Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दुचाकी घसरून महिला ठार

0
0

इचलकरंजीः नातेवाईकाच्या विवाह समारंभासाठी जात असताना दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. तर पती, मुलगा व मुलगी असे तिघेजण जखमी झाले. प्रियंका तानाजी शेंडे (वय ३२ रा. दातार मळा) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी पंचगंगा नदीवरील जुन्या पुलानजीक घडला.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दातार मळा परिसरात राहणारे तानाजी शेंडे हे पत्नी प्रियंका, मुलगा प्रथमेश (वय १०) व मुलगी वैजयंती (वय १२) यांच्यासह गडहिंग्लज येथील नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी जात होते. हे सर्वजण दुचाकीवरुन जात असताना पंचगंगा नदीवरील जुन्या पुलानजीक दुचाकी घसरली. त्यामुळे सर्वजण गाडीवरुन पडले. त्यामध्ये प्रियंका यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहचल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. प्रियंका या गारमेंटमध्ये नोकरीस होत्या. तर तानाजी शेंडे हे यंत्रमागावर काम करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७ तोळे सोन्यासह ३४ हजार लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गॅलरीच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख ३४ हजार ५०० रूपये चोरून नेले. चोरट्याचा पाठलाग करण्यात आला पण तो मोपेडवरून पळून गेला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. निलेश निवासराव मिसाळ (वय ४५, रा. धोत्री गल्ली, गुरूवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली.

मिसाळ यांच्या घरातील सर्व सदस्य गुरूवारी रात्री साडेअकरा वाजता झोपी गेले. हॉलमध्ये निलेश, त्यांचा भाऊ नितीन व दोन पुतणे झोपले होते. बेडरूममध्ये नितीन याच्या पत्नी वैजयंती व मावशी झोपल्या होत्या. उकडत असल्याने वैजयंती यांनी गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवला होता. चोरट्याने गॅलरीतून बेडरूममध्ये प्रवेश केला. तिजोरी उघडल्याचा आवाज ऐकल्यावर वैजयंती जोरात ओरडल्या. या आवाजाने नितिन व निलेश बेडरूममध्ये आले. वैजयंती यांनी चोर आल्याचे सांगितले. यावेळी चोरटा जिन्यावरून पळून जात असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केला. पण चोरटा पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून पळून गेला. मिसाळ बंधूंनी त्याचा पाठलाग केला असता तो पंचगंगा रोडमार्गे पळून केला. चोरट्याने चावीचा वापर करून साडेसतरा तोळे दागिन्यांचा डबा व निलेश व नितिन यांच्या खिशातील ३४ हजार रूपये पाचशे रूपये लंपास केले. चोरट्याचे दोन शूजही मिळून आले. पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंच्या हल्लेखोरांची भाकप माहितीपत्रके वाटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघा संशयितांची एक लाख रेखाचित्रे असलेली माहितीपत्रके वाटण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. सोशल मीडियावर हल्लेखोरांची रेखाचित्रे पोस्ट करावीत, असे आवाहनही पक्षाच्यावतीने केले आहे. एसआयटीने (विशेष तपास पथक) नुकतीच हल्लेखोरांची रेखाचित्रे व व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

भाकपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन दिले. कोल्हापूर पोलिस व एसआयटी करत असलेल्या तपासावर पक्षाचा विश्वास असून, तपासकामी पक्षाचे कार्यकर्ते मदत करतील असे आश्वासन दिले. हल्लेखोरांची रेखाचित्रे असलेली एक लाख माहितीपत्रके वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी पोलिस अधीक्षक शर्मा यांना दिली. ज्यांना माहितीपत्रके हवी असतील त्यांनी पक्ष कार्यालयातून घेऊन जावीत. माहितीपत्रे गल्ली, गाव व चौकातील फलकांवर लावावीत. फेसबुकवर संशयितांचे फोटो अपलोड करावेत व शेअर करावेत. संशयितांना शोधण्यासाठी पोलिसांना मदत करावी. पक्षाच्यावतीने पोलिस अधीक्षक शर्मा यांना निवेदन दिले. कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यासह देशातील सर्व वर्तमानपत्रांत संशयितांची छायाचित्रे प्रसिध्द करावीत, अशी मागणी केली. शिष्टमंडळात नामदेव गावडे, शिवाजी शिंदे, आशा कुकडे, सतीशचंद्र कांबळे, आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केर्लीजवळ पालिकेचा कचरा, वृक्षतोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केर्ली गावानजीक कासारी नदीपात्रालगतच महापालिका कर्मचाऱ्यांनी विनापरवाना लाखो टन कचरा टाकला आहे. कचरा टाकण्यापूर्वी जेसीबी वाहने लावून या भागातील सात ते आठ झाडे तोडली आहेत. स्थानिक नागरिक दिनकर चौगुले यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी झाडे तोड व कचरा टाकण्यास मनाई केली. सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कडले व पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

