Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कचरा उठावासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील दुर्गंधी, रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रकार आणि अस्वच्छतेमुळे संतप्त झालेले नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांना तीन तास रोखून धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना करण्याची ग्वाही दिल्यानंतर नागरिकांनी आंदालन मागे घेतले.

शहरात रोज १७० टनांपेक्षा जास्त कचरा जमा होतो. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जागा मिळेल तेथे कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. सुनील ​जाधव, नमजान शेख, इंदूमती कांबळे, अभिजित कांबळे, नितीन कसबेकर, भाग्येश कोंडूसकर आदींचा आंदोलनात समावेश होता.

त्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक चंद्रकांत घाटगे, उपमहापौर मोहन गोंजारे हेही आले. मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील घटनास्थळी आले. नागरिकांनी अधिकारी आणि नगरसेवकांसमेर तक्रारींचा पाढा वाचला. कचऱ्याचे डोंगर निर्माण झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आरोग्य विभागाकडून औषध फवारणी होत नाही अशा तक्रारी केल्या. आयुक्त घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांना रोखून धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीपंपांचे ऑडिट होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी शेतीसाठी वापरत असलेल्या विजेपेक्षा अतिरिक्त वीज वापराचे बिल वीज कंपनीकडून आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी आणि राज्य वीज ग्राहक संघटनेने केल्या होत्या. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन याबाबत त्रयस्थ संस्थेकडून वीजवापराबाबत ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था महावितरणचे संचालक विश्वास पाठक आणि राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या निरीक्षणाखाली काम करणार आहे. पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या वीज वापराबाबत ढोबळमानाने वीजबिल आकारले जाते. गेल्या काही महिन्यात त्यात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यात ३ ते ५ हॉर्सपॉवर, ५ ते ७. ५ आणि ७. ५ ते १० हॉर्सपॉवर बिल आकारले जात होते. शेतकऱ्यांची त्यासाठी कसलीही मागणी नसताना हे बिल आकारण्यात येत होते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना अतिरिक्त बिल येण्याबरोबरच चुकीची देणी वाढणे, सरकारच्या सबसिडीत वाढ होणे आणि वितरणातील खरी हानी समजून न येणे, अशा तक्रारी होत्या. हा प्रकार संपूर्ण राज्यभर सुरू आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषीसाठी एकूण लोड आणि प्रत्यक्षात होणारा वीजवापर याबाबत त्रयस्त एजन्सीकडून परिक्षण करण्यात यावे. त्यात वीजक्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रयास किंवा टाटा यांसारख्या विश्वसनीय संस्था ऑडीट करतील असे सुचविले आहे. त्याबरोबरच तपासण्यात येणाऱ्या नमुन्यात राज्यातील सर्व भागातील शंभर नमुने तपासण्यात यावे. त्यात मीटर लावलेले आणि मीटर नसलेले तसेच सिंचनाखालील पिके आणि बिगरसिंचनाखालील पिकांचाही समावेश असावा, अशा प्रकारच्या संमिश्र फिडरचा समावेश करण्याचेही आदेश दिले आहेत.

राज्याच्या विविध भागातून घेतलेले नमुने आणि त्याआधारे करण्यात येणारे विश्लेषण यासाठी विश्वास पाठक आणि प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमली आहे. याबाबत ते सरकारला मार्गदर्शन करतील. ही समिती कोणते नमुने घ्यायचे आणि परीक्षण करायचे याबाबतही निर्णय घेईल. लेखापरिक्षणानंतर शेतीचा वापर किती आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात सुमारे ७५ टक्के शेतीपंप मीटरशिवाय आहेत असे गृहीत धरले तर ९०२ कोटी रुपये अतिरिक्त बिल येऊ शकते. यामध्ये ६३१ कोटी रुपये अनुदान आणि २७१ कोटी चुकीच्या पद्धतीने आकारलेली रक्कम असते. त्यामुळेच कृषी संजीवनीसारख्या योजना यशस्वी ठरत नाहीत.

- प्रताप होगाडे, अध्यक्ष, राज्य वीज ग्राहक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’ला प्राधान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना पाटील म्हणाले, 'सांगली जिल्ह्याचा सन २०१५-१६ साठीच्या वार्षिक योजना आराखाड्यात दुष्काळ निवारण्यासाठी जलयुक्त शिवार व ठिबक सिंचनला अग्रक्रम दिला जाईल. जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसाठे निर्माण करून टंचाईमुक्त गावे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील १४१ गावे निवडण्यात आली आहेत. या ठिकाणी कामेही सुरू आहेत. जिल्हा नियोजनातून २४ कोटी निधी या करिता देण्यात आला आहे. इतर उपाययोजनातून जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी दोन एक्सॅव्हेटर खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, व्यापारी, उद्योजक, देणगीदारांकडून या अभियानासाठी निधी उपलब्ध करून घेण्याचे कामही केले जाणार आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यात ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.'

जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस या तालुक्यातील गावे जलशिवाराच्या निकषात बसत नसल्याने ती समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. या गावांसाठी वेगळ्या निधीची तरतूद केली जाईल. निकषात काही बदल करता येतात का? हेही पाहिले जाईल. ऊस शेती ठिबक सिंचनाद्वारे करण्यासाठी सरकारचे प्राधान्य आहे, असेही पाटील म्हणाले.

२६६ कोटींचा विकास आराखडा मंजूर

जिल्ह्याचा २०१५-१६ च्या २६६ कोटी ५९ लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. त्यात सर्वसाधारण योजनांसाठी १९८ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी ६७ कोटी ४ लाख, ओटीएसपीटीकरिता १ कोटी ५ लाख, अशी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी विशेष निधी दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना प्रशासन सज्ज

$
0
0

कराड : मुसळधार पावसासाठी प्रति चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे येथील कोयना धरण पाणलोट क्षेत्र मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापन करण्यासाठी बसवण्यात आलेली आठ पर्जन्यमापक टेलिमीटर यंत्रे अँक्टिव करण्यात आली आहेत. टेलिमेटीक तंत्रज्ञानाद्वारे स्वयंचलीत पर्जन्यमापक यंत्रे पर्जन्यमापन करणार आहेत. कोयना धरणात सध्या असणारा पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रात पडणारा संभाव्य पाऊस यामुळे कोयना धरण ऑगस्ट २०१५अखेर पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, वातावरणातील बदलाचे संकेत मिळताच कोयना प्रकल्पाच्या कोयना धरण व्यवस्थापनाने पाणलोट क्षेत्रातील आठ पर्जन्यमापक केंद्रांच्या सुस्थितीचा आढावा घेवून कोयनानगर वसाहतीत मान्सूनपूर्व करावयाची कामे चालू केली आहेत, असेही बागडे यांनी सांगितले.

बागडे म्हणाले, '१०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात यापूर्वी पर्जन्यमापनासाठी ९ पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापनाचे काम केले जात होते. या वर्षी यातील कारगाव या पाणलोट क्षेत्राचा तांत्रिक कारणामुळे समावेश करण्यात आला नाही. कोयना, नवजा, महाबळेश्वर या प्रमुख पाणलोट क्षेत्राबरोबरच काठी, बामणोली, वलवन, प्रतापगड, सोनाट ही पाणलोट क्षेत्रे असून या ठिकाणी टेलिमेटीक तंत्रज्ञानाद्वारे स्वयंचलीत पर्जन्यमापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. या यंत्रणेचा आढावा घेतला असता सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत वाळू ठेका उद्‍ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कृष्णा नदीकाठावरील जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथे सुरू असलेला अनाधिकृत वाळू ठेका येथील प्रांताधिकारी किशोर पवार यांनी छापा टाकून उद्ध्वस्त केल्याने व वाळू वाफे मुजविण्यात आले आहेच. या उत्खननाच्या पंचनाम्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठ्यांना दिल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, विना परवाना व रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करताना आढळून आलेल्या ३१ ट्रकांवर कारवाई करून १६ लाख ७४ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान जप्त केलेले सहा ट्रक संबंधितांनी पळवून नेल्याने सहाही ट्रक मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेशही प्रांताधिकारी पवार यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथे ठेकेदाराने वाळू ठेक्याची पूर्ण रक्कम जमा न केल्याने या वाळू ठेक्याचा कब्जा महसूल विभागाकडून ठेकेदाराला देण्यात आला नव्हता. तरीही तेथे गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृतपणे वाळू उपसा सुरू करण्यात आला होता. त्या बाबतची माहिती प्रांताधिकारी किशोर पवार यांना मिळाली होती. त्यावरून पवार यांनी मंडलाधिकारी व तलाठी यांना बरोबर घेऊन रविवारी उशिरा जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथे अचानक छापा टाकाला. या वेळी अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित वाळू ठेका उद्ध्वस्त करण्यात आला. तेथील सर्व वाळू वाफे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तातडीने मुजविले. या ठिकाणी केलेल्या वाळू उपशाचे पंचनामे करण्याचे आदेश मंडलाधिकारी व तलाठ्यांना देण्यात आले. संबंधित ठेका चालविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही प्रांताधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.

