Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भाजप नेत्यांच्या गाडीला अपघात

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उंब्रज

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या भाजप अधिवेशनासाठी निघालेल्या गाडीने उंब्रजजवळ ट्रकला मागून धडक दिली. पुढे जाणा-या ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर उंब्रजजवळ झालेल्या या अपघातात भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील नेते बाळासाहेब गव्हाणे आणि महेश कुलकर्णी यांच्यासह एक कार्यकर्ता जखमी झाला.

गव्हाणे यांच्या फॉर्च्युनर गाडीला सकाळी दहा वाजता अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या ३ जणांना लगेच कराडच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती तुटली, ताकद कळली!- देवेंद्र

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेसोबतची युती तुटली नसती, तर भाजपला स्वतःची ताकद कळली नसती, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अप्रत्यक्षपणे युती तुटल्याचं समर्थनच केलं आहे. त्यातून त्यांना काही सूचित करायचंय का, यावरून राजकीय वर्तुळात आणि भाजपच्या गोटातही कुजबूज सुरू झाली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं तीन दिवसीय अधिवेशन आजपासून कोल्हापूरमध्ये सुरू झालं. या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित आहेत. त्यांच्यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील भाजपच्या यशस्वी वाटचालीचं चित्र मांडलं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दणदणीत विजयावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. त्यावेळी, शिवसेनेसोबतची युती तुटल्यामुळेच भाजपला स्वतःची ताकद कळल्याचं विधान त्यांनी केलं.

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेसोबतची युती तोडावी लागेल, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की आम्हाला युती तोडावी लागली. या निर्णयामुळे एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे भाजपला राज्यातील स्वतःची ताकद उमगली. युती कायम राहिली असती, तर आम्हाला स्वतःची ताकद कधीच कळली नसती, असं त्यांनी नमूद केलं. विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याचं आव्हान मोठं होतं. वेळ कमी होता. परंतु, अमित शहा यांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळेच भाजपला १०० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वाढत्या ताकदीचं कौतुक केल्यानं शिवसेनेचा पापड मोडू शकतो. युती तुटल्याचं अप्रत्यक्ष समर्थनही त्यांना खटकू शकतं. त्यावरू ते मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करतात का आणि सेना-भाजपमधील धुसफूस वाढते का, हे पाहावं लागेल.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारण बाहेर करा, बँकेत नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकशाही मार्गाने आम्ही निवडून आलो आहोत, सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. यामुळे मनात येईल तेव्हा जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी खासदार शेट्टी कशी काय करू शकतात?,' असा सवाल बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. बँक अडचणीत आहे, ती वाचवण्यासाठी कितीही जवळचा कोणीही असला तरी कर्जवसुलीत हयगय करणार नसल्याचे सांगत बँकेत राजकारण आणू नका, असा सल्ला त्यांनी शेट्टीना दिला.

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार बैठकीत बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'कारखान्याकडून ऊसाचा हप्ता न मिळाल्याने बँक आणखी अडचणीत आली आहे. कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना ३० जून हा अखेरचा दिवस आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बिलाचा हप्ता न मिळाल्यास शेतकऱ्यांसह बँकेलाही फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारकडून कारखान्यांना जी मदत मिळणार आहे, ती लवकर मिळण्यासाठी शेट्टी यांनी थोडा वेळ काढून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. शेतकऱ्यांची आठवण असेल तर त्यांनी हे नक्की करावे. त्यांना माझ्याबद्दल व्देष असेल, पण बँकेबद्दल काय आकस आहे हेच कळत नाही.'

मुश्रीफ म्हणाले, 'गेल्या काही बँकात वर्षात ठेवीचे प्रमाण कमी होत आहे. कारखान्याकडून उसाची बिले न मिळाल्याने यावेळी त्यावर आणखी परिणाम होणार आहे. सध्या जिल्हा बँक अडचणीत आहे. यामुळे पुन्हा आरोपप्रत्यारोप होऊन ती आणखी बदनाम होऊ नये म्हणून सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन पॅनेल केले. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे हीच आमची जबाबदारी आहे. कर्जवसुलीसाठी कठोर पावले उचलली जातील हे यापूर्वीच आपण स्पष्ट केले आहे. येत्या रविवारी सर्व कर्मचारी व नंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून देण्यात येणार आहे. उदयसिंगराव गायकवाड कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी आपली चर्चा सुरू आहे. जोपर्यंत कर्ज ​वसुली होणार नाही, तोपर्यंत हा कारखाना सुरू करू देणार नाही, प्रसंगी आपण स्वतः कारखान्याच्या आवारात जाऊ असे सांगून दौलत कारखान्याच्या क​र्ज वसुलीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रशासक प्रताप चव्हाण, व्यवस्थापक ए.बी.माने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हीएचची चौकशी करणार

0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीमधील वादग्रस्त एव्हीएच कंपनीची 'निरी' सारख्या देशपातळीवरील समितीकडून चौकशी करणार आहे. जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत उत्पादनाला कंपनीला परवागनी देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. एव्हीएच विरोधी कृती समितीने फडणवीस यांची भेट घेवून कैफियत मांडली. लोकांच्या भावना, होणारा विरोध व प्रदूषणाचे मुद्दे समजावून सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'`निरी संस्थेकडून तज्ज्ञ समिती चंदगडला येईल. चंदगडमधील लोकांच्या भावना जाणून घेईल. लोकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेईल. लोकांच्या शंकाचे निरसन करेल व तेथील वास्तविक परिस्थिती काय आहे याची पाहणी करेल. जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत उत्पादनाला कंपनीला परवागनी देण्यात येणार नाही. जनतेने कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही काम करु नये.'

