Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

परिचालकांचा तिढा कायम

0
0

प्रकाश कारंडे, कागल

संगणक परिचालक एकीकडे ई पंचायतीच्या नावाखाली ग्रामपंचायतीत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत तर दुसरीकडे सरकारकडून कंपनीला मिळालेले मानधनही तब्बल सहा महिने देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांचे सुमारे १५० कोटी रुपये येणे आहेत. महागाईच्या गर्तेत परिचालकांवर उपासमारीची वेळ आली असून सरकारने या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. पुढील आशेवर उच्चशिक्षीत तरूण-तरुणी यामध्ये नोकरीच्या अमिषाने कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने आश्वासनांच्या हिंदोळ्यावर आपला उमेदीचा काळ फुकट गेल्याचीच परिचालकांची भावना आहे.

केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने पंचायत राज संस्थांच्या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने ई पंचायत राज्यात सुरु केले. यामधील महत्वाचा कणा असणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील २७ हजार सुशिक्षित संगणक परिचालकांनी तुटपुंज्या मानधनावर रात्रंदिवस राबून महाराष्ट्राला देशात तीन वेळा अव्वल स्थानावर पोहचवले. पण कष्ट करणाऱ्या संगणक परिचालकांवर महा ऑनलाईन कंपनीच्या जाचक अटीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना कामाच्या मोबदल्यासाठी तीन वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यापासून मानधन नसल्याने नाईलाजास्तव राज्यातील परिचालक आपल्या हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. नुकत्याच मुंबईतील आंदोलनातही आश्वासनाशिवाय काहीच नाही.

अध्यादेशाप्रमाणेच खर्च

'कंपनीच्या म्हणण्यानुसार टॅक्स वजा जाता आठ हजार रुपये कंपनीला मिळतात. त्यातून चार हजार १०० रुपये परिचालकांना देवून उर्वरित रक्कम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ट्रेनिंग खर्च, स्टेशनरी,इन्फास्ट्रक्चर खर्च आणि या परिचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात एक हजार जण काम करतात, त्यांच्यावर खर्च सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे करण्यात येतो, असे नितीन मुळे यांनी सांगितले.

पदवीधर, बीसीए, एमबीए अशा उच्चशिक्षित कुशल प्रशिक्षित संगणक परिचालकांनी गेल्या तीन वर्षापासून तुटपुंज्या मानधनात कष्ट केल्यामुळे राज्याला नेहमीच ई पंचायतीमध्ये देशात अव्वल स्थानावर पोहचवले आहे. इतर राज्यामध्ये परिचालकांना आठ हजार वेतनासह कायमस्वरुपी केले आहे. नको ते खर्च दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीशी पुन्हा करार करू नये.

- विशाल चिखलीकर, राज्य अध्यक्ष, राज्य संगणक परिचालक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रिया पाटील डीवायएसपीपदी

0
0

कोल्हापूर : एमपीएससीत कोल्हापूरच्या एकवीसवर उमेदवारांनी बाजी मारली. प्रिया पाटीलची डीवायएसपीपदी तर गणेश महाडिक यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. गेल्या जूनमध्ये मुख्य परीक्षा झाली होती. फेब्रुवारीत झालेल्या मुलाखतीचा अंतिम निकाल रविवारी ऑनलाइन जाहीर केला.

वर्ग दोनमध्ये कोलोली (ता. पन्हाळा) येथील विजय जाधव आणि गटविकास अधिकारीपदासाठी भरत चौगुले (खुपीरे, ता. करवीर) यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळविला. कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती पुण्यात घेण्यात आल्या. एकूण ९०० गुणांची ही परीक्षा झाली. दीडशे गुणांचे चार पेपर, मराठीचा १०० आणि इंग्रजीचा १०० गुणांचा पेपर आणि १०० गुणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. येत्या काही दिवसांत प्रशिक्षण आणि कागदपत्रांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. दरवर्षी कोल्हापुरातून स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार गोरेंना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आंधळी (ता. माण) विकास सोसायटीच्या निवडणूक अधिकारी एस. एस. तायडे यांचे अपहरण केल्याप्रकरणी माणचे आमदार जयकुमार गोरे व त्यांचे स्वीय सहायक अभिज‌ित काळे (रा. मार्डी, ता. माण) यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोरे यांचे सहकारी प्रतापराव भोसले व चालक फरार असून, पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी प्रतिनिधीस दिली.

१९ मार्च रोजी माण तालुक्यातील आंधळी विकास सोसायटीची निवड प्रक्रिया होणार होती. मात्र, निवडणूक अधिकारी एस. एस. तायडे यांचे अपहरण झाल्याने ही निवड प्रक्रिया होऊ शकली नाही. या वेळी आमदार गोरे आणि त्यांचे विरोधक आणि बंधू शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांमधे धुमश्चक्री झाली होती. यानंतर ही निवडप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

