Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हिवरे हत्याकांडातील तिसऱ्या महिलेचा मृत्यू

$
0
0

कुपवाड : खानापूर तालुक्यातील हिवरे येथील हत्याकांडातील जखमी तिसरी महिला निशीगंधा बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. हिवरे) हिचाही सोमवारी पहाटे सरकारी हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, मुख्य संशयित सुधीर घोरपडे याने आपल्याला जमावाने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद विटा पोलिसांत दिली आहे. तिघांपैकी एका अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. रवींद्र कदम याला विटा कोर्टाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य संशयीत सुधीर आणि त्याचे मित्र व्यवसायानिमित्त एकत्र असायचे. कर्नाटकातील गुलबर्गा येथे ते एकत्रित आल्यानंतर २० जून रोजी सुधीरच्या बहिणीच्या आत्महत्येचा बदला घ्यायचा निर्धार तिघांनी केला असल्याचे पोलिस तपासांत उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिघांच्या हल्ल्यातील गंभीर जखमी निशिगंधा यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मच्छिमारावर मगरीचा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कृष्णा नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारावर मगरीने हल्ला करून त्याला जखमी केल्याचा प्रकार काल पलूस तालुक्यातील नागराळे-शिरगाव वेशीजवळ घडला. बबलू नूरखान पठाण, असे या जखमी मच्छिमाराचे नाव आहे. त्याचा भाऊ बादशहा पठाण याने प्रसंगावधान राखून त्याची मगरीच्या तावडीतून सुटका केली. बबलू आपला भाऊ बादशहा याच्यासह कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होते. तेवढ्यात मगरीने बबलूच्या पाय जबड्यात पकडून त्याला ओढण्यास सुरूवात केली. त्यावेळी बादशहा याने हा प्रकार पाहून आरडओरड सुरू केली. मगरीला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बबलू मगरीच्या तावडीतून सुटला पण, त्याच्या उजव्या पायावर मगरीचे सात-आठ दात लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर पलूस येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले.

दरम्यान, मगरी केवळ नदीच्या पाण्यातच नव्हेतर आता काठावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा धोका वाढला आहे. नदीकाठावरील गावातून राहणारे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अंकलखोप, भिलवडी परिसरापाठोपाठ कृष्णा नदीत मगरींच्या वाढत्या हल्ल्यांमुळे, तसेच वावरामुळे कृष्णाकाठावर असलेल्या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना पगाराची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार तीन-तीन महिने होत नाहीत. पगार लांबणीवर पडू लागल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरत आहे. इंटरनेटमुळे पगार उशिराने होत असल्याची माहिती पुढे येत आहे. शालान्त वेतन प्रणालीनुसार ऑनलाइन पगाराची प्रक्रिया लोड करण्याचे जमत नाही आणि जमलेच तर नेट ऑफलाइनवर जाते. त्यामुळे आता शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. २९ जून रोजी जिल्हा परिषदे समोर निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

मुख्य लेखाधिकारी वैभव राजेघाडगे यांची बदली झाल्यापासून म्हणजे एक वर्षंभरापासून शिक्षकांच्या पगारात अनियमतता आलेली आहे. ती अद्यापही कायम आहे. काही तालुक्यात दोन महिने, तर तासगाव तालुक्यात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळाचे पगार थकले आहेत. पूर्वी त्या-त्या तालुकापातळीवर पगाराची बीले तयार केली जात होती. परंतु, अलिकडे शालान्त वेतन प्रणालीचा अवलंबली गेल्याने सर्वांचे पगार ऑनलाइन करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. यामध्ये संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन पगार बील भरायचे आहे. त्यानंतर तालुकापातळीवर त्याची पडताळणी होऊन जिल्हा पातळीवर आल्यानंतर शिक्षकांच्या पगाराचा प्रवास संबधित शिक्षकांच्या दिशेने सुरू होतो. या ऑनलाइन प्रक्रियेतच अनेकांचे घोडे अडलेले असल्याचे समोर येत आहे. संगणकाचे संपूर्ण ज्ञान नसल्याने एकमेकाला विचारुन पगार बील भरण्यापर्यंत मुख्याध्यापक यशस्वी होतात. परंतु पुढे त्यांचे घोडे इंटरनेटमध्ये अडखळते. ग्रामीण भागात केव्हा कोठे आणि कधी नेट ऑफलाइनवर जाईल हे सांगता येत नाही. त्यात बीएसएनलचे नेट म्हणजे, 'सरकारी काम आणि सहा महिने थांब,'अशी आवस्था आहे.