कृती समितीच्या वतीने विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून ७० दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही समिती आलेली नाही. सध्या स्थगिती आहे, मात्र कोणत्याही क्षणी ती उटेल अशी लोकांच्या मनात भिती आहे. स्वतंत्र अशी पर्यावरणावरची तज्ज्ञ समिती सरकारने तातडीने नेमावी व जोपर्यंत ही समिती येत नाही, सर्व कागदपत्रांची व परवानग्यांची फेरतपासणी होत नाही, तोपर्यंत ही स्थगिती उठवू नये. कृती समितीच्या वतीने समितीमध्ये दोन पर्यावरण तज्ज्ञ असावेत, अशी विनंती केली असता त्यांनी सकारात्मकता दर्शविली. कृती समितीच्या डॉ. नंदाताई बाभूळकर म्हणाल्या,' सात मार्चला जाळपोळ झाल्यानंतरही कंपनीच्या उत्पादनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीच स्थगिती दिली आहे. एव्हीएचचा प्रश्न सुटण्याच्या दिशेने हे चांगले पाऊल पडलेले आहे. ' यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, राजेश पाटील, सुनील शिंत्रे, नामदेवराव दळवी, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, भारत गावडे, विष्णू गावडे यांच्यासह एव्हीएच कृती समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमचा संघर्ष भविष्यासाठी

एव्हीएच कंपनीला लागूनच असलेल्या नाईक वस्तीमधील मंजुळाताई नाईक म्हणाल्या, 'जगावे की मरावे तुम्हीच ठरवा. आमच्या सर्व जमिनी एमआयडीसीमध्ये गेल्या आहेत. शंभर रुपये दिवसाच्या मजुरीवर आम्ही जगतो आहोत. हे शंभर रुपये आज आम्ही आमच्या पोट्यापाण्यासाठी घालवायाचे की दवाखान्यासाठी घालायचे हे सांगा. नाईक वस्तीतील मुलांना नद्या व जमिनी वाचल्या तर पुढे जगणे शक्य आहे. त्यासाठी आमचा हा संघर्ष आहे.'

काय आहे निरी संस्था

नागपूर येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्यावतीने (नीरी) विविध पर्यावरणविषयक मुद्यांबाबत अभ्यास केला जातो. तसेच त्यातून उपायही सुचवले जातात. या संस्थेमध्ये तज्ज्ञ अभ्यासक असल्याने एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास होऊन त्या प्रश्नाचे मूळ शोधून काढले जाते. तसेच त्यावर उपायही सुचवण्यात येत असल्याने संस्थेबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवणींचा खजिना... लग्नपत्रिकांचा

0
0

राहुल जाधव, कोल्हापूर

जीवनातील अविस्मरणीय आणि अत्त्युच्च आनंदाचा क्षण म्हणजे दोन जीवांना एकत्र आणणारा विवाह. केवळ दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटूंबे या पवित्र बंधनात बांधली जातात आणि सुखदुःखाची वाटचाल संगतीने करतात. या मंगल प्रसंगात महत्त्वाचे स्थान असते ते आमंत्रण पत्रिकांना. अशा या पत्रिका जमविण्याचा छंद तसा आगळावेगळाच म्हणावा लागेल. ऐश्वर्या आण पार्थ पाटील या भावंडांनी आपल्या कुटुंबातील आगळ्या वेगळ्या आणि अनोख्या अशा लग्नपत्रिकांचा संग्रह केला आहे. या पत्रिकांत सर्वांत जुनी आणि पहिली पत्रिका आहे ती त्यांचे पणजोबा आणि पणजींच्या लग्नाची. या लग्नाला रविवारी (ता. २४ मे) ८१ वर्षे पूर्ण होत आहेत.

ऐश्वर्या आणि पार्थ यांचे पणजोबा म्हणजे स्वातंत्रसैनिक गजाननराव यादव पाटील (शिरगावकर). यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तर पणजी भागिरथी उर्फ खाशीबाई गजाननराव पाटील यांनी भूमिगत क्रांतिकारकांना भोजन पुरविण्याचे काम अनेक वर्षे केले. अशी सामाजिक तसेच राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या या कुटुंबामध्ये ६० सदस्य आहेत. खंडोबाच्या पाल शेजारील शिरगाव (ता. कराड) हे त्यांचे मूळ गाव.

कुटुंबाचे एक सदस्य यशवंत पाटील हे कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. गावाकडील घराचे नूतनीकरण करत असताना त्यांना एक जुनी ट्रंक सापडली. उत्सुकतेने त्यांनी ही ट्रंक उघडली असता त्यांना १९३४ पासूनच्या विविध लग्नपत्रिका आढळल्या. या लग्नपत्रिका त्यांनी जपून ठेवल्या. वडीलांनी जपलेल्या या पत्रिकांचे महत्त्व जाणून ऐश्वर्या आणि पार्थ या भावंडांनी आपल्या छंदाव्दारे हा संग्रह वाढवित नेला. अलिकडे लग्नपत्रिकांत एकसारखेपणा किंवा तोचतोचपणा दिसून येतो. पण ऐश्वर्या आणि पार्थच्या या संग्रहातील पत्रिका पाहिल्या असता आगळे-वेगळेपण आणि आपुलकी दिसून येते.

१९३४च्या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत छोट्या आणि सुबक अक्षराच्या फॉंटमधील या पत्रिकेत 'आपण सहकुटुंब सहपरिवारे अगत्य येऊन कार्य सिध्दी करावी. आपण आल्याने कार्यास विशेष शोभा येणार आहे,' असे आपुलकीचे आमंत्रण आहे. महत्त्वाचे म्हणजे पाहुण्यांनाच कार्य सिद्धीचा मान दिला आहे. ​शिवाय पत्रिका छापलेली तारीखही आहे.

पाटील कुटुंबियांच्या १९६०-६१ दरम्यानच्या लग्नपत्रिकांचे वैशिष्ट्य म्हणजे या पत्रिकांत वधू-वरांचे फोटो छापले आहेत. विशेष म्हणजे हे आमंत्रण कुटुंबातील महिला सदस्यांनी आमंत्रित महिलांना दिले आहे. 'सौ. बाईसाहेब यांना सप्रेम नमस्कार वि.वि.' अशा आशयाची ही पत्रिका महिलांना आदराचे स्थान दर्शविते. १९३४ पासून अशा अनेक पत्रिकांनी हा खजिना सजला असून एक प्रकारे कौटुंबिक सुहृदांचाच संग्रह आहे.

