Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रदूषण नियंत्रण मंडळाची फिरवाफिरवी

$
0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्याच जिल्हा कार्यालयाने काढलेला आदेश परत घेण्याचा पराक्रम केला आहे. राजाराम कारखान्यासह इतर ८ यंत्रमागांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई विभागीय आयुक्तांच्या सूचनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोठ्या जोशात केली. मात्र, त्यांचा हा निर्णय चार दिवसही टिकला नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर मुंबईतील अधिकाऱ्यांनी हा निर्णय रद्द केला असून राजाराम कारखान्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याबाबत कोल्हापुरातील कार्यालय अनभिज्ञ आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या आदेशामागे राजकीय दबाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

राजाराम कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना न करणे आणि विजेसाठी इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर करणे सक्तीचे असल्याचे कारण देत १८ एप्रिल रोजी वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्याचवेळी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेऊन नदी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राजारामसह वारणा सहकारी साखर कारख्यान्याचाही विद्युत पुरवठा तडकाफडकी खंडीत करण्यात आला.

राजाराम साखर कारखान्यावरील कारवाईनंतर कारखान्याचे शिष्टमंडळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबईतील कार्यालयात गेले. शिष्टमंडळाने वीजपुरवठा जोडण्याबाबत म्हणणे मांडून पुर्नजोडणीचे पत्र मिळविले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे मत विचारात न घेता मुंबईतील अधिकाऱ्यांनी कारखान्याला तसे पत्र दिले. याबाबत कोल्हापुरातील कार्यालयाला कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही.

राजाराम कारखान्याच्या शिष्टमंडळाला मिळालेल्या आदेशानुसार त्यांनी जलसिंचन विभागाला पाणीउपसा करण्याबाबत परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, यासंदर्भात ताबडतोब कारवाई करता येणार नसून पहिल्यांदा रितसर आदेश आल्यानंतरच त्याची दखल घेतली जाईल असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना हे परवडणार नाही असेही कारखान्याच्या व्यवस्थापनाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

राजाराम साखर कारखाना आणि इतर ८ यंत्रमागांना देण्यात आलेल्या आदेशासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार मुंबई कार्यालयाकडून आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे आम्ही वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत एवढेच सांगू शकतो.

- एस. एस. डोके, विभागीय संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ

आम्ही कोणतेही प्रदूषण करत नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार सांगितले आहे. तरीही आमचा पाणीपुरवठा तोडण्यात आला. मात्र यात नुकसान शेतकरी वर्गाचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडीत करणे हे परवडणारे नाही.

- पी. जी. मेढे, तज्ज्ञ संचालक, राजाराम साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ऑल्युकेम छापा’ खरा की खोटा?

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

भुदरगड तालुक्यातील शेळोली येथील ऑल्युकेम कंपनीवर टाकलेला छापा हा तब्बल एक महिन्यापूर्वी प्रांताधिकारी यांनी टाकला होता. तो मंगळवारी उजेडात आला. त्यामुळे तालुक्यात आता या छाप्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ५० कोटी वार्षिक उलाढाल व कंपनीचा माल परदेशी निर्यात होण्याइतका इतका मोठा विषय असतानाही छाप्याबाबत इतकी गोपनीयता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भुदरगड तालुक्यात अवैध धंद्यांना अक्षरशाः ऊत आला आहे. त्याचाच एक नमुना म्हणजे शेळोलीच्या डोंगरात सुरु असलेली ऑल्युकेम ही कंपनी मागील सात वर्षे या कंपनीत अवैधरीत्या शाडूच्या गोळ्या बनविल्या जात होत्या व परदेशी निर्यात होत होती. या गोळ्यांचा नेमका कशासाठी उपयोग होतो, या विषयी अजूनही माहिती समोर आलेली नाही. केवळ या गोळ्यांच्या वापराविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. या कारखान्याच्या परिसरात सामान्य लोकांना फिरण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्यावर सीसीटीव्ही वॉच होता. कंपनी परिसरात चुकून कोणी सामान्य माणूस गेला तर त्याच्यावर कर्मचारी दहशत निर्माण करत होते. त्यामुळे अनेकवेळा लोकांनी महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र या कारखान्याकडे महसूलच्या कोणत्याही अधिकाऱ्याने ढुंकून सुध्दा पाहिले नाही. नागरिक अक्षरशः या कंपनीच्या दहशतीला कंटाळले होते. त्याचबरोबर या कारखान्यात नेमके काय तयार होतेय या विषयी या परिसरातील गावांमध्ये उलटसुलट चर्चा आणि भीतीचे वातावरणसुद्धा होते.

मार्च महिन्यात पुन्हा ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर १६ मार्चला या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्याबाबत कमालीची गोपनीयता पाळली गेली. परिसरातील नागरिकांना सुद्धा याची कल्पना नव्हती.

अचानक मंगळवारी (ता. २१) प्रांताधिकाऱ्यांनी छाप्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. ही माहिती देताना या छाप्याची कुणकुण प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना लागल्याचे समजल्यानेच त्यांनी ही माहिती उघड केली असावी असे बोलले जात आहे. हा गोपनीय तपासाचा भाग असे गृहीत धरले तरी मग तपास पूर्ण होण्याऐवजी व कोणावरही कोणतीही कारवाई होण्याऐवजी ही गोपनीयता उघड का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छाप्यानंतर ऑल्युकेम कंपनी, शेळोली ग्रामपंचायत, तहसील यांना नोटीस दिली होती. या नोटीसांना सबंधितांकडून काय उत्तरे मिळाली?, कंपनीकडून अजूनसुध्दा कोणताही कागद प्रांताधिकारी यांना मिळाला नाही असे सांगण्यात येते.

मग मागील एक महिन्यात कोणती कारवाई झाली. हा विषय सुध्दा चर्चिला जात आहे. एका महिला अधिकाऱ्याने मोठी दहशत असणाऱ्या या कंपनीवर छापा टाकल्याने त्यांचे तालुक्यात कौतुक होत होते. मात्र आता हा सारा प्रकार उघड झाल्याने जनतेचा मनात शंका आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील महिन्यात छापा टाकण्यात आला. मात्र या छाप्याची माहिती समोर आणण्यापूर्वी ऑल्युकेम कंपनी, शेळोली ग्रामपंचायत व तहसील विभाग यांना नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे पूर्ण माहिती समोर आणण्यासाठी छाप्याची माहिती दिली नाही.

- कीर्ती नलावडे, प्रांताधिकारी, भुदरगड-आजरा

एखाद्या सामान्य माणसाने चहाची टपरी जरी काढली तरी त्याच्यामागे हात धुवून लागणाऱ्या महसूल प्रशासनाला इतकी मोठी कंपनी कोणत्याही परवानग्या नसताना चालविली जाते याची कल्पना होती. पण, 'अर्थ'पूर्ण घडामोडी झाल्याने या कारखान्यावर कारवाई झाली नसावी.

- प्रवीणसिंह सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर फुटी रस्त्यासाठी सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर सुधारित विकास योजनेंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप ते कसबा बावड्यापर्यंत नदीकाठच्या बाजूने शंभर फुटी रस्ता तयार करण्यासाठी जागेचे प्राथमिक सर्व्हेक्षण (डिमार्केशन) करण्यात आले आहे. त्यातून कुणाच्या हद्दीतून किती रस्ता आणि त्याचे अंतर हे स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. महापालिकेने यासंदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांची मते आजमावली आहेत. नुकसान भरपाई म्हणून जागा संपादनाच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांनीही त्याला प्रथमदर्शनी संमती दर्शवली आहे. आठवडाभरात टीडीआर प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शंभर फुटी रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या खानविलकर पेट्रोल पंप, महावीर कॉलेज, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय ते कसबा बावडा असा १८ फुटी रुंदीचा रस्ता आहे. कॉलेज, सरकारी कार्यालय, कोर्ट, पोलिस प्रशासनाची महत्वाची कार्यालये असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीपासून ते कसबा बावडा गोळीबार मैदानपर्यंत सव्वा ​चार किलो मीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजित आहे. या रस्त्यासाठी सुमारे १२५ हून अधिकाऱ्यांची साठ एकर शेती क्षेत्र बाधित होणार आहे.