२९ जूनला झेडपीसमोर आंदोलन

पगार थकल्यामुळे काही शिक्षकांची कोंडी होते तर काही शिक्षक संयम ठेवून पगाराची वाट पहात बसतात. पण, गेले वर्षभर असे होत असल्याने आता शिक्षकांनी आंदोलनाची हत्यार उपसले आहे. २९ जून रोजी जिल्हा परिषदे समोर निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी केवळ पगाराचाच नाहीतर अन्यही काही प्रश्न प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी सांगितले. अद्यापही शंभर टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश मिळालेले नाहीत. गेल्यावर्षी सुरू झालेल्या आठवीच्या वर्गांना अद्यापही शिक्षक दिलेले नाहीत. केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. या आंदोलनास येताना शिक्षकांनी रजा घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

कर्ज काढून गाठले गाव

तासगाव तालुक्यात मार्च महिन्यांपासून पगार रखडले होते. मार्चचा पगार मिळाला आहे. मात्र, अद्यापही एप्रिल आणि मे महिन्याचा पगार मिळाला नाही. उन्हाळी सुटीत जिल्ह्याबाहेरील शिक्षकांना आपल्या गावी जाण्यासाठी खिशात पैसे नव्हते. त्यामुळे काही शिक्षकांनी हात-उसने तर काहींनी कर्जे काढून गाव गाठले होते. त्यामुळे शिक्षक वैतागले आहेत. पगाराची प्रक्रिया नियमीत आणि वेळेत व्हावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंकिंगपासून सुटका

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

दरवर्षी खरीप व रब्बी पेरणीच्या कालावधीत शेतकऱ्यांना लिंकिंगला सामोरे जावे लागत असे. यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात होती. मात्र यावर्षी लिंकिंग आणि बोगस बियाणे विक्रीसोबत खत लिंकिंगला आळा घालण्यास कृषी विभागाला यश आले आहे. लिंकिंगला अटकाव करण्यासाठी कृषी विभागाने ३७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या करड्या नजरेमुळे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकही तक्रार दाखल झालेली नाही. विभागातील प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे पथकांची स्थापना केली आहे.

पेरणीच्या हंगामात कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी अनेक बोगस बियाणांसह खत्यांचे लिंकिंग केले जात होते. एका युरियाच्या पिशवीसोबत कृषी सेवा केंद्रे इतर अनावश्यक खत शेतकऱ्यांचे माथी मारत होते. तर अनेक सेवा केंद्रांवर एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येत होते. अशा गैरप्रकारांना कृषी विभागातील काही झारीतील शुक्राचार्यांचा पाठिंबा मिळत असल्याने संगनमताचा हा व्यावसाय तेजीत सुरू होता. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते.

मान्यताप्राप्त कंपनींच्या बियाणांशिवाय इतर कंपन्यांच्या बोगस बियाणांची विक्री केल्यामुळे हजारो एकरावरील पिकांपासून शेतकऱ्यांना कोणतेही उत्पादन मिळाले नसल्याच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. याला कृषी विभागातील काहींचा छुपा पाठींबा मिळत असल्याने सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची लूट केली जात होता. यावर्षी मात्र अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून विभागातील सहा हजार ७०० सेवा केंद्राची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ३० जूनपर्यंत चालणाऱ्या तपासणी मोहिमेत अद्याप एकही तक्रार पुढे आलेली नाही किंवा लिंकिंग किंवा एमआरपीपेक्षा जास्त दराने बियाणांची विक्री केल्याची तक्रार आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भरारी पथकांमुळे लिंकिंगला आळा बसला असला तरी सध्या कोल्हापूर २८, सातारा २२.८ व सांगली जिल्ह्यातील ६.३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या पावसाला दमदार सुरुवात झाल्याने बियाणांची उगवण झाल्यानंतर बियाणांचा अहवाल प्राप्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य दुकानाचा परवाना रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

दभिल (ता. आजरा) येथील स्वस्त धान्य दुकान व रॉकेल वितरणाचा परवाना ग्रामस्थ व मुक्ती संघर्ष समितीच्या प्रयत्नांनंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आल्यानंतरही दुकानचालक जयश्री यादव यांनी मंत्रालयाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कक्षाकडे पुनरिक्षणासाठी दाद मागितली होती. तेथेही संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय कायम केला असल्याचा निर्णय झाला आहे. ग्रामस्थांच्या पिळवणुकीविरोधात व हक्क संरक्षणासाठी पुकारलेल्या या लढ्याला आणखी एक निर्णायक यश मिळाले आहे. यापुढेही तालुक्यातील अशा व्यवस्थेमध्ये भरडल्या जाणाऱ्यांबरोबर संघर्षासाठी तयर असल्याचे निवेदन समितीच्या संग्राम सावंत व ग्रामस्थांनी प्रसिध्दीस दिले.

येथील स्वस्त धान्य दुकान चालकाची हुकुमशाही व ग्रामस्थांच्या अन्यायाविरोधात अनेक प्रकारची आंदोलने गेल्या वर्ष-दीड वर्षात छेडण्यात आली. सर्व प्रकारचे ठोस पुरावे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सकारात्मक अहवाल देऊनही न्याय मिळत नाही असे चित्र निर्माण झाल्यामुळे अखेर बेमुदत ठिय्या व पाच कार्यकर्त्यांच्या प्राणांतिक उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर या लढ्याला यश आले. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून संबंधितांचा परवाना रद्द करण्यात आला.