एकाच प्रकारची पत्रिका

१९९४ नंतर पाटील कुटुंबियांनी आपल्या लग्नपत्रिकांचा एक नमुना निश्चित केला. साध्या कागदावर सुटीसुटीतपणे छापलेला आमंत्रणाचा मजकूर आणि विशेष म्हणजे कोणताही दुजाभाव न करता सर्व आमंत्रितांसाठी एकाच प्रकारची आमंत्रणपत्रिका.

आमच्या संग्रहात एका छोट्या कागदापासून ते बॉक्स पत्रिकांपर्यंतचा खजिना आहे. या संग्रहातून आपण आपल्या कौटुंबिक जिव्हाळ्याला उजाळा देऊ शकतो. शिवाय पूर्वजांविषयी आदरही व्यक्त करू शकतो. वडिलांमुळे सुरू झालेल्या हा छंद म्हणजे कौटुंबिक आठवणींचे कोंदणच आहे.

- पार्थ आणि ऐश्वर्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा फायदा घेवून गुजराती समाजाने आपली प्रगती साधावी,' असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

शहा म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमामुळे देशात भाजापने सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. भाजपच्या विजयामध्ये इतर समाजाप्रमाणे गुजराती समाजाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. गुजराती समाजाने व्यावसायाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्थालांतर केले आहे. तेथील संस्कृतीशी समरस होत आपल्या व्यावसामध्ये प्रगती साधली आहे. गुजराती समाजाने व्यावसायातून प्रगती साधत असताना, विविध सरकारी योजनांचा लाभही घ्यावा. संख्येने कमी असलेल्या गुजराती समाजाने आपल्यावरील अन्याय रोखण्यासाठी संघटना बांधणीवर अधिक भर द्यावा.'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'गुजराती समाजाला काही गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी देवून खंडणी उकळण्याचे काम करत आहेत. अशा समाज विघातक घटनांना आळा बसण्यासाठी तिनही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांची बैठक घेवून गुजराती समाजाला संरक्षण देण्यासाठी उपाययोजना केली जाईल.' यावेळी शहा यांचा सत्कार गोपालभाई पटेल, जसवंतभाई शहा व डॉ. बिपिनभाई शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुजराती समाजाच्यावतीने कोल्हापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा, रेल्वे स्थानकाला निधी द्यावा, कोल्हापूर ते अहमदाबाद दुरांतो रेल्वे सुरू करावी, कोल्हापूर शहराची उपराजधानी म्हणून घोषित करावी आदी मागण्यांचे निवेदन शहा यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफलाइन एंट्रन्स आजपासून सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या टप्प्यातील ऑफलाइन एंट्रन्स रविवारी (ता.२४) होत आहेत. १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध केंद्र्रांवर परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांकाबाबत विद्यापीठाचे www.unishivaji.ac.in/admission २०१५ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

कोल्हापुरातील बैठकव्यवस्था

एम.सी.ए. सायन्स, एम.सी.ए. कॉमर्स, एम.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स, एम.एस्सी. बॉटनी, एम.एस्सी. संगणकशास्त्र, एम.एस्सी. संख्याशास्त्र/अॅप्लाइड स्टॅट. इनफॉमेशन, एम.एस्सी. मायक्रोबायॉलॉजी या सर्व अभ्यासक्रमांची बैठक व्यवस्था मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे तर एम.एस्सी. फिजिक्स व एम.एस्सी. जिऑलॉजी व एम.एस्सी. गणित या अभ्यासक्रमांची बैठक व्यवस्था तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमांच्या होणार परीक्षा

एम.सी.ए. सायन्स, एम.सी.ए. कॉमर्स, एम.एस्सी. गणित, एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र, एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, एम.एस्सी. संगणकशास्त्र,, एम.एस्सी. संख्याशास्त्र, एम.एस्सी. अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इनफॉमेटीक्स, एम.एस्सी. मायक्रोबायॉलॉजी, एम.एस्सी. फिजिक्स, एम.एस्सी. जिऑलॉजी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस महाडिकांच्या घरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमल महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे अन्य मंत्री, आमदारही उपस्थित होते. फडणवीस यांचे रेसिडन्सी क्लबमध्ये स्वागतासाठी आमदार महादेराव महाडिक उपस्थित होते. त्यानंतर शनिवारी सकाळी फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीष बापट, गिरीष महाजन, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राम शिंदे, विद्या ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘उद्योगाचा वीजदर कमी करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील औद्योगिक विजेचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणी उद्योजकांनी उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्याकडे केली. पोटे यांनी गोकुळ‌ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनमध्ये (गोशिमा) भेट देऊन उद्योजकांशी चर्चा केली. वीजचे दर कमी करणे आणि भूखंड उपलब्ध करून देणे या प्रमुख मांडण्या उद्योजकांनी केल्या.

औद्योगिक वसाहतींना टाउनशिपचा दर्जा मिळणे, औद्योगिक कचरा निर्गत करण्यासाठी जागा मिळणे, एमआयडीसीमध्ये एफएसआय वाढवणे, बांधकाम मुदतवाढीसाठीचा वाढीव आकार कमी करणे, व्हॅटचे रिफंड तातडीने मिळणे या विषयांवर चर्चा झाली. पोटे यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय अंगडी, सीआयआयच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष मोहन घाटगे आदी उपस्थित होते. याप्रश्नी सरकार सकारात्मक विचार करेल. लवकरच धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून ढेकणेनेच केला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव येथे शीर धडावेगळे करून आणि दोन्ही हात कापून टाकलेला व्यक्तीचा खून आपणच केल्याची कबुली लहू ढेकणे याने पोलिसांना दिली आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर कळंबा कारागृहात हजर होण्याऐवजी एका सौंदर्यप्रसाधनाच्या कंपनीत सेल्समन म्हणून तो कोल्हापुरातच काम करत होता असेही पोलिसांनी सांगितले. ढेकणे याला न्यायालयात हजर केले असता त्याला १३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

