Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वळ‌वाच्या पावसाने तासभर झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मान्सूनची चाहूल लवकर लागण्याची चिन्हे असताना शुक्रवारी रात्री कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला वळीव पावसाने झोपडले. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाट आणि गारांसह जवळपास तासभर पाऊस झाला. सानेगुरुजी येथे पडलेल्या झाडाखाली दोन दुचाकी गाड्या सापडल्या. रुईकर कॉलनी परिसरात झाडे पडल्याने वीजेच्या तारा तुटण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सलग पडलेल्या वळीव पावसाने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ढगाळ वातावरण होत होते. पण पाऊस झाला नव्हता. गुरुवारपासून ढग दिसू लागले होते. शुक्रवारी दिवसभरही अधूनमधून ढगाळ वातावरण होत होते. रात्री आठच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. काही भागात पंधरा, वीस मिनिटे तर काही भागात जवळपास तासभर पाऊस सुरु होता. सांगली जिल्ह्यालाही रात्री पावसाने झोडपून काढले. गारांसह झालेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा रात्रीपर्यंत खंडीत झाला होता. मान्सूनचे आगमन लवकर येणार असल्याची चर्चा असताना अजूनही वळीव पाऊस लावत असलेल्या हजेरीने शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता पसरली आहे. झाडे पडल्याने पुन्हा वीजेच्या तारा तुटण्याचे प्रकार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रॉडने मारल्याने टेम्पोचालक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोखंडी रॉडने डोक्यात मारल्याने संजय विष्णू निर्मळे (वय ३८, रा. इचलकरंजी) हा टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कागल पंचतारांकित वसाहतीत ही घटना घडली. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

निर्मळे यांचा टेम्पो असून ते सोक्तास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मालाची ने-आण टेम्पोतून करतात. त्यांनी शुक्रवारी सकाळी टेम्पोचे २० हजार रुपये भाडे कंपनीतील इन्चार्ज रावसाहेब भदरगे यांच्याकडे मागितले असता, त्यांनी चार हजार रुपये कमिशन मागितले होते. निर्मळे यांनी असे कमिशन देण्यास नकार दिला. त्यानंतर या गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यातून बदरगे यांनी निर्मळे यांच्या डोक्यात रॉड मारल्याचे पोलिसांनी सांगितले. निर्मळे यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. कंपनीतील कमिशनच्या वादातून झालेल्या या प्रकाराची कागल पंचतारांकित एमआयडीसी परिसरात दिवसभर चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिटन रू. १२०० देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या तीन महिन्यांत उसाची बिलेच मिळाली नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जही भागवता आलेले नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने किमान १२०० रुपये प्रतिटन दराने पैसे द्यावेत असा निर्णय शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

केडीसीसीच्या शाहूपुरीतील मुख्य कार्यालयात झालेल्या साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बैछमध्ये बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ होते. कोल्हापुरातील चार कारखाने केडीसीसीकडे तर चार कारखाने राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आहेत. या बँकांनी आपापल्या कारखान्यांना ऊस बिलासाठी देय कर्जाचे वितरण तातडीने करावे. उर्वरीत कारखान्यांनी आपापल्या राष्ट्रीय बँकांकडून रक्कम उपलब्ध करण्याचे प्रयत्न करावेत असा निर्णय यावेळी झाला.

सध्या साखरेच्या दरात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची जवळपास ८५१ कोटी रुपये येणेबाकी आहे. कारखाने शेतकऱ्यांना उसाचे बिल देऊ शकलेले नाहीत. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या कर्ज वसुलीवर झाल्याचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले. गेल्यावर्षी केडीसीसीची पिक कर्जाची वसुली ७५ टक्के झाली होती. ती यंदा ६१ टक्क्यांवर आली आहे. ३० जूनपर्यंत जर पीककर्ज भागवले नाही तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार नाही. पंजाबराव देशमुख पीककर्ज व्याज सवलत योजनेतून १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के तर ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला २ टक्के व्याज सवलत आहे. तेही मिळू शकणार नाही, असे सांगत मुश्रीफ यांनी केडीसीसीच्या वसुलीसंदर्भात माहिती दिली.

यावेळी, फेब्रुवारीपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत तुटलेल्या उसाचे कोणतेही बिल शेतकऱ्यांना मिळालेले नाही. कारखान्यांनी आता तातडीने किमान १२०० रुपये प्रतीटन दराने शेतकऱ्यांना बील द्यावे. त्यातून कर्ज आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणीसाठी पैसे उपलब्ध होतील. किमान कर्जाच्या रक्कमेची तजवीज झाली तर पुढच्या पीककर्जाची समस्या सुटेल अशी यावेळी चर्चा झाली. राज्य सरकारने साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर उर्वरीत बिल देता येईल यावर कारखानदारांच्या प्रतिनिधींचे एकमत झाले. बँकांनी कारखान्यांच्या मालमत्तेचे व्हॅल्यूएशन पुन्हा करावे. पूर्व हंगामी कर्जावर तातडीने निर्णय व्हावा या मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे, सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाच्या रकमेतून १५ गावांचा विकास

$
0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १५ गावांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. बेकायदा पवनचक्क्या, रिसॉर्टवर केलेल्या दंडवसुलीतून वनविभागाकडे ३१ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामधून हा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश असणार आहे.

