Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोन किलोमीटरचीच हद्दवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरापासून दहा किलोमीटरच्या परिसरातील गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेने आता बाजूला ठेवत महापालिका आता दोन किलोमीटरच्या परिसरातील गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करणार आहे. यामुळे नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी तातडीने पाठवणे शक्य होईल.

शहराची हद्दवाढ झाली नसल्याने यापूर्वी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यामधील एक ४२ गावांचा तर नुकताच राज्य सरकारने रद्द केलेला १७ गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव होता. या दोन्हीमध्ये 'एमआयडीसी'सह अनेक मोठी गावे होती. नव्या सरकारने १७ गावांचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर पालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी शहराच्या हद्दीवरील मोजक्याच गावांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या होत्या. पण महापालिकेनेच पाच व दहा किलोमीटरपर्यंतच्या गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गावांची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. तसेच ४२ आणि १७ गावांचा प्रस्ताव यापूर्वी नामंजूर केलेला असताना आता ९३ गावांचा पाठवायचा हेही न पटण्यासारखे होते. त्यामुळे पालिकेने आता एक ते दोन किलोमीटरच्या अंतरातील गावांचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.

दहा गावांचा समावेश शक्य

याबाबत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक धनंजय खोत यांनीही दहा किलोमीटरच्या परिसरातील ९३ गावांचा प्रस्ताव तयार करण्यास बराच वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता तो प्रयत्न सोडून नजीकच्या गावांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नव्या प्रस्तावानुसार शिंगणापूर, बालिंगा, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर अशा गावांचा समावेश होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैसे भरा, नैतिकता दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ५ कोटी ४७ लाख रुपये तर इतरांवर एकूण १४७ कोटी रुपयांची जबाबदारी केडीसीसी बँकेने नि‌श्चित केली आहे. ही रक्कम मुश्रीफ आणि संबंधित माजी संचालकांनी भरून नैतिकता सिद्ध करावी', असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी येथे केले. मुश्रीफांनी केडीसीसीत भ्रष्टाचार केल्याच आरोप करत त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोनेरी टोळीने बँक लूटल्याची टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जयलक्ष्मी हॉलमध्ये मेळावा झाला.

केडीसीसीच्या निवडणूक प्रचारात मुश्रीफ यांनी हाळवणकर यांच्यावरील वीजचोरीच्या आरोपाचा उल्लेख केला होता. त्याचा संदर्भ देत हाळवणकर म्हणाले, 'या आरोपातून न्यायालयाने मला दोषमुक्त केले आहे. ज्या दिवशी आमच्यावर आरोप झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पैसे भरले, ही आमची नैतिकता आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या सहकऱ्यांनी त्यांच्यावर निश्चित केलेली रक्कम भरून आपली नैतिकता सिद्ध करावी. मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्जमाफीत भ्रष्टाचार केला आहे. सेवासंस्थाच्या माध्यमातून बोगस कागदपत्रे बनली. नाबार्डने जिरायत शेतीसाठी १० हजार प्रती एकर आणि बागायत शेतीसाठी २५ हजार प्रती एकर असा निकष ठरवला होता. पण बनावट कागदपत्रे बनवून पाच एकरासाठी एक कोटी रुपयांचे प्रस्ताव बनवल्याची उदाहरणे आहेत. ४० टक्के शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे कर्ज द्यायचे आणि ज्यांनी कर्ज घेतलेले नाही अशा ६० टक्के शेतकऱ्यांच्या नावावर टाकायचे, ही रक्कम परस्पर हडप करायची असा कारभार दरोडेखोरांची सोनेरी टोळीने मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केला आहे. हा भ्रष्टाचार उकरून काढण्यासाठीच परिवर्तन आघाडी प्रयत्नशील आहे.'

पुन्हा जर हेच लोक सत्तेवर आले तर बँक डबाघाईला येईल, हे लक्षात घेवून मतदारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार उल्हास पाटील, आमदार सुजीत मिणचेकर, ‌शिवसेनेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची भाषणे झाली. संघटन सरचिटणिस बाबा देसाई यांनी स्वागत केले. जिल्हा सरचिटणिस नाथाजी पाटील यांनी आभार मानले.

मंडलिकांवर शरसंधान

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आहेत. मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजपच्या पॅनलचा उल्लेख मोडकेतोडके पॅनल असा केला होता. त्यावर मिणचेकर यांनी मंडलिक यांना लक्ष्य करत 'याच मोडक्या-तोडक्यांनी तुम्हाला लोकसभेत पाच लाखांवर मते मिळवून दिली हे विसरू नका' अशी टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किसनवीर’कडून ८५ कोटी रुपये अदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

साखरेचे बाजारभाव कमालीचे घसल्यामुळे हा उद्योग अडचणीतून जात असतानाही किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याने या अडचणींतून मार्ग काढत एफआरपीप्रमाणे ऊस दर देण्यासाठी एप्रिल महिन्यात ८५ कोटी एक लाख ३९ हजार ८६७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचेअध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. दरम्यान, मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

किसनवीर साखर कारखान्याच्या विद्यमान व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम देताना कोणतीच तडजोड केलेली नाही. मात्र, उत्पादित साखरेला बाजारात मिळणाऱ्या भावावर कारखान्याचे अर्थकारण अवलंबून असल्यामुळे आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमालीचे घसल्यामुळे यंदाच्या गळित हंगामात राज्यातील साखर उद्योगावर आर्थिक ताणआलेलाआहे. या परिस्थितीला किसनवीर आणि दीर्घ मुदतीने चालविण्यास घेतलेला प्रतापगड साखर कारखाना अपवाद राहिला नाही. या प्राप्त परिस्थितीत दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या प्रतिटन २११२ रुपये एफआरपीप्रमाणे ऊस दर देताना प्राधान्यक्रम ठरवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कारखान्याने फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत ऊस उत्पादक सभासद-बिगरसभासदांच्या ऊस बिलांतून सोसायट्यांची देय असलेले सुमारे २८ कोटी रुपये मार्चअखेरीस सोसायट्यांच्या खात्यांवर जमा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीतील आरक्षणाला हरताळ

