Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

के. पी. पाटील यांचा एकतर्फी विजय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती (केडीसीसी) बँकेसाठी भुदरगड तालुक्यात चुरशीने मतदान झाले. मात्र निकाल एकतर्फीच लागला. या निवडणुकीतून के. पी. पाटील यांच्या गटाअंतर्गत काही धुसफूस आहे का याचा अंदाज विरोधकांनी घेतला. तर कोणतीही निवडणूक आणि कोणताही विरोधक सहज घ्यायचा नाही, याचा धडा माजी आमदार के. पी. पाटील यांनी घेतल्याचे निकाला नंतर स्पष्ट झाले.

विधानसभा निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी विजय मिळविल्यानंतर भुदरगड तालुक्यात के. पी. पाटील यांचे विरोधक आमदार आबिटकर यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येत होते. त्यातच बिद्री साखर कारखान्याच्या १४ हजार सभासदांचा निकाल उच्च न्यायालयाने के. पी. पाटील यांच्या सतारूढ गटाच्या विरोधात दिला होता. त्यामुळे विरोधकांच्यात तालुक्यात के. पी. पाटील यांची राजकीय मांड पुन्हा बसू द्यायची नाही अशी व्यूहरचना होती. त्याचबरोबर के. पी. पाटील गटात अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे बोलले जात होते. याचा फायदा घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण ६० चा आकडा गाठणार नाही याची कल्पना असतानासुद्धा निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.

के. पी. पाटील यांचे एकेकाळचे सहकारी माजी सभापती नंदकुमार ढेंगे यांनी निवडणूक लढविली. २०६ ठरावधारकांच्या पैकी केवळ ३४ मते विरोधी नंदकुमार ढेंगे यांना मिळाली. तर १७१ मते माजी आमदार के. पी. पाटील यांनी घेऊन विक्रमी विजय मिळविला.

आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव, मधुकर देसाई, बी. एस. देसाई हे मातब्बर एका बाजूला असतानाही ढेंगे यांना ५० चा आकडा गाठता आला नाही. माजी आमदार के. पी. पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम लागल्यापासून गावागावात संपर्क वाढविला होता व ठराव आपल्याच कार्यकर्त्याला कसा मिळेल याची व्यूहरचना केली होती.

किमान १४० ठरावाची बांधणी त्यांनी निवडणुकीपूर्वीच करून ठेवली होती. त्यात माजी आमदार बजरंग देसाई यांनी आपले ठराव के. पी. पाटील यांना दिले. तर विरोधक केवळ निवडणूक लढवायची या इराद्यात होते. उमेदवार कोण असणार या बद्दलसुद्धा ठोस तयारी नव्हती. विरोधी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपले ठरावधारक नजरकैदेत ठेवले होते. या विजयामुळे के. पी. पाटील यांच्या गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर विरोधकांना विधानसभेनंतर गोकुळ आणि जिल्हा बँकेत चांगलीच चपराक बसली आहे. आता बिद्रीचे मैदान जवळच आहे. त्यात पुन्हा के. पी. पाटील, आमदार आबिटकर आमने - सामने येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यड्रावकरांची व्यूहरचना यशस्वी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत माजी आमदार सा.रे.पाटील गटाची भूमिकाही निर्णायक ठरली, तर विधानसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका निंबाळकर यांना भोवली.

जिल्हा बँकेसाठी शिरोळ तालुक्यात विठ्ठलराव नाईक निंबाळकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात दुरंगी लढत झाली. जिल्हा पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी प्रणित छत्रपती शाहू विकास आघाडी आणि शिवसेना, भाजप युतीमध्ये लढत झाली असली तरी शिरोळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादी अंतर्गतच सामना रंगला. दोन्हीही एकाच पक्षाचे शिलेदार असल्याने ही निवडणूक चुरशीची बनली होती. स्व.शामराव पाटील यड्रावकर यांचे सहकारी असणारे विठ्ठलराव नाईक निंबाळकर हे गेली दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांनी बँकेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. बँकेच्या गेल्या निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माघार घेवून निंबाळकर यांना पाठबळ दिले होते. मात्र निंबाळकर यांनी शामराव पाटील यड्रावकर यांच्या निधनानंतर आपली वेगळी चूल मांडली व यड्रावकर गटाला विरोधाची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जवळ केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाने नियोजनबध्दरित्या मोर्चेबांधणी केली. त्यांना सा.रे.पाटील गटाचेही पाठबळ मिळाले, याचबरोबर छुपा पाठिंबाही मिळाला. शिरोळ तालुक्यात १४८ सेवा संस्थांपैकी दोन अपात्र होत्या. यामुळे १४६ संस्थांचे ठराव झाले होते. यड्रावकर आणि सा.रे.पाटील गटाविरूध्द घेतलेल्या भूमिकेचा 'गोकुळ'च्या निवडणुकीत दिलीप पाटील यांना फटका बसला होता. यामुळे बँकेतील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निंबाळकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तालुक्याच्या राजकारणात कुरघोडी करणाऱ्या निंबाळकर यांना शह देण्यासाठी यड्रावकर यांनी सर्व ताकद पणाला लावली.

नाराजी भोवली

विधानसभेच्या निवडणुकीत निंबाळकर, 'गोकुळ' चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील व सहकाऱ्यांनी शिरोळ तालुका विकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठबळ दिले होते. यड्रावकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात असताना निंबाळकर यांनी शिवसेनेचा प्रचार केला होता. या भूमिकेमुळे यड्रावकर गटाबरोबरच सा.रे.पाटील गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाराजी निंबाळकर यांना पत्करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकण रेल्वे कोल्हापुरातच येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठी सर्वांत जवळचा मार्ग म्हणून कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गाचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूर ते राजापूर मार्गाचाही सर्व्हे पूर्ण झाला आहे. रेल्वेबाबत काटेकोरपणे निर्णय घेणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू साहजिकच रेल्वेच्यादृष्टीने कोणता सोईस्कर व कमी खर्चाचा आहे हे पाहूनच या सर्व्हेपैकी एक निश्चित करतील, अशी शक्यता आहे. कराड ते चिपळूण या मार्गासाठी बजेटची तरतूद केली असली तरी प्रभू वारंवार कोल्हापूर ते वैभववाडी, राजापूर याच मार्गांचा उल्लेख करत असल्याने या दोन्हीपैकी एका मार्गाचे काम लवकर सुरु होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापुरातून वैभववाडी व राजापूर अशा दोन मार्गांनी कोकण रेल्वेला जोडण्याची बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे. राजापूर मार्गाचा यापूर्वी सर्व्हे झाला आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावानंतर मिळणाऱ्या परताव्याची टक्केवारी चांगली दाखवल्याने हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. वैभववाडीबाबत प्रभू यांनी सांगितल्यानंतर सध्या हा सर्व्हे सुरु केला आहे. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर किती अंतर, किती बोगदे, पूल, किती खर्च येईल याचा अंदाज येणार आहे. सध्या हा मार्ग सर्वात नजीकचा आहे, असे सांगण्यात येत आहे. पण तिथेही सह्याद्रीची पर्वतरांग असल्याने खर्च आहेच. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड ते चिपळूण मार्गाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलेल असा ठराव केला. त्यामुळे कोल्हापूरऐवजी कराडमधून कोकण रेल्वेला जोडले जाणार अशी शक्यता बळावली होती. मात्र प्रभू यांनी वेळोवेळी कोकणची रेल्वे कोल्हापूरलाच जोडली जाणे फायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे रेल्वे बजेटमध्ये जरी या मार्गासाठी तरतूद झाली नसली तरी भ​विष्यात हाच मार्ग लवकर सुरु होईल, असे रेल्वे सूत्र सांगत होते. त्यानुसार वैभववाडीचा सुरु करण्यात आलेला सर्व्हे त्यातीलच एक भाग असल्याचे समजण्यात येत आहे. त्यामुळे कराड ते चिपळूणच्या मार्गाचे काय होईल माहिती नाही. पण कोकण रेल्वेला कोल्हापूर तातडीने जोडले जाईल हे स्पष्ट होत आहे.

