Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रंकाळा शुद्ध‌िकरणाचा नवा उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांची अस्मिता असलेल्या रंकाळा तलावातील जलशुद्धीकरणासाठी रविवारपासून (१४ जून) खणविहार मंडळाजवळील खणीमध्ये हायड्रोडाय​नॅमिक कॅविटेशनची पद्धती प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. उच्च तापमान व उच्च दाबाचा वापर यामध्ये होणार असून यामध्ये पाच मिलिमीटरपेक्षा मोठ्या आकाराच्या कोणत्याही जलचरांना काहीही धोका होणार नाही, असा दावा आय. सी. टी. चे प्रकल्प संशोधन प्रा. अनिरुध्द पंडीत यांनी केला आहे.

मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आय.सी.टी.) व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व आरती ग्रुप ऑफ इं​डस्ट्रिजच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचे सादरीकरण शनिवारी महापालिकेच्या ताराराणी सभागृहात करण्यात आले. प्रा. पंडीत म्हणाले, या प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पध्दतीत पाण्यातील पर्यावरण किंवा पाण्याला, जलचरांना इजा पोहचवणारे कोणतेही रासायनिक पदार्थ किंवा प्रक्रिया केली जाणार नाही. उच्च तापमान व दाब यामुळे पाण्यातील नको असणारे जीवाणू, शेवाळ, पाण वनस्पती, जलपर्णी यांची वाढ पुर्णपणे थांबते. तसेच पाण्याचा रंग, वास, सीओडी, बीओडी सारखे पाण्याचे महत्वाचे घटकही नियंत्रणात आणता येतील. पंडीत यांनी रंकाळयाची ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड व दिलीप देसाई यांच्या शंकांचे निरसन केले.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी प्रास्ताविक केले. तर प्रसाद मंत्री यांनी पंडीत यांची ओळख करुन दिली. यावेळी आयुक्त पी.शिवशंकर, उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदील फरास, सभापती सौ. लीला धुमाळ, सभागृहनेता चंद्रकांत घाटगे, मधुकर रामाणे, आयुक्त पी.शिवशंकर यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी नियोजन मंडळामधून २ कोटी रुपये मंजूर करुन आणल्याबद्दल स्थायी सभापती आदील फरास यांच्या हस्ते सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेम्पो ड्रायव्हरची ‘रिओ’ सफर

$
0
0

मारुती पाटील

महाराष्ट्र केसरीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या निगवे खालसा (ता. करवीर) येथील सोनबा तानाजी गोंगणेला आर्थिक परिस्थितीमुळे कुस्तीला रामराम ठोकावा लागला होता. मात्र मित्रांच्या मदतीने पुन्हा शड्डू ठोकला आणि पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव युवा कुस्ती स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. यामुळे त्याला रिओ-दि-जानिरो (ब्राझिल) येथे होणाऱ्या ऑलिंपिकची सफर करण्याची संधी मिळणार आहे. सोनबाचा टेम्पो ड्राव्हर ते रिओ हा प्रवास नेत्रदीपक असाच म्हणावा लागेल.

सोनबाने निगवे येथे १२ व्या वर्षापासून कुस्तीचे डावपेच आत्मसात केले. त्यानंतर न्यू मोतिबाग तालीम येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व मॅटवरील कुस्तीसाठी राम सारंग यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. या काळात त्याने अखिल भारतीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. केवळ वीस गुंठे शेती असणाऱ्या गोंगाणे कुटुंबीयांना सोनबाच्या खुराकावरील खर्च परवडत नव्हता. त्यासाठी वडिलांनी गवंडीकामही केले. ओढाताणीमुळे सोनबाने कुस्तीला रामराम ठोकत टेम्पो चालवण्याचा निर्णय घेतला. होतकुरु पैलवानाची अशी पिछेहाट होत असल्याने राष्ट्रीय कुस्तीपटू रणजीत नलवडेने त्याला पुण्यात सह्याद्री कुस्ती संकुलात दाखल केले. यासाठी त्याला आर्थिक मदतही केली. दोन वर्षाच्या गॅपनंतर नलवडे व वस्ताद विजय बराटेच्या मदतीने पुन्हा सोनबा कुस्तीतील डावपेचात माहीर होत गेला. ६० किलो वजन गटात त्याने ग्रीको रोमन व फ्री स्टाइल अशा दोन्ही प्रकारांत कौशल्य आत्मसात केले.

पुण्यात सराव करत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांत यात्रेतील कुस्तीत सहभागी होत विविध किताब पटकावले. युवा शक्ती, मुंबई महापौर केसरी किताब पटकावत त्याने वस्तादांचा विश्वास सार्थ ठरवला. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पहिल्याच खाशाबा जाधव युवा कुस्ती स्पर्धेत ६० किलो गटात देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. ब्राझिल येथे होणारे ऑलिंपिक पाहण्याची संधी मिळवली. सोनबाने आर्थिक परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या यशाला अधिक उजाळा मिळण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची आवश्यकता आहे. असे प्रायोजक त्याला मिळाले तर एक आंतरराष्ट्रीय मल्ल होण्याची संधी त्याला मिळू शकते.

खुराकावर होणाऱ्या खर्चामुळे कुस्ती थांबवावी लागली होती. मात्र मित्रांचे आणि वस्तादांचे सहकार्य मिळाल्याने पुन्हा कुस्ती सुरू केली आहे. सरावामध्ये सातत्य राखून महाराष्ट्र केसरी किताबासह सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न आहे.

- सोनबा गोंगाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू म्युझियमचा आराखडा सादर

$
0
0

दीपक शिंदे

शाहू जन्मस्थळाचे पुरातत्व विभागाकडे असलेले जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नुकताच शाहू म्युझियमचा आराखडाही पुरातत्व विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शाहू म्युझियमच्या कामाला गती येणार असून सरकारकडून निधी उपलब्ध होताच पुढील सहा महिन्यात म्युझियमचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शाहू जन्मस्थळावर शाहू जयंती साजरी करण्यासाठी आता पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.

लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. ऑगस्ट २०११ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असे दोन्ही विभाग मिळून हे काम पूर्णत्वाकडे नेत आहेत. पुरातत्व विभागाकडील कामापैकी जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले परिसर विकासाचे काम शिल्लक आहे. पुरातत्व विभागाचे संपूर्ण काम झाल्यानंतर परिसर विकासाच्या कामाला गती येणार आहे. या ठिकाणचे सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे शाहू महाराजांचे जीवन दर्शन होय. याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी बराच उशीर लागला होता. त्या आराखड्याचे काम पूर्ण झाले असून हा आराखडा नुकताच पुरातत्व विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे कामाला आणखी गती येण्याची शक्यता आहे.

आरखडा पुरातत्व विभागाकडे सादर करण्यात आला असला तरी त्यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभाग या आराखड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समिती सदस्यांची बैठक घेणार आहे. त्यात काही कमतरता असल्यास त्या दूर करून इतिहासतज्ज्ञ आणि सर्व सदस्यांच्या मान्यतेनुसार त्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतरच तो राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकारिणी बैठकीदरम्यान सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी शाहू जन्मस्थळाला भेट दिली. या बैठकीत त्यांनी शाहू म्युझियमचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार म्युझियमचे काम करण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी लवकर उपलब्ध झाल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत हे कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शाहू जन्मस्थळावरील सर्व इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. या इमारतींमध्ये शाहू जन्मस्थळ (इमारत ए) , कुस्ती आखाडा (इमारत बी), दरबार हॉल (इमारत सी), पागा बिल्डींग (इमारत डी), शाहू संदर्भ ग्रंथालय व पुरातत्व ऑफिस (विंग टू) इतर दोन इमारतींमध्ये पुरातत्व विभाग शाहू महाराजांचे जीवनदर्शन घडविणार आहे.

शाहू जन्मस्थळावरील शाहू जीवन दर्शन आराखड्यात शाहू महाराजांच्या जीवनावर चित्रीत केलेले काही प्रसंग दाखविण्यात येणार आहेत. ते नामांकित चित्रकारांकडून चित्रित करण्यात येतील. त्याबरोबरच वेगेवगळ्या प्रकारची मॉडेल्स तयार करण्यात येणार आहेत. कुस्तीचा आखाडा, रेल्वे स्टेशन आणि छत्रपती शाहू महाराजांसाठी असलेली स्वतंत्र बोगी, साठमारीचे स्ट्रक्चर, हत्ती, लाइट आणि साऊंड शो, शाहूंवरील डॉक्युमेंटरी याचा समावेश या आराखड्यात असेल.

इमारतीच्या सहा एकर परिसरात राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीचे कामही पूर्ण झाले आहे. धरणाच्या प्रतिकृतीच्या शेजारी साठमारीची प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहे. मोठे प्रवेशद्वारही उभारण्यात येणार असून ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यासाठी १ कोटी १४ लाखांचा निधी मिळाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला आहे. त्याबरोबरच रोड पेव्हर, लॅण्ड स्केपिंग आणि प्रवेशद्वाराचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच करण्यात येणार आहे.

आराखड्यात काय आहे?

शाहू महाराजांची जन्मखोली, म्युझिक साउंड, रोबोटिक अनिमेटेड शो, शाहू महाराजांची जडणघडण, त्यांना शिक्षण देणारे शिक्षक, त्यांच्यावर झालेले संस्कार, शाहू महाराजांनी जोपासलेल्या कला, कुस्ती आखाडा, तयार केलेले मल्ल, चित्रकार, गायक, कलाकार, चित्रपटनिर्मिती, सामाजिक कार्य, लोकराजाच्या २८ वर्षांच्या कारकीर्दीचा इतिहास. साठमारी, खडखडा, गंगाराम कांबळेचे हॉटेल, दसऱ्याचा रथ, राधानगरी धरण, बोर्डींग हाउस, प्राथमिक शिक्षणाचा संदेश आणि विविध वस्तूंचे संग्रहालय. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येणार असले तरी ते शाहू महाराजांच्या काळाशी ते समरस होणारे असेल.

शाहू जीवन दर्शन दालनासाठी तज्ज्ञांची मते आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचना आणि आमची मते या सर्वांचा विचार करून दुसऱ्यांदा परिपूर्ण आराखडा तयार केला आहे. तो नुकताच पुरातत्व विभागाकडे सादर केला आहे. शाहू महाराजांचा जन्म ते सामाजिक कार्य असा सर्वंकष आढावा या आराखड्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

- अमरजा निंबाळकर, आर्किटेक्ट

पूर्ण झालेली कामे

शाहू जन्मस्थळ

कुस्ती आखाडा

दरबार हॉल

पागा बिल्डिंग

शाहू संदर्भ ग्रंथालय व पुरातत्व ऑफिस

इतर दोन इमारतींमध्ये पुरातत्व विभाग

राधानगरी धरणाची प्रतिकृती

विहीर इत्यादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीटी शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

केंद्र सरकारच्या आयसीटी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेले आठ हजार शिक्षक आजही आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. आपल्या मागण्यांचा विचार व्हावा यासाठी सोमवार ( ता.८) पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. संगणक शिक्षकांना पद निर्मिती करुन सेवा शर्तीचा लाभ द्यावा, करार डावलून काम करुन घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

केंद्र सरकारने सन २००८ मध्ये आयसीटी इन स्कूल योजनेंतर्गत संगणकाचे ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना मिळवून देण्याची योजना सुरु केली. त्यानुसार राज्यात शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाच्या नियंत्रणाखाली फेज-१, फेज-२ व फेज-३ मध्ये अनुक्रमे ५००, २५०० व ५००० असे सुमारे आठ हजार शाळांना लॅब व संगणक शिक्षक वेगवेगळ्या कंपन्यामार्फत दिले. योजनेनुसार पाच वर्षानंतर शिक्षकांसह संपूर्ण संगणक लॅब शाळेकडे हस्तांतरीत होते. परंतु शिक्षक वेतन व लॅबचा खर्च शाळेच्या आवाक्याबाहेरचा असल्याने पाच वर्षानंतरच्या सन २०१२-१३ मधील हस्तांतरीत लॅब बंद पडत आहेत. सुमारे ९० टक्के लॅब बंद स्थितीत गेल्या. परिणामी शिक्षक उघड्यावर आणि शालेय विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित अशीच स्थिती आहे. दुसऱ्या फेजमधील अडीच हजार लॅब २०१६ मध्ये हस्तांतरीत होणार आहेत. त्यांच्यावरही हीच वेळ येऊ नये यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे. सोमवारपासून आयसीटी शिक्षक महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. संगणक शिक्षकांना कामगार कायद्याप्रमाणे वेतन द्यावे, भविष्यनिर्वाह निधी कपात करावा, आरोग्य सुविधेचा लाभ, दरवर्षी दहा टक्के वेतनवाढ द्यावी, कामानुसार प्रवास बिल मिळावे आदी या संगणक शिक्षकांच्या मागण्या आहेत.