पुनरिक्षणाबाबत मंत्रालयातील संबंधित विभागाचे कक्षाधिकारी दिलीप वणिरे यांनी परवाना रद्दबाबत स्थगिती दिल्याने दुकान पूर्ववत सुरू झाल्याने पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. याबाबत ग्रामस्थ व समितीने मुख्यमंत्री, पुरवठामंत्री व पालकमंत्र्यांकडे आपली बाजू मांडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघटनेच्या व ग्रामस्थांच्या दीर्घ लढ्याचा विचार होणे महत्वाचे असे मत मांडले. त्यामुळे मंत्रालयातील सचिव व कक्षअधिकारी यांनी संबंधित प्रकरण पुण्याचे (पुरवठा) उपायुक्त प्रकाश कदम यांच्याकडे फेरसुनावणीस दिले. तेथे त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजू ऐकून घेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा परवाना रद्दचा निर्णय कायम ठेवला.

तत्पर पंचनामा

या निर्णयानुसार येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी संबंधित दुकानातील धान्य व रॉकेल साठ्याबाबत पंचनाम्याची कार्यवाही केली. तसेच पुढील आदेश होईपर्यंत या स्वस्त धान्य दुकानाकडील ग्राहकांना धान्य पुरवठ्याबाबतची गैरसोय होऊ नये म्हणून ११ जूनपासून तालुका संघामार्फत धान्याचे वितरण करावेत, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवतीर्थ तलावाची भिंत कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

येथील शिवतीर्थ तलावाची दगडी भिंत कोसळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. तलावात पाणी साठविण्यासाठी १५ फूट उंचीची दगडी भिंत उभारली आहे. रविवारी सायंकाळी या दगडी भिंतीचा काही भाग कोसळला तर पहाटेच्या दरम्यान ७० ते ८० फूट भिंतीचा भाग कोसळला.

पंचायत समितीजवळ शिवतीर्थ तलावात शिवस्मारक उभारण्याचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू आहे. तलावात मध्यभागी छ. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, चारही बाजूंना उंच मनोरे, तलावाभोवती बगीचा तयार करण्यात येत आहे. सध्या तलावात पाणी साठविण्यासाठी चारही बाजूंनी दगडी भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या भिंतीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे, त्यामुळे पावसाचे पाणी या तलावात साठले आहे. गेल्या वर्षी बांधलेल्या पूर्व बाजूची भिंत चार दिवस पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने मुरूम फुगल्याने कोसळली. सुमारे ७० ते ८० फूट दगडी भिंत कोसळल्याने मोठा आवाज झाला. तलावाच्या अन्य बाजूनाही काही प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पावसामुळे टाकलेल्या भराव फुगत आहे. परिणामी, दगडी भिंतीवर ताण येत असल्याने भिंतीची दगडे कोसळू लागली आहेत. पावसाच्या पाण्याने मुरूम फुगल्याने दगडी भिंत कोसळली असून अन्य बाजूला असणाऱ्या मुरूमावर रोलर फिरवून भराव दाबून बसविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी सांगितले. पन्हाळा नगरपरिषदेतर्फे गेली अनेक वर्षे या परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. अनेक वर्षे रखडत पडलेले काम पूर्णत्वाकडे जात असतानाच रविवारी पडलेल्या भिंतीमुळे नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यादेश पूर्ववत केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

ऐनवेळी अध्यादेश बदलून कृषी पदविकाधारकांचे वर्ष वाया जाणार अशा माहीतीसह सरकारने 'कृषि पदविका धारकांना ठेंगा' दाखवला आहे असे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिध्द होताच पुन्हा एकदा सरकाने अध्यादेश पूर्ववत करीत या विद्यार्थ्याना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या अध्यादेशात ठरल्याप्रमाणे या विद्यार्थ्याना आता बी.एस.सी अॅग्री (कृषी पदवी)च्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील चार कृषी विद्यापिठांतर्गत २२७ कृषी विद्यालयांना होणार आहे.

दहावीनंतर कृषि पदविकेला प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांना २०१२ -१३ या साली सरकारने दोन वर्षाचा अभ्यासक्रम तीन वर्षाचा करुन सेमी इंग्लिश केला होता. याशिवाय पुर्ततेनंतर कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश आणि त्यासाठी २० टक्के जागा राखीव देणार असा अध्यादेश काढला होता. हा अध्यादेश बनवताना राज्यातील चारही कृषी विद्यापिठांचे कुलगुरु,अधिष्ठाता आणि सहयोगी अधिष्ठाता यांची समिती नेमून निर्णय घेतला होता. परंतु आता तीन वर्षांच्या पूर्ततेनंतर सरकारने निकाल लागताच अध्यादेशात बदल केला आणि पदवीचा थेट दुसऱ्या वर्षीचा प्रवेश बदलून तो पहिल्या वर्षीचा केला होता.

