Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

मागील काही दिवसांपासून खासदार उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने मंगळवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दुपारी रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर सातारा शहरात तणाव वाढला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटणमध्ये जाऊन पाणीप्रश्नावरुन रामराजेंचे टीका केली होती. विधान परिषदेचे सभापतीपद मिळवल्यानंतर फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रामराजे यांनी उदयनराजेंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शाब्दिक हल्ला चढवला होता.

मंगळवारी उदयनराजे दिल्लीहून साताऱ्यात आल्यानंतर रामराजेंच्या थिल्लर वक्तव्यांचा निषेध केला. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. परंतु, कार्यकर्ते विश्रामगृहावरुन दुपारी साडे चारच्या सुमारास थेट पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले. या वेळी कार्यकर्त्यांनी रामराजेंसह त्यांच्या दोघा बंधूंवर पोलिसांसमोरच जहरी टीका केली. कार्यकर्ते या ठिकाणी रामराजेंचा पुतळा दहन करणार म्हणून, या ठिकाणी शेकडो पोलिस बंदोबस्तासाठी आले होते. पण, काही कार्यकर्त्यानी गनिमी काव्याने अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या घटनेमुळे पोलिसही चांगलेच गांगरुन गेले, त्यांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पुतळा दहनप्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेऊन जामिनावर सोडून दिले. उदयनराजे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष्य घालावे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शॉटसर्किटमुळे तीन घरे जळाली

$
0
0

सातारा : आसनी तळ (ता. जावली) येथे सोमवारी रात्री पावसाने झालेल्या शॉटसर्किटमुळे तीन रहात्या घरांना आग लागून ५ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मोठे नुकसान झाल्याने तीन कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने शार्टसर्किटने आग लागली. तत्काळ आगीने भीषण रूप धारण केले. एकमेकांना चिकटून असलेल्या तीन घरांना आगीने व्यापले. आगीत कांताबाई विजय धनावडे यांचे येथे किराणा मालाचे दुकान नारायण काशिनाथ भिलारे आणिर नंदा लक्ष्मण भिलारे यांचे घर जळाले. परिसरातील ग्रामस्थ, युवकांनी कोणतीही पर्वा न करता. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सरपंच विष्णू धनावडे यांनी मोठ्या धाडसाने गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने व आनंदा शेलार यांनी तातडीने वीज प्रवाह बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवसात हजारावर बिले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्षातील मंजूर निधीच्या खर्चाची बिले सादर करण्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा कोषागार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. मंगळवारी एका दिवसात विविध सरकारी कार्यालयांतील एक हजारहून अधिक बिले सादर करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदा सायंकाळी सातपर्यंत बिले स्वीकारण्याची जाहीर केलेली मुदत रात्री दहा वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. याशिवाय काही सरकारी कार्यालयांमध्ये शेवटच्या टप्प्यात आलेला निधी खर्च टाकण्याकरिता बिले तयार करण्याचीही गडबड सुरू होती. शेवटच्या टप्प्यात एक कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंडळाकडे वर्ग झाला.

२०१४-१५ या आर्थिक वर्षातील ३१ मार्च या शेवटच्या दिवसापर्यंत बिले देण्यासाठी कोषागारमध्ये गर्दी झाली होती. राज्य पातळीवर काही खात्यांमध्ये शेवटच्या दिवशी निधी वर्ग होतो. हा निधी २०१५ मध्येच खर्च पडण्याची आवश्यकता असल्याने त्यादिवशी बिले कोषागार कार्यालयात सादर करून त्यांच्याकडून हा निधी खर्च केला जाणे आवश्यक असते. त्यानुसार दिवसभर विविध खात्यांतील बिले सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात गर्दी झाली होती. ​शहरात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांतील २२७ अधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. ती बिले ३१ मार्चच्या आत कोषागार कार्यालयात जमा करणे आवश्यक असते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत एक हजारहून जास्त बिले सादर झाली होती.

शेवटच्या दिवशी गर्दी होण्याच्या शक्यतेने जिल्हा​धिकाऱ्यांनी बिले स्वीकारण्यास सायंकाळी सातपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर हीच मुदत रात्री दहापर्यंत वाढविण्यात आली. बिले सादर झाल्यानंतर तो निधी संबंधित खात्यावर वर्ग करण्याची आवश्यकता असल्याने स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेला रात्री अकरापर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारकडून अनेक खात्यांकडे शेवटच्या दिवशी काही निधी वर्ग होतो. हा निधी त्या दिवशीच खर्च पडण्यासाठी यावेळी बिलधारकांना धनादेश देण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार हे धनादेश ३१ मार्चलाच खर्च टाकण्यासाठी बँकेत जमा करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींना शुक्रवारी डोंगरावर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जोतिबा यात्रेला भाविकांची गर्दी व पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जोतिबा डोंगरावर शुक्रवारी (ता.३) सर्व दुचाकी वाहनांना डोंगरावर बंदी घालण्यात आली आहे. दानेवाडी क्रॉसिंगजवळ दुचाकी अडवण्यात येणार असून भाविकांसाठी केएमटी बसेसची सोय केली आहे.

यात्रेदिवशी सर्व मोटार वाहने केर्ली व कुशिरे फाट्यामार्गे जोतिबा डोंगरावर जातील. जोतिबा डोंगरावरून वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ, गिरोली मार्गे कोल्हापूर व इतर मार्गावर जातील. वाघबीळ व शाहूवाडीकडून येणारी वाहनेही केर्ली मार्गेच येतील असे शहर वाहतूक पोलिस शाखेने स्पष्ट केले आहे. एक एप्रिलपासून कोल्हापूर ते बोरपाडळे मार्गावर जड व अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. रत्नागिरीकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनी बोरपाडळे फाटा, कोडोली, वाठार व राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा.