पाचगावमध्ये १६ मे रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या पँटच्या खिशात लहू ढेकणेचे मतदान ओळखपत्र आणि डायरी आढळली होती. तो मृतदेह ढेकणे याचाच असल्याचे भासवले गेले. मात्र, पोलिसांना त्याबाबत संशय होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना ढेकणे रेल्वे स्टेशनवर आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

ढेकणे याच्यावर शिरवळ आणि जेजुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलांचे खंडणीसाठी अपहरण आणि खून असे गुन्हे नोंद आहेत. त्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कळंबा कारागृहात तो शिक्षा भोगत होता. १४ वर्षानंतर तो पॅरोल रजेवर बाहेर पडला. पॅरोल संपल्यानंतर कारागृहात हजर होण्याऐवजी तो नाव बदलून उचगाव येथे राहत होता. रुईकर कॉलनीतील एका सौंदर्यप्रसाधनाच्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. तेथे तो मार्च २०१५पर्यंत कामाला होता. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याचा शोध घेतला. रेल्वे स्थानकावर पकडल्यानंतर त्याने जयेश सावंत असे नाव सांगितले होते. 'करवीर'चे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही महिनाभर प्रतीक्षा करू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणुकांपूर्वी महाआघाडी करताना सत्तेतील वाटा काय असेल याबाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळे सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिने थांबलो आहे. अजून एक महिना थांबू असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीसाठी आले असता शेट्टी यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, 'केंद्रात सरकार येऊन एक वर्ष होत आहे. तर राज्यात सहा महिने झाले आहेत. निवडणुकांच्या दरम्यान जेव्हा महायुती झाली त्यावेळीच सत्तेत कोणाला किती वाटा असेल हे ठरले होते. त्यानुसार आता भाजपच्या नेत्यांनी घटकपक्षांना त्यांचा वाटा दिला पाहिजे. त्याबाबत वारंवार मागणी करणे योग्य नाही. पुढील महिनाभरात केंद्र आणि राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित आहे. यादरम्यान मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आहे. तआता पुन्हा एक महिना थांबायला तयार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. तसेच जैतापूर आणि शेतकरी आत्महत्या अशा काही विषयांतील सर्वच मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेना सहमत नाही. मात्र, या प्रश्नांबाबत शिवसेनेने समोर येऊन चर्चा करावी आणि सूचना कराव्यात,' अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्यानिमित्त शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दानवे म्हणाले, 'शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत; पण काही विषयांवर सहमती नाही. बऱ्याच विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी वेळोवेळी बोललो आहे, काही विषयांवर निर्णय झालेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांत ‌शिवसेनेशी युती करण्याची आमची भूमिका आहे, पण जागावाटप स्थानिक पातळीवर होईल, त्यात काही अडचणी आल्या तर परिस्थितीनुसार स्वतंत्र लढू, तसेच पक्षविस्तार करण्यासाठी आम्ही मोकळे आहोत.' दानवे पुढे म्हणाले, 'केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २६ ते ३१ मेपर्यंत संपर्क अभियान राबविण्यात येणार असून, १ मे ते ३१ जुलैपर्यंत महासंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यात राज्यातील एक कोटी पाच लाख सदस्यांपर्यंत कार्यकर्ते पोहोचतील, त्यानंतर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणही होणार आहे. सरकारने वर्षभर फक्त चर्चाच केली असून, कामी केले नसल्याचा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा आणि नैराश्येतून आहे, तसेच सरकारमधील काही मंत्री निर्णय घेत नसल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपाची आम्ही दखल घेत नाही. भाजपची नवीन कार्यकारिणी निवडताना 'एक व्यक्ती एक पद' हे सूत्र काटेकोरपणे पाळले जाईल. दानवे यांना वाय सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले. 'मला झेड सुरक्षा असल्याचे वृत्त चुकीचे आहे. कोणाला कोणती सुरक्षा व्यवस्था द्यायची याचा निर्णय मुख्य सचिवांची समिती ठरवते.'

शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदूमिल येथील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि लंडन येथील डॉ. आंबेडकरांचे घर विकत घेण्याच्या निर्णयाचे अभिनंदन केले.

गोवंश हत्याबंदी आणि कोल्हापुरी चप्पल

अधिवेशनात कोल्हापूरची आठवण म्हणून कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी चपला भाजपच्यावतीने देण्यात आल्या. पण भाजपने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला असताना कोल्हापुरी चपला भेट देणे हा विरोधाभास नाही का, या प्रश्नाला दानवे यांनी बगल दिली. गोवंश हत्याबंदी कायदा इतर राज्यांत पूर्वीपासूनच आहे. कोल्हापुरी चपला दिल्याने त्याचे ब्रँडिंग होण्यास मदत झाल्याची सारवासारव त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रीच्या आठवणींत ‘सोनल’ सहवास

0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

१९८१ चा मार्च महिना... दहावीची परीक्षा दिल्यानंतर एकमेकींचा निरोप घेतलेल्या सगळ्याजणी आपापल्या वाटांनी निघून गेल्या. त्यानंतर पाचेक वर्षांपर्यंत सुरू असलेला संपर्क विवाहानंतर पूर्णच थांबला. कोण कुठे आहे, कशी आहे हे माहिती होण्याचे सगळे बंध पुसट झाले आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रत्येकीच्या मनातील शाळा, मैत्रिणी, शिक्षिका यांचे संदर्भ काळासोबत मागे पडत गेले. पण तब्बल ३५ वर्षांनंतर मैत्रिणींचा मेळा भरला तो थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पत्नी अर्थात सोनल शहा यांच्या आग्रही निमंत्रणातून. भाजपच्या अधिवेशनाच्यानिमित्ताने सोनल शहा कोल्हापुरात माहेरी आल्या आणि प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमधील आपल्या वर्गमैत्रिणींसोबत त्यांनी चक्क गप्पांचा फड जमवला.

