Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मातांचा मृत्युदर झाला कमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

गर्भवती माता व बालमृत्यू यांचे प्रमाण अत्यल्प होण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणून सातारा जिल्ह्यातील गरोदर मातांचा मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेला आपल्या कामाची पोच पावती मिळाली आहे.

राज्यस्तरावर गर्भवती माता आणि नवजात बालकांचे संगोपन व संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भवतींना आवश्यक असणाऱ्या आरोग्य विषयक सेवा, औषधोपचार व संतुलित आहार यांची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते. गरोदर महिलांना वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी लागते. तालुका व जिल्हा सरकारी रूग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकती औषधे देण्यात येतात. मोफत आरोग्यसेवा, सल्ला व मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील जिल्हा उपकेद्रांमार्फत गर्भवतींना आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, प्रा. आ. केंद्रे अजूनही औषधांच्या बाबतीत दुबळी असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यस्तरांवर गर्भवती मातांच्या संगोपनासाठीच्या जननी सुरक्षा योजना राबविलेल्या आहेत. प्रसुतीनंतरही त्यांच्या संगोपनासाठी त्यांना आर्थिक मदतीचा धनादेशही दिला जातो.

इतर कारणांनीही माता मृत्यू

माता गरोदर असल्यापासून प्रसूतीनंतरच्या ४५ दिवसांपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. सातारा जिल्ह्यात २०१३मध्ये २६, २०१४ मध्ये १३ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारीपासून ते एप्रिल २०१५अखेर एकाही गर्भवती मातेचा मृत्यू झालेला नाही. प्रबोधनाचा अभाव असल्यामुळे गर्भवती मातांचा मृत्यू होत असेल तर उच्च रक्तदाब, निगेटिव्ह रक्तगट असणे तसेच गरोदरपणामध्ये येणारे झटके, रक्तातील आवश्यक घटकांची उणीव असलेल्या महिलांचा मृत्यूमध्ये समावेश होतो. अशा महिलांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेखा परीक्षणात गैरव्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या २००६-१० या कालावधीतील विशेष लेखापरीक्षणात गैरव्यवहार प्रकरणी ६ कोटी ९० लाख २८ हजार रुपयांचा फटका बसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचा दंडात्मक भारही स्थानिक निधी लेखा संचलनालयाने ठरविला आहे. त्याची तत्कालीन आयुक्त, त्या कालावधीतील स्थायी समिती सभापती, सदस्य, मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरीक्षक, तसेच संबंधित जबाबदार असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे आदेश स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे सहसंचालक कि. ब. तावडे यांनी महापालिकेला दिले आहेत.

गेली दीड-दोन वर्षे हे आदेश महापालिका प्रशासनाने दडवून ठेवले असल्याचा आरोप नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी केला आहे. त्यांनीच या बाबत पाठपुरवा केला आहे. या संदर्भात पुन्हा न्यायालयीन लढा उभारण्याचे संकेत त्यांनी दिले. तत्कालीन काँग्रेस व विकास महाआघाडीच्या काळातील हा गैरव्हवहार असल्याचे त्यांनी सांगितले. जकात घोटाळा, वसंतदादा बँक ठेव प्रकरण, घरकुल योजना, बीओटीचा बेकायदा कारभार, स्थायी समितीचे नियमबाह्य निर्णय, महासभेतील ऐनवेळचे बेकायदा ठराव, अशा प्रकारे हा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात विशेष लेखापरीक्षणाची आपणच मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले.

असे आहेत आक्षेप

शिवाजी स्टेडियमवर अधिकाराचा गैरवापर करून ४.९० कोटी रुपये खर्चाचे लॉन केले.

विनानिविदा केवळ २० कामांमध्ये १ कोटी ४२ लाख ३३९ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे.

लेखा परीक्षणासाठी ११४.३२ कोटींची कागदपत्रेच दिली नाहीत

ई-गव्हर्नन्सवर ४९.४० लाखाची उधळण करण्यात आली. घरकुल योजनाते २.४५ कोटींचा गैरव्यवहार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपत्ती’कडे काणाडोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाळ्यात आपत्ती ओढवल्यानंतर उपाययोजना व यंत्रणा राबवण्यापेक्षा ती परिस्थिती निर्माण होऊ नये याकडे मात्र प्रशासनाकडून काणाडोळा झाला आहे. गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदीवरील अणदूरच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक खांब तीन महिन्यांपासून पूर्णपणे कोसळला आहे. त्यामुळे अणदूर, धुंदवडे परिसरातील जवळपास दहा हजार ग्रामस्थांना बांबूच्या पुलावरून धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात पूर आल्यानंतर नागरिकांना कामकाजासाठी मोठे अंतर ओलांडून मुख्य रस्त्याला यावे लागणार असून बंधाऱ्यालाही मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

गगनबावडा तालुक्यात राज्य मार्गाशेजारून कुंभी नदी वाहते. त्या भागातील सिंचन व्यवस्थेसाठी कोल्हापूर पद्धतीचे जुने बंधारे आहेत. त्यातील अनेक बंधाऱ्यांचा पाणी साठवण्याबरोबरच प्रवासासाठीही वापर होतो. अणदूर गावाजवळही अशाच प्रकारचा बंधारा आहे. पण दोन वर्षापासून त्या बंधाऱ्याचा एक खांब निकामी होत चालला होता. त्यासाठी किरकोळ डागडुजीही केली नव्हती. परिणामी तीन महिन्यांपूर्वी तो खांब पूर्ण कोसळला. त्याबरोबर बंधाऱ्यावरील स्लॅबही कोसळला. यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झाली. अणदूर, धुंदवडे, शेळोशी, केळोशी, बोरबेट या गावांबरोबर वाड्यांवरील दहा हजारांहून जास्त लोकसंख्येला या बंधाऱ्याहून प्रवास करावा लागतो. शाळा, कॉलेजपासून नोकरीसाठी, बाजारासाठी दररोज या परिसरातील नागरिकांना बंधारा ओलांडल्याशिवाय पर्याय साकवावरून प्रवास करावा लागतो. अशा धोकादायक स्थितीत अनेकवेळा दुर्घटना घडल्या आहेत.

अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

बंधाऱ्याची दुरवस्था होऊनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी फिरकलेले नाहीत. प्रचंड पावसामुळे येथील बंधारे सातत्याने पाण्याखाली जातात. अशावेळी कळ्याच्या दिशेने असलेला अणदूर हा जवळचा बंधारा आहे. पण त्यासाठी या परिसरातील ग्रामस्थांना जवळपास सहा ते आठ किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. तसेच त्या बंधाऱ्यावर पाणी नसेल याची खात्री नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी ​प्रत्येक विभागाकडून यंत्रणा सज्जतेचा आढावा घेतला आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील जनतेवर आताही आपत्ती कोसळली आहेच. शिवाय पावसाळ्यात त्या आपत्तीचे संकट मोठे होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उपजिल्हा रुग्णालयप्रश्नी लवकरच बैठक घेऊ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक गैरसोयींबाबत अनेक तक्रारी असून यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांसमवेत लवकरच बैठक बोलावत आहे,' अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील कारभारावर नाराजी व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी रुग्णालयावर हल्लाबोल केला होता. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते

मुश्रीफ म्हणाले, 'आघाडीची सत्ता असताना रुग्णालयाचा कारभार सुस्थितीत होता. मात्र, युतीच्या कार्यकाळात राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांची स्थिती 'अतिदक्षता' विभागात दाखल करण्याजोगी झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. वेळोवेळी त्यासंदर्भात उपाययोजना केल्या. मात्र, आता स्थिती हाताबाहेर गेली आहे. लवकरच आरोग्य उपसंचालकां-समवेत बैठक लावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.' गडहिंग्लज उपविभागातील रुग्णांना वैद्यकीय सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी झाली. सुरुवातीच्या काळात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रुग्णालयाचे कामकाज सुरू होते. मात्र गेल्या दोन वर्षांत रुग्णालयाला उतरती कळा लागली. औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्री व तज्ज्ञांचा अभाव, पर्यटकासारखे तासभर येणारे डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची अरेरावी, नित्यनियमाने होणारी आंदोलने यामुळे उपजिल्हा रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलतवर मालकी शेतकऱ्यांचीच राहील’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

'दौलत कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील ऊस इतर कारखान्यांना घालताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत ही वस्तुस्थिती आहे. दौलत कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहील. शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा,' असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुक्यातील सहकारी संस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हा बँकेच्या व गोकुळच्या नूतन संचालकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'साखर उद्योग अडचणीत आहे. दौलतवर ३५० कोटींचा बोजा आहे. कारखाना सुरू करायचा असेल तर एनसीडीसी आणि जिल्हा बँकेचे कर्ज दोन महिन्यांत भरावेच लागेल. जिल्हा बँकेत आम्ही सत्तेत असल्यामुळे कर्जाचे दोन हफ्ते पाडून देऊ; मात्र एनसीडीसी थांबणार नाही. त्यामुळे दौलत सुरू करण्यासाठी तालुक्यातील जनतेने तालुका संघात ठेवी जमा कराव्यात. आम्ही दौलतचा लिलाव करणार नसून तो चालवायला देणार आहोत. जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे. यासाठी गट-तट बाजूला ठेवावेत. बँकेच्या हिताच्या दृष्टीने सर्वांना विश्वासात घेवून काम करणार आहे. दौलत चालवायला कोण घेणार हे ३ जूनला निविदा प्रसिद्ध केल्यानंतर कळेल.'

माजी आमदार नरसिंग पाटील म्हणाले, 'दौलत बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगारांचे नुकसान झाले आहे. दौलतच्या संचालकांनी कारखाना चालवायचा असतो. मात्र दौलतची रखवाली करण्याच्या बहाण्याने त्यांनीच साहित्य लंपास केले आहे.' यावेळी आमदार मुश्रीफ, 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, प्रा. संजय मंडलिक, राजेश पाटील, प्रताप ऊर्फ भैया माने, प्रतापसिंह चव्हाण, बाबासाहेब आसुर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती ज्योती पवार, राजेखान जमादर, जि. प.चे सदस्य राजेंद्र परीट, आदींसह विविध दूध संस्थांचे व सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 'गोकुळ'चे संचालक राजेश पाटील यांनी स्वागत केले. रवींद्र देसाई यांनी सूत्रसंचालन केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेनिक्रेत तीव्र पाणीटंचाई

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

बेनिक्रे (ता. कागल) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी व इतर कामासाठी सार्वजनिक विहिरी तसेच कूपनलिकांचा आधार घ्यावा लागत आहे. पाण्यासाठी महिला-पुरुषांना दिवस वाया घालवावा लागत आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली असून, ग्रामस्थ आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