पार्किंग व्यवस्था अशी

१) यमाई मंदिराजवळ दोन्ही बाजूस चारचाकी वाहने. २) मेन पार्किंगः लक्झरी, मिनी बस व ट्रक. ३) ग्रामपंचायत पार्किंगः चारचाकी. ४) ट्रक पार्किंग. ५) नवीन एसटी स्टॅडसमोर व परिसरः चारचाकी. ६) यात्री निवास समोरः राखीव. ७) यात्री निवास आतील परिसरः दुचाकी. ८) तळ्याच्या सभोवतालचा परिसरः चारचाकी. ९) नवीन एसटी स्टॅडसमोर व मागील पठारः चारचाकी. १०) दानेवाडी क्रॉसिंग (जुने अंब्याचे झाड परिसर) दुचाकी. ११) शेवताई मंदिर परिसरः चारचाकी. १२) गिरोली फाटा ते दानेवाडी रोड परिसरः दुचाकी/चारचाकी व इतर सर्व प्रकारची वाहने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची आबाळ संपता संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट परिसरातील व्यावसायिकांकडून महापालिकेला दरमहा कोट्यवधी रुपयांच्या कराचा भरणा होतो. मात्र या परिसरात पायाभूत सुविधांची वानवा आहे. रस्ते आणि गटर्सची देखील सोय नाही. खराब रस्त्यामुळे या भागातून वाहने चालविताना व्यावसायिक आणि ग्राहकांचे कंबरडेच मोडत आहे. गटर्स व्यवस्थित नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. टिंबर मार्केट व्यावसायिकांनी येथील पायाभूत सुविधांसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवले, पण प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हात आखडता घेतला आहे.

'टिंबर मार्केट परिसरात १५० व्यावसायिक आहेत. सॉ मिल, लाकूड विक्री, प्लायवूड असे बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री होते. येथील व्यावसायिक घरफाळा, व्यवसाय परवाना, एलबीटी अशा विविध स्वरुपातील मिळून दरवर्षी अंदाजे पाच कोटी रुपयांचा महसूल भरतात. सॉ मिल, टिंबर असे दोन प्रकारचा व्यवसाय परवाना फी भरतात. मात्र गेल्या चाळीस वर्षात या भागातील रस्तेच संपूर्णता तयार केले नाहीत' असे छत्रपती राजाराम टिंबर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी सांगितले.

प्रशासनाने भागातील रस्ते आणि गटर्सची सोय करावी यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी व स्थानिक नगरसेविका यशोदा मोहिते यांनी अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. त्यांना भागातील समस्या सांगितल्या. सुविधा न दिल्यास महापालिकेकडे कराचा भरणा करणार नाही, त्याच रक्कमेत सुविधा करून घेऊ असे असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांना सांगितले. शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती आदिल फरास यांची भेट घेतली. ​शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष देशमुख, हरिभाई पटेल, किसन पटेल, जयंती पटेल आदींचा समावेश होता.

कचऱ्याची दुर्गंधी

राजाराम चौकातून राजकपूर पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर राजाराम चौकातील रस्त्यालगच लहान मुले उघड्यावर शौचास बसतात. कचरा टाकण्यासाठी येथे कोंडाळा आहे, पण कचरा उठाव नियमितपणे केला जात नाही. परिणामी कचरा रस्त्यावर पसरलेला असतो.

टिंबर मार्केट परिसरात रस्ते, गटर्सच्या उपलब्धतेसाठी साठ लाख रुपये निधी मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या वर्षी २५ लाखाची तरतूद करूनही निधी मंजूर झाला नाही. गतवर्षीचे २५ लाख आणि यावर्षी ३५ लाख रुपयांचा एक​त्रित निधी मागितला आहे.

- यशोदा मोहिते, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात लवकरच टपाल खात्याचे ‘ATM’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

टपाल खात्याच्या बचत बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांसाठी रेल्वे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयाच्या आवारात लवकरच एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची इमारतही बांधून पूर्ण झाली आहे. त्यामुळे टपाल खात्याच्या ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी रांगेत न उभारता एटीएममधून तत्काळ पैसे काढणे सोपे जाणार आहे.

खासगी बँकांकडून नागरिकांना सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे टपाल खात्याकडे असलेले खातेदार खासगी बँकांकडे वळू लागल्यामुळे टपाल खात्याच्या आर्थिक उलाढालीवर थेट परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे बँकांबरोबर स्पर्धा करण्याच्या अनुशंगाने टपाल खात्याने एटीएम सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील टपाल कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार मुख्य टपाल कार्यालयाच्या परिसरातील जागेत एटीएम सुरू करण्यासाठी परिपूर्ण इमारत बांधून तयार ठेवण्यात आली आहे.

१६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षा

गळकी इमारत, रंगाचा झालेला बेरंग, जुन्या कौलारुच्या इमारती, ठिकठिकाणी लागलेल्या जाळ्या, असे काहीसे चित्र सोलापुरातील टपाल कार्यालयाचे होते. परंतु, टपाल खात्याने आता कात टाकली असून, कार्पोरेट लूक आला आहे. कार्यालयात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. टपाल कार्यालय कात टाकत असले तरी कामकाजासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची गरज असते. जवळपास ६० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच एक मोटार बंद पडली आहे.