तायडे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील घाडगेवाडी येथे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. ही तक्रार सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली. या तक्रारीनंतर तपासात आमदार गोरे यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे मिळाल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी दहिवडी येथून अटक करण्यात आली. तसेच, अटकेचे वृत्त फॅक्सद्वारे विधानसभेत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गोरे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारार्थ सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण करून तरुणाचा खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जमिनीच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणावरुन आरळे (ता. सातारा) बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) या तरुणाचे अपहरण करुन त्याला अंभेरी घाटात (ता. कोरेगाव) नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाला सातारा येथील एका खोलीत डांबून ठेवून त्याचा खून करून पुन्हा अंभेरी घाटात नेऊन जाळून टाकले. या भयानक घटनेची माहिती कळताच सातारा तालुका पोलिसांनी खुनाचा छडा लावून तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१ रा. आरळे ता. सातारा ) आणि राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (वय ४५ रा. खेड ता. सातारा) या दोघांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या दोघाची जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वादावादी झाली. त्यानंतर बजरंग जगन्नाथ गायकवाड याचे राजेंद्र पवार याने २६ मार्च रोजी स्कॉपिओ (एम. एच.१४ डी. एफ. ६४९३) या गाडीतून आरळे येथून अपहरण केले. त्यानंतर बजरंग गायकवाड यांना रहिमतपूर येथील अंभेरी घाटात नेऊन रात्री लाकडी दाडक्याने मारहाण केली. त्यानंतर बजरंग गायकवाड यांना जखमी अवस्थेत सातारा येथील एका खोलीत डांबून ठेवले. या घटनेत बजरंग गायकवाड यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ मार्च रोजी बजंरग गायकवाड यांना पुन्हा गाडीतून राजेंद्र पवार, वासुदेव शिवाजी जांभळे (वयस २२) रा. रहिमतपूर ता. कोरेगाव), आनंदा शरद सोनटक्के (रा. बारावकरनगर, सातारा) या तिघांनी अंभेरी घाटात नेऊन तिथे बजरंग गायकवाड यांना जाळून टाकले.

आपल्या भावाचे अपहरण झाले आहे, अशी फिर्याद हणमंत जगन्नाथ गायकवाड यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे हलवली. आरोपी राजेंद्र उर्फ वैभव रामराव पवार, वासुदेव शिवाजी जांभळे, आनंदा, शरद सोनटक्के या तिघांना अटक केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव हे करत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेल्या अस्थी डीएनए टेस्ट करण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत, असी माहिती एपीआय सुनील जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूधगंगेतील वाळू उपसा थांबविण्याची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शिवसेनेच्या वतीने कागल तालुक्यातील दूधगंगा आणि वेदगंगा नदीपात्रातील धोकादायक वाळू उपसा थांबवावा आणि पाण्याचे प्रदूषण थांबवावे या मागण्यासांठी तहसीलदार शांताराम सांगडे यांना निवेदन देण्यात आले. वाळू उपसा ठेके रद्द करून पुन्हा ठेकेच देवू नयेत आणि नद्यांचा प्रवाह, धूप आणि प्रदूषण थांबवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर चौकशी करतो असे जुजबी उत्तर तहसीलदारांनी दिले. याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे, अवैध वाळू उपशामुळे कागल तालुक्यात वाळू माफिये निर्माण होत आहेत. त्याविरुध्द पथक निर्माण करावेत व पर्यावरणाची हानी थांबवावी. मळगे ते यमगे दरम्यान दोन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची धूप होवून जमिनी नदीपात्रात ढासळत आहेत. २०१५ -१६ सालाकरीता प्रस्तावित ठेके रद्द करुन त्याचे दरमहाचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत. तहसीलदारांच्या ठोस आश्वासनाच्या अभावी शिवसैनिकांनी घोषणा देत प्रशासनाचा धिक्कार केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, शोभा पाटणकर, शिवगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदारास लाच घेताना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना पन्हाळा पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जगन्नाथ बाळू माळी (रा. कापरे गल्ली, कोडोली, ता. पन्हाळा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. मोबाइल हॅन्डसेट परत देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वाच्या सुमारास कोडोली येथील दत्त चौकात कारवाई करण्यात आली.

तक्रारदार सेंट्रींग व्यवसाय करतात. त्यांच्याकडे बांदीवडे (ता. पन्हाळा) येथील प्रकाश आनंदा सावंत काम करत होता. गेले महिनाभर तो कामाला आला नव्हता. पन्हाळा पोलिस ठाण्याचे हवालदार पाटील, थोरबाले व शिराळा पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांकडे जाऊन प्रकाश सावंतबाबत विचारपूस केली. त्यानंतर तक्रारदाराने प्रकाश सावंत यांचे राहते घर दाखवले. प्रकाश सावंत घरी न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला पन्हाळा पोलिस ठाण्यात नेले. तिथे सहाय्यक फौजदार जगन्नाथ माळी यांनी तक्रारदारांचा मोबाइल फोन काढून घेतला व तक्रारदाराला शिराळा पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिराळा पोलिसांनी जबाब घेऊन तक्रारदाराला सोडून दिले. त्यानंतर तक्रारदाराने जगन्नाथ माळी यांच्याकडे मोबाइल मागितला असता दोन हजार रूपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारला जे हवे होते, तेच घडले’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या होऊनही दीड महिन्यांचा कालावधी उलटला, मात्र अद्याप तपासाचा मार्ग सापडला नाही. मुळात या सरकारला पानसरे यांच्या हत्येचा शोधच लावायचा नाही. कारण सरकारला जे हवे होते, तेच घडले आहे. तपासाचा छडा लावण्याची सरकारची मानसिकता नाही' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. 'राज्य सरकार पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून ​मोकळे होईल. मात्र सीबीआयला महाराष्ट्राचा इतिहास काय माहित आहे?' अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार आव्हाड मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आव्हाड म्हणाले, 'अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची हत्या विशिष्ट विचारसरणीतून झाली. दाभोलकर कर्मकांडाविरोधात बोलत असल्याचे सनातनी विचारसरणीला रुचत नव्हते. कॉम्रेड पानसरे इतिहासाबद्दल बोलायचे. कर्मकांड, जातीयवादाविरोधात लढणाऱ्यांना संघर्ष करावा लागला आहे. अगदी राजर्षी शाहू महाराजांनाही विरोध झाला होता. पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्याची मानसिकता सरकारमध्ये दिसत नाही. हा तपास दिशाहीन बनला आहे.सरकारने कोर्टाच्या नियंत्रणाखाली विशेष तपास पथक नेमून त्यात पानसरे यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश करावा.'