हरियाणा राज्यात संगणक शिक्षकांना कायम सेवेत घेतले आहे, तामिळनाडूत न्यायालयाच्या अधिन राहून संगणक शिक्षकांना कायम सेवेत घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. गोवा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या राज्यातही शिक्षकांना कायम आस्थापनेवर नेमणुका दिल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकार मात्र आमच्या मागण्यांकडे म्हणजेच पर्यायाने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. याशिवाय काही कंपन्या आयसीटी शिक्षकांना नाहक त्रासही देत आहेत. '

-जीवन सुरुदे, सरचिटणीस, श्रमिक महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना मुरुम नेताना मक्तेदाराला पकडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केबल खोदाईसाठी खणलेल्या खड्ड्यातील मुरुम विनापरवाना नेत असताना मक्तेदाराला नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नगरपालिकेचे कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक मिलिंद वसंतराव जाधव (वय ५० रा. इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मक्तेदार मल्लिकार्जुन आण्णाप्पा सातलगांवकर (रा. आर.के.नगर, शहापूर) आणि ट्रॅक्टरचालक परसाप्पा बसाप्पा नंद्याळ (सध्या रा. गावचावडीसमोर शहापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वीज कंपनीच्या वतीने स्टेशन रोडवरील हॉटेल मानसनजीक वुई टू फटाका मार्टलगतच्या रस्त्यावर केबल टाकण्यासाठी रस्ता खोदाई केली आहे. हे काम मक्तेदार मल्लिकार्जुन सातलगांवर यांच्याकडे आहे. याठिकाणी खणलेल्या खड्ड्यातील मुरुम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरचालक परसाप्पा नंद्याळ हा ट्रॅक्टर ट्रॉलीतून मुरुम नेत असल्याचे नागरिकांना समजले. या घटनेची माहिती मिळताच काही जागरुक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सुनिल बस्तवाडे, भरत लकमाणी, भिमराव कोकणे आदींनी ट्रॅक्टर चालकास रोखले. त्याच्याकडे मुरुम वाहतूक व परवान्याबाबत माहिती विचारता ट्रॅक्टरचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांनी या संदर्भातील माहिती नगरअभियंता भाऊसो पाटील यांना दिली. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसही तेथे दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडित वीजपुरवठ्याचा वस्त्रोद्योगाला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

तिळवणी वीज केंद्रातील विद्युत रोहित्रांची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे इचलकरंजी शहर व परिसरात सोमवारपासून वीज पुरवठा दोन टप्प्यात आठ तास खंडीत केला जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरवड्याचा कालावधी लागणार असल्याने आधीच मंदीच्या गर्तेत असलेल्या वस्त्रोद्योगाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इचलकरंजी शहर व परिसराला हातकणंगले तालुक्यातील तिळवणी उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. वाढत्या औद्योगिकरणामुळे वीजेची मागणी वाढत असून येथे असलेल्या रोहित्रांची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी सध्या ५० मेगावॅट क्षमेतेची दोन रोहित्रे आहेत. या रोहित्रांची क्षमता दुप्पटीने वाढविण्यात येणार आहे. परिणामी त्याचा परिणाम शहरातील वीज पुरवठ्यावर होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महावितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या भारनियमनाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून दोन टप्प्यात चार-चार तास वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीतील आंबर्डे, पिशवी भाग तहानलेलाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शाहूवाडी तालुक्यात विविध धरणांमुळे तालुक्याचा बराचसा भाग पिण्याचे पाणी आणि शेती यासाठी समृद्ध झाला आहे. तालुक्याच्या आंबर्डे, पणुंद्रे व पिशवी या तिन्ही भागात पाण्याच्या कोणत्याही योजना कार्यान्वित न झाल्याने हे तिन्ही भाग पाण्याविना कोरडेच राहिले आहेत. वारणा, गेळवडे, कडवी, पालेश्वर, कांडवण, भंडारवाडी , मानोली, अनुस्कुरा या लहानमोठ्या धरणामुळे हरितक्रांती झाली आहे. यामुळे शेतींसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

१९९५ च्या शिवसेना - भाजप युती काळात तालुक्यात जलसंधारणाच्या योजना कार्यान्वित झाल्या होत्या. निव्वळ कडवी मध्यम प्रकल्पामुळे तालुक्याच्या पश्चिमेकडील ५२ गावांना पाणी मिळाल्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे.

तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबर्डे व पिशवी खोऱ्यात कोणतीही पाणीयोजना न राबविली गेल्याने आंबर्डे खोऱ्यात असलेली आंबर्डेसह आरूळ, करंजोशी, शाहूवाडी, शिराळे ही गावे वर्षानुवर्षे तहानलेलीच आहेत.आंबर्डे गावातल्या लोकांना जनावरांना पाणी मिळविण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागत असते. पिशवी खोऱ्यात येणारी परखंदळे, सोनवडे, साळशी, सुपात्रे ही प्रमुख गावे व त्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या व वस्त्या आणि पणुंद्रे खोऱ्यात असलेल्या बारा वाड्या पाण्यापासून दूर राहिल्या आहेत. पणुंद्रेमधील जाधववाडीला मार्च ते मे या तीन महिन्यात पाणी मिळविण्यासाठी डोंगर दऱ्यातले झरे शोधावे लागतात. पर्यायाने या भागातील शेतकऱ्यांना समृद्ध शेती करता आलेली नाही. पाणी समस्येमुळे या भागातील मुंबईतले चाकरमानी गावाकडे यायला फारसे धजावत नाहीत. शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते तर जनावरांसाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करत हिंडावे लागते. आंबर्डेपैकी रणवरेवाडी इथे मंजूर झालेला लघुपाटबंधारे प्रकल्प आजी माजी आमदारांच्या गटातील कार्यकर्त्यांच्या कुरघोडीत अडकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

