Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केडीसीसी निवडणुकीत ताकदीने उतरणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'गोकुळ' प्रमाणेच विक्रमसिंह घाटगे गट जिल्हा मध्यवर्ती बँके (केडीसीसी) च्या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा शनिवारी समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'आमच्याकडे संस्था आहेत. जिल्ह्यात संस्था जपणारा गट म्हणून आदर्श पारदर्शी कारभार आहे. आमच्या कार्यकर्त्यांनीही विक्रमसिंह घाटगेंच्या विचारावरच संस्था नावारुपाला आणल्या आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे कागल को ऑप.बँकेचा एन.पी.ए. तुलनेने इतर बँकाच्या अतिशय चांगला आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही व आमचे कुटुंब सदस्य असे आमचे धोरण नाही. विक्रमसिंह घाटगे यांचे केवळ मार्गदर्शन घेण्यापेक्षा त्यांच्या विचाराची माणसं सहकारात येण्याची गरज आहे. प्रशासक असणे म्हणजे सहकाराचा तसा अपमानच आहे. परंतु बेकायदेशीर कर्जांवर त्यांनी चांगले नियंत्रण ठेवून बँकेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच विश्वासाची व चांगल्या पारदर्शी विचाराची माणसे बँकेत आली पाहिजेत.' ते पुढे म्हणाले, 'गोकुळ'प्रमाणेच जिल्हा बँकेतल्या सत्तेपासून राजे गटाचे कार्यकर्ते वंचितच आहेत. ज्या पारदर्शी कारभाराची आणि विश्वासाची आज बँकेला गरज आहे, तो देण्यासाठी व विचार रुजवण्यासाठी उतरत आहे. 'गोकुळ' बाबत सध्या तरी 'वेट अँड वॉच' धोरण आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंडलिक गट सतेज पाटलांकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघात आता कोणालाही संधी देता येणार नाही म्हणून आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील डावलत असतील तर सतेज पाटील यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवाल करत जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची मते विचारात घ्यावीत आणि याबाबत सर्वाधिकार प्रा. संजय मंडलिक यांना देण्यात यावेत, असा निर्णय मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची संपूर्ण जिल्ह्यात ताकद होती. जिल्ह्याच्या सर्वच भागात त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कागल तालुक्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावीत आणि निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले. महाडिक आणि पाटील हे मंडलिक गटाला डावलत असतील तर सतेज पाटील यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांची अजिंक्यतारा येथे भेट घेऊन जिल्ह्यातील राजकारणाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची तत्काळ बैठक घेऊन मते जाणून घेतली जातील. सर्वांना विश्वासात घेऊन गोकुळसह सर्व संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाऊ.'

बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, 'दूरदृष्टीने सारासार विचार करून राजकीय आराखडा तयार करा आणि आक्रमक विचाराने यापुढील राजकारण करण्याची गरज आहे.' यावेळी कागल पं. स. उपसभापती भूषण पाटील, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत गवळी, बंडोपंत चौगुले, आदींची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ पिवळाधमक, पण...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. पण सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षाही जास्त सल्फर तसेच त्या जोडीने अन्य काही रसायने गुळात मिसळली जातात. यामुळे गुळाच्या रंगावर न भाळता सेंद्रिय गूळच खाण्यासाठी वापरला पाहिजे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांचे आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन्स २०११ (फूड प्रॉडक्ट स्टॅँडर्ड आणि फूड अॅडिटिव्हज) या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साइड मिसळण्याची परवानगी आहे. पण यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने 'गुळव्या' आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतो. काही गुळात हे प्रमाण ३५० ते १५०० पीपीएम इतके सल्फरही असू शकते. सर्वसाधारणपणे सल्फरचे प्रमाण जास्त झाले तर अल्सरसारखे आजारही संभवतात. याशिवाय कोणत्याही पदार्थाला अधिक पिवळेपणा येण्यासाठी 'मेटानिल येलो' ही रासायनिक पावडर वापरली जाते. हळद पावडरमध्ये

मेटानिल येलोची पावडर वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटानिल येलोचाही वापर केला जातो.

त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडीयम बायकार्बोनेट हा होय. सर्वसाधारणपणे गूळ करण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेएफएस आणि सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅ‌‌ल्शियम कार्बोनेट अशा रसायनांचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो. सोडीयम बायकार्बोनेटच्या अतिवापर असलेल्या गूळ खाल्ल्याने उलट्या जुलाब असे प्रकार होवू शकतात. तर मेटानिल येलो ही पावडर कॅन्सरला निमं‌त्रण देणारी आहे.

आपटेनगर येथील डॉ. संदीप लव्हटे म्हणाले, 'गुळाची निर्मिती कशी केली जावे याचे प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे कोणते रसायन वापरले जावू नये, कोणते रसायन किती वापरायचे याचे काही प्रमाण ठरलेले नाही. गुळाचे विशेष असे ब्रँडिंग नसल्याने त्यात कोणते घटक आहेत, याची नोंद गुळाच्या पॅकिंगवर केलेली नसते. ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त वापरली जाणारे रसायने तसे काही बंदी असलेली रसायने आरोग्याला अपयकारक असतात. गुळातील भेसळ ओळखणे सहजासहजी शक्य नसल्याने शक्यतो खात्रीशीर सेंद्रिय गूळ घेणे हाच चांगला उपाय आहे. तसेच सर्वच खाद्यपदार्थांचे क्वालिटी कंट्रोल होण्याची गरज आहे.'

पिवळ्या रंगाला भुलून खरेदी

सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस काहीलीमध्ये उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते, त्यामुळे गुळाला चव येते. पण या प्रकियेत गुळाचा पिवळा रंग यावा म्हणून त्यात सल्फरची पावडर टाकली जाते. चवीचा विचार केला तर सेंद्रिय गूळ केंव्हाही चांगला ठरतो. निव्वळ पिवळ्याधमक रंगाला भुलून लोक पिवळा गूळ विकत घेतात.

प्रयोगशाळेची गरज

अन्न आणि औषध प्रशासनाची स्थापना १९७० झाली असून प्रिव्हेंशन ऑफ फूड अॅडल्टरेशन अॅक्ट १९५४ ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे आहे. पण या विभागाकडे एकूण स्टाफ कमी असल्याने या कायद्याची कडक अंमलबजावणी करताना अडचणी येतात. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने संशयास्पद खाद्यन्नाची तपासणी करण्यातही वेळ जातो.