बेनिक्रेत तीस वर्षांपूर्वी ६४ दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघुपाटबंधारे प्रकल्प झाला आहे. तेव्हापासून येथील रब्बी पिकांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर होत आहे. मात्र, तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होत असल्याने तो अभावानेच भरतो. तरीही पिण्याच्या पाण्याची कधी इतकी टंचाई झाली नाही. याच प्रकल्पाच्या खालच्या बाजूस गावच्या नळयोजनेसाठी जॅकवेल बांधले आहे; परंतु त्याला मुळातच पाणी कमी असल्याने प्रकल्पाच्या गेटमधून थेट त्यात पाणी सोडले जाते. तेच पाणी गावातील नळयोजनेला मिळते. प्रकल्पात दरवर्षी पन्नास टक्क्यांवर पाणीसाठा होत राहिल्याने अडचण आली नाही.

मात्र गेल्या पावसाळ्यात केवळ तीस टक्के पाणीसाठा झाला. त्यातील पाण्याचा शेतीसाठी काही प्रमाणात वापर झाला आणि केवळ दहा दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले. सध्या त्यातील पाच दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे खाली पाणी सोडण्याच्या गेटला पाणी येणे बंद झाले. परिणामी गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून प्रकल्पातील गेटपर्यंत चर खोदून शिल्लक पाणी गेटमधून खाली सोडण्यासाठी प्रयत्न झाला. त्यामुळे थोडासा दिलासा मिळून गावाला दोन दिवसांतून पिण्यापुरते पाणी देता आले. तरीही जनावरे व कपडे धुणे आणि इतर खर्चासाठी पाणी मिळत नाही. ते मिळविण्यासाठी गावालगतच्या सार्वजनिक विहिरीवर झुंबड उडते. शेतीसाठी गेले दोन महिने पाणीच नाही. त्यामुळे पिकेही करपून जाऊ लागली आहेत.

यंदा पाणीसाठा वाढणार

बेनिक्रे लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने जलयुक्त शिवार योजनेचा लाभ घेतला जात आहे. प्रकल्पातील गाळ, मुरूम मोफत काढण्यास परवानगी मिळाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात गाळ काढून आपापल्या शेतात टाकत आहेत. दररोज दोन जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे येथे काम सुरू आहे. दोन हजारहून अधिक ट्रॉली गाळ आतापर्यंत उचलला आहे. त्यामुळे प्रकल्पाची खोली वाढण्यास मदत होणार असून, येत्या येत्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढेल.

प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावर उपायोजना सुरू आहे. लवकरच प्रा. संजय मंडलिक यांच्या सहकार्यातून दोन ठिकाणी कूपनलिका मारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच प्रकल्पातील गाळ निघाल्यामुळे येत्या पावसाळ्यात जादा पाणी साठेल अशी अपेक्षा आहे.'

-सरिता काळुगडे, सरपंच, बेनिक्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांदिवडेतील खूनप्रकरणी पुतण्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

बांदिवडे (ता. पन्हाळा) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी अभिमन्यू ऊर्फ आबा अर्जुन पाटील (वय ३१) या संशयिताला मंगळवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अभिमन्यूला पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. बांदिवडे येथील नाना बापू पाटील (५५) यांचा २ मे रोजी खून झाला होता. संशयित अभिमन्यू हा नाना पाटील यांचा पुतण्या आहे.

३ मे रोजी करंजफेण-बांदिवडे दरम्यान असलेल्या 'गवळ्याचा माळ' येथील नाल्यामध्ये नाना पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता. हा खून जमिनीच्या वादातून नामदेव गिरी यांनी केल्याचा संशय पाटील यांच्या नातेवाइकांनी त्यावेळी व्यक्त केल्याने गिरी यांना दोन दिवसांनी पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या खुनाचा तपास सुरू केला. नाना पाटील यांची जमीन अभिमन्यू पाटीलने विकली होती. जमीन विक्रीतील २७ लाख रुपये हडपण्यासाठी अभिमन्यूने नाना पाटील यांचा खून केल्याचे तपासात निष्पण्ण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. अभिमन्यूने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे. अधिक तपास पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत गवारी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कोठडी सुरक्षित करण्याचे आदेश

$
0
0

कोल्हापूरः तासगाव पोलिस ठाण्यातून तीन संशयित पळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस कोठडी तपासून त्या दुरूस्त करून सुरक्षित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत.

तासगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीतील तीन संशयितांनी लाकडी सीलिंग फोडून पलायन केले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. शहरात पाच पोलिस ठाणी असून करवीर व राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कोठडी सुरक्षित मानल्या जातात. करवीर ठाण्याची कोठडी जुनी असून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन आरसीसी इमारतीतील पोलिस कोठडी सुरक्षित मानल्या जातात. शाहूपुरी, जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात कोठडी आहे. शाहूपुरीतील कोठडी जुन्या इमारतीत आहे. जुना राजवाडा व लक्ष्मीपुरीत बाथरूम व टॉयलेटची सोय नसल्याने संशयितांना कोठडीबाहेर काढावे लागते. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यातील संशयितांना करवीर पोलिस कोठडीत ठेवले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन गाड्यांची जाळपोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) एमआयडीसीतील वादग्रस्त एव्हीएच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या सुपे (ता. चंदगड) येथे अज्ञातांनी हल्ला करून पेटविल्या. यावेळी अज्ञातांनी कामगारांनाही बेदम चोप दिला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी ः चंदगड येथील हलकर्णी एमआयडीसीमध्ये एव्हीएच कंपनी आहे. कंपनीला प्रदूषण व पर्यावरणाच्या कारणामुळे तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. कंपनी अन्यत्र हलवावी, अशी जनतेची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊनही सरकारी पातळीवर दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी ७ मार्च २०१५ रोजी प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवले होते.

