण्याचे आदेशही द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात सोसायटीच्या सदस्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहाआसनी रिक्षांकडून प्रदूषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिकृत ऑटो रिक्षा व केएमटी बस वाहतुकीच्या तोट्यास कारणीभूत असणाऱ्या सहा सिटर रिक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. कोल्हापूर शहरात गेल्या दहा वर्षांत सहा सीटर रिक्षा व्यवसायाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. सहा सीटर रिक्षा डिझेलवर चालत असल्याने शहर परिसरात व्यवसाय करण्यास या रिक्षांना बंदी आहे. या रिक्षावर बंदी घालावी म्हणून राजकीय संघटना, सामाजिक संघटनांकडून मागणी होत असते. आरटीओकडून सहा सीटरवर कारवाई सुरू झाल्यावर राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होता. आघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी राजकीय नेत्यांनी सहा सीटर रिक्षांच्या वाहतुकीला पाठबळ दिल्याने आरटीओकडून जुजबी कारवाई होत होती.

कोल्हापूर शहरात १०० हून अधिक सहा सीटर रिक्षा आहेत. कोल्हापूर ते शिरोली, कोल्हापूर ते गांधीनगर, कोल्हापूर ते टोप या मार्गावर या रिक्षांची वाहतूक होते. या वाहनांची कोणतीही तपासणी होत नाही. सर्व रिक्षा धूर ओकत असतात. सहा सीडरच्या बहुतांशी रिक्षांच्या धुराची चाचणी आरटीओकडून झालेली नाही. माळकर तिकटी, माळकर तिकटी, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात प्रवासी वाहतूक पळवण्यासाठी सहा सिडर रिक्षा चालू स्थितीत रस्त्यांवर उभ्या करतात. त्यामुळे धुरांचे लोट या परिसरातील रस्त्यांवर पसरत असतात.

सहा सीटरचे चालक प्रवासी पळवण्यासाठी धोकादायक पध्दतीने वाहने पार्क करतात. तसेच एसटी व बसेसच्या पुढे रिक्षा नेण्यासाठी या चालकांच्यात स्पर्धा सुरू असते. स्पर्धेमुळे प्रवाशांची धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरू असते. आरटीओ, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व हद्दीतील पोलिस ठाण्यातला हप्ता पोचत असल्याने सहा सीटर रिक्षांची वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या रिक्षांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ व पोलिस कचरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा वाहतूक : ३३ वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीर प्रवासी वाहतूक काळ्या पिवळ्या जीप, रिक्षा, अॅपे, मिनीडोअर, ओमनी व्हॅन अशा ३३ वाहनांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३० वाहने जप्त करण्यात आली असून आरटीओ, ट्रॅफिक पोलिस व केएमटी यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. दोन दिवसांत ५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

कागदपत्रे सोबत नसणे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, खासगी वाहनातून प्रवाशांची वाहतूक, ग्रामीण परवाना असताना शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. विविध भागांमध्ये तपासणी पथकांकडून अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली. काही रिक्षा तसेच जीप यांना प्रवासी वाहतुकीसाठी ग्रामीण परवाना असताना शहरात वाहतूक करत होत्या. अॅप्पे तसेच तीन आसनी रिक्षाचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना सापडले.

तर ओमनी व टाटा मॅजिक या खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. अशा ३३ वाहनांवर पथकाने कारवाई केली. त्यापैकी ३० वाहने जप्त करुन संभाजीनगर बसस्थानक तसेच केएमटीच्या वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आली आहेत.

बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीबाबत सातत्याने कारवाईची मागणी केली जात असल्याने आरटीओ लक्ष्मण दराडे व ट्रॅफिक ​पोलिस ​निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयातील श्रीनिवास जल्लावर, ऋषिकेश कोराणे, इंद्रजीत आमटे, सुरेश आव्हाड यांच्यासह चार ट्रॅफिक पोलिस, केएमटीचे अधिकारी अशा संयुक्त पथकाकडून कारवाई केली जात आहे. ही कारवाई सातत्याने केली जाणार आहे.

कारवाई करण्यात आलेली वाहने

अॅपे रिक्षा १८, बजाज मिनीडोअर २, काळी पिवळी जीप १, टाटा मॅजिक १, ओमनी व्हॅन ३, तीन आसनी रिक्षा ७ अशी वाहने जप्त करण्यात आली. बुधवारपासून सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत गुरुवारी २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी ३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यासाठी २०० वाहनांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ३५ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावी वधूवर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विवाहानंतर मोटारसायकल मिळणार नाही, असे भावी वधूने स्पष्ट केल्यानंतर चिडलेल्या वराने वधूवर चाकूने वार केले. त्यात ती जखमी झाली आहे. ही घटना राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली.