सेंद्रिय गुळाचे फायदे

सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमियामध्ये याचा चांगला उपयोग होतो.

सेंद्रिय गुळात असलेल्या मॅग्नेशियमचा उपयोग स्नायुंच्या बळकटीसाठी होतो.

रोगप्रतिकार क्षमता वाढते तसेच रक्तदाबावर नियंत्रण राहते.

पचनक्रियेसाठी सेंद्रिय गुळ उपयुक्त ठरतो. त्यामुळे जेवणानंतर गुळाचा तुकडा तोंडात टाकण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.

शरीरात उष्मांक वाढवण्यासाठी गुळाचा चांगला उपयोग होतो.

सेंद्रिय गूळ अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतो.

सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ

सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ यामध्ये फरक आहे. सेंद्रिय गुळाची निर्मिती करत असताना उसाची लागवड ही सेंद्रीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर गूळ निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही. अशा पद्धतीने बनवलेल्या गुळाला सेंद्रिय गूळ म्हटले जाते. असा गूळ दिसायला चॉकलेटी, काळसर आणि मऊ असतो. केमिकल फ्री गुळात उसाची लागवड रसायनिक खते वापरून केली असली तरी चालते, पण गुळाची निर्मिती करताना मात्र त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. साहजिकच सेंद्रिय गुळाच्या तुलनेते केमिकल फ्री गुळाची गुणवत्ता कमी असते.

गूळ क्लस्टर मंजूर

कोल्हापुरात सुमारे ९०० गुऱ्हाळघरे असून जवळपास २५ हजार शेतकरी गुऱ्हाळासाठी ऊस देतात. येथील बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे तीनशे कोटींच्यावर उलाढाल वर्षाला होते. काही शेतकरी सेंद्रीय तसेच केमिकल फ्री गूळ निर्मिती करतात. राजर्षी शाहू गूळ खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून सेंद्रीय गुळाचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. तसेच कोल्हापुरात केंद्र सरकारकडून गूळ क्लस्टरही मंजूर झाले आहे. पण या क्लस्टरचे काम रेंगाळले आहे.

किती केमिकल ‌घातले पाहिजे याचे सरकारी नियम आहेत. वस्तुस्थिती जर पाहिली तर केमिकल फ्री गूळ चवीला, खाण्यास आणि आरोग्यालाही चांगला असतो. ज्या ग्राहकांना याची जाण आहे, ते केमिकल फ्री गूळच घेतात. पण बाजारात आकर्षक दिसणाऱ्या पिवळ्या रंगाच्या गुळाला जास्त मागणी असते. अधिक आकर्षक गूळ बनवण्याच्या प्रयत्नात काहीवेळा जास्त केमिकलही टाकले जातात. अशावेळी चांगला गूळ बनवण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची आहे. मालकांनीच लक्ष घालून चांगल्या प्रतीचा गूळ बनवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

- उत्तम चौगुले, गूळ उत्पादक शेतकरी, उचगाव

बाजारात जे चालते ते विकण्याची पद्धत आहे. बाजारात केमिकल फ्री गुळाचा दर कमी असल्याने तसा गूळ बनवण्यास फारच कमी लोक उत्सुक असतात. कमीतकमी केमिकल वापरून जास्तीजास्त चांगला गूळ बनवण्याचा प्रयत्न काही गुळवे करतात. पण बाजारात 'फ्रेश' दिसणारा गूळ हवा असतो. केमिकल फ्री गुळाची किंमत कमी असल्याने शेतकरी आपला ऊस साखर कारखान्यांने देणे पसंत करतात. केमिकल फ्री गूळ बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, पण गुळाला दर फार कमी दर मिळाला.

- प्रकाश पाटील, गुऱ्हाळ मालक, कोतोली

सेंद्रीय तसेच केमिकल फ्री गुळाबद्दल जागृती वाढत आहे. तरीही कोणता गूळ केमिकल फ्री आहे, कोणता गूळ सेंद्रीय आहे, हे समजण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून त्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. बाजारात सेंद्रीय म्हणून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरोखरच सेंद्रीय आहेत का याबद्दल शंका असते. गूळ निर्मितीचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. गूळ‌ विक्री करताना त्याचे नीट पॅकिंग करून त्यातील घटक पदर्थांची माहिती त्यावर नोंद केली तर ग्राहकाला उपयोगी होईल.

- ज्योती अडवलीकर, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप गांधींचे वक्तव्य चुकीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी तोंडाचा कॅन्सर आणि तंबाखूजन्य प्रकारच्या कॅन्सरचे दोन हजारहून अधिक नवीन पेशंट आढळतात, तर देशात तोंडाच्या कॅन्सरचे ७५ ते ८० हजार पेशंट नव्याने आढळतात. अशा स्थितीत अहमदनगर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी केलेल वक्तव्य धक्कादायक आहे,' असे मत कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मुख्य सर्जन डॉ. सूरज पवार यांनी व्यक्त केले.

गांधी हे सबॉर्डिनेट लेजिस्लेशन कमिटीचे अध्यक्ष आहेत. तंबाखू उत्पादनांच्या आवरणावर ८५ टक्के भागात तंबाखू सेवन किती हानिकारक आहे याबाबत स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक करण्यापूर्वी तंबाखू सेवनाचा भारतीयांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची मेडिकल बोर्डाकडून तपासणी होणे आवश्यक आहे, असा अहवाल सादर केला आहे. याबद्दल कॅन्सर तज्ज्ञांत नाराजी व्यक्त होत आहे.