वैभववाडी मार्गामध्ये ​वनविभागाच्या जमिनीचा फार अडथळा येणार नाही अशी चर्चा आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे राजापूर लोकसभा मतदार संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे राजापूरशी कोल्हापूर जोडले जाण्यासाठी ते सकारात्मक असू शकतात. पण ते खर्चाच्या बाबतीत विचार करतील असे दिसते. वैभववाडी किंवा राजापूर या दरम्यान फार मोठे अंतर नाही. कदाचित दोन्ही शहरांना उपयोग होईल, असे दोन्हीच्या दरम्यानचे ठिकाण जोडण्यासाठी निवडले जाईल, अशीही शक्यता आहे. वैभववाडी, राजापूरपैकी एक मार्ग झाल्यास कमीत कमी वेळात कोकणात जाणे शक्य होणार आहे. तसेच जयगड बंदरातील मालवाहतूकही या मार्गाने पूर्व किनाऱ्याशी वेगाने होणार आहे. कोकण रेल्वेला हा पर्यायी मार्गही होऊ शकतो. त्यामुळे कोकण तसेच कोल्हापूरचा विकासही मोठ्या वेगाने होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते, बांधकामप्रश्नी अधिकारी गप्प का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा टॉवर ते तांबट कमानीपर्यंत रखडलेले रस्त्याचे काम, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, बांधकाम व्यावसायिकांकडून नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली बांधकामे, अपुरा पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांवरून जनता दरबारात नागरिकांचा आवाज उमटला. सदर बाजार परिसरातील झोपडपट्टी भागात बांधकाम व्यावसायिकाने तीनमजली इमारत बांधली आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण होऊनही अधिकारी कारवाई करत नाहीत. अधिकारी सभागृहात एक बोलतात आणि संध्याकाळी

बांधकाम व्यावसायिकासोबत हॉटेलमध्ये दिसतात याचा अर्थ नागरिकांना काय घ्यायचा ? असा सवाल नागरिकांनी केला.

महापौर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार झाला. संदीप पाटील यांनी रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था सांगितली. गेली चार वर्षे ड्रेनेज लाइन व इतर कामासाठी रस्त्याची खुदाई झाली आहे. ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे, पण रस्ता काही पूर्ण झाला नाही. रस्ता खुदाईमुळे भागात धुळीचे साम्राज्य पसरते. रंकाळा तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाले नाही तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अवधूत पाटील, रूपेश इंगवले, निखिल जाधव, शुभम सासणे, स्वप्निल यादव, आदींनी निवेदनही दिले. अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी आयआरबी कंपनीकडून ना हरकत दाखला व इतर तांत्रिक माहिती सांगण्यात सुरुवात केल्यानंतर नागरिकांनी त्याला विरोध करत पावसाळ्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे अशी मागणी केली.

येत्या दोन दिवसांत या संदर्भात नागरिक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे महापौरांनी सांगितले. अब्दुल करीम हासन शेख या नागरिकांनी सदर बाजार येथे झोपडपट्टीत बांधकाम व्यावसायिकाने तीनमजली बांधकाम केले आहे. अधिकारी त्या विरोधात कारवाई करण्याऐवजी बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालत आहेत, असा आरोप केला. अपुरा पाणीपुरवठा, पाणी बिलातील तफावत, मीटर रीडरविषयी तक्रारी झाल्या. जलअभियंता मनीष पवार यांनी या संदर्भातील तक्रारी दूर करण्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्याचा भरणा आता थेट बँकेत होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कच्च्या पावतीच्या आधारे घरफाळ्याची रक्कम भरून घेण्याची पारंपरिक पद्धत बंद करण्यात आली आहे. आता घरफाळ्याची रक्कम थेट बँकेत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेकडून बँकेत घरफाळा भरण्याची कम्प्युटर प्रणाली विकसित केली आहे. पहिल्या टप्प्यात एचडीएफसी व अॅक्सिस बँकेच्या सर्व शाखांमधून घरफाळा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातही घरफाळा भरण्याची सोय आहे. बँकेत भरणा होणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराला आळा बसणार आहे.

महापालिका पहिल्यापासून घरफाळ्याची वसुली कर्मचाऱ्यांकडून कच्च्या पावतीद्वारे करत होती. घरफाळा विभागातील कर्मचारी नागरिकांशी संपर्क साधून घरफाळा रक्कम भरून घेत. मात्र, या रकमेच्या कम्प्युटरवर नोंदी केल्या जात नव्हत्या. याचा फायदा घेत काहीजणांनी वर्षानुवर्षे पैसे हडपल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेतेर्फे थकीत घरफाळा वसुलीदरम्यान व्याज व दंडात सवलत दिली जाते. कच्च्या पावतीद्वारे रक्कम भरून घ्यायची आणि शिल्लक शून्य दाखवायची असा प्रकार उघडकीस आला आहे. बागल चौक मार्केट परिसरातील व्यापारी संकुलाला नियमबाह्यरीत्या सवलत दिल्याची घटना ताजी आहे. या प्रकरणात आठ लाख रुपयांच्या थकीत रकमेची नोंदच महापालिकेकडे नाही. आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शून्य शिलकेच्या १४५५ पावत्या तपासल्या असून अद्याप एक हजार पावत्यांची छाननी केली जात आहे. घरफाळा वसुलीदरम्यान कच्च्या पावतीच्या माध्यमातून अफरातफरी केली जाते हे लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी घरफाळा वसुली पद्धतीत बदलाचा निर्णय घेऊन तत्काळ कच्च्या पावतीद्वारे वसुली बंद करण्याचे आदेश काढला आणि अंमलबजावणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या (सीपीआर) आवारात अतिक्रमणांनी विळखा घातला असून, सीपीआरचा श्वास कोंडला जाऊ लागला आहे. टू व्हिलर व फोर व्हिलर पार्किंग, खाद्यपदार्थांच्या गाड्या, अनधिकृत रिक्षा स्टॉपमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना सीपीआर प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे. अतिक्रमणे हटवून शिस्त लावण्यासाठी राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कारवाईचा डोस द्यावा, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून होत आहे.