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

एसटी बसमधील विशिष्ठ व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या 'आरक्षित जागा' केवळ नावापुरत्या उरल्या असून आता तो केवळ फार्सच असल्याचे सिद्धच झाले आहे. 'राखीव' च्या नावाखाली ठेवण्यात आलेल्या जागेवर क्वचितच हक्क असणारी संबंधित व्यक्ती बसलेली दिसते. महिला, अपंग आणि वयोवृद्ध यांचे हाल तर एसटी प्रवासात पाचवीलाच पुजलेले असतात. इतर आरक्षित जागांबाबतही हाच प्रकार आहे. एसटी वाहकही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करतात. जर अंमलबजावणी होत नसेल तर तर आरक्षणचा आटापिटा हवाच कशाला? असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जावू लागला आहे.

विद्यार्थी, नोकरदार आणि वृद्धांसाठी एसटी महामंडळाच्या काही सुविधा चांगल्याच आहेत. परंतु बसेसमध्ये खासदार, आमदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. एसटी बसमध्ये चढल्यानंतर सीटच्या मागे अथवा खिडकीच्यावर ज्यांच्यासाठी संबंधित जागा राखीव आहे, त्यांचा आरक्षण प्रकार स्पष्ट शब्दात दिसेल असा लिहिलेला असतो. ज्या जागेवर नाव नाही त्या जागा सर्वसामान्य प्रवाशांच्या समजल्या जातात. महामंडळाकडून उदात्त हेतूने आरक्षण देण्यात आले, त्याची अंमलबजावणी मात्र शून्यच आहे.

आरक्षणाच्या अमंलबजावणीची जबाबदारी असलेले वाहक मात्र जाणीवपूर्वक यातून बगल काढतात. त्यामुळे महामंडळाच्या उद्देशाला त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून हरता फासला जात आहे. परिणामी अपंग, महिलांना आरक्षित जागा कधीच मिळत नाहीत. वृद्ध, आजारी व्यक्तींना माणुसकी म्हणूनही जागा दिली जात नाही. स्वत:साठी आरक्षित असलेली जागा देणारे वाहक क्वचितच आहेत.

सध्या लग्नसराईची धामधूम आणि सुट्यांचे दिवस सुरू आहेत. साहजिकच बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडते. अशा स्थितीत एसटी बस स्थानकावर येऊन उभी रहाताच अनेकजण गर्दी करुन स्वत:साठी जागा मिळवायची म्हणून खिडकीतून रुमाल, बॅग, वह्या अथवा तत्सम वस्तू टाकून जागा आरक्षित करतात. मात्र अपंग आणि महिलांना हे शक्य होत नाही. उलट बसमध्ये चढल्यावर गर्दीतून येणाऱ्या जाणाऱ्यांचे धक्के खात उभे रहावे लागते.

आम्ही दरवर्षी वारंवार याबाबत वाहक चालकांना सूचना देतो. हक्काच्या आरक्षणासाठी महिला व अपंगांनी प्रवाशांशी वाद घालण्यापेक्षा रितसर तक्रार द्यावी. आरक्षण पाळलेच जात नसेल तर यासंदर्भात या हंगामापासूनच कडक धोरणे अवलंबली जातील. वाहकांनी जबाबदारी झटकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करु.

- सुहास जाधव, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

बांदिवडे (ता. पन्हाळा) येथे शेतजमिनीच्या वादातून नाना बापू पाटील (वय ५०, रा. बांदिवडे) यांचा शनिवारी रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला. पाटील यांच्या नातेवाईकांनी संशयित आरोपी नामदेव शामराव गिरी आणि सुखदेव गिरी यांच्या शेतातील घरावर तुफान दगडफेक करत घर पेटवून दिले. याबाबतची फिर्याद आण्णा बापू पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत दिली आहे.

याबाबत पन्हाळा पोलिसांतून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नाना पाटील आणि शित्तूर (ता. शाहूवाडी )येथील नामदेव गिरी यांच्यात जमिनीच्या कारणावरून गेली पाच-सहा वर्षे वाद सुरू होते. या दोघांमध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून भांडणे होत होती. शनिवारी नाना पाटील हे पन्हाळा येथे काही कामानिमित्त आले होते, परंतु शनिवारी ते परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रविवारी सकाळी करंजफेण गावाजवळ रस्त्याच्या बाजूला नाना पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना डोक्यात तसेच पाठीवर दगडाने मारहाण करण्यात आली होती, तसेच गळा आवळल्याने गळ्याभोवती वळ उठले होते. रविवारी सकाळी नातेवाईकांनी नाना पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गिरी बंधूंच्या शेतातील घरावर हल्ला करत घर पेटवून दिले. अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल नदीत कोसळली अन्...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जोतिबा दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या कंदलगाव (ता.करवीर) येथील दुर्गुळे कुटुंब रविवारी रात्री अक्षरशः मरणाच्या जबड्यातून बाहेर आले. कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरुन त्यांची मोटरसायकल पंचगंगा नदीत कोसळली. काळ आला होता पण वेळ आली नसल्याने तीन वर्षाच्या मुलासह हे दाम्पत्य बचावले. रात्री आठच्या दरम्यान हा प्रकार झाला.