वनसंपदेवर अवलंबून असलेल्या गावांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळवून देऊन ही गावे स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने वन विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सातारा जिल्ह्यात सर्वांधिक असल्यामुळे सध्या प्रायोगिक तत्त्वावर विकासासाठी निवडलेल्या १५ गावांमध्ये सातारा जिल्ह्यातील जास्त गावांचा समावेश आहे. पुढच्या काळात सुमारे ७० गावे या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

वनसंरक्षण केंद्रीय समितीने पर्यावरणाची हानी करणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्प आणि रिसॉर्टच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा दंड केला होता. यापैकी ३१ कोटी रुपये वसूल करण्यात आल्यामुळे वन विभागाकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली आहे.

आम्हाला सुमारे ३१ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचा योग्य विनियोग करण्यात येणार आहे. गावांच्या विकासासाठी हे पैसे वापरण्यात येणार असून यातील पहिला टप्पा सुरू झाला आहे. गावांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले असून त्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात येतील.

- जी. साईप्रकाश, मुख्य वनसंरक्षक, वनविभाग (वन्यजीव)

स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पर्यटनस्थळांचा विकास महत्वाचा आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. त्याचे दर्शन सर्वांना व्हावे त्यासाठी योग्यप्रकारे पर्यटनाच्या सोयी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

- नाना खामकर, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फलाटावर शांतता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुटी संपत आली. पावसाळ्याआधीचे विवाह मुहूर्तही कमी राहिले. शाळा सुरू होण्याचे वेध लागले असल्याने कोल्हापूर आगाराने मुंबई, पुण्यासह आणखी काही शहरांसाठी १०० जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मात्र तिकीट आरक्षणात नेहमीपेक्षा अवघ्या ५ ते १० टक्क्यांपर्यंतच वाढ झाली आहे. त्यामुळे एसटी स्टँडच्या फलाटावर शांतताच आहे. रविवारी (३१ मे) अपेक्षित गर्दी होण्याचा अंदाज एसटी प्रशासनाचा आहे.

मे महिन्याच्या उन्हाळी सुटीसाठी मुंबई, पुण्याहून गावाकडे येणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यासाठी एसटीच्या आरक्षणासाठी अक्षरशः उड्या पडलेल्या असायच्या. एप्रिल अखेर व मे महिन्याच्या सुरुवातील ​मुंबई, पुण्याहून गावाकडे व मे अखेरच्या आठवड्यात परतीचा प्रवास असा अनुभव एसटीने अनेक वर्षे घेतला आहे. त्यानुसार सुटीच्या दिवसातील नियोजन केले जाते. यावर्षीही कोल्हापूर आगारातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, अलिबाग अशा शहरांसाठी धावणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन केले. त्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. येताना व जाताना दोन्हीवेळेसाठी प्रवाशांना बस उपलब्ध व्हाव्यात हा हेतू होता. मात्र सुटीला येणाऱ्यांची त्यानुसार संख्या जाणवली नसल्याचे एसटीच्या सूत्रांचे मत आहे. कोल्हापूरकडे येताना नाही, किमान मुंबई, पुण्याकडे परत जाताना तरी ही संख्या वाढेल अशी अपेक्षा होती.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण वाढण्याचा अंदाज होता. मात्र आरक्षणाच्या संख्येत फार वाढ होताना दिसत नाही. हंगाम नसलेल्या कालावधीत दररोज २०० तिकीट आरक्षित होत असतात. सध्या हंगाम असूनही २२५ च्या आसपासच आरक्षण होत असल्याचे सूत्रांचे मत आहे. ही परिस्थिती गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षाही खालावलेली आहे.

यामुळे एसटी स्टँडवर मे महिना आहे असे जाणवत नसल्याचे कर्मचारी व अधिकारी सांगत आहेत. ३१ मे रोजी रविवार आहे. तसेच एक जूनपासून काही शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे या दिवशी स्टँडवर गर्दी होण्याची अपेक्षा आहे. दर शनिवारी, रविवारी नेहमीपेक्षा थोडी गर्दी जास्त असते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील शनिवार व रविवारी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलप्रश्नी अहवालानंतरच निर्णय

$
0
0

म. टा. प्रति​निधी, कोल्हापूर

राज्यातील १२ टोलनाके पूर्ण बंद आणि ५३ टोलनाक्यावर एसटी आणि हलक्या वाहनांची टोलमुक्ती देण्याची अधिसूचना शुक्रवारी राज्य सरकारने जाहीर केली. तथापी, कोल्हापूरच्या टोलप्रश्नावरील निर्णय रस्ते मूल्यांकन आल्यानंतर घेण्यात येणार आहे. सध्या रस्ते प्रकल्पाचा सर्व्हे आणि फेरमूल्यांकनाचे काम सुरू आहे.