डॉ. पवार म्हणाले, 'खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेशी गांधी यांची भूमिका विसंगत आहे. जवळपास ७० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनातून उद्भवतो असे अभ्यास सांगतो. तरुणांमध्ये तंबाखू सेवनातून कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा कॅन्सरचे निदान वेळेवर न लागल्याने तरुणवयातच मृत्यूला सामोरे जावे लागते. तंबाखू सेवन करणाऱ्या तिघांपैकी एक दुष्परिणामांना बळी पडतो, हे जगभरातील चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि इतर ठिकाणच्या तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशींना गांधी आव्हान देत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने तंबाखू चघळण्याच्या सवयीच्या दुष्परिणामांबद्दल अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे. यात गुटख्यासह तंबाखू चघळता येईल अशा पद्धतीच्या उत्पादनात कॅन्सरला निमंत्रण देणारी २८ घटक असल्याचे नमूद केले आहे. भारतात तोंडाचा कॅन्सर होण्याच्या केसीसमध्ये ९० टक्के केसीस तंबाखूच्या दुष्परिणामांशी संबंधित आहेत. भारतात तंबाखूजन्य आणि तंबाखूशी संबंधित निगडित आजारांचा मुकाबला करण्यासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्ची पडतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, कोणत्याही प्रकारच्या तंबाखू सेवनाच्या विरोधात ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांअभावी दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारा आणि जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया असलेल्या उद्यमनगरातील नागरी सुविधांची स्थिती अतिशय खराब आहे. उद्यमनगरसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली जावी अशी मागणी उद्योजकांची आहे. रस्ते, पाणी आणि स्वच्छता या सुविधा मिळाव्यात इतकी माफक अपेक्षा उद्योजकांची आहे. मात्र, निव्वळ या परिसरात स्थानिक मतदार कोणी नसल्यानेच सुविधा पुरवल्या जात नाहीत अशी येथील स्थिती आहे.

फाउंड्री उद्योगात सध्या कोल्हापूरचे नाव देशात आघाडीवर आहे. या उद्योगांचा पाया म्हणजे शिवाजी उद्यमनगर होय. कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही जागा उपलब्ध करून दिली होती, पण उद्यमनगरात आज एकही रस्ता चांगला नाही. डॉ. अमर अडके यांच्या दवाखान्यासमोरील रस्ता, बिग बझारच्या मागील रस्ता असे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. याशिवाय परिसरात पाणी वेळेवर येत नसल्याने त्याचाही उद्योजकांना मोठा त्रास होत असतो. गोकुळ हॉटेल ते जवाहरनगर येथील रस्ता नगरोत्थान योजनेतून करायचा आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी अजूनही शेतकरी संघाचा पेट्रोलपंप ते वाय. पी. पोवारनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच माधवराव करजगार मार्गावर अनेक वर्षे डांबरीकरण झालेले नाही. या औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने होणे आवश्यक आहे. साई सर्व्हिसच्या ट्रू व्हॅल्यू या शोरूमच्या मागील रस्ता तसेच वालावलकर हॉ‌स्पिटलसमोरील रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे.

उद्यमनगरातील जवळपास सर्वच रस्त्यांची स्थिती खराब झालेली आहे. विशेषकरून अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण होऊन बरीच वर्षे उलटली असल्याने थोडाजरी पाऊस पडला तरी येथील रस्ते चिखलमय होतात. कित्येक उद्योगांत निर्यातक्षम कास्टिंग बनवले जाते. परदेशातील पाहुणे त्यांच्याकडे येत असतात, त्यामुळे खड्ड्यांनी भरलेली उद्यमनगर असेच चित्र त्यांच्यासमोर निर्माण होते.

'औद्योगिक वसाहतीतील समस्यांसंदर्भात अगदी मुख्यामं‌त्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत, पण औद्योगिक वसाहतींना कोणीही वाली नाही,' अशी प्रतिक्रिया राजर्षी शाहू लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष शदर तांबट यांनी दिली.

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारा परिसर म्हणजे उद्यमनगर औद्योगिक वसाहत होय. एलबीटी, घरफाळा, पाणीपट्टी या माध्यमातून वर्षाला सर्वाधिक कर महापालिकेला मिळतो, पण या ठिकाणी कोणी मतदार नसल्याने उद्यमनगरकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते. रस्ते, पाणी, गटारी इतक्या माफक सुविधा मिळाव्यात ही मागणी मान्य होत नाही.'

-संजय अंगडी, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन

उद्यमनगरात एकूण २० ते २५ लाख रुपये निधीच्या कामाचे नियोजन केले आहे. त्यातील चार ते पाच लाखांची दोन-तीन कामे येत्या चार दिवसांत सुरू होतील. श्रीकृष्ण मंदिर ते स्टेट बँकेपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी १० लाखांचा निधी देऊ. उद्यमनगरातील मुख्य प्रश्न रस्त्यांचाच आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. रस्ते चांगले होतील याकडे विशेष लक्ष देऊ.'

कादंबरी कवाळे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी मॅनेजर ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उच्च दर्जाच्या सेवा देणाऱ्या कंट्री क्लबमध्ये सदस्य करतो, म्हणून १० जणांनी फसवणूक झाल्याप्रकरणी राजारामपूरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारात सुमारे ६०० जणांची फसवणूक झाली असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर येथील मॅनेजर उदय मगदूम याला ताब्यात घेतले आहे.

शहरामध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या सेवा देणारा कंट्री क्लब सुरू होत आहे. त्यात सभासद करून घेतो म्हणून मनोज राठोड यांच्यासह दहा जणांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र या प्रकारातून फसवणूक झाल्याची तक्रार मंगळवार पेठेतील भक्तीपूजा नगरातील मनोज राठोड यांनी दिली. हैदराबादच्या कंट्री क्लबचे मालक राजीव शेट्टी यांच्यासह क्लबचे संचालक मंडळ, मुंबई व कोल्हापूर येथील ललिता गुप्ता, संजय घागरे, संतोष देसाई, सर्वेश नांगीचा, जावेद जमादार आणि कोल्हापूर येथील मॅनेजर उदय मगदूम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापैकी उदय मगदूम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टाकाळा परिसरात २००८ पासून कंट्री क्लबचे कार्यालय सुरू करण्यात आले. क्लबमध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार असून शहरातील प्रतिष्ठित क्लबपेक्षा अधिक चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदस्य संख्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा टोलनाक्याची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोल देण्याच्या कारणावरून कळंब्यातील साई मंदिरानजीकच्या आयआरबी कंपनीच्या टोलनाक्याची शनिवारी सकाळी संतप्त जमावाने मोडतोड केली. आक्रमक जमावाने टोलनाक्याची केबिन उचलून शंभर फूट अंतरावर फेकून दिली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. टोलच्या बूथची मोडतोड केल्याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर उमाकांत नारायण राजमाने (वय २८, सध्या रा. टोपसंभापूर, मूळ गाव ओगलेवाडी, ता. करवीर) यांनी ५० ते ६० अज्ञात व्यक्तींविरोधात करवीर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