या कारवाई बरोबरच कराड तालुक्यात विना परवाना व रात्रीच्या वेळी वाळू नियम धाब्यावर बसवून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजेंद्र शेळके, मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या संयुक्त पथकाने कराड तालुक्यासह कराड शहर तसेच उंब्रज, मसूर परिसरात केली. या वेळी विना परवाना पावती शिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या तसेच रात्रीची वाळू वाहतूक करताना आढळून आलेले ३७ ट्रक पकडण्यात आले. या मधील २१ ट्रक कराड तहसील कार्यालयात, १० ट्रक उंब्रज पोलिस ठाण्यात तर ६ ट्रक जप्त करून सैदापूर येथील एका पेट्रोल पंपामध्ये महसूल अधिकाऱ्यांनी उभे केले होते. मात्र सैदापूरातील पेट्रोल पंपावर उभे केलेले सहा ट्रक संबंधितांनी परस्पर पळवून नेले. त्यामुळे ट्रक मालक व चालक यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे तसेच सदर वाहनांचे वाहन परवाने रद्द करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अन्य ठेक्यांवर केव्हा कारवाई?

महसूल अधिकाऱ्यांनी जुने कवठे-वडोली भिकेश्वर येथे कब्जा न घेता अनाधिकृतणे वाळू उपसा सुरू असलेल्या ठेक्यावर कारवाई केली. मात्र, याच पद्धतीने कराड तालुक्यात अन्य काही ठिकाणी बोटी, जेसीबी, डंपर अशा यांत्रिक सामुग्रीचा वापर करून वाळू उपसा राजरोस सुरू आहे. अनेक ठिकाणी गावच्या ओढ्यातून वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यावर महसूल विभाग केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गढूळ पाणीपुरवठा पालिकेने थांबवला

$
0
0

कराड : कराड व पाटण तालुक्यात गेले दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसाने कृष्णा आणि कोयना नदीचे पाणी गढूळ बनले आहे. परिणामी नगरपालिकेच्या नवीन जलशुद्धिकरण केंद्रात उचलले जाणारे पाणीही प्रमाणापेक्षा जास्त गढूळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेने एक दिवस शहराला केला जाणारा पाणीपुरवठा नाईलाजाने थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी शहरवासियांची पाण्याअभावी गैरसोय झाली.

मान्सूनपूर्व पाऊसाने पाच व सहा जूनला कराड व पाटण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. कराडला पाच रोजी २० मिमी तर सहा रोजी ४५ मिमी पाऊसाची नोंद झाली. पाटण तालुक्यातही दोन दिवसांत पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने कोयना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले होते. पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने नदीत कचरा, घाण मोठ्या वाहून आले होते. या पार्श्वभूमीवर नवीन जलशुद्धिकरण केंद्रात नदीतून पाणी उचलले जात होते, हे पाणी प्रमाणापेक्षा जास्त गढूळ असल्याचे व त्यावर प्रक्रिया करूनही गढूळपणा कमी होत नसल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या नियमांचा बँकांना फटका

$
0
0

सांगली : सहकारी बँकांतील ठेवीदारांना प्रतिवर्षी दहा हजार रुपयांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर १० टक्के आयकर आकरला जाणार आहे. या नवीन नियमांमुळे बँकांची चिंता वाढलेली दिसते. या नवीन नियमाविरुद्ध राज्यातील सहकारी बँकांच्या अध्यक्षांची लवकरच समिती स्थापन होणार आहे. या समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटणार आहे.

एक जूनपासून हा नवीन नियम लागू झाल्याने ठेवींच्या संख्येत घट होऊ लागली आहे. सागंली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, 'या नव्या नियमामुळे सहकारी बँका आर्थिक अडचणीत येऊ लागल्या आहेत. राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या अध्यक्षांशी या बाबत चर्चा सुरू आहे. लवकरच या अध्यक्षांची एक संघटना स्थापन करून केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांच्याकडे या संदर्भात बँका आपले म्हणणे मांडणार आहेत. सहकारी बँकांवर अशा प्रकारचे संकट नको, अशी भूमिका मांडली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापड गोदामाला खोतवाडीत आग

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, इचलकरंजी

खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे वीस लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेची वर्दी नारायण गणेश पवार (वय ३५ रा. शहापूर) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शहापूर येथील नारायण पवार यांचे खोतवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ कापड गोदाम आहे. पवार यांचा ग्रे कापड त्याचबरोबर बर्मुडा व परकर आदी तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. या गोदामास सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गोदामातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आल्याने जवळच असलेल्या चहागाड्यावरील विक्रेत्याने ही माहिती पवार यांना दिली. आगीची माहिती मिळताचा पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.