कंदलगाव येथील रावसाहेब आनंदराव दुर्गुळे हे पत्नी व तीन वर्षाच्या मुलासह रविवारी जोतिबाला गेले होते. देवदर्शन करुन ते कसबा बावड्यातील राजाराम बंधारामार्गे गावाला परत जात होते. त्यावेळी राजाराम बंधाऱ्यावर त्यांची मोटरसायकल आली असता समोरुन ट्रॅक्टर येत होता. ट्रॅक्टर जात असताना दुर्गुळे यांची मोटरसायकल नदीच्यादिशेने झुकली. त्यावेळी पती व पत्नी बंधाऱ्यावर राहिले व डोळ्यासमोर मुलग्यासह मोटरसायकल पंचगंगा नदीत कोसळली. अंधार असताना नदीमध्ये मुलगा पडल्याने रावसाहेब दुर्गुळे यांनी तातडीने नदीमध्ये उडी मारली. मुलाला वाचवून नदीकाठावर आणले. दुर्देवाने तिघेही नदीमध्ये पडले असते तर वेगळीच परिस्थिती झाली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधमाशांचा गेला हकनाक जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमणमळा परिसरातील यशवंत या इमारतीमध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला काढताना हजारो माशांचाही जीव गेल्याची घटना नुकतीच घडली. या इमारतीमधील रहिवाशांना मधाचे पोळे नको असले तरी ते काढताना मधमाशांना मारले जाऊ नये असे वाटत होते, मात्र पोळे काढणाऱ्यांनी याचा विचार केला नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक शासकीय कार्यालये, अपार्टमेंट, सोसायटी, जुन्या इमारतींमध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्यांना काढण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरण्याची मागणी पक्षीप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून एखाद्या इमारतीच्या गच्चीचा कोपरा मधमाशांच्या पोळ्यांनी भरलेला दिसतो. मधमाशा जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत त्यांचा धोका नसतो, मात्र त्या जर पोळ्यावरून उठल्या तर त्या जीवघेणा चावा घेतात. परिणामी रहिवासी इमारतींवर पोळे दिसले की ते काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. मधमाशांचे पोळे काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली जाते किंवा ग्रामीण भागातील मधविक्री करणाऱ्यांना पाचारण केले जाते. विक्रेते पोळ्यातील मध मिळवून त्याची विक्री करत असल्यामुळे पोळे काढताना त्यांना केवळ मध हवा असतो, मधमाशा मृत झाल्या तर त्याचा ते विचार करत नाहीत. मात्र धुराचा वापर करून पोळे हटवले तर मधमाशा पोळ्यापासून दूर होतात आणि मधही मिळू शकतो. शहरीकरणाचा मोठा फटका मधमाशांना बसतो. पोळे काढताना मधमाशा मारल्यामुळे परागीभवनाच्या प्रक्रियेला हानी पोहोचते. पर्यायाने निसर्गचक्राला धक्का बसतो. मधमाशा जगवणे ही निसर्गचक्रासाठी आवश्यक बाब आहे अशी माहिती निसर्गप्रेमी सुबोध पानसे यांनी दिली.

मधमाशी वाचवा

मधमाशांचे पोळे काढण्यासाठी धुराचा वापर केला जातो. त्यात नारळाच्या शेंड्या, वाळलेली पाने, कापूस, कडूनिंब असे पर्यावरणपूरक साहित्य जाळून मधमाशांना पोळ्यापासून दूर केले जाते. या धुराचा मधमाशांना त्रास होत नाही. पोळे काढतानाही अगदी हळूवारपणे काढले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलांची आवक घटली, दर वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नसराई जोरात सुरू असल्याने समारंभ, सजावटीसाठी हार, पुष्पगुच्छांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे फुलशेतीवर किडींचा प्रार्दुभाव झाल्याने आवक घटली आहे. त्यामुळे मागणीसह दरात वाढ झाली आहे. गुलाबफुलांचा दर शेकडा ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. निशिगंध, गलाटा, झेंडूची आवक कमी असली तरी दरात फारशी वाढ झालेली नाही. फळभाज्यांचे दर स्थिर असले तरी कोथिंबिरीच्या दराने पुन्हा उचल खाली आहे. कोथिंबिरीच्या एका पेंडीचा दर वीस रुपयांवर पोहोचला आहे.

लग्नसराईमध्ये फुलांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली असते. ही मागणी विचारात घेऊनच फुलशेती केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने राशिवडे, गडमुडशिंगी, कंदलगाव, वडणगे, निगवे व कागल तालुक्यातील काही गावांतून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होते. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाचा फटका फुलशेतीला बसला आहे. त्यामुळे निशिगंध, गलाटा व झेंडूवर किडींचा प्रार्दुभाव झाला आहे. उत्पादन घटले आहे. लग्नसराईत वधू-वरांसाठी आवश्यक हार, गुच्छाच्या दरात वाढ झाली आहे. निशिगंधाच्या हाराची किंमत पन्नास ते २५० रुपयापर्यंत झाली आहे. मात्र, गुलाबाची आवक अत्यंत कमी झाल्याने दर वाढले आहेत. कोल्हापूरच्या बाजारपेठेत गुलाबाची सर्वात जास्त आवक जयसिंगपूर भागातून होत असते.

फळभाज्यांचे दर स्थिर

गेल्या महिन्यापासून फळभाज्यांचे दर स्थिर राहिले असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. वांगी, भेंडी, दोडका, गवार आदी भाज्यांचे दर सरासरी ४० रुपयांवर स्थिर राहिले आहेत. मात्र, कोबी, फ्लॉवरचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांची आवक कमी झाली, असून केवळ मेथी व शेपू बाजारात उपलब्ध आहे. मेथीच्या जुडीचा दर १५ तर शेपूच्या एका पेंढीचा दर २० रुपयापर्यंत पोहोचला आहे.

आंब्याची आवक वाढली

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूससह पायरी, लालबाग, तोतापुरी, मद्रास हापूस व पायरी आंब्याची आवक थोडीफार वाढली आहे. मद्रास व कर्नाटकातील आंब्याची आवक किरकोळ बाजारात झाल्याने दरामध्ये ५० ते ७० रुपयांची घट झाली आहे. यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी झाली आहे.

इलेक्शन फिव्हरचा परिणाम

महापालिकेची निवडणूक पाच ते सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुकांकडून कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. भागात आपली ताकद दाखवण्यासाठी गल्ली-बोळात वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुके दिले जात आहेत. शहरात असे अनेक वाढदिवस साजरे केले जात असल्यामुळे बुकेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सरासरी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत बुकेचे दर असून मागणीमध्ये वाढ झाली आहे.