यादवनगर परिसरातील एका युवतीचा जोतिबा रोड परिसरातील एका युवकाशी विवाह ठरला आहे. युवतीच्या पित्याचा वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. युवतीच्या पित्याने साखरपुडा धूमधडाक्याने साजरा केला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विवाहाची तारीखही निश्चित केली. गुरुवारी सायंकाळी भावी वर वधूच्या घरी भेटायला गेला. यावेळी त्याने मोटारसायकलची मागणी केली. वधूच्या आईने घरातील पुरुष मंडळी आल्यावर निर्णय घेऊ, अशी समजूत काढली. पण भावी वर मोटारसायकलसाठी अडून बसल्यावर चिडलेल्या वधूने मोटारसायकल देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर चिडलेल्या वराने चाकूने वधूवर हल्ला चढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅकर होणार अॅक्टिव्ह

$
0
0



जान्हवी सराटे,कोल्हापूर

बेकायदेशीर होणारी गर्भलिंग निदान चाचणी रोखून गर्भातील निष्पाप कळ्या उमलण्यासाठी काही वर्षांपूर्वी सायलेंट ऑब्झर्व्हर सिस्टीम सुरू केली. मात्र, त्यातही त्रुटी असल्यामुळे त्यानंतर अॅक्टिव्ह ट्रॅकर हे डिव्हाइस सुरू करण्यात आले. गेली काही वर्षे बंद असलेले हे अॅक्ट‌िव्ह ट्रॅकर पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत दिले आहेत.

सात वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्म‌ीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोनोग्राफी मशिन्सना सायलेंट ऑब्झर्व्हर बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार सर्व सोनोग्राफी मशिन्सना एस. आय. ओ. बी. बसविण्यात आले होते. सायलेंट ऑब्झर्व्हरमार्फत प्रत्येक गरोदर स्त्रीचा एफ फॉर्म 'सेव्ह द बेबी गर्ल'च्या वेबसाइटवर ऑनलाइन करणे चालू करण्यात आले होते. पण, यामध्ये त्रुटी असल्यामुळे सायलेंट ऑब्झर्व्हर चालू बंद करणे शक्य होते, त्यामुळे ते बंद ठेवून सोनोग्राफी चालू ठेवण्याची शक्यता अधिक होती. यावर चाप बसण्यासाठी अॅक्ट‌िव्ह ट्रॅकर हे नवीन डिव्हाइस सर्व सोनोग्राफी केंद्रांना बसविण्यात आले होते. अॅक्ट‌िव्ह ट्रॅकर हे डिव्हाइस सोनोग्राफीला मशिनला जोडले असल्यामुळे स्वतंत्रपणे चालू किंवा बंद करता येत नव्हते. सोनोग्राफी मशिन सुरू केल्याबरोबर त्वरित अॅक्ट‌िव्ह ट्रॅकरसुद्धा चालू होत असत; पण काही कालावधीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने हे मशिन बंद करून राज्यातील सर्व सोनोग्राफी मशिनशी कनेक्ट केले. http://pcpndt.mahaonline.gov. in या संकेतस्थळावर एफ फॉर्म ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू केली. पण या सरकारच्या प‌्रक्रियेमुळे पुन्हा बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणे सरकारनेच सोपे करून दिले. राज्यातील काही भागामध्ये मुलींचे प्रमाण चिंताजनक असल्याचे वास्तव पुढे आल्यानंतर जानेवारीमध्ये 'बेटी बचाव बेटी पढाओ' या योनजेनेची सुरुवात केली आणि याच माध्यमातून पुन्हा अॅक्ट‌िव्ह ट्रॅकर सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात मॅग्नम ओपस या खासगी कंपनीद्वारे अॅक्ट‌िव्ह ट्रॅकर अॅक्ट‌िव्ह करण्यात येणार आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेतून सोनोग्राफी केंद्राची तपासणी, ऑनलाइन एफ फार्म, कार्यशाळा, कोर्ट केसेसचा आढावा‌, जिल्हा सल्लागार समिती सभा, पीसीपीएनडीटी कक्ष, हेल्पलाइन, ट्रॅकिंग सिस्टीम अशा उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