या आगीत ७०० ग्रे कापडाचे तागे, २० हजाराहून अधिक परकर,१५०० हून अधिक तयार बर्मुडे तसेच टेबल, खुर्च्या व अन्य साहित्य जळून खाक झाले. शेजारील नागरिकांनी सतर्कता दाखवत काही कापड माल बाहेर काढल्याने तो बचावला. आगीत सुमारे २० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूकबधीर अभिषेकचे लखलखीत यश

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

लहानपणापासूनच अभिषेकच्या कानावर कोणतीच हाक पडली नाही, आई-बाबा म्हणून त्याला कधी हाकही मारता आली नाही. शिक्षकांनी शिकविलेले कधीच ऐकू आले नाही किंवा एखादी शंका असल्यास विचारता येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलचा मूकबधीर विद्यार्थी अभिषेक परकाळे याने दहावीला ७० टक्के गुण मिळवित एक आदर्शच निर्माण केला आहे.

येथील आर.के. नगरमध्ये राहणारा अभिषेक बाबासाहेब परकाळे हा जन्मतः मूकबधीर आहे. सुरूवातीला त्याला स्वतंत्र मूकबधीर शाळेत घातले. मात्र तिथे त्याच्यामध्ये फार फरक न पडल्यामुळे त्याचे वडील बाबासाहेब परकाळे यांनी त्याच्यासाठी एस. आर. कुलकर्णी यांच्याकडे सात वर्षे स्पीच थेरपीचे ट्रेनिंग घेतले. हे ट्रेनिंग घेत असताना त्याला शाळेत पोहोचायला दीड वाजायचे. वडील नोकरी करत असल्यामुळे त्याची आई संगीता ही रोज आर. के. नगरमधून स्पीच थेरपी ट्रेनिंगसाठी शहरात येत. परत ति‌थून त्याला शाळेमध्ये सोडत. अशी सात वर्षे अभिषेकच्या आईने त्याला शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्याला आर. के. नगरमधील देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये सर्वसामान्य मुलांमध्ये शिकण्यासाठी दाखल केले.

पण मुळात जे शिक्षक समोर शिकवित ते अभिषेकला कधी ऐकू आले नाही किंवा एखाद्या प्रश्नाबाबतची शंका विचारता आली नाही. पण यातून या स्कूलच्या शिक्षकांनी त्याला अनेक प्रयत्नातून दहावीचा अभ्यासक्रम शिकविण्याचा प्रयत्न केला.ते त्याच्या पाठीशी राहिले.

अभिषेकने दहावीचा अभ्यास हा प्रश्नांची उत्तरे वारंवार लिहून ती पाठ करून केला असून त्याची आई संगीता यांनी हा अभ्यास करून घेतला. त्या शिकविताना अनेक अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत त्याला शिकविण्याचा ध्यास घेतला. भविष्यात अभिषेकला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची खूप इच्छा असून त्याला इंजिनिअरिंगला घालण्याचा विचार आहे. पण संवादाच्या अभावामुळे त्याला शिक्षणाची शिखर चढताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

अभिषेक हा जन्मतःच मूकबधीर आहे. त्याला शिकविताना अनेक प्रयत्न करावे लागले. त्याने जे यश मिळविले त्यामध्ये त्याच्या आईने खूप कष्ट घेतले असून त्याच्या शाळेतील शिक्षकांचे मोठे सहकार्य मिळाल्यामुळे त्याला हे ‌यश मिळविता आले.

-बाबासाहेब परकाळे, अभिषेकचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत नागरी आघाडी

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत परिवर्तनवादी संघटना, पक्ष आणि कार्यकर्ते एकत्र येऊन नागरी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने यासाठी पुढाकार घेतला असून यासंदर्भात प्राथमिक बैठकही झाली आहे. विविध संस्था आणि संघटनांशी संपर्क साधला जात आहे. यानिमित्ताने महापालिकेच्या निवडणुकीसाठी अ-राजकीय संघटनांना सोबत घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच होणार आहे.

विविध पुरोगामी, डावे पक्ष आणि परिवर्तनवादी संघटना, तसेच नागरी समस्यांवर काम करणाऱ्या संघटना या सर्वांनी एकत्रित निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाचे नेते नामदेव गावडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'कोल्हापूर महापालिकेतील सध्याचा कारभार फार काही समाधानकारक म्हणता येणार नाही. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न आणि भ्रष्टाचाराचे होत असलेले आरोप लक्षात घेता चांगले कार्यकर्ते निवडून यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी एक‌त्र येऊन प्रयत्न केला तर नक्कीच मोठे आव्हान उभे करता येईल.'

डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी असा विचार आहे, त्याचबरोबर पर्यावरण, नागरी समस्या, महिलांचे आणि मुलांचे प्रश्न, आरटीआय कार्यकर्ते, नाट्य, साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते, संघटना, चांगली तरूण मंडळे, सोशल मीडियात काम करणारे तरूण, औद्योगिक संघटना यांनाही एकत्र घेण्याचा प्रयत्न होणार आहे. फक्त राजकीय पक्षांचीच नव्हेतर सर्वच क्षेत्रात चांगले काम करणारे कार्यकर्त्यांची नागरी आघाडी व्हावी असा प्रयत्न होणार आहे. एखादा प्राम‌ाणिक, निस्वार्थी नगरसेवक असेल तर त्याच्या पाठीशी राहण्याचाही प्रयत्न होईल.'

