Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘काळू-बाळू’ तमाशाला अनुदान नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानापासून प्रसिद्ध काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाला डावलले आहे. अनुदानाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या तमाशाला डावलून आमच्यावर अन्याय केला आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा जोपासत आमची पाचवी पिढी कार्यरत असलेल्या या तमाशाला न्याय द्यावा, अशी मागणी तमाशा मंडळाचे व्यवस्थापक संपत खाडे आणि सुनील खाडे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली.

राज्य सरकारने तमाशा या लोककलेची परंपरा जोपासणाऱ्या मंडळांना तीन वर्षांतून एकदा भरीव अनुदान देण्यात येते. २००९मध्ये एकदा अनुदान मिळाले. त्यानंतर यावर्षी प्रथमच अनुदानाची यादी निश्चित करण्यात आली आहे. २५ मे रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अनुदानाचे वाटप होणार आहे. परंतु, त्या यादीत काळू-बाळू तमाशाला स्थान नाही. पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव मोठा आणि देशात प्रसिद्ध असलेल्या या तमाशाला डावलण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील सर्वच तमाशांना यादीवर घेण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकाही तमाशा मंडळाला स्थान नाही, याचा अर्थ आम्ही कलाकारांनी काय घ्यावा? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सरकारने सुचविलेला कोणताही कार्यक्रम आजपर्यंत आम्ही चुकविलेला नाही. लाख दोन लाखांची कमाई बुडवून आम्ही सरकार सांगेल तिकडे धावत जावून कार्यक्रम केले आहेत. नुकत्याच झालेल्या वाशी येथील महोत्सवातही आम्ही हजेरी लावलेली आहे. त्या अगोदर परराज्यातले अनेक सरकारी कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. दिल्ली नाट्य अकादमी, सरकारचा जीवनगौरव पुरस्कार, असे अनेक सरकारी सन्मान आम्हाला दिले गेलेत. मग अनुदानाच्या यादीपासूनच आम्हाला वंचित ठेवले गेले आहे? आताच आम्हाला पैशाची गरज असते. शंभर कलाकार आणि सहा गाड्यांचा हा कलारुपी संसार सांभाळून लोककलेची परंपरा जोपासताना आम्हाला अर्थिक संकटाचा सामना सतत करावा लागतो आहे. या सरकारी अनुदानाने आम्हाला नक्कीच आधार मिळाला असता. पण, सांस्कृतिक कार्यसंचालनालयातील काही अधिकाऱ्यांमुळेच आमच्यावर अन्याय होत असावा, अशी शंकाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

सध्या या तमाशात काळू-बाळूंचे नातू सुरज अरुण खाडे (काळू) आणि निलेश संभाजी खाडे (बाळू) हे त्यांच्या भूमिका आजरामर करीत आहेत. पत्रकार बैठकीस अरुण लहू खाडे, सुनिल लहू खाडे, कुंदन अंकुश खाडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तेचे सेवक बना!: फडणवीस

$
0
0


मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

'काँग्रेसनं सत्तेचे सेवक नव्हे, दलाल तयार केले. पण, आपल्याला सत्तेचं सेवक बनून काम करायचं आहे. सत्ता आली म्हणून आपली जबाबदारी संपलेली नाही, उलट वाढलेली आहे. सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा,' असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.

कोल्हापूर येथे झालेल्या राज्य भाजपच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज समारोप झाला. समारोपाच्या भाषणात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या कारभारावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या वाईट परिस्थितीला काँग्रेसचं सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. 'राज्यातील सरकार मजबूत असून शाहू, फुले व आंबेडकरांचा वारसा पुढं नेण्याचं काम करत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून सरकारनं केलेल्या कामाची माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवावी,' अशी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत उभारणार म्युझिकल पार्क

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

तंतुवाद्यांसाठी जगभरात नावलौक‌िक असलेल्या मिरजेत तंतूवाद्य निर्मिती उद्योग विकस‌ित होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंहामंडळ व सरकारच्या विविध विभागांच्या समन्वयातून येथे क्लस्टर उद्योग उभारण्यात येणार आहे. शनिवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मिरजेतील प्रमुख तंतुवांद्य निर्माते व विक्रेत्यांची भेट घेऊन या बाबत चर्चा केली.

उद्योगाच्या उभारणीसाठी सरकारच्या पाच एकर जागेवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंतचे अनुदानही मिळणार आहे. आयटी पार्कप्रमाणे मिरजेत म्युझिकल पार्क उभारावा, अशी मागणीही येथील तंतूवाद्य निर्माते व विक्रेत्यांनी या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. तंतूवाद्य निर्मिती, संगीत परंपरा व मिरासाहेब दर्ग्यातील संगीत सभेमुळे मिरजेचा जगभरात नावलौकीक आहे. मिरजेतील तंतुवाद्य निर्माते सतारमेकर बांधवांचा मोठ्या प्रमाणातील रोजगारही या तंतूवाद्य निर्मितीच्या उद्योगावर अवलंबून आहे. येथील तंतूवाद्य निर्मितीला सरकारने चालना देण्याची या सतारमेकर बांधवांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेतील तंतूवाद्य निर्मात्यांना दिलासा देणारी योजना सरकारकडून आखण्यात आली आहे.