नदी पात्रालगतच कचरा टाकण्याचा प्रकार आणि झाडे तोडल्याचे निदर्शनास येताच पर्यावरणवादी कार्यकर्ते गायकवाड यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा देसाई यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगितले. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, अधिकारी तानाजी पाडळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

यासंदर्भात गायकवाड म्हणाले, 'केर्लीनजीक कासारी नदी पात्र आणि ओढ्याच्या मध्ये कचरा टाकला आहे. कचरा टाकण्यासाठी वाहनांच्या ये-जाकरिता या भागातील सात ते आठ मोठी झाडे तोडली आहेत. कचरा व झाडे तोडल्याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. विभागीय आयुक्त १८ जूनला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. पाणी प्रदूषित करण्याचा व वृक्षतोडीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणणार आहे. महापालिकेने प्रथम या भागातील कचऱ्याचा उठाव करावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष सरकारच्या भूमिकेकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हद्दवाढीचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. मात्र, महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीअगोदर सरकारने हद्दवाढ करायचा निर्णय घेतला तर तो निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घ्यावा लागणार आहे. आचारसंहितेपूर्वी हद्दवाढ झाली तर संबं​धित गावांमध्ये प्रभाग रचना करून एकत्रित निवडणूक घेता येऊ शकते. दुसरीकडे महापालिका कायद्यात सभागृहाला मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याचे

विधिज्ञांचे म्हणणे आहे. निवडणुकीनंतरही हद्दवाढ करून संबंधित भागात निवडणूक घेता येऊ शकते. या पार्श्वभूमीवर सरकार निवडणूक कार्यक्रम होण्याअगोदर हद्दवाढीचा निर्णय घेणार की निवडणुकीनंतर हद्दवाढ करणार याकडे लक्ष आहे.

सोमवारी प्रस्ताव नगर विकास खात्याकडे

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरुवारी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. महापौर तृप्ती माळवी यांनी त्यावर सही करून ठराव महापालिका प्रशासनाकडे पाठविला आहे. प्रशासनाकडून प्रस्तावात कसल्याही त्रुटी राहू नयेत यासंबधी दक्षता घेतली जात आहे. शुक्रवारी दिवसभर हद्दवाढीचा प्रस्ताव, नकाशा, संबंधित गावांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या सर्व बाबींचा अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू होते. आयुक्त पी. शिव शंकर यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रस्तावावर आयुक्तांची सही झाली आहे. दरम्यान, शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने हद्दवाढीचा मंजूर प्रस्ताव सोमवारी नगर विकास खात्याकडे सादर होणार आहे.

महापालिका नियम...

महापालिका कायदा कलम ५ मधील (४) तरतुदीनुसार निवडणूक झाल्यानंतर एखाद्या शहराचे क्षेत्र विस्तारले अथवा हद्दवाढ झाली तर त्या संबंधित क्षेत्रातील लोकांचे प्र​तिनिधी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया शक्य तितक्या लवकर घेण्यात यावी अशी तरतूद आहे. महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाली आणि त्यानंतर राज्य सरकारने हद्दवाढीचा निर्णय घेतला तर महापालिकेवर प्रशासक नेमला जाऊ शकत नाही. उलट हद्दवाढीच्या भागात निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधी निवडले जातात.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हद्दवाढीचा निर्णय झाल्यास महापालिकेची निवडणूक दोन महिने पुढे ढकलून हद्दवाढीच्या भागात प्रभाग रचना करून एकत्र निवडणूक घेता येऊ शकते. मात्र, हद्दवाढीचा निर्णय घेतल्यानंतर सध्याच्या सभागृहाला मुदतवाढ देण्यासंदर्भात कायदा नाही. तथापि, सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमता येतो. सभागृहाला मुदतवाढीसंदर्भात कसलीच तरतूद नाही.

- अॅड. महादेवराव आडगुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी पदविकाधारकांना ठेंगा

0
0

प्रकाश कारंडे, कागल

दहावीनंतर कृषी पदविकेचा दोन ऐवजी तीन वर्षांचा सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम करुन कृषी पदवी (बी.एस.सी.अॅग्री)च्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश आणि बारावी सायन्सचा दर्जा अशी स्वप्ने घेवून राज्यातील २२७ कृषी विद्यालयातून यावर्षी विद्यार्थी बाहेर पडले. परंतु निकालानंतर सरकारने अध्यादेशातच बदल करुन या विद्यार्थ्यांना ठेंगाच दाखवला आहे. पदवीला व्दितीय ऐवजी प्रथम वर्षाला प्रवेश मिळेल असे सांगितल्याने एक वर्षाच्या नुकसानीने विद्यार्थी,पालक आणि संस्थाचालकही हबकले आहेत. सरकारने तीन वर्षांचा पदविकेचा अभ्यासक्रम पदवीच्या एक वर्षाच्या पात्रतेचाही होत नसल्याचा जावईशोधही लावला आहे.