सीपीआरमध्ये रोज दोन ते अडीच हजार रुग्ण दाखल होतात. हॉस्पिटलच्या अनेक विभागात रुग्णांवर छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रसूती व अपघात विभाग चोवीस तास कार्यरत असतो. हॉस्पिटलमध्ये १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका, खासगी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका येत असतात; पण सीपीआरच्या आवारात अनधिकृत टू व्हिलर पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. न्यायालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक, रुग्णांचे नातेवाईक सीपीआरच्या दोन्ही बाजूला वाहने लावतात. त्यातच हॉस्पिटलची दोन फाटके कायमस्वरूपी बंद केली आहे. सीपीआरमध्ये आत व बाहेर जाण्याचा मार्ग एकच असल्याने सकाळी साडेनऊ ते दुपारी चारपर्यंत वाहतुकीची कोंडी होत असते. रुग्णवाहिकेला वॉर्डपर्यंत जाण्यास रस्ता नसतो. सीपीआर हॉस्पिटलसमोर फिजिओथेरपिस्ट वॉर्डसमोर अतिक्रमण करून खाद्यपदार्थ व शीतपेयांच्या दोन हातगाड्या नुकत्याच उभारल्या आहेत. एक्स-रे विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर चहाचे गाडे अनेक वर्षे आहेत. प्रसूती विभागाच्या दारात चहाचे दोन गाडे आहेत. खाद्यपदार्थांच्या गाड्यांना परवानगी कोण देतो, हा संशोधनाचा विषय आहे. या गाड्यांना पाणी व वीज सीपीआर हॉस्पिटलमधून पुरवली जाते.

प्रसूती विभागाच्या ठिकाणी गेल्या वर्षभरात अनधिकृत रिक्षा थांबा उभारला आहे. या थांब्यावरून जादा भाडे आकारून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक केली जाते. तरीही हॉस्पिटल प्रशासन कानाडोळा करत आहे.

वाढदिवसाच्या फलकांना ऊत

सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात गंभीर व दुर्धर रोगाची माहिती देणारे प्रबोधन फलक लावले जातात. पण या फलकांवर राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे फलक लावले जातात. शाहूपुरीतील गुंडाच्या वाढदिवसाचा फलक झळकला होता. सीपीआरमधील एक स्वयंघोषित नेता 'देशात नरेंद्र, राज्यात देवंद्र व सीपीआरमध्ये सुरेंद्र' असा फलक प्रत्येक राष्ट्रपुरुषाच्या वाढदिनी लावत असतो. अशा फलकांकडे प्रशासन कानाडोळा करत आहे.

सोनेरी टोळी

हॉस्पिटलमधील बिल कमी करून देतो, असे सांगून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक फसवणूक करणारी सोनेरी टोळी सीपीआर आवारात कायम फिरत असते. सिव्हिल सर्जनचा दाखला देणे, बिले मंजूर करून देणाऱ्या एजंटांचा वावर खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर असतो. अशा टोळ्या बदनामी अस्त्र वापरून काम करत असल्याची चर्चा आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही दोघे भाऊ-भाऊ... सारे मिळून खाऊ...

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

'आपण दोघे भाऊ-भाऊ...सारे मिळून वाटून खाऊ ' या सूत्राचा पुरेपूर वापर करत दोन्ही काँग्रेसने सत्तेची वाटणी करून घेतल्याचे जिल्हा बँकेच्या निकालावरून स्पष्ट झाले. 'गोकुळ तुम्हाला अन जिल्हा बँक आम्हाला' असे म्हणत राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे नेते आपआपासात लढत बसल्याने शिवसेना भाजपने खिंडार पाडले. यामुळे ठेच लागलेल्या नेत्यांनी आपला जुना फॉर्म्युला अमंलात आणला अन तो यशस्वीही झाला. ज्यांच्यामुळे बँक अडचणीत आली, त्यांच्याच हातात पुन्हा सभासदांनी सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत, त्यामुळे आता मात्र या संचालकांवार विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान आहे.

'गोकुळ' गेल्या अनेक वर्षापासून आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांच्या रूपाने काँग्रेसची सत्ता आहे. ती उलथून टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने दोन वेळा केला. पण त्यामध्ये फारशे यश आले नाही. त्यामुळे सपशेल शरणागती पत्करत त्यांनी गोकुळ मध्ये काँग्रेसला बाय दिला. त्यातून दोन जागा पदरात पाडून घेतल्या. हा बाय त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कामाला आला. तेथे काँग्रेसने फारशी आदळआपट न करता राष्ट्रवादीला मदतीची भूमिका घेतली. तुम्ही गोकुळकडे बघू नको, आम्ही बँकेकडे बघत नाही असा जणू संदेशच त्यांनी दिला. यामुळे सध्या तरी बँकेवर राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता आली आहे. संयुक्त आघाडी गेल्याने काँग्रेसला सत्तेत वाटा मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस एकत्र न लढल्याने मोठा दणका बसला. शिवसेनेच्या सहा जागा या त्यांच्या ताकदीवर आल्या नाहीत, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या वादाचा त्यांना फायदा झाला. यामुळे मात्र दोन्ही काँग्रेसचे नेते शहाणे झाले. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी दोघे मिळून सत्ता मिळवण्याचे नियोजन केले. महाडिक आणि माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातील वाद या निवडणुकीत गाजला. पण त्याचा फटका फारसा पक्षाला बसला नाही. कारण विरोधी गटातून निवडून आलेले सुभाष बोंद्रे राष्ट्रवादीचेच आहेत. अंबरिश घाटगे यांच्यावर शिवसेनेचा शिक्का नाही. यामुळे गोकुळ हे पूर्णपणे काँग्रेसच्याच ताब्यात असल्याचे सिद्ध झाले. गोकुळमध्ये ही रणनिती यशस्वी झाल्यानंतर जिल्हा बँकेत सुद्धा तीच निती आखण्यात आली​. आणि तेथे सुद्धा ते यशस्वी झाले.

महाडिक व पी. एन. यांना मुश्रीफांनी गोकुळमध्ये बाय देताच या दोघांनी बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफांना पुढे चाल दिली. हे करताना आपली जागा बिनविरोध करून घेतली. सोबत विनय कोरे यांना घेत त्यांनाही खूष केले. आपली ताकद नसतानाही शिवसेना व भा​जपाने चांगली ताकद दिली. येथे पुन्हा त्यांना मदत मिळाली ती दोन्ही काँग्रेसमधील गटबाजीचीच. ही गटबाजी नसती तर जयंत पाटील पुन्हा संचालक झाले असते. पण तसे न झाल्याने अनिल पाटील यांच्या रूपाने भाजपाने बँकेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी जी भूमिका बजावली त्याचा राग सतेज पाटील समर्थकांनी काढला. गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद असताना प्रा. पाटील यांना मात्र अतिशय कमी मते मिळाली. यामुळे त्यांचा पराभव झाला.