लघु उद्योग विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग, अशा विविध विभागांच्या समन्वयातून हा उद्योग उभा राहणार आहे. विशिष्ट उद्योग करणाऱ्या उद्योजकांना एकत्र करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची अशी ही क्लस्टर उद्योग योजना आहे. मिरजेतील तंतूवाद्य निर्मितीची यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी जागा उपलब्ध करून देऊन तेथे दुकाने व कारखान्यासाठी इमारत बांधून देण्यात येणार आहे. तसेच उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी वेळोवेळी विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांना निमंत्रित करणे आदी उपक्रम या योजनंतर्गत हाती घेण्यात येतात.

पाच कोटींची मदत

या उद्योगासाठी राज्य सरकारकडून सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या व शेकडो लोकांच्या रोजगाराचे साधन असलेल्या तंतुवाद्य निर्मितीसाठी येथे क्लस्टर उद्योग उभारल्यास या उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० वर्षांचा रस्ता गायब; ‘महसूल’चा कारभार

$
0
0

साताराः महागावपासून तुकाई पालखी मार्गाकडे जाणारा १५० वर्षांहून अधिककाळ नकाशावर असलेला रस्ता महसूल खात्याने गायब केला आहे. हा रस्ता विकासकाच्या ताब्यात गेला आहे. तिथे त्याने प्लॉटिंग केले आहे. विशेष म्हणजे तो प्लॉट एन. ए. झाला आहे. विकासकाने रस्त्याच्या मध्येच भिंत घातली असल्याने गावकऱ्यांचा तुकाई पालखी मार्ग बंद झाला आहे. सहा महिन्यांपासून महागाव ग्रामस्थ या बाबत दाद मागत आहेत. परंतु, प्रांताधिकारी, तहसीलदार यापैकी कोणीच दाद देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महागावपासून तुकाई पालखी मार्गाकडे जाण्याचा साडे तीन किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता १८५९पासून असून तो नकाशावरही आहे. हा रस्ता व्हावा यासाठी ग्रामस्थांनी आपआपसातील वाद सामजस्यांना मिटवले होते. काही दिवसांपूर्वी एका विकासकाने रस्त्याच्या शेजारील प्लॉट खरेदी केला. त्यानंतर महसूल खात्याच्या मदतीने त्याने प्लॉट एन. ए. करुन घेतला. या खात्यातील काही कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे १५० वर्षांपासून असलेला रस्ताही त्या प्लॉटमध्ये गेला. विकासकाने प्लॉटिंग करून भिंत बांधली. ग्रामस्थ हा रस्ता खुला करून द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत. या प्रकरणी महसूल खाते काय करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेंना पुरस्कार देऊन पानसरेंचा दुसरा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास कॉ. गोविंद पानसरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. असता त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. परिणामी महाराष्ट्रातील जनतेने कॉ. गोविंद पानसरे यांनी मांडलेला शिवाजी गावोगावी पोहोचवण्याची सुरुवात केली. हे राज्यकर्त्यांना सहन झाले नाही. म्हणून सध्याच्या राज्यकर्त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी शोधले नाहीत उलट त्यांचे विचार गावागावांत जाऊ नयेत म्हणून छत्रपती शिवरायांचा विकृत इतिहास सांगणाऱ्या ब. मो. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर करून गोविंद पानसरे यांचा दुसरा वैचारिक खूनच केला आहे, असा आरोप कॉ. धनाजी गुरव यांनी केला आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सातारा येथे झाली. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सचिव गौतम कांबळे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव गुरव, उपाध्यक्ष, विजय मांडके, कार्यकारीणी सदस्य प्रा. सुधीर अनावले (लातूर), प्रा. नामदेव करगणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी

$
0
0

सांगलीः जिल्ह्यात रिक्षा आणि जीपद्वारे सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, 'नो पार्किंग झोन' ची कडक अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली. जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूक कमालीची वाढली आहे. त्याविरुद्ध ताबडतोबीने कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. या बेकायदा वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी पोलिस यंत्रणेतर्फे कडक पावले उचलावीत, अशी मागणीही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांवर कारवाईची मागणी

$
0
0

कराडः कराड तालुक्यातील वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू असलेल्या विकासकामांची ठेकेदारांकडून गुणवत्ता राहत नसल्यामुळे कामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत. ठेकेदार अधिकाऱ्यांचे मालक बनल्याचे चित्र असल्यामुळे सरकारच्या निधीचा योग्य विनियोग होत नाही, त्यामुळे बेजबाबदार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, असे विविध ठराव कराड पंचायत समितीने केले. पंचायत समितीमध्ये सुमारे १२ वर्षांनंतर आमसभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण होते.