फळभाज्या

वांगी - ४०

भेंडी - ४०

दोडका - ५०

गवार - ४०

हिरवी मिरची - ४०

टोमॅटो - १५



फळे

सफरचंद - १२० १४०

संत्री - ८०

मोसंबी - ६०

डाळिंब - ५०

चिकू - ४०

द्राक्षे - ७०

हापूस आंबा - ३५० ते ४०० (डझन)

हापूस आंबा - ७०० ते ८०० (अडीच डझन)

फुले (किलोचे दर)

निशिगंध - १०० ते १२५

गलाटा - ३५

कलकत्ता झेंडू - ३० ते ३५

फकडी - ५० ते ६०

गुलाब - ७०० ते ८०० (शेकडा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'त्या' तेरा जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्डमधील मुस्कान लॉनमध्ये रविवारी रात्री गुंड स्वप्निल ताशिलदार याच्या वाढदिवसा​चा वि​नापरवानगी सुरू असलेला कार्यक्रम बंद करण्यास गेल्यावर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तेरा जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील सात जणांना अटक केल्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

रविवारी मुस्कान लॉनमध्ये ताशिलदार याचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यासाठी डॉल्बी मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता. तो कार्यक्रम बंद करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एम. भोसले व अन्य पोलिस गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित साऱ्यांनी जमाव तयार करुन पोलिसांना अडथळा आणून धक्काबुक्कीही केली होती. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी राजकुमार नाईक या कॉन्स्टेबलने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर उर्फ सोमनाथ जयवंत ढेरे (वय २२, रा. मार्केट यार्ड), सिद्धाप्पा माळाप्पा करगार (वय २१, रा. घोरपडे गल्ली, शाहूपुरी), अक्षय दगडू मधाळे (वय २१, रा. सदर बाजार), मंगेश सुभाष आठवले (वय १८, रा मार्केट यार्ड), सचिन ​सुरेश ​शिंदे (वय ३०, रा. विक्रमनगर), माधव महेंद्र कडूकर (वय २१, रा. आर. के. नगर), मनोज धर्मेश माटनावळ (वय २२, रा. उचगाव) यांना अटक केली.

शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या तपासानंतर विठ्ठल काशीनाथ सुतार, तुषार शिवाजी डवरी (रा. विक्रमनगर) , संजय महावीर किरणगे ( ​रा. विक्रमनगर), राकेश किरण कारंडे (रा. शास्त्रीनगर) , ​रामचंद्र विलास सावरे (रा. शिंगणापूर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सात जणांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. पोलिसांवरच गुंडांनी केलेल्या हल्ल्यामुळे या प्रकाराची दखल घेत कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटांची मतमोजणी करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्यांनी बुडविली तेच लोक आपल्यातील सर्व हेवेदावे विसरून एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांना जनता धडा शिकवेल. तर विनायकराव उर्फ अप्पी पाटील आणि बाबासाहेब पाटील हे बँकांचे थकबाकीदार असल्यामुळे ते लढत असलेल्या गटाची मतमोजणी करू नये, अशी मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती शाहू परिवर्तन आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार मिणचेकर म्हणाले, 'अप्पी पाटील हे भटक्या विमुक्त गटातून तर बाबासाहेब पाटील कृषी पणन व शेती प्रक्रिया संस्था गटातून निवडणूक लढवत आहेत. हे दोघेही थकबाकीदार असून उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका दाखल आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी अपात्र ठरणार आहे. निवडणूक ५ मे रोजी असल्यामुळे ती आता थांबविता येत नाही. त्यामुळे त्या दोन गटांची मतमोजणी न करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. तर बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावावर मोठा घोटाळा केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व त्यांच्या सहकाऱ्यांवर ८० कोटींचे ६ दावे सहकार न्यायालयात दाखल केले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या नावाखाली आयडीबीआय बँकेकडून २ कोटी ८८ लाख रुपये कर्ज उचलून शेतकऱ्यांना एक छदामही दिला नाही.'

परशुराम तावरे म्हणाले, 'विनायकराव पाटील हे शिवाजी बँकेचे थकबाकीदार आहेत. त्याबरोबरच त्यांनी सहकार निबंधकांकडे अपील करताना सर्व उमेदवारांना प्रतिवादी करणे आवश्यक होते. तसे करण्यात आलेले नाही. सहकारी नियमानुसार थकबाकीदार हे निवडणुकीस अपात्र आहेत. तर बाबासाहेब पाटील यांनीही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तारण नसलेली सरकारी जमीन विकली आहे. त्याबरोबरच कुक्कुटपालनासाठी बँकेकडून कर्ज काढून चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतले. त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही सक्षम पर्याय दिला आहे. ज्यांच्या कारभाराबाबत अनेक शंका उपस्थ‌ित झाल्या त्यांनी मतदान मागू नये. तसा त्यांना अधिकार नाही. मतदारांनी दिलेली मते वाया जाणार असून त्यांना मतदान करू नये. पत्रकार परिषदेत के. एस. चौगुले, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

आज मतमोजणी

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची मतमोजणी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी भवन येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १६ टेबलवर गटनिहाय मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दुपारी दोन वाजता संपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोरांची टोळी ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील डी मार्ट, स्टार बाजार, परीख पूल रस्ता अशा गजबजलेल्या ठिकाणांच्या पार्किंगमधून तसेच अन्य परिसरातून अवघ्या तीन महिन्यात ३४ दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. त्यातील १५ दुचाकी शाहूपुरी परिसरातून तर अन्य दुचाकी इतर परिसरातून चोरीस गेल्या होत्या.