वर्ष वाया जाणार नाही

याबाबत बोलताना पुण्यातील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. एस. जे. काकडे म्हणाले,'राज्यातील कृषि पदविकेच्या तृतीय वर्ष पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विचार करुन वर्ष वाया जावू नये म्हणून मंत्र्यांच्या मान्यतेने अध्यादेश पूर्ववत केला आहे. आता विद्यार्थी कृषी पदवीच्या (बी.एस.सी.अॅग्री) प्रथम आणि व्दितीय वर्षालाही प्रवेश घेवू शकतात. या विद्यार्थ्याना पोस्ट ग्रॅफयुएशनला अडचण येवू नये याबाबत विचार सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

चारित्र्याच्या संशयावरुन एमआयडीसीत काम करणाऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना सोमवारी मौजे सांगाव (ता.कागल) येथे घडली. कविता संतोष मगदूम (वय २८) असे खून झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. सांगावमया आवळे यांच्या ओढ्याजवळील शेतात सकाळी आठ वाजता ही घटना घडली. पती संतोषनेच खून केल्याची तक्रार कागल पोलिसात विवाहितेच्या नातेवाईकांनी केल्यानंतर पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष हा पंचतारांकीत एमआयडीसीत आरेती इंडस्ट्रिजमध्ये तर त्याची पत्नी कविता ओसवाल टेक्सटाईल मध्ये कामाला आहे. सोमवारी दोघांनाही सुट्टी होती. कविता ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली असताना संशयाने बेभान झालेल्या पती संतोषने तिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ती जागीच गतप्राण झाली.कविताच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेवून शांतपणे तो घरी बसला होता. त्याला आपण खून केलाच नाही असे भासवायचे होते असा पोलिसांनीही संशय व्यक्त केला आहे.

मृत कविताला विकास (वय १२) आणि मुलगी शैलजा वय (वय ११) अशी दोन मुले आहेत. संतोष चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला वारंवार मारहाण करीत होता. दोन महिन्यापूर्वीच झालेले कडाक्याचे भांडण मिटवण्यात आले होते. सोमवारच्या घटनेनंतर श्वानपथक मागवण्यात आले होते. परंतु पावसामुळे त्यात व्यत्यय आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठी महिला लाचलुचपतच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील तमदलगे व निमशिरगाव येथील महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. श्रीमती माया हौसेराव माळी असे या महिला तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तमदलगे येथील गट क्रं.४३५ मधील ५८ गुंठे जमीन तक्रारदाराने खरेदी केली होती. या जमिनीची सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह तलाठी माळी यांच्याकडे अर्जही दिला होता. यासाठी तलाठी माळी यांनी तीन हजार रूपये लाच मागितली होती. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे १८ जून रोजी माळी यांच्यावर कारवाईसाठी अर्ज दिला होता.

तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी माळी यांच्या निमशिरगाव येथील कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून तीन हजार रूपये लाच स्विकारताना पथकाने माळी यांना रंगेहाथ पकडले. पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधिक्षक अर्जुन सकुंडे यांमया मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक उदय आफळे, श्रीमती पद्मा कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा हद्दवाढीला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरचा दर्जा उंचाविण्यासाठी, विकास साधण्यासाठी शहराची हद्दवाढ अत्यावश्यक आहे. शिवसेना हद्दवाढीसाठी प्रयत्नशील आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या ग्रामीण भागातील सेना आमदारांची समजूत काढू, त्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल' अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्याचवेळी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेनुसार झाली पाहिजे. 'आधी हद्दवाढ, मग निवडणूक' अशी जी भूमिका काही जणांनी घेतली आहे, ती सेनेला मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले, 'काँग्रेस आघाडीच्या ताब्यातील कोल्हापूर महापालिकेचा कारभार हा भ्रष्ट आहे. आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूरवासियांना मूलभूत सोयी सुविधाही दिल्या नाहीत. स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. भ्रष्टाचारमुक्त कोल्हापूर हा सेनेचा अजेंडा असणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर युती करण्यास ​शिवसेना तयार आहे. चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. महापालिकेत आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इतर साऱ्या पक्षांनी एकत्र यावे अशी आपली भूमिका आहे. युती करताना स्थानिक नेत्यांच्या मताला महत्व राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सेनेतील गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाय ओढणाऱ्यांची प्रसंगी हकालपट्टी करू.'

जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम

खासदार राऊत म्हणआले, 'जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. अणु उर्जेला आमचा विरोध नाही, पण या प्रकल्पासाठी जैतापूर सुर​क्षित नाही. जैतापूरपासून काही किलोमीटर अंतरावर पश्चिम घाट आहे. अणूउर्जा प्रकल्पामुळे पश्चिम घाटाला हानी पोहचणार आहे. केंद्र सरकारने आपला हट्ट सोडावा.'

'राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले आहे. राष्ट्रवादीची राजवट ही भ्रष्टाचारी लोकांची राजवट होती. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रश्नी राष्ट्रवादीचे नेते छगन भु​जबळ यांची चौकशी करू आहे. भुजबळ यांना तुरुंगात जावे लागेल,' असे राऊत यांनी सांगितले.