गारगोटीतील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबासह नवीन वॅगनआर मोटार घेऊन कोल्हापूरला येत होते. साई मंदिरानजीकच्या टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्याकडे टोलची मागणी केली. जाधव यांनी टोल देण्यास नकार दिल्यानंतर बूथवरील कर्मचाऱ्यांनी, 'नवीन गाडीचे पेढे म्हणून पैसे द्या' अशी मागणी केली. त्यालाही जाधव यांनी नकार दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी आणि मोटारीतील महिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद टोकाला गेल्यानंतर जाधव हे पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी मोटार वळवत असताना कर्मचाऱ्यांनी मोटारीमागे बॅरिकेड लावल्याने मोटार त्यावर आदळली. यात मोटारीचे नुकसान झाल्याचे पाहून संतप्त जाधव यांच्याबरोबरच त्यांची हातघाई सुरू झाली. टोलनाक्यावर वाहनधारकाला मारहाण होत असल्याचे पाहताच परिसरातील ५० ते ६० जणांच्या जमावाने टोलनाक्यावर चाल केली. जमावाने पोलिसांना धारेवर धरत केबिनला लक्ष्य केले. दहा ते पंधरा तरुणांनी केबिन उचलून लांब फेकून दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर तेथे करवीर पोलिस दाखल झाल्यानंतर दोन तासांनंतर वातावरण निवळले. कर्मचारी दुपारी तीन वाजता पुन्हा तेथे आले. मात्र, रात्री उशीरापर्यंत टोलवसुली सुरू झाली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरून शूटिंगचा प्रयत्न

$
0
0



कोल्हापूर:

गोव्यातील कँडोलिम येथे फॅब इंडियाच्या ट्रायल रूममध्ये असलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या शूटिंगचे प्रकरण ताजे असतानाच, फॅब इंडियाच्या कोल्हापुरातील शोरूममध्ये ट्रायल घेणाऱ्या तरुणीचे मोबाइलवरून शूटिंग करण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी प्रकाश इस्पुर्ले या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा प्रकार ३१ मार्चला झाला होता. दरम्यान, गोव्यातील चार अटक आरोपींना शनिवारी कोर्टाने जामीन मंजूर केला. तर स्टोअर मॅनेजरने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विडी कामगारांच्या मजुरीत होणार वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूरसह राज्यभरातील विडी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याच्या अनुषंगाने कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्यभरातील विडी उद्योजक आणि विडी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे नेते यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत विडी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याबरोबरच विडी कारखानदारांच्या अडचणी समजून घेण्यात येणार आहेत.

राज्यात सुमारे साडेतीन ते चार लाख विडी कामगार असून, कारखान्यांची संख्या साडेतीनशेच्या घरात आहे. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एकट्या सोलापुरात १४ विडी कारखाने असून, सुमारे ६५ ते ७० हजार कामगार या उद्योगात काम करतात. यामध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. सध्या विडी कामगारांना १ हजार विड्या वळल्यानंतर १२६ रुपये ६० पैसे इतकी मजुरी मिळते. परंतु, ही मजुरी कमी असल्यामुळे ती वाढवावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. याची दखल घेत कामगार राज्यमंत्री देशमुख यांनी सोमवारी बैठक बोलावली असून, या बैठकीत कामगारांच्या मजुरीत वाढ होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. या बैठकीकडे राज्यभरातील ४ लाख कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे.

कामगार राज्यमंत्री देशमुख यांनी विडी कामगारांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला मिळावा यासाठी महत्वाचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. कामगारांना दिलासा देण्याबरोबरच विडी उद्योजकांच्याही अडचणी सोडविण्यासाठी देशमुख हे लक्ष घालणार आहेत. या बैठकीला सोलापूरसह पुणे, अहमदनगर, नाशिक, जालना, गोंदीया, नागपूर, तसेच अन्य जिल्ह्यातील विडी उद्योजक व कामगार नेते उपस्थित राहणार आहेत.

शहरामधील ६५ ते ७० हजार विडी कामगारांकडून दररोज सुमारे साडेतीन ते चार कोटी विडी उत्पादन घेतले जाते. सोलापूरची ही विडी महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, गुजरात, कर्नाटक राज्यांमध्ये जाते. या उद्योगात विडी कामगारांबरोबरच पॅकिंग आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आदी राज्यामध्ये विडी कामगारांना चांगला मोबदला मिळतो. काही राज्यात कमी अधिक प्रमाणही आहे. परंतु महाराष्ट्रातील विडी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला चांगला मिळण्यासाठी कामगार राज्यमंत्री देशमुख यांनी विशेष लक्ष घातले आहे. सोमवारच्या बैठकीत विडी कामगारांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दृष्टीक्षेपात विडी उद्योग

राज्यातील विडी कारखाने

सुमारे साडेतीनशे.

राज्यात सुमारे चार लाख विडी कामगार.

सोलापुरात १४ विडी कारखाने.

सोलपुरात ६५ ते ७० हजार कामगार.

उद्योगात महिलांचे प्रमाण मोठे

एक हजार विड्या वळल्यानंतर

१२६ रुपये ६० पैसे मजुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते खोदाईची चौकशी होणार

$
0
0

कुपवाडः महापालिका क्षेत्रातील रिलायन्स इन्फोटेकची रस्ते खोदाई, खोदाईनंतरचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या दरात प्रचंड तफावत ठेवून सुमारे साठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेविका स्वरदा केळकर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला. या चौकशीची मागणी मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केली असल्याचेही केळकर यांनी या वेळी सांगितले.

हा भ्रष्टाचार म्हणजे महापालिकेचे प्रचंड नुकसान आहे. संबधित कंपनी, खोदाईला परवानगी देणारे महापालिकेतील विभाग या नुकसानीला कारणीभूत आहेत. अन्य महापालिकांमध्ये सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे वेळोवेळी दरवाढ घेतलेली आहे. मग सांगली महापालिकेनेच दरात का सुधारणा केली नाही. डांबरीकरणाचा जो दर आजमितीला प्रतीचौरसमीटर २५९० हवा होता. तो अद्यापही ७५० रुपये इतकाच आहे. साईडपट्ट्या भरण्याचा दर १०४० रुपयांऐवजी अवघा ३०० रुपयेच कायम ठेवला आहे. ८७ किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईला मंजुरी दिली असताना प्रत्यक्षात मात्र, सुमारे १५० किलोमीटरची खुदाई केली आहे. खुदाईपोटी ८ कोटी ३० लाख रुपये भरुन घेतलेत आणि प्रत्यक्षात १६ कोटी रुपये खर्चाची पॅच वर्किंगची निविदा काढली गेली आहे. हा दुप्पट भूर्दंड महापालिकेवर का? मुख्यमंत्र्यांच्या निधीतून २० कोटींचे जे रस्ते होणार होते, त्याच रस्त्यावर पॅचवर्किंगचा कोट्यवधींचा खर्च केला आहे. यात कोणाचे हितसंबध गुंतले होते? रिलायन्सने ठिकठिकाणी एक हजारांपेक्षा अधिक चेंबर्स बांधलेत, त्याची नोंदच महापालिकेत नाही. त्याचे जागा भाडे का आकारले गेले नाही? असे अनेक सवाल स्वरदा केळकर यांनी उपस्थित केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड तालुका झाला ऑनलाइन