सुलेमान खुदबुद्दीन पठाण (वय २४, रा. यादवनगर), सद्दाम महमंद नरगुंद (वय २३, सरनाईक वसाहत, जवाहरनगर), वाजिद अबद्दील रझाक शेख (वय २६, रा यादवनगर), सलीम गुलाब जमादार (वय ३२, यादवनगर), फयाजअली शब्बीर मकानदार (वय २२ गणेश कॉलनी, मणेर मळा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जवळपास १७ लाख रुपयांच्या किमतीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दोघांनी दुचाकी चोरी करायची व अन्य तिघांच्या मदतीने त्यांची विल्हेवाट लावायची असा प्रकार या टोळीने केला होता. याबाबत सातत्याने पाळत ठेवून टोळीचे हे कारनामे उघड करण्यात पोलिसांना यश आले.

काही महिन्यांपासून डी मार्ट, मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील पार्किंगमधून दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक ए. डी. चौधरी , सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या ठिकाणी पाळत ठेवली होती. त्याच दरम्यान चोरलेल्या दुचाकींची विक्री केली जात असताना दोन महिन्यात सर्व कागदपत्रे देतो असे सांगून टोलवत असल्याचे पोलिसांना समजले.

या दोन्ही मार्गांनी शोध लावल्यानंतर ही टोळी समोर आली. पठाण व नरगुंद हे मोबाइलवर खेळत त्या दुचाकीवर बसायचे. त्याचवेळी पायाने जोराने झटका देऊन हँडल लॉक मोडायचे व बनावट चावीने गाडी चोरुन न्यायचे. तर इतर चार आरोपींपैकी सलीम हा विक्रीसाठी ग्राहक शोधायचा.

अन्य दोघे त्या दुचाकींचे स्पेअर पार्ट खोलून विक्री करायची असे प्रकार करायचे. या प्रकारे हिरो होंडा स्प्लेंडर, होंडा अॅक्टीव्हा, हिरो प्लेजर, डीओ अशा विविध कंपनीच्या दुचाकी चोरल्या आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत चोरी केलेल्या व विकलेल्या ३४ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. अजूनही त्यांच्याकडून शहरातील चोरल्या गेलेल्या दुचाकी मिळून येऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. शोध पथकामध्ये सुनिल कवळेकर, रविंद्र पाटील, अमर आडुळकर, समीर मुल्ला, धनंजय परब, विशाल बंद्रे, ओंकार परब, अरविंद पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना विचारणार जाब

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

उसाला किमान वाजवी दरानुसार (एफआरपी) भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सांगलीत आंदोलनाचे रणशिंग फुंकले. पालकमंत्र्यांना दिसेल तिथे जाब विचारणे हा आंदोलनाचा पहिला टप्पा असेल, असे संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. महायुतीतील सर्व घटकपक्ष एकत्र येऊन १२ तारखेला भाजपला जाब विचारतील, असेही त्यांनी सांगितले. एकवीस मे रोजी राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आणि तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा काढला जाईल, असे शेट्टी यांनी जाहीर केले. शेट्टी म्हणाले, 'एफआरपी एक रुपयाही कमी घेणार नाही. तो कमी करण्याचा अधिकारच कोणाला नाही. त्यामुळे एफआरपी कमी करण्याच्या केवळ वल्गना आहेत. पैसे वसूल करायचे असतील लढावे लागेल. त्यामुळे कार्यकत्र्यांनी अगदी उद्यापासूनच पालकमंत्र्यांना जाब विचारायला सुरुवात करावी.'

संघटनेची 'शेतकरी वाचवा, सहकार वाचवा' परिषद रविवारी सांगलीत पार पडली. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. 'भाजपला निवडणुकीत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटींवर आपण पाठींबा दिला होता. खासदार रामदास आठवलेंनी दलितांचे प्रश्न, महादेव जानकर यांनी धनगर आरक्षण आणि अन्य सामाजिक प्रश्नावर तर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पाठिंबा दिला होता. परंतु भाजपने सत्तेवर येताच आम्हाला शेंडी लावली आहे. त्यामुळे आम्ही १२ मे रोजी एकत्रित बैठक घेऊन भाजपला जाब विचारणार आहोत,' असेही शेट्टी यांनी जाहीर केले. 'विवाहितेने आत्महत्या केली तर सासरच्यांना तिच्या आत्महत्तेस कारणीभूत धरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. त्याप्रमाणेच सरकारच्या अनास्थेमुळे शेतकरी आत्महत्या करत असेल तर मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पंतप्रधान यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे,' अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
दरोडेखोर गुरू कसे?

भाजप सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळिकीवर शेट्टींनी सडकून टीका केली. 'कालचे दरोडेखोर आज यांचे गुरू कसे होऊ शकतात,' असा सवाल करून शेट्टी म्हणाले, 'साखर उद्योग अडचणीत यायला शरद पवार यांची नीतीच कारणीभूत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या घटनेत बदल करून या माणसाने तहहयात अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन शेतकऱ्यांच्या पैशांवर चालविल्या जाणाऱ्या या संस्थेचा वापर आपल्या बगलबच्चांना पोसण्यासाठी केला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्याची ‘लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सन २०१०मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांच्या वैध-अवैधतेवर कार्यकाळ संपत आला तरीही निर्णय झालेला नाही. संबंधित उमेदवारांच्या विरोधकांनी दाखल्यांना आक्षेप घेतला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ते हायकोर्टाचा दरवाजाही अनेकांनी ठोठावला. यादरम्यान काही जणांनी पदांचा लाभ घेतला आणि सत्ताही उपभोगली.

जात पडळताणी समितीकडून वेळेत चौकशी होत नाही. कधी राजकीय दबावापोटी समितीकडून निर्णय होत नसल्याने कारवाई लटकत असल्याचे विरोधी उमेदवारांचे म्हणणे आहे. २०१० मध्ये महापालिका निवडणुकीत इतर मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या कदमवाडी-पाटोळेवाडी प्रभागातून निवडून आलेल्या रेखा आवळे यांच्या जातीच्या दाखल्याला विरोधी उमेदवारांनी आक्षेप नोंदविला. आवळे यांनी निवडणुकीवेळी अनुसूचित जातीतून ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचा दाखला जोडाला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ जानेवारी २०१० मध्ये आवळे यांना दिलेला ओबीसी दाखला प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेत समितीच्या निर्णयाला स्थगिती मिळवली आहे.