CCTV साठी दोन कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी उपयुक्त असलेल्या सीसीटिव्ही योजनेसाठी दोन कोटी रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन मंडळाकडून मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर धान्य गोदामांत सीसीटिव्ही व बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यासाठीही एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून विकासाच्या टार्गेटवर असलेल्या दुधाळी शुटींग रेंजच्या विकासासाठी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 'रेंजच्या विकासासाठी अजून एक कोटी रुपये देण्यात येतील,' अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत २०१५-२०१६ सालासाठी ३२१ कोटी ७६ लाखाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्यवस्थित होण्याच्यादृष्टीने तालुकास्तरावर बैठक घेण्याचा महत्वाचा निर्णयही घेण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शाळांभोवती संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता असल्याने त्याबाबत स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री पाटील म्हणाले, '​जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवडलेल्या ६९ गावांवर १०९ कोटी रुपयांचा निधी विविध कामांवर खर्च करण्यात येणार आहे. कामांबाबत ग्रामसभेने आराखडे दिले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ८ कोटी ३५ लाखाचा निधी देण्यात येणार आहे. तो निधी कोणत्या कामांसाठी वर्ग करायचा याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याकरिता स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी दोन एक्सव्हेटर खरेदीसाठी ८४ लाख मंजूर केले आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील फाईलची व्यवस्था नीट ठेवण्यासाठी १ कोटी ४७ लाखाच्या निधीला मंजुरी दिली आहे. जिल्ह्याची प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतीगृहातील सुविधांसाठी ३० लाख रुपयेही मंजूर केले आहेत. ठिबक सिंचन योजनेसाठी जास्तीत जास्त निधी दिला जाणार असून प्रलंबित निधीचेही वितरण केले जाणार आहे.'

बऱ्याच कामांची गती संथ असल्याने कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर तेथील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी घ्यायच्या या बैठकीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच पाटील यांनी सहावीपासूनच्या विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या योजनेला या आर्थिक वर्षासाठीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर या योजनेला सुरुवात होईल, असे सांगितले. या बैठकीत गवे रेड्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी ७५ टक्के सरकार व २५ टक्के शेतकरी असे मिळून वीज तारेचे कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूवाडी पोलिस ठाण्याला लाचखोरीचे ग्रहण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शाहूवाडी पोलिस ठाण्यात तीन चार महिन्याला एक पोलिस कर्मचारी किंवा सहाय्यक फौजदार दर्जाचा अधिकारी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकतो आहे. पर्यायाने येथील पोलिस ठाण्याची प्रतिमा उत्तरोत्तर मलीन होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात या ठाण्यातील चार कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. त्यामुळे या पोलिस ठाण्याला एक प्रकारे लाचखोरीचे ग्रहण लागले आहे.

लाचखोरीच्या प्रकारामुळे प्रामाणिक काम करणाऱ्यांना लोकांची वाट्टेल ती बोलणी खावी लागत आहेत. लाचखोरीच्या कारणांमुळे बदली करून शाहूवाडी पोलिस ठाण्यात जायला कोणी धजावत नसल्याचे आजचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या बदल्यांवेळी तर शाहूवाडीत बदली करून जायला चक्क पोलिस प्रमुखांनाच विनंती करावी लागली.

शाहूवाडी तालुका मुळातच दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला आहे. विशाळगड, शित्तूर वारुण, उदगिरी, करंजफेण, परळे निनाई, कांडवण, येळवण जुगाई ही अति दुर्गम भागातील टोकावरची गावे आहेत. या भागात घडलेल्या घटना म्हणजे पोलिसांची डोकेदुखी ठरत असली तरी या भागातले लोक अशिक्षित व कमी शिकलेले असल्याने त्याचा गैरफायदा ठाण्यातल्या काही पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आलेल्यांशी बाहेरच सेटलमेंट करून अव्वाच्या सव्वा मागणी केल्याचे लाचलुचपतमध्ये अडकलेल्यांच्या 'कामगिरी'वरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात शाहूवाडी पोलिस ठाण्यातील पांडुरंग पवार, वसंत शिंदे, चंद्रकांत कदम व श्रीकांत कोरे ही चौकडी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडली आहेत. जे कर्मचारी व अधिकारी जादा अनुभवी आहेत त्यांच्याकडूनच लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी विविध पातळ्यांवरच्या अवैध धंद्यांवर बऱ्यापैकी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु हाताखालच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लाच घेण्याचे प्रकार करून एक प्रकारे त्यांच्या कामाच्या पद्धतीला हरताळच फासला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, कोथिंबिरीच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक २०० ते ३०० पोत्यांनी घटली आहे. आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. कांद्याच्या दरात पाच ते सहा रुपयांची किलोमागे वाढ झाली आहे. यामुळे कांद्याच्या एक किलोचा दर ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर कोथिंबिरीच्या दरात पुन्हा वाढ होऊन पेंडीचा दर ६० रुपयांवर पोहोचला आहे. फळभाज्या व हापूस आंब्याचे दर स्थिर राहिले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दररोज ११०० ते १२०० पोत्यांची आवक होत असते. गेल्या तीन दिवसांपासून यामध्ये दोनशे ते तीनशे पोत्यांची घट झाली आहे. बाजारात दाखल झालेला कांदा कमी प्रतीचा असूनही दरात मात्र वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून १५ ते २० रुपयांवर स्थिर असणारा भाव या आठवड्यात २५ ते ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्याबरोबरच कोथिंबीरच्या दराही पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपयांपर्यंत जुडीचा दर असताना पुन्हा त्यात वाढ होऊन ६० रुपयांवर पोहोचला आहे.