$
0
0

कराडः कराड तालुक्यातील सर्व ७/१२ संगणकीकरण पूर्ण करण्यात आले असून, फेरफार नोंदणीचे कामही ऑनलाइन झाले आहे. एक एप्रिलपासून हस्तलिखित कामकाज बंद करण्यात आले असून, आता सर्व कामकाज ऑनलाइन सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उताऱ्यांसाठी तलाठी, सर्कल व नंतर तहसीलदार कार्यालय, असे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ऑनलाइन उतारे मिळणार असल्याने नागरिकांचा खर्च आणि मानसिक त्रास वाचणार आहे.

कराड तालुक्यातील ई-फेरफार प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून, या बाबत अद्यावत अधिकार अभिलेखाचा डेटा मुंबई येथील स्टेट डाटा सेंटर येथे ठेवण्यात आला आहे. कराड तालुक्यासाठी ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात आली असून, हस्तलिखित ७/१२, फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवहीमधील हस्तलिखीत कामकाज बंद करण्यात आले आहे.

एप्रिलपासून ऑनलाइन सातबारा कधीही कोठेही मिळणार आहे. हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता थेट तलाठी ऑनलाइन सर्कलला व त्यानंतर तहसील कार्यालयात उतारा पाठवणार असल्याने नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

सुधाकर भोसले, तहसीलदार कराड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत दोन जण बुडाले

$
0
0

कुपवाडः सांगलीनजीकच्या हरीपुरात कृष्णा-वारणेच्या संगमावर पाण्यात बुडून दोन राजस्थानी तरुणांचा रविवारी मृत्यू झाला. बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला तर ते अचानक पाण्यात बुडाल्यानंतर पाठीमागील दोघांनी आपली पावले वेळीच मागे घेतल्याने ते बचावले. सुमारे तीन तासांच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह स्थानिकांनी पाण्याबाहेर काढले.

राजेंद्रकुमार वर्मा (वय १६) आणि मिठू नंदकिशोर दानका (वय २२) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील मुंद्रु येथील बलाईयो मोहल्ल्यात राहणारे हे दोघे इस्लामपूरार फरशी फिटिंगचे काम करत होती. रविवारी ते हरीपुरातील राजकुमार वर्मा याला फरशी कटिंगचे मशीन देण्यासाठी आली होती. दुपारच्या सुमारास या दोघांसह राजकुमार आणि मोनू दानका असे चौघेजण नदीवर गेले. अगदी गुडघाभर पाणी असल्याने त्यांना आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. पाणी कमी असल्याने ते आणखी जरा पुढे जात असतानाच एकजण अचानक खोल पाण्यात बुडाला. त्याच्यापाठोपाठ दुसराही बुडाला. त्यामुळे मागे असणाऱ्या दोघांनी पुढे टाकलेले पाऊल मागे घेवून आरडा ओरडा केला. गावकरी धावून आले. परंतु, ते दोघे बुडाल्याच्या ठिकाणी खोलवर खड्डा असल्याने कोणाचेच काही चालले नाही. अखेर स्थानिक नावाड्याच्या मदतीने लोखंडी अँकर टाकून तीन तासाच्या शोधमोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलिसांत झाली असून, बेसुमार वाळू उपशामुळेच त्या तरुणांचा जीव गेल्याची चर्चा घटनास्थळी होती.

हरीपुरात कृष्णा-वारणा नदीचा संगम असल्याने तेथील संगमेश्वर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे त्या संगमाच्या परिसरातील वाळू उपशावर गेल्या अनेक वर्षांपासून बंदी आहे. त्या परिसरातील वाळूचा ठेकाही काढला जात नाही. परंतु चोरुन वाळू उपसा सुरुच असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उदयनराजेंची दहशत संपविणार’

$
0
0



साताराः 'आम्हालाही जशास तसे लढता येते. आमचेही कार्यकर्ते कमी नाहीत. आडवे आलेल्यांना सरळ करण्याची ताकद कार्यकर्त्यांकडे आहे. आमच्या नादी लागू नका. आमचे घर गरिबांच्या पायावर झुकते; पण, तुमच्यापुढे आम्ही वाकणार नाही. उलट विधान परिषदेचे सभापतिपद गेले तरी चालेल; पण जिल्ह्याच्या राजकारणातून उदयनराजेंची दहशत कायमची घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.

गुणवरे (ता. फलटण) येथे श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत श्रीराम पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. जिल्ह्यात यांची दहशत प्रचंड वाढली आहे. त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. फलटण तालुक्याबाहेरील व्यक्तींना आमच्या तालुक्याविषयी व कारखान्याविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नाही. कारखान्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्यानंतर त्यांना थोबाडीत मारल्यासारखे होणार आहे, असेही रामराजे म्हणाले.

'जनतेने रामराजेंना जागा दाखवून द्यावी'

'मानसिक संतुलन बिघडलेल्याच्या हाती श्रीराम कारखाना न देता, सर्व विरोधी पॅनलमधील विरोधकांनी एकत्र येवून सभासदांच्या हक्कासाठी जनतेने तिसरा डोळा उघडून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी,' असे अवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. यानिमित्त रामराजे नाईक निंबाळकरांना राजेंनी पुन्हा लक्ष केले आहे. रामराजे नाईक-निंबाळकर व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या आरोपास प्रतिउत्तर देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले फलटणमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजांनी पोरकटपणा सोडावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'रामराजे विधान परिषदेत तर उदयनराजे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. रामराजे सभापतीही आहेत. राष्ट्रवादीतील या दोनही जबाबदार नेत्यांनी लोकांमध्ये वेगळा संदेश जावू नये, याची दक्षता घ्यावी. कोणत्याच पक्षातील नेत्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जावून टीका करू नये. हे लोकशाहीला मारक आहे. लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे. अशावेळी तुमच्यात हे काय चालू आहे, असा प्रश्न लोकांना पडेल. त्यांनी पोरकटपणा सोडावा,' असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पवार रविवारी कवठेमहांकाळ येथे पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन रावसाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या कवठेमहांकाळ आणि तासगाव येथे रविवारी जाहीर सभा झाल्या. पवार म्हणाले, 'माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनाच पक्षाने उमेदवारी देवून आर. आर. यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी जनतेने सुमन पाटील यांनाच निवडून द्यावे.'