काँग्रेसचे सचिन चव्हाण यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मदन चोडणकर यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. चव्हाण यांनी ओबीसी प्रभागात निवडणूक लढविताना कुणबी जातीचा दाखला जोडला होता. चव्हाण यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. शाहू मैदान प्रभागातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी सभापती आदिल फरास यांनी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवताना बावर्ची जातीचा दाखला व प्रमाणपत्र सादर केले होते. फरास यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात नगरसेवक आर. डी. पाटील व रत्नदीप कुंडले यांनी तक्रार केली होती. जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. कोर्टाने दाखला फेर पडताळणीसाठी विभागीय जात पडताळणी समितीकडे पाठविला होता. या महिन्याच्या पाच तारखेला या संदर्भात जात पडताळणी समोर सुनावणी आहे. स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्या विरोधात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी कायदेशीर लढाई सुरू ठेवली आहे.

जातीचे बोगस दाखले सादर करणाऱ्यांविरोधात कारवाई जलद झाली पाहिजे. नियमातील पळवाटा शोधत काहीजण पाच वर्षे सत्ता भोगतात. राज्य सरकार आणि हायकोर्टाने तक्रार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आता संबंधितांवर कारवाई निश्चित करावी. जेणेकरून गैरप्रकारांना चाप बसेल. उशिराने न्याय हा एक प्रकारचा अन्यायच आहे.

- आर. डी. पाटील, (नगरसेवक) याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; ६ ठार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शोभेच्या दारूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव येथील कवठे एकंद येथे सोमवारी सायंकाळी दारूच्या कारखान्यात स्फोट होऊन सहा जण जागीच ठार झाले. पाच जण होरपळून जखमी झाले असून, ते १०० टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन वर्षांपूर्वी याच कारखान्यात स्फोट होऊन आठ जणांचा बळी गेला होता.

'ईगल फायर वर्क्स' या कारखान्यात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण कारखाना जळून राख झाला. त्यावेळी कारखान्यात मालकाच्या नातेवाईकांसह नऊ कामगार आणि ग्राहक म्हणून आलेले दोघे असे ११ जण होते. त्यापैकी सहा जण जागीच ठार झाले. ठार झालेल्यांचे हातपाय शरीरापासून दूरवर फेकले गेले होते. मयत आणि जखमी सर्वच जण होरपळून काठेठिक्कर पडल्याने त्यांची ओळख पटविणेही कठीण झाले होते. एक मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता.

हा कारखाना रामचंद्र गुरव यांच्या मालकीचा असून, तासगाव रस्त्यावर कवठे एकंदपासून काही अंतरावर असलेल्या एका गोदामात तो चालविला जात होता. स्फोटात कारखाना मालकाचा मुलगा आणि आई मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये जुबेदा अकबर नदाफ ( वय ५५), इंदाबाई तुकाराम गुरव (वय ७०), सुनंदा रामचंद्र गिरी (वय ४०), राम राजेंद्र गिरी (४६), अनिकेत रामचंद्र गुरव (वय १६) यांचा समावेश आहे.

गंभीर जखमींमध्ये शिवाजी तुकाराम गुरव ( वय ४६), रामचंद्र राव गिरी (वय २२), तानाजी ईश्वर शिरतोडे (वय ३२, सर्व जण कवठे एकंद), अजित निशिकांत तोडकर (वय ३२, रा. वारणा कोडोली) आदी जखमींना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. कोळशाच्या ढिगाऱ्यांतून मृतदेह शोधण्यात आले. आगीने लपेटलेल्या अवस्थेतच जखमींना बाहेर काढून खासगी गाड्यांतून हॉस्पिटलकडे नेण्यात आले. आगीच्या झळा लागून त्या गाड्यांनीही पेट घेतला. त्यावेळी त्वरित जखमींना त्या गाड्यांमधून हलवून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांमधून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. स्फोटाचे वृत्त समजताच तासगावच्या आमदार श्रीमती सुमन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली.

आजवर २७ बळी

या गावाला जसा शोभेची दर्जेदार दारू बनविण्याचा इतिहास आहे, तसाच कारखान्यांमध्ये स्फोट होऊन कामगार बळी जाण्याचाही इतिहास आहे. दोन वर्षांपूर्वी २०१३ मध्ये दसऱ्याला एका कारखान्यात स्फोट होऊन एकाच कुटुंबातील आठ जणांचा बळी गेला होता. गावात आतापर्यंत स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या २७ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटानंतर विनापरवाना उत्पादन बंद करावे, परवानाधारक उत्पादकांनी कारखाने गावाबाहेर हलवावेत, असा ठराव करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेल एअर हॉस्पिटलला निधीसाठी प्रयत्न करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,' अशी ग्वाही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली. त्यांनी सोमवारी बेल एअर हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर राज्यपाल बोलत होते.

नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधत महाविद्यालयामया प्रगतीचा आढावा घेतला. 'बेल एअर हॉस्पिटलमध्ये एड्स व कुष्ठरोगाच्या रुग्णांची गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सेवा केली जाते. रुग्णसेवा ही ईश्वरसेवाच आहे, या भावनेतून आपल्याकडून अतिशय उत्तम काम होत आहे. या हॉस्पिटलला आवश्यक मदत करण्यात येईल. यासाठी रुग्णालय प्रशासनाने सर्वसमावेशक धोरण तयार करून प्रकल्प अहवाल सादर करावा. कार्पोरेट सोशल रिपॉन्सिबिलिटी तसेच केंद्र शासनाच्या व इतर योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल,' असे राज्यपाल म्हणाले.