जिल्हा बँक अडचणीत आल्याने पाच वर्षापूर्वी त्यावर प्रशासक नेमण्यात आला. पण तेव्हा जे संचालक होते, त्यातील बहुसंख्य चेहरे पुन्हा निवडून आले आहेत. जे दोन तीन नवीन चेहरे आहेत, त्यांना बँकेच्या कारभाराचा अनुभव नाही. त्यामुळे जुन्या कारभाऱ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. बँकेचा वापर राजकारणासाठी केल्याने तेव्हा बँक अडचणीत आली होती. त्याची शिक्षा मिळाली आहेच. त्यामुळे हे कारभारी आता गांभिर्याने काम करतील अशी जनतेची अपेक्षा आहे. बँकेवर आता मुश्रीफांची एकतर्फी सत्ता आली आहे. त्यांना वेसन घालण्याचे काम काँग्रेस करणार की त्यांच्या सुरात सूर मिसळणार यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जाबाबत कधीच तडजोड नाही

$
0
0

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासमोर मोठी आव्हाने आहेत. त्या आव्हानांना सामोरे जात नवी आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. याची जाणीव ठेवत तरुणांना दूध व्यवसायात आणणे, 'गोकुळ'चे पूर्ण संगणकीकरण करणे आणि मध्यान्ह भोजनामध्ये गोकुळ दुधाचा वापर यासाठी अध्यक्षपदाच्या काळात प्राधान्य देणार असल्याची माहिती 'गोकुळ'चे नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी दिली. त्यांच्याशी गोकुळच्या भविष्यातील नियोजनाबाबत केलेली चर्चा...

'गोकुळ'समोर कोणती आव्हाने आहेत ?

गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याचवेळी जागतिक स्तरावर दुधाचे पडलेले दर आणि शिल्लक असलेली पावडर यांचा ताळमेळ घालण्याचे मुख्य आव्हान आहे. कच्च्या मालाच्या किंमती अधिक आहेत, त्याला पर्याय निर्माण करावा लागेल. शिल्लक राहणाऱ्या दुधावर प्रक्रिया करून बाजारात चांगला चालणार आणि मार्केट काबीज करणारा पदार्थ तयार करावा लागणार आहे. या पदार्थाच्या माध्यमातून पुन्हा गोकुळची नवी ओळख तयार होईल, असे काम करण्याचे नियोजन आहे.

नव्याने कोणते बदल करावे लागतील?

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्यात आलेल्या दूधावर प्रक्रिया करावी लागते. त्यापासून सध्या बनविली जाणारी पावडर शिल्लक राहत आहे. या पावडरला चांगला दर मिळत नाही. तर शेतकऱ्यांना मात्र पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या फरकाच्या रकमेवर सरकार इन्कम टॅक्स आकारत आहे. त्यामुळेही गोकुळचे नुकसानच होते. ही सर्वात मोठी असलेली अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

पहिल्यांदा कोणते काम हाती येणार?

सध्या युवक दुधाच्या व्यवसायापासून दूर जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत त्यांना दुधाच्या व्यवसायातून एक चांगले उत्पन्न मिळेल आणि पूर्णवेळ दूधाचा व्यवसाय करता येईल, असे नियोजन करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 'गोकुळ'च्या डेअरी संगणकीकृत आहेत आणि मुख्य कार्यालय संगणकीकृत नसल्याचा आरोप केला जात आहे. तो खोडून काढून संपूर्ण गोकुळचे संगणकीकरण करण्याचा प्रयत्न अध्यक्षपदाच्या काळात केला जाणार आहे.

ऑडिट रिपोर्टमध्ये त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत याबाबत कोणती कार्यवाही करणार?

आपण म्हणताय ते खरे आहे. ऑडिटरनेही काही त्रुटी दाखविल्या आहेत. त्या कशा सुधारता येतील यासाठी प्रयत्न होणार आहेत. गोकुळमध्ये होत असलेला अतिरिक्त खर्च कमी करण्याचे कर्मचाऱ्यांच्या बदल्या किंवा इतर कोणत्या पद्धतीने खर्च कमी करता येईल, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

गोकुळचे नवीन कोणते प्रकल्प उभे राहत आहेत?

गोकुळच्या नवीन विस्तारित प्रकल्पांसाठी काम केले जाणार आहे. सध्या बिद्री, गडहिंग्लज, शिरोळ येथे विस्तारीकरण सुरू असून नवी मुंबई येथेही प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. वासरू संगोपन ही योजना गोकुळला उर्जितावस्था देणारी आहे. त्यामुळे त्या योजनेची वाढ भविष्यात कशी करता येईल याबाबत काम केले जाणार आहे.

'गोकुळ'साठी कोणत्या योजना असतील?

मध्यान्ह भोजनासाठी गोकुळच्या दूधाचा वापर मुलांसाठी करण्याचेही नियोजन करण्याचा विचार आहे. तसे झाले तर 'गोकुळ'च्या दुधाला चांगली मागणी येईल. एनडीडीबीकडून ८८ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याच्या माध्यमातून ७ लाख लिटरचे १२ लाख आणि १२ चे १५ लाख लिटर दूध कसे निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गृहीत धरू नका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात विरोधकांना गृहीत धरू नका असा सज्जड इशरा अध्यक्ष निवडीच्या सभेत चंद्रकांत बोंद्रे यांनी दिला. तर अंबरिश घाटगे यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोधकांची भूमिका सक्षमपणे निभावू असे सांगून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी विरोधकांना कारभाराव टीका करण्याची संधी देणार नाही असे सांगितले.

अरुण नरके यांनी पाटील यांचे सुचविले.

यावेळी पाटील म्हणाले, गोकुळ समोरील सर्व आव्हाने सक्षमपणे पेलली जातील. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ही आव्हाने पेलत असतानाच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. संचालक मंडळामध्ये विरोधक असले तरी त्यांना विरोध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कारण राहणार नाही, अशा प्रकारचे कामकाज करू. ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले, अलीकडच्या काळात सहकारी संस्था अडचणीत येत आहेत. संस्थांवर प्रशासक आले आहेत. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक कराभार करावा लागणार आहे. रणजित पाटील यांनी गेल्या ३५ वर्षातील कामकाजाचा आढाव घेत सर्वांनी एकत्रित काम केल्याने गोकुळची प्रगती झाल्याचे म्हटले.

चंद्रकांत बोंद्रे यांनी पहिल्याच बैठकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. संचालक मंडळात नाव घेताना विरोधकही आहेत याची आठवण ठेवून काम करा. शेतकरी केंद्रबिंदू ठेवूनच काम केले पाहिजे. आम्ही सुद्धा यापूर्वी गोकुळमध्ये काम केले आहे आणि दूध पावडरचा प्रकल्प फायद्यात आणला आहे. त्यामुळे कोणतीही कारणे देऊ नका असेही त्यांनी स्पष्ट केले. तर अमरिश पाटील यांनीही आम्ही विरोधक असून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई यांचीही भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीने केला ‘सरां’चा गेम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था गटात अटीतटीची लढत झाली. या गटातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार अनिल पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे प्रा. जयंत पाटील यांचा चार मतांनी पराभव केला. शेवटच्या मतपत्रिकेपर्यंत ही लढत अटीतटीचे ठरली. प्रा. पाटील यांचा अनिल पाटील यांनी चार मतांनी पराभव केला. कारभारी म्हणून वावरणाऱ्या जयंत पाटील यांचा एकप्रकारे गेम केला.