टोल हद्दपार ही सेनेची भूमिका

'कोल्हापूर शहरातून टोलला कायमस्वरूपी हद्दपार करणे ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. सध्या प्रकल्पाचे फेरमूल्यांकन सुरू आहे. आयआरबीने प्रकल्पाच्या किंमतीचा फुगवटा तयार केला आहे. प्रकल्पाची किंमत निश्चित झाली की महापालिकेचे भूखंड देऊन अथवा अन्य प्रकारे कोल्हापूरला संपूर्ण टोलमुक्ती मिळावी अशी सेनेची भूमिका आहे' असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय कार्यालयाला पाण्यासाठी कुलूप

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पार्क परिसरात गेले वर्षभर अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलने केली. मात्र अ​​धिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नगरसेविका अपर्णा आडके यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी सोमवारी ताराराणी विभागीय मार्केट कार्यालयाला कुलूप ठोकले. उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार यांच्याकडून पाठपुरावा केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. हे अ​धिकारी लोकप्रतिनिधींचे फोन घेत नाहीत अशी टीका नगरसेविका अपर्णा आडके यांचे पती नितीन यांनी केली.

शिवाजी पार्क, चंद्रप्रभू कॉलनी, फ्रेंडस कॉलनी परिसरात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. रविवारी नागरिक नगरसेविका आडके यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यांनी ताराराणी मार्केट परिसरातील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले. पण प्रशासनाने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी विभागीय कार्यालयाला कुलूप लावले.

दरम्यान, आयुक्त पी. ​शिव शंकर यांनी अधिकाऱ्यांना सुटीच्या कालावधीतही मोबाइल सुरू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यानुसार कार्यवाही होत नाही. विभागीय कार्यालयाला ठाळे ठोकूनही वरिष्ठ अधिकारी तिकडे फिरकले नाहीत. उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी आडके यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याखेरीज कुलूप काढणार नसल्याचे आडके यांनी सांगितले. परिणामी विभागीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाबाहेर थांबून होते.

शिवाजी पार्क परिसरातील पाइपलाइनचे व्हॉल्व दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे काही भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. पावसामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नगरसेविका आडके यांची तक्रार आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून व्हॉल्व दुरूस्तीचे काम सुरू आहे.

- मनीष पवार, जल अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐश्वर्याच्या स्वप्नांना हवे बळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज तालुक्यातील बामणे येथील अंकुश आणि लता कोलप यांचा दारिद्र्याच्या श्रीमंतीत संसार सुरू झाल्यानंतर बारा वर्षांनी ऐश्वर्याचा जन्म झाला. वडील खासगी नोकरी करायचे. आईही शेतमजुरीला जायची. जेमतेम घरखर्च भागायचा. यातच ऐश्वर्यापाठोपाठ अभिषेक आणि ऋषिकेश यांचाही जन्म झाला. संसार आणि मुलांचा शिक्षण खर्च करताना आई-वडिलांच्या नाकीनऊ यायचे, परंतु कितीही कष्ट उपसावे लागले तरी मुलांना शिक्षण देऊन त्यांना वाढवायचे ही आईवडिलांची जिद्द.

केवळ मुलांना चांगले शिक्षण द्यायचे यासाठी दाम्पत्याने बामणी गावाला रामराम ठोकून मिरज गाठली, परंतु ऐश्वर्या सातवीत असतानाच वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. पतीच्या निधनाच्या दुःखाचे कढ पचवत लता यांनी मुलांसाठी पदर खोचला. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून स्वत: सावरली. मुलांनाही सावरले. तीन-चार किलोमीटर पायी शेतमजुरीला जाऊ लागली. धुणी-भांडी करू लागली. लहान बाळांचे संगोपनही करू लागली. तिची दमछाक व्हायची. ते पाहून आईच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवायचेच या जिद्दीने ऐश्वर्यानेही सुरुवातीपासूनच तयारी ठेवली. वडिलांची जिद्द आणि आईच्या कष्टाचे तिने सोने केले आणि दहावीच्या परीक्षेत तिने ९४.२० टक्के गुण मिळवत मिरजेतील विद्यामंदिर प्रशालेत पहिला क्रमांक मिळविला. ऐश्वर्याचे हे देदिप्यमान यश पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

ब्राह्मणपुरीतील भोकरे गल्लीत ऐश्वर्या, आई आणि दोन भावंडं दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याने राहतात. सामाजिक कार्यकर्ते सुबोध भोकरे यांनी वेळोवेळी कुटुंबाला मदतीचा हात दिला. लता ह्या ज्यांच्या घरी बाळ सांभाळायला जातात ते अर्चना आणि सचिन जंगम यांनीही सहकार्य केल्याचे कोलप कुटुंबीयांनी सांगितले.

ऐश्वर्याचे चांगले गुण मिळवलेत हे जरी खरे असले तरी यापुढेही तिने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. तिच्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी आहे.

- लता कोलप, ऐश्वर्याची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईची मूळ मूर्ती संवर्धन आराखडा तयार

$
0
0

कोल्हापूरः करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी करावयाच्या केमिकल कॉन्झर्व्हेशनला केंद्रीय पुरातत्व विभागाची मान्यता मिळाली आहे. यासंबंधीचे आदेश पुरातत्व विभागाने जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले आहेत.