'आमची मुलगी' हेल्पलाइन

या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार व हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून www.amuchimulgi.gov.in या संक्रेत स्थळावर व १८००२३३४४७५ या हेल्पलाइनवर बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी संदर्भात तक्रार करता येणार आहे. येथे येणाऱ्या तक्रारींची चौकशी संबंधित समुचित प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग : जामीन फेटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गर्भलिंग चाचणीसाठी चिनी बनावटीचे अनधिकृत सोनाग्राफी मशिन खरेदी करणाऱ्या सहा संशयितांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. दरम्यान सोनोग्राफी मशिन विकेता एजंट श्रीपाद मधुसुदन गाड (वय ६३, रा. अंधेरी, मुंबई) याला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. गेल्या आठवड्यात जुना वाशी नाक्याजवळ महागड्या मोटारीत चिनी बनावटीच्या सोनोग्राफी मशिनसह बोगस डॉक्टर हिंदूराव पोवार, डॉ. हर्षल नाईक, चालक सुशांत दळवी यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना डॉ. विक्रम आडके, एजंट गजेंद्र कुसाळे, गजानन शिंदे यांना अटक केली. संशयित सहाही आरोपींनी न्यायालयात जामिनांसाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. मुख्य एजंट श्रीपाद गाड याने दिल्लीहून सोनोग्राफी मशिन खरेदी करून विक्री केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रफिती, म्युरल्स आणि खडखडा

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील काही वस्तू, महाराजांचा खडखडा, म्युरल्स, महाराजांच्या चित्रफितींबरोबरच लायब्ररी आणि संशोधन केंद्राचा समावेश शाहू जन्मस्थळी उभारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयात करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने बनविलेला प्राथमिक आराखडा निधीच्या तरतुदीसाठी सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

शाहू जन्मस्थळाच्या विकासासाठी ऑगस्ट २०११ मध्ये सुरुवात झाली. त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार इमारतींचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वस्तुसंग्रहालय हा या कामातील मुख्य गाभा आहे. त्यासाठी आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर व पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने पाच कोटी रुपयांचा खर्चाचा तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संग्रहालयासाठी प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. समितीने त्या आराखड्याचा अभ्यास करून काय हवे याच्या सूचना करायच्या होत्या. त्यानुसार या समितीने प्राथमिक आराखडा तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीप्रकरणी एकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे नंदकुमार जोतिबा गावडे यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी द्या, नाहीतर दुकान खाली करा, खंडणी न दिल्यास जातीवाचक केस करीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित काशिनाथ हणमंत कांबळे (रा. माणगाव) याला चंदगड पोलिसांनी अटक केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.

याबाबत माहिती अशी ः नंदकुमार गावडे यांचे पाटणे फाटा येथे सुजाता स्टेशनरी दुकान आहे. ही जागा विलास गडकरी (कलिवडे) यांच्याकडून गावडे यांनी पंधरा वर्षांपूर्वी पंधरा हजार रुपयांच्या डिपॉझीटवर भाडेतत्त्वावर घेतली आहे. गावडेच्या पाठीमागील बाजूस काशिनाश कांबळे याने सहा महिन्यांपूर्वी शेड मारून दुकान गाळा तयार केला आहे. गावडे बुधवारी नेहमीप्रमाणे दुकानात गेले असता कांबळेने गावडे यांना तुम्ही दुकान चालवत असलेली जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे पन्नास हजार रुपये खंडणी द्या, अन्यथा दुकानगाळा खाली करा, अन्यथा तुमचा गाळा पाडू. खंडणी न दिल्यास तुमच्याविरुध्द जातीवाचक फिर्याद देण्याची धमकी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज दरवाढीचा भुर्दंड छोट्या यंत्रमागधारकांना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विद्युत नियामक आयोगाच्या आदेशामुळे निश्चित झालेल्या नवीन वीज आकारानुसार २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांच्या वीज आकारात प्रति युनिट ३७ पैसे वाढ झाली आहे. तर २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांच्या वीज आकारात १३ पैसे प्रति युनिट घट झाली आहे.

हा थेट फरक प्रति युनिट ५० पैसे आहे. शिवाय रात्रीची वीजदर सवलत २५० पैसे युनिट वरुन १५० पैसे युनिट झाल्याने प्रति युनिट १२ पैसे वाढणार आहेत. त्याचा भुर्दंड लहान यंत्रमागधारकांवर पडणार आहे. २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांच्या बिलात वाढ होणार नाही. त्यामुळे राज्यातील २७ अश्वशक्तीखालील छोट्या यंत्रमागधारकांवरील हा वाढीव बोजा रद्द करावा व सर्व लघुदाब यंत्रमागधारकांना एकच समान वीजदर लागू करावी, अशी मागणी राज्यातील सर्व यंत्रमागधारक संघटनांनी व यंत्रमाग क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधीनी राज्य सरकारने त्व‌रीत करावी, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे.