उपजिल्हा हॉस्पिटलला सरकारने कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री देवूनही ती अधिकाऱ्यांविना धुळखात पडली आहे. उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांकडून पेशंटची पिळवणूक होत आहे. शवविच्छेदन डॉक्टर नव्हे तर स्वीपर करीत आहेत. हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम खात्यावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागाने दुष्काळमुक्ती साधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'लोकसहभागातून जाखणगावाने क्रांतीकारक पाऊल टाकून दुष्काळावर मात केली आहे. राज्यातील अन्य गावांनीही त्याचा आदर्श घेत पथदर्शी प्रकल्प म्हणून स्वत:च्या गावात राबवावा आणि दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करावी,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाखणगांव येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खटाव तालुक्यातील जाखणगांव येथे भेट देऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावाने लोकसहभागातून केलेल्या कामांची पहाणी केली. पाझर तलावाचे गाळ काढणे, कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेला सिमेंट बंधारा आणि लोकसहभागातून ग्रामस्थांनी जाणखगाव पॅटर्न म्हणून उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, 'जलयुक्त शिवार अभियान हे विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याचे अभियान असून, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी उचलण्यात आलेले क्रांतिकारी पाऊल आहे. हे अभियान केवळ सरकारचे नसून जनतेचे, गावाचे आहे. ज्या प्रमाणे जाखणगाव ग्रामस्थांनी लोकसहभागातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि प्रभाविपणे हे अभियान राबविले. त्याप्रमाणे राज्यातील इतर गावांनीही याचा आदर्श घेत पथदर्शी योजनेप्रमाणे जलसंधारणाचे काम करावे. गावामध्ये बागायती शेती करता आली पाहिजे. गावामध्ये पडणारा पाऊस आपल्या मालकीचा, हक्काचा आणि आपणच वापरला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वजण मिळून एक लोक चळवळ उभारुन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एफआरपी द्यायला हवी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

एफआरपी द्यायला हवी, हीच आपली भूमिका आहे. मात्र, केंद्र सरकारला साखरेचा दर ३१००पर्यंत ठेवण्यात अपयशी ठरल्याने शेतकरी, साखर उद्योग अडचणीत आला आहे. राज्य सरकारने कर्ज काढून साखर कारखान्यांना एफआरपीमधील तफावत दूर करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दयावे, अशी गटनेता म्हणून मी विधानसभेत मागणी लावून धरली आहे. राज्य सरकारने प्रतिटन २०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. अजून ते पैसे दिलेले नाहीत. जुलैच्या अधिवेशनापूर्वी ते निश्चितपणे हे पैसे देतील, असे जयंत पाटील म्हणाले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सत्ताधारी राजारामबापू सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ काळामवाडी येथे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील पुढे म्हणाले, 'सभासदांच्या घरा-घरापर्यंत पोहचा. आपल्या पारदर्शी, स्वच्छ व प्रगतीशील कारभारास सभासदांनी नेहमीच आशिर्वाद दिला आहे. याही निवडणुकीत सभासद मोठ्या मताधिक्याने आपले पॅनेल विजयी करतील.'

राजारामबापू दूध संघाची निवडणूक बिनविरोध

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. १८ जणांच्या संचालक मंडळात नवीन ७ चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विजयी उमेदवारांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येवून आमदार जयंत पाटील यांच्या समवेत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळीही दूध संघाने बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकार उद्योगपतींचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

प्रचंड बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेल्या भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या. मात्र, एका वर्षातच जनतेचा या सरकारबद्दल भ्रमनिरस झाला आहे. हे सरकार शेतकरी आणि उपेक्षितांकडे दुर्लक्ष करीत असून, केवळ उद्योगपतींचेच प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या अयशस्वी कारभाराबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, 'पंतप्रधान बनल्यापासून मोदी यांनी फक्त परराष्ट्र मंत्रालयालाच अधिक प्राधान्य दिले आहे. परराष्ट्र धोरणाची सर्व सूत्रे आपल्याच हाती ठेवून मोदींनी त्या खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांना दुर्लक्षीत केले आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यामधून काहीच साध्य होताना दिसत नाही.

कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जाण्याअगोदर खूप अगोदरपासून नियोजन करावे लागते. परदेश दौरा म्हणजे केवळ हस्तांदोलन आणि बुके घेणे नसते. मोदी संपूर्णपणे एकाधिकारशाहीने काम करीत असून, मंत्र्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. सहकार्यांचे त्यांच्याकडून खच्चीकरण सुरू असून त्यांनी गुजरातमध्येही याच प्रकारे पंधरा वर्षे सरकार चालवले होते.'

योजनांची अंमलबजावणी नाही

स्वच्छता अभियान, जनधन योजना, स्मार्ट सिटी, गंगा शुद्धीकरण योजना चांगल्या असल्या तरी त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात नाही. भाजप सरकार आपल्या काही नेत्यांच्या तोंडून हिंदुत्वाचा छुपा अजेंडा पुढे आणत आहे. अल्पसंख्यांक समाजाला भिती दाखवण्याचे काम केले जात आहे. गोमांसबंदीच्या कायद्यामुळे अनेक लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मापात पाप होताना गप्प का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तालुक्यातील कृषी विभागामार्फत करण्यात येणारी शेतकऱ्यांच्या बंडींगची कामाचे माप वेगळे आणि काम कमी असते. शेतकऱ्यांच्याच तशा तक्रारी आहेत. ज्या मापाने शेतजमिनीत खोदाई करण्यासाठी डोझर वापरला जातो, ते त्या मापात कामे करीतच नाही. शेतजमिनीचे बांध आणि कडेकपा-यातील बरेचसे काम ठेवले जाते. पण पैसे मात्र न झालेल्या कामाची मापे दाखवून अदा होतात. अशावेळी कृषी विभागाचे संबंधित काय करतात, असा सवाल आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी केला. सभापती विष्णू केसरकर अध्यक्षस्थानी होते.