दरम्यान, राज्यातील अन्य टोल नाक्यांबाबत एक भूमिका आणि कोल्हापूरविषयी दुटप्पी भू​मिका घेत असल्याची भावना टोलविरोधी कृती समितीने व्यक्त केली आहे. समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी आयआरबीमुक्त कोल्हापूर आणि टोलमुक्त कोल्हापूर ही कृती समितीची भूमिका आहे. आमचा लढा संपूर्ण टोलमुक्तीसाठी आहे. त्यापासून आम्ही तसूभरही मागे हटलेलो नाही, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉरेन्सिक लॅबला मुहूर्त मिळेना

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाचा भाग असलेल्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात सुरू करण्याबाबत मंत्र‌िमंडळाने घोषणा करूनही सात महिन्यापासून कोणतीही हालचाल झालेली नाही. नोव्हेंबर, २०१४ मध्ये भाजप सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले, मात्र, प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल न झाल्याने कोल्हापूर पोलिसांना पुणे व मुंबईची वारी चुकलेली नाही. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्या व गुंड लहू ढेकणे याने केलेल्या निर्घुण खून प्रकरणानंतर फॉरेन्सिक लॅबचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

दोन वर्षापूर्वी कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याची घोषणा तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. पण फॉरेन्सिक लॅब सुरू कोल्हापुरात करण्याचा निर्णय भाजपा सरकारने २७ नोव्हेंबर २०१४ बैठकीत घेण्यात आला. मंत्र‌िमंडळाच्या निर्णयानंतर लॅब उभारणीसाठी तातडीने हालचाल होईल, असे वाटत होती पण लॅब उभारणीसाठी जागा व निधीचीही तरतूद झालेली नाही. कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडे फॉरेन्सिक लॅबसाठी जागा नसल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे. पण जिल्हा प्रशासनाकडूनही जागा उपलब्ध करून दिली नसल्याने फॉरेन्सिक लॅबचा उभारणीचा पहिलाच मार्ग रखडला आहे. राजाराम महाविद्यालयाने फॉरेन्सिक लॅब त्यांच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्याची तयारी दर्शवली होती पण गृहखात्याकडून कॉलेजला प्रतिसाद मिळालेला नाही.

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना कोल्हापूर पोलिसांना मुंबई व पुण्यातील फॉरेन्सिक लॅबवर अवलंबून रहावे लागले. कोल्हापुरातील पोलिसांना मुंबई व पुण्यातील फॉरेन्सिक लॅबच्या वाऱ्या कराव्या लागल्या. या घटनेतील बॅलेस्टीक रिपोर्ट मिळवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांना एक महिन्याचा कालावधी लागला होता. गुंड लहू ढेकणे याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करताना सेंट्र‌िंग कर्मचाऱ्यांचा शीर व हात तोडून खून केला होता. मृत व्यक्ती व त्याच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुनेही पुण्यात पाठवण्यात आले आहेत. गुन्ह्याचा तपास व पुराव्याच्यादृष्टीने फॉरेन्सिक लॅब महत्त्वाचा असल्याने कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी राज्यकर्ते व प्रशासन पातळीवर संथगतीने प्रक्रिया सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २९ पोलिस ठाणी असून रोज फॉरेन्सिक लॅबला आठ ते दहा नमुने पाठवावे लागतात. महिन्याला ३०० ते ३२५ नमुने पाठवावे लागत. खुनाच्या गुन्ह्यात मृताचा रक्त, हत्यार आणि कपड्यावरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील मातीत पडलेले रक्ताचे नुमने तपासासाठी पाठवले जातात. बलात्काराच्या गुन्ह्यात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवरच अवलंबून रहावे लागते. रक्त व अन्य घटकाच्या तपासणीनंतर डीएनएवरून गुन्ह्याचा तपास केला जातो. अनोळखी व बेवारस व्यक्तीच्या मृत्यूचा शोधही डीएनवरूनच घेतला जातो. एखाद्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली असेल तर बॅलेस्टिक रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो.

हाताचे ठसे, हस्ताक्षराचे नमुनेही पाठवले जातात. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालावरून अहवाल न्यायालयात सर्वात सबळ पुरावा म्हणून ग्राह्य मानला जातो. फॉरेन्सिक लॅब सुरू झाल्यास पोलिसाचा वेळ, पैसा व श्रम वाचणार असून गुन्ह्याचा तपास वेगाने होण्यास होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, कोकणातील पोलिस ठाण्यांना कोल्हापुरात सुरू होणाऱ्या फॉरेन्सिक लॅबचा फायदा होऊ शकतो. तपासकामातही गती येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहारात आता दूधही

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

राज्यात दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे राज्य सरकारकडे सध्या दोन लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. या तयार दूध पावडरचा राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात आठवड्यातून एकदा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दूध देण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील पाच लाख शाळांतील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत आहे. यांअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, चटणी, तूरडाळ, मसूर डाळीसह नऊ प्रकारचे धान्य विभागून दिले जात होते. याचबरोबर आठवड्यातून एकदा पूरक आहारही दिला जात होता. यात आता दुधाचा समावेश करण्याचा प्रस्ताव दुग्ध विकास मंत्रालयाने तयार केला आहे.

राज्यात सर्वसाधारण एप्रिल ते जून महिन्यात दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते. मात्र २०१५ मध्ये दुधाचे विक्रमी उत्पादन झाल्याने दुधाची पावडर तयार करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारातही पावडरीचे दर घसरल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना देण्याचा मनोदय दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवला.

वित्त, शालेय शिक्षण, ग्रामविकास व दुग्धविकास विभागात चर्चा सुरू आहे. चारही विभागाचे एकमत झाल्यानंतर आणि वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर तसा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.