'रस्त्यासाठी आवश्यक जागेचा प्राथमिक सर्व्हे पूर्ण झाला आहे. सर्व्हेक्षणामुळे शेतकऱ्यांना निश्चित माहिती होणार आहे. कुणाच्या जागेतून रस्ता जाणार आहे, कुणाच्या हद्दीत किती जागा आहे, रस्त्याची दिशा याची माहिती संकलित करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांकडून टीडीआरचे प्रस्ताव भरून घेण्याच्या कामाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांना जागा संपादनाच्या मोबदल्यात टीडीआर देण्यात येणार आहे,' अशी माहिती नगर रचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी दिली. येत्या चार महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

नवीन रस्त्यामुळे होणारे फायदे...

मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता

वाहतुकीचा ताण कमी होणार

रत्ना​गिरी, पन्हाळामार्गे येणारी वाहतूक बाहेरून बावड्याकडे

महापालिकेने भूसंपादन प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाईल. खासदार, आमदार निधी, नगरोत्थानसह महापालिकेच्या स्वनिधीतून निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम केले जाईल.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवा ‘बारा’चा प्राइम टाइम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठीत सिनेमे मोठ्या संख्येने निर्माण होत आहेत. सिनेमांना ​​थिएटरची समस्या भेडसावत आहे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन जिल्हा आणि तालुका स्तरावरील बसस्थानक परिसरात शंभर ते दीडशे प्रेक्षक क्षमतेचे मिनी ​थिएटर साकारावीत अशी मागणी पुढे आली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने मुंबईत मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांची संयुक्त बैठक झाली. यावेळी मराठी सिनेमांना दुपारी बाराच्या शोची वेळ प्राइम टाइम म्हणून मिळावी असे मत अनेक निर्मात्यांनी व्यक्त केले. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यात मराठी सिनेमासाठीचा प्राइम टाइमचा विषय सध्या गाजत आहे. निर्मात्यांना भेडसावणाऱ्या समस्या, थिएटरचा अभाव यासह ​मराठी सिनेमांसमोरील अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. मराठीत दर्जेदार सिनेमे तयार होत असून प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी दुपारी बाराच्या शोची वेळ ही प्राइम टाइम म्हणून निश्चित करावी असा सूर उमटला. चर्चेत अभिनेत्री अलका आठल्ये, क्रांती रेडकर, विजय माने, सुमीत कक्कड, उज्ज्वल निरगुडकर, रवी जाधव, शिरीष राणे आदींनी सहभाग घेतला. मराठी सिनेमांची निर्मितीसंख्या वाढत आहे. एकाच दिवशी चार ते पाच सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे प्रेक्षक विभागला जाऊन त्याचा फटका प्रत्येकाला बसत आहे. सिनेव्यावसायिकांतील स्पर्धेमुळे मराठी निर्मात्यांचे नुकसान होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी एकच सिनेमा प्रदर्शित करण्याबाबत निर्मात्यांनी सूचना केल्या. निर्मात्यांनी यासंदर्भात विचार करून एकमत तयार करावे असे ठरले. यावेळी महामंडळाचे संचालक प्रसाद सुर्वे, मिलींद अष्टेकर, सतीश बीडकर, प्रिया बेर्डे, बाळू बारामती आदी उपस्थित होते. चर्चेत प्रकाश भालकर, रवींद्र दिवाण यांनीही मते मांडली.

बैठकीतील मुद्दे...

महिन्यातून एकदा निर्मात्यांसोबत बैठक

नव्या निर्मात्यांना मार्गदर्शन

रिकाम्या वेळेत नाट्यगृहात सिनेमा दाखविण्यास परवानगी हवी

एक किंवा दोन सिनेमे प्रदर्शित करण्याविषयी चर्चा

दुपारी बाराच्या शोची वेळ प्राइम टाइम म्हणून मिळावी

मराठी ​सिनेमांना ​​थिएटर उपलब्ध व्हावेत याकरिता राज्य सरकारने तालुका आणि जिल्हा स्तरावर बस स्थानकवर ​​थिएटर उभी करावीत. जेणे करून प्रेक्षक सिनेमाकडे आकर्षित होईल. निर्मात्यांनी एकाच दिवशी चार पाच सिनेमे प्रदर्शित न करता एका आठवड्याला एक किंवा दोन सिनेमे प्रदर्शित करावेत. जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांना होईल.

- विजय पाटकर, अध्यक्ष, मराठी ​चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वळवाची गारांसह हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह सोमवारी सायंकाळी वळवाने हजेरी लावली. काही काळ गाराही पडल्या. जोरदार वाऱ्यामुळे नागाळा पार्क येथील पितळी गणपती आणि 'आरटीओ'जवळच्या केबिनवर झाड पडले, तर भाऊसिंगजी रोडवरील सिल्व्हर पॅलेस या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली.

गेले काही दिवस उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ढगांची गर्दी होऊन सोसाट्याच्या वारासह पाऊस सुरू झाला. गारांचा वर्षाव आणि प्रचंड गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे पाऊण तास वळीवाने झोडपून काढले. शिवाजी ​चौकातील माळकर तिकटी सिग्नलजवळील वीजवाहिनीवर फ्लेक्स फलक उडून पडल्याने काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला. नागाळा पार्क, कुंभार गल्ली पापाची तिकटी, अंबाई टँक, बेलबाग, सम्राट नगर, बाबा जरगनगर, कावळा नाका, कनाननगरात पडलेल्या झाडांच्या फांद्या दूर करण्यासाठी अग्निशमन दलाची पथके रात्री उशिरापर्यंत कार्यरत होती.

दरम्यान, जिल्ह्यात गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल, चंदगड परिसरातही मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धा ते एक तास पाऊस सुरू होता. गारगोटी आगारातील बसवर झाड कोसळल्यामुळे एसटीचे नुकसान झाले. गडहिंग्लजमध्ये कडगाव रोड येथे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ कडगाव रोड बंद होता. कागल - निढोरी मार्गावर सिद्धनेर्लीजवळ रस्त्यावरच झाडे तुटून पडली. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. सेनापती कापशीत वीज उपकेंद्रावर झाड पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. चंदगड परिसरात दुपारी चारच्या दरम्यान तासभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. माणगाव, कार्वे, जंगमहट्टी, इसापूर, कानूर व चंदगड परिसरात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस काजू व ऊस आणि मशागतीसाठी उपयुक्त आहे. मात्र, काही ठिकाणी गारांसह पाऊस झाल्याने काजू खराब होत आहेत. यावर्षी काजू पीक पन्नास टक्यांवर आल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.

शहर अंधारात

प्रचंड वादळामुळे शहराच्या अनेक भागात वीजवाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. काही भागात झाडांच्या फांद्या वाहिन्यांवर तुटून पडल्यामुळे त्या बाजूला काढण्यासाठी तेथील पुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे शहर अंधारात असल्यासारखी परिस्थिती होती. स्टेशन रोड, सीबीएस आणि सर्किट हाउस परिसरात मंगळवारी दुपारपर्यंत पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीटीएम,‌ दिलबहारमध्ये राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारंपरिक विरोधक दिलबहार तालीम मंडळ व पाटाकडील तालीम मंडळाच्या (पीटीएम) समर्थकांनी दगडफेक करत राडा केला. पीटीएम समर्थकांनी दिलबहार तालीम मंडळाच्या रिक्षा स्टॉपवर दगडफेक केली तर दिलबहार समर्थकांनी पाटाकडीलचा खेळाडू रूपेश सुर्वेच्या घरावर दगडफेक केली तर दिलबहारचा खेळाडू सचिन पाटील याच्या महाद्वार रोडवरील कपड्याच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आली. दोन्हीकडच्या समर्थकांनी देवल क्लब चौकात दगडफेक केल्याने नागरिकांना मारहाणीचा फटका बसला. पोलिसांनी लाठीमार करत समर्थकांना पिटाळून लावले.