असा होईल उपयोग

एटीएम सेंटरचा वापर बचत खाते, रिकरिंग खाते, पीपीएफ आणि मुदत ठेवींच्या बचत योजनांसाठी खातेदारांना करता येणार आहे. या खात्यांमधील रक्कम एटीएम सेंटरमधून काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अन्य खात्यांसाठी एटीएम सेंटरचा वापर करता येणार नाही. एटीएम सेंटर सुरू झाल्यानंतरच खातेदारांना एटीएम कार्ड देण्यात येणार असून, वरिष्ठ पातळीवरुन आदेश येताच त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने सुप्रीम कोर्टात जावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

चंद्रभागा वाळवंटात राहुट्या टाकण्यास वारकरी संप्रदायाला मुंबई हायकोर्टाने मज्जाव केल्याच्या विरोधात वारकरी संप्रदायाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. चैत्री एकादशीच्या दिवशीच प्रशासनाच्या विरोधात मोठा मोर्चा काढून वारकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. एकादशी दिवशी दिंड्या विविध ठिकाणांहून विठ्ठल मंदिराकडे येतात. मंगळवारी मात्र उलटे झाले, विठ्ठल मंदिरापासून निघालेल्या वारकऱ्यांच्या भव्य मोर्चाने थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक मारली.

विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वारापासून सुरू झालेल्या मोर्चात अनेक वारकरी नेते, फडकरी, दिंडीकरी सामील झाले होते. वर्षातून किमान १५ दिवस तरी वारकरी संप्रदायाला आपल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरा जतन करण्यासाठी वाळवंटात राहुट्या टाकण्यास परवानगी मिळावी आणि यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात वारकऱ्यांची बाजू मांडवी, अशी मागणी वारकऱ्यांची आहे. मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच तसे निवेदन दिल्याचेही वारकरी नेत्यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी दोन वाजता ४१ अंशसेल्शिअस तापमान होते. इतके कडक्याचे ऊन असतानाही हजारो वारकरी पश्चिम दरवाजाजवळ जमले होते. येथून हरिनामाचा गजर करीत हा मोर्चा चौफाळा, शिवाजी चौक, स्टेशन रोडमार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. येथे काही काळ वारकऱ्यांनी भजने म्हणून हा परिसर दणाणून सोडला.

अशा आहेत मागण्या

आमच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी आम्हाला वाळवंटात ऊन-पावसापासून संरक्षणासाठी राहुट्यांची गरज असते. आमच्या पालख्या आणि पादुकांना निवारा करणे गरजेचे असते. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊन आमची बाजू योग्य रीतीने मांडावी. वर्षात किमान १५ दिवस तरी वाळवंटात राहुट्या बांधण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठरावाआधीच मंत्रालयवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवक रद्द करावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महापालिका सभागृहाने महापौर माळवी यांच्यावर कारवाई करावी असा ठराव बहुमताने मंजूर केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी पोलिस कारवाई झालेल्या महापौर माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही सरकारने करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटले. दरम्यान, ठराव अद्याप महापौरांच्या कार्यालयात स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहे.

शिष्टमंडळात पदाधिकारी आणि कारभारी महापौरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आघाडी प्रयत्नशील आहे. महापौरांनी राजीनाम्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर प्रकियेतंर्गत कारवाई व्हावी याकरिता आघाडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, परिवहन समिती सभापती अजित पोवार, विरोधी पक्ष नेता मुरलीधर जाधव, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, गटनेते शारंगधर देशमुख, राजू लाटकर, सचिन चव्हाण, प्रा. जयंत पाटील आदींचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापालिकेतील पदाधिकारी आणि कारभाऱ्यांचा समावेश होता.

ठराव अद्याप स्वाक्षरीसाठी महापौर कार्यालयातच

नैतिक अध:पतनच्या कारणाखाली महापौर माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारा सदस्य ठराव महापालिका सभागृहाने बहुमताने मंजूर केला आहे. सभागृहाने मंजूर केलेला सदस्य ठराव महापौर माळवी यांच्याकडे सहीसाठी पाठविण्यात आला आहे. महापौरांची सही झाल्यानंतर आयुक्त कार्यालयाकडे ठराव सादर होतो. त्यानंतर प्रशासनाकडून राज्य सरकारकडे शिफारस करणारा ठराव सादर केला जातो. दरम्यान सभागृहाने मंजूर केलेल्या सदस्य ठरावावर अद्याप महापौरांनी सही केली नाही.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील अनुपस्थित

काँग्रेसच्या नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना मुंबईला येण्याचे व मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणण्याची ग्वाही दिली होती. मात्र नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले त्यावेळी पालकमंत्री त्यांच्यासोबत गेले नाहीत. आमदार महादेवराव महाडिक समर्थक नगरसेवक महापौरांच्या पाठीशी आहेत. महापौरांनी राजीनामा देऊ नये याकरिता महाडिकांचे कारभारी पडद्याआड राहून सूत्रे हलवित आहेत. महाडिक आणि पालकमंत्री पाटील यांचे सख्य आहे. यामुळे मुख्यमंत्री भेटीवेळी पालकमंत्री गैरहजर राहिल्याची चर्चा नगरसेवकांत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिरती स्वच्छतागृहे हवीतच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर शुक्रवारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व यात्रा कमिटी अध्यक्ष रमेश रिंगणे उपस्थित होते. तहसीलदार हनुमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

बैठकीत महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नरळे यांनी प्राणी संघटनांसह संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन शहरातील मोकाट कुत्री व भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. राजेंद्र तारळे यांनी त्यांना जंगल परिसरात सोडावे अशी सूचना केली.