दरम्यान, खासदार संजय पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी एकमेकांवर टीका करून निवडणुकीचे वातावरण गढूळ करू नये. कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या मागेपुढे करण्यापेक्षा कामे करावीत, अशा कानपिचक्याही पवार यांनी अगदी स्पष्ट शब्दात दिल्या.

माळेगावचा पराभव मान्य

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेला पराभव मला मान्य आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजीचा आणि क्रॉसवोटिंगचा फटका आम्हाला बसला आहे,' अशी कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पराभव मान्य असलातरी तो का? झाला याची याची दखल घेतली जाणार आहे. आमच्याकडे ३०० जण इच्छुक होते. या उलट विरोधकांकडे केवळ २५ ते ३० इच्छुकांची संख्या होती. आमच्याकडचे २८० जण नाराज झाल्याने क्रॉसवोटिंगचा फटका आम्हाला बसला. कारखान्यात अवघे दहा हजार मतदार सभासद होते. या निवडणुकीकडे फारसे लक्ष देता आले नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागल ‘वायफाय सिटी’ करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'कागल नगरीने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. कागलकरांच्या समस्या या माझ्याच समस्या आहेत. कागल शहर राज्यात नंबर वन करुन 'वायफाय सिटी' केल्याशिवाय रहाणार नाही,' अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. परिसरातील माताभगिनी मार्बलच्या फरशीवर बसून माळवं विकतील ही भावना बाजार स्थलांतराच्या निमित्ताने पूर्ण केल्याचे मोठे समाधान असल्याचेही ते म्हणाले.

कागलचा आठवडी बाजार निपाणी वेस येथील ओट्यांवर स्थलांतरप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी बाजाराचे कै. श्रीमंत अजितसिंह घाटगे,कै.बाळगोंडा पाटील व कै. स्वातंत्र्यसैनिक गंगाराम घस्ते असे नामकरण करण्यात आले. ग्रामदैवत मरगाई मंदिराच्या सांस्कृतिक भवनाचे उदघाटन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले.

आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले,'मुख्य रस्त्यावरील बाजाराने विस्तारीकरणात गल्ल्या काबीज केल्या. अनंत अडचणी पाहून काहीजणांचा विरोध असतानाही माताभगिनींची सुरक्षा विचारात घेऊन परिस्थितीनुसार बदलत बाजार स्थलांतर केला. परंतु

कोणत्याही व्यापाऱ्यावर बदलाचा परिणाम होणार नाही.'

समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'बाजार स्थलांतर करणे हे विक्रमसिंह घाटगे यांचे स्वप्न होते. परंतु मते कमी पडतील या भितीने कुणी धाडस दाखवले नाही. परंतु नगरपालिकेने धाडसाचे पाऊल उचलून राज्यात कामाच्या बाबतीत महानगरपालिकेलाही मागे टाकले आहे. '

भैय्या माने म्हणाले, 'कोल्हापूरच्याजवळ आणि एमआयडीसी तसेच ४० ते ४५ गावांतील लोकांचा बाजाराकडे ओढा पहाता सोमवारचा बाजार कागलकरांच्या जीवावर आला होता. परंतु या समस्या जाऊन नव्या बाजारामुळे कागलच्या वैभवात आणखी भरच पडेल.'

यावेळी श्रीमती ताराबाई घस्ते, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, बाळ पाटील, शिवाजी गाडेकर, राजेंद्र जाधव, प्रकाश गाडेकर,रघुनाथ जकाते,यशवंत माने आदी उपस्थित होते. स्वागत नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी केले. मारुती मदारे यांनी आभार मानले.

सत्तेत नसलो तरीही...

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'सत्ता बदल झाल्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे. विविध कामांसाठी निधी आणताना अडचण होते. तरीदेखील नाट्यगृहात पाण्यावर लेसर शो, मल्टिप्लेक्स निर्मिती, हनुमान मंदिर जीर्णोध्दार आणि १६ एकर जागेत एकून पाच हजारजणांना घरे बांधून देणार आहे. नागपूरला तीनशे कोटींचा निधी देणारे मुख्यमंत्री आमच्या नगरपालिकेची कामे ऐकून थक्क आहेत. घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या उदघाटनाला मुख्यमंत्री कागलला येणार असून पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून ते कागलसाठी मदत करणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस हंगाम अंतिम टप्प्यात

$
0
0

संपत पाटील, चंदगड

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गेले सहा महिने तळ ठोकून असलेल्या बाहेरील ऊसतोड टोळयांना परतीचे वेध लागले आहे. गावागावातील ऊस संपवून टोळ्या आपल्या सांसारीक साहित्यासह ट्रकमध्ये बसून परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत. स्थानिक लोक मात्र शेवटचा ऊस ट्रक नेताना बँड वाजवत व गुलालाची उधळत करत वाजत-गाजत नेतानाचे चित्र चंदगड तालुक्यात दिसत आहे.

यावर्षीचा ऊस हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रारंभ झाला. तालुक्यातील ऊस तालुक्यातीलच कारखान्यांना पाठविण्याचा प्रारंभी प्रयत्न झाला. आठवड्यातून नियमित होणाऱ्या बसपाळ्यांमुळे शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार हव्या त्या कारखान्याला ऊस पाठविण्याला सुरवात केली. चंदगड तालुक्यामध्ये इको केन व हेमरस हे दोन कारखाने आहेत. तर तालुक्याशेजारी आजरा व गडहिंग्लज हे दोन कारखाने आहेत. शिवारातील ऊस मोकळा करुन तो कारखान्यापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच ऊसतोड मजुरांची मनमानी यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