- एकनाथ खडसे, दुग्ध विकास मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१५ दिवसांत प्रभागरचना जाहीर

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी येत्या पंधरा दिवसात प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यासाठी लागणारा डाटा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला गुरुवारी पाठवला आहे. यावेळी ८१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रभाग आरक्षणाची आकडेवारीही निश्चित झाली असून, २२ प्रभाग मागासवर्गीयांसाठी असून त्यातील ११ प्रभाग या पंचवार्षिकसाठी आरक्षित असणार आहेत. येत्या १५ जूनपूर्वी प्रभागांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. हद्दवाढीच्या हालचाली सुरू असल्याने ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची चर्चा होती. मात्र ती शक्यता धूसर आहे. गेले काही दिवस महापालिकेत निवडणुकीची तयारी सुरू आहे. २०११ च्या जनगणेनुसार प्रगणक डाटा तयार करण्यात आला आहे. ते यापूर्वी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले होते. त्यात काही त्रुटी होत्या. त्या दुरूस्त करून अंतिम डाटा गुरुवारी पाठवण्यात आला आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्या​शिवाय निवडणूक प्रक्रियेला वेग येत नाही. आता मात्र आठ ते दहा दिवसांत प्रभाग जाहीर होण्याची शक्यता आहे. तशी प्रक्रिया सुरू झाली आहे. डाटा संगणकावर तयार असल्याने प्रक्रियेला गती येणार आहे.

१५ जूनपर्यंत प्रभाग जाहीर होतील. त्यानंतर आठ दिवस हरकती घेण्यासाठी मुदत असेल. जूनअखेर पर्यंत प्रभागांची अंतिम यादी जाहीर होईल. यावेळी चार प्रभाग वाढले आहेत. ८१ प्रभाग होणार असल्याने नगरसेवकांची संख्या चारने वाढणार आहे. ८१ मध्ये ११ प्र्रभाग मागासवर्गीय तर ३० इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असतील. प्रभाग आरक्षणाचीही आकडेवारीही निश्चित केली आहे. ती जूनमध्ये जाहीर होणार आहे. आरक्षण ​जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीत रंग भरणार आहे. यावेळी महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने ४० प्रभाग महिलांसाठी आरक्षित असतील. यामुळे महापालिकेत महिलाराज दिसणार आहे.

जूनमध्येच ड्रॉ काढणार

प्रभाग आरक्षण पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणते प्रभाग आरक्षण करायचे यासाठी जूनमध्येच ड्रॉ काढण्यात येणार आहे. सध्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या सर्वांचेच डोळे या ड्रॉकडे लागले आहेत. यावेळी प्रचाराला केवळ नऊ दिवस मिळणार असल्याने रणधुमाळी जूनपासून सुरू होणार आहे.

१५ जूनपर्यत प्रभाग निश्चिती

८१ एकूण प्रभाग संख्या

३० इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता प्रभाग

४० महिलासाठी आरक्षित प्रभागाची संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपी देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळात केली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत त्यातील एकही रुपया न दिल्याने सहकार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर ६ जून रोजी मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्यात येणार आहे' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताराबाई पार्कातील जिल्हा कार्यालयात मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. मोर्चा किंवा सभेला बंदी घातली तरीही आम्ही त्याच ताकदीने त्याला सामोरे जाऊ असे आव्हानही मुश्रीफ यांनी दिले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'सरकारने गेल्या दोन महिन्यांत शेतकऱ्यांना काहीही रक्कम दिलेली नाही. भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हा बँकही अडचणीत आली आहे. अनेक शेतकऱ्यांची गेल्या दोन महिन्यातील ऊस बिले थकली आहेत. ही थकबाकी सुमारे ८३३ कोटी रुपयांची आहे. राज्य रक्कम देत नाही आणि केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात काही कारखाने बंद पडण्याची शक्यता आहे. या मोर्चासाठी २० हजार शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सहकारमंत्र्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही. ६ जूनला संभाजीनगरातील मैलखड्डा परिसरातून हा मोर्चा निघणार आहे. दुपारी १२ वाजता तेथे सभा होईल. दुपारी दोन वाजता पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात या सरकारला फार निर्णय घेता आलेले नाहीत. त्यामुळे पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवराज्याभिषेद दिनाचा हा मोर्चा म्हणजे नवी सुरूवात असेल.'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल ए. वाय. पाटील, शहराध्यक्षपदी निवडीबद्दल राजेश लाटकर यांच्यासह मावळते जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, खासदार महाडिक, गोकुळचे नूनत संचालक विलास कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, राजेंद्र पाटील, बाबासाहेब पाटील, संतोष पाटील यांचाही सत्कार झाला.

'जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्नशील राहू' असे आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिले. शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी 'आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावून काम करू' असे स्पष्ट केले.

खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीसोबतच

'महानगरपालिकेची गेल्यावेळची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन लढविली आहे. भविष्यात ही निवडणूक आघाडी करून लढविली जाईल किंवा नाही हे सांगता येत नाही. मात्र, खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची असणार आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच रणनिती ठरविली जाईल' असेही यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वर्षभरात केंद्रात आणि राज्यातही सरकारकडून लोकांच्या हिताचे निर्णय झालेले नाहीत. सत्ता नसतानाही जिल्ह्यात आणि राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड कायम आहे. ती कायम राखू असे खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर माळवी निर्लज्ज, निगरगट्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पुरुषच निर्लज्ज व निगरगट्ट असतात असे समजत होतो. पण, महापौर माळवी यांच्या राजीनाम्याच्या प्रकरणानंतर काही महिलाही निर्लज्ज, निगरगट्ट असतात हे दिसून आले,' अशा कडवट शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर माळवी यांच्यावरील संताप व्यक्त केला. 'काँग्रेसला पुढचे महापौरपद न मिळाल्याबद्दलच्या आमच्या चुकीची नक्कीच भरपाई करू', असे जाहीर आश्वासनही त्यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांना दिले. केएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ११ बसचा लोकार्पण सोहळा शनिवारी भवानी मंडपात झाला. त्यावेळी महापौर तृप्ती माळवी वगळता सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मुश्रीफ यांनी आजवर जाहीर कार्यक्रमांमध्ये महापौरांच्या राजीनाम्याबाबत वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर असलेल्या माळवी यांनी सतरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप झाला होता. त्यांच्या खासगी स्वीय सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली होती. त्यानंतर माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. मात्र, ठरलेल्या मुदतीत राजीनामा देण्यासाठी राज्य स्तरावरील नेत्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. स्थानिक पातळीवर मुश्रीफ यांनीही यासाठी बरेच प्रयत्न केले. नंतर कायदेशीर लढाईचे आदेश दिल्याने माळवी यांना पदावरून हटविण्यासाठीचा ठराव करण्यापासून ते तो राज्य सरकारपर्यंत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

केएमटीच्या कार्यक्रात मुश्रीफ यांनी केलेल्या कामांसह काही चुकांची जाहीर कबुलीही दिली. ते म्हणाले, 'अवधूत माळवी या कार्यकर्त्याचा खून झाल्यानंतर निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी तृप्ती यांना नगरसेवक केले. पद देतो असा त्यांना शब्द देऊन महापौरही केले. मात्र, त्या लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीत प्रत्येकी एक वर्ष महापौरपदाच्या समझोत्याप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची मुदत आली. त्यावेळी काही महिलाही निर्लज्ज, निगरगट्ट असतात ​हे दिसून आले. या प्रकारातून मात्र मुश्रीफ व राष्ट्रवादीने फसवणूक केल्याचा संदेश गेला. याबाबत आमच्याकडून चूक झाली. त्याची आम्ही निश्चित भरपाई करू', असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी-जनसुराज्य एकत्र लढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती एकत्र लढविणार आहेत. जागावाटपाबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या संचालकांना निवडणुकीत संधी न देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मतैक्य झाले. काँग्रेससोबत अद्याप चर्चा झाली नसली तरी, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा होऊ शकते, असे संकेतही मुश्रीफ यांनी दिले. बाजार समितीच्या संचालकांच्या १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेने समविचारी पक्षांशी चर्चा करून, तर भाजपने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

करवीरमध्ये आघाडी?

आघाडी करण्याबाबत काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, करवीर तालुका सोडून इतर साडेपाच तालुक्यांतील चेहऱ्यांची चाचपणी करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी ए. वाय. पाटील व के. पी. पाटील यांना दिल्या. यामुळे करवीर तालुक्यात काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांसाठी ‘रेड कार्पेट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निधी वापरासाठी ग्रामीण भागाला प्राधान्य, आरक्षणाची भीती नको, घरफाळा व जाचक अटी दूर करू, अशी आश्वासनांची खैरात महापालिकेने शनिवारी हद्दवाढीतील प्रस्तावित गावांच्या प्रतिनिधींवर केली. ग्रामीण भागातून होणारा विरोध निवळण्यासाठी महापालिकेने या गावांना 'रेड कार्पेट' अंथरल्याचे या निमित्ताने दिसून आले.

हद्दवाढीसाठी महापालिकच्या हद्दीबाहेरील एक किलोमीटरच्या अंतरातील २० गावांचा प्रस्ताव महापालिका तयार करीत आहे. त्याबाबत या गावांतील लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेण्यासाठी स्थायी समितीच्या सभागृहात बैठक आयोजिण्यात आली होती. यावेळी महापौर तृप्ती माळवी, आमदार चंद्रदीप नरके, आयुक्त ​पी. शिवशंकर, स्थायी समितीचे सभापती आदिल फरास, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजू लाटकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला हद्दवाढीच्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांपुढे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले. शहराच्या हद्दवाढीबाबत सध्या नकारात्मकच विचार केला जातो; पण त्याचा सकारात्मकही विचार करा. जो निधी येईल त्याचा वापर प्रथम नवीन भागासाठीच व नंतर शहरासाठी केला जाईल. अपेक्षित विकास आराखडा दिल्यास तो स्वीकारून त्याप्रमाणे कामकाज करू. शेती, रिकाम्या जागांवर आरक्षण टाकण्याची भीती बाळगू नका. घरफाळा व जाचक अटी दूर करू, अशी आश्वासने महापालिकेच्या वतीने देण्यात आली. सर्वच लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीला विरोध केला.

पाच जूनला विशेष सभा

एक किलोमीटरच्या आतील गावांचा हद्दवाढीसाठी प्रस्ताव देण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी पाच जूनला महापालिकेची विशेष सभा आयोजित केली आहे. त्यानंतर या सभेतील मंजूर ठराव राज्य सरकारकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी महापालिकेची यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.

ही बैठक अंतिम नव्हे. चर्चा करून निर्णय घेऊ. शहर व ग्रामीण भाग असे वेगळे न समजता आपल्या भागाचा विकास कसा होईल याचा विचार करण्याची गरज आहे.

- आदिल फरास, स्थायी समितीचे सभापती

शहर वाढले तर आपोआपच आजूबाजूच्या परिसराच्या विकासालाही गती येते. शहराचा विकास न झाल्यास आसपासचा ग्रामीण भागही मागास राहतो.