दरम्यान, राज्यात सध्या शेठजींचे सरकार असल्याची टीकाही आव्हान यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकमत होईना, कोंडी फुटेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेरीवाल्यांचे पुनर्वसन व्हावे, शहराला शिस्त लागावी यासाठी शहरात निश्चित करायच्या फेरीवाला झोनबाबत प्रशासन आणि फेरीवाले संघटनेचे एकमत झालेले नाही. फेरीवाला झोनमध्ये प्रशासनाने ठरविलेले रस्ते आणि ठिकाणांबाबत फेरीवाला संघटनेचे आक्षेप आहेत. त्यामुळे या प्रश्नाची आणि शहरातील वाहतुकीची कोंडी फुटलेली नाही. प्रभाग फेरीवाला समितीपासून शहर फेरीवाला समितीपर्यंत समित्यांची स्थापना होऊनही तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा फेरीवाला संघटना आणि महापालिका प्रशासनातर्फे झोनसाठी संयुक्त पाहणी होणार आहे. या महिन्यात शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि चौकांचा सर्व्हे होणार आहे.

'ना फेरीवाला क्षेत्र' वादात

महापालिकेने तयार केलेल्या फेरीवाला झोनच्या प्राथमिक प्रस्तावात फेरीवाला क्षेत्र' (ग्रीन झोन) आणि 'ना फेरीवाला क्षेत्र' (रेड झोन) अशी वर्गवारी आहे. 'ना फेरीवाला क्षेत्रा'त महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, शिवाजी पुतळा परिसराचा समावेश केला आहे. याला फेरीवाले संघटनेचा विरोध आहे. या भागात फेरीवाले वर्षानुवर्षे व्यवसाय करतात. येथे फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातच पुनर्वसन व्हावे अशी फेरीवाले संघटनांची भूमिका असल्याचे कॉम्रेड दिलीप पोवार यांनी सांगितले. महापालिकेने फेरीवाले क्षेत्र म्हणून काही मार्केट्स, रस्ते निश्चित केले आहेत. तेथे नागरिकांची वर्दळ कमी असते. परिणामी व्यवसाय होणार नाही म्हणून महापालिकेने ठरविलेले 'फेरीवाला क्षेत्र' फेरीवाल्यांना मान्य नाही.

बायाेमेट्रिक कार्डकडे पाठ

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्राथमिक टप्पा म्हणून बायोमेट्रिक कार्ड उपलब्ध करण्यात आलीत. स्थिर व फिरते फेरीवाले अशी वर्गवारी आहे. महापालिकेने, पहिल्या टप्प्यात शहरातील पाच हजार फेरीवाल्यांसाठी कार्ड तयार केले. फेरीवाल्यांची ओळख, व्यवसाय ठरविण्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे. मात्र या कार्डाकडे फेरीवाल्यांनी पाठ फिरवली आहे. यापैकी २५०० कार्डांचे वितरण झाले आहे. उर्वरित कार्ड इस्टेट विभागाकडेच आहेत. बायोमेट्रिक कार्ड स्वीकारल्यास नियमाप्रमाणे व्यवसाय करावा लागेल, पळवाटा शोधता येणार नाही म्हणून फेरीवाले कार्ड स्वीकारत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फेरीवाल्यांना कार्ड देण्याची प्रक्रिया अर्धवट राहिली. शहरात बारा हजार फेरीवाले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वेनुसार फेरीवाल्यांची संख्या आठ हजार आहे. संख्येवरूनही फेरीवाले आणि प्रशासनात मतभेद आहेत.