२०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून सरकारने राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत निम्नस्तर कृषी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या नावाखाली अभ्यासक्रमात बदल केला. यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे सहयोगी अधिष्ठाता,अधिष्ठाता कृषी, कुलगुरु आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या समित्या नियुक्त करुन अध्यादेश जारी केला. १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्याला कृषी पदविकेच्या थेट व्दितीय वर्षाला प्रवेश दिला. पदविकेच्या पूर्ततेनंतर २६ मे २०१५ साली सरकारने तीन वर्षापूर्वीच्या अध्यादेशात बदल करीत पदवीच्या व्दितीय वर्षाचा २० टक्के राखीव जागांचा प्रवेश रद्द करीत प्रथम वर्षाला १० टक्के जागा आणि त्याही खुल्या वर्गासाठी ६० टक्क्याच्यावर आणि इतर जातींसाठी ५० टक्क्यांच्यावर मार्कांची अट घातली. वास्तविक राज्यात ६९ विनाअनुदानित आणि १७ सरकारची कृषी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये यावर्षीच्या सुमारे ५ हजार विद्यार्थ्याना जुन्या अध्यादेशाप्रमाणे जाता जाता प्रवेश मिळाला असता, परंतु ऐनवेळी कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमात विशेषीकरण (स्पेशलायझेशन)नाही, त्यामुळे पदवीच्या सर्व विद्याशाखांच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षास प्रवेश घेण्यास हे विद्यार्थी पात्र ठरत नाहीत असा दृष्टांत सरकारला तब्बल तीन वर्षांनी झाला. या खेळात विद्यार्थ्यांचे मात्र एक वर्ष वाया जावून आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे.

विद्यार्थ्यांचा दुर्दैवाचा फेरा

२०१२ साली या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीतील दोन वर्षाचा अभ्यासक्रम बदल होवून तीन वर्ष सेमी इंग्लिश शिकावे लागले. शैक्षणिक शुल्क मात्र साडेआठ हजार रुपयांवरून २२ हजार रुपये करण्यात आले. पहिल्यावर्षी अत्यल्प निकालामुळे नापास विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात बसवण्यात आले आणि आता अध्यादेशात बदल होवून वर्षच वाया गेले.

तीन वर्षापूर्वीच्या कृषी पदविकांच्या बदलेल्या अभ्यासक्रमाला आय.सी.आर.ची मान्यता नाही. तीन वर्षात कृषी पदवीच्या ३९ ग्रेडचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश मिळणे कठीण आहे. नवीन निर्णयाने यावर्षीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असले तरी भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय खूपच मोलाचा आहे.

-डॉ.एस.जे.काकडे, संचालक, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर समितीत वारकरी हवेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

वारकरी संप्रदायाच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश आले आहे. पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी शिवाजी कादमाने यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील नेत्यांनी स्वागत केले आहे. आषाढी यात्रेपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या सुचनेनुसार १२ सदस्यांची स्थायी समिती नियुक्त करून त्यात वारकरी संप्रदायाला योग्य स्थान मिळावे, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

भक्त निवास वादाच्या भोवऱ्यात

सरकारने १९८५साली विधानसभेत कायदा करून मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून काढून घेतले होते. मंदिर व्यवस्थापनासाठी एक अस्थाई समिती नेमली होती. या नंतर जवळपास ४० वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर २०१४साली सुप्रीम कोर्टाने बडव्यांच्या विरोधात निकाल देत संपूर्ण मंदिराची मालकी सरकारकडे दिली. दरम्यान, या वेळी ३१ ऑगस्ट २०१२मध्ये अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यरत होती. मात्र, या समितीने नव्याने सुरू केलेले ५० कोटी रुपये खर्चाचे भक्त निवास वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मंदिर समिती बरखास्त करण्यात आली.

डांगे यांचे निर्णय गाजले

मंदिर समिती अध्यक्ष पदाची कारकीर्द अण्णासाहेब डांगे यांच्या धाडसी निर्णयाने खऱ्या अर्थाने गाजली. विठ्ठल पूजेसाठी हिंदू धर्मातील सर्व जातींच्या पूजाऱ्यांची परीक्षा घेवून केलेली नियुक्ती, रुक्मिणी मातेसाठी स्त्री-पुजारी नियुक्तीसारखे क्रांतिकारक निर्णय घेत घेत डांगे यांनी विठुराया लोकदेव असल्याचे दाखवून दिले. डांगे यांचे निर्णय मुठभर लोकांच्या टीकेचे कारण बनले असले, तरी राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. डांगे समितीमधील सदस्य आणि डांगे यांच्यातील वादातूनच ही बरखास्ती झाली आहे. तरीही अण्णासाहेब डांगे यांनीच १४ जून पूर्वी समिती बरखास्त न झाल्यास आपण राजीनामा देवू, असे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी

समिती बरखास्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. गेली ४० वर्षे विस्कळीत झालेल्या विठ्ठल मंदिर व्यवस्थापनाला आर्थिक शिस्त लागणार आहे. मुंढे यांच्या समोर मंदिराचे अर्थशास्त्र वळणावर आणण्याबरोबर कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचेही आव्हान असणार आहे. मुंढे यांनी वळण लावल्यावर थोड्या दिवसांनी सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे नवीन समिती येईल. पण, त्यात वारकरी संप्रदाय, मंदिराच्या परंपरेसह स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करणारे सदस्य असावेत, ही वारकरी संप्रदायाची मागणी सरकारने विचारात घेतल्यास सरकार आणि संप्रदाय यांच्यामधील संघर्षाला विराम मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा शु‌द्धिकरण मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ब्लू ग्रीन अलगीचे वाढते प्रमाण, दूषित पाणी, रंकाळा तलावावर साचलेला सांडपाण्याचा थर परिणामी अशुद्ध बनलेल्या तलावातील पाणी रंकाळा तलावातील हे चित्र नजीकच्या काळात बदलणार आहे. महापालिका, आयसीटी संस्था आणि आरती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर रंकाळा तलावातील पाण्याची शुद्धता केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खणविहार व आसपासच्या परिसरातील पाणी शुद्धीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. हायड्रोडायनॅमिक कॅविटेशन तंत्राचा वापर करून तासाला एक लाख लिटर पाणी स्वच्छ केले जाणार आहे. रविवारी त्या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.

तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी हायड्रोडायनॅमिक कॅविटेशन तंत्राचा वापर केला जाणार आहे. या तंत्रातंर्गत रिअॅक्टर आणि पंपचा वापर करून बबल तयार केले जातात. ठराविक वेळेनंतर हे बबल फुटल्यानंतर पाण्यामध्ये उच्चदाब व उच्च तापमान तयार होते. यामुळे पाच मायक्रोमीटर खालचे जे जीव असतात ते मरतात. परिणामी पाण्याच्या मोठ्या साठ्याचे निर्जंतुकीकरण होते. या पद्धतीत कुठल्याही रसायनचा वापर केला जात नाही. यामुळे मोठे जलचर सुरक्षित राहू शकतात. या तंत्राचा वापर करून पाणी हवे तितके शुध्द् करता येते. रोगराई पसरवणारे पाण्यातील जीवजंतू नष्ट झाल्यामुळे आरोग्यविषयक आजार उद्भवणार नाहीत अशी माहिती प्रा. अनिरूद्ध पंडित यांनी दिली.

इन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) आणि आरती उद्योग समूह यांच्यातर्फे सूक्ष्मजीव निर्जंतुकीकरण आणि शेवाळे नियंत्रण तंत्र वापरून पाण्याची स्वच्छता करण्याचा हा प्रयत्न आहे. आयसीटीतील प्रा. अनिरूद्ध पंडीत यांच्या नेतृत्वाखाली हायड्रोडायनॅमिक कॅविटेशन तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र ताशी १०,००० घन मीटर पाण्यावर प्रक्रिया करू शकते. या तंत्रामुळे पाण्यातील शेवाळ, हायसिंग आणि प्रदूषणास कारणीभूत घटकांचा नाश होऊन ​पाणी पिण्यायोग होणार आहे.आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव यांनी पुढाकार घेत आरती ग्रुपच्या सहकार्याने रंकाळा तलाव येथे प्रायोगिक तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.

शुद्धीकरण विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात

राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतंर्गत (एनएलसी) सध्या रंकाळा विकास आराखडा (दुसरा टप्पा) तयार करण्याचे काम सुरू आहे. यातंर्गत रंकाळा तलावाचा बॅथमेट्री व जीओ टेक्नीक सर्व्हे करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात अहवाल उपलब्ध होणार आहे. एनएलसी अंतर्गत तलाव कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करणे, संरक्षक भिंतीची डागडुजी, तलावातील गाळाचे मोजमाप आदींचा समावेश आहे. केंद्र सरकारकडे आराखडा सादर केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीतून दुसऱ्या टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. यामध्ये रंकाळा तलावातील पाणी शुद्धीकरणाचा समावेश आहे. महापालिका येत्या जुलै महिन्यात दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीची प्रतीक्षा वाढली

0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

व्यावसायिक शिक्षण घेऊनही जिल्ह्यातील वीस हजारांवर तरुण अजनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, वैद्यकीय, मॅनेजमेंट, आयटीआय या व्यावसायिक कोर्स करण्याची संख्या अमर्याद वाढल्याने तेथेही नोकरीसाठी वेटिंग आहे.

पूर्वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांना नोकऱ्याही मिळत होत्या; पण नंतर संधी कमी आणि पदवीधर जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अशा पदवीधरांचा आकडा बेरोजगार म्हणून वाढला. साहजिकच व्यावसायिक कोर्सेस करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. सध्या इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अशा व्यावसायिक कोर्सनंतरही रोजगाराची संधी मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात महिनाभरात ७२७ युवकांनी नोकरीसाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोंदणी केली, त्यातील केवळ २४ युवकांना नोकरीची संधी मिळाली.