तालुक्यातील लांब पल्ल्याचे उत्तूर-गारगोटी व आजरा संकेश्वर असे दोन राज्यमार्ग बाजूपट्ट्या व रस्तारूंदीकरणाचे नियोजन करण्यात आले असून सुमारे दहा कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबरोबरच तालुक्यांतर्गत अपघातप्रवण चौकांच्या रूंदीकरणाचाही प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. सध्या चाकरमानी गावाकडे परतत असून त्यांच्या सोयीसाठी चार लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू केल्या असल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. मात्र याशिवाय नागरिकांना कोल्हापूरपर्यंत विनाथांबा बसची गरज आहे. त्याबाबत कार्यवाही करा व दररोज साडेनऊच्या दरम्यान एक बस सोडण्याची सूचना करण्यात आली.

यावर्षी वन्यप्राणी हल्ल्यातील जखमी, पिक व पशुधन नुकसानीच्या ७२९ प्रकरणातील २९ लाख २७ हजार रूपयांचा सहाय्यता निधी वितरीत करण्यात आल्याचे वनविभागातून स्पष्ट करण्यात आले. यावेळी हत्तीच्या व गव्याच्या हल्ल्यातील जखमी अनुक्रमे विजय गोरे (भादवण) व बापू शिंगे (हाजगोळी) यांना अनुक्रमे एक लाख व पन्नास हजारांचा सहाय्यता निधी धनादेश वितरीत करण्यात आला. याबरोबरच सरकारच्या निर्णयानुसार तालुक्यातील खेतोबा राई परिसराचे क वर्ग पर्यटन केंद्र म्हणून विकासकाम सुरू करण्यासाठीचा सुमारे पावणे दोन कोटींचा आराखडा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. तसेच गवसे नजिकच्या चाळोबा परिसरासाठीही प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली. मात्र तेथे विकासकामांसाठी फारशी संधी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांचा प्रतिसाद

सर्फनाला प्रकल्पग्रस्तांनी जमिनींच्या पसंती अर्ज भरण्याला प्रतिसाद दिल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू असून पुढील वर्षी पाणी साठविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. मात्र उचंगी व आंबेओहोळ प्रकल्पांतर्गत बरेच प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक गाव, एक जागर

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

ग्रामीण भागात 'गाव करील ते राव करील काय ?' अशी एक म्हण प्रचलित आहे आणि ही म्हण खरी करून दाखविली आहे, महालवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी. या गावात मागील कित्येक वर्षे चालत आलेली प्रत्येक घराच्या उंबऱ्याला रेणुका देवीचा जागर ही खर्चिक संकल्पना बाजूला ठेवून 'एक गाव एक जागर' ही संकल्पना सुरु करून वार्षिक २० लाख रुपयांची बचत करून एक पुरोगामी विचार समाजात रुजविला आहे.

ग्रामीण भागात रेणुका देवीच्या भक्तांची संख्या मोठी आहे. प्रत्येक वर्षी या देवीचा जागर या देवीचे भक्त असणाऱ्या घरात केला जातो. या दिवशी जागर असणाऱ्या घरात तृतीयपंथी लोकांकडून रात्र जागवली जाते. देवीचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. गोडधोड जेवणाचे नियोजन करून इष्ट मंडळीना जेवण दिले जाते. यात एका जागरणीला सुमारे २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.

भुदरगड तालुक्यातील महालवाडी या गावातील प्रत्येक घरात रेणुका देवीची प्रतिष्ठापणा झालेली आहे. त्यामुळे या गावातील प्रत्येक घरात जागर ही परंपरा मागील कित्येक पिढ्यांपासून सुरु होती. या गावात ११५ कुटुंबियांचे वास्तव्य आहे. त्यामुळे गावात देवीच्या जागरणी साठी वर्षाला सरासरी २० ते २५ लाख रुपये खर्च होत होते. या देवीच्या जागरणीच्या नावाखाली होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीला लगाम घालावा अशी पारावर चर्चा करत असताना गावातील ज्येष्ठ नागरिक आश्राप्पा मोरे, धोंडीराम तावरे, शिवाजी चौगले, पोलिस पाटील नारायण चौगले, विठ्ठल इंदुलकर, परशुराम निकाडे, भीमराव निकाडे, गोविंद कुंभार, धनाजी इंदुलकर आदींच्या कलपनेतून आली व त्यांनी रेणुका भक्त मंडळ या मंडळाची स्थापना केली.

ग्रामस्थांना या लोकांनी एकत्र बोलवून 'एक गाव, एक जागर' ही संकल्पना बोलून दाखविली. मात्र भितीपोटी सुरवातीला काही महिला व ग्रामस्थांचा विरोध झाला. पण, साऱ्या ग्रामस्थांना विश्वास देऊन, विचारात घेऊन यापासून होणारे फायदे अमजावून सांगून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.