अहवालास विलंब

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाले समिती आहे. समितीत फेरीवाले संघटनेला चाळीस टक्के प्रतिनिधीत्व आहे. विभागीय मार्केट कार्यालयाच्या धर्तीवर प्रभाग फेरीवाला समिती आहे. प्रभाग फेरीवाला समितीने भागाचा सर्व्हे केल्याची माहिती फेरीवाले संघटनेचे प्रतिनिधी समीर नदाफ यांनी सांगितले. प्रशासनाची सकारात्मक पावले पडत असून त्याला गती हवी असे मत त्यांनी व्यक्त केले. फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार प्रभाग फेरीवाला समितीतील चर्चा, वृत्तांत अ​धिकाऱ्यांनी विचारात घेतलेला नाही. मनमानी पद्धतीने अहवाल तयार केला. त्याला फेरीवाले संघटनेच्या प्रतिनिधींनी शहर फेरीवाले समितीत आक्षेप नोंदवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणकडून थकबाकीची लबाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सहकारी पाणी पुरवठा संस्थाना सक्तीने बसविण्यात येणाऱ्या मोटरपंपास जलमापक यंत्र बसविण्यास स्थगिती दिली आहे. दोन ते तीन वर्षासाठी उपसा जलसिंचन योजनेसाठी जलमापक मीटर बसविले जाणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर कले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्थाना दिलासा मिळाला आहे. फेडरेशनकडे शून्य थकबाकी असून सुमारे वीज वितरण कंपनीने दाखविलेली दहा कोटी रुपयांची थकबाकी लबाडी करीत आहे' असा आरोप राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, 'वीज चोरीप्रमाणेच अजूनही पाण्याची चोरी सुरू आहे. ही चोरी थांबविल्यास पाण्याचे वाटप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. राज्यात सुमारे १७ लाख मोटरपंप आहेत. शेतकऱ्यांनी कॅनॉल आणि नदीनाल्यावरून पाणी वापरास जलमापक यंत्र बसविण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यानुसार घनमीटर पद्धतीने पाण्याचा वापर केला जाणार होता. या मोटरपंपाला जलमापक यंत्र बसविणे सक्तीचे केले होते. या मीटरची किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी असल्याने सहकारी पाणी पुरवठा संस्थाना भुर्दंड होता. पाणीपट्टीतही चौपट वाढीची शक्यता होती. वीज वितरण कंपनीही थकबाकीची फुगीर आकडा दाखवित आहे. खरी थकबाकी ७०० कोटी इतकी आहे. थकबाकी ही वादग्रस्त आहे.' यावेळी आर. जी. तांबे, एस. ए. कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, विक्रांत पाटील, जे. पी. लाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आराखड्यात विश्वासही जपा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा धार्मिक पर्यटनवृद्धीसाठी चांगला असला तरी या आराखड्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिसरातील व्यापारी व रहिवाशांच्या विश्वासाला तडा देऊन कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी व्यापारी व स्थानिक ​नागरिकांनी केली. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरणाच्या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आराखड्यासाठी संपादित होणाऱ्या जागेबाबत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी परिसरातील सूक्ष्म सर्वेक्षणानंतर बैठक घेण्याचे आश्वासन महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.

ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेच्या सभागृहात बैठक झाली. मंदिर परिसरातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांसमोर शहर अभियंता सरनोबत यांनी २५५ कोटी रुपयांच्या आराखड्याच्या प्रारूप रचनेचे सादरीकरण केले. यावेळी रंकाळा विकास आराखड्यातील प्रस्तावित माहिती देण्यात आली. आराखड्यात नमूद रचनेनुसार भक्तीसेवा विद्यापीठ हायस्कूलसह परिसरातील रहिवासी आणि व्यापारी यांचे पुनर्वसन करावे असे म्हटले आहे. त्यामुळे पर्यायी जागा किती मिळणार?, ती कुठे मिळणार?, त्या जागेचे स्वरूप कसे असणार? हे मुद्दे स्पष्ट करावेत अशी मागणी नागरिकांनी केली.

यावेळी राजाभाऊ जोशी म्हणाले, 'जोपर्यंत पर्यायी जागेबाबत निश्चित भूमिका मांडली जात नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासनाने आराखड्याबाबत चर्चा करू नये. आराखडा मूर्त स्वरूपात आल्यामुळे विकासाला चालना मिळेल हे खरे असले तरी रहिवासी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कुचंबणा खपवून घेतली जाणार नाही.'

अजित ठाणेकर म्हणाले, 'अंबाबाई मंदिर परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह पूजा-साहित्य विक्रीतून चालतो. त्यामुळे आराखड्याच्या प्रस्तावानुसार पुनर्वसन करत असताना याचा विचार होणे आवश्यक आहे.'

अशोक देसाई म्हणाले, 'आराखड्यातील रचनेमध्ये मंदिराच्या सभोवताली भाविकांच्या सोयीसाठी इमारती उभारण्याचे सूचवण्यात आले आहे. इमारतींचा अडसर मंदिरातील धार्मिक वैशिष्ट्यावरही होऊ शकतो.'

महेश जाधव म्हणाले, 'मंदिर परिसरातील नागरीक, व्यापारी, रहिवासी यांना विश्वासात घेऊनच सुधारित आराखडा तयार करावा यासाठी आग्रही भूमिका घेतली जाईल.' यावेळी राजू मेवेकरी, विनायक रेवणकर, नगरसेवक आर. डी. पाटील यांनी सूचना मांडल्या.

दरम्यान महापालिकेच्या स्तरावर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचे, आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच आराखडा राबविला जाईल. लवकरच याबाबत बैठक घेऊ असे आश्वासन महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० वर्षांपासून घरात सौरऊर्जेचा वापर

0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

चटणीसाठी मसाला तसेच थालीपीठासाठी विविध डाळी, धान्याची भाजणी, उन्हाळ्यात केले जाणारे पापड, रोजचे जेवण, घरगुती वापरासाठीची वीज इतकेच नव्हे सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्याची किमया जिल्ह्यातील दोन महिलांनी साधली आहे. त्यातील आनंदी कांबळे या काटेभोगाव (ता. पन्हाळा) या दुर्गम खेड्यातील तर दुसऱ्या बीना केमकर या राजारामपुरी परिसरातील मंडलिक पार्कसारख्या सोसायटी कल्चरमधील.