२७ अश्वशक्तीखालील अनेक यंत्रमागधारकांनी अद्याप टीओडी मीटर लावलेले नाही. टीओडी बिलिंग होत नाही. त्याच्यावर आणखी २२ पैसे प्रति युनिट वाढ होईल. त्यांचे बिलिंग ३.५३ रुपये प्रति युनिट होईल. त्यामुळे अशा यंत्रमागधारकांनी ताबडतोब अर्ज करुन टीओडी मीटर व बिलींग सुरु करुन घ्यावे, असे आवाहनही होगाडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या संदेशासाठी अभिषेकचे अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बारा राज्यातील १८८ जिल्ह्यातील ७३०० गावांना भेटी देत व तब्बल ९८०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून उत्तर प्रदेशमधील एक स्वच्छतादूत शनिवारी जिल्ह्यात आला आहे. अभिषेककुमार शर्मा असे त्याचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित होऊन अभिषेकने एका खासगी संस्थेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून एक वर्ष देशासाठी समर्पित करण्याचा निर्धार केला. गेल्या वर्षी १० नोव्हेंबरपासून अभिषेकने हा प्रवास सुरू केला.

दिवसभर अभिषेकने कोल्हापुरात सायकलवरुन फिरून स्वच्छतेचा संदेश दिला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अभिषेकला शुभेच्छा दिल्या. 'गावोगावी स्वच्छतेचे फायदे समजावून सांगणारा हा स्वच्छतादूत आहे, अशा शब्दांत डॉ. सैनी यांनी गौरव केला.

उत्तर प्रदेशमधील फतेहगडचा रहिवासी असलेल्या अभिषेकने पर्यावरण शास्त्रातून एम.एस्सी आणि एम.फीलचे शिक्षण घेतले आहे. त्याचे घनकचरा व्यवस्थापनामध्ये संशोधन सुरू आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मजल-दरमजल करत स्वच्छ भारत अभियानाचा संदेश घेऊन अभिषेक कोल्हापुरात पोहोचला आहे. देश स्वच्छ राहावा, कुणीही आजारी पडू नये, ही भावना मनात ठेवून गावोगावी स्वच्छतेचे महत्त्व व फायदे समजावून सांगत आहे. आतापर्यंत ९ लाख २० हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे २ हजार ३७६ पाठ दिलेत. सरकारी कार्यालयांपासून विविध कारखाने आणि अगदी चहाटपरीवरही तो स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अच्छे दिन नरेंद्र, देवेंद्र अन् भाजपलाच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र व राज्य सरकारची धोरणे पाहता भाजपचे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि भाजप कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन' आले आहेत. मात्र, सर्वसामान्यांची अजूनही ससेहोलपट सुरूच आहे,' अशी उपरोधिक टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शाहू स्मारक मिनी सभागृहामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर होते.

कवाडे म्हणाले, 'यूपीएच्या काळात सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली. निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसचे जहाज बुडणार याची पूर्ण कल्पना असताना पीपल्स रिपब्लिकन पक्ष ताकदीनिशी काँग्रेसच्या पाठीशी राहिला. अनेक स्वकियांनी जातीयवादी पक्षांचा आधार घेतला. निवडणूक काळापूरते तयार होणारे नेते म्हणजे पावसाळ्यातील बेडूकच आहेत. अनेक सत्कार समारंभामध्ये सहभागी होताना रिपब्लिकन नेत्यांची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐक्यासाठी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आदी प्रमुखांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनीही ऐक्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे लवकरच ऐक्य घडून येईल.'

कवाडे पुढे म्हणाले, 'माणगाव येथील राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष संघर्ष करत आहे. मात्र, काही नेते निवडणुकीच्या काळात सक्रिय होऊन स्मारकासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगतात. आता पक्षाने भरपूर समाजकारण केले, आता राजकारण करण्याची वेळ आली आहे.' पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या कवाडेंचा नंदकुमार गोंधळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमनाथ घोडेराव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीएससीत कोल्हापूर झळकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूरने बाजी मारली. जिल्ह्यातील सरूड (ता.शाहूवाडी) येथील अजित कुंभार हे २९२ व्या रॅंकने, राहुल कर्डिले ४२२ व्या रॅंकने तर कूर (ता.भुदरगड) येथील कुलदीप कुंभार हे ८६७ व्या रॅंकने उत्तीर्ण झाले.