शनिवारी पेटाळा मैदानावर अमित शहा पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या सौभाग्यवती सोनल मात्र शालेय जीवनाची सफर करत होत्या. दुपारी साडेबारा वाजता सोनल शाळेतील वर्गात आल्या आणि काही क्षणात त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना कडकडून मिठीच मारली. 'ए, तू आहे तश्शीच दिसतेस' अशा संवादातून सुरू झालेल्या गप्पांमध्ये शाळेतली लुटुपूटूची भांडणं, अबोला, एकमेकींच्या डब्यातील जेवण वाटून खाण्यातील आनंद, संक्रांतीची भेट, स्नेहसंमेलनातील धमाल, क्रीडा महोत्सवाचा सराव अशा सगळ्या आठवणींचा पट उलगडला. यावेळी सोनल यांनी मेळाव्यासाठी आलेल्या पुष्पा कदम, माजी मुख्याध्यापिका संध्या कोळेकर, राजलक्ष्मी भोपळे, विजया शिपुरे या शिक्षिकांसह के. आर. कांबळी, गुरुनाथ हेर्लेकर या शिक्षकांना नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

मैत्रिणी जमल्या की एकमेकींच्या आवडी-निवडींवर चर्चा होणारच. सोनल शहा यांच्या मैत्रिणींनी जेव्हा त्यांना विचारले की, अमित शहा यांना कोणता कोल्हापुरी पदार्थ बनवून खायला घालतेस? तेव्हा त्या म्हणाल्या, 'माझ्या हातचा मसालेभात आ​​णि कोल्हापुरी मिसळ त्यांना खूप आवडते. मग यानिमित्ताने शाळेत असताना केलेल्या मिसळ पार्टीचीही आठवण अनेकींच्या ओठावर आली. 'पद्माराजे सतत विराजे, त्या शाळेच्या मुली आम्ही' या सुरात सगळ्यांनी शालेय आयुष्यातील वाक्य उद्गारले तेव्हा हशा आणि टाळ्यांनी सारा वर्ग गजबजून गेला.

यावेळी सुवर्णा देव, प्राजक्ता खेडेकर, गिरीजा कुलकर्णी, चंद्रलेखा कांगठाणी, गीता शेट्ये, माधुरी देशपांडे, सुजाता गोखले, सविता पाटील, संध्या कुलकर्णी, प्रभा टिपुगडे, शुभांगी चरणकर, स्नेहल बांदेकर, वरदा कुलकर्णी, संजीवनी पाणदरे, वर्षा मुतालिक, सुखदा लोणकर, मनीषा वाडीकर आणि सविता लाड या सोनल शहा यांच्या वर्गमैत्रिणी या स्नेहमेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.

पाच लाखांची ठेव

ज्या विद्यार्थिनी दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम येतील त्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूने सोनल शहा यांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे पाच लाखांचा धनादेश देत असल्याचे जाहीर केले. आई इंदिरा आणि वडील सुंदरलाल यांच्या स्मृतिनिमित्त ठेवण्यात येणाऱ्या या ठेवीच्या व्याजातून भावी 'पद्माराजें'साठी आर्थिक रक्कम पुरस्काराच्या रूपाने देण्यात यावी, असे त्यांनी आवाहन केले.

कोल्हापूरने मला चांगली सहचारिणी दिली

सोनल आणि अमित शहा यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात पद्माराजे हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, 'सोनल खूप चांगली अन्नपूर्णा तर आहेच; पण तिने माझ्या आयुष्यातील चढउतारांमध्ये दिलेली साथ मला मोलाची आहे. कोल्हापूरने मला माझी सहचारिणी दिली.' तर सोनल म्हणाल्या, 'पद्माराजे हायस्कूल माझे दुसरे घरच आहे. शिक्षिकांनी केलेल्या संस्कारांमुळेच मी चांगली गृहिणी होऊ शकले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभूत मतदारसंघ दत्तक घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला, असे सर्व मतदारसंघ दत्तक घेऊन भविष्यात सर्व ठिकाणी भाजप हा संकल्प करूया. त्यासाठी सरकारने वर्षभरात घेतलेले चांगले निर्णय आत्मविश्वासाने प्रत्येक घराघरात जाऊन सांगा' असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. भाजपच्या राज्य प्रदेश कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरातील पेटाळा मैदानावर 'दिवंगत गोपीनाथ मुंडे' नगरीतील बैठकीच्या उदघाटनावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. 'या पुढे जे आमचे म्हणणे मान्य करतील, तेच आमच्या सोबत असतील' असा अप्रत्यक्ष इशारा शहा यांनी घटकपक्षांना यावेळी दिला.

अध्यक्ष अमित शहा म्हणाले, 'गेल्या ६० वर्षात काँग्रेस सरकारला भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवता आले नाही. भाजपने वर्षभरात भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान सरकार चालवून दाखविले आहे. त्यामुळे हेच सरकार सर्वसामान्य, गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचे निर्णय घेणारे सरकार असल्याचे स्वाभिमानाने सर्वांना सांगितले पाहिजे. केंद्र सरकारने भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याबरोबरच देशाची मान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. काळा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काँग्रेसला यातील काहीच करता आले नाही. त्यांना आमच्याकडे वर्षाचा हिशेब मागण्याचा काहीच अधिकार नाही. गरिबी निर्मूलन, युवकांसाठी संधी, देशाचा विकास दर वाढविण्याबरोबर आर्थिक गाडी रुळावर आणण्याचे काम या सरकारने केले आहे. हे सरकार भ्रष्टाचारी नाही असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे. सरकारने वर्षभरात अनेक निर्णय घेतले. हे सर्व निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे अत्याधुनिक सुविधांनी युक्त कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन २६ मे ते १ जून या कालावधीत जनकल्याणपर्व साजरे केले जाणार आहे.'