- राजू लाटकर, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

विकास योजनांसाठी लोकसंख्येची अट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने एकतर्फी निर्णय घेऊ नये. गावात कोणता विकास करणार ते ग्रामसभांत येऊन सांगावे.

- चंद्रदीप नरके, आमदार, करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीची रोजच वाट बघतोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारमधील अच्छे दिन आणणाऱ्यांचे सरकार शहरातंर्गत वाहतुकीचेही खासगीकरण करणार आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या केएमटीसाठी हा मोठा धोका आहे. तो टाळण्यासाठी शहरवासियांना तत्पर व चांगली देण्याची जबाबदारी केएमटीवर आहे', असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. 'दररोज सकाळी आम्ही टोलमुक्ती केव्हा होणार याची वाट पाहतोय' असा टोलाही राज्य सरकारला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत मंजूर ४४ कोटी रुपयांच्या निधीमधून १०४ बस केएमटीमध्ये दाखल होणार आहेत. त्यापैकी ११ बसचे शनिवारी लोकार्पण झाले. भवानी मंडपात माजी मंत्री पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालेल्या सोहळ्यात केएमटीच्या १९२ कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे पत्रेही देण्यात आली.

'निवडणुकीपूर्वी १०४ बसला मिळालेल्या मंजुरीतील उर्वरित बसही येत्या तीन महिन्यात उपलब्ध करून देऊ', असे सांगत पाटील म्हणाले, 'एखादा बसचा मार्ग सुरू केल्यानंतर प्रवाशांच्या तक्रारी येतात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रथम लोकांना विचारात घ्या. शहर परिसरात उपनगरांची संख्या वाढत आहे. बस घेतानाच लहान रस्त्यावरही त्या धावतील याचा विचार केला आहे. जिथे उपनगरांमध्ये बस वळविण्याइतकी जागा असेल, तिथे बस पोहोचवून प्रवाशांना सेवा द्या. कर्मचाऱ्यांची कोणतीही देणी ठेऊ नये. नवीन बस असल्याने देखभाल खर्च कमी करून कर्मचाऱ्यांनी जादा सेवा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत.'

हसन मुश्रीफ म्हणाले, 'नवीन सर्व बस दाखल झाल्यानंतर डिझेलची मोठी बचत होईल. या बचतीच्या रकमेतून कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाचा लाभ द्यावा. तसेच त्यांची सर्व देणी भागवून टाकावी. सतेज पाटील यांच्याशी माझे काही मतभेद असतील. वेगवेगळ्या व्यासपीठावर आम्ही दिसत असतो. मात्र शहर पहिल्या क्रमांकावर यावे यासाठी दोघांचे नेहमीच प्रयत्न केले. पक्षीय पातळीवर निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळालेल्या सत्तेचा वापर आरक्षण उठवणे, टीडीआरसाठी किंवा कोणत्याही टेंडर मंजुरीसाठी फोन असा केला नाही. सर्वात आदर्श कारभार अशी या कारभाराची नोंद होईल.'

यावेळी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आर. के.पोवार, उपमहापौर मोहन गोंजारे, परिवहन सभापती अजित पोवार, स्थायी आदिल फरास, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, मधुकर रामाणे, उपायुक्त अश्विनी वाघमळे तसेच परिवहन समिती सदस्य उपस्थित होते.

आता निधी मिळालाय का ? हे पहा

सतेज पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा समाचार घेतला. 'आम्ही महापालिकेला एक हजार कोटींचा निधी दिला. पण नवीन सरकार केंद्रात व राज्यातही आल्यानंतर आतापर्यंत काही निधी मिळाला का? टोलमुक्तीचे आश्वासन दिले आहे. पण कोल्हापूर टोलमुक्त केव्हा होणार याची आम्ही दररोज सकाळी वाट बघतोय. महापालिकेत कोणतेही काम असले तरी यापूर्वी आंदोलन केले जायचे. त्यामुळे टेंडर कुणी भरत नसल्याची स्थिती होती. आता आंदोलन करणारेच सत्तेत असल्याने आंदोलने होणार नाही. टेंडरही भरून कामे सुरू होतील,' असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामान बदलाचा द्राक्षशेतीला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तापमानात झालेली प्रचंड वाढ, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा दणका आणि द्राक्षांवर रासायानिक औषधांची फवारणी करण्यात घालण्यात आलेला प्रतिबंध आदी विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातून परदेशात होत असलेल्या द्राक्ष निर्यातीमध्ये वर्षाला सुमारे १५ कोटींची घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील द्राक्षबागांना बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांनी युरोपची बाजारपेठ गेल्या अनेक वर्षांपासून काबीज केली आहे. सोलापुरातील द्राक्षांना नाशिकच्या द्राक्षांपेक्षाही अधिक मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी सोलापुरातून वर्षांला सुमारे १२५ कंटेनर द्राक्षांची परदेशात निर्यात होत होती. ती संख्या आता केवळ १५वर येऊन ठेपली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नान्नज, कनबस, आहेरवाडी, कुमठे, बोरामणी, मुस्ती, हिंगणे तसेच पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. थॉमसन, सोनाका, सुपर सोनाका, नानासाहेब सिडलेस, शरद सिडलेस, सरिता सिडलेस तसेच मणिकचमन आणि २ ए क्लो आदी जातींच्या द्राक्षांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. परंतु, गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस धुडगूस घालत असल्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. परिणामी बहुतांश द्राक्ष उत्पादक बेदाण्याकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालल्यामुळे त्याचा थेट परिणाम निर्यातक्षम द्राक्षांवर होऊ लागल्यामुळे द्राक्ष बागायतदार पुरता संकटात सापडला आहे. शिवाय काही तालुक्यांमध्ये पाण्याचीही टंचाई जाणवू लागल्यामुळे दुसऱ्या संकटालासुद्धा बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यातील द्राक्षबागा संपुष्टात येण्याची भिती आहे.