अंतिम सामना १/१ असा बरोबरीत राहिल्यानंतर ६१ व्या मिनिटाला दिलबहारच्या जावेद जमादारने गोल केल्यानंतर दिलबहार समर्थकांनी जल्लोष केला. समर्थकांनी मैदानावर चकमकीचे गोळे व पताका फेकल्या. त्या पीटीएमचा बचावपटू दीपक थोरातच्या अंगावर पडल्या. थोरातने मैदानातूनच दिलबहार समर्थकांच्या गॅलरीसमोर जात जाब विचारायला सुरूवात केली. त्यामुळे चिडलेल्या समर्थकांनी थोरातला शिवीगाळ केली. थोरातला समजवण्यासाठी पीटीएमचे खेळाडूही धावले. काही हुल्लडबाजांनी मैदानावर उड्या मारल्या. पीटीएम समर्थक संपत जाधव व जय जाधव दिलबहारच्या गॅलरीकडे धावले. जयने मैदानावरील कॉर्नरचा फ्लॅग खेचून तो दिलबहार समर्थकांत फेकल्याने वातावरण चिघळले.

दरम्यान पीटीएमकडील काही हुल्लडबाजांनी बाहेर येत रिक्षा स्टॉपवर दगडफेक केली. त्यात एका रिक्षाचे नुकसान झाले. तसेच साई मंदिराजवळ दगड व बाटल्या फेकल्या. त्याचा फटका महिलांना बसला. त्यामुळे दिलबहारचे समर्थक मोठ्या संख्येने जमले. दरम्यान, राड्याची माहिती कळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी. एन. मोहिते घटनास्थळी आले. दिलबहार समर्थकांवर लाठीमार सुरू केला. त्याचा फटका नगरसेवक विनायक फाळके यांना बसला. पीटीएम समर्थकांत पोलिसांचा भरणा असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी दिलबहार समर्थकांनी केला. दिलबहार समर्थक जमू लागल्याचे कळताच पीटीएम समर्थक रावणेश्वर मंदिराजवळ जमले. दोन्ही समर्थक समोरासमोर भिडू नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

दोन्ही समर्थकांची गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवली. दिलबहार समर्थकांनी टेंबे रोडवरील रूपेश सुर्वेच्या घरावर दगडफेक केली. त्यात चैताली वैद्य (वय २९) व सहा वर्षाची अनन्या या जखमी झाल्या. सुर्वेच्या घरावर दगडफेक झाल्याचे कळताच पीटीएम समर्थक प्रायव्हेट हायस्कूलकडून येऊ लागले. दोन्ही समर्थक देवल क्लब चौकात आले. त्यांनी दगडफेक सुरू करताच पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी आली. शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांनी लाठीमाराचे आदेश दिल्यावर दोन्ही संघाच्या समर्थकांना पिटाळून लावले.

हुल्लडबाजी

मैदानावरील राड्याचे मैदानाबाहेर प्रत्यंतर, नागरिकांना त्रास

खाद्यपदार्थांच्या गाड्या, मोटारसायकल, मोटारींचे नुकसान

अचानक घडलेल्या प्रकारानंतर नागरिकांची पळापळ

दोन्ही गटांच्या समर्थकांवर दहशत, मोडतोड, दगडफेकप्रकरणी रात्री उशीरा गुन्हे दाखल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढ

$
0
0


गुरुबाळ माळी

कोल्हापूरचे बांधकाम क्षेत्र विस्तारत आहे. गृह प्रकल्प, व्यापारी संकुल, हॉटेल्स अशा बांधकामातील पूर्वीच्या पद्धती मागे पडत आहेत. त्याप्रमाणे राज्य तसेच महापालिका पातळीवर नवनवीन नियम आणि ते राबवण्याच्या पद्धती अस्तित्वात आहेत. या नियमांचे पालन करुन ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी महेश यादव यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या आगामी कारकीर्दीबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.

बांधकामाबाबत महापालिकेने घेतलेल्या प्रीमियम व रोख डिपॉझिटच्या पद्धतीत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?

रेडीरेकनरनुसार प्रीमियम भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे रेडिरेकनर वाढेल तसा प्रीमियम वाढणार आहे. सध्या बिल्डरांबरोबरच सर्वसामान्यांनाही बांधकाम करायचे असल्यास प्रीमियम भरावा लागतो. ते परवडत नाही. व्यवसायाच्या हेतूने बांधकाम न करणाऱ्या किमान सर्वसामान्य लोकांना प्रीमियममधून वगळण्याची आवश्यकता आहे. तसेच त्याकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांच्यादृष्टीने पाहिले पाहिजे. त्यामुळे बिल्डरांना तो कमीतकमी आकारण्याची आवश्यकता आहे. बांधकाम परवाना देताना जी डिपॉ​झिट घेतली जाते ती परत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बांधकाम परिपूर्ती परवाना घेतल्यानंतर ही रक्कम तातडीने मिळाली पाहिजे. ही डिपॉझिट पूर्वी बँकहमीच्या स्वरूपात होती. पण ती आता रोख स्वरूपात घेतली जाते. त्याऐवजी बँक हमीच्या चार वर्षांच्या कालावधीऐवजी पाच वर्षाची करावी अशी मागणी आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

शहर परिसरातील बांधकाम व्यावसायासमोर कोणती आव्हाने आहेत?

रखडणारी हद्दवाढ हा फार मोठा अडथळा आहे. हद्दवाढ होत नाही तोपर्यंत शहर विस्ताराला गती येणार नाही. विमानसेवेअभावी शहराच्या विकासाचा ओघ थांबला आहे. राजकीय ताकद अपुरी पडत असल्याने हे प्रश्न रखडले आहेत. हद्दवाढ झाल्यास जागा उपलब्ध होऊन सध्या घराचे वाढलेले दरही स्थिर राहतील. त्यातून उद्योगाला चालना मिळून सामान्यांना घरे उपलब्ध होतील. खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागला तर बांधकाम व्यवसायाला आणखी गती मिळेल. हे तीन मोठे प्रश्न सुटल्यास कोल्हापुरातील गुंतवणूक वाढणार आहे. शिवाय महापालिका आकारत असलेला व्यावसायिक घरफाळा जास्त आहे. ही आकारणी देशात सर्वाधिक आहे.

बी-टेन्युअर, टीडीआरबाबतचे प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे?

बी-टेन्युअरबाबत यापूर्वी प्रांताधिकारी निर्णय घेत होते. आता हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा व्याप पाहता या कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया गतीमान आणि सुटसुटीत करण्याची गरज आहे. ज्या जागा, इमारती बी-टेन्युअरमध्ये नाहीत त्यांना तातडीने ना-हरकत दाखला मिळावा. टीडीआरबाबतही अशीच प्रक्रिया राबवली पाहिजे.

बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेकडून काय अपेक्षा आहेत?