ते म्हणाले, 'चांगला पर्याय दिला तर लोक मान्य करतात. नागरिकांना स्वच्छ, कार्यक्षम, सुशिक्षित, अभ्यासू असे उमेदवार हवे आहेत. असे उमेदवार दिले तर नागरिक पाठीशी राहतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू. वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगले कार्यकर्ते एकत्र आले तर शहराच्या विकासासाठी नक्कीच चांगले पाऊल ठरेल.'

'चारित्र्यसंपन्न, अभ्यासू उमेदवार आणि शहाराच्या विकासाचा ठोस कार्यक्रम घेऊन जनतेपुढे जाऊ. त्यासाठी विविध संघटनांशी संपर्क साधत आहोत. अ-राजकीय संघटनांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. सध्याची बदलती सामाजिक परिस्थिती पाहिली तर लोक परिवर्तनाच्या बाजूने उभे राहतील असा आमचा विश्वास आहे,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचगांवमध्ये दूषित पाणी पुरवठा

$
0
0

कोल्हापूरः उचगांवमधील सरस्वती कॉलनी, गणेश कॉलनी, बाबा नगर आणि ओम साई पार्क परिसरात गेले दोन दिवस दूषित पाणी पुरवठा होत आहे. पाइपलाइन खराब झाल्याने त्यामध्ये गटारीचे पाणी मिसळत आहे. यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर टोलवाटोलवी सुरू असल्याचे सांगण्यात आले. गटारीच्या बाजूला घाण टाकण्यात आली असून तक्रारी करूनही कचरा उठाव केलेला नाही, ग्रामसेवक गेले दोन महिने रजेवर आहे. उडवाडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुपारी किलरवर लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या करणाऱ्या दोन संशयितांची रेखाचित्रे प्रसिध्द केल्यानंतर पोलिसांनी सुपारी किलरवर लक्ष केंद्रीत केले आहे. परिक्षेत्रासह सीमाभागातील सुपारी किलर गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

पानसरे यांच्या हत्येला शंभर दिवस उलटल्यानंतर पोलिस प्रशासनाने दोन संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिध्द केली आहेत. संशयितांची माहिती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने फोन व मोबाइल क्रमांक दिले आहेत. या क्रमांकावर माहिती देण्यासाठी नागरिकांचे कॉल येत आहेत.

दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मोटारसायकलवरून चौघेजण आल्याचे दिसून आल्याने पानसरे यांची हत्या या संशयित किलरनी केल्याचा संशय बळावला आहे. पानसरेंची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी परिसराची रेकी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडेल स्टेशन विकस‌ित करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. येथील रेल्वेस्थानकावर विविध सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने जवळपास पाच कोटींच्या कामांचा सोमवारी प्रारंभ झाला. तीन फूटओव्हर ब्रीज, शेड आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याच्या कामांचा यात समावेश आहे.

विशेषत: तीन एफओबींचा नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. खासदार महाडिक, स्टेशन मॅनेजर सुग्रीव म‌ीना, विभागीय अभियंता गुण शेखरा, रेल्वेचे अधिकारी एस. व्ही. देशपांडे, महापा‌लिकेचे शहर अ‌भियंता नेत्रदीप सरनोबत आदी यावेळी उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, 'रेल्वेस्टेशन हे शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतिक आहे. सातारा आणि कोल्हापूर पॅसेंजरचे दोन डबे वाढण्यात येतील. शिवाय कोल्हापूर आणि नागपूर एक्सप्रेस आठवड्यातून सहावेळा धावेल. मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून विकसित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील.'

मीना म्हणाले, 'महाडिक यांनी रेल्वे खात्याकडे निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे. दरवर्षी अशाप्रकारे निधी मिळाला तर येत्या काही वर्षांत रेल्वेस्टेशनचा कायापालट झालेला ‌दिसेल.'