या दोन्ही महिलांनी किमान दहा वर्षांपासून सौरऊर्जेचा वापर सुरू ठेवला आहे. निसर्गमित्र संस्थेचा वर्धापनदिन व आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्षानिमित्त या दोघींचा बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे.

आनंदी कांबळे यांच्याकडून केला जाणारा सौरऊर्जेचा वापर ग्रामीण भागातील तसेच शहरातील गृहिणींसाठीही आदर्शवत आहे. घरचे सर्व जेवण त्या सौरचुलीवर करतात. शेतातील काढलेले धान्य वाळवण्यासाठीही त्या या चुलीचा वापर करतात. त्यांचे पती आबा कांबळे गोशाळा चालवतात. पण तिथे वीजपुरवठा नसल्याने अंधारातच दूध काढण्याबरोबर स्वच्छता करावी लागत होती. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर सुरु केला आहे.

बीना केमकर यांचे पती तंत्रज्ञ आहेत. त्यांच्याकडून सौरऊर्जेची स्वस्त उपकरणे बनवण्याचे प्रयत्न सुरु असतात. ही उपकरणे तशीच न ठेवता त्यांच्या पत्नी बीना त्यांचा सातत्याने वापर करतात. रोजचे जेवण तयार करण्याबरोबरच ​चटणीसाठी मसाल्याचे पदार्थ भाजण्याबरोबरच डाळी आणि धान्यांच्या भाजणीही या सौरचुलीवरच करतात. वर्षभर पालेभाल्या तसेच कोथिंबीर वापरण्यासाठी त्या सौरचुलीचा वापर ड्रायर म्हणूनही करतात. या दोघी 'सौरचुलींचा तसेच सौरउर्जेचा वापर हा कुटुंबाच्या आर्थिक बचतीबरोबर नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासही हातभार लावतो,' हे त्या करून दाखवत आहेत.

कांबळे यांनी तयार केलेली उत्पादने

आनंदी कांबळे यांनी गोशाळेतील शेण व मूत्रापासून अगरबत्ती, साबण, गोमूत्र अर्क, दंतमंजन अशी उत्पादने घेतली आहेत. ही

उत्पादने तयार करण्यासाठी कांबळे या सौरऊर्जेचाच प्रभावी वापर करतात. सध्या त्यांनी याच सौरऊर्जेचा वापर करुन केमिकलविना हळद तयार केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनटीपीसी’ प्रगतिपथावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

दक्षिण सोलापूर तालु्क्यातील होटगी स्टेशन, आहेरवाडी गावांच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय औष्णिक उर्जा प्रकल्पाचे (एनटीपीसी) काम प्रगतिपथावर आहे. जुलै २०१६ मध्ये येथून वीजनिर्मितीस प्रारंभ होणार आहे. सुमारे अठराशे एकर जमिनीवर १३२० मेगावॉट क्षमतेच्या वीजनिर्मितीचा प्रकल्प एनटीपीसीकडून उभारण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, प्रकल्पास कोळसा आणि पाण्याची मोठी गरज भासणार आहे. त्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी ११४ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सध्या ५८ किलोमीटरपर्यं कामपूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल. त्याबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून कोळसा आणण्यासाठी एनटीपीसीकडून स्वतंत्र रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. एनटीपीसीमुळे सोलापूरच्या तापमानात वाढ होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तापमानात वाढ होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबरच लाखो वृक्षांची लागवडदेखील करणार असल्याचे एनटीपीसीचे महाप्रबंधक एन. एन. राय सांगितले. एनटीपीसीलाही पाणी आणि कोळशाची मोठी टंचाई भासणार आहे.

महाराष्ट्रास ५० टक्के वीज

सोलापूरच्या एनटीपीसीतून एकूण १३२० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. यातील ५० टक्के म्हणजे ६६० मेगावॉट वीज महाराष्ट्रासाठी राखीव असणार आहे. उर्वरित ५० टक्के वीज गुजरात, मध्य प्रदेश, दमण दीव, गोवा आणि अन्य राज्यांसाठी वितरित केली जाणार असल्याचे एनटीपीसीचे महाप्रबंधक एन. एन. राय यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पामधून तयार होणारी वीज सोलापूर परिसरातील उद्योगांना मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. औद्योगिक संघटना या मागणीसाठी आग्रही आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंगामात उच्चांकी गाळप

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखरेच्या उत्पादनात राज्याने आघाडी घेतली असून यावर्षी सर्वाधिक १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सध्या ९५. १४ लाख टन साखर उत्पादित झाली असून अजूनही सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुमारे १०० लाख टन ऊस शिल्लक आहे. या साखरेचे गाळप झाल्यानंतर १०० टनाचा आकडाही पार केला जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ११ कारखाने बंद झाले असून १ लाख ४२ हजार ५१५ मेट्रीक टन साखर उत्पादन झाले आहे.