सध्या जिल्ह्यात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या

युवकांची संख्या दीड लाखापर्यंत आहे. यामध्ये ४० हजार युवक हे पारंपरिक शिक्षण घेऊन पदवीधर झाले आहेत. व्यावसायिक कोर्स करूनही २० हजार युवकांना रोजगार मिळाला नाही. यामध्ये साडेतीन हजार युवक तर पदव्युत्तर पदवी घेतलेले आहेत. आयटीआय झाल्यानंतर तातडीने नोकरी मिळते अशी जाहिरातबाजी केली जाते, मात्र सहा हजारांवर आयटीआय होऊनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. वैद्यकीय, व्यवस्थापन कोर्स केलेल्या दोनशेवर तरुणांना नोकरी मिळालेली नाही. व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध असणाऱ्या संस्था वाढल्यानंतर तेथे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली, पण ही वाढ मात्र बेरोजगारी वाढवणारी ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य केंद्रांना समस्यांचा विळखा

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांनी ग्रासलेली असून, त्यामधील हुपरी केंद्राचा अपवाद आहे. येथे लोकसहभाग तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा लूक बदललेला आहे. यामुळे तालुक्यातील अन्य केंद्रांनी याचा आदर्श घेऊन लोकसहभाग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेचे हुपरी, पट्टणकोडोली, भादोले, अंबप, पुलाची शिरोली, सावर्डे, आळते, साजणी, हेर्ले येथे प्राथामिक आरोग्य केंद्रे आहेत. यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांत मिळणाऱ्या अनेक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब रुग्ण खासगी दवाखान्याकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मुक्कामी ठिकाणी राहत नाहीत, कर्मचाऱ्यांची बेशिस्त वर्तणूक, दिशाभूल करणारी व्यक्तव्ये याचा त्रास गरीब रुग्णांना होत आहे. पट्टणकोडोली येथे वैद्यकीय अधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असून, याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही जागा भरलेली नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारची स्थिती तालुक्यात अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. असे असतानाही हुपरी केंद्र याला अपवाद आहे. येथे असणारे वैद्यकीय अधिकारी अनिल कामते यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन केंद्राचा लूक बदलला आहे. त्यांनी येथे लोकसहभाग वाढविण्यासाठी केलेली कार्ये कौतुकास्पद असून सध्या दररोज ४० ते ५० बाह्यरूग्ण, आठवड्याला १० ते १५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दररोज चार ते पाच प्रसूती तसेच विविध रोगांच्या चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील रुग्णांची आरोग्य केंद्रात गर्दी वाढत आहे. यामध्ये हुपरी परिसरासह कर्नाटकातील काही गावांतील रुग्णांचा समावेश आहे. तसेच केंद्रात असणाऱ्या शवविच्छेदनाची सोय असल्याने कोल्हापूर, इचलकरंजी येथे जाण्याचा त्रास वाचला आहे.

गोरगरिबांसाठी असणारे हे केंद्र वाचविणे जि.प.च्या हातात असून सध्याची महागाई गरीब जनतेला न परवडणारी आहे. त्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लोकसहभागही महत्त्वाचा असून, लोकसहभागातून केंद्राचा लूक कसा बदलावयाचा हे अनेकांनी अनुकरण करणे गरजेचे बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वाशी नाका येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशी नाका येथे अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी मशिनवरील सुरक्षा पत्रा उचकटला. मात्र, आतील पत्रा उचकटता न आल्याने मशिनमधील १७ लाखांची रक्कम सुरक्षित राहिली. याबाबतची फिर्याद प्रशांत प्रकाश तवंदीकर (वय ३८, रा. शाहूमिल कॉलनी) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली आहे.

नवीन वाशी नाका येथील व्ही. आर. कॅसलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शाखेलगतचच्या गाळ्यात बँकेचे एटीएम आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीस दिले आहे. शनिवारी हाप डे व रविवारी सुटी असल्याने कंपनीने दोन दिवसांपूर्वी एटीएममध्ये पैसे भरले होते. चोरट्याने तब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्याला केवळ मशिनचा सुरक्षा पत्रा उचकटण्यात यश आले. मध्यरात्री तीनच्या सुमारास करवीर पोलिसांना या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. एटीएम मशिन व शेजारी बँक असतानाही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला नसल्याने पोलिस व नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट विमा पॉलिसी प्रकरणी चौघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट विमा पॉलिसी प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक प्रकरणात कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. याआधारे पोलिसांनी याप्रकरणी कंपनीच्या दोन सेल्स मॅनेजरसह अन्य दोघांना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रिलायन्स विमा कंपनीचे सेल्स मॅनेजर मधुरा शेखर जाधव, संदीप पंडितराव सावंत, एजंट अक्षय आनंदा चौगुले (वय २४ रा. जरगनगर), कल्पना शिवाजी सोनुले यांचा समावेश आहे.