ले आउट करताना एसटीपी प्रकल्प सक्तीचा केला आहे. पण लेआउट करताना अशा प्रकल्पाचा काहीच उपयोग नाही. उलट बांधकामानंतर तो सक्तीचा केल्यास त्याचा खरा फायदा होईल. याशिवाय रस्ते, वीज, गटर्सचीही सक्ती लेआउट करताना आहे. महापालिकेकडील निधी पाहता शहराच्या विकासासाठी हे गरजेचे आहेत. त्यासाठी संघटनेचीही हरकत नाही. या नियमानंतरही पन्नास टक्के डिपॉझिट कशासाठी? ही पध्दत बंद झाली पाहिजे. अरूंद प्लॉट असेल तर तेथे ट्रान्सफॉर्मरची सक्ती नसावी. बांधकाम परवाना ऑनलाइन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

क्रेडाई भविष्यात सभासदांसाठी कोणत्या योजना राबवणार आहे?

क्रेडाई सभासदांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच संस्थेची स्वतंत्र इमारत उभारण्याचा मानस आहे. तेथे स्वतंत्र लॅब करण्याचे नियोजन आहे. व्यवसायात येणाऱ्या युवकांना तिथे प्रशिक्षण देण्यात येईल. बांधकाम व्यवसायात सुपरवायझरची कमतरता आहे. त्यामुळे या व्यवसायात अ​धिकाधिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कारागृहापासून पाचशे मीटर अंतरावर बांधकाम करण्यावर मर्यादा आहेत. याबाबत सरकारकडून हा नियम शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. रेल्वे, संरक्षण मंत्रालय, कारागृह यांच्याकडून ना हरकत घेताना प्रचंड त्रास व वेळ जातो. तसेच महापालिकेकडून बांधकाम परवाना देण्यासाठी एक खिडकी योजना राबण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या जानेवारीत दालन प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. हे प्रदर्शन अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याची आर्थिक पाहणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ः पर्यायी दृष्टीकोन २०१५' या संदर्भग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता करवीर नगर वाचन मंदिर येथे ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी संपादित केलेला हा शेवटचा ग्रंथ आहे.

श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे, सहायक संपादक प्रा. सुनीता अमृत सागर, दिलीप पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी २०१२ मध्ये 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी - पर्यायी दृष्टीकोन २०१२' प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर २०१३, २०१४ आणि २०१५ मधील काही महत्त्वाच्या घाडमोडींचा समावेश करून हा ग्रंथ साकारण्यात आला आहे.

२०१५ च्या ग्रंथाचे काम ऑक्टोबर २०१४ मध्येच पूर्ण झाले होते. जानेवारी २०१५ मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन झाल्यानंतर कॉ. पानसरे प्रस्तावना लिहणार होते. पानसरे यांच्या निधनानंतर 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ः पर्यायी दृष्टीकोन २०१२' या ग्रंथाला पानसरे यांनी लिहिलेली प्रस्तावनाच नव्या ग्रंथाला वापरण्यात येणार आहे. अमृतसागर म्हणाल्या, '११ विभागात ३६ लेख या ग्रंथात आहेत. प्रत्येक अभ्यासकाने स्वतंत्र विषय घेवून लेखन केले आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरच हिंदुस्थान आर्थिक महासत्ता

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'अर्थसंकल्प आणि अर्थसिद्धी यामध्ये नोकरशाही व राजकीय इच्छाशक्ती उभी असते. या दोन्हींवर नियंत्रण ठेवल्यास हिंदुस्थान नक्कीच आर्थिक महासत्ता बनू शकतो,' असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. डॉ. जाधव म्हणाले, 'परमिटराजमुळे उद्योजकांची कोंडी होत गेली. कृत्रिम टंचाई व भ्रष्टाचार फोफावला. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ४७ टन सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. समाजवादी विचारसरणीने देशाची प्रगती होत असल्याचे खोटे चित्र देशासमोर उभे केले गेले. मात्र, १९८० च्या दशकात संगणक व इंटरनेटमुळे जागतिक अर्थकारणात गेल्या शंभर वर्षांत झाले नव्हते, एवढे मोठे बदल घडून आले.

श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह फायनान्स या मल्टीस्टेट सोसायटीमया जयसिंगपूर शाखेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनीता खामकर होत्या. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर, एम. एल. चौगुले, प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, शाखाध्यक्ष महावीर चौगुले यावेळी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले,' यंदाच्या अर्थसंकल्पात काही चांगल्या, तर काही अत्यंत वाईट गोष्टी होत्या. गुंतवणुकीला प्राधान्य, ऊर्जा प्रकल्प, वीस हजार कोटींचे सोने चलनात आणण्यासाठी प्रयत्न आणि जीएसटी या चांगल्या उपक्रमांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प आहे. तथापि बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना नाही. कृषि क्षेत्रासाठी कोणतीही उपाययोजना नाही. शिक्षण व अंगभूत कौशल्य विकासासाठी योजना नाही. आदिवासी व दलितांच्या अनुदानात मोठी कपात करणे, आदी गोष्टी खटकणाऱ्या आहेत. कार्पोरेट क्षेत्रासाठी सूट हे चांगल्या अर्थसंकल्पाचे लक्षण नाही.' प्रा. माणिक घुमाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. यावेळी अनिल घोलप, के. टी. पाटील, डॉ. नंदकुमार कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यांनी घडविले कोल्हापूर...

$
0
0


मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

देशातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. पुरोगामी विचारांचा, शेती, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक आणि उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरची ही ओळख घडवण्यात अनेकांचे योगदान आहे, अशा व्यक्तींच्या कार्याची प्रचिती करून देणारी ग्रंथमाला श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्ध केली जाणार आहे.

यापूर्वी श्रमिक प्रतिष्ठानने 'यांनी घडविले कोल्हापूर'चे दोन खंड प्रसिद्ध केले आहेत. 'एका व्यक्तीवर एक पुस्तिका' अशा दहा व्यक्तींवरील पुस्तिकांचा संच असे या खंडाचे स्वरुप आहे. या प्रकल्पातील तिसऱ्या खंडाचे काम सुरू झाले आहे.

२०१२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या खंडातून राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, डॉ. पी. सी. पाटील, संतराम पाटील, डॉ. बाळकृष्ण, भाई माधवराव बागल, जे. पी. नाईक, दादासाहेब शिर्के, वि. स. खांडेकर, आप्पासाहेब पवार, प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनकार्यांची माहिती देणारी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. तर २०१३ मध्ये दुसरा खंड प्रकाशित करण्यात आला यामध्ये राजाराम महाराज, रत्नाप्पा कुंभार, बाबूराव पेंटर, केशवराव विचारे, विमलाताई बागल, एस. पी. पी. थोरात, वाय. पी. पोवार, शांताराम गरूड, अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जीवनकार्यांवरील पुस्तिकांचा समावेश आहे.

श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे म्हणाले, 'कोल्हापूरला घडविण्यात ज्या व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे, अशांची चरित्रे, जीवनकार्य लोकांसमोर यावे या उद्देशाने हे काम सुरू आहे. लवकरच तिसऱ्या खंडाचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची बैठक घेण्यात आली आहे. ज्यांची चरित्रे साकारायची आहेत, त्यांची यादीही बनवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे एका खंडात दहा व्यक्तींवरील पुस्तिका असाव्यात असे आम्ही पाहतो. एक पुस्तिका ७० ते ८० पानांची असते. याशिवाय कोल्हापूरची शाहिरी परंपरामध्ये लहरी हैदर, पिराजीराव सरनाईक, अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याचा आढावा घेण्याचे नियोजन आहे. तर कुस्ती परंपरेवर वेगळे पुस्तक असेल. कोल्हापूरच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, त्यांतील अनेकांचे कार्य आजच्या पिढीला माहिती नाही. खरेतर पीएचडी किंवा एमफील होवू शकेल इतके उत्तुंग कार्य या व्यक्तींचे आहे.'