- डॉ. चनगोंडा हविनाळे, अध्यक्ष जिल्हा द्राक्ष बागायतदार संघ, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

राज्यात मागील दहा वर्षांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दरवर्षी सुमारे साडेपाच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातही सुमारे साडेतीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मंत्री दिलीप कांबळे यांची मिरजेतील सरकारी विश्रामगृहात आमदार सुरेख खाडे, सुधीर गाडगीळ, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या वेळी मंत्री कांबळे यांनी शिष्यवृत्तीमधील भ्रष्टाचाराबाबतच गौप्यस्फोट केला. मागील दहा वर्षांच्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची शिक्षण सम्राटांकडून लूट करण्यात आली असून, दरवर्षी सुमारे सोडपाच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातही साडेतीनशे कोटींचा भ्रष्टाचाराचा झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच यापुढे वैयक्तीक लाभार्थ्यांना कर्जे देण्यात येतील. सहकारी संस्थांना महामंडळाकडून कर्ज देणे बंद करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत प्रसूत‌िगृहाचा अनागोंदी कारभार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या कारभाराच्या चिंध्या झाल्याचा प्रत्यय आणून देणारे उदाहरण रविवारी समोर आले. महापालिकेच्या प्रसूत‌िगृहात आलेल्या महिलेला सिव्हिलचा रस्ता दाखविला. संबधित महिला रिक्षा करून सिव्हिलपर्यंत पोहचली. पण, हॉस्पिटलच्या दारातच प्रसूत झाली. 'तीही नॉर्मल' नॉर्मल डिलव्हरी होणाऱ्या गर्भवतींची जबाबदारीही प्रसूतीगृह घेणार नसेल, तर अशा प्रसूतीगृहांची गरड काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या प्रसृतीगृहात एकाला तीन डॉक्टर आणि आवश्यक त्या सुविधांसह कर्मचारी वर्ग दिलेला आहे. एकेकाळी या प्रसूतीगृहाच्या कार्यपद्धीतीबाबत वाहवा होत होती. पण, अलीकडे तेथे जाणाऱ्या शंभर गर्भवतींपैकी ९९ जणींना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्येच धाडले जाते. अनेकवेळा महापालिकेची रग्णवाहिका सायरन लावूनच सिव्हिलमध्ये दाखल होते. एखाद्या महिलेची प्रसूती गुंतागुंतीची असेल तर सिव्हिलचा आधार घ्यायला हरकत नाही. परंतु, केवळ जबाबदारी टाळण्यासाठी किंवा कामचुकारपणा करायचा म्हणून असे केले जात असेल, तर ते खूपच गंभीर आहे. रविवारी अशीच अवघडलेली गरीब महिला प्रसूती वेदना सहन करीत प्रसूतीगृहात आली. पण, तेथील डॉक्टरांनी तिला सिव्हिलला जाण्यासाठी सांगितले. प्रसूतीगृहात आलेल्या आणि अवघडलेल्या महिलेची आवस्था लक्षात घेऊन किमान तिला रुग्णवाहिकेची तरी सेवा द्यायला हवी होती. पण, तसे झाले नाही. अवघडलेल्या महिलने खासगी रिक्षा करून सिव्हिलपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. सिव्हिलच्या दारात पोहचली आणि ती प्रसूत झाली. त्यानंतर सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. त्या महिलेची डिलव्हरी अगदी नॉर्मल होती. म्हणून सर्वकाही सुरळीत पार पडले. अन्यथा तिला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असते, कोण जाणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीची शाळा पाडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

मिरज तालुक्यातील इनामधामणीतील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा रविवारी जेसीबीच्या सहाय्याने पाडली जात असल्याचे पाहूण गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. दोन भिंती पडत असल्याचे पाहून महिलांनी आरडाओरडा केला. गावकरी धावले आणि त्यांनी क्रमांक नसलेल्या जेसीबीसह चालकाला सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. एका गाव पुढाऱ्याने ती जागा हडपण्यासाठीच सुट्टीचा दिवस गाठून शाळा पाडण्याचा घाट घातला होता, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

इनामधामणी सुमारे अडतीस गुंठ्यांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतची मुलींची शाळा आहे. पटसंख्याही उत्तम आहे. पण, त्या सरकारी जागेवर डोळा ठेवून काहींनी शाळेची इमारत धोकादायक असल्याचे अहवाल धाडून सुरुवातीला शाळा पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने संबधित इमारत सुस्थितीत असल्याचे सांगून तो अहवाल फेटाळला.