सरूड येथील अजित कुंभार यांनी पुन्हा एकदा युपीएससी निकालावर आपली मोहोर उमटवली आहे. मागील वर्षी त्यांची भारतीय पोलिस सेवेत निवड झाली असून सध्या ते हैद्राबाद येथील वल्लभभाई पटेल पोलिस अॅकॅडमीत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे वडिल बाळासाहेब कुंभार हे प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आाहे. आपल्या यशाबाबत बोलताना ते म्हणाले, 'युवकांनी हार न मानता येणाऱ्या परिस्थितीशी झगडायला हवे. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अखंड श्रम केले पाहिजेत. ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड सोडून ध्येय गाठले पाहिजे. '

मूळचे गेवराई (ता.नेवासा,जि. अहमदनगर) येथील राहुल कर्डिले मागील दोन वर्षांपासून येथील प्रि आएएस ट्रेनिंगमध्ये अभ्यास करत असून सध्या ते उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना कर्डिले म्हणाले,'२०११ मध्ये मंत्रालयीन सहायक पदावर निवड होऊनही केवळ युपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी हे पद मी स्वीकारले नाही. माझ्या या निर्णयाचा आदर करत कुटुंबियांनीही मला पाठिंबा दिला. पण त्यानंतर मागील वर्षी मी उपनिबंधक पदावर निवड झाल्यानंतर मात्र हे पद स्वीकारून अभ्यास करत राहिलो.'

कर्डिले यांचे वडील शिक्षक होते, तर आई गृहीणी आहे. त्यांनी नगर येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातून इनस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. या काळात नगरमध्ये कार्यरत असणाऱ्या ​उच्च अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षा देण्याचे बीज रोवले गेले. प्रारंभीची तीन वर्षे त्यांनी कोणतीही नोकरी न करता अभ्यास केला. मुख्य परीक्षेला माझा मराठी वाड्मय हा विषय होता. यासाठी मी प्रा. वसंत आबाजी डहाके आणि प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी चर्चा केल्या. त्याचबरोबर वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांचाही चांगला उपयोग झाला. माझी मुलाखत ही लोकल ते ग्लोबल अशी झाली. मुख्य परीक्षेत अथवा मुलाखतीमध्ये उत्तर देताना कोणत्याही गोष्टीचा संबंध जोडता आला पाहिजे म्हणजेच इंटरलिंकिंग करता आले पाहिजे.' कर्डिले यांच्या पत्नी प्रियांका या कोल्हापूर येथे असिस्टंट सेल्सटॅक्स कमिशनर म्हणून कार्यरत आहेत.

कूर (ता. भुदरगड) येथील कुलदिप शिवाजी कुंभार यांनी ८६७ वया रॅंकने उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकत आणि परिस्थितीशी दोन हात करत युपीएससी परिक्षेत यश मिळविले आहे. कुलदीप कुंभार यांच्या आई-वडीलांचा व्यवसाय कुंभारकाम हा आहे.

शिवाजी आणि सुनंदा कुंभार या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कुलदीप यांनी परिस्थितीशी संघर्ष करतच शिक्षण घेतले. कूर येथील कुंभार समाजाला चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. तथापि, शिवाजी कुंभार यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या शिवाजी कुंभार यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या आईने चुली बनवून आणि घरी कोंबड्या पाळून मुले आणि नातवंडे यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. कुंभार यांनी शेती तसेच शेतमजुरी करून आपल्या दोन्ही मुलांना शिकविण्याचा विडा उचलला होता आणि त्यांच्या मुलांनीही त्याचे सोने केले.

कुलदीप कुंभार यांचे प्राथमिक शिक्षक केंद्र शाळा कूर येथे झाले. माध्यमिक शिक्षण, सैनिक स्कूल सातारा व शाहकुमार भवन गारगोटी येथे झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेज येथे झाले. पदवीचे शिक्षण त्यांनी दूधसागर कॉलेज बिद्री येथे घेतले. तर एम. सी. ए चे शिक्षण फिनोलेक्स कॉलेज रत्नागिरी येथे घेतले. युपीएससीसाठी त्यांनी पुणे येथे बंधू संदीप कुंभार यांच्याकडे राहून सलग तीन वर्षे तयारी केली आणि या यशाला गवसणी घातली.

स्वत: संदर्भ मिळवा

अभ्यासाबाबत राहुल कर्डिले म्हणाले,' परीक्षार्थींनी क्लास आणि नोट्सच्या पलिकडे जाऊन स्वतः संदर्भ मिळविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी रेडिओ, टीव्हीचाही वापर करावा. मी ऑल इंडिया रेडिओवरील साडेनऊच्या बातम्या आवर्जून ऐकत होतो. त्यानंतरचा स्पॉट लाईट अॅनालेसिस हा कार्यक्रमही एखादा विषय समजावून घेण्यास उपयुक्त ठरतो. तर राज्यसभा डीडी न्यूजवरील चर्चा नेहमीच उद्बबोधक अशा असतात, त्याचाही मला उपयोग झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डकरे यांनी पदभार स्वीकारला

$
0
0

कोल्हापूर : महापौरपदाबाबत हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेच्या अधीन राहून शनिवारी काँग्रेसच्या वैशाली डकरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. डकरे यांच्या कार्यालय प्रवेशानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.

राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी सैनी सकाळी अकरा वाजता आले. तत्पूर्वी माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील व काँग्रेस शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत डकरे यांनी महापालिकेत प्रवेश केला. नगरसचिव उमेश रणदिवे यांनी महापौरपदाच्या निवडीचा विषय सभेसमोर ठेवला. डकरे यांचा एकमेव अर्ज होता. ​नियमाप्रमाणे माघारीसाठी वेळ देण्यात आला. माघारीच्या कालावधीनंतर सैनी यांनी डकरे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करताच सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. मात्र माजी महापौर तृप्ती माळवी यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन राहून ही निवड जाहीर केली जात असल्याचेही सैनी यांनी नमूद केले आहे. प्रल्हाद चव्हाण यांनी डकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर पती राजेंद्र डकरे, कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यालय प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायलेंट ऑब्झर्व्हर निकामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदानाचे प्रमाण वाढत आहे. गर्भलिंगनिदान होऊ नये यासाठी याठिकाणी सायलेंट ऑब्झर्व्हसारखा उपक्रम राबवून गाजावाजा केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पावर किती खर्च करण्यात आला आणि त्याची सध्याची परिस्थिती काय? याबाबत स्टेट्स रिपोर्ट तयार करण्याची मागणी राष्ट्रीय मूल्यमापन व तपासणी समितीच्या सदस्य अॅड. वर्षा देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अॅड देशपांडे म्हणाल्या, 'जिल्ह्यात सापडलेल्या चीनी बनावटीच्या सोनोग्राफी मशीन्स या प्रगती मैदान दिल्ली येथून बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन भरविणारे आयोजक आणि त्याला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. सोनोग्राफी मशीन संबंधित यंत्रणेला माहिती दिल्याशिवाय खरेदी करता येत नाही. त्याबरोबरच मोबाइल सोनोग्राफी मशीनला एकतर परवानगी दिली जात नाही. मोठ्या दवाखान्यांमध्ये हे मशीन असेल तर ते हालविण्यासाठी देखील परवानगी घ्यावी लागते. त्याबरोबरच या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे त्यावर किती महिलांचे गर्भलिंगनिदान केले हे कळत नाही. मुलींचे कमी होणारे प्रमाण समाजासाठी घातक असून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न गरजेचे आहेत.'

देशपांडे पुढे म्हणाल्या, 'कोल्हापूर जिल्ह्यात न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेल्या डॉ. अरगडे, डॉ. टी. जी. माने, डॉ. पाटील व इतर निर्दोष मुक्तता झालेली प्रकरणे गांभीर्याने दाखल करून घ्यावीत, बेकायदेशीर फिरती सोनोग्राफी मशीन्सबाबत आशा स्वयंसेविका, अगंणवाडी सेविका यांच्या बैठका घेऊन स्वतः लक्ष घालावे. तसेच सोनोग्राफी मशीन विकणारे, तयार करणारे, गोडावूनमध्ये ठेवून घेणारे ते खरेदी करण्यासाठी पैसे पुरविणार बँका, पतसंस्था यांची त्वरीत जिल्हा स्तरावर बैठका घेण्यात येऊन त्यांची माहिती घ्यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने वाढवली बळीराजाची चिंता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनची सुरुवात नेहमीपेक्षा पंधरा दिवसांनी उशिराने झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीप पेरणीने वेग घेतला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाची चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा केवळ पन्नास टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर पन्नास टक्के क्षेत्रावरील पेरण्या अपूर्ण आहेत. पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

मान्सून वेळेत सुरू होणार, असा वेधशाळेचा अंदाज असताना मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनंतर पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसाने सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यातील पेरण्यांना वेग आला होता. पाणी देण्याची सुविधा आहे, अशा ठिकाणी खरीप भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण करून ठिकठिकाणी रोप लागण करण्यासाठी तरवाही टाकण्यात आला होता. तर कडधान्य, तृणधान्य तेलबियाण्यांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे सुरू होती, तर काही ठिकाणी या पिकांची पेरणीही करण्यात आली होती.

मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. तर पेरणी झालेल्या ठिकाणी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढील आठवड्यात पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप भाताचे सर्वाधिक क्षेत्र चंदगड, भुदरगड व शाहूवाडी तालुक्यांत असून, याच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पेरणी झाली आहे, तर सर्वात कमी पेरणी गगनबावडा, शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत झाली आहे. ज्वारी पेरणीमध्ये पन्हाळा तालुक्याने बाजी मारली आहे, तर भुदरगड, आजरा व चंदगडमध्ये सर्वाधिक तृणधान्याची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात गळीतधान्याखालील एक लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग व सोयाबीन पिकाखाली क्षेत्र सर्वाधिक असले, तरी या पिकांखालील केवळ पन्नास टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उसाला प्रतीक्षा खतांची

मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर उसाला खतांची मात्रा दिली जाते. पावासाचा विचार करून शेतकरी खतांचे नियोजन करत असतो. सुरुवातीला चांगल्या पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा दडी मारल्याने ऊस पिकाला खतांची मात्रा मिळालेली नाही. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास आणि खतांची मात्रा वेळेत न मिळाल्यास उसाची वाढ खुंटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑगस्टपासून व्यापाऱ्यांवर कारवाई

$
0
0

सांगली : एलबीटीची थकबाकी भरण्यासाठी ३१ जुलै २०१५ अखेर अभय योजना आहे. या योजनेअंतर्गत विवरणपत्र भरून सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध एक ऑगस्टपासून कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त अजीज कारचे यांनी सांगितले. अभय योजनेसंदर्भात माहिती देण्याकरिता मिरज शहरातील व्यापाऱ्यांची महापालिका विभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयुक्त बोलत होते.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरोज कोकणे यांनी सरकारने लागू केलेल्या अभय योजनेचा व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच व्यापाऱ्यांना कायदा समजावून सांगून विवरणपत्र भरून घेताना अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जाऊ नये, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी देखील सवलतींचा गैरफायदा घेऊ नये, चुकीचे वागणाऱ्या व्यापाऱ्यांना संघटना पाठीशी घालणार नाही, असेही ते म्हणाले.

आयुक्त कारचे म्हणाले, 'मुदतीत विवरणपत्रे भरणाऱ्या व्यापाऱ्यांना थकित एलबीटी रकमेवर दंड व व्याजाची माफी मिळणार आहे. जकातीच्या उत्पन्नाशी तुलना करता एलबीटी वसुली फारच कमी होत असल्याचे दिसते. त्यामुळे विविध विकास कामांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. म्हणूनच ३१ जुलैपर्यंत विवरणपत्रे भरून न देणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकातील तीन भाविकांचा मृत्यू

$
0
0

पंढरपूर : शिर्डी येथून देवदर्शन घेवून गुलबर्ग्याकडे (कर्नाटक) निघालेल्या फॉर्च्युनर गाडीला कंटेनरने दिलेल्या धडकेत फॉर्च्युनर गाडीतील अमित पाटील (वय ३२), सुभाष कोरावर (वय ५२) आणि संतोष नायर (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, शरण बिराजदार हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास शिर्डीकडून करमाळ्याकडे येत असलेल्या या गाडीला एका कंटेनरने धडक दिल्याने फॉर्च्युनर गाडी चक्काचूर झाली. धडक देणाऱ्या कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातात ठार झालेले अमित पाटील कालाबुरागीचे प्रसिद्ध उद्योजक बी. जी. पाटील यांचे चिरंजीव आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरदार खासगीवालेंची पूजा बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

यंदाच्या आषाढी एकादशीपासून दीडशे वर्षांपासून सुरू असलेली आणि पेशव्यांचे सरदार खासगीवाले यांच्याकडून होणारी एकादशीची पहिली पूजा बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. ही पूजेचा बंद केल्यामुळे वाचणारा वेळ भाविकांच्या दर्शनासाठी वापरण्यात येणार आहे. विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यात आल्यानंतर घेतलेला हा सर्वांत मोठा निर्णय आहे. आषाढी यात्रेच्या तयारीसाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पालकमंत्री विजय देशमुख, यांच्यासह सर्व पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