खुशालीच्या नावाखाली ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्यांची अक्षरक्षः पिळवणूक केली. टनाला दोनशे ते तीनशे याप्रमाणे दर असून ट्रॅकचालकाची खुशाली वेगळीच तीही एका लोडला पाचशेच्या घरात होती. वाढती महागाई, खतांचे वाढलेले दर, पाण्याची चौथाई, विजेचे लोडशेडींग, त्यासाठी लागणारे मजूर व त्यांची मजुरी यामुळे शेतकरी वर्ग अगोदरच घाईला आला होता. एवढे सगळे करुनही वेळेत ऊस जाईल याची खात्री नाही. त्यातच ऊसतोड मजुरांनी केलेल्या मनमानीमुळे शेतकऱ्याच्या हातात काय राहिले हा प्रश्न आहे. त्यामुळे कसा का होईना एकदाचा ऊस जावून रान मोकळे होतय की नाही ही चिंता शेतकऱ्यांला सवावत होती. ज्या घरातील व्यक्ती ऊसतोड टोळीमध्ये असेल त्या शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जातो. मात्र ज्यांना ऊसतोड टोळीमध्ये जाणे शक्य नाही. त्यांच्याकडून खुशालीच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळून त्यांचे रान मोकळे केले जात आहे. ज्या ठिकाणचा ऊस अडचणीच्या ठिकाणी असेल तो काढण्यासाठी वेगळी खुशाली. एवढे करुन ऊस कारखान्याला गेला तर ऊसाचे बिल वेळेत मिळेल याची खात्री नाही.

ज्या गावातील ऊस संपला आहे, त्या गावामध्ये बाहेरुन आलेल्या गेले काही महिने वास्तव्याला असलेल्या टोळ्या एक गाव सोडून दुसऱ्या गावी जात आहेत. काही टोळ्या तर आपल्या सर्व लवाजम्यासह आपापल्या गावी रवाना होत आहेत. स्थानिक मजुरांनी एकत्र येवून केलेल्या टोळ्या मात्र अखेरचा ऊस नेताना जल्लोष करताना दिसत आहेत. तालुक्यातील उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून इको केन साखर कारखाना बंद झाला आहे. हेमरस कारखाना मात्र अद्यापही चालू आहे. त्यामुळे तालुक्यातील निम्या ऊसतोड टोळ्या परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाल मिरची खरेदीला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऋतुमानानुसार पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी असला तरी पावसाळ्यात लागणाऱ्या साठवणुकीचे पदार्थ तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू झाली आहे. पापड, शेवया, सांडगे यांसह चटणी तयार करण्याची धांदल सुरू आहे. चटणी तयार करण्यासाठी संकेश्वरी, ब्याडगी, लवंगी मिरचीसह मसाल्याचे पदार्थ, कोथिंबिर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे.

जून महिन्यापासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी चटणी तयार करून ठेवण्याची प्रथा असल्याने गृहिणींनी लाल मिरचीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. लक्ष्मीपुरीतील बाजारात ब्याडगी, संकेश्वरी व लवंगी मिरचीची मोठी आवक झाली आहे. गडहिंग्लज येथून संकेश्वरी तर आंध्रप्रेदश येथून लवंगी मिरचीची मोठी आवक झाली आहे. खास चटणी करण्यासाठी ग्राहक ब्याडगी मिरचीला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मागणी जास्त असल्याने ब्याडगी मिरचीचा दर १६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चटणी तयार करण्याबरोबरच तयार मिरचीपूड खरेदीकडेही कल दिसून येत आहे. ठिकठिकाणी तयार मिरचीपूडचे स्टॉल्सही लागले आहेत.

उन्हाळ्यामध्ये कलिंगड व काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बहुसंख्य शेतकरी या पिकांची लागवड करत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीस मिरज, सोलापूर आणि सीमाभागातून कलिंगडाची आवक सुरू झाली होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची कलिंगड बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडची आवक दुप्पट झाली आहेत. मात्र दर स्थिर असल्याने उत्पादक आणि ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काकडीचीही आवक दुप्पट झाली आहे. किरकोळ बाजारापेक्षा वर्दळीच्या चौकात, रस्त्यावर काकडीची मोठी विक्री होत आहे.

भाजीपाला उतरला

फळभाजीपाल्यासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरांमध्ये सरासरी १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. वांगी, टोमॅटो वगळता सर्वच फळभाज्यांचा दर सरासरी ४० रुपये किलो झाला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून गवार आणि दोडक्याचा दर ८० रुपयांवर स्थिर राहिला होता. मात्र, या आठवड्यात गवार व दोडक्याचा दर दुप्पटीने कमी होऊन ४० रुपये झाला आहे. चाकवत, पोकळा, मेथी, पालक या भाज्यांचेही दरही कमी झाले आहेत. पालेभाज्यांची जुडी दहा रुपयाला दोन मिळत आहेत.

फळे (दर किलोचे, रुपयांत)

चिकू - २०

सफरचंद - १००

संत्री - २०-५०

मोसंबी - ५०

डाळिंब - ५०-१२०

रामफळ - १००

फळभाज्या

वांगी - २०

कारली - ४०

भेंडी - ४०

दोडका - ४०

काकडी - ४०

टोमॅटो - १०

मसाले

धने - १४०

तिळ - १६०

जिरे - २००

खोबरे - १६० ते २००

मसाल्याचे दर (प्रति शंभर ग्रॅम)

दालचिन - ४०

लवंग - १२०

मिरे - १२०

मसाला वेलदोडे - २२०

रामपत्री - १००

खसखस - १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या बैठकीतून महाडिक बाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कुणाला मदत करायची याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर मते व्यक्त करायला कार्यकर्त्यांनी नकार दिल्याने खासदार महाडिक यांना बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याबाबतचे सर्वाधिकार आमदार हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.

'गोकुळ'बाबत सत्ताधारी नेत्यांना भेटल्यानंतर फार काही आश्वासक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विरोधी गटाकडे चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची ताराबाई पार्कातील कार्यालयात बैठक झाली. खासदार धनंजय महाडिक, आमदार मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण खासदार महाडिक यांच्यासमोर मते व्यक्त करण्यास काहींनी स्पष्ट नकार दिला. काही कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ लागल्याने अखेर महाडिक यांनाच बैठक सोडून बाहेर जावे लागले.

त्यानंतर आमदार मुश्रीफ यांना सर्वाधिकार देण्यात आले. मुश्रीफ यांनी सर्व इच्छुकांचे माघारीचे अर्ज स्वतःकडे घेतले असून, त्यावरील निर्णय ८ एप्रिलला जाहीर करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे मुश्रीफ यांच्या निर्णयाबाबतही संदिग्धता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांच्यासमोर मत व्यक्त करण्यास नकार दिल्याने गोकुळसाठी महाडिक यांच्यासोबत जाण्यास कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचेही स्पष्ट होत आहे.