एका जागरणीसाठी यापूर्वी प्रत्येक कुटुंबाचे २० ते २५ हजार रुपये खर्च होत होते. ते 'एक गाव, एक जागर' करताना प्रत्येक कुटुंबाला एक हजार रुपये इतका खर्च आला. परिणामी एका वर्षाला या पुरोगामी विचारांमुळे सुमारे २० लाख रुपयांची बचत झाली. या ग्रामस्थांनी मागील दहा वर्षापासून गावात पराकोटीचे राजकारण असताना सुध्दा 'एक गाव, एक गणपती', 'एक गाव, एक सार्वजनिक मंडळ' व 'एक गाव, एक सप्ताह' या संकल्पना एकीतून राबविल्या आहेत.

गावात यापूर्वी देवीच्या जागरणीवर लाखो रुपये खर्च होत होते. काही कुटुंबीय कर्ज काढून जागर करत होते. हे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांचे व महिलांचे प्रबोधन करून 'एक गाव, एक जागर' ही संकल्पना सुरू करावी अशी संकल्पना पुढे आली. आणि त्याला ग्रामस्थांनी चांगला पाठिंबा दिला.

- आश्राप्पा मोरे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपाटीवरील रॉडमुळे व्हीलचेअरला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकीकडे अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न होत असताना कोल्हापुरात अपंग व्यक्तींना रंकाळा तलावाच्या चौपाटीवर रपेट करणे अवघड झाले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या तलावाच्या रपेटीच्या आनंदापासून गेल्या दोन महिन्यांपासून अपंग वंचित आहेत. रंकाळा टॉवरमार्गे चौपाटीच्या मार्गावरील प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या लोखंडी रॉडमुळे अपंगांच्या व्हिलचेअरला महापालिका प्रशासनाने ब्रेक लावला आहे. चौपाटीवर होत असलेल्या दुचाकीस्वारांच्या घुसखोरीचा फटका अपंगांच्या रंकाळा फेरीला बसला आहे.

वस्तूतः बँकांच्या बहुतांश एटीएम कक्षांमध्ये जाण्यासाठी अपंगांना रँप नाही. वस्तुसंग्रसालये आणि कलादालनात रँपअभावी अपंगांना वाट बंद आहे. शाळांमध्येही अनेकदा अपंगांच्या सोयीकडे दुर्लक्ष होते. यात आता चौपाटीवर फिरण्याच्या अपंगाच्या आनंदावर विरजण पडण्याची भर पडली आहे.

क्रशर चौकाकडून रंकाळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर ज्या​मार्गे रंकाळा चौपाटीचा मार्ग सुरू होतो, त्या ​बाजूच्या प्रवेशद्वारावर महापालिकेने लोखंडी रॉडचा अडथळा केला आहे. यामार्गे मध्यंतरी दुचाकीस्वार शॉर्टकट म्हणून वापर करत होते. तसेच जनावरेही रंकाळा चौपाटी मार्गावर या प्रवेशद्वारातून येत होती. रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना याचा अडथळा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी महापालिकेतर्फे याठिकाणी रॉड बसविण्यात आले.

लोखंडी रॉडमुळे दुचाकीस्वार आ​णि जनावरांना हा मार्ग बंद झाला असला तरी व्हिलचेअरवरून येणाऱ्या अपंगांच्या रंकाळा फेरीवरही बंधन आले आहे. अपंगांचे नातेवाईक त्यांना व्हिलचेअरवरून रंकाळ्यावर फिरायला आणतात. सकाळी रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्यांमध्येही अपंगांची संख्या लक्षणीय होती. मात्र, रॉड लावून मार्गच बंद केल्यामुळे चौपाटीमार्गावर व्हिलचेअर येऊ शकत नाही.

अपंग व्यक्तींची ​व्हिलचेअर चौपाटीवर येईल असा दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही. रॉड बसविण्यापूर्वी केवळ चौपाटीच्या मार्गाचा वापर शॉर्टकट म्हणून करणाऱ्या दुचाकीस्वारांना पायबंद घालताना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अपंगांच्या सुविधेचा विचार केला नाही. याबाबत रंकाळा मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे महापालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

- सोनाली नवांगुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तक्रार नोंदवून घ्या, टाळू नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिफारशींवर कार्यवाही न झाल्यास आयोगाकडून उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली जाते. ही वेळ अधिकाऱ्यांनी येऊ देऊ नये. वॉरंट निघणार नाही याची दक्षता घ्या. पोलिस विभागाविरुद्ध निम्म्याहून जास्त तक्रारी असल्याने तक्रारदार आल्यास तक्रार नोंदवून घ्या व सभ्य भाषेत बोला, अशा कानपिचक्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. आर. बन्नूरमठ यांनी नुकत्याच दिल्या.

सर्किट हाऊसमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी मानवी हक्कांबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये बन्नूरमठ यांनी मार्गदर्शन केले.