यावेळी संपप्त जमावाने कंपनी, कंपनीचे कार्यालय व वाहने पेटवून दिली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर कोल्हापूर येथे एव्हीएच विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन एव्हीएचची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते.

गेली दोन वर्षे एव्हीएच केमिकल कंपनीविरोधात तालुक्यातील जनतेच्या तीव्र भावना आहेत. याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सायंकाळी एव्हीएच कंपनीतील कामगार काम संपवून बेळगावच्या दिशेने चारचाकी वाहनातून जात होते. सुपे (ता. चंदगड) येथे आल्यानंतर अज्ञातांनी कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या दोन्हीही गाड्या अडवून कामगारांना बेदम मारहाण केली. त्यामुळे कामगार मिळेल त्या वाटेने पळून गेले. यावेळी अज्ञातांनी दोन्ही गाड्या पेटविल्या. गाड्यांनी पेट घेतल्यानंतर बेळगाव-वेगुर्ला मार्गावर आगीचे लोट उठत होते. आगीमुळे मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीही ६ मार्चला कर्मचाऱ्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत चंदगड पोलिसांत झाली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेंचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा. या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले जाईल', असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अॅड. आखरे म्हणाले, 'राज्यातील साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन, आरोग्य सेवा या क्षेत्रात एकनिष्ठेने प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. परंतु पुरंदरे या कोणत्याच निकषात बसत नाहीत. पुरंदरेंनी छत्रपती शिवरायांच्या काळातील इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या कादंबरीत घाणेरडे, आक्षेपार्ह, अनैतिहासिक, कल्पनारंजक, पक्षपाती लिखाण केले आहे. छत्रपती शिवराय व राष्ट्रमाता जिजाऊ यांना दुय्यम स्थानावर आणून त्यांचे नेतृत्व दुबळे ठरवण्याची व त्यांचे चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात सापडेल अशी भूमिका मांडली आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. या विषयावर सरकारने तोंड उघडले नाही तर संभाजी ब्रिगेड यापुढे राज्यव्यापी आंदोलन करेल. यावेळी उद्भभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची राहिल.' पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष हिंदूराव हुजरे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संपत चव्हाण, शहराध्यक्ष विकास जाधव, प्रविण पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमृत्यूमध्ये घट

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत मिळणाऱ्या सुविधा, विविध क्रमांकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सुविधा यामुळे जिल्ह्यातील बाल मृत्यू व माता मृत्यू प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली आहे. शहराशेजारील गावातील महिला शहरातील आरोग्यसेवेचा लाभ घेत असल्या, तरी राज्याची सरासरी टक्केवारी आणि जिल्ह्याची टक्केवारी समान असल्याचे दिलासादायक चित्र मानावे लागेल. बालमृत्यूचे प्रमाण वर्षागणिक घट होत आहे. मात्र, मातामृत्यू प्रमाणामध्ये असमानता दिसून येत आहे.

जिल्ह्यातील आरोग्यसेवा नेहमीच टिकेचे लक्ष बनलेली असते. प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रात मिळाणाऱ्या सुविधा औषधसाठा यांबाबत ग्रामीण जनतेमध्ये नेहमीच नाराजीचे सूर असतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उपचारांवर होणारी दिरंगाईमुळे ही आरोग्यसेवा अनेकांच्या जीवावर बेतली गेल्याची उदाहरणे होती. यात आता आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अतिरीक्त रक्तस्त्राव, रक्तदाब, रक्तक्षय आणि जंतूसंसर्गामुळे अनेक मातांना प्रसूती दरम्यान दगावल्या जात होत्या. गेल्या तीन वर्षात हे प्रमाण कमी करण्यामध्ये यश आले आहे.

मात्र, यामध्ये असमानता दिसून येत आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात ३८ मातांचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला होता. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ३३ पर्यंत कमी करण्यात यश आले होते. मात्र, २०१४-१५ मध्ये पुन्हा हे प्रमाण ४० पर्यंत गेले आहे. त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पुन्हा पयत्नांची पराकष्टा आरोग्य विभागाला करावी लागणार आहे.

बालमृत्यू कमी करण्यात मात्र आरोग्य विभागाला यश आले आहे. जननी सुरक्षा, गाडी प्रवास, मोफत भोजन, अनुसूचित जाती-जमातीमधील महिलांना देण्यात येणारा ७०० रुपयांचा भत्ता यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. यामुळे २०१३-१४ मध्ये ३६६ झालेल्या बालमृत्यूचे प्रमाण २०१४-१५ मध्ये ३३५ पर्यंत खाली आले आहे. तर २०१३-१४ मध्ये असलेले अर्भक मृत्यू १३१ वरून २०१४-१५ मध्ये ११३ पर्यंत कमी झाले आहे. आरोग्य सेवेत झालेल्या सुधारणेमुळे मातामृत्यू, बालमृत्यू व अर्भक मृत्यूमध्ये घट झाली असली, तरी यात आरोग्य यंत्रणेला सातत्य ठेवून हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सेवेत सुधारणआ करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील कुपोषण कमी झाल्यामुळे माता मृत्यू, बाल मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषद विविध उपाययोजना करत आहे. त्यासाठी प्राथमिक उपकेंद्रांतील सुविंधांमध्ये वाढ केली आहे.