स्थानिक भागातील भाजीपाल्याची आवक कमी होत असली, तरी बेळगाव मिरज येथून भाजीपाल्याची आवक नियमित होत असल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र गवार व दोडक्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. वांगी, भेंडी, कारली, टोमॅटो, हिरवी मिरचीचे दर स्थिर राहिले आहेत. तर कोबी व फ्लॉवर कवडीमोल दराने विक्री होत आहे.

हापूसची आवक वाढली

गेल्या दोन आठवड्यापासून हापूस आंब्याची आवक प्रचंड वाढली आहे. हापूस आंब्यासोबत मद्रास, कर्नाटक हापूस आणि लालबाग आंब्याची आवक वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना हापूसची गोडी चाकण्याची संधी मिळाली आहे. पाच डझन पेटीचा दर १५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत होता. याच दर गेल्या आठवड्यापासून एक हजार ते ११०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम महाराष्ट्राचा निधी विदर्भाकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी नवीन राष्ट्रीय पेयजल योजनांचे प्रस्ताव पाठवू नयेत, असे स्पष्ट आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिले आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांसाठी अपेक्षीत खर्चाचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेशही दिले आहेत. सरकारच्या या पत्रावरुन पश्चिम महाराष्ट्रातील निधी मराठवाडा व विदर्भाकडे वळवण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यातीलच २६१ योजना प्रलंबित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हा आकडा हजारांत असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खेड्यातील पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहेत. काही गावांच्या योजना प्रस्तावित आहेत. टप्प्या-टप्प्याने योजना पूर्णत्वाकडे नेण्याचा मानस असला तरी अजूनही काही भागात पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अशा भागांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण केल्या जात आहेत. यासाठी केंद्र व राज्य प्रत्येकी पन्नास टक्के निधी खर्च करत आहे.

यानुसार २०१४-१५ साठी २१६ योजना प्रस्तावित होत्या. यापैकी २०९ योजना पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ७२ कोटीचा निधी खर्च झाला आहे. तर २०१५-१६ साठी २४० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी १७८ पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजनांसाठी ५४ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. याचबरोबर २०१६-१७ मधील २६० योजनासाठी ८४ कोटी ९३ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत पाठवला होता. मात्र हा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच सरकारचे पत्र जिल्हा परिषदांना मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाचेच ‘नियोजन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात विकासकामांची दिशा ठरवण्यासाठी बनवलेल्या जिल्हा नियोजन मंडळात अधिकाऱ्यांचे प्राबल्य वाढू लागले आहे. कामांच्या प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याच्या सदस्यांनी केलेले आरोप आणि खुद्द पालकमंत्र्यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत 'हम करेसो कायदा,' अशी झाल्याचे वक्तव्य म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची 'दिशा' ठिक नसल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेशाच्या अनुषंगाने केलेली वक्तव्ये तर सदस्यांना विचार करायला लावण्यासारखी आहेत.

नवीन सत्ता असल्याने लोकप्रतिनिधींवर काम करुन दाखवण्याची वेळ आली आहे. अशावेळी आमदार फंडाबरोबर नियोजन मंडळातील विविध योजनांच्या निधी फार महत्त्वाचा असतो. हेच धोरण अवलंबून आमदार, खासदार तसेच ​सदस्यांनी​ प्रस्ताव सादर करावेत व त्यावर मंडळाच्या बैठकीत निर्णय घेणे अशी कामाची पद्धत आहे. अनेक सदस्यांना कामकाजाची पूर्ण नव्हती. यामुळे काम मंजूर करुन घेण्याचे दूर, सुचवण्याबाबतही फार आक्रमकपणा नव्हता. नव्या सरकारने जलयुक्त शिवार योजनेची घोषणा करुन कामाला सुरुवात केली. त्यासाठी विविध माध्यमातून निधी उभारण्यात येत आहे. अशावेळी या योजनेतून नवीन लोकप्रतिनिधींना मोठी संधी होती. पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी करण्यात आली. तीत अगदी पारखून गावे निवडून तेथील पाणीटंचाई दूर करता आली असती तर नव्या लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्यांच्या पदरात मोठे यश पडले असते. पण पाणी असलेल्या गावांच्या निवडीने त्या सर्वच सदस्यांचा संताप उफाळून आला. अनेक सदस्य तर काम सांगण्याचाही अधिकार शिल्लक राहिला नसल्याचे सांगत होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे धोरण?

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची नियोजन मंडळाची ही पहिलीच बैठक होती. त्यांनी ही जिल्हा परिषद नसून नियोजन मंडळाची बैठक आहे, असे सांगत खाली बसा असे सदस्यांना सांगणे. त्यानंतर जलयुक्त शिवार योजनेसाठी मंडळाच्या निधीतून ८ कोटी ३५ लाखांचा निधी द्यायचा आहे असा सरकारी अ​ध्यादेश असल्याने हा निधी मी घेईन, असे प्रथम सदस्यांचे मत विचारात न घेता सांगणे. त्याला आमदार प्रकाश आबीटकर यांनी आधीच निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे आम्ही निधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो वर्ग करु शकाल, असे इशारेवजा सांगताच हा सरकारचा आदेश आहे त्यामुळे त्याची गरज भासणार नाही असे सांगून सदस्यांकडे या निधीला रोखण्याची ताकद नसल्याचेच दाखवून देणे. हा सर्व प्रकार सदस्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याने आबीटकर यांनी 'सरकारने निर्णय घेतला म्हणून द्यावाच असे काही नसून आमचा विरोध आहे तो सरकारकडे मांडावा,' असे पालकमंत्र्यांना सांगितले. मात्र जिल्ह्याधिकाऱ्यांचा एकूणच अविर्भाव म्हणजे मी कुणाचा दबाव घेणार नाही, असेच सुचवणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहासाठी महिनाअखेरची मुदत

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

लंडन येथील पॅलेस थिएटरच्या धर्तीवर राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणपूर्तीसाठी जूनअखेरची डेडलाइन देण्यात आली आहे. मे अखेर नूतनीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र नाट्यगृह व खासबाग मैदान यांचे काम एकत्रितपणे सुरू असल्यामुळे वेळेचे गणित जुळण्यात अडचणी आल्या. अंतर्गत काम पूर्ण झाले असून फिनिशिंग सुरू आहे तर नाट्यगृहाच्या बाह्यपरिसराचे सुशोभिकरण सुरू आहे. जूनअखेर कामाचे बिगुल वाजणार असून ९ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाने नाट्यगृह खुले होण्याची तिसरी घंटा वाजणार आहे.