राज्यात २००६ -०७ साली ९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. २०१४- १५ या वर्षात ते नोव्हेंबर, डिसेंबर मध्येच पूर्ण करण्यात आले असून यावर्षीचे गाळप उच्चांक गाठणार आहे. महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, राज्यातील एकूण साखर कारखान्यांची संख्या पाहता साखर उत्पादन २३५ ते २४० लाख टन होणे अपेक्षित आहे.

राज्यातील १७५ साखर कारखान्यांपैकी फक्त ४५ कारखाने बंद झाले असून इतर कारखान्यांचा गळीत हंगाम संपण्यासाठी अजून काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यातच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेला खूपच कमी प्रमाणात मागणी आहे. १०० लाख टन ऊस शिल्लक राहिला असला तरी त्याला साधारणतः ११. २१ टक्क्यांपर्यंत उतारा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिल्लक ऊसापासून अजून ९ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचा साखर उतारा कमी आहे. गेल्यावर्षी साखर उतारा ११. ३० टक्के होता. तो यावर्षी ११. २१ टक्के झाला आहे. त्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा उतारा अधिक असून तो १२. ४७ टक्के आहे. उतारा वाढला तर साखरेचे उत्पादनही वाढते. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उत्पादनाचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अजून १५ दिवस तर सांगली जिल्ह्यातील कारखाने ३० एप्रिलपर्यंत सुरू राहतील अशी शक्यता आहे.

सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे. संबंधित मंत्र्यांना विनंती करून त्यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आता त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो याची आम्ही वाट पाहत आहोत.

- विजयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष, राज्य साखर संघ

साखरेच्या उत्पादनाची टक्केवारी आणि एकूण उत्पादन यांचा विचार करता उत्पादन जास्त वाटत असले तरी वस्तुस्थिती फार चिंताजनक आहे. राज्याचा यंदा साखर उताराही कमी आहे.

- संजीव बाबर, व्यवस्थापकीय संचालक, को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी अन्नछत्राला ‘ISO’

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सुविधा देणाऱ्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टला आयएसओ ९००१-२००८ या मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे. असे मानांकन मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिले अन्नछत्र असल्याची माहिती महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टने दिली आहे.

जर्मनीतील टीयूव्ही नॉर्ड ग्रुपने केलेल्या पाहणीनुसार नामांकन जाहीर करण्यात आले. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही संस्था काम करते. या संस्थेकडे ट्रस्टने प्रस्ताव सादर केला होता. टीयूव्ही इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ट्रस्टला दोनवेळा भेट देऊन अन्नछत्रातील भोजनाच्या व प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या दर्जाची तपासणी केली. पुण्यातील मार्क लॅब या प्रयोगशाळेत घटकपदार्थ, तयार भोजन आणि बुंदी लाडूची तपासणी केली. या अहवालाच्या आधारे अन्नपदार्थांना मान्यता दिली. संस्थेचे कामकाज, स्वच्छता, सेवा, प्रसादाचा दर्जा आणि सुरक्षिततेसाठी घेण्यात येणारी काळजी यांचा विचार करून महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टला मानांकन दिले. लवकरच प्रमाणपत्र देण्यात येईल असे कंपनीकडून ट्रस्टला कळविले आहे.

सात वर्षापूर्वी पौर्णिमेदिवशी भक्तांसाठी अन्नछत्र सुरू केले. सुरुवातीला दर शुक्रवारी, नंतर मंगळवार आणि शुक्रवार आणि आता दररोज सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन या वेळेत अन्नछत्र सुरू आहे. दररोज साडेतीन हजार भाविकांना मोफत भोजनाचा लाभ देणाऱ्या या अन्नछत्रामध्ये २५ लाख भाविकांना मोफत अन्नदान करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेमध्ये राजू मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, शरद काकिर्डे आदींचे सहकार्य लाभले.

चांगले काम करत असताना समाधान देणारा हा सन्मान आहे असे वाटते. भविष्यात भाविकांसाठी यापेक्षा चांगल्या सुविधा देण्याचा मानस आहे.

-राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला नको सबसिडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गलेलठ्ठ पगाराची नोकरी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग, घरात नोकरचाकर तरीही सिलिंडरसाठी सबसिडी घ्यायची. मनाला न पटणाऱ्या या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ७८० 'स्वाभिमानी' नागरिकांनी 'आम्हाला सबसिडी नको' असे पत्रच गॅस वितरकांकडे दिले आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांचाही समावेश असून जिल्हाधिकारी कार्यालयातून या 'स्वाभिमानी' वृत्तीचा समाजात प्रसार करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

सिलिंडरचे दर खुल्या मार्केटप्रमाणे ठेवण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला. पण त्यातील काही सिलिंडर सबसिडीवर देण्याचा निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा दिला होता. ती सबसिडी नागरिकांच्या थेट खात्यावर जमा होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विविध गॅस कंपन्यांच्या माध्यमातून ज्यांना सबसिडी नको आहे त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यास सांगितले होते. याबाबतची माहिती फार कमी नागरिकांना मिळाली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे, त्यांची सबसिडी मिळावी अशी अपेक्षा नाही.

पण काही पर्याय नसल्याने ती यंत्रणेतून मिळत होती.

मात्र या प्रकारचे अर्ज गॅस वितरकांकडून देण्यात येऊ लागले, तेंव्हापासून सबसिडी नको असा पर्याय भरुन देणारे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७८० नागरिकांनी सबसिडी नको असल्याचा पर्याय अर्जामध्ये भरुन दिला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनीही हा पर्याय भरुन अर्ज दिला आहे.