- डॉ. योगेश साळे, जिल्हा माता बालसंगोपन आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या

$
0
0

कोल्हापूर : कळंबा येथील प्रिया संदीप कांबळे (वय २१) या विवाहितेने राहत्या घरी फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. करवीर पोलिस ठाण्यात या आत्महत्येची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजूंसाठी पुण्यात वसतिगृहाची सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे येथे ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या गरीब, गरजू, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांची कमी खर्चामध्ये भोजन व निवासाची सोय व्हावी, यासाठी विद्यार्थी सहायक समितीच्यावतीने अल्पदरात निवास, भोजन व अन्य विविध सुविधा दिल्या जातात. या १ जूनपासून या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून संबधित विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबधित संस्थेची विद्यार्थ्यांकरीता तीन व विद्यार्थिंनींकरीता दोन अशी पाच वसतिगृहे व भोजनालये असून त्यांचा लाभ दरवर्षी सुमारे ७५० विद्यार्थी-विद्यार्थिनीं घेतात. समितीचे साहाय्य घेणारा विद्यार्थी स्वावलंबी व कार्यतत्पर असावा, अशी अपेक्षा आहे. याकरता कमवा व शिका योजनेंतर्गत काम करुन शिक्षणाच्या काही खर्चापुरते अर्थार्जन करण्यास विद्यार्थ्यांना सहाय्य केले जाते. तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो.

तांत्रिक शिक्षण घेणारे (उदा. डिप्लोमा, आय.टी.आय.) व १२ वी उत्तीर्ण झालेल्या व विविध विद्याशाखांच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना समितीच्या वसतिगृहात प्रवेश मिळेल. समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जून पासून ऑनलाइन www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेंटरांच्या प्रतिभेवर परदेशी संशोधकांची मोहर

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

सिनेमाचे तंत्र केवळ परदेशातच अवगत असण्याच्या काळात भारतीय बनावटीचा कॅमेरा बनवून सिनेमानिर्मिती करणाऱ्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या कलाप्रतिभेची भुरळ सिनेमा व रंगभूमी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही पडली आहे. आजपर्यंतसहा परदेशी संशोधकांनी पेंटर यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेपथ्यकार, दिग्दर्शक, चित्रकार अशा पैलूंवर अभ्यास केला आहे. भारताचे लिओनार्दो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या या कलाकाराच्या प्रतिभेवर जगातील कलासक्त अभ्यासकांनी मोहर उमटवली आहे.

ब्रिटन, फ्रान्स, न्यूझीलंड, जर्मनी आणि इस्रायल येथील संशोधकांनी पेंटर यांच्या कलेचा अभ्यास केला. पेंटर चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून सिनेमा व रंगभूमी क्षेत्रात कार्यरत होते. मराठी रंगभूमीचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधून आलेल्या स्टेफी स्टीव्ह हिने पेंटर यांच्या चित्रकलेचा अभ्यास केला. रंगभूमीच्या सुवर्णकाळात पेंटर यांनी बालगंधर्वांच्या कंपनीत नाटकांचे पडदे रंगवण्याचे काम केले होते. एखादे दृश्य कुंचल्याच्या माध्यमातून पडद्यावर चितारल्यानंतर रंगभूमीवर पडणारा प्रभाव हा स्टेफीच्या अभ्यासाचा विषय होता.

इस्रायल येथील सिनेमा समीक्षक डॅम उलमन यांनी पेंटर यांचे कार्य जाणून घेण्यासाठी कोल्हापूर दौरा केला. डॅम यांनी खरी कॉर्नर येथील पेंटर यांच्या घरापासून ते ​कॅमेरा मानस्तंभ, शालिनी सिनेटोन परिसर, पेंटर यांच्या सिनेमानिर्मितीतील काही आठवणींचा अभ्यास केला. पॅरिस आणि लंडन येथील दोन विद्यार्थ्यांनीही पेंटर यांच्यातील रंगभूषा व वेशभूषाकाराच्या प्रतिभेवर माहिती संकलन केले आहे. जर्मनीतून मुंबईत आलेल्या ज्युलिएट थॉमस या मुलीला जे.जे. स्कूल ऑफ आर्टस या संस्थेत पेंटर यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर तिने कोल्हापुरातील पेंटर याचे संदर्भ संकलित करून पेंटर यांनी सिनेमानिर्मितीत वापरलेल्या छायाप्रकाश कलेविषयी संशोधन केले आहे. न्यूझीलंड येथील एकाने पेंटरांच्या नेपथ्याचा विषय संशोधनासाठी निवडला आहे.

'डॉक्युमेंटरीला मदत'

पेटर यांच्या कार्यावर झोत टाकणारा माहितीपट काढावा. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे डॅम उलमन यांनी कोल्हापूर भेटीदरम्यान सांगितले होते. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही डॅम यांनी सोसायटी सदस्यांकडे व्यक्त केली आहे.