बनावट विमा पॉलिसी प्रकरणी संदीप शिवाजी सोनुले यांचा मृत्यू १२ फेब्रुवारी २०१४ रोजी झाला. मात्र, विम्यासाठी त्यांची बहीण कल्पना शिवाजी सोनुले हिने संदीपच्या नावाने १५ मे २०१४ रोजी विमा उतरविला. बहिणीने विम्यासाठी संदीप १ जानेवारी २०१५ रोजी मृत झाल्याचे प्रमाणपत्र डॉ. सागर पाटील यांच्याकडून बनवून घेतले. मृत आपल्या परिचयाचा असून त्याच्याविषयी माहिती असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र कंदलगाव येथून मिळवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीपची बहीण कल्पनाला अटक केली. सूरज मछले १ फेब्रुवारी २००१ मध्ये मृत झाले असताना त्यांचा वारस व भाऊ सचिन मछले याने सूरज मछले यांच्या नावे २० सप्टेंबर २०१४ रोजी पॉलिसी उतरवली.

तसेच डॉ. वर्षा बरगे यांच्याकडून सूरज मछले ५ मार्च २०१५ रोजी मृत झाल्याचे बनावट मृत्युपत्र तयार केले. बनावट मृत्यू प्रमाणपत्रप्रकरणी पोलिसांनी मधुरा जाधव, संदीप सावंत, अक्षय चौगुले यांना अटक केली.याप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये आणखी राजकीय व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार कार्यक्रमांच्या आस्वादाची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांस्कृतिक, साहित्यिक, शै​क्षणिक विषयातील वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहितीसह मनोरंजनाचे नवे व्यासपीठ घेऊन आलेल्या 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' या उपक्रमाला रसिक वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदस्य होण्यासाठी 'मटा'च्या नागाळा पार्क येथील कार्यालयात वाचकांची गर्दी वाढत आहे. दर्जेदार कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी या कल्चर क्लबच्या माध्यमातून मिळणार आहे.

कल्चर क्लबचे सदस्यत्व संपूर्ण कुटुंबासाठी देण्यात आल्यामुळे वाचक 'मटा कल्चर क्लब' या उपक्रमावर खूश आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वयाचा, आवडींचा आणि त्यांच्या उपयुक्ततेचा विचार करून कल्चर क्लबमधील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्यामुळे या क्लबचे सदस्य होण्यासाठी प्रतिसाद वाढला आहे. दोन दिवसांपूर्वीच कल्चर क्लबच्या नोंदणीला सुरूवात झाली. अवघ्या दोन दिवसात वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नोकरदार महिला, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह ​डॉक्टर, व्यावसायिक, प्राध्यापक, व्यापारी या क्षेत्रातील वाचकांनी कल्चर क्बल सदस्यत्व घेतले आहे. क्लबतर्फे पुढच्या दोन महिन्यातील कार्यक्रमांचे नियोजन झाले असून यामध्ये एरो मॉडेलिंग कार्यशाळा, डाएट प्लॅनिंग अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

क्लबतर्फे​ कोल्हापुरात 'मॉकटेल मेकिंग' कार्यशाळा घेण्यात आली. नव्या टेस्टचे पाच मॉकटेल बनवण्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. अशा प्रकारच्या वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमांमधून नविन गोष्टी शिकण्याची संधी कल्चर क्लब सदस्यांना मिळणार आहे. क्लबच्या सदस्यांसाठी खास संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या कवितांवर आधारित 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाचे मोफत पास देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे.

सध्या ताणतणाव वाढले असताना चांगल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला की प्रसन्न वाटते. ही गरज 'मटा' च्या कल्चर क्लबने पूर्ण केली आहे. वैविध्यपूर्ण कार्यक्रम हे कल्चर क्लबचे वैशिष्ट्य आहे. नव्या गोष्टी शिकण्यासोबत कलाकारांना भेटण्याची संधी या क्लबमुळे मिळणार आहे.

- अरविंद राणे, सदस्य, मटा कल्चर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅग चोरट्यास अटक, दोघे पसार

0
0

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून व्यापाऱ्याच्या हातातील रोख रक्कम असलेली बॅग लंपास करणाऱ्या एकास शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्याचे अन्य दोन साथीदार पसार झाले.