तिसऱ्या खंडासाठी अल्लादियाखाँसाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, यशवंतराव चव्हाण, बापूसाहेब पाटील, दासराम जाधव, व्ही. शांताराम, त्र्यं.सी. कारखानीस, उर्मिला सबनीस, बाबूराव यादव, मेघनाथ नागेशकर, शंकर पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कार्यावर पुस्तिका लिहिण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड, शिरोळमध्ये लक्षवेधी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य या पक्षांनी एकत्र येत छत्रपती शाहू विकास आघाडीची स्थापना केल्याने निवडणुकीतील रंगत संपलेली असली तरी काही जागांवर लक्षवेधी लढती होत आहेत. आघाडी होऊनही काही उमदेवारांना पाडण्यासाठी आघाडी अंतर्गत नेत्यांचे प्रयत्न होतील असे चित्र आहे. भाजप आणि शिवसेनाप्रणीत 'छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी' सहा जागा लढवत आहे. सेवा संस्थांमध्ये आमदार महादेवराव महाडिक (हातकणंगले), माजी आमदार पी. एन. पाटील (करवीर), माजी मंत्री विनय कोरे (पन्हाळा), ए. वाय. पाटील (राधानगरी) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

सध्याचे चित्र पाहता सेवासंस्था गटातील आजरा, चंदगड, गगनबावडा आणि शिरोळ तालुक्यात लक्षवेधी लढती होतील. तसेच नागरी सहकारी बँक आणि अनुसुचित जातीमधून 'काटा' लढत असेल.

आजरा तालुक्यातून अशोक चराटी यांच्याविरोधात जयवंतराव ‌शिंपी अशी थेट लढत होत आहे. दोन्ही गट तुल्यबळ असल्याने ही लढत जिल्ह्यात महत्त्वाची ठरणार आहे. तर चंदगड तालुक्यात माजी आमदार न‌रसिंग गुरुनाथ पाटील आणि गोपाळ पाटील यांच्यात पारंपरिक लढत होणार आहे. या दोन्ही ठिकाणी माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार महादेवराव महाडिक यांचा 'शब्द' महत्त्वाचा ठरणार आहे.

गगनबावडा तालुक्यात मान‌सिंग पाटील आणि पी. जी. शिंदे यांच्यात लढत असेल. गगनबावडा तालुक्यात माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रभाव आहे, त्यांनी मानसिंग पाटील यांच्यासाठी माघार घेतली आहे. तर गगनबावड्यातील सहकार क्षेत्रात पी. जी. शिंदे यांचीही शक्ती लक्षणीय आहे. या दोघांतील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

शिरोळ तालुक्यातून राष्ट्रवादीचे विठ्ठलराव नाईक निंबाळकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. नाईक निंबाळकर शिरोळ तालुक्यातील जुनेजानते नेते आहेत, तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडेही सहकारी संस्थाचे जाळे आहे.

अनुसुचित जाती जमातीतून ‌भाजप शिवसेनेच्यावतीने डॉ. सुजीत मिणचेकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजीव जयवंतराव आवळे यांच्यात लढत होत आहे. भाजप शिवसेनेचा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात फारसा प्रभाव नसला तरी ही लढत नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीची सहकार क्षेत्रातील पकड लक्षात घेवून मिणचेकर यांनीही जोमाने प्रचार सुरू केला आहे. मिणचेकर यांनी विधानसभा निवडणुकीत एकदा राजीव आवळे यांचा तर २०१४ मध्ये जयवंतराव आवळे यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आवळे गटासाठी सक्रीय असेल. भटक्या विमुक्त जातीतून काँग्रेस राष्ट्रवादीचे अप्पी पाटील आणि भाजप शिवसेनेचे परशुराम तावरे यांच्यातही चांगली लढत होणार आहे.

बँका, पतसंस्था गटाकडे लक्ष

बँका आणि पतसंस्था गटातून प्रा. जयंत पाटील विरुद्ध भाजप शिवसेनेचे अनिल पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. राजकीयदृष्ट्या कसलेले कार्यकर्ते अशी जयंत पाटील यांची ओळख आहे, तर अनिल पाटील हे सहकारी बँक क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारर्किदीत अनेक नेत्यांना जवळ केले आहे तसेच अनेकांना दुखावलेही आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांना मदतीचा मार्ग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विकासाच्या हव्यासापोटी मानवाने स्वतःपलिकडे इतरांची पर्वा केली नाही. त्यातून पशू व पक्ष्यांसाठी निर्माण केलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आता मानवानेच पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी वेगळे काही न करता दररोजच्या बिस्किट, ब्रेडच्या पाकिटातील भुगा, पीठ चाळल्यानंतर शिल्लक राहणारा चाळ, कोरडा खाद्यपदार्थ हे सर्व पक्ष्यांसाठी चांगले अन्न ठरतात. ही जाणीव जरी प्रत्येकाने ठेवली तर दररोज कचरा म्हणून जाणारा हा प्रकार पक्ष्यांसाठी भरपूर देऊ शकतो. त्यामुळे लहानग्या पक्ष्यांसाठी कटाक्षाने नव्हे तर जाता जाताही भरपूर मदत करता येऊ शकते.

शाहूपुरीतील अशोक आफळे हे पक्ष्यांसाठी नियमित खाद्यपदार्थ ठेवतातच, शिवाय पाण्यामध्ये साखर अथवा ग्लुकोज टाकून उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांचा उत्साह वाढवत आहेत. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

उन्हाळ्याचा तडाख्याने पक्ष्यांची चांगलीच ससेहोलपट होत असते. गारवा निर्माण करणारे जुने वाडे व झाडे जाऊन काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे पक्ष्यांचे उन्हाळ्याच्या दिवसातील विसावे नष्ट झाले आहेत. साहजिकच अन्न व पाण्यासाठीही त्यांची दमछाक होत आहे. त्यांच्या अडचणी या मानवनिर्मित आहेत. त्यामुळे त्या सोडवण्यासाठी मानवानेच पुढाकार घेतला पाहिजे हे तत्त्व बाळगून आफळे यांनी सर्वांना आदर्श असा उपक्रम आपल्या घराच्या परिसरात राबवला आहे.

घराची गच्ची असो वा समोरील अंगण असो, तिथे पक्ष्यांना पिता येईल अशा भांड्यामध्ये ते पाणी ठेवतात. बेकरीतील ब्रेड, बिस्किटसारखे पॅकिंगमधील जे पदार्थ असतात. त्यांच्या पॅकिंगमध्ये भुगा पडतो. तो आपण सहजपणे कचऱ्याच्या डब्यात टाकतो. तोही पक्ष्यांचे चांगले अन्न होते.

याशिवाय घरात आपण अनेक कोरडे पदार्थ खाण्यासाठी आणतो. त्यामध्ये चिवडा, विविध प्रकारचे वेफर्स यांचा समावेश असतो. तो जुना झाला म्हणून टाकून न देता तो पक्ष्यांच्या भांड्यात ठेवल्यास पक्ष्याचे चांगले अन्न होते.

घराबाहेरील उष्णतेने पाणीही गरम होते. अनेकवेळा ते पाणी पक्षी पित नाहीत. त्यासाठी पाणी सावलीत ​ठेवल्यास त्याचा पक्ष्यांना खरोखर उपयोग होईल. लहानग्या पक्ष्यांसाठी असे लहानगे प्रयत्नही जीव वाचवण्याचे फार मोठे काम होऊ शकते हे आफळे यांनी दाखवून दिले आहे.

.........