प्रा. पाटील हे राजकीयदृष्ट्या कसलेले आणि मुरब्बी कार्यकर्ते समजले जातात. त्यांचे राजकीय कौशल्य जरी वाखाण्याजोगे असले तरी त्यामुळेच जिल्ह्यातील काही नेत्यांशी त्यांनी वैरही ओढवून घेतले आहे. तर दुसरीकडे अनिल पाटील सहकारी ‌बँकिंग क्षे‌त्रातील अभ्यासू कार्यकर्ते समजले जातात.

करवीर तालुक्यातील मतमोजणी झाली. येथे प्रा. पाटील यांना १७७ तर अनिल पाटील यांना १४६ मते मिळाली. अनिल पाटील यांना करवीरमधून जास्त मते मिळण्याची अपेक्षा होती, तेथे प्रा. पाटील यांनी मुसंडी मारली. सुरुवातीच्या अर्ध्या तासात प्रा. पाटील यांनी ६० मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित अशीच परिस्थिती निर्माण झाली. पण कागलमध्ये प्रा. पाटील यांना जास्त मतांची अपेक्षा असताना तेथे त्यांना ५७ तर ‌अनिल पाटील यांनी ५७ मते मिळाली. अनिल पाटील यांना गडहिंग्लज (५५), आजरा येथे (४६), हातकणंगले (११६) अशी मते मिळाली. चंदगडमध्ये प्रा. पाटील यांना १३ तर अनिल पाटील यांना ४२ मते मिळाली. या मतदार संघातून चांगला हात मिळाल्याने अनिल पाटील यांनी प्रा. पाटील यांची मतांची आघाडी मागे टाकत १२ मतांची आघाडी घेतली.. शेवटी भुदरगडची मतमोजणी सुरू झाली. येथे प्रा. पाटील यांना ३० मते मिळाली तर अनिल पाटील यांना २२ मते मिळाली. मतमोजणी नंतर अनिल पाटील यांना ६१० तर जयंत पाटील यांना ६०६ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी अनिल पाटील यांना विजयी जाहीर केले. त्यानंतर प्रा. पाटील यांनी फेरमोतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत अनिल पाटील यांना कागलमधून एक मत जादा मिळाले तर त्यांचे शिरोळमधील एक मत कमी झाले, पण मतांच्या एकूण बेरजेमध्ये काहीच फरक पडला नाही. फेरमतमोजणी‌चा निकाला जाहीर झाल्यानंतर अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसी’त विधानसभेचे उट्टे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. पण कोल्हापुरातील सहकार क्षेत्रात फारसे वर्चस्व नसतानाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली शिवाय एक जागाही जिंकली.

सेवासंस्था गटात १२ तालुक्यांतील चार ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या होत्या. उर्वरीत आठ तालुक्यांत कार्यकर्त्यांनी लढावे, असे सूत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाचे ठरले होते. यातील शाहूवाडी आणि शिरोळ तालुक्यात धक्कादायक निकालांची नोंद झाली. येथे मानसिंगराव गायकवाड व बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला. शाहूवाडी आणि शिरोळमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटले.

शिरोळमध्ये राष्ट्रवादीचे नेते विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात लढत झाली. नाईक-निंबाळकर हे केडीसीसीचे माजी अध्यक्ष आहेत, तसेच तालुक्याच्या सेवासंस्थावर त्यांची पकड आहे. पण याठिकाणी यड्रावकर यांनी १४२ पैकी ९७ मते घेतली तर नाईक निंबाळकर यांना केवळ ४४ मतांवर समाधान मानावे लागेल. विधानसभा निवडणुकीत शिरोळमध्ये माने गट, निंबाळकर गट, भगवानराव घाटगे यांनी एकत्र येत शिवसेनेचे उल्हास पाटील यांना विजयी करण्यात मोठा वाटा उचलला होता. केडीसीसीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, दिवंगत सा. रे. पाटील यांचा गट आणि इतर काही नेत्यांनी यड्रावकर यांना सहकार्य केल्याची उघड चर्चा होती. तर शाहूवाडीमध्ये शिवसेनेचे आमदार सत्यज‌ित पाटील-सुरूडकर यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांना सहकार्य केले असल्याने गायकवाड यांची विजय निश्चित मानला जात होता. पण याठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी ४५ मते घेत गायकवाड यांचा केवळ दोन मतांनी पराभव केला. शाहूवाडीमध्ये कर्णसिंह गायकवाड यांची मदत झाल्याचे पेरीडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मान्य केले. शाहूवाडीमध्ये जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी या पराभवाची परडफेड केली.

कागलमध्ये हसन मुश्रीफ यांनी दत्तात्रय वालावलकर यांचा पराभव केला, तर आजरा तालुक्यात अशोक चराटी यांनी जयवंतराव शिंपी यांचा पराभव केला. चंदगड नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी गोपाळराव पाटील यांचा पराभव करत सलग आठव्यांदा निवडून येण्याची किमया केली. गडहिंग्लजमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष टी. एस. पाटील यांचे पुत्र संतोष पाटील यांनी बाबासाहेब आरबोळे यांचा पराभव केला. तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी नंदकुमार ढेंगे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

कृषी पणन आणि शेतीमाल प्रकिया गटासाठी दोन जागा आहेत. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी विजय मिळवले. या गटात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना प्राणित शाहू परिवर्तन आघाडीचे दिलीप पाटील यांचा पराभव झाला.

इतर शेती संस्था आणि व्यक्ती गटात भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. चौगुले आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांच्यात थेट लढत झाली.

अनुसुचित जाती जमातीसाठी काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे आणि शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात थेट लढत होती. येथे आवळे यांनी मिणचेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विधानसभेतील पराभवाची परतफेड केली. विमुक्तजाती जाती गटातून शाहू विकास आघाडीचे अप्पी पाटील यांनी आणि परिवर्तन आघाडीचे परशुराम तावरे यांचा पराभव केला. महिला गटातून अपेक्षानुसार माजी खासदार निवेदिता माने आणि काँग्रेसच्या उदयानी निंबाळकर विजयी झाला.

प्रमुख पराभूत

आमदार डॉ. सुजित मिणचेकर, बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, जयवंतराव शिंपी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, प्रा. जयंत पाटील.

अध्यक्ष निवड सात दिवसांत

निकालावर सहनिबंधकांनी सही केल्यानंतर सात दिवसांनी संचालक मंडळाची बैठक घेवून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होते. संचालक मंडळाची अधिसूचना सहनिबंधकांनी प्रसिद्ध करावी लागते. सर्वसाधारणपणे १३ ते १५ मे यामध्ये अध्यक्षपदाची निवड होणे अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल तर उपाध्यक्षसाठी काँग्रेस अंतर्गत माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांची वर्णी लागू शकेल.