बन्नूरमठ म्हणाले, 'आयोग हा सरकारी यंत्रणेवरील वॉचडॉगची भूमिका पार पाडतो. ज्या ठिकाणी मानवी हक्कांचे उल्लंघन अथवा पायमल्ली होत असेल तरच त्यांची छाननी करुन कार्यवाही करते. त्यामध्येही केवळ शिफारसी करुन आयोग थांबत नाही. तर शिफारसी ज्या सरकार अथवा प्राधिकरणाला केल्या जातात. त्यावर मुदतीत कार्यवाही न केल्यास आयोग स्वत: उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे. अहवाल तत्काळ पाठवण्याबरोबरच दुय्यम दर्जाचे अधिकारीही पाठवू नयेत. न्यायालयाचे संपूर्ण अधिकार असल्यामुळे वॉरंट निघणार नाही याची काळजी घ्यावी.

बन्नूरमठ म्हणाले, 'आयोगाकडे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी पोलिसांविरुद्ध असतात. चुकीच्या पध्दतीने अटक, पोलिस कस्टडीत मारहाण, तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ, तक्रारींची दखल न घेणे यांचा समावेश असतो. त्यामुळे तक्रारदार आल्यास तक्रार तात्काळ नोंदवून घ्या व सभ्य भाषेत संवाद साधा,' आरोग्य सुविधा, प्रदूषण, आरोग्य केंद्रात प्रवेश नाकारणे या तक्रारींबाबत आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांनी मानवता जपावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आभार मानले. आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढेकणेने खून केलेल्याची आज ओळख पटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंदलगाव येथील निर्जन माळावर शीर व दोन्ही हात कापलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मात्र त्याची खात्री झालेली नाही. याबाबत सोमवारी माहिती उघड होईल असे पोलिसांनी सांगितले. स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी उचगाव येथील सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची कबुली गुंड लहू ढेकणे याने दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ढेकणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेल्वे स्टेशन परिसरात अटक केली होती.

गुंड लहू ढेकणे जिवंत सापडल्यानंतर खून झालेली व्यक्ती कोण? याचा शोध करवीर पोलिस करत आहेत. उचगाव येथील सेंट्रिंग कर्मचाऱ्याचा खून केल्याची कबुली ढेकणे याने दिली आहे. ढेकणेने दिलेली माहिती खरी आहे का? याचा पोलिस खातरजमा करून घेत आहेत. ढेकणेने खून झालेल्या व्यक्तीची माहिती खरी असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. याबाबत पुरावा शोधण्यासाठी पोलिसांनी खून झालेल्या व्यक्तींचे नाव जाहीर केलेले नाही. पॅरोलवर सुटल्यानंतर ढेकणे हा रुईकर कॉलनीतील सौंदर्यप्रसाधनाच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. ढेकणे वापरत असलेली मोटारसायकल चोरीची होती हे स्पष्ट झाले आहे. बनावट क्रमांकाची नंबरप्लेट लावून तो मोटारसायकल फिरवत होता. ढेकणेने खून एकट्याने केला की अन्य त्याच्यासोबत आणखी सहकारी होते, याचा पोलिस शोध घेत आहेत. खून झालेली व्यक्ती आपलाच भाऊ होता अशी कबुली ढेकणेच्या भावाने दिली होती. मृत व्यक्ती ढेकणे नाही याची माहिती पोलिसांना पहिल्याच दिवशी मिळाली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणलेल्या नऊ व्यक्तींनी मृतदेह ढेकणेचा नसल्याचे सांगितले. ढेकणे व्यायाम करीत होता. पोलिसांनी पहिल्याच दिवशी हा बनाव असल्याचे ओळखले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबई महापालिकेत युती: CM

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे. मात्र राज्यातील अन्य महापालिकांच्या निवडणुकांतील युतीबाबतचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात निर्णय घ्यायचा आहे' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितले. भाजप कार्यकारिणीसाठी ते येथे आले आहेत. पेटाळा येथे पत्रकारांसाठी चहापान आणि अनौपचारिक गप्पा अशा कार्यक्रमात ते बोलत होते. सीमालढ्याबाबत वकिलांना लागेल ती मदत सरकारकडून केली जात आहे. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपासाची दिशा योग्य आहे. पोलिस पूर्ण क्षमतेने तपास करत आहे. पानसरेंचे मारेकरी लवकरच सापडतील' असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या ताकदीवर स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या सर्वच महापालिकांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरच निर्णय होतील. कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही पुढील सहा महिन्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू असून वेगवेगळे कार्यक्रम राबविल्याने त्याचा पक्षाला फायदा होईल. फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढेल. राज्यातील अन्य महापालिकांमध्ये स्थानिक जिल्हा कमिट्यांना अधिकार दिले आहेत. शिवसेना आणि भाजपची युती गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. विधानसभा निवडणुकीत काही कारणाने युती झाली नव्हती. युती तुटावी असे कुणालाच वाटत नव्हते. खूप कमी कालावधीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागला.'