दररोज घरात गहू किंवा ज्वारीचे पीठ चाळले जाते. चाळल्यानंतर त्या पिठातील जो भाग राहतो, त्याला चाळ म्हणतात. तो भाग पक्षी आवडीने खातात असा आफळे यांचा अनुभव आहे. तसेच जेवण झाल्यानंतर जे खरकटे रहाते. ते कचऱ्यात टाकून न देता पाण्याशेजारी उथळ भांड्यात ठेवावे. पक्षी तेही खूप आवडीने खातात व घरातील कचराही निघून जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकाम’च्या योजनांचा तिढा

$
0
0

महेश पाटील, कोल्हापूर

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक दाखल्यांबाबत बदललेल्या नियमानुसार राज्यभर कार्यवाही सुरू झाली असली तरी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत केली गेली नसल्याने योजनांच्या अंमलबजावणीच्या गतीचा प्रश्न कायमच आहे. कल्याणकारी मंडळासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात न आल्याने कामगार आयुक्त विभागाकडूनच याचे कामकाज सुरू आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ, कामाचा ताण यामुळे नोंदणी बंद असल्याचा आरोप कामगार संघटनांचा आहे. तर नोंदणी सुरू आहे. अपुऱ्या मनुष्यबळासह काही प्रमाणात कामाचा ताण आहे. तरीही नोंदणी थांबविण्यात आली नसल्याचे सहायक कामगार आयुक्तांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने १९९६ मध्ये इमारत व इतर बांधकाम कायदा लागू केला. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात २००७ मध्ये सुरू झाली. या योजनेमध्ये बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजना सुरू झाल्या आहेत. कोणत्याही क्षेत्रातील बांधकाम कामगार यासाठी नोंदणी करू शकतो. नोंदणीनंतर त्यांना एक लाख रुपयांच्या विम्यासह विविध २४ योजनांचा लाभ मिळतो. कल्याणकारी मंडळाच्या २१ ऑक्टोबर २०१३च्या निर्णयानुसार बांधकाम कामगारांना ३००० रुपये भेटवस्तू खरेदीसाठी मिळतात.

तीन महिन्यांपूर्वी दाखले देण्याच्या पद्धतीत सरकारने बदल केले. यापूर्वी फक्त बांधकाम व्यावसायिकांकडील दाखला ग्राह्य धरला जात होता. आता त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेकडून दाखला घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेकडून दाखले दिले जाऊ लागले आहेत. मात्र, त्यासाठीही कामगार संघटनांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. यापुढील टप्प्यातील नोंदणीच्या अडचणी कायम आहेत. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडील अपुरे मनुष्यबळ, कामाचा ताण यामुळे नोंदणी बंद असल्याचे सांगितले जाते असा आरोप कामगार संघटनांचा आहे. दाखले असुनही योजनांचा लाभ मिळत नसल्याचे आरपीआयच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष गुणवंत नागटीळे यांनी सांगितले. आणखी दहा हजार कामगार दाखल्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भात, सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'कामगार कल्याण मंडळाच्या योजनांसाठीची बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू आहे. ती बंद करण्यात आलेली नाही. मात्र, कामगार आयुक्त कार्यालयाकडे यासाठी स्वतंत्र स्टाफ नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या मनुष्यबळावरच कल्याण मंडळाकडील योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यातही कोल्हापूर अग्रेसर आहे. आतापर्यंत ४१ हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. पुर्ननोंदणीसाठी आलेल्या ८२०० अर्जांपैकी ४५०० अर्ज आतापर्यंत मंजूर झाले आहेत. बांधकाम कामगारांना दिल्या गेलेल्या दहा कोटी रुपयांच्या वैद्यकीय सुविधेपैकी सात कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना दिले गेले. कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू खरेदीसाठीही कोल्हापूर जिल्ह्याने ४ कोटी ६८ लाख रुपये मिळवले आहेत. घरेलू मोलकरीण कामगारांच्या नोंदणीचाही १२ हजारांचा टप्पा आम्ही ओलांडला आहे. मनुष्यबळ अपुरे असल्याने कामावर ताण पडतो ही मात्र वस्तुस्थिती आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्षपदासाठी नऊ मे रोजी बैठक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांना अध्यक्षपद निवडीचे वेध लागले आहेत. आता गोकुळमध्ये १६ विरुद्ध २ असे संख्याबळ आहे. आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष होणार असल्याने आणि इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अध्यक्षपदाबाबत उत्सुकता आहे. अध्यक्षपदासाठी बुधवारी संध्याकाळी बैठक होणार असून त्यावेळी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर गोकुळचा अध्यक्ष कोण यासाठी सर्वांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्षपदासाठी सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरीही अनुभवी संचालकाला संधी द्यावी अशी मागणी आहे. विद्यमान संचालकांपैकी पाच संचालकांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे नव्यांना संधी मिळणार का याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती-बालाजीचा शाही विवाह

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलांनी सजवलेला मंडप, तिरूपती बालाजी मंदिराची सुवर्णप्रतिकृती, मंगलकलश, लक्ष्मीदेवीची सालंकृत मूर्ती आणि मंत्रोपचाराचे अखंड पठण अशा मंगलमय वातावरणात कल्याणमहोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी तिरूपती बालाजी आणि देवी पद्मावती यांचा शाही विवाह सोहळा शेकडो करवीरकरांच्या साक्षीने मंगळवारी गोरज मुहुर्तावर संपन्न झाला. हा २५५ वा सोहळा असल्याचे श्री वारी फाउंडेशनचे संचालक व्यंकटेशमूर्ती यांनी सांगितले. पेटाळा मैदानावर उभारण्यात आलेल्या आकर्षक शामियानात बेंगळुरू येथील श्रीवारी फाउंडेशन, श्री राघवेंद्र स्वामी मठ आणि कोल्हापुरातील चिपडे सराफ यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी सात वाजता विवाहाच्या विधींना प्रारंभ झाला. तत्पूर्वी पाच वाजल्यापासूनच या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. नागाळा पार्क येथील राधिका चिपडे भजनी मंडळाच्या महिला कलाकारांनी पद्मावती आणि बालाजी यांच्यावर भजनातून स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर या विवाह सोहळ्याला सर्व देवतांनी उपस्थित रहावे यासाठी मंत्रांच्या माध्यमातून आवाहन केले. गणेश पूजन झाल्यानंतर वर श्रीनिवास बालाजी मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पद्मावती देवीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. ज्या लक्ष्मीदेवीच्या साक्षीने हा विवाह सोहळा साजरा केला जातो त्या देवीची आराधना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉकी स्टेडियमनजीक रस्ता खचला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाल्यानंतर यातील काही रस्त्यांवर पडलेले छोटे-छोटे खड्डेही भरून देखभाल करत असल्याचे दाखवून दिले जात आहे. पण त्याच प्रकल्पातील शहरातील वर्दळीचा व मध्यवस्तीतील असलेल्या हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज या रस्त्याचा काही भाग खचला असून त्याकडे लक्षही दिले जात नाही.

ड्रेनेजच्या मॅनहोल्सजवळील भागही खचला आहे. त्याकडेही फारसे लक्ष दिलेले नाही. या दुर्लक्षामुळे पावसाळ्यामध्ये हा खचलेला भाग आणखी खचून कदाचित रस्ताही बंद होऊ शकतो.

रस्ते प्रकल्पातील बहुतांश रस्ते आयआरबीने अर्धे डांबरी तर अर्धे काँक्रीटचे केले. पण हॉकी स्टेडियम ते टायटन शोरुमपर्यंतचा रस्ता पूर्णपणे डांबराचा केला आहे. या रस्त्याखाली शहरातील सर्वात मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जितके शक्य होईल, तितके त्यावर भर टाकून हा रस्ता करण्यात आला आहे. पण काही ठिकाणी कठीण दगडाचा तर काही ठिकाणी माती आहे. मातीच्या ठिकाणी भर टाकण्याबरोबरच दगडी खडीही वापरली आहे. पण लवकर रस्ता पूर्ण करण्याच्या प्रयत्नाला आवश्यक तितका वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर सातत्याने या रस्त्यावर काम करण्याची आवश्यकता होती. रस्त्याचे काम होऊन आता जवळपास चार वर्षे होत आली आहेत. या काळात हॉकी स्टेडियम ते यल्लमा मंदिर चौकापर्यंत काळी माती असलेल्या भागात ड्रेनेजच्या मॅनहोल्सच्या ठिकाणी रस्ता खचला आहे.