भारतीय सिनेमाच्या इतिहासात बाबुराव पेंटर यांचे योगदान मोलाचे आहे. याची जाण सिनेरसिक आणि अभ्यासकांना आहेच, पण त्यांच्या कलाप्रतिभेवर जगातील संशोधक विद्यार्थ्यांकडून अभ्यास होणे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. कोल्हापूर आणि सिनेमाचे माहेरघर हे समीकरण या संशोधनातून जगभरात पोहोचले आहे.

- चंद्रकांत जोशी, अध्यक्ष, बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाच्या झाडाचे अस्तित्व धोक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

प्राचीन परंपरा लाभलेल्या भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ पोर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी होत असते. सुवासिनींच्या दृष्टीने या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. पतीच्या दिर्घायुष्यासाठी सुवासिनी या दिवशी वडाच्या झाडाची विधीवत पूजा करतात. यामुळे हिंदू संस्कृतीत वडाच्या झाडाला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणासह सिमेंटच्या जंगलांच्या विस्तारीकरणामुळे अलिकडच्या काळात वडाच्या झाडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वडाच्या झाडाची प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वडाची झाडे संपुष्टात आल्यानंतर सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या झाडाला फेरे मारायचे अन् दोरे गुंडाळायचे? असा प्रश्न सद्यस्थितीत निर्माण झाला आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड नसेल तेथे झाडाची फांदी तोडून आणून त्या फांदीला दोरे व फेरे घेतले जात असल्याचे काही ठिकाणी चित्र पहावयास मिळाले. वडाच्या झाडाचे अस्थित्व कमी होत गेले तर आणखी काही वर्षांनी वडाचे झाडच शिल्लकच राहणार नाही. परिणामी, सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या झाडाला फेरे मारायचे? असा प्रश्न उपस्थित होणार असल्यामुळे सत्यवानाच्या 'कथे'वर प्रश्न निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया सुवासिनींमधून व्यक्त होत आहे.

वड तोडायला गेलेल्या सत्यवानाचा झाडावरून पडून मृत्यू झाल्यानंतर सावित्रीने वडाच्या झाडाला फेरे मारून व त्याची विधीवत पूजा करून 'यमा'च्या दारातून त्याचे प्राण परत आणल्याची पौराणीक आख्यायिका आहे. त्यातच, वड हा वृक्ष बरेच वर्षं टिकतो. त्याची पाळेमुळे खोल आणि दूरवर रूजतात. पारंब्या आणि मोठ्या बुंध्यामुळे वडाचे झाड महाकाय म्हणून ओळखले जाते. या वृक्षाची छाया आसपासच्या जागेवर पडते. वृक्षारोपणासाठी सरकार 'झाडे लावा झाडे जगवा' ही मोहीम प्रतिवर्षी राबवत असले, तरी वृक्षारोपणामध्ये वडाच्या झाडाचा समावेश करण्यात आलेला नाही, हे या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते आहे.

येथील परिसराचा सर्व्हे केल्यास वडांच्या झाडाची संख्या फारच कमी दिसून येत आहे. वनविभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडेही या बाबतची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा वृक्ष दुर्मिळ होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मात्र, वडाच्या झाडाचे महत्व प्रतिवर्षी वटपौर्णिमे दिवशीच समजते. मात्र, या झाडांची संख्या वाढावी, असा उपक्रम राबवण्याचा मानस कोणताही घटक करत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिलासाठी २१ जून डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाला २० जूनपर्यंत एफआरपीनुसार दर न मिळाल्यास २२ जूनपासून पुण्यात साखर आयुक्तालयाच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करू असा' इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. 'आम्ही आंदोलन करतो म्हणून मंत्रिपद नकारायचे असल्यास खुशाल नकारा. आम्ही जर तुम्हाला जड होत असू, तर आम्हाला सरकारमधून बाहेर काढा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे', असेही शेट्टी यांनी यावेळी भाजप सरकारला सुनावले.

खासदार शेट्टी म्हणाले, 'साखर कारखानदारीसमोर अडचणी आहेत म्हणून आम्ही हा प्रश्न संयमाने हाताळला. केंद्र किंवा राज्य, सरकारने कारखानदारांना पैसे द्यायचे की कारखानदारांनी बाजारातून पैसे उपलब्ध करायचे या प्रश्नाशी शेतकऱ्यांचा काही संबंध नाही. ऊसतोडणी कामगार, बँकाचे व्याजदर, सरकारचे कर हे सारे सुरळीत आहे, मग शेतकऱ्यांनीच का झळ सोसायची? प्रसंगी सरकारने साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावेत. एफआरपीनुसार पैसे मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. प्रत्येकवेळी शेतकरी त्याग करणार नाहीत.'

शेट्टी म्हणाले, 'कोल्हापुरातील कारखानदारांनी तात्पुरता १२०० रुपये प्रतीटन दर देण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. एकरकमी एफआरपी मिळावी. 'शेतीकर्जांचे आर्थिक वर्ष ३० जूनला संपते. या तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांना उसाचे बील मिळाले नाही, तर स्वत:ची कसलीही चूक नसताना शेतकरी थकबाकीत जातील. त्यामुळे नवीन पीककर्ज न मिळणे, सध्याच्या कर्जावरील व्याजसवलत न मिळणे अशा अडचणीत शेतकरी सापडतील.'