रेड क्रॉस सोसायटीमया सचिव होमाई एन. मोदी आणि हॉस्पिटलचे संचालक फादर टॉमी के. यांनी राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांनी हॉस्पिटलचे प्रशासकीय कार्यालय, लॅब, एचआयव्ही/एड्स वॉर्डच्या नवीन वाडिया वॉर्डला भेट दिली व रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. नर्सिंग कॉलेजच्या नूतनीकरण केलेल्या जिमखाना हॉलचे उद्घाटन राज्यपालांनी केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर, राज्यपालांचे एडीसी मेजर सुचित मेहरोत्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, नर्सिंग महाविद्यालयामया प्राचार्य सिस्टर लोर्दूमेरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात दुर्मिळ वृक्ष जतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगेशकरनगरात लोकसहभागातून दुर्मिळ वृक्षाचे जतन व पुनर्लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. झाडांच्या संरक्षणासाठी जागृती कार्यक्रम केले जातात. विविध प्रकारच्या झाडांना मराठी व इंग्रजी नावाचे फलक लावले आहेत. मंगेशकर नगरात २३ दुर्मिळ वृक्ष आढळून आले आहेत. निसर्गमित्र संस्था व वृक्ष प्राधिकरण समितीच्यावतीने कार्यक्रम सुरू आहे.

मंगेशकरनगर परिसरात नऊ वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्वावर वृक्षगणना करण्यात आली होती. यामध्ये जारूल, बारतोंडी, सातवीन, गुलाबजाम, करंबळ, पुत्रंजीवी, जंगली, आवळा, सीतारंजन, पांढरीसावर, टेंबुर्णी, बकुळ अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. लोकसहकार्यातून या झाडांना मराठी व इंग्रजीतील फलक लावण्यात आले. परिसरातील खासगी जागेतील सुमारे २५ फुट उंचीचा ख्रिसमस ट्री ​वृक्षप्राधिकरणाच्या परवानगीने काढून टाकण्यात येणार होता. मात्र पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांस महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या सहकार्याने मंगेशकरनगर उद्यानात पुनर्लागवड करण्यात आली.

शहरात ३५० दुर्मिळ वृक्ष

शहरात ३५० दुर्मिळ वृक्ष आढळले आहेत. त्यावर लोकसहभागातून फलक लावण्याची मोहीम सुरु आहे. मोहिमेत प्रत्येक प्रभागातील निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे असे निसर्ग मित्र संस्थेच्या अनिल चौगुले यांनी सांगितले.

झाडांना जीवदान दिल्याबद्दल वसंत ढेरे, खंडू सोस्ते, गणेश खडे, दिपक दावणे, राजू भोसले यांचा नगरसेवक संभाजी जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'बहुगुणी शेवगा' पुस्तक व कापडी पिशवी देऊन संबंधितांना गौरविण्यात आले. वाढदिवसाला प्रभागात कुठेही डिजीटल फलक न लावल्याबद्दल नगरसेवक संभाजी जाधव यांचा बाबूराव घोडके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 'जारूल' वृक्षाचा वाढदिवस साजरा केला. अजित अकोळकर, पराग केमकर, मयूर गोवावाला, भारत चौगुले, विजय चरापले आदींनी संयोजन केले. सीमा जोशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरुषाचे पोस्टर फाडल्यावरून रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत परिसरातील वाल्मिकी कॉलनीत समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी परिसरातील रहिवाशांनी सकाळी साडेदहा वाजता रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक व्यवस्था कोलमडली. रास्ता रोकोत आंदोलकांनी केएमटी बस फोडल्याने तणाव निर्माण झाला.

सानेगुरुजी वसाहत परिसरातील वाल्मिकी कॉलनीत जयभीम मित्र मंडळाने लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर, आपटेनगर, संतोष कॉलनी, क्रशर चौक आणि आरपीआयचे कार्यकर्ते जमा झाले. सानेगुरुजी मुख्य बसस्टॉपजवळच आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यामुळे कोल्हापूर-राधानगरी रोडवरील वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली. रस्त्यावर दगड लावून रस्ता अडवून धरला. काही वाहनधारकांनी सानेगुरुजी बसस्टॉप येथून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक आणि वाहनधारकांत बाचाबाची झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि दंगलकाबू पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अखेर संबंधितांना पकडू, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औदुंबर परिसरात मगरींमुळे घबराट

$
0
0

सांगली : चोपडेवाडी ते औदुंबर-भिलवडी परिसरातील कृष्णेच्या पात्रात असलेल्या धोकादायक मगरी वनखात्याने ताबडतोब पकडाव्यात अशी मागणी करणारा एकमुखी ठराव भिलवडी ग्रामपंचायत बैठकीत नुकताच करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी व वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते. पण अद्याप वनखात्याच्या त्यादृष्टीने काहीही हालचाली दिसत नाहीत त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सांगलीतही कृष्णा नदीकाठी एका मोठ्या मगरीचे सतत दर्शन होत असते.

कडेगाव-पलूस तालुक्याचे वनक्षेत्रपाल जी. एम. सावंत, शिराळ्याचे एस. के. कदम यांनी मगरीचे वास्तव्य आढळते तेथे नदीकाठी जाळ्या बसवण्याचे, तसेच प्रत्येक पाणवठ्यावर मगरीपासून सावध राहण्यासंबंधीचे पलक लावले जाणार असल्याचे सांगितले. सध्या भिलवडीत नदीकाठावर दोन वनखात्याची माणसे मगरीची टेहळणी करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत अशी माहितीही दिली. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या काठावर अलीकडे मगरींचा सुळसुळाट झाला असून, या मगरींनी काही जणांचा बळीही घेतला आहे. लहान जनावरांनादेखील त्या ओढून नेतात, अशी तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घरपोच मोफत तिरडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फोन करा आणि मयतांसाठी अॅल्युमिनियमची मोफत तिरडी मिळवा, असा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम एका सामाजिक कार्यकर्त्याने सुरू केला आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणानंतरही आम्ही आपल्या सोबत आहोत, असा संदेश देत दीपक पोलादे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