राखीव निकालात पाटील यांची आघाडी

गगनबावडा तालुका सेवसंस्था गटातील निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखीव ठेवण्यात आला आहे. याठिकाणी अक्षेप असलेल्या २३ संस्थांचे मतदान स्वतंत्र पेटीत ठेवण्यात आले असून त्याची मोजणी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर होणार आहे. तर उर्वरित ४३ संस्थांच्या मतांची मोजणी गुरुवारी करण्यात आली. यात माजी मंत्री सतेज पाटील यांचे समर्थक मानसिंग पाटील यांना २५ तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी. जी. शिंदे यांना १८ मते मिळाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...२४ तास’चे टेन्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडल्यानंतर सहायक निरीक्षकानेही स्वत:ची जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून जाणते-अजाणतेपणी होत असलेल्या मानसिक छळामुळेच असे प्रकार घडत आहेत. कामाचा ताण कमी व्हावा, हक्काच्या सुट्यांचा उपभोग घेता यावा आणि अपमानास्पद वागणूक मिळू नये, अशी माफक अपेक्षा पोलिस व्यक्त करीत आहेत.

मुंबईत एपीआय दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जोशी यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. राज्यात चर्चेला आलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस दलातही हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. तणावामुळे पोलिसांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहेत. कामाचा ताण वाढू लागला आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांनी पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत ताणतणावात राहणाऱ्या पोलिसांची यादी तयार करून त्यांचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनीही पोलिसांना समजून घ्यावे अशी इच्छाही वर्मा यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे अधिकारी चांगले निर्णय घेत असले तरी प्रत्येक पोलिस ठाण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांना सापत्नभावाची वागणूक आजही देत आहेत. अंतर्गत हेवेदावे, कामाच्या वाटपामध्ये केला जाणारा भेदभाव, वेळी-अवेळी कर्तव्यावर बोलावले जात असल्याने येणारा मानसिक ताण, सुट्या नामंजूर करणे, साप्ताहिक सुट्या रद्द होणे आणि वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक मिळणे यासारख्या प्रकारांमुळे ताणतणाव ठळक दिसून येत आहे.

सकारात्मक उपक्रम

गेल्या वर्षभरात पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिस कल्याण निधीतून पोलिस कर्मचाऱ्यांना चांगली मदत केली आहे. रजा देताना अधिकाऱ्यांनी मानवतावादी भूमिका घ्यावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी व्हीआयपी राजकारण्यांच्या सभेवेळी पोलिसांना दिवसभर अन्न व पाण्यावाचून बंदोबस्त करावा लागत होता. मनोजकुमार शर्मा यांनी गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बड्या नेत्यांच्या दौऱ्यांवेळी फूड पॉकेट व पाण्याची सोय केली होती. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या व मुलांच्या वाढदिवशी दिवशी सुट्टी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रत्येक कर्मचाऱ्याला मिठाईचे बॉक्स देण्यात आले. आयुष्यभराच्या नोकरीत प्रथमच पोलिसाला अधिकाऱ्यांकडून मिठाईचे बॉक्स मिळाले अशा प्रतिक्रिया पोलिस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ची डेडलाइन ओलांडणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यास पालकमंत्र्यांनी १५ मेची डेडलाइन दिली होती. मात्र, कामांची गती पाहता ती पूर्ण होण्यास किमान महिनाभराचा कालावधी सहज लागण्याची चिन्हे आहेत. कामे पूर्ण होण्यामध्ये निधीचा तुटवडा असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे निधीची उपलब्धता झाली नाही तर हे काम आणखीही लांबण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरणाच्या कामाला जानेवारी २०१४ मध्ये सुरुवात झाली. सध्या इमारतीचे बांधकाम बहुतांश पूर्ण होत आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीही आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले; पण त्यानंतर अजून या प्रकल्पातील सर्वच इमारतींचे काम पूर्ण व्हायचे आहे. आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च झाले असून आणखी आठ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या खर्चातील काही रक्कम सरकारकडून मिळालेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन दालनाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी मार्चअखेर असल्याने काही वेळ झाला असण्याची शक्यता व्यक्त केली; पण निधीची तरतूद केली असल्याचेही सांगितले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत १५ मेपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले होते.

राजाराम माने यांच्या बदलीनंतर या कामामध्ये थोडा संथपणा आला. डेडलाइन सात दिवसांवर आली तरी अद्याप कामे शिल्लक आहेत. हे काम १५ तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता फार कमी असल्याचे दिसते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता निधी मंजूर असून, तो लवकरच दिला जाणार आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत प्रकल्पातील मुख्य बांधकाम पूर्ण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंच्या जबाबाचा पहिला टप्पा पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार उमा पानसरे यांचा तब्बल पावणे तीन महिन्यांनंतर गुरुवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जबाब घेतला. जबाब तीन टप्प्यांत घेतला जाणार असून, पहिला टप्पा आज पूर्ण झाला. आजच्या जबाबावेळी उमा पानसरे यांना घाम आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील जबाब घेण्यात येणार आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे ​अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजयकुमार यांची तपास अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. संजयकुमार यांनी तपासाच्यादृष्टीने कोल्हापुरात दोन बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुरुवारी जबाबाचे काम सुरू झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी उमा पानसरे यांचा दीड तास जबाब घेतला. जबाब घेत असताना त्यांना घाम आल्याने व ताण आल्याने जबाब थांबविण्यात आला. घटनेदिवशी पानसरे घरातून बाहेर पडले व तिथून हुतात्मा स्मारकापर्यंत गेल्याच्या नोंदी जबाबात घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडगडाटाने भरवली नागरिकांमध्ये धडकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी जोरदार वारा सुटला; पण जोरदार पावसाऐवजी किरकोळ सरींचाच शिडकावा झाला. कसबा बावडा येथील दत्त मंदिराजवळ कारवर झाड कोसळले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आणखी पाच ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वळवाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्याचवेळी सलग दोन दिवस तापमान ३९ अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे पुन्हा वळीव झोडपून काढण्याची शक्यता होती. गुरुवारी दुपारनंतर वातावरण तयार झाले; पण सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वारा सुटला. वाऱ्यामुळे काही ठिकाणच्या झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. जोरदार वारा सुटल्याने महावितरणने वीजपुरवठा बंद केला. काही काळ जोरदार वाऱ्यानंतर पावसाला सुरुवात झाली. मात्र त्याला जोर नव्हता. रस्ते भिजले असले तरी पाऊस वळवाचा वाटला नाही. कसबा बावड्यात दत्त मंदिरजवळील झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले, तर डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळील मोहिते कॉलनी, शिवाजी पार्क, टाउन हॉल, टुरिस्ट हॉटेलच्या पिछाडीस, ताराबाई पार्क या ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. मंगळवारच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने धडकी भरवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत माशांप्रकरणी महापालिकेला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दूषित पाणी आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे रंकाळा तलावात तब्बल एक हजार किलो वजनाचे मासे मृत्युमुखी पडले आहेत. माशांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस काढली आहे. तसेच माशांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत माशांसह नाले व तलावातील पाणी तीन ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आठवडाभरात अहवाल अपे​क्षित आहे.