याबाबत आगवणे म्हणाले, 'या यंत्रणेत सध्या मोठा अडथळा जाणवत आहे तो वितरकांकडे येऊन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा. ही प्रक्रिया जर ऑनलाइन झाली तर या संख्येत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच वितरकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने सिलिंडरचे बुकिंग केले जाते. तशी यंत्रणा यासाठीही वापरली गेली तर अनेकजण सबसिडी नको असल्याचा पर्याय निवडतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृत्रिम पिकवलेल्या फळांचा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्च महिन्याची चाहूल लागताच बाजारात दिसणारा पिवळाधमक आंबा लक्ष वेधून घेतो, परतु तो कृत्रीमरित्या पक्व करण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात आहे. अशा द्रव्यांच्या वापरामुळे फळांना पिवळाधमक रंग आणि तकाकी येत असतली तरी त्याचे मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत आहेत. व्यापारी आणि विक्रेत्यांकडून केवळ हव्यासापोठी होत असलेले असे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वर्षभर सहजपणे उपलब्ध होणारी केळी आणि हंगामात हापूस आंब्यासाठी ग्राहकांकडून चांगली मागणी असते. हापूसच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून आंब्याची आवक होते. मात्र नैसर्गिकरित्या आंबा पक्व न करता कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी आंबा

पाडाला येण्यापूर्वीच कृत्रिमरित्या पिकविला जातो. त्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. यामुळे अॅसिटीलिन गॅस तयार होऊन फळाला चांगला रंग येतो. मात्र यामुळे तयार झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे किडनी व यकृतावर परिणाम होतो.

चुनखडीसारख्या दिसणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडच्या तयार पुड्या कच्चा कैरीच्या क्रेटमध्ये २४ तासासाठी ठेवल्या जातात. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन कैरीचे रुपांतर पिवळ्याधमक आंब्यात होते. आंबा नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा काळ जावा लागतो. मात्र या प्रक्रियेत दोन ते तीन दिवसांत आंबा पक्व होतो. अशा प्रक्रिया केलेल्या आंब्यांचे सेवन केल्यास किडनी व फुप्फुसाचे आजार निर्माण होतात. तसेच जुलाब होण्याची शक्यताही असते.

त्यामुळे नागरिकांनी फळांची खरेदी करताना अधिक काळजी घ्यावी. फळे घेतल्यानंतर ती धुवूनच खावीत. फळे कृत्रीमरित्या पिकवून त्यांची विक्री करणे हे खरेतर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे अशा गोष्टींबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

फळे कृत्रिमरित्या पिकवताना इथिलीनचा वापर करता येतो. त्यामुळे मानवी आरोग्याला अपाय होत नाही. फळे पाच ते सहा दिवसांत पक्व होतात. त्यासाठी ही शास्त्रीय प्रकिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच राबवायला हवी.

प्रा. डॉ. के. पी. पुजारी,

संशोधक, दापोली विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिका, VIP साठी स्वतंत्र लेन

0
0

सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील पी. एस. टोल प्रा. लि. तर्फे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापनाने रुग्णवाहिक व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लेन आरक्षित ठेवावी. त्याचबरोबर तक्रार पेटीसह व्यवस्थापनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावावा, असे आदेश सातारा उपविभागीय दंडाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले आहेत.

मौजे आनेवाडी येथील टोलवर होणाऱ्या अनुचित प्रकाराबाबत जिल्हादंडाधिकारी यांनी १० फेब्रुवारीला कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यादृष्टीने फौजदारी कारवाई करुन अहवाल करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पी. एस. टोल प्रा. लि. तर्फे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे टोल मॅनेजर विवेक शर्मा यांनी समक्ष उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांच्या कोर्टात ३० मार्च २०१५ रोजी उपस्थित राहून आपले लेखी म्हणणे व खुलासा सादर केला.

प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

शुल्क संकलनासाठी दोन स्वतंत्र शुल्क संकलन केंद्रे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करावेत. प्रत्येक ठिकाणी लेनची संख्या ८ ते १० असावी. ही कार्यवाही दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी. रुग्णवाहिका व अतिमहत्चाच्या व्यक्तींच्या वाहनांकरिता स्वतंत्र लेन आरक्षित ठेवावी अन्यथा अतिरिक्त तयार करावी. लेनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाहने रांगेत असतील तर त्याठिकाणी जादा कर्मचारी नेमून तातडीने लेनमधील वाहतूक सुरळीत करावी. शुल्क संग्रह करण्यासाठी प्रशिक्षित व नम्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच कर्मचारी व वाहनचालक यांच्यात तंटा होऊ नये, याची दक्षता घ्यावी. शुल्क संकलनाच्या ठिकाणी कंपनीच जबाबदार अधिकारी कायमस्वरुपी हजर ठेवावा. व्यवस्थापनाने तात्काळ उपाययोजना करुन टोल वसूल केंद्रानजीक असणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये उदयनराजेंना घ्या’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश करा', अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे उपस्थित होते.