तहसीलदार पाटील म्हणाले, 'यात्रेच्या निमित्ताने बळी देण्याची प्रथा असून मोठ्या संख्येने बोकडाची कत्तल होणार आहे. सरसकट प्राण्यांची तपासणी करणे व्यावहारीकदृष्ट्या शक्य नसल्याची जाणीव नागरिकांनी प्रशासनाला करून दिली. या सर्व प्रकारामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घेण्याची आहे. मात्र कत्तलखाना असलेल्या ठिकाणी आरोग्य निरीक्षकाच्या उपस्थितीत कत्तल व्हावी व प्रमाणित मटण मिळावे अशी सूचना जगदीश पाटील यांनी केली. त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाने मान्य केले.

नगरपालिकेकडे काम करणारे स्थानिक कर्मचारी यात्रा कालावधीत सुटीवर असतील. त्यामुळे यात्रा कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने पालिका प्रशासनाने ठेका पध्दतीने बाहेरून मागविलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. १५ एप्रिलपासून नवीन कर्मचारी हजर होणार असून शहरात एकूण सात बीट करण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

शहरात सुमारे २७९ सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. मात्र भाविकांची गर्दी लक्षात घेता वैयक्तिक व सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी अशी सूचना नागरिकांतर्फे करण्यात आली.

वेस्टबॅग वाटप करणार

शहर आणि परिसरात कीटकांचा त्रास होऊ नये यासाठी औषध फवारणी तसेच कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीतीने व्हावी यासाठी पालिकेमार्फत 'वेस्टबॅग' वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी नरळे यांनी दिली. यावेळी विजेचा अपव्यय टाळावा यासाठी यात्रा कालावधीत घराला लायटिंग करू नये असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा चुकवून पाहिला पन्हाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकमेकांच्या घराशेजारी राहणारे ते दोघे मंगळवारी सकाळी शाळेला जायला बाहेर पडले. मुलग्याकडे दहा रुपये तर मुलीकडे १५ रुपये होते. दोघांनी शाळेत न जाता पन्हाळा किल्ला पहायचे ठरवले. शाळेच्या दप्तरासह ते रेल्वे स्टेशनजवळील बस स्थानकाजवळ गेले. अर्धे तिकीट काढून ते पन्हाळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. पन्हाळ्यावर या दोघांना पर्यटन सुरु केले, परंतु पन्हाळ्यावर आलेल्या एका अन्य सहलीतील शिक्षकांना ही मुले आपली नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकरवी या मुलांच्या शाळेत माहिती कळवली.

पालकांनाही जेव्हा आपले मुले शाळेत नाहीत असे समजले तेव्हा त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. गेले काही दिवस शहरात बालके अपहरणाच्या घटना ऐकून हादरलेल्या या पालकांच्या मनात पाल चुकचुकली. परंतु मुले सुरक्षित असल्याचे समजले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.

घटनेची हकीकत अशी की, शाहूपुरीतील एका गल्लीत सहावीत शिकणारा मुलगा आणि मुलगी शेजारी राहतात. शेजारच्या शाळेत ते शिकतात. मंगळवारी दोघांनी शाळा न पाहता पन्हाळा पाहायचे ठरवले. एसटीने त्यांनी पन्हाळा गाठला. पन्हाळ्यात एका शाळेची सहल आली होती. त्या सहलीत दोघे सहभागी झाले. सहलीसमवेत त्यांनी निम्मा गड पाहिला.

दरम्यान या सहलीतील शिक्षकाचे लक्ष या मुलांकडे गेले. त्यांनी दोघांकडे चौकशी केली, पण दोघेही काहीही बोलले नाहीत. शिक्षकांना अपहरणाची शंका आल्याने त्यांनी पन्हाळा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना ताब्यात दिले. पोलिसांनाही त्यांनी काही सांगितले नाही. दप्तर तपासल्यावर दोघांच्या शाळेचा व पालकांचा पत्ता मिळाला. पोलिसांनी पालक व शाळेशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची माहिती दिल्यावर शाळेत व पालकांत खळबळ उडाली. तोपर्यंत मुलांच्या अपहरणाची अफवा उठली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालक व त्यांच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. पन्हाळा पोलिसांनी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर पोलिस व पालकांनी मुलगा व मुलीला विश्वासात घेऊन माहिती घेतल्यावर अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुस्कारा सोडला. दरम्यान, शाळांमध्ये याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांबाबत संपर्क साधणे आवश्यक

अनेक शाळांमध्ये गैरहजर पालकांशी संपर्क साधून विद्यार्थी शाळेत का आला नाही याची कारणे विचारली जातात. पण अनेक शाळेत दुर्लक्ष केले जाते. शाळेतील वर्गशिक्षकांकडे विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक असतात. दरदिवशी एक किंवा दोन विद्यार्थी गैरहजर असतात. अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांनी गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर RTO कॅशलेसच्या दिशेने

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) येऊन शुल्क भरण्याची प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. त्याऐवजी एक जूनपासून बँकेचे चलन किंवा ई पेमेंटची पद्धत अवलंबण्यात येणार आहे. नव्या पद्धतीनुसार ३०० रुपयांपर्यंतचे शुल्क कार्यालयात रोखीने स्वीकारण्यात येणार आहे. उर्वरित शुल्क स्वीकारण्यासाठी बँक आणि इतर पर्यायांचा विचार सुरू आहे.