दीपक सुभाष पोवार (वय २५, रा. निंबाळकर माळ, सदर बझार) याला अटक करण्यात आली असून गोग्या, स्वप्निल (दोघांचेही पूर्ण नाव समजू शकले नाही) हे पसार झाले. विनोद किशनचंद वाघवाणी (वय ३८, रा. गांधीनगर) हे एक लाखांची रोख रक्कम घेऊन गांधीनगरकडे जाण्यासाठी दाभोळकर कॉर्नर चौकातील रिक्षा थांब्यावर थांबले होते. यावेळी दीपकसह त्याच्या साथीदारांनी वाघवाणी यांना धक्का देत त्यांच्या हातातील रक्कम हिसडा मारून लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघवाणी यांच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा हा बेत फसला. नागरिकांनी पाठलाग करून चोरट्यास पकडले व शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिने चोरीप्रकरणी महिलांना अटक

0
0

इचलकरंजी : येथील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. दीपाली किशोर काळे (वय ३० रा. राधानगरी) हिच्यासह अन्य एका महिलेला पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर येथील रेखा आनंदा जाधव (वय ५०, रा. शाहूमिल कॉलनी) या येथील बसस्थानकातून कोल्हापूरकडे जात होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे १० हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबतची तक्रार जाधव यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयावरुन काळे हिच्यासह दोघींना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती या दोघींनी जाधव यांची बोरमाळ चोरल्याचे स्पष्ट झाले होते. हा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीसाठी तीन पॅनेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप आणि सतेज पाटील यांची आघाडी झाली असून शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी युती केली आहे. तर काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील यांना एकाकी पाडल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी आपले पॅनेल जाहीर केले. त्यामुळे आता निवडणुकीत तीन पॅनेल रिंगणात असणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना जिल्हा बँकेत पी. एन. पाटील यांनी केलेल्या विरोधाचे उट्टे बाजार समितीच्या निवडणुकीत काढल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे छत्रपती शाहू शेतकरी आघाडी, शिवसेना - भाजपचे शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी पॅनेल तर पी. एन. पाटील प्रणित काँग्रेसचे राजर्षी शाहू पॅनेल अशी पॅनेल असणार आहेत.

राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप आणि सतेज पाटील यांच्यात जागांचे वाटप झाले आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला ८ जागा, जनसुराज्यला ४, सतेज पाटील २, शेकापला १ आणि शाहू विकास आघाडी १ असे जागावाटप करण्यात आले आहे. तर तीन जागा सर्वांच्या संमतीने देण्यात आल्या आहेत.

शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी यांच्यातील जागावाटपानुसार शिवसेनेला १५, भाजपला ३ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यात आली आहे. शेकापने सत्ताधारी गटासोबतच राहणार असल्याचे निश्चित केले.

मुश्रीफ यांची खेळी

राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती. पण, आमदार हसन मुश्रीफ यांनी खेळी करत जिल्हा बँकेमध्ये पी. एन. पाटील यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. सतेज पाटील यांना पॅनेलमध्ये घ्यावे यासाठी जनसुराज्यचे नेते विनय कोरे यांनी आग्रह धरला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्जाला मुदतवाढ नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांनी त्यांना दिलेल्या मुदतीतच पीक कर्जाची परतफेड करावयाची आहे. ३० जून ही मुदत वाढीव मुदत आहे, त्यापेक्षा जास्त मुदत मिळणार नाही. त्यावेळेत कर्जाची परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज देणे बँकांना शक्य होणार नाही. त्यामुळे ती वेळेत भरावी अन्यथा कर्ज मिळणार नाही,' असा इशारा सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

दळवी म्हणाले, 'शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना ते वेळेत परतफेड करण्याच्या अटीवर दिलेले असते. केवळ कारखाना उसाच्या बिलाचे पैसे देत नाही म्हणून पीककर्जाची परतफेड करण्यास अडचणी येत आहेत, हे बरोबर नाही. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळत असतात. त्यानुसार त्यांनी तडजोडी केल्या पाहिजेत. कारखान्यांनीही शेतकऱ्यांची बिले वेळेत दिली पाहिजेत. एफआरपीप्रमाणे ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांवर भविष्यात कारवाई होईलच. पण, सद्यस्थितीमध्ये कारखान्यांकडे असलेली रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे. अपात्र कर्जमाफीचा अहवाल मिळाला असून त्याची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल.'

ते पुढे म्हणाले, 'अनेक नागरी बँकांकडे ठेवीदारांचे पैसे देण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यासाठी वसुली यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच कलम ८३ ची प्रकरणे सहा महिन्यात तर ८८ ची प्रकरणे दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