मॅनहोल्सच्या भोवतालचा भाग खचला आहे. दिवसभर हा प्रकार लक्षात येतो. पण अंधारात या खचलेल्या भागाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने जोराने आदळतात. याशिवाय मंडलिक वसाहतीजवळील रस्त्याचाही मोठा भाग खचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासासाठी निम्माच निधी

$
0
0


आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

महापालिकेतील सत्ता संघर्षाच्या राजकारणामुळे बजेटवर सही होण्यास लागलेला विलंब, तोंडावर आलेला पावसाळा आणि ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमुळे पाच महिन्यांचा कालावधी यामुळे अर्थसंकल्पात तरतूद करूनही नगरसेवकांना विकासकामांसाठी निम्माच निधी मिळणार आहे. १५ मे नंतर रस्त्याची कामे करता येणार नसल्यामुळे गटर आणि चॅनेल या दोनच कामांसाठीच ऐच्छिक निधी खर्ची टाकावा लागणार आहे. भांडवली व महसुली निधीतून होणारी विकासकामेही अर्ध्यावरच लटकणार आहेत. रस्ते पॅचवर्कसह अन्य कामे टाळावी लागणार आहेत.

महापालिकेच्या स्वनिधीतून नगरसेवकांना ऐच्छिक निधीतंर्गत त्यांच्या प्रभागातील विविध कामासाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यंदा सभागृहाने अर्थसंकल्प मंजूर करून त्यावर महापौरांच्या सही होण्यासाठी वीस दिवसांचा कालखंड लागला. महापौरांनी बजेटवर सही केल्याने आता प्रशासकीय व नगरसेवक पातळीवर ऐच्छिक निधीतंर्गत एस्टीमेट तयार करण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये मोजक्याच नगरसेवकांनी लक्ष घालत एस्टीमेटचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत. बहुतांश नगरसेवकांनी अजून एस्टीमेट सादर केले नाहीत. एस्टीमेट तयार करणे, वॉर्ड ऑफीसची मान्यता आणि निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी बरेच दिवस जातात. यामुळे हा निधी खर्ची पडण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, नगरसेवक सचिन चव्हाण स्थायी समिती सभापती असताना त्यांनी सर्व नगरसेवकांचे एस्टीमेट एकत्र तयार करून एकाच वेळी निविदा प्रक्रिया राबवली होती. प्रशासनावर पकड ठेवत त्यांनी ऐच्छिक निधी तत्काळ खर्ची पडावा यासाठी प्रत्यक्ष नियोजन केले होते. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्यासह महापालिकेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी निधी तत्काळ खर्ची पडावा याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

मात्र, गेल्या तीन महिन्यांत महापौरांच्या राजीनाम्याच्या प्रकरणावरून महापालिकेतील राजकारण टोकाला पोहचले आहे. परिणामी पदाधिकारी एकत्र येऊन विकासकामांसाठी प्रशासनावर एक​त्रित दबाव टाकणार का यावर निधीचे भवितव्य अवलंबून असल्याचे नगरसेवक निशिकांत मेथे यांनी सांगितले.

बगिच्यांचा विकास कधी ?

सभापती आदील फरास यांनी अर्थसंकल्पात बागेत खेळणी व बाके याकरिता प्रत्येक प्रभागाकरिता ७५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया, त्यानंतर प्रशासकीय कामकाज याकरिता भांडवली की महसुली निधीची उपलब्धता होईल याचा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बगिचामध्ये खेळणी आणि बाकांचा निर्णय लटकण्याची शक्यता आहे.

२०१५-१६ मधील अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सध्याच्या सभागृहाला ५० टक्केच निधी मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी पुढील सभागृहाला उपलब्ध करण्यासंदर्भात नियम आहे. यामुळे प्रभागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामावर मर्यादा पडणार आहे. केवळ गटर्स, चॅनेल आणि पॅसेज काँक्रीटकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. -चंद्रकांत घाटगे, सभागृह नेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळापेक्षा मारामारीत ‘दरारा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऐतिहासिक क्रीडा परंपरा लाभलेल्या फुटबॉलने कोल्हापूरचा वेगळाच दरारा निर्माण केला आहे. तालीम व संघाच्या अस्मितेसाठी जीवतोड संघर्ष करणाऱ्या खेळाडूंमुळे फुटबॉलला वेगळी उंची मिळाली. पण गेल्या काही दिवसांपासून मैदानावर आणि मैदानाबाहेर खेळाडूंसह समर्थकांच्या हुल्लडबाजीमुळे फुटबॉलचा गालबोट लागत आहे. ही हुल्लडबाजी रोखण्यास कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनला (केएसए) अपयश आल्याने त्यांचे लोण आता व्यवसाय आणि घरावर हल्ला करण्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे फुटबॉलच्या मैदानावरील खेळाच्या दरारापेक्षा आता मारामारीतच वाढतोय की काय, एवढी वाईट परिस्थिती आहे.

मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान रविवारी पीटीएम आणि दिलबहार समर्थकांत राडा झाला. खेळाडूंच्या गैरवर्तनाचा फटका फुटबॉलशी संबंधित नसलेल्या अनेक घटकांना बसला. मैदानावरील इर्ष्या मैदानावरच न संपवता ती मैदानाबाहेर जाणीवपूर्वक वाढवली जात आहे. दीपक थोरात याच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूने प्रेक्षकांच्या दिशेने दगड, बाटली फेकून मारल्यानंतर काही व्यक्ती समर्थकांना मैदानाबाहेर येण्याच्या सूचना करत होते. त्यांच्या या सूचना म्हणजे पूर्वनियोजीत राड्याचाच भाग होता. यादरम्यान दोन्ही मंडळातील एकही ज्येष्ठ कार्यकर्ता समर्थकांना अडवण्यासाठी पुढे येत नव्हता. यामुळे दिलबहारच्या समर्थकांनी पीटीएमच्या खेळाडूच्या घरावर तर पीटीएम समर्थकांनी दिलबहारच्या खेळाडूच्या दुकानावर दगडफेक केली.

मैदानावरील खेळाडूंसाठी केएसएने अचारसंहिता तयार केली आहे. त्यानंतरही अनेकदा खेळाडू पंचाच्या अंगावर धावून जाणे, प्रेक्षकांकडे पाहून जमाव प्रक्षोभक होईल असे हावभाव करणे अशा घटना घडल्या. मात्र केएसएने कारवाई न केल्याने खेळाडूंना प्रोत्साहनच मिळत गेले. याचमुळे रविवारचा गोंधळ वाढत गेला. केएसएने वेळीच कारवाई केली असती तर असे अनेक प्रसंग टाळता आले असते, असे फुटबॉल शौकिनांचे म्हणणे आहे.

दुजाभाव वाढतोय?

केएसएने खेळाडूंच्या वागणुकीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. खेळाडू पाहून कारवाई केली जात असल्याने खेळाडूंच्या मनातही शल्य आहे. कालच्या सामन्यातही पीटीएमच्या दीपक थोरात, धैर्यशील पोवार, सैफ हकीम पंचाच्या अंगावर धावून जाण्याबरोबरच प्रेक्षकांना थेट दगड व बाटल्या फेकून मारत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. खेळाडूंच्या या वर्तनावर केएसएने कठोर कारवाई न केल्यास अशा प्रकाराला पुन्हा उत्तेजन मिळणार आहे.