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, 'राज्यामध्ये पक्ष सध्या एकामागून एक विजय मिळवत पुढे चालला आहे. विरोधक असलेल्या काँग्रेसला ते सहन होत नसल्यामुळेच वर्षभरात भाजपने काहीच केले नसल्याचा सूर आळवला जात आहेत. मात्र, राज्य सरकारने सहा महिन्यांत जे निर्णय घेतले, ते काँग्रेस सरकारला गेल्या १५ वर्षांत घेता आलेले नाहीत. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने भाजप सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू न देण्याचे काम केले. सरकारने गेल्या ६ महिन्यांत ४४ आश्वासने पूर्ण केली आहेत.'

उदघाटन कार्यक्रमावेळी 'झेप' ही चित्रफित दाखविण्यात आली. 'सशक्त भारत, सशक्त भाजपे या थीमवर आधारीत नृत्याविष्कारही सादर झाला. भाजपचे महानगरअध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत केले. अतुल भातखळकर यांनी आभार मानले. बैठकीला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महसूल मंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीकर, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी मंत्री विष्णू सावरा, उर्जामंत्री चंद्रशेखर वावनकुळे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, विनय सहस्त्रबुद्धे, व्ही. सतीश आदी उपस्थित होते.

सुरुवात जावयांच्या हस्ते

'राज्य प्रदेश कार्यकारणीची बैठक कोठे घ्यावी आणि त्याचे उदघाटन कोणाच्या हस्ते करावे? असा प्रश्न होता' असे सांगून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, 'प्रदेश कार्यकारणीची बैठक करवीर निवासिनी अंबाबाईसमोर नतमस्तक होऊन सुरू करावी आणि त्याचे उदघाटन जावयांच्या हस्ते करावे म्हणजे पुढील कार्य सफल होतील असा निर्णय घेतला. त्यामुळेच कोल्हापूरचे जावई असलेले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते उदघाटन करण्याचा निर्णय झाला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी विकत घेण्याची वेळ

0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळे तर्फ मलकापूर या गावात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. येथील पाणीयोजना कुचकामी ठरल्या असून सायफन पद्धतीने होत असलेला पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

डोंगरभागात वसलेल्या कळकेवाडी, धनगरवाडा, बामणेवाडी, ढोलेवाडी व रिंगेवाडी या पाच वाड्यांसह शिराळे तर्फ मलकापूर या गावची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाला कळकेवाडी व धनगरवाड्याच्या बाजूला असलेल्या नैसर्गिक स्त्रोताद्वारे सायफन पद्धतीने गेल्या पंचवीस वर्षापासून पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात सायफन पद्धतीने येथे पाणी मिळू शकत नाही.

सध्या पाच वाड्यापैकी धनगरवाड्यावरील पंधरा कुटुंबांना अर्ध्या किलोमीटर अंतरावर डोंगरकपारीत साठविलेल्या झऱ्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. रात्रभर या झऱ्यात पाणी साठल्यानंतर पहाटेपासूनच एक एक घागर मिळविण्यासाठी या ठिकाणी महिलांची झुंबड उडते. कळकेवाडीतील लोक सायफन पद्धतीने साठलेले विहिरीतील पाणी गोळा करत आहेत.

सर्वात मोठी पाणी समस्या शिराळेतल्या ग्रामस्थांना भेडसावत आहे. इथला सायफन पद्धतीने होत असलेला पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे. गावात असलेल्या दोन्हीही कुपनलिकांना पाणी नाही. एका शेतकऱ्याची जी कूपनलिका आहे तिला मुबलक पाणी असल्याने लोकांना त्यांच्याकडून दोन रुपये घागर, चाळीस रुपये बॅरेल याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गावात एखाद्याचे लग्नकार्य असेल तर त्यांना सातशे रुपये प्रमाणे एक टॅंकर विकत घ्यावा लागत आहे.

उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी मुंबईतले चाकरमानी आपल्या मुलाबाळांसह गावी आले आहेत. परंतु त्यांचा अधिकांश वेळ मिळेल त्या ठिकाणी पाणी गोळा करण्यासाठीच जात असल्याने चाकरमान्यांनी सर्वाधिक धास्ती पाण्याचीच घेतली आहे. ज्यांच्या स्वतःच्या बोअर्स आहेत त्यांना मात्र पाणीटंचाईची कोणतीच झळ पोहोचत नाही. उन्हाळ्याच्या दोन महिन्याच्या पाणीटंचाईसाठी ग्रामपंचायत पातळीवरही पावले उचलली जात नाहीत.

गॅस्ट्रोची साथ

ज्या ठिकाणाहून सायफन पद्धतीने गावाला पाणीपुरवठा होत होता त्या ठिकाणी महिला वर्गांनी कपडे धुतल्याने साबणाच्या पाण्याने हे पाणी दुषित झाले होते. त्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरली होती. हे दुषित पाणी ग्रामस्थांना प्यावे लागल्यामुळे गावातील सुमारे अडीचशे लोकांना याची लागण झाली होती. दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती.