आरटीओ कार्यालयामध्ये शिकाउ परवान्यापासून विविध प्रकारच्या कामांसाठी शुल्क आकारले जाते. ते स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. वाहनांच्या रजिस्ट्रेशनवेळी टॅक्स भरण्याची आवश्यकता असल्याने ते शुल्क कंपन्यांचे डीलर भरतात. कोट्यवधी रुपयांचे शुल्क आरटीओ कार्यालयात जमा होत असते. त्याची सुरक्षितता, बनावट नोटांची काळजी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठरावीक वेळेतच शुल्क भरून घेतले जात असल्याने लांबलचक रांगेत उभे राहण्याचा होणारा त्रास यामुळे शुल्क भरण्याची पद्धत त्रासदायक आहे. हा बोजा कमी करण्यासाठी परिवहन विभागाने रोख पैसे घेण्यापेक्षा ई पेमेंटवर भर द्यायला सुरुवात केली आहे. डीलरकडून जमा होणारे शुल्क ई पेमेंटमधून करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक कार्यालयांमध्ये अजूनही ई पेमेंट पद्धतीचा अवलंब केला जात नाही. सध्या पहिल्या टप्प्यात एकूण महसुलापैकी किमान ४५ टक्के तरी महसूल ई पेमेंटद्वारे व्हावा, असे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरात गव्हर्न्मेंट रिसीट अकाउंटिंग सिस्टमचा (ग्रास) अवलंब यापूर्वी केला असल्याने जवळपास ५० टक्के महसूल ई पेमेंट पद्धतीने जमा झालेला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेशी सहयोग

ई पेमेंटद्वारे शुल्साक वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेसोबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी तिथे काही स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल का याची चर्चा सुरू आहे. आरटीओमध्ये कॅशलेस कामकाज सुरू झाल्यानंतर तेथील गर्दीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ते फायदेशीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे भोसलेंनी तोफ डागली

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

उन्हाचा पारा चढू लागलाय तसं निरेच्या पाण्यावरून साताऱ्यातलं राजकारण तापू लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षातील नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना लक्ष्य करत हल्लाबोल केला आहे.

'पाऊस नाही, धरणांमध्ये-कालव्यांमध्ये पाणी नाही म्हणून मग काय ... का?' हे वादग्रस्त वाक्तव्य सांगत उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे नेते अजित पवारांवर टीका केली. 'लोकांना पाणी मिळत नाहीए. पाण्यापासून लोकं वंचित आहेत आहे. आणि रामराजे नाईक निंबाळकर म्हणातात की मी निरा-देवघर कोळून प्यायलो. हो..ते निरा-देवघरचं पाणी कोळूनच प्यायलेत. एवढं प्यायलेत की काही शिल्लकच ठेवलं नाही. त्यांच्या डोक्यात ग्लास, बाटली आणि गटरचं का?' असा सवाल उपस्थित करत उदयनराजेंनी रामराजेंना टार्गेट केलं.

'मालोजीराजेंनी दूरदृष्टी ठेवून लोकांसाठी कामं केली. लोकांचं हित जोपासलं. आणि ह्या रामराजेंनी काय केलं? त्यांनी आणि राजकारणातील त्यांच्या सहकारी बंधुंनी काय केलं. त्यांनी परमीट रूम उघडले. हे सभापती म्हणजे त्या परमीट रूमचे सभापती आहेत. त्या परमीट रूममध्ये होणारी जी सभा आहे, त्या सभेला त्यांनी मला निमंत्रित केलं. आणि मी जर गेलो नाही, तर एवढं चिडायचं काय कारणचं नाही ना. ज्या मार्गाने मला जायचं नाही तर त्या सभेला कसं जाऊ मी...',असं सांगत उदयनराजेंनी रामराजेंवर असा संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सा. रे. पाटील यांचे निधन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सहकार आणि राजकीय क्षेत्रात सात दशकांहून अधिक काळ सक्रिय असणारे ज्येष्ठ नेते डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील (वय ९४) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. मेंदूविकार व वृद्धापकाळाने त्यांच्यावर गेले महिनाभर बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पाटील यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

सा.रे. पाटील यांच्यामागे पत्नी कृष्णाबाई (वय ९०), बंधू अण्णासाहेब, पुत्र गणपतराव, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. 'सारे' यांच्या निधनामुळे सहकार, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व हरपल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

'सारे' यांनी २५ फेब्रुवारीला जांभळी हायस्कूलमधील स्काऊट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. २६ फेब्रुवारीला पहाटे त्यांची प्रकृती बिघडली. मेंदूतील संवेदना कमी झाल्याने दत्त कारखान्यावरील हॉस्पिटलच्या पथकाने जयसिंगपूर येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार केले. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना प्रथम मिरजेला व बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल हलविण्यात आले. पहिल्या आठ दिवसांत त्यांची प्रकृती कमालीची बिघडली होती. मात्र, त्यानंतर ते औषधोपचारांना प्रतिसाद देत होते. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आमटे दाम्पत्याला अहिंसा गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील शालिनीदेवी चिंतामणी कापसे मानवधर्म सेवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा भगवान महावीर मानवधर्म अहिंसा गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यावेळी ५१ हजार रूपयांचा निधी आमटे यांच्या प्राणी अनाथालयासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यात डॉ. आमटे यांच्या जीवनावरील डाक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहे. रविवार, ता. ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात ​दिग्दर्शिका समृद्धी पोरे, पत्रकार उत्तम कांबळे, भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील, सुनील माने यांचा सत्कार करण्यात येणार असून कमलाकर व वासंती किलकिले यांचा शाकाहार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार ​परिषदेला अॅड. महावीर ​बिंदगे, प​द्मीनी कापसे, प्रकाश उपाध्ये, शरद शेटे, अभिषेक मिठारी, अनुप भिवटे, दीपक शहा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन टोल दरवाढ तातडीने रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील टोलआकारणी​ अन्यायकारक आहे. टोलला हद्दपार करतानाच नव्याने केलेली टोल दरवाढ रद्द करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत केली. या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांनी सभागृहाच्या वेलमध्ये प्रवेश करत ठाण मांडले. त्याचबरोबर टोलविरोधी घोषणा देत सभागृहाचे लक्ष वेधले.