मार्च २०१४ मध्ये केशवराव नाट्यगृहाचा पडदा नूतनीकरणासाठी बंद केला होता. नाट्यगृहासह खासबाग मैदानाचाही कायापालट करण्यात आला आहे. गेले वर्षभर नाट्यगृह व मैदानाचे काम नियोजनानुसार अखंडितपणे सुरू आहे. सन २०१३ मध्ये नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी महापालिकेच्या खात्यात जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यापैकी सात कोटी रुपये नाट्यगृहासाठी, तर ३ कोटी रुपये मैदानाच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या दहा कोटी निधीबरोबरच महापालिकेतर्फे दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्कमही नूतनीकरणाच्या खर्चात समाविष्ट करण्यात आली आहे.

नूतनीकरणाच्या प्रक्रियेत नाट्यगृहात ७५० आसनक्षमता निश्चित करण्यात आली आहे. नाट्यगृहाच्या परिसरात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पेंढारकर कलादालनाचाही या नूतनीकरणामध्ये समावेश असून, भविष्यात विविध कला प्रदर्शनासाठी गॅलरी म्हणून वापर व्हावा यादृष्टीने या दालनाची रचना तयार करण्यात आली आहे.

७५० आसनक्षमतेसह अद्ययावत वातानुकूलन यंत्रणा

नवोदित कलाकारांना तालीम करण्यासाठी स्वतंत्र स्टेज

बांधकामात घडीव दगडाचा अधिक वापर

दगडी भिंतीत झुडपे उगवू न देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर

दहा कोटी रूपयांच्या निधीसोबत महापालिकेतर्फे दीड कोटीची तरतूद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये रुग्णांचा जीव टांगणीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याने अर्धा तास रूग्णांचा जीव टांगणीला लागला होता. जनरेटर नादुरूस्त झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकत नसल्याचे कारण कर्मचाऱ्यांनी दिले. जिल्हा शल्य​चिकित्सक व राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता रविवारी सुटी असल्याने त्यांचे मोबाइल स्वीच ऑफ होते.

रविवारी दुपारी साडेचार वाजता पावसाला सुरूवात झाल्याने शहरातील सर्व वीजपुरवठा काही काळ खंडीत झाला. त्याचा फटका सीपीआर हॉस्पिटलला बसला. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या विद्युत विभागाशी संपर्क साधला असता जनरेटर खराब झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्युत विभागात कुणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, अपघात विभागातील डॉक्टरांनी मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशात उपचार सुरू केले. तीन वर्षाच्या मुलीचा पाय दरवाजात सापडल्याने पायाच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टर व नातेवाईकांनी मोबाइल बॅटरीच्या उजेडात भुलीचे इंजेक्शन देऊन उपचार केले. अपघात विभागात गणेश मारूती पाटील (वय १४, रा. भादोले) याला सर्पदंश झाल्याने उपचारास दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला. गणेशचे नातेवाईक श्वासोच्छ्वासाची बॅग प्रेस करून कृत्रिम श्वासोच्छ्वास देत होते. अखेर अर्धा तासांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाल्यावर पुन्हा व्हेंटिलेटर सुरू करण्यात आला.

सीपीआरमधील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावर जनरेटरव्दारे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला जातो. पण गेले महिनाभर विद्युत पुरवठा खंडीत झाल्यावर 'दैवाच्या हवाल्या'वर रूग्णांवर उपचार करावे लागतात. अपघात विभाग २४ तास सुरू असतो. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर सर्वांत जास्त फटका या विभागाला होतो. विद्युत शाखेशी संपर्क साधल्यावर उत्तर मिळत नसल्याने मोबाइल बॅटरीच्या उजेडात उपचार करावे लागतात असे डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मे महिन्यात वळवाच्या पावसामुळे अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पण जनरेटर दुरूस्त करण्याबात सीपीआर व महाविद्यालयीन प्रशासन गंभीर नसल्याने पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला कसा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांचा हद्दवाढीला विरोध

$
0
0

कोल्हापूरः शिरोली आणि गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील कारखानदारांनी दोन्ही एमआयडीसींचा हद्दवाढीत समावेश करायला विरोध केला आहे. इंडस्ट्रीज क्षेत्र हे औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते. महापालिका केवळ आर्थिक उत्पन्नावर डोळा ठेवून हद्दवाढीत औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्याचा खटाटोप करत आहे, अशी टीका कारखानदारांनी केली आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींत छोटे-मोठे मिळून १००० कारखानदार आहेत.

'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन व गोकुळ शिरगाव एमआयडीसी कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अजित आजरी यांनी महापालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. महापालिका नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. कारखानदारांसमोर सध्या विविध समस्या आहेत. कारखानदारांवर करांचा आणखी बोजा पडला तर ते परवडणारे नाही. प्रस्तावित हद्दवाढीत एमआयडीसीच्या समावेशाला विरोध राहील, असे अजित आजरी यांनी सांगितले. ​कारखानदारीच्या विकासावर परिणाम होणार असल्याने शिरोली एमआयडीसीचाही हद्दवाढीत समावेश करू नये, सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिरो इंडस्ट्रीमुळे विकासावर परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या हद्दीत मोठ्या औद्योगिक वसाहती नाहीत. परिणामी आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसीसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींचा समावेश करून कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. त्याचबरोबर या मोठ्या औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांसह विशेष पॅकेजसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाऊ शकतो. यासाठी औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश गरजेचा आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. यासंबंधी गुरुवारी (ता.११) पुन्हा सर्वसाधारण सभा होणार आहे.