पेयजल योजनेला गती देण्याची गरज

गावासाठी ८९ लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर आहे. सध्या या योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या योजनेतून कळकेवाडीसह संपूर्ण गावाला सायफन पध्दतीने पाणीपुरवठा करावयाचा असल्याने कळकेवाडीतल्या शेतात वीस फुट खोल खड्डा खोदला आहे. गेल्या चार दिवसापासून हे काम बंद आहे. संबधित कंत्राटदाराने हे काम गतीने पावसाळ्यापूर्वी केले तर ठीक नाहीतर भर पावसात केलेले काम वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांच्या वतीने बोलून दाखवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता ‘वन’वास संपणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरच्या विमानतळासाठी आणि काळम्मावाडीच्या थेट पाइपलाइन योजनेसाठी वनजमीन देण्यास तातडीने परवानगी दिली जाईल' असे केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय 'चांदोली अभयारण्याग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. एव्हीएच प्रकल्पावर मंत्रालयाच्या समितीचा अहवाल येताच निर्णय घेऊ. विमानतळ आणि पाइपलाइन योजनेसाठी वनजमीन देण्याचा प्रस्ताव आल्यानंतर दोन महिन्यांत मंजूरी देऊ. त्यामोबदल्यात राज्य सरकारला इतरत्र वनक्षेत्र दुप्पट विकसित करण्यात सांगू' असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, 'प्राण्यावर अत्याचार न होता बैलगाडी शर्यत घेतली जावी. त्यासाठी प्रसंगी कायदा बदलण्याची सरकारची भूमिका आहे. अभयरण्यातून स्वत:हून अन्यत्र स्थलांतरीत होणाऱ्या ग्रामस्थांना नुकसानभरपाई वाढवून देण्यात येणार आहे. पश्चिम घाटासंदर्भात कस्तुरीरंगन समितीने दिलेल्या अहवालाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांची भूमिका महत्त्वाची आहे. पश्चिम घाट असलेल्या सात राज्यातील अशा गावांमध्ये जनमत घेतले जात आहे. कस्तुरीरंगन समितीने काय सुचविले आहे? याची माहिती देऊन लोकांना काय हवे याची माहिती घेतली जात आहे. तीन राज्यांचे अहवाल तयार झाले असून इतर राज्यांचे अहवाल जून महिन्यांपर्यंत येतील. त्यानंतर निर्णय घेतले जातील. यात गावांच्या भूमिकेला प्राथमिकता असेल', असे ते म्हणाले.

जावडेकर म्हणाले, केंद्र सरकार वने विकसित करण्यासाठी राज्यांना ३८ हजार कोटींचा निधी देणार आहे. यात गवताळ कुरणे आणि पाणवठे निर्माण करण्यासही प्राधान्य असेल. त्यामुळे हत्तींसारखे वन्यप्राणी जंगलातून बाहेर येवून शेतीचे नुकसान करणार नाहीत. शेड्युल्ड 'अ'मध्ये नसलेले प्राणी जर शेतीचे नुकसान करत असतील आणि त्यांना उपद्रवी प्राणी जाहीर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला, तर तो मान्य केला जाईल. नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या सर्व डिस्टिलरी या 'झीरो' डिस्चार्ज आणि चोवीस तास प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा असणाऱ्या असल्या पाहिजेत असा नियम केला जाईल. तसेच जुन्या डिस्टिलरीसंदर्भात असे नियम करण्यात येतील. त्यांना ठराविक मुदत देऊ. त्यांना प्रदूषण नियंत्रणसाठी अशा यंत्रणा बसविण्यात सांगण्यात येणार आहे.

याशिवाय देशभरातील प्रदूषण नियंत्रण मंडळे सक्षम आणि मजबूत करण्यात येणार आहेत. वन्य जमिनींवर अतिक्रमणे होणार नाही यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईचे पायी दर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आणि राज्य परिषदेच्या निमित्ताने भाजपचे निम्मे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कोल्हापुरात दाखल झाले आहे. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्यातील मंत्री, भाजपचे खासदार आणि कार्यकारिणीच्या सभासदांनी बिदू चौकातून चालत जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले.

कार्यकारिणीची बैठक आणि राज्य परिषदेच्या निमित्ताने भाजपचे मंत्री, वरिष्ठ नेते कोल्हापुरात आले आहेत, त्यांनी परिषदेच्या सुरुवातीपूर्वी बिंदू चौकातून चालत जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यासाठी बिंदू चौकात मंडप उभारण्यात आला होता. तेथे हलगी आणि तुतारीच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत होते.

बिंदू चौकात पाहुण्यांना भगवा लहरी फेटा बांधण्याची सोय केली होती. नीलेश मुळे आणि त्यांच्या दहाजणांच्या टीमकडे हे काम होते. कडक ऊन असतानाही उपस्थित पाहुणे उत्साहाने फेटे बांधून घेत होते, यात महिलाही आघाडीवर होत्या. विशेष म्हणजे फेटा परिधान केल्यानंतर एकमेकांसमवेत, फक्त स्वत:चे, नेत्यांसमवेत फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

दहाच्या सुमारास मुख्यमंत्री फड‌णवीस आणि अमित शहा यांचे बिंदू चौकात आगमन झाले. त्यांना फेटा बांधल्यानंतर त्यांनी ‌‌बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हलगीच्या निनादात फडणवीस, शहा, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, आदींसह सर्व उपस्थित अंबाबाईच्या मंदिराकडे चालत गेले. दक्षिण दरवाजानजीक अजित ठाणेकर यांनी उपस्थितांना कमळाची फुले देण्याची व्यवस्था केली होती, तर मंदिरात देवस्थान समितीच्यावतीने उपस्थितांना देवीचा प्रसाद देण्यात आला. दर्शनानंतर सर्व मंत्री विद्यापीठ हायस्कूल येथून परिषदेच्या‌ठिकाणी गेले.

रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी

बिंदू चौक ते भवानी मंडपातील क्रीडा स्तंभापर्यंच्या रस्त्याची स्वच्छता करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांगोळी काढली होती. तसेच केळीचे खांब उभारण्यात आले होते. याशिवाय या मार्गावर २२ स्टेरिओवरून महालक्ष्मी स्तोत्र आणि महिशासुरमर्दिनी स्तोत्राची धून वाजविण्यात येत होती. याशिवाय मार्गावर जागोजागी अंबाबाईची विविध रूपे दर्शविणारे, मंदिर आणि परिसराचे वैभव दर्शविणारी 'स्टँडी' उभे केले होते.

राग भटियारचे सूर

भाजपच्या अधिवेशनाच्या निमित्ताने भवानी मंडपाच्या कमानीत सनई, चौघडा आणि पेटीचे सुरू निनादले. पहाटेच्या समयी राग भटियारचे सूर कानांना विलक्षण अशी तृप्ती देतात, हे जाणून राग भटियार सादर करणारे माणगाव येथील कलाकार अशोक केंगार, रघुनाथ कोरवी आणि शिवाजी कोरवी यांना पाचारण केले होते. भवानी मंडपात सकाळच्या मंगलप्रहरी राग भटियार कानावर पडणे ही परिसरातील नागरिकांसाठी पर्वणीच ठरली.