नव्या दराने टोलवसुली सुरू

कोल्हापुरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वानुसार रस्त्यांची बांधणी केली आहे. महापालिका, आयआरबी कंपनी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात त्रिस्तरीय करार झाला आहे. करारात दर तीन वर्षांनी दरवाढ करण्याची तरतूद आहे. त्यानुसार आयआरबीने एक एप्रिलपासून टोल दरात वाढ केली आहे. कार वाहनांसाठी पूर्वीइतकाच २० रुपये टोल आहे. मात्र मिनी बसेस, टेंपो या वाहनांसाठी पाच रुपयांची वाढ करत ३० रुपये केला. बसेस, ट्रकसारख्या वाहनांना ४० रुपयांचा टोल आता ५० रुपये केला आहे. अवजड वाहनांकरिता ५० रुपयांचा टोल ६० रुपये केला आहे. मासिक पासमध्येही वाढ झाली आहे. नव्या दरवाढीचा फटका मिनी बसेस, ट्रक अशा वाहनांना बसला असून पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. टोल दरवाढीच्या विरोधात वाहनधारकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरवाढ रद्दसाठी सरकार प्रयत्नशील

दरम्यान, आमदार क्षीरसागर व नरके यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'खासगी चारचाकी वाहनांचा टोल रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. रस्ते विकास प्रकल्पातील त्रिसदस्यीय करारानुसार दर तीन वर्षांनी दरवाढ करण्याची तरतूद आहे. त्यानुसार दरवाढ झाली आहे. कोल्हापूर शहरातील टोलसंदर्भात चर्चा सुरू आहे. टोल दरवाढ रद्द करण्याबाबत सरकार प्रयत्न करेल. लवकरात लवकर कोल्हापूर टोलमुक्त करून शहरवासीयांची या प्रश्नातून सुटका करण्याची ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भलिंग चाचणीकडे ‘आरोग्य’चे दुर्लक्ष

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणी केंद्रांवर चालणाऱ्या गैरप्रकाराकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी शहरातील बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकारानंतर स्त्री भ्रूण हत्येच्या चर्चेला बळकटी मिळू लागली आहे.

कोल्हापूर शहरातील मुलींचा जनन दर खालावल्यानंतर २००८ मध्ये जिल्हा प्रशासनाने स्त्री भ्रूण हत्या रोखणे, लोकांचे प्रबोधन करण्यावर भर दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यात दर हजारी मुलांच्या जन्माच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण फक्त ८३९ होते. तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'सायलंट ऑबर्झव्हर' ही संकल्पना अस्तित्वात आणली होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २५० हून अधिक सोनोग्राफी क्रेंदावर सायलंट ऑबर्झव्हर यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणत्या महिलेची तपासणी झाली याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूमला मिळत होती. जिल्हा परिषदेनेही लेक वाचवा मोहिमेअंतर्गत मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावे ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे अनुकरण अनेक सामाजिक संस्था, बँका व पतसंस्थांनी केले होते. सायलंट ऑबझर्व्हर यंत्रणेला प्रारंभी वैद्यकीय क्षेत्रातून विरोध झाला पण त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. दीड वर्षानंतर मुलींचा जन्मदर ८७६ पर्यंत पोहचला होता. या योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता पण त्याचा पाठपुरावा आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींनी न केल्याने सायलंट ऑबझर्व्हर ही यंत्रणा बंद पडली. राजस्थान सरकारने कोल्हापुरातील ही योजना पाच जिल्ह्यात सक्षमपणे सुरू ठेवली आहे.

सायलंट ऑबझर्व्हर ही यंत्रणा बंद पडल्याने जिल्ह्यातील सोनाग्राफी केंद्रांना रान मोकळे झाले आहे. 'इथे गर्भलिंग चाचणी केली जात नाही' असे फलक हॉस्पिटलमध्ये लावून मागील दाराने गर्भलिंग चाचणी करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर गर्भलिंग चाचणीसाठी सीमाभागातील निपाणी व सीमेवरील ग्रामीण भागाचा आधार घेतात. निर्मनुष्य वस्तीतही मोबाईल व्हॅनव्दारे गर्भलिंग चाचणी केली जात आहे. गर्भलिंग चाचणीला अटकाव करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व महानगरपालिका आरोग्याधिकारी यांच्या अध्यक्षेतखालील समिती करत असतात. त्यांनी वर्षभरात सोनोग्राफी क्रेंद्राला भेट देऊन रजिस्टर तपासणी करणे, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्टींग ऑपरेशन करण्याची जबाबदारी असते. पण या समितीच्या नियमित बैठका होत नसल्याची चर्चा सरकारी आरोग्य विभागात सुरू आहे.

पहिली मुलगी, दुसरा मुलगाच

एकाद्या दाम्पत्याला पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच हवा असा आग्रह कुटुंबाकडून होत असल्याने स्त्री भ्रूण हत्येचा पर्याय वापरला जात आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरातील कुटुंबेही स्त्री भ्रूण हत्येला बळी पडत आहेत. वैद्यकीय स्पर्धेतील तीव्र स्पर्धेमुळे गर्भलिंग चाचणी सरकारी अधिकाऱ्यांना मॅनेज करून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीने झाकोळतोय रथ

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चैत्री रथोत्सवातील चांदीच्या रथाचे सौंदर्य आणि शाही बाज रथावर दाटीवाटीने बसणाऱ्यांच्या गर्दीने झाकोळत आहे. मानाच्या श्रीपूजकांसह चोपदार, मशालजी यांच्यासह पाच श्रीपूजक रथावर बसावेत असा संकेत आहे. मात्र, रथातील देवीच्या उत्सवमूर्तीपर्यंत वाढणाऱ्या गर्दीमुळे रथावरील नक्षीकाम आणि सजावटही दिसत नाही. रथावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.