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'कमी कालावधीतही जास्त जागा येऊ शकल्या ही भाजपची ताकद सर्वांना समजली, एवढाच माझ्या बोलण्याचा उद्देश होता. भविष्यात युती होणार नाही किंवा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील असे समजण्याचे कारण नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. आता सरकारमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र आहे. हेही अनेकांना बघवत नाही. त्यांची युती तुटेल आणि आपल्याला संधी मिळेल अशी आशा लावून अनेकजण बसले आहेत, परंतु अजून पाच वर्षे सरकारला काहीच धोका नाही असा मेसेजही त्यांच्यापर्यंत द्यायचा होता.'

मुख्यमंत्री म्हणाले, 'पहिल्यापासूनच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा भाग महाराष्ट्राला जोडावा अशी भाजपची मागणी आहे. त्याप्रमाणे सीमालढ्यात वकिलांना लागेल ती मदत सरकारकडून केली जात आहे. सध्या साक्षी-पुराव्याचे काम सुरू आहे. काही संस्थांची माहिती फी भरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. सर्किट बेंच, टोल, शाहूंच्या स्मारकाचा प्रश्न, चित्रपटनगरीचा विकास, पंचगंगा प्रदूषण रोखणे या प्रश्नांबाबत आग्रही राहू. भाजपच्या बैठकीच्या दरम्यान कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली आहे. विदर्भवादी आणि विदर्भातील मुख्यमंत्री म्हणून पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही. गेल्या सहा महिन्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून दुष्काळी स्थिती असलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील दुष्काळासाठी सुमारे १०९ कोटी रुपये दिले आहेत.'

महापौरांवर कारवाई होणारच

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही' या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'महापौरांना पदावरून हटविताना काही नियम आहेत. त्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत चुकीचे काम करणाऱ्याला माफ केले जाणार नाही, असा निर्वाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटन मजबूत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्षाच्या यशाच्या शिखराचा पाया हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची मोट हाच आहे. त्यामुळे भविष्यात 'अभाविप'चे संघटन अधिक मजबूत करा,' अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'अ​भाविप'च्या राज्यातील कार्यकर्त्यांसोबत भेटीदरम्यान केले. भाजपाच्या राज्य परिषदेच्या निमित्ताने कोल्हापुरात पेटाळा येथे राज्यातील 'अ​भाविप'चे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. शनिवारी शहा यांची अ​भाविपच्या सर्व राज्यपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. पद्माराजे हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या शहा यांनी अभाविपच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना शहा म्हणाले, 'अभाविप'च्या संघटनातून आज अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. भाजपच्या आजवरच्या राजकीय यशामध्ये अभाविपच्या संघटनाचा खूप वाटा आहे. भविष्यातही यामध्ये खंड पडू न देता अभाविपच्या सदस्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. संघपरिवारातील ध्येयधोरणांचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी करणे हे 'अभाविप'शी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या नसानसात भिनले तरच भाजपाची तत्वे आणि विचार समाजातील तरूणाईपर्यंत पोहोचू शकतो. गुजरातमध्ये कोल्हापुरातील एक तरूण 'अभाविप'चे चांगले काम करत आहे याचा उल्लेख करत शहा म्हणाले, कोल्हापुरात राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालण्याची समज आहे. त्याचा वापर अभाविपच्या माध्यमातून झाला तर राजकारणात तरूणाईचा सहभाग अधिक सक्रिय होईल. यावेळी ​जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगराध्यक्ष महेश जाधव, अजित ठाणेकर यांच्यासह 'अभाविप'चे राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजना घराघरात पोहोचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कार्यकर्त्यांनी सत्ता आली आता आपले काम संपले या भूमिकेत राहून चालणार नाही. सरकार बदलले तरी प्रशासन तेच असून या प्रशासकीय लाल फितीतून जनहिताच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याजी जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'सत्ता मंजिल नही पडाव है, समाज परिवर्तन यह मंजिल है' या विचारानुसार समाज परिवर्तन हे आपले ध्येय आहे याची खूणगाठ कार्यकर्त्यांनी सदैव बाळगावी. गेली १५ वर्षे सत्ता उपभोगून महाराष्ट्राचे दिवाळे काढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीची भाषा 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हाज को'सारखी आहे.' अशा शब्दांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर तोफ डागली.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. केंद्रीय मंत्री नितनी गडकरी, हंसराज अहिर, मंत्री सुधीर मुनगंठीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उप​स्थितीत दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी बोलताना दानवे म्हणाले, 'राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांचे दाखले देत प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून गोरगरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या घटकांच्या हिताच्या अनेक योजनांना प्राधान्य दिले आहे.