व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या साखरेसाठी स्वतंत्र दराच्या प्रश्नावर शेट्टी यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'हा मुद्दा मांडून माझे केस पांढरे होण्याची वेळ आली. पण काहीही उपयोग झाला नाही. शेतीमालाचे आयात-निर्यात धोरणही स्थीर नाही. सरकार बदलले तरी सिस्टीम जुनीच आहे. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून, साधन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी सदाभाऊ खोत, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचा प्रसिद्धी स्टंट

माजी मंत्री हसन मुश्रीफ ६ जूनला ऊस दराच्या प्रश्नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. यासंदर्भात शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, 'राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यात अशाच पद्धतीने आंदोलन करावे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर गांभीर्याने आंदोलने होणार असतील तर आम्हीही सहभागी होऊ. काहीजण नव्याने आंदोलनात येत आहेत. त्यांचा हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट वाटतो. मी बारामतीत शारदा प्रांगणात आंदोलन केले. इंदापुरात साखर कारखान्याच्या दारात आंदोलन केले. मात्र व्यक्तीद्वेषाने कोणाच्याही दारात जाऊन आंदोलन केले नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर पकडण्यात कोल्हापूर पुढे

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

तक्रारी आल्यानंतर लाच घेणाऱ्यांना व्यक्तीवर सापळा रचून त्यांना पकडण्यात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कारवाईत ४४ टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मे २०१४ पर्यंत नऊजणांना लाच घेण्यात अटक केली होती. मे २०१५पर्यंत कोल्हापूर विभागाने १३ जणांना अटक केली आहे.

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जानेवारी महिना जवळजवळ कोरडा गेला होता. मात्र ३१ जानेवारी रोजी महापौर तृप्ती माळवी यांच्यावतीने त्यांचा स्वीय सहायक अश्विन गडकरी याला १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक झाली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली. महापौरांवरही कारवाईचे धाडस विभागाला होत असल्याचा विश्वास जनतेत निर्माण झाल्याने लाच मागितल्याच्या तक्रारी देण्यास लोकही पुढे येऊ लागले आहेत. गेल्या चार महिन्यांत १२ जणांना लाच घेताना अटक झाली आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, त्याचा पंटर मिलिंद वावरे याला बांधकाम परवानगीसाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली. महापालिकेतील सलग दोन घटनामुळे तेथील भ्रष्टाचारावर प्रकाश पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात केळोशी ब्रुद्रुक (ता. राधानगरी) येथील तलाठी अनंत कांबळे यालाही पाच हजार रुपये घेताना अटक झाल्याने महसूल विभागातील भ्रष्टाचार तेथेच उघड झाला.

त्यानंतर कोडोलीचा सहायक फौजदार जगन्नाथ माळी याला दोन हजारांची लाच घेताना अटक झाली. आरटीओ निरीक्षक प्रशांत पाटील याला दहा हजारांची लाच घेताना चंदगडमध्ये रंगेहाथ पकडले गेले. इचलकरंजीत सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी दोन लाख ५५ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी हंबीरराव संकपाळ जाळ्यात सापडला. याशिवाय महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सागर कांबळे याला एक हजार रुपयांची तर हुपरी पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक जालंदर भाट याला गेल्या आठवड्यात मध्यरात्री तीन हजारांची लाच घेताना अटक झाली होती. गेल्यावर्षाच्या तुलनेत हे तक्रारींचे प्रमाण वाढले असून नागरिक तक्रारी देण्यास पुढे येऊ लागले आहेत.

तिघांना शिक्षा

लाच घेणाऱ्या तिघांना न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. पोलिस नाईक सुरेश लोहार याला एक हजाराच्या लाच प्रकरणात दीड वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. तलाठी बाळू कोळी आणि कोतवाल बाबूराव भोसले यांनाही एका प्रकरणात एक हजाराची लाच स्वीकारल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दीड वर्षाची शिक्षा दिली आहे. वीज मंडळाचा कनिष्ठ अभियंता रत्नाकर जोशी याने तीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने दीड वर्षाची शिक्षा सुनावली. तिन्ही शिक्षा मे महिन्यात ठोठावण्यात आल्या आहेत. त्यामुळे धाक वाढला आहे.

यापूर्वी माझ्याकडे लाच मागितली आहे अशी तक्रार करण्यासाठी संबंधित तक्रारदाराला कार्यालयात यावे लागत होते. आता १०६४ हा टोलफ्री क्रमांक, ई मेल आणि खात्याच्या अॅपवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन खातरजमा करून तक्रारदारांच्या घरी जाऊन थेट संपर्क साधत आहे. त्यामुळे तक्रारदारांना कारवाईबाबत विश्वास वाटत आहे.

- उदय आफळे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यांसाठी ऑन मनी

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

शैक्षणिक वर्षात विविध प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या दाखले मिळविण्यासाठी फरफट सुरु आहे. विद्यार्थी आणि पालकांना दाखले मिळविण्यासाठी अग्निदिव्यच करावे लागत आहे. दाखले देण्यासाठी सरकारी यंत्रणा तोकडी पडत आहे. ऑन मनी दिल्याशिवाय दाखले मिळत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. तत्काळ दाखला देण्यासाठी एजंटाची यंत्रणाही फोफावली आहे.