पुरातत्व विभागाच्या आदेशामुळू मूर्तीला रासायनिक संरक्षण कवच मिळणार आहे. त्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने एक लाख ३४ हजाराचा डीडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याचे आदेशही देवस्थान समितीला दिले आहेत. अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्याची परवानगी भारतीय पुरातत्व खात्याकडे मागितली होती. यानुसार पुरातत्व विभागाचे रसायनतज्ज्ञ अधीक्षक डॉ. सिंग यांनी नुककतीच मूर्तीची पाहणी करून अंदाजपत्रक सादर केले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार यासाठीचा खर्च देवस्थान समितीला करावा लागणार आहे. हे काम त्वरित व्हावे यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर महापौर ही राष्ट्रवादीची देणगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्ट राजवट कोल्हापूर महापालिकेत आहे. लोकहिताची कामे करण्यात आघाडी अपयशी ठरली आहे. लाचखोर महापौर ही राष्ट्रवादीची देणगी आहे. अशा भ्रष्टाचारी आघाडीला महापालिकेत स्थान नको' अशी घणाघाती टीका खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी केली. 'कोल्हापूरच्या चौफेर विकासासाठी महापालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प करा. शिवसेनेचे ५० नगरसेवक निवडून आणण्यासाठी कटिबद्ध व्हा' असे आवाहन त्यांनी केले. भगवा सप्ताहाच्या माध्यमातून ​शिवसेनेने शाहू स्मारक भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात शक्तीप्रदर्शन केले. खासदार राऊत यांच्यासह सर्वच नेत्यांनी आघाडीसह भाजपचाही समाचार घेतला.

खासदार राऊत म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या महापौर लाचखोरीच्या प्रकरणात सापडल्या आहेत. हा पक्ष म्हजे लुटारूंची टोळी आहे. कोल्हापूर शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव प्रदूषणमुक्ती, शहरवासियांना स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय अशी लोकहिताची कामे करण्यात आघाडी अपयशी ठरली आहे.

क्षीरसागरांची टोलेबाजी

'विधानसभेला स्वतंत्र लढल्यामुळे ताकद कळली' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा आमदार क्षीरसागर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून तुमचा पक्ष वाढला हे भाजपच्या नेत्यांनी विसरू नये. विधानसभेच्या निवडणुकीनंतर औरंगाबाद, नवी मुबई, बदलापूरच्या महापालिका निवडणुकीत सेनेने मुसंडी मारली, तेव्हा भाजपची ताकत कुठे गेली? भाजपने सेनेला ताकत दाखविण्याचा प्रयत्न करू नये. पालकमंत्री पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांचा बळी देऊन युती करणार नाही असे म्हटले आहे. शिवसेनाही कार्यकर्त्याना वाऱ्यावर सोडून युतीसाठी धावणार नाही.'

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत ४२ प्रभागात सेनेला मताधिक्क्य मिळाले. महापालिका निवडणुकीत आणखी ताकद वाढवून भगवा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा. केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते बांधणीची घोषणा केली आहे. त्यांनी त्याआधी कोल्हापूर टोलमुक्तीसाठी ५०० कोटी द्यावेत.'

प्रा. विजय कुलकर्णी यांनी आमदार क्षीरसागर यांना पालकमंत्री देण्याची मागणी केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंगस यांची भाषणे झाली. डॉ. ​शिवरत्न शेटे यांचे 'शिवचरित्र आणि शिवसेना' याविषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर विनायक साळोखे, उदय पोवार, किशोर घाडगे, पूजा भोर, स्मिता माळी उपस्थित होत्या. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले.

पालकमंत्री मित्र की विश्वासघातकी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही शिवसेनेच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची अफजलखानशी तुलना खासदार राऊत यांनी केली. तर, क्षीरसागर यांनी विधानसभेला भाजपने शिवसेनेच्या पाठीत वार केल्याचा आरोप करत 'गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळत नव्हते हे त्यांनी लक्षात घ्यावे' असा टोला पालकमंत्री पाटील यांना लगावला. 'पालकमंत्री प्रत्येक ठिकाणी जाऊन उमेदवारी जाहीर करत आहेत. वाढदिवस, कार्यक्रमांचा खर्च करत आहेत. भाजप सेनेला संपवायला निघाली आहे. त्यांना मित्र म्हणावे की विश्वासघातकी ? अशी टीका विजय कुलकर्णी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनच्या मार्गास वन विभागाची मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी धरण क्षेत्रात करण्यात येणाऱ्या थेट पाइपाइनच्या कामाला राज्याच्या वन्यजीव समितीने मान्यता दिली आहे. यामुळे पाइपलाइनच्या मान्यतेतील अडथळा दूर झाला असून महापालिकेचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर होणार आहे. केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाच्या मान्यतेनंतर धरणक्षेत्रात पाइपलाइनसह जॅकवेल, पंपिंग स्टेशनची कामे होणार आहेत.