श्री जोतिबाची चैत्र यात्रा झाली की, दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव साजरा करण्याची परंपरा संस्थानकाळापासून आजतागायत पाळली जाते. जोतिबा यात्रेसाठी राज्यासह कनार्टक, आंध्रप्रदेश या भागातून येणारे भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्यांना कोल्हापूरच्या देवीचे वैभव दिसावे या हेतूने संस्थानकाळात ही परंपरा सुरू करण्यात आली.

महाद्वारातून निघणाऱ्या देवीच्या रथाची मिरवणूक गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, खासबाग, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे मंदिरात शाही थाटात काढली जाते. यावेळी भाविकांकडून उत्स्फूर्तपणे रथोत्सव मार्गावर फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या घातल्या जातात. हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी येतात.

दोन वर्षांपूर्वी देवीच्या रथोत्सवासाठी चांदीचा रथ तयार करण्यात आला आहे. संजय साडविलकर यांनी रथावर नक्षीकाम केले आहे. रथोत्सवासाठी फुलांसह विद्युत रोषणाईने हा रथ सजवण्यात येतो. रथाची उंची १२ फूट आहे. रथावर आरती धरण्यासाठी पाच श्रीपूजकांसह एक चोपदार आणि एक मशालजी यांचा मान असतो, पण केवळ रथावर बसण्याच्या हौसेखातर मंदिरातील स्वयंसेवक, कर्मचारी यांच्यासह काही श्रीपूजकांचे नातेवाईकही बसतात. रथावर अनावश्यक होणाऱ्या गर्दीमुळे रथाचे सौंदर्य तर लुप्त होतेच, पण त्याचबरोबर रथावर नाहक गोंधळ होतो.

विद्युत रोषणाईचाही अतिरेक

एकीकडे रथावरची गर्दी वाढत असताना रथाच्या सजावटीसाठी करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचाही अतिरेक होत आहे. रथाच्या पुढील बाजूस रोषणाई केली तर त्याचा प्रकाश भाविकांच्या डोळ्यावर पडल्याने रथाचे दर्शन व्यवस्थित होत नाही. मागील बाजूने लाइट लावले तर रथावर त्याची प्रकाशछाया पडते. त्यामुळे यावर्षी रथाच्या विद्युत रोषणाईतही बदल करण्याचा विचार होणे आवश्यक आहे.

पूर्वी लाकडी रथ होता, तर आता चांदीचा आहे. रथ बदलला तरी त्यावर होणाऱ्या गर्दीवर अद्याप नियंत्रण आलेले नाही. रथोत्सवात मिरवण्याची हौस असणारे रथाच्या दुसऱ्या टप्प्यावर येऊन बसतात. श्रीपूजकांनी अडवले तर त्यांना दाद दिली जात नाही. किमान पाच श्रीपूजक, चोपदार आणि मशालजी रथावर असणे आवश्यक असते. त्याव्यतिरिक्त अन्य लोकांकडून रथावर बसण्याचा आग्रह चुकीचा आहे.

- अजित ठाणेकर, श्रीपूजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फुलेवाडी’ समर्थकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएसएच्यावतीने छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या दसरा चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दिलबहार तालीम मंडळाच्या समर्थकांनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा समर्थक मनीष बोडेकरला बेदम मारहाण केली. यामुळे मैदानावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेने प्रेक्षकांमध्ये धावपळ होऊन अनेकजण किरकोळ जखमी झाले. प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्याने १६ वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. सामन्यानंतर फुलेवाडी समर्थकांनी दिलबहारचा खेळाडू करण चव्हाण-बंदरे याच्या फुलेवाडी येथील घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याने मनोज बोडके, ओंकार पाटील, वल्लभ जोशी, व दीपक यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी दिलबहार व फुलेवाडी संघांदरम्यान अंतिम सामना असल्याने दोन्ही संघाच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये मोठी गर्दी केली होती. सामन्यात दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतर फुलेवाडीच्या समर्थक मनीष बोडेकरने दिलबहारच्या समर्थकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे दिलबहारच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध झाला.

दरम्यान, फुलेवाडी येथील करण चव्हाण-बंदरेने दिलबहारकडून खेळताना हॅट्ट्रिकसह तीन गोल केले. मैदानावर झालेली मारहाण आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या करणच्या निवासस्थानासमोर शंभर ते दीडशे फुलेवाडी समर्थकांनी गर्दी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून करणला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे करणने त्यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून यामुळे फुलेवाडी येथेही प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

स्पर्धेच्या पहिल्या दिवसांपासून वादावादीचे प्रसंग घडले आहेत. मात्र याकडे केएसएसह पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आजच्या सामन्यावेळीही पोलिसांचा फौजफाटा मैदानाबाहेर तैनात होता. मात्र, मैदानात पोलिसांची संख्या कमी होती. पोलिस गॅलरीत येईपर्यंत सर्व समर्थक बाजूला गेले होते.