'झिरो इंडस्ट्रीज क्षेत्र असलेले कोल्हापूर हे एकमेव शहर आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात मोठ मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. कोल्हापुरात मात्र उद्यमनगर, टिंबर मार्केट असे लघु औद्योगिक प्रकल्प आहेत. महापालिका या औद्योगिक क्षेत्रांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. मात्र लघु औद्योगिक प्रकल्पामुळे त्यांच्या माध्यमातून अपेक्षित कर स्वरूपात उत्पन्न मिळत नाही. शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसीचा हद्दवाढीत समावेश झाला तर कोल्हापूर आणखी विस्तारणार आहे. या औद्योगिक वसाहतींना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवणे महापालिका पातळीवर शक्य आहे. त्या मोबदल्यात या एमआयडीसीकडून महापालिकेला कराच्या माध्यमातून जादा उत्पन्न मिळणार आहे,' असे नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

नगरसेवक भूपाल शेटे म्हणाले की, हद्दवाढीत एमआयडीसीचा समावेश झाला तर महापालिका सक्षम बनणार आहे. महत्वाचे म्हणजे मोठ्या औद्योगिक वसाहतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेष पॅकेज उपलब्ध होऊ शकते. महापालिका पातळीवर त्याची अंमलबजावणी करणे, इंडस्ट्रीज भागात सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. भविष्यकाळाचा विचार करता एमआयडीसींचा समावेश गरजेचा आहे.

महापालिका रहिवासी क्षेत्रासाठी घरफाळा, पाणीपट्टी आकारणी करते. त्याच्या दीडपट दराने लघु औद्योगिक प्रकल्पासाठी कर आकारणी केली जाते. एमआयडीसीकरिता तिप्पट आकारणी होते. या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावित हद्दवाढीत १९ गावांचा समावेश आहे. २०११ च्या जणगणनेनुसार या १९ गावांची लोकसंख्या २,२५,००० इतकी आहे. कोल्हापूर शहराची लोकसंख्या ५,४९,२८३ इतकी आहे. हद्दवाढ झाली तर एकूण लोकसंख्या आठ लाखाच्या आसपास पोहचते. केंद्र आ​णि राज्य सरकारच्या विविध योजनेसाठी दहा लाख लोकसंख्येची अट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्ती संकट पुन्हा गडद

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

गेल्या तीन महिन्यांपासून आजरा परिसरातून परागंदा झालेला टस्कर आता पुन्हा एकदा परिसरात परतला आहे. यामुळे गेली दोन वर्षे त्याचा हा नित्यक्रम बनल्याचेच अधोरेखित झाले आहे. यावेळी मात्र त्याने येताक्षणीच पारेवाडी, आवंढी आणि दर्डेवाडी परिसरात मानवी समूहांवर गेल्या पाच-सहा वर्षात पहिल्यांदाच चाल केल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजरा व चंदगड परिसरातील हत्तींच्या नुकसानसत्रापासून सुटका करून घेण्यासाठी कोकणाप्रमाणे हत्ती जेरबंद करण्याची मोहिम राबविण्याचे ठरले होते. सरकारनेही याला हिरवा कंदील दाखविला होता. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. दरम्यान, कोकणातील जेरबंद केलेल्या दोन हत्तींचा मृत्यू झाला आहे. इतर सर्व प्रयत्नांना दाद न देणाऱ्या आणि आता आजरा तालुक्यात परतलेल्या टस्कराच्या चिंता वाढविणाऱ्या हालचालींबाबत जेरबंदीची मोहिम राबविण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हत्तीच्या या गडद संकटछायेतून चंदगड-आजरेकरांची सुटका कशी होणार, हा प्रश्न आहे.

सात वर्षांपूर्वी आधी चंदगड व नंतर आजरा तालुक्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हत्तींचा एक कळप कर्नाटकातून स्थलांतरीत झाला. हत्ती येथे येऊच शकणार नाही अशा वल्गना करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह अनेकांची बोलतीच यामुळे बंद झाली. खाण्यासाठी पिकांनी फुललेली हिरवीगारं शेतं, मनसोक्त डुंबण्यासाठी व पिण्यासाठीचे तुडुंब भरलेले धरण प्रकल्प आणि निवांत पहुडण्यासाठी घनदाट जंगलांचा हा परिसर हत्तींचे निवासस्थानच बनले आहे. तेंव्हापासून दरवर्षी या कळपांकडून नुकसानसत्र सुरू आहे. मोबदल्यात कितीतरी कमी नुकसानभपाई स्वीकारीत येथील ग्रामस्थ मूग गिळून गप्प आहेत. पहिल्या काही वर्षात येथून काढता पाय घेणारे हत्ती आता येथेच स्थिरावल्याचे दिसत झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एक टस्कर आजऱ्यात, तर हत्तींचा कळप चंदगडात रूळला आहे. चंदगडमध्ये काही जिवीतहानीबरोबरच ऊस, काजू, माड, केळींसह खळ्यातले मळलेले धान्य, अवजारे आदींचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ मात्र येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

दरवर्षीच्या नुकसानीपासून सुटका करून घेण्यासाठी वनविभागही आपल्या परीने ग्रामस्थांच्या मदतीला तत्पर आहे. विभागाने आतापर्यंत राबविलेल्या फटोके, सूरबाण, मशाली, ढोल-ताशांचा गजर, प्रकाशझोत, चिली-स्मोक, गो-बॅक एलीफंट आदी मोहिमा निष्फळ ठरल्या आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी कोकणातील हत्तींना जेरबंद करण्याच्या प्रयोगाप्रमाणे आजरा-चंदगडमधील हत्तींनाही जेरबंद करण्यासाठी धरलेला आग्रह सरकारने मान्य केला आहे. यालाही दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र दरम्यान कोकणातील 'त्या' दोन हत्तींचा मृत्यू झाल्याने या मोहिमेला खो बसण्याची शक्यता आहे.

वर्तन चिंताजनक

आजरा तालुकावासियांना त्रस्त केलेला टस्कर यावर्षीच्या फेब्रुवारीत चंदगडमध्ये गेला, पण पुन्हा एकदा सुळेरान-धनगरमोळा मार्गे तालुक्यात परतला आहे. यावर्षी मात्र त्याच्या स्वभावात फरक पडला आहे. येताक्षणीच पारेवाडी, आवंढी, दर्डेवाडीमधील मानवी समूहांवर त्याने चाल केली आहे. हत्तीचे हे वर्तन चिंताजनक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिपाइं स्वबळावर लढणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सचिव राजाभाऊ सरवदे यांनी दिली. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे हा समारंभ झाला.