धरणक्षेत्रात पाइपलाइन योजनेंतर्गत जॅकवेल, पंपिंग स्टेशन आणि १६०० मीटर लांबीची पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी दोन एकरहून अधिक जागेची आवश्यकता आहे. पाइपलाइन व बांधकामासाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेतर्फे वन्यजीव विभागाला सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभाग सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त पी. शिव शंकर आदी उपस्थित होते. केंद्रीय वन्य जीव विभागाची मान्यता मिळाल्यास योजनेला गती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिद्दी ऐश्वर्याला व्हायचंय कलेक्टर

$
0
0

नामदेव भोसले, मिरज

वडिलांचे छत्र हरपलेले, काबाडकष्ट करून कसाबसा संसार सावरणारी आई अशा प्रतिकूल परिस्थितीत मिरजेतील ऐश्वर्या अंकुश कोलप हिने दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवले. तिच्या डोळ्यांत आता जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न तरळत आहे.

बामणीसारख्या गावात मुलांना चांगले शिक्षण मिळणार नाही. त्यासाठी जिद्दी वडिलांनी गाव सोडले, मिरज गाठले. खासगी नोकरी पत्करली. हे दाम्पत्य मुलांच्या डोळ्यांत स्वप्न पेरत राहिले, परंतु नियतीही सत्त्वपरीक्षा घेत असते असे म्हणतात. या कुटुंबाबतही ते दुर्दैवाने खरे ठरले. वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलांची स्वप्नं उद्ध्वस्त होताहेत असे वाटत असतानाच ही माउली पदर खोचून कामाला लागली. पडेल ते कष्ट उपसू लागली. मुलांची स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी चार-चार किलोमीटर पायी शेतमजुरीला जाऊ लागली. आईला घरकामात मदत करीत ऐश्वर्यानेही कंबर कसली. स्वप्नांना पंख फुटले. आईचे कष्ट आणि ऐश्वर्याच्या जिद्दीला धुमारे फुटले. दहावी परीक्षेत कसल्याही सुविधा नसताना तिने ९४.२० टक्के गुण मिळवले. दहा-बाय दहाच्या त्यांच्या खोलीत स्वप्नांचे अवघे आकाश उतरले.

ऐश्वर्याचे दोन्ही भाऊही आता दहावीत आहेत. त्यांच्या शिक्षणाचाही भारही लता यांच्यावर आहे. त्यातच ऐश्वर्याचे पुढील शिक्षणही करायचे आहे. ऐश्वर्याच्या पंखात बळ भरण्यासाठी समाजातून दातृत्वाचे हात पुढे येण्याची गरज आहे.

स्वप्न साकारणारच

वडिलांचे आशीर्वाद, आईचे कष्ट आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच मी चांगले गुण मिळवू शकले, अशा भावना ऐश्वर्याने बोलून दाखवल्या. आईवडिलांचे स्वप्न साकार करायचे आहे. शिक्षणासाठी पडेल ते ‌कष्ट झेलायची तयारी आहे. जिद्दीने उच्च शिक्षण घेणार. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न आहे. तेही पूर्ण करणार, अशी जिद्द ऐश्वर्याने बोलून दाखवली.

विद्यार्थ्याचे नाव : ऐश्वर्या कोलप

चेक स्वीकारण्याचा पत्ता :

महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहर रेसिडन्सी, २४९ ए, १, ७७, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर.

संपर्कः गुरुबाळ माळी

८५५१०१४०४०

(विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा'ने कोणाचीही नेमणूक केलेली नाही.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाई वैद्य यांना शाहू पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार बैठकीत पुरस्काराची घोषणा केली. १ लाख रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. शाहू जयंतीदिवशी, २६ जूनला पुरस्काराचे वितरण होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे होणाऱ्या सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत प्रा.एन.डी.पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होईल. भाई वैद्य गेली सत्तर वर्षे सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. ट्रस्टतर्फे आतापर्यंत २९ जणांना हा पुरस्कार प्रदान देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परस्पर शिक्षक भरती येणार अंगलट

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

शिक्षण उपसंचालक कार्यालयाची परवानगी न घेता ज्युनिअर कॉलेज काही संस्थाचालकांनी प्राध्यापक आणि सहायक शिक्षकांची केलेली परस्पर भरती अंगलट येणार आहे. या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळणार नाही. कोल्हापूर विभागात दोनशेहून अधिक शैक्षणिक संस्थानी परस्पर जाहिरात देऊन भरती केली आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून या त्रिस्तरीय समितीकडे ३७६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. समितीला मात्र मंजुरीसाठी अद्याप मुहुर्त मिळालेला नाही.

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही संस्थाचालकांनी लढविलेली शक्कल मात्र तात्पुरती सेवा असलेल्या या ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्यावर येणार आहे. नोकरभरतीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्रिस्तरीय समितीकडे अर्ज पाठवू नयेत, असे आवाहन कार्यालयाने केले होते. मात्र काही शिक्षण संस्थानी आवाहनाला धुडकावून संस्थात नोकरभरती केली. यात उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक,लिपिक, ग्रंथालय परिचर, शिपाई या पदांचा समावेश आहे.