दरम्यान, 'गोकुळ'साठी घडामोडींना वेग आला आहे. रविवारी प्रा. संजय मंडलिक यांची रुईकर कॉलनीतील घरी गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्ते तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांनीही भेट घेऊन अंतिम निर्णय दोन दिवसांत कळवित असल्याचे सांगितले. सत्ताधारी आमदार महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांचीही दिवसभरात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी आणि राजारामपुरीतील घरी भेट घेतली.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत 'गोकुळ'बाबत कार्यकर्त्यांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या. याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांना सर्वाधिकार दिले आहेत. आपल्याला काही कामानिमित्त बैठकीआधी बाहेर पडावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर मते व्यक्त करण्यास नकार दिला असा प्रकार घडलेला नाही.

- धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सचा शहरात धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साने गुरूजी वसाहत परिसरात चोरट्यांनी तीन महिलांचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवारी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या परिसरात या घटना घडल्या. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले असून दुपारी आणि रात्री पोलिसांची गस्त कमी झाल्याने चोरट्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे.

राजोपाध्येनगरातील विद्या हनुमंत नलवडे (वय ३०, रा. इंदिरा पार्क) या परिसरातील जोतिबा मंदिरात महाप्रसादाला गेल्या होता. तेथून त्या घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील चोरट्यांनी विद्या यांच्या गळ्यातील सोन्याचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दुसऱ्या घटनेत राजोपाध्येनगर येथील पूजा महेश किल्लेदार या घरी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील आठ तोळ्यांच्या मंगळसूत्राला हिसका मारला. मात्र पूजा यांनी मंगळसूत्र पकडले. या झटापटीत चोरट्यांच्या हातात मंगळसुत्राचा एक तोळ्यांचा भाग राहिला. पूजा यांच्या हातात सात तोळ्यांचे मंगळसूत्र राहिले. त्यांनी आरडाओरड केला पण चोरटे पळून गेले.

सानेगुरूजी वसाहतीतील देशमुख हायस्कूलनजीकच्या विमल शंकर रंगावले (वय ६५, रा. पोवार कॉलनी) या काही कामानिमित्त रविवारी दुपारी येथील रावजी मंगल कार्यालयाजवळ आल्या होत्या. तेथून त्या परतत असताना मोटारसायकलवरून दोन तरूण आले. त्यांनी विमल यांना सीआयडी असल्याचे सांगून गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे चिताक काढण्यास सांगितले. ते पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने लंपासही केले.

रथोत्सवावेळी सोन्याची माळ चोरीस

महाद्वार चौकात शनिवारी रथोत्सव पाहण्यास गेलेल्या आनंदी नारायण पठाडे (रा. पापाची तिकटी) यांची तीन तोळ्यांची सोन्याची माळ चोरटयांनी लंपास केली. दरम्यान, रथोत्सवावेळी मिरजकर तिकटी येथे भूषण बाळकृष्ण पाटील (वय १९, रा. विक्रमनगर) यांचा मोबाइल चोरताना सूरज उदय बागडे (१९) आणि उदय गोपाळ देवपुजे (१८) या दोघा चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसाय परवान्यांची धांदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सुविधा घ्यायच्या, व्यवसाय थाटायचा पण व्यवसायची नोंदणी करायची नाही, परवान्याचे नूतनीकरण पुढे ढकलायचे अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी ३० एप्रिलपर्यंत व्यवसाय परवाना नूतनीकरण घेण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. व्हॅट क्रमांक असलेल्या व्यावसायिकांनीही व्यवसाय परवाना व नूतनीकरण करणे बंधनकारक असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मुदतीत परवान्याचे नूतनीकरण करून घेतले नाही तर परवाना फीच्या दहा टक्के विलंब शुल्क आकारले जाणार आहेत. महापालिकेच्या परवाना विभागाकडील नोंदीनुसार शहरातील व्यवसायधारकांची संख्या ८००० हून अधिक आहे. या व्यावसायिकांनी दरवर्षी व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण बंधनकारक आहे. जनरलमध्ये ७१ व्यवसायांचा समावेश आहे.

यामध्ये वाइन्स, बिअरबार परमीट रूम, मोबाईल टॉवर्स, मंगल कार्यालये, मल्टी पर्पज हॉल, दुचाकी तीन चाकी चारचाकी वाहनांची शो रूम्स, सर्व प्रकारचे हार्डवेअर वस्तू, लोखंडी स्टील, पोलादी वस्तू, कटलरी, नॉव्हेल्टी, रेडीमेड कापड दुकान, होजिअरी दुकानांचा समावेश आहे. वीजेवर चालणाऱ्या व्यवसायात इंडस्ट्रीज, साबण कारखाने, वर्कशॉप, छपाई, सिनेमा थिएटर आदींचा समावेश आहे. महापालिकेने २०१३ नंतर महापालिका शुल्कात वाढ केली नाही. व्यवसायावर आधारित परवाना शुल्क ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यत आहे.

विनापरवाना व्यवसाय तेजीत

महापालिकेच्या अधिनियम ३७६मधील तरतुदींनुसार व्यवसाय परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र शहरातील विविध भागात महापालिकेची परवानगी न घेता बिनधिक्कतपणे व्यवसाय सुरू आहेत.अनेक प्रकरणात महापालिकेतील काही कर्मचारीच अशा व्यावसायिकांना पाठीशी घालतात. अर्थपूर्ण वाटाघाटीमुळे कारवाई केली जात नाही. तर व्यावसायिक नगरसेवकांच्या पाठबळावर विना परवाना व्यवसाय करत आहेत. प्रशासनाने कारवाई सुरू केली तर स्थानिक नगरसेवक आडवे पडतात. नगरसेवकांचा हस्तक्षेप आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडत आहेत. महापालिका प्रशासन दर वर्षी मार्च एडिंगला व्यवसाय परवाना संदर्भातील कारवाई हाती घेते. आर्थिक वर्षारंभीच विनापरवना व्यवसायिकांच्या विरोधात बडगा उगारला तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.

जर एखाद्या व्यावसायिकाने विलंब शुल्काच्या कालावधीतही नूतनीकरण केले नाही, परवाना घेतला नाही तर ​महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदींनुसार विनापरवाना व्यवसाय म्हणून अशा व्यवसायांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- दिवाकर कारंडे, परवाना अधिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images