सरवदे म्हणाले, 'काँग्र‍ेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमची गेली अनेक वर्षे फसवणूकच केली. आता सत्तेत असलेल्या भाजपनेही हाच कित्ता गिरवला आहे. खरेतर आम्हाला सत्तेत दहा टक्के वाटा मिळायला हवा होता. हे लक्षात घेऊन आगामी जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुका पक्ष स्वबळावर लढवेल.' प्राचार्य हरिष भालेराव, डॉ. कृष्णा किरवले यांनी शहाजी कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला.

सत्काराला उत्तर देताना प्रा. कांबळे म्हणाले, 'पँथर चळवळ, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची चळवळ अशा विविध चळवळीत काम करताना चळवळीतील कार्यकर्त्यांची घरची स्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे लक्षात येत होते. ही परिस्थिती बदलली पाहिजे, कार्यकर्त्यांना सन्मान मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले.'

यावेळी प्रा. कांबळे, त्यांच्या पत्नी प्रा. सुरेखा कांबळे, आई फुलाबाई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, विजय काळेबाग, सचिन जाधव आदी उपस्थित होते. शहाजी कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. सुखदेव बुद्ध्याळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेखाचित्रांबाबत कॉलवर कॉल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे एसआयटीने प्रसिध्द केल्यावर संशयितांची माहिती देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे कॉल येऊ लागले आहेत. या माहितीची खातरजमा करूनच पुढील तपास करणार आहेत, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

हत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतर पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे प्रसिध्द केली. प्रसारमाध्यमातून रेखाचित्रे प्रसिध्द झाल्यावर पोलिसांनी संपर्कासाठी दिलेल्या ०२३१ २६५४१३३ व ९७६४००२२७४ या क्रमांकावर नागरिकांचे कॉल येऊ लागले आहेत. नाव सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे. रविवारी दिवसभर आलेल्या कॉलची खातरजमा करून पोलिस तपास करत आहेत. हल्लेखोरांची माहिती सांगणाऱ्यांना राज्य सरकारने २५ लाखाचे बक्षीस जाहिर केले आहे. रेखाचित्रे प्रसिध्द झाली असली तरी पोलिसांना संशयितांची ओळख पटलेली नाही. पानसरे यांची हत्या कोणत्या कारणावरून झाली याचाही कसून तपास सुरू आहे. तपासासाठी आठ पथके निश्चित केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारसांना मुक्तीचे ‘चारधाम

$
0
0

कुमार कांबळे, कोल्हापूर

पोलिस ठाण्यातून बेवारस मृतदेह आल्याबद्दलचा फोन येतो. सर्वांना मोबाइलवर मेसेज जातो. ठरल्याप्रमाणे सर्वजण सकाळी सातच्या ठोक्याला सीपीआरच्या पीएम रूमवर येतात. मृताच्या नावावरून जात समजली तर ठीक नाहीतर त्याचा अंत्यविधी सन्मानपूर्वकच झाला पाहिजे, या भावनेतून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. बेवारस मृतदेहांवर १५ वर्षे अंत्यसंस्कार करीत येथील मानवसेवा सेकंड इनिंग होम ही संस्था चारधाम यात्रेचे पुण्य पदरात पाडून घेत आहे. संस्थेला सध्या मनुष्यबळाची तीव्र आवश्यकता आहे.

कुणी नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करीत असतानाच त्याच्यावर अपघाती मृत्यू ओढवतो. पंचनाम्यावेळी ओळखपत्र सापडले तर त्याच्या नातेवाईकांना कळवणे सोपे जाते, अन्यथा पोलिस नियमाप्रमाणे तीन दिवस वाट पाहून संबंधितांचा मृतदेह मानवसेवा संस्थेकडे अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द करतात. त्याआधी संस्था संबंधिताचे फोटो, त्याच्या ओळखीचे वर्णन या सर्व बाबी नोंदवून ठेवते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मगच अंत्यसंस्कार केले जातात. संस्थेकडे आज मोजकेच कार्यकर्ते आहेत. तरीही रोज सकाळचे दोन तास त्यांनी या कामासाठी काढून ठेवले आहेत. अंत्यसंस्कारासाठी शिवाजी चौकातील पठाण हारवाले यांच्याकडून न चुकता हार पाठवला जातो. रेल्वे स्थानकासमोरील संकटविमोचन हनुमान मंदिर ट्रस्टने दिलेल्या अंत्यसंस्काराच्या साहित्यातून सर्व ती तयारी होते. महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या शववाहिकेत मृतदेह ठेवला जातो आणि विधी-संस्कारासह अंत्यसंस्कार होतो. दिवसाला एक किंवा बऱ्याचदा चार-चार मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते, परंतु हे काम आत्मिक समाधानाने कार्यकर्ते करीत असतात. गेल्या पंधरा वर्षांत संस्थेने २८५० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

संस्थेच्या कामात सहभागी कार्यकर्ते

किशोर नैनवाणी, महेश शानबाग, शाहीर शहाजी माळी, देवानंद गायकवाड, दिलीप सावंत, देविचंद पुरोहित, पंडित मस्कर, अर्जुन कांबळे आणि यशवंत हेगडे, फोटोग्राफर अंजुम शेख.

संपर्कासाठी आवाहन

मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेक वर्षांनी नातेवाईकांची ओळख पटते. असे अनेक प्रसंग घडल्याचे संस्थेचे कार्यकर्ते शाहीर शहाजी माळी यांनी सांगितले. शहरालगत नातेवाईक आहेत, परंतु बेवारस म्हणून अंत्यसंस्कारही झाले, अशाही घटना घडतात. हेच नातेवाईक मृतावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केल्याबद्दल संस्थेला धन्यवाद देतात. संस्थेकडे फक्त मनुष्यबळाचीच वानवा आहे. या कामात मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी किशोर नैनवाणी (९४२१३९४९५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही माळी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images