त्रिस्तरीय समितीने ठोस निर्णय घेतला नसल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापनाचा प्रश्न गंभीर आहे. काही संस्थानी अन्य सहायक शिक्षकांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. संस्थाचालकांनी विषय शिक्षक नसल्याने महिन्याला पाच हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या सहायक शिक्षकांची नेमणूक केली आहे. जाहिरातीलाही परवानगी न घेता परस्पर केलेली नोकरभरती संस्थाच्या आणि सेवारत असलेल्या शिक्षकांना अंगलट येणार आहे. पाच जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक िक्षणसंस्थानी परस्पर नोकरभरती केली आहे.

त्रिस्तरीय समितीत समाजकल्याणचे उपसंचालक, महसूल आयुक्त आणि विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत. समितीचे अध्यक्ष महसूल आयुक्त आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभागातून सहायक शिक्षकांची २७५ आणि अर्धवेळ १०१ पदांसाठी या समितीकडे प्रस्ताव पाठविले आहे. समितीची बैठकच झाली नसल्याने या पदाचा कार्यभार मानधन तत्वावर नेमलेल्या सहायक शिक्षकांच्याकडे आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहिरातीची परवानगी घेऊनच भरतीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश आहेत. मात्र दोनशेहून अधिक शिक्षण संस्थानी जाहिराती देऊन नोकरभरती सुरु केली आहे. परस्पर दिलेल्या जाहिरातीची माहितीही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतलेली नाही.

प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीची परवानगी एकाही शिक्षण संस्थेने घेतलेली नाही. त्यामुळे संस्थानी नोकरभरती केली असली तरी वैयक्तिक मान्यता दिली जाणार नाही. त्रिस्तरीय समितीने दिलेल्या निर्णयानुसारच भरती मान्य केली जाईल.

- मकरंद गोंधळी, शिक्षण उपसंचालक

राज्य सरकारने दर महिन्याला नवे निर्णय घेत आहे. त्यामुळे शिक्षण संस्थेसह ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक हवालदिल होत आहे. गुणवत्ता वाढविण्यासाठी कायम स्वरुपी नोकरीची हमी हवी. नोकर भरतीचे नवे निकषही जाचक ठरत आहेत.

- एस. बी. उमाटे, विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी दोन तास ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन महिन्यांपासून न्यू पॅलेस परिसरात पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या नागरिकांनी संतप्त होत रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून महापालिकेचा निषेध केला. आंदोलनस्थळी उपायुक्त येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. उपायुक्त विजय खोराटे यांनी पाणीप्रश्न लवकर मिटविण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. महावीर कॉलेजमसमोर मुख्य रस्त्यावर हे आंदोलन केल्याने या परिसरात वाहतूक प्रचंड खोळंबली.

दरम्यान, वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी आंदोलनात सहभागी झालेल्या दिलीप देसाई यांच्यासह ६७ जणांवर शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसाआड कमी दाबाने येणारे पाणी, रात्री उशीरा पाणी सोडल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक सकाळी दहा वाजता महाविर कॉलेजसमोर एकत्र आले. नागरिकांनी 'महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो,' 'लाच घ्या पण पाणी द्या,' 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महापालिकेच्या नावाने शंखध्वनीही केला.

सुरुवातीला आंदोलनस्थळी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी दाद दिली नाही. उपायुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा नागरिकांनी घेतला. दीड तास आंदोलन सुरू राहिल्यामुळे वाहतूक खोळं‌बली.. यावेळी दिलीप देसाई यांनी, या प्रश्नाबाबत डोके फोडून घेऊ असा आत्मदहनाचा इशाराही प्रशासनाला दिला.

त्यानंतर उपायुक्त विजय खोराटे यांनी घटनास्थळी आले. शिंगणापूर येथील व्हॉल्व खराब झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तीन दिवसात दुरुस्ती होईल. लवकरच पाणीप्रश्न सुटेल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाजपाचे संदीप देसाई, संग्राम पाटील, हेमंत बोश्के, अरुण गावडे, अनिल फडतारे, सुनील कांबळे, अनुज गावडे, राजू खान, अश्विनी लाड, शुंभागी कुरणे, सुरेखा भंडारे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकनाचे काम लांबणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व नोबेल कंपनीच्या प्रतिनिधींची बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापक आणि फेरमूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांची जीवन प्राधिकरणकडे बदली झाल्याने मूल्यांकनाचे काम रखडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने संतोषकुमार यांच्या बदलीचा निषेध केला आहे. समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकात म्हटले आहे की, संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकनाचे काम गेली अडीच महिने सुरू आहे. मूल्यांकन पारदर्शक व्हावे यासाठी त्यांनी योग्य भूमिका घेतली असताना आणि काम अंतिम टप्प्यात असताना त्यांची बदली करणे हे संशयास्पद आहे. त्यांची बदली हा आयआरबीच्या षड्यंत्राचाच भाग आहे. सरकारने संतोषकुमार यांची बदली रद्द करावी.

रस्ते मूल्यांकनाचे काम अंतिम टप्यात आहे. संतोषकुमार यांची अन्यत्र बदली झाल्याचे समजते, मात्र त्यांनीच समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिल्यास मूल्यांकन वेळेत पूर्ण व्हायला मदत होणार आहे. सरकारने मूल्यांकन लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करावा.

- राजेंद्र सावंत, मूल्यांकन स​मिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images