पेशवे काळापासून म्हणजे सुमारे १५० वर्षांपेक्षाहून अधिक वर्षे आषाढी एकादशीची पहिली पूजा करण्याचा मान खासगीवाले सरदार घराण्याचा होता. गेल्या वर्षी मंदिराचे सर्व अधिकार सरकारला मिळाल्यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ही परंपरा बंद करीत या पूजेसाठी लागणारा ४० मिनिटांचा वेळ भाविकांच्या दर्शनासाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती मंदिर समितीने हायकोर्ट आणि सरकारला कळविली आहे. या निर्णयामुळे भाविकांच्या दर्शनाला वेळ मिळणार आहे. आषाढी एकादशीला रात्री १२ वाजता सुरू होणारी ही पाद्यपूजा झाल्यावर मंदिराची नित्यपूजा आणि त्यानंतर सरकारी महापूजा होत असते. आता खासगीवाले यांची पूजा बंद केल्याने नियमित वेळेपेक्षा ४० मिनिटे आधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी सरकारी पूजा होणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी जादा वेळ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ११ लाख घरे बांधणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तंत्रशिक्षणातील ५१ हजार रिक्त जागांमुळे इतर नव्या कॉलेज व तुकड्यांची परवानगी सरसकट थांबवण्याला आपला विरोध आहे. हा प्रस्ताव केवळ तंत्रशिक्षण विभागापुरता लागू होऊ शकतो,' असे मत गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले. तसेच सरकार राज्यात ११ लाख घरे बांधण्यासाठी धोरणानुसार काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या पदाधिकारी आढावा बैठकीसाठी वायकर रविवारी सायंकाळी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'तंत्रशिक्षण विभागातील ५१ हजार जागा रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नवीन विनाअनुदानित कॉलेजना दिलेल्या मान्यतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन कॉलेज व तुकड्यांना परवानगी न देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. पण सायन्स व कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठा आहे. त्यामुळे हा प्रस्ताव इतर विद्याशाखांना लागू होऊ शकत नाही. त्याला आपला विरोध असेल. फक्त तंत्रशिक्षणासाठी हा प्रस्ताव लागू होऊ शकतो.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्याच्या संकल्पनेनुसार राज्यात ११ लाख घरे बांधण्यात येणार आहेत, असे सांगत वायकर म्हणाले, 'त्यानुसार राज्याचे गृहनिर्माणचे धोरण तयार करण्याचे काम सुरु आहे. ही घरे म्हाडा किंवा लॉटरीच्या माध्यमातून दिली जातील. या घरांसाठी जागा लागणार आहेत. त्या कशाप्रकारे उपलब्ध करायच्या, त्यांचे संपादन करायचे यांचे नियोजन सुरु आहे.' विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सरकारने जाहीर केलेला निधी रखडला असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच महापालिका निवडणुकीसाठी भाजपबरोबरच्या युतीबाबत स्थानिक पदाधिकारी, नेत्यांशी चर्चा करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. त्याचवेळी भाजपच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपाबाबत त्यांच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कारवाई वगैरे हा त्यांच्या पक्षांतर्गत शिस्तीचा भाग आहे, असेही वायकर यांनी सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कामावर पक्षप्रमुखांचे लक्ष आहे, असेही सूचकपणे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामकाज आता ई-न्यूजवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्मार्ट सिटी' योजनेसाठी निकषांची पूर्तता करण्यासाठी महापालिका प्रशासानने कंबर कसली आहे. योजनेसाठी आवश्यक निकषांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने सर्व माहिती दहा जुलैपर्यंत अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत आणि शहरवासियांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आधु​निक तंत्रज्ञानाचा अवलंबचा भाग म्हणून महापालिका दरमहा ई न्यूजची प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. महापालिकेचे कामकाज, विविध प्रकल्प, सध्या सुरू असलेल्या योजना ऑनलाइनवर झळकणार आहेत.

केंद्र सरकारने 'स्मार्ट सिटी'योजनेतील समावेशासाठी ११ निकष ठरविले आहेत. यामध्ये लोकोपयोगी उपक्रम, शहर स्वच्छतेचे प्रकल्प, ई गव्हर्नस, सांडपाणी निचरा व प्रक्रिया, घन कचरा व्यवस्थापन, ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा आदी बाबींचा समावेश आहे. आयुक्त पी. शिव शंकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून महापालिका कामकाजात ऑनलाइनचा आग्रह धरत आहेत. गतीमान कामकाज आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीची सध्य स्थिती त्यांना समजावी याकरिता ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

'महापालिकेकडून विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. महापालिका शहरवासियांशी निगडीत विविध धोरणांची आखणी करते. या सगळ्या कामांचे अपडेटस लोकांना समजावेत, महापालिकेतील कामकाजाची माहिती होण्यासाठी ई न्यूज सुरू केले जाणार आहे.'अशी माहिती अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिली. स्मार्ट सिटी योजनेच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे आवश्यक माहिती जमवली जात आहे. संबंधित विभागाने यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

आजपासून शौचालयांचा सर्व्हे

महापालिका शहराच्या स्वच्छतेसाठी कोणते उपक्रम आखते, घनकचरा व्यवस्थापन, एसटीपी प्लँन्ट याबाबीही 'स्मार्ट सिटी' विचारात घेतल्या जाणार आहेत. शहरातील किती कुटुंबांकडे व्यक्तिगत शौचालये आहेत याचाही सर्व्हे होणार आहे. पूर्वी किती शौचालये आहेत, सध्या त्यामध्ये किती वाढ झाली आहे याची तुलना होणार आहे. आरोग्य विभागामार्फत सोमवारपासून नागरिकांकडून माहिती भरून घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images