असा होणार फायदा

एसटी स्टँडवरून शाहूपुरी, राजारामपुरीकडे जाण्यासाठी एफओबीचा फायदा होईल. तसेच या‌ ‌ठिकाणी खासगीकरणातून तिकीट विक्रीची व्यवस्था असेल. रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या एफओबीला सरकता जिनाही असणार आहे. तसेच रेल्वेस्टेशनवर जाण्यासाठीही एफओबी असेल. शिवाय विक्रमनगर येथे एफओबी असेल. फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ ची उंचीही वाढवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर शेड उभारण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

रेल्वेस्टेशनच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. स्थानकावर येणारे नागरिक आणि प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, 'प्लॅटफार्मची उंची वाढवण्याचा मुद्दाही सुरक्षेशी निगडीत आहे. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या डब्याच्या पायऱ्या यात जास्त अंतर असल्याने अपघात होतात. प्लॅटफॉर्मची उंची वाढवल्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल. तसेच एफओबीमुळे रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरपीआय मोर्चावेळी तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर येथे बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कायमस्वरूपी ठेवावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकारी शिवाजी सभागृहात आले नसल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी फाटकावर चढून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

डॉ. आंबेडकरांचा पुतळा कायमस्वरूपी गांधीनगर येथील शिरू चौकात ठेवावा, या मागणीसाठी आरपीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सव्वा एक वाजता बिंदू चौकातून मोर्चा काढला. मोर्चात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा मोर्चात देण्यात आल्या. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर अडवण्यात आला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, श्यामप्रसाद कांबळे, डॉ. अनिल माने यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी अमित सैनी उद्योग विभागासंबधी जिल्हास्तरीय बैठक घेत होते. बैठक सुरू असताना शिष्टमंडळाला भेटीस का बोलावले?, शिवाजी सभागृहात शिष्टमंडळाची का भेट घेतली नाही असा आरोप करत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. एका कार्यकर्त्यांने प्रतीक्षा कक्षातील खुर्च्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत परत मुख्य फाटकाजवळ आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले नाही असे कळताच कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. फाटकावर चढून काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करू लागल्यावर नेत्यांनी त्यांना रोखले. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन जादा बंदोबस्त बोलावण्यात आला. शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे उप अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने करवीर पोलिस उप अधीक्षक जाधव यांनी निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर परिक्षेत्रात डायरी ऑनलाइन होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्रात सीसीटीएनएसवर डायरीचे कामकाज दीड महिन्यात सुरू होईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्ह्याने ऑनलाइन डायरीत राज्यात आघाडी घेतली असून सातारा व पुणे ग्रामीण विभागात महिन्याअखेरीस ऑनलाइन डायरीचे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

पुणे सीआयडी महानिरीक्षक म्हणून काम करत असताना राज्यातील सीसीटीएनएस कार्यक्रमाची जबाबदारी होती असे संजय वर्मा यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याने सुरवातीपासून आघाडी घेतली आहे. सातारा व पुणे ग्रामीणमधील पोलिस ठाण्यातही सीसीटीएनएस कार्यप्रणालीने वेग घेतला आहे. सांगली व सोलापूर ग्रामिण हे जिल्हेही प्रगतीपथावर आहेत. १५ जुलैपर्यंत परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यात पेपरलेस काम सुरू होईल, असे संजय वर्मा यांनी सांगितले.

सीसीटीएनएसवर स्टेशन डायरी, एफआयर रजिस्टर, आर्म रजिस्टर, नोंदवही, लॉगबुक अशा ४७ प्रकारच्या नोंदी केल्या जातात. अशा नोंदी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले आहे. सीसीटीएनएसवर १९९८ पासूनचे सर्व प्रकारचे कामकाज नोंदवले आहे. यावर नोंदवली गेलेली प्रत्येक नोंद एका क्लिकवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहता येते. जिल्ह्यातील २८ पोलिस ठाणी, सहा उपअधीक्षक कार्यालये, पोलिस मुख्यालय कार्यालय सर्व्हरव्दारे जोडली आहेत. या यंत्रणेमुळे गुन्हे व गुन्हेगाराची माहिती ताबडतोब मिळणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरूंची निवड लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड आणखी तीन दिवस लांबणीवर पडली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी झालेल्या मुलाखतीनंतर कुलगुरूंचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कुलगुरु शोध निवड समितीने अंतिम टप्प्यात पाच पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस.पी. गोविंदवार, औरंगाबादमधील देवानंद शिंदे, भूगर्भशास्त्र विभागातील प्रा. डॉ. नितिन करमळकर, सोलापूरचे डॉ. लालासाहेब देशमुख, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. नामदेव कल्याणकर यांचा पाच जणांच्या यादीत समावेश आहे. त्रिस्तरीय शोध निवड समितीने अंतिम टप्प्यात पाच उमेदवारांची चुकीच्या पद्धतीने निवड केल्याची चर्चा विद्यापीठ क्षेत्रात सुरु झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या उमेदवारांच्या मुलाखती अवघ्या वीस मिनिटांत घेतल्या. उमेदवारांनी राजकीय लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंकिंगच्या डोकेदुखीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपुरे कर्मचारी आणि मशीनरी नसल्यामुळे मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिं​​किंग करण्यात अडचणी येत आहेत. या मोहिमेला नागरिकांचे अद्याप असहकार्यच आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सध्या आधार कार्ड लिंकिंगचे काम सुरू आहे. मतदानासाठी आधार कार्ड लिंकिंग अत्यावश्यक आहे. मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंकिंग केल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे. दुबार मतदार नोंदणी उघडकीस येणार आहे. यामुळे निवडणुकीचे आडाखे चुकतील या भीतीपोटी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आधार कार्ड लिंकिंग करण्यात टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