त्यानंतर काही महिन्यांपूर्वी एक जेसीबी येवून शाळेची एक खोली पाडण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी त्याला 'शाळा पाडण्याचे लेखी दाखव आणि मग शाळा पाड,' असे बजावताच तो निघून गेला. रविवारी पुन्हा एक जेसीबी आला आणि सरळ शाळेच्या भिंतीवर घाव घालू लागला. त्यावेळी शेजारच्या महिलांनी आरडाओरडा केला. गावकरी धावत आल्यानंतर शाळा पाडली जात असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी एकी करून 'शाळा पाडली तर आमच्या मुलीबाळी कुठं शिक्षण घेणार, असा जाब विचारून त्या जेसीबी चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. एखादी सरकारी इमारत कोणी यावे आणि पाडून जावे. असे, कसे होऊ शकते. याचा जाब संबधित प्रशासनाला विचारणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४ कोटींचे भाडे ‘भारती’ने थकविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीतील चावडीची सरकारी जागा शैक्षणिक उपक्रमासाठी देताना घातलेल्या आटींचा भारती विद्यापीठाने भंग केला आहे. सुमारे चार कोटी रुपयांचे भाडे थकविले आहे. अशा प्रकारे सरकारची फसवणूक करणाऱ्या भारती विद्यापीठाकडून चक्रवाढ व्याजाने भाडे वसूल करून संबधित जागा परत घ्यावी, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केली.

जगताप म्हणाले, 'सांगलीत मध्यवर्ती ठिकाणी असलेली सुमारे अर्धा एकर मोक्याची जागा भारती विद्यापीठाने शैक्षणिक कारण पुढे करून १९८३मध्ये घेतली आहे. त्या ठिकाणी चावडीच्या दोन खोल्या आणि सर्कल ऑफीसच्या दोन अशा चार खोल्या होत्या. अटीनुसार बांधकाम केलेली सुमारे ३७१ चौरसमीटरची जागा सरकारच्या ताब्यात देणे बंधनकारक होते. पण, अद्यापही या अटीची पूर्तता झालेली नाही. १९८९मध्ये इमारतीचा काही भाग वाणिज्य वापरासाठी देण्याची परवानगी घेण्यात आली. परंतु, त्यामध्ये केवळ शैक्षणिक उपक्रम राबविण्याचीच अट होती. विद्यापीठाने ही अट धुडकावून लावत तेथे भारती बँक आणि भारती बझार सुरू केला आहे. २०००सालापर्यचे चौदा लाखांचे भाडे थकीत आहे. भाडे भरण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा नोटीस बजावल्यानंतरही भाडे भरले गेले नाही. शिवाय गेल्या पंधरा वर्षांतील आणि त्यावरील व्याज असे सुमारे चार कोटी रुपयांचे भाडे थकीत आहे. या संदर्भात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बी. डी. बुकटे गेली अनेक वर्षे

सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यांना दाद दिली जात नाही. अशा प्रकारे सरकारलाच तंगविणाऱ्या भारती विद्यापीठाकडील सरकारी जागा सरकारने त्वरीत काढून घ्यावी, अशी आपली मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीराव नाईकांना मंत्रिपद?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा जून महिन्यामध्ये विस्तार होणार असल्याचे निश्चित आहे. मंत्रिपदाच्या बाबतीत अनुशेषाच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्याला शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या रुपाने मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ज्येष्ठ, संयमी आणि युतीच्या काळात राज्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा अनुभव या नाईक यांच्या जमेच्या बाजू आहेत.

राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेना युती सरकारचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची किंवा युतीची, आघाडीची असो मंत्रिमंडळात सांगलीचे स्थान निश्चित असायचे. अगदी १९९५च्या युतीच्या काळातही जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे होती. वास्तविक त्यावेळी भाजपचा किंवा सेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता. अपक्ष मात्र, युतीच्या पाठिशी होते. सांगलीने लोकसभा निवडणुकीत भाजपला एक खासदार आणि विधानसभा निवडणुकीने चार आमदार दिले आहेत. सेनेने एका आमदाराच्या माध्यमातून आपले खाते उघडले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेच्या वेळीच सांगली जिल्ह्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगलीला मंत्रिपद दिले जाईल, असे भाकीत भाजपनेते गेले सहा महिने करत आहेत. आता मात्र येत्या जूनमध्ये त्यांचे भाकीत खरे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषदेचे सभापती या नात्याने ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या रुपाने जिल्ह्याकडे उरला सुरला एक लाल दिवा होता. तोही राष्ट्रवादीने काढून घेऊन साताऱ्याला दिला. जिल्ह्यातला मंत्रीच नसल्याने पालकमंत्रीही प्रभारीच आहेत. त्यामुळे गारपीठ, अवकाळी, वादळी पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा देणारा हक्काचा मंत्रीच या जिल्ह्याला नाही. मंत्री नाही म्हटले की, अधिकारीही तिकडे फिरकत नाहीत. त्यांच्या सोयीनुसार पंचनामे आणि फुरसतीनुसार भरपाईचे प्रस्ताव, असे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी किमान पालकमंत्री तरी हक्काचा पाहिजे. ही उणीव आमदार शिवाजीराव नाईक यांच्या रुपाने भरून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वाभिमानी, आमदार खाडेंचे काय?

शिवाजीराव नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास मंत्रिपदावर डोळा ठेवून अधून-मधून ईशारे देणाऱ्या स्वाभिमानीच्या नेत्यांचे काय होणार? असा प्र्शन उपस्थित होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येताना आपल्यामुळे येथे भाजप वाढल्याचा दावा करीत आमदार सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. पक्ष खाडे यांच्या मागणीला कसा प्रतिसाद देतो याकडेही जाणकारांचे लक्ष्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images