केएसएच्या कारवाईकडे लक्ष

सामन्यादरम्यान हुल्लडबाजी रोखण्यासाठी केएसएने प्रेक्षक गॅलरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून झालेली हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅमेऱ्यातील पुराव्यावरून केएसए कोणती कारवाई करणार याकडे फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आता विक्रमसिंह घाटगेंची मनधरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळच्या संचालकांशी न जमल्यामुळेच बाहेर पडून शाहू दूध संघाची स्थापना केली त्यामुळे आता गोकुळसाठी पॅनेल तयार करून निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मात्र, गोकुळमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी जे संधी देतील त्यांना मदत करण्याची भूमिका लवकरच घेऊ, असे मत विक्रमसिंह घाटगे यांनी व्यक्त केले. गोकुळमध्ये मदत करावी यासाठी सतेज पाटील यांनी भेट घेतली आहे. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही घाटगे यांनी सांगितले. सतेज पाटील यांच्यानंतर आता आमदार महादेवराव महाडिक हे देखील विक्रमसिंह घाटगेंची भेट घेणार आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घाटगे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, गोकुळच्या नेत्यांमध्ये लागलेली भांडणे सोडविण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. पण, भांडणे मिटविल्यानंतर त्यांनी आपल्यालाच बाजूला केले. त्यामुळे पुन्हा गोकुळमध्ये जाण्याची माझी इच्छा नाही. त्यासाठीच गोकुळच्या निवडणुकीत घाटगे कुटुंबातील कोणीही लढणार नाही, असा निर्णय आपण यापूर्वीच घेतला आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी गोकुळच्या वाढीमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्यासाठी गोकुळमध्ये आपल्याला काही जागा हव्या आहेत. याबाबत नेत्यांशी चर्चा सुरू असून जे संधी देतील त्यांना मदत करण्याची भूमिका घेणार आहे. याबाबत गोकुळच्या विद्यमान संचालक किंवा नेत्यांशी बोलणी झालेली नाही. मात्र, माजी मंत्री सतेज पाटील यांनी आपली भेट घेऊन गोकुळसाठी मदत करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी लवकरच निर्णय घेतला जाईल.

ते पुढे म्हणाले, गोकुळ आता एक सशक्त दूध संघ आहे. त्यादृष्टीने संघाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. सध्याच्या कारभाराबाबत कोणावरही टीका करावयाची नाही पण गोकुळला भविष्यात अधिक सक्षम व्हावे लागणार आहे. कोणाला संधी मिळते, कोणाला मिळणार नाही या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह इतरही पक्षांची भूमिका स्पष्ट होणार आहे. सध्या आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या विरोधात माजी मंत्री सतेज पाटील आणि विनय कोरे यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. कोणाच्या हाती किती उमेदवार लागतात यानुसार त्यांची रणनिती आणि आमचा सन्मान याचा विचार करूनच आम्हीही आमचा निर्णय जाहीर करू. मात्र, गोकुळसाठी आपले काही कार्यकर्ते निवडणुकीत भाग घेतील यात संशय नाही.

याबाबत आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, 'गोकुळ दूध संघाच्या घडामोडींबाबत विक्रमसिंह घाटगे यांच्याशी चर्चा करणार आहे. सध्या काही संचालक त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचेही स्थान महत्त्वाचे असल्याने आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका असल्यामुळे घाटगे यांचीही भेट घेणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराजे निंबाळकर परम‌िट रूमचे सभापती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'पाण्याशी माझा संबंध फक्त बाटलीपुरता येतो, असे म्हणणाऱ्या रामराजेंनीच परम‌िट रूम उघडले आहे, ते परमिट रूमचे सभापती आहेत' अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. रामराजेंचा भ्रष्टाचार आपण उघड करणार असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. पाण्याच्या मी नेहमी लोकहिताचे बोलत आलो आहे आणि कायम बोलत राहणार. भ्रष्टाचाराविरोधात मी आवाज उठवणारच. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच मालोजीराजे, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगण्याऐवजी ते मोदींचा जप करीत आहेत. लालदिव्याच्या गाडीसाठी आणि सत्तेसाठी सभापती रामराजे कोणाचीही हुजरेगिरी करतील,' असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुरुवातीलाच त्यांनी रामराजेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. सभापतिपदासाठी शरद पवारांची निवड चुकली आहे. त्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा. पवारांनी तातडीने बैठक घेऊन भ्रष्ट लोकांना पक्षातून हाकलावे, अन्यथा पक्षाच्या दुर्देवात आणखी भर पडेल. सभापती रामराजे यांनी नैतिकता मानून सभापतिपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा अधिवेशनात त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मांडू, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.‍

आम्हाला सांगतात पाण्याचा संबंध फक्त बाटलीपुरता येतो. परंतु, मी फलटणमध्ये गेलो असता लोकांनीच मला सांगितले रामराजेंनाच बाटली, ग्लास, गटार या शिवाय बोलता येत नाही. शरद पवारांनी भ्रष्ट लोकांची हकालपट्टी केली असती तर आज पक्षाची ही दुर्दशा झाली नसती. श्रीराम कारखाना त्यांना खासगी करायचा होता. परंतु, प्रशासक नेमला गेल्याने त्याचा डाव फसला. श्रीराम कारखान्याची जमीन विकून रामनगर वसवण्यात आले. परंतु, जमीन खरेदी करणारे यांचेच बगलबच्चे आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.

'सत्तेत असो अथवा नसो मी कायम जनतेच्या हिताचीच भूमिका मांडणार. बालिशपणाचे वक्तव्य सहन करणार नाही. मी कोणाचा अपमान करीत नाही आणि माझा अपमान झाला तर मी सहनही करत नाही. आतापर्यंत छत्रपतींसारखेच वागत आलो आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन केले. भ्रष्टाचारी लोकांची थडगी बांधण्यासाठी राजकारणात आलो नाही. जिल्ह्याला सभापतीपद मिळाल्याचा आनंद आहे. परंतु, निवड चुकीची आहे, असे माझे नाही तर बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. मी द्वेषापोटी कधीच आरोप करीत नाही आणि केलेलेही नाहीत. मी लोकांना मुजरा करायला सांगत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images