ग्रामपंचायत सदस्यापासून कारकीर्द

कार्यकर्ता या नात्याने अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गावातील भाजप शाखेच्या अध्यक्षापासून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती अशा चढत्या क्रमाने कारकीर्द बहरत गेली. २०१४ वर्षे तर माझ्यासाठी लकी आहे. यावर्षी मी खासदार झालो, केंद्रीय मंत्री झालो आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रदेश अध्यक्ष होईन असे कधी वाटले नव्हते. नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखविला आहे त्याबद्दल मी आभारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातमध्ये सर्वाधिक गुंतवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिकीकरणात राज्य आघाडीवर असले तरी सध्या गुजरातमध्ये सर्वांत जास्त परकीय गुंतवणूक होत असल्याची कुबली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र, पुढील वर्षभरात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा समारोप रविवारी झाला. त्यापूर्वी ते पेटाळा येथे पत्रकारांशी बोलत होते. तसेच समारोपाच्या भाषणात काँग्रेसवर घणाघात करताना काँग्रेसने केवळ सत्तेचे दलाल तयार केले असा घणाघाती आरोप केला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'औद्योगिकदृष्ट्या पुणे आणि जवळपासचा परिसर वेगाने विकसित होत आहे. त्याचवेळी प्रत्येक भागाच्या समतोल विकासाच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग, त्याबरोबरच फूड प्रोसेसिंग युनिट आणि वस्त्रोद्योगासंदर्भातील धोरण विकसित करण्याचे नियोजन आहे. साखर उद्योगाच्या विकासासाठी एकाचवेळी २ हजार कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून अनेक शहरांचा विकास होणार आहे. त्याचेही काम सुरू असून सध्या औरंगाबादसारख्या शहरांत थेट गुंतवणूक केली जात आहे. भविष्यात अशाच प्रकारची गुंतवणूक अन्य शहरांतही होणार आहे.'

केंद्र सरकार स्मार्ट सिटी म्हणून काही शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. त्यासाठी केंद्राचे काही निकष ठरविले आहेत. त्यानुसार राज्यातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात २० पेक्षा जास्त शहरे स्मार्ट सिटी होऊ शकतात, पण निकषांचा विचार करता त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

शेतकऱ्यांना दिलेले मदतीचे पैसे बँकांनी जाणीवपूर्वक दिलेले नाहीत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'काही ठिकाणी असा प्रकार घडला आहे. सरकारने दिलेले पैसे जिल्हा बँकांनी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. सहकारी बँका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्या तरीही त्यांना नियमाप्रमाणे काम करावे लागेल. सहकारात त्यांना ट्रस्टी म्हणून काम करायचे आहे. त्यांनी त्याप्रमाणेच काम करावे. मालकीप्रमाणे काम केले तर अडचणी निर्माण होतील.'

अनिल जयसिंघानी संरक्षण प्रकरणी चौकशी समिती

अनिल जयसिंघानी या बुकी व्यावसायिकाला संरक्षण देण्यात आले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाच्या पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्फ्रा टू’ची तीनशे कोटीची कंत्राटे रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'इन्फ्रा टू' अंतर्गत येणारी कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे तीनशे कोटी रुपयांची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याबरोबरच महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कारवाई करण्यासाठी विधीज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले.

नागरिकांना तत्काळ वीज कनेक्शन देणारी आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारी महावितरणची 'इन्फ्रा टू' योजना बारगळली. तसेच, कोल्हापूर परिमंडळासाठी ५१३ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा या योजनेंतर्गत ही कामे होणार होती. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने २६ एप्रिलला दिले होते. याबाबतची माहिती बावनकुळे यांनी घेतली होती. त्यानंतर रविवारी संबंधितांची कंत्राटे रद्द केल्याचे जाहीर केले.

ते म्हणाले, 'या योजनेचा ठेका दिलेल्या प्रतिभा आणि प्रतीक इंटरप्रायजेस, श्राम इलेक्ट्रिकल्स आणि सुनील हायटेक या कंपन्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यांच्यावरील कारवाईत अधिकाऱ्यांनीही दिरंगाई केली आहे. ठेकेदारांच्या या वेळकाढूपणामुळे ८ हजार शेतकरी आणि ६ हजार घरगुती वीजधारकांना वीज मिळालेली नाही. २०१५ पर्यंत शहरातील १ लाख ५६ हजार ८६२ हून अधिक ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार होता. या परिस्थितीत कठोर निर्णय घेण्याशिवाय पर्यायच नाही.'

अधिकाऱ्यांवर कारवाई करू

कोल्हापूर शहराच्या विकासासासाठी आगामी दोन वर्षांत जास्तीत जास्त कामे करण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राहिलेच पाहिजे. ते राहत नसतील तर त्यांचा घरभत्ता बंद करून फसवणूक केल्याप्रकरणी वेतनवाढही रोखण्यात येईल, असा इशाराही ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे.

इन्फ्रा अंतर्गत होणारी कामे

शहरात ३३/११ केव्हीची चार नवी उपकेंद्रे

७१ किमी नवीन उच्चदाब वाहिन्या

८८ किती भूमिगत उच्चदाब वाहिन्या

११२ किमी लघुदाब वाहिन्या

२३० नवीन रोहित्रांची उभारणी

ऊर्जामंत्र्यांचे निर्णय

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ५० टक्क्यांत जोडणी

वीजचोरी पकडून देणाऱ्यांसाठी २० टक्के अतिरिक्त भत्ता

ठेकेदारांकडून कामे करून घेण्याची पद्धत बंद

बेरोजगार इलेक्ट्रिक इंजिनीअर्सना दरवर्षी ७५ लाखांची कामे

कंत्राटी कामगारांचे पगार ताबडतोब वाकलेले पोल आणि दुरुस्तीसाठी २० कोटींना मान्यतेचा विचार

अतिरिक्त दराने वीज घेणे बंद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images