दरम्यान, महापालिकेतर्फे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्यामठ परिसरातील मासे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मासे, नाल्यातील दूषित पाण्याचा पंचनामा केला.

'रंकाळा तलावात मासे नेमके कशामुळे मृत्युमुखी पडले आहेत? पाणी विषारी बनले आहे का ? कुठल्या भागातील पाणी दूषित आहे, या साऱ्या बाबीचा तपास करण्यासाठी तलावात मिसळणाऱ्या नाल्यातील सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूणला पाठविले आहेत. रंकाळा तलावातील पाण्याची तपासणीसाठी (बायो अॅसेस टेस्ट) तलावातील चार ठिकाणचे पाणी नमुन्यासाठी घेण्यात आले असून त्याची मुंबईत तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय तपासासाठी मृत माशांचे काही नमुने फॉरेन्सिक लॅबला (पुणे) पाठविले आहेत,' अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी दिली.

संध्यामठ परिसरात दुर्गंधी

संध्यामठ परिसरात मृत माशांचा खच पडल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात महापालिकेचे पर्यावरण कक्ष ​अभियंता आर. के. पाटील म्हणाले, 'महापालिकेतर्फे सलग दुसऱ्या दिवशीही मासे काढण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांत मिळून जवळपास १००० किलो वजनाचे मासे बाहेर काढले आहेत. संध्यामठ परिसरातील मृत मासे बाहेर काढण्यात आले आहेत.'



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसाय नव्हे, समाजसेवा

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

एखादी व्यक्ती मरण पावली की, घरात रडारड सुरू होते. अंत्यविधीचे चर्चा सुरू होते. शेजारी, पै-पाहुणे किंवा मित्र रिक्षा ठरवतात. मयताचे साहित्य मिळण्याचे ठिकाणही रिक्षावाल्याला माहीत असते. दिवस असो वा रात्र, शिवाजी पेठतील निकमाचे घर, आमदारांचा बोळ, जुना बुधवार तालमीचा बोळ या ठिकाणी रिक्षा जाते. दोन उभ्या काठ्या, पाच आडव्या काठ्या, एक गाडगं, दोन लोटकी, सुतळी, गवत, पांढरे कापड, उदबत्ती, कापूर असे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळते. असा हा अंत्यविधी साहित्यविक्रीचा व्यवसाय धाडसाने करणारी मंडळी व्यवसाय न बघता त्याकडे समाजसेवा म्हणूनच पाहतात.

शिवाजी पेठेतील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते कै. सुबराव निकम (तात्या) यांनी १९४५ मध्ये अंत्यविधी साहित्य विक्रीचे केंद्र सुरू केले. पावतीवर 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीदवाक्य छापून व्यवसाय सुरू केला. व्यवसायामुळे पै-पाहुण्यांनी बहिष्कार टाकला. घरात गाडगी, मडकी, काठ्या, गवत, गुलाल हे साहित्य पाहून गल्लीतील लोकही घरी फिरकायचे नाहीत; पण तात्यांनी मोठ्या हिमतीने व्यवसाय सुरू केला. रात्री-अपरात्री घरावर थाप पडली की, तात्या विचारायचे, 'बाई की पुरुष?' उत्तर 'बाई' असे आले की, सुहासिनी की विधवा? या उत्तरानंतर तात्या साहित्य द्यायचे. तात्यांनी त्या काळात मोफत दहन योजना सुरू करावी म्हणून नगरपालिकेकडे मागणी केली होती. तात्यांच्या मृत्यूनंतर मुलगा आदिनाथ यांनी हा व्यवसाय सांभाळला. आज तात्यांचा नातू राजेंद्र हा व्यवसाय सांभाळत आहे. निकमांच्या दारात आजही काठ्या, पहिल्या खोलीत सुतळ्या, मडकी पाहायला मिळतात; पण आज पेठेतील सर्व लोकांना निकमांच्या घरात अंत्यविधीचे साहित्य विक्री होत असल्याने त्यामध्ये सहजता आली आहे.

शनिवार पेठेत सोमनाथ जयवंतराव शंकरदास हे गेली दहा वर्षे अंत्यविधीचे साहित्य विक्री करतात. दिवसभर रिक्षा चालवणे, अंबाबाई मंदिराबाहेर कापूर, उदबत्ती विक्रीचा व्यवसाय करतात. ६० वर्षांपूर्वी सोमनाथ यांच्या आजोबांचे पानलाइनला अंत्यविधी साहित्यविक्रीचे दुकान होते. शिवाजी मार्केटचे दुकान बंद झाल्यावर मधल्या वीस वर्षांच्या काळात व्यवसाय बंद होता. दहा वर्षापूर्वी सोमनाथ यांच्या वडिलांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला. घराजवळील एका खोलीत साहित्य ठेवले जाते.

सध्या सोमनाथ यांची आई शकुंतला, पत्नी भाग्यश्री साहित्य देतात. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलेही साहित्य देण्यास मदत करतात. सुरुवातीला त्यांनाही याची भीती वाटे; पण साहित्य खरेदी करणारे लोक धन्यवाद देऊ लागल्यावर आपण करतो ते काम योग्य आहे असे वाटते असे सोमनाथ यांनी सांगितले. जुना बुधवार पेठेच्या पिछाडीस सिद्धार्थगरातील लिंगायत स्मशानभूमीजवळील साहित्यविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. दीपक पोलादे यांनी प्रत्येक स्मशानभूमीत अॅल्युमिनियमच्या तिरडी ठेवल्या आहेत. तिरडी घरपोच करण्यासाठी त्यांनी वाहनांची मोफत व्यवस्थाही केली आहे.

अंत्यविधीचे साहित्य

काठ्या, गाडगी, लोटकी, सुतळी, कापड, चंदन कापूर, उदबत्ती, शेणी, खोबरे, उपरणे, पटका, पंचा, टोपी, थैली, लाल कापड, हरक, पातळ, मलमल, खण, ओटीचे साहित्य, नारळ करंडा, फणी, बांगड्या, हळदी-कुंकू, बुक्का, पाने, हार व इतर. लिंगायत समाजासाठी थैला तर मारवाडी समाजासाठी शाल तसेच सुवासीनीसाठी हिरवी साडी दिली जाते.

गरिबालाही मदत

काहीवेळा अंत्यविधीचे साहित्य घेण्यासाठी अनेकांकडे पैसे नसतात. अशावेळी रकमेत सूट दिली जाते. बेवारस मृतदेहाच्या दहनासाठी मोफत साहित्य दिले जाते. लहान मूल मरण पावल्यास निकम व शंकरदास त्यांच्या विधीसाठीचे पैसे घेत नाहीत. परजिल्ह्यातील फासेपारधी व रोजगारासाठी आलेल्या कुटुंबांनाही रकमेत सूट दिली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दबदबा नरसिंगरावांचाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नरसिंग गुरूनाथ पाटील यांनी १९ मतांनी विजय मिळवत गोपाळ पाटील यांच्यावर मात केली. दुसऱ्यांदा जिल्हा बँकेत चंदगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यास यश मिळविले. त्यामुळे आता चार वर्षे बंद असलेला दौलत कारखाना सुरु होण्यास अडचण येणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. जिल्हा बँकेतील नरसिंग पाटील यांच्या विजयाने त्याचा दबदबा तालुक्यात कायम असल्याचे स्पष्ट झाले. गोपाळ पाटील यांची 'दौलत'वर सत्ता असताना दौलत बंद पडून गेले चार वर्षे बंद असल्याचा फटका गोपाळराव पाटील यांना बसल्याचे स्पष्ट होते.

तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर नरसिंगरावांनी पहिल्यापासून 'दौलत'च्या माध्यमातून मजबूत पकड ठेवली आहे .नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 'दौलत'शी संबंधित असणारे नरसिंगराव पाटील व गोपाळ पाटील तर विरोधकाची भूमिका बजावत असलेले भरमू पाटील हे एकत्र आले होते. अपेक्षेप्रमाणे दोन्हीही गोकुळचे उमेदवार विजयी झाले. हाच फामुर्ला जिल्हा बँकेत कायम राहील असे वाटतानाच नरसिंग पाटील यांनी गोपाळ पाटील यांना आव्हान देत जिल्हा बँकेत उमेदवारी ठेवली. गोकुळच्या निवडणुकीच्यावेळी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासमोर केलेला करारही त्यांनी धाब्यावर बसविला.

२००१ पासून 'दौलत'मध्ये अथवा तालुक्याच्या राजकारणात मेहुण्या-पाहुण्यांचे वैर सर्वश्रूत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत गोपाळ पाटील यांनी नरसिंग पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली होती. मात्र सत्तेसाठी ऐनवेळी तालुक्यात पुन्हा कुरघोडीचे राजकारण पहायला मिळाले. तालुक्याचे राजकारण 'दौलत'भोवतीच फिरत होते. किंबहुना 'दौलत'चा बळी राजकारणामुळेच गेला. मात्र 'दौलत'च्या वाताहतीला जबाबदार असणाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत अवघ्या तालुक्यालाच कर्जाच्या खाईत लोटले. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले. चार वर्षे दौलत बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा बँक व दौलत यांच्यात गेले चार वर्षे अनेक वेळा दौलत सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाल्या. पण जिल्हा बँकेवर प्रशासक असल्याने दौलतबाबत ठोस निर्णय घेता आलेला नाही.

जिल्हा बँकेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे नरसिंगराव पाटील यांच्या विजयाने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी यात्रेची सांगता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या लोकोत्सवाची सांगता झाली. उत्सवमूर्ती भव्य मिरवणुकीनंतर पाटील वाड्यात स्थानापन्न झाली. तत्पूर्वी दिवसभर लक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. यात्रा कमिटी, पोलिस, प्रशासन व नगरपालिकेसह सर्वच घटकांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडल्याने तालुक्याच्या इतिहासातील सर्वोत्तम सोहळा गडहिंग्लजकराना पाहायला मिळाला.

गेल्या दशकभरातील तालुक्यातील सर्वात मोठा लोकोत्सव श्री देवी लक्ष्मीच्या यात्रेनिमित्ताने भरला होता. विस्तारलेले शहर व वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांच्या मनात यात्रेच्या यशस्वितेसंदर्भात साशंकता होती. मात्र समाजाच्या सर्वच घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने यात्रा यथासांग पार पडली.

देवीला गुरूवारी दही-भाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीफळ फोडून सांगता समारंभाला सुरवात झाली. लक्ष्मी खेळविण्यासाठी हजारो भाविकांची विशेषतः युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.

पारंपारिक वाद्याच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत तरुणाई न्हाऊन निघाली. 'लक्ष्मीच्या नावान चांगभल'चा अखंड जयघोष सुरु होता. मंदिराबाहेरील चौकात दीड तास लक्ष्मी खेळत होती. शेवटी मुसळे तिकटीमार्गे कडगाव रस्त्यावरील भगवा चौक येथे विधिवत पूजा करून उत्सवाची सांगता झाली.

तब्बल १४ वर्षांनंतर झालेल्या महालक्ष्मी यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. या काळात गडहिंग्लज शहर यात्रामय झाले होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीत बनली इंग्रजी शिक्षिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंग्रजी बोलायला येत नाही याचा न्यूनगंड अनेक मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात बाधा आणतो. खेड्यातील मुलांना तर इंग्रजीतून संवाद साधण्यासाठी पोषक वातावरण मिळत नाही. त्यामुळेच इंग्रजीचे ज्ञान असूनही इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण होत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी रिचा राणे ही शालेय मुलगी आपली सुटी सत्कारणी लावणार आहे. यावर्षीच्या सुटीत रिचा तिच्या गावाकडच्या मुलांसाठी इंग्रजीची शिक्षिका होणार आहे. यंदाच्या सुटीत काय ​केलेस? या प्रश्नाचे उत्तर देताना, आपल्याला येणारी एखादी गोष्ट इतरांना शिकवल्यानंतर मिळणारा आनंद मिळवला असे सांगण्यासाठी उत्सुक असल्याचे रिचाने सांगितले.

परीक्षा संपली की, लगेच मनात विचार येतो तो सुटीत काय करायचे या प्लॅनिंगचा. रिचाही सुटीत कुठे फिरायला जायचे याचा विचार करत होती. पण तिला काही वेगळे करायचे होते. त्यातूनच तिला कल्पना सुचली की भटकंतीदेखील होईल आणि सुटीत आपल्या हातून चांगले काम होईल असे काही करूया. रिचा जेव्हा जेव्हा गावी जायची तेव्हा तिला जाणवायचे की गावातल्या मुलांना इंग्रजी संभाषण करताना अडचणी येतात.

इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास यायचा असेल तर सराव व्हायला हवा आणि त्यासाठी इंग्रजी कसे बोलावे हे शिकावे लागणार. रिचाने हेच करायचे ठरवले. आता ती सुटीत गावी जाऊन तेथील मुलांना इंग्रजी बोलण्याचे धडे देत आहे. रिचाने तिच्या शाळेत शिकलेली सॉफ्टस्किल्स तिच्या या अनोख्या अध्यापनात उपयोगी येत आहेत.

अंगी अनेक गुण असूनही केवळ इंग्रजीच्या न्यूनगंडापोटी मुले स्पर्धेत मागे पडतात. त्यातही हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. यासाठीच रिचाने सुटीत हा उपक्रम राबवण्याचे ठरवले.

प्रत्येकाने त्यांच्या शालेय आयुष्यात शिक्षकदिनी एक तासाचा शिक्षक होण्यातील आनंद घेतला असेल. पण या सुटीत मी खरोखरच कुणाला तरी इंग्रजी संभाषणकला शिकवणार याचा आनंद मोठा आहे. दैनंदिन व्यवहारातील इंग्रजी वाक्ये कशी बोलावी, इंग्रजीमध्ये आपला मुद्दा पटवून देताना कोणत्या शब्दांचा वापर करावा, शिष्टाचारातील इंग्रजी शब्द, संवाद याचे शिक्षण रिचा तिच्या गावाकडच्या मित्रमैत्रिणींना देत आहे. - रिचा राणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images