पोलादे यांनी याआधी फायबरची पिंडी, रक्षाविसर्जन कुंडासह आता घरपोच मोफत तिरडीचा उपक्रम सुरू झाला आहे. तिरडी घेण्यासाठी यापूर्वी महापालिकेच्या बागेत व्यवस्था केली होती. त्यानंतर फायर स्टेशन आणि मयताचे साहित्य विक्री करणाऱ्या ठिकाणी तिरडी ठेवण्यात आली. या ठिकाणाहून मयताचे नातेवाईक तिरडी घेऊन स्मशानभूमीतच ठेवत होते. स्मशानभूमीतून पुन्ही ही तिरडी संबंधित ठिकाणी ठेवण्यासाठी नातेवाइकांकडून टाळाटाळ केली जात होती. त्यासाठी आता नातेवाइकांनी फोन केल्यास घरपोच अॅल्युमिनियमची तिरडी दिली जाणार आहे. त्यासाठी टेम्पोची व्यवस्था केली जाणार आहे. या टेम्पोतून तिरडी आणि मयताच्या विधीसाठी लागणारे साहित्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

टेम्पोचालक स्मशानभूमीतून ही तिरडी परत नेणार आहे. या सुविधेमुळे नातेवाइकांना कोणतीही धावपळ करावी लागणार नाही. रक्षाविसर्जनावेळी यापूर्वीच फायबर पिंडीची व्यवस्था केली आहे, तर काही ठिकाणी रक्षाकुंडही उभारले आहेत. शहरातील पंचगंगा स्मशानभूमी, कसबा बावडा, बापट कॅम्प, कदमवाडी या ठिकाणच्या स्मशानभूमीत तिरडीसह रक्षाकुंडाची व्यवस्था केली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक कलश नदीत आणि उर्वरित रक्षा कुंडात टाकण्याचे आवाहन पोलादे यांच्याकडून केले जात आहे. शहराजवळच्या गावांनीही तिरडी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

मृताच्या नातेवाइकांना अधिक धावपळ करावी लागणार नाही. तिरडीसाठी कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. मयताच्या साहित्याची माहिती नागरिकांना नसल्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिरडीसोबत मयतासाठी लागणारे सर्व साहित्यही दिले जाणार आहे. तिरडीसाठी ८६९८१६७८५० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

- दीपक पोलादे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता अडवा, मंडप घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात अगोदरच वाहतुकीची बोजवारा उडाला आहे. त्यातच महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या व वर्दळीच्या रस्त्यांवर नेते व कार्यकर्त्यांचे वाढदिवस व प्रसिद्धीच्या कार्यक्रमांसाठी परवानगी न घेता रस्ते पूर्णपणे अडवून स्टेज व मंडप उभारण्याचे फॅड शहरात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नेत्यांचे अभय मिळत असल्याने अशा बेकायदेशीर स्टेज व मंडप उभारणी करणाऱ्यांविरोधात महापालिका व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, मोहरम अशा प्रमुख उत्सवांवेळी रस्त्याच्या कडेने एक वाहन जाईल असे मंडप उभारले जातात. या उत्सवांवेळी पोलिस प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली जाते. तसेच महापालिकेकडे शुल्कही भरले जाते. महाप्रसाद व अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप घातले तरी मंडपाच्या बाजूने वाहतूक सुरळीत सुरू असते. पण महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक, इच्छुक उमेदवार व गुंड मंडळी थेट रस्ते अडवून स्टेज व मंडप उभारून कार्यक्रम घेत आहेत.

काँग्रेसचे नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन करताना शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलसमोर रस्ता अडवून स्टेज उभारले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम सायंकाळी असताना दोन दिवस स्टेज उभारून वाहनधारक व नागरिकांची कुचंबणा केली होती. पाटाकडील तालीम मंडळाने केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी रस्ता अडवून स्टेज घातले होते. शिवसेनेचे शहराध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी वाढदिवसाला ताराराणी रोडवर स्टेज घालून मंडप घातला होता. एक मे या कालावधीत सुट्या असल्याने शहरात करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने संख्येने गर्दी केली होती. थेट रस्त्यांवरच स्टेज घातल्याने बाहेरगावच्या प्रवासी वाहनांचे व भाविकांचे अतोनात हाल झाले होते. भाविकांनी याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती तरी संयोजकांना फिकीर नव्हती. खासदार धनंजय महाडिक यांनी अंबाबाईच्या सुवर्ण पालखीसाठी सोने जमा करण्याच्या कार्यक्रमांसाठी थेट भाऊसिंगजी रोडवर गुजरी कॉर्नरवर रस्ता अडवून मंडप उभारला होता. आमदार राजेश क्षीरसागर व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेही वाढदिवसादिवशी रस्ते अडवून मंडप व स्टेज उभारून वाढदिवस साजरा करतात.

रस्त्यांवर मंडप अथवा स्टेज घालण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक असते; पण राजकारणी, नगरसेवक, इच्छुक उमेदवार व गुंड मंडळी विनापरवाना मंडप व स्टे​ज उभारतात. वाढदिवस साजरा करणाऱ्या मंडळींच्या परिसरात मैदाने, महापालिकेची सभागृहे, मंगल कार्यालये असताना सार्वजनिक ठिकाणी रस्ते अडवून, डॉल्बी लावून वाढदिवस व अन्य कार्यक्रम साजरे केले जातात. या कार्यक्रमांसाठी अनेक मंडळी थेट महापालिकेच्या स्ट्रीट लाइटच्या खांबावरून वीज कनेक्शन घेतात. तसेच परिसराची स्वच्छता मोहिमेसाठी महापालिकेची आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लावली जाते. अशा मंडळींवर महापालिका व पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलल्यास वाहतूक सुरळीत होईल व नागरिकांचा त्रास कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images