निवडणूक तयारीचा भाग म्हणून सध्या महापालिका प्रशासनाकडून आधार कार्ड लिंकिंग, मतदार नोंदणी, मतदार यादीत दुरूस्ती, दुबार नाव रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान केंद्र अ​धिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात या कामासाठी सहाशे जणांच्या नेमणुका झाल्या आहेत. प्रभागनिहाय भागाभागांत फिरून सध्या आधारकार्ड लिंकिंग करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. आधार कार्डचा नंबर, झेरॉक्स प्रती जमा केल्या जात आहेत. मात्र नागरिकांकडून कर्मचाऱ्यांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेत सध्या दोन ठिकाणी आधार कार्ड लिंकिंगची सुविधा आहे. शहरातील मतदारांची संख्या पाहता या यंत्रणेत वाढ करण्याची आवश्यकता आहे. कम्प्युटरसह मशिनरींची संख्या वाढली तर या कामाला गती येणार आहे.

दोन दिवस विशेष मोहीम राबविणार

आधार कार्ड लिंकिंग, नवीन मतदार नोंदणी, मतदारयादीत दुरूस्तीसाठी २१ जून आणि २५ जुलै या दोन दिवशी प्रत्येक केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाचदरम्यान हे काम होईल. नवीन मतदार नोंदणीसाठी रेशनकार्ड, वयाचा दाखला या कागदपत्रासह एक फोटो गरजेचा आहे जेणेकरून आधार कार्ड लिंकिंगची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

एका तांत्रिक मुद्यावरून प्रभाग रचनेसंदर्भात अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे. आयोगाची बुधवारी बैठक होणार असून त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. आयोगाच्या सूचनेनुसार दहा दिवसात प्रभाग रचनेचे काम होईल.

- आयुक्त पी. शिव शंकर

लिंकिंगवेळच्या अडचणी

नागरिकांकडे आधारकार्डाचा अभाव

आधारकार्ड काढले, पण उपलब्ध नाही

सुट्यामुळे अनेकजण बाहेरगावी

स्थलांतरित लोकांची संख्या मोठी

अपुरे कर्मचारी आणि मशीनरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही मुलींचीच बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी सोमवारी नेटकॅफेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. निकाल समजताच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनीशी संवाद साधण्यात विद्यार्थी गुंग होते. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून सलग ५ वर्षे मुलांच्या तुलनेत मुली आघाडीवर आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर गल्लीबोळ फटाक्यांच्या आतषबाजीने दणाणून गेले. तर उषाराजे हायस्कूलची विद्यार्थीनी निहारिका साळोखे हिने ९८.४० टक्के गुण मिळवित आघाडी घेतली आहे.

ऑनलाइन निकाल पहाण्यासाठी दुपारपासून नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होती. राजारामपुरी, ताराबाई पार्क, भवानी मंडप, महाद्वार रोडसह शहरातील अनेक ठिकाणच्या नेटकॅफेमध्ये सायंकाळपर्यंत निकाल पाहण्यासाठी गर्दी दिसून येत होती. दुपारी ऑनलाइन निकाल कळताच यश‌ मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईकांकडून आणि शाळांमधून अभिनंदन केले जात होते. आई-वडिलांन‌ी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मित्र-मैत्रिणींकडून मोबाइल, एसएमसद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

१५ जूनला दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका वितरीत केल्या जाणार आहेत. कोल्हापूर विभागात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ लाख ५३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर १५ जूनपासून २५ जूनपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळालेले कोल्हापूर विभागात ४२ हजार २६८ विद्यार्थी आहेत. तर पुनर्परीक्षा विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असून १६ टक्क्यांवरून ४८ टक्यांवर पोहचली आहे.

'ती'च्या जिद्दीला सलाम!

हृदयविकाराने त्रस्त ज्योती पाटीलने दहावीला ६६ टक्के गुण मिळवित तिची जिद्द दाखवून दिली. दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील ज्योतीने हृदयविकाराने त्रस्त असून दहावीची परीक्षा अॅम्ब्युलन्समधून दिली होती.‌ तिला दहावीला ६६ टक्के गुण मिळाले असून अजूनही तिच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही.

...अन धाकधूक वाढली

अनेक नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी गर्दी केली होती मात्र सोमवार असल्यामुळे शहरातील विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.