नेत्यांचे दुर्लक्ष

बक्षीस समारंभास खासदार धनंजय महाडिक, स्थायी समिती सभापती अदिल फरास उपस्थित होते. त्याचवेळी दोन्ही समर्थकांत प्रचंड दगडफेक सुरू होती. मतांसाठी प्रत्येक मंडळाकडे पाठिंबा मागायला जाणारे या दोन्ही नेत्यांनी राडा सुरू असताना तेथून जाताना शांततेचे आव्हानही केले नाही. त्यांच्या या वृत्तीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते सखारामबापू खराडे यांनी अशा अनेक घटनावेळी जमावात घुसून जमावाला पांगवले होते. कालच्या घटनेने खराडे यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.

खेळाडूंकडूनच हुल्लडबाजीला प्रोत्साहन

पीटीएम, फुलेवाडी, खंडोबा संघातील प्रत्येकी एक-दोन खेळाडू पराभव समोर दिसू लागला की मैदानावर गैरवर्तन करायला सुरुवात करतात. खेळाडूंच्या अशा वर्तनामुळे समर्थकांना उत्तेजन मिळते. त्यातून विरोधी संघातील खेळाडूंना अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात होते. यामुळे मैदानाबाहेरही वातावरण तणावपूर्ण बनते. अशा खेळाडूंवर केएसएने आजीवन बंदी घालावी अशी मागणी फुटबॉलशौकिन करीत आहेत.

हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे फुटबॉलला गालबोट लागत आहे. हुल्लडबाजांत लहान मुले असल्याने त्याचे गांभीर्य जास्त आहे. वाद वाढत गेल्यास अनेक उदयोन्मुख खेळाडूंचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. सर्व समर्थकांची बैठक घेऊन यासंबंधी सूचना देऊ. - रामभाऊ फाळके, अध्यक्ष, दिलबहार तालीम मंडळ

या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशिक्षणादरम्यानच खेळाडूंना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे. वारंवार वादाचे प्रसंग घडल्यास फुटबॉल बंद पडण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते, समर्थकांची दोन दिवसांत बैठक घेऊन सूचना देण्यात येणार आहेत. - एस. वाय. सरनाईक, अध्यक्ष, पीटीएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लीम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम स्पर्धेत सोमवारी राडा करून दहशत माजवणाऱ्या पाटाकडील तालीम मंडळाच्या २५ जणांव तर दिलबहारच्या आठ समर्थकांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. स्पर्धेसाठी रितसर परवानगी न घेतल्याप्रकरणी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे सचिव माणिक मंडलिक, सदस्य संभाजी पाटील-मांगोरे, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, सुपरिटेंडेंट कादर मलबारी यांच्यावर पोलिसांनी खटला दाखल केला आहे.

पीटीएमचे संशयित जय जाधव, संपत जाधव, अश्विन गडकरी, दीपक थोरात, रोहित ठोंबरे, अमित जाधव, अमोल पाटील, रोहन ठोंबरे, सुमित जाधव, संतोष भोसले, पराग हवालदार, अभिजित नलवडे, करण, वृषभ ढेरे, जुनेद हकीम, सूरज हकीम, तौसिफ हकीम, महेश पाटील, संतोष शिंदे, सागर कांदेकर, मिथुन मगदूम, निलेश चव्हाण, महेश यादव, रोहित दरवान, उमेश पाटील या संशयितांना पोलिसांनी अटक केली. दिलबहारचे कार्यकर्ते राजू पाटील, बंटी कावणेकर, अक्षय साळोखे, टिल्लू शिंदे, रतन, उमेश साळोखे, शैलेश जाधव, अभिषेक सावंत, विश्वास दिलीप पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

युवकांचे करिअर धोक्यात

दोन्ही तालमींसह शहरातील अन्य मंडळे व तालमींच्या काही युवा कार्यकर्त्यांवर यापूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, आंदोलन, सोशल मीडियावर राष्ट्रपुरूषांची बदनामी झालेल्या गुन्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी पोलिस भरती, अन्य सरकारी कर्मचारी परीक्षेत गुन्हे दाखल झालेले तीघेजण उत्तीर्ण झाले होते. मात्र चारित्र्य पडताळणी दाखल्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने समोर आल्यानंतर त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. तशाच प्रकारे या गुन्ह्यातील सहभागी असलेल्यांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संशयितांची बडदास्त

पीटीएम - दिलबहारच्या अटक केलेल्या संशयितांची पोलिस ठाण्यात बडदास्त ठेवण्यात आली होती. संशयितांना नाष्टा, थंड पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात आला. मुख्य संशयित संपत जाधव हा पोलिस ठाण्याच्या आवारात मोबाइलवर बाहेरच्या समर्थकांशी संपर्क साधत बोलताना दिसत होता. संपत जाधव याचा भाऊ निवृत्त पोलिस कर्मचारी असल्याने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सीपीआरमध्येही संशयितांना भेटण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली होती.

कारवाईनंतर स्पर्धेला परवानगी

अंतिम सामन्यात दोषी खेळाडू, संघांवरील कारवाईनंतर पुढील स्पर्धेला परवानगी दिली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शाहू स्टेडियमवर सीसीटीव्ही बसविले असल्याने केएसएकडे फुटेज उपलब्ध आहे. त्यामुळे केएसएकडून लवकर कारवाई होईल असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर केएसएस नेहमी कारवाईबाबत संयोजकांकडे बोट दाखवत असते. केएसए ही मुख्य आयोजक व शिखर संस्था असल्याने त्यांनाच खेळाडू, संघावर कारवाई करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटबॉल राड्यात पोलिस कर्मचारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाटाकडील तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळातील अंतिम सामन्यात राडा करण्यात पुढे असलेला पाटाकडील तालमीचा (पीटीएम) समर्थक रोहित शेखर ठोंबरे याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली आहे. रोहित हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. जुना राजवाडा पोलिसांनी हुल्लबाजांवर कडक कारवाई करताना पाटाकडीलच्या २५ तर दिलबहारच्या ८ समर्थकांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

सोमवारी शाहू स्टेडियमवर दिलबहार व पाटाकडील यांच्यात अंतिम सामना झाला. या वेळी पीटीएम समर्थकांनी दिलबहार समर्थकांवर चाल केली. पीटीएमचे खेळाडू व समर्थकांनी दिलबहारच्या गॅलरीत दगडफेक केली. त्यानंतर पीटीएम समर्थकांनी मैदानाबाहेर दिलबहार तालमीच्या रिक्षा स्टॉपची मोडतोड करीत बाटल्या फोडून दहशत माजवली. एकीकडे मैदानात सामना सुरू असताना दुसरीकडे दोन्ही संघाच्या समर्थकांनी मैदानाबाहेर येत शक्तिप्रदर्शन केले. दिलबहार समर्थकांनी पीटीएमचा खेळाडू रूपेश सुर्वेच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर पीटीएम व दिलबहार समर्थकांनी देवल क्लब, खासबाग मैदान, खाऊ गल्लीत दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

घटनेची गंभीर दखल घेत जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी पीटीएमच्या २५ तर दिलबहारच्या ८ समर्थकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे मागे घेण्यासाठी दोन्ही संघांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण पोलिस कारवाईवर ठाम राहिले. पोलिसांनी शोधमोहीम घेत हुल्लडबाजांना अटक केली. हुल्लडबाजांवरील कारवाई मागे घेणार नाही, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पीटीएमकडील समर्थक पोलिस रोहित ठोंबरे याच्यावरही कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेचे संयोजक कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व मुस्लिम बोर्डिंग यांनी पोलिस बंदोबस्तासाठी शुल्क भरले नसल्याने व रितसर परवानगी न घेतल्याने त्यांच्यावर खटला दाखल केल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी. एन. मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images