बँकेत खासदार उदयनराजेंना बरोबर घेऊन निवडणूक लढल्यास काय होईल, तसेच त्यांना डावलल्यास काय समीकरणे राहतील, या दोन्ही बाजूंवर पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. रामराजे व उदयनराजे यांच्यात सुरू असलेल्या वादावरही या वेळी चर्चा झाली. पवार म्हणाले, 'राजकारणात वाद हे होतच असतात; पण, प्रत्येकाने आपली पातळी सोडून एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा सन्मान राखावा. चुकून एखाद्याकडून वादग्रस्त वक्तव्ये झाली, तर त्यावर माफी मागण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. खासदार उदयनराजेंना बरोबर घेऊनच ही निवडणूक लढावी.'

'तर सत्तांतर झाले नसते'

'माझे जाहीरपणे जिल्ह्यातील आमदारांना आवाहन आहे. त्यानी प्रसारमाध्यमांपुढे येऊन पुराव्यानिशी सांगावे की, मी त्यांच्या विरोधात काम केले आहे. मी नेहमी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात माझ्या विरोधीत कोणी मतदान केले असले, तो कोणत्याही पक्षातील असला तरी मतदारसंघातील साडेअठरा लाख मतदारांसाठी मी कामे करीत असतो. माझे म्हणणे अंमलात आणले असते, तर आज पक्षाची ऐवढी मोठी पिछेहाट व कदाचित सत्तांतर झाले नसते,' असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटेशनप्रमाणे पाणीवाटप करा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता म्हैसाळ योजनेचे पाणी वाटप रोटेशनप्रमाणे करावे. कॅनॉलमधून किंवा दरवाजे मोडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास संबधितांवर कारवाई करावी लागेल,' असा इशारा खासदार संजय पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

पाटील म्हणाले, 'गेल्या पाच ते सहा वर्षांपासून म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यावरील वीजेचे ट्रान्सफॉर्मर्स, पंपाची देखरेख याकडे लक्ष दिले गेले नसल्याने अडचणी होत्या. तरीही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पंप सुरू केले आहेत. त्यांनी देखरेखीसाठी निधीची मागणी केलेली आहे. त्यांना तो निधी निश्चित दिला जाणार आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने चालविली जाईल. चौथी राजझिंग मिल आजतागायत सुरूच केलेली नव्हती. तीसुद्धा सुरू करून नरवाडनजीकचे सर्व पंप सुरू केले जातील. पाण्यात पाणी सोडले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत होणार असल्याने तसे नियोजन केले जाणार आहे. टप्पा क्रमांक तीनवर शनिवारी लाभार्थी गावातील प्रमुखांची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यावेळी पाणी मागणीचे फॉर्म भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. कॅनॉलमध्ये पाणी बघितल्यानंतर शेतकरी किमान वीजबीलाइतकी तरी पाणीपट्टी भरतील, असा विश्वास आहे.' यावेळी त्यांनी तासगाव काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनाही लक्ष केले.

पाणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचले

मिरज : म्हैसाळ सिंचन योजनेचा एक पंप मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळी नरवाड येथील दुसऱ्या टप्प्यात व सायंकाळी बेडग आणि आरगेच्या मधील तिसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचले. गुरुवारी बेळंकी येथील चौथ्या व सलगरे येथील पाचव्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचवून पुढे कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. पाणी सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. खासदार संजय पाटील यांनाही म्हैसाळच्या पाण्याची पाहणी केली. जे शेतकरी अर्ज देतील त्यानांच पाणी देण्याची भूमिका राहणार आहे. योजना सुरू राहण्यासाठी दहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी अर्ज येणे अपेक्षीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव, चाळके यांची जामिनावर मुक्तता

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नगरसेवक मोहन कुंभार यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव व माजी नगरसेवक सागर चाळके यांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, चाळके आणि जाधव यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुंभार यांच्यासह भागातील महिला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आल्या होत्या.त्यावेळी चाळके आणि जाधव यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन कागदोपत्री कारवाई करीत दोघांना एका खासगी गाडीतून न्यायालयात नेण्यात आले.

पोलिसांकडून त्या दोघांची बडदास्त ठेवली जात असल्याचे पाहून महिलांना संताप अनावर झाला. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करुन चाळके आणि जाधव यांना दिल्या जात असल्याबद्दल वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला. सुमारे अर्धातास हा गोंधळ सुरु होता.

भागातील स्वच्छता आणि त्या संदर्भातील तक्रारीवरुन सोमवारी नगरसेवक मोहन कुंभार व आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्यात शाब्दिक वाद होऊन त्यातून कुंभार यांनी संगेवार यांना धक्काबुक्की केली होती. तर नगराध्यक्षांच्या दालनात कुंभार आणि माजी नगरसेवक सागर चाळके यांच्यात जोरदार खडाजंगी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारात कुंभार यांना झाल्या प्रकाराचा जाब विचारत काही नगरसेवकांनी कुंभार यांना धक्काबुक्की केली होती.

डॉ. संगेवार यांनी सरकारी कामात अडथळात आणल्याबद्दल कुंभार यांच्याविरोधात तर कुंभार यांनी मारहाण करुन पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती. कुंभार यांच्या तक्रारीवरुन बुधवारी शिवाजीनगर पोलिसांनी अजितमामा जाधव व सागर चाळके यांना विनयभंग प्रकरणी अटक केली. दुपारी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images