आई-वडील आणि शिक्षकांच्या मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज मी हे यश मिळविले आहे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्या परीक्षा कठीण नाही. दहावीचा अभ्यास केला तर ती सोपी आहे त्याचे टेन्शन घेण्यासारखे नाही. मी अकरावी व बारावीला सायन्स शाखेत जाणार असून आर्किटेक्ट होण्याचे माझे स्वप्न आहे.

- निहारिका अमित साळोखे, ९८.४० टक्के, उषाराजे हायस्कूल

दहावीचा अभ्यास करताना नियोजन करणे फार महत्त्वाचे असते. माझ्या वडिलांनी माझ्या अभ्यासाचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास करून हे यश मिळविले आहे.

- प्रतीक सुधाकर जाधव, ९७.८० टक्के, विद्यापीठ हायस्कूल

सकाळी क्लास, शाळा यामुळे दिवस निघून जायचा. त्यानंतर रात्री अभ्यासासाठी वेळ मिळतो. त्यावेळी अभ्यास करून यश मिळविले आहे. शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले. भविष्यात स्पर्धा परीक्षा देवून आयएसआय व्हायचे स्वप्न आहे.

- इमरान जमादार, ९६ टक्के, देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर झाला. 'सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.१२ तर जिल्ह्याचा निकाल ९५.५६ टक्के लागला,' अशी माहिती विभागीय सचिव शरद गोसावी यांनी पत्रकार बैठकीत दिली. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

गोसावी म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात १ लाख ४३ हजार ६८७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोल्हापूर अव्वल ठरले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा १.२९ टक्क्याने वाढले आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुली पुढे असून मुलींची टक्केवारी ९६.१७ टक्के तर मुलांची टक्केवारी ९५.७ आहे. कोल्हापूर शहराचा निकाल ९४.०८ टक्के लागला.' यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, सहसचिव पी. डी. भंडारे उपस्थित होते.

मुंबईचा टक्का यंदा वधारला!

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी बोर्डाच्या निकालाचा टक्का तब्बल ३.१४ टक्क्यांनी वाढला असताना मुंबई निकालाच्या टक्क्यानेही यंदा विक्रमी झेप घेतली. 'बेस्ट ऑफ फाईव्ह' आणि अंतर्गत गुणांमुळे यंदा निकालाचा टक्का वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.

गैरप्रकाराला आळा

दहावी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी १२८ केंद्रावर भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्याचा चांगला फायदा झाला. २००९ च्या परीक्षेदरम्यान पाचशे गैरप्रकार घडल्याची नोंद आहे. ते यंदा केवळ ४४ आहे. भरारी पथकामुळेच गैरप्रकारांना आळा बसल्याचे गोसावी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर-नागपूर’ ६ दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मिरज-लातूरमार्गे सध्या आठवड्यातून दोन दिवस धावणारी कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे १ नोव्हेंबरपासून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. तसेच कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला मोठी गती येणार आहे,' खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर रेल्वेस्टेशनवर विविध विकासकामांचा प्रारंभ सोमवारी झाला. त्यावेळी महाडिक म्हणाले, 'कोल्हापूर ते नागपूर गाडी १ नोव्हेंबरपासून आठवड्यातून सहा दिवस धावणार असल्याने गाडीचा मोठा लाभ विदर्भ आणि मराठवाड्याला तसेच या भागातील कोल्हापुरात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.'

कोल्हापूर ते मुंबई सुपरफास्ट गाडी सुरू करण्याची मागणी जुनीच असल्याचे सांगून ते म्हणाले, 'यासाठीही पाठपुरावा सुरू आहे. देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडल्या जाणारी सुपरफास्ट गाडी सुरू झाली तर कोल्हापूरच्या विकासाला मोठी गती येईल.'

रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे पदाधिकारी शिवनाथ बियाणी म्हणाले, 'कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट सुरू करायची असेल तर साहाजिकच ‌सांगली, सातारा येथे स्टॉप घेता येणार नाही. येथील खासदारांनी यासाठी संमती द्यावी लागेल. त्यासाठी खासदार उदयनराजे, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्याशी २४ आणि २५ जूनला चर्चा करण्यात येणार आहे.'

कनेक्टिव्हिटी वाढणार

कोल्हापूर ते नागपूर ही गाडी जवळपास संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भाचा भाग कव्हर करते. या परिसरातील अनेक लोक कोल्हापुरात कामानिमित्त राहत आहेत. त्यांना ही गाडी सोयीची होणार आहे. महाराष्ट्र एक्सप्रेसपेक्षा ही रेल्वे सहा तास आधी नागपूरला पोहचेल. गजानन महाराजांचा भक्तगणही कोल्हापुरात मोठ्या संख्येने आहे. त्यांनाही या रेल्वेने शेगावला जाणे सोपे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images