शहा दाम्पत्याकडून देवीला अभिषेक

अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल सकाळी साडेआठ वाजता म‌ंदिरात पोहोचले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश जाधव होते. शहा दाम्पत्याने अंबाबाईला अभिषेक घेतला. यावेळी शहा यांची भेट घेण्यासाठी म‌ंदिराबाहेर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहा मंदिरात उपस्थित असताना भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी स्वतः म‌ंदिरात येऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंचे हल्लेखोर कर्नाटकचे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे खुनी कर्नाटकातील असावेत अशी शक्यता एसआयटीने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात आल्यानंतर एसआयटीची बैठक घेतली. या बैठकीवेळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पडताळून पाहिलेल्या अनेक शक्यतांपैकी ही एक शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंड दाखवून दिवंगत गोविंदराव पानसरे यांचे हल्लेखोर सापडत नसल्याबाबत निषेध केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या आहेत. त्यानुसार हल्लेखोर कोठून आले असावेत आणि कुठे गेले असावेत याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याप्रमाणेच हल्लेखोरांची रेखाचित्रेही तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्याबाबत एसआयटीचे प्रयत्न सुरू असून लवकरच हल्लेखोरांपर्यंत पोहचले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांकडून अनेक प्रयत्न करुनही हल्लेखोर हाताला लागत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी पोलिसांकडून एक नवीन खुलासा केला जात आहे. आता नव्याने हे हल्लेखोर कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासाचा सुगावा लागत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. गेल्या काही दिवसांत विविध शक्यतांवर पोलिस तपास करीत आहेत. या खुनाच्या तपासासाठीही सुमारे वीसहून अधिक टीम कार्यरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ण टोलमुक्तीला सरकार अनुकूल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरच्या संपूर्ण टोलमुक्तीसाठी सरकार सकारात्मक आहे. ती तोंडदेखली होऊ नये यासाठी मूल्यांकन आवश्यक आहे; पण जिल्ह्यातील वाहनांची टोलमुक्ती तत्काळ होऊ शकते', असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण टोलमुक्तीला वेळ लागणार असल्याचेच सूचित केले. टोल विरोधी कृती समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करून, 'या शब्दापासून मुख्यमंत्री ढळणार नाहीत,' असा विश्वास व्यक्त केला. तसेच आयआरबीचे खोकेही दिसू नये, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्यानिमित्ताने टोलविरोधी कृती समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची समितीसोबत बैठक घडवून आणली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यानुसार शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत एन. डी. पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, निवास साळोखे यांच्यासह व्यापक शिष्टमंडळाची बैठक झाली.

त्यामध्ये फडणवीस म्हणाले, 'मूल्यांकनानंतर कंत्राटदाराचे पैसे भागवण्यासाठी विविध पर्याय सुचवले आहेत. सध्याच्या प्लॉटवर एफएसआय वाढवून देण्याबरोबरच आणखी काही प्लॉट देऊन त्याला जादा एफएसआय देण्याबाबत तसेच अन्य काही सहकार्य हवे असल्यास सरकार महापालिकेला मदत करेल. पेट्रोल, डिझेलवर सेस बसवला जाऊ शकतो. पण, अंतिम तोडगा निघेपर्यंत कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना टोलमाफीच्या पर्यायावर दुमत असल्यास पालकमंत्र्यांशी यांच्याशी चर्चा करा.'

खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांवरील खटले काढून टाकण्याबरोबरच तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याची मागणी केली. खासदार महाडिक, आमदार क्षीरसागर यांनीही भूमिका मांडली.

जनतेचे पैसे झाडाला लागलेले नाहीत. त्यामुळे झालेल्या कामापेक्षा चार आणेसुद्धा कंपनीला जादा देता कामा नये. त्यासाठी मूल्यांकन झाले पाहिजे. गेल्या सरकारच्या तुलनेत या सरकारची भू्मिका स्वच्छ दिसते.

-प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती तुटली; ताकद कळली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी असलेली युती तुटली नसती, तर आम्हाला आमची खरी ताकद कळली नसती, असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. 'विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेशी अनेक वर्षांपासून असलेली युती तुटेल, असे वाटले नव्हते. मात्र, निवडणुकीच्या काळात युती तुटली. खूप कमी कालावधी शिल्लक होता, तरीही त्या परिस्थितीला सामोरे जाऊन भारतीय जनता पक्षाने आपली ताकद काय आहे हे दाखवून दिले,' असे फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नमूद केले.

कोल्हापुरातील पेटाळा मैदानावरील 'दिवंगत गोपीनाथ मुंडे'नगरीतील या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'भाजप एक सशक्त पक्ष म्हणून समोर येऊ लागला आहे. आपली ताकद वाढवू लागला आहे. सदस्य नोंदणी मोहिमेतही एक कोटी सदस्य झाले आहेत. त्यामुळे सरकारसमोर काहीच अडचणी येणार नाहीत. सताधारी पक्ष म्हणून सरकारचे निर्णय कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले, तरच पुढील काळात जनतेची ताकद भाजपसोबत राहील.'

'जनतेच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ न देता गेल्या वर्षभरात सरकराने निर्णय घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकार आणि पक्षात समन्वय राखणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाचा खरा चेहरा असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातही समन्वय असला पाहिजे,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील पारदर्शक आणि गतिमान कारभार करीत आहे. शेतकऱ्यांसाठीच्या भूसंपादन कायद्यात थेट जमीन घेतल्यास सव्वाचारपट अधिक रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. रक्ताच्या नात्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रद्द करण्यात आल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला, असे सर्व मतदारसंघ दत्तक घ्या.

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. जैतापूर प्रकल्प आणि शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेना सहमत नाही.

- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष

मोदी लाटेमुळे भाजपला विजय मिळाला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सगळ्यांच्याच विरोधात लढून ६३ जागा जिंकल्या हे विसरून चालणार नाही.

- दिवाकर रावते, नेते, शिवसेना, (मुंबईत बोलताना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images