फायलींचा निपटारा करणार

सध्या सहकार कार्यालयात कामकाजाच्या फाइल्सचे ढीग पडले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवरच नाही तर त्याच्या मागे, पुढे आणि पायाखाली देखील अनेक फाइल पडलेल्या असतात. त्यामुळे सर्व फाइल नीटनेटक्या ठेवणे, त्याची माहिती संगणकावर लोड करणे आदी माहिती करावयाची आहे. गेल्या सहा महिन्यात निवडणुकांमुळे हे कामकाज फारसे झालेले नाही. १जुलैपासून पुन्हा ते करून घेतले जाणार असल्याची माहती दळवी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेंचा पुरस्कार रद्द करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करू,' अशा शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुरंदरे यांच्या पुरस्कारावर आक्षेप घेतला. पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याच्या एकमुखी मागणीने शनिवारी कोल्हापुरात झालेली शिवसन्मान जागर परिषद गाजली. शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीच्यावतीने या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पवार बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ ​इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव होते. यावेळी श्रीमंत कोकाटे, प्रतिमा परदेशी, इंद्रजित सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ. जयसिंगराव पवार यांनी शिवाजी महाराजांबाबत इतिहासातील दाखले दिले. शिवाजी महाराजांबाबत जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध होत आहे त्यासाठी पूरक माहिती देणाऱ्या काही मंडळींमुळे खोटी माहिती लोकांपर्यंत जात आहे. अशाप्रकारची प्रवृत्ती ठेचायची असेल तर शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणाऱ्या अभ्यासक व संशोधकांची संख्या वाढली पाहिजे. आपल्याच सभोवतालचे काहीलोक चुकीची माहिती प्रसारित करण्याचा उद्योग करतात. जिजाऊंचे चारित्र्यहनन करणाऱ्या जेम्स लेनने आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले आहेत. मात्र, तरीही पुरंदरे यांनी त्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यात येऊ नये या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

ज्या जेम्स लेनने शिवाजी महाराजांची बदनामी करणारे पुस्तक लिहिले त्या पुस्तकात त्याने पुरंदरेंचे आभार मानले आहेत. त्यामुळे पुरंदरे यांना पुरस्कार देणे म्हणजे पुरंदरे लिखित विकृत इतिहासाला अधिकृत करण्याचा प्रकार आहे. यासारखा दुसरा राष्ट्रीय गुन्हा असू शकत नाही, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीच्या ठरावाला पाठिंबा दिला. यावेळी व्यंकप्पा भोसले, अनिल म्हमाणे, डॉ. मेघा पानसरे, डॉ. मंजुश्री पवार, आदी उपस्थित होते. नंदकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तासगाव’चा पेच कायम

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

तासगाव सहकारी साखर कारखाना दीर्घकाळ भाड्याने द्या, ही क्रांती सहकारी साखर कारखाना व श्री डेव्हलपर्स (मुंबई) ची मागणी राज्य सहकारी बँकेने अमान्य केली आहे. साखर कारखाना भाड्याने देताना अटी व शर्थी शिथिल करा ही त्यांची मागणीही राज्य बँकेने नामंजूर केली आहे. मुंबई हायकोर्टात या बाबतचा दावा सुरू असल्याने असा निर्णय घेता येणार नाही, अशी राज्य बँकेची भूमिका आहे. बँकेच्या वतीने बोलताना व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड म्हणाले, 'लवकरच कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतरच दीर्घकाळचे धोरण ठरविणे शक्य होईल.'

दरम्यान, तासगाव साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी राज्य बँकेतर्फे निविदा मागवण्यात आल्या होत्या, त्यांची अंतिम मुदत संपली आहे. एकही सहकारी संस्था, साखर कारखान्याने निविदा भरली नाही. कुंडलचा क्रांती, तसेच सोनहिरा सहकारी साखर कारखाना व श्री डेव्हलपर्स कंपनीने केवळ राज्य बँकेशी पत्रव्यवहार केला. बँकेच्या अटी व शर्थी जाचक आहेत, कारखाना सुस्थितीत नाही, तो सुरू करणे खर्चिक काम आहे. तीन वर्षे कारखाना बंद आहे, अशा स्थितीत तो चालवावयास घेताना दीर्घकाळासाठी मिळणे आवश्यक आहे, असे या संस्थांचे म्हणणे आहे. कर्नाड म्हणाले, 'काहीही झाले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारखाना दीर्घकाळ चालवावयास देणे अशक्य आहे. म्हणूनच एक वर्षाच्या मुदतीने तो भाड्याने देण्याची तयारी बँकेने दाखविली. त्यात बदल करणे कसे शक्य आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना परिसरात मान्सूनची हजेरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

मान्सूनच्या पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. ढगांनी अच्छादलेले आभाळ, पावसाची रिमझीम या पावसाळी वातावरणामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळा सक्रीय होण्याचे संकेत आहेत. आठ जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतरही पावसाला प्रारंभ न झाल्यामुळे शेतकरीवर्गासह सर्वच चिंतातूर झाले होते.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपात पडणाऱ्या सरीचे रुपांतर आता दमदार स्वरूपात झाले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने पावसाने दमदार सलामी दिली आहे. कोयनानगर एकूण ३० मि.मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे. गतवर्षी याच दिवशी पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे एकूण ४३ मि. मी., नवजा येथे एकूण ४७ मि. मी., महाबळेश्वर येथे एकूण फक्त ३ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.

कोयना धरणाची सध्याची जलपातळी २०७७.१ फूट असून धरणात ३०.३२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातील २५.२० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणाची जलपातळी २०४३.४ फूट होती तर धरणात १५.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यातील केवळ १०.२३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ टीएमसी अतिरीक्त पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images