पहिली प्रवेशापासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक सुरू आहे. सरकारचे सेतू, महा ई सेवा केंद्र आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अजूनही पन्नास हजारांहून अधिक दाखले प्रलंबितच आहेत. प्रवेशात पन्नास टक्के एससी, एसटी, एन. टी, व्ही. जे, एसबीसी या प्रवर्गासाठी आरक्षण आहे. या आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

मेडिकल आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी जात पडताळणी अत्यावश्यक आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडून मात्र पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी गांभीर्य नाही. अजूनही या कार्यालयाकडे शैक्षणिक प्रकारातील एक हजार दाखले प्रलंबित आहेत. शैक्षणिक, सेवा आणि निवडणूकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) या कार्यालयाकडून दिली जाते. मात्र शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला या कार्यालयाकडे गांभीर्य नाही. सध्या देण्यात येत असलेले दाखले दोन वर्षांपूर्वीचे प्रलंबित आहेत. या कार्यालयात अजूनही एजंटाची पर्यायी यंत्रणा कार्यरत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सेतू कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी महा-ई सेवा केंद्र सुरू करण्यात आली. शहरात ४० महा- ई सेवा केंद्रे आहेत. इ डिस्ट्रिक्ट प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन दाखले देण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र तहसीलदार कार्यालयाकडे केवळ एकच मुख्य लिपिकांकडे जबाबदारी असल्याने दाखले प्रलंबित राहण्याचे प्रमाणात हजारांत आहे. महा ई सेवा केंद्राकडे दररोज दाखल्यासाठी दोनशे अर्ज दाखल होतात. मात्र महा-ई सेवा केंद्राना महसुली खोडा अनुभवा लागत आहे. चार दिवसांत दाखले देण्याचा नियम असतानाही एका दाखल्यासाठी महिनाभर वेटिंगवर रहावे लागते. यातही काही महा-ई सेवा केंद्र संचालकांकडून पालकांच्याकडून निर्धारित शुल्कापेक्षा जादा शुल्काची मागणी केली जात आहे.

संपर्क अभियान थंडावले

सरकारने दोन वर्षापूर्वी घरपोच दाखले देण्यासाठी संपर्क मोहीम राबविली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्यात येणार होते. बारावीचा निकाल जाहीर झाला. दहावीचा निकालही लवकरच जाहीर होईल. घरपोच दाखल्याची मोहीम यापूर्वी राबविली असती तर यंत्रणेवरील ताण कमी झाला असता.

एजंट फोफावले

सेतू आणि विभागीय जाती प्रमाणपत्र कार्यालयात एजंटाचे वजन कायम आहे. वाढलेली महागाई आणि अधिकारी रजेवर असल्याची कारणे सांगून विद्यार्थी आणि पालकांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. त्वरीत दाखल्यांच्या अमिषाला काही पालकही बळी पडले आहेत.

शैक्षणिक दाखले

रहिवाशी दाखला

उत्पन्नाचा दाखला

नॉनक्रिमिलेयर

जात प्रमाणपत्र

डोंगरी दाखला

कास्ट व्हॅलिडीटी

राष्ट्रीयत्व

सेतू, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय क्रमांक दोन आणि महा-ई सेवा केंद्र एकाच माळेचे मणी आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक लूटीचे सूत्र तिन्ही कार्यालयाकडे आहे. या कार्यालयाच्या कामकाजावर वचक आहे. ऑन मनी घेतल्याशिवाय दाखलेच मिळत नाहीत.

- हेमंत कांबळे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तेव्हा पवारांनी हे का केले नाही?!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी का सोडवला नाही? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला. पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात नुकतेच दौरे करून दुष्काळग्रस्त आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नवीन कर्ज देण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही. दुष्काळी भागात जर सिंचनाची शाश्वत व्यवस्था उपलब्ध झाली असती, तर शेतकऱ्यांची समस्या सुटली असती. पवार अनेक वर्षे केंद्रात मंत्री होते. त्यांनी त्यावेळी हा प्रश्न सोडवला नाही?. त्यांनी आता हा प्रश्न मांडणे म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज को' असा प्रकार आहे. पवारांनी यापूर्वी शेतकऱ्यांना किती वेळा कर्जमाफी द्यायची?, शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी देता येणार नाही असे त्यांनी म्हटले होते. मग, आता मात्र ते कर्जमाफीचा मुद्दा का मांडत आहेत?'

शेट्टी म्हणाले, 'पवार कोणती भूमिका घेतील आणि ते का घेतील? याचा अंदाज त्यांच्या निकटवर्तींयांनाही येत नाही. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी तातडीने सरकारला पाठिंबा दिला. नंतर साखर उद्योगावर रोडमॅप बनविण्यासाठी सरकारसोबत परिषदही घेतली. मात्र या रोडमॅपचे काय झाले? ते सांगावे. आता कर्जमाफी द्या म्हणणे आणि प्रश्नासाठी प्रयत्नशील असल्याचे नाटक कशासाठी?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहात घुसून युवतीचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा हॉस्पिटलमध्ये असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश करून एका अठरा वर्षांच्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनोज लोखंडे (रा. म्हसवड, ता. माण,) यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी युवती ही नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. संबंधित संशयित हा २०१३पासून ३१ मे २०१५पर्यंत सातत्याने फिर्यादी युवतीचा पाठलाग करत होता आणि मला तुझ्याशी विवाह करायचा आहे, असे सांगत होता. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास नर्सिंगच्या वसतिगृहात त्याने बेकायदा प्रवेश केला आणि वसतिगृहाच्या खिडकीवर लाथा मारून युवतीकडे विवाहाची मागणी केली. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. त्यानंतरही तो गप्प बसला नाही. त्याने फिर्यादी युवतीचा हात पकडून तिला ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>